Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिकरोड रेल्वेस्थानकाची गटांगळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

देशभरातील स्वच्छ रेल्वेस्थानकांत दोन वर्षांपासून पहिल्या दहामध्ये असणारे नाशिकरोड स्थानक यंदा ६६७ गुणांसह १६९ व्या स्थानी फेकले गेले आहे. ओव्हरऑलमध्ये पहिल्या दहांत महाराष्ट्रातील फक्त अहमदनगर स्थानकाचा (चौथा) समावेश आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या रेल्वेस्थानक स्वच्छता थर्ड पार्टी आडिट रिपोर्टद्वारे ही स्थिती स्पष्ट झाली आहे. अहवालात ए वन गटात आंध्रचे विशाखापट्टणम देशातील सर्वांत स्वच्छ स्थानक ठरले आहे, तर अ गटात पंजाबच्या बिआसला प्रथम आणि खम्मामला दुसरा क्रमांक मिळाला. गेल्या वेळी खम्माम २८५ व्या स्थानी होते. झोनमध्ये साउथ ईस्ट सेंट्रल सर्वांत स्वच्छ झोन ठरला आहे.

रेल्वेने स्थानक स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी गेल्या वर्षीपासून थर्ड पार्टी क्लीनलीनेस इंडेक्स सुरू झाला आहे. त्यामुळे स्थानकांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा सुरू झाली आहे. रेल्वे कोच, रूळ, स्थानक, स्वच्छतागृह यांच्या स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. रेल्वेने क्लीन माय कोच सर्व्हिस सुरू केली आहे.

भारतीय रेल्वेचे जाळे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे जाळे आहे. त्यामध्ये ६६ हजार किलोमीटरचा मार्ग आणि आठ हजार रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर २०१४ रोजी स्वच्छ भारत अभियान सुरू केल्यानंतर भारतीय रेल्वेनेही स्वच्छ रेल अभियान सुरू केले. २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत स्वच्छ भारतचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.

--

क्यूसीआय टीमचा सर्वे

रेल्वेतर्फे देशातील स्थानक स्वच्छतेचा सर्वे केला जातो. गेल्या वर्षीपासून इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या पुढाकाराने थर्ड पार्टी आडिट सुरू झाले आहे. २०१५ च्या रेल्वे बजेटपासून रेल्वेस्थानक स्वच्छतेसाठी उपाययोजना सुरू झाल्या आहेत. रेल्वे स्थानकांमध्ये स्वच्छेतची स्पर्धा सुरू करणे, अस्वच्छतेची ठिकाणे शोधून उपाय योजणे हा त्यामागील उद्देश आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (क्यूसीआय) टीमने देशातील १६ रेल्वे विभागांतील ४०७ स्थानकांमध्ये यंदा सर्वे केला. त्यामध्ये ए वन गटात ७५, तर ए गटात ३३२ स्थानकांचा सर्वे झाला. पार्किंगमधील स्वच्छता, प्रवेशाचा मुख्य मार्ग, मुख्य स्थानक, वेटिंग रूम या सर्वांना ३३.३३, तर प्रवाशांच्या फीड बॅकला ३३.३३ टक्के वेटेज देण्यात आले. सर्वेसाठी चोवीस तासांचा नियंत्रण कक्ष स्थापन करून लक्ष ठेवण्यात आले. टीमच्या सदस्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. ४० विविध मुद्यांच्या आधारे त्यांनी प्रवाशांना प्रश्न विचारून स्थानकाला मानांकन देण्यास सांगण्यात आले. क्यूसीआयचा अंतिम अहवाल आल्यानंतर रेल्वे मंत्रालय स्वच्छतेच्या उपाययोजना करणार आहे.

--

तफावतीबाबत प्रश्नचिन्ह

याआधी झालेल्या पाहणीत नाशिकरोड स्थानकाला २०१५ मध्ये सहावा आणि २०१६ मध्ये सातवा क्रमांक मिळाला होता. आता थर्ड पार्टी ऑडिटमध्ये ओव्हरऑलमध्ये यंदा मात्र नाशिकला ६६७ गुणांसह १६९ वा क्रमांक मिळाला आहे. स्वच्छतेचे पॅरामीटर बदलले, की संस्था बदलली म्हणून ही तफावत निर्माण झाली, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. महिन्यापूर्वी नाशिक, इगतपुरी व अऩ्य स्थानकांचा सर्वे क्यूसीआयने केला होता असे नाशिकरोड रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

--

अहमदनगरची झेप

ओव्हरऑल रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील पाच स्थानके पहिल्या पंचवीसमध्ये आहेत. त्यामध्ये अहमदनगर (४), बडनेरा (११), रंगीया (१४), पुणे (१७) आणि अमरावती (२२) यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालचे दुर्गापूर पाचव्या, तेलंगणाचे मंचेरियल सहाव्या, सिकंदराबाद सातव्या, जम्मू तावी आठव्या, आंध्रचे विजयवाडा नवव्या, तर दिल्लीचे आनंदविहार दहाव्या स्थानी आहे. सविस्तर अहवाल http://www.railswachh.in या वेब पोर्टलवर उपलब्ध आहे.

०००
बजेट तब्बल १८०० कोटींवर!

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या बजेट मंजुरीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. बजेट मंजुरीसाठी येत्या २९ मे रोजी विशेष महासभा बोलावण्यात आली आहे. त्यात स्थायी समितीकडून महासभेला बजेट सादर केले जाणार असून, त्याच दिवशी त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. स्थायी समितीकडून बजेटमध्ये तब्बल ३८९ कोटींची वाढ सुचविण्यात आली असल्याने बजेट आता १७९९ कोटींवर पोहोचले आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात बजेटचा वनवास लवकर संपण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीमुळे महापालिकेचे बजेट यावर्षी उशिराने सादर झाले. प्रशासनाने स्थायी समितीला १४१० कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे. परंतु, या नव्या बजेटमध्ये विकासकामांना प्राधान्य देण्यात आलेले नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपचा या बजेटसाठी कस लागत आहे. स्थायी समितीने या बजेटवर अंतिम हात फिरविला असून, भाजपच्या योजनांना मूर्त रूप देण्यासाठी बजेटमध्ये तब्बल ३८९ कोटींची वाढ सुचविली आहे. स्थायी समितीने सुचविलेल्या या वाढीमुळे बजेट १७९९ कोटींवर पोहोचले आहे. सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली आहे. नगरसेवकांना विकासकामांसाठी ४० लाख रुपये अपेक्षित धरण्यात आले आहेत. स्थायी समितीने बजेटला अंतिम रूप दिले असून, ते महासभेला सादर करण्याची तयारी केली आहे. या बजेटला मंजुरी देण्यासाठी २९ मे रोजी विशेष महासभेचे आयोजन केले आहे. त्यात बजेटला मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.

--

करवाढीची टांगती तलवार

दरम्यान, स्थायी समितीने प्रशासनाने सुचविलेली घरपट्टी व पाणीपट्टीतील प्रस्तावित करवाढ फेटाळली आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा महासभेवर थेट करवाढीसाठीचा प्रस्ताव ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. मनसेच्या काळातही महासभेवर प्रस्ताव ठेवला होता. परंतु, हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा महासभेवर प्रस्ताव ठेवून मालमत्ता करात १५, तर पाणीपट्टी करात सरासरी ५ टक्के करवाढ सुचविण्यात आली आहे. त्यामुळे भाजप या करवाढीसंदर्भात काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोटरी पार्किंगला मिळेना ठेकेदार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका प्रशासनाने शहरातील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पार्किंगचा त‌िढा सोडविण्यासाठी पुढाकार घेत शहरातील वर्दळीच्या १२ ठिकाणी चारचाकी वाहनांसाठी रोटरी पार्किंग सिस्टिम उभारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात सीबीएस, शालिमार, अशोक स्तंभ या ठिकाणांचा समावेश आहे. या कामासाठी आतापर्यंत त‌िनदा निविदा काढण्यात आल्या आहेत. परंतु, ठेकेदारांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या निविदेतील अटी व शर्तींवर फेरविचार करण्याचा विचार पालिका प्रशासन करत आहे.

शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत विषय म्हणून पार्किंगकडे पाहिले जाते. शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने व पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिक रस्त्यावरच वाहने पार्क करतात. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सीबीएस, शालिमार, रविवार कारंजा, भद्रकाली, अशोक स्तंभ, मेनरोड आदी ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न बिकट बनला आहे. पार्किंगसाठी ठिकाणच नसल्याने येथे रस्त्यावरच पार्किंग केले जात असल्याने सर्वसामान्यांना येथून वाट काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या वाहतुकीच्या कटकटीतून नाशिककरांची सुटका करण्यासाठी शहरात १२ ठिकाणी १४ रोटरी पार्किंग स्टेशन उभारले जाणार आहेत. एका पार्किंग स्टेशनमध्ये १४ कार बसणार आहेत. हे सात मजली रोटरी पार्किंग हायड्रोलिक पद्धतीचे राहणार असून, त्याचा संपूर्ण खर्च महापालिका उचलणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका मुख्यालय, अशोक स्तंभ, शालिमार, रविवार कारंजा या वर्दळीच्या ठिकाणी हे पार्किंग स्टेशन उभारले जाणार आहेत. या ठिकाणी जवळपास १६० वाहनांचे पार्किंग होणार असून, त्यासाठी महापालिकेने निविदा काढली आहे. कंपन्यांना रोटरी पार्किंगसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

या कामासाठी आतापर्यंत पालिकेने तीनदा निविदा काढल्या आहेत.पहिल्यांदा,दुसऱ्यादा आणि तिसऱ्यांदा काढलेल्या निविदा प्रक्रियेत एकही कंपनीने रस दाखवलेला नाही. त्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकला आहे. या अटी व शर्तींत संबंधित कंपनीलाच तीन वर्षांचे देखभाल व दुरुस्तीचे काम दिले जाणार आहे. त्यामुळे ही अट कंपन्यासाठी जाचक मानली जात असून त्यात काही शिथ‌िलता द्यायची का याचा विचार पालिकेने सुरू केला आहे. या अटी व शर्तींवर विचार करण्यासह मोठ्या शहरातील ठेकेदारांपर्यंत पालिका पोहचण्याचा विचार करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामात हलगर्जी केल्यास कारवाई

$
0
0

आमदार अनिल कदम यांचा वीजवितरण अधिकाऱ्यांना इशारा

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील अवाजवी वीज भारनियमन व विजेच्या इतर समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामध्ये तत्काळ सुधारणा न झाल्यास कामात हलगर्जीपणा करणाऱ्या वीजवितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा आमदार अनिल कदम यांनी दिला.

बेरवाडी येथे मारुती मंदिरात विजेच्या अडचणीसंदर्भात आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते. या वेळी नाशिक विभागाचे वीज कंपनीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता गुल्हाने, ओझरचे उपअभियंता जाधव, शाखा अभियंता कातकाडे व इतर अधिकारी उपस्थित होते. पिंपळगाव निपाणी, तळवाडे, बेरवाडीच्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या तक्रारींचा पाढाच आमदार अनिल कदम यांच्यासमोर मांडला.

या सर्व तक्रारींची आमदार कदम यांनी तातडीने दखल घेऊन सर्व वीजसमस्या सोडविण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी अंबादास जामकर, बस्तीराम खालकर, खैरनार सर, जयराम सांगले, रवींद्र बोडके, कान्हू खालकर, संजय बोडके, पांडुरंग बांगर, दादा बोराडे, दिलीप कदम, रामनाथ उकाडे या शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आमदार कदम व अधिकारी यांच्यासमोर मांडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय मदतीअभावी नवजात तिळ्यांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव जवळच्या रायपाडा येथील महिलेस तिळे झाले. परंतु, वेळीच वैद्यकीय मदत न मिळाल्याने तीनही बालके दगावली आहेत. सरकारच्या महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी असलेल्या योजना या मातेपर्यंत पोहचल्या नसल्याचे श्रमजीवी संघटनेने उघड केले आहे. या घटनेनंतर अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राची दयनीय परिस्थिती समोर आली आहे.

तालुक्यातील देवगाव रायपाडा येथील महिला संगीता पांडुरंग वारे या मंगळवारी (दि. १६) च्या रात्रीस राहत्या घरी प्रसुत झाली. तिने दोन मुले आणि एक मुलगी यांना जन्म दिला. जन्मानंतर एक मुलगा काही वेळातच मृत झाला. त्यानंतर बुधवारी (दि. १५) सायंकाळी रायपाडा येथे भगवान मधे हे लग्न सोहळ्यासाठी गेले असता त्यांना ही सर्व बाब समजली. तेव्हा तातडीने त्यांनी शेतकरी कुटुंबास भेट देऊन वास्तव जाणून घेतले.

देवगाव आणि परिसर अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या महिलेसाठी रात्री उशीरा वाहन धाडले. मात्र या बालकांना अंबोली येथे आणत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. तीन मुले होऊन एकही न वाचलेली महिला हताशपणे आक्रोश करत राहिली. मात्र या महिलेला गर्भवती असल्यापासून कोणताही शासकीय लाभ मिळाला नाही. तिला या कालावधीत केवळ एकदा इंजेक्शन दिल्याचे समजते. रायपाडा येथे अंगणवाडी मदतनीस जागा रिक्त असून, येथे अंगणवाडी इमारत पडकी आहे. म्हणून थेट मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला होता मात्र तहसीलदार महेंद्र पवार यांनी आश्वासन देऊन वेळ निभावून नेली. मात्र अद्यापही ती परिस्थिती कायम आहे. सामुंडी, डहाळेवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र झाले पाहिजे, अशी मागणी कित्येक वर्षांची असून ठराव होतात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. याबाबत सावळा गोंधळ असून, त्यामध्ये गरीब शेतमजूर कुटुंबातील बालकांचा बळी जातो आहे.

श्रमजीवी संघटनेने याबाबत गटविकास अधिकारी मुरकुटे यांना निवेदन दिले आहे. तसेच अधिकारी, कर्मचारी यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

- भगवान मधे, श्रमजीवी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जिल्हा बँक संचालकांवर गुन्हे दाखल करणार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक मंडळाने प्रचंड आर्थिक घोटाळा केला असून, यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लवकरच संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी दिला.

शेतकरी संघटनेच्या वतीने मुखेड येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळावा आणि आत्मक्लेश यात्रेच्या जनजागृती निमित्त आयोजित कार्यक्रमात गोविंद पगार बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते धोंडीराम शेळके होते. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव मोरे, सुधाकर मोगल, निवृत्ती गारे, सोमनाथ बोराडे, प्रभात पाटील, रामकृष्ण जाधव, प्रतापराव पवार, विठ्ठलराव शेळके उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना गोविंद पगार म्हणाले की, गत वर्षभर जिल्हा बँकेकडे रक्कम नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करता आले नाही. मात्र नोटबंदी होताच एका दिवसात जिल्हा बँकेत साडेतीनशे कोटी रुपये आले कसे, याचा खुलासा चार महिन्यांनंतरही जिल्हा बँक प्रशासन करू शकत नाही. येथेच घोटाळा व काळा पैसा जमा झाल्याची बाब स्पष्ट होते, असे पगार म्हणाले. संपूर्ण कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २२ मेपासून पुणे ते मुंबर्इ आत्मक्लेश यात्रा खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असे सांगून १ जूनपासून शेतकऱ्यांनी संप पुकारून दूध व भाजीपाला उत्पादन थांबवत शहरात पाठवू नये, असे आवाहन पगार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड बस स्थानकातून ७०९ फेऱ्या बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

प्रवासीसंख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने तोट्यात सुरू असलेल्या शहर बससेवेच्या गेल्या आठवडाभरात नाशिकरोड बस स्थानकातून सुटणाऱ्या सुमारे ७०९ फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या स्थानिक प्रशासनाने अचानक हा निर्णय घेतल्यानंतर येथील बससेवेवर परिणाम झाला असून, प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे. लालपरीला अचानक सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने खासगी प्रवासी वाहतुकीला मात्र चांगलीच गती मिळाली आहे.

नाशिकरोड बसस्थानक शहरातील एक प्रमुख स्थानक आहे. जवळच रेल्वेस्थानक असल्याने येथे दिवस-रात्र प्रवाशांची वर्दळ असते. या बसस्थानकातून शहर बससेवेच्या दररोज ५२९, तर ग्रामीण बसेसच्या ३३० फेऱ्या होतात. ग्रामीण बससेवेच्या ७० बसफेऱ्या वाढल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून लालपरी तोट्यात गेल्याने त्याचा परिणाम येथील बससेवेवरही झाला आहे.


प्रमुख मार्गांवर कपात

नाशिकरोड बस स्थानकातून अंबड, सातपूर, श्रमिकनगर, उत्तमनगर, एकलहरे आणि पंचवटी या प्रमुख मार्गांवरील शहर बससेवेच्या फेऱ्यांत मोठी कपात करण्यात आली आहे. परिणामी या मार्गांवरील लालपरीची वर्दळ कमी झाली आहे. या मार्गांवरील दिवसाकाठी सरासरी सुमारे १०० बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत.

शालेय सुटीचा परिणाम

शाळांना सुरू असलेल्या उन्हाळी सुट्यांमुळे नाशिकरोड बस स्थानकातून मोठ्या संख्येने बसफेऱ्या घटविण्यात आल्याचे परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर या बसफेऱ्या पुन्हा पूर्ववत केल्या जाणार आहेत.

प्रवाशांची गैरसोय

शहर बससेवेच्या फेऱ्यांत मोठी कपात करण्यात आल्याने प्रवाशांना बसथांब्यांवर बसेससाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. काही प्रवाशांकडून बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकांशी वाद घालून संताप व्यक्त केल्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत. बसेसअभावी असंख्य प्रवाशांना नाईलाजाने खासगी रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे.


खासगी वाहनांची संख्या वाढल्याने सार्वजनिक बससेवेच्या प्रवाशांत घट आली आहे. अवैध प्रवासी वाहतूकही एसटीच्या तोट्यास कारणीभूत ठरत आहे. सध्या शाळांना सुटी असल्याने शहर बसफेऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे.

-एस. ई. सोनवणे, वाहतूक नियंत्रक, नाशिकरोड बसस्थानक


गेल्या आठवड्यात बंद केलेल्या फेऱ्या

दिनांक बंद बसफेऱ्या

११ मे ७६

१२ मे ७५

१३ मे ९०

१४ मे १३८

१५ मे ९१

१६ मे १२१

१७ मे ११८

एकूण ७०९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिस्टर सिटीचा प्रस्ताव बासनात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसेच्या सत्ताकाळात नाशिकचा सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक विकासासह आर्थिक विकास होण्यासाठी दोन देशांबरोबर करण्यात आलेला सिस्टर सिटीचा महापालिकेचा प्रस्ताव आता केंद्र व राज्य सरकारने बासनात गुंडाळला आहे. चीनच्या युवाँग आणि जर्मनीच्या हेब्रॉन शहरासोबत केलेल्या सामंजस्य कराराला मंजुरी मिळावी यासाठी महापालिकेने पाठविलेल्या प्रस्तावांना वर्ष झाले आहे. परंतु, केंद्र व राज्य सरकारने अद्यापही त्यांना मंजुरी दिली नसल्याने सिस्टर सिटीचा प्रस्ताव आता बारगळल्यात जमा आहे. त्यामुळे तत्कालीन सत्ताधारी मनसेच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले असून, या देशांमध्ये नाशिकची प्रतिमाही मलीन झाली आहे.

शहराच्या विकासासाठी चीनमधील युवाँग या शहराबरोबर माहिती व सांस्कृतिक देवाण-घेवाणीच्या माध्यमातून मैत्रीचे संबंध निर्माण करण्यासाठी सिस्टर सिटीचा प्रस्ताव निमाकडून ठेवण्यात आला होता. निमाच्या पुढाकाराने ठेवलेल्या प्रस्तावाला चीननेही प्रतिसाद देत युवाँग शहराच्या लोकप्रतिनिधींना गेल्या वर्षी २५ मे रोजी नाशिक दौऱ्यावर पाठविले होते. त्यासाठी नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) आणि चीन सरकारच्या राजदूत यांच्यातील संपर्क काही वर्षांपासून सुरू आहे. नाशिक महानगर राज्यातील सर्वोत्तम गुंतवणूक करण्यासाठी योग्य असल्याने निमाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भातील करारनामा करण्यासाठी चीनमधील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गेल्या वर्षी २५ मे रोजी नाशिकमध्ये येऊन महापालिकेसोबत करारही केला होता. महापालिकेने या कराराला मंजुरी मिळावी यासाठी राज्य सरकाकडे प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव पाठवून आता एक वर्ष होत आले, तरी केंद्राकडून या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळालेला नाही. त्याप्रमाणेच आठ महिन्यांपूर्वी जर्मनीच्या हेब्रॉन शहरासोबत वातावरणातील बदलासंदर्भात सिस्टर सिटीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या सामंजस्य करारालाही मंजुरी मिळावी, यासाठी राज्य व केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. परंतु, त्यालाही अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे हे दोन्ही प्रस्ताव आता बासनात गुंडाळले गेले आहेत.

-

नाशिकच्या प्रतिमेला धक्का

चीन आणि जर्मनी या दोन्ही देशांनी नाशिकसोबत सिस्टर सिटी करण्याच्या प्रस्तावाला तेथील सरकारने मंजुरी दिली आहे. परंतु, या शहरासोबत करार करण्यास केंद्रातील भाजप सरकारने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे या दोन देशांमध्ये नाशिकची प्रतिमा मलीन झाली आहे. महापालिकेत मनसेची सत्ता असल्याने मनसेच्या आकसापोटी केंद्र व राज्य सरकारने मंजुरी दिली नसल्याचा आरोप मनसेने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साल्यांची सालपटे काढणार: उद्धव ठाकरे

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

'आता माझा शेतकरी रडणार नाही, तुम्हाला रडवणार आहे. त्याला साले म्हणणाऱ्या साल्यांची सालपटे काढणार आहे' असा टोला हाणत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा केल्यास कर्जमाफीची मागणी मागे घेऊ, असं बोचरं वक्तव्यही उद्धव यांनी यावेळी केलं.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शिवसेनेने नाशिक येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याची सांगता उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने झाली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या राज्यव्यापी अभियानाची घोषणा केली. 'शिवसेनेचे अभियान हे १ महिना चालणार आहे. ही ठिणगी आहे. याचा वणवा भडकू नये असे वाटत असेल तर या ठिणगीकडे आजच लक्ष द्या. 'शेतकरी कर्जमुक्त होणारच' हा आमचा निर्धार आहे. शेतकऱ्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या अभियानात शिवसेनेचे मंत्रीही शिवसैनिक म्हणून उतरणार आहेत. एक महिना हे अभियान चालल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा लाँग मार्च घेऊन विधानसभेवर धडकायचे आहे', अशी घोषणा उद्धव यांनी केली.

उद्धव ठाकरे यांचे फटकारे...

- आमचं सरकार येऊन अडीच वर्ष झालं. चेहरे बदलले पण प्रश्न तेच आहेत.

- मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते असताना त्यांची भाषा काय होती आणि आता काय झाली. आता त्यांचं रूपांतर अभ्यासू विद्यार्थ्यामध्ये झाले आहे.

- सत्ता आल्यानंतर भाषा बदलणारी आमची औलाद नाही. सत्ता असली किंवा नसली तरी आम्ही आहोत तसेच राहणार.

- शेतकरी सगळ्यांचा आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणारे आम्ही कपाळकरंटे नाहीत. शेतकरी जोपर्यंत शेतकरी म्हणून मतदान करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही.

- मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाचे स्वप्न पाहिले आहे. आनंद आहे. समृद्धी तर सर्वांनाच हवी असते पण ही समृद्धी आणताना जे लोक थोड्याफार सुखात जगत आहेत त्यांच्यावर वरवंटा फिरवला जाणार असेल तर तोच वरवंटा आम्ही सरकारवर फिरवल्याशिवाय राहणार नाही.

- शेतकऱ्याला कर्जमुक्त करणे हा तात्पुरता इलाज आहे असं म्हणत असाल तर तो तरी किमान करा.

- रावसाहेब दानवे 'रडताहेत साले' असे शेतकऱ्यांना म्हणाले. हे ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. आता यापुढे माझा शेतकरी रडणार नाही, तो रडवणार आहे आणि साल्यांची सालपटे काढणार आहे.

- जर आता मध्यावधी झाल्या तर आम्हाला मते किती पडतील, याचा सर्वे भाजप करतंय. सगळं दिलंय तरी त्यांना आणखीन हवंय. हरकत नाही. तेही देऊ पण आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. शिवसेना सरकारला बाहेरून पाठिंबा देईल. शिवसेनेचे सगळे मंत्री राजीनामे देतील आणि तुम्हाला मदत करतील. सरकार पडू देणार नाही.

- गाडीवरचा दिवा विझला तरी यांच्या डोक्यातला दिवा मात्र विझत नाहीय. यांच्या डोक्यातला दिवा जोपर्यंत तुम्ही विझवत नाही, जोपर्यंत यांची दिवास्वप्नं नष्ट करत नाहीत तोपर्यंत तुमच्या घरातला दिवा पेटणार नाही.

- शेतकरी का टाहो फोडतो त्याचा पहिला सर्वे करा. यापुढे एकतर्फी 'मन की बात' आम्ही ऐकणार नाही. माझ्या शेतकऱ्यालाही मन आहे आणि तो आता बोलणार आहे. त्याची 'मन की बात' तुम्हाला ऐकावीच लागेल.

- शेतकरी तूर तूर करत आहेत आणि हे सत्तातुर झाले आहेत. चिंतातुर शेतकरी यांना दिसत नाहीय.

- तूर घोटाळ्याची आधी चौकशी करा. विक्रमी उत्पादन होणार होतं तर तूर आयात करण्याचा निर्णय कुठल्या सुपीक डोक्यातून आला त्याचं आधी मॅपिंग करा आणि त्या घोटाळेबाजांना शिक्षा करा.

- सत्तेवरती लाथ मारायला मला एक क्षणही लागणार नाही.

- विरोधी पक्षात नालायक लोक बसले आहेत. आम्हाला सत्ता सोडायला सांगतात आणि स्वतःच्या भाजप प्रवेशासाठी गुप्त बैठका करतात.

- स्विस बँकेतला काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५-१५ लाख रुपये टाकतो, या तुमच्या आश्वासनाचं काय झालं? मी कर्जमाफीची मागणी मागे घेतो तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार आहात का?



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत नाशिकला सोळा पदके

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

इंडियन फाऊंडेशन ऑफ रोलर अँड आइस स्केटिंगतर्फे सिमला येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत नाशिकरोड येथील ईगल हार्ट व्हील स्केटिंगच्या खेळाडूंनी सोळा पदके मिळवली. आर्यन मोरे, आयुषी शेट्टी, तन्मय डावरे, साई पाटोळे यांना प्रत्येकी दोन सुवर्ण, हितेश्री आव्हाडला एक सुवर्ण, एक रौप्य, सिया तांबवे, कृष्णा आव्हाड यांना प्रत्येकी दोन रौप्य, अभिनय कोशीला एक ब्राँझ अशा नऊ खेळाडूंना सोळा पदके मिळाली. वेदान्त वैद्य, अनुराग कौशिक यांनीही चमक दाखवली. प्रशिक्षक शशिकांत मोरे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. संजय मानभाव, जितेन ठक्कर, चेतन बोरा, सुरेश लाल, राजेश चौव्हाण, गिरीश गाडेकर, प्रकाश जोशी, संतोष चव्हाण, मंगेश यवतीकर आदींनी खेळाडूंचा गौरव केला. दोन दिवस झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध ठिकाणचे स्पर्धक सहभागी झाले होते. विविध वयोगटांत नाशिकचे ११ स्पर्धक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘तहसील’मध्ये फॅन कोसळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

छताचा सीलिंग फॅन खाली पडतो की काय अशी भीतीवजा शंका कधीतरी तुमच्याही मनात डोकावली असेल. नुसत्या विचारानेच पाचावर धारणही बसली असेल. परंतु असे एक नव्हे दोन सीलिंग फॅन नुकतेच खाली कोसळले. ते देखील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील तहसील कार्यालयात. या घटनेत एकजण जखमी झाला आहे. हा अपघात नसून जाणीवपूर्वक घडविलेला सुनियोजित कट असल्याची चर्चा तहसील कार्यालयाच्या आवारात होत असल्याने सर्वांचेच डोळे विस्फारले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नाशिक तालुका तहसील कार्यालय आहे. महसूल विभागाच्या अखत्यारित असलेली नाशिक तालुक्याशी संबंधित कामे या कार्यालयातून होतात. या कार्यालयाच्या बाजूलाच सेतू कार्यालय आहे. जेथे विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी होते आहे. अशा नेहमी वर्दळ असलेल्या या कार्यालयांमध्ये गुरूवारी विचित्र घटना घडल्या. सायंकाळी पाचच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या ज्या हॉलमध्ये लिपीकांपासून नायब तहसीलदारां पर्यंतचे कर्मचारी आणि अधिकारी बसतात तेथील एक फॅन पात्यांसह कोसळला. सुदैवाने त्यावेळी तेथे कोणी उपस्थित नव्हते. त्यामुळे हा फॅन एका खुर्चीवर पडून ती खुर्ची मोडली. या धक्कादायक घटनेतून उपस्थित कर्मचारी सावरत नाहीत तोच बाजूच्याच सेतू कार्यालयात कर्मचाऱ्यांशी चर्चा करणारे सेतूचे सहाय्यक संचालक आडगावकर यांच्या दालनातील सीलिंग फॅन कोसळला. हा फॅन पात्यांसह आडगावकर यांच्या डोक्यात पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली होती.

देखभाल दुरुस्तीचे तीनतेरा...
नाशिक तहसील कार्यालयातील काही सहकाऱ्यांमध्ये एकमेकांबद्दल पराकोटीची असूया असल्याचे बोलले जाते. एकमेकांना कामात मदत करण्याऐवजी त्यांची उणीदुणी काढण्यातच अधिक वेळ खर्ची घालण्याचे प्रकार या कार्यालयामध्ये घडू लागले आहेत. फॅन कोसळण्याच्या घटनांचे आणि त्यापूर्वीच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाणार आहे. कार्यालयाचे वायरींग जुने झाली असून कम्प्युटर्सजवळ जाळ निघण्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत. देखभाल दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून, तहसील कार्यालयातील काही आडमुठे कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे दुरुस्तीची कामेही होत नसल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७ प्रकरणांवर सुनावणी

$
0
0

नाशिक : नाशिक परिक्षेत्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदूरबार या पाच जिल्ह्यातील खात्यातंर्गत चौकशीच्या १७ अपील प्रकरणांवर आज, अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रज्ञा सरोदे यांनी सुनावणी घेतली. यावेळी विविध विभागाच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच, शहर पोलिस दलातर्फे सुरू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी पाहणी केली.
विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्या गडकरी चौकातील कार्यालयात दुपारपर्यंत सुनावणी घेण्यात आली. कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी तसेच इतर काही गंभीर आरोपांमुळे कर्मचारी तसेच पोलिस अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी केली जाते. अनेकदा हे निर्णय संबंधितांना मान्य नसतात. अशावेळी ते वरिष्ठ पातळीवर अपील करतात. अशाच प्रकारच्या परिक्षेत्रातील १७ प्रकरणांवर सरोदे यांनी सुनावणी घेतली. नाशिकचे पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्यासह इतर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षकही हजर होते. सरोदे यांनी प्रलंबित प्रकरणांचा इतर कामांचा आढावा घेतला. संध्याकाळच्या सुमारास त्यांनी शहर पोलिस आयुक्तालयाला भेट दिली. विविध कामांचा आढावा घेऊन त्यांनी सूचना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मापात पाप करणाऱ्यांना चाप

$
0
0

नाशिक : मापात पाप करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी वैद्यमापन शास्त्र विभागाने राज्यातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्र नाशिकमध्ये उभारले आहे. यामध्ये वजन मापातील कायदे सहज समजेल यावर भर दिला असून त्यात फोटो व चित्राचा वापर केला आहे. ग्राहकांची कशी फसवणूक होते याच्या प्रबोधनावर भर देण्यात आला आहे.

नाशिक येथील वैद्यमापन शास्त्र अधिकारी जयंत राजदरकर यांच्या कल्पनेतून चार दालनांमध्ये हे प्रबोधन केंद्र उभारले गेले आहे. दालनाला महिंद्रा अॅण्ड महिंदा व सीएट कंपनीने आर्थिक सहाय्य केले आहे. दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीत वैद्यमापन शास्त्राच्या सी - १ बिल्डींगमध्ये हे दालन आता सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. शाळा-कॉलेजेसला विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरा करता येऊ शकतो. त्यासाठी वैद्यमापन विभागही प्रयत्न करणार आहे. तसेच प्रत्येक ग्राहकाने ते आवश्यक बघितल्यानंतर त्यातून त्यांची वजनाबाबतीत फसवणूक होणार नाही, असेच हे दालन आहे.

वजनाची इत्यंभूत माहिती

वजनकाटेबाबत असलेल्या नियमाबाबत सामान्यांना फारशी माहिती नसते. त्यात फसवणूक होऊनही बऱ्याचदा त्याची तक्रार कोठे करायची याची माहिती नसते. या प्रबोधन केंद्रातील पहिले दालन काय करावे व काय करू नये ही संकल्पना समोर ठेऊन तयार केले आहे. यात दुकानात गेल्यानंतर ग्राहकाने काय दक्षता घ्यावी, याची माहिती दिली आहे. यात इंधन पंपावरील होणाऱ्या फसवणुकीसह गॅस सिलिंडरची माहिती येथे देण्यात आली आहे. सिलिंडरच्या वजनात कसा घोळ केला जातो, त्यासाठी काय तपासणी करावी, याची माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या दालनात वैध, अवैध वजने मापे व उपकरणे याची माहिती देण्यात आली आहे.

कायदे अन् नियमांविषयी

तिसऱ्या दालनात वैध व अवैध अशी दोन दुकाने समोरासमोर उभारण्यात आले असून त्यात १० गोष्टी चित्ररुपाने मांडण्यात आल्या आहेत. यात वैध दुकानात काय असते व अवैध दुकानात काय नसते याची माहिती आहे. पडताळणी प्रमाणपत्र प्रदर्शित करणे, वजन काटे पडताळणी झाली आहे का हे कसे बघणे, सिलबंद उत्पादनात नाव, पत्ता, उत्पादनाची तारीख, यासह काय गोष्टी बघाव्या याचे वर्णन केले आहे. चौथ्या दालनात ग्राहक संरक्षण कायदा १९८६ ची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

ग्राहकांना सहज वैद्यमापन कायदा समजावा, त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी हे प्रबोधन केंद्र तयार केले आहे. भेट दिल्यावर ग्राहकांना माहिती मिळू शकेल. केंद्र सर्वांसाठी खुले आहे.
- जयंत राजदरकर, वैद्यमापन शास्त्र अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायद्यासोबत स्वयंशिस्तही हवीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

वाहतूक सुरक्षेसारख्या मुद्द्यावर प्रत्येक वेळी कायद्याला लक्ष्य करणे योग्य ठरणार नाही. कायद्याच्या ठिकाणी कायदा काम करतोच आहे. नागरिक म्हणूनही आपली काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आहेत. त्यांचेही आपण भान ठेवायला हवे, असा सूर अभिनव न्यायालय या संकल्पनेंतर्गत आयोजित चर्चेत उमटला.

आर्किटेक्चर्स अॅण्ड इंजिनीअर्स असोसिएशनच्या ‘नाशिक आणि सुरक्षित वाहतूक’ या ट्राफिक सेमिनारचे आयोजन वैराज कलादालन येथे झाले. शहरातील वाहतूक व विजेच्या समस्यांसंदर्भात या उपक्रमात संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाने नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी ‘सीबीआय’चे विशेष अभियोक्ता अॅड. अजय मिसर, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, राजू भुजबळ आणि महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनिल पावडे उपस्थित होते.

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पोलिसांतर्फे करण्यात येणाऱ्या प्रयत्नांसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर बोलताना लक्ष्मीकांत पाटील यांनी याप्रश्नी करण्यात येणारे नागरीकांचे प्रबोधन आणि दंडात्मक कारवाईबाबतची माहिती दिली. याशिवाय चेनस्नॅचिंगसारख्या घटनांमध्ये संशयितांचा शोध घेताना अनेकदा रस्त्यात नागरीकांकडेही गाडीची कागदपत्रे मागितली जाऊ शकतात. तो तपासाचा भाग आहे. हे समजून घेऊन पोलिसांना सहकार्य करण्याची समंजस भूमिका नागरिकांकडून अपेक्षित आहे, अशीही अपेक्षा यावेळी व्यक्त झाली.

शहरातील गुन्हेगारी आणि पोलिसांची भूमिका, गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, महावितरणकडून नागरिकांना जाणवणाऱ्या समस्या आदी मुद्द्यांवर उपस्थित प्रश्नांना शासकीय चौकटीतील उत्तरे देण्यात आली.

भरकटलेली चर्चा अन् खरडपट्टी

कार्यक्रमादरम्यान अभिरूप न्यायालयाच्या संकल्पनेनुसार प्रश्न विचारण्याचा प्रयत्न आयोजकांच्या वतीने करण्यात आला. यावेळी भावनेच्या भरात प्रश्न विचारताना चर्चा भरकटून कायद्यासंदर्भात धोरणविषयक प्रश्न विचारले गेले. यावर पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी प्रश्नकर्त्यांची खरडपट्टी काढताना नियमांच्या चौकटीत राहून प्रश्न विचारा, अशा सूचना केल्या. धोरणात्मक मुद्द्यांवर बोलण्याचा अधिकार नसल्याचे व अशी माहिती सांगणे बंधनकारक नसल्याचे सांगत त्यांनी प्रश्नकर्त्यांनाच गप्प केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी आत्महत्येचा वाढता आलेख

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक विभागातील नंदुरबारचा अपवाद वगळता उर्वरित चारही जिल्ह्यांमध्ये पाच वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढता राहिल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. विभागात विविध कारणांनी तब्बल १ हजार ७७५ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

दुष्काळ, नापिकी, शेतमालाला मिळणारा मातीमोल भाव, कर्जाचा वाढता डोंगर, गारपिट अशा विविध कारणांमुळे बळीराजा खचत आहे. या मुद्यांकडे प्रशासकीय तसेच सामाजिक पातळीवर अधिक गांभीर्याने बघण्याची आणि आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपायांची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नाशिक विभागात २०१२ ते ८ मे २०१७ या काळात १ हजार ७७५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची महसूल खात्याकडे नोंद आहे. त्यापैकी १४६ प्रकरणे चालू वर्षातील आहेत. शेतकऱ्यांच्या या आत्महत्या प्रकरणांपैकी ८९६ प्रकरणे शासनाच्या निकषानुसार या विषयीच्या समितीने आर्थिक लाभास पात्र ठरविले होते.

तर ८०८ आत्महत्यांची प्रकरणे अपात्र ठरली. या शिवाय ७१ प्रकरणे निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत. यापैकी २०१२ ते २०१६ या पाच वर्षांतील केवळ ३ प्रकरणे प्रलंबित आहेत.

शासकीय निकषांप्रमाणे लाभास पात्र ठरलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांस प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. संबधित शेतकरी कुटुंबांना या संकटातून सावरण्यास मोठा हातभार लागला. गेल्या पाच वर्षांत विभागातील एकत्रित ८९२ शेतकरी कुटुंबांना ८ कोटी ९२ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.

समितीचा निर्णय अंतिम

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक लाभ मिळण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावरील समितीची मंजुरी मिळणे आवश्यक असते. त्यासाठी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे प्रकरण शासकीय निर्णयातील अटींची पूर्तता करणारे असले पाहिजे. कोणत्याही वित्तीय संस्थेकडून संबधित शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले असले पाहिजे, अशा वित्त संस्थांकडून संबधित शेतकऱ्याला कर्जवसुलीचा तगादा व नापिकी अशा निकषांची पूर्तता करणाऱ्या प्रकरणांना या समितीकडून आर्थिक लाभाची शिफारस केली जाते.

जळगाव जिल्हा प्रथम स्थानी

विभागातील जळगाव जिल्ह्यात पाच वर्षांमध्ये सर्वाधिक म्हणजे ७८६ इतक्या शेतकरी आत्महत्या घडल्या. त्या खालोखाल नगर जिल्ह्याचा (३९४ आत्महत्या) क्रमांक धुळे जिल्हा तिसऱ्या (२९७ आत्महत्या) तर नाशिक जिल्हा चौथ्या क्रमांकावर (२८१ आत्महत्या) आहे. नंदुरबार या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात पाच वर्षांत शेतकरी आत्महत्येच्या १७ घटना घडल्या. निसर्गाशी एकरुप झालेला व चंगळवादापासून स्वतःला चार हात दूर ठेवणारा नंदुरबारमधील शेतकरी खचण्याऐवजी आपत्तीशी संघर्ष करीत असल्याचे यावरून दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमुक्ती द्या; सत्ता सोडतो!

$
0
0

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे आव्हान


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण भागातील निवडणुकांमध्ये पिछाडीवर पडल्यामुळे शिवसेनेने सत्तेत आल्यानंतर प्रथमच खऱ्या अर्थाने कृषी अधिवेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घातला आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, आम्ही सत्तेतून बाहेर पडून पूर्ण पाठिंबा देऊ, असे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केले. उद्धव ठाकरेंनी या अधिवेशनात सरकारवर थेट घणाघात केला असला तरी, मोठ्या घोषणेची आस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची मात्र घोर निराशा झाली. खासदार राजू शेट्टी यांनी मात्र मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर हल्लाबोल करीत सरकारचे वाभाडे काढले.

भाजप पूर्ण सत्तेसाठी राज्यात मध्यावधी निवडणुकांच्या चाचपणीसाठी सर्व्हेक्षण करीत आहे. परंतु, मध्यावधीसाठी चाचपणी काय करता, शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त करा. तुम्ही कर्जमुक्तीचा शब्द पाळल्यास, माझे सगळे मंत्री सत्ता सोडून बाहेर पडून तुम्हाला पूर्ण सत्ता देतील, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले. सत्तेला लाथ मारायला मला एका क्षणाचाही विलंब लागणार नाही, असे म्हणत त्यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरून सत्तेतून बाहेर पडण्याची धमकीही फडणवीस सरकारला दिली. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी साथ आहे, सोबत आहे. ती मी तुम्हाला देईन, अशी ग्वाहीही ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिली. कर्जमुक्तीसाठी सरकारविरोधात एल्गार पुकारण्याची घोषणा त्यांनी केली आहे. एकतर्फी ‘मन की बात’ आम्ही ऐकणार नाही. माझ्या शेतकऱ्यालाही मन आहे आणि तो आता बोलणार आहे. त्याची ‘मन की बात’ तुम्हाला ऐकावीच लागेल असा टोलाही त्यांनी फडणवीस व मोदींना लगावला. कर्जमुक्तीसाठी जुलैमध्ये विधिमंडळावर भव्य लाँग मार्च काढण्याची घोषणा करीत त्यांनी सरकारविरोधात आता रस्त्यावर उतरून लढाई लढू. ही ठिणगी भडकली तर वणवा पेटेल अशा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

समृद्धी विरोधात मोर्चेबांधणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या विरोधात पूर्ण मोर्चेबांधणी या अधिवेशनात करण्यात आली. शेतकऱ्यांनी साथ दिल्यास शिवसेना समृद्धी महामार्गाच्या विरोधात उभी राहील, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. राजू शेट्टी यांनी प्रथम शेतकऱ्यांची समृद्धी करा, तरच समृद्धीला बळ देऊ असे सांगत समृद्धी विरोधात शड्डू ठोकला. त्यामुळे समृद्धी विरोधात ठाकरे आणि शेट्टी यांनी एकत्रित येऊन त्याला हाणून पाडण्याची तयारी सुरू केली आहे.

कर्जबाजारीपण सरकारचेच पाप

भाजपपासून दुरावलेल्या आणि शिवसेनेच्या मंचावर आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांवर सडकून टीका करीत सरकारला मातीत घालण्याची, थडगे बांधण्याची तसेच खुर्च्या काढून घेण्याची भाषा वापरली. गेल्या तीन वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारने दिलेले आश्वासन पाळले असते, तर आज शेतकऱ्यांवर भीक मागण्याची वेळ आली नसती. आमच्या डोक्यावरचे कर्ज हे सरकारचे अनैतिक पाप असून, कर्जबाजारीपणा हे सरकारचेच पाप असल्याची घणाघाती टीका शेट्टी यांनी केली. एक निवडणूक जिंकली म्हणजे राजकारण संपत नाही असे सांगत शेतकऱ्यांना फसवले तर २०१९ फार लांब नाही अशा इशारा देत वांरवार फसवले तर मातीत गाडू अशा शब्दात त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखेर सेलहॉलचे भगदाड बुजविणे सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलहॉलला भगदाड बुजविण्यास अखेर सुरुवात झाली. याबाबतचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल बाजार समितीने घेत दक्षिणेच्या बाजूला असलेल्या सेलहॉलपासून या कामाला त्वरित सुरुवात करण्यात आली.

बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी येणारा शेतमाल हा सेलहॉलमध्ये आणण्यात येतो. शेतीमाल आणणाऱ्या वाहनातून या मालाच्या क्रेट, गोण्या, पोती काढून ते बाजार समितीच्या सेलहॉलमध्ये सहज नेता येतील अशी व्यवस्था करण्यासाठी या सेलहॉलला उंची देण्यात आलेली आहे. सुमारे तीन ते चार फूट उंच असलेल्या या सेलहॉलच्या कॉँक्रिटीकरणाखाली विटा निखळून गेल्या आहेत. त्यामुळे या सेलहॉलच्या बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे भगदाड पडत चालले आहे. ती अशीच वाढत गेली तर त्याचा धोका निर्माण होऊन अपघातही होण्याची शक्यता होती. ‘मटा’त याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच बाजार समितीने भगदाड बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. दक्षिण बाजूला सिमेंट काँक्रीट टाकून या कामाला सुरुवातदेखील झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडला सातभाई बिनविरोध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर
नाशिकरोड प्रभाग सभापत‌िपदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेविका सुमन उर्फ अनिता दत्तात्रय सातभाई यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत शहरातून नवनिर्वाचित प्रभाग सभापती सुमन सातभाई यांची मिरवणूक काढली. सुमारे २० वर्षांनंतर नाशिकरोड प्रभाग सभापत‌िपदी भाजपला संधी मिळाली आहे.
शुक्रवारी सायंकाळी चार वाजता येथील पालिका विभागीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अप्पर आयुक्त ज्योतिबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक पार पडली. पदासाठी सुमन सातभाई यांचा एकमेव अर्ज होता. त्यांनी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केलेली होती. सुरुवातीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नगररचना विभागाचे सचिव अशोक वाघ यांनी या निवडणुकीविषयीच्या नियमांचे वाचन केले व त्यानंतर निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली. सुरुवातीची २० मिन‌िटे अर्ज माघारीसाठी देण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अप्पर आयुक्त ज्योतिबा पाटील यांनी सुमन उर्फ अनिता सातभाई यांची प्रभाग सभापत‌िपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी भाजपचे सर्व नगरसेवक हजर होते. या निवडीनंतर भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, नाशिकरोड भाजप मंडलाध्यक्ष बाजीराव भागवत, उद्धव निमसे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश घुगे, सुनील आडके, शांताराम घंटे आदींनी नवनिर्वाचित प्रभाग सभापतींचे अभिनंदन केले.

सिडकोत शिवसेनेचे डेमसे
म. टा. वृत्तसेवा, सिडको
सिडकोत शिवसेनेचे वर्चस्व असल्याने शिवसेनेचा सभापती होणार हे निश्चित झाले होते. त्यामुळे शिवसेनेच्या सुदाम डेमसे यांच्या व्यतिरिक्‍त कोणाचाही अर्ज दाखल नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर आयुक्‍त ज्योत‌िबा पाटील यांनी जाहीर केले.
सिडकोच्या विभागीय कार्यालयातील सभागृहात आयेाजित केलेल्या या निवड प्रक्रियेप्रसंगी नगरसेवक चंद्रकांत खाडे, बंटी तिदमे, शाम साबळे, मुकेश शहाणे, सुदाम डेमसे, नीलेश ठाकरे, भगवान दोंदे, रत्नमाला राणे, किरण दराडे, छाया देवांग, प्रतिभा पवार आदी सदस्य उपस्थित होते. सुरुवातीला माघारीसाठी पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला. मात्र केवळच एकच अर्ज असल्याने डेमसे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. पाथर्डी गाव व परिसर हा पहिल्यापासूनच सिडको प्रभागाला जोडण्यात आलेला आहे. यापूर्वीही सिडकोचे प्रभाग सभापत‌िपद पाथर्डी गावातील विजय ढेमसे यांच्या रुपाने या परिसराला प्रभाग सभापत‌िपद मिळाले होते. त्यानंतर आता पुन्हा सुदाम डेमसे यांच्या रुपाने पाथर्डीला प्रभाग सभापत‌िपद मिळाले आहे. विकासाची जबाबदारी आता डेमसे यांच्यावर असून, ते कशा पद्धतीने पूर्ण करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सातपूरला मनसेची भाजपला साथ
म. टा. वृत्तसेवा, सातपूर
नाशिक महापालिकेच्या सातपूर प्रभागाच्या निवडणुकीत भाजपच्या माधुरी बोलकर यांची सभापतिपदी निवड झाली आहे. भाजपला मनसेची साथ लाभल्याने बोलकर यांना सभापती होण्याचा मान मिळाला आहे. सभापत‌िपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेविका बोलकर व शिवसेनेचे संतोष गायकवाड यांनी अर्ज सादर केले होते. परंतु, यात दोन्ही उमेदवारांनी माघार न घेतल्याने अखेर निवडणूक निर्णय अधिकारी ज्योत‌िराव पाटील यांनी सभागृहात उपस्थित सदस्यांना मतदान करण्यास सांगितले. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक गायकवाड यांनी ९ मते मिळाली तर भाजप नगरसेविका बोलकर यांनी मनसेच्या पाठबळावर ११ मते मिळवली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी बोलकर यांना विजयी घोष‌ित केले. यानंतर नवनिवार्चित सभापती बोलकर यांचा महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप आदिंनी अभिनंदन केले. शिवसेनेचे नगरसेवक गायकवाड यांनी मनसेची मनधरणी करण्याचे काम केले खरे. परंतु अखेर मनसेने भाजपच्या नगरसेविका बोलकर यांनाच मतदान केले. याप्रसंगी नगरसेवक दिनकर पाटील, शशिकांत जाधव, सुदाम दादा नागरे, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे, दिलीप दातीर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्धवसाहेब, रिमोट कंट्रोलचा वापर करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समृध्दी महामार्गासाठी बंदुकीच्या जोरावर शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. म्हणूनच मोठा पोलिस बंदोबस्त लावून जमिनीची मोजणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठविले जात आहे. परंतु शेतकरी या महामार्गासाठी कदापि आपल्या हक्काची जमीन देणार नाहीत. उद्धवसाहेब, युती सरकारचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्हीच न्याय मिळवून द्या, अशी विनंती समृध्दी महामार्गाला राज्यभरात विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीने नानासाहेब पळसकर यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये केली.
कृषी अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे नाशिकमधील चोपडा लॉन्समध्ये आले होते. समृध्दी महामार्गाला विरोध करणाऱ्यांच्या वतीने पळसकर यांनी शेतकऱ्यांची व्यथा ठाकरे यांच्यासह शिवसेना आमदार, खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधींसमोर मांडली. यावेळी पळसकर म्हणाले, ‘विविध प्रकल्पांसाठी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करीत असते. यापूर्वीही अनेक एमआयडीसींसाठी हजारो एकर जमिनी संपादीत करण्यात आल्या. परंतु, त्यापैकी अनेक क्षेत्रांवर उद्योग स्थापन होऊ शकले नाहीत. चार हजार रुपये एकर दराने घेतलेल्या अशा साडेसहा हजार एकर जमिनी सरकारने शेतकऱ्यांना परत कराव्यात, अशी मागणी पळसकर यांनी यावेळी केली. समृध्दी महामार्गाला विरोध दर्शवित शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या. परंतु, अद्याप त्यांना ना चौकशीसाठी बोलावले ना या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. समृध्दी महामार्गाच्या विरोधात शेतकरी तासन् तास रस्त्यावर उतरून आंदोलन करतात अन् औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एसी हॉलमध्ये समृध्दीबाबत बैठक
बोलावली. जेथून समृध्दी महामार्ग
जाणार आहे तेथेच बैठक घ्या, अशी मागणी करीत आम्ही ही बैठक उधळून लावली. नागपूर ते मुंबईसाठी अमरावती तसेच वर्धा मार्ग हे दोन महामार्ग आहेत. तरीही पुन्हा समृध्दी महामार्गाचा अट्टाहास का, असा सवाल पळसकर यांनी
उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड बॅँकेची २५ ला निवडणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सहकार क्षेत्रात आघाडीवर असलेल्या नाशिकरोड- देवळाली व्यापारी बँकेची निवडणूक २५ जून रोजी होणार आहे. पुणेस्थित राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने शुक्रवारी याची घोषणा केली. त्यामुळे निवडणूक हालचालींना वेग आला आहे.

जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. १९ ते २३ मेदरम्यान सारडा सर्कल येथील जिल्हा उपनिबंधकांच्या निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. येथे उमेदवारी यादी रोज दुपारी चारला प्रसिद्ध केली जाईल. मतदान व मतमोजणीचे ठिकाण नंतर जाहीर केले जाणार आहे.

तीन पॅनल शक्य

आर्थिक संकटावर मात करून रुळावर आलेल्या या बँकेचे सुमारे ६५ हजार सभासद आहेत. दत्ता गायकवाड बँकेचे अध्यक्ष आहेत. गेल्या निवडणुकीत २२ पैकी १६ जागांवर गायकवाड व निवृत्ती अरिंगळे यांच्या सहकार पॅनलचे १६ उमेदवार विजयी झाले होते. माजी नगरसेवक अशोक सातभाई, भाजप नेते सुनील आडके, हेमंत गायकवाड यांच्या श्री व्यापारी पॅनलचे सहा उमेदवार विजयी झाले होते. आपलीच सत्ता पुन्हा यावी यासाठी सहकार पॅनलने व्यूहरचना केली आहे, तर परिवर्तन करायचे या जिद्दीने विरोधी पॅनल प्रचाराला लागले आहे. यंदा तीन पॅनल होण्याची शक्यता आहे. राजाभाऊ जाधव, जयप्रकाश गायकवाड, मुन्ना अन्सारी, नाशिकरोड- देवळाली विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष वसंत अरिंगळे, नामदेव आढाव यांनी तिसऱ्या पॅनलसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ‘खूप झाला भ्रष्टाचार, आता परिवर्तन करू’ हे स्लोगन घेऊन त्यांचे पॅनल निवडणूक लढविणार आहे.

निवडणूक कार्यक्रम असा

२४ मे ः सकाळी अकराला छाननी

२५ मेस ः विधिग्राह्य उमेदवारी पत्रांची यादी जाहीर केली जाईल

२६ मे ते ९ जून ः सकाळी अकरा ते दुपारी तीनदरम्यान उमेदवारी अर्ज माघारीची मुदत

१२ जून ः निवडणूक चिन्हांचे वाटप आणि अंतिम यादीचे प्रकाशन

२५ जून ः सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान

२६ जून ः सकाळी आठला मतमोजणी व निकाल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवाल तर मातीत गाडू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भाजपपासून दुरावलेल्या आणि शिवसेनेच्या मंचावर आलेल्या स्वाभ‌िमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांना लक्ष्य करत, सरकारला मातीत घालण्याची, थडगे बांधण्याची तसेच खुर्च्या काढून घेण्याची भाषा वापरत थेट हल्लाबोल केला.
नाशिकमध्ये शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आयोजित केलेल्या कृषी अधिवेशनाला राजू शेट्टी यांनी हजेरी लावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवरच हल्लाबोल केला.
ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत केंद्र आणि राज्यसरकारने दिलेले आश्वासन पाळले असते, तर आज शेतकऱ्यांवर भीक मागण्याची वेळ आली नसती. आमच्या डोक्यावरचे कर्ज हे सरकारचे अनैतिक पाप असल्याची घणाघाती टीका शेट्टी यांनी केली. एक निवडणूक जिंकले म्हणजे राजकारण संपत नाही, असे सांगत शेतकऱ्यांना फसवले तर २०१९ फार लांब नाही, वांरवार फसवाल तर मातीत गाडू, असा इशारा त्यांनी दिला. तुमच्या स्वप्नांच्या आड आम्ही येणार नाही. परंतु, जर का शेतकऱ्यांची थडगी बांधून तुम्ही मनोरे उभे करत असाल, तर त्याच थडग्यांमध्ये तुम्हालाही गाडू अशा शब्दांत शेट्टी यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले.
शेट्टी यांनी केंद्र व राज्यसरकारला थेट अंगावर घेत, मी शेतकऱ्यांची भाषा बोलणार असून मला कुणाला घाबरायची गरज नाही. सरकार शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. कृषी मूल्य ठरवणारा आयोग हे सरकारचे खेळणे असल्याचा आरोप त्यांनी केला.
आमच्या डोक्यावरचे कर्ज हे सरकारचेच अनैतिक पाप असून तेच पापाचे धनी आहेत. त्यामुळे सरकारनेच हे पाप संपवले पाहिजे असे सांगत, शेट्टी यांनी पतंप्रधान नरेंद्र मोंदीनी महायुतीच्या बैठकीपूर्वी दिलेले स्व‌ामिनाथन आयोगाच्या दीडपट हमी भावाचे आश्वासन पाळले नसल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांची सातबारा कोरा करण्याची भाषा का बदलली, असा प्रश्न त्यांनी विचारला.
कर्जमुक्ती केली तर आत्महत्या थांबतील अशी खात्री मुख्यमंत्री मागत आहेत. परंतु तुम्ही फसवणार नाहीत अशी खात्री आम्ही माग‌ितली होती का, असा सवालही त्यांनी केला. सरकारने आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ४५ हजार विधवा महिलांचे कर्ज माफ करायला हवे होते. सिंचन घोटाळ्यात भ्रष्टाचाराच्या पुराव्याची बैलगाडी आता कुठे गेली, असा जाब विचारला. भ्रष्टाचारासाठी तुरुंगात जाणारे तुमच्यासोबत उजळ माथ्याने फिरत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

थडग्यात गाडू अन् खुर्च्या फेकू

मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नांना आमचा विरोध नाही. परंतु माझ्या शेतकऱ्यांची थडगी बांधून जर तुम्ही मनोरे उभे करणार असाल तर तुम्हाला त्या थडक्यात गाडू, असा इशारा शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. आधी शेतकऱ्यांना समृद्ध करा, मगच समृद्धी महामार्ग करा असे सांगत समृद्धी, हमीभाव, संप याला विरोध करणार असाल तर ते तुम्हाला महागात पडेल. खुर्च्या आणि सत्ता देवून तुम्ही फसवाल तर त्या खुर्च्या काढून फेकण्याची ताकद आमच्यात आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

आता वाल्मिकी नको
मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्यांनी भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये घातलेच नाही. गावगुंडांना आणि भ्रष्टाचाऱ्यांना वाल्याचा पक्षात घेतले. महाराष्ट्राला एवढ्या वाल्मिकींची गरज नाही, असेही ते म्हणाले.

‘त्या’ १५ लाखांचे काय झाले?

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निवडणुकीपूर्वी विदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख टाकणार होते, त्याचे काय झाले, असा सवाल करत शेतकऱ्याला कर्जमुक्त करू नका, पण त्याच्या खात्यात स्वीस बँकेतील १५ लाख आधी टाका असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केले.
नाशिकमध्ये शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी भव्य कृषी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनात ‘मी कर्जमुक्त होणारच’ हा नारा देण्यात आला. शिवसेनेचे राज्यातील मंत्री, आमदार व खासदार या अधिवेशनाला झाडून हजर होते. कर्जमुक्तीसाठी जुलैमध्ये विध‌िमंडळावर भव्य मोर्चा काढण्याची घोषणा करत त्यांनी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून लढण्याचा इशारा दिला.
ते म्हणाले की, भाजप पूर्ण सत्तेसाठी राज्यात मध्यावधी निवडणुकांच्या चाचपणीसाठी सर्व्हेक्षण करत आहे. परंतु, मध्यावधीसाठी चाचपणी काय करता, शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त करा. तुम्ही कर्जमुक्तीचा शब्द पाळल्यास माझे सगळे मंत्री सत्तेतून बाहेर पडून तुम्हाला पूर्ण सत्ता देतील, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
उध्दव म्हणाले की, आता शेतकरी रडणार नाही, साल्यांची सालपटं काढणार असा टोला ठाकरे यांनी दानवेंना लगावला. तूर खरेदीसाठी उत्पादनाचे मॅपिंग करण्याचा निर्णय सरकारने घेतला. अरविंद सुब्रह्मण्यम यांच्या अध्यक्षतेत केंद्राने समिती नेमली. तुरीचे बम्पर पीक येणार असा अहवाल समितीने दिला. झालेही तसेच. विक्रमी उत्पादन होणार होते तर आयात करण्याचा निर्णय कुठल्या सुप‌िक डोक्यातून आला, त्याचे आधी मॅपिंग करा, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तूर घोटाळ्याची चौकशीची मागणी त्यांनी केली.

दानवेंना शेण काढायला ठेवले असते!

नाशिक : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा अस्थिकलश घेऊन राज्यभर फिरणारे विजय जाधव म्हणाले, पूर्वी शेतकरी शेकडो एकर जमिनींचा मालक होता. आता त्याच्याकडचे क्षेत्र कमी झाले आहे. हल्ली त्याने दहा रुपये पेरले की त्याला पाचच रुपये मिळतात. एक बी पेरले की १०० बियाणे उगविण्याची क्षमता शेतकऱ्यात आणि त्याच्या जमिनीत आहे. परंतु, या उत्पादनाला १०० पटींनी नफा दिला जात नाही. हा नफा मिळाला असता तर दानवे साहेब याच साल्याने तुम्हाला शेण काढायला ठेवले असते, असा टोला जाधव यांनी लगावला. शेतकऱ्याची किंमत करणाऱ्यांना त्याने पिकविलेले अन्न घेण्याची लायकी नाही, असे ते म्हणाले. मंत्र्यांच्या बंगल्यांवर काचा आणि मंत्र्यांच्या घरांमध्ये अन्नधान्य राहू देणार नाही, असा इशारा जाधव यांनी दिला. डॉ. एस. के पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. आमचे दाजी (रावसाहेब दानवे) कुठे भेटले तर आम्ही आमचा सातबारा आमच्या बहिणीच्या नावावर करून द्यायला तयार आहोत. दाजींना तुरीचे वरण खाऊ घालायला तयार आहोत. पण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images