Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

निवडणूक प्रचाराचा करणार श्रीगणेशा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सध्या होत असलेल्या नगरपरिषद निवडणुका आणि तोंडावर येऊन ठेपलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ भाजपच्या वतीने शनिवारी अप्रत्यक्षपणे फोडला जाणार आहे.

भाजपने उड्डाणपुलाच्या कामासह विविध कामांचा शुभारंभ करून या सोहळ्याला कॅश करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी भाजपने विशेष तयारी केली असून, या कार्यक्रमातूनच प्रचाराचा अप्रत्यक्ष संदेश देण्याचा प्रयत्न आहे. शहरात गडकरींच्या स्वागताचे बॅनर लावतानाही त्यात भाजपची वचनपूर्ती, उड्डाणपुलाची होतेय स्वप्नपूर्ती असा मजकूर टाकला आहे. महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागा जिंकून भाजपने सर्वच पक्षांना धक्का दिला आहे. त्यामुळे आता पंचवार्षिक निवडणुकीतही मनपा ताब्यात घेण्याची व्यूहरचना आखून सर्व पक्षांना धोबीपछाड करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. उड्डाणपुलाच्या श्रेयवादाचा प्रयत्नसुध्दा त्याचाच एक भाग असल्याचे त्यातून समोर आले. पण गडकरी यांच्या उपस्थितीत गडबड नको म्हणून ४८ तासांत पॅचअपही करण्यात आले. तरीसुध्दा हे काम अखेर गडकरींनीच केले ना असा खोचक प्रश्न विचारून भाजपने हे श्रेय आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुकीचीही तयारी भाजपने सुरू केली आहे. पदवीधर मतदारसंघात आपलाच उमेदवार निवडून यावा, यासाठी जोरदार फिल्डिंगही लावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघातात मोपेडस्वार ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उभ्या रिक्षाला मागून धडकलेल्या मोपेडस्वाराचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कलजवळ हा अपघात झाला. मोहमद फिरोज अहमद (वय ५८, रा. सावरकरनगर, गंगापुर रोड) असे मृताचे नाव आहे. डॉ. उज्वल कांगुने यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. ते गुरुवारी दुपारच्या सुमारास गंगापूरकडून अशोक स्तंभाकडे चालले होते. प्रसाद सर्कलजवळ त्यांची मोपेड रिक्षावर जाऊन आदळली. त्यामुळे त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

पंचवटीत घरफोडी

बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने दागिने चोरुन नेले. पंचवटीतील कृष्णनगरमध्ये घरफोडीची ही घटना घडली. गुरुवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. संदीप प्रभाकर बागूल (वय ३६, रा. सुंदरबन को ऑपरेट‌िव्ह हौसिंग सोसायटी, कृष्णनगर, पंचवटी) यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. बागूल कुटूंब बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेऊन चोरट्याने बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून १७ हजार ५०० रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरून नेले. बुधवारी रात्री दहा ते गुरुवारी सकाळी सव्वासात या कालावधीत चोरीची ही घटना घडली.

युवतीचा विनयभंग

भांडी घासणाऱ्या युवतीचा हात पकडून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी रात्री आठच्या सुमारास काजीगढी परिसरातील जुन्या कुंभारवाड्यात घडला. एका १७ वर्षीय युवतीने या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याच परिसरात राहणाऱ्या दुर्गेश पोटे या संशयितावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. युवती घराबाहेरील नळावर भांडी घासत असताना संशयित तेथे आला. तुझे आई वडील कोठे आहेत अशी त्यांना विचारणा केली. तुला काय करायचे आहे, तू माझ्याशी बोलायचे नाही असे तिने त्याला सुनावले. त्यावेळी संशयित पोटे याने तिचा हात पकडून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

लोखंडी रॉडने मारहाण

तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्वारका परिसरात मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. जुनेद इब्राहिम शेख (वय २२, रा. देवळाली कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. आबिद शेख याच्यासह आणखी दोघांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनेद शेख कामावरून घरी परतत असताना सारडा सर्कलजवळ आबिद शेख याने त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली.

घरातून मोबाइल चोरीस

घरातील व्यक्तींचे लक्ष चूकवून अज्ञात चोरट्याने १० हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. नाशिकरोड परिसरातील चव्हाण मळा परिसरात हा प्रकार घडला. सीमा झेव्ह‌ियर मिनीझेस (वय ४८, रा. दिगंता सोसायटी) यांनी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यांनी सोमवारी सकाळी दहा ते अकराच्या सुमारास बहिणीच्या घरात मोबाइल ठेवला होता. बहिणीच्या शेजारी अंत्यविधीकरीता आलेल्या इसमांपैकी कोणीतरी हा मोबाइल उघड्या घरातून चोरून नेला असावा असा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेतू’व्दारे मिळणार डिजिटल दाखले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेतू कार्यालयात दाखले मिळविण्यासाठी नागरिक आणि विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड आता थांबणार आहे. सेतू कार्यालय ऑनलाइन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. अर्जदाराचा अर्ज स्कॅन होणार असून, डिजिटल दाखले दिले जाणार आहेत. दाखला तयार झाल्याचा संदेश अर्जदाराच्या मोबाइलवर मिळणार असल्याने विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना सेतू कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज राहणार नसल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

नागरिकांना सातत्याने महत्त्वाचे दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयात धाव घ्यावी लागते. मात्र तेथे अनेकदा दाखले तयार नसतात. दाखल्यांसाठी त्यांना हेलपाटे मारावे लागतात. हे प्रकार टाळता यावेत यासाठी सरकारने डिजिटल पध्दती अस्तित्वात आणली आहे. जिल्हा प्रशासनाने या पध्दतीचा अवलंब सुरू केला आहे. डिजिटल स्वाक्षरीनिशी दाखले देण्याचा प्रशासनाचा मानस असून, प्रायोगिक तत्त्वावर मालेगाव आणि सिन्नर येथे डिजिटल दाखले देण्यात येत आहेत. नागरिकांना घरबसल्या ई पध्दतीने विविध प्रकारचे दाखले मिळावेत, तसेच दाखले वाटपास होणार विलंब कमी होऊन त्यात पारदर्शकता यावी आणि गैरप्रकारांना आळा घालता येणे यामुळे शक्य होणार आहे.

दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर जात दाखला, उत्पन्न, क्रिमिलेअर आणि अधिवास असे विविध दाखले घेण्यासाठी नागरी सुविधा केंद्रांमध्ये विद्यार्थी पालकांची गर्दी होते. अल्पावधीत हजारो अर्ज येत असल्याने जिल्हा प्रशासनाचीही दाखले देताना धांदल उडते. काही वेळा स्वाक्षरीसाठी अधिकारी उपलब्ध नसतात. अधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित राहत असल्याच्या तक्रारी होतात. मात्र आता नागरिकांना विनातक्रार घरबसल्या अर्ज मिळू शकणार आहेत. पुढील आठवड्यापासून ही योजना कार्यान्वित होणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी शुक्रवारी सांगितले.

दाखल्यांवर आता अधिकारी डिजिटल स्वाक्षरी करतील. त्यामुळे सर्व दाखले ई डिजिटल होणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर सिन्नर आणि मालेगावात डिजिटल दाखले देण्यास सुरुवात झाली आहे. अर्जदाराचा अर्ज घेतानाच तो स्कॅन करून त्याला प्रिंटेड पोहोच दिली जाणार आहे. प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर अर्जदाराला त्याच्या मोबाइलवर संदेश प्राप्त होईल. त्यामुळे सेतू कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

- राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज फोडणार विकासकामांचा नारळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शुक्रवारी (११ नोव्हेंबर) नाशिक दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात अनेक राजकीय समीकरणांबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.

राज ठाकरे हे ११ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शहरात येणार असून, त्या दिवशी निवडक पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. पांडवलेण्याच्या पायथ्याशी १२ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या बॉटनिकल गार्डनच्या कामाची पहाणी करणार असून, याबाबत शहरातील वास्तू विशारद व तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहेत. गंगापूर रोडवर असलेल्या श्रीरंगनगर येथे शस्त्र संग्रहालय साकारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी राज ठाकरेंसमवेत भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी मुंबईचे काही वास्तूविशारद राज ठाकरेंसमावेत हजर होते. येत्या निवडणुकीपूर्वी हे संग्रहालय तयार झाल्यास विकासकामांच्या यादीत भर पडेल व निवडणुकीला फायदा होईल त्या उद्देशाने शस्त्र संग्रहालयाच्या जागेची पहाणी करून तज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत. नाशिक शहरात कचऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. दिवसेंदिवस घंटागाड्या अपुऱ्या पडत असल्याने महापालिकेने नवीन घंटागाड्यांसाठी निविदा काढल्या. त्यानुसार लवकरच नवीन १९७ घंटागाड्या नाशिककरांच्या सेवेत दाखल होणार असून, याच दिवशी नवीन घंटागाड्यांचा लोकार्पण सोहळा राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

अगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांच्या उद्घाटनातून नाशिक शहराचा विकास कसा झाला हे दाखवण्याचा प्रयत्न यातून होणार आहे. भारतीय जनता पार्टीनेही नितीन गडकरींना विकासकामांच्या उद्घाटनाला बोलावून आघाडी घेतली आहे. यामुळे नाशिक शहरातील राजकीय वातावरण तापणार असून, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघांच्या नाशिक भेटीने तर्कवितर्क लावले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्जुन पगारेचा जामीन अर्ज फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तळेगाव अंजनेरी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर उसळलेल्या दंगलीतील संशयित व तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ‍) चा शहराध्यक्ष अर्जुन पगारे याचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. बी. भोस यांनी शुक्रवारी (दि.४) फेटाळला. याच प्रकरणात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असलेला नगरसेवक पवन पवार याच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि. ९) सुनावणी होणार आहे.

तळेगाव येथील एका बालिकेवर अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केला. आठ ऑक्टोबरला ही घटना घडली. या घटनेनंतर नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. काही वाहनांच्या तोडफोडीच्या तसेच जाळपोळीच्याही घटना घडल्या. या घटनेचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडल्याने त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अर्जुन पगारे याच्यासह शांताराम बागूल याच्या विरोधात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, सरकारी कामात अडथळा तसेच मुंबई पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पगारे याने न्यायाधीश भोस यांच्या कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर शुक्रवारी युक्तिवाद झाला. जिल्हा सरकारी वकील अजय मिसर व पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी जोरदार युक्तिवाद केला. न्यायाधीश भोस यांनी अर्जुन पगारेचा जामीन अर्ज फेटाळला.

पवन पवारच्या अर्जावर बुधवारी सुनावणी

पोलिस संचलनावेळी जेलरोड परिसरात दगडफेक झाली. पोलिस अधिकाऱ्यांवर चाकूहल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी अपक्ष नगरसेवक तथा सराईत गुन्हेगार पवन पवार याला अटक केली. त्याच्या घराच्या झडतीत दोन कट्टे, काडतुसे तसेच हत्यारे सापडली. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तो नाशिकरोड कारागृहात असून, जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर.शर्मा यांच्या कोर्टात त्याने जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर ९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वयंचलित केंद्रच धक्क्यावर!

$
0
0

देशातील पहिले वाहन तपासणी केंद्र

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या देशातील पहिले स्वयंचलित वाहन केंद्राची गाडी वर्षभरातच फसल्याचे चित्र आहे. तपासणीसाठी येणाऱ्या वाहनांना नाकारण्याचेच काम अधिक होत असल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे देशातील हे एकमेव केंद्र जवळपास बंद असल्यासारखेच आहे. या केंद्राच्या प्रश्नाकडे गडकरी आणि त्यांचे मंत्रालय लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

देशातील पहिले केंद्र अशा गाजावाजात सुरू झालेल्या स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राने वाहनधारकांची निराशाच अधिक केली आहे. या केंद्रामुळे सोय होण्याऐवजी गैरसोयींचाच पाढा अधिक वाचला जाऊ लागल्याने हे केंद्र वर्षभर वादात राहिले. त्यामुळे कधी बंद पाडल्या जाणाऱ्या, तर कधी व्यवस्थित कार्यान्वित असणाऱ्या या केंद्राची गाडी केव्हा रूळावर येणार असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. वर्षानुवर्षे वाहन चालविण्याचा अनुभव असूनही सहजासहजी लक्षात न येणारे आणि अपघातांना कारणीभूत ठरणारे दोष शोधण्याच्या उद्देशाने स्वंयचलित वाहन तपासणी यंत्रणा गतवर्षी ऑक्टोबरमध्ये नाशिकमध्ये कार्यान्वित करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच या यंत्रणेचे उद्घाटन केले. ही यंत्रणा कार्यान्वित होऊन एक वर्ष उलटले. परंतु, ही यंत्रणा अद्याप नाशिककरांच्या पचनी न पडल्याने ती वादात राहिली आहे. रस्त्यांवर धावणारी वाहने खऱ्या अर्थाने फिट असावीत आणि वाहनांमधील दोषांमुळे होणारे अपघात रोखण्यास मदत व्हावी हा यंत्रणेचा प्रामाणिक उद्देश असला तरी अन्य नावाजलेल्या ठिकाणांहून तपासणी करून आणलेली वाहनेही येथे अनफिट दाखविली जात असल्याचे प्रकार सातत्याने घडले आहेत. परिणामी वाहनधारक आणि संबंधित यंत्रणा चालविणाऱ्यांत गत वर्षभरात अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण झाले.

भारतातील पहिले स्वयंचलित वाहन चाचणी आणि परिक्षण केंद्र नाशिकमध्ये होणार याचा बराच गाजावाजा करण्यात आला. केंद्राचे उद्घाटन झाल्यानंतरही काही दिवस तेथे प्रत्यक्ष वाहन तपासणीला सुरुवात होऊ शकली नव्हती. वाहन तपासणी सुरू झाली मात्र वाहनधारक आणि केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांत वादाचे प्रसंग निर्माण झाले. चोपडे टायर असलेली, खूप जुनी तसेच टायर फुगलेल्या वाहनांना केंद्रामध्ये प्रवेश नाकारला जाऊ लागल्याने वाहनधारकांचा रोष बळावला. मात्र केंद्रामध्ये अपघाताची शक्यता आणि तेथील महागड्या यंत्रसामग्रीचे नुकसान यामुळे व्यवस्थापनाने सुरुवातीपासूनच अशी वाहने तपासणीस असमर्थता दर्शवली. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषांनुसार वाहनांना प्रवेश द्यायचा की नाही याचे धोरण राबविले जात असले तरी यामुळे वाहनधारक आणि अधिकाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

आरसी बुकचीही प्रतीक्षाच

वाहनधारकांना घरपोच आरसी बुक देण्याची व्यवस्था प्रादेशिक परिवहन विभागाने केली आहे. परंतु, आरटीओ कार्यालय आणि टपाल कार्यालयातील असमन्वयामुळे हजारो वाहनधारकांना आरसी बुक वेळेत मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच हजारहून अधिक वाहनधारक आरसी बुकच्या प्रतीक्षेत असल्याचे आरटीओ विभागाकडून अधिकृतपणे सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कृता, श्रेयाला सुवर्ण; नचिकेतला रौप्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागपूर येथे सीबीएससीच्या पश्चिम विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या संस्कृता ठाकूर, श्रेया मुत्तुकुमार यांनी सुवर्णपदक मिळवले, तर नचिकेत गंगाखेडकरने रौप्यपदक पटकावले. नागपूरच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये ही स्पर्धा झाली.

स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोव्यातील सीबीएससी शाळांचे संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत मुला-मुलींच्या १४, १७ आणि १९ वर्षांखालील वयोगटांचा समावेश होता. वैयक्तिक प्रकारात १४ वर्षांखालील मुलींच्या गटात नाशिकच्या दिल्ली पब्लिक स्कूलच्या संस्कृता ठाकूरने अंतिम फेरीत नागपूरच्या जुई पेंढारकरचे आव्हान ३-१ असे मोडीत काढत विजेतेपद मिळविले. १९ वर्षांखालील वयोगटात नाशिकच्या सिम्बॉयसिस स्कूलच्या श्रेया मुत्तुकुमारनेही नागपूरच्याच संस्कृती सरकारवर ३-० असा विजय मिळवत सुवर्णपदक मिळविले. १७ वर्षांखालील गटात नाशिकच्या सिम्बॉयसिस स्कूलच्याच नचिकेत गंगाखेडकरने उपांत्य फेरीत मुंबईच्या प्रणित आखुडेचा ३-२ असा पराभव केला. मात्र, अंतिम फेरीत त्याला ठाण्याच्या जितेंद्र यादवकडून ३-० असा पराभव पत्करावा लागला. संस्कृता ठाकूर, श्रेया मुत्तुकुमार आणि नचिकेत गंगाखेडकर या तिन्ही पदकविजेत्या खेळाडूंची सीबीएससीच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा २३ ते २८ नोव्हेंबरदरम्यान बडोदा (गुजरात) येथे होणार आहे. प्रशिक्षक शशांक वझे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. दिल्ली पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका चित्रा जोशी, तर सिम्बॉयसिस स्कूलच्या मुख्याध्यापिका सुरिंदर सबरवाल, को-ऑर्डिनेटर सी. आर. पाटील यांनी, तर शिवसत्य क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष अनिल सोनवणे, आमदार डॉ. राहुल आहेर, प्रशिक्षक मकरंद देव, आनंद खरे यांनी अभिनंदन केले. बडोदा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी या खेळाडूंबरोबर प्रशिक्षक म्हणून राज्यस्तरीय खेळाडू स्वरूपा मुत्तुकुमार, तर व्यवस्थापक म्हणून कविता ठाकूर या जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय फुटबॉल लीग नोव्हेंबरमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्टतर्फे नोव्हेंबर महिन्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी फुटबॉल लीग स्पर्धा होणार आहे.
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्टेट डेव्हलपमेंट प्रोजेक्टअंतर्गत महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून, त्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे.

या कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील फुटबॉलपटूंना संधी मिळावी, यासाठी नोव्हेंबर महिन्यात १४ वर्षांखालील मुलांसाठी जिल्हा स्तरावर फुटबॉल लीग स्पर्धा घेण्यात येणार आहे. २०१६- १७ या वर्षातील स्पर्धांचे आयोजन ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करावयाचे आहे. १ जानेवारी २००३ रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या मुलांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. इच्छुक संघांच्या व्यवस्थापकांनी, क्रीडाशिक्षकांनी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता दिल्ली पब्लिक स्कूल, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या बाजूला, मानोरी, नाशिक येथे उपस्थित राहावे.

अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या वतीने यंदा अखिल भारतीय स्तरावर कोका कोला स्कूल फुटबॉल स्पर्धा होणार आहे. स्पर्धेंतर्गत १ जानेवारी २००० ते ३१ डिसेंबर २०११ या कालावधीत जन्म झालेल्या मुलांसाठी जिल्हास्तरावर फुटबॉल लीग स्पर्धा होणार असून, ती १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान होईल. या स्पर्धेतील विजयी संघ राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र असतील.
इच्छुक संघांनी ९ नोव्हेंबरपूर्वी htpp://administrator.the-aiff.com/cocacola या वेबसाइटवरील माहितीनुसार नोंदणी करावी. नोंदणीनंतर बी. डी. रॉय (९८२३५८७५५८) यांना माहिती द्यावी, असे आवाहन फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्टतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये संगीत राज्य नाट्य स्पर्धेचे सूर गवसेना!

$
0
0

Prashant.bharvirkar@timesgroup.com

नाटकाच्या क्षेत्रात भरजरीपण लाभलेल्या आणि मखमलीचा शेला अंगभर परिधान करून अवघ्या नाट्यसृष्टीला ललामभूत होणाऱ्या संगीत राज्य नाट्य स्पर्धा अद्याप नाशिकला होत नसल्याने रंगकर्मींचा हिरमोड झाला आहे. नाशिक शहर कलेच्या बाबतीत अत्यंत पुढारलेले असूनही संगीत राज्य नाट्य स्पर्धा घेण्याच्या बाबतीत मागासलेपण का, असा सवाल अनेक ज्येष्ठ रंगकर्मींकडून केला जात आहे. अशाने नव्या दमाच्या कलाकारांना संगीत राज्य नाट्य समजेल कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पारंपरिक कलांचे आश्रयदाते म्हणविणाऱ्या नाशिकमध्ये संगीत राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र नसावे ही मोठीच शोकांतिका असल्याची रंगकर्मींची भावना झाली आहे. अगदी छोट्या एकांकिका महोत्सवापासून अगदी राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत अनेक स्पर्धा नाशिकमध्ये यशस्वी होतात. मात्र, ज्या संगीत नाटकांनी रंगभूमीला कलावैभव प्राप्त करून दिले, त्यांच्या स्पर्धेसाठीच नाशिकला केंद्र नसावे ही नामुष्कीची बाब ठरत आहे.

शहराला संगीत नाटकांची दीर्घ परंपरा आहे. नाट्यसेवाचे राजेंद्र जाधव पूर्वी संगीत नाटकांचा महोत्सव भरवीत. जयमाला शिलेदार, कीर्ती शिलेदार नाट्यसंगीताचे धडे देण्यासाठी नाशिकला येत असत. ज्येष्ठ रंगकर्मी व अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे माजी अध्यक्ष नेताजी भोईर यांनी अनेक संगीत नाटके लिहिली. मात्र, त्यांना ते सादर करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणच्या केंद्राचा शोध घ्यावा लागला. रामदास कामत, शुभदा दादरकर यांच्या माध्यमातून शहरात सलग नाही, परंतु नाट्यसंगीताचे वर्गही सुरू आहेत. या जमेच्या बाजू आहेत. संगीत स्पर्धा झाल्यास त्याला एन्ट्री व प्रेक्षकही उपलब्ध होईल. मात्र, असे असताना अद्याप नाशिकला संगीत राज्य नाट्य स्पर्धा होत नाहीत. राज्य नाट्यसाठी केंद्र मिळते, मग संगीत नाट्यसाठी का नाही, असा सवालही ज्येष्ठ रंगकर्मींकडून उपस्थित होत आहे.

पूर्वीपासून केवळ सांगलीलाच संगीत राज्य नाट्य स्पर्धा होत असत. विष्णुदास भावे यांनी सांगलीला रंगभूमीची स्थापना केल्याने तेथेच संगीत नाट्यप्रेमी आहेत, असा सरकारचा समज असावा; मात्र पाच वर्षांपासून केवळ संगीत राज्यनाट्य स्पर्धेची ठिकाणे बदलण्यात येत आहेत. त्यात नाशिकला अद्याप यजमानपद मिळालेले नाही. यंदाची स्पर्धादेखील फिरून सांगलीलाच होणार आहे.

नाशिकला संगीत राज्यनाट्य स्पर्धा व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संस्थेतर्फे तसे बोलणेही झाले होते. येथे स्पर्धा होणार असतील तर आम्ही यजमानपद स्वीकारायला तयार होतो. परंतु जे नाटक पहिले येईल तेथे स्पर्धा होतील, असे जाहीर केल्याने यंदाच्या वर्षी सांगलीला संगीत नाट्य स्पर्धा होणार आहे. लवकरच त्या नाशिकलाही होवोत, अशी अपेक्षा.

- सुरेश गायधनी, ज्येष्ठ रंगकर्मी, दीपक मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटींमध्ये अडकले ड्रायव्हिंग लायसन्स

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘हेल्मेट घालूनच ड्रायव्हिंग करा आणि वाहतुकीचे नियम पाळतानाच ड्रायव्हिंग लायसन्स बाळगा’, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी करीत असले तरी याच आवाहनाला छेद देणारे काम महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) करीत असल्याची बाब समोर आली आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणेच सर्वसामान्यांना शक्य होत नसल्याने विनालायसनच वाहने चालविण्याची नामुष्की अनेकांवर आली आहे. सर्वत्र वेबपेज ओपन होईल यासाठीची कार्यपद्धती स्वीकारण्याऐवजी विभागाने विविध अटी घातल्याने ठराविक ठिकाणीच हे वेबपेज ओपन होत आहे.

पारदर्शक कारभाराची कास धरत आरटीओने ऑनलाइन अर्जाचा पर्याय निवडला आहे. तसेच, टॅबद्वारे ग्रामीण भागात लर्निंग लायसन देण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. अशा प्रकारची टिमकी आरटीओकडून वाजवली जात असली तरी प्रत्यक्षात विभागाचा कारभार हा लायसन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी अतिशय त्रासदायक ठरत आहे. आरटीओने लर्निंग लायसन काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे बंधनकारक केले आहे. या अर्जाद्वारेच अर्जधारकांना त्यांना हवी असलेली वेळ (अपॉइंटमेंट) परीक्षेसाठी निवडता येते. मात्र, विभागाची www.sarathi.nic.in या वेबसाईटवर इच्छुकांना अर्जच करता येत नसल्याचे निदर्शनास येत आहे. हे वेब पेज ओपन करण्यात एरर येत असल्याचा संदेश वारंवार दिला जातो. या तांत्रिक अडचणीमुळे अनेक जण लायसनपासून वंचित राहत आहेत. सध्या दिवाळीच्या सुट्या असल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, अर्जच करता येत नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. सर्वत्र वेबपेज ओपन होईल यासाठीची कार्यपद्धती स्वीकारण्याऐवजी विभागाने विविध अटी घातल्याने ठराविक ठिकाणीच हे वेबपेज ओपन होत आहे.

एजंट, ड्रायव्हिंग स्कूलचे फावते

सायबर कॅफे किंवा घरातील ब्रॉडबँडवर विभागाचे वेबपेज ओपन होत नाही. तसेच, अर्जही करता येत नाही. मात्र, ड्रायव्हिंग स्कूलचालकांकडे गेले तर तेथे तत्काळ वेबपेज ओपन होते. त्यामुळे अनेकांना ड्रायव्हिंग स्कूल किंवा एजंटकडे येऊनच लर्निंग लायसनसाठी अर्ज करावा लागत आहे. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक केली जाते.

या आहेत तांत्रिक अडचणी

www.sarathi.nic.in या वेबसाईटवर अर्जासाठीचे वेबपेज ओपन करण्यासाठी विविध प्रकारच्या अटीच विभागाने घातल्या आहेत.
इंटरनेट एक्स्प्लोरर हे व्हर्जन नऊपेक्षा अधिक असावे. मोझिला फायरफॉक्स किंवा गुगल क्रोममध्ये हे वेबपेज ओपन होणार नाही. अॅडोबे रिडर हे ११ आणि त्यापेक्षा वरचे असावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय महामार्गावर ‘ब्रिज कम बंधारा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राष्ट्रीय महामार्गावरील प्रत्येक पूल हा ‘ब्रिज कम बंधारा’ असेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ परिवहन, महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी धुळ्यात केले. धुळे ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ चे चौपरदीकरण आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी त्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे, महापौर कल्पना महाले, खासदार हिना गावित, आमदार काशिराम पावरा, डी. एस. अहिरे, अमरिश पटेल, अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी दिलीप पाढंरपट्टे, मनपा आयुक्त संगीता धायगुडे आदी उपस्थित होते. नितीन गडकरी पुढे म्हणाले की, धुळे ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. हा रस्ता पुढील ५० वर्षे खराब होणार नाही अशा पद्धतीने त्याचे काम केले जाईल. शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महामार्गावर ब्रिज कम बंधारे बांधण्याचा प्रयत्न आहे. त्यात अडविलेले पाणी हे शेतीसाठी उपयोगात आणले जाणार असल्याचे गडकरींनी सांगितले. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात येत्या काही वर्षांत सात नवीन राष्ट्रीय महामार्ग तयार होणार आहेत. शिवाय तापी नदीला जलमार्ग म्हणून घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात नवीन रोजगार उपलब्ध होऊन विकासाला गती लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रस्ताविकात डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, केंद्र शासनाने मनमाड-धुळे-इंदौर रेल्वेमार्गासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच एवढा मोठा निधी धुळे जिल्ह्याला मिळाला आहे.

सहा महिन्यांत रेल्वेमार्गाचे काम

येत्या सहा महिन्यांत मनमाड-धुळे-इंदौर रेल्वेमार्गाचे भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री धुळ्यात येतील, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले. देशभरात ठिकठिकाणी जलमार्ग विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे दळणवळणाची सुविधा सोयीस्कर होणार आहे. धुळे जिल्ह्यातील तापी नदीला जलमार्ग म्हणून घोषीत करण्यात आल्याचे गडकरींनी सांगितले.

आरक्षणाचा फलक झळकला

गडकरी यांच्या कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांमधून काहींनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असे फलक हातात धरून सर्वांच लक्ष वेधले. काही वेळाने पोलिसांनी हे फलक ताब्यात घेतले.

अमरावती-सुरत महामार्गाचा कोनशिला समारंभ

नंदुरबार : अमरावती ते सुरत या चारपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कोनशिलेचा समारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते नवापूरला झाला. आदिवासी गोरगरीब जनतेला दिलेला आश्वासनाची पूर्तता करताना मला मनापासून आनंद होत असल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले. या रस्त्यासाठी पाच हजार कोटींचा खर्च आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पदवीधर’ची नोंदणी सव्वादोन लाखांवर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पदवीधर मतदारसंघासाठी शनिवारी हजारो मतदारांनी नावनोंदणीकरिता गर्दी केल्याने नोंदणीच्या अखेरच्या दिवशी नाशिक जिल्ह्यात विक्रमी नोंदणी झाली. त्यामुळे नोंदणीत आतापर्यंत आघाडीवर असलेला नगर जिल्हा मागे पडला असून, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ७८ हजार पाच पदवीधरांनी नोंदणी केली, तर नगर जिल्ह्यात एकूण ७२ हजार ९२० पदवीधरांनी नोंदणी केली आहे. उत्तर महाराष्ट्रात एकूण दोन लाख २२ हजार ६०३ पदवीधरांनी नोंदणी केली आहे.

नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात शेवटच्या दिवशी मतदार नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात ४३ हजार मतदारांनी नोंदणी केली होती. शनिवारी सायंकाळी ही संख्या ७८ हजारांवर पोहोचली. जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल ३५ हजार मतदारांनी विक्रमी नोंदणी केली आहे. याउलट अहमदनगर जिल्हा शुक्रवारपर्यंत आघाडीवर होता. ५० हजार ६ अर्ज अहमदनगर जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते. शनिवारी दिवसभरात सुमारे २३ हजार पदवीधरांनी अर्ज भरून दिले. त्यामुळे ही संख्या ७२ हजारांवर पोहोचली आहे. शुक्रवारपर्यंत उत्तर महाराष्ट्रात एक लाख ४० हजार ७०१ पदवीधरांनी मतदार नोंदणी केली होती. अखेरच्या दिवशी ही संख्या दोन लाख २२ हजार ६०३ पर्यंत पोहोचल्याची माहिती महसूल विभागातील सूत्रांनी दिली आहे.

पदवीधर मतदारसंघासाठी नववर्षाच्या पहिल्या एक-दोन महिन्यांतच निवडणूक होण्याची शक्यता आहे. जुन्या मतदारयाद्या रद्द ठरविण्यात आल्याने या निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणीचे काम १ ऑक्टोबरपासून हाती घेण्यात आले होते. नावनोंदणीसाठी ५ नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. सुरुवातीला काही दिवस या मोहिमेला थंड प्रतिसाद होता. अधिकाधिक पदवीधरांना मतदार नोंदणी करता यावी यासाठी २२ आणि २३ ऑक्टोबरला प्रशासनाद्वारे विशेष मोहीमदेखील राबविण्यात आली. मात्र, तिलाही फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. उत्तर महाराष्ट्रात या मोहिमेत १० हजार १६ अर्ज जमा झाले. अधिकाधिक पदवीधरांनी जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये, तसेच मंडल अधिकारी कार्यालयांमध्ये पोहोचून मतदार नोंदणी करावी, असे आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत होते. शेवटच्या टप्प्यात या मोहिमेला जिल्ह्यातच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातही दिवाळीनंतर अधिक प्रतिसाद मिळाल्याचे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे. शुक्रवारपर्यंत उत्तर महाराष्ट्रात एक लाख ४० हजार ७०१ पदवीधरांनी मतदार नोंदणी केली होती. सर्वाधिक ५० हजार ६ अर्ज अहमदनगर जिल्ह्यात, तर ४३ हजार २०५ अर्ज नाशिक जिल्ह्यात जमा झाले होते. मात्र, शनिवारी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे ५८ हजार पदवीधरांनी नावनोंदणी केली. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील पदवीधर मतदारांची संख्या सुमारे सव्वादोन लाखांवर पोहोचली आहे.

झालेली नोंदणी

जिल्हा मतदार नोंदणी

नाशिक ७८,००५

अहमदनगर ७२,९२०

जळगाव ३२,१५५

धुळे २४,४७६

नंदुरबार १५,०४७

एकूण २,२२,६०३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात भरारी पथके तयार ठेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, माघारीच्या दिवशी उमेदवारांवर दबाव आणून किंवा त्यांना पैशांचे आमिष दाखवून अर्ज माघारीसाठी प्रवृत्त केले जाते. आचारसंहितेचा भंग ठरणाऱ्या अशा गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक शाखेने भरारी पथके तैनात करावीत, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी शनिवारी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा प्रशासनाला दिल्या.

राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती निवडणुकांचा बिगुल वाजला असून, त्यासाठीची कार्यवाही देखील सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात भगूर, सिन्नर, नांदगाव, मनमाड, येवला आणि सटाणा या सहा नगरपालिकांसाठी २७ नोव्हेंबरला निवडणूक होणार असून, कालबद्ध कार्यक्रमानुसार कार्यवाही सुरू आहे. यासंदर्भातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयुक्तांनी शनिवारी व्हीडीओ कॉन्फरन्स घेतली.

जिल्ह्यातील सहा नगरपालिकांसाठी सुमारे १ हजार २४७ अर्ज प्राप्त झाले आहेत. यंदा ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची सक्ती आयोगाने केली होती. मात्र पह‌िले दोन दिवस तांत्रिक दोषांचा अनुभव आल्याने आयोगाने अखेरच्या दिवशी ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली. त्यामुळे मोठया प्रमाणावर अर्ज दाखल झाले.

गैरप्रकारांवर राहणार लक्ष

ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यात आले असले तरी हे सर्व अर्ज स्कॅन करून त्याच दिवशी आयोगाच्या संकेतस्थळावर लोड करावेत असे आदेश आयोगाने दिले होते. नाशिक जिल्ह्यात ११५२ पैकी ८५५ अर्ज ऑनलाइन पद्धतीने तर ३५५ अर्ज ऑफलाइन स्वीकारण्यात आले. यापैकी ४५ अर्जांचे डिजीटलायजेशन बाकी असून, ते त्वरीत करा, असे आदेश आयोगाने दिले आहेत. उमेदवारांकडून विरोधी उमेदवारांवर दबाव आणला जातो. पैशांचे आमिषही दाखविले जाते. अशा प्रकारांवर नजर ठेवा, अशी सूचना आयोगाने जिल्हा प्रशासनाला केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खर्च कमी अन् उत्पन्न जास्त

$
0
0

हार्वेस्टर मशिनद्वारे निफाड तालुक्यात प्रथमच ऊसतोडणी

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी आधुनिक पद्धत वापरण्याचा प्रघात सुरू असून, हार्वेस्टर या यंत्राने ऊसतोडणी होत आहे. निफाड पंचायत समितीचे सभापती सुभाष कराड यांच्या जळगाव येथे असलेल्या उसाची तोडणी संगमनेर करखान्याच्या हार्वेस्टर मशिनने सुरू केली आहे. निफाड तालुक्यातील हा पहिलाच प्रयत्न आहे. यामुळे वेळ व पैशांची बचत होत असल्याने शेतकऱ्यांसाठी हार्वेस्टर फायदेशी ठरत आहे.

हार्वेस्टर मशिनने ऊस मुळापासून तोडला जातो. त्यामुळे एकरी उत्पादन वाढते. नुकसानही होत नाही. तोडलेला ऊस कमी वेळेत कारखान्याच्या काट्यावर पोहोचल्याने तो वाळत नाही. त्यामुळे वजन वाढते. ऊस थेट कारखान्याच्या गव्हाणीत पोहोचतो. या यंत्रामुळे ऊसतोडणी मजुरांच्या मागे धावण्याची गरज नाही. ऊसतोड कामगारांना तोडणीसाठी शेतकऱ्याला खूप आर्जव करावे लागतात. प्रसंगी पैसे खर्च होतात आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे जी ऊसतोडणी व्हायला एक महिना लागेल ती अवघी चार दिवसांत झाल्याने शेतकरी या कामातून मुक्त होईल. मात्र यामुळे हार्वेस्टर यंत्राचा वापर वाढला, तर ऊसतोड मजुरांच्या रोजगारावर मोठा परिणाम होऊ शकतो.

सुमारे २० एकर क्षेत्रातील ऊस तोडण्यासाठी महिना लागू शकतो. ऊसतोडणी सलग चालली नाही, तर एकरी सरासरी उत्पादनावर परिणाम होतो. हार्वेस्टर यंत्राने चार दिवसांत माझे क्षेत्र पूर्ण मोकळे होईल आणि उत्पन्न वाढेल. त्यामुळे मोठ्या क्षेत्रासाठी हार्वेस्टरने ऊसतोडणी फायद्याची आहे. निफाड तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

- सुभाष कराड, ऊस उत्पादक, निफाड

अशी करावी लागवड

ऊस उभ्या पध्दतीने लावलेला असावा. चार फुटाच्या सऱ्या असाव्यात. लागवड नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यानची अधिक उपयुक्त. पाचट खत म्हणून उपयोगी पडते. ऊस निघून गेल्यानंतर कुट्टीचा एकरी दोन हजार रुपये खर्च वाचतो.

अशी होत ऊसतोड

हार्वेस्टर यंत्र वेगाने उसाची तोडणी करते. उसाचे तुकडे तयार करून तोडणीवेळी यंत्रासोबत चालणाऱ्या ट्रॉलीत ते टाकले जाते. ट्रॉली भरल्यानंतर मालट्रकमध्ये उसाचे तोडलेले टिपरे ओतले जातात. हे सर्व काम आटोमॅटिक चालते. या कामासाठी फक्त चार ते पाच माणसांची गरज असते. यानंतर भरलेला ट्रक थेट कारखान्याच्या काट्यावर जातो. उसतोडीच्या प्रचलित पद्धतीपेक्षा ही हार्वेस्टर पद्धत कमी खर्च, वेळेची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुसुमाग्रज म्हणजे नाशिकचे बोधिवृक्ष

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भगवान बुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली सत्याचे ज्ञान झाले, त्याचा स्पर्श व्हावा म्हणून गेलो असता त्या अश्वत्थ वृक्षाची सळसळ ऐकून ही आपण पूर्वी कोठेतरी ऐकल्याचे स्मरले आणि लख्ख प्रकाश पडला, की ही सळसळ म्हणजेच कुसुमाग्रज. त्यांनी नाशिकला ज्ञानवंत बनवले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांनी केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मराठी रंगभूमी दिनानिमित्ताने शनिवारी पुरस्कार वितरण करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शहाणे यांची उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले, की तात्यासाहेबांचा पिंड विश्वात्मक होता. त्यांनी लोकहितवादी मंडळाची स्थापना केली. नाशिकचा भावनिक कायापालट केला. सांस्कृतिक, सामाजिक बदल घडण्यास ते कारण ठरले. तात्यासाहेबांची विश्वात्मकता पुढे सरकली. त्यांनी मराठी नाटकांना संजीवनी दिली. अनेक नाट्यरत्नांना त्यातून घडवले. प्रतिष्ठान सुरू केले, तात्यासाहेबांनी या नाशिकचा खऱ्या अर्थाने विकास केला, असेही शहाणे म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर उपमहापौर गुरुमित बग्गा, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, नगरसेवक गुलजार कोकणी यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते नाट्य परिषदेतर्फे पुरस्कार वितरण करण्यात आले.

स्व. दत्ता भट स्मृती पुरस्कार (अभिनय पुरुष)- नरेंद्र दाते, स्व. शांता जोग स्मृती पुरस्कार (अभिनय स्त्री)- मीनल सौदागर, स्व. प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार (दिग्दर्शन)- गिरीश सहदेव, स्व. बापूसाहेब काळसेकर स्मृती पुरस्कार (रंगभूषा)- माणिक कानडे, स्व. गिरिधर मोरे स्मृती पुरस्कार (प्रकाशयोजना)- रवींद्र रहाणे, स्व. कुमुदताई अभ्यंकर स्मृती पुरस्कार (संगीत)- कैलास पाटील, स्व. वा.श्री. पुरोहित स्मृती पुरस्कार (बाल रंगभूमी)- प्रबोधिनी विद्यामंदिर, स्व. जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार (सांस्कृतिक पत्रकारिता)- नरेश महाजन यांना प्रदान करण्यात आला, तर विशेष योगदान पुरस्कार पाडवा पहाट व ग्रंथयात्रा– शाहू खैरे, सांस्कृतिक क्षेत्र– जयप्रकाश जातेगावकर, सांस्कृतिक क्षेत्र– राजेंद्र जाधव आणि ग्रंथसेवेबद्दल विनायक रानडे यांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमात दिवंगत नाट्यकर्मींना श्रद्धांजली वाहण्यात आली, त्यांच्या नावाने दीप उजळविण्यात आला. तसेच, पुरस्कारमूर्तींच्या हस्ते दिवंगतांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चारुदत्त दीक्षित संचालित बागेश्री वाद्यवृंदांच्या सहभागाने नांदी सादर करण्यात आली. गणेशस्तवन व नटराजवंदना कलानंद नृत्य संस्थेच्या वतीने सादर करण्यात आली. नृत्य संयोजन गुरू संजीवनी कुलकर्णी यांनी केले. क. का. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टसतर्फे थिएटरच्या कविता सादर करण्यात आल्या. कविता कुसुमाग्रज आणि सौमित्र यांच्या होत्या. राहुल गायकवाड, एकता आढाव यांनी कविता सादर केल्या. दिग्दर्शन विनोद राठोड, नेपथ्य अथर्व पाटील, प्रकाशयोजना रोहित चौधरी यांची होती. प्रास्ताविक सुनील ढगे यांनी केले. सूत्रसंचालन पल्लवी पटवर्धन यांनी केले. यावेळी नाट्य परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आभार चंद्रकांत घुगे यांनी मानले.

--

चेकअप कॅम्प

कलावंतांचे जीवन नेहमी अस्थिर असते. खाण्याची वेळ ठरलेली नसते. त्यामुळे अनेक व्याधींना त्यांना सामोरे जावे लागते. यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आजीव सभासदांसाठी हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चेकअप करण्यात आले. यावेळी १५० जणांनी त्याचा लाभ घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘से नो टू सेल्फी’ मोहीम जोरात

$
0
0

शिक्षकांकडून उपहासात्मक प्रतिक्रियांचा पाऊस

तुषार देसले, मालेगाव

शाळाबाह्य विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती टिकवून ठेवण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने एका शासन निर्णयाद्वारे जानेवारीपासून दर सोमवारी वर्गातील विद्यार्थ्यांच्या समवेत शिक्षकांनी सेल्फी काढण्याचा अजब फतबा गुरुवारी काढला. यावरून शिक्षणक्षेत्रासह सर्वच क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सोशल मीडियावर तर ‘से नो टू सेल्फी’ मोहीमदेखील उघडण्यात आली आहे. शिक्षकांना पाहूनच मुले आता ‘सेल्फी ले ले रे’ अशी चित्रपट गीतेदेखील वर्गात म्हणतील, अशा गमतीशीर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुरू झाल्यापासून शालेय शिक्षण विभागाने दररोजच नवनवे शासन निर्णय जाहीर केले आहेत. त्यात आता सेल्फीचा प्रयोग करण्याच्या निर्णयाची भर पडली आहे. राज्यात एकीकडे तंत्रस्नेही शिक्षकांनी नवनवीन प्रयोगाद्वारे गुणवत्ता वाढीत महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी ‘सरल’ प्रणालीद्वारे सर्वच ऑनलाइन करण्याच्या नादात शिक्षण विभागाकडून अशैक्षणिक कामेदेखील वाढली आहेत. याबद्दल आधीच शिक्षकांमध्ये नाराजीची भावना आहे. आता जानेवारीपासून हा सेल्फी प्रयोग सुरू करण्याचा निर्णय झाल्याने सोशल मीडियावर मात्र याबाबत जोरदार विरोध होत आहे.

जिल्ह्यासह तालुक्यातील अनेक शिक्षकांचे व्हॉट्सअॅप ग्रुप असून, त्यावर या निर्णयाबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. हा निर्णय कसा अव्यवहार्य व हास्यास्पद आहे, यावर शिक्षकांनी आपापली मते मांडली आहेत. सेल्फी काढून त्याच्यातील प्रत्येक मुलाचा आधार सरल प्रणालीवर टाकायला ते सरल किमान सरळ तर चालायला हवे ना! अशी उपरोधिक टीका होत आहे. यात अनेकांनी अशा प्रयोगांनी मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष होईल या गंभीरबाबीकडे देखील लक्ष वेधले आहे. याची दखल शासनदरबारी घेतली जावी, अशी रास्त अपेक्षा सोशल मीडियावर शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.

सेल्फीवर कविता

सोशल मीडियावर या निर्णयानंतर अनेक विनोद, कविता व्हायरल झाल्या आहेत. यात ‘सरल सरल म्हणत वाकड्यात की हो शिरलयं, सेल्फी विथ गुरुजी, आमची शाळा सेल्फी शाळा, चल बेटा सेल्फी ले ले’ या आणि आशा अनेक उपहासात्मक कवितांचा पाऊस पडत आहे. यातून असे निर्णय किती हास्यापद आहेत, यावर मिश्किल भाष्य केले जात आहे.

सोशल मीडियावर पडसाद

हल्ली अनेक घटनांनंतर सोशल मीडियावर त्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या सेल्फीच्या निर्णयानंतर शिक्षकांनी आता व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरवर थेट ‘से नो सेल्फी’ मोहीम उघडली आहे. यासाठी अनेकांनी आपल्या व्हॉट्सअॅपचे डिपी बदलले आहेत. अनेकांनी मी ठेवले नो सेल्फी स्टेटस आपण ठेवले का? असे मेसेज सेंड करून आवाहन केले आहे. सोबतच या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी http://vote.pollcode.com/553438692 या लिंकद्वारे वोटिंगदेखील घेण्यात येत असून यावर हो, नाही पर्यायत सर्वाधिक मते नाहीच्या बाजूने येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेहिशेबी रक्कम प्रकरणात बडे मासे?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बेहिशेबी रक्कम बाळगल्याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तिघांवर कारवाई झाली असली, तरी या प्रकरणात आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्तविली आहे. बाजार समिती प्रशासन आणि पदाधिकारी पैशांसाठी कर्मचाऱ्यांवर दडपशाहीचा अवलंब करीत असल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली असून, अन्य कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि तत्सम सहकारी संस्थांमध्येही असे प्रकार घडत असण्याची शक्यता बळावली आहे. अशा संस्थांमधील कर्मचाऱ्यांनीही तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

बेहिशेबी रक्कम बाळगल्याप्रकरणी नाशिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील स्टेनो विजय सीताराम निकम, लेखापाल अरविंद हुकूमचंद जैन आणि लिपिक दिगंबर हिरामण चिखले या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ ऑक्टोबरला अटक केली. त्यांच्याकडे तब्बल ५८ लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम आढळून आली होती. संशयित निकम हा माजी खासदार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देवीदास पिंगळे यांचा स्वीय सहायक असल्याने या प्रकरणाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान तीनही संशयितांची कसून चौकशी करण्यात आली असून, त्यामध्ये काही धक्कादायक माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागली आहे. कर्मचाऱ्यांना महागाईभत्ता किंवा तत्सम फरक मिळतो, तेव्हा त्यांच्याकडून कोरे धनादेश घेऊन ती रक्कम त्यांच्या खात्यातून काढून घेतली जात असल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. २०१४ मध्येदेखील असा प्रकार घडला असून, त्यामुळे कर्मचारी जेरीस आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असली, तरी आणखी काही बडे मासे गळाला लागू शकतात, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला आहे. केवळ नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच नव्हे, तर जिल्ह्यातील अन्य बाजार समित्या, अन्य सहकारी संस्थांमध्येही असे प्रकार घडत असण्याची दाट शक्यता असून, कर्मचाऱ्यांनी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


‘त्या’ तिघांना हजेरी सक्तीची

या प्रकरणात अटक केलेल्या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजेरी लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यांना आठवड्यातून दोन वेळा हजेरी लावणे बंधनकारक आहे. कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात येते. बेहिशेबी रक्कम बाळगताना तिघांना पकडण्यात आले असले, तरी याकामी त्यांना कोणाचे सहकार्य मिळते, कुणाच्या सांगण्यावरून आणि कुणासाठी कर्मचाऱ्यांचे धनादेश घेतले जातात, तसेच अशा रकमेचे पुढे काय होते, याबाबतची माहिती मिळविण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सध्या सुरू आहे. तपासात सहकार्य न केल्यास किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजेरी न लावल्यास संबंधितांचा जामीन रद्द व्हावा, यासाठी कार्यवाही करण्याची तयारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजचा दिवस ‘लेकीचा दिवस’!

$
0
0

विवाह पत्रिकेद्वारे ‘मुलगी वाचवा’चा संदेश

म. टा. वृत्तसेवा, येवला

स्त्रीभ्रूण हत्या अन् घटणारे मुलींचे प्रमाण पाहता वेगवेगळ्या माध्यमातून ‘लेक वाचवा’चा संदेश दिला जात आहे. येवल्यातील एका कुटुंबाने आपल्या मुलाच्या विवाह निमंत्रण पत्रिकेवर आपल्या घरी येणारी सून म्हणजे आमच्या घरी एक लेक जन्म घेत असल्याचे स्पष्ट करीत ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’चा समाजमनाला संदेश दिला आहे. निमंत्रण पत्रिकेच्या मुखपृष्ठावरच लहान बालिकेच्या लक्षवेधी छबीसह दिलेला ‘लेक वाचवूया, लेक शिकवूया’चा संदेश सर्वांनाच प्रभावित करीत आहे.

येवला तालुक्यातील धुळगांव येथील अन् सध्या येवला शहरातील पटेल कॉलनीतील रहिवाशी असलेले दिनकर गायकवाड हे जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त विभागीय अधिकारी. दिनकर गायकवाड यांचा मुलगा सुयोग हा येत्या १६ नोव्हेंबरला पंचकेश्वर (निफाड) येथील गणेश काशिनाथ ढोमसे यांची कन्या अश्विनी हिच्याशी विवाहबद्ध होत आहे. गायकवाड कुटुंबीयांनी छापलेली विवाह निमंत्रणाची पत्रिका जरा हटकेचं ठरली आहे.

समाजमनाला प्रभावित करणारा आशय

सस्नेह नमस्कार, आम्ही कृतकृत्य झालो आहोत. आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. आजचा दिवस ‘लेकीचा दिवस आहे’. आमच्या घरात चि. सौ. का. अश्विनीच्या रूपाने एक ‘लेक’ जन्म घेत आहे, अशी या विवाह निमंत्रण पत्रिकेची सुरुवात होताना गायकवाड कुटुंबीयांनी मुलीचं महत्त्व समाजमनाला पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आपलं कर्तव्य जपूया...लेक वाचवूया, लेक शिकवूया!, विवाह निमंत्रण पत्रिकेवरील हे सगळं काही मोलाचा संदेश सर्वांनाच भारावून टाकताना प्रभावित करून जातो.

आमच्या घरात येणारी आमची सून नव्हे, तर आमची एक लेकचं असणार आहे. समाजानेदेखील स्त्री जन्माचं खुल्या दिलानं स्वागत करताना तिचा सन्मान करावा. तिला आदराचं स्थान देताना शिकवावे. याच हेतूने विवाह निमंत्रण पत्रिकेद्वारे संदेश देण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे.

- दिनकर गायकवाड, येवला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हौशा-नवश्यांची निवडणूक जत्रा!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक महापालिकेची सहावी पंचवार्षिक निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या अगोदर आलेल्या दिवाळीत इच्छुकांनी आपापले कधी न दिसलेले चेहेरे प्रभागातील नागरिकांपर्यंत दिवाळी शुभेच्छांची भेटकार्डे, सोशल मीडिया आणि शुभेच्छांच्या होर्डिंग्जद्वारे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या शुभेच्छांमधून हौसे, नवसे आणि गवश्यांची जत्रा येत्या निवडणुकीत दिसणार हे स्पष्ट झाले आहे.

चार सदस्यीय प्रभाग रचनेत साधरणतः पन्नास हजार लोकवस्तीच्या भागात निवडणूक लढविण्यात कशी कसरत करावी लागणार आहे, याच्या कल्पनेनेच भल्यभल्यांना घाम फुटला आहे. २०१२ च्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांना प्रभावीपणे कामे करता आलेली नाहीत. महापालिकेच्या या पंचवार्षिकमध्ये विकासकामांना खीळ बसलेली असल्याने येत्या निवडणुकीला इच्छुकांमध्ये फारसा उत्साह नसणार, असे वाटत असताना प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसत आहे. दिवाळीच्या सणाचा इच्छुकांनी पुरेपूर वापर करीत आपले चेहेरे मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम भेटकार्डांसह सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. या भेटकार्डांवर प्रत्येकाने प्रभाग क्रमांक टाकून ते कोणत्या प्रभागातून निवडणूक लढविणार आहेत. हे स्पष्ट केलेले आहे.


हौस भागवायची म्हणून

जत्रेत जसे हौसे, नवसे व गवसे असतात, त्याचप्रमाणे या निवडणुकीतही त्यांची जत्रा भरणार असे दिसत आहे. काही जण केवळ हौस म्हणून या निवडणुकीकडे बघत आहेत. चार सदस्यांमध्ये आपण सहज तारले जाऊ, असे काहींना वाटत आहे. निवडणुकीचा अनुभव नसताना, प्रभागात कोणत्या प्रकारचे सामाजिक काम नसतानाही सहज म्हणून निवडणूक लढवायची, असा विचार करणाऱ्यांची संख्या कमी नाही.


बघू नशीब आजमावून!

नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणारे आतापासूनच देव-देवतांना साकडे घालू लागले आहेत. कुंडली घेऊन ज्योतिषांकडे चकरा मारणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. काही ठिकाणी, तर अशा तांत्रिक बाबांचे होर्डिंग्जही झळकू लागले आहेत. पॉवरफुल बाबांच्या शोधात अशी मंडळी आतापासूनच लागलेली आहे.

गवश्यांची प्रतीक्षा

निवडणुकीत उभे राहण्यासाठी प्रत्येकाचा काही ना काही डाव असतो. तसाच डाव इच्छुक मांडीत असतात. वास्तविक त्यांच्यात निवडणूक लढविण्याची क्षमता नसते, हे ते स्वतःही जाणून असतात. मात्र, तरीही लुडबूड करीत या ना त्या पक्षाकडून तिकीट मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे ते भासवितात. नाहीच जमले, तर अपक्ष फॉर्म भरण्याची तयारी करतात आणि माघारीसाठी कुणी आपल्याकडे येतंय का याची प्रतीक्षा करीत बसतात. अशा गवश्यांचीही संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.


सत्तेची लालला कायम

नाशिकचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्याने नगरसेवकांना फारसे महत्त्व राहणार नाही, असा निराशजनक सूर विद्यमान नगरसेवक काढीत आहेत. एका बाजूला असा सूर निघत असताना दुसऱ्या बाजूला अनेक जण प्रभागात निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. आपल्या पॅनलमध्ये सांभाव्य उमेदवारांची चाचपणीही करीत आहेत. यावरून त्यांची सत्तेची लालसा कमी झालेली दिसत नाही.


नव्या चेहेऱ्यांना वाढली संधी

पंचवटीतील २४ पैकी १२ जागा महिलांसाठी राखीव आहेत. विविध आरक्षणांमुळे विद्यमान नगरसेविकांची संधी हुकली असल्याने या निवडणुकीत अनेक नवीन महिलांना नगरसेविका होण्याची संधी आहे. मीना माळोदे, फुलावती बोडके, सिंधू खोडे, विमल पाटील, रुपाली गावंड, ज्योती गांगुर्डे आदींच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता असल्यामुळे नवोदितांची संधी वाढली आहे. दिवाळीत शुभेच्छा कार्ड आणि होर्डिंग्जवर असे काही चेहेरे झळकलेही आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक पावली, तिजोरी भरली!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला
घरपट्टी, पाणीपट्टी यासह इतर विविध करांचा शहरातील मिळकतधारकांकडून दरवर्षी होणारा भरणा म्हणजे नगरपालिकेसाठी उत्पन्नाचा एक मोठा स्रोत. मात्र, या करवसुली व्हावी पालिका प्रशासनाला दरवर्षीच नागरिकांची दारे ठोठावी लागतात. यंदा मात्र पालिकेची निवडणूक पालिकेला पावली आहे. कुठलेही कष्ट न घेता येवला नगरपालिकेच्या तिजोरीत अगदी सहज तब्बल ५६ लाखांची भर पडली आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या असंख्य मालमत्ताधारकांनी आपला करांचा भरणा केल्यामुळे ही वसुली झाली आहे.

येवला नगरपालिका निवडणुकीमुळे पालिकेच्या कर विभागात करांचा भरण्यासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी नागरिकांची गर्दी होती. निवडणुकीमुळे इच्छुकांनी स्वत:हून आपल्याकडील सर्वच करांचा भरणा केल्याने पालिकेच्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे. येवला शहरात हजारो मिळकतधारक आहेत. यातील अनेक मिळकतधारकांनी घर बांधकाम, पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने वसुली थकीत पडली होती.

मात्र पालिकेची पंचवार्षिक निवडणूक येवला पालिकेच्या पथ्य्यावर पडली आहे. निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढली असून, त्यातही विविध प्रभागांमधून मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पालिकेची निवडणूक लढवताना उमेदवार हा पालिकेचा थकबाकीदार नसावा अर्थातच त्याच्याकडे चालू आर्थिक वर्षासह मागील कुठलीही अन् पालिकेच्या कोणत्याही विभागाची करांची बाकी नसावी हा नियम आहे. उमेदवार थकबाकीदार असल्यास छाननीमध्ये त्याचा उमेदवारी अर्ज ‘अवैध’ ठरविला जातो. परिणामी इच्छुक उमेदवारांनी स्वत:सह सूचकांच्या करांचा भरणादेखील पालिकेत केल्याचे चित्र दिसले. विविध करांपोटीचा भरणा करून तसा थकबाकी नसल्याचा पालिकेचा दाखला घेण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदरच्या शेवटच्या तीनचार दिवशी इच्छुकांनी पालिकेत मोठी गर्दी केली. पालिका प्रशासनानेही कर भरून घेण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवल्याने चारच दिवसांत तब्बल ५० लाखांची तर निवडणूक काळात जवळपास ५६ लाखांची वसुली झाली असल्याचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images