Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

इगतपुरीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी चौधरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

इगतपुरी नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या अलका चौधरी यांची बुधवारी निवड करण्यात आली. नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा जनाबाई खातळे या दोन महिने रजेवर गेल्यामुळे नगराध्यक्षपदाचा कार्यभार अलका चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

इगतपुरी नगरपरिषदेच्या सभागृहात बुधवारी शिवसेना व रिपाइंच्या नगरसेवकांची विशेष बैठक घेण्यात आली. त्यात उपनगराध्यक्ष अलका चौधरी यांची दोन महिन्यांकरिता प्रभारी नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे, माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर, नगरसेवक सुनील रोकडे, शशी उबाळे, ज्ञानेश शिरोळे, नगरसेविका संगीता वारघडे, रत्नमाला जाधव, नीलिमा सोनवणे, माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, गणेश भराडे, महेश शिरोळे, किसन बिन्नर, सुनील सोनवणे, बाळू मेंगाळ, प्रल्हाद चौधरी, बाळू चौधरी, रामदास चौधरी, अजित तुपे, मल्हारी मलुजकर, भगीरथ मराडे, आदी उपस्थित होते. निवड झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिन्नरला वाढणार पक्षांतर्गत बंडाळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननी करण्यात आली असून, नगराध्यक्षपदासाठी १४ उमेदवारांचे १५ अर्ज दाखल करण्यात आले होते. यामध्ये दहा उमेदवारांचे अर्ज वेगवेगळ्या कारणांनी अवैध ठरले. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात असून, नगरसेवकपदाच्या २८ जागांसाठी १५० उमेदवारांचे १६६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये ५७ उमेदवारांचे अर्ज वेगवेगळ्या कारणांनी अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे ११४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपच्या वतीने अनेक ठिकाणी पर्यायी उमेदवार दिले होते. पक्षाचे ए बी फॉर्म एकाच प्रभागात दोघांना देण्यात आले होते. त्यामध्ये एक व दोन क्रमांक असे पर्याय दिल्याने छाननीमध्ये एक क्रमांकांचा फॉर्म वैध ठरवल्याने त्यामुळे पर्यायी उमेदवाचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. यामुळे पक्षांतर्गत नाराजी निर्माण झाली असून, ज्या उमेदवारांनी पाच सूचक दिले, त्यांचे अर्ज वैध ठरवून त्यांना अपक्ष उभे राहता येऊ शकेल. शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल बलक, भाजपचे शहराध्यक्ष पंकज जाधव, शिवसेनेच्या निशा बोडके, मनीषा वाजे, भाजपच्या जयश्री देशमुख, शिवसेनेचे संतोष तुंगार कृष्णा कासार, सागर वारुंगसे, मीना कोतवाल, सविता खोलाम्बे, वनिता गोजरे, सुमन वारुंगसे यांचे अर्ज अवैध झाले. सरला लोणारे, मीरा बळवंत जाधव, आशा जाधव, प्रामुख्याने अर्ज अवैध ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्रांनीच केला मयुरचा घात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/जुने नाशिक

आधीच्या भांडणाची कुरापत काढून कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मित्राचेच अपहरण करून त्याचा खून केला. काठे गल्ली परिसरात सोमवारी (दि. ३१) बलिप्रतिपदेलाच रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये पाच संशयितांवर अपहरण व खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये एका पोल‌िस पुत्राचाही समावेश आहे.

मयुर नरेंद्र देवरे (वय १९, रा. खंडेराव चौक, जुने सिडको) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील नरेंद्र उत्तमराव देवरे (वय ५०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय उर्फ बिटू काळोगे, शुभम उर्फ नन्नु शर्मा, मयुर शेलार, दिपक ठाकरे, जुबीन सैय्यद या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित काळोगे याचे वडील पोलिस दलात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोमवारी (दि. ३१) काठेगल्ली परिसरात सांज पाडवा कार्यक्रम होता. मयुर देवरे याच्या काही मित्रांनी त्याला तेथे बोलावून घेतले होते. मित्र सर्वेश पवार याच्या समवेत मयुर बंडू वस्ताद तालीम म्हसरुळ टेक येथे पोहोचला. तेथे संशयितांसोबत त्याची भेट झाली. मागील भांडणाची कुरापत संशयितांनी त्याच्याशी वाद घातला. तसेच सर्वेशची मोटरसायकल आणि मोबाइल हिसकावून घेत मयूरला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसविले. त्याला तपोवन परिसरात घेऊन गेले. तेथे त्यांची भांडणे झाली. त्यांनी मयुरच्या डोक्यात पेव्हर ब्लॉकचा गट्टू मारून गंभीर दुखापत केली. त्यानंतर बेल्टने गळा आवळून त्याचा खून केला. घटनेनंतर सर्व संशयित फरार झाले. घटनेबाबत कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्‍वानपथकालाही पाचारण करण्यात आले.

मयूर घरी न परतल्याने त्याचे वडिल नरेंद्र देवरे यांनी सर्वेश पवारकडे विचारपूस केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि. १) नोव्हेंबरला भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये मुलाच्या अपहरणाची फिर्याद दिली. पोलिस तपास सुरू असतानाच तपोवनच्या शाही मार्ग परिसरात मयूरचा मृतदेह आढळून आला. मयूरची ओळख पटल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित पसार झाले आहेत. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे, गुन्हे निरीक्षक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विलास शेळके तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भंगार बाजाराचं दिवाळं केव्हा?

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक संघटनांसोबत घेण्यात आलेल्या बैठकीत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी अनधिकृत भंगार बाजाराबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर दिवाळीचा ताण संपल्यामुळे आता अनधिकृत भंगार बाजाराचं दिवाळं वाजणार केव्हा, असा सवाल उद्योजकांसह परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिस आयुक्तांच्या यासंदर्भातील आदेशाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. एकेकाळी शे-दोनशे असलेली भंगाराची दुकाने आज हजारोंच्या संख्येने झाली आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त व पोलिस प्रशासनाने यावर निर्णय घेणे गरजेचे असलेल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतींच्या अगदी मधोमध भंगार बाजाराची निर्मिती झाली होती. सातपूरला एमआयडीसी सुरू झाल्यावर नंदिनी नदीच्या किनाऱ्यावरच महापालिकेच्या जागेवर पहिल्यांदा अनधिकृत भंगाराची दुकाने सुरू झाली होती. त्यानंतर वाढलेल्या कारखान्यांची संख्या पाहता अंबड लिंकरोड भागात आज हजारोंनी अनधिकृत भंगाराची दुकाने वसली आहेत. विशेष म्हणजे एकेकाळी केवळ भंगाराचा व्यावसाय अंबड लिंकरोड येथील भंगार दुकानांवर होत होता. परंतु, कालांतराने भंगार हा दुय्यम व्यवसाय झाला असून, या ठिकाणी एमआयडीसीला लागणारे सुटे पार्ट बनविले जात आहेत, तसेच घरगुती वस्तूंचे मोठे मार्केटच भंगार बाजारात अनेकांनी उभारले आहे. भंगार बाजार हटविण्याबाबत अनेकदा आंदोलनेदेखील झाली आहेत. परंतु, महापालिका व पोलिस प्रशासनांच्या वादात अनधिकृत भंगार बाजाराचे भिजत घोंगडे अडकून पडले आहे. महापालिकेच्या पूर्व विभागाच्या कार्यालयात बुधवारी अनधिकृत मंदिरांच्या कारवाईबाबत बैठक झाली. त्यातही भंगार बाजाराचा मुद्दा उपस्थित होऊन नगरसेवक विनायक खैरे यांनी भंगार बाजार हटवण्याबाबत महापालिका न्यायालयाचा अवमान करीत असल्याचा आरोपदेखील केला.

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निमा या औद्योगिक संघटनेच्या बैठकीत पोलिस आयुक्त सिंघल यांनी लवकरच अनधिकृत भंगार बाजार हटविण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता दिवाळीच्या सणानंतर पोलिस आयुक्त सिंघल अनधिकृत भंगार बाजार हटविण्याबाबत कधी निर्णय घेतात, याची चर्चा नागरिकांत होत आहे.

दुकाने जाणार कुठे?

भंगार बाजारात असलेली हजारो भंगार दुकाने हटविल्यास त्यांची सोय कुठे होणार, असा सवालही यानिमित्ताने केला जात आहे. विशेष म्हणजे अनधिकृत भंगार बाजार हटविण्यासाठी महापालिकेने तीन वर्षांपूर्वी भंगार गोळा करण्यासाठी टेंडर नोटीसदेखील काढली होती. परंतु, कुठल्याच भंगार व्यावसायिकाने महापालिकेने काढलेले भंगाराचे टेंडरच भरले नसल्याचे समोर आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिटको चौक टाकतोय कात

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडच्या बिटको चौकाचे रूप पालटत असून, या चौकात दोन ठिकाणी कामगारांचे नवे पुतळे उभारण्यात आले आहेत. नव्या आयलॅण्मध्ये योगा आणि शाळेला जाणाऱ्या मुलीचे पुतळे आहेत. त्यामुळे हा चौक जणू कात टाकत असल्याची स्थिती दिसून येत आहे.

नाशिकरोडचा बिटको चौक हा बेशिस्त वाहतुकीमुळे नेहमी चर्चेत असतो. चौकाला सर्व बाजूंनी रिक्षाचालकांचा विळखा पडलेला असतो. दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक सिग्नल तोडून वाहने पुढे घुसडतात. चौकातील वाहतूक बेटाची माती रस्त्यावर आली आहे. चौकातील पोलिस चौकीसमोर नागरिक सर्रास वाहने लावतात. पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेतात आदी कारणांनी बिटको चौकाची वेगळी ओळख लोकांच्या मनात रुजली आहे.

नाशिकरोडला मध्यमवर्गीयांची व कामगारांची वस्ती जास्त आहे. बिटको चौकात सकाळी हातावर पोट असलेल्या कामगारांची गर्दी असते. रोजगाराच्या आशेने ते येथे जमतात. हे लक्षात घेऊन बिटको चौकात कामगारांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. बिटकौ चौकात दोन नवीन वाहतूक बेटे खासगीकरणातून उभारण्यात आली आहेत. मुख्य चौकातील बेटात हातोडा घेतलला आणि सेफ्टी हेल्मेट घातलेला कामासाठी निघालेला कामगार असा सुंदर पुतळा उभारण्यात आला आहे. जेलरोडला जाणाऱ्या रस्त्यावरील सिग्नलजवळ सफाई मजुराचा पुतळा उभारण्यात आला आहे. शेजारीच असलेल्या नवीन वाहतूक बेटात दोन लहान मुलांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. एक मुलगा योगा करताना दाखवला आहे. योगा करा आणि दीर्घायुषी राहा, असे सुंदर वाक्य पुतळ्याखाली लिहिलेले आहे. या नव्या वाहतूक बेटात दुसरा पुतळा शाळेला निघालेल्या मुलीचा आहे. मी शिकतेय, तुम्हीही शिका असा संदेश या पुतळ्याखाली आहे. या चारही पुतळ्यांमुळे बिटको चौकाला नवे रूप प्राप्त झाले आहे.

---

बेटांचे काम मंदावले

बिटको चौकात नवीन पुतळे उभारण्यात आले असले, तरी दोन्ही वाहतूक बेटांचे सुशोभीकरण मंद गतीने सुरू आहे. बेटात हिरवळ लावणे, रंगरंगोटी बाकी आहे. बेटातील माती रस्त्यावर पसरू लागली आहे. कामाचे साहित्य, डबर तेथेच पडलेले आहे. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर महाराष्ट्राला नाशिकचा ‘सुवर्ण’टच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकेकाळी उत्तर महाराष्ट्रात जळगाव येथे सराफ बाजाराचा दबदबा होता; पण आता नाशिकचा सराफ व्यवसाय आता उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठा व्यवसाय ठरत आहे. जळगावमध्ये ११० सराफी दुकाने असून, नाशकात हीच संख्या एक हजाराच्या आसपास गेली आहेत. विशेष म्हणजे जळगाव, धुळे येथील मोठ्या सराफांसह राज्यातील नामांकित ब्रँड आणि प्रख्यात सराफांनीही नाशिकला शो-रूम सुरू केले आहेत. यामुळे नाशिकमध्ये सुवर्ण व्यवसायाची उलाढाल लक्षणीय वाढली आहे.

शुद्ध सोने व विविध डिझाइन्सच्या दागिन्यांमुळे जळगावने राज्यातही आपला दबदबा निर्माण केला होता; पण आता शुद्ध सोन्याच्या हमीबरोबरच नाशिकमध्ये तब्बल पाच हजारांहून अधिक बंगाली कारागीर नाशिकमध्ये स्थिरावल्यामुळे सराफ बाजारालासुद्धा त्याचा फायदा झाला आहे. एकाच ठिकाणी असलेली जळगावची दुकाने हीदेखील वैशिष्ट्ये या बाजारपेठेची होती; पण नाशिकमध्येही आता कॉलेज रोड ही सराफांची बाजारपेठ होत आहे. आता जुन्या नाशकातील बऱ्याच सराफांनी आपला व्यवसाय येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. कॉलेज रोडप्रमाणेच गंगापूर रोडवरही शो-रूम उघडली असून, भविष्यात येथेही मोठे शो-रूम येण्याची शक्यता आहे. नाशिकरोड, सिडको येथेही मोठ्या सराफांच्या शाखा होत आहेत. नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षांत मुंबई, पुणे येथील सराफांच्या व्यावसायिकांनीसुद्धा आपली शो-रूम थाटली आहेत, तर अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनीही आपला व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे नाशिक हे सोने खरेदीचे मोठे खरेदी केंद्र बनले आहे.

घाऊक व्यापारही वाढला

जळगाव हे घाऊक व्यापारासाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे येथून अनेक सराफ दुकानदार सोन्याचे दागिने घेत असत; पण आता हीच स्थिती नाशिकची झाली आहे. येथे अनेक जण घाऊक व्यापार करीत आहेत. त्याचप्रमाणे मुंबई जवळ असल्यामुळे त्याचा फायदाही येथे होतो.

डायमंड व्यवसाय जोरात

सोन्याप्रमाणेच डायमंड व्यवसाय येथे जोरात सुरू झाला आहे. नवग्रह व हिऱ्यांच्या विक्रीत येथे वाढ झाली आहे. डायमंड व्यवसाय मुंबईपासून सुरत, बडोदा, अहमदाबाद या भागात मुख्यत्वे असला तरी नाशिक हे या भागाला जवळचे आहे. महाराष्ट्रातील अनेक कुशल कामगार डायमंड क्षेत्रात गुजरातमध्ये काम करीत आहेत. त्यामुळे भविष्यात या व्यवसायाची येथे मोठी बाजारपेठ होण्याची शक्यता आहे.

नाशिक शहराची वाढलेली लोकसंख्या व शहरात असलेले पोटेन्शियल यामुळे येथे जळगाव, धुळ्याबरोबरच मुंबई व पुण्याच्या सराफांनी आपल्या शाखा उघडल्या आहेत. पाच हजारांहून अधिक बंगाली कारागीर नाशिकला आहेत.

- राजेंद्र ओढेकर, माजी अध्यक्ष, सराफ असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये सुरेल दिवाळी पहाट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे मखमलाबाद येथील यशोदामाई नाना-नानी पार्कमध्ये सकाळी ६ ते ७.३० या वेळेत सुरेल दिवाळी पहाट साजरी करण्यात आली.

सारंग गोसावी, सचिन म्हसाणे, सचिन विधाते, हेमंत भालेराव, स्मृती ठाकूर, सौरव आव्हाड, स्मिता आव्हाड यांनी अनेक लोकप्रिय गाणी सादर केली. एम टीव्ही कलर्स ऑफ यूथमधील गायन स्पर्धेतील उपविजेते सारंग गोसावी यांनी ‘मन शुद्ध तुझे गोष्ट आहे पृथ्वी मोलाची’ व ‘अवघे गरजे पंढरपूर’ ही गीते गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सर्व गायकांना प्रतीक कुलकर्णी यांनी तबल्यावर व उमेश खैरनार यांनी ऑक्टोपॅडवर साथ केली.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे ज्येष्ठ प्रशिक्षक स्वामी वैशंपायन, स्वामी संतोष, विजय हाके, असे अनेक मान्यवर व स्वयंसेवक आदी सुमारे सहाशे रसिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याचा निषेध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लष्करातील निवृत्त सुभेदार रामकिशन ग्रेवाल यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी दोनदा ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशभर आपला संताप व्यक्त केला आहे. नाशिक येथेही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, राहुल गांधी यांना अटक करुन सरकारने हुकुमशाही पध्दत अवलंबली आहे. ही गोष्ट लोकशाहीला घातक आहे. शहीद कुटुंबियांना मारहाण करणे व त्यांना भेटण्यास जाणाऱ्या राहुल गांधी यांना मज्जाव करणे ही गोष्ट निषेधार्हच आहे. केंद्र सरकार मनमानी कारभार करुन लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. राहुल गांधींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना अशी वागणूक देणे चुकीचे आहे. या देशात आंदोलन करण्याचा व न्याय मागण्याचा सर्व नागरिकांना समान हक्क व अधिकार आहे. या अधिकारावर सरकार सूडबुध्दीने वागणूक देऊन जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, माजी आमदार शोभा बच्छाव, उत्तम कांबळे, वत्सला खैरे, डॉ. हेमलता पाटील, शाहु खैरे, लक्ष्मण जायभावे, सुरेश मारु, बबलू खैरे, उध्दव पवार, पांडुरंग बोडके, राहुल दिवे, रईस शेख, वसंत ठाकूर, संतोष लोळगे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते सामील झाले होते.


पुतळ्याचे दहन

काँग्रेसने निदर्शने केल्यानंतर युवक काँग्रेसने मात्र आपला संताप व्यक्त करतांना भाजप सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यानंतर विविध घोषणा देऊन त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पदवीधर’ची नोंदणी लाखावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणी मोहिमेकडे सुरुवातीला पदवीधरांनी पाठ फिरवली असली, तरी दिवाळीच्या सुट्टीत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे नाशिक विभागाच्या एकूण नाव नोंदणीने एक लाखाचा टप्पा पार केला आहे. पदवीधर मतदार नावनोंदणीकामी दिवाळी पावल्याने आता प्रशासनाच्याही जीवात जीव आला आहे. विभागातून नगर जिल्ह्यात सर्वात जास्त पदवीधरांनी नावनोंदणी केली आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत या निवडणुकीची जुनी मतदार यादी रद्द ठरवत नव्याने यादी तयार करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले होते. त्यामुळे कमी वेळात हे अत्यंत जिकीरीचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर येऊन पडली होती. त्यासाठी विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील सुमारे ४०० केंद्रांवर नाशिक पदवीधर मतदार नोंदणीचे कामकाज सुरू झाले होते. परंतु, या नावनोंदणीकडे पदवीधरांनी सुरुवातीला पाठ फिरविली होती. त्यामुळे प्रशासनाने सरकारी सुट्ट्यांच्या दिवशीही मतदार नावनोंदणीसाठी विशेष मोहीम राबविली होती. परंतु, या मोहिमेलाही फारसा प्रतिसाद लाभला नव्हता.

दिवाळी पावली

सुरुवातीला पदवीधरांनी नावनोंदणीकडे चक्क पाठ फिरविल्याने पदवीधर मतदारसंघाची यादी पन्नास हजारांपर्यंत पोहचण्याबाबत शंका निर्माण झाली होती. परंतु दिवाळीच्या सुट्टीत मोठ्या संख्येने पदवीधरांनी नावनोंदणीचे कर्तव्य पार पाडल्याने आता एकूण नावनोंदणी १,०९,८२८ वर पोहचली आहे. आणखी दोन दिवसांत मोठ्या संख्येने पदवीधरांचे अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहिराणी अजूनही बोलीभाषेच्या कळपातच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अहिराणी भाषेला तिची म्हणून स्वतंत्र लिपी नाही. अजूनही ती बोलीभाषेच्या कळपातच आहे. अहिराणी बोलणारे, तिची परंपरा सांगणारे, तिच्या विषयी अभिमान बाळगणारे कोट्यावधी लोक आहेत. वर्षानुवर्ष आपल्या काळजात आणि ओठावर अहिराणी फुलवणारे आहेत. या भाषेला लिपी लाभली असती तर तिचा आणखी विकास झाला असता, पण तसे घडले नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले. खांदेश अहिराणी कस्तुरी मंच महाराष्ट्र आणि नाशिक महापालिका यांच्यातर्फे खांदेश साहित्य, सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते महोत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कालिदास कला मंदिर येथे झालेल्या या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक उमेशभाई राठी यांच्या हस्ते करण्यात आले. मी मराठी न्यूजचे सल्लागार संपादक तुळशीराम भोईटे, आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर गुरुमित बग्गा, अहिराणी अभ्यासक डॉ. उषा सावंत, सदाशिव माळी, मंचच्या महिला प्रदेशाध्यक्ष वंदना वनकर, विजया मानमोडे उपस्थित होते.

कांबळे म्हणाले, खान्देशाने जन्माला घातलेली अहिराणी ही अन्य वेगळ्या भाषांपेक्षा पूर्णतः वैशिष्ट्यपूर्ण अशी भाषा आहे. या भाषेच्या जन्मामध्ये अनेकांचा सहभाग असला तरी मराठीची भूमिका अधिक आहे. खान्देशला त्याचा एक भूगोल आहे, एक कृषी संस्कृती आहे. त्याचे एक अर्थकारण आहे. खान्देशची वस्त्रसंस्कृती, अलंकार संस्कृती, नृत्य कला सस्कृती आगळी-वेगळी आहे. अनेकांना ती मोहिनी घालते. अहिराणीच्या व्यासपीठावर अन्य भाषांना निमंत्रित करणे आनंददायी आणि आवश्यक आहे. त्यामुळे भाषा-भाषांमधला भगिनीभाव दृढ होतो.

उद्योजक राठी यांनी विविध पदार्थ एकत्र आल्यानंतर जशी चवदार मिसळ तयार होते, त्याचप्रमाणे विविध भाषा एकत्र आल्यानंतर त्यांच्या जो सुसंवाद होतो तो सर्वांना आवडणार असतो, असे सांगितले.

भोईटे यांनी बोलीभाषेतून बोलण्याचा आनंद आगळावेगळा असतो असे सांगितले. आमदार सानप यांनी बोलीभाषा टिकण्यासाठी त्यांचे संवर्धन होण्यासाठी अशा प्रकारच्या महोत्सवाची गरज असल्याचे सांगितले. उपमहापौर बग्गा यांनी शुभेच्छा दिल्या.

सांस्कृतिक क्षेत्रात चाळीस वर्ष योगदान देणारे विश्राम बिरारी यांना जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच योगेश शिरसाठ, अश्विनी कासार, अमोल थोरात, प्रकाश पाटील, आशा रंधे, नाना खेडीकर, रेखा महाजन, भैय्या पाटील, सुनील गायकवाड, पुष्पा ठाकूर, आबा पाटकरी, तनय मल्हारा, विजयराज पाटील, रामदास वाघ, डॉ. रमेश सूर्यवंशी, शाहीर शिवाजी पाटील, किशोर कुलकर्णी, पंकज निकम, सुभाष शिंदे, सुनील ढगे, रजनी घुगे यांना कलाभूषण, कलागौरव, खांदेश भूषण, साहित्यभूषण आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले. रेखा महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रेयवादाचे पॅच-अप; नंतर कौतुकसोहळा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

के. के. वाघ इंज‌िनीअरिंग कॉलेज ते आडगाव मार्गावरील उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ होण्याअगोदरच शिवसेना व भाजपमध्ये श्रेयावरुन जुंपल्यानंतर गुरुवारी त्यांच्यात पॅच-अप झाले. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी फोन करून झालेला गैरसमज दूर केला. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना कामाचे श्रेय देत एकमेकांकडून कौतुक करुन घेतले. पण हा वाद भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केलेल्या वक्तव्यामुळे झाल्याची बाबही समोर आली आहे. सानप यांनी भाजपच्या मेळाव्यात उड्डाणपुलाचे काम भाजपने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच झाले असे म्हटले. त्यानंतर शिवसेनेने व्हॉट्सअॅप व मेलचे ई-बाण सोडून माध्यमांना माहिती पुरवली व दोन्ही पक्षांत नंतर जुंपली.

आमदार फरांदे यांनी इंदिरानगर अंडरपासबाबत पाठपुरावा केला, तर उड्डाणपुलाचा प्रश्न खासदार हेमंत गोडसे यांनी सोडवला. त्यामुळे या कामांचे श्रेय दोघांना असल्याचे या नेत्यांनी कबूल केले. पण वादाची ठिणगी पडली ती भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी केलेल्या वक्तव्यामुळे. ही गोष्ट नंतर दोन्ही नेत्यांच्या लक्षात आली व त्यांनी आमने-सामने होणारा हा सामना गडकरी येण्याअगोदरच संपवला. केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या ५ रोजी या पुलाचे भूमिपूजन होणार आहे. त्यांच्याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुध्दा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर हा युतीमधील वाद रंगला तर सर्वांचीच पंचाइत होईल, यासाठी हे पॅच-अप करण्यात आले आहे. शिवसेनेने या श्रेयवादावर आक्रमक पवित्रा घेतला व त्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनीसुध्दा दोन वर्षे केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. पण एकमेकांचे काम दोघांना मान्य असूनही वाद का झाला, यामुळे नंतर दोन्ही नेते चक्रावले. त्यामुळे गुरुवारी फोनाफोनी झाली व गैरसमज दूर झाला.


खासदार हेमंत गोडसे यांनी उड्डाणपुलाच्या कामासाठी पाठपुरावा केला, तर मी इंदिरानगर अंडरपास व इतर कामांसाठी केला होता. या दोन्ही कामांमुळे अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे.

-देवयानी फरांदे, आमदार, भाजप


उड्डाणपुलाच्या संदर्भात आमदार देवयानी फरांदे यांचा फोन आला. त्यांनी अंडरपाससाठी मी प्रयत्न केले व उड्डाणपुलाच्या कामासाठी तुम्हीच पाठपुरावा केल्याचे सांगितले. त्यामुळे गैरसमज दूर झाला.

-हेमंत गोडसे, खासदार, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमजीरोडवर वाहतुकीचे तीनतेरा

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

स्मार्ट नाशिकमध्ये सध्या वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अपडेट होत असलेल्या नाशिक शहरात अनेक व्यवसाय देखील कमालीचे वाढत आहेत. मात्र, वाढते व्यवसाय आणि त्यामुळे साहजिकच वाढत ग्राहक यामुळे नाशिककरांना वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शहरातील एम.जी. रोड, वकिलवाडी तसेच गोळे कॉलनी परिसरात वाहन धारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मेहेर सिग्नलपासून मेनरोडपर्यंत अनेक लहानमोठ्या दुकानांची गर्दी झाली आहे. इथे असलेल्या अनेक व्यावसायिक कॉम्प्लेक्समध्ये पार्किंगची सुविधा नसल्याने वाहनधारक रस्त्यावर वाहने पार्क करत आहेत. रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांसोबत फळविक्रेते, लहान वस्तूंचे गाडे, खाद्य पदार्थ विक्रेते यांचीही दाटी बघायला मिळत आहे. सोबतच आजूबाजूला असणाऱ्या दुकानांचे माल घेऊन येणारे टेम्पो देखील वाहतुकीस अडथळा ठरत आहे. यामुळे वाहनधारकांसमवेत पादचाऱ्यांनाही या दाटीमधून रास्ता शोधावा लागत असल्याचं नाशिककर सांगतात. वकिलवाडीतील हॉटेल्स, प्रिंटिंग, मोबाइलची दुकाने व कॉम्प्लेक्स यांना पुरेशी पार्किंची सुविधा नाही. यामुळे याही भागात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अस्ताव्यस्थ पद्धतीने वाहनांची गर्दी या दोन्ही भागात होत असल्याने वाहन चालवणे अवघड झाले आहे.

भूम‌िगत पार्किंगची दैना

मेहेर सिग्नल जवळ असलेल्या जिल्हा परिषदेशच्या ग्राऊंडला लागून व्यवसायिकांचे कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्सच्या खाली भूमिगत पार्किंगची सुविधा आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून ही पार्किंग दयनीय अवस्थेत आहे. या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा तसेच सांडपाणी साचले आहे. ही पार्किंग पालिकेने सुधारित करून सुरू करावी, अशी मागणी नाशिककर करत आहेत.


टोइंग का म्हणून?
एमजी रोड, गोळे कॉलनी तसेच वकिलवाडी परिसरात पार्किंगची सुविधा नसल्याने वाहने रस्त्यावर पार्क केली जात आहेत. यावेळी ट्रॅफिक पोलिसांकडून बेकायदेशीर पार्किंग अंतर्गत ही वाहने टोइंग केली जातात. मात्र, मुळात पार्किंगची सुविधांच नसल्याने नाईलाजाने वाहनधारकांना वाहने रस्त्यावर लावावी लागत आहेत. मग वाहन टोइंग का म्हणून असा सवाल नाशिककर करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परतीच्या प्रवासात प्रवाशांचे ‘दिवाळे’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

दिवाळी सणाच्या निमित्ताने गावी आलेले नोकरदार, व्यावसायीक पुन्हा मुंबई, पुण्याकडे निघाले आहेत. मात्र शहर आणि तालुक्यातून मुंबई, पुणे, नाशिक, ठाण्याकडे जाण्यासाठी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याकडे अनेकांचा कल असतो. गेल्या दोन ते तीन दिवसात या खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट दरात २०० ते ५०० रुपये वाढ झाल्याने दिवाळीनंतर प्रवाशांचे दिवाळे निघत आहे.

दिवाळी सणाच्या सुट्टी निमित्ताने शहर व तालुक्यातून मुंबई, पुणे, नाशिक ठाणे येथे व्यवसाय, उद्योग, शिक्षण, नोकरी निमित्ताने स्थलांतरित झालेली अनेक जण गावाकडे येतात. आता सुट्ट्या संपत आल्याने गावाकडे आलेल्यांना परतीचे वेध लागले आहेत. मालेगाव शहरातून रेल्वेने प्रवास करण्यासाठी मनमाड गाठावे लागते. त्यापेक्षा शहरातून उपलब्ध असलेल्या ट्रॅव्हल बससेवेलाच अनेकांची पसंती असते. थोडे चार पैसे जास्त गेले तरी आरामदायी प्रवास होतो. या उद्देशाने बहुतांशी मुंबई, पुणेच्या दिशेने परतणारे प्रवाशी लग्झरी ने प्रवास करतात. यंदा देखील परतीच्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मालेगाव ते मुंबई, पुणे अशी सेवा देणाऱ्या सर्वच ट्रॅव्हल्सचे भाडे चांगलेच वाढले आहे. प्रवाशांची संख्या वाढल्याने गाड्यादेखील वाढवण्यात आल्या आहेत.

परतीच्या प्रवास आरामदायी व्हावा, यासाठी प्रवासी दोन तीन दिवस आधीच सीट आरक्षित करतात. मात्र तिकीट दरात २०० ते ५०० रुपये वाढ झाल्याने दिवाळीनंतर प्रवाशांचे दिवाळे निघत आहे. मालेगाव ते मुंबई एसटीचे भाडे किमान ३६० ते कमाल ५०० इतका आहे. मात्र या तुलनेत खासगी बससेवेचे दर कमालीचे वाढले आहे. मालेगाव ते मुंबईसाठी प्रवाशांना किमान ६०० ते कमाल एक हजार ५०० इतके जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. यातही एसी, स्लीपर, वायफाय यासारख्या अत्याधुनिक सुविधांच्या नावाने प्रवाशांना या दराने तिकीट घेणे भाग पडत आहे. अर्थात परतीच्या प्रवासात एसटीमध्ये देखील गर्दी असल्याने अनेकांनी हा महागडा प्रवास करणेदेखील पसंत केले आहे. रेड बस सारख्या ऑनलाइन बुकिंग साईटवरून तत्काळ तिकीट मिळत असल्याने चार पैसे गेले चालतील पण प्रवासात हाल नको व्हायला, असे म्हणून प्रवासी दिवाळी नंतरचा महागडा प्रवास करीत आहेत. मात्र यामुळे ट्रॅव्हल कंपनी दिवाळी साजरी करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकामात येणार आता फेरोसिमेंट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विविध प्रकारच्या इमारती, धरणे, रस्ते, महामार्ग इत्यादी बांधकाम करण्यासाठी आता राज्य सरकार फेरोसिमेंट तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. त्यासाठी एक हस्तपुस्तिका काढण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, त्याचे काम नाशिकच्या मेरीमध्ये होणार आहे. त्यासाठी एका समितीची स्थापनासुध्दा करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपद मेरीचे चिफ इंजिनिअर रवींद्र उपासनी यांच्याकडे देण्यात आले असून, दहा सदस्यांची ही समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे.

राज्यातील सरकारी बांधकामात ही पध्दत वापरली जाणार आहे. त्यासाठी या तंत्रज्ञानाची माहिती सर्व सरकारी अभियत्यांना व्हावी यासाठी मार्गदर्शक ठरणारी पुस्त‌िकाही नाशिकमध्ये तयार होणार आहे. त्यात फेरोसिमेंट तंत्रज्ञान, फेरोसिमेंट बांधकाम व दर विश्लेषण, पध्दती इत्यादी माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी ही समिती काम करणार आहे.

साधे-सोपे तंत्रज्ञान

विविध प्रकारच्या इमारती, धरणे, रस्ते महामार्ग इत्यादी बांधकाम करताना कुशल कारागीर अद्यावत बांधकाम साहित्य व योग्य गुण नियंत्रण यांची आवश्यकता असते. परंतु, प्रत्येक ठिकाणी या सर्वांची उपलब्धता होणे शक्य नसते. फेरोसिमेंट तंत्रज्ञान वापरल्यास या सर्व बाबींची आवश्यकता अल्प प्रमाणात असते. फेरोसिमेंट तंत्रज्ञान साधे व सोपे असून हे स्थापत्य अभियंत्यांसाठी पूरक तंत्रज्ञान आहे. त्यामुळे बांधकाम अधिक मजबूत होऊन खर्चही वाचवता येवू शकतो.


काय आहे फेरोसिमेंट तंत्रज्ञान

फेरोसिमेंट म्हणजे लोखंडी सळ्यांच्या वेल्ड केलेल्या सांगाड्यांवर घट्ट ताणून बसविलेल्या लोखंडाच्या बारीक तारांच्या जाळ्यात दाबून भरलेले मोयक्रो काँक्र‌िट होय. जगभर पारंपरिक बांधकामाची पध्दत पूर्णपणे बदलून फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या बांधाकामाचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानात आधी फ्रेमस्ट्रक्चर उभे करून त्यानंतर वीटकामाच्या भिंती उभ्या करण्याच्या एकदम विरुध्द आहे. आधी भिंती उभारुन त्यांच्या पोटात फ्रेमवर्क उभे करणे ही अत्यंत नाव‌िण्यपूर्ण पध्दत आहे.

तंत्रज्ञानाची उपयुक्तता

खडी, सिमेंट, माती, मुरुमाचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यावर उपाय शोधत फेरोक्रिट तथा फेरोसिमेंटचा शोध लावण्यात आला आहे. वापरण्यास सोपे व सर्वत्र वापर होत असलेले हे तंत्रज्ञान आहे. प्रचलित आरसीसी बांधकामाला योग्य पर्यावरणपूरक पर्याय म्हणून फेरोसिमेंट तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे. किफायतशीर अशा या बांधकाम पद्धतीचा प्रसार सर्वत्र वेगाने होत असून, त्यामुळे सरकारने त्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सिमेंटच्या कमी वापरामुळे कार्बनच्या उत्सरणात व लाकूड, मातीच्या विटांपासून मुक्तता होणार आहे.

फेरोसिमेंट बनवण्याचे प्रकार

फेरोसिमेंट बनविण्यास तीन प्रकारचे बांधकाम साहित्य लागते. एक सांगाडा वेल्ड करण्यासाठी लोखंडी सळ्या, दुसरे म्हणजे त्यावर बांधण्यासाठी बारीक तारांच्या जाळ्या, वेल्डमेश, चिकनमेशच्या स्वरुपात आणि तिसरे जाळ्यात दाबून भरण्यासाठी उच्च दर्जाचे घट्ट सिमेंट मॉर्टर.


तीनच कामगार लागतात

फेरोसिमेंट बनविण्यासाठी तीनच प्रकारचे कुशल कामगार लागतात. एक म्हणजे सांगाडा वेल्ड करणारा वेल्डर, दुसरा जाळ्या बांधणारा फिटर आणि तिसरा मॉर्टर भरणारा गवंडी. त्यामुळे कुशल कामगारांचा प्रश्नही या तंत्रज्ञानामुळे निकाली निघणार आहे.

समितीत नाशिकचे सहा जण

अकरा जणांच्या समितीचे अध्यक्ष मेरीतील रवींद्र उपासनी आहेत. त्यांच्याबरोबर सदस्य म्हणून नियोजन व जलविज्ञानचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, मेरीचे अधीक्षक अभियंता रा. वि. श्रीगिरीवार, म. श. बेंद्र, व्ही. पी. रामगुडे व वैज्ञानिक संशोधन अधिकारी अ. शा. महिरे हे पदसिध्द सदस्य सचिव असणार आहेत.

समितीची आताच स्थापना झाली आहे. त्यामुळे विविध सूचना घेवून कामाचा दर्जा, व्यावहारिकता याचा अभ्यास करुन फेरोसिमेंट तंत्रज्ञानाचा अहवाल सरकारकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर हस्तपुस्तिका तयार होईल. ती सर्वांना मार्गदर्शक ठरावी यासाठी ही समिती काम करेल.

-रवींद्र उपासनी, अध्यक्ष, फेरोसिमेंट तंत्रज्ञान अभ्यासगट समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवत्ता सुधारण्यासाठी आता गुरुजींचेही उड्डाण!

$
0
0

Jitendra.tarte@timesgroup.com

राज्याच्या घसरत्या शैक्षणिक गुणवत्तेला पुन्हा उचल देण्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर असलेल्या आशियातील पाच देशांमध्ये महाराष्ट्रातील गुरुजी अन् शिक्षण अधिकारी आता आंतरराष्ट्रीय दौरा करणार आहे. आतापर्यंत राज्यभरातून ३४० शिक्षकांनी शासनाच्या या प्रस्तावास तयारी दाखविली आहे. विशेष म्हणजे शासकीय उद्दीष्टांच्या पूर्तीसाठी असणाऱ्या या दौऱ्यासाठी शिक्षक स्व-कमाईतून खर्च करणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून घसरत्या गुणवत्तेला सावरण्यासाठी आता फडणवीस सरकारने शिक्षण विभागाला महाराष्ट्रास गुणवत्ता स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर पहिल्या तीन क्रमांकात आणण्याचे उद्द‌िष्ट दिले आहे. या उद्द‌िष्टाच्या पूर्तीसाठी राज्यात आंतरराष्ट्रीय स्तराच्या १०० शाळांच्या निर्मितीचाही संकल्प सरकारने सोडला आहे. या संकल्पपूर्तीसाठी आशियातील पाच देशांमध्ये उड्डाण करण्याची संधी आता गुरुजींना मिळणार आहे. मात्र, त्यांचे हे उड्डाण स्व-खर्चानेच होणार असल्याची तरतूद करून हुश्शार फडणवीसांनी ‘कॉस्ट कटींग’ ही साधले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शैक्षणिकदृष्ट्या राज्य पिछाडीवर पडत असल्याची बाब काही सर्वेक्षणांनी अधोरेखित केली. हे चित्र बदलण्यासाठी ज्ञानरचनावादावर आधारित काही उपक्रमांना शासनाने पाठबळ दिले. यात शासकीय शाळांवरील समाजाचा विश्वास वाढविण्यावर भर देण्यात आला होता.


शाळांच्या निर्मितीचा संकल्प!

प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट (पिसा) या आंतरराष्ट्रीय स्तरावरील चाचणीमध्ये सन् २०२१ साठी मुलांची सरासरी उत्तम वर्गात येण्यासाठी विद्या प्राधिकरणाच्या वेबसाईटवर संकल्प पत्र व ऑनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा उपयोग १०० दीपस्तंभ शाळांच्या निर्मितीसाठी होणार आहे.

‘पिसा’ मध्ये आशिया खंडातील सिंगापूर, तैवान (चीन), जपान, शांघाय (चीन) आणि साऊथ कोरिया व फिनलँड ही सहा आंतरराष्ट्रीय शहरे व देश आघाडीवर आहे. या उपक्रमांतर्गत या देशांना शिक्षकांना भेट देता येईल. यातही सिंगापूरला प्राधान्य देण्यात आले आहे.


फडणवीसांचं ‘कॉस्ट कटिंग’

राज्याचा ढासळता शैक्षणिक स्तर सुधारण्यासाठी स्थानिक गुरूजींना आशियातील पाच देशांच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्याची सुवर्णसंधी देताना मुख्यमंत्र्यांनी चतुराईने कॉस्ट कटिंगही केले आहे. ४० शिक्षकांची एक बॅच याप्रमाणे इच्छुकांना हे दौरे घडविले जातील. मात्र, शिक्षकांच्या स्व खर्चाने हा दौरा असणार आहे. यासाठी शासन कोणताही निधी उपलब्ध करून देणार नाही. या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शिक्षकांना www.research.net/r/teachersstudytour या लिंकवर माहिती अपडेट करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​वयोवृध्द कलाकारांची मानधनाअभावी हेळसांड

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध कला जिवंत ठेवणाऱ्या वयोवृध्द कलाकारांना सरकारतर्फे मिळणारे मानधन रखडल्याने उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये चकरा मारून हाती काही मिळत नसल्याने वयोवृध्द कलाकार हतबल झाले आहेत.

कीर्तन, भरुड, गोंधळ, शाहिरी अशा लोककला जिवंत रहाव्यात म्हणून अनेक कलाकारांनी आपली हयात घालविली आहे. या कला जिवंत ठेवण्याचे काम केले. पुढील पिढीला आपली कला अवगत व्हावी, यासाठी काही कलाकार आजही धडपडत आहेत. अशा ज्येष्ठ कलाकारांना मानधन देण्याची प्रथा काही वर्षापूर्वी राज्य सरकारने सुरू केली. सुरुवातीला यातून अनेक कलाकारांना नियमित मानधन मिळू लागले. त्यामुळे त्यांचे जगणे काही अंशी सुसाह्य झाले. सुरुवातीला मिळणारी रक्कम तुटपुंजी असली तरीही ते वेळेवर मिळत असल्याने घरखर्चाला हातभार लागत असे. सरकारतर्फे मिळणारे मानधन मिळवून घेण्यासाठी प्रत्येक कलाकाराला आपण केलेल्या कार्याचा अहवाल द्यावा लागत असे. हा अहवाल तलाठी, गटविकास अधिकारी यांच्यामार्फत पंचायत समितीत येऊन सरकारतर्फे नेमलेल्या समिती समोर ठेवला जातो. त्यानंतर त्या वयोवृध्द कलाकाराला मानधन सुरू होते. मानधनासाठीची समिती गठीत होणे अपेक्षित असते. ती समिती गेल्या काही वर्षांपासून गठीत न झाल्याने अनेक कलाकारांच्या मानधनाचा प्रश्न प्रलंबित आहे. तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात अशी समिती गठीत झाली होती. परंतु, राज्यात युतीचे नवीन सरकार आल्यानंतर अशी समिती गठीत करण्यात आलेलीच नाही. समिती गठीत होत नाही तोपर्यंत हा प्रश्न प्रलंबित रहाणार, अशी चिन्हे आहेत. समिती अहवाल देत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही, अशी भूमिका पंचायत समिती अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे.

..

पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष्य

समिती गठीत करण्याचे काम पालकमंत्र्यांचे आहे. समितीच्या स्थापनेसाठी अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले. परंतु, पालकमंत्र्यांनी या प्रकरणाबाबत फारसे लक्ष घातले नाही. पालकमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातले तर कलाकारांचा प्रश्न मार्गी लागू शकतो.

अनेक कलाकारांची उपासमार होत असून घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. याबाबत पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे. लवकरच त्याबाबत काही तरी तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.

- बी. मेघराज, शाहीर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज खान्देशात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११/५२, धुळे ते औरंगाबाद या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा शुभारंभ करण्यासाठी आज (दि.५) केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी हे धुळ्यात येत आहेत.
धुळे लोकसभा मतदारसंघातील रस्त्याच्या कामासाठी १५ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी या कामांसाठी नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

धुळे ते औरंगाबाद नवीन राष्ट्रीय आणि धुळे ते नागपूर महामार्ग चौपदरीकरणाचा भूमिपूजन सोहळा दुपारी अडीच वाजता जिल्हा पोलिस कवायत मैदानावर पार पडणार आहे. त्यानंतर गडकरी हे नाशिककडे प्रयाण करतील. या कार्यक्रमप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजन सोहळ्यानंतर सभा होणार असल्याची माहिती देण्यात आली. धुळ्यातील कार्यक्रमापूर्वी गडकरी हे नंदुरबारमधील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. दरम्यान, नितीन गडकरी यांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. पोलिस कवायत मैदानावर आकर्षक मंडप उभारण्यात आला आहे. गडकरी ज्या रस्त्याने कार्यक्रमस्थळी येणार आहेत, त्याच्या डागडुजीचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. दुभाजकांना रंगरंगोटी केली जात आहे. केंद्र किंवा राज्यातील मंत्र्यांच्या दौराकाळात शहरात अशारितीने विकासकामे होणार असतील, तर या मंत्र्यांचा दौरा दर सहा महिन्यांनी व्हावा. यानिमित्ताने अनेक रस्ते सुस्थितीत येतील, असा सूर आता धुळेकरांमधून उमटू लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसीबीच्या प्रलंबित खटल्यात नाशिक तिसरे

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet : @ArvindJadhavMT

नाशिक : अॅण्टी करप्शन ब्युरोचे (एसीबी) राज्यभरात तीन हजार २५१ खटले प्रलंबीत आहेत. परिक्षेत्रनिहाय प्रलंबित खटल्यांचा विचार करता नागपूरचा प्रथम क्रमांक लागतो. यापाठोपाठ पुणे आणि नंतर नाशिकचा तिसरा क्रमांक लागतो. प्रलंबीत खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी न्याय विभागासह एसीबीने आधुनिक कार्यपध्दतीचा स्वीकार करणे आवश्यक आहे. प्रलंबित खटल्यांचा ताण कमी झाल्यास तपासाची गुणवत्ता सुधारण्यास वाव मिळू शकतो.

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एसीबीची भूमिका महत्वाची आहे. एसीबीने रचलेले सापळे यशस्वी होणे तसेच संशयित दोषी ठरला जाणे महत्वाचे आहे. आजमितीस ७० ते ८० टक्के संशयित आरोपींची निर्दोष सुटका होते. हे चित्र नाशिकमध्येच नाही तर राज्यभरात दिसून येते. गेल्या काही वर्षांत खास एसीबीच्या खटल्यांसाठी विशेष कोर्टांची जास्त संख्येने नियुक्ती करण्यात आली आहे. आजमितीस नाशिक परिक्षेत्रात तब्बल ३१ विशेष कोर्टांत एसीबीचे खटले चालवले जातात. नाशिक परिक्षेत्रातील ४४३ खटले प्रलंबीत आहेत. यात अगदी १९९०पासूनच्या खटल्यांचा समावेश आहे. प्रलंबीत खटल्यांचा दबाव तपासाधिकाऱ्यासह न्यायपालिकेवरदेखील पडतो. ज्या खटल्यांचा निपटारा होतो त्यात निर्दोष सुटणाऱ्यांचे प्रमाण खूपच जास्त असते. त्यामुळे या कायद्यासह एकूण उठाठेवीचा फायदा होताना दिसत नाही. गृह विभागासह राज्य सरकारने या खटल्यांच्या जलद निपटाऱ्यासाठी आणखी मजबूत व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत सूत्रांनी व्यक्त केले.


नाशिकमध्ये ३१ विशेष कोर्ट

नाशिक परिक्षेत्रात नाशिकमध्ये सात, मालेगावात दोन, निफाड दोन, धुळे येथे पाच, जळगावला तीन, अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील दोन ठिकाणे असे नऊ, धुळे जिल्ह्यासाठी पाच तर नंदूरबारसाठी तीन अशा ३१ विशेष कोर्टांत एसीबीच्या खटल्यांची सुनावणी होते. नाशिक परिक्षेत्रात जानेवारी ते सप्टेंबर या काळात १२३ सापळे एसीबीने रचले असून, अन्य भ्रष्टचाराचे चार असे मिळून १२७ गुन्हे दाखल झाले आहेत. सापळ्यांच्या दृष्टीने नाशिकचा राज्यात दुसरा क्रमांक लागतो.



परिक्षेत्र- प्रलंबीत खटले

नागपूर- ५६३

पुणे-४७७

नाशिक-४४३

ठाणे-४२२

औरंगाबाद-४३९

अमरावती-३८३

नांदेड-३३३

मुंबई-१७१



नाशिक परिक्षेत्रातील खटले निकाली

वर्ष- २०१४-२०१५-२०१६

गुन्हे सिध्द-१७-२६-१४

निर्दोष सुटले-२३-६७-४५

एकूण-४०-९३-५९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंडित दसककर यांना कलागौरव पुरस्कार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे पंडित सुभाष दसककर व शिवानी मारुलकर दसककर यांचा आग्रा येथील मानाच्या कला गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

नुकत्याच झालेल्या पंडित रघुनाथ तळेगावकर फाऊंडेशन ट्रस्ट द्वारा, संगीत कला केंद्र आग्रा व प्राचीन कला केंद्र चंदिगढ आयोजित संगीत महर्षी पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत संमेलनात हा पुरस्कार देण्यात आला. निनाद असे कार्यक्रमाचे शीर्षक होते. यात नाशिकचे पं. सुभाष दसककर यांचे हार्मोनिअम वादन व शिवानी मारुलकर-दसककर यांच्या शास्त्रीय गायनाने सकाळच्या मैफलीत अप्रतिम रंग भरले.

तीन दिवस चाललेल्या या संगीत महोत्सवात सकाळच्या सत्रात पं. सुभाष दसककर यांनी अहिर भैरव या रागाने सुरुवात केली. गायकी व तंत्रकारी या दोनही अंगांचा योग्य समन्वय साधत आपले वादन रंगवत नेले. त्यानंतर मिश्र शिवरंजनीची धून वाजवून कार्यक्रमाची सांगता केली. हार्मोनिअम वादनावर त्यांच्या आलापीपासून झाला प्रकारापर्यंत लिलया बोटे फिरण्यावर व अफाट तयारीवर सर्व रसिकांनी भरभरुन दाद दिली. त्यांच्याबरोबर तबला संगत, युवा कलाकार अनुरत्न रॉय यांनी तितक्याच प्रभावीपणे केली.

त्यानंतर शिवानी मारुलकर-दसककर यांच्या गायनाची सुरुवात नटभैरव या रागाने झाली. त्यातील बडा ख्याल- ‘लालन तुमसे भली ना होत’ हा विलंबीत तीनतालात व मध्य लयीत तराणा सादर केला. त्यानंतर शुध्द सारंगमध्ये मुरवा करत ही रुपकमधील बंदिश गायली. शेवट खमाज रागातील दादरा सादर करुन त्यांनी आपल्या कार्यक्रमाची सांगता केली. भारदस्त आवाज, उत्तम तयारी, दमसास व गायनातील नजाकतीने सर्व रसिक तृप्त झाले. तबलासंगत पं. सुरेश हरिदास व हार्मोनिअम संगत सुभाष दसककर यांनी केली. नाशिकच्या या दोन्ही कलाकारांना संगीत महोत्सवात अतिशय मानाचा कलागौरव पुरस्कार राणी सरोज गौरीहर यांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामांचा उडणार बार

$
0
0

गडकरींच्या उपस्थितीत आज विविध कामांचे भूमिपूजन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आज (५ नोव्हेंबर) केंद्रीय भूपृष्ठ, परिवहन व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. विविध राष्ट्रीय महामार्गांचे विस्तारीकरण, तसेच नूतनीकरणाच्या या कामांमुळे येत्या काळात जिल्ह्यातील रस्त्यांचे नेटवर्क अधिक गतिमान आणि सशक्त होणार आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाशिक परिक्षेत्रातील विविध विकासकामांचा कोनशिला समारंभ केंद्रीय भूपृष्ठ, परिवहन व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा हस्ते ५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता के. के वाघ इंजिनीअरिंग कॉलेजच्या पटांगणात होणार आहे. या सोहळ्यात विविध पक्षाच्या नेत्यांची मांदियाळी अवतरणार असल्यामुळे या सरकारी कार्यक्रमात पक्षीय रंग फिका पडणार आहे. या सोहळ्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह खासदार व आमदारांमुळे हा सोहळा लक्षवेधी असणार आहे. या सोहळ्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, या कामात नाशिकसह पालघर व शिर्डी मतदारसंघातील विविध कामांचा शुभारंभही यावेळी करण्यात येणार आहे. श्रेयवादावरून पॅचअप झाल्यामुळे भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची हजेरी या कार्यक्रमात असणार आहे. त्याचप्रमाणे या सोहळ्यात सन्मानीय अतिथी म्हणून आमदार बाळसाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, डॉ. सुधीर तांबे, हेमंत टकले, जयंत जाधव, डॉ. अपूर्व हिरे, अनिल कदम, शेख असिफ शेख रशीद, योगेश घोलप, नरहरी झिरवाळ, डॉ. राहुल आहेर, छगन भुजबळ, निर्मला गाहवत, पंकज भुजबळ, जीवा पांडू गावित, दीपिका चव्हाण, राजाभाऊ वाजे, स्नेहलता कोल्हे तसेच महापौर अशोक मुर्तडक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंबळे हे उपस्थित राहणार आहेत.

या कामांचे भूमिपूजन

या समारंभात नाशिक जिल्ह्यातील के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेज ते आडगाव व ओझर ते पिंपळगाव महामार्गावरील उड्डाणपुलासह विविध कामांचा शुभारंभ केला जाणार आहे. त्याचप्रमाणे पालघर येथील रस्त्याचे काम, सिन्नर-शिर्डी पालखी मार्गाचे चौपदरीकरण, नाशिक-जव्हार रस्ता, त्र्यंबकेश्वर मोखाडासह विविध रस्त्याचे कामाचाही शुभारंभ होणार आहे. त्यामुळे विशेष उपस्थिती म्हणून पालखरचे खासदार चिंतामन वंगा व शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्याचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण व हेमंत गोडसे यांचीही उपस्थिती या सोहळ्यात राहणार आहे.

जागेच्या वादाचेही सावट

द्वारका सर्कलला बायपास करून नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक थेट जिल्हा बँकेसमोरील उड्डाणपुलावर नेण्याचे काम वादात सापडण्याची चिन्हे असल्यामुळे त्याचेही सावट या कार्यक्रमावर असणार आहे. या बायपाससाठी घेतली जाणारी जागा महापालिकेची असून, सध्या या जागेवरील एक मंदिर स्थलांतरणासह ३३ जागा मालकांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतल्याने संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे याबाबत मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मात्र कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

ट्रॅफिक नॉलेज हबचाही शुभारंभ

गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिडके कॉलनीतील चिल्ड्रन ट्रॅफिक हब एज्युकेशन पार्कमध्ये शनिवारी सकाळी ११ वाजता या हबचे उद्‍घाटन होणार आहे. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी भावी पिढीलाच प्रशिक्षित करणारे धडे या हबमध्ये दिले जाणार आहेत. यामध्ये ट्रॅफिक मॅनेजमेंटचे शिक्षण पुस्तक, ऑडिओ, व्हिडीओ डीव्हीडी सीडीच्या माध्यमातून दिले जाणार आहे. देशातील ही पहिली संकल्पना असून, त्यासाठी नाशिक फर्स्टच्या अॅडव्हान्टेज नाशिक फाउंडेशनने प्रयत्न केले आहेत.

नाशिकला आज मंत्र्यांची वर्दळ

सहा मंत्री व एक विरोधी पक्षनेत्याबरोबरच चार खासदार व १९ आमदारांच्या उपस्थितीमुळे शासकीय विश्रामगृहातही नेत्यांसह कार्यकर्त्यांची गर्दी असणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात होणाऱ्या कृषी परिषदेसाठी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे हे उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय मंत्र्यांचे विविध खासगी व काही सरकारी अधिकारी कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. फुंडकर नाशिकच्या कार्यक्रमाबरोबरच पिंपळगाव येथे सायंकाळी ५ वाजता ग्रामसमृध्दी कृषी गौरव सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे द्राक्ष व भाजीपाला पॅकिंग शेडलाही ते भेट देणार आहेत. सदाभाऊ खोत हे कृषी व पणन विभागातील जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images