Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कोर्टाच्या निर्देशांकडे दुर्लक्षानेच फटाका दुर्घटना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळी, तसेच इतर काळातही रहिवाशी भागात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा अवैध साठा केला जातो. फटाक्यांचा साठा व वापर याबाबत स्फोटके कायदा, १८८४ व २००८ च्या तरतुदींचे कडक पालन करण्याचे आदेश हायकोर्टासह सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मात्र, क्षणिक फायद्यासाठी याकडे दुर्लक्ष केले जाते. पोलिस व महापालिका प्रशासन कारवाई करीत नाही. त्यामुळे औरंगाबादसारखी भीषण दुर्घटना घडली. कोर्टाच्या आदेशाकडे कानाडोळा करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई व्हावी, अशी मागणी हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या चंद्रकांत लासुरे यांनी केली आहे.

फटाक्यांचा अवैध साठा आणि त्याचा वापर याविषयी सुसूत्रता आणण्यासाठी शहरातील चंद्रकांत लासुरे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. वेळोवेळी त्यांनी पोलिस, तसेच महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यांना अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी थेट हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान अवघ्या १५ दिवसांपूर्वी हायकोर्टाने महापालिकेसह पोलिसांना फटकारत कायद्याची अंमलबजावणी करताना एकमेकांकडे अंगुलीनिर्देश केलेला खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. फटाक्यांच्या दुर्घटना रोखण्यासाठी पोलिस व महापालिका प्रशासनाने काय केले, याचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले होते. हायकोर्टाचा हा आदेश राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रांसाठी लागू करण्यात आला होता. वास्तविक फटाके विक्रेत्यांच्या दुकानांची रचना कशी असावी, याविषयी वेळोवेळी कोर्टाने, तसेच प्रशासनाने सूचना केल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. औरंगाबादच्या घटनेने हे सिद्ध केले असून, या घटनेसाठी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी लासुरे यांनी केली. नाशिक शहरातही नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिस आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी निर्देश दिले होते. त्या निर्देशांचे पालन फटाका विक्रेत्यांसह महापालिकेने केले काय, याविषयी हायकोर्टात पुरावे सादर करणार असल्याचे लासुरे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आम्हालाही हवाय मतदानाचा हक्क

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात १६ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत एक लाख ८५ हजार ९३६ नवमतदारांनी नोंद केली आहे. या अर्जांच्या छाननीनंतर पाच जानेवारी रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नवीन मतदारांची नोंदणी करण्याबरोबरच नावात बदल करणे, पत्त्यामध्ये बदल करणे, दुबार आणि मयत मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज स्वीकारण्यात आले. १६ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विशेष मोहीम राबविण्यात आली. सुरुवातीला १४ ऑक्टोबरपर्यंत या मोहिमेची मुदत होती. मात्र, ही मुदत एक आठवड्याने वाढविण्यात आली. २१ ऑक्टोबर रोजी ही मुदत संपली असून, जिल्ह्यात एक लाख ८५ हजार ९३६ नवमतदारांनी अर्ज केले आहेत. यामध्ये एक लाख ६२ हजार २ पुरुषांनी, तर ७९ हजार ७२९ महिलांनी मतदार अर्ज भरले आहेत. सध्या जिल्ह्यात ४० लाख २३ हजार ५४९ इतके मतदार आहेत. नाशिक शहरातील चारही मतदारसंघांत मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करण्यात आली. नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक ४९ हजार २२१ नवमतदारांनी अर्ज केले आहेत. त्याखालोखाल नाशिक पूर्वमध्ये २८ हजार १०६ मतदारांनी नोंदणी केली आहे. सर्वांत कमी म्हणजे २०४३ मतदारांची नोंदणी सुरगाणा तालुक्यात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगवेगळ्या अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

नाशिक-पुणे रस्त्यावर गांधीनगर प्रेस वसाहतीत शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अपघात झाला. अपघातात कन्हैया रवींद्र जगदाळे (वय २३) या तरुणाचा मृत्यू झाला. गांधीनगर प्रेस वसाहतीत राहणारा जगदाळे पंचशीलनगर, टाकळीगाव येथे राहणाऱ्या अक्षय भीमराव भालेराव याच्या दुचाकीवर (एमएच १५/ एझेड २६०८) नाशिककडून नाशिकरोडच्या दिशेने प्रवास करीत होते. नासर्डी पुलाजवळील सिटीकेअर हॉस्पिटलजवळ भरधाव असलेली मोटारसायकल स्लीप झाली. यामुळे मागे बसलेला जगदाळे गंभीर जखमी झाला. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना जगदाळेचा मृत्यू झाला. या प्रकरणी गौरव मधुकर जाधव याने दिलेल्या तक्रारीनुसार भद्रकाली पोलिसांनी अक्षय भालेरावविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पानसरे तपास करीत आहेत.

अपघाताची दुसरी घटना पाथर्डी वडनेर रोडवरील दर्ग्यासमोर शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. या घटनेत अंबड एमआयडीसी परिसरातील शांतीनगर झोपडपट्टीतील डोंगर बाब चौक येथील विजय भास्कर आवळे (वय २६) या तरुणाचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी आवळे दुचाकीने (एमएच १५/ईटी ८३९०) वडनेर गेटकडून पाथर्डी चौफुलीकडे जात होता. दरम्यान, पाथर्डी गाव चौफुलीकडून वडनेर गेटकडे भरधाव जाणाऱ्या दुचाकीने (एमएच १५/एफए २३८५) आवळे यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. यात आवळे गंभीर जखमी झाला. अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भास्कर देविदास आवळे (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसांनी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाके विक्रीत ५० टक्के घट

$
0
0

नागरिकांचा खरेदीस अल्प प्रतिसाद; विक्रेते हवालदिल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीचा सण म्हणजे फटाक्यांची आतषबाजी हे काही वर्षांपूर्वीचे समीकरण आता पूर्णतः बदलले आहे. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यावर आज प्रत्येकाचा भर आहे. त्यामुळेच यंदा फटाके खरेदीला नाशिककरांनी अल्प प्रतिसाद दिला असून फटाके विक्रेते मात्र हवालदिल झाले आहेत. यंदा ५० टक्क्यांनी विक्री घटली असल्याची माहिती नाशिक फटाका असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली.

दिवाळी साजरी करताना फटाक्यांचा होणारा अतिवापर, आतषबाजी यामुळे सर्वच सजीवांना कोणत्या ना कोणत्या हानीला सामोरे जावे लागते. फटाके उडविणे अनेकांच्या जीवावर बेतले असल्याचीही अनेक उदाहरणे दिवाळीदरम्यान घडतात. त्याचबरोबर पर्यावरणाचा मोठा ऱ्हास या फटाक्यांमुळे होत असतो. या व अशा अनेक बाबींविषयी समाजात होत असलेल्या प्रबोधनामुळे फटाक्यांकडे नागरिकांनी पाठ फिरवली.

फटाकेमुक्त दिवाळी साजरी करुन पर्यावरण संवर्धनास हातभार लावण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला गेला. दरम्यान, शाळांमध्येही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये वारंवार प्रबोधन करून त्यांच्यात पर्यावरण संवर्धनाचे बीज रोवण्यात आले. होणाऱ्या नुकसानाची जाणीव त्यांना करून दिली जात असल्याने चिमुकल्यांनी फटाके उडविण्याचा हट्ट कधीच सोडला आहे. परिणामी, यंदा दिवाळी खऱ्या अर्थाने फटाकेमुक्त साजरी करण्यात आली.

याचा मोठा फटका फटाका विक्रेत्यांना मात्र बसला. विक्रीसाठी आणलेल्या फटाक्यांचे पुढे काय करायचे, हा प्रश्न त्यांना सतावत असून गुंतवलेला पैसादेखील मिळणे मुश्किल झाले आहे. उरलेला माल ठेवायचा कुठे, या प्रश्नामुळे व्यथित होत मोठ्या विक्रेत्यांना कमी दरातच फटाके देऊन टाकण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी हलाखीचीच ठरली आहे.


नागरिक पर्यावरणाविषयी जागरुक होत असल्याने फटाके खरेदीला कमी प्रतिसाद मिळाला. आम्ही चायनीज फटाक्यांवर बंदी आणली होती. मात्र काही लोकांना हेच फटाके आकर्षित करत असल्याने इतर फटाक्यांची विक्री झाली नाही.

– जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, नाशिक फटाका असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोभावे ‘लक्ष्मी’पूजन

$
0
0

शहरात दिवाळीचा उत्साह; नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी दिवसभर गर्दी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दीपमाळांची रोषणाई, पणत्यांचा झगमगाट, दारासमोरच्या रांगोळ्या, फटाक्यांच्या आतषबाजीत रविवारी (दि. ३०) लक्ष्मीपूजन उत्साहात करण्यात आले. यानिमित्ताने घराघरात, दुकानात, कार्यालयात लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मंद‌िरांमध्येही स्त्रीसूक्त व महालक्ष्मीच्या पाठाचे आयोजन करण्यात आले.

लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी शनिवारीच (दि. २९) पासून शहरातील बाजारपेठा फुलल्या होत्या. रविवारीही खरेदीचा ओघ कायम होता. पुजेसाठी लागणाऱ्या केरसुण्या, मीठ, झेंडूची फुले यांना मोठ्या प्रमाणात मागणी होती. शहरातील रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, अशोक स्तंभ, महात्मा गांधी रोड, सातपूर कॉलनी, सातपूर गाव, सिडकोतील स्टेट बॅँक परिसर, नाशिकरोडच्या उड्डाण पुलाखाली त्याच प्रमाणे देवळाली गाव येथे फुले विक्रेत्यांनी पहाटेपासून झेंडू व अन्य फुलांच्या विक्रीची दुकाने मांडली होती.

दिवसभर घराघरात फुलांचे हार, गाड्यांची सजावट सुरू होती. त्याचप्रमाणे पूजेसाठी लागणाऱ्या लाह्या, बत्ताशे व बोळक्याची खरेदी महिलांकडून केली जात होती. बहुतांश नागरिकांनी दिवसभर मुहूर्त असला तरी सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले. रविवार पेठेतील व्यापाऱ्यांनीही नेहमीच्या प्रथेप्रमाणे सायंकाळी लक्ष्मीपूजन व चोपडी पूजन केले व एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

या वेळी धने, गुळ, लाह्या व पेढ्यांचा प्रसादाचे वाटप करण्यात आला. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्याची प्रथा असल्याने शहरातील सराफांची दुकाने, इलेक्ट्रॉनिक दुकाने, मोबाइल शॉपी, गाड्यांचे शोरूम ग्राहकांनी भरलेले दिसत होते.सकाळी अनेक महिलांनी आपल्या घरासमोर मोठ्या रांगोळ्या काढल्या त्य़ाच प्रमाणे पुरुष मंडळी देखील घराच्या दारांना तोरणं बांधतांना दिसत होती. पूर्वी घराघरात फराळ तयार केला जात असे त्यासाठी आधीपासून तयारी करावी लागत होती. मात्र सध्याच्या जमान्यात घरातील स्त्रीयांना वेळ नसल्याने अनेकांनी फराळ्या जिन्नस बाहेरुनच खरेदी करणे पसंत केले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत फराळाच्या खरेदीचा ओघ कायम होता. जुन्या पोलिस आयुक्तालयाजवळ असलेल्या तिबेटियन मार्केटमध्येही कपडे खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. रोजच्या वस्तुंसोबतच अनेकांनी थंडीचे कपडेही खरेदी केले.

आज पाडवा

कार्तिक शुद्ध प्रतिपदा (दिवाळी पाडवा). श्री विष्णूने ही तिथी बळीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला ‘बलिप्रतिपदा’ म्हटले जाते. यादिवशी पंचरंगी रांगोळीने बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात.

यानंतर बलिप्रित्यर्थ दीप अन् वस्त्रे दान करतात. प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. या दिवशी पक्वान्नांचे भोजन करतात. लोक नवी वस्त्रावरणे नेसून सर्व दिवस आनंदात घालवितात. याचदिवशी गोवर्धनपूजा करण्याचीही प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा आणि फुले खोचतात. श्रीकृष्ण, इंद्र, गायी अन् वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करत मिरवणूक काढतात.

महापालिकेत लक्ष्मीपूजन

नाशिक : महापालिकेच्या वतीने लक्ष्मीपूजनाचा रविवारी (दि. ३०) कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानिमित्त कोषागारातील तिजोरीचे महापौर अशोक मुर्तडक यांनी सपत्निक तसेच आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या हस्ते विधीवत पूजन करून लक्ष्मीपूजन करण्यात आले. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन कोषागार येथे झालेल्या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती सलिम शेख, गटनेते तानाजी जायभावे, अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, आर एम बहिरम, रोहिदास दोरकुळकर, शहर अभियंता सुनील खुने आदींसह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ...तर शुभ्र शिधाप‌त्रिका मिळवा!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे, त्या शिधापत्रिकाधारकांनी सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ न घेणे अभिप्रेत असून, त्यांनी तत्काळ स्वेच्छेने सवलतीच्या दरात अन्नधान्य नाकारावे व तहसील कार्यालयातून शुभ्र शिधापत्रिका प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन देवळ्याचे तहसीलदार कैलास पवार यांनी केले आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळविण्यासाठी उत्पन्न मर्यादा विहित करण्यात आली आहे. त्यानुसार वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्या कुटुंबांकडे शुभ्र शिधापत्रिका असणे व त्यांनी सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ न घेणे अभिप्रेत आहे. अशा कुटुंबांनी केशरी किंवा पिवळी शिधापत्रिका बाळगून त्याद्वारे शिधावस्तूचा लाभ मिळविणे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र शासन (अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग) यांच्याकडील शासन निर्णय १३ ऑकटोबर २०१६ अन्वये स्वीकारण्यात आलेल्या धोरणानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत अन्नधान्याचा लाभ घेत असलेल्या नागरिकांना सवलतीच्या दरात मिळणारे धान्य स्वेच्छेने नाकारण्याचा पर्याय शासनाने उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार ज्या केशरी अथवा पिवळ्या शिधापत्रिकाधारकांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न एक लाखांपेखा जास्त आहे, अशा सर्व शिधापत्रिकाधारकांनी त्यांची केशरी अथवा पिवळी शिधापत्रिका तहसील, धान्य वितरण कार्यालयात तत्काळ जमा करून शुभ्र शिधापत्रिका प्राप्त करून घ्यावी, तसेच सवलतीच्या दरात मिळणारे धान्य स्वेच्छेने नाकारण्याचा पर्याय स्वीकारावा. सवलतीच्या दरात मिळणारे अन्नधान्य आपण स्वेच्छेने नाकारल्यास सदर अन्नधान्य खऱ्या अर्थाने गरजू असलेल्या शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे.

भविष्यात होणाऱ्या अपात्र शिधापत्रिका शोधमोहिमेत वार्षिक एक लाखांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांकडे केशरी अथवा पिवळी शिधापत्रिका असल्याचे आढळून आल्यास व सदर शिधापत्रिकाद्वारे शिधावस्तूंचा लाभ घेत असल्याचे आढळून आल्यास अशा शिधापत्रिकाधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे तहसीलदार कैलास पवार, धान्य पुरवठा अधिकारी ए.जी. गावित यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावत्र पित्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गांजा पिलेल्या सावत्र पित्याने १४ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी, त्याची पत्नी व १४ वर्षीय मुलगी जयभवानी रोड परिसरातील फर्नांडिसवाडीत राहतात. पती पत्नीचा हा दुसरा विवाह असून, पहिल्या लग्नानंतरची मुलगी आईसोबतच राहते. शुक्रवारी रात्री ४५ वर्षीय संशयित आरोपी गांजा पिऊन आला. रात्री ११ वाजता त्याने भांडणास सुरुवात केली. पीडित मुलीला त्याने आपल्यासोबत राहण्यास सांगितले. रात्री दोन ते तीनच्या सुमारास सावत्र पित्याने पीडित मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार बाजूलाच झोपलेल्या पत्नीच्या लक्षात आला. तिने या घटनेला विरोध केला. संशयित आरोपीने मायलेकींना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तुम्हाला जिवंत सोडणार नाही, असा दम दिला. यानंतर पीडित मुलीने आपल्या आईसह उपनगर पोलिस स्टेशन गाठून सावत्र पित्याविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात विनयभंग, तसेच लहान बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यातील कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

बनावट इअरफोन विक्री

नामांकित कंपनीचे बनावट इअरफोन विक्री करणाऱ्या प्रधान पार्कमधील भरत मोबाइल व रामदेव मोबाइल या दुकानांवर छापा टाकत पोलिसांनी ७२ हजार ९४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही दुकानमालकांवर गुन्हा दाखल करून सरकारवाडा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

या बाबत कंपनीचे प्रतिनिधी अजय दत्तात्रेय डापसे यांनी फिर्याद दिली आहे. प्रधान पार्कमधील या दोन्ही दुकानांत नामांकित कंपनीच्या नावाखाली बनावट इअरफोन्सची विक्री होत असल्याची माहिती डापसे यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी पुराव्यासह ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी केलेल्या तपासणीत ही बाब उघड झाल्याने भरत नेथीराम पटेल आणि प्रकाश कसनाराम चौधरी या दुकानमालकांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी फसवणूक, कॉपीराइट अॅक्ट १९५७ च्या ४१ आणि ६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववीची पुस्तके बदलणार

$
0
0

गणित, विज्ञान, इतिहास पुस्तकांचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा आणि विज्ञान, भाषा या विषयातील बदलत्या परीक्षा पद्धतीशी सांगड घालता यावी, यासाठी आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीची पुस्तके बदलण्यात येणार आहेत. पुस्तकांच्या नव्या रचनेत रचनावादावर भर देण्यात आला आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० नुसार या पुस्तकांमध्ये बदल करण्यात येत आहेत.

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ या चालू वर्षात सहावीच्या पुस्तकापर्यंत बदल करण्यात आले होते. मात्र यंदा इयत्ता सातवीच्या त्याचबरोबर इयत्ता नववीच्या पुस्तकांचा अभ्यासक्रमही बदलण्यात येणार आहे. यात मुख्यतः गणित, विज्ञान, इतिहास या पुस्तकांचा समावेश असणार आहे. नववीच्या पुस्तकातील महत्त्वाचा बदल म्हणजे यात स्वातंत्र्योत्तर इतिहासाचा समावेश असणार आहे. तर भाषा विषयाकरिता प्रश्नपत्रिकेऐवजी कृती पत्रिका तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये विकसित करण्याचा प्रयत्न यामागे आहे. नव्या रचनेत इयत्ता सातवी ते दहावीपर्यंत अभ्यासक्रमात एकसंधता आणण्यावरही भर देण्यात आला आहे. आठवी पर्यंतच्या अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी सामान्य तर नववी व दहावीची काठिण्यपातळी जास्त असल्याचा आरोप होत होता. यामध्ये सुसूत्रता आणण्याचाही प्रयत्न या रचनेत करण्यात आला आहे.इयत्ता पहिली ते ज्यूनिअर कॉलेज स्तरांमध्ये अभ्यासक्रमांच्या निर्मितीसाठी यापूर्वी दोन संस्थांकडे विभागून जबाबदारी होती.

यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्या परिषदेच्या माध्यमातून अभ्यासक्रम तयार करण्यात येत होता. प्रत्यक्षात निर्मितीचे काम बालभारतीकडून होत होते. आता मात्र इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत निर्मितीसाठी एकाच अभ्यासमंडळाकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता कोठेही मिळणार केरोसिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खुल्या बाजारात केरोसिन आता सहजगत्या उपलब्ध होऊ शकणार आहे. केरोसिन वापरावरील नियंत्रण आणि कमाल किंमत निश्‍चिती धोरणात केंद्र सरकारने सुधारणा केली असून, सार्वजनिक केरोसिनचा साठा, वाहतूक आणि विक्री नियंत्रणमुक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता केवळ रेशन दुकाने किंवा केरोसिन परवानाधारकांकडेच नाही तर कुठल्याही दुकानात केरोसिन सहजरीत्या उपलब्ध होऊ शकणार आहे. मात्र, कोटा कमी केल्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या केरोसिन परवानाधारकांसाठी हा निर्णय घातक ठरेल, असे बोलले जाऊ लागले आहे.

राज्य सरकारने नुकतेच याबाबतचा अध्यादेश काढला आहे. बाजारात केरोसिनची समांतर व्यवस्था असावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. केरोसिन नियंत्रणमुक्त केल्यामुळे आता परवानाधारक, रास्त भाव दुकानदारांसह खासगी व्यक्ती आणि दुकानांमध्येही केरोसिन पुरवठा, वितरण, खरेदी-विक्री करता येणार आहे. अल्प उत्पन्न, दारीद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय कार्डधारकांनाच सरकारकडून सवलतीच्या दरात केरोसिन दिले जाते. घरात गॅस कनेक्शन असलेल्या कुटुंबांनाही केरोसिन देणे सरकारने केव्हाच बंद केले आहे. परिणामी, केरोसिन परवानाधारकांकडील रॉकेलचा कोटाही बराच कमी झाला आहे. केरोसिन परवानाधारकांसह, रास्त भाव दुकानदारांनाही मिळणारे कमिशन अगदीच कमी आहे. त्यात उदरनिर्वाह करणेही कठीण झाल्याची तक्रार केरोसिन परवानाधारकांनी अलीकडेच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे केली होती. गॅस वितरणाचे सबसेंटर्स द्यावेत, अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली आहे. एकीकडे ते मेटाकुटीला आले असताना आता तर खुल्या बाजारात केरोसिनची विक्री होणार असल्याने केरोसिन परवानाधारकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

महाराष्ट्र केरोसिन डीलर्स लायसेन्सिंग ऑर्डरमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार समांतर केरोसिन बाजार व्यवस्थेंतर्गत फ्री-सेल केरोसिनचा पुरवठा, वितरण, खरेदी-विक्री अशा सर्वच बाबी नियंत्रणमुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परवान्याशिवायही केरोसिनची विक्री होऊ शकणार आहे. शिधापत्रिकाधारकांना १० रुपये लिटरने दिले जाणारे केरोसिन काळ्या बाजारात ५० ते ६० रुपये लिटर दराने विक्री होत असे. मात्र, आता खुल्या बाजारात केरोसिन उपलब्ध होणार असल्याने केरोसिनचा काळा बाजार रोखणे शक्य होणार आहे. मात्र, खुल्या बाजारातील केरोसिनची पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळ होण्याचीही शक्‍यता बळावली आहे.

परवानाधारकही करू शकतील फ्री-सेल विक्री

परवानाधारक केरोसिन विक्रेते, रास्त भाव दुकानदार, शिधावाटप दुकानांमधूनही फ्री सेल केरोसिनची विक्री करण्याची परवानगी सरकार दिली आहे. मात्र यामुळे सवलतीचे केरोसिनही खुल्या बाजारातून विकले जाण्याची शक्यता आहे. खुल्या बाजारातील केरोसिन आणि सवलतीचे केरोसिन यांची भेसळ करता कामा नये, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसे होणार नाही, याची जबाबदारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना‌शकात हुडहुडी; पारा ११.२ अंशांवर

$
0
0

नाशिक : काही महिन्यांपूर्वी उन्हाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या नाशिककरांना आता थंडीचा सुखद अनुभव मिळू लागला आहे. दिवाळी सणाचा आनंद लुटणाऱ्या नाशिककरांना थंडीचा कडाका जाणवू लागला असून, नाशिकमध्ये चालू हंगामातील यंदाचे सर्वात कमी ११.२ अंश सेल्स‌िअस एवढे तपमान नोंदविले गेले आहे.

अवकाळी पाऊस, उन्हाचा कडाका आणि थंडीचा घसरणारा पारा याचा अनुभव नाशिककर नेहमीच घेत असतात. यंदाही कडाक्याची थंडी पडणार, असे संकेत ऑक्टोबर अखेरमध्येच मिळू लागले आहेत. रविवारी नाशिकमध्ये या हंगामातील सर्वात कमी म्हणजेच ११.२ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे. शनिवारी हेच तपमान ११.४ अंश सेल्सिअस ऐवढे नोंदविण्यात आले होते. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नाशिककरांना थंडीचा अनुभव येऊ लागला आहे. त्यामुळे उबदार कपडे पुन्हा बाहेर निघू लागले आहेत. गेल्या १० दिवसांत तपमानात अनेकदा चढउतार झाले. कमाल तपमान ३०.१ ते ३२.२ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले गेले. तर किमान तपमान देखील ११.२ ते १७.० या दरम्यान राहीले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीत ५०० कोटींची उलाढाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीत नाशिककरांनी जोरदार खरेदी केल्यामुळे बाजारपेठेत गेल्या दहा दिवसांत ५०० कोटींहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वेळी दुष्काळाचे सावट असल्यामुळे त्याचे पडसाद नकळत बाजारेपठेवर पडले. पण यावर्षी पावसाचे जोरदार झालेले आगमन, सातव्या वेतन आयोगाचे पैसे व औद्योगिक कामगारांना मिळालेला बोनस यामुळे बाजारपेठेत दहा दिवसांत प्रचंड गर्दी होती. पाडव्याच्या मुहूर्ताबरोबरच भाऊबीजेच्या निमित्ताने खरेदीला उधाण आले होते.

ग्राहकांना आकर्षक योजना, नव्या तंत्रज्ञानाने भरपूर उत्पादने आणि बँका व फायनान्स कंपन्यांकडून मिळणाऱ्या कर्जसुविधांचा फायदा घेत ग्राहकांनी खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. यंदा दिवाळी पाडव्याच्या खरेदीत मोबाइल आणि सोन्याबरोबरच ऑटोमोबाइल बाजारपेठेत मोठी उलाढाल झाल्याचे चित्र होते. सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी सराफांच्या शोरुमध्ये दिसत होती. त्यामुळे सोनेबाजारही उजळून निघाला. शहरातील मोठ्या शोरुमसह लहान दुकानांतही खरेदीसाठी ग्राहक दिसत होते.

इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या खरेदीसाठी शहरातील दुकाने व शोरूम्स गर्दीने फुलली होती. व्यापाऱ्यांनी खरेदीवर विशेष सवलती आणि ऑफर्सही दिल्यामुळे खरेदीला सवलतींची झालर होती. यामध्ये मोबाइल फोन, टॅब, लॅपटॉप यासह गृहोपयोगी वस्तूंमध्ये फ्र‌िज, वॉशिंग मशीन, घरगुती आटा चक्की, व्हॅक्युम क्लिनरच्या नवीन मॉडेल्सना मागणी होती. याच्या जोडीला बँका आणि फायनान्स कंपन्यांनी अगदी शून्य टक्के दराने अर्थपुरवठा करण्याची तयारी दर्शवून ग्राहकांना संधी उपलब्ध करून दिली. त्याचा ग्राहकांना फायदा झाला. शहरातील काही शोरूममध्ये अगदी ९९९ रुपये भरून वस्तू घरी घेऊन जाण्याची संधी देण्यात आली. उर्वरित किंमत हप्त्यांमध्ये भरून घेण्यासाठी फायनान्स कंपन्या पुढे आल्या. त्यामुळे वस्तूची पूर्ण रक्कम हातात नसूनही ग्राहकांना ती घरी घेऊन जाता आली. काही लकी ड्रॉदेखील जाहीर करण्यात आले होते. त्यातून पुन्हा एखादी वस्तू किंवा पुढील खरेदीसाठी कूपन्स देण्यात आली. याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद होता. मुहूर्ताने खरेदी केलेले हे साहित्य ग्राहकाच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी शोरूम मालकांना आणि कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत होती. या घरपोच सेवेमुळे माल वाहतूक करणाऱ्या छोट्या व्यवसायिकांची अक्षरशः चांदी झाली.

दुचाकी, चारचाकी गाड्यांच्या खरेदीचा वेगही मोठा होता. ग्राहकांनी हजारोंच्या संख्येने दुचाकी खरेदी केल्या. तर, चारचाकी गाड्यांमध्ये ग्राहकांची पहिली पसंती राहिली. नाशिकमध्ये चारचाकी गाड्यांच्या विक्रीतही यंदा वाढ दिसून आली. ऑटोमोबाइल क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज या व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपुलाच्या श्रेयावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

के. के. वाघ इंजीन‌िअरिंग कॉलेज ते आडगाव मार्गावरील उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ होण्याअगोदरच शिवसेना व भाजपमध्ये श्रेयावरुन जुंपली आहे. या पुलाचे काम माझ्या प्रयत्नांमुळेच झाले, असा दावा शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी केला आहे. तर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनीसुध्दा आपणच पाठपुरावा केल्याचे सांगितले आहे. केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ५ नोव्हेंबर रोजी या पुलाचे भूमिपूजन होणार आहे. त्यापूर्वीच श्रेयवादाची ठिणगी पडली आहे.

वाढत्या रहदारीमुळे नाशिक ते पिंपळगाव महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला असून, या समस्येतून बाहेर पाडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे भाजपाने सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच या पुलाच्या कामांना मंजुरी मिळाली व त्यामुळे वाहतुकीच्या मोठ्या समस्येतून नाशिककरांची सुटका होणार असल्याची माहिती आमदार सानप यांनी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिली.

हा दावा केल्याचे कळताच खासदार गोडसे यांच्या समर्थकांनी थेट खासदारांनी केलेल्या कामाचा पाठपुरावा करताना काय काय केले याचा पुरावा म्हणून कागदपत्रे अॅटॅच असलेला ई-मेल माध्यमांकडे पाठवला आहे. वर्तमानपत्रातील कात्रणे, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचे पत्र, पोलिस स्टेशनमधून अपघातांचा घेतलेला तक्ता यासह पुलाच्या मंजुरीच्या कामांची सर्व कागदपत्रे पाठवली आहेत. या दाव्यानंतर मात्र भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी शेवटी गडकरी साहेबांनीच केले ना, असा खोचक प्रश्न विचारत पुन्हा श्रेय भाजपकडे घेण्याचा प्रयत्न केला आहे. श्रेयवादावरुन याअगोदर शिवसेना-भाजपमध्ये जुंपल्याची अनेक प्रकरणे असली तरी केंद्रीय मंत्री गडकरी येण्याअगोदरच ही ठिणगी पडल्यामुळे शिवसेना आता काय पवित्रा घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


गेल्या दोन वर्षांपासून मी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. २०१५मध्ये त्यासाठी आर्किटेक्टची टीम घेऊन दिल्लीत केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर त्याचा सर्व्हे होवून सर्व प्रक्रिया राबवण्यात आली व टेंडरही निघाले. या सर्व पाठपुराव्याचे माध्यमांनी वृत्तही प्रसिध्द केले आहे. या कामाबद्दल केंद्राचे पत्र मलाही आले आहे. आम्ही जे केले तेच बोलतो.

-देवयानी फरांदे, आमदार भाजप


आमदार फरांदे यांनी इंदिरानगर अंडरपासबाबत पाठपुरावा केला आहे. मात्र, द्वारका आणि अमृतधाम येथील उड्डाणपुलाचा प्रश्न वारंवार मी उपस्थित केला आहे. त्याचा पत्रव्यवहार आणि मंत्र्यांसह विविध अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या गाठीभेटीचा पुरावा माझ्याकडे आहे. विशेष म्हणजे ६ जुलै रोजीच यास मान्यता मिळाली आहे. आता मंत्र‌िमहोदयांच्या हस्ते भूमीपूजन आहे.

-हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनाच्या धडकेत घोटीत बिबट्या ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

दिवाळी पाडव्याच्या पहाटेला घोटी टोल नाक्याजवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात तसेच प्राणी मित्रांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

सोमवारी पहाटे सोडपाच ते सहा वाजेच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील घोटी टोल नाक्यालगत ही घटना घडली. बिबट्या रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाची त्याला जोरात धडक बसली. यामुळे तो रस्त्यावरच ठार झाला. अनेक वाहनचालक व परिसरातील नागरिकांनी बिबट्यास वाचविण्याचा प्रयत्न केला.

घोटी टोल नाका कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती वन विभाग व पोल‌िस विभागास कळविल्यानंतर वन विभाग अधिकारी व कर्माचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळीच पंचनामा करण्यात आला. अपघातात मृत्युमुखी पडलेला बिबट्या पूर्ण वाढ झालेला पाच ते सहा वर्षाचा असून, तो नर जातीचा होता. या परिसरात पहिल्यादांच बिबट्याचा वावर झाला असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पाण्याच्या व भक्षाच्या शोधात असताना हा बिबट्या भरकटून घोटी महामार्गाकडे आला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वीही घोटी-सिन्नर महामार्गावर बेलगाव तऱ्हाळे परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन बिबटे तर घोटी नासिक महामार्गावरील पाडळी शिवारातही भर दिवसा रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकजगन्नाथ कोठावदे कालवश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

पारतंत्र्याच्या लढ्यात सक्रिय राहून सन १९४२ च्या ‘चले जाव’च्या आंदोलनामुळे तुरुंगवास भोगणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ रामचंद्र कोठावदे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा जागृत ठेवणाऱ्या कळवण मधील हयात असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी जगन्नाथ कोठावदे उर्फ आप्पा हे सर्वात जुने स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्याच्या लढ्यातील रसिकलाल शहा व पुंडलिक काळू जाधव हे दोनच स्वांतंत्र्यसैनिक आज ह्यात आहेत.

३१ ऑक्टोबरला दुपारी १ वाजता मेनरोड वरील राहत्या घरी आप्पांची प्राणज्योत मालवली. आप्पांचा जन्म ५ डिसेंबर १९१९ रोजी झाला होता. ते त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले होते. सन १९३८ ते १९४२ या कालावधीत गावोगावी पारतंत्र्याच्या विरुद्ध लढा सुरू होता. त्यात प्रभातफेरी, वंदे मातरम्, समूहगीत धरणे, आंदोलन अशा एकसूत्री कार्यक्रमात जगन्नाथ आप्पांनी सक्रिय सहभाग घेतला होता. सन १९४२ साली चले जाव आंदोलनावेळी त्यांना इंग्रज राजवटीने धुळे येथे बंदिवासात ठेवले. तीन महिन्यांची शिक्षा भोगूनही स्वातंत्र्य मिळेपावेतो आप्पांनी आपले कार्य सुरू ठेवले होते. त्यांच्या अंत्यविधीप्रसंगी नायब तहसीलदार लिलके यांनी तर औदुंबरवाडीचे अनिल महाराज जोशी, जाणकाई शिक्षण संस्थेचे प्राचार्य जोशी, कळवण शिक्षण संस्थेचे संचालक आर. के. महाजन, शिक्षक नेते कारभारी पगार, धनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक महाजन आदींनी वाहिली. आप्पांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दळवटला होणार ग्रामीण रुग्णालय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील दळवट परिसरातील आदिवासीबांधवांच्या आरोग्यप्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दळवट येथे ग्रामीण रुग्णालयास शासनाने मान्यता दिली आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारत बाांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

दळवट, बापखेडा, जिरवाडे, शेपुपाडा, कुमसाडी, धनोली, भांडणे, शिवभांडणे, वेरुळे, अंबापूर, शिंगाशी, वीरशेत, मागीलदार, चाफापाडा, ततांनी, शृंगारवाडी, दरेगाव, भाकुर्डे, कोसुर्डे, जामले (हा) आदी भागांतील आरोग्यप्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सध्या दळवट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सेवेत आहे. या भागातील आरोग्यविषयक प्रश्न आणि आरोग्य विभागाकडून दिली जाणारी सेवाबाबत या भागात गैरसोय होती.

आरोग्य सेवा संचालनालयाने दळवट येथील ग्रामीण रुग्णालय व मुख्य इमारत बांधकामाच्या १३ कोटी ४६ लाख ५ हजार २०० रुपयांच्या रकमेच्या अंदाजपत्रक व नवीन प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. प्रत्यक्ष काम करताना पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मंजुरी, जागेची उपलब्धता, योग्यताबाबत आरोग्य विभागाने पाठपुरावा करावा, अशा अटी व शर्ती शासनाने प्रशासकीय मान्यता देताना लागू केल्या आहेत. इमारत बांधकामासाठी लागणाऱ्या रकमेची अर्थसंकल्पात तरतूद करण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवा, संचालक यांनी शासनास सादर करावे, असे शासनाने निर्णयात नमूद केले आहे.

अंदाजपत्रक २०१३-१४ च्या दरसूचीनुसार

पाणीपुरवठा व मलनिस्सारण ५ टक्के, अंतर्गत जलविद्युतीकरण ५ टक्के, बाह्य जलविद्युतीकरण ६ टक्के, आकस्मित खर्च ४ टक्के, एकूण निधी १२ कोटी ६९ लक्ष ५४ हजार

दळवट व परिसरातील २० ते २५ आदिवासी गावे, वाड्या-पाड्या व वस्तींवरील आरोग्यप्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने मान्यता दिली असून, मुख्य इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

- जयश्री पवार, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेगवेगळ्या अपघातांत दोघा दाम्पत्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सुरत जवळील कुबेर येथे जात असताना तवेरा गाडीला झालेल्या अपघातात पती-पत्नी दोघेही ठार झाले असून, गाडीतील अन्य व्यक्ती जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघात ठार झालेले दाम्पत्य शहरातील सिडको येथील होते.

नाशिक शहरातील लाडशाखीय वाणी मित्र मंडळाचे माजी संचालक रत्नाकर वाणी यांचे काका सहपरिवार कुबेर दर्शनासाठी जात होते. सोमवारी रात्री ११.३० वाजता सुरत नजीक तवेरा गाडीचा अपघात झाला. यात कुसुमबाई काशिनाथ येवले जागीच ठार झाल्या. अपघातात त्यांचे पती काशिनाथ वेडू येवले हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारसाठी नेत असताना प्रवासातच त्यांचेही निधन झाले. त्याचबरोबर गाडीत असलेली एक महिला गंभीर जखमी झाली असून उर्वरित प्रवाशांनाही मोठ्या प्रमाणावर इजा झाली. जखमींवर उपचार सुरू आहेत. येवले दाम्पत्यांचा अपघाती निधनामुळे शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत कुसूमबाई व काशिनाथ येवले यांच्यावर नाशिक येथील अमरधाममध्ये अत्यंसंस्कार करण्यात आले.

वाघेरे गावावर शोककळा
शहापूर ः मुंबई-नाशिक महामार्गावरून घोटी जवळील वाघेरे येथे घरी जाणाऱ्या दाम्पत्याच्या मोटरसायकलला पाठीमागून येणाऱ्या गॅस टॅकरने जोरदार धडक दिली. यात हे दाम्पत्याचा जागीच दुदैवी मृत्यू झाला. कल्याण येथील वेतुरपाडा येथे राहणारे तानाजी किसन भोर (६०) आणि त्यांची पत्नी कौसाबाई भोर (५२) हे नाशिककडे मोटरसायकलने येत असताना कसाऱ्याजवळ लतिपवाडी येथील बाबा का धाबाच्या समोर त्यांच्या मोटरसायकलला एचपी गॅस टॅकरने पाठीमागून जोरदार धडक दिली.
कसारा पोल‌िस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, पोल‌िस निरिक्षक प्रदीप कसबे तपास करीत आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरून घोटी जवळील वाघेरे येथे ठिकाणी अपघात होण्याचे प्रामाण वाढले असल्याने येथे गतीरोधक बसवावा, अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत अनेकदा स्थान‌िकांनी निवेदनही दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकज शिंपीची रिट याचिला फेटाळली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

गुन्हेगारी कृत्ये व लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याबद्दल नाशिक पोलिसांनी पंकज शिंपी या गुंडाविरुद्ध केलेली तडीपारीची कारवाई योग्य आहे, असा निर्वाळा देत या कारवाईला आव्हान देणारी शिंपीची रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली. त्यामुळे शिंपीला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही.

नाशिकमधील सहायक पोलिस आयुक्तांनी शिंपीला तडीपारीच्या कारवाईसाठी कायदेशीर नोटीस दिली होती. त्यावर त्याने त्याचे उत्तर मांडल्यानंतर हे प्रकरण पोलिस उपायुक्तांकडे सुनावणीसाठी पाठवण्यात आले. त्यांनीही नागरिकांच्या जीवाला व मालमत्तेला असलेला धोका लक्षात घेऊन नोटीस बजावली. या व्यक्तीची इतकी दहशत आहे की, त्याच्याविरुद्ध जबानी देण्यासाठीही कोणी पुढे येण्यास धजावत नाही. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांबाबत दोन साक्षीदारांचे जबाब इन-कॅमेरा नोंदवण्यात आलेले आहेत.

शिंपी नामचिन गुंड

कामटवाडे येथील पंकज प्रकाश शिंपी यास पोलिसांनी जेरबंद केले होते. शिंपीवर विविध पोलिस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे शिंपीविरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असताना शिंपी मात्र शहरात राहत असल्याची माहिती पोलिसांना समजली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ उमेदवारांचे अर्ज बाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला नगरपालिकेसाठीच्या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी येवला पालिका कार्यालयात झाली. नगराध्यक्षपदासाठी १५ पैकी ३ जणांचे, तर नगरसेवकपदासाठी एकूण १४२ पैकी ५ उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध ठरले.

उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती थविल व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नरेश बहिरम यांच्या समोर पार पडली. पालिकेच्या १२ प्रभागांतील नगरसेवकपदाच्या एकूण २४ जागांसाठीची छाननी करण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी शेवटी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस अॅड. माणिकराव शिंदे, भुजबळांचे स्वीय सहाय्यक बी. आर. लोंढे, माणिकलाल शर्मा, शिवसेनेचे संभाजी पवार, तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश भंडारी, भाजपचे शहराध्यक्ष आनंद शिंदे, प्रमोद सस्कर, बंडू क्षीरसागर आदींसह विविध प्रभागातील उमेदवार पालिका कार्यालयाच्या इमारतीत उपस्थित होते.

अर्जांच्या छाननीत प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेसाठी माधव बारे यांनी भाजपच्या वतीने दाखल केलेला उमेदवारी अर्ज पक्षाचा बी फॉर्म नसल्याने व अर्जावर केवळ एकच सूचक असल्याने अवैध ठरला. प्रभाग क्रमांक १० व ११ मधील सर्वसाधारण महिला जागांसाठी देवयानी प्रमोद सस्कर यांनी भाजपच्याच वतीने दाखल केलेले दोनही उमेदवारी अर्ज अशाच रीतीने पक्षाचा बी फॉर्म जोडलेला नसल्याने बाद ठरविण्यात आले. प्रभाग क्रमांक १० मधील सर्वसाधारण जागेसाठी शिवसेनेच्या वतीने राहुल प्रकाश भावसार यांनी दाखल केलेला अर्ज बी फॉर्म जोडलेला नसल्याने अवैध ठरविण्यात आला. प्रभाग क्रमांक ११ मधील सर्वसाधारण जागेवर काँग्रेसच्या वतीने दाखल केलेला तस्लीम आरीफ मन्सुरी यांचा उमेदवारी अर्ज देखील ‘बी’ फॉर्म जोडलेला नसल्याने बाद झाला. प्रमोद सस्कर यांना भाजपने प्रभाग क्रमांक १० मधील सर्वसाधारण जागेवर उमेदवारी दिली आहे.

नगराध्यक्षपदासाठी ३ अर्ज अवैध

नगराध्यक्षपदासाठी एकूण १५ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. यातील सुनील काबरा यांनी अर्जाला भाजपचा ‘बी’ फॉर्म जोडलेला नसल्याने व अर्जावर केवळ एकच सूचक असल्याने बाद झाला. मोमीन मो. जर्रार मो. इसाक व आफ्रीन इरफान पठाण या दोघांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज देखील पक्षाचा ‘बी’ फॉर्म जोडलेला नसल्याने बाद ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीचे वेळापत्रक चुकीचेच ः मुख्याध्यापक संघ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काठिण्यपातळीच्या स्तरावर गणित आणि इंग्रजीच्या तुलनेत अवघड समजल्या जाणाऱ्या विज्ञान विषयाचीच परीक्षा सलग क्रमाने आयोजित करणाऱ्या राज्य मंडळास वेळपत्रकाच्या मुद्द्यावरून टीकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. शिक्षक परिषदेमागोमाग नाशिक मुख्याध्यापक संघानेही या वेळापत्रकास विरोध दर्शविला आहे.

राज्य शिक्षण मंडळाचे वेळापत्रक यंदा दोन महिने उशिरानेच जाहीर झाले आहे. या वेळापत्रकात दहावीच्या तीन विषयांचे पेपर सलग तीन दिवशी जाहीर करण्यात आले आहेत. या वेळापत्रकानुसार २०, २१ आणि २२ मार्च रोजी सलग पेपर आहेत. या रचनेवर शिक्षक परिषदेने मंगळवारी आक्षेप घेत हे नियोजन बदलण्याची मागणी केली आहे. या पाठोपाठ नाशिकच्या मुख्याध्यापक संघानेही विज्ञान या विषयाची काठिण्यपातळी गणित व इंग्रजीपेक्षाही अनेक विद्यार्थ्यांना अधिक वाटते. त्यामुळे या विषयाच्या योग्य पूर्वतयारीसाठी दोन पेपरमध्ये किमान दोन दिवसांचे अंतर असावे अशी भूम‌िका नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी ‘मटा’शी बोलताना माडली.

गत काही वर्षांपासून एसएससी बोर्डाच्या वतीने दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक वर्षाच्या सुरुवातीस जाहीर करण्यात येते. यंदा मात्र सप्टेंबर उलटूनही वेळापत्रक जाहीर न झाल्याने बोर्डावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर अखेर गेल्या आठवड्यात बोर्डातर्फे दहावी आणि बारावी वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार ७ मार्चपासून दहावी तर २८ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

विद्यार्थ्यांना परीक्षेचे दडपण येऊ नये यासाठी मागील काही वर्षांपासून सलग परीक्षा न घेता एक किंवा दोन दिवसांआड एक पेपर घेण्यात येतो. यामुळे विद्यार्थ्याला थोडा वेळ तयारीसाठी मिळतो व मनावरचे दडपणही कमी होते. परंतु यावेळेस २० मार्च रोजी विज्ञान, २१ मार्च रोजी सामाजिक शास्त्रे-१ व २२ मार्च रोजी सामाजिक शास्त्रे-२ असे सलग तीन दिवस पेपर ठेवले असल्याने विद्यार्थ्यांवर दडपण येऊ शकते, असे शिक्षक संघटनांचेही मत आहे.

बोर्डाच्या वतीने नववीच्या निकालासह शाळाबाह्य मुलांचे संशोधन आदी कारणांसाठी शिक्षक किंवा मुख्याध्यापकांच्या संघटनांना विचारात घेतले जाते. यंदा मात्र या प्रकारे कुणालाही विश्वासात न घेता वेळापत्रक घोषित करण्यात आल्याची भूमिकाही मुख्याध्यापक संघाने मांडली.


दहावीच्या परीक्षेत दोन पेपरमध्ये किमान एक दिवसाचे अंतर हवेच. यंदा मात्र उश‌िराने वेळापत्रक जाहीर करताना बोर्डाने विज्ञान व सामाजिक शास्त्रे या विषयाचे पेपर सलग ठेवले आहेत. अनेकांना इंग्रजी व गणितापेक्षा विज्ञान विषय अवघड वाटतो. आतापर्यंत असे वेळापत्रक कधीही निघालेले नाही. यासंदर्भात आमच्या संघटनांनाही विश्वासात घेतले गेलेले नाही.

एस. बी. देशमुख, सचिव, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ सचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडमध्ये छाननीत ३३ अर्ज अवैध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड व नांदगाव नगरपालिकेच्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या थेट नगराध्यक्ष व प्रभाग नगरसेवक निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया बुधवारी पार पडली. मनमाड पालिकेत थेट नगराध्यक्षपदाचे १८ पैकी १४ अर्ज वैध ठरले असून, चार अर्ज अवैध ठरले आहेत. सविता साईनाथ गिडगे, जयश्री धनंजय कमोदकर यांचे, तर उषा दिलीप सोळसे यांचे दोन असे चार अर्ज अवैध ठरले आहेत.

मनमाड पालिकेच्या १५ प्रभागांच्या ३१ नगरसेवकपदांसाठी दाखल उमेदवारी अर्जात एकूण २९ अर्ज छाननीत अवैध ठरले असून, २५१ अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, सहाय्यक अधिकारी चंद्रकांत देवगुणे यांनी दिली. छाननी प्रक्रियेप्रसंगी त्यांच्यासह मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, पालिका अधिकारी सतीश जोशी, संदीप तोरणे आदी उपस्थित होते. यावेळी उमेदवारांनी पालिका सभागृहात एकच गर्दी केली होती.

पालवेंचा अर्ज बाद

नांदगाव नगरपालिकेत थेट नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. गुलाबराव पालवे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला असून, भाजपतर्फे थेट नगराध्यक्षपदासाठी दावेदारी सांगणाऱ्या पालवे यांच्या अवैध अर्जाने भाजपला धक्का बसला आहे. नांदगाव पालिकेत थेटसाठीचे नऊ अर्ज वैध तर तीन अर्ज अवैध ठरले. सतरा नगरसेवकपदांसाठी दाखल अर्जांपैकी १२ अर्ज नामंजूर, तर ७२ अर्ज वैध ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images