Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

२५ हजार विद्यार्थ्यांचे डेंग्यू प्रबोधनासाठी बळ ​

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात डेंग्यूला अटकाव करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने शिक्षण विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतला असून, मुख्याध्यापक व शिक्षकांची कार्यशाळा गुरूवारी (दि. ६) आयोजित केली आहे. महापालिकेचे सुमारे ९५० शिक्षक जवळपास २५ हजार विद्यार्थ्यांना डेंग्यूच्या काळजी संदर्भात प्रशिक्षित करणार असून, प्रत्येक विद्यार्थ्याला पाच घरांची जबाबदारी सोपविली जाणार आहे.

शहराच्या हद्दीत डेंग्यून थैमान घातले आहे. सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांनी वर्षभरातील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता खळबळून जागे झाली आहे. डेंग्यूच्या अळ्या नागरिकांच्या घरातच सापडत असून जनतेमध्ये जनजागृती आवश्यकता आहे. त्यामुळे महापालिकेकडून घरोघरी तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेपाठोपाठ आता महापालिकेने महापालिकेचे शिक्षक व विद्यार्थ्यांची मदत घेण्याच निर्णय घेतला आहे. शिक्षण मंडळांतर्गत कार्यरत असलेल्या ९५० शिक्षकांसाठी महापालिकेने डेंग्यसंदर्भात प्रशिक्षण वर्ग गुरूवारी दिले जाणार आहे. शिक्षक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये डेंग्यूचे प्रबोधन करणार आहे. एक विद्यार्थ्याला पाच घरांचे प्रबोधनाचे टार्गेट दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रभागाचा सिमसिम खुलणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये होत असून या निवडणुकीची प्रभाररचना तयार झाल्यानंतर आता प्रभागांची आरक्षण सोडत शुक्रवारी, सात ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार आहे. महापालिका क्षेत्राचे ३१ प्रभागात विभाजन करण्यात आलेले असून, त्या अंतर्गत १२२ सदस्य संख्या निश्चित झालेली आहे.

प्रभागांमधील १२२ जागांच्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यापैकी एकूण ६१ प्रभाग महिलांसाठी राखीव असणार आहेत. तर अनुसूचित जातीसाठी १८, अनुसूचित जमातीसाठी ९, इतर मागासवर्गीयांसाठी ३३ जागा आरक्षित राहणार आहेत. उर्वरित ६६ जागा या सर्वसाधारण गटासाठी असून, त्यापैकी ३१ जागा सर्वसाधारण महिलांसाठी असणार आहेत. त्यामुळे कोणाच्या प्रभागावर कोणते आरक्षण पडते, याकडे नगरसेवकांसह सर्व इच्छुकांच्या नजरा लागून आहेत.

महापालिकेची प्रभागरचना येत्या १० ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे. दोन प्रभागांचा एक प्रभाग झाला असल्याने नगरसेवकांची धाकधूक अगोदरच वाढली आहे. त्यात आता कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडते यावर विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांच्या नजरा लागून आहेत. चार सदस्यीय प्रभागरचनेमुळे शहरात नव्याने ३१ प्रभाग तयार झाले आहेत.

महिलांसाठी ६१ जागा
अनुसूचित जातींसाठी १९ जागा असून त्यात महिलांसाठी नऊ जागा आरक्षित राहणार आहेत. अनुसूचित जमातीसाठी नऊ जागा असून, त्यात पाच महिलांसाठी राखीव असणार आहेत. ओबीसींसाठी ३३ जागा आरक्षित असून, त्यात १७ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. सर्वसाधारण गटासाठी ६२ जागा असून, त्यात ३० जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. अशाप्रकारे १२२ पैकी महिलांसाठी ६१ जागा महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत.

प्रोजेक्टरद्वारे तयारी
महाकवी कालिदास कलामंदिरात शुक्रवारी (दि. ७) सकाळी ११ वाजता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासह महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या जागांची सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीच्या ‍ठिकाणी नागरिकांना पाहणेसाठी सर्व प्रभागांचा एकत्रित नकाशा तसेच सर्व प्रभागांचे स्वतंत्र नकाशे लावण्यात येणार आहेत. तसेच सोडतीत निघालेला जागा क्रमांक सर्व उपस्थित नागरिकांना सहज दिसावा, म्हणून प्रोजेक्टरद्वारे पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे नगरसेवकांसह सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांचे लक्ष लागून आहे.

आज रंगीत तालीम
दरम्यान, शुक्रवारी काढण्यात येणार आरक्षण सोडतीसाठी महापालिकेच्या वतीने बुधवारी (दि. ५) रंगीत तालीम केली जाणार आहे. शुक्रवारच्या आरक्षण सोडतीत घ्यावयाच्या काळजीसंदर्भात ही तयार केली जात आहे. त्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा बुधवारी उपस्थित राहणार आहे.

नगरसेवकांची वाढली धडधड
आरक्षित जागांची संख्या निश्चित झाल्यानंतर आता प्रभागांमधील आरक्षणाकडे नगरसेवकांचे लक्ष लागून आहे. शुक्रवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीमुळे नगरसेवकांची धडधड वाढली आहे. मुंबईत महापालिकेत दिग्गजांचे वॉर्ड आरक्षणामुळे गायब झाले आहेत. त्यामुळे अगोदरच प्रभागाची मोडतोड असतांना, पुन्हा प्रभाग आरक्षित झाल्यास राजकीय भवितव्य पणाला लागणार आहे. त्यामुळे या सोडतीपूर्वीच नगरसेवकांकडून कोणता प्रभाग सुरक्षित याची चाचपणी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नासाका समितीला लागेना मुहूर्त

$
0
0

आमदार सानप यांच्यापुढील अडचणी वाढल्या

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकसह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व सिन्नर या चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला सध्या सुमारे १०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या भाराने जर्जर झालेला नाशिक सहकारी साखर कारखाना येत्या गळीत हंगामापासून सुरू करण्याचे शिवधनुष्य आमदार बाळासाहेब सानप यांनी उचलले आहे. त्यासाठी गठीत करावयाच्या समितीवर आपली वर्णी लागावी, यासाठी कारखाना रसातळाला नेण्याचे ‘पुण्यकर्म’ ज्यांच्या सत्ताकाळात झाले त्यांनीच पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. यामुळे आता आमदार सानपांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. ही समिती तयार करण्यासाठी अद्याप कोणतेही पाऊल उचलले गेले नाही.

नासाका कर्ज न फेडल्याने गेल्या तीन गळीत हंगामापासून बंद आहे. तेव्हापासून कामगार, ऊस उत्पादक शेतकरी सभासद, वाहतूकदार यांच्यावर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. कारखाना पुन्हा सुरू व्हावा यासाठी नासाका कामगार युनियनसह काही स्थानिक माजी पदाधिकाऱ्यांनी गेल्या एक-दोन वर्षांपासून जोरदार प्रयत्न सुरू केले. सभासदांना विश्वासात घेत नासाका कामगार युनियनने हा साखर कारखाना भाडे तत्त्वावर देण्यासाठीही निकराचे प्रयत्न केले. परंतु त्यातही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.

त्यातच जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी कायदेशीर मार्गाचा पाठपुरावा सुरुच ठेवल्याने हा कारखाना अवसायनात निघण्याचे चित्र स्पष्ट झाले होते.

या नवीन समितीवर लोकप्रतिनिधींना स्थान नसल्याने आता साखर कारखानदारीची सखोल माहिती असलेल्यांची या समितीवर वर्णी लावावी लागणार आहे. त्यासाठी जुन्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा ‘चाळ’ बांधल्याने आमदार सानप यांच्यापुढील पेच वाढला आहे. त्यामुळे ही समिती अस्तित्वात येते की नाही, अशीही शंका निर्माण झाली आहे. या राजकीय पेचावर लवकर तोडगा न निघाल्यास नासाकाची चाके फिरण्याचा हा अंतिम प्रयत्नही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समिती ठरविणार मुंबई मोर्चाची तारीख

$
0
0

बैठकीत मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी समित्या स्थापन करणार

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

राज्यातील विविध जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाच्या यशस्वी आयोजनानंतर मुंबईला मोर्चा काढण्याचा विचार सुरू झाला आहे. मोर्चा नेमका कधी काढायचा या विषयावर झालेल्या बैठकीत मोर्चाचे पडसाद अधिवेशनाच्या काळात उमटले पाहिजे. त्यासाठी मोर्चा हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर घ्यायचा की अधिवेशनाच्या काळात घ्यायचा याचा निर्णय समितीवर सोपविण्यात आला. नांदूर येथील वरदलक्ष्मी लॉन्सवर झालेल्या बैठकीस शैलेश कुटे, माणिकराव कोकाटे, उद्धव निमसे, दिनकर पाटील, अजय बोरस्ते, करण गायकर यांनी मार्गदर्शन केले.

मराठा समाजाच्या मागण्यांच्या पाठपूराव्यासाठी राज्यस्तरावर अकरा सदस्यांची आणि जिल्हास्तरावर पंचवीस सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. याशिवाय कोणताही निर्णय घेऊन तो सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करू नये. मराठा समाजाच्या नावाने कोणाकडेही वर्गणी मागू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या. मराठा क्रांती मोर्चात सर्वच पक्षातील समाजबांधवांनी आपापल्या पक्षांच्या आमदारांकडे मागण्या सरकारकडे मांडण्याचा आग्रह धरला पाहिजे, अशा सूचना मांडण्यात आल्या. मोर्चानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या पोस्ट टाकल्या जात आहेत. त्यामुळे मराठा समाजाचे एक खास लेटरहेड बनवत त्यावरून टाकलेल्या पोस्ट ग्राह्य धराव्यात, असेही बैठकीत सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजगार फळा देणार हाताला काम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनसेने प्रयत्न सुरू केले असून, स्थायी समिती अध्यक्ष सलीम शेख यांच्या संकल्पनेतून सातपूरमध्ये सुरू असलेली ‘रोजगार फळा’ ही संकल्पना आता सर्व शहरभर राबविली जाणार आहे. त्यांसदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवला जाणार असून, शहरात ६०० ठिकाणी रोजगार फळा लावण्यात येणार असल्याची माहिती शेख यांनी दिली आहे. या रोजगार फळा योजनेमुळे येत्या तीन वर्षांत अठरा हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, शहरातील मोठे चौक, एमआयडीसींमध्ये हे फळे लावले जाणार आहेत. त्यासाठी पालिकेवर एक ते दीड कोटींचा बोझा पडणार आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात बेरोजगार असून, त्यांना रोजगाराची प्रतीक्षा आहे. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. बेरोजगारांची हीच समस्या हेरून सलीम शेख यांना आपल्या प्रभागात रोजगार फळा ही संकल्पना सुरू केली आहे. या योजनेत ज्यांना कामगार हवे आहेत ते फळ्यावर माहिती लिहून बेरोजगारांना रोजगार मिळू देवू शकतात. सध्या काही प्रभागांपुरतीच मर्यादीत असलेली रोजगार फळा ही संकल्पना संपूर्ण शहरात राबविण्याचा निर्णय सभापती शेख यांनी घेतला आहे. बेरोजगारांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रभागांमध्ये फळा उभारून त्यावर कंपनी, सरकारी तसेच खासगी नोकरी कुठे उपलब्ध आहे, याची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. फळ्यावर दररोज नवीन माहिती लिहिण्यासाठी संस्थाही तयार आहे. या माध्यमातून पंधरा ते वीस हजार बेरोजगारांना रोजगाराचे उद्दिष्ट ठेवले आहे.

यांसदर्भातील प्रस्ताव आता प्रशासनाच्या वतीने तयार केला जात असून, तो येत्या महासभेत सादर केला जाणार आहे. शहरात ६०० ठिकाणी रोजगार फळा उभारले जाणार असून प्रती फळ्यासाठी १७ हजार रुपये खर्च येणार आहे. इंडीग्रेटेड रुरल लाईव्हलीहूड डेव्हलपमेंट संस्थेच्या वतीने हे काम केले जाणार आहे. त्यासाठी एक ते दीड कोटींचा खर्च लागणार असून, संस्था तीन वर्षांपर्यंत हे काम करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून रोजगारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


तीन हजार महिलांना प्रशिक्षण

शहरात वाहनचालकांची कमतरता आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील तीन हजार महिलांना वाहनचालकांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शहरातील सहा विभागांमध्ये प्रत्येकी पाचशे महिलांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी प्रति महिला साडेचार हजार रुपये खर्च केला जाणार असून त्यासाठी प्रस्ताव पारित झाला असून लवकरच प्रशिक्षणाली सुरू होणार आहे.


रोजगार फळा या संकल्पनेमुळे शहरातील १८ हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महासभेवर ठेवला जाणार असून, आर्थिक खर्च उचलण्याची पालिकेची तयारी आहे.

- सलीम शेख, सभापती,

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात होर्डिंग्जचा सुळसुळाट

$
0
0

न्यायालयाच्या निर्देशांची पायमल्ली; अतिक्रमण निर्मूलन विभागाचे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शहरभर अनधिकृतपणे झळकणाऱ्या होर्डिंग्जचा सुळसुळाट झाला आहे. अशा होर्डिंग्जमुळे न्यायालयाच्या निर्देशांची सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र सध्याला शहरभर दिसून येत आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचे होर्डिंग्ज लाऊन शहर सौंदर्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी पालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग हा तमाशा मुकाटपणे बघत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

शहरात कित्येक होर्डिंग्ज तर चक्क मुख्य चौकातील सिग्नलला बांधलेले आहे. कित्येक होर्डिंग्ज हे सार्वजनिक रहदारीला अडथळा ठरत आहेत. काही होर्डिंग्ज अत्यंत निष्काळजीपणे लावण्यात आलेले असल्याने ते कधीही कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. काही होर्डिंग्ज तर पालिकेने लावलेल्या दिशादर्शक फलकांच्यावरच असल्याने दुसऱ्या शहरातून येणाऱ्या नागरिकांची फसगत होत आहे.

नाशिकरोड परिसरातील बिटको चौक, शिवाजी पुतळा, दत्त मंदिर चौक, इंगळेनगर चौफुली, सैलानी बाबा चौक, दसक पेट्रोलपंप, उपनगर नाका, बिटको कॉलेज, देवळाली गाव, चेहेडी, एकलहरे टी पॉईंट, सिन्नर फाटा, सावरकर उड्डाणपुलाजवळ खर्जुल मळा आदी ठिकाणी दररोज लहान-मोठे असंख्य होर्डिंग्ज झळकत असतात. सध्या सार्वजनिक सण-उत्सवांचा, विविध मोर्चांचा काळ असल्याने संपूर्ण शहरात अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट झाला आहे.

कायदेशीर कारवाई नाहीच

नाशिकरोड मध्ये होर्डिंग्ज लावण्यासाठी केवळ २७ अधिकृत ठिकाणे निश्चित केलेली आहे. मात्र आजमितीस शहरात ५०० पेक्षा जास्त ठिकाणी भव्य स्वरूपाची होर्डिंग्ज असण्याची शक्यता आहे. अधिकृत असलेल्या होर्डिंग्जवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मिळालेले स्टिकर लावले जाते. परंतु शहरातील बहुसंख्य होर्डिंग्जवर अशा प्रकारचे स्टीकर्सही दिसून येत नाही. मुख्य रस्त्यांच्या व्यतिरिक्त शेजारच्या उंच इमारतींवर मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावण्यात आलेले दिसून येत आहेत. गेल्या महिनाभरापासून या पैकी एकाही अनधिकृत होर्डिंग्जवर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची नोंद नाही.

भाऊ, दादांची ढगफुटीच

शहरातील चौकाचौकात निवड, वाढदिवस, सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अभीष्टचिंतन, शुभेच्छा फलक झळकत आहेत. त्यावर भाऊ, दादांची अक्षरशः ढगफुटीच झालेली दिसून येत आहे. सार्वजनिक जागेवरील त्यांच्या या चमकोगिरीच्या अतिक्रमणाचा पालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग केवळ तमाशा बघत आहे.

शहरात केवळ २७ ठिकाणीच होर्डिंग्ज लावण्यास परवानगी आहे. अशा होर्डिंग्जवर पालिकेचे स्टिकर लावले जाते. तसेच अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून होर्डिंग्ज काढून घेतले जातात. मात्र त्यावेळेस पोलिस संरक्षण मिळत नाही. त्यामुळे शहरातील अनधिकृत होर्डिंग्जही संख्या वाढली असण्याची शक्यता आहे. अशी सर्व होर्डिंग्ज तत्काळ हटविण्याची कारवाई केली जाईल.

-सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..तर कोर्टाच्या अवमानाची कार्यवाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांच्या बदलीस मॅटने स्थगिती देऊनही त्यांना अद्याप हजर करून घेण्यात आलेले नाही. या प्रकरणावर झालेल्या सुनावणीत कोर्टाने प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. सात दिवसांत आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कोर्टाच्या अवमानाची कार्यवाही का करू नये, असे आदेशात म्हटले आहे.

ऑक्टोबर २०१५ मध्ये मुंडावरे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (प्रशासन) म्हणून रुजू झाले. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची जळगाव जिल्ह्यात पूनर्वसन उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आल्याने मुंडावरे यांनी २२ ऑगस्ट रोजी मॅटमध्ये आव्हान दिले होते. निवडणुकीशी संबंधित कामाचा संबंध येणार नाही अशा नाशिकमधील कोणत्याही पदावर नियुक्ती देता येऊ शकते, असे त्यांनी प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून दिले. नाशिकमध्ये बदली मिळावी ही त्यांची विनंती मान्य करून त्यांना दिलासा देण्यात आला. दरम्यान, नुकतेच मॅटमध्ये बदली आदेशाविरूद्धच्या याचिकेची सुनावणी झाली. बदलीच्या आदेशाला स्थगिती असतानाही उपजिल्हाधिकारी प्रशासन या पदावर हजर करून घेतले नाही किंवा नाशिक येथे जि. प./ पं. स. निवडणुकीशी संबंध नसलेल्या इतर पदावर नियुक्ती न दिल्याने न्यायाधिकरणाने तिव्र नाराजी व्यक्त केली. तसेच संबंधितांविरूद्ध कोर्टाच्या अवमानाची कार्यवाही का सुरू करू नये, अशी विचारणा केली. दरम्यान, सरकारी वकिलांनी या अंमलबजावणीस एक आठवड्याची मुदत देण्याची विनंती केली. ती मान्य करण्यात आली आहे. अंमलबजावणी न केल्यास कारवाई करण्याचे आदेशात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व्हिस रोडवर खड्डेच खड्डे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

मुंबई-आग्रा महामार्गाजवळील सर्व्हिस रोड येथे सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यासोबतच या भागातील रस्त्यावरील पथदीपही बंद आहेत. त्यामुळे खड्ड्यांमुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. अशा परिस्थितीत ढिम्म झालेल्या प्रशासनाला व स्थानिक नगरसेवकांना जाग येणार कधी येणार, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील बहिणाबाई शिक्षक महाविद्यालय, जत्रा हॉटेल, कोणार्क नगर, धात्रक फाटा, के. के. वाघ, हनुमान नगर, अमृतधाम या परिसरातील सर्व्हिस रोडवर पावसामुळे वाहतुकीच्या वर्दळीमुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने खड्ड्याचे साम्राज्य वाढतच चालले आहे.

या परिसरातील पथदीपही बंद असल्याने रात्रीच्या खड्ड्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. वाहनांचेदेखील मोठे नुकसान होते. हे खड्डे बुजविण्यासाठी वारंवार मागणी करूनदेखील प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. तरी यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहे.

सर्व्हिस रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. अनेकवेळा याबाबत पाठपुरावा केला. मात्र कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

-अभिजीत पाटील, स्थानिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कनु’तील कृष्णलिलांनी भारावले प्रेक्षक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कथक नृत्याच्या उत्पत्तीमध्ये श्रीकृष्णाच्या रासलिलांचे संदर्भ आहेत. जेव्हापासून कथक नृत्य जन्मले तेव्हापासून किंवा किंबहूना त्या अधीपासून श्रीकृष्ण आणि कथक नृत्य एकमेकांशी जोडले गेले आहेत. आणि हेच कथकनृत्य आणि कृष्ण यांचे संबंध सांगणारा नृत्याविष्कार म्हणजे ‘कनु’ सुप्रसिद्ध नृत्यांगना कीर्ती भवाळकर आणि ज्येष्ठ शिष्यांनी बुधवारी सायंकाळी कालिदास कलामंदिरात सादर केला आणि उपस्थित प्रेक्षक भारावून गेले.

कथक नृत्याच्या सादरीकरणात कृष्ण कसा भेटत जातो या संकल्पनेवर ‘कनु’ ही नृत्य प्रस्तुती आधारीत होती. कनुची सुरुवात श्रीकृष्ण गायत्रीमंत्र आणि अष्टपदीने झाली. यातून कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्यांनी श्रीकृष्णाला नृत्यांजली वाहिली. त्यानंतर ‘ए रे मना, ए रे मना’,’ तू शाम की वंदना’ ही कृष्णवंदना प्रस्तुत केली. जेष्ठ गायक पं. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरांनी सजलेल्या ‘बाजे रे मुरलीया बाजे’ या रचनेवरील नृत्याविष्काराने उपस्थित रसिकांची मने जिंकली. यानंतर ‘होरी खेलत है गिरीधारी’ या होरी मधून श्रीकृष्णाच्य़ा त्यांच्या गोप गोपिकांबरोबर खेळलेल्या होरीचे चित्र रसिकांसमोर अत्यंत देखण्या स्वरुपात नृत्यांगनांनी सादर केले. उपशास्त्रीय संगीतातील कजरीने विशेष लक्ष वेधले. उपशास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य संगीत यांचा सुदर मिलाप यात प्रस्तुत करण्यात आला. ‘सावन की रितू आई रे सजनिया’ ही कजरी नृत्यांगनांनी अतिशय उत्कंटतेने सादर केली. यानंतर कीर्ती भवाळकर यांनी ‘ऐसी मोरी रंगी है शाम, शाम घर आए’ ही ठुमरी सादर केली. यातील अभिनयाला रसिकांनी विशेष दाद दिली. त्या पाठोपाठ उपशास्त्रीय संगीतातील ‘झुला’ सादर केला. ‘झुलत शाम हिंडोरे राधे संग’ या झुल्यातील भावभिनय व पदन्यासाने रसिक प्रेक्षकांनाही झुलायला लावले. त्यानंतर प्रस्तुत करण्यात आलेल्या मीरेच्या भजनातून मीरेचे उत्कंट प्रेम आणि भक्ती यांचा सुरेख मिलाप साकार करण्यात आला. कथक नृत्यातील कवित्व च्या प्रस्तुतीने रसिकांची विशेष दाद मिळवली. कृष्णाच्या खोड्या छेडछाड गोवर्धन धारण, कालिया मर्दन, माखन चोरी अशी विविध रुप कवित्व या विशेष प्रस्तुतीतून भवाळकर व त्यांच्या शिष्यांनी सादर केली. या नृत्याविष्काराची अत्यंत समर्पक प्रकाशयोजना अरविंद भवाळकर यांनी केली. तर रंगभूषा माणिक कानडे यांचे होते. कनुचे सुंदर निवेदन धनेश जोशी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘त्या’ने शोधला डेंग्यूचा डास

$
0
0

जागरुक नागरिकाकडून मनपाच्या आरोग्य विभागाला माहिती

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

डेंग्यूच्या डासांनी शहरावर हल्ला केल्यामुळे त्याला प्रतिकारासाठी नागरिकांनीही एकजूट केली आहे. याबाबत नागरिकही आता जागरुकतेने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला लागले आहे. अशाच एक जेलरोडला राहणाऱ्या जागरुक नागरिकाने डेंग्यूचा डास शोधून काढला. विशेष म्हणजे, त्याने इंटरनेटवर सर्च करून तो डेंग्यूचाच डास असल्याची खात्री करत महापालिकेला कळवले. महापालिकेच्या दक्ष आरोग्य विभागानेही तातडीने येऊन त्याला पुष्टी दिली.

जेलरोडच्या शिवाजीनगर भागातील तुलसी पार्क येथे मनोज पगारे यांचा फोटो स्टुडिओ आहे. मंगळवारी (दि. ४) सायंकाळी त्यांनी आपल्याला चावा घेऊ पाहणारा डास मारला. तो प्लाटिकच्या पिशवीत ठेवला. इंटरनेटवर सर्च करून डेंग्यूचा डास आणि मारलेला डास यांची लक्षणे तपासली. हा डेंग्यूचा घातक एडिस डास असल्याचे स्पष्ट झाले. रात्रीचे आठ वाजले तरी शांत न बसता त्यांनी नाशिक महापालिकेचा फोन नंबर इंटरनेटवर शोधून महापालिकेतील मलेरिया विभागाचे मुख्य सुपरवायझर किशोर पगार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी नाशिकरोडचे मलेरिया पर्यवेक्षक रवींद्र राऊत यांचा फोन नंबर दिला. राऊत यांच्याशी पगारे यांनी संपर्क साधल्यावर त्यांनी आरोग्य पथकासह तातडीने जेलरोडला येऊन हा डास डेंग्यूचा असल्याचे मान्य केले. दुसऱ्या दिवशी येऊन परिसरात औषध फवारणी करण्याची ग्वाही दिली.

डेंग्यू डासाची ठिकाणे

एडिस डासामुळे डेंग्यू व चिकनगुन्या होतो. घरातील हौद, बॅरल, रांजण, पाण्याच्या टाक्या, जायनीज प्लॅन्ट, डेझर्ट कुलर, फ्रिजचा ड्रिप पॅन, फुलदाण्या, करवंट्या व टायरमध्ये साठलेले पाणी, अडगळीचे सामान याठिकाणी यांची पैदास होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोकळ्या भूखंडांवर डेब्रिजचे साम्राज्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक शहरात सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील मोकळे भूखंडांवर डेब्रिजचे साम्राज्य पसरले आहे. महापालिका व एमआयडीसीचे याकडे लक्ष नसल्याने वाट्टेल त्या मोकळ्या भूखंडावर सर्रासपणे कचरा टाकण्याचे काम होताना दिसते. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यावर हजारो शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या होत्या. यानंतर मोठ्या प्रमाणावर कारखान्यांचे जाळे पसरले होते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून एमआयडीसीकडून उद्योगांसाठी घेतलेल्या भूखंडांवर उद्योगच उभारले गेले नाहीत. यात मोकळ्या भूखंडांवर डेब्रिज टाकण्याची हक्काची जागा बनली की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत अनेक ठिकाणी मोकळे असलेल्या भूखंडांवर सर्रासपणे डेब्रिज टाकण्याचे काम अनेकांकडून केले जात आहे. एकीकडे उद्योग टाकण्यासाठी व्यावसायिक एमआयडीसीकडे भूखंडांची मागणी करताना दिसतात. तर दुसरीकडे अनेक भूखंड उद्योगांविनाच पडून आहेत. याआधी एमआयडीसीने संबधित भूखंडांवर कारवाईचा बडगा उगारला होता. परंतु कायद्याच्या कक्षात एमआयडीसीलादेखील कारवाई करण्यात अडचणी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिका व एमआयडीसी यांनी संयुक्तर‌ित्या कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कामगार वर्गातून होत आहे. तसेच वर्षांनुवर्ष मोकळे पडून असलेल्या भूखंडांवर देखील एमआयडीसीने कारवाई करावी, अशीही मागणी केली जात आहे.

सरकारच्या नियमानुसार दोन वर्षांहून अधिक दिवस एमआयडीसीच्या भूखंड मोकळा ठेवता येत नाही. परंतु सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत एमआयडीसी स्थापन झाल्यापासून अनेक भूखंड आजही उद्योगांविनाच पडून आहेत. त्यातच मोकळ्या भूखंडांवर घाण, कचरा टाकण्याचे काम सर्रासपणे केले जाते. याकडे महापालिका व एमआयडीसीने लक्ष घालण्याची गरज आहे.

- सुभाष राजपूत, लघु उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डॉन इन नाशिक’चा सस्पेन्स वाढला!

$
0
0

रानडे व नागरे-पाटील यांच्या नावांची चर्चा

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

नाशिकमधील अनेक कॉलेजेसमध्ये 'डॉन इन नाशिक' असे पोस्टर लावण्यात आलेले आहेत. सोमवारपासून शहरात अनेक ठिकाणी नाशिकमध्ये डॉन येणार असल्याची चर्चा सरू आहे. शहरातील कॉलेजेस सोबतच महत्त्वाच्या ठिकाणी सदर पोस्टर लागल्याने डॉन नेमका असणार कोण याबाबत सर्वांना संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिस प्रशासनाने सर्वत्र हे पोस्टर लावले आहेत.

कॉलेजियन्सच्या कट्ट्यावर आणि सोशल मीडियावर पोलिसांमधील काही दबंग ऑफिसर्स डॉन म्हणून येणार का अशी चर्चा बघायला मिळत आहे. एचपीटी आरवायके कॉलेजच्या कट्ट्यावर मंगळवारी डॉन इन नाशिकची चर्चा रंगली होती. पोलिसांनी डॉन येतोय म्हंटल्यावर तो कुख्यात गुंड नसेल हे नक्की, असं रुचिता म्हणाली. वाहतुकीला शिस्त लावायला येणार डॉन असल्याने एखादा चांगला ऑफिसर यासाठी येणार असेल का? असा सवाल या चर्चेत कॉलेजियन्स करत होते. विश्वास नागरे पाटील किंवा मकरंद रानडे डॉन म्हणून येणार असतील असं यावेळी अजय म्हणाला. यानंतर कट्टयावर बराचवेळ या दबंग ऑफिसर्सची चर्चा रंगलेली दिसून आली.

सोबतच सोमवारपासून सोशल मीडियावरही डॉन बाबतचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हे पोस्टर बघून अनेक ग्रुप्समध्ये डॉन कोण असेल याची चॅटिंग रंगत आहे. या चॅटिंगमध्येही विश्वास नागरे पाटील किंवा मकरंद रानडे हेच शिस्त लावणारे डॉन असतील अशी चर्चा होत असलेली दिसून आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोन अधिकाऱ्यांची नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली होती. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी यांपैकी एखादा अधिकारी येणार असेल असा समज तरुणाईचा होतो आहे.

डॉन नेमका कोण असेल असं विचारल्यावर तरुणाईला विचारल्यावर या दबंग ऑफिसरची नावे घेतली जात आहे. पोलिसांनी वाहतुकीच्या काँक्रीट प्लॅन बाबत राखलेल्या प्रचंड सस्पेन्समुळे यंगस्टर्स आता डॉन बाबत अनेक तर्क लावत असल्याचं यावरून दिसून येत आहे. जाहिरातीसारखा उपयुक्त फंडा वापरून नाशिक पोलिस विभागाने तरुणाईत एक उत्सुकता निर्माण केली आहे. यामुळे प्रत्येक कॉलेजयन्सला आता नेमका डॉन कोण हाच प्रश्न पडल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कन्यागत महापर्वकाळ आध्यात्मिक अनुभूती’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

कन्यागत महापर्वकाळ हा बारा वर्षातून एकदा येणारा उत्सव आहे. हे एक भौगोलिक आश्चर्य आणि आध्यात्मिक अनुभूती असल्याचे प्रतिपादन प्रा. क्षितिज पाटुकले यांनी केले. कापड पेठ येथील श्री व्यंकटेश बालाजी मंदिर येथे सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवात ते कन्यागत महापर्वकाळ या विषयावर बोलत होते.

प्रा. पाटुकले म्हणाले, गुरू सिंह राशीत गेला की सिंहस्थ, गुरू कुंभ राशीत गेला की कुंभमेळा तसेच गुरू कन्या राशीत गेला की कन्यागत महापर्वकाळ येतो. हा महापर्वकाळ ऑगस्ट २०१६ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत आहे. त्यांनी कन्यागत महापर्वकाळ म्हणजे काय, याची माहिती दिली. तसेच कृष्णा नदीची जन्मकथा आणि महात्म्य महापर्वकाळातील स्नानपर्व आणि त्यात करायचे धार्मिक विधी, कृष्ण तिरावरील तीर्थ आणि त्याची कथा, दत्तात्रय राजधानी, नरसिंहवाडी यांची माहिती दिली.

संगीत, नृत्य प्रस्तुती आज

श्री बालाजी संगीत सेवा उदयोन्मुख कलाकारांची संगीत कला व नृत्य प्रस्तुतीचा कार्यक्रम गुरूवारी (दि. ६) रात्री आठ वाजेला होणार आहे. त्यात निमीष घोलप, आरोह ओक, वैष्णवी जोशी, आर्य हिरे यांचा सहभाग राहील, असे आयोजकांनी कळविले आहे.


शिवाजीनगरला महिला दांडिया

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथे महिला रास दांडिया सुरू झाल्याची माहिती नगरसेवक राहुल दिवे, मंडळाचे अध्यक्ष अशोक शेजवळ, कार्याध्यक्ष राज आहेर यांनी दिली. ही दांडिया १२ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील तसेच यासोबत इतरही विविध स्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये शनिवारी (दि. ८) ऑक्टोबरला लहान मुलांसाठी पारंपरिक वेशभूषा तर मंगळवारी (दि. ११) ऑक्टोबरला नृत्य स्पर्धा होईल. स्पर्धेचे बक्षीस वितरण सेलिब्रेटी अर्पिता तिवारी आणि सोहेल कपाडिया यांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेचे संयोजन उपाध्यक्ष प्रमोद वाळके, जयेश सोनवणे, मुकुंद बागूल, मनीष बस्ते, योगेश बच्छाव, बाळा पगारे आदी करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेणुकामाता मंदिरात भाविकांचा ओघ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील रेस्ट कॅम्प रोडवर असणाऱ्या जागृत देवस्थान रेणुका माता मंदिर भाविकांच्या गर्दी गेल्या तीन-चार दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे कमी होती. मात्र मंगळवारपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर पाचव्या माळेपासून भाविकांची गर्दी पुन्हा होऊ लागली आहे. परिसरात उभारण्यात आलेल्या पूजा साहित्य, खेळण्यांच्या व खाद्यपदार्थांच्या दुकानांवर भाविक खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे चित्र आहे.

भृगु ऋषी यांनी प्राचीन काळी स्थापन केलेली ही रेणुका माता नवसाला पावणारी देवी अशी ख्याती आहे. मंदिरात नवरात्र उत्सव प्राचीन काळापासून साजरा करण्यात येत असतो. यंदा मंदिरामध्ये सेवा देणारे चिंगरे कुटुंबीयांच्या अकराव्या पिढीतील पुजारी महेश चिंगरे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. मंदिरासमोर दर्शन रांगेसाठी मोठा सभा मंडप उभारण्यात आला आहे. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून पहाटेच्या व सायंकाळच्या आरतीसाठी अनेक भाविक पायी चालत येतात.

देखरेखसाठी फौजफाटा तैनात

या वेळी मंदिराच्या वतीने देखरेखीसाठी मंदिरासह परिसरात १९ सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता देवळाली कॅम्प पोलिसांच्या वतीने ३५ पोलिस कर्मचारी व ९ पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय पोलिस मुख्यालयातून ८ महिला तर १२ पुरुष पोलिसांसह ६० पुरुष होमगार्ड, २० महिला होमगार्ड असा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून दिवसभर देवळाली कॅम्प वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांच्यासह अधिकारी भेट देत पाहणी करत असतात.

सकाळ व सायंकाळी वाहतूक मार्ग भगूरकडून देवळाली कॅम्पला येणारी वाहतूक कॅन्टोन्मेंट नाका नंबर दोनमार्गे बार्न्स स्कूल, शिंगवे बहुला, धोंडीरोड मार्गे देवळाली कॅम्प अशी वळविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा राज्यभर आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांशी गद्दारी केली असून, जोपर्यंत शेतीमालाला रास्तभाव देणार नाही तोपर्यंत या शासनाला आपण कदापिही स्वस्थ बसू देणार नाही, असा सज्जड इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी सटाणा येथील कांदा परिषदेत दिला. दरम्यान कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपींवर येत्या तीन दिवसात आरोपपत्र दाखल न झाल्यास १० ऑक्टोबरपासून राष्ट्रवादी राज्यभर आंदोलन छेडून मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही, असा गंभीर इशाराही सुळे यांनी दिला.

येथील आंनद लॉन्स येथे बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कांदा परिषदेत खासदार सुळे बोलत होत्या. व्यासपिठावर माजी मंत्री सुरेश धस, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, महिलाप्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, शंकरराव धोंडगे, आमदार दीप‌िका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार दिलीप बनकर उपस्थित होते.

खासदार सुळे म्हणाल्या, आपली संस्कृती ही विद्या, बुद्धी, सरस्वती व अन्न यांचा मान करणारी आहे. मात्र विद्यमान राज्य व केंद्र सरकारने अन्न उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नव्हे तर कपील शर्माच्या भ‌िंतींच्या प्रश्नांवर गंभीर होत असल्याचा आरोप केला. आपल्याला सत्ता नसल्याचे दुःख नाही मात्र शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत असल्याने मोठे दुःख आहे.

राज्यात सर्वत्र अशांततेचे वातावरण असून शेतकरी, आदिवासी, कष्टकरी, मराठा, ओबीसींचे आंदोलने सुरू आहेत. मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यांना पाठिशी घालत असून, अशा मंत्र्यांना घरी पाठविण्याची मागणी यावेळी खासदार सुळे यांनी केली.

आमदार चव्हाण यांनी कांदा उत्पादकांना न्याय मिळावा यासाठी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करूनही शासनाने त्यांची दखल घेतली नाही. कांद्याला ५०० रूपये अनुदान देण्याची मागणी करूनही केवळ १०० रुपये अनुदान देवून शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. सुरेश धस म्हणाले, राज्यात शेतमालाला कुठेही अच्छे दिन असल्याचे दाखवून द्या, एक लाख रुपये बक्षीस देण्यात देवू असे सांगून त्यांनी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, व पाशा पटेल यांची खिल्ली उडविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एमईटीचे नाव अखेर सात-बारावर

$
0
0

म.टा प्रतिनिधी, नाशिक

छगन भुजबळ यांच्या ‘मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट’ मेट ला शैक्षणिक संकुलासाठी नाशिक येथील गोवर्धन शिवारात दिलेली जमीन जप्त करण्याच्या कारवाईचे अपील सुप्रीम कोर्टाने फेटाळले आहे. हायकोर्टाचा निर्णयच सुप्रीम कोर्टाने कायम ठेवल्याने भुजबळांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार आज नाशिक तहसील कार्यालयाने सात बारावर एमईटी संस्थेचे नाव लावले.

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या एमईटी या संस्थेला गोवर्धन (ता. नाशिक) शिवारात दिलेली ९ हेक्टर १३ आर एकर जमीन शासनाने सरकारजमा केली होती. त्यामुळे मुंबई हाय कोर्टात धाव घेत या कारवाईला स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावर कोर्टाने भुजबळ यांच्या मेटला बहाल केलेल्या जागेचा ताबा घेण्याची राज्य सरकारची कारवाई रद्द ठरविली. मुंबई हाय कोर्टाच्या या आदेशाविरुद्ध राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अपील दाखल केले. त्यात शैक्षणिक संस्थेसाठी सरकारी जमीन घेतल्यानंतर मेट ने अटी, शर्तींचा भंग केल्याचे म्हटले होते. राज्य सरकारचे अपील सुनावणीसाठी आल्यावर कोर्टाने ते फेटाळले. सात बारा उताऱ्यावर पुन्हा एमईटीचे नाव लावा असे आदेश प्रशासनाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणाचे चित्र आज होणार स्पष्ट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचनेची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. ७) जाहीर होणार असून, या सोडतीनंतर राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. या सोडतीमुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांच्या राजकीय कारकिर्दीचाही फैसला होणार आहे. शुक्रवारी प्रारुप प्रभागरचनाही समजणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे राजकारण्यांसह संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे. दरम्यान, या आरक्षण सोडतीसाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, शुक्रवारी अकरा वाजेपासून ही सोडत काढण्यास सुरुवात होणार आहे.

महापालिकेचा निवडणूक आखाडा खऱ्याअर्थी शक्रवारपासून रंगणार आहे. महापालिकेने प्रारुप प्रभागरचना तयार केली असून, ती निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली आहे. शहरात ३१ प्रभाग राहणार असून १२२ नगरसेवकांची संख्या कायम आहे. तर या प्रभागांची आरक्षणेही जाहीर करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ शुक्रवारी आरक्षणांचेही चित्र स्पष्ट होणार आहे. कालिदास कलामंदिरात सकाळी अकरा वाजेपासून ही आरक्षण सोडत निघणार आहे. तर उद्याच काढण्यात येणाऱ्या सोडतीत आरक्षण जारी करतांना तयार केलेल्या प्रभागाचा प्रारुप नकाशाही सादर केला जाणार आहे. प्रभागांच्या चतु:सीमा प्राथमिक टप्प्यात दाखवल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांना प्रभारचनाही अप्रत्यक्षरित्या कळणार आहे.

आरक्षण सोडतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर राजकीय उलथापालथींना सुरुवात होणार आहे. आरक्षणानंतर व प्रभागरचनेचे स्वरुप समजल्यानंतर निवडणूक कोणत्या पक्षांकडून सोपी राहणार याचे अंदाज लावून पक्षांतराला वेग येणार आहे. त्यामुळे शुक्रवारच्या आरक्षण सोडतीकडे सगळ्यांचा नजरा लागून आहेत. या सोडतीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी तयारीचा आढावा घेतला असून, महाकवी कालीदास कलामंदिरात सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कश्यपी प्रकल्पग्रस्तांची पदरी निराशाच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कश्यपी धरणात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना महापालिकेने टोलवाटोलवी केल्यानंतर शुक्रवारी सर्व प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयात गेले; पण येथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी., अप्पर जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर दुपारी कार्यालयात नसल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. तब्बल २५ वर्षे न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या या प्रकल्पग्रस्तांनी अधिकारीच नसल्यामुळे अखेर जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य द्वाराजवळच बैठक घेत संताप व्यक्त केला.

आपली व्यथा मांडताना प्रकल्पग्रस्तांनी सांगितले, की अद्याप ३७ प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबीयांतील व्यक्तींना नाशिक महापालिकेमध्ये नोकरी मिळालेली नाही. यापूर्वी महापालिका व पाटबंधारे खाते यांच्यात करारनाम्याचा मसुदा झालेला होता. महापालिका ही सरकारच्या अखत्यारीत आहे आणि पाटबंधारे खातेही. अशा वेळी प्रत्येक जण आपला चेंडू दुसरीकडे टोलवत आहे. त्यामुळे आमच्या आदिवासी कुटुंबीयांची घोर फसवणूक आणि थट्टा होत आहे. या कामी जर सरकारने अथवा महापालिकेने सामावून घेतले नाही तर आम्ही त्याच धरणात समाधी घेणार आहोत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोका मार्केट चोरांना आंदण!

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेने सातपूर येथे लहान व्यावसायिकांसाठी उभारलेल्या खोका मार्केटमध्ये चोरीचे सत्र सुरूच असून, बुधवारी रात्री चोरट्यांनी येथील कापड दुकानाचे पत्रे फोडून हजारो रुपयांचे कपडे, तसेच साडेसात हजारांची रोकड लांबविली. या प्रकरणी सातपूर पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून येथे होत असलेल्या चोऱ्यांमुळे हे मार्केट जणू चोरट्यांना आंदणच दिले, की काय असा सवाल उपस्थित होत असून, येथील चोरीचे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे.

महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयाच्या हद्दीत टपरीधारकांचे मोठे अतिक्रमण महापालिकेच्याच जागेवर झाले होते. त्यानंतर माजी महापौर दशरथ पाटील यांनी टपरीधारकांना हक्काचे मार्केट उपलब्ध व्हावे यासाठी खोका मार्केटची उभारणी केली. त्यात अनेकांना व्यवसाय करण्यासाठी स्वतःच्या हक्काचे दुकान उपलब्ध झाल्याने व्यावसायिकांनीदेखील समाधान व्यक्त केले. परंतु, महापालिकेने उभारलेल्या या खोका मार्केटमध्ये गेल्या काही वर्षांपासून चोरीचे सत्र सुरू झाले आहे. खोका मार्केटला असलेल्या दुकानांना पत्राचे छत असल्याने पत्रे फोडून चोरी होण्याचे प्रकार वारंवार होत असून, त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी येथील व्यावसायिकांकडून केल्या जात आहेत. बुधवारी रात्रीदेखील चोरट्यांनी येथील कापड दुकानावरील पत्र्याचे छत फोडून हजारो रुपयांचा एेवज व रोकड लंपास केली असल्याचे सातपूर पोलिसांनी सांगितले. याबाबत फिर्यादी संदीप वाळके यांच्या तक्रारीवरून सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक निरीक्षक समाधान हिरे तपास करीत आहेत. महापालिकेने सातपूरला बांधलेल्या श्री छत्रपती शिवाजी मार्केटला चार सुरक्षारक्षकांची नेमणूक केली होती. परंतु, कालांतराने सुरक्षारक्षकच गायब झाले होते. त्यानंतर खोका मार्केटची उभारणी महापालिकेने केली खरी, मात्र त्या ठिकाणी सुरक्षारक्षकच नेमण्यात आलेले नाहीत. व्यावसायिकांनीदेखील स्वखर्चाने सुरक्षारक्षकाची नेमणूक केल्यास चोऱ्यांवर आळा बसू शकेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.


बालगुन्हेगारांचा समावेश

सातपूरच्या खोका मार्केटमध्ये झालेल्या अनेक चोऱ्यांमध्ये बालगुन्हेगारांचा समावेश असल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे. आता पुन्हा कपड्याच्या दुकानात झालेल्या चोरीबाबत पोलिसांनी बालगुन्हेगारांचाच हात असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आई-वडील कामाला जात असताना शाळाबाह्य बालगुन्हेगार अशा चोऱ्या करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. परंतु, खोका मार्केटमध्ये वारंवार होणाऱ्या चोऱ्यांना आळा बसणार तरी केव्हा, असा सवाल व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.

सातपूरच्या खोका मार्केटमध्ये होत असलेल्या चोऱ्यांमुळे व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. नेहमीच होत असलेल्या चोऱ्यांना पोलिसांनी आळा घालण्याची गरज आहे. व्यावसायिकांनीदेखील रात्रीच्या वेळी खासगी सुरक्षारक्षक नेमावेत.

- नितीन निगळ, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यूची आता लपवाछपवी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वाढत्या डेंग्यूची आता आरोग्य विभागानेच धास्ती घेतली असून, डेंग्यूच्या आकड्यांचीच लपवाछपवी सुरू केली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी विभागातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना आकड्यांच्या खेळात न पडण्याचा सल्ला दिल्याने डेंग्यूचा उद्रेक ऑक्टोबरमध्येही कायम असल्याचे चित्र आहे. दरम्यान, डेंग्यूप्रकरणी पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदाराला दिलेली नोटीस आता आरोग्य विभागाच्या अंगलट आली आहे. आरोग्य अधिकाऱ्याने ऑगस्टपूर्वीच्या डेंग्यूचे खापर दिग्विजय कंपनीवर फोडले आहे. त्यामुळे ही नोटीस ठेकेदाराला वाचवण्यासाठी होती की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

जूनपासून शहरात डेंग्यूचा उद्रेक वाढला आहे. आरोग्य विभागाची अनास्था आणि ठेकेदारांच्या बेपर्वाईमुळे शहरातील नागरिकांना डेंग्यूने विळखा घातला आहे. पाऊस सुरू होताच जूनपासून सुरू झालेला डेंग्यूचा कहर दिवसेंदिवस वाढत असून, सप्टेंबर महिन्यात डेंग्यूच्या संशयित रुग्णांसह पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने वर्षभरातील सर्व रेकॉर्ड मोडले आहे. जून, जुलै, ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबरमध्येही डेंग्यूचा उद्रेक कायम राहिला. सप्टेंबरची आकडेवारी आरोग्य विभागाने जाहीर केली असून, गेल्या महिन्यात २२१ डेंग्यूचे रुग्ण पॉझ‌‌िटिव्ह आढळले आहेत. त्यात १७५ रुग्ण हे शहरी हद्दीतील, तर ४६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. संशयित ६१९ रुग्ण आहेत. त्यामुळे यंदा डेंग्यूच्या रुग्णांचा उच्चांक आहे. जानेवारीपासून आतापर्यंत ६४० रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे.

डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपामुळे आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांची अडचण वाढली आहे. डेंग्यूप्रकरणी त्यांनी गेल्या महिन्यात पेस्ट कंट्रोलचा ठेकेदार दिग्विजय एंटरप्रायजेसला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आता संबंधित ठेकेदाराने केलेला खुलासा आरोग्य विभागावरच उलटला आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी आता डेंग्यूच्या आकड्यांची लपवाछपवी सुरू केली आहे. डेकाटे यांनी आरोग्य व वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांना डेंग्यूची आकडेवारी न देण्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्येही शहरात डेंग्यूची तीव्रता जास्त असल्याचे चित्र असून, डेंग्यू नियंत्रण करण्यात आरोग्य विभागाला अपयश येत असल्याने लपवाछपवी सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.

नोटीस पालिकेवरच बूमरँग

दिग्विजय कंपनीने आपला खुलासा सादर केला आहे. त्यात आरोग्य विभागाचेच वाभाडे ठेकेदाराने काढले असून ठेका ऑगस्टमध्ये दिला असताना एप्रिल, मे, जून, जुलैच्या डेंग्यूशी कंपनीचा संबंध काय, असा उलटा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे, तर सप्टेंबरमध्ये डेंग्यूची संख्या कमी झाल्याचा दावा केला आहे. सोबतच नोटिशीमध्ये उल्लेख केलेल्या अटी व शर्तींच्या अंमलबजावणीचे पुरावेच दिले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागच तोंडघशी पडल्याचे चित्र आहे. डेकाटे यांनी जुन्या कर्मचाऱ्यांचे वेतन दिले नाही, असा ठपका कंपनीवर ठेवला आहे, तर कंपनीने जुन्या काळातील वेतन आपण कसे देणार, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे ही नोटीस ठेकेदाराला वाचवण्यासाठी तर दिली नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images