Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जिल्हाधिकाऱ्यांना ‘झूम’चा विसर

0
0

२१ महिन्यांत बैठकच नाही; औद्योगिक समस्यांचे तीनतेरा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

औद्योगिक समस्यांच्या निराकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणारी जिल्हा उद्योग मित्र समिती (झूम)ची बैठक तब्बल २१ महिन्यांत झालीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्र आणि राज्य पातळीवर ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जात असताना जिल्ह्यात मात्र औद्योगिक अनास्था दिसून येत आहे. परिणामी, झुमचा विसर खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनाच पडला की काय, अशी शंका उद्योग वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

राज्य सरकारने १९८४ साली या समिती राज्यभर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी, तर सचिव म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांच्यावर जबाबदारी दिली. या समितीत उद्योगाशी निगडित असणाऱ्या विविध सरकारी विभागाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला. पण ही समिती केवळ आता नावपुरतीच उरली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशावह यांनी ही बैठक कुंभ मेळ्यानंतर घेऊ असे उद्योजकांना आश्वासन दिले होते. पण कुंभमेळ्यानंतरही ही बैठक झाली नाही. त्यानंतर त्यांची बदली झाली व नवे जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. रुजू झाले. पण त्यांनीही याबाबत बैठक घेतलेली नाही. राज्य सरकारने सदर समितीची बैठक महिन्यातून किमान एकदा घेण्यात यावी. जे प्रश्न व समस्या बऱ्याच वेळा चर्चा करुनही प्रलंबित राहतात, असे प्रश्न, समस्या ठरावाद्वारे विभागीय समन्वय समितीकडे पाठवण्याचे सांगितले आहे. पण बैठकच न झाल्यामुळे हा सोपस्कार केवळ कागदावर राहीला आहे.

सरकारी यंत्रणा ढिसाळ

नाशिक शहरातील सातपूर आणि अंबड या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये पायाभूत सुविधांबरोबरच अनेक समस्या आहेत. या सोडवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महावितरण, महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, इएसआय, जिल्हा परिषद अशा विविध सरकारी यंत्रणांशी समन्वय साधून हे प्रश्न मार्गी लावता येवू शकतात पण त्यासाठी ही बैठक होणे गरजेचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व परिस्थितीकडे दुर्लक्षच केले. एकूणच सरकारी यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे उद्योजकांमध्ये संताप आहे.

नुकताच रुजू झाल्यानंतर ही बैठक घेण्यासाठी मी आग्रही आहे. समितीची बैठक तीन महिन्यात एकदा घेऊन उद्योजकांचे प्रश्न सुटण्यासाठी समितीमार्फत पाठपुरावा केला जाणार आहे.

पी. डी. रेंदाळकर, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र


जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक दर महिन्याला दुसऱ्या मंगळवारी घ्यायला हवी. त्यामुळे उद्योजकांचे प्रश्न सोडवले जातात. मात्र औद्योगिक संघटनाही राजकारणात गुंतल्या आहेत. त्यामुळे या समितीकडे कोणाचेच लक्ष नाही.

अभय कुलकर्णी, उद्योजक

जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक तातडीने घेण्यात यावी. या समितीमुळे उद्योगाचे प्रश्न सुटतात. त्यामुळे समितीला वैधानिक दर्जा देत घेतलेल्या निर्णयाची सक्तीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही सरकार दरबारी मागणी केली आहे.

प्रदीप पेशकर, अध्यक्ष, भाजप उद्योजक आघाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डेंग्यूने गाठला उच्चांक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील डेंग्यूचा उद्रेक दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने सप्टेंबर महिन्याची आकडेवारी जाहीर केली असून, २२१ जणांना डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे. या वर्षातील हा डेंग्यूच्या रुग्णांचा उच्चांक मानला जात आहे. तसेच तब्बल ६१९ डेंग्यूचे संशय‌ित रुग्ण आढळून आले आहेत. २२१ रुग्णांपैकी १७५ रुग्ण शहर हद्दीतील तर ४६ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. महापालिकेची यंत्रणा डेंग्यूवर आवर घालण्यात अपयशी ठरत असल्याने आता नाशिककरांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

जून २०१६ पासून शहरात डेंग्यूचा उद्रेक सुरू आहे. आरोग्य विभागाची अनास्था आणि ठेकेदारांच्या बेपर्वाईमुळे शहरातील नागरिकांना डेंग्यून विळखा घातला आहे. पाऊस सुरू होताच जूनपासून सुरू झालेला डेंग्यूचा कहर दिवसेंदिवस वाढत असून, सप्टेंबर महिन्यात डेंग्यूच्या संशयित रुग्णांसह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्येने वर्षभरातील सर्व रेकॉर्ड मोडले आहे.

जून, जुलै, ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही डेंग्यूचा उद्रेक कायम राहिला. सप्टेंबरची आकडेवारी आरोग्य विभागाने जाहीर केली असून, गेल्या महिन्यांत २२१ डेंग्यूचे रुग्ण पॉझ‌‌िटीव्ह आढळले आहेत. त्यात १७५ रुग्ण हे शहर हद्दीतील तर ४६ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. तर संशयित ६१९ रुग्ण आहे. त्यामुळे चालू वर्षातील डेंग्यूच्या रुग्णांचा उच्चांक आहे. जानेवारीपासून आतापर्यंत ६४० रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे.

डेंग्यू संदर्भात राज्यातील पाच संवेदनशील जिल्ह्यात नाशिकचा समावेश असून राज्य आरोग्य विभागानेच महापालिकेची कानउघाडणी केली. परंतु, तरीही महापालिकेचा आरोग्य विभाग गंभीर नसल्याचे चित्र असून नोटिसांचा व पेस्ट कंट्रोलवरील ठेकेदारावर कारवाईचा फार्स दाखवला जात आहे. नगरसेविका मेघा साळवे यांच्या मुलालाच डेंग्यू झाला असून, सिडकोत एका संशय‌ित महिलेचा मृत्यू झाला आहे. तरीही या प्रश्नाची आरोग्य विभागाने दखल घेतलेली नाही. परतीच्या पावसाने आपला मुक्काम वाढवल्याने डेंग्यूची तीव्रता आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमपीए’मध्ये बुधवारी दीक्षांत संचलन

0
0

पोलिस महासंचालक माथुर यांची उपस्थिती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र पोलिस अकॅडमीत प्रशिक्षण पोलिस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या ११४ व्या बॅचचा दीक्षांत संचलन समारंभ पार पडणार आहे. बुधवारी (दि. ५) पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथुर, प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालक, शहराचे माजी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्र पोलिस अकॅडमीच्या मुख्य कवायत मैदानावर हा कार्यक्रम सकाळी आठ वाजता सुरू होईल.

११४ व्या बॅचमध्ये १८४ पुरूष व ५३ महिला असे एकूण २३७ प्रशिक्षित पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षणाअंती पोलिस सेवेत रूजू होतील. परविक्षाधिक पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या २५ व्या बॅचमध्ये आठ पुरूष व सहा महिला असे १४ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पहिल्याच बॅचमध्ये दोन पुरूष अधीक्षक, तीन पुरूष अधीक्षक व महिला प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

महाराष्ट्र पोलिस अकादमीतून आजवर ३८९ आयपीएस अधिकारी, ८४२ पोलिस उपअधीक्षक आणि तब्बल २३,९४४ पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षण घेऊन पोलिस सेवेत रूजू झाले आहेत. अकादमीला राज्य सरकारने ५ फेब्रुवारी २०१६ रोजी स्वायत्त संस्थेचा दर्जा बहाल केला असून, त्याचाही फायदा प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना मिळत असल्याचे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सचिन चव्हाण पदवीधरसाठी मैदानात

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पदवीधरांचे प्रश्न सभागृहापर्यंत पोचविण्याचे काम आतापर्यंत झाले नाही. त्यामुळे पदवीधरांचा आवाज दबला गेला. अशा पदवीधरांच्या हक्कांसाठी आजवर लढा उभारला असून त्यांची यापुढील जबाबदारी खांद्यावर घेण्यासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची घोषणा बहुउद्देशीय संवर्धन संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केली.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन चव्हाण यांच्या समर्थकांचा कदम लॉन्स येथे मेळावा झाला. यात विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला. त्यानंतर त्यांनी आपल्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली. यामुळे आता या निवडणुकीतील चुरस आणखी वाढणार आहे. यापूर्वी भाजपने डॉ. प्रशांत पाटील, काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे तर राष्ट्रवादी काँग्रेसने संग्राम कोते-पाटील यांची तर डाव्या आघाडीकडून कॉ. राजू देसले यांची उमेदवार म्हणून घोषणा केलेली आहे. त्यात आता अपक्ष सचिन चव्हाण यांची भर पडल्याने निवडणूक बहुरंगी होणार आहे. समर्थकांच्या मेळाव्यात चव्हाण यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्यामागची आपली भूमिका विषद केली. त्यापूर्वी अॅड. अपर्णा पाटील, प्रकाश कोरडे, प्रा. राम खैरनार, भारत निकम आदींनी चव्हाण यांच्या उमेदवारीला समर्थन जाहीर केले.

पदवीधरांचे प्रश्न सध्या दुर्लक्षित आहेत. त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित रहावे लागत आहे. पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक व जबाबदार उमेदवाराची गरज आहे. मी उमेदवारी करावी अशी नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर जिल्ह्यांतील असंख्य पदवीधरांचीच इच्छा आहे.

- सचिन चव्हाण, इच्छूक उमेदवार, नाशिक पदवीधर मतदारसंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओला दुष्काळ जाहीर करा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात सरसकट अतिवृष्टी झाली असून, ज्या भागात पिकांचे नुकसान झाले असेल, त‌ेथे ओला दुष्काळ जाहीर करून मुख्यमंत्र्यांनी तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. औरंगाबाद येथे होणाऱ्या मराठवाडा मंत्र‌िमंडळ बैठकीआधी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याचा दौरा करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. तसेच दुष्काळात मंत्र‌िमंडळाची बैठक अपेक्षित असतांना, ती पावसाळ्यात का घेता असा सवालही त्यांनी केला आहे.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना मुंडे यांनी भाजप सरकारकडून मराठवाड्यासाठी स्वतंत्र मंत्र‌िमंडळ बैठक घेण्याच्या विषयावर टीका केली. औरंगाबाद येथे होणारी मंत्र‌िमंडळाची बैठक ही दुष्काळात घ्यायला हवी होती. परंतु, दुष्काळात बैठक घेण्याऐवजी ती पावसाळ्यात का घेतली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे. राज्यसरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर केली नाही, तर शेतकरी पुन्हा संकटात सापडणार, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. मराठावाडा मंत्र‌िमंडळाची बैठक दरवर्षी होणे अपेक्षित आहे. आपण बैठकीपूर्वी मराठवाड्याच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचे त्यांनी सांग‌ितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता रुंदीकरणावर हरकती

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर शहराच्या प्रस्ताव‌ित डीपी आराखड्यावर हरकती येण्यास प्रारंभ झाला आहे. सर्वाधिक हरकती शहरांतर्गत रस्ता रुंदीच्याबाबत आहेत. शहरात साधरणात: तीन ‌मीटर रुंदीच्या रस्त्यावर सरसकट ९ म‌ीटर ते १२ म‌िटर रुदीकरण सुचविल्याने याबाबत आता सर्वस्तारातून विरोध होत आहे.

आखाडा परिषदेचे माजी महामंत्री महंत शंकरानंद महाराज यांनी यास तिव्र आक्षेप घेतला आहे. नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी याबाबत साधुमहंतांशी याबाबत चर्चा केली असता महंत शंकरानंद महाराज यांनी ग्रामस्थांनी याबाबत नाहक चिंता करण्याचे काम नाही असे सांग‌ितले आहे. बारा वर्षानंतर येणारा कुंभमेळ्यातील शाही मार्गाच्या नावाने आजच नागरिकांना वेठीस धरणे संयुक्त‌िक ठरणारे नाही. वास्तव‌िक पाहता प्रस्ताव‌ित विकास आराखडा आगामी ५० वर्षांचा विचार करता चांगला झाला आहे. नुकत्याच संपलेला सिंहस्थ निर्विघ्न पार पडला आहे. तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अवास्तव गर्दीचा अंदाज करत केलेल्या सूचनांमुळे अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते रुंदीकरण या आराखड्यात सुचविलेले दिसते आहे. या शहर विकास आराखड्याबाबत लवकरच साधुमहंतांची बैठक होणार आहे. या बैठकीत आपण स्वतः या रस्ता रुंदीकरणाबाबत पुनर्विचार रण्याची विनंती करणार आहोत. शहरात शेकडो वर्षांपासून कुंभमेळा होत आहे.

येथील ग्रामस्थ साधुंचे स्वागत करतात. त्याच साधुंच्या सुविधेसाठी नागरिकांनी आपले घरदार तोडावे लागणे चुकीचे आहे.

केवळ आपणच नाही तर कोणत्याही आखाड्याचे साधू अशा प्रकारे ग्रामस्थावर अन्याय होऊ देणार नाही. याबाबत साधुमहंतासह आपण शासन, उच्चाधिकारी आणि मंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी शाही मार्ग अथवा अन्य सुविधा निर्माण करतांना सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होणार नाही अशी साधुमहंतांची भूमिका होती. यापुढे देखिल ही भूमिका कायम राहील असे महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी सांग‌ितले आहे.

...तर घरांतूनच रस्ता

माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका यशोदा अडसरे यांनी नगरपरिषद कार्यालयात हरकत दाखल केली आहे. सिंहस्थाच्या नावाने नागरिकांना वेठीस धरले जाते. रस्ते आरक्षीत करतांना अथवा रुंदीकरण करतांना तीन मीटर अथवा चार मीटर असे असतील तर सरासरी साडेचार मीटर रस्ते करावेत. मात्र सरसकट ९ मीटर रस्ता हा थेट नागरिकांच्या घरामधूनच काढावा लागेल याचा नगररचना विभागाने विचार करावा, असे सांगितले.


नागरिकांनी गैरसमज करू नये!

नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी प्रस्ताव‌ित विकास योजनेच्या बाबत नागरिकांनी स्वतः आराखडा पाहून माहिती समजावून घ्यावी, असे आवाहन केले आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत हरकत घेण्यासाठी मुदत आहे. आराखड्यातील तरतुदी लक्षात घेता सूचना व हरकती घेऊन नागरिक आपले म्हणणे मांडू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वरुणराजाची कृपादृष्टी अन् बहरली सृष्टी!

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

वरुणराजाची कृपादृष्टी

बहरून जाई हि सृष्टी

आभाळानं केली माया

बदलून गेली दुष्काळाची काया

नटली वसुंधरा,ग्रहण झालं दूर

बळीराजाच्या आशेला फुटला अंकुर

असंच चित्र यंदाच्या पावसाळ्यात येवला तालुक्यात दिसू लागले आहे. निसर्गाची अवकृपा अन् दुष्काळाच्या दाहकतेत अडकलेला बळीराजा, गावोगावच्या विहिरींनी गाठलेला कातळ, हंडाभर पाण्यासाठी आयाबायांचा टाहो, गुरांची होरपळ हे सलग गेल्या तीन वर्षांत तालुक्यात दिसणारं निराशाजनक चित्र यंदाच्या पावसाळयात वरुणराजाचं भरभरून दान पदरी पडल्यानं एकदमच बदलून गेलं आहे. आभाळाची भरभरून माया यंदा लाभल्याने दुष्काळाची काया दूर झाली असून हिरवाईने नटलेल्या वसुंधरेसरशी बळीराजाच्या आशेला अंकुर फुटला आहे. गेल्या तीन वर्षातील तालुक्यातील अत्यल्प पर्जन्यमानामुळे एकामागोमाग एक खरीप व रब्बीचे हंगामांना फटका बसलेला. ‘रब्बी’चं दुखः तर विचारायलाच नको असं. गतवर्षी तर पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घसरल्याने तालुक्याला दुष्काळाच्या महाझळांचा सामना करावा लागला होता. मात्र हे चित्र यंदा झालेल्या दमदार पावसामुळे एकदम बदलले आहे.

बळीराजासह सर्वांनाच दिलासा

यंदा वरुणराजाने भरभरून दान टाकल्याने चित्र एकदमच पालटले आहे. गेल्या तीन वर्षांत तालुक्यातील नदी, नाले व बंधारे कधीही खळाळून वाहिले नव्हते. यंदा मात्र हे चित्र दिसलं अन् सर्वांचीच चिंता मिटली गेली. परतीच्या पावसाने देखील गेल्या आठवड्यापासून चांगलाच जोर लावल्याने तालुक्यातील पाण्याचा स्रोत उंचावला आहे. एकंदरीत यंदाच्या जोरदार पावसाने आगामी ‘रब्बी’ हंगामासह पुढील पाण्याची चिंता देखील मिटल्यातच जमा आहे. रविवारी ते सोमवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान तालुक्यातील महसूलच्या सहा परिमंडळात झालेला पाऊस बघितला तर येवला (२५), अंदरसूल (११.२), नगरसूल (१७.४), पाटोदा (५८), सावरगाव (१५.२) तर जळगाव नेऊर (३२.८) मिलीमीटर अशी नोंद झाली आहे.

वनक्षेत्रातील कुरणे हिरवीगार झाल्याने तालुक्यातील वनक्षेत्रात हजारोंच्या संख्येने असलेली हरणे, काळविटे, मोर यासह इतरही वन्यजीव बागडताना दिसत आहे. एकंदरीत यंदाच्या पावसाळ्यात दमदार पाऊस झाल्याने सर्वत्र वनराई बहरली असून तालुक्यावरील दुष्काळाची छाया दूर होण्यास मदत झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संरक्षणमंत्र्यांसमवेत आज होणर बैठक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशाचे एव्हिएशन हब अशी ओळख होत असलेल्या नाशिकमध्ये संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योगांचा विस्तार व्हावा यासाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (४ सप्टेंबर) नाशिकमध्ये विशेष बैठक होणार आहे. या बैठकीत नाशिकच्या विमानसेवेसह अन्य समस्यांबाबत चर्चा केली जाणार आहे.

नाशिक इंडस्ट्रिज मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (निमा) व नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अंबड येथील एनईसी हॉलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे उपस्थित राहणार आहे. ओझर येथील विमानसेवेसह नाशिकमध्ये मोठा उद्योग सुरू व्हावा यासाठी या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

गेल्याच आठवड्यात नाशिकमध्ये औद्योगिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक व्हावी, यासाठी मुंबईमध्ये मेक इन नाशिकचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय निमा व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत विमानसेवेचा विषयही सुध्दा गाजला.त्यानंतर उद्योजकांच्या संघटनांनी आता डाॅ.भामरे यांना साकडे घातले असून त्यातून हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.नाशिककडे मोठ्या उद्योजकांनी फिरवलेली पाठ फिरवल्यामुळे येथे मोठे उद्याेग यावे यासाठी केंद्रीय पातळीवर डाॅ.भामरे यांनी प्रयत्न करावे यासाठी उद्योजक आग्रह धरणार आहे. उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन निमाचे अध्यक्ष हरिशंकर बँनर्जी ,एनईसीचे अध्यक्ष नरेंद्र गोलिया, उदय खरोटे यांनी केले आहे.

यावर होणार चर्चा

या बैठकीत नाशिकची विमानसेवा सुरू करण्याबाबत, एमआरओ ओझर विमानतळाच्या ठिकाणी एचएएलद्वारे सुरू व्हावा, प्रवासी विमानांची देखभाल दुरुस्ती ओझर येथे व्हावी, विमानात इंधन सेवा नाशिक येथील ओझर विमानकेंद्रात सुरू करण्यात यावी, सुखोईनंतर ओझरच्या एचएएलमध्ये तेजस विमानांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे. त्याचा उहापोह बैठकीत केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छगन भुजबळांच्या समर्थनार्थ मूक मोर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये पावसाच्या सरी कोसळत असताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप करीत त्यांचे लाखो समर्थक सोमवारी रस्त्यावर उतरले. ओबीसी बांधवांनी एकजुटीचे दर्शन घडवत भुजबळांवरील कथित अन्यायाचा मूक मोर्चाद्वारे निषेध नोंदवून शांत व शिस्तबद्ध मोर्चा काढून सरकारला जाब विचारला. राज्य सरकार सूड बुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप करतानाच, ओबीसींचा देशातील विक्रमी मोर्चा ठरल्याचा दावा संयोजन समितीने केला.

आठवडाभरापूर्वीच मराठा समाजाने शहरातून विराट मोर्चा काढला. त्याचवेळी ओबीसी बांधवांनी मोर्चाची जय्यत तयारी सुरू केली. या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यात आल्याने सर्वांचेच त्याकडे लक्ष लागले. शहरात सकाळपासूनच पावसाचा जोर असतानाही मोर्चेकऱ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. पावसाची तमा न बाळगता केवळ जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्यातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव मोर्चामध्ये सहभागी झाले. महिला, मुली तसेच ज्येष्ठ नागरिकांची संख्याही लक्षणीय होती.

दुपारी बारा वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.

दुपारी तीनच्या सुमारास जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना विविध जाती धर्माच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर एका समर्थकाने मोर्चेकऱ्यांसमोर निवेदनाचे वाचन केले. राष्ट्रगिताने मोर्चाची सांगता झाली.

बीडमध्ये २० ला मोर्चा

भुजबळांच्या समर्थनासाठी ओबीसी समाजाच्या वतीने मराठा मोर्चांच्या धर्तीवर नाशिकपाठोपाठ अन्य जिल्ह्यांतही मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे. नाशिकमधील भुजबळ समर्थक मोर्चांमध्ये बीड येथे येत्या २० ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्याला पावसाचा तडाखा

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरासह जिल्हाभरात परतीच्या पावसाने मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून जोरदार तडाखा दिला. यामुळे धुळे, साक्री, शिंदखेडा तालुक्यातील शेती पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्यासह पिकांची वाढ खुंटली होती. मात्र, परतीच्या पावसामुळे काही ठिकाणी शेतीपिकांना मोठा आधार मिळाला आहे. पावसामुळे पांझरा, बुराई नदीला पूर आला असून, नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी जाऊन कांदा, कापूस, भुईमूग, बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, रब्बी हंगामातील पिकांना या पावसामुळे फायदा होऊन, जिल्ह्यातील तलाव, धरणे, विहिरीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

शहरात मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने दुपारी तीन वाजता विश्रांती घेतली. मात्र, या कालावधीत शहरातील प्रमुख रस्त्यावरील गटारी पावसाच्या पाण्याने तुंबल्याने ते पाणी रस्त्यावर आले होते. तसेच देवपूरातील जयहिंद चौक, बसस्थानक परिसर, फाशीपूल चौक, मनपा परिसर यासह अन्य ठिकाणी रस्त्यांवर पाण्याचे मोठ-मोठे तळे साचले होते.

नंदुरबारचे रस्ते जलमय

नंदुरबार शहरातही परतीच्या पावसामुळे सर्वच रस्ते जलमय झाले आहेत. ग्रामीण भागात पावसामुळे नदीनाल्यांना पूर आल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे खरीप हंगाम वाया गेल्याने या पावसामुळे रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नवापूर तालुक्याचा पूर्व पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने रंगवली नदीला पूर आला आहे. तर करणाऱ्या धरणक्षेत्रातही पाऊस झाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या कलागुणांमुळे शाळेत डिज‌िटल क्रांती

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुरगाण्यासारख्या आदिवासी बहुल भागातील दोडीपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मागील आठ वर्षांपासून नृत्यविष्कारातून शाळेला डिजिटल स्वरूप करणारी साधने मिळवून दिली आहेत.

मुलांच्या कलागुणांवर डिजिटल रुप धारण करणारी ही बहुदा जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पहिली शाळा असेल, असा दावा शालेय व्यवस्थापन समितीने केली आहे. आरती जाधव, हर्षवर्धन गावित, आशा गावित, रोहित वाघमारे, मयुरी भोये, वैभव भोये, शिवाजी जाधव, दर्शना गावित, योगिता गावित, भावेश गावित, पुजा जाधव, स्नेहा कणसे या चिमुकल्यांनी अपार कष्ट करुन शाळेला पाच वर्षांत पंधरा लाखांची रोख रक्कम, पारितोषिक मिळवून दिले आहेत.

या विद्यार्थ्यांनी मुंबई येथील राज्यस्तरिय समूहनृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिकांसह शाळा डिजिटल करणारी साधनेही मिळवली. कला, नृत्य, क्रीडा, विज्ञानप्रदर्शन या सर्वच क्षेत्रात सदर शाळेतील विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व व विलक्षण यश संपादन केले आहे. या शाळेतील विद्यार्थी मागील आठ वर्षापासून ज्या ठिकाणी सांस्कृत‌िक नृत्य स्पर्धा असेल तिथे जाऊन शैक्षणिक साहित्य स्वरूपात पारितोषिके मिळविली आहेत. आज शाळेत दोन संगणक संच, दूरचित्रवाणी, डिश टीव्ही, ओव्हलहेड प्रोजेक्टेर, इन्वर्टर, साऊॅन्ड सिस्टमसह इतरही शैक्षणिक संसाधने आहेत. या विद्यार्थ्यांनी गुजरात आणि महाराष्ट्रात आपला कलाविष्कार सादर करून बक्षिस मिळविले आहेत. आज शाळेत आठ वर्षांपासून प्राप्त केलेले वेगवेगळ्या क्षेत्रातील शंभरापेक्षा जास्त बक्षिस जमा आहेत. शाळेला मुख्याध्यापक श्रीकांत काटेलवार, विनोद चव्हाण हे शिक्षक लाभले असून, त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला आहे. सन २००९ मध्ये मोडकळीस आलेली शाळा आज जिल्ह्यात लोकप्रिय व गुणवत्ता प्रिय शाळा ठरली आहे. याच शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला ‘कासरा’ या मराठी चित्रपटात काम करून शाळेच्या नावलौकिकात आणखीनच भर घातली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इस्लामी नववर्ष, मोहरमचा प्रारंभ

0
0


खान नजमुल इस्लाम, जुने नाशिक

इस्लामी हिजरी सन १४३७ चा शेवटचा दिवस संपून सोमवारी सायंकाळी इस्लामी हिजरी सन १४३८ मधील पहिला इस्लामी महिना मोहर्रमुल-हराम सुरू होऊन इस्लामी नववर्षाला प्रारंभ झाला. मोहरम सणालाही प्रारंभ होत आहे.

एकीकडे इस्लामी नववर्षाचा जल्लोष, तर दुसरीकडे दुखवट्यात साजरा होणारा मोहरमचा सण हे इस्लामी नववर्ष प्रारंभाचे वैशिष्ट्य ठरले आहे. दुसरीकडे गेल्या महिन्यात बकरी ईद व गणेशोत्सव एकाच काळात दहा दिवस साजरे झाले. आता मोहरम व नवरात्रोत्सव बरोबरीने आले आहेत. या दोन्ही उत्सवांचा कालावधीही सारखाच म्हणजेच सलग दहा दिवसांचा आहे, हे विशेष. विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे यौम-ए-अशुरा पाळत दहाव्या दिवशी मोहरम सणाची सांगता होते.

हिजरी सन आणि इस्लामी कालगणना

इस्लाम धर्माचे अंतिम पैगंबर हुजूर मुहम्मद सल्लल्लाहू अलैही वसल्लम यांनी पवित्र मक्का शरीफ येथून मदिना शरीफकडे हिजरत (स्थलांतर) केल्याच्या दिवसापासून हिजरी सनाला सुरुवात झाली. इस्लामी कालगणना चंद्रावर आधारित असून, या कालगणनेत बारा महिने आहेत. मात्र, महिन्यात ३१ तारीख नसून महिन्याच्या २९ तारखेला चंद्रदर्शन घेऊनच पुढील महिना व पहिली तारीख प्रारंभ होणार की नाही हे ठरविण्यात येते. २९ तारखेला स्पष्ट चंद्रदर्शन घडल्यास ३० तारीख न लागता महिना बदलतो. २९ तारखेला चंद्रदर्शन न घडल्यास ३० तारीख पूर्ण होऊन महिना आपोआप बदलतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयटीआय’ला दुकानांचा विळखा

0
0


म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेच्या जागेवर कुणीही यावे व काहीही व्यवसाय करावा, अशी परिस्थिती शहराच्या मुख्य रस्त्यांवर पाहायला मिळते. त्र्यंबकेश्वररोडवरील आयटीआयच्या मैदान परिसरातदेखील अशीच स्थिती असून, या मैदानाला अनधिकृत व्यावसायिकांचा विळखा पडला आहे. त्यामुळे त्र्यंबकरोडलाच बाजाराचेच स्वरूप आले आहे.

या प्रकारामुळे शासन व महापालिकेचे सर्व कर भरून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी अशा अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर महापालिकेची मेहेरबानी का, असा सवाल उपस्थित केला आहे. महापालिका प्रशासनाने शहरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीदेखील अधिकृत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत भंगार बाजाराचा प्रश्न महापालिकेकडून सुटत नसताना आता शहरातील मुख्य रस्त्यांवर अनधिकृत व्यावसायिकांनी आपले बस्तान मांडले आहे. त्र्यंबकेश्वररोडवरील आयटीआयच्या मैदानाला अशाच प्रकारे अनधिकृत व्यावसियाकांनी विळखा घातला आहे. चप्पल, बुटांपासून ते कपडे विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी येथे सर्रासपणे उघड्यावर दुकाने थाटली आहेत. महापालिकेच्या विविध कर विभागाकडून केवळ जागेचा वापर करतात म्हणून २० ते ३० रुपयांची पावती फाडण्यातच धन्यता मानली जात आहे. मात्र, या अनधिकृत व्यवसायांमुळे त्र्यंबकरोडला बाजाराचेच स्वरूप आले आहे. एकाने अनधिकृत दुकान थाटले म्हणून दुसरा, तिसरा असे करत अनेकांनी त्र्यंबकरोडवर दुकाने थाटली आहेत.

महापालिकेचे अनेक अधिकारी या रस्त्यावरून जात असताना त्यांना अनधिकृत व्यावसायिकांचे अतिक्रमण दिसत नाही का, असा सवाल उपस्थित होतो. त्यातच काही राजकीय पुढाऱ्यांचीदेखील अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर मोठी मेहेरबानी असल्याने अशा दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी शासनाचे सर्व कर भरणाऱ्या व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

भाविकांची नेहमीच वर्दळ असलेल्या त्र्यंबकेश्वररोडवर आयटीआय सिग्नलच्या मैदानाला लागून अनधिकृत व्यावसायिकांनी आपले बस्तान बसविले आहे. अतिक्रमण निर्मूलन विभाग हे अतिक्रमण कधी हटविणार, असा आमचा सवाल आहे.

-चिंतामण काळे, व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्पा’वर पोलिसांची धाड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील उच्चभ्रू समजला जाणाऱ्या कॉलेजरोडवरील स्पा आड सुरू असलेला कुंटणखाना शहर पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी उद‌्ध्वस्त केला. पोलिसांनी एका व्यवस्थापक महिलेसह पाच मुलींची सुटका करीत स्पा मालकास जेरबंद केले आहे. कॉलेजरोडवरील इजी डे मॉलसमोरील ठक्कर मॅजेस्टी इमारतीत हा अड्डा सुरू होता. विशेष म्हणजे याच ठिकाणी पोलिसांनी मागील वर्षी छापा मारून काही मुलींची सुटका केली होती.

कॉलेजरोड परिसरातील हॉलमार्क चौक, इझी डे मॉल परिसरातील काही इमारतींमध्ये अवैध व्यवसायाचे पेवच फुटले आहे. पोलिस सातत्याने रौलेटसह इतर अवैध गेम्स पार्लरवर छापे मारतात. टवाळखोरांसाठी हा परिसर नंदनवन म्हणून ओळखला जात असून, कॉलेजचे विद्यार्थी या अवैध व्यावसायिकांसाठी मोठी पर्वणीच ठरत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस सातत्याने हॉलमार्क चौकात कारवाई करताना दिसतात.

ठक्कर मॅजेस्टी इमारतीतील एनझी या स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना समजली होती. त्यानुसार, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची खात्री केली. संध्याकाळच्या सुमारास पोलिस उपायुक्त पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्यासह गंगापूर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी या स्पावर छापा मारला. पोलिसांनी येथून सहा मुलींची सुटका केली. यातील एक मुलगी स्पामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करते. पोलिसांनी स्पा मालक हेमंत अशोक परिहार यास अटक केली. छापा मारला त्यावेळी एक ग्राहक स्पा मध्ये हजर होता.

दुसऱ्यांदा टाकली धाड

याच स्पावर गेल्या वर्षी पोलिसांनी छापा मारून काही मुलींची सुटका केली होती. मात्र, त्यावेळी स्पा मालक वेगळाच होता. पोलिसांच्या कारवाईनंतरही स्पा आड सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाला आळा बसत नसेल तर पोलिसांनी यापेक्षा कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे.

माहिती मिळाल्यानंतर आम्ही खात्री करून छापा मारला. संबंधित संशयित आरोपींविरोधात पीटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. स्पा मालकाविरोधात कारवाई होईल. मात्र, हे दुकान कोणाच्या मालकीचे आहे, त्याचाही शोध घेऊन त्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.

- राजू भुजबळ,

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगरची रामलीला एेक्याचे प्रतीक

0
0


गांधीनगरची रामलीला आणि बंगाली बांधवांचा दुर्गोत्सव नाशिकरोडचीच नव्हे, तर नाशिकची शान आहे. रामलीला ही संस्कार आणि सामाजिक एक्याचे प्रतीक झाली आहे. रामलीलेने रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला अनेक कलावंत दिले आहेत. रामलीलेचा हा सोहळा आता ६१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त रामलीला समितीचे महासचिव कपिल शर्मा यांच्याशी केलेली बातचीत.

रामलीला केव्हा सुरू झाली?

देशाची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानातून हिंदीभाषक दिल्लीत आले. तेथून काही जण नाशिकरोडला स्थायिक झाले. त्यांनी १९५५ मध्ये ही रामलीला सुरू केली. सुरुवातीला दोन वर्षे ती उर्दूत सादर होत असे. १९५७ पासून दिग्दर्शक सुरेंद्रसिंग बिश्त, देवीलाल शर्मा यांनी ती हिंदीमधून सादर करणे सुरू केले.

रामलीलेची वैशिष्ट्ये काय आहेत?

या रामलीलेस सर्व जाती-धर्मीयांचे योगदान मिळते. दिलबागराय त्रिखा ४० वर्षांपासून लक्ष्मणाची भूमिका करीत आहेत. दिवंगत दिग्दर्शक फ्रान्सिस वाझ यांनी इंद्रजीत, शरीफ शेख यांनी परशुराम आणि तस्लिम पठाण यांनी रावणाची भूमिका केली. सुनील मोदियानी रावणाचा पुतळा तयार करतात. गुरुदयाल त्रिखा स्टेज व्यवस्था बघतात. धीमन यांनी सर्वात प्रथम फिरता रंगमंच केला होता. पूर्वी रावणदहन गोल्फ क्लबवर होत असे. ते आता गांधीनगरला होते. त्यासाठी लाखभर प्रेक्षक येतात.

साठ वर्षे पूर्ण झाल्याचे रहस्य काय?

सर्व कलाकार विनामूल्य काम करतात. प्रेस कामगार, वकील, डॉक्टर, इंजिनीअर, व्यावायसिक, लोकप्रतिनिधी अशा अनेकांमुळे रामलीला सुरू आहे. लहान मुलांचा सहभागही महत्त्वाचा आहे. संगमनेरचे जमीर फायर वर्क्स १९५५ पासून मोफत फटाके पुरवीत आहेत. रामलीलेत भूमिका केलेले मनोज कदम (न्यूझीलंड), सचिंदर पालसिंग मारवा (दिल्ली), प्रकाश राजानी (इंदूर), मनोज कुलथे (ठाणे) असे अनेक जण यथाशक्ती मदत करीत आहेत.

रामलीलेसाठी कोणाचे सहकार्य लाभते?

मल्होत्रा ब्रदर्स, गुप्ता डेकोरेटर्स, आनंद ट्रान्सपोर्ट, आदर्श लॉड्री, एलआयसी, कारडा कन्स्ट्रक्शन्स, श्यामराव विठ्ठल बँक, प्रेस युनियन, पोलिस, सीपीडब्ल्यूडी आदी संस्था, संघटना, तसेच राजेंद्र जाधव (मेकअप), आर. पी. सिंग, प्रदीप भुजबळ, अशोक लोळगे, संजय लोळगे, हरीश परदेशी, अनिल ताजनपुरे, मनोहर बोराडे, सुनील मोदियानी आदींसह असंख्य व्यक्तींचे सहकार्य लाभत आहे.

प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा आहे?

केबल टीव्हीमुळे मनोरंज होते. परंतु, रामलीलेमुळे संस्कार होतात. आदर्श पुत्र, आदर्श पत्नी, भाऊ कसा असावा हे रामलीलेतून कळते. नेहमी सत्याचाच विजय होतो, हेदेखील ध्वनित होते. त्यामुळे आजही लोक मुलाबाळांसह रामलीला बघण्यासाठी येतात. पूर्वी सिन्नर, भगूर, लहवित, देवळाली, म्हसरूळ आदी भागातून लोक बैलगाड्यांतून येत

असत. आजही प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे.

रामलीला संयोजकांपुढील अडचणी कोणत्या?

रामलीलेचा खर्च दर वर्षी चार-पाच लाखांच्या घरात जातो. त्याची तोंडमिळवणी करताना नाकीनऊ येतात. मुंबईहून ड्रेसेस व अन्य साहित्य आणावे लागते. पूर्वी हौशी कलाकार सहज उपलब्ध होत असत. आता नोकरी-धंद्यामुळे कलाकार सहज उपलब्ध होत नाहीत. प्रेस कामगारांमुळे रामलीला सुरू आहे. पूर्वी साडेतीन हजार प्रेस कामगार होते. मात्र, आता सुमारे सव्वादोनशे प्रेस कामगार आहेत.

कलाकारांना काेणता फायदा झाला?

रामलीला कलाकारांचा कारखाना आहे. रामलीलेतील कलावंत नाटक, चित्रपटसृष्टीत चमकत आहेत. त्यामध्ये महेश बोराडे, हरीश परदेशी, प्रदीप भुजबळ, सुजाता देशमुख, प्रिया तुळजापूरकर आदींचा समावेश आहे.

पुढील योजना काय आहेत?

पैशाची तरतूद झाली तर चित्रपटाप्रमाणे ट्रीक सीन्स सादर करायचे आहेत. सध्याचे स्टेज छोटे आहे. ते मोठे करायचे आहे. रामलीलेचा प्रसार-प्रचार दूरवर करायचा आहे.

(संकलन ः डॉ. बाळकृष्ण शेलार)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासदार सुळे घेणार निवडणुकीचा आढावा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून, पक्ष तयारीचा आढावा घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे बुधवारी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. निवडणुकीचा आढावा घेण्यासह सुळे या सटाण्यातील कांदा परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकांची तयारी पक्षाने सुरू केली असून, खासदार सुळे पक्षाच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. बुधवारी सकाळी ९ वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी, नगरसेवक, फ्रंट सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. प्रभागनिहाय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून इच्छूक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली.

दुपारी सटाण्यात कांदा परिषद

खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार बुधवारी सटाणा येथे कांदा परिषदेत उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली. सटाणा येथील आनंद मंगल कार्यालयात दुपारी अडीच वाजता खासदार सुळे यांच्या उपस्थितीत कांदा परिषद होणार आहे. कांद्याचे भाव वाढल्यावर भाव स्थिर रहावे यासाठी सरकारतर्फे हस्तक्षेप केला जातो. त्याचप्रमाणे कांद्याचे भाव अत्यंत कमी झाल्याने सरकारने बाजार हस्तक्षेप योजनेद्वारे कांद्याला हमीभाव जाहीर करावा, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. त्यावर सुळे या आगामी आंदोलनाची दिशा मांडणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉवरग्रीडची चर्चा फिस्कटली

0
0

म. टा प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना योग्य मोबदला तसेच द्राक्ष बाग उभी करण्यासाठी येणारा खर्च दिला जावा, प्रकल्पाचे काम सुरू करण्याआधी शेतकऱ्यांच्या नावावर एकरकमी भरपाई देण्यात यावी आदी मागण्यांवर पॉवरग्रीड प्रकल्पग्रस्त कायम आहेत. त्यामुळे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली.

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंड‌ियाची अतिउच्च दाबाची विद्युत लाइन निफाड, दिंडोरी तसेच चांदवड तालुक्यातून टाकण्यात येत आहे. तीन वर्षांपासून हे काम सुरू असून, शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. कंपनीने योग्य मोबदला देण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे शेतकरीही सकारात्मक प्रतिसाद देऊ लागले. मात्र त्यांना आश्‍वासनापलीकडे ठोस काही न मिळाल्याने हा प्रश्न जैसे थे आहे. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रकल्पबाधित उपस्थित होते. पॉवरग्रीडच्या टॉवरखालील द्राक्षबागांचे मोठे नूकसान होणार आहे. त्यामुळे योग्य मोबदला मिळायलाच हवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. बैठकीत शेतकऱ्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. मात्र ठोस निर्णय होऊ शकला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

या आहेत मागण्या

द्राक्ष निर्यातीचा दर विचारात घेवून मोबदला द्यावा

नूकसान भरपाईत कुठलीही वजावट करू नये

जेथे द्राक्षबाग नाहीत त्या शेतकऱ्यांना भरीव मोबदला द्यावा

टॉवरच्या आजूबाजूचे एक ते दीड एकर क्षेत्र नापिक होते त्यास पूर्ववत करण्यासाठी खर्च दिला जावा

प्रकल्पबाधित म्हणून दाखला देण्यात यावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्या वैद्यकीय विभागात भरती

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेत मानधनावर नोकरभरती करण्याची नगरसेवकांची मागणी प्रलंबित असली तरी महापालिकेने विविध ७० पदासांठी भरतीप्रक्रिया सुरू केली आहे. परंतु, ही भरती राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) केली जाणार असून त्याचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. सोबतच पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही भरती केली जाणार आहे. त्यामुळे उशिरा का होईना महापालिकेला पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी मिळणार आहे. दरम्यान, वैद्यकीय विभागाच्या मानधनावरील भरतीप्रक्रियेमुळे नगरसेवकांच्या संभाव्य भरतीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

महापालिकेत विविध रिक्त पदांसाठी नोकरभरती प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र, राज्य सरकारने या नोकरभरती करण्याऐवजी आऊटसोर्सिंगद्वारे कामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेतील नोकरभरतीचा प्रश्न अनेक दिवसांपासून रेंगाळला आहे. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत महापालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण समितीच्या वतीने नोकरभरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. वैद्यकीय विभागातील सुमारे ७० पदे या भरतीत भरली जाणार आहे. त्यात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, नर्स, फार्मासिस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर, ए. एन. एम, लॅब टेक्निशिएशन, लेखापाल, शिपाई अशी पदे भरली जाणार आहे. याव्यतिरिक्त अन्य सात पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी १३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सहा पदे रिक्त आहेत. ती सर्व पदे या मोहिमेअंतर्गत भरली जाणार आहे. महापालिकेमार्फत ही भरती केली जाणार असली तरी हा सगळा खर्च मात्र केंद्र सरकारकडून केला जाणार आहे. ही पदे कंत्राटी तत्वावर भरली जाणार आहे. परंतु, या भरतीप्रक्रियेने नगरसेवकांच्या आशा मात्र पल्लवित झाल्या आहेत. या भरतीच्या निमित्ताने महापालिकेची नोकरभरती निवडणुकांपूर्वी तरी मार्गी लागेल, अशी चर्चा नगरसेवकांमध्ये रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोळीत फास लागल्याने चिमुकल्याचा अंत

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

झोळीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना ओढणीत अडकून श्वास कोंडल्याने दीड वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत झाला. अंबड गावालगतच्या महालक्ष्मीनगर परिसरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.

महालक्ष्मीनगरमध्ये संदीप साळुंखे हे आपल्या परिवारासह राहतात. मंगळवारी त्यांचा दीड वर्षांचा चिमुकला पृथ्वी हा झोळीत झोपलेला होता. पृथ्वी झोक्यातून खाली पडू नये यासाठी त्याच्या आईने झोळीला ओढणी बांधली होती. परंतु काही वेळाने पृथ्वीला जाग आली आणि तो झोळीतून खाली येण्यासाठी खटपट करू लागला. पृथ्वीची आई कामात असल्याने तिचेही इकडे लक्ष नव्हते. पृथ्वी झोळीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतांना झोळीला बांधलेल्या ओढणीत त्याचा गळा आवळला गेला आणि त्याला गळफास लागला. आईच्या लक्षात येताच त्यांनी त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. याबाबत रात्री अंबड पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हागणदारीमुक्तीसाठी डिसेंबरपर्यंतचे टार्गेट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने आता शहर हागणदारीमुक्तीचे टार्गेट डिसेंबरपर्यंत वाढविले आहे. प्रभाग हागणदारीमुक्त जाहीर करण्याची जबाबदारी प्रभागातील लोकप्रतिनिधी, शिक्षक व मुख्यध्यापकांवर टाकण्यात आली आहे. संबंधित घटक पब्लिक नोटीस देऊन आपला प्रभाग हागणदारीमुक्त जाहीर करणार असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. दरम्यान, आतापर्यंत पाच हजार कुटुंबाकडे शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्याचा दावाही आरोग्य विभागाने केला आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेत हागणदारीमुक्त शहर मोहीम राबविण्यात आली आहे. त्यासाठी शहरात शौचालय नसलेल्या कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात शहरात ७ हजार २६४ कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे समोर आले आहे. या कुटुंबांसाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधले जात आहेत. आतापर्यंत पाच हजार ९ कुटुंबाकडे शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर अकराशे कुटुंबाकडे बांधकाम सुरू आहे. २६९ नागरिकांनी शौचालय बांधण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या कुटुंबाचे काऊन्सि‌लिंग केले जात आहे. १४० कुटुंबासाठी सामूहिक शौचालय बांधले जात आहे.

आरोग्य विभाग स‌क्रिय
डिसेंबर अखेरपर्यंत सर्वांना शौचालय बांधून देवून शहर हागणदारीमुक्त घोषित केले जाणार आहे. त्याची जबाबदारी आता लोकप्रतिनिधी, शिक्षक, मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली असून त्यासंदर्भातील डिक्लरेशन त्यांच्याकडूनच केले जाणार आहे. संबंधितांनी डिक्लेरेशन दिल्यानंतरच महापालिकेकडून संबंधित प्रभाग हागणदारीमुक्त म्हणून घोषित केला जाणार आहे. डिसेंबरपर्यंत स्वच्छ भारत अभियानाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाची धावपळ सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images