Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

हजर व्हा, अन्यथा मालमत्ता जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी अशा गंभीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि मोक्का कलमानुसार कारवाई झालेल्या सात संशयितांनी हजर व्हावे; अन्यथा त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. याबाबतचा आदेश कोर्टाने दिला आहे.

पंचवटीतील सुनील वाघ हत्याकांडानंतर शहर पोलिसांनी हत्या, तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार पंचवटीतील अनेक सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली. या गुन्ह्यात पोलिसांनी काही जणांना अटक केली असून, सध्या ते सेंट्रल जेलमध्ये आहे. मात्र, रवींद्र दगडूसिंग परदेशी (हनुमानवाडी, पंचवटी), अर्जुन रवींद्र परदेशी (हनुमानवाडी, पंचवटी), गणेश भास्कर कालेकर (हनुमानवाडी, पंचवटी), जयेश हिरामण दिवे (एरंडवाडी, पेठ फाटा, पंचवटी), राकेश तुकाराम कोष्टी (विजयनगर, दत्त चौक, सिडको), व्यंकटेश नानासाहेब मोरे (फ्लॅट क्रमांक १३, प्रीती अपार्टमेंट, विठ्ठल रुक्मिणी कार्यालयाजवळ, मखमलाबाद रोड) आणि किरण दिनेश नागरे (प्लॉट क्रमांक ७८, पार्वती निवास, जाणता राजा कॉलनी, मखमलाबाद रोड) यांना विशेष मोक्का कोर्टाने फरार असल्याबाबत जाहीरनामा (उदघोषणा) काढला असून, कोर्टाने या संशयितांना १४ ऑक्टोबर २०१६ पर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या तारखेपर्यंत संशयित कोर्ट अथवा पोलिसांसमोर हजर झाले नाही, तर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे संशयितांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जेव्हा शिक्षकच बनतात विद्यार्थिनींचा आधार

$
0
0

ashwini.kawale@timesgroup.com
Tweet : ashwinikawaleMT

नाशिक : वय शाळेचे.. पण पोटासाठी बाहेर पडून काम करण्याला घरादारातही जास्त महत्त्व.. त्यामुळे सकाळी उठल्यापासून पहिले घरातील व त्यानंतर इतरांकडे धुण्याभांड्याची काम करायला जायचे.. रोजच्या या दिनक्रमात शाळा मागे पडत चाललेली.. परंतु खऱ्या अर्थाने गुरुतुल्य असलेल्या शिक्षकांमुळे शाळा व अभ्यास दोन्हीही चांगल्या गतीने सुरू आहे.. हे चित्र आहे रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयातील मुलींच्या दैनंदिन जीवनाचे.

शाळेतील बहुतांश मुलींची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असून, झोपडपट्ट्यांमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. आई-वडिलांची शिक्षणाशी कधीच गाठ न पडल्याने आपल्या मुलांच्या व त्यातही मुलीच्या शिक्षणाबद्दल त्यांची मोठीच अनास्था असते. ‘शाळेत जाण्यापेक्षा काम कर’, असे टोमणेही त्यातूनच ऐकावे लागतात. मात्र, काहीही करून या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवायेच या अट्टहासाने रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयातील सर्व शिक्षक कार्य करीत आहेत. या मुलींच्या कुटुंबाप्रमाणे या पिढीच्या वाट्याला तरी असे जीवन येऊ नये, यासाठी शाळेत येण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा शाळेमार्फत पुरविल्या जातात. बहुतांश मुली राजीवनगर, शिवाजीवाडी, सहवासनगर, कालिकानगर, मिलिंदनगर, कामटवाडे येथील झोपडपट्ट्यांमधून येतात. ये-जा करण्यासाठी लागणारा खर्च परवडत नसल्याने त्यांना मोफत बस पास काढून दिले जातात. शाळेतील शिक्षक दर महिन्याला स्वतःच्याच पगारातून यासाठी वर्गणी काढतात. याशिवाय मोफत गणवेश, नववी- दहावीच्या मुलींना पाठ्यपुस्तकेही उपलब्ध करून दिली जातात. शिवाय त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठीही शाळेतील शिक्षकवृंद सातत्याने पुढे असल्याने हे शिक्षक सर्वार्थाने या मुलींसाठी गुरू ठरत आहेत.

असे चालते काम...

रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात २० शिक्षक व एक मुख्याध्यापक असे २१ जण कार्यरत आहेत. प्रत्येक शिक्षक दर महिन्याला एक ते दीड हजार रुपये या मुलींच्या बस पासेससाठी देतात. शाळेतील शिपाईही आपल्या मिळकतीनुसार या उपक्रमाला हातभार लावतात. दर महिन्याला १५ ते १६ हजार रुपये जमा केले जातात. यातून पाससाठी आवश्यक फॉर्म आणणे, ते भरणे इथपासून मुलींना त्यांच्या हातात पास देण्यापर्यंतचे सर्व काम शिक्षक करतात. मुलींनी केवळ शाळेत यावे व शिक्षण घ्यावे ही एकच आमची इच्छा असल्याचे शिक्षक सांगतात.

शाळेत सर्व गरजू विद्यार्थिनी आहेत. त्यांच्याकडून कोणतीही फी आकारली जात नाही. त्यांनी फक्त चांगले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे, ही आमची इच्छा आहे.

- करुणासागर पगारे, विश्वस्त

या मुलींच्या घरातील पार्श्वभूमी ही शिक्षणासाठी पूरक नसल्याने आम्हाला सातत्याने प्रबोधनाचे काम सुरू ठेवावे लागते. काही विद्यार्थिनी पास मिळाल्यानंतर दोन-तीन दिवस येत नाहीत. अशांना त्यांच्या घरी जाऊन शाळेत येण्यासाठी प्रवृत्त करावे लागते. या मुलींना जास्तीत जास्त चांगले शिक्षण मिळावे, या हेतूने आम्ही कार्य करीत आहोत.

- सरिता जोशी, मुख्याध्यापिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादचा ‘एनयूएफसी’ उपांत्य फेरीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

गुरू स्पोर्टस व सोशल फाऊंडेशनतर्फे आनंद रोड मैदानावर सुरू असलेल्या ‘द देवळाली कप’ राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत औरंगाबादच्या एनयूएफसी संघाने ड गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी मुंबईच्या कस्टम सी बॉइज संघाचा टाय ब्रेकरमध्ये ५-३ असा पराभव केला.

स्पर्धेच्या चौथ्या दिवशी कस्टम सी बॉइज संघाने मिल्लत एफसी संघाचा १-०, तर एनयूएफसी संघाने बांगलादेश फुटबॉल क्लबचा ७-० तर असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत एनयूएफसी विरुद्ध कस्टम सी बॉइज संघातील सामना चुरशीचा झाला. आक्रमण आणि बचावाचे सुरेख प्रदर्शन झाले. मध्यांतरापर्यंत गोलशून्य बरोबरीची स्थिती उत्तरार्धातही कायम राहिली. अखेर पेनल्टी शूटआऊटवर दोन्ही संघांना सामोरे जावे लागले. कस्टम सी बॉइज संघाकडून मनीष भांबरे, जॉन कुटिनो, प्रमोद गालरे यांनी गोल नोंदवले. एनयूएफसी संघाकडून हनीफ, इम्युअल, विन्सेंट, रिझवान, अझर यांनी गोल नोंदवत ३-५ असा विजय मिळविला. रिचर्ड डिक्सन, सिद्धार्थ गाडे, साहील बोस्तेकर पंच होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आॅक्टोबरमध्ये बँकांना तब्बल दहा सुट्या

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सणांचा महिना असलेल्या आॅक्टोबरमध्ये तब्बल दहा दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यात नियमित सुटीचे पाच रविवार व दुसऱ्या व चौथ्या शनिवारच्या सुटीचे दोन दिवस अशा सात दिवसांचा समावेश आहे. या नियमित सुटीबरोबरच ११ आॅक्टोबर रोजी दसरा, त्यानंतर १२ आॅक्टोबरला मोहरम व ३१ आॅक्टोबरला दिवाळी या तारखांनाही बँकांना सुटी राहणार असल्यामुळे सर्वांना बँकांचे व्यवहार करण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे.

आॅक्टोबर महिना ३१ दिवसांचा असला, तरी त्यातील २१ दिवसच बँका सुरू राहणार असल्यामुळे त्याचा ताण मात्र इतर दिवसांवरही येणार आहे. दिवाळी व दसरा हे दोन्ही सण सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. त्याचप्रमाणे व्यापारीदृष्ट्या या दोन्ही सणांच्या वेळेत बाजारात मोठी उलाढाल होत असते. त्यामुळे व्यापाऱ्यांनाही त्यांचे नियोजन हा सुटीचा कालावधी लक्षात घेऊन करावे लागणार आहे. सामान्य माणूसही या सणांच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार करतो. त्यामुळे त्यांना या सुटीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बँकांनी पुरवलेले विविध कार्ड व एटीएममुळे बँका बंद असल्या, तरी त्याचा फारसा फरक पडत नाही. पण, या काळात एटीएममध्येसुद्धा गर्दी राहणार असून, त्यात कॅश संपली, तर ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हे सर्व नियोजन व्यापारी व सामान्य माणसाला करावे लागणार आहे.



सलग सुट्या चार वेळा

या सुट्यांमध्ये सलग सुट्याही आहेत. त्यात ८ आॅक्टोबरला दुसरा शनिवार व ९ आॅक्टोबरला रविवारची सुटी आहे. त्याचप्रमाणे ११ आॅक्टोबरला दसरा, तर १२ आॅक्टोबरला मोहरम आहे, तर २२ आॅक्टोबरला चौथा शनिवार व २३ आॅक्टोबरला रविवार आहे. त्याचप्रमाणे ३० आॅक्टोबरला रविवार व ३१ आॅक्टोबरला दिवाळीचा सुटी आहे.



कॅशची चणचण

बँकांच्या या सुट्यांमुळे कॅशची चणचण भासणार आहे. बँक अकाऊंटमध्ये पैसे असले, तरी ते काढण्यासाठी नियोजन केले नाही, तर त्याची चणचण भासणार आहे. विशेष म्हणजे सणांचे दिवस असल्यामुळे नेहमीपेक्षा कॅशचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे त्याचाही फरक कॅशवर पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीचा जाहिरात फंडा!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या सहा-सात वर्षांपासून तोट्यात असलेल्या एसटीला बूस्ट मिळावा यासाठी आता महामंडळ सरसावले असून, प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आता जाहिरातीचा फंडा वापरण्यास सुरुवात केली आहे. या जाहिरातीमध्ये ‘एसटीचा आता लागला लळा, खासगी बसचा प्रवासच टाळा’ अशी कविताच प्रसिद्ध केली आहे. त्यात ‘परवडत नाही एेनवेळी वाढलेले खासगी प्रवासाचे दर म्हणून तर द्या एसटी प्रवासावर भर’ अशा आकर्षण निर्माण करणाऱ्या आेळींचाही समावेश केला आहे.

विशेष म्हणजे या कवितेच्या आेळींबरोबरच ‘सुरक्षित आणि वक्तशीर प्रवासाची हमी, आपली एसटी लई भारी’ असे आकर्षण निर्माण करणारे वाक्यही वापरले आहे. या जाहिरातीत आॅनलाइन आरक्षणासाठी वेबसाइटचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुमारे सव्वालाख कर्मचारी आणि १८ हजार बसेस असलेल्या एसटी महामंडळाचा तोटा कोट्यवधींच्या घरात पोहोचला आहे. त्यात खासगी वाहतुकीची समस्याही एसटीला डोकेदुखी ठरली आहे. एसटी प्रवासाच्या वाढलेल्या दरांमुळेही प्रवाशांचा आेढा कमी झालेला आहे. अशात एसटीने आता प्रवाशांना कसे आकर्षित करता येईल यासाठी विविध योजनाही सुरू केल्या आहे. त्यात कल्पकता वापरून कधी धार्मिक स्थळांना जाता यावे यासाठी बसेस सुरू करणे असो की सुटीमध्ये जादा बसेसचा विषय असो, एसटी आता त्याला अग्रक्रम देते. प्रवास भाड्यातही काही सवलतीच्या स्किम एसटीने काढल्या आहेत.

खेडोपाडी किंवा दुर्गम भागात जाण्यासाठी एसटीने सर्वत्र आपल्या बसेस सुरू केल्या आहेत. त्याचप्रमाणे विविध सवलतींचे प्रवासीसुद्धा एसटीनेच प्रवास करतात, असे असताना एसटीकडे मात्र प्रवाशांनी पाठ फिरवल्याचे चित्र नेहमीच दिसते. त्यामुळे अशा प्रवाशांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी एसटीचा हा जाहिरात फंडा कितपत उपयोगी पडतो, हे पुढील काळात समजणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्याने मतदार नोंदणीची सर्वपक्षीयांना डोकेदुखी

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याचे करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्याने सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघासाठी अगोदरच सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारी घोषित केल्यामुळे त्यांना पक्षातंर्गत विरोधकांचाही सामना करावा लागत आहे. या नोंदणी मोहिमेसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रयत्न सुरू केले असले, तरी जिल्हा परिषद ,नगरपालिका व महापालिकेच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष असल्यामुळे नव्या मतदार नोंदणीसाठी त्याचा फटका बसणार आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार अशा पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाचही जिल्ह्यांत आठ लोकसभा व ४७ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यात भाजपचे ६ खासदार व १९ आमदार आहेत. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक आता प्रतिष्ठेची ठरली आहे. भाजपपाठोपाठ शिवसेनेचे दोन खासदार व ८ आमदार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ आमदार व काँग्रेसचे १० आमदार असून, एकही खासदार नाही. या मतदारसंघात माकपचा एक आमदार व भाजपसमर्थक एक अपक्ष आमदार आहे.

भाजपसाठी हा मतदारसंघ व मतदार पारंपरिक होते. त्यामुळे नव्याने नोंदणीसाठी भाजपला सर्वाधिक फटका बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार डाॅ. सुधीर तांबे यांनी भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात दोनदा विजय मिळवत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात ठेवला. त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली. त्यांनाही आता नव्याने नोंदणी करणे जड जात आहे. शिवसेनेने या मतदारसंघाकडे पहिल्यापासून दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांचा या नव्याने होणाऱ्या नोंदणीत फारसा सहभाग नाही. राष्ट्रवादीने उमेदवारी घोषित केल्यामुळे त्यांना मतदार नोंदणीची चांगली संधी मिळाली असली, तरी त्यांना मतदार नोंदवणे अवघड जाणार आहे. माकपसह इतरांनीही या निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या पाच जिल्ह्यांत ३५ दिवसांत फिरणे त्यांनाही अवघड आहे.

---

मतदारांचा सामना

ही नोंदणी ५ नोव्हेंबरपर्यंत करावी लागणार असल्यामुळे पदवीधरही फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे राजकीय पक्षांना निवडणुकीपूर्वीच मतदारांचा सामना करावा लागत आहे. भाजपने या मतदार नोंदणीसाठी जोरदार मोहीम उघडली असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला रोज ५०० मतदारांची नोंदणीचे टार्गेट दिले आहे. काँग्रेसनेही आपली व्यूहरचना आखली आहे, तर इतर राजकीय पक्षांचेसुद्धा वेगवेगळे आराखडे आहेत. मात्र, तरीही नव्याने मतदार नोंदणी सर्वांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचपीटीतील ‘ती’ मशिन झाली सुरू

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

एचपीटी आरवायके कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अनेक समस्या सध्या भेडसावत आहेत. कॉलेजमध्ये निर्माण झालेल्या सर्व समस्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी (२७ सप्टेंबर) रोजी प्राचार्यांना सांगितल्या होत्या. यावेळी प्रामुख्याने विद्यार्थी प्रतिनिधी कॉलेजला मिळावा, एलआर रूममधील सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीनमध्ये रिफिल टाकली जावी, श्रद्धा मॅगझिन लवकरच विद्यार्थ्यांना द्यावे अशा समस्या लिखित स्वरूपात प्राचार्यांना देण्यात आल्या होत्या. या निवेदनानंतर ‘मटा’ ने पाठपुरावा केला असता, एलआर रूमच्या समस्येचे गुरुवारी निवारण करण्यात आल्याचे दिसून आले.

कॉलेजच्या लेडिज रूममधील सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिन गेल्या कित्येक दिवसांपासून बंद होती. यातील रिफिल्स संपल्या असल्या कारणाने विद्यार्थिनींना त्याचा वापर करता येत नव्हता. विद्यार्थ्यांनी समस्या सांगतांना हा मुद्दा कॉलेज प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. या वेळी विद्यार्थिनी कल्याण मंडळातील प्रा. रूपन सिंग यांनी लागलीच सॅनिटरी नॅपकिन मशिन बघून त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते.

विद्यार्थिनीकडून गैरवापर

विद्यार्थिनी कल्याण मंडळाच्या सदस्य उपप्राचार्य रूपन सिंग यांनी सांगितले की, 'अनेकदा विद्यार्थिनी एक रुपयाचा कॉइन मशीनमध्ये टाकतात. त्यामुळे मशिनला तांत्रिक अडसर येतो. विद्यार्थिनींच्या सुविधेसाठी असलेल्या सोयींची त्यांनीही योग्यतेने काळजी घ्यावी.


आवाज उठवल्यावर येते जाग

गुरुवारी सदर वृत्ताची दखल घेत कॉलेज प्रशासनाने सॅनिटरी नॅपकिनच्या रिफिल्स मशीनमध्ये टाकली आहे. विद्यार्थ्यांनी निवेदन दिले तेव्हा त्यांना, 'मशिन मेकॅनिक वेळेवर येत नाही, रिफिल्स मिळत नाहीत. आमचं लक्ष असतं पण रिपेअर करणारा किंवा रिफिल उपलब्ध होत नाही.' असे उत्तर प्राचार्यांनी दिले होते. मात्र, विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेरीस ही समस्या प्रशासनाने निकालात काढली आहे. निवेदन देण्या अगोदर माहिती असूनही समस्येचे निवारण केले गेले नाही. तसेच निवेदनानंतर एक दिवसात मेकॅनिक आणि रिफिल उपलब्ध करता आली का? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. कॉलेज प्रशासनाला विद्यार्थ्यांनी आवाज उठवल्यानंतरच जाग येते असेल असंही कॉलेजियन्सचे म्हणणं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रांतून जपली विज्ञानाची जाणीव

$
0
0

चित्रकला स्पर्धेत विवि‌ध विषयांचे सादरीकरण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेतर्फे रविवारी (दि. २) वैज्ञानिक चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बालकांच्या कलागुणांची जोपासना व्हावी व त्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली. यंदाचे स्पर्धेचे चौदावे वर्ष होते. महात्मा गांधी जयंतीनिमित्त व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘व्हीजन २०२०’ कार्य पूर्तीसाठी व विश्व गुरू भारत निर्मितीसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक जाणीव जपत विविध चित्रांचे यावेळी सादरीकरण केले.

या स्पर्धेत नाशिक शहरातील ८५ शाळांमधील एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अहिंसेचा मंत्र जागर करीत वैज्ञानिकतेची कास घेऊन बलशाली भारत निर्माण व्हावा, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे यांनी केले.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ निवास पाटील यांनी शास्त्रीय दृष्टीकोन व कला यांच्या समन्वयातून निर्माण झालेल्या नवसंशोधनाविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठ चित्रकार भिवराव सावंत, पोलिस निरीक्षक इनामदार, संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, अशोक नवले, मुख्याध्यापिका ज्योती कोल्हे व अशोक ढिवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘तत्त्वज्ञानाशिवाय पाया मजबूत नाहीच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजाच्या करमणुकीपेक्षा उपयोग व्हावा यासाठी मी लेखन सुरू ठेवले. मनातील भाव मांडता यावे या कलेसाठी वेगळी ताकद लागते. तत्त्वज्ञानाशिवाय माणसाचा पाया मजबूत होत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक डॉ. भीष्मराज बाम यांनी केले. सार्वजनिक वाचनालयाच्या ४९ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या मुलाखतप्रसंगी ते बोलत होते. वंदना अत्रे व प्रा. प्रणव रत्नपारखी यांनी त्यांची मुलाखत घेतली.

डॉ. बाम म्हणाले, मनातील भावनेला साजेशी तत्त्वज्ञान शोधून काढायचे असतात. पोलिस खात्यात काम करीत असताना ‘दक्षता’ मासिकात लेखक व संपादक म्हणून काम केले. पोलिस खात्यात काम करीत असताना सांगण्यासारखे खूप असते मात्र ते सांगायचे नसते. गुप्तचर खात्यातील अनुभव लिहिल्यास तीस वर्षांनंतर परवानगी मिळते. तोपर्यंत ती व्यक्ती बरेच काही विसरून गेलेली असते, असेही ते म्हणाले.

माझे वडील आणि काका अध्यात्माचे साधक होते. तेच संस्कार माझ्याही मनावर झाले. क्रीडा हा आवडीचा विषय होता. जास्त खेळता येईल, याकडे लक्ष देत असे. खेळात ९० टक्के मानसिक पातळीवर प्रयत्न असतो. शरीर हे मनाचे साधन आहे, असे सांगत डॉ. बाम यांनी वास्तव आणि स्वप्न वेगवेगळे असल्याचे स्पष्ट केले. कल्पनेतील चित्र निर्माण करताना, ते खरे आहे हे भासवता आले पाहिजे. म्हणूनच कादंबरी हा साहित्य प्रकार अवघड आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्याला मनातील भाव मांडता आले पाहिजे. दैवी संपत्ती दुर्लभ होत चालली आहे. स्वप्नात जगता येत नाही. स्वप्न आणि वास्तव वेगळे आहे.

फक्त स्वतःचा विचार करणे चुकीचे

आयुष्य वेचून जे काही मिळवतात. त्याकडे लक्ष जात नाही मात्र जेथे भपका असतो त्याच्याकडे जास्त लक्ष जाते. योग आपल्याकडे आहे मात्र ते आपणच विसरलो आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. प्राण शक्ती आत वळण्याची क्रिया आहे. वर्तमानात जगता आले पाहिजे. फक्त स्वतःचा विचार करणे चुकीचे आहे. सत्ता सोडायची नाही, अशा प्रकारच्या लोकशाहीचा आपला देश झाला आहे. मुलं बघून संस्कार घेतात. मुलांना खेळापासून दूर ठेवू नये. मेंदू सक्षम होण्यासाठी कला आणि क्रीडा मध्ये मुलांना रमू द्यावे. झाडाला फुले, फळे चांगले रुजण्यासाठी मूळांना पाणी घालण्याची गरज असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. वर्टी, कवी गोविंद पुरस्कार प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयातर्फे दरवर्षी जिल्हा साहित्यिक मेळाव्यानिमित्त देण्यात येणारे डॉ. अ. वा. वर्टी कथा व कवी गोविंद काव्य पुरस्कार प्रमुख पाहुणे डॉ. श्रीपाद जोशी यांच्या हस्ते मेळाव्यात प्रदान करण्यात आले. हे दोन्ही पुरस्कार जिल्हास्तरीय पातळीवर देण्यात येतात.

कवी गोविंद काव्य स्पर्धेत मनोहर विभांडिक यांच्या ‘देखावा’ या कवितेला प्रथम तर अलका कुलकर्णी यांच्या ‘तू आयुष्या’ या कवितेला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. तृतीय क्रमांक विभागून शारदा गायकवाड यांच्या ‘को जागरती’ व सुरेखा बोऱ्हाडे यांच्या ‘एक सत्यकथन’ या कवितेला देण्यात आला. त्यांना याप्रसंगी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. अ. वा. वर्टी कथा स्पर्धेत प्रथम क्रमांक पुरस्काराने नवनाथ गायकर, आहुर्ली यांच्या ‘माजली खूप कुत्री’ कथेचा सन्मान करण्यात आला. द्वितीय क्रमांक श्रीकृष्ण वैद्य यांच्या ‘कुटाळ गावाची लूट’ व पद्माकर देशपांडे यांच्या ‘निवाडा’ या कथेस विभागून देण्यात आला होता. स्पर्धांचे परीक्षण राम पाठक, प्र. द. कुलकर्णी, ना. द. जोशी यांनी केले. आपल्याला आवडलेली कथा दुसऱ्यालाही आवडेलच असे नाही परंतु त्याला काही निकष असतात ते पाळूनच बक्षिसे जाहीर केल्याचे जोशी यांनी सांगितले. तर पाठक यांनी सांगितले की, कविता यमकांशी खेळून होत नसतात तर त्या मनापासून लिहाव्या लागतात. साध्या सोप्या कविता लिहाव्यात, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.

पुरस्कारानंतर अरूण इंगळे, राजेंद्र उगले, रवींद्र मालुंजकर, दत्तात्रेय अलगट यांनी ‘माय बाप : एक कृतज्ञता’ हा कार्यक्रम सादर केला. तबल्यावर ज्ञानेश्वर कर्पे होते. जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या समारोपात दादासाहेब फाळके फिल्म सोसायटीच्या सहकायाने गजानन जहागिरदार दिग्दर्शित ‘दादासाहेब फाळके’ आणि प्रदीप दीक्षित दिग्दर्शित ‘गदिमा’ हे दोन लघुपट दाखविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वयंपूर्ण संमेलने सत्तेच्या गैरसोयीची

$
0
0

जिल्हा साहित्यिक मेळाव्यात मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यकर्त्यांकडे संमेलनाचे माध्यम गेले आहे. त्यामुळे ही संमेलने स्वयंपूर्ण झाली तर ते सत्तेच्या गैरसोयीचे होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले. साहित्य संमेलने ही गर्दीची माध्यमे झाली आहेत. त्यामुळे या संमेलनांच्या गर्दीत विचारांची देवाणघेवाण होत नाही, असेही ते म्हणाले. साहित्य संमेलनेही टुरिझम झालेली आहेत. ती अभिमान, गौरव आणि अस्मितेचा भाग झाली असून गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव अशा उत्सवांच्या पातळीवर होत आहेत. सार्वजनिक वाचनालयाच्या ४९ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यात ते ‘संमेलन संस्कृती’ या विषयावर बोलत होते.

सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमास वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष नरेश महाजन, मिलिंद जहागिरदार, विनया केळकर आदी उपस्थित होते.

डॉ. जोशी म्हणाले, माध्यमांच्या मोहात पडल्यामुळे आपण कुठे जायचे ते विसरत चाललो आहोत. आपल्यामध्ये बधीरता, तुटलेपणा, स्वार्थीपणा आलेला आहे. माध्यम अभिव्यक्ती ही कृतीतून व्यक्त होत आहे. माध्यम युगातील या दिशाहिनतेचा शोध घेताना नेमक्या मागण्या काय आहे, हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळे या विश्वात स्वतःचा हरवलेपणाचा शोध घेत आशयात्मक वळण देणारा लेखक मेला आहे, अशी खंतही डॉ. जोशी यांनी व्यक्त केली. त्याच्या गेलेल्या प्राणाला फुंकर घालण्याची जबाबदारी शब्द माध्यमांवर आली असल्याचे ते म्हणाले.


छोट्या साहित्यिक मेळाव्यांना बळ द्या !

१९८०-८५ च्या काळात वाङमय संस्कृती या कलांच्या हातात हात घालून संवादी होत्या. एकमेकांशी आदानप्रदान करीत होत्या. आता अभावानेच सांस्कृतिक व्यवहार होत आहे. सरकार साहित्य संमेलनासाठी पैसे देत नव्हते त्यावेळीही वाद होत असत मात्र ते तात्त्विक होते. साहित्य संमेलनामुळे मराठी भाषा माहिती व्हायला लागली मात्र दर्जा घसरला. जो दर्जा, गुणवत्ता, वाङमय इतर भाषांमध्ये अधिक टिकून आहे तो मराठीत दिसत नाही. साहित्य संस्कृतीची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे. तेच बेजबाबदारपणे वागत आहेत. अशा परिस्थितीत छोट्या साहित्यिक मेळाव्यांनाही बळ दिले पाहिजे, असे आवाहन डॉ. जोशी यांनी केले. सुरेश गायधनी यांनी सूत्रसंचालन केले. केळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्वानंद बेदरकर यांनी परिचय करून दिला.


कलांच्या माध्यमातून सुरुवात

काव्य, चित्र, नाट्य, नृत्य, संगीत यांच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने उद््घाटन करण्यात आले. सी. एल. कुलकर्णी यांनी सादर केलेल्या ‘चैत’ या कवितेवर धनंजय गोवर्धने यांनी चित्र रेखाटले तर गिरीश जुन्नरे यांनी अभिनय सादर केला. संगीता पेठकर यांनी नृत्य सादर केले आणि मोहन उपासनी यांनी हे काव्य संगीतबद्ध करून त्याचे गायन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी

$
0
0

सप्तशृंग गड, येवला, त्र्यंबकला पावसातही उत्साह

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील आदिशक्ती सप्तशृंग मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या आनंदी व भ‌‌क्तीमय वातावरणात सुरू आहे. रविवारी (दि. २) दुसऱ्या माळेच्या दिवशी एक ते सव्वालाख भाविकांनी दर्शन घेतले. पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे यात्रेवर त्याचा काहीसा परिणाम जाणवला.

श्री आदिशक्ती सप्तशृंग मातेच्या मंदिरातील गाभारा विविध फुलांनी व विद्युत रोषणाईने सजावट केल्याने वातावरण प्रसन्न होते. श्री आई भगवतीस पंचामृत महापूजा करून दुपारी १२.०० वाजता महानैवैद्य आरती करण्यात आली. देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र सूर्यवंशी यांनी सपत्नीक आरती केली. रविवार सुट्टीचा दिवस व दुसरीच माळ असल्याने सव्वा लाख भाविक दर्शनासाठी गडावर दाखल झाले होते.

‘आई सप्तशृंगी माता की जय’, ‘अंबे माता की जय’ अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. प्रचंड गर्दी असल्याने पायर्‍यांवर बाऱ्या लावून भाविकांना टप्प्याटप्याने मंदिरात सोडण्यात येत होते. प्रसादालयात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असून मंदिरामध्ये महाराष्ट्रातून विविध भाविक भक्त घटी बसलेले आहेत. यावेळी ‘जोगवा मागेन आईचा, जोगवा मागेन’ अशा सुरात देवीपुढे भक्तांकडून जोगवा मागितला जात आहे.

निलांबिका मंदिरात गर्दी

त्र्यंबकेश्वर : निलपर्वत येथील नवसाला पावणारी निलांब‌िका माता मंदिर अत्यंत प्राचीन आहे. येथे नवरात्रोत्सवात भाविक सकाळ, सायंकाळ आरतीसाठी मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. येथील पुजारी सतीश दशपुत्रे यांनी यावर्षी भाविकांची गर्दी होत असल्याची माहिती दिली.

कोटमगावी भक्तीचा मळा

येवला : ‘आईचा जागर पायी चाले भक्तीचा सागर...’ असे चित्र नवरात्रोत्सवानिमित्त येवला तालुक्यात दिसु लागलं आहे. तालुक्यातील श्री क्षेत्र कोटमगावच्या आई जगदंबेच्या दर्शनासाठी भक्तांची पावलं पडू लागल्यानं कोटमगाव गजबजू लागलं आहे. शनिवारच्या पहिल्या माळेलाच सायंकाळपर्यंत ४० हजार भक्तांनी जगदंबेचे दर्शन घेतले. यंदा जवळपास साडेतीन हजार भक्त घटी बसले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ड्राय डे’लाही दारूची विक्री

$
0
0

सुरगाणा तालुक्यातील ठाणापाड्यातील प्रकार

म. टा. वृत्तसेवा, कळवण

एकीकडे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहताना अवघा देश श्रद्धेय भावना व्यक्त करीत आहे. तर दुसरीकडे रविवारी (दि. २) ड्राय डे असूनही सुरगाणा तालुक्यातील ठाणापाडा गावात खुलेआम दारूविक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

महाराष्ट्रात दारुची विक्री फक्त राष्ट्रीय सण आणि महापुरुषांचे स्मरणदिनांच्या दिवशी केली जात नाही. त्यास ड्राय डे म्हणण्याची प्रथा मद्दापींनीच सुरू केली आहे. मात्र ठाणापाडा हे सुरगाणा तालुक्याचेच नव्हे तर महाराष्ट्रातील गुजरात राज्याच्या सीमेवरील शेवटचे गाव आहे. त्यामूळे राज्याची सीमा ओलांडून अवघे एक किलोमिटर ठाणापाडा गावात आले की मद्दपींची सोय होते. यातच रविवारी, ड्राय डे असुनही ठाणापाडा येथील कोणतेही अधिकृत परवानगी नसलेल्या त्या विशिष्ट हाटेलमध्ये दारुची खुलेआम विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे यादिवशी दारुची प्रत्येक बाटली दुप्पट किमतीला विकण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात संततधार

$
0
0

नांदगाव, चांदवड, कळवण, देवळा, निफाड, येवल्यात पाऊस

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

शहरासह नांदगाव व चांदवड तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील ओढे, नदी नाले तुडूंब भरून वाहत असल्याचे चित्र रविवारी (दि. २) पाहायला मिळाले. रविवार सकाळपासूनच मनमाड, नांदगाव, चांदवड या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. नांदगाव तालुक्यातील विविध गावात संततधार पाऊस बरसल्याने दहेगाव धरणात प्रथमच मोठ्या प्रमाणावर पाणी आले. तर चांदवड, नांदगाव तालुक्यातील ओढे, नालेही या पावसाने भरल्याचे दिसून आले.

रविवारी (दि. २) पडलेल्या पावसामुळे शेतीचे विशेषतः बाजरीचे मोठे नुकसान झाले. शेतातील पिकांमध्ये पाणी शिरल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. नांदगावच्या शाकंभरी नदीलाही या जोरदार पावसामुळे पाणी आले. रविवारच्या पावसामुळे मनमाडच्या आठवडे बाजारावर विपरीत परिणाम झाला असून बाहेर गावाहून आलेल्या शेतकरी, भाजीपाला विक्रेत्यांचे नुकसान झाले. त्यामुळे मनमाडचा आठवडे बाजार विस्कळीत झाला. मात्र रविवारी दुपारी पावसाने जरा विश्रांती घेतल्याने बाजार पुन्हा सुरू झाला.


कळवण, देवळ्यातही जोर

कळवण : शहर व परिसरात रविवारी (दि. २) सायंकाळी ४ ते ५ वाजेच्यादरम्यान वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. तर देवळा परिसरातही याचवेळेत जोरदार पावसाने हजेरी लावली. रविवारी, दुपारी कडक ऊन असल्यामुळे पावसाचे आगमन होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र वातावरणात अचानक झालेला बदल झाल्याने पावसाला जोरदार सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह तासभर पावसाने जोर धरत देवळा व कळवणकरांना दर्शन दिले. तासभर चाललेल्या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी डबके साचले होते. होत्या. पावसामुळे नदी, नाले, विहिरी, प्रकल्पांच्या पातळीत वाढ झाली आहे.


येवल्यात रिमझिम

येवला : शहर व तालुक्यात रविवारी (दि. २) दिवसभर अधूनमधून पावसाची रिमझिम सुरू राहिल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजेनंतर शहरासह तालुक्यात काही ठिकाणी अर्धा तास पावसाच्या सरी बरसल्या. दरम्यान, सध्या तालुक्यात अनेक ठिकाणी खरिपाची बाजरी सोंगणी आली असताना परतीच्या पावसाने मारा सुरू केल्याने बाजरीचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसत आहे.


निफाडलाही हजेरी

निफाड : पावसाने निफाड तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली. रविवारी (दि. २) सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुमारे एकतास मुसळधार पाऊस झाला. तर सायंकाळच्या सुमारास सुमारे एकतास मुसळधार बरसल्यानंतर रात्री उशिरापर्यंत संततधार पाऊस सुरू होता. निफाड, विंचूर, ओझर, पिंपळगाव, सुकेणे, चांदोरी, खडकमाळेगाव आदी परिसरात रविवारी संततधार पाऊस झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्ट्यांत अवैध धंद्यांचे अड्डे

$
0
0

शांतीनगरला गुंडांची दहशत; वृद्ध दाम्पत्याला मारहाण

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक शहराला चारही बाजूंनी वेढलेल्या झोपडपट्ट्या अवैध धंद्यांचे अड्डेच बनल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांना याबाबत माहिती असूनही केवळ नावापुरतीच कारवाई केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

त्यातच अंबड औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या शांतीनगर झोपडपट्टीत अवैध मद्यविक्रीचा व्यावसाय करणाऱ्या एका ‘भाई’ची या परिसरात दहशत आहे. दोन दिवसांपूर्वीच वृद्ध दाम्पत्याला या भाईने मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. यात पोलिसांनी त्याच्यावर कुठलीच कारवाई न केल्याने अवैध धंद्यांना पोलिस पाठिशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, मारहाण झालेले दाम्पत्य जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी झोपडपट्ट्यांमधील अवैध व्यवसायांवर कारवाई करावी, अशी मागणी कष्टकरी कामगार वर्गातून होत आहे.

सातपूरच्या सीपी टूल, संत कबीरनगर, कांबळेवाडी, महादेववाडी या झोपडपट्ट्यांमध्ये सर्रासपणे अवैध धंदे सुरू आहेत. तसेच अंबडच्या गौतमनगर व शांतीनगर झोपडपट्टीत अवैध धंदे करणाऱ्यांची मोठी दहशत पहायला मिळते.

शाळेच्या बाजूलाच दारूचा अड्डा

शांतीनगर भागात दहशत पसरविणाऱ्या भाईचा अवैध दारूचा अड्डा महापालिकेच्या शाळेला लागूनच आहे. याबाबत स्थानिक नगरसेवकांनीदेखील अंबड पोलिसांकडे अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती. परंतु, उलट पोलिसांनीच स्थानिक नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. यामुळे पोलिसांना अवैध धंद्दे करणाऱ्यांचा पुळका असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.

किराणा दुकानात दारू

सातपूर व अंबड भागात असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये किराणा दुकानातच दारू मिळत असल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिस कर्मचाऱ्यांना माहिती असूनदेखील चिरीम‌िरी घेण्याची सवय झाल्याने संबंधित दुकानांवर कारवाई होत नसल्याचे रहिवाशी सांगतात. विशेष म्हणजे पोलिसांच्याच कोम्बिंग ऑपरेशनमध्ये झोपडपट्टी भागात अनेक घरांमध्ये दारू विकली जात असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई देखील केली. परंतु पुन्हा त्याच ठिकाणी अवैध मद्य विक्रीचे काम तथाकथित भाईंकडून केले जात आहे.

ड्राय डेला मद्यविक्री तेजीत

या झोपडपट्ट्यांमध्ये ‘ड्राय डे’ला अवैध मद्यविक्री तेजीत असते. अशोकनगरच्या महिंद्रा मटेरियल गेटसमोर तर सर्रासपणे उघड्यावर मद्यविक्री केली जाते. सीपी टूल झोपडपट्टीला लागून असलेल्या एका हॉटेलमध्येही ड्राय डेला मद्यपींचा अड्डा भरत असतो. ड्राय डेच्या दिवशी अंड्डा भुर्जीच्या गाड्यांवर देखील मद्यपींची मोठी गर्दी होत असते. काही अंडा भुर्जी चालकही अवैध मद्यविक्री करताना दिसतात. महापालिकेच्या जागेवर उघड्यावर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई कधी करणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...अखेर शिवनेरी उद्यान होणार चकाचक!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

प्रभाग क्रमांक ४६ मधील रायगड चौकातील शिवनेरी उद्यानाची तातडीने साफसफाई करण्याचे आदेश सभापती अश्विनी बोरस्ते यांनी दिले. पुढील शुक्रवारी पुन्हा याच ठिकाणी अधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी करण्यात येईल, त्यामुळे तातडीने काम सुरू करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. ‘मटा’ने या उद्यानाच्या दुरवस्थेबद्दल वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत बोरस्ते यांनी उद्यानाची पाहणी करून सफाईचे आदेश दिले.

सिडको प्रभाग समितीच्या बैठकीत प्रभाग ४६च्या नगरसेविका शोभा निकम यांनी शिवनेरी उद्यानाच्या दुरवस्थेबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मागील अनेक वर्षांपासून या उद्यानाची साफसफाईसुद्धा होत नसून, येथील अनेक झाडांना अळ्या लागल्याचेही सांगितले. त्यानंतर सभेत सभापती बोरस्ते यांनी या उद्यानाच्या पाहणीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सभापती बोरस्ते, विभागीय अधिकारी सुनीता कुमावत, उद्यान विभागाचे अधिकारी यांनी शिवनेरी उद्यानाची पाहणी केली. यावेळी उद्यानात मोठ्या प्रमाणावर गवत उगवल्याचे आढळून आले. त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेला कारंजाही बंद अवस्थेत आढळून आला. अनेक झाडांना कीड लागलेली आढळून आली. येथील झाडांच्या फांद्यासुद्धा खूपच अस्ताव्यस्त वाढल्याचे निदर्शनास आले. भरवस्तीत असलेल्या या उद्यानाची अत्यंत दुरवस्था झाली असल्याचे पाहून सभापती बोरस्ते यांनी तातडीने उद्यान सफाईचे आदेश दिले. पुढील शुक्रवारी पुन्हा याच उद्यानाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आठ दिवसांत उद्यानाची सुधारणा झालीच पाहिजे, असे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. सभापतींनी प्रथमच अशा पद्धतीने तातडीने कारवाईचे पाऊल उचल्यामुळे सिडकोतील किमान एक उद्यान तरी व्यवस्थित होणार आहे. अशाच पद्धतीने सर्वच सिडको परिसराचा दौरा त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत केल्यास सिडकोचा विकास होण्यास वेळ लागणार नाही, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी अनिल कर्नावट, विश्राम सोनवणे, लता मिस्त्री आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी तरतूद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम मजुरांच्या कल्याणकारी योजनेत भरघोस वाढ केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ‘सीटू’च्या आंदोलनाला यामुळे यश आले असल्याचे कामगारनेते डॉ. डी. एल. कराड यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. ज्या बांधकाम मजुरांनी बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणी केली नसेल अशा सर्व कामगारांनी तत्काळ नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे ‘सीटू’ने विविध मागण्यांबाबत आंदोलन केले होते. विशेष म्हणजे बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनेत भरघोस वाढ करावी, अशी मागणीही वेळोवेळी केली होती. ‘सीटू’च्या या मागणीला अखेर यश आले असून, बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. याबाबत ‘सीटू’ला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने १९ विविध लाभ देण्याचे पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

--

शिक्षणासाठी मोठी मदत

बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी पहिला ते सातवी २ हजार ४००, आठवी ते दहावी ५ हजार रुपये, ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास दहावी ते बारावीसाठी १० हजार रुपये, पदवीच्या शैक्षणिक साहित्यासाठी २० हजार रुपये, वैद्यकीय प्रवेशासाठी १ लाख रुपये, अभियांत्रिकी शिक्षणासाठी ६० हजार रुपये, पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी २० हजार रुपये, पदव्युत्तर शिक्षणासाठी २५ हजार रुपये मानधन व एमएस-सीआयटी पास झालेल्या बांधकाम कामगारांच्या मुलांना फीचा परतावा देण्यात येणार आहे.

--

या योजनेंतर्गत बांधकाम कामगाराने एका मुलीवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास १ लाख रुपये मुलीच्या नावे जमा होणार आहेत. बांधकाम कामगाराला ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास २ लाख रुपयांची मदत किंवा विमा संरक्षण असल्यासही २ लाख रुपये मिळणार, कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी १० हजार रुपये, बांधकाम कामगार मृत झाल्यास ५ वर्षांपर्यंत पत्नीला प्रतिवर्षी २४ हजार रुपये मिळणार, बांधकाम कामगाराचा कामावर मृत्यू झाल्यास वारसाला ५ लाख रुपये मिळणार, गंभीर आजाराच्या उपचारांसाठी १ लाख रुपये, पहिल्या विवाहासाठी ३० हजारांचे मानधन, ३१ ऑगस्ट २०१४ रोजी नोंदणी जीवित असलेल्या बांधकाम कामगारांना वस्तू खरेदीसाठी ३ हजारांचे मानधन, कामगारांना ३ वर्षांतून अवजारे खरेदी करण्यासाठी ५ हजार रुपये, व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचारांकरिता प्रत्येकी ६ हजार रुपये, कामगारांच्या पत्नीला प्रसूतीसाठी १५ ते २० हजार रुपये अशा विविध कल्याणकारी योजना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने जाहीर केल्या आहेत. बांधकाम कामगारांना संबंधित योजनेचा लाभ घ्यावा, बांधकाम कामगार कल्याण मंडळात आपली नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. कराड यांनी केली आहे.

--

महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजनेत वाढ करावी, अशी ‘सीटू’ची मागणी होती. या मागणीची कल्याण मंडळाने दखल घेत भरघोस वाढ केली आहे. बांधकाम कामगारांच्या कुटुंबालादेखील आर्थिक सहाय्य केले आहे. त्यामुळे असंघटित बांधकाम कामगारांना निश्चितच लाभ होणार आहे.

-डॉ. डी. एल. कराड, राज्य अध्यक्ष, सीटू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एस्क्रो खात्यात जमा होणार सात कोटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मैत्रेय ग्रुपने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीपैकी तब्बल सात ते आठ कोटी रुपये येत्या आठवडाभरात एस्क्रो खात्यात जमा होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मैत्रेय संचालकांनी एस्क्रो खात्यात जमा केलेल्या साडेसहा कोटी रुपयांपैकी चार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे वाटप झाले असून, नव्याने पैसे जमा झाल्यास पैशांच्या प्रतीक्षेत असलेल्या गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
डायरेक्ट मनी ट्रान्सफर या सुविधेने कोर्टाच्या आदेशानुसार पोलिस गुंतवणूकदारांना पैशांचे वाटप करीत आहेत. मैत्रेय कंपनीने एस्क्रो खात्यात जमा केलेले पैसे गुंतवणूकदरांना टप्प्याटप्प्याने देण्याचे आदेश दिल्यापासून सरकारवाडा पोलिस तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी या कामात गुंतले आहेत. शहर पोलिसांनी सर्वप्रथम २९ जुलै रोजी १२५ गुंतवणूकदारांना समारंभपूर्वक १७ लाख १४ हजार ३९७ रुपयांचे वाटप केले होते. पैसे परत देण्यासंबंधी कोर्टाच्या आदेशानुसार एक कमिटी गठ‌ित करण्यात आली असून, दर शनिवारी ठेवीदारांची यादी तयार करून ती यादी सोमवारी कोर्टात सादर केली जाते. कोर्टाच्या मंजुरीनंतर लागलीच खातेदारांच्या खात्यात पैसे वर्ग केले जातात. याबाबत बोलताना सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी सांगितले की, पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून जवळपास साडेचार हजार गुंतवणूकदारांना चार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे वाटप करण्यात आले आहे.
सध्या एस्क्रो खात्यात दोन कोटी रुपये शिल्लक असून, आठवडाभरात त्यात सात ते आठ कोटी रुपये नव्याने येण्याची शक्यता आहे. मुंबई स्थित एका कंपनीत मैत्रेय संचालकांनी पैसे गुंतवले होते. सदर कंपनीशी पोलिसांनी संपर्क साधला. गुंतवणूकदारांसाठी तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मैत्रेयच्या संचालकांनी गुंतवलेले पैसे परत करण्यास पोलिसांनी उद्युक्त केले. सदर कंपनी मैत्रेय संचालकांच्या नावे पैसे जमा करीत असून, हे लवकरच एस्क्रो खात्यात जमा होतील, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले.

मैत्रेयच्या संचालकांनी राज्यासह परराज्यात अनेक ठिकाणी पैसे गुंतवले आहेत. यातील किमान २० कंपन्यांपर्यंत पोलिस पोहचले असून, त्यांना पैसे परत करण्यासाठी उद्युक्त केले जात आहे. काही पातळ्यांवर कायदेशीर अडचणी असून, त्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुक बँकेतून ‘क्राइम कंट्रोल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘चांगली पुस्तके माणसाचे चरित्र घडवितात’, ही संकल्पना गांभीर्याने घेऊन नाशिक पोलिस आता क्राइम कंट्रोलसाठी एका नव्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. केवळ दंड उगारण्यापेक्षा विचार परिवर्तनातूनही गुन्हेगारी मानसिकतेला आळा बसू शकतो, या तत्वाने पोलिसांनी शहरातील गरजू भागांमध्ये वाचनालय चालविण्याचा अभिनव संकल्प सोडला आहे.
शहराचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी यासंदर्भात नुकतीच ‘बुक बँक’संकल्पना मांडली. शहराच्या विविध भागांमध्ये परिस्थितीशी दोन हात करून काही चांगले मिळवू इच्छिणारे विद्यार्थी कुसंगतीत अडकून गुन्ह्यांकडे वळू नयेत, यासाठी या उपक्रमाचा उपयोग केला जाणार आहे.
यासाठी ज्या पोलिस आयुक्तालयात चेन स्नॅचिंगपासून तर खुनासारख्या बड्या गुन्ह्यांची अहोरात्र नोंद होते, त्याच आयुक्तालयात आता ‘बुक बँक’उपक्रमासाठी पुस्तके घेऊन येणाऱ्या नागरिकांचे चक्क दर्शन घडणार आहे. यासाठी पोलिस आयुक्तांनी नाशिककरांना गरीब विद्यार्थ्यांसाठी आपल्याजवळील देणगीयोग्य पुस्तके जमा करण्याचे आवाहन केले आहे. पुरेशा संख्येत ही पुस्तके उपलब्ध झाल्यानंतर संवेदनशील परिसरातील लहानग्या मुलांसाठी पोलिस पुरस्कृत वाचनालय उभारण्याचाही आयुक्तांचा मानस आहे. नागरिकांनी आपल्याजवळील जुनी किंवा नवी शैक्षणिक व संस्कारक्षम पुस्तके आयुक्तालयात जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

येथे जमा करा पुस्तके
गंगापूर रोडवरील पोलिस आयुक्तालयात ही पुस्तके जमा करता येथील अथवा या संदर्भात पोलिस निरीक्षक प्रकाश सपकाळ यांच्याशी : ९५९४९४५४२६ किंवा पोलिस निरीक्षक विलास सोनवरे यांच्याशी ९९२३४३३५९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, अशी माहिती पोलिस आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आली.

गांधी जयंतीस दिसला वर्दीमागचा माणूस
विविध सत्कार सोहळ्यांमध्ये मिळालेल्या शाली मोठ्या संख्येने जमा होऊन नंतर केवळ कपाटाचेच धन बनतात, अशी वस्त्रे निराधार गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी पोलिस आयुक्तालयात जमा करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. यानुसार नागरिकांनी प्रतिसाद दिल्यानंतर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून पोलिस कर्मचाऱ्यांनी रात्री ९ वाजेनंतर शहरातील निराधार आबालवृध्दांवर शालरूपी मायेची पाखर घातली. या संवेदनशीलतेमुळे वर्दीमागील माणसाचे दर्शनही गांधीजींच्या जयंतीदिनी नाशिककरांना घडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरब्यात होतेय तरुणाई दंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नवरात्र सुरू झाले की वेध लागतात ते दांड‌िया आणि गरब्याचे. सालाबादप्रमाणे यंदाही तरुणांच्या आवडत्या गरब्याने जोर धरला असून, जागोजागी सुरू असलेल्या गरब्यात तरुण-तरुणी बेधुंद होऊन नाचत आहेत.

दांड‌ियाचा खेमटा सुरू झाला की न नाचणाऱ्यांचे पाय आपसूक थिरकायला लागतात. तेव्हा नृत्याची आवड असलेले तरुण-तरुणी ही संधी चुकवत नाहीत. पंचवटीच्या सरदार चौकापासून सुरू झालेल्या गरब्याने इव्हेंटचे स्वरुप धारण केले असून, शहरातील सर्व लॉन्स दांड‌ियाच्या कार्यक्रमांनी फुल्ल झाले आहेत. पूर्वी या सणाला धार्मिकता होती. ही धार्मिकता लोप पावली असून, त्या जागी जल्लोष सुरू झाला आहे. शहरातील बहुसंख्य लॉन्सवर दांडिया सुरू असून, तरुण-तरुणी आकर्षक पेहराव करुन नृत्याचा आनंद घेत आहेत. दांडिया आणि गरब्याचे अर्थकारण लक्षात घेता मोठ्या इव्हेंट कंपन्यांनीही यात उडी घेतली असून, लाखो रुपयांची बक्ष‌िसे लावण्यात आली आहेत. ज्यांना नृत्याचे प्रकार येत नाहीत, असे काही तरुण-तरुणी वर्कशॉपमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. दरवर्षी नृत्यामध्ये नवनवीन प्रकार येत असतात. पारंपरिक नृत्याबरोबरच बॉलिवूड डान्स सध्या लोकप्रिय होत आहे. या डान्सचे शस्त्रशुध्द प्रशिक्षण मिळावे अशी युवावर्गाची इच्छा असते. त्याकरता विद्यार्थी अशा कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन नवीन तंत्र आत्मसात करतात. यंदाही पारंपरिक नृत्याबरोबरच बॉलिवूड डान्सने भूरळ घातली असून, गर्दीने उच्चांक गाठला आहे. पारंपरिक नृत्यांमध्ये दोडियो, पोपट, सनेडो, दो मारी, चारमारी लहेर, ६ स्टेप, ८ स्टेप, १० स्टेप अशा नृत्यांचा समावेश आहे. या नृत्यांबरोबरच बॉलिवूड दांडियाने यंदा चागला जोर धरला आहे. यातील नवीन प्रकार म्हणजे बॉलिवूडच्या आणि वेस्टर्न डान्सच्या काही स्टेप एकत्र करुन फ्यूजन तयार केले आहे. त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून लोकप्रिय असलेला डिस्को दांडिया हा प्रकार आजही त‌ितकाच खेळला जातो.

ड्रेसकोडकडे लक्ष
नवरात्रात नृत्याबरोबरच ड्रेस कसा असावा, याकडेही तरुण-तरुण लक्ष देत असून, घागरा-चोली, बाराबंदी, चुस्ती असे रोज लागणारे ड्रेस विकत घेतले जात आहेत, तर काही लोक ते भाड्याने घेत आहेत. कपड्यांमध्ये पारंपरिक घागऱ्याबरोबरच इंडो वेस्टर्न कॉश्च्युमलाही चांगली मागणी आहे. रोजचा पेहराव कसा असावा, याकडेही लक्ष दिले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images