Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

​धो धो पाऊस तरीही भिस्त टँकरवरच!

$
0
0


pravin.bidve@timesgroup.com

tweet : @bidvepravinmt

नाशिक : नाशिक विभागातील अहमदनगर जिल्ह्यात यंदा सर्वाधिक पाऊस पडूनही २१० गावांमधील रहिवाशांना टँकरखाली ओंजळ धरावी लागते आहे. यंदा १३० टक्के एवढा रेकॉर्डब्रेक पाऊस होऊनही नगर जिल्ह्यात ४८ टँकरच्या वाऱ्या सुरूच आहेत. धुळे जिल्ह्यातही चार गावे अद्याप तहानलेलीच आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत नाशिक विभागात ९८ टक्के पाऊस झाला असतानाही पाणी टंचाईच्या झळांतून नाशिक विभाग पूर्णत: मुक्त झाला नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.

यंदा दुष्काळाच्या झळांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे सर्वच जिल्हे पोळून निघाले. मात्र जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसाने सर्वच बॅकलाक भरून काढला. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक म्हणजेच १२९.८ टक्के पावसाची नोंद झाली, तर नाशिक जिल्ह्यातही १०१.९ टक्के पाऊस झाला. गतवर्षी याच कालावधीत दोन्ही जिल्ह्यात अनुक्रमे ८०.४ आणि ६५.१ टक्के पाऊस झाला होता. गतवर्षी उत्तर महाराष्ट्रात सप्टेंबर अखेरपर्यंत ७५.७ टक्के पाऊस झाला होता. यंदा त्यामध्ये २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नगर जिल्ह्यातील १४ पैकी १३ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला असला तरी त्यापैकीच चार तालुक्यांमध्ये अजूनही टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यातही १५ पैकी ११ तालुक्यांमध्ये पावसाने १०० टक्क्यांचा आकडा ओलांडला आहे. गतवर्षी धुळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत ९३.४ टक्के पाऊस झाला होता. यंदा मात्र वरुणराजाने या जिल्ह्याकडे काहीशी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात कमी ७८.६ टक्के पाऊस धुळ्यात झाला आहे. नंदुरबारमध्ये गतवर्षी इतकाच ८४ टक्के पाऊस झाला आहे. तर जळगावात गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के अधिक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. उत्तर महाराष्ट्रात सरासरी ६९५.८८ मिलीमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत तेथे ६६८.६८ मिमी म्हणजेच ९७.७ टक्के पाऊस पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नगर, धुळ्यातही टँकर

सप्टेंबर महिना उजाडला तरी उत्तर महाराष्ट्रातील २१४ गावांमध्ये अजूनही टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ नगर आणि धुळे जिल्हा प्रशासनांवर आली आहे. धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील चार गावांमध्ये अजूनही चार टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात १२८ टक्के पाऊस झाला असला तरी अजूनही येथील काही तालुके तहानलेलेच आहेत. अहमदनगर, संगमनेर, कर्जत, पारनेर शहर आणि पारनेर तालुक्यातील २१० ठिकाणच्या रहिवाशांची तहान भागविण्याचे काम ४८ टँकर अजूनही करीत आहेत.

तालुक्यांमधील टक्केवारी निहाय पाऊस

जिल्हा २६ ते ५० ५१ ते ७५ ७५ ते १०० १०० हून अधिक एकूण

नाशिक ० ० ४ ११ १५

धुळे १ १ १ १ ४

नंदुरबार ० २ २ २ ६

जळगाव ० २ ६ ७ १५

अ.नगर ० १ ० १३ १४

एकूण १ ६ १३ ३४ ५४ 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


 अखेर डाव्या कालव्याद्वारे पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणांतर्गंत डाव्या कालव्यातून पाणी मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर आजअखेर प्रशासनाने या कालव्यातून पाणी सोडले. या पाण्याचा लाभ तालुक्यातील १५ गावांतील शेतीला होणार आहे.

प्रशासनाने या कालव्यातून पाणी सोडावे म्हणून विविध राजकीय पक्षांनी सुरत-नागपूर महामार्गावर चक्का जाम आंदोलने केली, तर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले. यावेळी दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेत ७६ शेतकऱ्यांना अटक झाली होती. या सर्व घटनांचा जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने विचार करीत अखेर डाव्या कालव्यातून पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. पंधरा गावांतील शेतीला पाणी मिळणार असले, तरी कालव्याच्या गेटपासून ते शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचण्यास किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.

२५ वर्षांपासून पाण्यासाठी प्रतीक्षा

गेल्या २५ वर्षांपासून डाव्या कालव्यातून पाणी मिळण्याची मागणी होत होती. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केली, त्यातून दगडफेकीची घटनाही घडली होती. त्यानंतर पालककंत्री दादा भुसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धुळ्यात येऊन प्रशासनाला शेतकरीवर्गाला न्याय देण्याची सूचना केली होती. प्रशासनाने कालव्याचे अर्धवट काम तातडीने पूर्ण करून ३० सप्टेंबरला पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

 ‘वर्डकॅम्प नाशिक - २०१६’ द्वारे नाशिकला बूस्ट

$
0
0


Gopal.Paliwal@timesgroup.com

Tweet : @gopalpaliwalMT

नाशिकमध्ये येत्या १६ ऑक्टोबर रोजी ‘वर्डकॅम्प नाशिक - २०१६’ या आंतरराष्ट्रीय बॅनरखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. शहर आणि उत्तर महाराष्ट्रातील आयटी पदवीधर, ब्लॉगर्स, सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि आयटीमध्ये आपल्या कंपनीचे स्टार्टअप्स् करू पाहणाऱ्यांसाठी हा मेळा सुवर्णसंधी ठरू शकेल.

सुवर्ण त्रिकोणात मुंबई, पुण्यासह असलेले नाशिक माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातही आपली नवीन ओळख निर्माण करीत आहे. शहरात आयटी इंजिनीअर्सची संख्या वाढत असून, नवीन सॉफ्टवेअर कंपन्या नाशकात येत आहेत. यामुळे आयटीसाठी तसे पोषक वातावरणही उपलब्ध आहे. नाशिकमध्ये पर्यटन, वाइन तसेच आयटीसाठी भरपूर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांना केवळ समोर आणण्याची गरज आहे. या हेतूनेच या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘वर्डकॅम्प नाशिक - २०१६’ चे मुंबई, पुण्यानंतर नाशिकमध्ये आयोजन होत आहे. यासाठी नाशिकमधील काही सॉफ्टवेअर डेव्हलपर मेहनत घेत आहेत. त्यामध्ये हर्षद माने, संजीव मिश्रा, चिन्मय डिंगोरे, दीपक कोरी, चेतन महाले, तेजस्विनी देशपांडे, अक्षय विंचूरकर यांचा समावेश आहे. अंबड एमआयडीसीतील नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टर्सच्या आकाश ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम होईल. यात सहभागासाठी नाममात्र शुल्क आहे.

आयटी उद्योगास चालना
‘वर्डकॅम्प नाशिक’मध्ये देश-विदेशातील प्रथितयश वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यामध्ये तीन सत्रांत बाहेरून आलेल्या वक्त्यांची भाषणे, सहभागी झालेल्यांसोबत त्यांचे संभाषण ‘टॉक्स’, ‘पॅनल डिस्कशन’ होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी https://2016.nashik.wordcamp.org/ या वेबसाइटवर नोंदणी करता येईल. इतर माहितीही तेथे उपलब्ध आहे. याद्वारे आयटी उद्योगासाठी अन्य फायदे होऊ शकतील.

नाशिकसाठी ‘नापू’ची निर्मिती
‘वर्डकॅम्प’साठी खास ‘नापू’ नावाने मॅस्कॉट बनविण्यात आले आहे. त्याला ‘नाशिकचा वापू’ असे नाव देण्यात आले आहे. ‘वापू’ हे नाव जपानमधील असून ते जपानच्या वर्डप्रेस कम्युनिटीत २००९ मध्ये झालेल्या वर्डकॅम्पमध्ये वापरण्यात आले होते. त्यालाच पुढे ठिकठिकाणी ‘वर्डकॅम्प’मध्ये मॅस्कॉट म्हणून वापरण्यास सुरुवात झाली. त्यासाठी नाशिकची पौराणिक पार्श्वभूमी, सिंहस्थ आणि पवित्र गोदावरी नदी यासोबतच पर्यटनासाठी उत्तम या सर्व बाबींना विचार करून या ‘नाशिकच्या वापू-नापू’ची निर्मिती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगांची अदाकारी, लई भारी!

$
0
0

सांस्कृतिक कार्यक्रमाने भारावले मान्यवर

म. टा. वृत्तसेवा, येवला

निसर्गाने जन्मताच अपंगत्व पदरात टाकले तरी ‘हम भी कुछ कम नही’ असं सांगत अंगी भिनलेल्या कलेतून दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेले एकापेक्षा एक सरस व प्रशंसनीय सांस्कृतिक कार्यक्रमांने उपस्थितांची मने जिंकली.

कुणी नाटिकेद्वारे समाजमनाला वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला, तर कुणी भक्तीगीतांसह देशभक्तीपर गीतावर ठेका धरत देशाप्रती प्रेम व्यक्त केले. निमित्त होते बुधवारी दुपारी येवल्यातील मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयात जागतिक कर्णबधिर दिनानानिमित्त आयोजित विशेष मुलांच्या गुणगौरव,सांस्कृतिक तसेच विविध कार्यक्रमांचे.

जागतिक कर्णबधिर दिनाचे औचित्य साधत येवल्यातील समता प्रतिष्ठान संचलित अंगणगाव येथील मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयात बुधवारी आयोजित सोहळा सर्वांचेच लक्ष वेधून गेला. मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरचे मोठे बंधू तथा प्रसिद्ध कवी नितीन तेंडूलकर, सुप्रसिद्ध लोककवी अरुण म्हात्रे यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती, मायबोलीतील विशेष मुलांनी सादर केलेले अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, यासह सचिन तेंडूलकरचे बालपण ते भारतरत्न किताबापर्यंतच्या वाटचालीचे दर्शन घडवणारे छायाचित्र प्रदर्शन याने हा सोहळा संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मारोतराव पवार होते. यावेळी विशेष मुलांनी ‘ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था, अनाथाच्या नाथा तुज नमो’ या भक्ती गीतावर सादर केलेल्या नृत्याला उपस्थितांची दाद मिळाली. मास्टर स्ट्रोकने अवघ्या जगातील क्रिकेट शौकिनांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर यांना सलाम ठोकणारे विशेष मुलांचे नृत्याने सर्वांची दाद मिळविली. यावेळी नितीन तेंडूलकर यांनी सचिन तेंडूलकर यांची स्वाक्षरी असलेले सचिनचे फोटो हे नृत्य सादर करणाऱ्या मायबोलीतील विशेष मुलांना भेट देवून सर्वांचे कौतुक केले.

यावेळी विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या मायबोली विध्यालयातील विशेष मुलांचा मान्यवरांच्या हस्ते ‘गुणगौरव’ करण्यात आला. समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे, संचालिका सुधा कोकाटे आदींच्या हस्ते यावेळी नितीन तेंडूलकर यांचा सत्कार करण्यात आला. नितीन व मीना तेंडूलकर, अरुण म्हात्रे, डॉ. कमलाकर वडेलकर, डॉ. नेहा शिरोरे, पोलीस निरीक्षक संजय पाटील, प्रकाश देवरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

अर्जुन कोकाटे यांनी खासदार सचिन तेंडूलकर यांनी संस्थेला ४० लाखांचा निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. बरोबरच येत्या ३ डिसेंबरला शाळेत साजऱ्या होणाऱ्या जागतिक अपंग दिनाच्या कार्यक्रमास विश्वाच्या लाडक्या सचिनने यावे अशी गळ त्यांचे बंधू नितीन तेंडूलकर यांना घातली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईचा सेंट्रलाइट संघ उपांत्य फेरीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्पच्या आनंद रोड मैदानावर गुरू स्पोर्टस व सोशल फाऊंडेशनतर्फे ‘द देवळाली कप’ नावाने सुरू झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ब गटातून मुंबईचा सेंट्रलाइट संघ उपांत्य फेरीत दाखल झाला.

निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी, ट्रायब्रेकरमध्ये ४-४ असा समसमान राहिलेला सामना सडन डेथमध्ये सेंट्रलाइट मुंबई संघाने बलाढ्य केरळच्या जनसेवा फुटबॉल क्लबच्या संघाचा ७-६ अशी मात करीत दुसऱ्या दिवशीच्या ‘ब’ गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पुणे आर्यन संघाविरुद्ध केरळच्या जनसेवा संघाने ०-१, तर मुंबईच्या सेंट्रलाइट संघाने देवळालीच्या आनंद बॉइज संघाचा ४-० असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. सायंकाळी हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने सुरू झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत जनसेवा केरळ व सेंट्रलाइट मुंबई संघांच्या दरम्यानच्या सामन्यात दर्जेदार खेळाचे प्रात्यक्षिक प्रेक्षकांना पाहावयास मिळाले. दोन्ही संघ बलाढ्य असल्याने निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी राहिली. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये जनसेवा संघाकडून संजय, जिसेस, अन्सार, सेल्वन, यांनी सेंट्रलाइट संघाकडून अक्षय, रितिक, निहार व अमरनाथ यांनी गोल केले, तर सडन डेथमध्ये जनसेवा संघाकडून जिमील, लेम हॅथिक यांनी, तर सेंट्रलाइट संघाकडून विनय, अखिल, अनिल यांनी गोल करीत ७-६ असा लढतीत विजय मिळविला. अ गटापाठोपाठ ब गटातील सामन्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. सामन्यात पंच म्हणून रिचर्ड डिक्सन, रोहित मर्चंडे, सिद्धार्थ गाडे यांनी काम पाहिले. कालच्या सामन्यादरम्यान माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांनी भेट दिली. राजाभाऊ सोनवणे, शिबू जोस यांनी त्यांचे स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अरंगेत्रम’मधून झळकली नृत्य ‘ऊर्जा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विजेच्या चपळाईने होणारा पदन्यास, महिषासुरमर्दिनी, गणेशस्तोत्रसारख्या पुरातन स्तोत्रांच्या तालातूनही साकारणारे नृत्यशिल्प असा माहोल जमून आला होता ऊर्जा पेखळे या नृत्यांगनाच्या ‘अरंगेत्रम’प्रसंगी. महाकवी कालिदास कलामंदिर येथे हा नृत्याचा कार्यक्रम झाला.

वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून गुरुमाई मीरा धानू यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यमचे धडे घेणारी बाल नृत्यांगना ऊर्जा पेखळे हिने वयाच्या १६ व्या वर्षी, गुरुवारी अरंगेत्रम सादर केले. या कार्यक्रमात तिने भरतनाट्यम या नृत्यशैलीच्या विविध छटा सादर केल्या. 

नृत्यशैलीमध्ये किमान सात वर्षे गुरूच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतल्यानंतर नृत्यशैलीच्या सर्वासक्षम सादरीकरणाला अरंगेत्रम म्हटले जाते. हे नृत्य सादर करणे नृत्यांगनेच्या व गुरूच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा क्षण असतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीकृष्णमूर्ती यांनी गणेशस्तवन म्हटले, नंतर पेखळे व राव, गुरुमाई मीरा गणपथी धानू यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

कार्यक्रमात ऊर्जाने हमसदवनी रागावर आधारित पुष्पांजली, अलारपू सहित गणेशवंदना, कल्याणी रागावर आधारित जतीस्वरम, भीमपलास रागावर आधारित देविस्तुती, श्री रागावर आधारित वर्णम बेहग रागावर आधारित नटराजपदम, यमनकल्याणी रागावर आधारीत कृष्णाकृती, हिदोलाम रागावर आधारित थिलाना व सौराष्ट्रम रागावर आधारित मंगलम या प्रकाराचे सादरीकरण केले. ऊर्जाच्या नृत्यात ताल व सुर व पदलालित्याचा सुरेख संगम या वेळी पाहायला मिळाला. 
या कार्यक्रमात मृदंगमची साथ मुंबई शंकरनारायणन, व्हायोलिनची साथ मंगला वैद्यनाथन व गायनाची साथ कृष्ण मुर्ती यांनी दिली. वेशभूषा डी.एस. अय्येलू, रंगभूषा विकी सदरे, श्यामला वासूदेवन, नेपथ्य अवधूत देशपांडे, लाइट-साऊण्ड चंद्रशेखर मेनन तर रियंका पेखळे यांनी सूत्रसंचालन केले. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय सैन्यावर शुभेच्छांचा वर्षाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाकिस्तानने भारताच्या उरी या लष्करी केंद्रावर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये आतंकवाद्याच्या तळावर हल्ला केला. यात अनेक घुसखोर आतंकवादी ठार झाले असून, भारताने उचललेल्या या कारवाईचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे. तसेच भारतीय सैन्यावर शुभेच्छांचा वर्षावही सोशल मीडियावर सुरू होता.

भारताने उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानवर कडक कारवाईचे संकेत दिले आहे. सिंधू करार रद्द करावा, अशीही मागणी सुरू होती. पाकव्याप्त काश्मीरमध्ये गुरुवारी मध्यरात्री काही घुसखोर दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत शिरत असल्याची कुणकुण भारतीय सैन्याला लागली होती. यावर भारतीय सैन्याने कडक कारवाई करत अतिरेक्यांना यमसदनी धाडले. आणखी कडक कारवाईचे संकेत देत मोदी सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठकीचेही आयोजन केले. या प्रतिहल्ल्याबाबत संपूर्ण भारतात आनंदाची भावना असून, मोदी सरकारने चांगले पाऊल उचललल्याची चर्चा सर्व पातळीवर दिसून येत होती. नाशिक शहरात अनेक भागात प्रतिहल्ल्याचे वृत्त समजताच नागरिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. त्याचप्रमाणे काही ठिकाणी साखर, पेढेदेखील वाटण्यात आले. अनेक संस्थांनी लष्कराच्या कामगिरीबाबत अभिनंदनाचे ठराव केले आहेत. रविवार कारंजावर भारतीय युवा मोर्चाच्या वतीने फटाके फोडण्यात आले. नाशिक जिल्ह्याच्या विविध भागातही आनंदोत्सव साजरा करून पेढे वाटण्यात आले.

सोशल मीडियावर आनंद

या हल्ल्याचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले. व्हॉट्सअॅपवर तसेच फेसबुकच्या वॉलवर भारतीय लष्कराच्या कामगिरीचे कौतुक सुरू होते. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन पोलिसांचा नूर बदलला ! 

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात आठ मार्च रोजी जागतिक महिलादिनाची धामधूम होती. सर्वत्र नारीशक्तीचा, तिच्या कर्तृत्वाचा जागर सुरू होता. पोलिसांनीदेखील एक मोठा कार्यक्रम आयोजित करीत महिलांचा सन्मान केला. हा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे एका महिलेलाच टवाळखोर मुले शिव्या हासडीत होते. तिच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. पंचवटी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची कारवाई केली. लागलीच हे प्रकरण बंद झाले; पण बुधवारी पोलिस आयुक्तांना व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला आणि पोलिसांचा नूरच बदलला.

आंतरराष्ट्रीय महिलादिनाची धूम सुरू असताना पंचवटी कारंजावरील एका बँकेच्या महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून वाहनाचे नुकसान करण्यात आल्याची घटना घडली होती. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बँकेच्या महिला कर्मचारी नेहमीप्रमाणे ड्युटीवर आल्या होत्या. त्यांनी आपली दुचाकी बँकेसमोर पार्क केली. काही वेळाने तेथीलच एका टपरीवर चहा पिण्यासाठी आलेल्या काही टवाळखोर मुलांनी महिलेच्या वाहनावर ठाण मांडले. दुचाकीच्या आरशाशी खेळत असलेल्या मुलांना या महिलेने टोकले असता, त्या मुलांनी महिलेलाच अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संशयित आरोपी महिलेच्या अंगावर धावून गेले. घाबरलेली महिला बँकेत पळाली, तेव्हा आरोपींनी त्यांची दुचाकी पाडून पोबारा केला होता. काही दक्ष नागरिकांनी तातडीने पंचवटी पोलिसांना माहिती दिली. संशयितांच्या वाहनांचा क्रमांकही दिला. मात्र, अशा पद्धतीने संशयितांचा शोध लागणार नाही, अशी बोळवण करीत पंचवटी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. तेव्हापासून या महिलेशी किंवा पोलिसांना माहिती देणाऱ्या व्यक्तीशी कोणी संपर्क साधला नाही. दरम्यान, पंचवटी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यासह पोलिस आयुक्तांची बदली झाली. नवीन पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी आपला व्हॉट्सअॅप क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला. या क्रमांकावर एका व्यक्तीने वरील घटनेची तक्रार दिली. पोलिस आयुक्तांनी तातडीने याची दखल घेत कारवाईचे आदेश दिले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी बँकेत जाऊन महिलेची विचारपूस केली. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तक्रारदाराशी संपर्क साधला. त्यानंतर अवघ्या दोन-तीन तासांत पोलिसांनी संबंधित तरुणांचा शोध घेऊन त्यांना ‘समज’ दिली. वास्तविक तत्कालीन अधिकाऱ्यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करणे ही घोडचूक ठरली.

या घटनेत दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, तिसराही लवकरच सापडेल. त्यांची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिसांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून आपली तक्रार द्यावी. तक्रारींचे समाधान नक्कीच केले जाईल.

- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल्पवयीन मुलांनी फोडली वाहने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गार्डनमध्ये हटकल्याचा राग मनात धरून तीन अल्पवयीन मुलांनी सातपूर परिसरातील श्रमिकनगरमध्ये वाहनांची तोडफोड केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मुलांच्या पालकांकडे चौकशी करीत तिघांना ताब्यात घेतले.

सातपूर परिसरातील श्रमिकनगर ते शनीमंदिर रस्त्यावर उभी असलेली पाच वाहने समाजकंटकांनी फोडल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी समोर आली होती. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. कायदा व सुव्यवस्था काबूत ठेवण्याचा प्रयत्न करणारे पोलिस दलही यामुळे चक्रावून गेले. एका ठिकाणी झालेल्या घटनेचा तपास पूर्ण होत नाही तोच दुसरी घटना घडल्याने नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी दोन दिवसांत वाहनांची तोडफोड करणाऱ्या तीन मुलांचा शोध घेतला. क्राइम ब्रँचच्या युनिट दोनच्या पथकाने ही कामगिरी केली. पत्रकार परिषदेदरम्यान पोलिसांनी ही माहिती दिली. या वेळी पोलिस उपायुक्त दत्तात्रेय कराळे, विजय पाटील, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन गोरे, राजू भुजबळ आदी उपस्थित होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेली मुले १५ ते १६ वर्षांची असून, इयत्ता नववी, तसेच दहावीमध्ये शिक्षण घेतात. विशेष म्हणजे घटनेच्या दिवशी या मुलांनी मद्यपान केले होते. यापैकी दोन मुलांना वडील नसून, एकाचे वडील मद्याच्या दुकानात मॅनेजर आहेत.

असा लागला तपास

एका बारमध्ये काही मुले वाहनांची तोडफोड केल्याची चर्चा करीत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार अधिक तपास करीत पोलिस या मुलांपर्यंत पोहोचले. तोडफोडीची घटना झाली, त्या वेळी या मुलांनी मद्यपान केले होते. रात्री उशिरा घरी परतत असताना एका मुलाला एक वाहन दिसले. हे वाहन अशा व्यक्तीचे होते, की ज्याने त्याला काही महिन्यांपूर्वी गार्डनमध्ये हटकले होते. याचा राग आल्याने या मुलाने त्याच्या साथीदारासह त्या व्यक्तीचे वाहन फोडले. यानंतर पुढे त्यांनी आणखी चार वाहनांची तोडफोड केली. विशेष म्हणजे घटनेच्या अवघ्या एका दिवसानंतर ही मुले पुन्हा मद्य पिण्यासाठी बारमध्ये गेली. तिथे ते वाहने फोडल्याच्या फुशारक्या मारत असताना कोणी तरी हे ऐकले आणि पोलिसांना सांगितले.


...तर मद्य विक्रेत्यांसह पालकांवरही कारवाई!

दरम्यान, वाहन तोडफोडीसह इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याबाबत पोलिसांनी चिंता व्यक्त केली. सातपूर येथून ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांनी मद्य प्राशन केले होते. त्यांना पालकांनी आपली दुचाकी दिली होती. यानंतर मुलांनी वाहनात पेट्रोलसुद्धा भरले. अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देणे गुन्हा आहे. अल्पवयीन मुलांना बारमध्ये मद्य दिल्यानेसुद्धा कायद्याचा भंग होतो. त्यामुळे मुलांना वाहन देणाऱ्या पालकांवर, तसेच मद्य देणाऱ्या बारमालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त कराळे यांनी स्पष्ट केले.

मटा भूमिका

वाहनांच्या तोडफोडप्रकरणी तीन शाळकरी मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गुन्हेगारी कृत्यात नाशिकमधील अल्पवयीनांचा वाढता सहभाग ही आता सामाजिक चिंतेची बाब बनू पाहत आहे. गेल्या आठवाड्यात वाहनचोरी प्रकरणीही अशाच काही लहान मुलांना पकडण्यात आले होते. नववी– दहावीची मुले मद्यपान करून वाहनांची तोडफोड करतात किंवा मौजमजेखातर वाहने चोरतात हा प्रकारच धक्कादायक आहे. यावर्षी पहिल्या आठ महिन्यांतच तब्बल १५८ मुले कायद्याच्या कचाट्यात सापडली असून, हा आकडा नाशिकच्या बालविश्वाला लागलेले ग्रहण अधोरेखित करतो. कोणाही विवेकशील माणसाला आतूनच हलवून टाकणाऱ्या या घटना आहेत. नाशिकच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना यापुढे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही विचार करावा लागेल. नाशिककरांनी मात्र आपल्या पाल्यांकडे अधिक काळजीपूर्वक पाहणे गरजेचे ठरले आहे. बदलती लाइफस्टाइल, महागड्या वस्तूंचे आकर्षण व संवादाचा अभाव अशी काही कारणे मुलांच्या गुन्हेगारीकडे झुकण्यास कारणीभूत मानली जातात. त्यामुळेच अशा घटनांमध्ये पोलिसांकडे अंगुलीनिर्देश करून पालकांना हात झटकता येणार नाही. समाजानेही मला काय त्याचे, ही वृत्ती सोडून या गंभीर विषयाकडे काळजीने पाहावयास हवे. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुकेण्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी समिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कसबे सुकेणे (ता. निफाड) येथील रवींद्र अंबादास गांगुर्डे (वय ३५) याने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी घडली आहे. या आत्महत्येप्रकरणी तहसीलदारांकडून चौकशी समिती नियुक्त केली आहे. मात्र, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

रवींद्र गांगुर्डे याने रागाच्या भरात स्वतःस पेटवून घेतल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कसबे सुकेणे पोलिस दूरक्षेत्र येथे आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आय. जी. मोरे तपास करीत आहेत. निफाड तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेल्या अहवालात शेतकरी आत्महत्यांबाबत तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. निफाड तहसील कार्यालयाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यावर किती कर्ज होते किंवा नव्हते, याबाबत त्रिसदस्यीय समिती नेमली असून, तिचा अहवाल दोन दिवसांत सरकारकडे सादर केला जाईल, असे तहसीलदार विनोद भामरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरला १५ किलो गांजा जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

पोलिस आयुक्तालयातर्फे शहरात ठिकठिकाणी जुगारअड्ड्यांवर छापासत्र सुरू आहे. यात सातपूर भागात गुरुवारी सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे यांनी महादेववाडीत एका घरावर छापा टाकत १५ किलो गांजा जप्त केला आहे. यापैकी नऊ किलो गांजा पिशव्यांमध्ये आढळला. या वेळी संशयित कृष्णा जाधव याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून पोलिसांनी तलवारही हस्तगत केली आहे.

दरम्यान, सातपूर भागात अनेक दिवसांपासून जुगारअड्ड्यांवर छापासत्र सुरू असताना अवैध मद्य विक्रीवरही कारवाई कधी होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याप्रसंगी मोहिमेत सातपूरचे पोलिस निरीक्षक मनोज करंजे, सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रतिक देवरे यांसह कर्मचारी सहभागी झाले होते.
त्यातच सातपूर भागात काळ्या काचा लावलेल्या चारचाकी वाहनांमधून अवैध मद्य विक्रीच्या अड्ड्यांवर दमनमधील डी मालाचे मद्य विक्री केले जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याकडे पोलिसांनी लक्ष न घातल्याने संबंधित अवैध मद्य विक्री करणारे मोकाट फिरताना दिसतात. पोलिसांनी संबंधितांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘या’ नर्सरीने जाणले भारतीय वनस्पतींचे महत्त्व

$
0
0

ashwini.kawale@timesgroup.com
Tweet – ashwinikawaleMT

नाशिक : भारतातील वनसंपदेचे आकर्षण अतिप्राचीन काळापासून आहे. भारतीय वनस्पतीचे जतन करण्यासाठी अनेक संस्था पुढे येत असून, कालौघात दुर्लक्षित ठरलेल्या भारतीय प्रजातीच्या वनस्पतींना पुन्हा महत्त्व प्राप्त करून देण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये मूळ धरत आहे. या दृष्टीने पाऊल उचलत पर्यावरणप्रेमी व नेचर फॉरएव्हर सोसायटीचे मोहम्मद दिलावर यांनी ‘नेचर इंडिया नर्सरी’ची स्थापना केली आहे. केवळ भारतीय प्रजातीच्याच वनस्पतींचा समावेश असलेली ही नर्सरी देशाच्या पर्यावरण संवर्धनासाठी मोलाची ठरत आहे.

भारतातील बहुतांश नर्सरींमध्ये विदेशी प्रजातींच्या वनस्पतींना प्राधान्य दिले जात असून, त्यांचीच लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. परिणामी, भारतीय प्रजातीच्या वनस्पती या अधिक गुणधर्मयुक्त व पर्यावरणासाठी मोलाच्या असल्या तरी त्या दुर्लक्षित राहत आहेत. त्यामुळेच या वनस्पती नामशेष होण्याची भीतीही पर्यावरणप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे. या वनस्पतींचा प्रचार, प्रसार व संरक्षण करण्याची गरज ओळखत या नर्सरीची स्थापना करण्यात आली आहे. नाशिक पुणे रोडवरील श्रीकृष्ण लॉन्सजवळ ही नर्सरी सुरू करण्यात आली आहे. जंगली, फळे, मेडिसिनल, रीलिजिअस, लँडस्केपिंग, प्लँट्स या प्रकारांमधील २५० वेगवेगळ्या प्रकारच्या भारतीय प्रजातीच्या वनस्पतींचा यामध्ये समावेश असल्याने ती वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. शिवाय विदेशी प्रजातींच्या तुलनेत भारतीय वनस्पतींचे पर्यावरणीय महत्त्वही अधिक असून, फुलपाखरू व इतर काही पक्ष्यांसाठी हे आकर्षणाचे ठिकाण ठरत आहे.

या वनस्पतींचा समावेश

सप्तपर्णी, सुपारी, हिरवा चाफा, नीम, ताडगोळा, पलाश, धाऊरा, किन्हई, अशिंद, रोहितुका, बुजडा, हळद, लिंबू, दालचिनी, टेंभुर्णी, पिवळा कांचन, कापूर, भोकर, रुद्राक्ष, आंबोडी, उंबर, पिंपळ, माधवीलता, मेहंदी, बकुळ, लिंबू तुळस, मिरी, पिस्ता, अग्निमंथ, शमी, बिब्बा, सर्पगंधा, रिठा, कुसुम, लवंग, अश्वगंधा, अर्जुन आदी. याशिवाय थंबेर्गिया प्रकारातील सुंदर व दुर्मिळ प्रकारच्या वेली, १५ प्रकारच्या भारतीय वेली, फायकस प्रजातीतील वनस्पती आदींचाही यात समावेश आहे.

भारतीय वनस्पती या सुंदर नसतात व त्यांची वाढही लवकर होत नाही, अशी धारणा आपल्याकडे आहे. ही धारणा पूर्णतः चुकीची असून, ती भारतीय वनस्पतींबाबत घातक ठरणारी आहे. या वनस्पतींची लागवड फ्लॅट, रस्त्याच्या कडेला, रहिवासी भागात अशा सर्व ठिकाणी करता येते. या वनस्पतींविषयी लोकांना शिक्षण देणे हे आमचे ध्येय आहे.

– डॉ. मोहम्मद दिलावर, नेचर इंडिया नर्सरी 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्याकडे आढळले वाघाचे कातडे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पट्टेरी वाघाचे कातडे विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला गुरुवारी सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. तो फॅशन डिझायनिंगचा विद्यार्थी आहे. शहरामध्ये प्रथमच असा प्रकार समोर आला असून, पोलिस संबंधित संशयिताकडे कसून चौकशी करीत आहेत.

ओमकार राजेंद्र आहेर (१९ रा. गजरा पार्कजवळ, ऋषिका निवास, कमोदनगर) असे या संशयित आरोपीचे नाव आहे. तो फॅशन डिझाइनच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असून, बुधवारी रात्री कॉलेजरोड येथून त्याला अटक करण्यात आली. याबाबत पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले, की ओमकार वाघाचे कातडे विकण्याचा प्रयत्न करीत होता. त्यातूनच त्याने काही व्यक्तींशी संपर्क साधला. त्यातील एका व्यक्तीने सरकारवाडा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक उबाळे यांना ही माहिती दिली. उबाळे यांच्यापर्यंत आलेली माहिती खरी असल्याने सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सोनवणे, पीएसआय चव्हाण, हवालदार दिलीप शिंदे, पोलिस नाईक सचिन आहिरराव आदींनी सापळा रचला.

पोलिसांपर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीलाच हे कातडे विकत घ्यायचे असल्याचे संशयिताला सांगण्यात आले. २५ लाख रुपयांना सौदा ठरला. कातडे घेण्यासाठी कॉलेजरोड येथे संशयितास पाचारण करण्यात आले. रात्री दहा वाजेच्या सुमारास ओमकार स्कूल बॅगमध्ये वाघाचे कातडे घेऊन कॉलेज रोडवरील बिग बाझारजवळ आला असता, पोलिसांनी त्याला अटक केली. वाघाचे कातडे जुने असून, सुस्थितीत आहे. हे कातडे त्याच्यापर्यंत कसे आले, या गुन्ह्यात आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे काय, याचा पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, या वाघाचे कातडे ओमकारला त्याच्या वडिलांनी दिले. वडिलोपार्जित आणि कित्येक वर्षांपासून हे कातडे आपल्या घरातच पडून असल्याचे ओमकारने पोलिसांना सांगितले. तपासधिकारी सर्व शक्यता तपासून पाहत असून, पोलिस कोठडीदरम्यान अनेक बाबी स्पष्ट होतील, असे पोलिस निरीक्षक कोल्हे यांनी सांगितले. संशयित आरोपीविरोधात वन्यप्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वन विभागाला गुन्ह्याची माहिती देण्यात आली आहे. वाघाच्या कातड्याची किंमत २५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. संशयिताची कसून चौकशी सुरू आहे.

- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘र. ज. चव्हाण’ उपविजेते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रीडा व युवक संचालनालयातर्फे २४ आणि २५ सप्टेंबरदरम्यान गंगापूर (जिल्हा औरंगाबाद) येथे झालेल्या चौथ्या राज्यस्तरीय शालेय टेनिस हॉलीबॉल स्पर्धेत १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या गटात नाशिकरोडच्या र. ज. चव्हाण शाळेला दोन गटांत उपविजेतेपद मिळाले. यापूर्वी १६ आणि १७ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्रीय व धुळ्यात १९ आणि २० सप्टेंबर रोजी झालेल्या विभागीय स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.

राज्यस्तरीय शालेय टेनिस हॉलीबॉल स्पर्धेतही नाशिकरोडच्या र. ज. चव्हाण शाळेच्या १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने अंतिम फेरी गाठली. १४ वर्षांखालील गटात या संघाच्या मुलींनी प्रथम मुंबईचा पराभव केला, तर उपांत्य फेरीत अमरावती विभागाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत मात्र त्यांना कोल्हापूर विभागाच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला. या संघाकडून संजना जगताप, सिद्धी खैरे, प्राची तांबट, दिया शेख, प्रियांका नागरे, अक्षदा बिडवे यांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केले.

१७ वर्षांखालील वयोगटात नाशिक रोडच्या मुलींनी प्रथम कोल्हापूरचा, तर उपांत्य फेरीत औरंगाबाद विभागाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत मात्र त्यांना पुणे विभागाकडून पराभव पत्करावा लागला. हा सामना तीन सेटपर्यंत रंगला. नाशिकरोडच्या प्रांजल उगलेने पहिला एकेरी सामना जिंकून आघाडी घेतली. मात्र, दुसरा दुहेरी सामना आणि परतीचा एकेरी सामना पुणे विभागाच्या संघाने जिंकला. नाशिकरोडच्या संघात प्रांजल उगले, डिम्पल सोनार, वैष्णवी आचार्य, मुस्कान काद्री, सपना गरगटे आणि शलाका वाघ यांनी शर्थीचे प्रयत्न केले. उपविजेतेपद मिळविलेल्या दोन्ही संघांचा मुख्याध्यापिका छाया वाणी, उपमुख्याध्यापक संजय सूर्यवंशी यांनी गौरव केला. क्रीडा शिक्षक प्रद्युम्न जोशी, कैलास आरोटे, क्रीडाशिक्षिका जयश्री उदार, प्रशिक्षक मनोज म्हस्के यांचे मार्गदर्शन लाभले. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैवल्य नागरेला दुहेरी मुकुट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिमखान्यातर्फे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ९ व ११ वर्षांखालील गटात कैवल्य नागरे, १३ वर्षांखालील गटात तन्मय महाले, तर १५ वर्षांखालील गटात अनीश नहार यांनी विजेतेपद मिळविले.

स्पर्धेत एकूण ८७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. १७ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंचा सहभाग असलेल्या या चुरशीच्या स्पर्धेत पहिल्या फेरीपासूनच खेळाडूंना कडव्या लढतीला सामोरे जावे लागले. कैवल्य नागरे या बिगरमानांकित खेळाडूने मानांकितांना आश्चर्याचा धक्का देत लहान गटाची दोन विजेतीपदे खिशात घातली. तन्मय महाले याने आपल्या गुणवत्तेचे कसब दाखवत १३ वर्षांखालील गटातील विजेतेपद पटकावले.
सर्व वयोगटांपैकी सर्वांत चुरशीच्या १५ वर्षांखालील गटामध्ये तब्बल नऊ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंचा सहभाग होता. या गटात अनिश नहार (एलो रेटिंग १६००) याने विजेतेपद मिळविले. मंगेश गंभिरे पंच होते. हर्षल वाल्डे यांनी सहकार्य केले.
शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त नरेंद्र छाजेड यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. शेखर भंडारी यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद रानडे, अनिल चुंबळे, झुलकरनैन जागीरदार, मिलिंद जोशी, शेखर भंडारी, संजय मराठे आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल ः

९ वर्षांखालील वयोगट ः

१. कैवल्य नागरे. २. अरविंद अय्यर, ३. श्रीहरी कुलकर्णी, ४. राम राठी, ५. ईश्वर रोकडे.

१३ वर्षांखालील वयोगट ः

१. तन्मय महाले, २. चैतन्य मते, ३. अजिंक्य जाधव, ४. सिया कुलकर्णी, ५. विशाल जाधव.

११ वर्षांखालील वयोगट

१. कैवल्य नागरे, २. सृष्टी रांका, ३. क्रीश चोपडा, ४. श्रावणी सामंत, ५. अरविंद अय्यर

१५ वर्षांखालील वयोगट ः

१. अनीश नहार, २. तन्मय महाले, ३. अनुराग काळकर, ४. श्रुती राठी, ५ ऐश्वर्या जोशी. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चंदू चव्हाण यांच्या आजीचा धक्क्यानं मृत्यू

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । धुळे

पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असलेले धुळ्यातील लष्करी जवान चंदू चव्हाण यांच्या आजीचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. आपला नातू पकडला गेल्याचा धक्का सहन न झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

लीलाबाई पाटील असं चंदू चव्हाण यांच्या आजीचं नाव आहे. चंदू चव्हाण लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांच्या निधन झालं. त्यानंतर चंदू, त्यांचा भाऊ भूषण व बहिणीचा सांभाळ त्यांच्या आजी-आजोबांनी केला. चंदू यांचा भाऊ भूषण हाही लष्करात असून गुजरातमधील जामनगर येथे '९ मराठा रेजिमेंट'मध्ये कार्यरत आहेत. आजी त्यांच्याच घरी राहायला होत्या. चंदू पकडले गेल्याची बातमी गुरुवारी रात्री त्यांना समजली. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं पार्थिव जामनगरहून धुळ्यातील मूळगाव बोरविहीर इथं आणलं जाणार आहे.

भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईनंतर चंदू चव्हाण हे चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानाच्या हद्दीत गेले. तिथं पाकिस्तानी लष्करानं त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकवीरा मातेच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खान्देश कुलस्वामिनी व महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ आदिशक्ती एकवीरा मातेच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होणार असून, त्यात दस-यापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. आज महापौर कल्पना महाले व मंदिराचे ट्रस्टी सोमनाथ गुरव यांच्या हस्ते आरती होईल. १ ते ११ ऑक्टोंबर, मंदिर देवी दर्शनासाठी अखंड २४ तास खुले राहणार आहे. मंदिर व परिसरात १० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. खान्देशातील धुळे, नंदुरबार, जळगाव, तसेच नाशिक, पुणे, मुंबई गुजरात व मध्य प्रदेशात भाविक देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.

मंदिराचा इतिहास

आदिशक्ती कुलस्वामिनी एकवीरा मातेचे धुळे शहरातील पांझरा नदीच्या किना-यावर देवूपर भागात प्राचीन देवस्थान आहे. एकविरा देवीची मूर्ती स्वयंभू, अष्टभूजा, शेंदूरलेपन पूर्वाभिमुख आहे. पूर्वीच्या काळापासून मंदिराची देखरेख जुने धुळे परिसरातील गुरव घराण्याकडे आहे. सन १९८८ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार व सुशोभिकरण करण्यात आले. मंदिराच्या परिसरात अहिल्यादेवी होळकरांनी निर्माण केलेल्या पायविहिरीस आजही पाणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदिनी स्वच्छतेसाठी उद्या मोहीम

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नासर्डी नदीला नंदिनी करण्याच्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या उपक्रमाला बळ देण्यासाठी श्री सत्यसाई सेवा संस्थेनेही पुढाकार घेतला आहे. त्यासाठीच रविवारी (दि. २) ‘स्वच्छता से दिव्यता’ ही मोहीम राबविली जाणार आहे. शहराच्या विविध कॉलेजेसचे विद्यार्थी आणि संस्थेचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते त्यात सहभागी होणार आहेत.

दक्षिणगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीची उपनदी असलेल्या नासर्डी नदीला पुनर्वैभव मिळवून देऊन तिला पुन्हा नंदिनीचे स्वरूप देण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पुढाकार घेतला आहे. त्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. आता या मोहिमेत श्री सत्यसाई सेवा संघटनेनेही सक्रिय होण्याचा निश्चय केला आहे. श्री सत्यसाई सेवा संघटना ही आध्यात्मिकता व समाजसेवा याचे निराळे मिश्रण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचे आवाहन केलेले आहे. त्याला प्रतिसाद देण्यासाठी संघटनेने ‘स्वच्छता से दिव्यता’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आहे. त्याचप्रमाणे २० ऑक्टोबर हा श्री सत्यसाईबाबांचा अवतार घोषित करण्याचा दिवस आहे. त्यामुळे या दोन्ही महापुरुषांना वंदन करण्यासाठी २ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर यादरम्यान संघटनेच्या वतीने देशाच्या विविध भागात स्वच्छतेचे उपक्रम राबविले जाणार असल्याचे संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष निमेष पांड्या यांनी सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये नंदिनीच्या उपक्रमात सहभागी होत स्वच्छता केली जाणार असल्याचे नाशिक जिल्हाध्यक्ष धर्मेश वैद्य यांनी सांगितले.

गेल्या वर्षीच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात संघटनेच्या वतीने दीड लाख जणांवर आरोग्य उपचार केल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रमेश सावंत यांनी दिली. सामाजिक कार्याचा मोठा अनुभव संघटनेला असून, त्याचा फायदा आता नंदिनीच्या मोहिमेलाही होणार आहे.

नासर्डीला पुन्हा नंदिनीचे पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पुढाकार घेतला आहे. त्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. त्यात विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संस्था-संघटनांसह सामान्य नागरिकादेखील वेळोवेळी उत्स्फूर्त सहभाग नोंदवीत असून, आता श्री सत्यसाई सेवा संस्थेनेदेखील पुढाकार घेतला आहे.

--
..येथून होणार प्रारंभ

संघटनेच्या वतीने येत्या रविवारी (दि. २ ऑक्टोबर) सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत ‘स्वच्छता से दिव्यता’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ श्री म्हसोबा मंदिर पटांगण, सिटी सेंटर मॉलजवळ, उंटवाडी येथे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा आणि जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता होणार आहे. या मोहिमेत शहराच्या विविध भागातील कॉलेजेसचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यूच्या अळ्या सापडल्यास फौजदारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात जोमाने फैलावत चाललेल्या डेंग्यूच्या अटकावासाठी महापालिकेने आता स्वच्छता व जनजागृती मोहिमेपाठोपाठ नागरिकांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उचलण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या घरोघरील तपासणीत नागरिकांच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्यात तर नोटीस दिली जात आहे. दुसऱ्या तपासणीत संबधित घरात पुन्हा डेंग्यूच्या अळ्या सापडल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. परंतु तरीही घरासह आजुबाजूच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या घरमालकांवर मग फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

शहरात डेंग्यूने उच्छाद मांडल्यानंतर महापालिकेने आता उश‌िरा का होईना डेंग्यूचे ऑपरेशन सुरू केले आहे. शुक्रवारी महापालिकेने नाशिकरोड, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सिडको व सातपूर या पाच विभागांत स्वच्छता मोहीम व धूर फवारणी सुरू केली. नाशिक पश्चिमचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या उपस्थितीत काल‌िका मंदिर परिसरातून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. स्वच्छतेसाठी ३२ पथके तयार करण्यात आली असून, त्यांच्या जोडीला ६४ क्षेत्र कार्यकर्ता व १० विभाग पर्यवेक्षक देण्यात आले आहेत. दररोज एका प्रभागात जाऊन या पथकामार्फत स्वच्छता, जनजागृतीसह धूरफवारणी केली जाणार आहे.

या मोहिमेत प्रत्येक घराघरात जाऊन डेंग्यूची तपासणी केली जात आहे. नागरिकांच्या घरात पहिल्यांदा अळ्या सापडल्यानंतर संबंधित घरमालकाला व जागामालकाला पालिकेकडून नोटीस दिली जात आहे. दुसऱ्या टप्प्यात पुन्हा त्याच घरात अळ्या सापडल्या तर, संबंधितावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तरीही नागरिकांनी दुर्लक्ष केले आणि तिसऱ्या तपासणीत त्याच ठिकाणी अळ्या सापडल्या तर थेट फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पालिकेने दिला आहे. नागरिकांच्या दुर्लक्षामुळे घराघरात डेंग्यूच्या अळ्या तपासणीत सापडत आहेत. त्यामुळे महापालिकाच आता अॅक्शनमध्ये आली आहे.

शिक्षकांचीही मदत

महापालिकेने डेंग्यूसंदर्भात जनजागृतीसाठी विशेष मोहीम सुरू केली असून, यात आता शिक्षक व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. शिक्षकांची जनजागृती केल्यानंतर शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांना या मोहिमेत सहभागी करतील. प्रत्येकी एका विद्यार्थ्याला डेंग्यूच्या जनजागृतीसाठी पाच घरे दिली जाणार आहेत. शिक्षकांसोबतच निमा व आयमा या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन एमआयडीसी परिसरात ही मोहीम राबविली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांप्रति व्यक्त व्हावी कृतज्ञता...

$
0
0


जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन दर वर्षी १ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. ज्येष्ठ नागरिक संघाच्या निर्मितीचा मूळ स्रोत हा युनाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिसून येतो.
---
रमेश देशमुख, नाशिक

देशात व महाराष्ट्रात विविध प्रांतांमध्ये ज्येष्ठ नागरिक संघ कार्यरत आहेत. १९६९ साली युनोच्या आमसभेने जगातील ज्येष्ठांच्या जीवनावश्यक विविध प्रश्नांच्या अनुषंगाने, तसेच ज्येष्ठांचे जीवनमान सुस्थितीत करण्याबाबत विचार सुरू केला. युनोच्या कार्यालयात ज्येष्ठांच्या आरोग्यसेवा, अर्थ, उत्पन्न, विकास, आरोग्यसंपन्न जीवन, दैनंदिन गरजा, सुरक्षितता, सामाजिक समस्या यासाठी समिती नेमून विविध देशांच्या अहवालांचे एकत्रीकरण करून आमसभेने १९७८ मध्ये ज्येष्ठांसाठी पहिली जागतिक सभा घेऊन जुलै/ऑगस्ट १९८२ मध्ये १२१ देशांच्या ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधींची बैठक घेतली. ३ डिसेंबर १९८२ रोजी युनो आमसभेच्या परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी फेस्कॉमचे निर्मितीप्रमुख डॉ. राधाकृष्ण भट यांना लाभली. १९९४ मध्ये भारतात ज्येष्ठांबाबत मसुदा तयार करण्यात आला. १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ज्येष्ठांसाठी राष्ट्रीय धोरण अस्तित्त्वात आले. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यास १ ऑक्टोबर १९९१ पासून सुरुवात झाली. घरात, रस्त्यात, बस, रेल्वे व अन्य ठिकाणी ज्येष्ठांना सुरक्षितता व सवलत प्राप्त व्हावी, तसेच त्यांचे जीवनमान सुसंपन्न व्हावे, असा या दिवसाचा मुख्य हेतू होता. नाशिक शहरातील विविध भागांमध्ये अंदाजे ७० ते ८० ज्येष्ठ नागरिक संघ कार्यरत आहेत. राज्यातील प्रादेशिक संघांपैकी नाशिक-नगर हा प्रादेशिक संघ पूर्वीपासून फेस्कॉमच्या (महासंघ) कार्यात आघाडीवर आहे. नाशिक-नगर प्रादेशिक संघाचे अध्यक्षपद उत्तमराव तांबे यांच्याकडे असून, गेल्या पाच वर्षांत प्रादेशिक संघात ज्येष्ठांसाठी विविध कार्यक्रम, कार्यशाळा, फेस्कॉमच्या कार्यकारिणी सभांचे नाशिकला आयोजन करण्यात तांबे व त्यांचे सहकारी यांचा मोठा वाटा आहे. फेस्कॉमचे माजी अध्यक्ष अनंत घोलप यांच्याही कार्यकाळात नाशिक व महाराष्ट्रात फेस्कॉमचा वर्धापन दिन व जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरे होत असत. नाशिक महापालिकेने पुढाकार घेऊन १ ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठांप्रति कृतज्ञता दिन म्हणून साजरा करावा. महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ नागरिकांचे विविध उपक्रमांसाठी भरीव आर्थिक तरतूद असायला हवी.

(लेखक महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे माजी संपर्क सचिव आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images