Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सांगा, कधी न्याय मिळेल कुणब्याच्या जातीला?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

क्रांती मोर्चात साहित्यिकांनी सहभाग नोंदवत कोपर्डी घटनेचा निषेध केला. यावेळी गीतकार विष्णू थोरे, संदीप जगताप, सागर जाधव जोपुळकर, प्रा डॉ. शंकर बोऱ्हाडे, प्रशांत केंदळे, प्रा. ज्ञानोबा ढगे, रवींद्र मालुंजकर, राजेंद्र उगले, राजेंद्र सोमवंशी, प्राचार्य सयाजी पगार, दत्ता सोनवणे, कैलास सलादे, गुरुदेव गांगुर्डे, अरुण इंगळे, संजय गोराडे, संजय गोर्डे, भीमराव कोते आदी साहित्यिक उपस्थित होते.

कवी संदीप जगताप यांनी...

आता आमचा जथ्था निघालाय

भुकेचे बॅनर खांद्यावर घेऊन

दिल्लीच्या तख्ताला आव्हान द्यायला

फास घेऊन मारण्यापेक्षा

लढता लढता सरणावर जायला..!

कवी गीतकार विष्णू थोरे म्हणाले,

'कोणी जुंपले हे आत्महत्येचे घोडे

आमचेच टांगे उलाल झाले

आणि आमच्या मरणावर टपलेले

लाखो इथे दलाल झाले'

बहुतांश आत्महत्याग्रस्त शेतकरी हे मराठा समाजातील आहेत. शेतीमाल कवडीमोल जात असताना सागर जाधव जोपुळकर कवितेतून म्हणाले,

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समाजाच्या न्यायासाठी नक्षलवादीही होईल

$
0
0

उदयनराजे भोसलेंचा हल्लाबोल; आर्थिक निकषावरच हवे आरक्षण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ व मराठा आरक्षणासाठी नाशिकमध्ये शनिवारी (दि. २४) क्रांती मूकमोर्चासाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्र व राज्य सरकारसह प्रस्थापित मराठा नेत्यांच्या विरोधात तोफ डागली. कोपर्डी घटनेतील आरोपींनी जाहीर गोळ्या घालण्याची मागणी करत, सत्तेत कोणतेही राज्यकर्ते असले तरी, ते जनतेची लूटच करतात, असा आरोपही त्यांनी केला.

अन्यायामुळेच लोक नक्षलवादाकडे वळतात, असे सांगत त्यांनी 'समाजावर अन्याय होत असेल तर, मी नक्षलवादाचे नेतृत्व करायला तयार आहे' असे खळबळजनक वक्तव्य केले. बदलत्या काळानुसार घटनेत लाख वेळा बदल करावे लागले तरी चालतील असे सांगत, त्यांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी केली. जीएसटीसाठी अधिवेशन बोलवता मग आरक्षण व अॅट्रॉसिटीसाठी तत्काळ अधिवेशन का बोलवत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.

नाशिकमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी खासदार उदयनराजे भोसले सहभागी झाले. या मोर्चात व गोल्फ क्लब येथील जाहीर मेळ्यात सहभागी झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत भोसले यांनी प्रतिमोर्चे काढणाऱ्यांसह केंद्र व राज्यसरकारसह प्रस्थापित मराठा नेत्यांवरही टीका केली. कोपर्डी घटनेचा निषेध करत, या आरोपींना बाहेर काढा अन जाहीर गोळ्या घाला, असे आवाहन त्यांनी केले. सत्ता आणि पैशांच्या जोरावर न्यायालयीन यंत्रणा ताब्यात घेवून लोकशाहीची क्रूर चेष्टा केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

आरक्षण हे आर्थिक निकषावरच

काळाबरोबर कायद्यात बदल करणे गरजेचे असल्याचे सांगत, आरक्षण हे आर्थिक निकषावरच हवे, अशी मागणी त्यांनी केली. मेरिटनुसार आरक्षण द्यावे असे सांगत, एकतर आम्हालाही द्या नाहीतर कोणालाही नको अशी भूमिका त्यांनी मांडली. समाजाचा असमतोल बिघडत चालला असून उद्रेकाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सामाजिक क्रांतीची स्थिती निर्माण झाली असून लिबिया, सिरियासारखी स्थिती टाळणे गरजेचे आहे. कंट्रीपेक्षा पक्षाला जास्त महत्त्व दिले जात असून तुम्ही देशभक्त कसे, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. स्पर्धात्मक युगात मेरिटनुसारच आरक्षण हवे असे सांगत, त्यांनी मंडल आयोगावरही टीका केली. मंडल आयोगाने दुर्बलतेची चुकीची व्याख्या केली असून जे आर्थिक दुर्बल आहेत, त्या सगळ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

आरक्षण हिसकावून घेऊ...

राजकारण बाजूला ठेवून कुठेतरी समाज म्हणून विचार करा असे सांगत,मात्र मूठभर लोकांनी समाजाचे नुकसान केल्याची टीका त्यांनी केली.पॉलिवुडने सर्वात जास्त नुकसान केले आहे. कास्ट लीस्टऐवजी 'कास्टीस्ट'कडे आपण दिवसेंदिवस चाललो आहोत. अॅस्टॉसिटीचा दुरूपयोग होत आहे. त्यामुळे अॅट्रॉसिटी रद्द झाले पाहिजे असे सांगत, आता आरक्षणासाठी भीक मागणार नाही ते द्यावेच लागेल. नाहीतर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थानच्या व त्या पाठोपाठ आमदार खासदारकीच्या आहेत. मागण्या मान्य झाल्या नाही, तर यांना धडा शिकवू व जे आरक्षणाच्या बाजून उभे राहतील त्यांना निवडून देऊ, अशी भूमिका भोसले यांनी यावेळी मांडली. समाज आहे, म्हणूनच शरद पवार आणि मी आहे, त्यामुळे समाजासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपोवन परिसर गजबजला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मराठा समाजबांधवांचे लोंढेच्या लोंढे तपोवनाच्या दिशेने येऊ लागले आणि सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर तपोवन परिसर पुन्हा गर्दीने गजबजला. तपोवनाच्या कोणत्याही दिशेला नजर टाकली असता फक्त भगवे ध्वज आणि मराठा बांधवांची गर्दी एवढेच दिसत होते. या गर्दीला समावून घेण्यासाठी शहरातील रस्त्यांची रुंदी कमी पडली.

तपोवन परिसरात सकाळी सहापासून जिल्ह्यातील मराठा बांधव जमा होत होते. मोर्चामध्ये सर्वप्रथम मुलींना स्थान देण्यात आले. मुली आणि महिलांची गर्दी वाढत गेली. ही रांग लक्ष्मीनारायण मंदिरापर्यंत पोहोचली.

औरंगाबाद रोडकडून येणारा लोंढा प्रचंड होता. मालेगाव, नांदगाव, येवला, सटाणा, लासलगाव, पिंगळगाव बसवंत, ओझर येथून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था औंरंगाबाद रोडलगतच्या भागात केल्याने हा रस्ता समाज बांधवांच्या गर्दीने भरला. मोर्चाची सुरवात तपोवनातून असली तरी नांदूर नाक्यापासून पार्किंग लागल्याने तेथून समाज बांधव पायी तपोवनाकडे येते होते. त्यांच्या मोर्चाला नांदूर नाक्यापासूनच सुरुवात झाली होती.

तपोवनात मोर्चाला सुरवात झाली तेव्हा मुली आणि महिला सर्वांत पुढे होत्या. त्यांची गर्दी प्रचंड असल्याने मुले आणि पुरुषांना मोर्चाच्या मार्गात जाण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. मोर्चा पुढे जाऊ लागला तशी गर्दी वाढत गेली आणि नाशिक शहराचे रस्ते एवढ्या मोठ्या गर्दीला समाविष्ट करून घेण्यास कमी पडायला लागले. औरंगाबाद रोडच्या एकाच बाजूने मोर्चाला सुरुवात झाली होती. मात्र, गर्दीमुळे दोन्ही बाजूने मोर्चा पुढे निघाला आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूही कमी पडायला लागल्या.

चटणी भाकरीने भागवली भूक

तपोवनाच्या प्रवेशद्वाराजवळच मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडतर्फे सोलापुरी भाकरी, चटणी, पुरीभाजी यांच्या अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या समाजबांधवांची भूक भागविण्याचे काम या मोफत अल्पोपाहारामुळे झाली.

वाहनांची भगवी रांग

अमृतधाम ः शनिवारी सकाळी सातपासून सटाणा, मालेगाव, चांदवड,मनमाड, कळवण आदी भागांतून वाहनांतून नागरिक मोर्चासाठी आले होते. प्रत्येक वाहनावर भगवे ध्वज फडकत होते. महामार्गावर सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ध्वजांमुळे या रांगाही भगव्यामय दिसत होत्या. अनेकांनी आपली वाहने पार्किंगच्या ठिकाणी पार्क केली होती, तर काहींनी नातेवाइकांच्या घरासमोर उभी केली. अमृतधाम, रासबिहारी, हॉटेल जत्रा आणि आडगाव परिसर भगवा झाला होता. वाहनांची शिस्त, महिलांना दिली जाणारी संधी आणि स्वयंसेवक यांची कामाची पद्धत कौतुकास्पद होती. आडगाव शहरात दुकाने बंद ठेवण्यात आली होती. आडगावमधील नेहमी गजबजलेले छोटे भाजीपाला मार्केटदेखील बंद होते.

सातपूरमध्ये उत्साह

सातपूर ः मोर्चात सातपूर पंचक्रोशीतून समाजबांधवांची गर्दी झाली होती. पहाटेपासूनच मिळेल त्या वाहनाने समाजबांधव तपोवनच्या दिशेने निघाले होते. एसटी महामंडळाच्या बस, खासगी वाहने, तसेच आयशर गाड्यांनी मराठा समाजबांधव मेळाव्यासाठी तपोवनच्या दिशेने निघाला होता. हातात भगवे झेंडे व काळ्या रंगाचा गणवेश परिधान केलेल्या समाजबांधवांनी थेट तपोवनाकडे कूच केले.

परतीचा प्रवास पायीच

मोर्चाचा समारोप झाल्यावर समाज बांधवांनी कुठल्याही वाहनाची वाट न पाहता पायीच प्रवासाला सुरुवात केली होती. यावेळी महामंडळाच्या बसेसदेखील उपलब्ध झाल्या नसल्याने गटागटाने मराठा समाज बांधव पायी घरी परतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर्चात मुस्लिम बांधवांकडून पाणीवाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

मराठा क्रांती मोर्चा गोल्फ क्लबवरून परतीच्या प्रवासाला निघाला असताना जुन्या नाशिक भागात मुस्लिम बांधवांकडून पाणीवाटप, खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. गडकरी चौक ते द्वारकापर्यंतचा रस्ता सुमारे चार तास गर्दीने फुलून राहिल्याने या प्रमुख रस्त्यावरील वाहतूक पूर्ण बंद होती. मुस्लिम बांधवांनी मोर्चाला समर्थन दर्शवून मोर्चात सहभागी होत मराठा- मुस्लिमांना आरक्षण मिळालेच पाहिजेच्या घोषणा या वेळी दिल्या.

राष्ट्रीय एकता मंचने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत मोर्चेकऱ्यांना पाणीवाटप करताना मराठा समाजाच्या एकतेसारखी देशाची राष्ट्रीय एकात्मता, अखंडताही जोपासावी, एकात्मतेच्या बळकटीसाठी एकजुट दाखवावी, असे आवाहन केले. बहुतांश मराठा समाजबांधवांनी राष्ट्रीय एकता मंचच्या कार्यास शुभेच्छा देत राष्ट्रीय एकता बळकटीसाठीही अशीच एकता दाखवू, असा प्रतिसाद दिला.

राष्ट्रीय एकता मंचच्या एकात्मता, अखंडता, एकतेचा जागर कार्यक्रमास सिराजुद्दीन हुड्डा, एकबाल पठाण, मोईज हुड्डा, सरफराज हुड्डा, मोहम्मद फरदीन शेख, शाहनवाज हुड्डा आदींचे सहकार्य मिळाले.

विक्रेत्यांना अच्छे दिन

आडगाव : मोर्चाच्या मार्गावरील बरेचसे हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. त्यामुळे मोर्चाच्या मार्गात येणाऱ्या छोट्या दुकानांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे
रस्त्यावर नारळपाणी, फळ विक्रेते, आइसक्रीम विक्रेत्यांना मोर्चातून अच्छे दिन अनुभवायला मिळाले.

सेल्फीची क्रेझही

मूक मोर्चात युवकांसह महिलादेखील हाती सेल्फी स्टिकद्वारे फोटो टिपण्याचा प्रयत्न करीत होत्या. अनेकांनी इतरांना रिक्वेस्ट करीत मोबाइलवर मोर्चातील आपला सहभाग टिपला.

मोर्चात अ‍श्वारूढ बालके

अनेक नागरिकांनी मोर्चात सहभागी होताना बालकांना झाशीची राणी, जिजाऊ, शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून आणले होते. बहुतांश बालमूर्ती अश्वावर स्वार झाल्याचे पाहायला मिळाले. मोर्चात बालकांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा केल्या होत्या. यात बालशिवरायांची वेशभूषा केलेली बालके सर्वाधिक होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पायी वेदना, पण निर्धार पक्का!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साठी ओलांडली की हातपाय उत्तर देऊ लागतात. या काळात निवांतपणा आणि आराम हवा असतो. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाचा बोलबाला ऐकून उतारवयातही शांत न बसता ज्येष्ठांचा एक ग्रुप 'साथी हात बढाना' म्हणत मोर्चात सहभागी झाला. पायांना वेदना होत होत्या मात्र, मनाचा पक्का निर्धार करीत या ज्येष्ठांनी उतारवयावर मात करीत मोर्चा पूर्ण केला. पायांच्या दुखण्यापेक्षा मोर्चात सहभागी झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.

आरक्षण व अॅट्रॉसिटीची झळ आपल्याला बसली. आपल्या मुलाबाळांनाही त्याला सामोरे जावे लागले. किमान आपल्या नातवांना तरी आपण सामोरे गेलेल्या समस्यांना तोंड द्यावे लागू नये, तसेच कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी हा ज्येष्ठांचा ग्रुप मोर्चात सहभागी झाला होता. रोज वाचनालयाच्या आवारात कधी पेपर वाचत, तर कधी उद्यानात जगाच्या रहाटगाड्यावर चर्चा करणारा हा ग्रुप फक्त मराठा मोर्चात तळमळीने न्याय मिळेल, या भावनेने सहभागी झाला होता.

या ज्येष्ठांच्या ग्रुपला नाव नसले तरी मराठा समाजबांधव म्हणून ते सर्व एकत्र आले होते. रोज गावाकडच्या गोष्टी करणारा हा ग्रुप आज फक्त मराठा मोर्चावर खल करीत होता. गावाकडून किती माणसे आली, त्यांची विचारपूस आणि मार्ग कसा आहे, यावर प्रत्येक जण मार्गदर्शन करीत होता. घोषणा नव्हत्या, पण खदखद होती. मात्र, प्रथमच अफाट संख्येने समाजबांधव एकत्र जमल्याचा अभिमानही या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर झळकत होता.

पावले थकली, उत्साह कायम
तपोवनापासून गोल्फ क्लब मैदानापर्यंत मोर्चा निघाला असता काही जणांना इच्छितस्थळी पोहोचता आले नाही. विशेषकरून ज्येष्ठ नागरिक मोर्चात सहभागी झाले; पण वयामुळे गोल्फ क्लबपर्यंत पोहोचू शकले नाहीत. अनेक ज्येष्ठांनी अर्ध्या रस्त्यापर्यंतच मोर्चासोबत प्रवास करीत ठाण मांडले. मात्र, पावले थकली असली तरी मोर्चाबाबत ज्येष्ठांमध्ये उत्साह कायम होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गावर ‘भगवाच’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

'एक मराठा लाख मराठा'चा एल्गार करीत मालेगाव शहर व तालुक्यातून लाखो मराठा समाज बांधव नाशिककडे शनिवारी पहाटेच रवाना झाले. लहान मोठी अशी हजारो वाहने महामार्गावर पहाटे पाच वाजेपासूनच धावताना दिसत होती. अवघ्या तासाभरात संपूर्ण महामार्ग भगवामय झाल्याचे चित्र मालेगाव, उमराणा, सौंदाणापासून नाशिककडे दिसत होते. वाहनांची रांग जसजशी नाशिककडे पुढे सरकत होती तसतसे 'जय भवानी, जय शिवाजी,' 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी महामार्ग दणाणला होता.

तालुक्यातील सौंदणेपासूनच स्वयंसेवकानी पाणी नाश्ता यांचे पॅकेज वाटप करण्याची सोय केली होती. नाशिकच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या प्रत्येक गावानंतर वाढत होती. यात ट्रक, टेम्पो, कार ते अगदी दुचाकी वाहनांचा ताफाच फक्त दूरदूरपर्यंत नजरेस पडत होता.

चांदवड, पिंपळगाव टोल फ्री

चांदवड, पिंपळगाव, ओझर गावांच्या सुरुवातीस स्वागत कमानी भगवे ध्वज यामुळे मोर्चेकरींचा उत्साह वाढत होता. एरवी सक्तीने टोल वसूल करण्यासाठी चर्चेत असलेला पिंपळगाव चांदवड येथे वाहने टोल फ्री सोडण्यात येत होती. मालेगाव नाशिक दरम्यान हजारो वाहने रस्त्यावरून जात असली तरी कुठेही शिस्तभंग वा वाहतूक खोळंबा झाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​मराठ्यांचा प्रवाहो चालला

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोपर्डी घटनेचा निषेध, मराठा आरक्षण तसेच अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यासह इतर विविध मागण्यांसाठी औरंगाबादपासून सुरू झालेला मराठा क्रांती मोर्चाचा झंझावात नाशिकमध्येही शनिवारी दिसून आला. लढाऊ बाणा जपणाऱ्या मराठा समाज बांधवांनी विराट संख्येने रस्त्यावर उतरून मूक मार्गाने तीव्र संताप व्यक्त केला. मागण्या मान्य केल्या नाहीत तर एल्गार करण्याचा गर्भीत इशाराही त्यांनी दिला. स्वंयशिस्तीचा आदर्श ठरलेल्या या विराट मेळ्यात महिला आणि युवतींची लाखोंच्या संख्येने उपस्थिती होती हे विशेष. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या कुंभमेळ्याचेही रेकॉर्ड मोडीत काढत 'न भुतो न भविष्यती' अशा पद्धतीचा तपोवनातून निघालेला मोर्चा अतिशय संयतपणे, शिस्तबद्धपणे कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडला. मोर्चा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असल्याची भावना मराठा बांधवांबरोबरच समस्त नाशिककरांनी व्यक्त केली.

हाती भगवे झेंडे व दंडावर काळ्या पट्ट्या बांधलेल्या सुमारे २५ लाखांच्या समुदायाने आपल्या विविध मागण्यांवर तत्काळ निर्णय घेण्याचे आवाहन सरकारला केले. तपोवनातून सकाळी पावणे अकराच्या सुमारास निघालेल्या मोर्चाचे गोल्फ क्लबवर विराट सभेत रुपांतर होऊन ९ मुलींचे वैशिष्ट्यपूर्ण भाषण आणि पाठोपाठ सामूहिक राष्ट्रगीत गायनाने दुपारी तीनच्या सुमारास मोर्चाची सांगता झाली. महिला व युवतींना अग्रभागी ठेऊन संपूर्ण राज्यालाच नव्हे; तर देशाला पुरोगामित्वाचा संदेश देतानाच, महिला सुरक्षाच सर्वोच्चस्थानी असल्याचे दर्शविण्यात आले.

आतापर्यंत कुंभमेळ्याच्या पर्वणी अनुभवणाऱ्या नाशिककरांनी शनिवारी मराठा विशाल जनसागराचा थरार अनुभवला. तपोवनापासून निघालेल्या या मोर्चात लाखोंच्या संख्येने जिल्हाभरातून जमा झालेल्या मराठा समाजाने प्रचंड एकी दाखवत खदखदत्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली. सुमारे २५ लाख मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाने नाशिकमधील कुंभमेळ्यातील पर्वण्यांसह आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. मोर्चाचे पहिले टोक गोल्फ क्लब मैदानावर, तर दुसरे टोक तपोवनात होते. सोबतच उपनद्यांप्रमाणे गर्दीचे विविध रस्ते मुख्य मोर्चाला येऊन मिळत असल्याने शहरात जनसागर लोटल्याचे चित्र निर्माण झाले होते.

मोर्चाला सातारा व कोल्हापूर गादीचे वारस उदयनराजे भोसले व संभाजी राजे भोसले आवर्जून उपस्थित होते. मोर्चेकऱ्यांनी वापरलेली `मी मराठा` असे लिहिलेली गांधी टोपी लक्ष वेधून घेत होती. मोर्चात प्रथमस्थानी महिला व विद्यार्थिनी तर शेवटच्या स्थानावर राजकीय नेते होते. जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह मंत्री व सर्वपक्षीय नेत्यांनी या मोर्चात सहभाग नोंदवत समाजासाठी एकी दाखवली. मोर्चात वयोवृद्धांसह, अपंग व अंधांचाही सहभाग होता. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, नेता-कार्यकर्ता वकील, डॉक्टर, शिक्षक, नेते, कार्यकर्ते, व्यापारी अशा प्रत्येक घटकाने मोर्चात सहभाग नोंदवला. मविप्र संस्थेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वंयसेवकांची जबाबदारी उत्तमपणे पार पाडली. मोर्चा संपताच परतीच्या वाटेवर असलेल्या मराठ्यांनी स्वयंशिस्त दाखवत, कचरा, प्लॅस्टिक पिशव्या उचलून घेतल्या. त्यामुळे केवळ सहा तासांतच नाशिक पूर्ववत झाले होते.

मोर्चात प्रत्येक घटकाने आपआपली जबाबदारी पार पाडल्याने व नाशिककारांनी त्यांना तसाच प्रतिसाद दिल्याने निर्विघ्नपणे मोर्चा पार पडला. मोर्चेकरांच्या स्वंयशिस्तीमुळे प्रशासकीय यंत्रणा व पोलिसांवरील ताण कमी झाला होता. विशेषतः मोर्चातील महिला व मुलींची सुरक्षा पुरूषांनीच स्वंयप्रेरणेने केली. गोल्फ क्बलवर मोर्चा आल्यानंतर त्याला विशाल जनसमुदायाचे रुप आले. गोल्फ क्लबवर मोर्चा आल्यानंतर सहा मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिले. गोल्फ क्लब मैदानात मुलींनी समाजाच्या व्यथा जनसमुदायासमोर मांडल्या. कोणत्याही नेतृत्वाविना पार पडलेल्या मोर्चाचीच चर्चा दिवसभर संबंध जिल्हाभरात सुरू होती.

पाऊस, नेत्यांचा संयम!

मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. परंतु, पावसाने सकाळी विश्रांती घेतल्याने मोर्चात लाखोंचा जनसागर उपस्थित झाला. पावसाने साथ दिल्याने शासकीय व पोलीस यंत्रणेवरील ताणही कमी झाला. तर राजकीय नेत्यांनी संयम दाखवत, आपली जागा ओळखून मोर्चात शेवटच्या स्थानी राहणे पसंत केले.

स्नेहा, आकांक्षाने रडविले!

आकांक्षा पवार व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलगी असलेल्या स्नेहा चौधरीने मांडलेल्या व्यथा ऐकून गोल्फ क्लब मैदानावर जमलेल्या समुदायाच्या डोळ्यात अश्रू तरळले. आकांक्षाने शेतकरी आत्महत्येवर बाबा जहर खाऊ नका, ही कविता सादर केली. तर स्नेहाने शेतकऱ्याच्या व्यथा मांडत शिवाजी महाजारांनी शेतकऱ्यांना मातीतून वर काढले, पण आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांना मातीत घातले जात असल्याच्या भावना व्यक्त केल्या. अख्खा महाराष्ट्र पेटून उठलाय, मराठ्यांच्या एकीवर, जिजाऊंच्या लेकीवर या ओळींनी तिने मैदान जिंकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांनी अनुभवली समर्थांची टाकळी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समर्थ रामदासांचे कार्य घराघरापर्यंत पोहोचले असले, तरी टाकळीतील त्यांचे वास्तव्य अन् येथील मठरुप वारसा नव्याने उभा करेपर्यंतचा संघर्षमय प्रवास अजूनही अज्ञात आहे. समर्थांचा मठ अजूनही प्रेरणा देतो अन् जगण्याचा वेगळ अर्थ देतो, हे उमजलेल्या काही समर्थभक्तांनी हा मठ अथक प्रयत्नांतून नावारुपाला आणला... न्यायालयीन लढाई... अडचणींचा डोंगर... अजूनही संपलेली नाही. तरीही टाकळीतील मठ समर्थांचे कार्य जोपाने पुढे घेऊन जात आहे. नव्या पिढींने हा वारसा पुढे न्यावा अशी हाक देत आहे, त्याचा काहीसा वेगळा अनुभव देणारा 'मटा' हेरिटेज वॉक ठरल्याची प्रतिक्रिया नाशिककरांनी व्यक्त केली.

टाकळीतील समर्थांचा मठ, समर्थांची पादत्राणे, कुबडी, त्यांचे शब्दसाहित्य, मठातील गोयम हनुमान व रामासह इतर दुर्मिळ मूर्ती, समर्थांची ध्यानगुहा, समर्थकालीन वड, तसेच त्यांचा आकर्षक पुतळा अन् समर्थ मठाचा परिसर अनभुवण्याची संधी 'मटा हेरिटेज वॉक'मधून नाशिककरांना मिळाली. यावेळी मठाचे विश्वस्त सुधीर शिरवाडकर व ज्योत‌िराव खैरनार यांनी मठाचा इतिहास व मठाला नवे रुप देण्यासाठी समर्थभक्तांकडून ४३ वर्ष लढलेल्या लढ्याची माहिती दिली. मठाला जगभर पोहोचविण्यासाठी अन् नवीन इमारतीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नाची माहिती यावेळी त्यांनी दिली. समर्थ अभ्यासक मकरंद जोशी यांनी समर्थांचे निरनिराळे पैलू व समाधींची माहिती दिली. समर्थांचे कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नाशिककरांनी पुढे येण्याची गरज शिरवाडकर व खैरनार यांनी व्यक्त केली, तसेच मठाधिपतींच्या समाधी व नंदिनी-गोदावरीचा संगमावर जाऊन समर्थांचे अनेक पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न नाशिककरांनी केला. यावेळी नंदिनी नदीला पुनरूज्जीवन देण्यासाठी 'मटा'तर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांचे हेरिटेज वॉकमध्ये सहभागी झालेल्या नाशिककरांनी कौतुक केले.



समर्थ अभ्यास केंद्राची गरज

टाकळीतील समर्थ रामदास स्वामींचा मठ दुर्लक्षित असल्याने या मठाला नव्याने झळाली देण्यासाठी मठात विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे. समर्थांचे साहित्य आजच्या घडीला येथे उपलब्ध नाही. हे सा‌हित्य उपलब्ध करून येथे अभ्यास केंद्र उभे करण्याचा मठाचा मानस आहे. मात्र, यासाठी नाशिककरांनी साथ देण्याची गरज आहे. येथे समर्थ अभ्यास केंद्र सुरू झाल्यास तरुणाईची पावले मठाकडे वळतील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त झाली.

समर्थांचे कार्य अन् मठरुपी वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी जाण‌िवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अनेक बाबतींत न्यायालयीन लढे अजूनही सुरू आहेत. या अडचणी दूर झाल्यास मठाचे कार्य वेगाने पुढे घेऊन जाता येईल.

- सुधीर शिरवाडकर, विश्वस्त

समर्थभक्त व पर्यटकांनी हा मठ परिसर नेहमी गजबजलेला असतो. समर्थांचे साहित्य, कार्य व मठाचे विविध उपक्रम हेरिटेज वॉकसारख्या उपक्रमांमुळे सर्वांपर्यंत पोहोचत आहेत. मठाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे.

- ज्योत‌िराव खैरनार, विश्वस्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मटा’च्या हेरिटेज वॉकने दिला वारसा जतनाचा संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टाकळीतील समर्थांच्या मठाच्या मठाधिपतींच्या समधींचे चिरे उद्धवस्थ अवस्थेत पाहून 'मटा' हेरिटेज वॉकमध्ये सहभागी झालेल्या नाशिककर गहिवरलेले. विखुरलेले दगडी चिरे सर्वांनी उत्स्फूर्तपणे एकत्र‌ित करीत ते पुन्हा समाधी स्थळी ठेवले. नाशिकच्या या समाधीरूपी वारशांचे संवर्धन व जीर्णोध्दार व्हायला हवा, अशी मागणी यावेळी व्यक्त करण्यात आली. 'मटा' हेरिटेज वॉक ही चळवळ रुपाने नाशिकच्या वारशांच्या संवर्धनासाठी जनजागृती करू लागल्याचा प्रत्यय यावेळी नाशिककरांनी अनुभवला.

'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी 'मटा' हेरिटेज वॉकचे आयोजन केले जाते. या माध्यमातून नाशिकच्या वारसा नाशिककरांना नुसते दाखविण्याचाच नाही तर हा वारसा जपला पाहिजे, याची जाणीव जागृतीही या उपक्रमातून निर्माण होत असल्याचा प्रत्यय रविवार समर्थांच्या टाकळीतील हेरिटेज वॉक दरम्यान आला. टाकळीतील समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या पहिल्या मठाचे आतापर्यंत नऊ मठाधिपती लाभले आहेत. यापैकी सात मठाधिपतींच्या समाधी गोदावरी काठी टाकळी मठापासून अर्धाकिलोमीटरवर आहेत. या सर्व समाधी दुर्लक्षित अवस्थेत असल्याने त्यांची मोडतोड झालेली आहे. या समाधींचे संवर्धन व्हावे, यासाठी मठातर्फे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष अन् उदासीनतेमुळे या समाधी समर्थभक्तांपासून अजूनही लांबच आहेत. या समाधींपर्यंत जाणेही कठीण असल्याने हेरिटेज वॉकदरम्यान त्या समाधीपर्यंत जाऊन त्या अनुभवण्याची संधी नाशिककरांना मिळाली. यावेळी समाधींच्या अवस्थेमुळे सहभागी झालेले नाशिककर गहिवरले. आपला हा वारसा इतका दुर्लक्षित कसा राहू शकतो, असा प्रश्नही यावेळी उपस्थित झाला. यावेळी नाश‌िकरांनी समाधींची विखुरलेले दगडी चिरे मेहनतीने जमा केले अन् समाधीस्थळी पुन्हा ठेवले. या समाधींचे संवर्धन तातडीने व्हावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर्चात तरुणाईचा आक्रोश

$
0
0

मराठा क्रांती मूक मोर्चात तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग; सोशल मीडियाद्वारेही निषेध


कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

शहरात शनिवारी झालेल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये तरुणाईची संख्या लक्षणीय होती. अन्यायाचा तेढ दूर करत समाजात समता दृढ करण्यासाठी मोठ्या संख्येने तरुणाईने मोर्चात सहभाग नोंदवला होता. मोर्चात नाशिकसोबतच बाहेरील गावांतून मोठ्या संख्येने तरुणवर्ग मोर्च्यासाठी नाशिक नगरीत दाखल झालेला दिसून आला. मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्यापासून नाशिकच्या तरुणाईची जय्यत तयारी सुरू होती. शनिवारी झालेल्या मराठा क्रांती मोर्चामध्ये सर्वाधिक संख्या तरुणींची असल्याचेही दिसून आले.

सकाळपासूनच तपोवनात मराठा बांधवांनी मोर्चासाठी गर्दी केली होती. यामध्ये तरुणींनी फेटे बांधून, तसेच पारंपरिक पेहरावात उत्साहाने सहभाग घेतला. सोबतच शाळकरी मुलीही तितक्याच उत्साहात मोर्चात निषेध व्यक्त करण्यासाठी जमल्या होत्या. अनेक तरुणींनी आपल्या हातावर 'मराठा' टॅटूही तयार केले होते.

मोर्चामध्ये सहभागी तरुणींमध्ये हक्काची आस तरुणींच्या मनगटात दिसत होती. तर न्याय मिळावा, असा आक्रोश त्यांच्या नजरेतून जाणवत होता. क्रांती मोर्चाचे आकर्षण ठरले ते म्हणजे तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग. मराठा समाजाचे तरुण हातात भगवे झेंडे घेऊन सकाळीच मोर्चाच्या ताफ्यात सहभागी झाले होते. मोर्चामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने तरुणांनी प्रथम तरुणींना आणि महिलांना वाट करून दिली. हातात भगवे झेंडे, छातीवर मराठा लिहिले स्टिकर अन् शिवरायांची प्रतिमा अशा जोशात तरुण मराठा मोर्चात एकवटले होते.

विशेष म्हणजे, 'जातीचा नसलो तरी विषय आपल्या भावांच्या हक्काचा आहे, दूर असलो तरी तुमच्या सोबत आहे. मराठा नसलो तरी मराठी नक्कीच आहे', असे म्हणत अनेक तरुण सहभागी झाले होते. तरुणाईमध्ये असलेला समतेचा भाव आणि जातीपलिकडे असलेली एकात्मतेची भावना मोर्चात आणि नंतर सोशल मीडियावर या माध्यमातून व्यक्त झाली.


विद्यार्थिनींचे आंदोलन

सातपूर : नाशिक जिल्ह्यातील मराठा बांधवांचा शनिवारी लाखोंचा मराठा क्रांती मूक मोर्चा निघाला. यामध्ये कोपर्डी प्रकरणातील अमानूष घटनेचा निषेध म्हणून मोर्चात महिला व तरूणींची संख्या लक्षणीय होती. यामधील सहभागी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम कॉलेजातील विद्यार्थिनींनी शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलन केले.


कोपर्डीच्या आरोपींना कठोर शासन होणे गरजेचे आहे. शेतकरी आत्महत्या हा प्रश्न सरकारने निकाली काढायला हवा. तसेच समाजाचा उद्रेकही सरकारने लक्षात घ्यायला हवा.

- पूजा गवळे, विद्यार्थिनी

मोर्चात आम्ही तरुणींवर कायम होणारे अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सहभागी झालो होतो. जिजाऊंचा बाणा अजूनही आमच्यात आहे. सरकारने लवकर आता यावर निर्णय घ्यावा. अन्यथा तरुणींचा आक्रोश आणखी तीव्र होईल.

- श्रद्धा शिंदे, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झुणका भाकर केंद्राची कचराकुंडी

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शिवसेना-भाजप युती सरकारच्या मागच्या टर्मच्या काळात सुरू झालेल्या 'एक रुपयात झुणका भाकर' या महत्त्वाकांक्षी योजनेचे प्रतीक असलेल्या उपनगर येथील टपरीवजा केंद्राला गंज चढला आहे. सध्या त्यामध्ये कचरा टाकला जात आहे. या केंद्राची योग्य विल्हेवाट लावावी, कचरा टाकणे बंद करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

केंद्रासह राज्यात सध्या भाजप-शिवसेना युतीचे सरकार आहे. हे सरकार गरिबांचे जगणे सुसह्य करण्यासाठी विविध योजना लागू करीत आहे. या आधी शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात एक रुपयात झुणका भाकर ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली होती. त्यासाठी विशेष अनुदानदेखील देण्यात आले होते. अनेक ठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांनाच केंद्र चालविण्यास देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले होते. या योजनेनुसार बस स्टँड व अन्य सरकारी जागांमध्ये झुणका भाकर केंद्रे सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला या योजनेचा लाभ अऩेक गरिबांनी घेतला. कालांतराने या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी खासगी तत्त्वावर केंद्रे चालविण्यात देण्यात येऊ लागली. झुणका भाकरीबरोबरच अन्य पदार्थही उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, कालांतराने ही योजना बंद पडली.

यामुळे योजना पडली बंद

ही योजना गरिबांसाठी चांगली होती. मात्र, नंतर तिचा दर्जा घसरला. भ्रष्टाचाराला पाय फुटले. रोज रोज झुणका भाकर खाऊन लोकांनाही कंटाळा येऊ लागला. एक रुपयात झुणका भाकर देणे, ती तयार करणाऱ्यांचा पगार, जागेचे भाडे देणे असे सर्वच अवघड होऊ लागले. त्यामुळे ही चांगली योजना अखेर बंद पडली.

स्मृती होतात जाग्या

येथील झुणका भाकर केंद्राच्या समोरून जाताना शिवसेना कार्यकर्त्यांबरोबरच नागरिकांच्या स्मृती जाग्या होतात. एक रुपयात झुणका भाकर ही दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची महत्त्वाकांक्षी योजना होती. त्या काळात युतीत सुसंवाद होता. युतीचे ते पहिले सरकार होते.शिवसेनेचा बोलबाला होता. आता युतीत दरी वाढली आहे. महागाई व आंदोलनेही वाढली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपल्या आतमधले मूल जागे करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रत्येक बालक सर्जनशीलच जन्माला येते. त्याला प्रत्येक बाबतीत कुतूहल असते. ते कुतूहल ज्यामध्ये आजन्म टिकून राहते, तो यशस्वी होतो. भलेही तो व्यावहारिक दृष्टीने कितीही मागास राहिला असेल, परंतु समाधानाच्या पातळीवर तो आनंदी असतो, म्हणून आपल्या आतमध्ये असलेले मूल जागे करा, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आयोजित तीन दिवसीय प्रतिभासंगम साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून जोशी बोलत होत्या. रावसाहेब थोरात सभागृहात हे संमेलन तीन दिवस सुरू होते. जोशी म्हणाल्या, की मला कलेच्या कामात विशेष रस आहे म्हणून मला ती जवळची वाटते. एखाद्याला आकडेमोड जवळची वाटत असेल, तर कुणाला साहित्य लिहिण्यात रस वाटत असेल. ज्याने-त्याने आपले क्षेत्र निवडून ठरवावे. आपल्यासाठी नाही तर आपल्या लोकांसाठी जगायचे शिकले की जगणे सोपे होऊन जाते. कोणताही गोष्ट स्वीकारली पाहिजे. आपल्याला काही येत नाही यामध्ये संकोच बाळगण्याची गरज नाही. ते स्वीकारता यायला हवे.

आपण समाजात इतके गुरफटून गेलेलो असतो, की अनेक चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत येतच नाहीत. असे का होते, या विचाराच्या अंतापर्यंत जाण्याची गरज आहे. आपल्यावर बाहेरून खूप लादले जाते. ते सर्व झुगारून देण्याची गरजही जोशी यांनी व्यक्त केली. या वेळी ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक, डॉ. गिरीश पवार, राम सातपुते, अमोल अहिरे, प्रमोद कराड उपस्थित होते.

प्रकाश पाठक म्हणाले, की कलेचा प्रांत हा उंची मिळविण्यासाठी प्रदीर्घ असतो. फक्त त्या सोपानावरून आपण चालत गेले पाहिजे. आपणच आपल्याला प्रश्न विचारत गेलो तर त्यातून अनेक गोष्टी सुचत जातात. कलेच्या प्रांतात क्लिकिंग पॉइंट असतो. तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. प्रतिभेच्या वाट्याला प्रसिद्धी आपोआपच चालत येते. मात्र, त्यात एक दुर्गुण असा आहे, की अहंकारही पाठोपाठ चालत येतो. तो ज्याने दाबला तो जिंकला. त्याची बाधा होऊ न देणे हे श्रेयस आहे.

त्यानंतर ते म्हणाले, की व्यथेच्या अनुभवातून परमेश्वराचे दर्शन होऊ शकते. प्रतिभा ही जोडण्यासाठी असते तोडण्यासाठी नाही. या वेळी परिषदेचे महामंत्री राम सातपुते यांचेही भाषण झाले. प्रारंभी वैयक्तिक गीत सुधीर मुतालिक यांनी सादर केले. प्रा. प्रशांत टोपे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लावणी हे प्रबोधनाचे हत्यार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लावणी ही केवळ शृंगारिक नव्हे, तर लावणीला आध्यात्मिक रूपदेखील आहे. छक्कड असेल अगर रसप्रधान लावणी. तिला बीभत्स रूप कधीच नव्हते. तो काळाचा महिमा आहे. शिवरायांच्या काळात तर लावणी हे प्रबोधनाचे हत्यार होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध कलावंत नंदेश उमप यांनी केले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आयोजित प्रतिभासंगम साहित्य संमेलनात शेवटच्या सत्रात 'साहित्यिकांचा आविष्कार' या विषयावर उमप बोलत होते. ते म्हणाले, की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लावणीने मोठी कमाल केली. 'माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतेय काहिली' यांसारखी शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली व शाहीर अमर शेख यांनी गायलेली लावणी आजही आठवली, की अंगावर शहारे येतात.

उमप म्हणाले, की शृंगारिक, प्रासादिक, आध्यात्मिक लावण्या म्हणजे काय हे विद्यार्थीवर्गाने समजून घेतले पाहिजे. भाऊ फक्कड व पठ्ठे बापूराव यांचा सवालजवाब जवळजवळ नऊ तास रंगायचा. त्यांनी कोणत्या शाळेत जाऊन अभ्यास केला होता? संयुक्त महाराष्ट्रात शाहिरांचे कसब पणाला लागले होते. जशी परिस्थिती बदलते तसे साहित्य बदलते. मांडणी, ढंग, हावभाव, चालीरीती बदलत गेल्या. त्यामुळे साहित्यही बदलले. काळ बदलला, चळवळी सुरू झाल्या. तेथेही साहित्याने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली. भाषा बदलत गेली आणि लावणीही बदलली. लोकसंगीत आले. बेंबीच्या देठापासून गायले जाते ते लोकसंगीत असते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये, असेही ते म्हणाले.

या वेळी उमप यांनी लावणी, गण, गणातला लिहिण्याचा प्रकार याविषयी वर्णन केले. विद्यार्थी साहित्यिकांच्या विनंतीवरून त्यांनी अफझल खानाचा पोवाडा गाऊन दाखवला. व्याख्यानादरम्यान उमप यांनी पहाडी आवाजात लावणी, पोवाडा, तसेच इतर लोकगीते गाऊन विद्यार्थ्यांची मने जिंकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वार्षिक सरासरीपेक्षा शहरात अधिक पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या वर्षी आणि यंदाही जुलैपर्यंत चातकाप्रमाणे प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाने नाशिककरांना अवघ्या साडेतीन महिन्यांतच तृप्त केले आहे. शहरात आणि जिल्ह्यात पावसाने धुव्वाधार फटकेबाजी केली असून, शहरात आतापर्यंत एक हजार मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६७६ मिलिमीटर असताना यंदा रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. शहरात आणि नाशिक तालुक्यात आतापर्यंत १४८ टक्के पाऊस झाला आहे.

गेली तीन वर्षे सातत्याने गारपीट आणि अवकाळी पावसाचा सामना करणाऱ्या पावसाने यंदा नाशिककरांना दुष्काळाचीही अनुभूती दिली. ग्रामीण भागात तर दुष्काळाची दाहकता प्रकर्षाने जाणवली. अगदी जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागाची तहान टँकरद्वारे भागविली जात होती. मुख्यत्वे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाने तळ गाठल्यामुळे शहरवासीयांवरही पाणीकपातीचे संकट ओढवले. साधारत: जून महिन्यात अशी परिस्थिती असताना जुलै आणि ऑगस्ट म‌हिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने सर्वच बॅकलॉग भरून काढला. या काळात गोदावरीसह तिच्या उपनद्या, दारणा तसेच अन्य नद्यांना पूर आला. दहा जुलै रोजी शहरात पावसाने कहर केला. अवघ्या नऊ तासांत १३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. २ जुलै २००७ रोजी शहरात १३० मिमी पावसाने रेकॉर्ड केले. हे रेकॉर्ड यंदाच्या पावसाने ब्रेक केले. आताही पावसाने शहरात एक हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. १ जून ते २५ सप्टेंबर अशा सुमारे चार महिन्यांत नाशिक शहरात १०२५.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच शहरात एवढा विक्रमी पाऊस झाला आहे.

९६.२४ टक्के पाऊस

जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १५ हजार ५१० मिलिमीटर पाऊस झाला असून, १५ तालुक्यांमध्ये सरासरी १०३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ३३२६ मिमी पाऊस इगतपुरीत, तर पेठमध्ये २२६८ मिमी पाऊस झाला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये १७२४ मिमी पाऊस झाला असून, सुरगाण्यात १४८५ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मालेगावात सर्वांत कमी ३७३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६ हजार ११७ मिलिमीटर एवढे असून, आतापर्यंत ९६.२४ टक्के पाऊस झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालपणापासूनच निसर्ग संगीताचीच ओढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'बालपणापासूनच निसर्गातील प्रत्येक गोष्टीने मला आकर्षित केलंय. घरी जरी संगीतमय वातावरण असले तरी मला मात्र निसर्गाच्या संगीताचीच ओढ होती. निसर्गाला एक िऱ्हदम आहे. त्या िऱ्हदमने मला कायम साद घातली. निसर्ग रंगमय तर आहेच, पण संगीतमयही आहे...' या भावना आहेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वन्यजीव व वनस्पतिशास्त्र अभ्यासक, छायाचित्रकार बिभास अमोणकर यांच्या.

नाशिककरांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही 'गाथा जंगलाची' हा मुलाखत व स्लाइड शोचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. वैशाली बालाजीवाले यांनी अमोणकर यांची प्रकट मुलाखत घेतली. जंगल, निसर्ग याविषयीचे विविध पैलू, अनुभव त्यांनी या वेळी उलगडून सांगितले. फोटोग्राफीच्या प्रेमाविषयी त्यांनी सांगितले, की दोन- तीन दिवस जेवायला मिळाले नाही तरी चालेल, पण कॅमेऱ्याशिवाय राहणे शक्य नाही. कॉलेजच्या पहिल्या वर्षीच कॅमेरा मिळाला. त्यानंतर कॅमेऱ्याविषयी आवड निर्माण झाली. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही सोबत आहोत. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच कॅमेरादेखील माझा एक अवयवच झाला. निसर्गाची फोटोग्राफी करणे हे इतर कोणत्याही फोटोग्राफीपेक्षा माझ्यासाठी जास्त जवळचं आहे. निसर्ग आपल्याला जो अनुभव देत असतो, त्यासमोर दुःख काहीच नसतं. निसर्गाची प्रगल्भता सांगताना ते म्हणाले, की रणथंबोर जंगलात समोर वाघ दिसत असताना केवळ त्याचे दोनच फोटो काढले. बाकी चाळीस मिनिटे केवळ त्याच्याकडे पाहत होतो. वाघाला बघण्याचा जो अनुभव होता, तो कोणतीही लेन्स देऊ शकणार नव्हता.

पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली, प्रसिद्ध छायाचित्रकार गोपाळ बोधे, मारुती चितमपल्ली यांच्यासारख्या दिग्गजांसोबतच्या आठवणीही त्यांनी या वेळी सांगितल्या. डॉ. सलीम अली डोक्यापासून पायापर्यंत निसर्ग आहे. निसर्गाकडे बघण्याची मिळालेली दृष्टी, संयम अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यास मिळाल्याचे त्यांनी सांगितले. व्हॅली ऑफ फ्लॉवर, फोटोग्राफीतील आव्हाने, अडचणी आदींविषयी त्यांनी संवाद साधला. तरुणांना फोटोग्राफीच्या टिप्सही दिल्या.

व्याघ्र अभ्यासक व राज्य शासन पुरस्कारप्राप्त लेखक, छायाचित्रकार अतुल धामणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. नाशिकचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, गानसरस्वती किशोरी अमोणकर आदी या वेळी उपस्थित होते. भास भामरे, सुमुख देशपांडे व सारंग पाठक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘प्रतिभासंगम’वर जळगावच्या ‘एमजे’ची मोहर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रतिभासंगम विद्यार्थी साहित्य संमेलनात सर्वोत्कृष्ट संघाचे सांघिक पारितोषिक जळगावच्या मूळजी जेठा (एमजे) कॉलेजने पटकावले, तर नाशिकला उत्कृष्ट ग्रंथदिंडी वेशभूषा या बक्षिसावर समाधान मानावे लागले. नाशिकरोडच्या बिंदू रामराव देशमुख महिला कॉलेज व भोसला कॉलेजने हे पारितोषिक पटकावले.

स्पर्धेचा निकाल असा

ललितलेखन ः

प्रथम- 'बनगरवाडीतल्या आजोळी'- स्वप्नील सुनील चव्हाण (मूळजी जेठा कॉलेज, जळगाव), द्वितीय- 'लमाणी'- विजयकुमार बिळूर (गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी), तृतीय- 'चहाची केमिस्ट्री'- प्रीतम दादाजी तोरवणे (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव).

लघुपटनिर्मिती ः

प्रथम- 'शिक्षण'- अजिंक्य औताडे, द्वितीय- 'नारायण'- दिलीप जाधव (सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे), तृतीय- 'शुभारंभ—नव्या पर्वाचा'- सचिन झाल्टे, कल्पेश पाटील, उत्तेजनार्थ- 'बालव्यसन'- जयेश गवळी.

पथनाट्य सादरीकरण ः

प्रथम- मूळजी जेठा कॉलेज, जळगाव, द्वितीय- दौलतराव आहेर कॉलेज (कराड, सातारा), तृतीय (विभागून)- डी. ए. व्ही. वेलणकर कॉलेज (सोलापूर) व इंद्रायणी कॉलेज (तळेगाव दाभाडे, पुणे),

अभिवाचन ः

प्रथम- तृप्ती राजेंद्र पाटील (नटावदकर कॉलेज, नंदुरबार), द्वितीय- अनिल गरदास (हिराचंद नेमचंद कॉलेज, सोलापूर).

वैचारिक लेख ः

प्रथम- घनश्याम देवरे (फर्ग्युसन कॉलेज, पुणे), द्वितीय- चिन्मयी मराठे (नटावदकर कॉलेज, नंदुरबार), तृतीय- वर्षा उपाध्ये (मूळजी जेठा कॉलेज, जळगाव).

कथालेखन ः

प्रथम- 'शिकार'- रोहित पाटील, (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड), द्वितीय- 'पोकळी' पंकज पाटील (मूळजी जेठा कॉलेज, जळगाव).

हिंदी कविता ः

उत्तेजनार्थ- 'नकाब' अपर्णा पटणे (समाजकार्य कॉलेज, भारती विद्यापीठ, सोलापूर).

मराठी कविता ः

प्रथम- 'काळ आणि दुष्काळ', उन्मेष पाटील (दौलतराव आहेर कॉलेज, कराड, सातारा), द्वितीय- 'सभेचा वृत्तान्त'- पंकज पाटील (मूळजी जेठा कॉलेज, जळगाव), तृतीय- 'शांततेचं काळंभोर मांजर'- स्वप्नील चव्हाण (मूळजी जेठा कॉलेज, जळगाव), 'विज्ञानगीत', पल्लवी कांबळे (नाशिक). उत्तेजनार्थ- १. 'तुक्याचा अंत' बाजीराव शंकर काळे (स. का. पाटील कॉलेज, मालवण, सिंधुदुर्ग), 'मला वाटते'- कांचन जाधव, (गोखले इंजिनीअरिंग कॉलेज, नाशिक).

कॉलेजीन नियतकालिक :

प्रथम- 'सहकार' (गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी), द्वितीय- 'सहकार' (अभ्यंकर-कुलकर्णी कॉलेज, रत्नागिरी), तृतीय- 'श्री परशुराम' (डी. बी. जे. कॉलेज, चिपळूण).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता ओबीसींच्या मोर्चाची तयारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

राष्ट्रवादी काँग्रेस व ओबीसी समाजाचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी गेल्या चार-पाच महिन्यांपासून तुरुंगात आहेत. सध्या त्यांची प्रकृती बिघडल्याने ते जे. जे. रुग्णालयात आहेत. त्यांना जामीन मिळत नसल्याने सरकार त्यांच्यावर सूडबुद्ध‌िने कारवाई करत असल्याचा आरोप करत भुजबळांच्या समर्थनार्थ येत्या ३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचा मार्ग तपोवन येथील जनार्दन स्वामी आश्रमापासून औरंगाबाद रोडने नवीन आडगाव नाका, संतोष हॉटेल, काट्या मारुती चौक, निमाणी, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, एम. जी. रोड, जिल्हाधिकारी कार्यालय असा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात येईल, अशी माहिती संयोजकांनी दिली.

या मोर्चाची पूर्वतयारी बैठक रविवारी दुपारी २ वाजता जय शंकर फेस्टिवल लॉन्सवर घेण्यात आली. या बैठकीला माजी मंत्री तुकाराम दिघोळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, बागलाणचे जिल्हापरिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, आरपीआयचे नेते किशोर घाटे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे हाजी बालम पटेल, बारा बलुतेदार संघटनेचे अरुण नेवासकर, मातंग समाजाचे भरत जाधव, सुतार समाजाचे अरुण गाडेकर आदींनी सूचना मांडल्या.

माजी मंत्री दिघोळे म्हणाले की, ओबीसी समाज महाराष्ट्रात मोठ्या संख्‍्येने आहे. यामध्ये विविध प्रकारच्या जाती आहेत. त्यामुळे सर्व घटकांपर्यंत या मोर्चाचा प्रचार करून त्यांना समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे. बाळासाहेब कर्डक म्हणाले की, भुजबळ यांनी ठराविक जातींसाठी काम केले नाही तर त्यांनी सर्व थरांतील लोकांसाठी काम केले आहे. नाशिकच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

या बैठकीला मोठ्या संख्येने बहुजन समाजाचे कार्यकर्ते व भुजबळ समर्थक उपस्थित होते. बैठकीत मोर्चाची तयारी व नियोजनासंदर्भात सूचना करण्यात आल्या. शिवाय अनेकांनी विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या घेतल्या. संयोजकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी रोख रकमेची मदत केली. काहींनी स्ट‌िकर, बॅनर, पाण्याचे पाऊच, गाड्यांची व्यवस्था अशा जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. आज यासाठी विविध भागात जनजागृतीसाठी बैठका, मोटर सायकल रॅली काढली जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. यावेळी मधुकर जेजुरकर, नगरसेवक समाधान जाधव, विजय राऊत, संतोष कमोद, बाजीराव तिडके, अशोक जाधव, सुनील सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेविकेच्या मुलाला डेंग्यू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निष्ठूर यंत्रणेचा अनुभव महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरेसविका मेधा साळवे यांनाच रविवारी आला. साळवे यांचा मुलगा आदित्य साळवे (वय ९) याला डेंग्यूची लागण झाली असून त्यांनी उपचारांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, आरोग्य विभागाने व आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी साळवे यांना प्रतिसादच दिला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे साळवे यांना आपल्या मुलाला खासगी रुग्णालयात उपचार सुरू करावे लागले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेलाच महापालिकेत न्याय मिळत नसेल, तर सर्वसामान्यांचे काय असा सवाल मेधा साळवे यांनी केला आहे.

शहरात डेंग्यूने थैमान घातले असताना आरोग्य विभागाची यंत्रणा मात्र सुस्तावलेली आहे. सप्टेंबर महिन्यात पहिल्या पंधरवाड्यात साडेतीनशे डेंग्यूचे संशयीत रुग्ण आढळले असून, ५०च्या वर रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक डेंग्यूप्रभावीत पाच जिल्ह्यांमध्ये नाशिकचा समावेश झाला आहे. त्याची गंभीर दखल राज्याच्या आरोग्य विभागाने घेतली असून, त्यासाठी नाशिकमध्ये पथकही पाठवले आहे. या पथकाची पाठ वळताच आरोग्य विभाग मात्र सुस्त झाला आहे. पथकाला उपाययोजनेची व शहरातील धूर फवारणीची खोटी आकडेवारी सादर करून आरोग्य विभाग आयुक्त, लोकप्रतिनिधी व नागरिकांचीच फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. तसेच आरोग्य विभागाच्या कागदी कारभाराची लक्तरे खुद्द मनसेच्या नगरसेविकेनेच आता काढली आहेत.

महापालिकेतील प्रभाग क्र. ३१मधील मनसेच्या नगरसेविका मेधा साळवे या शिवाजीनगरात राहतात. त्यांचा मुलगा आदित्य गेल्या आठ दिवसांपासून तापाने फणफणत आहे. मुलाच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाची यंत्रणा पोहचलीच नाही. त्यामुळे त्यांनी डॉ. राजेंद्र कुलकर्णी यांच्याकडे त्याला दाखल केले. त्यांच्या लॅबमध्ये तपासणी केली असता आदित्यला डेंग्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे घाबरलेल्या मेधा साळवे यांनी रविवारी आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांच्याशी उपाययोजनांसंदर्भात फोन केला. परंतु डॉ. डेकाटे यांनी त्यांच्या फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी सभागृहनेत्या सुरेखा भोसले यांच्या कानावर बाब टाकली. भोसले यांनाही डेकाटे यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा दावा साळवे यांनी केला. महापालिकेतील आरोग्य यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या नगरेसेविकेलाच दाद देत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. आरोग्य विभागातील या अनास्थेबद्दल प्रभाग क्रमांक ३१मधील नागरिक संतप्त असून, ते आता सोमवारी महापालिकेत येऊन जाब विचारणार आहेत. महापालिकेने धूर फवारणीसाठी १९ कोटींचा ठेका दिला आहे. पंरतु, ही धूर फवारणी कधी होते याची माह‌िती नागरिकांनाच नाही. फवारणी करतानाही कोणी दिसत नाही. मात्र, ठेकेदाराची बिले नित्यनेमाने निघत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अनास्थेविरोधात नगरसेवक आक्रमक झाले आहेत.

महापालिकेची यंत्रणाच मुजोर झाली आहे. मी सकाळपासून मुलाच्या उपचारांसाठी डॉ. डेकाटे यांना फोन करतेय. परंतु त्यांनी लक्ष दिले नाही. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही संपर्क केला. मात्र, त्यांनी दाद दिली नसल्याने मला खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला. नगरसेवकालाच असा अनुभव येत असेल, तर सर्वसामान्यांचे काय हाल ही यंत्रणा करत असेल?

-मेधा साळवे, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांचे १२.५ कोटी मनपाकडे थकीत

$
0
0

राज्यमंत्री दादा भुसेंचे आयुक्तांना बैठक घेण्याचे निर्देश

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील मनपाच्या सन २०११-१२ ला सेवानिवृत्त झालेल्या दोनशे शिक्षकांच्या हक्काचे पेन्शनचे व अन्य बाबीचे एकूण साडेबारा कोटी रुपये इतकी रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. याबाबत संबंधित शिक्षकांकडून वारंवार मनपा प्रशासनास पाठपुरावा करण्यात आला. मात्र तरीही ही थकीत रक्कम अदा करण्यात आली नसल्यामुळे या शिक्षकांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रश्नी दादा भुसे यांनी मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांना तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

मालेगाव मनपातील सुमारे दोनशे शिक्षकांची एकूण १२.५ कोटी रुपये थकबाकी झाली आहे. सन २०११-१२ ला सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना उपदान व पेन्शन रक्कम ३ कोटी, सहाव्या वेतन आयोगाचे फरकाचे ३ कोटी व अन्य बाबींचे असे एकूण १२.५ कोटी रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. यातील राज्य सरकारच्या वाट्याची ५० टक्के रक्कम देण्यात आली आहे. मात्र मनपाकडून अद्याप थकीत रक्कम न मिळाल्याने संबंधित सेवानिवृत्त शिक्षकांच्या कुटुंबीयांची आर्थिक कुचंबणा होत आहे.

याबाबत गेल्या ६ ते ७ वर्षांपासून सेवानिवृत्त शिक्षक व तालुका पेन्शन संघटना प्रयत्न करीत आहेत. मात्र मनपामधील अधिकारी व आयुक्त यांना निवेदन देऊनदेखील रक्कम मिळालेली नाही.

याप्रश्नी शिष्टमंडळाने राज्यमंत्री दादा भुसे यांनी भेट घेऊन चर्चा केली. शिष्टमंडळात कुरेशी गुलाम हैदर, सलाउद्दीन यासीम, अल्ताफ अहमद, जगन्नाथ जयराम आदी उपस्थित होते. चर्चेत मनपाला थकीत रक्कम देण्यासंबंधी दहा दिवसांचा आत बैठक घेण्याचे निर्देश त्यांनी दिले, अशी माहिती अध्यक्ष बी. के. नागपुरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकर तुम्हाला पचवता आले नाही : शिंदे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सावरकर तुम्हाला पचवता आले नाही. सावरकर थोर सुधारक होते. नंतरच्या काळात बदल झाला असेल; पण त्यांनी समाजाला फटके मारण्याचे काम केले. मी काँग्रेसवाला आहे; पण मी संपूर्ण सावरकरांचे साहित्य वाचले. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे साहित्यही वाचतो. कम्युनिस्टांचेही वाचतो, अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी साहित्यातील जीवनपट उलगडला.

'लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमात 'मला भेटलेले साहित्यिक व त्यांचे साहित्य' या विषयावर शिंदे बोलत होते. ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभाग आयोजित व्याख्यानमालेत शिंदे प्रमुख वक्ते होते. ते म्हणाले, की अत्रे, सावरकरांना भेटता आले नाही; पण त्यांना बघता आले. मला साहित्यिकांच्या घरी जाण्याचासुद्धा नाद आहे. मी कुसुमाग्रजांपासून सर्व साहित्यिकांच्या घरी गेलो आहे. माझी बाळ सामंतांशी मैत्री झाली व त्यांच्यामुळेच मला साहित्यिकांना भेटता आले व त्यानंतर मी झपाटलो. साहित्य जीवनावर प्रभाव टाकत असतो. साहित्य क्षेत्रात फसले पाहिजे. चांगले वाक्य असेल तर मी हृदयात ठेवतो. मी ज्या वस्तीत वाढलो तेथे साहित्याचा विषयच नव्हता. त्यामुळे गोडी नव्हती; पण महाविद्यालयीन जीवनापासून त्यात आवड निर्माण झाली. त्यानंतर मात्र खूप पुस्तकेही वाचली. आता तरुण व्हॉट्सअॅपमध्ये गुंतला आहे; पण ते थोडे दिवस. तो संशोधक असतो व तो नवीन नवीन शोधतो. तो विचारी असतो.

या वेळी माजी मंत्री विजय नवल पाटील, उपमहापौर गुरुमित बग्गा, माजी आमदार शोभा बच्छाव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, श्रीकांत बेणी यांच्यासह शंकराचार्य न्यासचे आनंद जोशी उपस्थित होते. ज्योती स्टोअर्सचे वसंत खैरनार यांनी प्रास्ताविक केले.

७५ वर्षे सरल्याचे वाटत नाही!

माणूस नेहमी धडपडत असतो. मलाही ७५ वर्षे झाली, असे वाटत नाही. आजही कॉलेजला जावेसे वाटते; पण आता बघणार कोण, असा प्रश्न पडतो. मात्र, तुम्ही जेथे आहात तेथे आनंद घ्या, असेही त्यांनी सांगून हशा पिकवला.

नाशिककर भाग्यवान

नाशिकला सावरकर, कानेटकर, कुसुमाग्रज, बाबूराव बागूल, वामनदादा कर्डक यांच्यासह आताच्या पिढीतील तुकाराम धांडे व होळकर मिळाल्याचे सांगत त्यांनी कौतुक केले. असे साहित्यिक येथे होणे म्हणजे तुम्ही भाग्यवान असल्याचे ते म्हणाले.

'आप का अजब रसायन है'

मी तरुणपणी शंकराचार्यांना भेटलो. त्यांच्याशी वाद घातला. मी हिंदू आहे, याचा मला अभिमान आहे; पण सर्वधर्मसमभाव आपण विसरून गेलो आहे. त्यामुळे बदल होणे गरजेचे आहे. डॉ. आंबेडकर का गेले, असे प्रश्न विचारायचो. त्यात मी त्यांना सांगत असे, की मी जन्माने दलित आहे; पण विद्यापीठात मी पहिला आलो म्हणून मी ब्राह्मण आहे. वकिली केली म्हणून मी वैश्य आहे. पोलिसांत काम केले म्हणून मी क्षत्रिय आहे. तेव्हा शंकराचार्य सांगायचे, ''आप का अजब रसायन है.'' आता मी शंकराचार्यांना नेहमी भेटतो. त्यांचे-माझे संबंध खूप चांगले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images