Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भुजबळांच्या सुटकेसाठी OBC ची मोर्चा बांधणी

0
0

गिते-खैरेंची बैठक; ३ ऑक्टोबरला करणार आंदोलन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे व कारागृहात असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर नाशिकमधील भुजबळ समर्थकांना बळ आले आहे. गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खैरे यांनी भाजपचे नेते व माजी आमदार वसंत ग‌िते यांच्या समवेत बैठक करून भुजबळांच्या सुटकेसाठी येत्या ३ ऑक्टोबरला काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चासंदर्भात चर्चा केली. भुजबळांवरील कारवाईच्या निषेधार्थ हा मोर्चा असल्याचे सांग‌ितले जात असले तरी, राज्यभर निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चांना प्रत्युत्तर देण्यासाठी ओबीसींचा संघटन बांधण्याचा प्रयत्न असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यभर मराठा क्रांती मोर्चामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे सरकारचीही कसोटी लागली असतानाच अचानक पंकज मुंडे यांनी बुधवारी छगन भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज्य सरकारनेच भुजबळांना पूर्ण डॅमेज केल्यानंतर अचानक मुंडेच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या प्रकाराने नाशिकमधील त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला असून, त्यांनी अचानक भाजपमधील ओबीसींच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. समता परिषदेचे नेते व राष्ट्रवादीचे पदाधिकारी दिलीप खैरे यांनी गुरूवारी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत ग‌ितेंची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. राज्य सरकारकडून भुजबळांवर केल्या जाणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ येत्या ३ ऑक्टोबरला ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात भुजबळांच्या सुटकेसाठी शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. भुजबळांसाठी सर्व पक्षातील ओबीसींना एकत्रित करण्याचा हा प्रयत्न असला तरी, यामागे राज्य सरकारचीच चाल असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे.

भाजप नेते संभ्रमात

भाजप सरकारनेच भुजबळांचा भ्रष्टाचार बाहेर काढत, त्यांना सध्या जेलमध्ये पाठविले आहे. असे असतांनाही भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या भेटीपाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांची भेट घेऊ लागले आहेत. महामोर्चा काढण्याची तयारी असली तरी यात भाजप नेते सहभागी होतील काय, याबाबत शंका आहे. फडणवीस सरकारनेच त्यांना जेलमध्ये पाठविले असतानाच भाजपचे नेते सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावर आल्यास जनतेत चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या भूमिककडे आता लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ भ्रष्टाचार मुक्त संघटनेचे मालेगावी आंदोलन

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील विविध रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असून या रस्त्यांची दुरुस्ती तत्काळ व्हावी तसेच शहरातील बनारसी चौक येथील रस्ता खुला करून अतिक्रमण काढावे या मागणीसाठी येथील भ्रष्टाचार मुक्त मालेगाव मोर्चाचे रिजवान बेटरीवाला यांनी मनपा प्रवेशद्वारसमोर धरणे आंदोलन केले.

यावेळी मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांना निवेदन देण्यात आले. यात रिजवान यांनी बस स्थानकालगत असलेल्या नाल्यात उतरून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, अद्याप याबाबत प्रशासनाकडून आश्वासन देऊन देखील काम सुरू झालेले नाही. तसेच इक्बाल रोड, मिर्झा गालिब रोड, मोहम्मद अली रोड, अली अकबर दवाखाना रोड, आदिब रोड, द्याने, नया इस्लामपुरा, देवीचा मळा यासह शहरातील सर्वच रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. अशा परिस्थितीत देखील प्रशासनाची झोपेचे सोंग घेत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. चक्री आंदोलन करण्याचा इशारा रिजवान बेटरीवाला यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभिमानी संघटनेतर्फे जोडे मारो आंदोलन

0
0

म. टा. वृत्तसेवा, जुने नाशिक

भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, शहीद जवान अमर रहे, पाकिस्तान आतंकवाद बंद करो, नवाज शरीफ मुर्दाबाद, पाकिस्तानी अतिरेक्यांचा धिक्कार असो' अशा घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी युवा संघटनेतर्फे काश्मिरमधील उरी येथे अतिरेकी हल्ल्याचा शुक्रवारी निषेध करण्यात आला. यावेळी पाकचा ध्वज व पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करीत निषेध करण्यात आला.

युवा संघटनेचे महानगरप्रमुख नितीन रोठे पाटील यांच्या नेतृत्तवाखाली दुपारी शालिमार चौकात उरी येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाकिस्तानचा निषेध करीत पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन झाले. यावेळी पुतळासह पाकचा ध्वज जाळण्यात आला. या निषेध आंदोलनात नितीन रोठे पाटील यांच्यासह नीलेश कुसमोडे, प्रफुल वाघ, सलिम शेख, बशीर शेख आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गावर ‘एक मराठा लाख मराठा’चा एल्गार

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नाशिक येथे होत असलेल्या मराठा क्रांती मोर्चासाठी तालुक्यातून सुमारे ४ ते ५ लाख समाज बांधव शुक्रवारी मुक्कातीच नाशिकच्या दिशेने रवाना झाले. नगर येथील विराट मोर्चामुळे तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चात सहभागी होणाऱ्या समाजबांधवांच्या संख्येत मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात असून, मोर्चात सहभागी होण्यासाठी शहर व तालुक्यातून चारचाकी, दुचाकी तसेच बस, ट्रॅव्हल अशा विविध वाहनाची संख्याच हजारोंच्या घरात जाणार आहे. 'एक मराठा लाख मराठा' असा निर्धार करीत गेल्या काही दिवसापासून शहर व तालुक्यात या मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे.

मराठा क्रांती मोर्चा नियोजन समितीच्या मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी अंतिम नियोजन करण्यात आले असून, सर्वच यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मध्यवर्ती कार्यालयातून सकाळी ६ वाजता वाहने नाशिकच्या दिशेने रवाना होत आहेत. यात २ ते ३ बसेस व २ ट्रॅव्हलची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अनेकांनी स्वयंस्फूर्तीने आपली वाहने यासाठी देऊ केली आहेत. त्यामुळे शहर व तालुक्यातून १० ते १२ हजार चारचाकी, २०० ते ३०० अवजड वाहने तर सुमारे ३ ते ४ हजार दुचाकीने समाजबांधव मोर्च्याच्या ठिकाणी पोहोचणार आहेत, अशी माहिती नियोजन समितीचे देवा पाटील यांनी दिली. दरम्यान मोर्चाच्या जनजागृतीसाठी शुक्रवारी शहरात वाहन रॅली काढण्यात आली. यावेळी मध्यवर्ती कार्यालय ते गिरणा पूल दरम्यान रेलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच तालुक्यातून सहभागी होणाऱ्या बांधवाना येथून ५ हजार ध्वज, १० हजार हून अधिक स्टीकर वाटप करण्यात आले आहे. तालुक्यातील झोडगे, दाभाडी, रावळगाव, सौंदाणे, टेहरे, अजंग-वडेल, वडनेर खाकुर्डी, कळवाडी, देवघट यासह गावांमधून लाखो समाजबांधव सहभागी होणार आहेत. तसेच समाजबांधवांनी या मोर्चासाठी वाहतूक करताना नियमांचे पालन करावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा नियोजन समिती मालेगावच्या वतीने केले आहे.

बस स्थानक सज्ज

मोर्चात सहभागी होणाऱ्यांची लाखोंची संख्या लक्षात घेता येथील मालेगाव बस आगारात बस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. समितीच्या वतीने २ बस आरक्षित देखील करण्यात आल्या असून गर्दीचा अंदाज घेऊन नाशिकच्या दिशेने जादा बस सोडण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आघार प्रमुख शेखर कापसे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध समाज, संघटनांचा पाठिंबा

0
0

टीम मटा

शनिवारी नाशिक येथे होणाऱ्या मराठी क्रांती मोर्चास जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना तसेच समाज बांधवांनी जाहीर प‌ाठिंबा दिला आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या या मोर्चात या सर्व संघटना, समाज बांधव सहभागी होणार आहेत.

पटेल ग्रुप, येवला

येवला ः शहरातील सरदार वल्लभभाई पटेल ग्रुपने मराठा क्रांती मूक मोर्चाला आपला पाठिंबा दिला आहे. ग्रुपच्या वतीने याबाबतचे निवेदन अॅड. माणिकराव शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

उद्योगपती सुशिल गुजराथी, अनिरुद्ध पटेल, डॉ. राजेश पटेल, माजी नगराध्यक्ष नीलेश पटेल, शैलेष गुजराथी, नितीन पटेल, सुजोत पटेल, प्रणव पटेल, प्रज्ज्वल पटेल, हरिष पटेल, मनोज गुजराथी, श्रीपाद पटेल, उमेश पटेल, रुपेश पटेल, विकास पटेल, मनिष पटेल, राम पटेल, नचिकेत पटेल, गजेंद्र पटेल, परेश पटेल, तरंग पटेल, गौरव पटेल, अंकुश पटेल, अभिजीत पटेल, मयुर पटेल आदींसह समाज बांधवांच्या उपस्थित होते.

वैष्णव गुजराती समाज

येवला ः मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेला मराठा समाजाचा संयम, शासन प्रशासनासोबत इतरही समाज व्यवस्थेला देखील चांगलाच भावला असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच नाशिक येथे शनिवारी होणाऱ्या मोर्चात मराठा समाज बांधवांसाठी जातीपातीचा भेद विसरून येवल्यातील द. सा. श्रीमाळी वैष्णव गुजराती समाजाच्या वतीने बैठक आयोज‌ित करण्यात आली. या बैठकीत मोर्चास जाहीर पाठिंबा देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. तसे पत्र पंचकमिटीच्या वतीने तालुक्यातील ज्येष्ठ नेते शिंदे यांना देण्यांत आले आहे.

बैठकीस समाजाचे अध्यक्ष सुरेश गुजराथी, सुधाकर गुजराथी, अरविंद गुजराथी, गोपाळराव गुजराथी, सुधिर गुजराथी ह्या पंचकमिटीसह ज्येष्ठ कमलाकर गुजराथी, बाळाकृष्ण पाटोदकर (सर), डॉ. परानंद गुजराथी, अरुण गुजराथी, सतिष पाटोदकर, राजीव पाटोदकर, अनिल गुजराथी, नरेंद्र पाटोदकर आदी उपस्थित होते.

ठाकूर समाज

देवळाली कॅम्प : मराठा समजातील आर्थिक दुर्बल घटकांना खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. त्यांनाही आरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी नाशिक जिल्हा ठाकूर समाजाचे अध्यक्ष बंडूनाना पवार व सचिव नीलेश ठाकूर यांनी मराठा क्रांती मूक मोर्चाला समाजाच्या वतीने पाठिंबा जाहीर केला आहे.

शनिवारी नाशिकमध्ये २० लाखाहून अधिक मराठा समाज एकवटणार असल्याने एवढ्या वर्षांपासून शेतकरी समजाला जाणारा मराठी बांधव आपल्या रास्त मागण्यांसाठी मोर्चा काढणार असून, या मोर्चाला पाठिंबा जाहीर आपला पाठिंबा आहे. तसेच अॅट्रॉसिटी कायद्यात फेरसर्वेक्षण करीत त्याची अंबलबजावणी करण्यात यावी, असे शासनाने आश्वासित करणे गरजेचे असल्याची मागणी देखील नीलेश ठाकूर यांनी यावेळी केली. समाजाच्या वतीने शनिवारी मोर्चात जागोजागी जनसेवा सटॉल उभारण्यात येणार असून, सहभागी नागरिकांना चहा व पाण्याचे वाटप केले जाणार आहे.

भाजप जिल्हा आघाडी

देवळाली कॅम्प : मराठा क्रांती मूक मोर्चात आपण बहुसंख्य महिलांसह सहभागी होणार असल्याचे भाजप जिल्हा आघाडीच्या सरचिटणीस प्रीतम आढाव यांनी सांगितले. राज्यात अत्याचार वाढले ही वस्तुस्थिती आहे. मराठा क्रांतीने शिस्तबद्धपणे मोर्चे काढून निषेध व्यक्त केला आहे. या मोर्चाचा आदर्श घ्यावा इतक्या शांततेत हा निषेधाचा सूर उमटत आहे. मराठी समाजासही आरक्षण मिळावे, असे आपले स्पष्ट मत असून त्यासाठी आम्ही पाठिंबा देत आहोत. तसेच कोपर्डीसह नाशिकमधील नांदूर नाक्याजवळ घडलेल्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाद्रपद अष्टमीनिमित्त जीवतिया व्रत

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सुख नांदावे, समृद्धी मिळावी, निरामय आरोग्य लाभावे यासाठी नदीच्या पवित्र स्थानावर भाद्रपद कृष्ण अष्टमीला उत्तर भारतातील महिला पूजा करण्यासाठी जातात. शुक्रवारी अष्टमी असल्याने उत्तर भारतीय महिलांनी रामकुंडाच्या पवित्र स्थानावर स्नान करून जीवतिया या व्रताची हजारो महिलांनी मनोभावे पूजा केली.

घरात सुख, समृद्धी लाभावी विशेषतः आपल्या पाल्यांना सुख-समृद्धी मिळावी, यासाठी उत्तर प्रदेशातील महिला हे व्रत करीत असतात. पितृपक्षाच्या अष्टमीला हे व्रत करण्याचा मुहूर्त असतो. दुपारीनंतर ही पूजा केली जाते. सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदर ही पूजा आटोपावी लागते. त्यामुळे दुपारपासून रामकुंडावर महिलांची स्नानासाठी आणि पूजेसाठी गर्दी झाली. फळे आणि फुलांच्या टोपल्या करंड्या घेऊन या महिला रामकुंडावर येत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारपासून बार्न्स स्कूल पूर्ववत

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

बार्न्स स्कूलच्या कंत्राटी कर्मचारी आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई सुरू केली आहे. शाळा प्रशासनाशी सकारात्मक चर्चा झाली. त्याम‌ळे प्रशासन व संपकरी कर्मचारी यांनी संयम राखून शाळा सुरू करावी, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले आहे. परिणामी येत्या सोमवारपासून (दि. २६) शाळा पूर्ववत सुरू होणार आहे.

कंत्राटी कर्मचारांपैकी चिनाप्पा मंद्री यांच्या आत्महत्येनंतर बार्न्स शाळेल तणावाचे वातावरण निर्माण झाले. घाबरलेल्या पालकांनी शाळेत आपल्या पाल्यांना पाठविण्याचे टाळले. संपकरी कर्मचारी शाळा बंद करत असल्याचा आरोप शाळा प्रशासनाने केला होता. तर दुसरीकडे शाळा प्रशासनाच आमची बदनामी करीत असल्याचे प्रत्युत्तर कंत्राटी कामगारांनी दिले होते. दरम्यान, खासदार गोडसे यांनी शुक्रवारी सकाळी शाळा व्यवस्थापनाची भेट घेतली. यावेळी उपप्राचार्य किथ -के एवरेट व विजय नायर यांच्यासह तानाजी करंजकर, वरिष्ठ निरीक्षक विनायक लोकरे, कर्मचाऱ्यांच्या वतीने सोमनाथ कडभाने, देविदास मोरे, संजय देशमुख आदी उपस्थित होते.
प्रशासनाने कठोर भूमिका न घेता कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. कर्मचारी शाळेस सहकार्य करण्यास तयार आहेत. शाळेचे मुख्य विश्वस्थ व्हाईट यांनी देखील दूरध्वनीवरून चर्चा करतांना कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याचे आश्वासन दिल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.

लूक यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी
बार्न्स स्कूलचे कर्मचारी मंद्री याच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्राचार्य ज्युलियन लूक यांना सोमवार, २६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी चिनप्पा मंद्री यांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत करण्याचे आवाहन कॅन्टोन्मेंट नगरसेवक भगवान कटारिया यांनी पोलिसांना केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात आज मराठ्यांचा हुंकार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा मोर्चा कृती समितीच्या वतीने आयोजित विराट मूक मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, नाशिकमध्ये शनिवारी मराठ्यांचा हुंकार अनुभवयास मिळणार आहे. अहमदनगरमधील मोर्चाने गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढल्याने आता नाशिकमधील मोर्चाकडे सबंध राज्याचे लक्ष लागले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून, दहा हजार स्वयंसेवकांची फौज मोर्चेकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे. नाशिकच्या मोर्चाला विविध समाज, संघटनांनी पाठिंबा जाहीर केल्याने मोर्चाचे बळ वाढले आहे. मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध होण्यासाठी आयोजकांसह पोलिसांनी मायक्रो प्लॅनिंग केले आहे, तर ग्रामीण भागातील मराठा बांधव शुक्रवारी सायंकाळपासूनच क्रांती मोर्चासाठी शहरात दाखल झाले आहेत.

कोपर्डी घटनेचा निषेध, अॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शनिवारी नाशिक शहरात मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यात दररोज कोठे ना कोठे निघणाऱ्या मराठा मोर्चांचाच बोलबाला आहे. दररोज गर्दीचे विक्रम मोडीत निघत आहेत. नांदेड, सोलापूरपाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यात मूक मोर्चाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्यानंतर आता नाशिकमधील मोर्चाकडे सबंध राज्याचे लक्ष लागले आहे. 'मराठी पाऊल पडते पुढे' या उक्तीप्रमाणे मराठा बांधवांची पाऊले आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी आवेशाने पुढे पडू लागली आहेत. मोर्चाला जिल्हाभरातील लाखो मराठा बांधवांनी यावे, यासाठी महिनाभरापासून जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती. खेडोपाड्यांत घेण्यात आलेल्या बैठकींमुळे मराठा बांधवांमधील उत्साह दुणावला असून, अबालवृद्ध आणि महिलांनाही मोर्चात सहभागी होण्याचे वेध लागले आहेत. तपोवनातून सकाळी दहाला मोर्चाला सुरुवात होणार असून, शुक्रवारी सायंकाळपासूनच बांधव नाशिकनगरीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

यापूर्वी नांदेड, बीड, अहमदनगरसारख्या तुलनेने छोट्या शहरांमधील मोर्चाने सरकारी यंत्रणांची झोप उडविली. त्यामुळे नाशिकमधील यंत्रणाही सज्ज झाली आहे. मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी जिल्हाभरातील सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्रित आले असून, आयोजकांकडून मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे. वाहनतळांवर पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या असून, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे दीड हजार पोलिस रस्त्यावर उतरणार आहेत.

असा आहे मोर्चाचा मार्ग...

औरंगाबाद नाका, आडगाव नाका, काट्या मारुती, पंचवटी कारंजा येथे छत्रपती शिवरायांना अभिवादन करून पुढे होळकर पुलामार्गे रविवार कारंजा, एम.जी. रोड, हुतात्मा स्मारकाजवळील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून जिल्हाधिकारी कार्यालय, त्र्यंबक नाकामार्गे गोल्फ क्लब हा मोर्चा येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिकेचे ‘येरे माझ्या मागल्या’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर
महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील अंबड लिंकरोडवरील वादग्रस्त अनधिकृत भंगार बाजारातील दुकानांची नोंदणी सुरू केली आहे. या बाजाराची अलिकडच्या काळातील ही चौथ्यांदा नोंदणी केली जात आहे. प्रत्येक वेळी भंगार दुकानांची संख्या शेकडोने वाढल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या या बाजारावर कारवाई होणार तरी कधी, असा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

अनधिकृत भंगार बाजार हटविण्यासाठी अनेकदा राजकीय पक्षांनी आंदोलने केली. परंतू महापालिका व पोलिस प्रशासन यांच्यात एकमत होत नसल्याने या बाजाराला वारंवार अभय‌ मिळाले. यापूर्वी तीन वेळा या बाजारातील दुकनांची नोंदणी महापालिकेच्या नगररचना विभागाने केली आहे. आता पुन्हा चौथ्यांदा नोंदणीचे काम हाती घेण्यात आले आहे. भंगार दुकांनाच्या नोंदणीत प्रत्येकवेळी शेकडोने संख्यावाढ झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता पुन्हा भंगार दुकानांची नोंदणी करून महापालिका केवळ कारवाईचा फार्स दाखवित असल्याचा आरोप माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी केला आहे. यात महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकाऱ्यांचे भंगार व्यावसायिकांशी आर्थिक हितसंबध असल्याचा आरोप दातीर यांनी केला आहे.

पोलिस बळाअभावी उशिराने नोंदणी
सातपूर पोलिस स्टेशनकडून उशिराने पोलिस बंदोबस्त मिळाल्याने भंगार बाजरातील दुकांनाची नोंदणी महापालिकेने सुरू केली. नेहमीच महापालिका व पोलिस प्रशासन यांच्या असहकार्यामुळे अनधिकृत भंगार दुकानांची संख्या दिवसगणित वाढली आहे. बोटावर मोजण्याइतकी भंगाराची दुकाने आता तब्बल ७०० पेक्षा अधिक झाली. यास जबाबदार कोण? असा प्रश्न दातीर यांनी उपस्थित केला आहे.

नोंदणी करतांना कर्मचारी अवाक्
महापालिकेने यापूर्वी तीन वेळा भंगार बाजारातील दुकानांची केली आहे. प्रत्येकवेळी दुकानांची संख्या वाढलेली दिसली आहे. दरम्यान, आता चौथ्यांदा भंगार दुकानांची नोंदणी करतांना नगररचना विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होतांना दिसत आहे. वाढलेल्या भंगार दुकानांच्या संख्येमुळे अधिकारी आणि कर्मचारी देखील अवाक् झाले आहेत.

महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि भंगार बाजारातील व्यावसायिक यांच्यात आर्थिक हितसंबंध आहेत. भंगार बाजार हटविण्यासाठी अनेकदा महापालिकेकडे पाठपुरावा केला. मात्र, महापालिका व पोलिस यांच्यात एकमत होत नसल्याने भंगार दुकानांची संख्या सातत्याने वाढत आहे. आता केवळ रेखांकनचा फार्स न करता महापालिकेने थेट कारवाई करण्याची हिम्मत दाखवावी.
- दिलीप दातीर, माजी सभागृह नेता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कोसळून महिलेसह तीन ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला/मनमाड

जिल्ह्यात शुकवारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने तिघांचा बळी घेतला. येवला तालुक्यात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. मनमाड येथे शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

संतोष जगन्नाथ गुडघे (वय २८), वर्षा नवनाथ गुडघे (वय २५, दोघेही रा. ममदापूर, ता. येवला) या दीर-भावजयीचा वीज पडून जागीच मृत्यू झाला, तर नवनाथ जगन्नाथ गुडघे (वय ३२) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर येवला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदगाव तालुक्यातील नवे पांझण नजीकच्या डोरली पाडा येथे वीज पडून दत्तू साहेबराव चव्हाण (वय १३) या शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तो घराजवळ उभा असताना अचानक वीज अंगावर कोसळली. त्यात पूर्णतः भाजल्याने दत्तूचा दुर्दैवी मृत्यू झाला. तो साकोरे येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा विद्यार्थी होता. नांदगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

येवला तालुक्यात उत्तरा नक्षत्रातील परतीच्या पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. तालुक्याच्या उत्तरपूर्व पट्ट्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. ममदापूर-रेंडाळे शिवारात सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे पिकांचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी गुडघे कुटुंबीय शेतात गेले होते. ‌विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने ते एका झाडाखाली आडोशाला जाऊन थांबले. मात्र, वीज झाडावर कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर नवनाथ गुडघे गंभीर जखमी झाले. तिघांना नगरसूल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले, तर जखमी नवनाथ यांना उपचारासाठी येवल्यात हलविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तणाव निवळला, मात्र धास्ती कायम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

योग्य उपचारांअभावी अन् अक्षम्य दुर्लक्षामुळे वर्षभरापूर्वी (२४ सप्टेंबर २०१५) नंदुरबारच्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. या निमित्ताने सिव्हिलच्या आवारातील नर्सिंगच्या विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न चव्हाट्यावर आले होते. याचा वर्षभरानंतर पाठपुरावा केल्यानंतर या प्रकारात काहीअंशी फरक पडून त्या प्रकरणाचा तणाव निवळला असल्याचे निदर्शनास येते. तरीही स्वत:च्या हक्कांसाठी ‌विद्यार्थिनींना अद्यापही पाठपुरावा करावा लागतो. यामुळे त्यांच्या मनात त्या प्रकरणाची धास्ती अद्यापही कायमच असल्याचे चित्र आहे.

नंदुरबार येथील १९ वर्षीय विद्यार्थिनी सुप्रिया माळी ही सिव्हिलच्या आवारातील नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. केवळ योग्य उपचारांअभावी तिचा मृत्यू झाल्यानंतर या संस्थेत विद्यार्थिनींचा क्षोभ उसळला होता. यावर आरोग्य संचालनालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. समितीच्या अहवालानंतर संस्थेतील दोन परिसेविकांना निलंबित करीत नर्सिंग कॉलेजेसना संचालनालयाने सूचना देत संस्थांचे कान पिळले होते. यानंतर वर्षभरात संचालनालयाने तपासणी अधिकारी पाठविले असले तरीही संचालनालयाचा या संस्थांवरील दबाव यापुढेही कायम रहावा, अशी अपेक्षा विद्यार्थिनींमधून व्यक्त होत आहे. सुप्रियाच्या मृत्यूला सिव्हिलचा हलगर्जीपणाच जबाबदार असल्याचा आरोपही विद्यार्थिनींसह रिपाइं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्या घटनेनंतरच्या आंदोलनामुळे काही दिवस अन्नाचा दर्जा एकाकी सुधारला होता.

विद्यार्थिनींच्या मागण्या

विद्यार्थिनींना अन्नाचा आणखी चांगला दर्जा व पुरेशी स्वच्छता अपेक्षित आहे. विद्यार्थिनींचा सन्मान जपला जावा, केवळ नेमून दिलेलीच कामे देण्यात यावी, अशा या विद्यार्थिनींच्या मागण्यात आहेत. विद्यार्थिनी धास्तीपोटी माध्यमांशी जास्त बोलण्यासही तयार होत नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जातेगावच्या सरपंचाची रेल्वेखाली आत्महत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील जातेगावच्या सरपंच सुप्रिया लाठे यांनी गुरुवारी दुपारी रेल्वेखाली आत्महत्या केली. रात्री उशिरा चाळीसगाव रेल्वे पोलिसांत या प्रकरणी अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळी शौचालयाला जाते म्हणून सुप्रिया लाठे घराबाहेर पडल्या पण त्या दुपारपर्यंत घरी पोहचल्या नाहीत. त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह शहराबाहेर उड्डाणपुलाजवळील लोहमार्गावर आढळून आला. त्यांनी हातावर मृत्यूपूर्वी आपण सहा वर्षांपासून इथे राहतो पण आपल्याला करमत नाही. मला दोन मुले आहेत, असे लिहिले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. जातेगावच्या सरपंच सुप्रिया लाठे यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. चाळीसगाव लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुप्रिया या रिपाइं नेते राजेंद्र लाठे यांच्या पत्नी होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाइन, मद्य विक्रेत्यांना नोटिसा

0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या अधिसूचनेनंतरही स्थानिक व्यवसाय कराची (एलबीटी) नोंदणी न करणाऱ्या शहरातील मद्य, वाइन विक्रेते तसेच बिअर बारमालकांना महापालिकेने दणका दिला आहे. राज्य सरकारने 'एलबीटी' भरण्यासंदर्भातील आदेश काढून नोंदणी न करणाऱ्या शहरातील ३४० पैकी २९० मद्य व वाईन विक्रेत्यांना महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

'एलबीटी'ची नोंदणी न केल्याने बेकायदा व्यवसाय करत असल्याचा ठपका महापालिकेने ठेवला असून १५ दिवसात नोंदणी करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत नोंदणी केली नाही, तर पाच पट दंड आकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राज्य सरकारने नुकतेच मद्य, वाइन विक्रेत्यांनाही एलबीटी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्या संदर्भातील अधिसूचना १४ ऑगस्ट जारी करून १५ ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. १५ ऑगस्टपासून त्यांची वसुलीही करण्याचे आदेश दिले. मद्य, वाइन विक्रीवर राज्य सरकारने नऊ टक्के एलबीटी लावला होता. तर त्यासाठी १५ दिवसांची मुदत शहरातील मद्य, वाइन विक्रेत्यांसह बिअरबारचालकांना देण्यात आली. परंतु, महिना लोटला तरी, अद्याप केवळ ५० विक्रेत्यांनी एलबीटीची नोंदणी केली होती. त्यामुळे महापालिकेच्या एलबीटी विभागाने शहरातील मद्य व वाइन विक्रेत्यांची माहिती मागवून त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे.

उत्पादन शुल्क विभागाककडे शहरात ३४० मद्य, वाइन विक्रेत्यांसह बिअरबारचालकांची यादी दिली आहे. यातील केवळ ५० जणांनीच नोंदणी केली आहे. त्यामुळे उर्वरित २९० मद्य व वाइन विक्रेत्यांना नोटीस बजावल्या आहेत. संबंधितांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करत, एलबीटीची नोंदणी न केल्याने आपण बेकायदेशीर विक्री करत असल्याचा ठपका महापालिकेने ठेवला आहे. नोंदणी न केल्या प्रकरणी १५ दिवसात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नोंदणी केली नाही तर पाच पट दंड करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मद्य, वाइन विक्रेत्यांसह बिअरबारचालकांचे धाबे दणाणले आहे.

... तर दोन कोटींचे उत्पन्न
शहरातील मद्य, वाइन व बिअरबारचालकांकडून एलबीटी ९ टक्के वसूल केल्यास महापालिकेच्या तिजोरीत दोन कोटी रुपयांपर्यंत दरमहा उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे तिजोरीला हातभार लागणार आहे. या वसुलीला शहरातील मद्य व बिअरबारविक्रेत्यांनी विरोध केला आहे. परंतु, आता महापालिकेने कारवाईची तयारी केल्याने एलबीटी भरल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा बळी

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सायखेडा (ता. निफाड) येथे शुक्रवारी उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तीन वर्षीय बालकावर झडप घातल्याने बालकाचा मृत्यू झाला. सार्थक महेश सोळोसे असे या मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे.

सायखेडा येथील सोनगाव ते गंगानगर रस्त्यावरील सागर रामनाथ कुटे यांच्या शेतात ही घटना घडली. शेतात महेश पोपट सोळोसे सालदार आहेत. कुटे यांच्या शेतात शुक्रवारी मजूर काम करीत असताना सार्थकसह आणखी एक बालक या महिलांजवळ खेळत होते. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक सार्थकवर झडप घातली. मानेजवळ वेगाने उसात घेऊन गेला. ही घटना पाहताच सार्थकची आई व महिलांनी मदतीसाठी आरडाओरड केली. सुमारे दोनशे ते तीनशे नागरिकांनी तेथे धाव घेत संपूर्ण शेत पिंजून काढला असता सार्थक मृतावस्थेत आढळला. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कुटे यांच्या शेतात पिंजरा लावला आहे. सार्थकला एक वर्षाची बहीण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा विज्ञान प्रदर्शन डिसेंबरमध्ये

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने तालुका व जिल्हास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण लोकसंख्या शिक्षण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. ११ ते ३१ जानेवारी २०१७ या दरम्यान पाच दिवसांच्या कालावधीत हे प्रदर्शन होईल, असे राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले आहे. एनसीईआरटी, नवी दिल्ली यांनी या प्रदर्शनाचे दिशानिर्देश जारी केले आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये शालेय वयातच विज्ञानाविषयी ओढ निर्माण झाल्यास त्याचा लाभ त्यांचे करिअर घडविण्यासाठी होतो. त्यादृष्टीने अशाप्रकारचे प्रदर्शन महत्त्वाचे ठरत असल्याने दरवर्षी हे प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनाचे यंदाचे ४२ वे वर्ष आहे. 'राष्ट्र निर्माणासाठी विज्ञान, तंत्रज्ञान व गणित' या विषयावर हे प्रदर्शन आधारित असणार आहे. सामाजिक गरज लक्षात घेत आरोग्य, उद्योग, वाहतूक व दळणवळण, शाश्वत पर्यावरणासाठी पुनर्वापरायोग्य संसाधनावरील नवकल्पना व दैनंदिन जीवनात गणितीय उपाय या विषयांवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनाची तयारी ही तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय प्रदर्शन या पद्धतीने होणार आहे. यातील १ ते ३० नोव्हेंबरमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, १ ते १५ डिसेंबरदरम्यान जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ११ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होणार आहे. याच्या निश्चित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. एनसीईआरटीअंतर्गत राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाकरिता मूल्यमापनासाठी उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत) व माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर (इयत्ता नववी ते बारावी) या विभागांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी ी एका उपविषयावर वस्तू, प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकल्प तयार करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शब्दरूप आले मुक्या भावनांना

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गाऱ्हाणेच मांडायचे असेल...न्यायच मागायचा असेल....निषेधच नोंदवायचा असेल... अन एकजूटच दाखवायची असेल तर प्रत्येकवेळी शब्दांचाच आधार कशासाठी हवा. तोंडातून 'ब्र' न काढता...शब्दांना आवाजाची धार न लावताही सामर्थ्य दाखवून देता येते. नाशिक शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या मांडवाखालून मार्गस्थ झालेल्या जनसागराने शिस्तबद्धतेचे दर्शन घडवित व्यक्त केलेल्या मुक्या भावनांनाही आपसूकच शब्दरुप प्राप्त झाले.

ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चाला डोळ्यांत साठविता यावे, आपणही अशा ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हावे अन् आज नाही तर कधीच नाही, या भावनेने भविष्याच्या काळजीपोटी मराठा समाज बांधवांची पाऊले तपोवनाच्या दिशेने पडू लागली. अनेक ऐतिहासिक व पूरातन घटनाक्रमांचा साक्षीदार राहीलेला पंचवटीचा परिसर मराठा समाजाच्या या विराट मोर्चाचाही साक्षीदार ठरला. मोर्चाला दहा वाजता सुरूवात होणार असली तरी सकाळ झाली तशी मराठा समाजातील अबाल वृध्दांची पाऊले तपोवनाच्या दिशेने पडू लागली. मराठा क्रांती मोर्चा समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच व्यासपीठ उभारले होते. या व्यासपिठावरून 'शिवरायांचे आठवावे रुप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी' यांसारख्या घोषवाक्यांद्वारे मोर्चेकऱ्यांचा उत्साह दुणावण्याचे काम सुरू होते. मेहेर सिग्नल ते त्र्यंबक नाका मार्गावर दुभाजकाच्या एका बाजूने महिला तर दुसऱ्या बाजूने पुरुष अतिशय शिस्तबध्दरित्या मार्गदर्शन करीत होते. त्यांनी रस्ता सोडून अन्यत्र जाऊ नये यासाठी स्वयंसेवक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. मोर्चात तरुणाईचा लक्षणीय सहभाग असला तरी घोषणा अन हुल्लडबाजीला कोठेही थारा नव्हता. गोल्फ क्लब मैदान गर्दीने तुडूंब भरल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावरच बसून घेतले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बसण्यास जागा न राहील्याने लोकांनी कार्यालयाच्या आवारात धाव घेतली. दुपारी अडीचच्या सुमारास निवेदनाचे वाचन पूर्ण झाले. काहीवेळाने राष्ट्रगीताला सुरूवात झाली. असेल तेथे थांबून प्रत्येकाने राष्ट्रगीत गायले. त्यानंतर लगेगच मराठा बांधवांचा परतीचा प्रवास सुरू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा विद्यार्थ्यांची; तारांबळ पालकांची

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कला संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकला परीक्षेचा पहिला दिवस २४ सप्टेंबरला पार पडला. मात्र, या दिवशी जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चा असल्याने विद्यार्थ्यांना केंद्रस्थळापर्यंत पोहोचविण्यासाठी पालकांची मोठी तारांबळ उडाली. ग्रामीण भागातून शहराकडे येणाऱ्या व शहराच्या मुख्य भागांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर याचा अधिक परिणाम झाल्याचे दिसून आले.

विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने काढलेल्या क्रांती मोर्चासाठी नाशिक जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने गर्दी झाली होती. मोर्चा आणि ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थी व पालकांची तारांबळ उडाली. जिल्ह्यातील ४२ केंद्रांवर सकाळी १० ते ४ यावेळेत ही परीक्षा घेण्यात आली. राज्यस्तरावर एकाचवेळी ही परीक्षा घेतली जात असल्याने केवळ नाशिक जिल्ह्यासाठी ही परीक्षा रद्द करणे शक्य नसल्याचे कला संचालनालयाच्या वतीने कलाशिक्षकांना कळविण्यात आले होते. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांना मोर्च्याला पार करून जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

सकाळी लवकर मोर्च्यासाठी गर्दी जमा झाल्याने ग्रामीण भागातील पालकांना विद्यार्थ्यांना शहरातील केंद्रांवर घेऊन येण्याची शर्यत करावी लागली. त्यामुळे परीक्षा विद्यार्थ्यांची असली तरी तारांबळ पालकांची उडाल्याचे चित्र दिसून आले. २७ सप्टेंबरपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार असून, चार दिवसांत वीस हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौशल्यविकास यात्रा नाशिकमध्ये

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी कौशल्य विकास धोरणांच्या प्रचार प्रसारासोबतच तरुणांपर्यंत या संदर्भातील संधी पोहचविण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील आयसेक्ट कौशल्य विकास यात्रा नाशिकमध्ये होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून २९ सप्टेंबरपर्यंत नाशिकसह महाराष्ट्रातील तरुणांशी संवाद साधला जाणार असल्याची माहिती अभियानाच्या वतीने देण्यात आली.

'आयसेक्ट एनएसडीसी कौशल्य विकास यात्रा २०१६' या उपक्रमांतर्गत कौशल्य विकसनाविषयी देशभरात जागृती करण्यात येत आहे. देशभरातील १९ राज्यांमधील २७५ जिल्ह्यांत यात्रेच्या माध्यमातून कौशल्य विकसनाचे धडे देण्यात येणार आहेत. अवघ्या २२ दिवसांच्या कालावधीत संपूर्ण देशातील तब्बल ४७८ ठिकाणी या यात्रा पोहोचणार आहे. या कालावधीत तब्बल एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा दावाही या अभियानाच्या वतीने करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या 'स्किल इंडिया मिशन' या उपक्रमासंदर्भात युवकांमध्ये जागृती करण्यासोबतच आयसेक्टच्या माध्यमातून कौशल्याच्या क्षेत्रातील उपलब्ध संधी आणि नवनव्या प्रकल्पांची माहिती युवकांना सांगण्याचे उद्दिष्ट या उपक्रमामागे आहे. कौशल्य विकसनाचा थेट परिणाम देशाच्या आर्थिक प्रगतीवर होत असल्याची बाब प्रामुख्याने या उपक्रमातून युवकांच्या लक्षात आणून द्यायची असल्याची माहिती आयसेक्टचे संचालक सिध्दार्त चतुर्वेदी यांनी सांगितले.

१९ राज्यांमध्ये उपक्रम

महाराष्ट्रासोबतच हा उपक्रम मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश पंजाब, गुजरात, झारखंड, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर, ओरिसा, बिहार, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगा, सिक्किम आणि केरळ या १९ राज्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येईल.

देशाच्या अर्थकारणास गती देण्यासाठी तरुणांनी कौशल्य विकसनावर भर द्यावा, यासाठी ग्रामीण भागापासून तर बड्या शहरांपर्यंत कौशल्य विकसनाचा गोषवारा पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून राहील.

- सिध्दार्थ चतुर्वेदी, संचालक, आयसेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहेब, आता कृती हवीच…

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हाधिकारी साहेब, कोपर्डीची संतापजनक घटना घडली त्यावेळीही आम्ही आपल्याला निवेदन दिले होते. त्यास महिना लोटला. मात्र, अद्याप प्रशासनाकडून आणि सरकारकडूनही त्यावर ठोस कारवाइ झाली नाही. आमच्या बहिणीला न्याय हवाय, अशी आर्त मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या मुलींनी केली. त्यांच्या आवाजात आवेश होता अन करारीपणाही. अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग थांबवा किंवा हा कायदाच रद्द करा, अशी आग्रही मागणी या मुलींनी केली.

साक्षी चव्हाण, काजल गुंजाळ, तृप्ती कासार, तुप्ती लोने, रुतुजा लांडगे, रुचिका ढिकले, आणि प्रगती पगार या युवतींनी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन दिले. साक्षी चव्हाण या युवतीने निवेदनाचे वाचन केले. १३ जुलैला कोपर्डीत शाळकरी मुलीवर अमानुष अत्याचाराची व हत्येची माणुसकीला काळीमा फासणारी क्रुर घटना घडली. त्याचीच प्रतिक्रिया आज संपूर्ण राज्यभर उमटत आहे.अन्याय अन्यायच असतो, मग तो कोणत्याही समाजावर होवो. त्याचा निषेध व्हायलाच हवा. यासंयमाचा पुढे उद्रेक होऊ नये व त्याला कोणतेही जातीय वळण लागू नये हाच या संवादामागील आमचा उद्देश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या या राज्यात कुणाच्याही आया-बहिणींना त्यांच्या कुटुंबीयांना यापुढे मान खाली घालावी लागणार नाही. ही संपूर्ण राज्यातल्या प्रत्येक नागरीकाची भावना असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा तासांतच नाशिक पूर्वपदावर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोर्चाला सातारा व कोल्हापूर गादीचे वारस उदयनराजे भोसले व संभाजी राजे भोसले आवर्जून उपस्थित होते. मोर्चेकऱ्यांनी वापरलेली `मी मराठा` असे लिहिलेली गांधी टोपी लक्ष वेधून घेत होती.

मोर्चात प्रथमस्थानी महिला व विद्यार्थिनी तर शेवटच्या स्थानावर राजकीय नेते होते. जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह मंत्री व सर्वपक्षीय नेत्यांनी या मोर्चात सहभाग नोंदवत समाजासाठी एकी दाखवली. मोर्चात वयोवृद्धांसह, अपंग व अंधांचाही सहभाग होता. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, नेता-कार्यकर्ता वकील, डॉक्टर, शिक्षक, नेते, कार्यकर्ते, व्यापारी अशा प्रत्येक घटकाने मोर्चात सहभाग नोंदवला. मविप्र संस्थेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वंयसेवकांची जबाबदारी उत्तमपणे पार पाडली. मोर्चा संपताच परतीच्या वाटेवर असलेल्या मराठ्यांनी स्वयंशिस्त दाखवत, कचरा, प्लॅस्टिक पिशव्या उचलून घेतल्या. त्यामुळे केवळ सहा तासांतच नाशिक पूर्ववत झाले होते. मोर्चेकरांच्या स्वयंशिस्तीमुळे प्रशासकीय यंत्रणा व पोलिसांवरील ताण कमी झाला होता. विशेषतः मोर्चातील महिला व मुलींची सुरक्षा पुरूषांनीच स्वयंप्रेरणेने केली. गोल्फ क्लबवर मोर्चा आल्यानंतर सहा मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिले. मैदानात मुलींनी समाजाच्या व्यथा जनसमुदायासमोर मांडल्या. कोणत्याही नेतृत्वाविना पार पडलेल्या मोर्चाचीच चर्चा दिवसभर संबंध जिल्हाभरात सुरू होती.


चेंगराचेंगरीच्या घटना टळल्या

मोर्चासाठी जनसागर लोटल्याने तीनवेळा चेंगराचेंगरीची शक्यता निर्माण झाली होती. तपोवनात जेथून मोर्चाला सुरूवात झाली, तेथे महिलांचा ओघ अधिक होता. महिलांना प्राधान्याने पुढे सोडण्यात आले. मात्र, गर्दीचा ओघ अधिक असल्यामुळे लोक पुढे जाण्यासाठी जोर लावू लागले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करणाऱ्या स्वयंसेवकांना ही परिस्थिती आटोक्यात आणणे जिकीरीचे ठरले. असाच प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही घडला.

मोबाइलही नॉट रिचेबल

लाखोंच्या संख्येने मोर्चेकरी या मोर्चात दाखल झाल्याने सर्वच कंपन्यांची मोबाइल सेवा विस्कळीत झाली. मोबाइल टॉवरच्या क्षमतेपेक्षा अधिक लोड निर्माण झाल्याने मोबाईल सेवा ठप्प झाली. त्यामुळे मोबाइल नॉट रिचेबल झाले. व्हॉटस अॅपही स्लो असल्याने गैरसोय झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images