Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दप्तर गहाळ, नागरिकांचे हाल!

0
0

वाडी बु. ची सन २०१० पूर्वीची कागदपत्रे मिळेनात

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील हिंगळवाडी ग्रुपग्रामपंचायतमधील जुने उतारे व नमुने गहाळ झाल्यामुळे नागरिकांना मोठी अडचणी निर्माण झाली आहे. तत्काळ या प्रकारची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कळवण तालुक्यातील वाडी बु. ग्रामपंचायत अंतर्गत असोली, एकलहरे गाव येत असून, जुने उतारे नोंदी नसल्याचे आढळून आले आहे. फक्त २०१० पासून कागदपत्रे असल्याची खातरजमा झाली आहे. पंरतु, त्यामागील कागदपत्रे नाही, असे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. ही बाब गांभीर्याची बनली आहे. जुने कागदपत्र मिळत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबली असून, याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्मण झाला आहे.

रामदास देवरे, असोली यांनी ग्रामपंचायतीकडे १९८१ चे उतारे मागितले. पंरतु, ग्रामसेवक यांनी आपल्याकडे मागील काहीच उतारे नसल्याचे सांगितले. मग मागील कागदपत्रे गेली कुठे हा संशोधनाचा विषय बनला आहे. मागील दप्तर गहाळ झाले, तर नवीन दप्तर का केले नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. दप्तर गाळ झाले तर त्याचा पंचनामा का करण्यात आला नाही असा सवाल उपस्थित झाला आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांची देखरेख करण्याचे काम ग्रामसेवकाचे असते. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम गटविकास अधिकाऱ्याचे असते. परंतु, येथे कोणाचे काही घेणे देणे नसल्याचे दिसून आले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामपंचायतीचे कागदपत्रे गहाळ किंवा नष्ट झाली आहेत, तर नवीन कागदपत्रे का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कोट

वाडी बु. ग्रामपंचायतीच्या मागील दप्तरचा शोध घेऊन दप्तर मिळाले नाही तर, दप्तराबाबत चौकशी करून दोषींवर कडक करावी करण्यात येईल.

- तुकाराम सोनवणे, गटविकास अधिकारी

आक्टोबर २०१० पासून येथे हजर झालो त्या वेळी मला दप्तर व नमुने उपलब्ध झाले नसल्यामुळे याबाबत ग्रामपंचायतीत ठरावही करण्यात आला आहे.

- रवींद्र ठाकरे, ग्रामसेवक

दप्तर मिळत नसल्यामुळे शासनाच्या कामात नागरिकांना अडथळा निर्माण झाला आहे. दप्तर तत्काळ उपलब्ध करून द्यावे. मागील दप्तर आले नाहीतर ग्रामपंचायतीला टाळे लावले जाईल.

- रामदास देवरे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देहदानासाठी ७०० नागरिकांचा पुढाकार

0
0

येवल्यात महारक्तदान शिबिरात निश्चय

म. टा. वृत्तसेवा, येवला

महाराष्ट्र शासन आणि नरेंद्राचार्य महाराज सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येवल्यात आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी तब्बल ७०० नागरिकांनी मरणोत्तर देहदानाची तयारी दाखवत सहमतीपत्रक भरून‌ दिले.

जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षपूर्तीनिमित्त श्रीसंप्रदायच्या वतीने सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. त्यानिमित्त राज्यभर ठिकठिकाणी 'महारक्तदान' शिबिरांचे आयोजन केले जात आहे. राज्यातील सर्व शिबिरातून एकूण एक लाख रक्तपिशव्या संकलित करण्याचा संकल्प श्रीसंप्रदायाच्या वतीने करण्यात आला आहे. संकलित झालेल्या या रक्तपिशव्यांपैकी ५० हजार रक्तपिशव्या सीमेवरील सैनिकांकरिता, तर ५० हजार रक्तपिशव्या या गरजूंसाठी राज्यातील शासकीय रक्तपेढ्यांना देण्यात येणार आहेत.

येवल्यातील रक्तदान शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्त देऊन या उपक्रमात सहभाग नोंदवला. यावेळी नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, सुनील शिंदे, प्रभाकर झळके, सचिन शिंदे, प्रमोद सस्कर, प्रभाकर आहिरे आदींसह तालुका श्रीसंप्रदाय सदस्य उपस्थित होते. या शिबिराप्रसंगी येवला तालुक्यातील ७०० नागरिकांनी मरणोत्तर देहदानाचे पत्रक भरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिरुपती-नगरसूल’ रेल्वेगाडी पुन्हा रुळावर

0
0

प्रवाशांकडून निर्णयाचे स्वागत

म. टा. वृत्तसेवा, येवला

प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याच्या कारणास्तव गेल्या महिनाभरापासून बंद पडलेली 'नगरसूल-तिरुपती' ही साप्ताहिक प्रवाशी रेल्वेगाडी पुन्हा एकदा धावण्यास सुरुवात झाली आहे. महिनाभराच्या विश्रांतीनंतर आंध्रातील बालाजींचे तिरुपती अन् साईबाबांचे शिर्डी या दोन धार्मिकस्थळांना जोडणारी 'नगरसूल-तिरुपती' रेल्वे पुन्हा सेवेत दाखल होताना झाल्याने प्रवाशी वर्गाने आनंद व्यक्त केला आहे.

दक्षिण मध्य रेल्वेचे शेवटचे स्थानक असलेल्या येवला तालुक्यातील नगरसूल रेल्वेस्थानकापर्यंत अनेकदा नवीन रेल्वे सुरू होतात अन् प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याचे कारण देत बंद होतात. तशीच गत 'तिरुपती-नगरसूल' या प्रवाशी रेल्वेची झाली होती. गेल्या महिनाभरापासून बंद असलेली ही रेल्वे आता पुन्हा सुरू झाली आहे. साईबाबाची शिर्डी व बालाजीचे तिरुपती या दोन धार्मिकस्थळांना जोडणारी तिरुपती एक्स्प्रेस दाखल झाल्याने प्रवासी, भाविकांसह नगरसूल स्थानकावरून प्रवाशांना शिर्डीला नेणाऱ्या अनेक वाहनचालक, वाहनमालक तसेच ग्रामस्थांनी तिचे जल्लोषात स्वागत केले. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर ही रेल्वे पुन्हा सुरू होताना नगरसूल स्थानकावर आली.

असे असेल वेळापत्रक

आता रेल्वेच्या तिमाही वेळापत्रकानुसार सप्टेंबर, आक्टोबर, नोव्हेंबर या तीन महिन्यांतील दर शुक्रवारी 'तिरुपती-नगरसूल' ही प्रवाशी रेल्वेगाडी सकाळी साडेसात वाजता तिरुपती येथून निघेल व शनिवारी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी नगरसूल स्थानकात येईल. रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी पुन्हा तिरुपतीकडे निघताना तिरुपती येथे सोमवारी रात्री दोन वाजून तीस मिनिटांनी पोहचेल. तिचा मार्ग तिरुपती, रेणुगुंडा, नालगोडा, चेरापली, सिंकदराबाद, उदगीर, लातूर, औरंगाबाद, नगरसूल असा असेल. ही माहिती नगरसूल रेल्वे स्टेशन अधीक्षक हरिष महाले, सह स्टेशनमास्तर अनिल कुमार, बुकिंग क्लर्क मंडल कुमार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर्चे महाराष्ट्राच्या विकासासाठी हानिकारक

0
0

भालचंद्र मुणगेकर यांचे प्रतिपादन; आरक्षणाचे समर्थन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रात सध्या मोर्चांचे पेव फुटले असून ते समाजस्वास्थासाठी अत्यंत हानिकारक आहे. काही दिवसांनी महाराष्ट्राची ओळख ही मोर्चांचे राज्य म्हणून होईल. राज्याची सामाजिक व अार्थिक परिस्थिती जपायची असल्यास अशा मोर्चांना आवर घालणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष व माजी राज्यसभा सद्स्य भालचंद्र मुणगेकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी (दि. २०) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात ज्या मुलीवर बलात्कार होतो त्या समाजातील व्यक्तीच मोर्चे काढतात. दुर्दैवाने इतर समाज पुढे येत नाही. त्याकरीता सर्व सामाजाने पुढे येऊन त्या घटनेचा निषेध करायला हवा. मोर्चे काढून काही साध्य होत नाही. या मोर्च्यांमुळे महाराष्ट्राला उदारमतवादी व पुरोगामी म्हणावे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. एक समाज काही कारणामुळे मोर्चा काढतो, त्यावर दुसरा समाज प्रतिमोर्चा काढतो. यातून सामाजिक समतोल बिघडते आहे असे मला वाटते. या बाबींची सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्षांनीही गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कोपर्डीत ज्या मुलीवर बलात्कार झाला त्या गावातील सर्व दलितांनी गुन्हागाराला फाशी व्हावी असे स्टॅम्प पेपरवर लिहून दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

आरक्षणाला विरोध नाही

आरक्षणाच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, आमचा आरक्षणाला विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण आर्थिक निकषावर मिळावे ही आमची इच्छा आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्यास आरक्षणाच्या यादीत फक्त ब्राह्मण राहतात त्यांनादेखील आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे, असा आमचा आग्रह आहे. मोर्चांनी सरकारवर दबाव आणून परिस्थिती बदलणार नाही, असे त्यांनी सांगितले. अॅट्रॉसिटी कायद्याबाबत त्यांनी, हा कायदा रद्द करता येणार नसल्याचे मत व्यक्त केले. मात्र या कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर होत असेल तर तो सामाजिक गुन्हा आहे, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसामुळे जनजीवन विस्कळीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवसभर ढगाळ हवामान, पावसाची रिपरिप यांमुळे मंगळवारी शहरवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले. कधी संततधार, कधी भुरभुर, कधी उघडीप यांमुळे नागरिकांची दैना उडाली.

काही आठवड्यांपासून गायब झालेला पाऊस शुक्रवारपासून पुन्हा नाशिकमध्ये परतला आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत १५८. ६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. एकट्या पेठ तालुक्यात ६९ मिलीमीटर पाऊस झाला. त्याखालोखाल दिंडोरीत ३५, इगतपुरीत २९, सुरगाण्यात १९ मिलीमीटर पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर, नाशिक, निफाड आणि कळवण तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. मालेगाव, नांदगाव, चांदवड, बागलाण, देवळा, सिन्नर आणि येवला तालुक्यात मात्र हा पाऊस झाला नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात १ जून ते २० सप्टेंबर २०१५ या कालावधीत ९,६७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. म्यंदा १४ हजार ८८७ मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरी ९९२.५ मिलीमीटर (९२.३७) टक्के पावसाची नोंद झाली आहे.

शहरात ९८४.२ मिमी पाऊस

शहरात १ जूनपासून आतापर्यंत ९८४.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी कमाल तापमान २५.८ अंश सेल्सियस तर किमान तापमान २१.८ अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले. सोमवारी सकाळी साडे आठ ते मंगळवारी सकाळी या २४ तासांत शहरात ७.३ मिमी पावसाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हक्कांबाबत जागरूक राहा

0
0

ग्राहक जनजागृती शि‌बिरातील तज्ज्ञांचे आवाहन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बदलत्या जीवनशैलीमुळे खाद्यपदार्थांपासून दैनंदिन वापराच्या अनेक उत्पादनांसाठी आपण विक्रेत्यांवर अवलंबून असतो. त्यासाठी पैसे मोजतो. त्यामुळे ग्राहक म्हणून आपण आपल्या हक्कांविषयी जागरूक राहायलाच हवे, असे आवाहन मंगळवारी (दि. २०) ग्राहक जनजागृती शिबिरातील तज्ज्ञांनी केले.

राज्याचा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेने 'ग्राहक फसवणूक विरुद्ध जनजागृती' शिबिराचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या शिबिराला मान्यवर म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके, जिल्हा धान्य वितरण अधिकारी सुभाष भाटे, संस्थेचे पदाधिकारी दिनेश भंडारे, स्टिव्हन फर्नांडिस, आनंदिता कोहूर आदी उपस्थित होते.

या वेळी भंडारे म्हणाले, भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेने ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी काम करताना मेडिएशन सेंटर सुरु केले आहे. न्यायालयीन प्रक्रियेतील वेळ वाचवितानाच येथे तक्रारदार व उत्पादक कंपन्यांमध्ये तडजोडीचा मार्ग वापरला जातो. ग्राहकांनी पॅकबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना अॅगमार्क असलेले पदार्थ घेणे, इलेक्ट्रिकल साहित्यासाठी बीईई रेटींग पाहणे, आय.एस.आय. मार्कची उत्पादने खरेदी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. ग्राहकांनी फसवणूक झाल्यास योग्य ठिकाणी दाद मागावी असे यावेळी आवर्जून सांगण्यात आले. आपल्या अडचणी आणि प्रश्नांबाबत माहितीसाठी संस्थेचा टोल फ्री क्रमांक १८००२२२२६२ या क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले.

आर्थिक गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी याबाबत फर्नांडिस यांनी मार्गदर्शन केले. तसेच विमा, म्युच्युअल फंड आदी सुरक्षित गुंतवणूक पर्यायाबाबतही माहिती देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा मोर्चाला आध्यात्मिक संप्रदायाचे बळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्त्या करण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी जिल्हाभरातील मराठा समाजबांधव रस्त्यावर उतरणार असून, त्यांना आता धार्मिक आणि आध्यात्मिक संस्थांचे पाठबळही मिळू लागले आहे.

मराठा समाजाकडून राज्यभरात मूक मोर्चांचे आयोजन केले जात आहे. सरकारचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरून विराट मोर्चात सहभागी होत आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली मोर्चाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या मोर्चात सहभागी होणार असल्याने सिंहस्थापेक्षाही काटेकोर नियोजन करण्याकडे आयोजकांसह प्रशासनानेही भर दिला आहे. मोर्चाला कुठल्याही परिस्थितीत गालबोट लागू नये, शांततेतच मोर्चाचा समारोप व्हावा यासाठी सूक्ष्म नियोजन केले जाऊ लागले आहे. मोर्चेकऱ्यांकडून शांतता आणि संयमाचा परिचय दिला जात असल्याने विविध सामाजिक संघटनांचे त्याकडे लक्ष वेधले जाऊ लागले आहे. त्यामुळे या मोर्चाला विविध स्तरातून पाठिंबा लाभतो आहे. इतकेच नव्हे, तर अशा अनेक संघटनांनी मोर्चाच्या आयोजनातही सहकार्य देऊ केले आहे. एकीकडे वकील, इंजिनीअर्स, डॉक्टर्स असे सर्वच स्तरांतील घटक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. आता जिल्ह्यातील धार्मिक आणि आध्यात्मिक संघटनांनीही मराठा समाजाच्या मोर्चाला पाठबळ देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शांतिगिरी महाराज यांचा भक्तपरिवार, जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने या मूक मोर्चाला पाठिंबा दिला असून, ते शनिवारी या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. अध्यात्माच्या मार्गावर चालणारा मोठा भक्तपरिवार नाशिक जिल्ह्यात असून, तो सहभागी झाल्यास मोर्चाची ताकद वाढणार आहे.

अण्णासाहेब मोरे यांच्या गुरूमाऊली सेवेकरी संप्रदायाने या मोर्चाला अद्याप पाठिंबा जाहीर केला नसला तरी त्यांचा मोठा भक्तपरिवार मराठा समाजातील आहे. त्यामुळे ते या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

जाट आरक्षण समितीचाही पाठिंबा

अखिल भारतीय जाट आरक्षण संघर्ष समितीने मराठा क्रांती मूक मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष यशपाल मलिक यांच्या अध्यक्षतेखाली शहरात नुकतीच बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शांताराम लाठर यांच्यासह अनेक पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. मराठा समाज व जाट समाजाची आरक्षणाची स्थिती देशात एकसमानच असल्याने या मोर्चाला पाठिंबा देणे नैतिक कर्तव्य असल्याचे या समितीने म्हटले आहे.

पुण्यतिथीचा कार्यक्रम ढकलला पुढे

जोग महाराज भजनी मठाधिपती व वारकरी पंथाचे आधारस्तंभ माधव महाराज घुले यांच्या मातोश्रींची पुण्यतिथी शनिवारी २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेची होती. मात्र, मराठा क्रांती मोर्चामुळे या कार्यक्रमाची वेळ दुपारी चारची ठेवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनंजय मुंडे करणार पाण्यासाठी उपोषण

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्याप्रमाणे पाणी न सोडल्यास शेतकरी हितासाठी आपण स्वतः उपोषणाला बसू, असे आश्वासन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिले. ते धुळ्यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधत होते.

धनजंय मुंडे हे बुधवारी धुळ्यातील शासकीस विश्रामगृहात आले होते. त्यांनी शेतकऱ्यांकडून अक्कलपाडा प्रकरणी मंगळवारी घडलेल्या घटनेची माहिती घेऊन जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलन केले होते. त्यांचा आंदोलनाचा पवित्रा बरोबर होता. परंतु, काही जणांमुळे आंदोलनास गालबोट लागले आणि दगडफेक झाली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांची सुटका होण्यासाठी प्रशासनाने मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी दिलीप पाढंरपट्टे यांनी आश्वासन दिले आहे की, येत्या ३० सप्टेंबरला डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येईल. त्यानुसार पाणी सोडले नाही, तर आपण स्वत: पाण्यासाठी उपोषण करू, असा इशारादेखील धनंजय मुंडे यांनी दिला.
याप्रसंगी उपस्थित असलेले शेतकरी व ग्रामस्थांनी पाण्यासंदर्भातील जोरदार मागणी केली. तसेच कालच्या आंदोलनप्रसंगी प्रशासनाने जी कठोर कारवाई केली त्याबाबत काहींनी नाराजी व्यक्त केली. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे, जि. प. सभापती किरण पाटील, युवा नेते अनिकेत पाटील आदी उपस्थित होते.

जखमी आंदोलकांवर रुग्णालयात उपचार

अक्कलपाडा धरणाचा डावा कालवा सुरू करण्यासाठी मंगळवारी झालेल्या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी ७६ आंदोलकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. यापैकी सहा ते सात आंदोलक जखमी असून, त्यांच्यावर शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार चालू आहेत.

शिवसेनेकडून घटनेचा निषेध

या घटनेच्या संदर्भात शिवसेनेने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अक्कलपाडा प्रकल्प आजही अपूर्ण स्थितीत आहे. शिवसेनेने वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे या प्रक्लपातील डाव्या कालव्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले. उर्वरित १० टक्के कामासाठी व सय्यदनगर येथील ३० ते ३५ घरांच्या पुनर्वसनाचा विषय तत्काळ मार्गी लावून अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले जाऊ शकते. त्यानंतर डाव्या कालव्यातून शेतीला पाणी मिळू शकते मात्र, ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या दबावाला बळी पडणा-या प्रशासनाने आंदोलन करणा-या शेतक-यांवर लाठीचार्ज केला ही बाब निंदनीय असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठा मोर्चाला विविध समाजांतर्फे पाठिंबा

0
0

टीम मटा नाशिक

नाशिक शहरात शनिवारी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात विविध समाज, संघटनांतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. विविध समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचाही निर्णय घेतला आहे.

'शिंपी समाजोन्नती'तर्फे पाठिंबा

नाशिक ः मराठा क्रांती मोर्चास शहरातील शिंपी समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. नाशिक प्रांतिक नामदेव शिंपी समाजोन्नती संस्थेचे प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर यांच्या अध्यक्षततेखाली झालेल्या बैठकीत ठराव करून हा निर्णय घेण्यात आला. या वेळी प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंपी, सरचिटणीस सतीश भांबारे, कैलास निरगुडे, संजीव तूपसाखरे, दत्ता वावधाने, रत्नाकर लुंगे, सुभाष लचके, सचिन निरगुडे, रवींद्र रहाणे, प्रवीण पवार, योगेश वारे आदी उपस्थित होते.

वारकरी मंडळाचा पाठिंबा

शहरात शनिवारी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला अखिल भारतीय वारकरी मंडळाने पाठिंबा दर्शविला आहे. यासाठी वारकरी मंडळाकडून नुकतेच एक पत्रक काढण्यात आले. त्यात ही माहिती देण्यात आली. मराठा क्रांती मोर्चासाठी वारकरी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, प्रदेशाध्यक्ष शिवाजी महाराज देशमुख येणार असल्याचीही माहिती यात देण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत चुंचाळे येथील वारकरी शिक्षण संस्थेत होणार आहे. जनार्दन काकडे, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब महाराज आहेर यांनी ही माहिती दिली.

कोळी समाजाचा पाठिंबा

त्र्यंबकेश्वर ः मीटिंग सुरू असताना तेली समाज, ब्राह्मण, महादेव कोळी, ठाकूर, नाभिक समाज, कांदडी समाजांनी निवेदन देऊन मोर्चास पाठिंबा जाहीर केला आहे. या वेळी उपनगराध्यक्ष संतोष कदम, मधुकर लांडे यांनी उपस्थित होते. बैठकीत मोर्चाच्या दिवशी शहर व तालुक्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे ठरविण्यात आले.

आज प्रचार रॅली

पंचवटी : मराठा क्रांती मोर्चाच्या प्रचारासाठी २३ सप्टेंबर रोजी नांदूर नाका येथून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी आठला निघणारी ही प्रचार रॅली नांदूरगाव, मानूरगाव, विडी कामगार वसाहत, माडसांगवी, आडगाव, कोणार्कनगर येथे जाणार आहे. आडगाव येथील प्रचार रॅली मविप्र संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयापासून निघणार आहे. ही रॅलीही सकाळी आठला निघेल.

मारवाडी, गुजराती समाजाचा पाठिंबा

मराठा क्रांती मोर्चाला अखिल भारतीय मारवाडी, गुजराती समाजाचा पाठिंबा असल्याची माहिती अखिल भारतीय मारवाडी, गुजराती मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित बागमार यांनी पत्रकाद्वारे दिली. मोर्चाला आमच्या समाजाचा पाठिंबा असून, या मोर्चाचे दिव्य संघटन व एकजुटीचा इतर समाजाने आदर्श घ्यावा, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. पत्रकावर दिग्विजय कापडिया, प्रदीप बूब, कमलेश लुणावत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आमदार गावितही सहभागी होणार

त्र्यंबकेश्वर ः मराठा क्रांती मोर्चात आमदार निर्मलाताई गावित सहभागी होणार असून, त्यांनी मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. मोर्चास आमच्या गावित कुटुंबीयांकडून पूर्णपणे पाठिंबा असून, मोर्चात आम्ही सहकुटुंब सहभागी होणार असल्याची माहिती आमदार गावित यांनी सांगितले. आमदार गावित म्हणाल्या, की कोपर्डी येथे झालेली घटना मानवतेला काळिमा फासणारी असून, या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात शनिवारी (दि. २४) प्रस्तावित असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दहा ठिकाणी नो व्हेईकल झोन जा‌हीर केले आहे. तर मूक मोर्चासाठी येणाऱ्या मराठा समाजबांधवांच्या वाहनांसाठी पार्किंगची सात ठिकाणे निश्चित झाली आहेत.

१. मालेगांव-बागलाण

देवळा-चांदवड-पिंपळगाव-ओझर :

या मार्गावरून येणाऱ्या वाहनांना रासबिहारी स्कूल येथून डावीकडे वळून नीलगिरी बाग येथील जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

२. दिंडोरी-कळवण

या मार्गावरील वाहनांना मार्केट यार्ड-दिंडोरी रोड- महालक्ष्मी टॉकीज समोर व मेरीच्या जागेत पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानंतर आंदोलनकर्त्यांना पायी तपोवनात जायचे आहे किंवा पंचवटी करंजा येथे मोर्चात सहभागी होता येणार आहे.

३. पेठ-हरसूल-गिरणारे-मखमलाबाद
वरील मार्गावरून येणाऱ्या वाहनांना शरदचंद्र पवार बाजार समिती, आरटीओ समोर वाहने पार्क करून तपोवनात यायचे आहे.

४. निफाड-येवला-नांदगाव-लासलगाव-चांदोरी-सायखेडा
मुख्यतः औरंगाबाद हायवेने येणाऱ्या वाहनांना हॉटेल मिर्ची येथून डावीकडे वळून जय शंकर फेस्टीव्हल लॉन्स (जेजुरकर मळा) येथील मैदनात पार्किंग करावे लागेल.

५. सिन्नर-भगूर-देवळाली-नाशिकरोड
या मार्गावरील वाहने पुणे रोडने विजय-ममता टॉकीजपासून उजवीकडे वळून तपोवन रस्त्याने मारुती वेपर्स चौकातून लक्ष्मीनारायण पुलाशेजारील गोदावरी नदीच्या दक्षिणेकडील मैदानात पार्किंग करतील.

६. त्र्यंबकेश्वर मार्ग
या मार्गावरून येणारी वाहने अंबड टी पाँईट, पपया नर्सरी येथून उजव्या बाजूकडे वळून अंबड लिंकरोडने एक्सलो पाँईटवरून गरवारे टी पाँईट येथे पोहचतील. यानतंर उजव्या रॅमने चढून वाहने उड्डाणपुलावर येतील. ही वाहने द्वारका येथे उतरतील. येथून पंचवटी कॉलेज येथे उजव्या बाजुला वळतील. पुढे तपोवन रस्त्याने आठवन लॉन्स येथे डाव्या बाजूला वळून चव्हाण मळ्यातील मैदनात पार्किंग करतील.

७. इगतपुरी-घोटी मुंबई आग्रा हायवेने मोर्चासाठी येणारे समाजबांधव हे उड्डाण पुलावरून द्वारका चौकात खाली उतरतील. येथून मार्ग़े येणारी वाहने मुंबई-आग्रारोडने फ्लाईओवर वरून द्वारका चौकात खाली उतरून हायवे पंचवटी कॉलेज येथे उजव्या बाजुला वळतील. पुढे तपोवन रस्त्याने आठवण लॉन्स येथे डाव्या बाजूला वळून चव्हाण मळ्यातील मैदानात पार्किंग करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायीचा विकासाला खो!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या बांधकाम व्यवसायाची वर्षभरापासून सुरू असलेली कोंडी फोडण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना स्थायी समितीने गुरूवारी खो घातला. प्रशासनाने युद्धपातळीवर खतप्रकल्पाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवल्यानंतर त्याला तत्काळ मंजुरीची अपेक्षा होती. मात्र, शहरातील बांधकाम व्यवसायाची कोंडी सोडविण्याबाबत गंभीर नसलेल्या सदस्यांनी 'अभ्यासा'साठी खत प्रकल्पाच्या खासगीकरणाचा विषय तहकूब ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहर विकासाबाबत सदस्यांच्या या अनास्थेची चर्चा आता अधिकाऱ्यांसह बिल्डरांमध्ये रंगली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये खत प्रकल्पातील अनास्थेमुळे शहरातील नवीन बांधकामांवर राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) बंदी घातली होती. खत प्रकल्प बंद असल्याने नवीन बांधकामे करू नका, असे 'एनजीटी'ने आदेशित केले होते. त्यामुळे कपाटामुळे अगोदरच अडचणी आलेला बांधकाम व्यवसाय 'एनजीटी'च्या आदेशाने पुरता ठप्प झाला. खत प्रकल्प कार्यान्वित होत नाही; तोपर्यंत बंदी न उठविण्याची भूमिका कोर्टाने घेतली होती. त्यामुळे खत प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी 'जीआयझेड'शी चर्चा करून हा प्रकल्प मार्गी लावण्याचा तसेच त्याची दुर्दशा करणाऱ्यांची चौकशी प्रस्तावित केली होती. त्यांच्या बदलीनंतर आलेल्या अभिषेक कृष्णा यांनीही 'एनजीटी'ला आदेशाला प्राधान्य देत, खत प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले.

दोन महिन्यांच्या प्रयत्नांनतर कृष्णा यांनी खत प्रकल्पाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला. संबंधित प्रकल्प हा पुण्याच्या मेकॉन आयकॉस कंपनीला ३० वर्षे चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. गुरुवारच्या बैठकीत संबंधित हा प्रस्ताव मंजूर होऊन प्रकल्प लवकर कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा प्रशासनाला होती. मात्र, सभेत घडलेच उलटेच. सदस्यांनी अमरधामच्या ३७ लाखांच्या ठेक्यावर तब्बल दीड तास चर्चा केली. या ठेक्याची चिरफाड करतांना भरपूर वेळ घेतला. परंतु, दुसरीकडे शहराच्या विकासाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या खत प्रकल्प खासगीकरणाकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केल्याने सदस्यांच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तहकुबीचे 'राज' काय?
गुरूवारी हा प्रस्ताव मंजूर झाला असता, तर प्रशासनाने तत्काळ प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी संबंधित कंपनीसोबत करार केला असता. त्यामुळे लवकर हा प्रकल्प मार्गी लागला असता. मात्र, या बैठकीत अधिक अभ्यासासाठी हा विषय तहकूब ठेवून विशेष सभेची मागणी करण्यात आली. त्यामुळे या प्रस्तावाचा मार्गही घंटागाडी ठेक्याप्रमाणेच होतो की, काय असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमधील वाहतुकीत बदल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातून जाणाऱ्या अवजड व शहरांतर्गत फिरणाऱ्या वाहनांच्या मार्गात लक्षणीय बदल करण्यात आला आहे. मूक मोर्चासाठी लाखो मराठा समाजबांधव हजेरी लावण्याची शक्यता असून, शनिवारी आंदोलनकर्ते माघारी फिरेपर्यंत वाहतुकीतील बदल लागू असणार आहे.

मोर्चातील वाहने वगळून इतर वाहनांना व अवजड वाहनांना खालील मार्गांचा अवंलब करावा लागेल.

- औरंगाबादकडून पुणे व मुंबई बाजूकडे जाणारी अवजड वाहने नांदूर नाका, जेल रोड, बिटकोमार्गे नाशिक रोडकडून पुण्याकडे व नाशिक रोड, तसेच सम्राट कॉर्नर येथून डावीकडे वळून डीजीपीनगरमार्गे वडाळा गाव व पुढे पाथर्डी फाटा, मुंबईकडे जातील.

- औरंगाबादकडून धुळे बाजूकडे जाणारी अवजड वाहने नांदूर नाकामार्गे हॉटेल जत्रा व पुढे धुळ्याकडे जातील.

- धुळे बाजूकडून पुणे व मुंबईकडे जाणारी अवजड वाहने जत्रा हॉटेलमार्गे नांदूर नाका, जेलरोड, बिटकोमार्गे पुण्याकडे जातील, तर मुंबईकडे जाणारी वाहने सम्राट कॉर्नर येथून डावीकडे वळून डीजीपीनगरमार्गे वडाळा गाव व पुढे पाथर्डी फाटा असे जातील.

- दिंडोरी बाजूकडून धुळे, औरंगाबाद, पुणे व मुंबईकडे जाणारी अवजड वाहने हे आरटीओ कॉर्नरमार्गे रासबिहारीमार्गे धुळे बाजूकडे जातील. औरंगाबाद, पुणे व मुंबईकडे जाणारी अवजड वाहने हे जत्रा हॉटेलमार्गे नांदूर नाका येथून औरंगाबादकडे तर बिटको चौकातून पुणेच्या दिशेने जातील. मुंबईकडे जाण्यासाठी सम्राट कॉर्नर येथून डावीकडे वळून डीजीपीनगरमार्गे वडाळा गाव व पुढे पाथर्डी फाटा असे जातील.

- पेठ बाजूकडून धुळे, औरंगाबाद, पुण्याकडे जाणारी अवजड वाहने पेठ रोड, राऊ हॉटेल, म्हसरूळ, आरटीओ कॉर्नर, रासबिहारमार्गे नांदूर नाका येथे जातील. तर, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी शरद पवार मार्केट चौकातून उजवीकडे वळून ड्रीम कॅसल सिग्नल, चोपडा लॉन्स, गंगापूर नाका सिग्नल, जेहान सिग्नल, बारदाण फाटा व तेथून डावीकडे वळून अंबड टी पॉइंट येथून हायवेला जातील.

- गंगापूर रोडने मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना बारदाण फाटा येथे डावीकडे वळून अंबड टी पॉइंट येथून गरवारेमार्गे मुंबईकडे जाता येईल. तर, धुळे, औरंगाबाद, पुणेकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी गंगापूर नाका, चोपडा लॉन्स, ड्रीम कॅसल सिग्नल, मखमलाबाद रोडने शरदचंद्र पवार मार्केट, आरटीओ कॉर्नर, रासबिहारी स्कूल व जत्रा हॉटेल असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

- त्र्यंबकेश्वरकडून औरंगाबाद, धुळेच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना अंबड टी पॉइंटवरून गरवारे व उड्डाणपुलावरून इतरत्र जातील. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी पाथर्डी फाटा, वडनेरगेट, विहीतगाव, बिटको चौक मार्गे पुण्याकडे जावे.

-मुंबईकडून धुळ्याकडे जाणारी वाहने उड्डाणपुलाचा वापर करतील. तसेच पुण्याकडे जाणारी वाहने ही पाथर्डी फाटा, वडनेर गेट, विहीतगाव, बिटको चौक मार्गे पुण्याकडे मार्गस्थ होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांच्या सोयीसाठी बसमार्गांमध्ये बदल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठा क्रांती मोर्चामुळे बस प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने मार्गात बदल केला आहे. तर जुने व नवीन सीबीएस हे बस स्थानक मोर्चाकाळात बंद राहणार आहे. त्याऐवजी महामार्ग बसस्थानकावरून पुणे, मुंबई बसेससाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तर डोंगरे वसतिगृह मैदानावर तात्पुरते स्वरुपाचे बसस्थानक होणार आहे. शहर बससेवेसाठी सुध्दा सहा विविध ठिकाणांहून जादा बसेस सुटणार आहेत.

डोंगरे वसतिगृह मैदान येथून बसेस चोपडा लॉन्स, रासबिहारी शाळा मार्गे बस पाठविल्या जाणार आहे. मालेगाव, मनमाड, ओझर, पेठ, सटाणा, कळवण, पिंपळगाव, मनमाड, नांदगाव, येवला मार्ग असणार आहे. पुणे येथून जाणाऱ्या सर्व बसेस महामार्ग बसस्थानकावरून सुटतील. मुंबई, पुण्यासह धुळे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मीनाताई ठाकरे स्टेडियमजवळ बस थांबविली जाणार आहे. साक्री, नंदुरबारकडून पुणेकडे जाणाऱ्या बसेस द्वारका पूलावरून उतरतील. नगर ते सेलवास जाणाऱ्या बसेस नाशिकरोड, पाथर्डी रोड मार्गे अंबड लिंकरोडने त्र्यंबककडे जातील.

प्रवाशांसाठी बससेवा
मोर्चकरी व प्रवाशी यांच्यासाठी सकाळी ६ वाजेपासून मोर्चा सुरू होईपर्यंत महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी गरजेनुसार बससेवा ठेवण्यात आली आहे. त्यात नाशिकरोड ते तपोवन मार्गे नांदूर नाका, नाशिकरोड ते द्वारका मार्गे तपोवन, भगूर ते द्वारका मार्गे तपोवन, श्रमिकनगर ते तपोवन, उत्तमनगर ते तपोवन, ओझर ते तपोवन अशा बसेस असणार आहे.

परतीसाठीही बससुविधा

महामार्ग बस स्थानकावरून तपोवन, सिन्नर, नाशिकरोड, ओझर येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी शहर बस वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मायको सर्कल व डोंगरे वसतिगृह येथून सातपूर श्रमिकनगर, उत्तमनगर, गिरणारे मार्गावरुन जाणाऱ्या प्रवाशांसाठी बस वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

शहर बससेवेवर परिणाम
मोर्चामुळे शहरातील बससेवेवर थेट परिणाम होणार असून त्याचे नियोजन वेळवरच केले जाणार आहे. मोर्चाला किती वेळ लागतो व कोणते मार्ग अगोदर मोकळे होतात यावर हे नियोजन असणार आहे. पोलिसांनी काही मार्गावर वाहतूक बंद केल्यामुळे ती सुध्दा बससेवेला सुरू ठेवण्यात अडचण होणार आहे. तसेच मोर्चा केव्हा सुरू होतो व केव्हा संपतो, सुटल्यानंतर रस्त्यावरून गर्दी कशी असते, याचा अंदाज घेतल्यानंतर वेळेवर बसचे नियोजन होणार आहे.

मार्गदर्शनासाठी नियंत्रक
मोर्चाला जिल्ह्यातून होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होणार आहे. या सर्वांचा अंदाज घेऊन हे बदल केल्याचे पत्रकच एसटीमहामंडळाने जारी केले आहे. प्रवाशांना मार्गदर्शनासाठी द्वारका चौक, मिनाताई ठाकरे स्टेडियम, मायको सर्कल व बिटको चौक येथे वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून प्रवाशांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडला शनिवारी लिलाव बंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नाशिक येथील मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चांदवड येथील बाजार समितीत शेतीमालाचे लिलाव व खरेदी-विक्री बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर यांनी दिली.

मोर्चात विविध जिल्ह्यांतून समाजबांधव येणार असून, मुंबई-आग्रा महामार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार आहे. चांदवड बाजार समिती या महामार्गालगत असल्याने शेतीमाल आणताना शेतकरी वर्गाला अवघड होणार आहे. वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. वेळीच लिलाव करणे अशक्य असून, लिलावात सहभागी होणारे घटक मोर्चात सहभागी होणार असल्याने शनिवारी लिलाव बंद ठेवावेत, अशी मागणी समितीकडे यापूर्वी करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. कुंभार्डे, आहेर यांनी सांगितले. मुख्य बाजार, वडनेरभैरव उपबाजार, रायपूर खरेदी-विक्री केंद्र शनिवारी बंद राहील, असे चांदवड बाजार समितीतर्फे कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारसायकल रॅलीने केली वातावरणनिर्मिती

0
0

टीम मटा

नाशिकसह जिल्हाभरात मोटारसायकल रॅलीने मराठा क्रांती मोर्चाची वातावरणनिर्मिती करण्यात आली. पाथर्डी, सातपूरसह मालेगाव दाभाडीत रॅलींमध्ये हजारो तरुणाईने सहभाग नोंदवला. रॅलीत भगव्या ध्वजांनी नागरिकांचे लक्ष वेधले.

मालेगाव दाभाडीत रॅली

मालेगाव ः नाशिक येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागृतीसाठी दाभाडीत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तनिष्का निकम हिच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुभाष निकम यांनी मोर्चाबाबत मार्गदर्शक सूचना केल्या व नियोजनाबाबत माहिती स्पष्ट केली.

मोर्चाच्या पूर्वनियोजनासाठी यापूर्वी दाभाडीत तीन ते चार बैठकी घेण्यात आल्या होत्या. शिवाजी पुतळा ते ग्रामपालिका कार्यालय, नवीन गाव, न्यू प्लॉट, जवाहरनगर, इंदिरानगर, गिसाका, रोकडोबानगर, पाच डिव्हिजन असा रॅलीचा मार्ग होता. रॅलीत काळे टी-शर्ट परिधान करण्यात आले होते, तर प्रत्येकाच्या हाती भगवे झेंडे होते. सुमारे पाचशे मोटारसायकलींचा समावेश होता. या वेळी अमोल निकम, हरी निकम, आबा सोनवणे, पुरुषोत्तम निकम, मंगेश निकम, सुधाकर निकम, विजय निकम, किशोर निकम, संजय निकम, अंबू निकम, नकुल निकम, बापू निकम, गब्बर निकम, अमोल हिरे, राजेंद्र निकम आदी उपस्थित होते.

त्र्यंबकेश्वर येथे बैठक

त्र्यंबकेश्वर ः त्र्यंबकेश्वर येथील जनार्दन स्वामी आश्रमात मराठा क्रांती मूक मोर्चाच्या नियोजनासाठी सभा झाली. या वेळी माजी खासदार देविदास पिंगळे यांनी मोर्चाचा उद्देश समजून सांगितला. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात यावी, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबविणे व महिलांच्या सुरक्षिततेसह विविध मागण्यांसाठी शनिवारी मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यांनी दिली.

शहिदांना श्रद्धांजली

दरम्यान, काश्मीरमधील उरी येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व कोपर्डी प्रकरणात बळी ठरलेल्या मुलीस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्रांती मोर्चाची नोंदणी करा ऑनलाइन!

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. हिंगोलीपासून सुरू झालेल्या या मोर्चाचे राज्यभरात अनेक ठिकाणी आयोजन केले गेले आहे. शनिवारी (२४ सप्टेंबर) नाशिकमध्येही मराठा क्रांती मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मोर्चाची पार्श्वभूमी सर्वांपर्यंत पोहोचावी, तसेच सर्वांना यात सहभागी करून घेता यावे, यासाठी आता अॅपची मदत घेतली जात आहे.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे अॅप तयार करण्यात आले आहे. अँड्रॉइड मोबाइल, तसेच स्मार्टफोन असणाऱ्यांना या अॅपचा वापर करून घेता येणार आहे. गुगल मार्केटवर उपलब्ध असलेल्या मराठा क्रांती मोर्चा अॅप बहुतांश लोकांनी डाऊनलोड केले आहे. १२ सप्टेंबर रोजी हे अॅप गुगल प्लेवर अपलोड करण्यात आले होते. आतापर्यंत झालेल्या सर्व मोर्चांमध्ये या अॅपचा सहभागासाठी वापर करण्यात आला होता. नाशिकमध्ये शनिवारी होत असलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन म्हणून या अॅपची लिंक शेअर केली जात आहे. गुगल प्लेमधून अॅप डाऊनलोड केल्यानंतर नाव, नंबर आणि मोर्चात सहभागी होणाऱ्या शहराचे नाव टाकायचे आहे. यानंतर 'आय सपोर्ट' म्हंटल्यावर आतापर्यंत झालेल्या व होणार असलेल्या मोर्चांची यादी अॅप युजरला दिसते. सहभागी बांधवांचा डाटा मिळवण्यासाठी या अॅपचा टेक्नॉसॅव्ही वापर करून घेतला जात आहे. नाशिकनंतर इतरही मोर्चांसाठी या अॅपचा वापर केला जाणार आहे. संपूर्ण शेड्युल या अॅपवर देण्यात आले आहे. शहरातील अनेकांनी हे अॅप डाऊनलोड करून मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. अॅपसोबतच ७६२०९००३०० या क्रमांकावर मिस-कॉल देऊनही आपला सहभाग नोंदवता येत आहे.

मॅपद्वारे सहभागाची माहिती

मराठा क्रांती मोर्चात सहभाग कसा असावा, याबाबतची माहिती अॅप डाऊनलोड करताना मॅपद्वारे दर्शवली जात आहे. त्यानुसार मोर्चात, 'विद्यार्थिनी- महिला- महिला नेत्या- विद्यार्थी- युवक- राजकीय नेते- स्वच्छता कार्यकर्ते- नियोजन कार्यकर्ते' अशा पद्धतीने सहभाग असावा असे सांगण्यात आले आहे.


अॅपमध्ये नियमांची माहिती

- इतर नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
- मोर्चात सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नये.
- मोर्चात कोणत्याही घोषणा देऊ नये.
- शिस्तीचे पालन करावे.
- पोलिस व इतर समाजार्थींसोबत सहकार्याने वागावे.
- अफवांवर विश्वास ठेवू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर्चासाठी पोलिसही सज्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी तगड्या बंदोबस्ताचे नियोजन आखले आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. दादासाहेब गायकवाड सभागृहात गुरुवारी पोलिसांचे मार्गदर्शन शिबिर झाले. त्यात पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले.

मराठा क्रांती मोर्चासाठी लाखो समाजबांधव एकत्र येण्याची शक्यता आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असेल. यासाठी शहर पोलिसांनी चार पोलिस उपायुक्त, पाच सहाय्यक पोलिस उपायुक्त, २६ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ९७ सहायक पोलिस निरीक्षक, तसेच पोलिस उपनिरीक्षक, ८४६ पोलिस कर्मचारी, तसेच २५२ महिला पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात केला आहे. याव्यतिरिक्त मराठा समाजातर्फे मोठ्या संख्येने स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत. हे स्वयंसेवक पोलिसांना मदत करतील. दरम्यान, मराठा समाजाच्या मोर्चाच्या बंदोबस्ताबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी पोलिस आयुक्त सिंघल यांनी मार्गदर्शन केले. बंदोबस्तासाठी तैनात कर्मचारी वा अधिकाऱ्यांनी काय करावे, तसेच काय करू नये, याविषयी आयुक्तांनी सूचना केल्या. मोर्चावर पावसाचे सावट असून, त्याबाबत पोलिसांनी काय खबरदारी घ्यावी हे या वेळी सांगण्यात आले.

आज रंगीत तालीम

मोर्चाचे आयोजन शनिवारी होणार असून, बंदोबस्ताचे नियोजन पारखण्यासाठी शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शहर पोलिस रंगीत तालीम घेणार आहेत. मॉक ड्रीलच्या माध्यमातून बंदोबस्तात काय सुधारणा करायला हव्यात, याचाही आढावा घेतला जाईल. मॉक ड्रील संपल्यानंतर पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होणार आहे. मॉक ड्रीलमध्ये समोर आलेल्या त्रुटी व जमेच्या बाजू यावर चर्चा करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा मोर्चातून नाशकात ‘अर्थ क्रांती’

0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

राज्यातील इतर शहरांपाठोपाठ नाशिकमध्येही शनिवारी (दि. २४) निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी सुमारे २० लाख येणार असल्याचा अंदाज आहे. जिल्हाभरातून जमणाऱ्या या जनसमुदायाच्या अनेक गरजांसाठी लहान व्यवसाय तेजीत आले आहेत. या मोर्चाच्या निमित्ताने शहरातील अनेक महत्त्वाचे व्यवसाय शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस तेजीत राहणार आहेत.

हॉटेल्स
तपोवन, जुने नाशिक, सीबीएस, मुंबई नाका तसेच मध्य नाशिकमधील अनेक ठिकाणचे हॉटेल्स मोर्च्यासाठी सज्ज झाले आहेत. मार्चाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांनी जेवणाच्या सोयींसाठी दक्षता घेतली आहे. शहरात येणाऱ्या सर्वांना जेवणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्व हॉटेल व्यावसायिकांनी जय्यत तयारी केली आहे. छोटे हॉटेल्स तसेच नाश्ता सेंटरचाही यात समावेश आहे.

लॉजिंग
मोर्चासाठी शहरात मोठा जनसमुदाय येणार म्हणजे त्यांच्या लॉजिंगची सोय असणे महत्त्वाचे असणार आहे. पंचवटी तसेच मध्य नाशिकमधील अनेक लॉज शुक्रवारपासूनच बुक करण्यात आले आहेत. तसेच हॉटेल व्यवसायिकांसोबत लॉज मॅनेजर्सदेखील मोर्चासाठी येणाऱ्या लोकांच्या राहण्याच्या सोयीसाठी सज्ज झाले आहेत. शुक्रवारी तसेच शनिवारी शहरातील अनेक लॉज बुक असणार आहेत.

खासगी वाहतूक
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक महत्त्वाचे रस्ते असणार आहेत. मात्र, शहरात इतर ठिकाणी पोहोचण्यासाठी विद्यार्थी किंवा इतरांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागणार आहे. मोर्चाच्या रस्त्या व्यतिरिक्त भागातून जाण्यासाठी रिक्षा तसेच इतर खासगी वाहनांची मदत नाशिककरांना घ्यावी लागणार आहे. सोबतच बाहेरगावाहून मोर्च्यासाठी येणारे नागरिकांनाही या खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागणार आहे. यामुळे दोन दिवस खाजगी वाहतुकदारांना जास्तीचे प्रवासी मिळणार आहेत.

पाणी बॉटल्स
मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी मार्गात पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार आहे. यासाठी अनेक मराठा आणि गैरमराठा संघटनांनी पुढाकार घेतला आहे. त्याम‌ुळे पाणी बॉटल्स तसेच जारची खरेदी करण्यात आली आहे. शहरातील अनेक वॉटर डिस्ट्रिब्युटर्सचा व्यवसाय यामुळे तेजीत झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परतीच्या पावसाने तारांबळ

0
0

जिल्ह्यातील अनेक धरणे ओव्हरफ्लो

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

परतीच्या पावसाने गुरुवारी पुन्हा हजेरी लावल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. शहर परिसरात दिवसभर ऊन आणि पावसाचा खेळ सुरू होता. जिल्ह्यातील अनेक भागात तसेच शहर व नाशिकरोडसह अन्य काही भागात जोरदार पाऊस बरसल्याने अनेक रस्त्यांवर पाणी तुंबले होते. परतीच्या पावसाने गंगापूर धरणातून पाणी सोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

गंगापूर धरणाची पातळी ९३ टक्केवर पोहचली असून, उपयुक्त साठा ५ हजार २२२ घनफुटापर्यंत पोहचला आहे. गंगापूर धरण समुहातील आळंदी धरण अगोदरच १०० टक्के भरले आहे. काश्यपी धरण ९९ टक्केपर्यंत पोहचले आहे तर गौतमी गोदावरी धरणाची पातळी ८९ टक्के आहे. त्यामुळे गंगापूर धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात १६४.८ मिमी पाऊस झाला. त्यात सर्वाध‌िक पाऊस हा येवला येथे झाला आहे. सप्टेंबर महिन्यात २२ दिवसात संपूर्ण जिल्ह्यात १८३४ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील धरणाच्या साठ्याची टक्केवारी ८५ टक्केपर्यंत पोहचली आहे. गेल्यावेळेस हाच साठा ४९ टक्के होता त्यात आता ३६ टक्के वाढ झाली आहे. जिल्ह्यातील मोठे व मध्यम अशा एकूण २४ धरणात आता ५५ हजार ७५८ दशलक्ष घनफूट साठा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाथर्डी फाटा : परप्रांतीय तरुणाची हत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

पाथर्डी फाटा परिसरातील दामोदरनगर भागात राहणाऱ्या परप्रांतीय तरुणाचा खून झाला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी मिळालेल्या बॅटने हा खून झाल्‍याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. हा खून कोणी व का केला याबाबत तपास सुरू आहे.

आकाश कुवरप्रताप वर्मा (२८, ट्विंकल अपार्टमेंट, दामोदरनगर, पाथर्डीफाटा, मूळ रा. बिहार) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो अन्य चार मित्रांसमवेत राहत होता. ते सर्व जण एकाच कंपन्यांमध्ये कामाला असून त्यांच्या प्रत्येकाची ड्युटीला जाण्याची वेळ वेगवेगळी आहे. बुधवारी रात्री याच खोलीत राहणारा अविनाश तावडे घरी आला. त्याला खोलीत आकाश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. जवळच एक बॅट पडलेली होती. त्याने तातडीने आजूबाजुच लोकांना बोलावले. तसेच इंदिरानगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणी अविनाश तावडेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, खोलीत राहणाऱ्या एका तरुणाशी आकाशचे वारंवार भांडण होत असल्याचे समजते. घटनेनंतर संबंधित तरुण फरार असून पोलिसांनी अन्य मित्रांची चौकशी सुरू केल्याची माहिती पोलिस उपायुक्‍त श्रीकांत धिवरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images