Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

खरेदीखत न देणाऱ्या बिल्डर्सना २ वर्षे कैद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बिल्डरने सहा महिन्यात हौसिंग सोसायटीला खरेदीखत (डीड ऑफ कनव्हेन्स) देण्याचे राज्य ग्राहक न्यायमंचच्या मुंबई खंडपीठाने आदेश दिले. त्यानंतरही खरेदीखत न दिल्यामुळे जिल्हा ग्राहक न्यायमंचाने नाशिकच्या चार बांधकाम व्यावसायिकांना दोन वर्षांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. बिल्डरला प्रत्येकी १० हजार रुपये दंडही मंचने ठोठावला आहे.

गंगाघाट येथील यशवंतराव महाराज पटांगण येथील गंगामंदिर को-ऑप. हौसिंग सोसायटीचे चेअरमन रामचंद्र गोविंद वझे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार न्यायमंचात दाखल केलेल्या तक्रारीनंतर हा निकाल न्यायमंचाने दिला. २००६ साली वझे यांनी ए. जी. बिल्डरर्सचे भागीदार नंदकिशोर अवधूत आघारकर, बिल्डर प्रवीण हरिभाऊ धात्रक, पांडूरंग दत्तात्रय बोधले, नितीन हरिभाऊ धात्रक यांच्याविरुध्द जिल्हा ग्राहक न्यायमंचाकडे केली. पण ही तक्रार जिल्हा ग्राहकमंचाने फेटाळली. त्यानंतर वझे यांनी राज्य ग्राहक मंचाच्या खंडपीठाकडे याविरुध्द अप‌लि केले. त्यात खंडपीठाने सहा महिन्यात खरेदीखत देण्याचे आदेश दिले. पण सहा महिने उलटूनही हे खरेदी खत न दिल्यामुळे रामचंद्र वझे यांनी खंडपीठाच्या आदेशाची पूर्तता न केल्यामुळे कारवाई करण्याची जिल्हा

न्यायमंचाकडे पुन्हा तक्रार केली. त्यानंतर जिल्हा ग्राहक न्यायमंचाने चौघांविरुध्द दोन वर्षाची शिक्षा व दहा हजार दंडाचा निकाल दिला. वझे यांच्यावतीने अॅड. डी. आर. रणदिवे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोठलीमधील आदिवासी आश्रमशाळेस ‘आयएसओ’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नंदुरबार

तालुक्यातील कोठली येथील शासकीय आश्रमशाळा ही राज्यातील आयएसओ नामांकन मिळविणारी पहिली आश्रमशाळा ठरली आहे. यामध्ये शाळेच्या विविध उपक्रमांची आणि भौतिक सुविधांची दखल घेऊन आयएसओ नामांकन देण्यात आले आहे. ही शाळा या अगोदर शिक्षक आणि लोकसहभागातून पहिली डिजिटल आदिवासी आश्रमशाळा ठरली होती.

गेल्या वर्षभरापासून कोठली आश्रमशाळेत विविध उपक्रम राबविण्यात येत होते. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यांना जास्तीत जास्त शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळेत सुसज्ज डिजिटल लॅब तयार करण्यात आली आहे. याशिवाय सायन्स सेंटरदेखील उभारण्यात आले आहे. त्यात लाइव्ह प्रयोगांची सुविधा पुरविण्यात आली आहे. यासोबतच आश्रमशाळेत पहिली ते बारावीचे ६५० विद्यार्थी आहेत. २५ शिक्षक व २० शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण ४५ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. ही शाळा जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दत्तक घेतली आहे. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी गजेंद्र केंद्रे यांच्यासह प्राचार्य जगदीश पाटील व शिक्षकांनी विविध उपक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिमांशूची कविता तत्त्वज्ञान मांडते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केवळ चौदा वर्षांचा हिमांशू हा अत्यंत तरल आणि संवेदनशील कवी असून, त्याच्या कवितांमधून त्याचा जीवनाविषयीचा दृष्टिकोन लक्षात येतो. अत्यंत साध्या घटनांना निवडून त्याने त्यावर कवितांच्या माध्यमातून केलेले भाष्य एखाद्या तत्त्वज्ञानाला शोभावे असे आहे, असे प्रतिपादन कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांनी केले.

प्रसिद्ध सिने-अभिनेते तथा कवी सौमित्र-किशोर कदम यांच्या हस्ते नवोदित कवी हिमांशू कुलकर्णी याचा पहिला काव्यसंग्रह, 'पोएट्रीज ऑफ लाइफ'चे दिमाखदार प्रकाशन झाले. त्या वेळी कदम बोलत होते.
ते म्हणाले, की मैत्रीला वयाचे बंधन नसते. हिमांशू हा आनंदाने, उल्हसित होऊन कविता करतो. मात्र त्याच्या वयात असताना मी दु:खाने कविता लिहीत असे. कुणाशी तरी बोलायला मिळावे म्हणून मी कागदाशी बोलत होतो. लिहिण्यासाठी कवीला लहान मुलांचा दृष्टिकोन असावा लागतो, तरच तो कवी होऊ शकतो आणि हे सगळे गुण हिमांशूमध्ये आहे. त्याच्या वयात त्याला असणारी लिखाणाची आवड ही त्याने जोपासावी. भविष्यात यातूनच खूप मोठी झेप तो घेईल.

पहिला काव्यसंग्रह, 'पोएट्रीज ऑफ लाइफ'चे आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्था 'पार्टरीज' यांच्या सहयोगाने ऑनलाइन जगभर प्रकाशन झाले. श्याम पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. स्मिता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. उदय कुलकर्णी यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावर बैलपोळ्याची धूम

$
0
0

म. टा प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांसाठी, कृषिसंस्कृतीसाठी महत्त्वाचा असणाऱ्या बैलपोळ्याच्या सणानिमित्त फॉरवर्ड होत असलेल्या जोक्सनी गुरुवारी सोशल मीडियावर हास्याचे फवारे उडवून दिले. नवरे मंडळींवर लक्ष्य साधत नेटिझन्सनी बैलपोळ्याचे अनेक मेसेजेस एकमेकांना फॉरवर्ड केले.

वाढत्या शहरीकरणामुळे शहरवासीयांना बैलपोळा कसा साजरा करतात हे पाहणेही दुर्मिळ झाले आहे. त्यातच तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराने जगातील सर्व लहान-मोठ्या गोष्टी एका क्लिकवर आणल्या आहेत. सण-उत्सवाच्या शुभेच्छा देऊन सणही सोशल मीडियावरच साजरे केले जातात. बैलपोळाही याला अपवाद ठरला नाही. तो विविध जोक्सनी साजरा केला. बैलपोळ्याच्या सकाळपासूनच म्हणजेच गुरुवारी सकाळपासूनच व्हॉट्सअॅप, फेसबुकवर बैलपोळ्याच्या जोक्सनी गर्दी केली होती. मुख्यतः पुरुषांची टिंगल उडवणाऱ्या या विनोदांनी सर्वच ग्रुप्सवरही हास्यकल्लोळ निर्माण झाला होता. केवळ जोक्सच नाही तर बहिणाबाई चौधरींची 'आला आला शेतकऱ्या पोयाचा रे सन मोठा हाती घेईसन वाट्या आता शेंदुराले घोटा', ही कविताही मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड केली जात होती.
--

बाई ः एक बैल द्या हो
विक्रेता ः अहो, जोडी घ्या.
बाई ः एक आहे घरी.

बायकोचा फोन आल्यावर नुसतंच हं, होय, बरं, म्हणणाऱ्या सर्वांना पोळ्याच्या शुभेच्छा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये विशाल मोर्चा काढण्याची तयारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कोपर्डी येथील घडलेल्या बलात्काराच्या प्रकरणानंतर संबंधित मुलीला न्याय मिळवण्यासाठी राज्यभर मराठा संघटनांकडून विशाल मोर्चे काढण्यात येत आहेत. राज्यभर चर्चेत ठरत असलेला हा मोर्चा आता नाशिकमध्येही काढण्याची तयारी मराठा संघटनांनी सुरू केली आहे. या नियोजित मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन करण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. नाशिकमध्येही विशाल मोर्चा व्हावा, यासाठी संघटनांनी कंबर कसली आहे.

कोपर्डी येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यभर मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज रस्त्यावर उतरत आहे. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जळगावपाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातील नियोजित मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी विविध संघटनांनी एकत्र येऊन हा मोर्चा विशाल करण्याचे ठरविले असूनस त्यासाठी तीन सप्टेंबरला औरगांबाद रोडवरील वरद लक्ष्मी लॉन्स येथे बैठक होणार आहे. हा मराठा क्रांती मूक मोर्चा असणार असून, तो पक्षविरहित असणार आहे. मोर्चा केव्हा काढायचा आणि त्याचे स्वरूप काय असावे, याचे नियोजन करण्याबाबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद शिंदेंना शिवसेनेकडून श्रद्धांजली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना नाशिकच्या वतीने कर्तव्यदक्ष शहीद वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. हुतात्मा स्मारक येथे शिवसेनेच्या माध्यमातून या हल्ल्याचा तीव्र निषेध करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

विनाहेल्मेट प्रवास करत असलेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराला हटकणे दुर्दैवाने वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या जिवावर बेतले. विलास शिंदे यांना दुचाकीस्वाराच्या भावाने जबरी मारहाण केली व त्यात त्यांचा मृत्यू झाला. या हल्यासंदर्भात शिवसेना नाशिकच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे निषेध नोंदवून शहीद विलास शिंदे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, सुनील पाटील, नीलेश कुलकर्णी, संतोष कहर, दिगंबर मोगरे, राजेंद्र क्षीरसागर, योगेश बेलदार, दीपक दातीर, नाना काळे, महेश सोपे, उमेश चव्हाण, मसूद गिलानी, रूपेश पालकर, आदित्य बोरस्ते, गणेश बर्वे, देवा जाधव, पप्पू टिळे, अमित खांडवे, ऋषी वर्मा, वैभव ढिकले, समर्थ मुठाळ, स्वप्नील धनगर, सतीश काळे, अमोल सूर्यवंशी आदी शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसपीव्ही येणार महासभेत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी नाशिक महापालिकेने एसपीव्ही (स्पेशल पर्पज वहन) स्थापन केला असून, हा एसपीव्ही लवकरच महासभेवर ठेवण्यात येणार आहे. एसपीव्हीच्या रचनेत काही बदल करण्यात आले असून, एसपीव्हीचा सीईओही आता भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी राहणार आहे. एसपीव्ही स्थापन झाल्यानंतर विकासकामांसाठी राज्य सरकारकडून म्हाडाच्या माध्यमातून शंभर कोटी रुपये मिळण्याची आशा आहे. दरम्यान, नगरसेवकांची नियुक्तीसह त्याला मंजुरीसाठी एसपीव्ही महासभेवर ठेवण्यात येणार आहे.

महापालिकेने राज्य सरकारच्या आदेशानंतर स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी एसपीव्हीची स्थापन केली असून, त्याच्या अध्यक्षपदी उच्च व तंत्र विभागाचे प्रधानसचिव सीताराम कुंटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एसपीव्हीमध्ये १५ संचालक राहणार असून, त्यात महापालिकेतर्फे महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख, सभागृह नेत्या सुरेखा भोसले, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, आयुक्त अभिषेक कृष्णा संचालक आहेत. पक्षांचे प्रतिनिधी म्हणून सहा नगरसेवक घेण्यात येणार आहेत. सोबतच पोल‌िस आयुक्त, जिल्हाधिकारी व सिडकोचे कार्यकारी अधिकारी संचालक असणार आहेत. नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड असे कंपनीचे नामकरण असून, भागभांडवल पाच लाख रुपयांचे असणार आहे. केंद्र सरकारचेही प्रतिनिधी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती स्मार्ट सिटीतल्या समावेशानंतर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटीसाठी म्हाडाच्या माध्यमातून शंभर कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गतिमान प्रशासनासाठी आता मासिक अहवाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कामाची शिस्त लावण्यासह नागरिकांचे प्रश्न तातडीने सुटावेत यासाठी आयुक्तांनी आता प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला मासिक प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सेवा हमी कायद्यांतर्गत नागरिकांच्या तक्रारी सुटाव्यात यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे येणाऱ्या फायलींचे ट्रॅकिंग केले जाणार असून, महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता व गतिमानता येईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

महापालिकेत सर्वसामान्यांना आपल्या कामासाठी अनेक वेळा चकरा माराव्या लागतात. कर्मचारी दाद देत नसल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे नवनियुक्त आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी प्रशासनाला गतिमान करण्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला आता आपल्या कामाचा मासिक प्रगती अहवाल द्यावा लागणार आहे. वेगवेगळ्या २२ फॉरमॅटमध्ये कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामाचा अहवाल सादर करावा लागणार आहे. त्यात कोणते काम महत्त्वाचे आहे, त्याची सद्यःस्थिती, त्याची मुदत कधी संपणार, कधी पूर्ण होणार, तसेच त्या कामाच्या पूर्ततेसाठी काय केले, असा तपशील आता सादर करावा लागणार आहे. लोकायुक्तांकडील प्रलंबित तक्रारी, सेवा हमी कायद्यांतर्गत येणाऱ्या सुविधांचा तपशीलच सादर करावा लागणार आहे. त्यामुळे वार्षिक केआरए आता कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना दरमहा सादर करणे बंधनकारक असणार आहे. नागरिकांची तक्रार व अर्ज आल्यानंतर त्याचा किती दिवसांत निपटारा झाला, याचे आता महापालिकेत ट्रॅकिंगच होणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना वेळेत सुविधा मिळणार असून, त्यांच्या तक्रारींचे लवकर निदान होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलसंपदाचे घाट महापालिकेकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान सिंहस्थ निधीतून उभारलेल्या स्थायी कामे व वस्तुंचे संबंधित विभागांनी महापालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीवरील घाटांसह विविध विभागांच्या सिंहस्थ स्थायी कामांचे महापालिकेकडे हस्तांतरण केले जाणार आहे. गोदावरी नदीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या घाटांची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी आता महापालिकेची असणार आहे. सोबतच सिंहस्थाच्या घटनाक्रमाचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

सिंहस्थ शिखर समितीची बैठक मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्याला महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासह विभागीय आयुक्त एकनाथ डवले व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यात सिंहस्थातील २३७८ कोटींच्या कामांचा आढावा घेण्यात आला. महापालिकेच्या ९१९ कोटींच्या आराखड्यात आतापर्यंत ८७२ कोटी रुपये खर्च केले आहेत. आतापर्यंत महापालिकेला राज्य सरकारने तीन चतुर्थांश निधीपैकी ६२२ कोटी रुपये महापालिकेला दिले आहेत, तर अजून ३२ कोटी रुपये सरकारकडे शिल्लक आहे. महापालिकेने ६७ कोटी रुपयांची बचत केली आहे, तर समितीने ६ कोटी ३१ लाखांच्या अतिरिक्त कामांना मंजुरी दिली आहे.

सिंहस्थात ८० टक्के रक्कम ही स्थायी कामांवर खर्च झाली आहे. त्यामुळे स्थायी कामे ही संबंधित महापालिका व नगरपालिकांना देखभाल व दुरुस्तीसाठी देण्याचे आदेश सचिवांनी दिले आहेत. त्यामुळे नदीकाठावर पाटबंधारे विभागाने १३० कोटी रुपये खर्चून बांधलेले घाट आता महापालिकेच्या ताब्यात येणार आहेत. त्यामुळे या घाटांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पालिकेची असणार आहे.

डिजिटल रेकॉर्ड तयार करा
सिंहस्थातील संपूर्ण घटनाक्रम व कामांचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिले आहेत. यात फोटोग्राफी, व्हिडीओ शूटिंगसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्व कामांचे एकत्रित रेकॉर्ड जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केले जाणार असून, त्याचे डिजिटलायझेशन केले जाणार आहे. पुढील कुंभमेळ्यासाठी हा एक पाठ राहणार असून, सगळ्या यंत्रणांना त्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगरांत पोळा उत्साहात

$
0
0

टीम मटा

नाशिक शहरातील विविध उपनगरांमध्ये पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महिलांनी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलांची पूजा केली. शहराच्या रस्त्यारस्त्यांवर खिल्लारी बैलांची सजलेली जोडी मिरवत होती. मखमलाबाद, सातपूर, आडगावमध्ये पोळ्याचा उत्साह ओसंडून वाहत होता. नाशिक रोड येथील कारागृहात पोळा उत्साहात साजरा करण्यात आला.

सातपूरमध्ये उत्साह

सातपूर ः शेतकऱ्यांचे दैवत असलेल्या बैलांचा पोळा सण सातपूर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. बळीराजाने बैलांची मनोभावे पूजा करत सर्जा-राजाच्या जोडीला सजविले होते. यानंतर ठिकठिकाणी गावातून सर्जा-राजाची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी महिलांनी बैलांना पुरणपोळीचा नवैद्य दिला.

दोंदेचा बेपत्ता सर्जा सापडला!

सातपूर ः बेळगावढगा येथील शेतकरी सोमनाथ गांगुर्डे यांचे नातेवाईक गोविंद दोंदे आठवडाभरापासून इगतपुरी येथून बैलजोडी घेऊन आले होते. मात्र, तीन दिवसांपासून दोंदे यांचा खिल्लारी जोडीचा सर्जा नावाचा बैल बेपत्ता झाला होता. यानंतर गावातील ग्रामस्थांनी सर्जाचा कसून शोध घेतला. मात्र, तो कुठेही आढळून आला नाही. अखेर दोंदे यांनी नातेवाइकांसह पोलिस स्टेशन गाठत सर्जा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनीही सर्जाचा तपास सुरू केला. याच वेळी गावातीलच एका तरुणाने सर्जाची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्जाला ताब्यात घेत दोंदेंकडे सुपूर्द केला. सर्जा घरी आल्याने दोंदे कुटुंबात पोळ्याचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला. मात्र, सर्जाची चोरी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी सोडून दिल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

आडगावमध्ये सजले बैल

आडगाव ः आडगावात पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी बैलांची शिंगे घासून अंघोळ घालण्यात आली. नंतर शिंगावर हिंगोलाचा लेप देण्यात आला. बेगड (चमकीचा कागद), शिंगावर घुंगराच्या पितळी छमब्या, गळ्यात घोगल पट्टी (चंगाळे /पितळी घंटी), नवीन माथूट, मोहरकी, वेसण, कासरा, अंगावर रंगाचे पट्टे, सजवलेली कपड्याची झूल असा साज लेवून बैलांची मिरवणूक काढण्यात आली. मारुती मंदिरात मिरवणुकीची सांगता झाली. गावातील वेशीवर मानाच्या बैलांची पूजा केली.

कारागृहात पोळा उत्साहात

नाशिकरोड ः नाशिकरोड परिसरात बैल पोळा सण पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. मराठीजनांनी घरीच मातीच्या बैलांची पूजा केली, तर शेतकऱ्यांनी आपले पशुधन असलेल्या बैलांची विधिवत पूजा केली. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मुख्य अधीक्षक रमेश कांबळे, वरिष्ठ अधिकारी वैभव आगे, तसेच कैद्यांच्या हस्ते बैलांचे पूजन करण्यात आले.

कारागृहाचा स्वतंत्र कृषी विभाग असून, कैद्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. भाजीपाला राज्यभरात पाठविला जातो. शेतीसाठी कारागृहाची मोठी विहीर व बैलजोड्या आहेत. त्यांची पोळ्याला पूजा केली जाते. प्रथम कारागृहाच्या बाहेर बैलांना आणून सलामी दिल्यानंतर आत नेऊन कैद्यांच्या हस्ते नैवेद्य व धान्य देऊन पूजा करण्यात आली. या वेळी कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, वरिष्ठ अधिकारी वैभव आगे, कृषी सहाय्यक अधिकारी आदी उपस्थित होते. बैलांना कारागृहाच्या विविध विभागांत मिरवून नंतर कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. तेथे कारागृह कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी बैलांची पाद्यपूजा केली. दरम्यान, जेलरोडचा लोखंडे मळा, दसक, पंचक, चेहेडी, शिंदे, पळसे, सिन्नरफाटा, देवळालीगाव, विहीतगाव, उपनगर आदी गावठाण भागातही शेतकऱ्यांनी बैलांना रंगवून व सजवून वाजतगाजत मिरवणूक काढली. गावातील मारुती मंदिरात नेऊन बैलांनी मारुतीरायाला सलामी देऊन दर्शन घेतले. नंतर घरी नेऊन पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला. शेतकऱ्यांनी बैलांना आज पूर्ण विश्रांती दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

पाणीटंचाईच्या काळात कपात करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्यात बदल करत पूर्वीप्रमाणेच आता देवळालीवासीयांना दोन वेळचा पाणीपुरवठा होणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत देवळालीतील ६० कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेच्या टेंडरला मंजुरी देण्यासह शहरातील व्यापाऱ्याला चालना देण्याकामी तीन नव्या मार्केटच्या उभारणीचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळे देवळालीची वाटचाल खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटीकडे सुरू झाली आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाची महत्त्वपूर्ण बैठक बोर्डाच्या कार्यालयात झाली. अध्यक्ष ब्रिगेडिअर प्रदीप कौल अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष बाबूराव मोजाड, नगरसेवक दिनकर आढाव, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, कावेरी कासार, प्रभावती धिवरे, मीना करंजकर, आशा गोडसे, लष्कर नियुक्त सदस्य कर्नल चंद्रशेखर, ब्रिगेडिअर एस. एम. सुदुंबरेकर, गेरिसन इंजिनीअर मेजर पीयूष जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार या वेळी उपस्थित होते.

उपाध्यक्ष मोजाड व नगरसेवक आढाव यांनी शहराच्या पाणीप्रश्नावर लक्ष केंद्रित करीत यंदा चांगल्या प्रकारचे पर्जन्यमान झाले असून, धरणातील पाणीसाठा परिपूर्ण असल्याचे सांगितले. शेजारील नाशिक महापालिकेनेही पाणीकपातीचा निर्णय मागे घेत नागरिकांना दोन वेळचा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर देवळालीतही दोन वेळचा पाणीपुरवठा करण्यात यावा यासह शहरातील मागासवर्गीय परिसर व आर्थिक दुर्बलांसाठी ५०० रुपये अनामत रक्कम व ४० रुपये प्रतिमहिना पाणीपट्टी अशा सवलतीची मागणी करण्यात आली. शहरातील प्रत्येक घटकाला पाणी मिळावे या उद्देशाने ही योजना असून, स्टँडपोस्टद्वारे वाया जाणाऱ्या पाण्यावर नियंत्रण राहील व स्वतःचे पाणी मिळणे सोयीचे होईल. बैठकीत विविध विकासात्मक बाबींना मंजुरी देण्यात आल्याने शहरातील नागरिकांना अपेक्षित बदल पाहायला मिळणार आहे.

नवी व्यापारी संकुले उभारणार

शहरातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे ५०० गाळ्यांचे मार्केट शहराच्या विविध भागांत निर्माण करण्याला अंतिम स्वरूप देण्यात आले असून, त्यात लेव्हिट मार्केट येथे २८० गाळे, हौसन रोड व्यापारी संकुलात ९० गाळे, भाजी मार्केट परिसरात ८० गाळे याशिवाय बोहरी मशिदीलगतच्या जागेत स्वतंत्र भाजी मार्केट, कॅन्टोन्मेंट हॉस्पिटललगतच्या पडीक जागेत अद्ययावत व्यायामशाळेसह काही गाळ्यांची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे बोर्डाला प्रतिवर्षी तीन कोटी रुपये उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊन तरुणांना रोजगाराची दालने उपलब्ध होतील. यासाठी उपाध्यक्ष मोजाड यांच्या अध्यक्षतेखाली पाच नगरसेवकांसह मेजर पीयूष जैन, विधिज्ञ अण्णा नगरकर यांची समिती नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसहभागातून या मार्केटची उभारणी होणार आहे.

कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल व कार्यालय

देशाबाहेरील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या देवळाली येथील हॉस्पिटलचे नूतनीकरण करण्याबरोबरच नवीन इमारत उभारून अद्ययावत सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासह कॅन्टोन्मेंट मुख्य कार्यालयाची इमारतही नव्याने उभारणी करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. मुख्य कार्यकारी यांचे निवासस्थानही नव्याने उभारण्यात येणार आहे.

भुयारी गटार योजना व रस्ते

देवळालीसाठी महत्त्वपूर्ण अशा १५० कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेपैकी खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून पहिल्या टप्प्यासाठी मंजूर झालेल्या ६० कोटी रुपये खर्चाच्या कामाच्या टेंडर काढण्याला मंजुरी देण्यात आली. पहिल्या टप्प्यात आधुनिक पद्धतीच्या मलनिस्सारण केंद्रासह भुयारी पाइपलाइनचा समावेश राहणार आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करून फूटपाथची रुंदी कमी करून शहरात सर्वच फूटपाथ समान असतील. डांबरीकरणही करण्यात येऊन रस्त्यातील अडथळे दूर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीजे व्यावसायिकांवर बंदी नोटिसांमुळे संक्रांत

$
0
0

jitendra.tarte @timesgroup.com

कोर्टाने ध्वनिप्रदूषणासंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांशी पूर्णत: सहमती दर्शविल्यानंतरही डीजे व्यावसायिकांची सर्रास गळचेपी करण्याचे धोरण नाशिकच्या 'खाकी'ने अवलंबिले आहे. साउंड सिस्टिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने असा आक्षेप नोंदवला जात आहे. पोलिस आणि कोर्टाच्या निर्देशांना पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दाखविल्यानंतरही उपनगर, मेरी आणि दिंडोरी हद्दीत डीजे बंदीबाबत बजावलेल्या कडक नोटिसांमुळे डीजे व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली आहे. निर्देश पालनास पूर्ण सहमती दर्शविल्यानंतरही डीजेचा आवाज कायमचा बंद करून या व्यवसायातील तरुणांना बेरोजगार होण्याची वेळ या उफराट्या कार्यपद्धतीमुळे येऊन ठेपली असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी डीजे व्यावसायिकांनी कंबर कसली आहे. पण, काही उपनगरांमध्ये त्यांच्या मनसुब्यांवर पोलिसांनीही इशारावजा नोटिसीद्वारे पाणी फेरले आहे. शहरात नाशिकरोडचे उपनगर, पंचवटीतील मेरी आदी परिसरांमध्ये पोलिसांनी डीजेमुक्त मिरवणुकीसाठी कारवाईचा बडगा डीजे व्यावसायिकांवर उगारला असून, व्यावसायिकांनी अनेक संभ्रम आणि अपवादांवर बोट ठेवत कोर्टाच्या निर्देशाच्या पालनानंतरही या मिरवणुका डीजेमुक्त करण्याचा पोलिसांचा अट्टाहास का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुंबई हायकोर्टाने ध्वनिप्रदूषणासंदर्भात ‌मार्गदर्शक तत्त्वांची बंधने गणेश मंडळांना घालून दिल्याच्या पार्श्वभूमीवर कोर्टाच्या तत्त्वांचे पालन करण्यासाठी पोलिसांनीही कडक पावले उचलली आहेत. गणेश मंडळांच्या झालेल्या बैठकांमध्ये कोर्टाच्या निर्देशांची माहिती देणारी पत्रकेही मंडळांपर्यंत पोहोचविण्यात आली होती. यंदाचा गणेशोत्सव 'डीजे फ्री' करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी शहरातील सुमारे हजार मंडळांना नोटीसही पाठवली होती. या नोटिसीमध्ये कोर्टाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन असले, तरीही जिल्ह्याच्या काही ग्रामीण भागात आणि शहरातील काही उपनगरांमध्येच पोलिसांनी 'डीजे फ्री' संकल्पनेची सक्ती केल्याची व्यथा साउंड सिस्टिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने 'मटा'शी बोलताना मांडण्यात आली. एकाच हद्दीतल्या मंडळांना वेगवेगळ्या कायद्याची अंमलबजावणी का, असा प्रतिसवालही काही गणेश मंडळे आणि डीजे व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.

निर्देशांचे पालन करणारच पण...

कोर्टाच्या निर्देशांचे पालन करण्याची तयारी या नोटिसांनंतर डीजे व्यावसायिक व त्यांच्या संघटनांनी दर्शविली आहे. ही तयारी दर्शविल्यानंतरही जिल्ह्यात दिंडोरी, तर शहरात उपनगर आणि मेरी परिसरात डीजेवर काटेकोरपणे बंदीच घालण्याची पोलिसांची भूमिका संभ्रमात टाकणारी असल्याचे साउंड सिस्टिम वेल्फेअर असोसिएशनने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जनआंदोलनांवर अंकुश ठेवण्यासाठी कायदा’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र सरकारने नवीन प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सिक्युरिटी अॅक्टला विरोध करण्यासाठी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (दि. १) आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी तसेच जनआंदोलनांवर अंकुश ठेवून हुकुमशाही प्रस्थापित करण्यासाठी हा कायदा आणत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

काँग्रेसकडून देण्यात आलेल्या निवेदनात, या कायद्याच्या माध्यमातून पोलिसांना अमर्याद अधिकार देण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय विरोध संपवण्याचा राज्य सरकारचा प्रय़त्न आहे, असे नमूद करण्यात आले आहे. हा कायदा लागू झाल्यास पोलिसांविरुद्ध टीका करता येणार नाही. कोणत्याही परवानगीशिवाय झडती घेण्याचे अधिकार पोलिसांना मिळतील, जनआंदोलन, रास्ता रोकोसह इतर आंदोलनावरही पोलिस कठोर करवाई करून गुन्हा दाखल करेल, या सर्व गोष्टी प्रस्तावित कायदा लागू झाल्यास होणार आहे,असेही म्हटले आहे. या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, माजी आमदार डॉ. शोभाताई बच्छाव, हेमलता पाटील,शाहु खैरे, आश्विनी बोरस्ते, वत्सला खैरे, लक्ष्मण जायभावे, राजेंद्र बागुल, सुरेश मारु यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते सामील झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा हद्दीत मद्यावर ९ टक्के एलबीटी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यसरकारने मद्यावर एलबीटी लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेने १५ ऑगस्टपासून शहरातील मद्यविक्रेत्यांवर एलबीटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मद्यविक्रेते व हॉटेल्स, बार रेस्टॉरंट व वाइन विक्रेत्यांना आता ९ टक्के एलबीटी महापालिकेत भरावी लागणार असून, मद्यविक्रेत्यांनी तत्काळ पालिकेकडे नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मद्यावरील एलबीटीमुळे पालिकेच्या महसूलात दर महिन्याला किमान दोन कोंटीची वाढ होणार आहे.

राज्य सरकारने राज्यातील मद्यविक्रेत्यांवर एलबीटी लागू केली आहे. नव्या धोरणात आता ५० कोटींच्या आत वार्षिक उलाढाल असलेल्या मद्यविक्रेत्यांनाही एलबीटी भरावी लागणार आहे. सरकारच्या आदेशानंतर पालिकेने मद्यविक्रेत्यांना एलबीटी लागू करण्याचे काम सुरू केले असून, मद्यविक्रेत्यांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. राज्य उत्पादन शुल्क व विक्रीकर विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या मद्यविक्रेत्यांची यादी एलबीटी विभागाने मागवली आहे. मद्य विक्रेत्यांना सर्वसाधारणपणे ९ टक्के एलबीटी लागू करण्यात आली आहे. महापालिका हद्दीतील मद्यविक्रेते व हॉटेल्स, बार रेस्टॉरंट व वाइन विक्रेत्यांना ही एलबीटी लागू करण्यात येणार आहे. एलबीटी लागू केल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात दरमहा साधारण दोन कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहेत. त्यामुळे पालिकेला आर्थिकदृष्ट्या हातभार लागणार आहे. दुसरीकडे मद्यविक्रेत्यांनी मात्र एलबीटी धोरणाला विरोध केला आहे. एकीकडे ५० कोटींवरील उद्योगांनाच एलबीटी लागू आहे, तर मद्य विक्रेत्यांना ५० कोटींची सवलत का नाही, असा सवाल केला जात आहे. त्यामुळे या निर्णयालाही न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पालिकेच्या हातून निधीही गेला अन् व्याजही !

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील मधुर संबंधांमुळे मनसेच्या ताब्यात असलेल्या महापालिकेला मुख्यमंत्री आर्थिक मदत देतील, अशी अपेक्षा होती. परंतु राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर प्रशासनात नेमके उलटे चक्र फिरले आहे. सिंहस्थात बचतीच्या ६७ कोटींच्या निधीसह अतिरिक्त माग‌ितलेल्या १९५ कोटींच्या ठाकरेंच्या मागणीला राज्य सरकारने ठेंगा तर दाखव‌िलाच पण, या मागणीवर कडी करत सिंहस्थ निधीच्या व्याजाचे पालिककडे असलेले १३ कोटी ८९ लाख रुपयेही परत करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंसह नाशिककरांना मोठा झटका दिला असून, पालिकेच्या पदरचेही पैसे काढून घेतल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात महापालिकेने स्वतंत्र सिंहस्थ आराखडा तयार केला होता. १११९ कोटींच्या या आराखड्यातून २०० कोटींचे भूसंपादन वगळण्यात आले होते. त्यामुळे ९१९ कोटींच्या आराखड्यात राज्य सरकारने ६९० कोटींचा भार उचलला होता. त्यापैकी ६२२ कोटींचा निधी पालिकेला मिळाला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात पालिकेच्या यंत्रणांनी उत्कृष्ट काम करत ६७ कोटींची आर्थिक बचत केली होती. या बचतीतून नवी कामे पालिकेने सरकारकडे सुचविली होती. पंधरा दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेत पालिकेच्या सिंहस्थातील थकीत रकमेसह अतिरिक्त १९५ कोटींच्या निधीची मागणी केली होती. परंतू राज ठाकरेंची पाठ फिरताच मंत्रालयात उलटे चक्रे फिरली असून, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सिंहस्थ निधीच्या आढावा बैठकीत ६७ कोटींच्या बचतसह १०७ कोटीच्या अतिरिक्त कामे फेटाळून लावली आहेत. केवळ बचत निधीचे कामे फेटाळण्यावरच सरकार थांबले नाही तर, त्यांनी पालिकेला दिलेल्या सिंहस्थ निधीचे १३ कोटी ८९ लाखाचे व्याज परत मागून मोठा झटका दिला आहे.

सिंहस्थात पालिकेला मिळालेला निधी ठेकेदारांना देईपर्यंत तो बँकामध्ये ठेवला होता. त्याचे व्याज १३ कोटी ८९ लाख रुपये झाले आहे. या पैसांचा विचार सरकार करणार नाही, असे वाटत असतानाच पालिकेच्या पदराचा पैसाही सरकारने माग‌ितल्याने आता पालिका अडचणीत सापडली आहे. यामुळे आता हक्काच्या निधीवरही पाणी सोडण्याची वेळ आली असून, राज व फडणवीस यांच्या मधुर संबंधही कामी आले नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सिंहस्थात बचत झालेल्या ६७ कोटींच्या निधीतून घाट सुशोभीकरण व साधुग्रामला कंपाऊड करण्याचे काम प्रस्ताव‌ित करण्यात आले होते. मात्र हा निधी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुरेश जैन अखेर तुरुंगाबाहेर

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । धुळे

घरकुल घोटाळ्याप्रकरणी धुळ्यातील कारागृहात शिक्षा भोगत असलेले राज्याचे माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सुरेश जैन यांची आज अखेर सुटका झाली. कालच सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता.

सुरेश जैन यांच्यासाठी प्रमोद वाणी व विनोद वाणी यांनी प्रत्येकी दोन लाख, तर प्रदीप वाणी यांनी एक लाखाचा जामीन दिला. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. जैन यांची सुटका होणार असल्यानं कारागृहाबाहेर त्यांच्या पाठिराख्यांनी मोठी गर्दी केली होती.

जळगावातील २९ कोटींच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी सुरेश जैन यांना १० मार्च २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तब्बल अकरा वेळा त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र, साडेचार वर्षांची शिक्षा व खटल्यातील सर्व महत्त्वाच्या साक्षी पूर्ण झाल्याच्या मुद्द्यांवर काल अखेर त्यांना जामीन मिळाला. जैन यांचे राजकीय विरोधक एकनाथ खडसे यांचे मंत्रिपद गेले असतानाच हा निर्णय आल्यामुळं जळगावातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता आहे.

कारागृहात साडेचार वर्षे काढली तसेच या खटल्यातील महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्षही पूर्ण झाल्या या दोन मुद्यांच्या आधारावर जैन यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किसवे, भोगे यांची बदली

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असून, उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांची दिंडोरीचे प्रांताधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. या पदावर कार्यरत मुकेश भोगे यांची अंधेरी औद्यागिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांना मात्र अद्याप कुठल्याही पदावर नियुक्ती देण्यात आलेली नाही.

गत महिन्यात महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. वर्षानुवर्षे नाशिक जिल्ह्यात तळ ठोकून असलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा नाशिकमध्येच नियुक्ती मिळाल्याने नाराजीनाट्यही घडले. बदल्यांमध्ये दुजाभाव होत असल्याबाबत आक्षेप घेत काही अधिकाऱ्यांनी 'मॅट'चा दरवाजा ठोठावला. जळगाव जिल्ह्यात पुनर्वसन अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आलेल्या नितीनकुमार मुंडावरे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला 'मॅट'मध्ये आव्हान दिले. त्यांना पुन्हा नाशिकमध्येच नियुक्ती मिळणार असली, तरी अद्याप ती देण्यात आलेली नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणारे रघुनाथ गावडे यांची विभागीय महसूल कार्यालयात पुरवठा उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या गीतांजली बाविस्कर यांची कोकणात, तर रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांची बढतीवर सरदार सरोवर प्रकल्पावर बदली झाली आहे. ही तीनही पदे सध्या रिक्त आहेत. याखेरीज भूसंपादन उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनावणे यांची रस्तेविकास महामंडळ विभागात बदली करण्यात आल्याने तेही पद लवकरच रिक्त होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अभाविप’चे पत्थर आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शुक्रवारी पत्थर आंदोलन केले. शरणपूररोडवरील उपकेंद्राच्या कार्यालयात समन्वयक रावसाहेब शिंदे यांच्या खुर्चीवर दगड ठेवून विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला.

विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक वर्ष २०१५-१६चा इंजिनीअरिंग विभागाचा निकाल अनपेक्षित लागला आहे. या निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे. विद्यापीठाचे कर्मचारीही उडवाउडवीची उत्तरे देऊन या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी पत्थर आंदोलन केले. फोटोकॉपी वेळेत न मिळणे, कॉलेजांनी अवाजवी फी आकारणे आदी तक्रारी या वेळी विद्यार्थ्यांनी मांडल्या. काही कॉलेजेसही प्रोविजनल प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट करीत आहेत, अशी कैफीयत उपकेंद्राचे समन्वयक रावसाहेब शिंदे यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी मांडली. यावेळी 'अभाविप'चे प्रदेशमंत्री राम सातपुते, जिल्हा संयोजक कुणाल काबरा, महानगरमंत्री अमोल अहिरे, रुपेश पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, सातत्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडूनही कोणताच महत्त्वपूर्ण निर्णय होत नसल्याने 'अभाविप'तर्फे यंदा १० सप्टेंबरपर्यंतची मुदत विद्यापीठाला देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना फोटोकॉपी मिळेल, असे शिंदे यांच्याकडून लेखी घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रार केली म्हणून सुपरवायझरचेच अपहरण

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वरिष्ठ कार्यालयात तक्रार केली म्हणून दोघा भावांनी मिळून सुपरवायझरला बेदम मारहाण करीत अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. मुंबई नाका पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत टाकळीरोड येथील संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हेमंत रमेश बनकर (वय २६) आणि चेतन रमेश बनकर (२५) अशी या संशयितांची नावे आहेत. टाकळीरोडवरील शांतीनगर येथे राहणाऱ्या बनकर भावांपैकी हेमंत हा गोपारियाज मार्शल सिक्युरिटी या सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या कंपनीत कामास आहे. कंपनीचे मुख्यालय भांडूप येथे असून, कंपनीमार्फत विविध कार्यालयांना सुरक्षारक्षक पुरविले जाते. सुरक्षारक्षकांवर लक्ष ठेवण्यासाठी कंपनीने फिल्ड सुपरवायझर्सची नियुक्ती केली आहे. त्यात लासलगाव येथील विद्यानगर येथे राहणाऱ्या हेमंत शिवाजीराव पाटील (४२) यांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी हेमंत पाटील यांनी सुरक्षारक्षकांची पाहणी केली असता हेमंत बनकरच्या पायात नियमानुसार बूट नव्हते. याबाबतचा जाब त्यांनी त्याला विचारला. त्यातून त्यांच्यात ​वादही झाला. त्यानंतर पाटील यांनी भांडूप येथील कंपनीच्या मुख्यालयात सविस्तर अहवाल सादर करून बनकरला कामावरून कमी करण्याची शिफारस केली. त्यामुळे चिडलेल्या बनकरने आपल्या भावासमवेत शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गडकरी चौकातील कालिका मंदिराशेजारी असलेल्या एचडीएफसी बँकेचे एटीएम गाठले. तिथे बनकर बंधूंनी हेमंत पाटील यांना मारहाण केली, तसेच पाटील यांना आपल्या दुचाकीवर बसवून टाकळीरोडकडे धूम ठोकली. या घटनेची माहिती मुंबई नाका पोलिसांना समजली असता उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ यांनी लागलीच सूत्रे हलवली. मुंबई नाका पोलिसांनी तत्काळ बनकर बंधूंचा तपास लावत पाटील यांची सुटका केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये अपहरण, मारहाण आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई नाका पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे पुढील अनर्थ टळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिसेंबरपर्यंत शहर हागणदारीमुक्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी धावपळ सुरू केली असून, पालिकेने पहिल्या टप्प्यात चार हजाराचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. तर उर्वरित ३७७४ वैय‌क्तिक शौचालयांचे उद्दिष्ट डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी आरोग्य विभागाला दिले आहे. तसेच शौचालयाचा पहिला हप्ता घेऊनही शौचालय न बांधणाऱ्या ६३८ नागरिकांचे प्रबोधन करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्ह‌िड‌िओ कॉन्फन्सद्वारे राज्यातील महापालिकांमध्ये सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला. नाशिक पालिकेचाही आढावा घेत, डिसेंबरपर्यंत शहर हागणदारीमुक्त करण्याचे आदेश त्यांनी दिले.पालिकेने ७ हजार २६४ वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी लाभार्थ्यांची निवड करून सात हजार लाभार्थ्यांना सहा हजार रुपयांचा पहिला हप्ताही दिला आहे.
आतापर्यंत चार हजार ४०६ लाभार्थ्यांनी शौचालय बांधून पूर्ण केले आहे. तर ११०५ लाभार्थ्यांच्या शौचालयांचे बांधकाम
सुरू आहे.
पालिकेने आता उर्वरीत उद्दिष्टही डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक महिन्याला टार्गेट ठेवण्यात आले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये प्रत्येकी ८५३, नोव्हेंबरमध्ये ८२७ आणि डिसेंबरमध्ये ३८३ शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी पालिकेने विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून, दररोज या कामाचा आढावा घेतला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images