Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जि. प. निवडणुकीसाठी प्रभागरचना कार्यक्रम जाहीर

$
0
0

नोडल ऑफिसरचीही नियुक्ती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात २०१७ मध्ये होणाऱ्या २६ जिल्हा परिषद, २९७ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, तसेच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. २५ नोव्हेंबरपर्यंत हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून, हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम प्रभाग रचना तयार केली जाणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील एक जिल्हा परिषद, १५ पंचायत समित्या, १४६ गण व ७३ गटांसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठीच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीसाठीचा प्रारुप प्रस्ताव जिल्हाधिकारी ९ सप्टेंबर २०१६ पर्यन्त विभागीय आयुक्तांकडे सादर करतील. या प्रस्तावाला शुक्रवार २३ सप्टेंबरपर्यंत महसूल आयुक्त मान्यता देतील. २८ सप्टेंबरला आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रातून प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर आरक्षणाची सोडत निघेल. ५ ऑक्टोबरला जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी व पंचायत निर्वाचक गणासाठी ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे. १० ऑक्टोबर रोजी सोमवारी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल. हरकती व सूचना १० ते २० ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.

१७ नोव्हेंबरला निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचना अतिंम केली जाणार आहे. शुक्रवारी २५ ऑक्टोबरला अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकचे वैदेही, अजिंक्य विजेते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येथे शुक्रवारी झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या वैदेही चौधरीने १९ वर्षांखालील गटात विजेतेपद मिळवले. दुहेरीत नाशिकच्या अजिंक्य पाथरकरने मुंबईच्या अक्षण शेट्टीसोबत खेळताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली. स्पर्धेत नागपूरच्या रितिका ठाकरने १७ वर्षांखालील एकेरी, दुहेरी गटातील विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट पटकावला.

अंतिम सामन्यावेळी नाशिकचे माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू उदय पवार, नाशिकची माजी राष्ट्रीय खेळाडू प्रज्ञा गद्रे उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

नागपूरच्या रितिका ठाकरने एकेरीच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या पूर्वा बर्वेला २१-१३, २१-१९ असे पराभूत केले. दुहेरीत रितिका ठाकर आणि सिमरन सिंघी या जोडीने आर्या शेट्टी आणि जान्हवी जगताप या जोडीचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

मुलांच्या १७ वर्षांखालील गटात ठाण्याच्या अमन संजय याने मुंबईच्या अक्षण शेट्टीचे आव्हान २१-१८, २१-११ असे मोडीत काढत विजेतेपदावर मोहोर उमटवली. दुहेरीत नाशिकच्या अजिंक्य पाथरकर आणि मुंबईच्या अक्षण शेट्टी या जोडीने नागपूरच्या गौरव मिथे आणि रोहन गर्बानी या जोडीचा २१-१९, १५-२१, २१-१४ असा पराभव केला.

मुलींच्या १९ वर्षांखालील गटात दुहेरीत रितिका ठाकर आणि सिमरन सिंघी या जोडीने नाशिकच्या अदिती कुटे आणि विशाखा पवार या जोडीवर २१-१२, २१-१७ अशी मात करत विजय मिळवला. मुलांच्या दुहेरीत अनिरुद्ध मयेकर आणि करण जाधव या जोडीने पुण्याच्या देवाशीष नावडीकर आणि हर्ष जगधने या जोडीचा २०-२२, २१-१५, २१-१३ असा फडशा पाडला.

१७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत धमाकेदार विजय मिळवणाऱ्या अमन संजय याला १९ वर्षांखालील गटात अंतिम फेरीच्या सामन्याच्या सुरुवातीलाच गंभीर दुखापत झाल्याने पुण्याच्या आर्य भिवपत्कीला विजयी घोषित करण्यात आले. सामना सोडला तेव्हा अमनकडे ३-० अशी आघाडी होती.

दरम्यान, पारितोषिक वितरण करताना उदय पवार यांनी सांगितले, की या वर्षी पुढील काही महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांत महाराष्ट्राचे खेळाडू नक्कीच चांगली कामगिरी करतील. प्रज्ञा गद्रे हिने खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले, की बॅडमिंटनमधील करिअर कमी कालावधीचे असल्यामुळे खेळाडूंनी १५ ते २० याच वयात जास्त कष्ट घेण्याकडे लक्ष द्यावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसपुत्राकडे आढळली तलवार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

शहरातील गुन्हेगारीला वेसन घालण्यासाठी शहर पोलिस कंबर कसून प्रयत्न करीत असताना नाशिकरोड येथे गुरुवारी पहाटे नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांना तिघा संशयितांकडे तलवार आढळली होती. या तिघा संशयितांपैकी एक पोलिसपुत्र, तर दुसरा मुंबई पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्याचा भाऊ असल्याचे पोलिस तपासात उघडकीस झाल्याने या पोलिसपुत्राच्या प्रतापाने पोलिस खात्याचाच कपाळमोक्ष झाला आहे.

गुरुवारी मध्यरात्रीनंतर नाशिकरोड पोलिस गस्तीवर असताना शिवाजी पुतळ्यासमोर उड्डाणपुलाखाली तिघेजण वाहनासह संशयास्पदरित्या आढळून आले होते. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर या तिघांची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे एक तलवार आढळून आली. त्यानंतर सुशील किसन कटारे (रा. गोरेवाडी), नीलेश पांडुरंग मुंडे व पवन दिलीप कोऱ्हाटे (दोघेही राहणार जेलरोड) या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्याखाली नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर या तिघाही संशयितांचा ताबा उपनगर पोलिसांनी घेतला. सुशील कटारे हा पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा, तर नीलेश मुंडे हा मुंबई पोलिस दलात कार्यरत एका पोलिस कर्मचाऱ्याचा भाऊ असल्याची माहिती पुढे आल्याने पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांच्या मुलाकडे घातक शस्त्र असण्याचे कारण काय हा प्रश्न निर्माण झाला आहे.

या तिघा संशयितांचा रोकडोबावाडी दुहेरी हत्याकांडाशी काही संबंध आहे का याची शहानिशा करण्यासाठी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, त्यांचा रोकडोबावाडी दुहेरी हत्याकांडाशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र त्यांच्यापैकी एकजण पोलिसपुत्र, तर एकजण पोलिस कर्मचाऱ्याचा भाऊ आहे.

- अशोक भगर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उपनगर पोलिस ठाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळाबाह्य मुलगा दिसताच कळवा अॅपद्वारे

$
0
0

अत्याधुनिक अॅप उपलब्ध, नाशकात पायलट प्रोजेक्ट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या कुठल्याही भागात शाळाबाह्य मुले दिसतील, तर त्यांची तत्काळ माहिती आपण अॅपद्वारे देऊ शकतो. या माहितीच्या आधारे त्या मुलांच्या जीवनात शिक्षणाची कवाडे खुली होणार आहेत. एनजीओ, कार्पोरेट व सरकारी व्यवस्था यांनी एकत्र येऊन शाळाबाह्य मुलांसाठी अॅप विकसित केले असून, त्याचा दोन टप्प्यात नाशकात पायलट प्रोजेक्ट सुरू झाला आहे.

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे सर्वात मोठे आव्हान शिक्षण विभागापुढे सध्या आहे. हे आव्हान सामाजिक बांधिलकी म्हणून पेलण्यासाठी चाक शिक्षणाची, कलम टीम आणि नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळाने एकत्रित येत 'आयडेंटीफाय किड' नावाचे अॅप विकसित केले आहे. शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी नाशिकमध्ये दोन टप्प्यात याचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे.

शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी 'एव्हरी चाईल्ड काऊंट' या उपक्रमाद्वारे मागील वर्षी ९०० हून अधिक शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणले होते. त्याच पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या अॅपद्वारे शाळाबाह्य मुलांना शोधण्यात येणार आहे. अनेकदा आपल्याला शाळाबाह्य मुले दिसतात परंतु, त्यांना शिक्षणाची दिशा कशाप्रकारे द्यावी, हे ठाऊक नसल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. या अॅपच्या साहाय्याने अशी मुले निदर्शनास आणून देण्यास सामान्य व्यक्तीलाही मदत होणार आहे. सध्या नाशिकपर्यंत सीमित असलेले या अॅपद्वारे पुढे राज्यपातळीवर व त्यानंतर देशपातळीवर शाळाबाह्य मुलांना शोधण्याची मोहीम राबविली जाणार आहे. एनजीओ, कार्पोरेट व सरकारी व्यवस्था हे एकत्रित येत प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबवत असल्याची माहिती शिक्षण अभ्यासक सचिन जोशी, शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अॅपची वैशिष्ट्ये

शाळाबाह्य मुले दिसल्यास त्वरित नोंद करता येते, शाळाबाह्य मुलाचा फोटो, नाव, पत्ता, शाळा सोडल्याचे कारण आदी माहिती भरता येते, एका मुलाची ड्युप्लिकेट एन्ट्री करता येत नाही. स्थलांतरीत मुलांची माहिती अॅपवर नोंदवता येते, ही सर्व माहिती नाशिक महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

'कलम' टीमने केले अॅप विकसित

टाटा कन्सल्टंट सर्व्हिस (टीसीएस)ने नाशिकमध्ये 'डिस्क' नावाचे इनोव्हेशन सेंटर सुरू केले आहे. ज्यामध्ये तरूण विविध विषयांवर संशोधन करून त्यावर उपाययोजना करतात. यातील अपर्णा घटे, कनक जेटली, श्याम किशोर या तीन तरुणांच्या 'कलम टीम'ने हे अॅप विकसित केले आहे. सर्व अँड्रॉईड मोबाइलवर हे अॅप उपलब्ध आहे. मुलांच्या माहितीचा गैरवापर होऊ नये, यासाठी हे अॅप इन्स्टॉल करण्यासाठी आधारकार्ड किंवा पॅन कार्ड नंबर देणे अनिवार्य असणार आहे. 'डिस्क'चे व्हाईस प्रेसिडेंट हसीत काझी आणि मेंटर महादेवन तसेच सचिन जोशी यांचे सहकार्य या तरुणांना लाभले आहे. या अॅपद्वारे ४३१ शाळाबाह्य मुलांना शोधण्यात आले असून त्यातील दोनशे मुलांना विविध शाळांमध्ये प्रवेश घेऊन देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील एकही बालक शिक्षण हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षकांकडून दोनदिवसीय शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, तंत्रज्ञानाची कास धरून हे सर्वेक्षण होणार असून 'आयडेंटिफाय किड' या अॅपची मदत त्यासाठी घेतली जाणार आहे.

'आयडेंटिफाय किड' या अॅपच्या माध्यमातून नाशिक शहरात शाळाबाह्य मुले शोधण्याची दोन दिवसीय मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेसाठी नाशिक महानगरपालिकेच्या वॉर्डनिहाय एक शिक्षक असे १२८ टेक्नोसॅव्ही शिक्षक व २४ केंद्रप्रमुख यांची टीम शिक्षणमंडळाचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्या नेतृत्वाखाली नेमली आहे. या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नाशिकमध्ये एकही मुल शाळाबाह्य रहायला नको, हा या मोहिमेमागील उद्देश आहे.

या मोहिमेसाठी १८ ठिकाणे निवडण्यात आली असून पेठरोड, फुलेनगर, गंगाघाट, लेखानगर झोपडपट्टी, नानावली, शिवाजीवाडी, राजीवनगर आदी ठिकाणांचा समावेश आहे. यामध्ये संकलित केलेली माहिती पाच सप्टेंबरला प्रकाशित करून त्याचा अहवाल शिक्षण सचिवांना सादर केला जाणार असल्याची माहिती शिक्षण अभ्यासक सचिन जोशी, शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सय्यद वस्तीचे आव्हान

वज्रेश्वरी झोपडपट्टी येथील सय्यद वस्तीतील एकही मुल शाळेत जात नसल्याचे चाकं शिक्षणाची या उपक्रमांतर्गत निदर्शनास आले आहे. या वस्तीत सहा महिन्यांपासून चाकं शिक्षणाची यांची बस जात असून, या मुलांना तेथेच शिक्षण दिले जाते. शिक्षणाविषयी प्रबोधन नसल्याने या वस्तीतील अनेक पिढ्या शाळेमध्ये गेलेल्याच नाही. त्यामुळे या वस्तीतील मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्याचे मोठे आव्हान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपाने तीन ठेकेदारांना टाकले काळ्या यादीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या वृक्षलागवडीचा ठेका घेऊनही ते वेळेत काम न केल्याप्रकरणी महापालिकेने तीन ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली आहे. शहरात पंधरा फुटी वृक्ष लागवडीचे काम घेऊन वर्ष लोटले तरी, संबधित ठेकेदारांनी काम करण्यास टाळाटाळ केली. तसेच पालिकेने अट शिथिल करूनही काम पूर्ण केले नसल्याने अखेर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली आहे.

महापालिकेने शहरात साडेपाच कोटी रुपये खर्च करून २१ हजार वृक्षलागवडीचे काम हाती घेतले होते. पंधरा फूट उंचीचे वृक्ष लावण्यासाठीची निविदा काढली होती. त्यात सात ठेकेदारांनी सहभाग घेत ठेका घेतला होता. त्यात अर्जुन हरिश्चंद्र फाफळे, पाटील नर्सरी, निसर्ग एंटरप्रायजेस या तीन ठेकेदारांनी वेळेत काम पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तरीही संबंधित ठेकेदारांनी त्या कामाकडे दुर्लक्ष केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जरा देख के चलो, ये मालेगाँव के रोड है

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील मुख्य रस्त्यांसह लहान मोठ्या सर्वच रोडावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मालेगाव महानगरपालिकेने या खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, यासाठी 'आम्ही मालेगावकर' संघटनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. आम्ही मालेगावकरतर्फे रावळगाव नाका, कॉलेज रोड, स्टेट बँक कॉर्नर येथे खड्ड्यांत कुंडी ठेऊन वृक्षारोपण करत 'ए भाई जरा देख के चलो' असे खोचक संदेश देणारे फलक खड्ड्यांत लावून पाल‌िका प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

मालेगाव शहरात गेल्या दोन महिन्यांत संततधार पाऊस झाल्याने शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांचे पितळ उघडे पडले आहे. बहुतांश रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच माती आणि धुळीने रस्ते माखले असून वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोणता खड्डा चुकवावा अशी कसरत करतांना अनेकांचा तोड जावून अपघातही होत आहेत. या खड्डंयामुळे मन-पाठदुखी व माणक्यांच्या व्याधींनी मालेगावकर त्रस्त झाले आहेत.

आगामी काळात बकरी ईद, गणेशोत्सव सारखे सण येत आहेत. रस्त्यावरून मिरवणूक जातांना अनुचित प्रकार घडल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता पालिकेने या खड्ड्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे करू, असा इशारा देखील संघटनेने दिला.

तीन दिवसात काम सुरू

दरम्यान, स्टेट बँक कॉर्नर येथे प्रभाग अधिकारी मनपा पंकज सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. सोनवणे यांनी तीन दिवसात रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात निखिल पवार, रविराज सोनार, राहुल देवरे, देवा पाटील, यशवंत खैरनार, नीलेश आहेर, भरत देवरे, विवेक वारुळे, दादा बहिराम, दीपक पाटील, प्रवीण साळुंखे, करण भोसले, बाळा भुसे, अतुल लोढा, सलाम कुरेशी, किरण छाजेड, सचिन भकोड, शाम चौधरी आदी सहभागी झाले.

आधीच नियमांचे वावडे..

मालेगाव शहरातील रिक्षाचालक, दुचाकीचालक कोणताही नियम पाळत नसल्यामुळे अनेकदा अपघात झाले आहेत. वळणावर इंडिकेटर न देणे, रस्त्याच्या मध्येच रिक्षा थांबविणे, प्रवाशी भरणे यामुळे संपूर्ण शहरातील वाहतुकीचे आधीन तीन तेरा वाजले आहेत. त्यात खड्ड्यांमुळे तर कधी एकदाचे घरी पोहोचतो, अश प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर येवल्यासाठी पालखेडचे पाणी सुटले...

$
0
0

म.टा. वृत्तसेवा,येवला

गेली तीन वर्षे दुष्काळाशी झुंजतानाच यंदाच्या पावसाळ्यातही आतापावेतो अत्यल्प पर्जन्यमान, तालुक्यातील गावोगावच्या जनतेसमोर घोंगावणारे संकट लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने येवला तालुक्यासाठी पालखेडचे पाणी सोडले आहे.

येवल्यातील शिवसेना पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी लावलेला मोठा रेटा, निवेदने अन् पाठोपाठ उपोषणाचा पवित्रा अखेर कामी आला आहे. पालखेड डाव्या कालव्यास पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेने केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदयानुसार पाणी टंचाई लक्षात घेवून पालखेडच्या पाण्याने येवला तालुक्यातील सर्व बंधारे भरून देण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून पाणी सोडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

डाव्या कालव्याद्वारे ओव्हरफ्लोचे पाणी मिळावे, यासाठी शिवसेनेने गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा चालवला होता. माजी सभापती संभाजी पवार यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांनी केलेल्या उपोषणाची ग्रामविकास राज्यमंत्री नामदार दादा भुसे, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गांभीर्याने दखल घेतली होती. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदयानुसार पाणीटंचाई म्हणून येवला तालुक्यातील सर्व बंधारे भरून देण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार शुक्रवारी दुपारी पाणी सोडण्यात आले.

शिवसेनेने पालखेड कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. निवासी जिल्हाधिकारी, अधिक्षक अभियंता यांना तत्काळ लक्ष घालण्यास सांगतानाच उपोषणकर्त्या शिवसेना शिष्टमंडळाशी प्रत्यक्ष चर्चा देखील केली होती. १५ ऑगस्टचा राष्ट्रीय सण असल्याने उपोषण मागे घ्यावे, आपल्या मागण्यांचा गांभिर्याने विचार करू असे आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेतले होते.

राष्ट्रवादीचा दावा

पालखेड कालव्याला पाणी सोडून येवला व परिसरातील आरक्षित बंधारे भरून देण्यासाठी आमदार जयंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली येवला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यामुळे पालखेड कालव्याला पाणी सोडण्यात आले असल्याचा दावा आता राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कौटुंबिक वादातून पत्नीवर गोळीबार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

पाथर्डी फाटा येथील साईराम रो हाऊसमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबारात दोघेजण जखमी झाले. पतीने कौटुंबिक वादातून पत्नीवर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. दरम्यान, जिल्हा कोर्टाने पतीला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईराम रो हाऊस परिसरात परदेशी दांपत्य राहते. दीपक उर्फ सोनू अशोक परदेशी याचा गुरुवारी वाढदिवस होता. रात्री त्याचा पत्नी कोमल यांच्याशी वाद झाला. यावेळी संतापलेल्या दीपकने शिवीगाळ करून कोमलच्या दिशेने गोळीबार केला. हा प्रकार बघून त्याठिकाणी असलेल्या नागेश्वर बंगाली ठाकूर (२४, रा. शांतीनगर) याने कोमल यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा राग आल्याने दीपकने नागेश्वरवरही गोळीबार केला. या गोळीबारात कोमल आणि नागेश्वर हे दोघेही गंभीर जखमी झाले. गोळीबारानंतर नागेश्वरने परिसरातील घरांचे दरवाजे ठोठावत मदतीसाठी याचना केली. काही जणांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. काही लोकांनी जखमी नागेश्वरला पाहिले आणि इंदिरानगर पोलिसांना घटनेची तत्काळ माहिती दिली. कोमल यांच्या उजव्या डोळ्याला गोळी लागली असून नागेश्वरच्या गालातून शिरलेली गोळी मानेतून बाहेर पडली आहे.

अनैतिक संबंधांचा संशय

गोळीबार झालेल्या घराची तपासणी केली असता त्याठिकाणी दोन गोळ्या झाडल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. जखमी नागेश्वरला पोलिसांनी उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी नागेश्वरच्या फिर्यादीवरून दीपकविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कोमल आणि नागेश्वर यांचे अनैतिक संबंध आहेत का याचा पोलिस शोध घेत आहेत.

जखमी सिव्हिलमध्ये

पोलिस नागेश्वरचा शोध घेत असतांना दीपकने पत्नी कोमलला गाडीवर बसवून सिव्हिलमध्ये नेले. त्यानंतर पोलिसांना जखमी अवस्थेतील नागेश्वर आढळून आला. त्याच्याकडे चौकशी आणि सिव्हिलमधून मिळालेल्या नोंदीवरून पोलिसांनी दीपकला ताब्यात घेतले. त्यावेळी दीपक सिव्हिलमध्येच होता.

पिस्तूल आलेच कसे?

पाथर्डी फाटा परिसरात रक्षाबंधनाच्या दिवशीच असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दीपककडे पिस्तूूल आलेच कसे याचाही पोलिस शोध घेत आहेत. दीपक हा नंदुरबार येथे नोकरीस असल्याचे परिसरातील नागरिकांकडून समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पवन’ला भाजपने केले पावन!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणाऱ्या भाजपने शहरातील गुंडांना पावन करण्याची मोहीम सुरू केली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, पोलिसाची हत्या प्रकरणात आरोपी असलेला तडीपार व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला नाशिक रोड येथील अपक्ष नगरसेवक पवन पवार याला भाजपने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात प्रवेश देऊन 'पावन' करून घेतले आहे. पवन याच्या पक्षप्रवेशाने मात्र नाशिककरांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भ्रष्टाचार, गुन्हेगारांना आश्रय अशा अनेकविध कारणांमुळे मतदारांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीला धोबीपछाड करत भाजपला भरभरून मते दिली. विशेष म्हणजे गुन्हेगारांच्या आश्रयामुळे माजी मंत्री छगन भुजबळ यांना नाशिककरांनी घरी बसवले होते. मात्र, सत्तेवर येताच भाजपनेही आता पलटी खाल्ली असून, गुन्हेगारांच्या शुद्धीकरणासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचाच फॉर्म्युला अवलंबला आहे. नाशिक महापालिकेच्या पुढील वर्षी निवडणुका आहेत. त्यात शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीला पराभूत करण्यासाठी थेट गुंडांचीच भरती पक्षात सुरू केली आहे. सत्तेत येताच भाजपने रम्मी राजपूत यांना पक्षात घेऊन थेट पालकमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून बसवले होते. त्यानंतर शहरातील लहान- मोठ्या गुन्हेगारांना पक्षाची कवाडे खुली करण्यात आली. गेल्या महिन्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या हेमंत शेट्टी व शेखर निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ शुक्रवारी भाजपने इतर पक्षांवर गुन्हेगारीच्या बाबतीत आघाडी घेत, पवन पवार याला भाजपमध्ये प्रवेश दिला. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या 'अभूतपूर्व' सोहळ्याने नाशिककरांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पोलिस हत्येतील आरोपी

पवन पवार याची नाशिकरोडला चांगलीच दहशत असून, त्याच्यावर नाशिकरोड, उपनगर व देवळाली पोलिस स्टेशनमध्ये जवळपास २० च्या वर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे बीट हवालदार कृष्णा बिडवे यांच्या हत्येचाही त्याच्यावर आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन डीसीपी स्वामी यांनी पवार याला तडिपार केले होते, तर गेल्याच पंधरवड्यात तडीपार गुंड संतोष कुशारे याला आश्रय दिल्याप्रकरणी पवारला अटक करण्यात आली होती. त्यामुळे असे गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या पवार याला थेट भाजपने रेडकार्पेट टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळ्यात ५० गावांना पाणीटंचाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. शिंदखेडा तालुक्यात तर परिस्थिती बिकट आहे. जिल्ह्यातील ५० गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने ५८ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, आणखी तीन गावांना टँकरचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे अनेक गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. पिण्यासाठीदेखील पाणी मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील टंचाईग्रस्त ५० गावांसाठी एकूण ५८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. याच तालुक्यात सद्यस्थितीत गोराणे, वारूड, पथारे या गावांना टँकर सुरू करण्यात आले आहेत. भडणे, झिरवे आणि वायपूर या तीन गावांनी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे दिले आहेत. जिल्ह्यात एकूण ३९ मंडळ आहेत. धुळे तालुक्यात आतापर्यत ७२.५ टक्के, साक्री तालुक्यात १३८.४ टक्के, शिरपूर तालुक्यात ६७.०१ टक्के आणि शिंदखेडा तालुक्यात केवळ ५७ टक्के पाऊस झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बस उलटून दोन ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी पहाटे नगावबारी परिसरात मुंबईहून इंदौरकडे जाणारी ट्रॅव्हल बस उलटली. या अपघातात दोन ठार, तर आठ जण जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात भरती केले.

मुंबईहून इंदौरकडे जाणारी ट्रॅव्हल बस पहाटेच्या वेळी नगावबारीजवळ उलटली. चालकाला वेगावर नियंत्रण न मिळविता आल्याने हा अपघात घडला असल्याचा अंदाज आहे. या अपघातात देवाशिष तेभा (वय ३५), विशाल अवखी (दोन्ही रा. इंदौर) हे बसखाली दाबले जाऊन जागीच मृत झाले. विकी वाघारी (वय ३०), राहूल वाघारी (वय २१), प्रमिला वाघारी (वय ५०) (तिघे रा. उज्जैन), मनोज वर्मा (वय २५ रा. इंदौर), ईश्वर जाधव (वय २५), मीरा जाधव (वय ४०, रा. सेंधवा) सुहास लक्ष्मण साहू (वय ४४ रा. मुंबई), लक्ष्मी साळुंखे (वय २७ रा. कळवा, ठाणे) हे प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघात घडताच मोठा आवाज झाला. तो ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. हा अपघात घडला त्यावेळी सर्व प्रवासी हे झोपेत होते. देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूरला पाणी सोडण्याचे संकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैजापूर, गंगापूर तालुक्यांमधील रहिवाशांना एक्स्प्रेस कॅनलद्वारे पिण्यासाठी १५०० दलघनफूट पाणी सोडा, असे आदेश औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक पाटबंधारे विभागाला दिले आहेत. पिण्यासाठी पाण्याची मागणी होत असल्याने ते सोडावेच लागेल, असे संकेत दिले जाऊ लागले आहेत.

पावसाळ्यातच पाण्याची मागणी होऊ लागल्याने पुन्हा उन्हाळ्यातही पाणी सोडावे लागणार का, असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे. गेल्या वर्षी नाशिककर दुष्काळाची दाहकता अनुभवत असतानाही जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले. यंदा नाशिकसह राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे जायकवाडीमधील पाणीसाठा ७५ टक्क्यांवर गेला आहे. अशा परिस्थितीत आता पावसाळ्यातच पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी वैजापुरमधील राजकीय पक्षांचे पदाधिकारी करू लागले आहेत. त्यासाठी त्यांनी तेथील जिल्हाधिकाऱ्यांना उपोषणाचा इशाराही दिला. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी तत्काळ पाणी सोडण्याबाबतचे पत्र नाशिक पाटबंधारे विभागाला पाठविले आहे. जायकवाडी ६५ टक्क्यांहून अधिक भरल्याने लाभक्षेत्राला पाणी देण्यात तांत्रिक अडचण नसल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याची मागणी असल्याने ती पूर्ण करावीच लागेल असे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या पुराचे (ओव्हरफ्लो) पाणी खालील भागास नदीमार्गे सुरु आहे. ते कालव्याला वळविता येईल. तर ओव्हरफ्लोचे पाणी बंद झाल्यानंतर औरंगाबाद, वैजापूर, गंगापूरसाठी असलेल्या आरक्षणातील मुकणे आणि भावली या धरणांमधून पाणी सोडले जाईल असे संकेतही देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिओतील हवामानामुळे अपयश

$
0
0

कविता राऊतने व्यक्त केली खंत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतासाठी पदक मिळवायचे ध्येय समोर ठेवूनच ऑलिम्पिक स्पर्धेत पूर्ण क्षमतेने उतरले होते. मात्र, ब्राझील येथील हवामानाचा वाईट परिणाम झाल्याने यशाला गवसणी घालता आली नाही, अशी खंत कविता राऊत हिने व्यक्त केली.

ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या कविता राऊत हिचे रविवारी रात्री नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, की भारताच्या तुलनेत ब्राझील येथील हवामान दमट आहे. तेथील सागरी दमट वातावरणाचा परिणाम झाल्याने अपेक्षित कामगिरी करणे शक्य झाले नाही. मात्र, ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली याचा अभिमान आहे. ऑलिम्पिकहून परतलेल्या कविताचा नाशिक जिल्हा अॅथलिट असोसिएशन साई यांच्या वतीने डॉ. भीष्मराज बाम, डॉ. विजय घाडगे, डॉ. अनिल थत्ते, प्रशिक्षक विजयेंद्र सिंग, कविताचे पती महेश तुंगार यांच्या उपस्थितीत हॉटेल सिध्दार्थ येथे सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना कविता म्हणाली, की बंगळुरू आणि रिओ येथील वातावरण समान असल्याने आमचे प्रशिक्षण बंगळुरू येथे घेण्यात आले. रिओ येथे स्टेडियममजवळ समुद्र असल्याने वातावरण अधिक दमट होते. त्याचा शरीरावर परिणाम झाला. स्पर्धेच्या एक दिवसआधी ४० किलोमीटर धावण्याची चाचणी स्पर्धादेखील माझ्या अपयशाला कारणीभूत ठरली, असे तिने स्पष्ट केले.

कार्यक्रमास प्रख्यात क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भीष्मराज बाम, डॉ. विजय घाडगे, डॉ. अनिल थत्ते, राजाराम शिंदे, कविताचे पती महेश तुंगार, डॉ. मिलिंद पिंप्रिकर आदी उपस्थित होते. शेखर शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

आता लक्ष्य वर्ल्ड चॅम्पियनशीप

या अपयशाने खचून जाता ऑगस्ट २०१७ मध्ये लंडन येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये यशस्वी कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे, असेही तिने स्पष्ट केले. प्रशिक्षक विजयेंद्र सिंग यांनी पुढील काळात कविता यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा कांदा रेल्वेने निघाला बिहारला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिन्नर फाटा

जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील कांद्याचे लिलाव बेभरवशाचे झाल्याने जिल्ह्यातील हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. परंतु, रेल्वेमार्फत कांद्याची परराज्यात निर्यात पुन्हा सुरू झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वेच्या खेरवाडी व मनमाड या रेल्वे स्थानकातून ४२ वॅगनमधून नुकताच १६८० टन कांदा बिहारमधील पाटणा येथे पाठविण्यात आला. यात खेरवाडी रेल्वे स्थानकातून बुधवारी २१ डब्यांतून कांदा बिहारला पाठविण्यात आला. याप्रसंगी स्टेशन अधीक्षक एस. व्ही. राठोड, मुख्य माल पर्यवेक्षक एन. के. गिते यांच्यासह इतर कर्मचारी, व्यापारी, शेतकरी उपस्थित होते. याशिवाय मनमाड रेल्वे स्थानकातूनही २१ डब्यांतून बिहारला कांदा पाठविण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेमार्फत परराज्यात कांदा निर्यात थांबलेली होती.

आडतीच्या प्रश्नावरून सरकार व व्यापाऱ्यांच्या वादात नाशिक जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या ठप्प होत्या. या पार्श्वभूमीवर पुन्हा जुन्या पद्धतीचे लिलाव पूर्ववत झाल्याने जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांत कांद्याची आवक प्रचंड वाढली होती. त्यामुळे कांदा निर्यात होणे आवश्यक होते. नेमक्या याच वेळेला रेल्वेनेही कांदा निर्यातीसाठी सोय उपलब्ध करून दिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचा फायदा खेरवाडी, लासलगाव, मनमाड येथील रेल्वे मालधक्क्यावरील माथाडी कामगारांनाही रोजगाराच्या स्वरुपात नकळतपणे झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेना पदाधिकाऱ्याकडून तलवार जप्त

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, सिडको

अंबड पोलिसांनी पवननगर भागातील शिवसेनेचा पदाधिकारी अभय पवार यास अटक करून त्याच्याकडून तलवार जप्त केली. पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी ही माहिती दिली. यामुळे दहशत पसरविणारे राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते पुन्हा पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

सध्या राजकीय पक्ष म्हणजे गुन्हेगारांचे हक्काचे घर झाले आहे. यामुळे सरार्सपणे गुन्हेगारांना राजकीय पक्षात प्रवेश दिला जात आहे. या पार्श्वभूमीवरही पोलिसांनी राजकारणाच्या जोरावर दहशत माजविण्याचा प्रयत्न करणा-यांच्या मुसक्या आवाळण्यास सुरुवात केली आहे.

पवननगर भागातील शिवसेनेचा पदाधिकारी अभय पवार या युवकाकडे तलवार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पवार याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्याकडून एक तलवार आढळून आली. दरम्यान पवार यास काही दिवसांपूर्वी अंगावर सोने घालून फिरणे व बॉडीगार्ड घेऊन फिरण्याच्या कारणावरून पोलिसांनी समजही दिली होती. त्यानंतर काही दिवसांत त्याने वाढदिवसासाठी तलवारीचा वापर केल्याचे फोटो सोशल मीडियावर फिरले होते. यामुळे अभय पवार याच्याकडे तलवार असल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे सोमवारी सकाळी पोलिसांनी त्याच्याकडून ही तलवार जप्त करीत त्यास अटकही केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. किरण यांच्या नृत्याभिनयाने रसिक मुग्ध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रामभक्त हनुमानाचे रूप मांडताना झालेला अप्रतिम अभिनय... शबरीची बोरे चाखून गोड तेवढी रामाला देणे, तिची रामाची वाट पाहणे हे प्रत्यक्ष अभिनयातून प्रकट करताना लीलया चेहरा बदलण्याची किमया... महादेवाची पूजा बांधणारे ब्रह्मा, विष्णू यांचा अभिनय अशा विविधतेने नटलेला डॉ. वसंत किरण यांचा नृत्याभिनय पाहण्याचे भाग्य नाशिककर रसिकांना लाभले. निमित्त होते कीर्ती कलामंदिरातर्फे दरवर्षी होणाऱ्या तीनदिवसीय पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाचे. या महोत्सवाला सोमवारी सुरुवात झाली. या वर्षीचा महोत्सव 'नायक' या शीर्षकाने होत आहे.

महोत्सवाची सुरुवात झाली ती पारंपरिक कुचिपुडी नृत्याने. डॉ. किरण यांनी त्र्यंबकस्तुती सादर करीत श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी महादेवाला हे पुष्प अर्पण केले. त्यानंतर आदितालातील रागमालिका सादर करताना गदिमा यांची रचना असलेल्या 'एकच वर द्यावा, प्रभू मज एकच वर द्यावा' या गाण्यावर डॉ. किरण यांनी नृत्य सादर केले. या गाण्याची कोरिओग्राफी खुद्द त्यांचीच असल्याने अभिनयाने नटलेले हे नृत्य पाहणे म्हणजे नाशिककरांच्या दृष्टीने अविस्मरणीय अनुभवच ठरला. त्यानंतर त्यांनी शिवतरंग सादर केले. तिल्लाना या प्रकाराने त्यांच्या पुष्पाचा समारोप करण्यात आला. उत्तरार्धात गौरव-सौरव या जुळ्या भावंडांचे कथक नृत्य झाले.

गोपीकृष्ण जयंती महोत्सवात आज...!

गोपीकृष्ण जयंती महोत्सवात आज, २३ रोजी द्वितीय पुष्प शारवत जोशी गुंफणार आहेत. ते उत्तम ओडिसी नर्तक, कोरिओग्राफर आणि शिक्षक आहेत. गुरु शंतनू बेहरा आणि गुरू प्रशांत पटनाईक यांनी शारवतला घडवले. त्यांचे आजवर साऊथ कोरिया, चायना, जपान या देशात कार्यक्रम झाले आहेत आणि यू. के. फ्रान्स, बुडापेस्ट इथे त्याच्या 'ब्लू डान्स लाइट' या नृत्य संस्थेच्या शाखादेखील आहेत. महोत्सवाच्या द्वितीय पुष्पाच्या अखेरीस पुण्याचे परिमल फडके यांचे भरतनाट्यम् होणार आहे. गुरू रेया श्रीकांत, गुरू सुचेता चाफेकर आणि गुरू जयश्री राजगोपालन या दिग्गज गुरूकडे परिमलने भरतनाट्यमची तालीम घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांच्या महालात अनेक किमती वस्तू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर एसीबीने तपासणी सुरू केली आहे. भुजबळांवर ईडीने कारवाईचा फास आवळल्यानंतर त्यांचे फार्महाऊसही सील करण्याबाबत चर्चा सुरू होती. एसीबीच्या कारवाईने या चर्चेला उधाण आले होते. एसीबीने केलेल्या तपासणीत भुजबळांच्या महालात अनेक किमती दुर्मिळ वस्तू आढळल्या आहेत. त्याच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मफलर अन् बूटही मोजले

भुजबळ फार्म हाऊसमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या महालांमध्ये देश-विदेशातील अत्यंत दुर्मिळ अशा महागड्या वस्तू वापरण्यात आल्या आहेत. त्यांची प्रत्यक्ष दाखवलेली किंमत आणि बाजारभावातील किंमत यात मोठी तफावत असल्याने या महालांची इंचन् इंच मोजदाद केली जात आहे. लाकूड, शिल्प, विविध पेंटिंग, फर्निचर, शोभेच्या वस्तूंसह बांधकाम केलेल्या वस्तूंची मोजदाद सुरू आहे. विशेष म्हणजे या महालांमधील भुजबळ कुटुंबीयांकडून वापरण्यात येणारे कपडे, चादरी, गालिचे, भुजबळांचे मफलर, तसेच बुटांपासून सॉक्सपर्यंतची मोजदाद या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

दगड, मातीसाठी विशेष तज्ज्ञ

नव्या पॅलेससाठी वापरलेले लाकूड, माती व दगडांचे मूल्य शोधण्यासाठी विशेष तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. या बंगल्यात वापरलेले लाकडू विदेशातील आहे, तर मातीही विशिष्ट रंगाची आहे. दगडही वेगवेगळ्या आकाराचे असल्याने हे सर्व परदेशातून आणल्याचा पथकाला संशय आहे. त्यामुळे लाकूड, माती व दगडांच्या तपासणीसाठी कृषी विभागाचे अधिकारी व तज्ज्ञांना सायंकाळी बंगल्यात बोलविण्यात आले. त्यांच्याकडून या चीज वस्तूंची किंमत काढली जात आहे.

तीन दिवस चालणार कारवाई

एसीबीच्या पथकाकडून रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या फार्महाऊसमध्ये देशी व विदेशी वस्तूंची संख्या अधिक आहे, तसेच परिसरही बराच मोठा आहे. त्यामुळे एका दिवसात मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे सोमवारी नव्या महालांची तपासणी रात्रीपर्यंत सुरू होती, तर ही कारवाई अजून दोन ते तीन दिवस चालणार आहे. भुजबळांच्या चंद्राई या बंगल्याचीही मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर आर्मस्ट्राँग कंपनीच्या प्रकल्पांचीही मोजणी केली जाणार आहे.

जप्तीची अफवा

एसीबीच्या पथकांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे भुजबळांचे घर 'ईडी'ने जप्त केल्याची माहिती शहरात पसरली. गेली दहा वर्षे नाशिकमधील राजकीय घडामोंडीचे केंद्र असलेले भुजबळांचे घर जप्त होत असल्याची अफवा पसरताच ते पाहण्यासाठी नाशिककरांचीही मोठी गर्दी या परिसरात झाली होती. या परिसरात एसीबीच्या गाड्यांची संख्या व हालचाल बघून बघ्यांनी मात्र लांब राहणेच पसंत केले. भुजबळांच्या वकिलांनी मात्र ही जप्ती नव्हे, तर मालमत्तेचे मूल्यांकन केले जात असल्याचा दावा केला.

एसीबीने भुजबळ फार्महाऊसच्या मूल्यांकनाचा अर्ज राज्य सरकारकडे केला होता. त्याला सरकारने मंजुरी दिल्यानंतर बांधकाम विभागाच्या मदतीने येथील मालमत्तेचे मूल्यांकन केले जात आहे. जप्तीसंदर्भात कोणतीही नोटीस अथवा कागदपत्रे आम्हाला अद्याप मिळालेली नाहीत.

- अॅड. जालिंदर ताडगे, भुजबळांचे वकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी, नंदिनीची आता रात्री साफसफाई

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रदूषण थांबवण्यासाठी महापालिकेने गोदावरी व नंदिनी या दोन नद्यांची साफसफाई रात्रीपाळीतही करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच नदीच्या स्वच्छतेसाठी १७ स्वच्छता निरीक्षकांसह तेवढेच समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता गोदावरीसह नंदिनीच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित होणार असल्याने नद्यांचे प्रदूषण रोखले जाणार आहे.

गोदावरी व नंदिनीच्या स्वच्छतेची गंभीर दखल महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. नदी प्रदूषणाचा प्रश्न कायमच चर्चेत राहत असल्याने नदीकाठावरील स्वच्छतेची काळजी घेण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. या दोन्ही नद्यांच्या काठावर आता रात्रपाळीतही कर्मचाऱ्यांमार्फत साफसफाई मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने १७ स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती केली असून, ते महापालिकेच्या सहा विभागांची जबाबदारी घेणार आहेत, तसेच १७ समन्वय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामांचे बिघडले ‘बजेट’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महासभेने २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे बजेट मंजूर करून दीड महिना लोटला तरी महापौर कार्यालयाकडून प्रशासनाला बजेटचा ठरावच दिलेला नाही. त्यामुळे ५० लाखांच्या नगरसेवक निधीसह विकासकामांना ब्रेक लागला आहे. महापालिका निवडणुकांचा बिगूल वाजला तरी बजेटला मुहूर्त मिळत नसल्याने नगरसेवकांची विकासकामे मार्गी लागण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. बजेटचा ठराव महापौरांनी अडवून ठेवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे, तर दुसरीकडे जवळपास १५ ते २० नगरसेवकांनी विकासकामांची यादी प्रशासनाकडे सादर केल्याने प्रशासनही पेचात सापडले आहे.

महापालिकेतील सत्ताधारी मनसेने गेल्या वर्षीच्या बजेटचे 'बारा वाजवले' होते. एप्रिलपासून अंमलबजावणी करण्यात येत असलेले बजेट प्रत्यक्षात डिसेंबरमध्ये मंजूर झाले होते. त्यामुळे प्रशासनाच्या बजेटवरच काम करावे लागले होते. यापासून सत्ताधाऱ्यांनी कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. २०१६-१७ या वर्षाच्या बजेटचा मार्गही त्याच पद्धतीने सुरू आहे. स्थायी समितीने बजेट फेब्रुवारीत मंजूर केले असले तरी प्रत्यक्षात महासभेत ते जूनमध्ये आले होते. प्रशासनाच्या १३५८ कोटींच्या बजेटमध्ये स्थायी समितीने ३२० कोटींची वाढ सुचवून ती १७३७ कोटींपर्यंत नेली. यात नगरसेवकांना ५० लाखांचा निधी देण्याची तरतूद करण्यात आली होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात महासभेने या बजेटला मंजुरी दिली होती.

महापौर कार्यालयाकडून हा बजेटचा ठराव प्रशासनाला तातडीने मिळणे अपेक्षित होते; परंतु बजेट मंजूर होऊन दीड महिना झाला तरी महापौर कार्यालयाकडून बजेटचा ठरावच मिळालेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या बजेटवरच महापालिकेचे कामकाज सुरू आहे. जोपर्यंत हा ठराव येत नाही तोपर्यंत नगरसेवक निधी मंजूर करणार नसल्याचा पवित्रा आयुक्तांनी घेतला होता. त्यानंतरही महापौरांनी ढिम्मपणाचीच भूमिका घेतली आहे.

आचारसंहितेचा फटका

महापालिका निवडणुकांचा आता बिगूल वाजला आहे. डिसेंबरमध्येच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापौरांनी आता बजेट मंजूर केले तरी विकासकामे आचारसंहितेच्या कात्रीत सापडणार आहेत. बजेट मिळाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणासाठी दोन ते तीन महिने लागणार आहेत. निविदा काढल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू होण्यास सहा महिने जातील. त्यामुळे या कामांचे श्रेय घेण्याचा नगरसेवकांचा अधिकार कमी होणार आहे. बजेट मंजूर केले तरी त्याचा सत्ताधाऱ्यांना फायदा मिळण्याची शक्यता कमीच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images