Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पाणीपट्टी बिलं मिळाली तब्बल ५ वर्षांनंतर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

महापालिकेकडून मुदतीत घरपट्टी व पाणीपट्टीची बिले मिळत नसल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. बिले उशिरा मिळाल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पाण्याची बिले तर तब्बल पाच वर्षांहून अधिक दिवसांपासून ग्राहकांना मिळत नसल्याने एकाच वेळी हजारो रुपयांची बिले भरण्याची वेळ येते. याकडे महापालिकेने लक्ष घालावे, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

महापालिकेच्या चारही बाजूंनी रहिवाशी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. महापालिकेच्या सातपूर विभागात गंगापूररोड, ध्रुवनगर, शिवाजीनगर, श्रमिकनगर, अशोकनगर, विश्वासनगर, चुंचाळे शिवार, भोर टाऊनशिप येथील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर नागरीवस्ती वाढल्या आहेत. वाढत्या नागरी वस्तीला सुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याचा आरोप नगरसेवकांसह रहिवाशांनी केला आहे. परंतु, यामध्ये सर्वाधिक अडचणींना रहिवाशांना सामोरे जावे लागते ते मुदतीत न मिळालेल्या पाणीपट्टी व घरपट्टीला. मुदतीत पाणीपट्टी व घरपट्टी न मिळाल्याने आर्थिक भूर्दंड देखील ग्राहकांना सहन करावा लागतो. त्यातच पाण्याची बिले अनियमित मिळत असल्याचा आरोप बैठकीत नगरसेवकांनीच केला आहे. नगरसेवक विक्रांत मते यांनी तर पाणी बिल जादा आल्यावर तडजोडीची भाषा महापालिका कर्मचारी ग्राहकांना करत असल्याचा आरोप केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक पालिकेला प्रतीक्षा ६७ कोटींची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात केलेली काटकसर व बचत आता पालिकेच्या अंगलट आली आहे. सिंहस्थात पालिकेने वाचविलेले ६७ कोटी ४३ लाख रुपये शहरातील अन्य कामांसाठी पालिकेला देण्याबाबत शासन स्तरावर अद्यापही उदासीनता दिसून येत आहे. या बचतीतून घाट सुशोभिकरणासह, संरक्षक भिंत व गंगापूर एसटीपीचा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रस्तावाला अद्यापही हिरवा कंदील मिळालेला नाही. दरम्यान सिंहस्थ आराखड्यातील १११९ कोटींपैकी वर्षभरात पालिकेने आतापर्यंत ९८० कोटी खर्च केले असून अजूनही काही कामे प्रलंबित आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या सोयी सुविधांसह विविध विकासकामांसाठी महापालिकेने स्वतंत्र आराखडा तयार केला होता. सुरुवातीला १०५१ कोटींचा हा आराखडा नंतर वाढून १११९ कोटी २९ लाखांपर्यत गेला होता.त्या त सर्वाधिक रक्कम ही रस्ते व रिंगरोडसाठी तब्बल ४६२ कोटी ठेवण्यात आली होती. १११९ कोटीच्या आराखड्यात तीन चर्तुथांश खर्च शासन उचलणार होते. तर भूसंपादनासाठी २०० कोटींचे कर्ज घेतले जाणार होते. शासन या आराखड्यात ६८९ कोटी ४७ लाख रुपये महापालिकेला देणार होते. त्यानुसार आतापर्यंत पालिकेला शासनाने ६२२ कोटी रुपये अदा केले आहेत. महापालिकेने सिंहस्थात अनेक कामे काटकसरीने केल्याने सिंहस्थ निधीत तब्बल ६७ कोटी ४३ लाखांची बचत झाली आहे.

बचत झालेला निधी घाट सुशोभिकरण, काझी गढीला संरक्षक भिंत, गंगापूर एसटीपी साठी मिळावा असे प्रस्ताव महापालिकेने दिले आहेत. परंतु, शासनाने या कामांना अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे ही कामे रखडली आहेत. महापालिकेने आतापर्यंत आपल्या वाट्यातील १८२ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यात ९५ कोटींचे कर्ज काढले आहे. तर भूसंपादनासाठी २३४ कोटी रुपये खर्च केले आहेत. अनेक कामे अजूनही प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे या कामांच्या पुर्ततेची प्रतीक्षा कायम आहे. विशेषतः झाडांमुळे गंगापूर व दिंडोरी रस्त्यावरील रिंगरोडचे काम अपूर्ण आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू

दरम्यान सिंहस्थातील बचत निधी अन्य कामांकडे वळविण्याची विनंती महापालिकेने अगोदरच शासनाकडे केली आहे. परंतु, अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे गुरुवारी मुख्यमंत्री नाशिकमध्ये असून या दौऱ्यात त्यांच्याकडे या कामांना मंजुरी द्यावी व बचत निधी पालिकडे हस्तांतरीत केला जावा, अशी मागणी केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्वतः याला मंजुरी दिल्यास काझी गढीचा प्रश्नही सुटणार आहे. तर घाटांचे सुशोभिकरणही मार्गी लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याकडे नजरा लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून खुल्या पद्धतीने कांदा खरेदी

$
0
0

व्यापाऱ्यांची अखेर नरमाईची भूमिका; कांदा उत्पादकांना दिलासा

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत महिन्यापासून बंद असलेला कांदा लिलाव अखेर गुरुवारपासून सुरू होणार आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांच्या पुढाकारातून प्रचलित (खुल्या)पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय सचांलक व व्यापारी यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश देवरे यांनी दिली.

गेल्या तीस दिवसांपासून सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद असल्याकारणाने तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सलग दोन दिवस आंदोलनाचे हत्यार उपसले होते. शेतकरी रस्त्यावर उतरल्याने व्यापारी व शासनाचे धाबे दणालले होते. या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश देवरे यांनी दुपारी बाजारसमिती सभागृहात संचालक मंडळाची बैठक घेऊन कांदा लिलावासंदर्भात चर्चा केली.

देवरे म्हणाले की, कांदा लिलाव होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला असून त्यांच्या चाळीतील कांदा सडतोय. आधीच दुष्काळाने होरवळलेला शेतकरी कसाबसा उभा राहतोय. त्यात कांदा मार्केट बंद असल्याने त्याची चोहीकडून कोंडी झाली आहे. व्यापारी आणि नियमांच्या कचाट्यात सापडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, असे सांगून त्यांनी व्यापाऱ्यांना भावनीक आवाहन केले.

चर्चेदरम्यान केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यापाऱ्यांशी दूरध्वनीवर संभाषण केले. डॉ. सुभाष भामरे यांनी कांदा व्यापाऱ्यांना विश्वासात घेत शासन निश्चितच व्यापाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेणार आहे. तुमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांचा अंत न बघता आपण बाजार समितीचे व्यापार सुरू करावेत असे, आवाहनही त्यांनी केले.

या आवाहानास कांदा व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. यामुळे उद्या गुरुवारपासून पूर्वीप्रमाणे प्रचलित पद्धतीनुसार व्यापाऱ्यांकडून आडत घेवून बाजार समितीत कांदा लिलाव सुरू करण्यात येत असल्याची माहिती देवरे यांनी दिली.

उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मालाची प्रतवारी करून कांदा विक्रीस आणावा, असे आवाहनही देवरे यांनी केले आहे. या बैठकीस व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक निकम, श्रीधर कोठावदे, वर्धमान लुंकड महेश देवरे, दीपक सोनवणे, जयप्रकाश सोनवणे, पप्पू सोनवणे आदी व्यापारींसह उपसभापती विशाल सोनवणे व संचालक मंडळ उपस्थित होते. बाजार समितीच्या या निर्णयाचे स्वागत शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्रबापू पाटील, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, अरविंद सोनवणे, काका रौंदळ, जिभाऊ खंडू सोनवणे, संजय वाघ शिरसमणीकर, जनार्दन सोनवणे, राजेंद्र जगताप, भिका सोनवणे, तालुकाध्यक्ष सुभाष अहिरे आदींनी केले आहे.

उशिराचा निर्णय

गेल्या दोन वर्षांपासून नाशिक जिल्हा दुष्काळाला सामोरा जात आहे. त्यातच कसमादे पट्ट्यातील शेतकऱ्यांनी इतर पिकांचे पाणी तोडून कांदा जगविला. मात्र कांदा घरात नियमनाच्या मुद्द्यांवरून सगळे फिसकटले. मुसळधार पावसामुळे साठवणीतला कांदा अक्षरशः सडला. त्यामुळे खरेदी सुरू होणार असली तरी कांद्याची प्रत ढासळल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काय पडते, हे महत्त्वाचे आहे.

शेतकरी हितासाठी निर्णय

पिंपळगाव बसवंत : आपल्या मागण्यांबाबत विचार करण्याचे दिलेले आश्वासन तसेच शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून गुरुवारपासून नियमनमुक्तीच्या धोरणानुसार अडतमुक्त कांदा लिलाव जिल्ह्यातील सर्व बाजार समितीत सुरू करणार असल्याची घोषणा नाशिक जिल्हा कांदा व्यापारी आसोशिएशनचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांनी केली. बुधवारी जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांची पिंपळगाव येथे बैठक झाली. भंडारी म्हणाले की, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यापाऱ्यांनी पॅकिंग खर्च मिळावा, गोणीत कांदा विक्रीसाठी यावा किंवा दोन टक्के आडत मिळावी, या मागण्यांबाबत विचार करण्याची ग्वाही दिल्यामुळे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

लासलगावमध्ये धूसफूस

निफाड : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खुल्या पद्धतीने कांदा विक्रीसाठी आणला होता. पण कालच्या तुलनेत अत्यंत कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडीत रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा धूसफूस पहायला मिळाली.

शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खुल्या पद्धतीने कांदा विक्रीसाठी आणला होता. तर काही शेतकऱ्यांनी गोणीत कांदा आणला. व्यापाऱ्यांनी गोणी लिलाव सुरू केले, पण आम्ही खुला कांदा आणला आहे. त्याचा लिलाव करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. व्यापाऱ्यांनी ते ऐकले नाही. फक्त गोणीतील कांद्याचा लिलाव सुरू केला. त्यावर शेतकऱ्यांनी गोणी लिलाव बंद पाडले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी खुला पद्धतीने कांद्याचे लिलाव सुरू केले. मात्र, आदल्या दिवशी आठशे रुपये क्विंटल असलेल्या या कांद्याला अवघा पाचशे रुपये क्विंटलचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडीत रास्तारोको आंदोलन केले. नंतर खुला कांदा आणलेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीच्या संचालकांनी गोणी देऊन पुन्हा लिलाव सुरू केले.

नाफेडही कांदा घेणार

नियमनमुक्तीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या वादामुळे व्यापारी वर्ग कांदा खरेदीस आडमुठेपणाच्या धोरणामुळे लिलाव सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांचा कांदा खराब होऊ लागला आहे. दिल्लीत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी बोलवलेल्या बैठकीत हमीभावाने नाफेडला कांदा खरेदी करण्याचा आदेश दिला. हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे.

-नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड

सबस‌िडीचा विचार व्हावा

देशाची गरज भागविल्यानंतर ४० ते ५० लाख टन कांदा यंदा शिल्लक राहणार असल्याने देशाबाहेर पाठविण्यासाठी निर्यातीवर पंधराशे रुपये टन सबशिडीची देण्याची मागणी केंद्र शासनाकडे केली होती. बाजार समितीतील लिलाव बंदमुळे ५ ते ६ लाख टन कांदा थांबला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर भर देऊन निर्यातीला सबसीडी देण्याबाबत विचार करावा.

-चांगदेवराव होळकर, माजी अध्यक्ष,नाफेड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तपासात ढवळाढवळ होण्याची शक्यता होती’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

घरकुल योजनेत दाखल गुन्ह्यात प्रमुख चार संशयितांच्या विरोधात पुरेसा पुरावा उपलब्ध असला, तरी इतर आरोपी हे कायदेशीर बाबींचा लाभ घेत तपासात ढवळाढवळ करण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले असल्याची साक्ष तत्कालीन तपास अधिकारी ईशू सिंधू यांनी गुरुवारी धुळ्यातील विशेष न्यायालयात दिली.

तपास अधिकारी सिंधू यांची उलटतपासणी घेण्याबाबत संशयित सुरेश जैन यांच्यातर्फे अॅड. राजा ठाकरे यांनी न्यायालयात अर्ज केला होता. प्रदीप रायसोनी यांच्यातर्फे अॅड. सुशील अत्रे यांनी उलटतपासणी घेतली.

ईशू सिंधू यांनी सांगितले की, दोषारोपपत्र दाखल करताना प्रमुख चार आरोपींबद्दल तपास पूर्ण झाला होता. प्रदीप रायसोनी यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करताना, कायद्याचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन प्रशासक तथा सहकार खात्याचे सहनिबंधक (पुणे) यांची साक्षही न्यायालयात नोंदविण्यात आली.

जैन यांच्या जामीनावर आज सुनावणी

संशयित आरोपी माजी आमदार सुरेश जैन यांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात आज, शुक्रवारी सुनावणी होणार आहे. यापूर्वी १४ जुलैला जैन यांच्या जामीनावर कामकाज झाले होते. त्यावेळी सरकार पक्षाकडून सांगण्यात आले होते की, या खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार तपासणे बाकी आहे. त्‍यामुळे जामीन अर्जावर कामकाजासाठी सर्वोच्च न्यायालयाने १२ ऑगस्ट ही तारीख दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे व्यक्तिमत्त्व शतपैलू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव उच्चारताच श्रोत्यांच्या मनात देशभक्तीचे स्फुरण चढते. जाज्वल्य देशभक्ती, उत्तुंग कवित्व आणि परखड हिंदुत्ववादी विचार यांचा संगम म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. पण सावरकर समजून घेताना त्यांना 'शतपैलू सावरकर' असेच संबोधावे लागेल, इतके ते विशाल व्यक्तिमत्त्व होते, असे मत सावरकर साहित्याचे नाशिक येथील अभ्यासक डॉ. गिरीश पिंपळे यांनी व्यक्त केले.

मालेगावच्या एस. एम. जोशी सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते 'शतपैलू सावरकर' या विषयावर बोलत होते. हा कार्यक्रम सावरकर चरित्र आधुनिक तंत्राने कथन करण्याचा एक अतिशय आकर्षक आणि अभिनव असा प्रयोग होता. या कार्यक्रमात डॉ. पिंपळे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सुमारे १०० स्लाइड्स दाखविल्या आणि आपल्या ओघवत्या निवेदनशैलीतून सावरकरांचे अवघे जीवन श्रोत्यांपुढे उभे केले. या चित्रांमध्ये लंडनहून पाठविलेली पिस्तुले, अंदमानचा तुरुंग, तेथील बेड्या, फाशी घर, त्यांची कोठडी, मुंबईचे स्मारक, सावरकर सदन, त्यांच्या रोजच्या वापरातील वस्तू अशा अनेक ऐतिहासिक गोष्टींचा समावेश होता.

याशिवाय सावरकरांचे हस्ताक्षर, त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांची पत्नी आणि इतर नातेवाईक अशा अनेक बाबतीत पिंपळे यांनी सविस्तर माहिती दिली. सावरकरांच्या काही गीतांची झलक ऐकवून त्यांनी या कार्यक्रमात अधिक रंग भरले. या कार्यक्रमाचा शेवट करताना त्यांनी एका चित्रफितीत सावरकरांचे दर्शन घडविले आणि त्यांचा आवाजही ऐकविला.

वाचनालयाच्या अध्यक्षा डॉ. कल्पना करवा यांनी प्रास्ताविक केले. सचिव भास्कर तिवारी यांनी सूत्रसंचालन केले. संजय पाठक यांनी डॉ. पिंपळे यांचा परिचय करून दिला. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सूर्यवंशी या वेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ हजारांच्या दाव्यांचा खर्च देण्याचा आदेश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट को-ऑप. बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांच्याविरुद्ध बँकेचे माजी सरव्यवस्थापक मगनलाल बागमार यांनी नाशिक मर्चंट बँकेच्या लवाद प्राधिकरणाकडे केलेल्या दाव्यात लवादाने २५ हजार रुपये दाव्याचा खर्च देण्याचा आदेश दिला आहे. त्याचप्रमाणे बागमार यांना बँकेकडून अपेक्षित असलेल्या कागदपत्रांच्या प्रती दोन महिन्यांच्या आत प्रमाणित करून ती निःशुल्क देण्याचेही आदेश दिले आहेत. या निकालावर मात्र भोरिया यांनी लवादाची मुदत संपली असल्याचे सांगत लवादाच्या कक्षेत ही तक्रार येत नसल्याचे सांगितले.

या निकालावर बागमार यांनी मात्र प्रशासक भोरियांचा हा जावईशोध असल्याचे सांगत सहकार आयुक्तांनी ६ ऑक्टोबर २०१५ रोजी नाशिक मर्चंट बँकेचे लवाद प्राधिकरणावर अधिकारी म्हणून अमित चोरडिया यांची नियुक्ती केली असून, त्यांची मुदत आदेशानंतर एक वर्षाची आहे. त्यामुळे बँकेच्या प्रशासकांबाबत त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी हा निकाल दिला आहे. या निकालात लवाद अधिकाऱ्यांनी दावा बँकेच्या हिताचा असून, बँक प्रशासनाने दाव्यास केलेला विरोध अनाकलनीय आहे. बँक प्रशासन, कर्मचारी व बँकेचे वकील हे प्रशासकाच्या दबावाखाली काम करत असल्याचे निरीक्षणही नोंदवले.

बागमार यांनी, बँकेला प्रशासकांच्या बेकायदेशीर निर्णयामुळे कोट्यवधी रुपयाचा भुर्दंड बसल्याचे स्पष्ट करून, तो प्रशासकांकडून व्याजासह वसूल करावा, यासाठी लवादाकडे दावा दाखल केला होता. त्यावर लवादाने हा निर्णय दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमजी रोडवर महिलेची पर्स लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एमजी रोडवरील धुमाळ पाँइटवर खरेदीसाठी आलेल्या निफाडच्या रूपाली रवींद्र भोसले यांच्या पर्समधील रोकड आणि दागिने चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या पर्समध्ये एकूण २७ हजार रुपयांचा मुद्देमाल होता.

रूपाली भोसले बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास धुमाळ पाँइटवर खरेदीसाठी आल्या होत्या. त्यांच्या पर्समध्ये पाच हजार रुपये किमतीची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, १० हजार रुपये किमतीचे कानातील दागिने आणि ११,५०० रुपये रोख असा ऐवज होता. भोसले यांची खरेदी सुरू असताना चोरट्याने त्यांचे लक्ष विचलित करून पर्समधील किमती ऐवज आणि रोकड लंपास केली.

५० हजारांची चोरी

घरात झोपलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करून पँटच्या खिशातील ५० हजार रुपये चोरट्याने लंपास केले. नवीन आडगाव नाका येथील बाप्पा सीताराम मार्ग परिसरात बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली.

नवीन आडगाव नाका येथील सिंघानिया बंगला येथे राहणारे नितीन खेमचंद सिंघानिया (वय ४६) बुधवारी रात्री घरात झोपलेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सिंघानिया यांच्या डोक्यात, पाठीवर, पायावर धारदार शस्त्राने वार करीत खुंटीला टांगलेल्या पँटच्या खिशातील ५० हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पतीस मारहाण करून लूट

महिलेसह तिच्या नातलगांनी पतीस बेदम मारहाण करून सोन्याचे दागिने काढून घेतले, तसेच नणंद गर्भवती असतानाही जाणीवपूर्वक तिच्या पोटावर लाथ मारून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी कोर्टाच्या आदेशावरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हनुमानवाडी परिसरात ३ जुलै रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत तुषार दौंड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी प्रतीक्षा तुषार दौंड, बस्तीराम फकीर वाघ, संगीता बस्तीराम वाघ, प्रतीक बस्तीराम वाघ, अनिकेत पोपट वाघ (सर्व रा. हिरावाडी, पंचवटी), पोपट फकीर वाघ, गोकुळ पोपट वाघ (दोघे रा. अटकवडे, सिन्नर) आणि राजाराम नागरे (रा. निफाड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या संशयितांनी बळजबरी घरात प्रवेश करीत शिवीगाळ केली, तसेच गळ्यातील चेन आणि हातातील अंगठी काढून घेतली. दौंड यांची बहीण गर्भवती असतानाही संशयितांनी तिला बेदम मारहाण केल्याचे तुषार दौंड यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी कोर्टाच्या आदेशान्वये आठही संशयितांविरोधात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल दिला नाही म्हणून तोडफोड

मोबाइल दिला नाही, या क्षुल्लक कारणावरून चौघा संशयितांनी घरात घुसून तोडफोड करीत मारहाण केल्याचा प्रकार पंचवटीतील नवनाथनगर परिसरात घडला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथनगर परिसरातील सावरकर चौक येथील नीलेश दिलीप पवार बुधवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांचे मामा विकास वाजे यांच्यासोबत घरासमोर उभे होते. तिथे आलेल्या सुनील नागू गायकवाड याने मोबाइल न दिल्याची कुरापत काढून वाद घालण्यास सुरुवात केली. अन्य तीन संशयितांसोबत पवार यांच्या घरात घुसून सामानाची तोडफोड केली, तसेच मारहाण केली.

तरुणाची आत्महत्या

सातपूर येथील शिवशक्ती चौकातील परमानंद पार्क परिसरात राहणाऱ्या तरुणाने बुधवारी राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. सुनील रमेश वाघ (वय ३३) असे या तरुणाचे नाव आहे. त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा मार्केट खुलले

$
0
0

सटाणा, लासलगाव, पिंपळगाव बसवंत येथे लिलाव पूर्ववत सुरू

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तब्बल ३२ दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात खुल्या ट्रॉलीवरील कांदा लिलावास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाल्यानंतर कांदा उत्पादकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यावेळी कांदा उत्पादक शेतऱ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहत होता.

बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश देवरे यांनी बुधवारी कांदा लिलाव सुरू करण्याचा मार्ग सुकर झाल्याची घोषणा केल्यानंतर गुरुवारी सकाळी बाजार समिती आवारातील मैदान कांदा ट्रॅक्टरने फुलले होते.

बाजार समिती सभागृहात शेतकरी नेते रामचंद्र पाटील, पांडुरंग सोनवणे, मनोहर देवरे, अरविंद सोनवणे, संजय वाघ शिरसमणीकर, जनार्दन सोनवणे, सुभाष पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बाजार समितीमधील कांदा व्यापारी यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका व सरकारचे आभार व्यक्त करून संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. सर्व शेतकरी प्रतिनिधी, संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत पहिल्या ट्रॉलीचा लिलाव करण्यात आला. त्याचा मान करंजाड येथील कांदा उत्पादक यादव गोपजी यांना मिळाला. ७०१ रुपये दराने त्यांचा कांद्याचा लिलाव करण्यात आला. बाजार समिती आवारात ३५० ट्रॉली ट्रॅक्टरसह १५० वाहनातून आठ हजार क्विंटल कांद्याची आवक होती. सर्वाधिक ७५५ रुपये प्रति क्विंटल इतका भाव सकाळच्या सत्रात मिळाला.

आश्वासन पूर्ण करावे

लिलाव शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे सुरू केले तर बाजार समिती संचालक मंडळ व्यापाऱ्यांना मार्केट फीमध्ये ५० टक्के सवलत देईल, हे आश्वासन सभापती रमेश देवरे यांनी पूर्ण करावे, अशी मागणी कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक निकम यांनी केली आहे.



पिंपळगावला १५ हजार क्विंटल आवक

पिंपळगाव बसवंत : सरकारने जाहीर केलेल्या नियमनमुक्ती विरोधात कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामळे तब्बल एक महिन्यापासून बंद असलेले कांदा लिलाव पुन्हा सुरू झाले. गुरुवारी पिंपळगाव बसवंत बाजार आवारात शेतकऱ्यांना मोकळ्या पद्धतीने कांदा आणला होता. पहिल्याच दिवशी १५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. तर बाजारभाव किमान ५०० रुपये, कमाल ८९० रुपये तर सरासरी ६८० रुपयांपर्यंत होते. आवक वाढल्यामुळे सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेले लिलाव सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होते. कांदा व्यापाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेत खुल्या पद्ध्तीने लिलाव सुरू केले. विशेष म्हणजे गुरुवारपासून शेतकऱ्यांकडून आडत कपात न करता खरेदीदारांकडून आडत कपात करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.


उमराणे-मुंगसेत आवक कमी

मालेगाव : तालुक्यातील उमराणे व मुंगसे बाजार समिती आवारात खुल्या पद्धतीने कांदा खरेदी सुरू झाली. कांदा लिलाव सुरू झाला असला तरी बहुतांशी शेतकऱ्यांना याची माहिती नसल्याने गुरुवारी दोन्ही बाजार समिती आवारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मुंगसे आणि उमराणे बाजार समित्यांमध्ये खुल्या पद्धतीने सकाळपासून कांदा लिलावास सरुवात झाली. १०५ वाहनांमध्ये कांदा विक्रीला आला. मुंगसे येथे क्विंटलला ४०० ते ७०० तर, उमराणे येथे ६०० ते ८०० रुपये दर मिळाला. यामुळे अनेक शेतकरी नाराज झाले. कांदा खरेदी खुल्या पद्धतीने सुरू झाल्याबद्दल शेतकरी समाधान व्यक्त करीत असले तरी शासनाने हमी भाव द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांंनी केली आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समाजकल्याणकडून अपंगांची उपेक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, प्रतिनिधी

अपंग बांधवांमध्ये आत्मविश्वास जागविण्यासाठी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग असे संबोधण्यास सुरुवात केली, असे केवळ तोंडी दाखले देणाऱ्या समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांच्या समाजकल्याण खात्याने मात्र राज्यभरातून कार्यक्रमास उपस्थित अपंग बांधवांची गुरुवारी घोर उपेक्षा केली.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून आमंत्रित अपंग बांधव कसेबसे कालिदास सभागृहात अपंगांच्या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते. मात्र, नियोजित वेळेपेक्षा तब्बल तीन तास हा कार्यक्रम उश‌िरा सुरू झाला. शरिरात अपंगत्व असताना त्यावर मात करत समाजापुढे अनोख्या जिद्दीचा आदर्श निर्माण करणारे १२ अपंग पुरस्कारार्थी, एक संस्था आणि राज्यातून उपस्थित हजारो बांधव कालिदास सभागृहात सोहळ्यासाठी दुपारी २ वाजेपासून जमले होते. हा सोहळा गुरुवारी दुपारी ३ वाजता नियोजित होता. मात्र तब्बल अडीच तास उलटून कार्यक्रम सुरू झाला नाही. अधूनमधून 'थोड्याच वेळेत कार्यक्रम सुरू होईल' अशा केवळ घोषणा देण्यात येत होती.

अखेरिस समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले सायंकाळी सहा वाजता आल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. हा कार्यक्रम संध्याकाळी उश‌िरा संपल्याने माघारी परतताना नवख्या शहरात अपंग बांधव गोंधळून गेले होते. अपंगांच्या आत्मसन्मानाचा कार्यक्रमच वेळेत सुरू न करू शकणारे समाजकल्याण नेमके अपंगांचे कसे कल्याण साधणार असा सवाल

नाराज अपंग बांधवांनी 'मटा' कडे उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरमध्ये यापुढे शैव-वैष्णवांचे शाहीस्नान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर सिंहस्थ ध्वजावतरणाच्या सोहळ्यास वैष्णव आखाड्याच्या साधुंनी उपस्थित राहून शैव वैष्णव भेदाभेद नाही, हे जाहीर केले आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज आणि महामंत्री महंत हरिगिरी महाराज यांच्या प्रयत्नातून हे साध्य झाले असून त्र्यंबकेश्वर येथील पुढील सिंहस्थात वैष्णव साधुंचे शाहीस्नान होण्याचे संकेत मिळाले आहेत.

त्र्यंबकेश्वर येथील स्वामी सागरानंद आश्रमात पंच निर्मोही आखाड्याचे महंत राजेंद्रदास महाराज, निर्वाणी आनी आखाड्याचे महंत धर्मदास महाराज आणि दिगंबर आखाड्याचे भक्तदास महाराज यांची अख‌िल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज, महामंत्री हरिगिरी महाराज आणि षड्दर्शन आखाडा परिषद अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज त्याचप्रमाणे महामंडलेश्वर डॉ. रघुनाथदास महाराज माऊलीधाम महंत शंकारानंद महाराज आदींसह भेट झाली. तेथे विचारविनीमय झाला. दरम्यान उपस्थित वैष्णव साधुंनी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तावरील सिंहस्थ ध्वजावतरणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे या प्रसंगी सांग‌ितले. सन १६९० मध्ये शैव वैष्णव साधुंचा स्नानावरून वाद झाला होता. त्यानंतर सन १७१४ मध्ये यावर तत्कालीन पेशवे सरकारने निर्णय देऊन दहा आखाडे शैव साधू त्र्यंबक येथे तर तीन आखाडे वैष्णव साधू नाशिक येथे स्नान करतील, असा निवाडा केला. त्यानंतर आजतगायत शैव आणि वैष्णावांचे त्र्यंबक आणि नाशिक येथे स्नान होत आले आहे. तथापि त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तिर्थावर पर्वणी शाही स्नानाचे वेळेस सकाळी ८ ते ९ दरम्यान वैष्णव साधुंसाठी वेळ राखीव असते. प्रत्येक सिंहस्थात यावर चर्चा होत असते. विशेष बाब म्हणजे त्र्यंबक-नाशिक वगळता उर्वरित तीन सिंहस्थ उज्जैन, हरिद्वार आणि प्रयाग येथे सर्व १३ आखाडे एकत्र असतात. यावेळेस ध्वाजवतरणास तील वैष्णव आखाड्यांचे प्रमुख साधू त्र्यंबकेश्वर येथे आले. येथील १० शैव आखाड्यांच्या सोबत उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व १३ आखाडे एकत्र आले आहेत याचा आनंद सर्व साधुंच्या चेहऱ्यावर दिसून येत हाता. भाजपचे शहराध्यक्ष शामराव गंगापुत्र यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दिव्यांगांच्या सर्वांगीण सक्षमीकरणावर भर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ​ नाशिक

दिव्यांग बांधव जीवनाशी निगडीत समस्यांना तोंड देत जिद्दीने कार्यरत असतात. अशा जिद्दी दिव्यांग बांधवांच्या सर्वांग सक्षमीकरणावर समाजकल्याण विभागाचा पूर्ण भर आहे. यासंबंधी काही महत्वाच्या योजना प्रस्तावित आहेत, त्या लवकरच कार्यान्वीत होतील, अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

अपंग कल्याण राज्य पुरस्काराचे वितरण आज त्यांचे हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, उषा बच्छाव, शारदा वडोले, अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, सहसचिव दिनेश डेंगळे उपस्थित होते.

बडोले म्हणाले, दिव्यांग नागरिकांशी संबंधित विशेष महाविद्यालय, विशेष शाळांसाठी सुधार सम‌िती, त्यांची कागदपत्रे वेळेत मिळण्यासाठी स्वावलंबन अभियान, आणि दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष समितीची स्थापना अशा विविध आघाड्यांवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच घरकुल योजनांमध्ये उत्पन्न मर्यादेची अट शिथील केल्याचे मंत्री म्हणाले. दिव्यांगांच्या अडचणी लवकर सोडवण्यासाठी शासनाने तालुकास्तरावर समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. दिव्यांग स्वावलंबन अभियान राज्यात राबवण्यात येत असून त्याद्वारे अपंग प्रमाणपत्र देण्यासाठी सुलभता, कृत्रिम अवयव उपचार, व्यवसाय कर्ज सुविधा, १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींसाठी आधारगृह उभारणे, विशेष महाविद्यालय उभारणे हे उपक्रम हाती घेतले आहेत.

यावेळी अंध प्रभाकर काळबांधे, अशोक आठवले, अस्थिव्यंग श्रीमती सुरेखा ढवळे, जयभीम शिरोडकर, साईनाथ पवार, अल्पदृष्टी राजेंद्र एन्प्रेंडीवार, मतिमंद दीपक रॉय, आनंद गुजर, अक्षय कोराळे, कर्णबधीर दीपक खानोलकर, बहुविकलांग प्रशांत अभ्यंकर, कर्णबधिर संजय परदेशी यांना तसेच पंड‌ित दिनदयाळ उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ मेड‌िकल सायन्स रिसर्च अॅण्ड ह्युमन रिसोर्सेस संस्था व ज्ञानवर्धिनी शिक्षण प्रसारक मंडळ व सेवाभावी संस्था परभणी यांना मंत्री महोदयांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ खात्याचा व्याप मोठा अन‍् निधीचा तोटा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी ,नाशिक
व्याप मोठा, पण खिशात निधीचा तोटा, अशी माझ्या खात्याची अवस्था आहे, अशी खंत पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्सव्यवसाय मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केली. मात्र विभागाचा चेहरामोहरा लवकरच बदलवून दाखविणारा असे आश्वासनही त्यांनी दिले.

सिंहस्थ ध्वजावतरण कार्यक्रमासाठी आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांनी पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्सव्यवसाय, पशूधन विभागाची जानकर यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील चारही विभागाचे अधिकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

जानकर म्हणाले, आमच्या विभागाकडे राज्यात ७५ हजार हेक्टर जागा आहे. त्यातील ज्या जागा हार्ट ऑफ सिटीत आहे तेथे गाळे बांधता येणार आहेत. केंद्रानेही या खात्याला मदत देण्याचे आश्वासन दिले. राज्यातही निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यासाठी अधिकाऱ्यांनी 'दिल लगा के काम करना चाहिए' असे आवाहन त्यांनी केले. सहा महिन्यात हे राज्यातले एक नंबरचे खाते बनवून दाखविणार, असेही जानकर यांनी सांगितले.

राज्यातील आत्महत्या आमचा विभागाच रोखू शकतो. हाच विभाग भाकड गायीचे संवर्धन करू शकतो. पैसा कमी पडू देणार नाही. पण अधिकाऱ्यांनी अभ्यास करावे, चिंतन करावे, बोगस योजना बंद कराव्यात. त्याचप्रमाणे पत्रव्यवहार करा, प्रस्ताव पाठवा. योजना निश्च‌ित मार्गी लागतील, असेही ते म्हणाले.

विभागांचा लवकरच चेहरामोहरा बदलणार
राज्यातील सर्व पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांना वाहन दिले जाणार आहे. तुमच्या सर्व अडचणीही दूर करू. बदल्यांसाठी मंत्रालयात येवू नका. टाटा, अंबानी या उद्योजकांना जनावरांच्या दवाखान्यासाठी मदत करा, असे आवाहन केले असून त्यांनी मदत देण्यास होकार दिला आहे. त्यामुळे विभागाचे चेहरामोहरा लवकरच बदलेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ शिक्षण समिती कार्यकाळावरून पेच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शिक्षण समितीचा कार्यकाळ हा एक वर्षाऐवजी अडीच वर्षाचा करण्याच्या महासभेच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. पालिकेच्या इतर समित्यांचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असतांना महासभेने शिक्षण समितीचा कार्यकाळ अडीच वर्षाचा केला आहे. विभागीय आयुक्तांनी आलेल्या तक्रारीच्या आधारावर पालिकेला विचारणा केली असता, पालिकेने महासभेचा निर्णय पुढे केला आहे. परंतु, या प्रकरणात निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी व अधिकचा वाद निर्माण होवू नये म्हणून प्रशासनाने या प्रकरणात शासनाचे मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेतला आहे.

तत्कालीन आघाडी सरकारने शिक्षण मंडळ बरखास्त करून महापालिकांमध्ये शिक्षण मंडळाऐवजी शिक्षण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरून बराच काळ वाद सुरू राहिला. हायकोर्टातही हा वाद पोहचला होता. अखेरिस नाशिक महापालिकेनेही मंडळ बरखास्त करत शिक्षण समितीची स्थापना केली. त्यामुळे अन्य विषय समित्यांप्रमाणेच शिक्षण समितीही अस्त‌ित्त्वात आली. परंतु, २० नोव्हेंबर २०१४ मध्ये झालेल्या महासभेत शिक्षण समितीचा कार्यकाळ हा एक वर्षाऐवजी अडीच वर्षाचा असावा, असा ठराव करण्यात आला आहे. तसेच समितीच्या सदस्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्तावही मंजूर झाला होता.

महासभेच्या ठरावानुसार समितीच्या १६ सदस्यांची निवड ही २७ एप्र‌िल २०१५ मध्ये करण्यात आली. तर ७ ऑगस्ट २०१५ रोजी सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली. त्यानंतर समितीचे कामकाज सुरू झाले होते. परंतु, संदीप भवर यांनी विभागीय आयुक्तांकडे या समितीच्या कार्यकाळा संदर्भात तक्रार दाखल केली आहे. मनपा प्रांतिक अधिनियम (३१) ब प्रमाणेच शिक्षण समिती असून अन्य समित्यांप्रमाणेच त‌िचाही कार्यकाळ एक वर्षाचाच असावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी महापालिकेला या संदर्भात स्पष्टीकरण माग‌ितले होते. त्याप्रमाणे जूनच्या महासभेत पुन्हा अडीच वर्षाचाच ठराव करून पुर्वीच्या ठरावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसा ठराव प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. अन्य समित्यांप्रमाणेच समितीची रचन असतांना त‌िला वेगळा न्याय का, असा सवाल तक्रारदारांकडून केला जात आहे. नियमाप्रमाणे ऑगस्टमध्येच कार्यकाळ संपणे आवश्यक आहे. परंतु, महासभेच्या ठरावामुळे सदस्यांना अडीच वर्षासाठी जीवदान मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ चिमुकल्यांसाठी सरसावताहेत हात

$
0
0

सायगाव येथील अनाथ बहिणींसाठी मदतीचा ओघ

म. टा. वृत्तसेवा, येवला

आईचं किडनीच्या विकाराने निधन होताना वडिलांनी अवघ्या दोनच महिन्यात हृदयविकाराच्या झटक्यामुळे जगाचा निरोप घेतला. नियतीने एकामागोमाग घाला घातल्यानं डोक्यावरच्या छायेचं अन् मायेचं मातृपितृछत्र गेल्यानं त्या चिमुकल्या अनाथ झाल्या... ; अशाच अनाथ मुलींच्या भवितव्याची काळजी लागल्याने माणुसकीच्या दातृत्वाचे हात पुढे सरसावत असल्याचं चित्र येवला तालुक्यातील सायगावी पुढे आलं आहे. आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या सायगाव येथील साक्षी अन् पूजा या दोघी चिमुकल्या बहिणींचे पोरकेपण दूर करण्यासाठी गावचे ग्रामस्थ पुढे सरसावले आहे.

येवला तालुक्यातील सायगाव येथील शेतमजूर बाबासाहेब सोपान लोहकरे (वय ३८) यांचे चार महिन्यांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या दोन महिने आधीच पत्नीचे किडनीच्या आजाराने निधन झाले.नियतीने घातलेल्या या घाल्याने त्यांच्या साक्षी (वय ८ ) आणि पुजा (वय १०) या दोन मुली माता-पिता विना अनाथ झाल्या आहेत. त्यांच्यासाठी सायगावमधील भागूनाथ उशीर, शिवाजी भालेराव, सुनील देशमुख, दिनेश खैनार आदी तरुणांनी काहीतरी करण्याचा निश्चय केला.

त्यांनी शहरातील व्यक्तींना आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत मातोश्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी कुणाल दराडे यांनी मदतीचा हात पुढे करत ११ हजाराची मदत दिली. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात सुपूर्द केली. कार्यक्रमात जमा झालेला हा पैसा मुलींच्या बँक खात्यात टाकला जाणार आहे. या मुलींना सर्वस्तरातून मदत जाहीर होत असून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही एका संस्थेने घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकमध्येच थाटला संसार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गेल्या आठवड्यात गोदाकाठच्या गावांना पुराने अक्षरशः वेढले होते. अनेक गावांमध्ये पाणी शिरले, घरांना पाणी लागले. अनेकांच्या संसाराची वाताहत झाली. सायखेडा येथील गंगानगर भागात राहणाऱ्या शंकर हांबरे यांचेही घर वाहून गेल्याने या कुटुंबावर आजपर्यंत एका मालट्रकमध्ये संसार थाटण्याची वेळ आली आहे.

शंकर हांबरे, त्यांची पत्नी मंगला, मुलगा, सून, दोन मुली, दोन नातू यांच्यासह सायखेड्याचा गंगानगर भागात राहतात. गेल्या सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला पूर आला. पुरामुळे गंगानगर भागातील घरात पाणी शिरले. या भागातील घरामध्ये पाणी शिरल्याने सगळ्यांनी जीव मुठीत घेवून हाती जे लागेल ते घेवून आधार शोधला. पाण्याचा प्रवाह इतका होता की काही कळायच्या आत पुराच्या पाण्याने घरांमध्ये थैमान घातले. मंगलाबाईने हातात मावेल तेवढे सामान घेत जीव वाचवित मुलगा, सून, मुली, नातू यांना घराबाहेर काढले. पाण्याचा वेढा कसाबसा मागे रेटत ते बाहेर तर आले. पण घर-संसार पूर्ण पाण्यात बुडाला होता. त्यांचा मुलगा टिंगू ज्या मालट्रकवर ड्रायव्हर आहे. त्याने कुटुंबावर ओढवलेली परिस्थिती आपल्या ट्रकमालकाला सांगितली. मालक भाऊसाहेब हाडळे यांनीही त्याला ट्रक दिला. टिंगूने ट्रकमध्ये उरलासुरला सामान भरला. कुटुंबासह ट्रक सायखेडा कॉलेजजवळ सुरक्षित ठिकाणी आणून उभा केला. तेव्हापासून आठ जणांच्या या हांबरे कुटूंबाने चारचाकी घरात संसार थाटला आहे.

प्रशासनाने आम्हाला काहीही मदत केली नाही. काही माणसांनी आम्हाला खायला आणून दिले. आमचा किराणा, भांडी आणि घर सारंकाही वाहून गेले. सरकारने आम्हाला पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करावी, अशी मागणी या कुटूंबाने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपहरण झालेल्या विवाहितेची अखेर ‘घरवापसी’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या दोन परप्रांतीयांनी अपहरण केलेल्या विवाहितेची सरकारवाडा पोलिसांनी सुटका केली. यासाठी शहर पोलिसांचे पथक थेट उत्तराखंड राज्यातील धारचूल या छोट्याशा गावापर्यंत पोहोचले होते. पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ही विवाहिता घरी परतली असून, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत जाबजबाब नोंदवण्याचे काम सुरू होते.

माहितीच्या आदानप्रदानासाठी फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाचा वापर केला जातो. सरकारवाडा पोलिस स्टेशन हद्दीतील शरणपूर रोड भागात राहणारी महिलाही फेसबुकचा नित्यनेमाने वापर करत होती. मात्र, फेसबुकचा वापर महिलेला, तसेच तिच्या कुटुंबीयांना फारच त्रासदायक ठरला. या महिलेचा उत्तराखंड राज्यातील देव धोनी आणि नथू भंडारी या दोन व्यक्तींशी संपर्क आला. २०१४ मध्ये विवाह झालेल्या या तरुणीशी हे तरुण काही महिन्यांपासून सातत्याने संपर्क साधत होते. याच ओळखीचा फायदा घेत दोघांनी तिचे १२ जुलै २०१६ रोजी शहरातूनच अपहरण केले. सुरुवातीला या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल झाली. विवाहिता बेपत्ता झाल्यापासून मुंबई व पुणे येथे ती राहत असल्याचे पुरावे समोर आले. नंतर मात्र ती उत्तराखंड राज्यातील नेपाळ देशाच्या सीमेनजीक असलेल्या धारचूल या गावात असल्याचे पोलिसांना समजले. दोन वर्षे सुखाने संसारात रमलेल्या पत्नीचे अपहरण झाल्याची तक्रार पतीने दिली. या घटनेतील गांभीर्य ओळखून पोलिसांनी हा गुन्हादेखील दाखल केला. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव यांच्यासह पोलिस कर्मचारी नाईक व वाघ धाराचूल येथे पोहोचले. तिथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने या महिलेची सुटका करण्यात आली. दुर्दैवाने संशयित दोन्ही तरुण पोलिसांना सापडले नाही. याबाबत आहिरराव यांनी सांगितले, की सदर महिलेसह इतरांचे जाबजबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. धारचूल हा उत्तराखंड राज्यातील अत्यंत दुर्गम भाग असून, ही महिला तिथे कशी पोहोचली हे तीच सांगू शकते. सध्या तपास सुरू असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, असे आहिरराव यांनी सांगितले.

सततच्या पाठपुराव्यामुळे या महिलेला आम्ही परत आणू शकलो. बऱ्याचदा परराज्यात अशी कारवाई सफल होत नाही. सुदैवाने सरकारवाडा पोलिसांना यात यश मिळाले. सोशल मीडियाचा वापर कसा करावा, याचा प्रत्येकाने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

- राजू भुजबळ, सहाय्यक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'मैत्रेय' च्या ३४३ ठेवीदारांना ४३ लाखांचे वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीच्या ३४३ ठेवीदारांना गुरुवारी ४३ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत ६१९ गुंतवणूकदारांना ८१ लाख ५७ हजार रुपयांचे वाटप कमिटीमार्फत करण्यात आल्याचे सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी सांगितले.

मैत्रेय ठेवीदारांना इस्क्रो खात्यातून पैसे परत करण्यासाठी कोर्टाच्या आदेशाने एक कमिटी नियुक्त करण्यात आली आहे. या कमिटीमार्फतच गुंतवणूकदारांची यादी निश्चित करून पैसे परत करण्याची कार्यवाही होते आहे. ३४३ ठेकेदारांना गुरुवारी एकूण ४३ लाख २० हजार ६८० रुपये देण्यात आले. आतापर्यंत ६१९ ठेवीदारांना ८१ लाख ५७ लाख रुपयांचे वाटप झाले असून, ही प्रक्रिया निरंतर सुरूच राहील, असे पोलिस निरीक्षक कोल्हे यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात कमिटीने कागदपत्रे सादर करण्यास सांगितलेल्या अनेक ठेवीदारांना पावसामुळे पोलिसांशी संपर्क करता आला नव्हता. या ठेवीदारांनासुद्धा चालू आठवड्यात पैसे परत करण्यात आल्याचे कोल्हे म्हणाले. ठेवीदारांशी संपर्क साधणे, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करणे, रकमेनुसार यादी तयार करणे यासाठी सात ते आठ अधिकारी कर्मचारी कार्यरत असून, सर्वांना पैसे मिळतील, यासाठी पोलिस प्रयत्नशील असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. इस्क्रो खात्यात जवळपास साडेसहा कोटी रुपये जमा असून, मैत्रेय संचालकांच्या परदेशातील मालमत्तांचा शोध घेतला जात आहे.

आठवड्याला पैसेवाटप

मैत्रेय ठेवीदारांचा आकडा मोठा असून, आठवड्यागणिक फार तर १५० ते २०० गुंतवणूकदारांना पैसे परत केले जाऊ शकतात. गुंतवणूकदारांशी संपर्क साधणे, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे यासाठी पोलिस स्टेशनमध्ये रोज रात्री उशिरापर्यंत काम सुरू असते. पावसामुळे पोलिसांशी संपर्क साधू न शकलेल्या गुंतवणूकदारांना आजच्या आठवड्यात संधी देण्यात आली. त्यामुळे पैसे मिळालेल्या ठेवीदारांचा आकडा वाढला. मात्र, दर आठवड्याला हे शक्य होणार नाही, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैव-वैष्णवांच्या उपस्थितीत उतरली धर्मध्वजा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथे गुरुवारी रात्री ९ वाजून १६ मिनिटांनी ध्वजावतरण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बालविकासमंत्री पंकजा मुंडे आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अम‌ित शहा यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम नीलपर्वत जुना आखाडा येथे त्यांचे रात्री साडेआठ वाजता सर्व मान्यवरांचे आगमन झाले. अम‌ित शहा यांनी शैव व वैष्णव आखाड्यांचे साधू महंत एकत्र आल्याचे पाहून आनंद व्यक्त केला. त्यानंतर कुशावर्तावर ध्वजावतरणाचा पुजाविधी झाला. नगराध्यक्षा विजया लढ्ढा आणि उपनगराध्यक्ष संतोष कदम यांनी शहा यांचे स्वागत केले.

नीलकंठेश्वर महादेव मंदिरात शहा यांच्या हस्ते श्रीफळ वाहून कार्यक्रमांची सुरूवात करण्यात आली. त्र्यंबकेश्वर येथे प्रथमच सिहस्थ कुंभमेळा ध्वजावतरण कार्यक्रमात अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या प्रयत्नाने १३ आखाड्यांचे सर्व पदाधिकारी, साधू संत उपस्थित होते. त्यामुळे वर्षानुवर्षे चालत आलेला शैव-वैष्णव वाद संपुष्टात आल्याचे दिसून आले. यावेळी बिंदुजी महाराज, श्रीमहंत धनराजगिरीजी महाराज, श्रीमहंत गणेशानंद सरस्वती, शंकरानंद सरस्वती, जुना आखाडा महामंत्री, शांतिगिरीजी महाराज, भाजप शहराध्यक्ष श्याम गंगापुत्र, प्रांताधिकारी वाघचौरे, तहसीलदार नरेशकुमार बहीरम यांच्यासह त्र्यंबक शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर डॉक्टरची युरोपात सायकलस्वारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे सायकलपटू अांतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने ठसा उमटवत आहेत. शहरातील कान नाक घसातज्ज्ञ डॉ. शिरीष घन यांनी अत्यंत खडतर अशी स्वित्झर्लंड ते फ्रान्स ही रॅली नुकतीच पूर्ण केली. या रॅलीत सहभागी होणारे ते एकमेव भारतीय ठरले आहेत. पाच दिवसांत त्यांनी तब्बल ६०० किलोमीटर अंतर कापले.

अमेरिकेतील स्मॉल स्टेप्स चॅरिटी या संस्थेतर्फे जिनेव्हा (स्वित्झर्लंड) ते नीस (फ्रान्स) ही ६०० किलोमीटरची रॅली ३१ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत झाली. शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी या संस्थेतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले. घटस्फोटीत दाम्पत्यांच्या मुलांची हेळसांड थांबावी यासाठी या रॅलीतून प्रबोधनही करण्यात आले. या मोहिमेतून जमा होणारा निधी भारतातील शाळांमधील लहान मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे. विविध देशातील एकूण ३२ सायकलिस्ट रॅलीत सहभागी झाले. यात अमेरिका, इंग्लंड, डेन्मार्क व भारतीय सायकलिस्टचा समावेश होता. रॅलीची सुरुवात जिनिव्हा येथून होऊन नीस येथे समारोप झाला. ६०० किलोमीटरच्या रॅलीत सायकलिस्टला अनेक ठिकाणी चढ-उतार, खडतर रस्ते, डोंगर-दऱ्या, वाळवंट अशा परिस्थितीचा सामना करावा लागला. टूर द फ्रान्सचा १३ किलोमीटरचा काही भाग या राईडमध्ये येतो. 'अल्पस दे हज' हा १८१५ फुट उंचीवर चढण्याचे कसब यांना दाखवावे लागले.

सलग १५ तास प्रवास
रॅलीचा प्रवास बहुतांश प्रवास ग्रामीण भागातून असल्याने तेथील जीवनमान पहाण्याची देखील सायकलिस्टला संधी मिळाली. रोजचा अंदाजे १२० ते १५० किलोमीटर प्रवास सायकलिस्टला करावा लागत असे. साध्या रस्त्यावरून १५० किलोमिटर प्रवास करण्यास अंदाजे दोन ते तीन तास लागतात; मात्र हेच अंतर रॅलीत पूर्ण करतांना १५ तासापेक्षाही जास्त कालावधी लागत होता.

तीन महिन्यांचा कठोर सराव
रॅलीसाठी डॉ. घन यांनी तीन महिन्यांपासून सातत्याने सराव केला. यासाठी रोज ते कसारा ते नाशिक अशा दोन फेऱ्या पूर्ण करत होते. तसेच व्यावसायिक सायकलिस्टचे देखील त्यांनी मार्गदर्शन घेतले होते. मोहिमेच्या कालावधीत कोणता आहार घ्यावा, यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली. रॅलासाठी डॉ. घन यांनी जिनिव्हा येथील सायकल भाडेतत्वाने वापरली होती. डॉ. घन यांनी यापूर्वीही हिमालयातील अवघड सायकल मोहिमा पूर्ण केलेल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन हजार नकाशे ऑनलाइन उपलब्ध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील बांधकाम मंजूर झालेल्या इमारतींचे नकाशे ऑनलाइन करण्याच्या मोहिमेला वेग आला असून, नगररचना विभागाच्या वतीने आतापर्यंत दोन हजार इमारतींचे नकाशे ऑनलाइन करण्यात आले आहेत.
गेल्या तीन वर्षांत मंजुरी झालेल्या इमारतींचे पालिकेकडून मंजूर करण्यात आलेले नकाशे पालिकेच्या वेबसाइटवर टाकण्यात आले असून पालिकेच्या अॅपवरही ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांना आपल्या इमारतीचा प्लॅन माहिती व्हावा, या उद्देशाने तत्कालीन आयुक्तांनी नकाशे ऑनलाइन टाकण्याचे आदेश दिले होते.
बिल्डरांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने नगररचना विभागाकडून इमारतीचे मंजूर केलेले प्लॅन टाकण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घेतला होता. नागरिकांनी महापालिकेने मंजूर केलेल्या इमारतीचा नकाशा पाहूनच फ्लॅट घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार नगररचना विभाग व पालिकेच्या तांत्रिक विभागाच्या मदतीने दोन महिन्यांपासून नकाशांचे स्कॅनिंग करून ते वेबसाइटवर टाकण्यात येत आहेत. भोगवटा प्रमाणपत्र मिळालेल्या इमारतींचे नकाशे टाकण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images