Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

​ ‘सैराटवृत्तीने देशाचे नैतिकदृष्ट्या अधःपतन’

$
0
0

लखन सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर

भारतीय संस्कृतीला जागतिक पातळीवर अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्रियांना देवत्व बहाल करणाऱ्या भारत देशाचे सध्या सैराटवृत्तीमुळे नैतिदृष्ट्या अधःपतन होत आहे. यामुळे आजच्या काळात स्त्रीप्रधान संस्कृती टिकून राहणे ही काळाची गरज असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी वक्त केले.

नामपूर येथील कृष्णाई मंगल कार्यालयात श्रीहरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच उन्नती विद्यालयाचे शिक्षक शरद नेरकर यांच्या सेवापुर्ती सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी शरद नेरकर यांचा सिंधुताई यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच श्रीहरी प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या 'श्रीहरी गौरव' पुरस्काराने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उन्नती एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अशोक सोनजे होते. कार्यक्रमास डॉ. प्रभाकर निकम, सरपंच प्रमोद सावंत, अशोक नखाते, साहेबराव बच्छाव, डॉ. प्रशांत पाटील, सतीश विसपुते उपस्थित होते. सिंधुताई पुढे म्हणाल्या, महिलांवरील अत्याचार, बलात्कार यांसारख्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कोर्टात पती-पत्नी वादाच्या सर्वाधिक केसेस पेंडिंग आहेत. आपला जन्म हा स्वतःसाठीच नाही तर समाजासाठी देखील झालेला आहे ही भावना लक्षात घेऊन समाजऋण फेडण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासण्याची गरज असल्याचा सल्ला त्यांनी दिला. एक्कावन्न हजार रुपयांची रोख देणगी सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथालयाला देण्यात आली. सुभाष सोमवंशी, सुरेश शेलार, राजेंद्र दिघे, चरणसिंग इंगळे, दीपक मोरे, जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा (माळीनगर), दीपक शेवाळे, जयवंतराव ठाकरे, जेष्ठ नागरिक संघ (नामपूर) यांना 'श्रीहरी गौरव' पुरस्कार देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘अग्निशमन’ची बनवाबनवी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत सर्वाधिक टीकेचे लक्ष्य बनलेल्या अग्निशमन दलाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. अग्निशमन दलाकडून शहरातील हॉस्प‌िटल्स, हॉटेल्स, लॅब व १५ मीटरवरील इमारतींच्या परवानगीचा दाखला देण्यात येतो. हा दाखला दरवर्षी नुतनीकरण करण्यास सांगून संबंधितांना विनाकारण त्रास दिला जात आहे. वास्तविक राज्य सरकारने दरवर्षी नूतनीकरणाची गरज नसल्याचा आदेश दोन वर्षांपूर्वीच दिला आहे. तरीही अग्निशमन दलाने हा आदेश दाबून धरला.

केवळ बी फाॅर्म भरणे आवश्यक असताना पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून दाखले नुतनीकरण करून डॉक्टर, व्यावसायिक, बिल्डरांना त्रास दिला जात होता, असा आरोप सभापती संजय चव्हाण यांनी केला आहे. ही बनवेगीरी उघड होताच विशेष म्हणजे अग्निशमन विभागाने महासभेत प्रस्ताव ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, दोन वर्ष झालेली पिळवणुकीचे काय, असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.

महापालिकेतील अग्निशमन दल अधिकारी अनिल महाजन यांच्यासह हा संपूर्ण विभागच अनेक दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत आहे. गेल्या महिन्यात केंद्रप्रमुखाला पाच हजाराची लाच घेतांना अटक झाली होती. तर बिल्डरांना त्रास दिला जातो, असा आरोप केला जात होता.

महाराष्ट्र आगम प्रतिबंधक व जीवरक्षक अधिनियम २००६ नुसार शहरातील प्रत्येक हॉटेल्स, बार, हॉस्पीटल्स, लॅब व १५ मीटरवरील इमारतींना अग्निशामक यंत्रणा बसवण्यासह त्यांसदर्भातील दाखला घेणे बंधनकारक आहे. हा दाखला एकदा घेतला तरी, दरवर्षी त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक होते. परंतु, संजय चव्हाण यांनी शासनाशी पत्रव्यवहार करत नुतनीकरण रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने ३० ऑक्टोबर २०१४ रोजी शासन आदेश काढत ही अट रद्द केली. केवळ स्ट्रक्चरल ऑडीट करून बी फॉर्म सादर करणे बंधनकारक केले होते.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाने मात्र हा शासन आदेश दोन वर्ष दडवून ठेवला. दोन वर्षापासून सर्वांचे दाखले सरसकट नुतनीकरण करण्याचा अट्टाहास सुरूच ठेवला. त्यामुळे सर्वांनाच त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागत होता. हा नूतनीकरण दाखला मिळवण्यासाठी ग्राहकांची अक्षरशा पिळवणूक केली जायची. त्यामुळे शासनाचा आदेश दडवून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

अर्थकारण थांबणार
आता केवळ बी फॉर्म भरावा लागणार आहे. दाखल्यांच्या नूतनीकरणासाठी अग्निशमन विभागात कार्यरत असलेले एजंटही होते. तसेच स्पॉट व्हिज‌िट व यंत्रसामग्री तपासण्यासाठी अग्निशमचे मोठे दिव्यच पार करावे लागत होते. यातून आता सुटका होणार आहे.


सलग दोन वर्षे शासनाचा आदेश दाबून ठेवलेल्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जाईल. तसेच दोन वर्ष नूतनीकरणाच्या नावाखाली घेतलेले पैसे परत मिळावेत.
- संजय चव्हाण, सभापती, शिक्षण समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तरीही शहरात खड्डेच खड्डे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन आठड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. प्रमुख रस्तेही खड्ड्यात गेले असून महापालिकेच्या वतीने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात जवळपास १६८३ खड्डे बुजविण्यात आले आहेत. तर चार दिवसांत २४५ ठिकाणांहून गाळ व माती काढण्यात आली आहे. शहरातील खड्डे बुजवण्याचे काम पालिकेने हाती घेतले असले तरी, अजूनही शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे.

सततच्या पावसामुळे 'रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते' अशी अवस्था झाली आहे. पालिकेने खड्डे बुजविले तरी, दुसऱ्या दिवसाच्या पावसाने 'जैसे थे' स्थिती झाली आहे. त्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. रस्त्यांची चाळण झाली असली तरी महापालिकेने पावसाळ्यातही युद्दपातळीवर खड्डे बुजविण्याची मोहीम उघडली आहे. शनिवारी बांधकाम विभागाने शहरातील अडीचशे खड्डे बुजविले. रविवारी २६६, सोमवारी २४०, मंगळवारी ९२७ खड्डे बुजवून ७१ रस्ते साफ केले.

पावसाने फेरले पाणी
महापालिकेच्या बांधकाम विभागाने दररोज २४ जेसीबी, ३३ ट्रॅक्टर, पाच स्क्रॅपर, ८ डम्पर अशी सामग्री वापरून रस्त्यांची साफसफाई व खड्डे बुजविण्याचे काम केले. परंतु, तरीही शहरातील रस्त्यांवर खड्ट्यांचे साम्राज्य कायम आहे. खड्डे बजविल्यानंतर त्याच्यावर पुन्हा पाणी पडल्यानंतर मुरूम वाहून जातो. यामुळे यंत्रणाही त्रस्त झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरोहित संघाला सुनावले खडेबोल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शुभारंभप्रसंगी पुरोह‌ित संघाने महापालिकेच्या लोकप्रतिनिधींच्या केलेल्या अपमानाची सल पालिकेच्या लोकप्रतिनिधींनी मंगळवारी काढली. मोठ्या थाटामाटात व जल्लोषात ध्वजावतरण करण्याच्या तयारीत असलेल्या पुरोहित संघाला महापुरात थाटबाट करू नका, असा सल्ला देत आता यावेळी तरी आमचा सन्मान राखा, असे खडे बोल सुनावले आहेत.

शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना त्यांचा सन्मान द्या, असे सांगत मुख्यमंत्र्यांना निवेदन देतांना महापौरांना पुन्हा का टाळले अशा प्रश्नांची सरबत्ती पुरोहित संघावर केली. त्यामुळे पुरोहित संघाचे सतीश शुक्लांसह पदाधिकारी या अनपेक्षित हल्ल्याने ओशाळले आहेत. आगामी सोहळ्यातही राजकारण तापणार असल्याचे चित्र आहे.

येत्या ११ ऑगस्टला सिंहस्थ कुंभमेळ्याची समाप्ती होत असून त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यांत आहे. विविध साधू महंतासह मुख्यमंत्र्यांनाही या ध्वजावतरण सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी १४ जुलै रोजी सिहंस्थ ध्वजारोहण पुरोहित महासंघ व महापालिकेच्यावतीने संयुक्तरित्या करण्यात आले होते. महापालिकेने यासाठी सर्व खर्च केला होता. परंतु, या कार्यक्रमात महापालिकेतील लोकप्रतिनिधींना अपमानास्पद वागणूक दिली होती. त्यामुळे वर्षभर हा वाद सुरू होता.

ध्वजावतरण सोहळ्यात हा वाद शांत होईल अशी शक्यता होती. परंतु, पुरोहित संघाने ध्वजारोहण सोहळ्यावेळी केलेली चुक पुन्हा केली. मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देतांना महापौरांना पुन्हा डावलले. त्यातच ध्वजावतरण सोहळ्यासाठी आर्थिक मदतीसह मंडप, स्टेज, खुर्च्यांची व्यवस्था पालिकेने करावी, असे साकडे घालण्यासाठी शुक्लांसह पदाधिकारी महापौरांकडे मंगळवारी आलेत. महापौर, उपमहापौर,स्थायी समिती अध्यक्ष,आयुक्त यांच्यासोबत बैठक घेतली. यात त्यांनी मागण्यांचा पाढा वाचताच लोकप्रतिनिधींनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वजावतरणासाठी त्र्यंबकनगरी सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळा ध्वजावतरण सोहळ्यासाठी चोख व्यवस्था करा, असे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सर्व विभागांना दिले आहेत. ११ ऑगस्ट रोजी सिंहस्थ महापर्वाची सांगता होत असून, त्यानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अनेक मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर येथे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याप्रमाणेच ध्वजावतरण सोहळाही दिमाखात साजरा करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

त्र्यंबक नगरपरिषद, षडदर्शन आखाडा परिषद, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्यामार्फत सोहळ्याचे नियोजन सुरू आहे. गुरुवारी (दि.११) गुरूचा सिंह राशीतून कन्या राशीमध्ये प्रवेश होणार आहे. या दिवशी रात्री नऊला ध्वजावतरण सोहळा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​वाढदिवसाची वर्गणी बनली त्यांचा आधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरातील पशुधन सांभाळण्याच्या कौटुंबिक जबाबदारीमुळे शाळाबाह्य म्हणून गणती केलेल्या चिमुरड्यांना सिन्नर तालुक्यातील पाताळेश्वर विद्यालयाने अनोख्या उपक्रमातून शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. यासाठी शिक्षकांचा वाढदिवस साजरा न करता त्यापोटी जमा होणारी वर्गणी ४२ आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधार बनली आहे.

सिन्नर तालुक्यातील पाडळी पातळेश्वर माध्यमिक विद्यालयात ४२ आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेपासून किमान दहा किलोमीटर अंतर असणाऱ्या लहान लहान गावांमधून व पाड्यांमधून हे विद्यार्थी येथे शाळेत येत होते. मात्र प्रतिकूल परिस्थितीच्या परिणामी घरातील पशुधन सांभाळण्यासाठी या विद्यार्थ्यांची शिक्षणाशी असणारी नाळ तुटली. यानंतर या शाळेतील शिक्षक सातत्याने त्यांच्या पालकांच्या संपर्कात होते. पण शालेय साहित्य, गणवेश आदी प्राथमिक गरजांअभावी या पाल्यांना शाळेत पाठविण्यास पालक तयार नव्हते. यावर पाताळेश्वर विद्यालयातील शिक्षकांनी एकत्रित येत वाढदिवसाच्या निमित्ताने काढण्यात येणारी वर्गणी एकत्रित करून या मुलांसाठी ती खर्च करण्याचा निर्णय घेतला. यातूनच या ४२ मुलांसाठी शालेय साहित्य, गणवेश, खाऊ आदी उपयोगी वस्तू घेण्यात आल्या. या नात्यातून निर्माण झालेल्या जिव्हाळ्यापोटी या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येता आले आहे. आदिवासी दिनाचे औचित्य साधत दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. यंदाही हा उपक्रम राबविण्यात आला.

यासाठी मुख्याध्यापक एस. बी. देशमुख, बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शेख, एस. एस. देशमुख, के. डी. गांगुर्डे, आर. आर. गिते, एस. डी. ढोली, ए. बी. भोरे, टी. के. पाटोळे, सी. बी. गिते, आर. आर. पाटोळे आदींनी सहभाग घेतला.

रोज वीस किलोमीटर पायपीट

या उपक्रमाचा लाभ घेणारे ४२ विद्यार्थी शाळेपासून दहा ते वीस किलोमीटरच्या परिघातील आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये टोळे वस्ती, लिंबाची वाडी, मोखऱ्याची वाडी, गावखाडी, खालची आडवाडी या अतिदुर्गम वस्तीवरची मुले आहेत. रोज हे विद्यार्थी पायपीट करत शाळा गाठतात. त्यांच्या निवासापासून शाळेपर्यंत कुठलीही वाहन व्यवस्था नाही. शेळी व मेंढीपालन हा त्या मुलांच्या घरातील प्रमुख व्यवसाय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल कॉलेजचे नाशिकला गिफ्ट?

$
0
0

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचे सकारात्मक संकेत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये शासकीय मेडिकल कॉलेज सुरू व्हावे यासाठी सत्ताधारी भाजपने कंबर कसली आहे. एकट्या नाशिक शहरात सिव्हिल आणि संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये मिळून तब्बल साडेआठशे बेडची व्यवस्था असल्याने यापैकीच एका हॉस्पिटलला मेडिकल कॉलेजचा दर्जा मिळण्याची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनीही याबाबत सकारात्मकता दर्शवित या विभागाच्या सचिवांना याकामी लक्ष घालण्यास सांगितले आहे. त्यामुळे नाशिकला लवकरच मेडिकल कॉलेजचे गिफ्ट मिळण्याची चिन्हे आहेत.

वैद्यकीय क्षेत्राकडे वाढणारा नवीन पिढीचा ओढा पहाता अजूनही विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय कॉलेजांमध्ये प्रवेशापासून वंचित राहावे लागते. शहर आणि जिल्ह्यात सहा खासगी मेडिकल कॉलेजेस असून तेथे विविध वैद्यकशाखांचे शिक्षण घेता येते. मात्र तेथे मर्यादित असणाऱ्या जागा, न परवडणारे प्रवेश शुल्क यांमुळे इच्छा असूनही अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येत नाही. पुणे, मुंबईतही मर्यादित जागा असल्याने नाशिककरांची पीछेहाट होते.

उत्तर महाराष्ट्रात केवळ धुळे येथेच सरकारचे वैद्यकीय कॉलेज आहे. नाशिकमध्ये अशा प्रकारचे शासकीय महाविद्यालय सुरू झाल्यास येथील विद्यार्थी आणि पालकवर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नाशिकमध्येच राज्य सरकारने मेडिकल कॉलेज सुरू करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुनील आडके यांनी महाजन यांच्याकडे केली. नुकतेच त्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

सिव्हिल हॉस्पिटल येथे अलिकडेच नवीन इमारत उभारण्यात आली असून लॅब, नर्सिंग कॉलेजदेखील आहे. सर्वसाधारण आजारांवर येथे उपचार होतात. तर संदर्भ सेवा हॉस्पिटलमध्ये हृदयरोग, किडनी आणि तत्सम गंभीर आजारांवर उपचार केले जातात. त्यासाठीची महागडी आणि अत्याधुनिक मशिनरीही उपलब्ध आहे. सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने येथे लवकरात लवकर मेडिकल कॉलेज सुरू करून विद्यार्थी आणि पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याबाबत महाजन यांनीही तेवढीच तत्परता दाखवित सचिवांना व्यवहार्यता तपासून कार्यवाही करण्याचे आदेशही दिलेत.

मेडिकल कॉलेजसाठी केवळ वर्गखोल्या, बेंचेस, प्रशिक्षित प्राध्यापक वर्गाची गरज आहे. या मेडिकल कॉलेजमध्ये मंजूर जागांपैकी किमान ३० टक्के जागा नाशिककरांच्या वाट्याला येतील. येथून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांना सरकारी हॉस्पिटल्समध्येच नोकरी मिळू शकेल. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

- सुनील आडके,

जिल्हा सरचिटणीस, भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल इन्शुरन्स कंपनीला ग्राहक मंचाचा दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चोरी गेलेल्या मोबाइलचा इन्शूरन्स देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपनीस ग्राहक मंचाने दणका दिला. तक्रारदारास २३ हजार ५०० रुपये व त्यावर १० टक्के व्याज, तसेच मानसिक त्रासापोटी आठ हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक मंचाने दिले आहेत.

मालेगाव स्टॅण्ड परिसरात राहणाऱ्या रूपचंद रामचंद सुराणा यांनी तक्रार दिली होती. सुराणा यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी ५ ऑक्टोबर २०१४ रोजी सॅमसंग कंपनीचा एन ७५०० हा मोबाइल नाशिकरोड येथील दुकानातून २३ हजार ५०० रुपयांना खरेदी केला होता. तसेच मोबाइल चोरीला जाणे किंवा इतर बाबींमुळे त्याचे नुकसान झाले, तर सुरक्षा म्हणून मुंबईतील कश्मिरारोडवरील दहिसर चेक नाका येथील पीक-मी सोल्युशन्स इं .प्रा.लि. या कंपनीकडून ७ ऑक्टोबर २०१४ पासून पुढे एका वर्षाचा विमा काढला. १४ जून २०१६ रोजी सुराणा रात्री १० वाजेच्या सुमारास पंचवटी येथे रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने त्यांचा मोबाइल खेचून धूम ठोकली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर, सुराणा यांनी संबंधित कंपनीकडे विम्याची रक्कम मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला. मात्र, कंपनीने अगदीच थंड प्रतिसाद दिला. यानंतर, एक दिवस कंपनीने ओळखपत्रात आणि क्लेम फॉर्मच्या स्वाक्षरीत बदल असल्याचे तोंडी कारण देत सुराणा यांचा क्लेम फेटाळला. दरम्यान, सुराणा यांनी कंपनीस नोटीस पाठवून विमाकृत मोबाइलच्या रकमेची मागणी केली. कंपनी दादच देत नसल्याने अॅड. रूबी सुराणा यांच्या मार्फत सुराणा यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाकडे दाद मागितली. न्यायमंचाने कंपनीस नोटीस पाठवून सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत. मात्र, कंपनीने या नोटीसीला उत्तर दिले नाही. यानंतर, एकतर्फी सुनावणी घेत मंचचे सदस्य कारभारी जाधव यांनी न्यायनिर्णय सुनावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंबड पोलिस ठाण्यात बिबट्याचे दर्शन

$
0
0

नागरिकांमध्ये भीती; बिबट्याचा थांगपत्ता लागेना

म. टा. प्रतिनिधी सिडको

सिडकोतील अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, दिवसभर वनविभागाने याचा तपास करण्याचाही प्रयत्न केला नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

सोमवारी मध्यरात्री पोलिस ठाण्यातील कर्मचारी राजेंद्र ढोले व दीपक वाणी हे परिसरात गस्त घालून काही कामानिमित्त पोलिस ठाण्यात आले असता त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. याबाबतची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनीही तातडीने सीसीटीव्ही फुटेज बघून खरोखरच बिबट्या आहे की नाही याची खात्री केली. रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास हा बिबट्या रस्त्याने जाताना दिसला, मात्र गाडीचा आवाज आल्यानंतर या बिबट्याने थेट पोलिस ठाण्याच्या आवारात धाव घेतली. पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या भंगार गाड्यांच्या दिशेने हा बिबट्या पळाल्याचे दिसून आले. मात्र त्यानंतर हा कुठे गेला याचा शोध लागला नाही. पोलिस ठाण्यापासून जवळच असलेल्या पेलीकन पार्कमध्ये हा बिबट्या गेला की सिडकोच्या नागरीवस्तीत कोठे जाऊन थांबला आहे याबाबत तर्कवितर्क काढले जात आहे. दोनच दिवसांपूर्वी पाथर्डी शिवारातील एका मळ्यातही बिबट्याचा वावर दिसल्याची चर्चा सुरू आहे. पाथर्डी येथे दिसलेला हा तो बिबट्या असावा का याबाबत शंकाकुंशका व्यक्‍त होत आहेत.

अंबड पोलिसांनी तातडीने याबाबतची माहिती वनविभागाला कळविली असली तरी वनविभगाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ पाहणी करून या ठिकाणाहून काढता पाय घेतल्याचे नागरिकांनी सांगितले.

रात्री जिल्हा रुग्णालयातील काम आटोपून आम्ही पोलिस ठाण्यात आलो. त्यावेळी गाडीच्या लाइटच्या प्रकाशात बिबट्या दिसून आला. त्यानंतर वरिष्ठांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून तातडीने हा बिबट्या असल्याची खात्री व्यक्त केली.

- राजेंद्र ढोले, पोलिस कर्मचारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरात वाहून गेलेल्या एसटीतील १७ प्रवाशांना वाचवले

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नंदुरबार

महाडमध्ये पुराच्या तडाख्याने पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन एसटी बस वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आज पहाटे नंदुरबारमध्येही पुरात एसटी बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे या बसमधील चालक, वाहक व १७ प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.

गुजरातला लागून असलेल्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात काल बुधवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नवापूरमधील रंगावली नदीला तर पूर आला असून याच पुरात एसटी बस वाहून गेली.



ही एसटी बस जालना येथून सूरतकडे जात होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास ही बस नवापूर शहरापासून जवळच असलेल्या रंगावली नदीपुलावरून जात असताना पुरात अडकली. पूल पूर्णपणे पाण्यात बुडाला होता मात्र चालकाला त्याचा अंदाज न आल्याने बस पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली.

दरम्यान, नदीशेजारीच वस्ती असल्याने या दुर्घटनेबाबत कळताच स्थानिकांनी धाव घेतली आणि महाडची पुनरावृत्ती टळली. बसमधील सर्व १७ प्रवासी तसेच वाहक आणि चालकाला जेसीबीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनपुरवठा सुरळीत

$
0
0

दुकानदारांचा संप मागे; हमाली, वाहतूक खर्च सरकार देणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वस्त धान्य दुकानापर्यंत माल पोहोचविताना वाहतुकीवर आणि हमालीवर होणारा वाहतूक खर्च करण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली आहे. याखेरीज दरमहा पगाराच्या मागणीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा करण्याची ग्वाही अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिल्याने स्वस्त धान्य दुकानदार संघटनांनी संप मागे घेतला आहे. उद्यापासून जिल्ह्यासह राज्यभरातील रेशन दुकानदार धान्य उचल करतील, अशी माहिती संघटनेने दिली.

सरकार दरबारी अनेक मागण्या प्रलंबित असल्याने रेशन दुकानदारांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले होते. १ ऑगस्टपासून सुरू झालेला हा संप तब्बल १० दिवस चालला. जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थिती आणि रेशन दुकानदारांच्या संपामुळे धान्य मिळत नसल्याने पूरग्रस्तांचे अतोनात हाल झाले. सरकार आणि स्वस्त धान्य दुकानदारांच्या या वादात सामान्य नागरिक भरडला जाऊ लागल्याने या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी पुरवठा विभागाने हालचाली गतिमान केल्या. मुंबईत अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले होते. महाराष्ट्र फेअर प्राइज शॉपकीपर्स फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर, विजय गुप्ते, शहाजी लोखंडे, बाबुराव ममाडे, बाबुलाल शहा आदी पदाधिकाऱ्यांनी बापट यांच्यासमवेत चर्चा केली. स्वस्त धान्य वाहतुकीचा आणि हमालीचे पैसे रेशन दुकानदारांना द्यावे लागू नयेत, ही संघटनांची मागणी पुरवठामंत्र्यांनी मान्य केल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी दिली. दरमहा ३० ते ३५ हजार रुपये वेतन द्यावे, ही मागणी तूर्तास मान्य करणे शक्य नसले तरी अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यावर चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाही देत बापट यांनी संघटनेला संप मागे घेण्याबाबत आव्हान केले. त्याला प्रतिसाद देत राज्यभरात संप मागे घेण्यात आल्याची माहिती कापसे यांनी दिली.

रेशन दुकानदारांना मदतनीस ठेवण्यास मान्यता, सरकारकडे थकीत असलेली रक्कम देण्याची ग्वाही या मागण्यांबाबतही सरकारने सकारात्मकता दर्शवली आहे. राज्यातील रेशन व केरोसीन परवानाधारकांना तामिळनाडू राज्याच्या धर्तिवर अन्न महामंडळ स्थापन करून सरकारी सेवेत सामावून घ्यावे, ही एकच मागणी तूर्तास अमान्य करण्यात आली आहे.

अल्प कमिशनवर व्यवसाय करणे रेशन दुकानदारांना परवडेनासे झाले आहे. त्यात हमाली आणि वाहतुकीवरील खर्चही दुकानदारांनाच करावा लागत असल्याने रेशन दुकानदारांची कुटुंबच रस्त्यावर येण्याची वेळ आली होती. सरकारने मान्य केलेल्या मागण्या हा संघटनेचा नव्हे, तर रेशन दुकानदारांचा विजय आहे. उर्वरित मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी पाठपुरावा सुरूच राहील.

- निवृत्ती कापसे, जिल्हाध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायन्स क्लबकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने अनेकांची घरे वाहून गेली. चांदोरी, सायखेडा व नदी जवळच्या घरांना मोठे नुकसान सोसावे लागले. या निसर्गनिर्मित परिस्थीतिशी दोन हात करण्यासाठी लायन्स क्लबच्या शिकागो येथील मुख्या कार्यालयाने ५ हजार डॉलर्सची मदत केली आहे.

जाणीव लायन्स क्लब पंचवटीच्या अध्यक्षा वैद्य नीलिमा जाधव तसेच माजी प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव यांनी प्रांतपाल चंद्रहास शेट्टी यांना नाशिक येथील परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यांनीही तत्काळ पावले उचलून पूरग्रस्तांची परिस्थिती शिकागो येथील कार्यालयाला कळवली. या कार्यालयाने पूरग्रस्तांसाठी तातडीने पाच हजार डॉलर्सची मदत जाहीर केली आहे.

सरकारच्या मदतीने मदत साहित्य पूरग्रस्ताना दिले जाणार आहे. लायन्स नाशिकच्या सर्व क्लबला बरोबर घेऊन हे मदत कार्य केले जाणार आहे. तसेच मदतीचे वाटप जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे, असे वैद्य जाधव यांनी सांगितले. नाशिकसाठी आठ वर्षात आंतरराष्ट्रीय संघटनेकडून मदत येण्याची तिसरी वेळ आहे. २०१२ मध्ये कल्पतरू या डोळ्याच्या रुग्णालयाला १ कोटी ६० लाखांची मदत देण्यात आली होती. नाशिकच्या सर्व लायन सभासदांना लायन संघटनेचा अभिमान असून वेळेला धावणारी संघटना म्हणून नावलौकिक सिध्द केला आहे. या मदतकार्यास विनोद कोठावदे, उषा तिवारी, हेमंत वाझे, स्वप्नील कोठारी, लायन सोनावणे, अमित प्रभू, अजय अहुजा, जयंत येवला, राजेश कोठावदे, जे. पी. जाधव, वसंत घटे, हंसराज देशमुख, विनोद सोनजे, प्रकाश पाटील, निशा भरभात आदी प्रयत्नशील आहेत.

वस्तू-सेवा स्वरुपात मदत
पूरग्रस्ताना भांडी, कपडे, पाणी, औषधं, धान्य, खाद्य तसेच उबदार कपड्यांसाठी मदत मान्य करण्यात आली आहे. अभ्यासपूर्ण पद्धतीने योग्य व्यक्तींना मदत करण्याचे आदेश प्रांतपाल चंद्रहास शेट्टी यांना संघटनेने दिले आहेत. शहराला अशा प्रकारची मदत सन २००८ मध्ये वैद्य विक्रांत यांच्या पाठपुराव्याने मिळाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना ऑनलाइन प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यस्थळी अत्याधुनिक प्रशिक्षण मिळण्यास आता सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र पोलिस अॅकॅडमीमध्ये (एमपीए) त्यासाठी 'इ एमपीए स्टुडिओं विकसित करण्यात आला असून त्याचे उदघाटन बुधवारी प्रशिक्षण व खास पथकाचे अपर पोलिस महासंचालक डॉ. के. वेंकटेशम यांच्या हस्ते झाले.

गुन्हेगारीची मोडस बदलत असून जटील गुन्ह्यांचा तपास लावणे पोलिसांसाठी आव्हान ठरू लागले आहे. चोरट्यांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांनाही काळानुरूप आपल्या कार्यपध्दतीत बदल करणे अनिवार्य झाले आहे. प्रशिक्षण हाच त्यावर सर्वोत्तम उपाय असला तरी कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलिस त्यापासून वंचित राहातात. दैनंदिन कामाचा ताण, बंदोबस्त, गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हान अन् तत्सम अनेक कारणांमुळे त्यांना इच्छा असूनही प्रशिक्षण घेता येत नाही. वेळेचा अभाव किंवा चालढलकपणामुळेही अधिकाऱ्यांना प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागते. प्रशिक्षणाच्या सक्तीबाबत गृह विभाग आग्रही असून अधिकाऱ्यांना घरबसल्या प्रशिक्षण घेता येईल, अशी व्यवस्था 'एमपीए'च्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी ऑनलाइन प्रणाली 'एमपीए'मध्ये विकसित करण्यात आली असून प्रायोगिक स्तरावर प्रशिक्षणाचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत. या प्रशिक्षणाचे रेकॉर्डिंग जेथे होईल त्या 'इ एमपीए स्टुडिओ'चे उदघाटन वेंकटेशम यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, नाशिक परिक्षेत्रच विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चौबे, 'एमपीए'चे संचालक नवल बजाज आदी मान्यवर उपस्थित होते.

जर्मनीहून साधनसामुग्री
'एमपीए'मध्ये प्रशिक्षणार्थींसाठी अद्यावत फिटनेस सेंटर उभारण्यात आले असून व्यायामाची साधन सामग्री जर्मनीहून मागविण्यात आली आहे. ५० लाख रुपये खर्चून उभारलेल्या या फिटनेस सेंटरसह रॅपलिंग व क्लायबिंग वॉलची वेंकटेशम यांनी पाहणी केली.

मोबाइलद्वारेही प्रशिक्षण सुविधा
राज्यात अमरावती, कोकण, कोल्हापूर विभागासह १३ ठि‌काणी पूर्वीपासूनच पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध आहे. 'एमपीए'ने डिझाईन केलेले प्रशिक्षण तेथे दिले जाते. मात्र, अनेकदा अधिकाऱ्यांचा निरुत्साह किंवा कामाच्या व्यापामुळे अधिकाऱ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी जाता येत नाही. त्याचा परिणाम थेट त्यांची वेतनवाढ आणि पदोन्नतीवर होतो. मात्र, आता इ अॅकॅडमीमुळे अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातही प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. विशिष्ठ सॉफ्टवेअरद्वारे लॅपटॉप, टॅब, किंवा अगदी मोबाइलवरही हे प्रशिक्षण घेता येते याचे प्रात्यक्षिक बुधवारी 'एमपीए'च्या स्टुडिओमध्ये दाखविण्यात आले. विशेष म्हणजे राज्यातील प्रत्येक विभागात ‌विशिष्ठ अधिकाऱ्यांनी इ 'एमपीए'मधील हे प्रात्यक्षिक लाईव्ह अनुभवले. पहिल्या टप्प्यात एकावेळी १०० अधिकारी प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. यादीत नाव असलेल्या १०० अधिकाऱ्यांना विशिष्ट सॉफ्टवेअर डाऊनलोड करून मोबाइलवरही हे प्रशिक्षण घेणे शक्य होणार आहे.

पोलिस उपनिरीक्षकापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच आता प्रशिक्षण घेता येऊ शकेल. प्रशिक्षणाचा विषय आणि अधिकाऱ्याचे पद यांनुसार अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. किमान सहा तासांचे हे प्रशिक्षण असेल. टप्प्याटप्प्याने पोलिस कॉन्स्टेबललाही या प्रशिक्षणाच्या कक्षेत आणले जाईल. तणाव व्यवस्थापनासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन पोलिसांना त्यांच्या कार्यस्थळीच मिळू शकेल.
- डॉ. के. वेंकटेशम, अपर पोलिस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रह्मगिरी फेरीवेळी गैरप्रकार रोखा

$
0
0

जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना आदेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वरमध्ये श्रावणी सोमवारी किमान चार लाख भाविक ब्रह्मगिरी प्रदक्षिणा घालतील, असा अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तवला आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने नियोजन सुरू केले असून, ब्रह्मगिरी फेरीवेळी गैरप्रकार घडणार नाहीत याची काळजी घ्या, असे आदेश यंत्रणांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी त्र्यंबकेवर येथे जाऊन तिसऱ्या सोमवारच्या तयारीचा आढावा घेतला. पावसामुळे अनेक भागात पाणी साचले असून, मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. त्यामुळे या भागात भाविक पाय घसरून पडण्याची शक्यता असून, फेरीमार्गावरील रस्ते पाण्याने स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रदक्षिणेनंतर त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे देवस्थान ट्रस्टने परिसरात चोख व्यवस्था करावी, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी पासेसची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. परिसरातील प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेतला. यंदा १३ ऑगस्टला दुसरा शनिवार, १४ ला रविवार आणि १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन अशा लागोपाठ सुट्ट्या असून, भाविकांचा ओघ राहणार आहे. फेरीमार्गावर अंधाराचा फायदा घेऊन चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी वीज व्यवस्था करावी, छेडछाडीचे प्रकार घडणार नाहीत याची पोलिसांनी काळजी घ्यावी, असे आदेश पोलिसांना दिले आहेत.

खासगी वाहनांना प्रवेश बंदी

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असल्याने खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वरमध्ये बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककडून येणारी वाहने खंबाळे येथे उभी करून भाविकांना एसटीने जावे लागणार आहे. जव्हारकडून येणारी वाहने आंबोली येथे थांबविण्यात येणार असून, तेथूनही बसेसची व्यवस्था असणार आहे. घोटीकडून येणारी वाहने पहिने येथे थांबविण्यात येणार आहेत. तळवाडे, सातपूर, नाशिकरोड, निमाणी, महामार्ग, सिडको, घोटी येथूनही जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ उमेदवारांचे अर्ज ठरले वैध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोडला महापालिकेच्या दोन प्रभागात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी छाननी झाली. त्यामध्ये १५ जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले. जनसुराज्य पक्षाच्या अमोल मोरे यांच्या उमेदवारी अर्जाबाबत गुरुवारी (दि. ११) सकाळी अकरा वाजता निर्णय होणार आहे.

अमोल मोरे यांच्या उमेदवारीला सूचक आणि अनुमोदक असलेल्यांनी महापालिकेची कराची थकबाकी भरली नसल्याचा लेखी आक्षेप काँग्रसेचे उमेदवार शशिकांत उन्हवणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी रोहिदास बहिरम यांच्याकडे नोंदवला. त्यामुळे अमोल मोरे यांचा अर्ज वैध की अवैध यावर गुरुवारी निर्णय घेतला जाणार असल्याचे बहिरम यांनी सांगितले.

उमेदवारी दाखल करण्याच्या मंगळवारी अखेरच्या दिवशी १६ उमेदवारांनी एकूण २५ अर्ज दाखल केले होते. प्रभाग ३५ ब मधून ६ तर प्रभाग ३६ ब मधून १० उमेदवारांनी नेते व समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी छाननीच्या वेळीही गर्दी झाली होती. शुक्रवारी (दि. १२) माघारी तसेच शनिवारी (दि. १३) निवडणूक चिन्ह वाटप झाल्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिककरांसाठी ‘ट्रेझर हंट गो’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'पोकेमॉन गो' गेमने जगभरात धुमाकूळ घातला आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकस्थित 'झाबुझा लॅब्स' कंपनीने खास नाशिककरांसाठी 'ट्रेझर हंट गो' या गेमची निर्मिती केली आहे.

आजकालचे गेम्स लक्षात घेता सर्व गेम्स घरी बसून खेळता येतात. त्यामुळे फिजिकल एक्ससाईज, नवनविन ठिकाणी जाऊन भेट देणे, या गोष्टींमध्ये सर्वांचा कल हळूहळू कमी होत आहे. हीच बाब ओळखून झाबुझा लॅब्सने 'ट्रेझर हंट' सारख्या फिजिकल गेम्सना वाव मिळावा, यासाठी गेमची निर्मिती केली आहे. या गेममध्ये मॅप, ऑग्युमेण्ट रियालिटी या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या गेममध्ये सुरवातीला एक ठिकाण दिलेले असते. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला नाशिकच्या ठिकाणांशी निगडीत एक कोडे विचारले जाईल आणि त्या कोड्याचे उत्तर म्हणजेच दुसऱ्या ठिकाणाचे नाव असेल. अशा प्रकारे एका नंतर एक सर्व कोड्यांचे उत्तर देऊन तुम्ही नाशिकच्या गुपित खजिन्यापर्यंत पोहचू शकतात.

प्रत्येक कोड्याचे बरोबर उत्तर दिल्यास तुम्हाला १० कॉइन्स मिळतात. या कॉइन्सचा वापर तुम्ही एखाद्या कोड्यात अडकल्यास उत्तर माहीत नसल्यास, हिंट्सच्या सहाय्याने उत्तर मिळवू शकता. या गेममधून नाशिककरांची नाशिक विषयीची व ठिकाणांची माहिती होण्यास मदत होईल.

'पोकेमॉन गो'पेक्षा वेगळा कसा?
नाशिककरांना रुची निर्माण होईल यासाठी नाशिकमधल्या नामांकित ठराविक ठिकाणांचा 'ट्रेझर हंट गो' गेममध्ये समावेश करण्यात आला आहे. हा गेम खेळताना तुम्हाला रस्त्यावर किंवा अडचणींच्या ठिकाणी जावे लागणार नाही, याची दक्षता या गेममध्ये घेतली आहे. या गेममध्ये ६० नामांकित ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे.

४० लाख यूजर्स
गुगल मॅप आणि ऑग्युमेण्ट रियालिटी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला हा भारतातला पहिलाच गेम असणार आहे.मानस गाजरे हे नाशिक स्थित 'झाबुझा लॅब्स' या कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्या कंपनीने बनविलेल्या अनेक गेम्सपैकी तीन गेम्सची जागतिक गेम कॉम्पिटिशनमध्ये निवड झालेली होती. तसेच त्यांच्या 'बलून बो अॅण्ड अॅरो' या गेमने भारतात अँग्री बर्डसला मागे टाकून गुगलमध्ये स्टोअरवर अव्वल नंबर कमावला होता. या गेमचे आतापर्यंत ४० लाखांहून जास्त यूजर्स आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुंधरा मित्र पुरस्कारांचे आज वितरण

$
0
0

संजय पाटील यांना वसुंधरा सन्मान पुरस्कार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवातील पुरस्कार वितरण आज (११ ऑगस्ट) संध्याकाळी पाच वाजता कुसुमाग्रज स्मारक येथे करण्यात येणार आहे. नाशिकचे प्रसिद्ध वास्तुविशारद संजय पाटील यांना वसुंधरा सन्मान हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 'नाशिक सायकलिस्ट', कुंभमेळ्यात पर्यावरणासंबंधी महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या डॉ. धनश्री हरदास आणि सॅमसोनाईट प्लान्‍टेशन ड्राइव्ह या उपक्रमाला 'वसुंधरा मित्र' पुरस्कार देण्यात येणार आहे.

जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून पदवी शिक्षण झालेले वास्तुविशारद संजय पाटील यांनी नेहमीच विजेची बचत करणाऱ्या इमारती बांधण्यास प्राधान्य दिले आहे. या आधीही त्यांना विविध संस्थांच्या पन्नासहून जास्त पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नाशिक सायकलिस्ट ही संस्‍था सायकल फेरी आयोजित करून लोकांमध्ये सायकल वापरण्यासंबंधी जनजागृती करण्याचे काम करीत आहे. डॉ. धनश्री हरदास यांनी नाशिकमध्ये पार पडलेल्या कुंभमेळ्यात 'कुंभमेळा २०१५ - केअर नाशिक ग्रीन कॉल' या उपक्रमाचे प्रतिनिधित्व केले आहे. या आगळ्या वेगळ्या उपक्रमात त्यांनी 'ग्रीन सोल्जर्स' नावाची फौज तयार करून कुंभमेळ्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. सॅमसोनाईटचे व्यवस्थापक डॉ. तैन्वाला, कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट वाय. एम. सिंग आणि इतर कर्मचाऱ्यांच्या प्रेरणेने सॅमसोनाईट प्लान्‍टेशन ड्राइव्ह या उपक्रमातून गोंदे दुमाला (इगतपुरी) येथे अडीच लाखाहून जास्त वृक्षांचे संवर्धन करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना हा 'वसुंधरा मित्र' हा पुरस्कार देण्यात येत आहे.

पांडवलेणी (त्रिरश्मी गुंफा) येथे 'फोटो वॉक' होणार आहे. प्रसाद पवार यांच्या कॅमेऱ्यातून घेतलेल्या छायाचित्रांमधून सफर बघण्याची संधी या निमित्ताने नागरिकांना मिळणार आहे. तसेच चांदशी येथील 'आयडिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चर' मध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून 'सर्वांना परवडणारी घरे' या स्मार्ट सिटी उपक्रमातील महत्त्वाचे उद्दिष्ट असलेल्या विषयावर चर्चा करण्यात येईल.

पुरस्कार खालील प्रमाणे : वास्तुविशारद संजय पाटील : वसुंधरा सन्मान, नाशिक सायकलिस्ट : वसुंधरा मित्र, डॉ. धनश्री हरदास : वसुंधरा मित्र, सॅमसोनाईट प्लांटेशन ड्राइव्ह : वसुंधरा मित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिस्तीसाठी दंडुका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यास महिनाभराचा कालावधी दिल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी आता शिस्तीचा बडगा उगारला आहे. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये बुधवारी सरप्राईज व्हिजिट देत त्यांनी कामकाजाची पाहणी केली. यावेळी अनेक आपत्तीजनक बाबी समोर आल्या.

कर्मचाऱ्यांच्या खुर्च्यांवर कर्मचाऱ्याऐवजी अनाहुत व्यक्ती आढळून आल्या. महापालिकेचे रेकार्डही अस्ताव्यस्त असल्याचे समोर आले आहे. कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सक्तीचे असतांनाही कर्मचारी आदेशाचे पालन करत नसल्याचे तर हालचाल रजिस्टर अद्ययावत नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे आयुक्तांनी विभागप्रमुखांसह कर्मचाऱ्यांना तंबी दिली असून पुन्हा असा प्रकार आढळल्यास थेट कारवाईचाच इशारा दिला आहे.

महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी महापालिकेचा पदभार घेतल्यानंतर महिनाभर महापालिकेच्या एकूण कामकाजाची माहिती जाणून घेतली. अन्य अधिकाऱ्यांप्रमाणेच पहिल्या दिवसापासून अॅक्शनमध्ये न येताच सर्व स्थितीचा बारीक अभ्यास करत अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावून घेण्यासाठी वेळ दिला. परंतु, तरीही शिस्त दिसून येत नसल्याने आयुक्तांनी बुधवारी अचानक मुख्यालयातील विविध विभागांना भेटी दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, अनिल चव्हाण, उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांच्यासह प्रशासन अधिकारी उपस्थित होते. या पाहणीत अनेक कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याचे आढळून आले. तर विभागामंध्ये महापालिकेचे रेकॉर्डच अस्ताव्यस्त असल्याचे त्यांना भेटीदरम्यान दिसून आले. तसेच डेड स्टॉक नष्ट केला नसून मध्यवर्ती रेकॉर्डरुमही व्यवस्थित नसल्याचे समोर आले.

नगरसेवकांच्या तक्रारीला पुष्टी
धक्कादायक बाब म्हणजे काही विभागामंध्ये कर्मचा-यांच्या खुर्च्यावर बाहेरील व्यक्तीच बसल्याचे आयुक्तांना आढळून आले आहेत. तर काही विभागांमध्ये अधिकारी व कर्मचारी बाहेर गेले असतांनाही हालचाल रजिस्टरच भरले नसल्याचे समोर आले. त्यामुळे आयुक्तांनी या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत, सर्व विभागप्रमुख व खातेप्रमुखांना तंबी दिली आहे. यापुढे असा प्रकार आढळल्यास थेट कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. अधिकारी व कर्मचारी जागेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी अनेक नगरसेवक करतात. त्याची पुष्टीच या भेटीने समोर आली असून सुधारणा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.

आयुक्तांचे आदेश
प्रत्येकाला ओळखपत्र सक्तीचे
मानधनावरील कर्मचाऱ्यांनाही तात्पुरते ओळखपत्र
रेकॉर्डचे वर्गीकरण करून त्याची विगतवारी निश्चित करणे
डेड स्टॉक दोन महिन्यात नष्ट करा
मध्यवर्ती रेकॉर्ड रुमचे संगणकीकरण होणार
अनाहूत व्यक्तींना प्रतिबंधाची जबाबदारी विभागप्रमुखांवर
हालचाल रजिस्टर अद्यायावत ठेवा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभपर्वाची आज सांगता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशासह संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या सिंहस्थ कुंभपर्वाचा समारोप गुरुवारी (दि.११) होत आहे. त्र्यंबकेश्वर तसेच नाशिकमध्ये रात्री नऊ वाजून ३१ मिनिटांनी स्वतंत्रपणे ध्वजावतरण करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह आखाडा परिषदेचे साधू, महंत उपस्थित राहणार आहेत. तर नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह वल्लभपीठाचे वल्लभाचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडणार आहे. देवी-देवतांची उत्तरपूजा झाल्यानंतर कुशावर्त व रामकुंडावर ध्वजावतरण होईल.

सिंहाचा गुरू राशीमध्ये प्रवेश होताच १४ जुलै २0१५ पासून सिंहस्थ कुंभमेळ्याला नाशिक-त्र्यंबकेश्‍वरमध्ये सुरुवात झाली होती. त्यानंतर वर्षभर कुंभमेळ्याचा सोहळा सुरू होता. बारा वर्षानंतर आलेल्या या पर्वणीने नाशिकला अनेक आठवणी दिल्या आहेत. स्मार्ट सिटीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी या कुंभमेळ्याने दिलेल्या काही ठेवी, नाशिकला उपयुक्त ठरणार आहेत. भारतभरातून पर्वणी साधण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या साधूंच्या निमित्ताने अनोखी परंपरा आणि वैविध्यपूर्ण भारताचे दर्शन नाशिककरांना घडले. ११ ऑगस्टला ९ वाजून ३१ मिनिटांनी गुरू सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तेव्हाच कुंभपर्वाची सांगता होणार आहे. पशुवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्यासह अनेक मंत्री व साधू, मंहतही सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. नाशिकमध्ये सायकांळी ६ वाजता ध्वजावतरण सोहळ्याला सुरूवात होणार असल्याची माहिती सतीश शुक्ल यांनी दिली आहे. कपालेश्वर मंदिरासमोरील जागेत हा जाहीर सत्कार सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. रामकुंड परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्ववैमनस्यातूनच दुहेरी हत्याकांड!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी सात संशयितांना अटक केली आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणातून हे दुहेरी हत्याकांड घडल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिश कैलास निकम, नितीन निवृत्ती बनकर (दोघे रा. रोकडोबावाडी), प्रशांत नाना जाधव (रा. जाधव मळा), आकाश नामदेव खताळे, अमोल अंबादास पठाडे, गोविंदा शंकर इंगोले (तिघे रा. विहितगाव) यांच्यासह एका अल्पवयीन संशयिताला अटक करण्यात आली आहे.

सोमवारी (८ ऑगस्ट) रात्री साडेअकराच्या सुमारास रोकडोबावाडीतील वालदेवी नदीकिनारी अकबर शेख याचा मृतदेह आढळून आला होता. गुलाम शेख याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर संदीप जैन गंभीर जखमी असून, त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांच्या नातलगांनी हा खुनाचा प्रकार असल्याचा दावा केल्यानंतर उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मृतदेहांचे विच्छेदन करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही खुनाचा संशय व्यक्त केला होता. या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलिसांनी आतिश निकम याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून, तिघेजण पसार आहेत. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images