Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिकमधील अतिरिक्त शिक्षकांचे होणार समायोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील शाळांची २०१५-१६ ची संचमान्यता करण्यात आली असून, या संचमान्यतेत जे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत, त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंबंधित परिपत्रक जारी करण्यात आले असून, याचा लाभ अनेक शिक्षकांना होणार आहे. नाशिकमध्ये रिक्त जागांच्या तुलनेत अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाण कमी असल्याने शंभर टक्के म्हणजे सर्वच शिक्षकांचे समायोजन होणार असल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. समायोजनाच्या शिक्षकांविषयी edustaff.maharashtra.gov.in या वेबसाइटवर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी, त्यांची नावे व रिक्त पदांच्या माहितीसह जाहीर करण्यात आली आहे.

अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रवर्ग व अध्यापनाचा विषय याचा विचार करून त्याच प्रवर्गात व त्याच विषयांच्या रिक्त जागांवर समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात आली. या कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी प्रवर्गनिहाय जागा शिल्लक नसल्यास संबंधित शिक्षकाच्या अध्यापनाच्या विषयानुसार खुल्या प्रवर्गातील रिक्त जागांवर समायोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले, तसेच उपलब्ध असलेल्या रिक्त पदांवर समायोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे. समायोजनामुळे ज्या ठिकाणी शिक्षकांच्या रिक्त जागा असतील तेथे समायोजित शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी राज्यभर घेण्यात येत आहे. नाशिकमध्ये मात्र रिक्त जागांपेक्षा अतिरिक्त शिक्षकांची संख्या कमी असल्याने सर्वच शिक्षकांचे समायोजन होणार आहे. त्यामुळे नाशिक असा एकमेव जिल्हा ठरला आहे जिथे शंभर टक्के समायोजन पूर्णत्त्वास पोहोचले आहे, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले आहे.
संबंधित संस्थेत भविष्यात अन्य रिक्त होणाऱ्या पदामुळे बिंदुनामावलीनुसार तात्पुरते समायोजन केलेल्या शिक्षक कर्मचाऱ्याच्या समायोजनामुळे आरक्षणास बाधा येत नसल्यास समायोजन केलेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी सामावून घेण्यात येणार असल्याची स्पष्ट करण्यात आले आहे. समायोजनाच्या शिक्षकांविषयी edustaff.maharashtra.gov.in या वेबसाइटवर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी त्यांच्या नावे व रिक्त पदांच्या माहितीसह जाहीर करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भुजबळांच्या एमईटीतून आंतरराष्ट्रीय कॉल्स

$
0
0

Gautam.sancheti@timesgroup.com

नाशिक: भुजबळ नॉलेज सिटीतील एमईटी महाविद्यालयातून आंतरराष्ट्रीय कॉल्स करण्यात आल्यामुळे संस्थेला तीन महिन्यांत १० लाख ३४ हजार ५७६ रुपयांचे बिल आले आहे. एक जुलै ते ३० सप्टेंबर २०१० या तीन महिन्यांच्या कालावधीत हे कॉल्स करण्यात आले. नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये एमईटीने बीएसएनएलविरोधात दाखल केलेला दावा फेटाळल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

बीएसएनएलने पाठवलेल्या या बिलात एसटीडीबरोबरच आयएसडी कॉल्सचेही बिल आहे. हे बिल संस्थेने न भरल्यामुळे बीएसएनएलने ३ लाख ४१ हजार ४१० रुपये व्याजही लावल्यामुळे हे बिल १३ लाख ७५ हजार ९८६ रुपये झाले आहे. दरम्यान, दूरध्वनी केंद्रातील माहीतगार व्यक्तीने टेलिफोन कनेक्शनचा दुरुपयोग केल्याचा दावा एमईटीने केला. टेलिफोन एक्स्चेंज पूर्णपणे संगणकीकृत असल्याने एमईटी संस्थेव्यतिरिक्त टेलिफोनवरून कोणीही फोन करू शकत नसल्याचे बीएसएनएलने न्याय मंचात सांगितले आहे.

एमईटीने पीआरआय सर्व्हिसेस प्लॅनमधून प्रतिमहा १५ हजार रुपये भाडे असलेले दूरध्वनीचे कनेक्शन घेतले. त्यानंतर हा प्लॅन बदलून १७५० रुपयांचा प्लॅन मिळावा, यासाठी संस्थेने २५ जानेवारी २०१० रोजी विनंती केली. त्यानंतर मे महिन्याचे बिल ५० हजार २६९ आले. या बिलातून संस्थेला आंतराष्ट्रीय बिल झाल्याचे समजले. त्यानंतर संस्थेने बीएसएनएलला पुन्हा प्लॅन बदलण्याच्या पत्रावर कार्यवाही करण्यास सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून ५००० चा प्लॅन मिळावा, असे पत्र संस्थेने दिले. मात्र त्यानंतरही १० लाख ३४ हजार ५७६ रुपयांचे बिल आल्यामुळे संस्थेने ग्राहक न्यायमंचात १४ मार्च २०१४ रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर १६ महिन्यांनी ग्राहक मंचाने ही टेलिफोन लाइन संस्थेच्या अभ्यासक्रम चालवण्यासाठी व्यावसायिक कारणाने घेतली आहे. त्यामुळे संस्थेला ग्राहक म्हणता येत नाही, असे सांगत हा दावा फेटाळला. ग्राहक न्याय मंचात दावा दाखल केल्यामुळे आंतरराष्ट्रीय कॉल्सची बाब समोर आली असली तरी नेमके हे कॉल्स कोणी केले हा विषय आता चर्चेचा ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस स्टेशनजवळील बँकेवर दरोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी धुळे शहरालगत असलेल्या नगावमध्ये धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेत (डीडीसी) अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून तिजोरीतून रक्कम लंपास केली होती. या घटनेनंतर आता शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे डीडीसी बँकेच्या शाखेत चोरी झाली असून, बँकेतील साडेतीन लाख रुपये लंपास झाले आहेत.

दरोड्याची घटना सकाळी बँकेच्या कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी बँकेचे व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी व संचालक, नरडाणा पोलिसांना माहिती कळविली. काही वेळातच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि नरडाणा पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकाने चोरट्यांचा काही अंतरापर्यत माग काढला. अज्ञात चोरट्यांविरूद्ध बँकेचे व्यवस्थापक गजानन देवरे यांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे.

गॅस कटरने कापले शटर; पोलिस अनभिज्ञ

अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि बँक व्यवस्थापकांच्या दालनात असलेल्या तिजोरीतून ३ लाख ६१ हजार ४०० रुपये चोरून नेले. ही बँक पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर आहे मात्र, या घटनेचा पोलिसांना कोणताही सुगावा लागला नाही.

आयसीआयसीआयचे फोडले एटीएम

चोरट्यांनी १५ दिवसांपूर्वी नगाव येथील डीडीसी बँक फोडली होती. त्यानंतर तेथून काही अंतरावरच असलेले आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले. मात्र, चोरट्यांच्या हाती पैसे लागले नाहीत. त्यांनी एटीएमची मात्र, मोडतोड केली. या घटनेची माहिती पश्चिम पोलिस ठाण्यात देण्यात आली असून, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नसलयाने चोरट्यांनी संधीचा फायदा घेत चोरी करण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज पोलिसांचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी मंदिरातून चांदीचा मुकूट चोरी

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रामकुंडावरील श्री गंगागोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या श्री गंगागोदावरी मंदिरातून चोरट्यांनी ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकूट चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अलोक मोरेश्वर गायधनी यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान ही चोरी झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो आहे. पुरोहीत संघाच्या गोदावरी मंदिरात रोज सकाळ - संध्याकाळ महाआरती केली जाते. यावेळी होणारी धांदल लक्षात घेवून चोरट्याने संधी साधली असावी. चोरट्याने मंदिर कार्यालयातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून आत ठेवलेला सुमारे १२ हजार रुपये किंमतीचा चांदीचा मुकूट चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत. वृध्दाचा मृत्यू घरात फिरत असताना पाय घसरून पडल्याने ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. ही घटना बजरंगवाडी येथे घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ही संधी गमावू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तुमच्यातील टॅलेंट सादर करण्याची संधी 'मटा श्रावणक्वीन' घेऊन आला आहे. तुमचा स्मार्टनेस दाखविण्यासाठी ही उत्तम संधी या निमित्ताने मिळते. श्रावणक्वीनमध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल तर आजच नावनोंदणी करून स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. 'वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत' 'मटा श्रावणक्वीन' पॉवर्ड बाय 'आयुर्वेदा थेरपीज' स्पर्धा एलिमिनेशन राऊंड येत्या गुरुवारी (११ ऑगस्ट) होणार आहे. सोमवारी (८ ऑगस्ट) ही नावनोंदणीची शेवटची तारीख आहे. तुम्हाला ही संधी गमवायची नसेल तर आजच नावनोंदणी करा.

या कार्यक्रमासाठी 'िऱ्हदम म्युझिक' हे म्युझिक पार्टनर, 'द एमराल्ड पार्क हॉटेल' व्हेन्यू पार्टनर, 'उपाध्ये क्लासेस' नॉलेज पार्टनर, तर 'व्हीएलसीसी' स्टाइल पार्टनर आहेत. ज्यांनी वेबसाइटवर नावनोंदणी केली आहे, मात्र फोनवर नावनोंदणी केलेली नाही, त्यांनी आजच फोनवरही नावनोंदणी करायची आहे.

नावनोंदणीसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन ः

http://www.mtshravanqueen.com
संपर्क क्रमांक ः ०२५३- ६६३७९८७

मिळाला आत्मविश्वास

नाशिकहून निवड होऊन जेव्हा ग्रुमिंग सेशनसाठी मुंबईला गेले तो अनुभव खूप काही शिकवणारा ठरला. मुंबईत गेल्यानंतर स्पर्धेचे आव्हान मोठे होत गेले, तसतसा आत्मविश्वास वाढत गेला. प्रोफेशनल ट्रेनिंग, एक्स्पर्ट अॅडव्हाइस, विविध शहरांमधून आलेल्या तरुणी आणि स्पर्धेतील विविध टास्क यामुळे खूप काही शिकायला मिळाले. मोठ्या पातळीवरील स्पर्धेमध्ये स्वतःमध्ये अनेक सकारात्मक बदल करता आले. श्रावणक्वीनचा अनुभव खूप छान होता. यामुळे आत्मविश्वास अधिक दृढ झाला. तुम्हालाही ही संधी नवीन ओळख देऊ शकेल.

- भैरवी बुरड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरेशा शिक्षकांअभावी; शाळेला लावले टाळे

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, देवळा

तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या दोन रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षण विभागाकडे अनेकवेळा लेखी, तोंडी तक्रार करूनही उपयोग न झाल्याने संतप्त पालकांनी ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेला सलग दोन दिवसांपासून कुलूप ठोकले आहे. जोपर्यंत रिक्त जागेवर शिक्षकांची नेमणूक होत नाही तोपर्यंत कुलूप न उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डोंगरगावात पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून येथे २३४ विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. सध्यस्थितीत शाळेत ५ शिक्षक व १ मुख्याध्यापक इतके कर्मचारी आहेत. एक उपशिक्षक व एक पदवीधर शिक्षक तसेच जवळ असलेल्या झगडेपाडा येथे एक शिक्षक असे एकूण ३ पदे रिक्त असल्याने याबाबत ग्रामसभेत देखील बऱ्याचदा चर्चा झाली. सरपंच, सदस्यांनी २७ जूनला पंचायत समितीच्या बाहेर उपोषणही केले. त्यावेळी संबंध‌ित अधिकाऱ्यांनी दोन ते तीन दिवसात शिक्षक देतो, असे पोकळ आश्वासन दिले.

परंतु, आजपर्यंत शिक्षक न मिळाल्याने गुरुवारी सरपंच, सदस्य तसेच पालकांनी शाळेच्या गेटलाच कुलूप लावले. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिवसभर रस्त्यावर बसवून शाळा प्रशासनाला ज्ञानदानाचे काम करावे लागले. प्रभारी गटशिक्षणाधिकारी सतिश बच्छाव यांच्याशी संपर्क केला असता आम्ही तात्पुरता शिक्षक दिला असता. ग्रामस्थांना कायमस्वरुपी शिक्षक पाहिजे, असे त्यांनी सांगितले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुकसानीच्या पंचनाम्यांकडे लागले लक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबला असून, आता प्रशासनाकडून होणाऱ्या पंचनाम्यांकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे. मात्र, अद्यापपर्यंत बांधावर गावकामगार, तलाठी, कृषी सहायक फिरकलेले नसल्यामळे शेतकरी चांगलेच संतापले आहेत.

दोन दिवस धुमाकुळ घातल्यानंतर पावसाने उघडीप दिली असून या काळात झालेल्या नुकसानीचा अंदाज शेतकरी उभारी घेऊन शिवरात उभा आहे. पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याकडे कृषी सहायक व तलाठी यांचे दुर्लक्ष झालेले असतांनाच पंचायत सम‌ितीने देखील याबाबत गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. तहसीलदार, कृषी अधिकारी आणि गटविकासाधिकारी यांनी एकत्र बैठक घेऊन याबाबत आढावा घेण्याची आवश्यकता असतांना याबाबत कोणतेही पाऊल उचललेले नाही.

पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर बांध बंधिस्ती फुटली आहे. घरांचे नुकसान झाले आहे. जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत. याबाबत संबंध‌ित सरकारी यंत्रणा अद्यापही सुस्त असून हे काम आपले नाही अशा अविर्भावात आहेत.

सलग अशा नैसर्गिक फेऱ्यात सापडल्याने बळीराजा हबकला आहे. शेतकरी बांधवांच्या हाकेल वेळीच धावून जाण्यासाठी कर्मचारी मुख्यालयी राहणे गरजेचे आहे. या विषयावर वारंवार चर्चा होऊन देखील संबंध‌ित खात्याचे अधिकारी कानाडोळा करत आहेत.

मुख्यमंत्र्यांना निवेदन पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचानामे त्वरित करावेत अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलेरिया विभागाचा भांडाफोड

$
0
0

म. टा. वृत्तसंस्था, मालेगाव शहरातील 'आम्ही मालेगावकर' संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मालेगाव मनपाच्या सटाणा रोडवरील मलेरिया विभागाच्या दवाखान्यास अचानक भेट देऊन कामकाजाचा अक्षरशः भांडाफोड केला. यावेळी ढिसाळ नियोजन, अपुरे मनुष्यबळ आणि भोंगळ कारभार कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आला. ऐन पावसाळ्यात प्रशासनाचा हा कारभार चव्हाट्यावर आल्याने सर्वसामान्य मालेगावकर चांगलाच संतापला आहे.

शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य वाढतेच आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने औषध फवारणी होणे गरजेचे आहे. मात्र, या दवाखान्यातीलन यंत्रणेचा कारभारच या प्रत्यक्ष पाहणीत संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'आम्ही मालेगावकर' संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी अचानक सकाळी नऊ वाजता मलेरिया विभागाच्या दवाखान्यास भेट देऊन पाहणी केली. औषधसाठा उपलब्ध असून तो फवारणी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ व साधनसामुग्री उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. फवारणी करण्यासाठी मनपाचे पाच ट्रॅक्टर आहेत. मात्र शहराचा विस्तार लक्षात घेता ते पुरेसे नाहीत. त्यातही दोन ट्रॅक्टर ना दुरुस्त असल्याचे समोर आले आहे. शहरासाठी ८० औषध फवारणी हातपंप हवे असताना केवळ ४० असून त्यापैकी ३६ कार्यरत आहेत. तर फरवरणीसाठीचे ट्रॅक्टर सकाळी नऊ वाजता प्रभागात येतात. दिवसाला केवळ एक फेरीत फवारणीचे काम अवघ्या दोन तासात गुंडाळले जाते, असे देखील यावेळी निदर्शनास आले आहे. यावेळी दादा बहिरंम, विवेक वारुळे, निखिल पवार, देवा पाटील, देवेंद्र अलई, यशवंत खैरनार आदी उपास्थित होते.

फवारणी जेमतेमच समितीच्या सदस्यांनी यानंतर थेट ओंकार कॉलनी, कलेक्टर पट्टा या फवारणी चालू असलेल्या ठिकाणी भेट दिली. यावेळी ट्रॅक्टरच्या टाकीत केवळ १०० लिटर औषधी पाणी होते. याबाबत सदस्यांनी कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी 'हे पाणी संपले की आमची सुट्टी होते' असे संगितले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंहस्थच्या कामांचे निसर्गानेच केले परीक्षण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

प्राचीन कुशावर्त त‌ीर्थ ओव्हर फ्लो झाले आणि पुराणात उल्लेखानुसार येथे प्रकट होऊन पुन्हा लुप्त झालेली गोदावरी वाहती झाल्याची घटना मंगळवारच्या अतिवृष्टीत पाहावयास मिळाली. वास्तविक सिंहस्थ कुंभमेळ्यात झालेल्या चुकीच्या कामांमुळेच कुशावर्तातून पाणी वाहिल्याचे शहरातील ज्येष्ठांकडून सांगण्यात येत आहे.

त्र्यंबकेश्वरला मुसळधार पाऊस हा नवल नाही. तथापि शेकडो वर्षात जे घडले नाही ते या पावसाळ्यात अनुभवण्यास मिळाले. त्यामागे सिंहस्थ कामांच्या दरम्यान रस्ते आणि गटारी यांचे झालेले नियोजनशुन्य काम हेच खरे कारण आहे. जोरदार पाऊस झाल्यास निलगंगा आणि म्हातार ओहळ यांचे पाणी वाढते. त्यामुळे तेली गल्ली आणि मेनरोड परिसरात रस्त्यावर पाणी येते आणि अर्ध्या तासाच्या आत त्याचा निचरा होत असतो. यावेळेस दोन ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते सांयकाळी पाचपर्यंत रस्त्यावरचे पाणी कमी झालेले नव्हते. काही ठिकाणी हे सात वाजेपर्यंत होते. कुशावर्ताच्या पश्चिम आणि दक्षिण बाजुच्या दरवाजांनी बाजुच्या रस्त्यावरील पाणी कुशावर्तात धावत होते. तर पूर्वेकडील विस्तीर्ण मोकळ्या बाजुने देखील कुशावर्तात पाणी उतरले. नंतर संपूण कुशावर्त समतल झाले. बाजुच्या ओवऱ्या दशक्रिया विधीची जागा आणि शेजारचे महादेवाचे मंदिर सर्वत्र पाण्याची पातळी वाढली होती.

सिंहस्थ नियोजनात रस्ते नव्याने काँक्रिटीकरण करतांना त्यांच्यावर थरच्या थर अंथरले गेले. त्यानंतर गटारींचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा रस्त्याच्या तुलनेत गटारी वर आल्यामुळे घरातील सांडपाणी बाहेर जाण्याऐवजी गटारींचे पाणी घरात जाणे, असे देखील प्रकार घडले. भूमिगत गटारींचा प्रकार पूर्णतः फसलेला आहे. भूमिगत गटारी कोरड्याठाक आणि रस्त्यावरून पाणी, असे प्रकार घडत आहेत. नदीपात्र, नाले तसेच भूमिगत गटारींची सफाई होते की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष त्र्यंबकेश्वर मंदिरात महाद्वारासह सर्व दरवाजांनी रस्त्यावरचे पाणी वाहत प्रांगणात आले.

सिंहस्थ कामांची पूर्तता गत वर्षी १४ जुलैपर्यंत झालेली नव्हती. त्यातच गतवर्षी पाऊस कमी झाला. त्यामुळे या कामांचे नैसर्गिक परिक्षण झालेच नाही. यावर्षी जोरदार पाऊस झाला. १० जुलैच्या आणि २ ऑगस्टच्या पावसात या कामांचे पितळ उघडे पडले आहे. नागरिकांच्या सूचनांचा विचार न करणे, ज्येष्ठ अनुभवी नागरिकांचे मागर्दशन न घेणे आणि कामांची घाई यामुळे हे सर्व घडत असल्याचे बोलले जात आहे. पुढील आठवड्यात ध्वजाअवतरणास मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तेव्हा पुन्हा कुशावर्तातून गंगा बाहेर पडली, तर काय करणा, असा प्रश्न आता त्र्यंबकचे नागरिक विचारत आहेत.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेट अडकले महापौर कार्यालयात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील नगरसेवक हे आपल्या साठ लाखांच्या निधींाठी एकीकडे भांडत असतांना, या साठ लाखाच्या निधीबाबत बजेटमध्ये चकार शब्दही नसल्याचा खुलासा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी केला आहे. प्रशासनाच्या बजेटमध्ये तरतुद नसल्याने व महापौरांकडून बजेट संदर्भातील ठरावच अद्याप प्राप्त नसल्याने निधी द्यायचा कसा, असा उलट सवालच त्यांनी सदस्यांना केला. त्यामुळे प्रशासनाशी भांडण करणाच्या तयारीत असलेले स्थायी समिती सदस्यच तोंडघशी पडले. महासभेने बजेट मंजूर करून महिना झाला तरी, महापौर कार्यालयाकडून ठरावच प्राप्त झाला नसल्याची बाब उघड झाली आहे.

स्थायी समितीने नगरसेवकांना ६० लाखाचा नगरसेवक निधी दिला आहे. त्यानुसार सुधारित बजेट महासभेने गेल्या महिन्यातच मंजूर केले आहे. परंतु, हे बजेट अद्यापही प्रशासनाला प्राप्त झाले नसल्याने सध्या प्रशासकीय बजेटवर काम सुरू आहे. दुसरीकडे नगरसेवक निधीसाठी भांडत आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी नगरसेवक निधीचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी तत्कालीन आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांच्या बजेटमध्ये नगरसेवक निधीची तरतूदच नाही. त्यामुळे नगरसेवक निधी देणार कसा, असा सवाल उपस्थित करत प्रशासकीय बजेटवर काम सुरू असल्याचा खुलासा केला. महासभेचा ठराव अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे हा ठराव आल्यानंतरच नगरसेवक निधीचा प्रश्न मार्गी लागेल, असे सांगितल्याने सदस्यांची बोलती बंद झाली.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ आदेशावरून पुन्हा वादंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पालिकेचे तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांच्या माह‌िती न देण्याच्या आदेशापाठोपाठ उच्च न्यायालयाच्या आदेशाने माहिती नाकारणाऱ्या नगररचनाच्या प्रयत्नांवर सभापती सलीम शेख यांनी ताशेरे ओढले. उच्च न्यायालयाचा निर्णय हा कल्याण-डोंबिवलीसाठी असल्याचे सांगत नगररचना विभागासह सर्व खातेप्रमुखांनी मागितलेली माहिती सादर करा, असे आदेशच त्यांनी प्रशासनाला दिले. त्यामुळे पुन्हा प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

नगररचना विभागाच्या टीडीआर संदर्भातील नस्ती स्थायी समितीला सादर करण्याचे आदेश सभापती सलीम शेख यांनी दिले होते. परंतु, या आदेशाला तत्कालीन आयुक्त खंदारे यांचा माह‌िती न देण्याच्या एका परिपत्रकाचा आधार देत, माहिती नाकारण्यात आली. त्यावरून नगररचना विभाग व स्थायीत वाद निर्माण झाला होता. परंतु, सभापतींनी पुन्हा नगररचनाला पत्र लिहून माहिती माग‌ितली. तीन पत्रानंतर त्यांना उच्च न्यायालयाचा आदेश दाखवण्यात आला. परंतु, असा आदेश लागूच होत नसल्याचा दावा करत ही माह‌िती दिलीच पाहिजे, असा आदेशच सर्व विभागांना दिला. आपण यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेतला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. नगररचना विभाग सभापतींनाच माहिती नाकारत असेल तर काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदन्यासाने रूणझुणल्या ‘श्रावणसरी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
बाहेर श्रावणसरी कोसळत असताना कालिदास कलामंदिरातही पदन्यासाच्या श्रावणसरी बरसत होत्या निमित्त होते, कलानंद कथक नृत्य संस्थेच्या गुरुपौर्णिमा उत्सवाचे. प्रसिद्ध नृत्यांगना संजीवनी कुलकर्णी यांना त्यांच्या शिष्यसमुदायाने अर्पण केलेली ही श्रावणसरी नृत्यमैफल चांगलीच रंगतदार झाली.

गुरूपौर्णिमेच्या औचित्याने विविध नृत्याद्वारे गुरूपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात कलानंदच्या सर्व विद्यार्थिनी व विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा प्रारंभ तेजोनिधी लोहगोल या वंदनेने करण्यात आला. पाऊस आला, तीनताल, वाऱ्याची गोष्ट, प्रणम्य शिरसां देवं, घनन घनन या नृत्यांमध्ये छोट्या विद्यार्थिनींनी आपले नृत्यकौशल्य सादर केले. सरस्वती स्तुती, समन्वय, आयी बरखा, झपताल, बरसे बदरिया सावन की, बरखा ऋतू आयी, तराणा यावर मोठ्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले. कथक नृत्यशैलीत विद्यार्थिनींनी गुरू संजीवनी कुलकर्णी यांना नृत्यांजली अपर्ण केली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका अश्विनी बोरस्ते, भास्कर पवार यांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते कलानंदच्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. त्यात ओजस्विनी पंडीत, मृणालिनी जाधव तसेच क.का.वाघ कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. बोरस्ते म्हणाल्या की, कलानंद कथक नृत्य संस्थेतील गुणवंत हे नाशिककरांना आनंदाची अनुभूती करून देणारे आहेत. या संस्थेची पाळेमुळे घट्ट असून या वैभवामुळे शहराच्या सांस्कृतिक वातावरणाची जडणघडण होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली कोकाटे, पल्लवी वीरकर, मधुवंती देशपांडे, गीतांजली सोळंके, वृषाली पाठक यांनी केले. आभार कल्याणी साने हिने मानले.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॉट्स अॅप ग्रुपमधून प्रशासनाला मिळाली गती

$
0
0

म.टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रशासन गतीमान करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला असून यावरच कामांबाबत चर्चा करून संबंधित कामांबाबत अधिकारी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश, तसेच काही कामांना मंजुरीही देत आहेत. नैसर्गिक आपत्तीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सोशल ‌मीडियाच्या आधारे सुरू असलेल्या स्मार्ट कामकाजाची प्रशासनात चांगलीच चर्चा होत आहे.

जिल्ह्यात कोठेही रस्ता खचला, दरड कोसळली किंवा रस्ते किंवा पुलावर पाणी वाहू लागले, अशा सर्व गोष्टीचे तत्काळ फोटो या ग्रुपमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पोस्ट केले जातात. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रणजीत हांडे सूचना करून काम करण्याचे आदेश देतात. वेळप्रसंगी या ठिकाणी भेटही देतात व त्यानंतर काम झाल्याचा फोटोही लोड करण्याच्या सूचना करतात. नाशिकच्या सार्वजिनिक बांधकाम विभागाने आपत्ती काळासाठी जिल्हाभरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा एक व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रपमध्ये २ ते ५ ऑगस्टपर्यंत तब्बल ७२ मेसेज व फोटो आले. आपत्ती व्यवस्थापनालाही ग्रुपमध्ये मेंबर केल्यामुळे त्यांनाही त्याचा उपयोग होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिरणा पूलही ब्रिटिशांच्या यादीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल पुरात वाहून गेल्याची घटना घडल्यानंतर मालेगाव शहरातून नाशिककडील वाहतुकीसाठी असलेल्या गिरणा नदीवरील ब्रिट‌िशकालीन पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. ब्रिटिशांना सन २०१० मध्ये पाठविलेल्या पत्रात या पुलाचा उल्लेख असूनही प्रशासन हातावर हात धरून आहे. त्यामुळे भविष्यात जर प्रसंग उद्भवला तर यास जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

महाड घटनेनंतर मालेगाव शहराबाहेर जाणाऱ्या जुना गिरणा पुलाबाच्या भक्कमतेचा प्रश्न उपस्थित होत आहे. सन २०१० पूर्वी ब्रिटिश सरकारने राज्यातील १६ हजार जुन्या ब्रिटिशकालीन पुलाबाबत राज्य सरकारला पत्र पाठवून या पुलांची आयुर्मर्यादा संपली असल्याचे कळवले होते. यात येथील जुना गिरणा पुलाबाबत जिल्हाधिकारी तसेच स्थानिक मनपा प्रशासनास देखील पत्र प्राप्त झाले होते. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलास समांतर असा नवीन पूल बांधण्यात आला आहे. नवा पूल वाहतुकीस खुला देखील करण्यात आला आहे. मात्र ब्रिट‌िशांकडून धोकादायक ठरवण्यात आलेला जुना गिरणा पूल अद्यापही वाहतुकीसाठी खुला आहे. मालेगावहून नाशिकच्या दिशेने या पुलावरून वाहतूक आजही सुरू आहे. महाड येथे झालेल्या दुर्घटनेत देखील अशीच स्थिती होती.

जुना गिरणा पुलाबाबत प्रशासन गाफील असून या पुलाचे बांधकाम पडण्यात यावे, असे पत्र मिळून देखील प्रशासनाने याबाबत कोणती निर्णय घेतलेला नाही. या पुलाखालून गिरणा नदी वाहते. चणकापूर धरणातून नेहमीच पाणी सोडण्यात येते. त्यावेळी येथे अत्यंत वेगाने पाण्याचा विसर्ग होत असतो. गेल्या तीन दिवसापासून देखील पुराचे पाणी वेगाने वाहते आहे. महाड सारखी दुर्दैवी घटना भविष्यात टाळता यावी, यासाठी जुना गिरणा पूल रहादरीसाठी बंद करावा, अशी मागणी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड यांनी केली आहे.

प्रशासनाकडून पाहणी

महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोल‌िस अधिकारी यांनी गिरणा पुलाची पाहणी केली. नवीन व जुन्या पुलाबाबत पूर्ण तपासणी करण्यात येऊन स्टॅबिलिटीचा आढावा घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाच्या सुरक्षिततेला धोका नसल्याचे निर्वाळा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूरच्या सातपट पाणी जायकवाडीला

$
0
0

आतापर्यंत ३८ हजारांहून अधिक दलघफू पाण्याचा विसर्ग

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण सातवेळा भरेल इतके पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडी धरणात शुक्रवारपर्यंत सोडण्यात आले आहे. गंगापूर धरणाची क्षमता ५६३० दशलक्ष घनफूट असून, जायकवाडीला आतापर्यंत ३८ हजारांहून अधिक दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे.

पावासाळा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत हे पाणी सोडण्यात आले आहे. अजून काही दिवस हे पाणी सोडण्यात येणार असून, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण धरणसाठ्यापेक्षाही जास्त पाणी हे जायकवाडीकडे वळवले जाणार आहे. गेल्या पाच महिन्यांपासून मृतसाठ्यात असलेल्या जायकवाडी धरणाने अखेर मंगळवारी रात्री उपयुक्त पातळी गाठली व त्यात नंतर वाढच होत गेली.

या आठवड्यात तर नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात एक लाख ४५ हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गुरुवारी जायकवाडी धरणाचा रात्रीपर्यंत उपयुक्त पाणीसाठा ४३३.८९५ दशलक्ष घनमीटरपर्यंत (२० टक्के) पोहोचला. त्यानंतर त्यात शुक्रवारपर्यंत सहा टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी जायकवाडीमध्ये ऑगस्टमध्ये केवळ सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. जायकवाडी येथे दारणा, गंगापूर, पालखेड, कडवा व इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पाणी सोडूनही तक्रारींचा पाढा

नांदूरमध्यमेश्वरहून शुक्रवारी सकाळपर्यंत ३७ हजार ९३० दलघफू पाणी सोडण्यात आले. त्यात दारणा धरणातून १२ हजार ५७० दलघफू, कश्यपी धरणातून ९१.५३, कडवा धरणातून ३३५६.३५, आळंदी ९४३.३९, भावली ५६५.०८, गंगापूर ४२६९.३२, भोजापूर ७३३.४५, वालदेवीमधून ३५७.९१ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. नाशिकच्या धरणातून इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानंतरही मराठवाड्यातील लोकांची तक्रार सुरूच आहे. त्यामुळे नाशिककरही संतापले आहेत. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सुध्दा मराठवाड्यातील नागरिकांच्या आरोपाचे खंडण करीत फटकारले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिका अजूनही करतेय घंटागाडीचा अभ्यास

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या वादग्रस्त १७६ कोटींच्या घंटागाडीच्या ठेक्यावरून स्थायी समितीत घमासान होऊन सभापतींनी तूर्तास घंटागाडीचे विषय हे अधिक अभ्यासासाठी व परिपूर्ण माहितीसाठी तहकूब केले. सदस्यांनी या प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगत, रकमेचा फुगवटा असल्याचा आरोप करत संशयास्पद बाबी स्पष्ट होईपर्यंत संबंधित प्रस्ताव तहकूब ठेवण्याची मागणी केली. काही ठेकेदार ब्लॅकलिस्टेड असून, न्यायालयाचा अंतिम निर्णय नसतांनाही ठेका का दिला जात आहे, असा सवाल सदस्यांनी केला. आयुक्तांनी पूर्वीच्या अटी व शर्ती कायम असून, तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचाच प्रस्ताव असल्याचा दावा केला.

महापालिकेच्या सहा विभागांसाठी स्वतंत्र घंटागाडी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु, या प्रस्तावावंर सदस्यांनीच आक्षेप घेतला.

वॉटरग्रेस कंपनीकडे बायोमेडीकलचे एक कोटी रुपये बाकी आहेत. तर घंटागाडी किमान वेतनावरूनही ब्लॅकलिस्टेड आहे. आसिफअलीचीही त‌िच स्थिती आहे. त्यामुळे काळ्या यादीतील ठेकेदारांना काम देवू नका, अशी मागणी दिनकर पाटील यांनी केली. दरातही तफावत असल्याचा आरोप त्यांनी केला. अशोक सातभाई यांनी या प्रस्तावासंदर्भात संशय असल्याचे सांगून संपूर्ण प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी केली. लक्ष्मण जायभावे यांनी प्रस्तावात त्रुटी असून शंकाचे निरसन होईपर्यंत तहकूब करण्याची मागणी केली. मनिषा हेकरे, अर्चना जाधव, यशवंत निकुळे यांनीही तोच रेटा लावला. प्रकाश लोंढे यांनीही काळ्या यादीतील ठेकेदार कसे आले, असा सवाल केला. त्यामुळे या प्रस्तावावर कायदेशीर सल्ला घ्यावा, अशी मागणी त्यांनी केला. अनेकांनी आक्षेप घेतल्याने सभापतींनी सध्या या प्रस्तावावर अभ्यासाची गरज असल्याचे सांगत हा विषय तहकूब ठेवला आहे.

डॉ. प्रवीण गेडामांचाच प्रस्ताव आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी संदस्यांच्या शंकाचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. खुलासा देतांना माझे सुदैव की दुर्देव म्हणायेच, ते माहीत नाही असे सांगून त्यांना जोरदार बॅटिंग केली. हा तांत्रिक विषय असून संबंधित प्रस्ताव हा डॉ. प्रवीण गेडाम यांच्याच काळातील आहे. त्यातील कोणत्याही अटी व शर्ती बदलल्या गेल्या नसल्याचा दावा कृष्णा यांनी केला. पूर्वीच्या प्रस्तावातील अटी व शर्ती बदलण्याचा नवीन आयुक्तांना अधिकारच नाही. प्रस्तावासंदर्भात गोंधळ असला तरी तो न्यायालयाच्या अटी व शर्तीच्या अधिन राहूनच ठेका देण्याचा प्रस्ताव आहे. डॉकेटवर माझी सही असली तरी प्रस्ताव पूर्वीचाच आहे. त्यामुळे स्थायी या संदर्भात जो निर्णय घेईल तो आम्ही लागू करू्र असे स्पष्टीकरण देत त्यांनी या प्रस्तावावरून सध्या सुरू असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.

विकासच अडकला कोर्टाच्या फेऱ्यात

महापालिकेतील अनेक प्रस्ताव कोर्टाच्या कचाट्यात अडकवण्याच्या प्रयत्नांवरून आयुक्त अभिषेक कृष्णाच हतबल झाले आहेत. शहर विकासाचे अनेक प्रश्न व प्रस्ताव कोर्टात अडकल्याने शहराचा विकासच रखडल्याची प्रतिक्रिया त्यांनी स्थायीत व्यक्त केली. घंटागाडी, पेस्ट कंट्रोलसह अनेक प्रस्ताव सध्या कोर्टात आहेत. हे वेळीच सुटले नसल्याने नागरिक वेठीस धरले जात आहे. परंतु, आपण या प्रस्तावा संदर्भात कायदेशीर सल्ला घेवून मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदोरी, सायखेड्याला इशारा

$
0
0

दोन दिवसांपासून पुलावरील अवजड वाहतूक बंद; प्रशासन सतर्क

म. टा. वृत्तसेवा, निफाड

जिल्ह्यात पुन्हा संततधार पाऊस झाल्याने निफाड तालुक्यातील गावांना पूर परिस्थितीचा फटका बसू नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणेने खबरदारीची पावले उचलली आहेत. सायखेड्याच्या पुलाला शनिवारी, (‌दि. ६) सायंकाळपर्यंत पाणी लागले होते. तसेच गेल्या दोन दिवसांपासून या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.

शनिवारी, (‌दि. ६) जिल्ह्यातील गंगापूर, दारणा, पालखेड, कडवा, वालदेवी धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने निफाड तालुक्यातील गोदावरी व कादवा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देऊन नागरिकांना अन्यत्र हलविले आहे.

चांदोरी येथील कोळीवाडा परिसरातील नागरिकांना तसेच सायखेडा येथील गंगानगर भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. शनिवारी गंगापूर धरणातून १५,६०० क्यूसेक, दारणातून २०,००० क्यूसेक, पालखेडमधून २१,४०० क्यूसेक, कडवातून ७४,००० क्यूसेक तसेच वालदेवीमधून ३,५०० क्यूसेक पाणी सोडले. हे सर्व पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्याच्या ८ दरवाज्यातून चार वाजेपर्यंत ७७,३५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत होत होता. जिल्ह्याच्या पाच धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी आणि कादवा, बाणगंगा किनाऱ्यावर दवंडी देऊन, भोंगे वाजवून नागरिकांना सतर्क करण्यात आले. गोदावरी नदीचे पाणी वाढू लागल्याने चांदोरी, सायखेडा, शिंगवे, चाटोरी यासह गोदावरी व कादवा किनाऱ्यालगतच्या इतर गावातील नदीकाठच्या नागरिकांना अन्यत्र निवाऱ्यात हलविण्यात आले. शिवाय कादवा, बाणगंगा, गोदावरी काठी असलेल्या इतर गावात तातडीने शासकीय अधिकाऱ्यांची आपत्ती व्यवस्थापन पथके पाठव‌िण्यात आली.

चांदोरीचे गोदावरी लॉन्स व सायखेडा येथील गोदावरी मंगल कार्यालय येथे या नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. शनिवारी, चांदोरी व सायखेडा या गावात स्वछता मोहीम राब‌विण्यात आली. नुकसानग्रस्त चांदोरी येथील ९० टक्के तर सायखेडा येथील ७५ टक्के घराचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.

पावसाळी अधिवेशनामुळे निफाडचे आमदार अनिल कदम यांना पूर प‌रिस्थितीदरम्यान चांदोरी, सायखेडा येथे येता आले नव्हते. त्यामुळे ते मुंबईहून आल्यानंतर तातडीने परिस्थिती आणि मदतकार्याची पाहणी करण्यासाठी सायखेडा, चांदोरी येथे पोहोचले. यावेळी प्रांत शशिकांत मंगरुळे, तहसीलदार समवेत होते. सायखेडा येथील जीर्ण व धोकादायक झालेला पुलाला समांतर पूल करण्यात यावा, यासाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आमदार कदम यांनी सांगितले.

अधिकारी सायखेड्यात

प्रांत शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विनोद भामरे, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर, नायब तहसीलदार शांताराम पवार आदींचे पथक गेल्या पाच दिवसांपासून चांदोरी, सायखेडा येथे पूर परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी थांबले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडळांच्या नोंदणीसाठी प्रथमच ऑनलाइन अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सणांच्या दिवसांत काही मंडळांकडून बळजबरीने वर्गणी वसूल करण्याचा सपाटा लावला जातो. अशा मंडळांकडे धर्मदाय आयुक्तांची परवानगीदेखील नसते. या मंडळांवर कारवाई करण्यात येणार असून, परवानगी नसलेल्या मंडळांनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन धर्मदाय आयुक्तांनी केले आहे. यासाठी यावर्षीपासून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा धर्मदाय आयुक्त कार्यालयाने केली आहे.

ज्या मंडळांकडे धर्मदाय आयुक्तांची परवानगी नाही, अशा मंडळांनी वर्गणी वसूल केल्यास पोलिसांकडून खंडणीचा गुन्हा व धर्मदाय आयुक्त अशा दोघांकडूनही कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक रित्या साजऱ्या होणाऱ्या उत्सवासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिकलम १९५०च्या उपकलम ४१ अ अन्वये धर्मादाय उपायुक्त यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. तरीसुध्दा काही मंडळे या नियमाचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा मंडळांवर कारवाई होऊ नये, यासाठी नोंदणी करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. मंडळांच्या सोयीसाठी यावर्षीपासून अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाइन पद्धत सुरू करण्यात आली आहे. यासाठी https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज सादर करताना सदस्यांच्या सहीचा हस्तलिखित ठराव, सदस्यांच्या ओळखपत्राची प्रत, जागा मालकाचे परवानगी पत्र, प्रतिष्ठीत व्यक्ती यांचे सदस्यांच्या ओळखीबाबतचे पत्र, मागील वर्षीच्या उत्सवाचे हिशेब आणि मागील वर्षी घेतलेल्या परवानगीपत्राची प्रमाणित प्रत सादर करणे आवश्यक आहे. धर्मदाय आयुक्तांना अर्ज मिळाल्यानंतर योग्य ती चौकशी करून वर्गणी गोळा करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. परवानगी न घेता वर्गणी घेतल्यास संबंधित मंडळावर कायदेशीर कार्यवाई करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी मंडळांनी वर दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे धर्मादाय उपआयुक्त राहुल मामू यांनी केले आहे. यात काही अडचण असल्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष संपर्क साधल्यास त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

नेहमीपेक्षा यावर्षी नोंदणी नसलेल्या मंडळांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. मंडळांच्या सोयीसाठी यंदा प्रथमच ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्याचा मंडळांनी लाभ घ्यावा

-राहुल मामू,

धर्मदाय उपायुक्त, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काश्यपी धरणग्रस्तांना मोबदला देण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काश्यपी धरणासाठी अनेक वर्षांपूर्वी जमीन देऊनही मोबदल्यापासून वंचित राहिलेल्या धरणग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी, तसेच ते स्थानिक असल्याने धरण क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी त्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांनी पाटबंधारे विभागासह संबंधित विभागांना केल्या आहेत.

काश्यपी धरण प्रकल्पासाठी जमिनी देऊनही प्रकल्प बाधित कुटूंबातील एका व्यक्तीला अद्याप सरकारी नोकरी देण्यात आलेली नाही. संपादित जमिनीचा विनाअट व विनाविलंब चालू बाजार भावाप्रमाणे मोबदला द्यावा आणि आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी काश्यपी धरणग्रस्तांनी केली. वारंवार आंदोलने करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने ते आता आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी १५ ऑगस्ट रोजी कुटुंबियांसह धरणात जलसमाधी घेऊ, असा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला. याबाबतचे निवेदन २७ जुलै रोजी त्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना दिले होते.

धरणावर मत्स व्यवसाय करण्याचे अधिकार मिळावेत ही देखील धरणग्रस्तांची मागणी आहे. धरणग्रस्त हे स्थानिक असून त्यांना तेथे मासेमारीसाठी प्राधान्य द्यायला हवे अशी सूचना बगाटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लाय अॅशबाबत टोलवाटोलवी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

फ्लाय अॅशचा वापर करणे राज्य शासनाने बंधनकारक करून वाहतूक खर्च आैष्णिक केंद्राने करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, शासनाच्या या निर्णयाला बगल देत एकलहरे आैष्णिक विद्युत केंद्राने मागच्या निविदेचा आधार घेत फ्लाय अॅश स्वखर्चाने वाहून नेण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. याबाबत केंद्राकडे विचारणा केल्यानंतर अद्याप आदेश आलेले नाहीत, ही जाहिरात मागील निविदेची आहे, असे टोलवाटोलवीचे उत्तर दिले जात आहे.

एकलहरे औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्राने १२ मार्च रोजी २० टक्के कोरड्या राखेच्या वाटपाबाबत जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात उद्योगांनी राखेसाठी कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना होत्या. त्यानंतर या कागदपत्रांची छाननी करून केंद्राने यशस्वी व अयशस्वी अर्जदार अशी एकूण १९६ जणांची यादी महाजेनकोच्या वेबसाइटवर लोड केली आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या आैष्णिक केंद्राच्या राखेचा धुरळा उडला आहे. राज्य शासनाने नुकतेच औष्णिक विद्युत केंद्रापासून ३०० किलोमीटर अंतरावरील बांधकामात फ्लाय अॅश वापरणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी १०० किलोमीटरपर्यंत फ्लाय अॅशचा वाहतूक खर्च औष्णिक विद्युत केंद्राने करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत, तसेच १०० ते ३०० किलोमीटरदरम्यानच्या निम्म्या खर्चाचा भारही उचलण्याचेही आदेश आहेत. असे असतानाही आता जुन्या जाहिरातीचा आधार घेत आैष्णिक विद्युत केंद्राने स्वखर्चाने फ्लाय अॅश उचलून नेण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या केंद्राकडे एकूण १८०० मेट्रिक टन फ्लाय अॅश असून, त्यातील २० टक्के अॅश ही मोफत दिली जाणार आहे. पण, ही राख स्वखर्चाने नेण्याबरोबरच ती उचण्याची जबाबदारीही फ्लाय अॅश घेणाऱ्यांना उचलावी लागणार आहे. या सर्वांचा खर्च हा ३५० रुपये टन येणार आहे.


सूचनांना बगल

पर्यावरण मंत्रालयाने या अगोदरही विद्युत केंद्रांना ३१ ऑगस्ट २००७ पर्यंत १०० टक्के वापर करण्याचे उद्दिष्ट दिले होते. पण, विद्युत केंद्राने हे उद्दिष्ट पूर्ण केले नाही. त्यामुळे फ्लाय अॅशचे प्रमाण प्रचंड वाढले. त्यानंतर केंद्रीय मंत्रालयाने पुन्हा जानेवारी २०१६ मध्ये सुधारणा केली. राज्य शासनाने त्यानुसार नवीन आदेश काढत सुधारित सूचना दिल्या. त्यालाही आता बगल देण्यात आली आहे. औष्णिक विद्युत केंद्रातून निर्माण होणारी राख डोकेदुखी ठरत असून, या राखेचा शेतीवरही परिणाम होतो व परिसरातील अनेकांना आजारांचाही त्रास सहन करावा लागत असूनही यासंदर्भात टोलवाटोलवी होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images