Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

हवालदाराची पोलिस स्टेशनमध्येच आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/सातपूर

अंबड पोलिस स्टेशनमधील पोलिस हवालदार भाऊसाहेब यशवंत सोनवणे (४८, रा. उत्तमनगर, सिडको) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस स्टेशनमधील नवीन बॅरेकमध्ये सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. सोनवणे यांनी सुसाईड नोट लिहिली असून, वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. सिंहस्थ काळात पोलिस स्टेशनच्या मागील बाजूस बांधलेल्या नवीन बॅरेकमधील लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत सोनवणे आढळून आले. पहाटे तीन ते चारच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. घटना उघडकीस येताच पोलिसांनी मोरवाडी येथील ट्रामाकेअर हॉस्पिटलमधील डॉक्टरांना पाचारण केले. डॉक्टरांनी तपासणी करून मृत्यू झाल्याचे सांगितले.

रविवारी दिवसभर पोलिस स्टेशनमध्येच असलेले सोनवणे सायंकाळी एका नातलगाशी मोबाइलवर बोलतच ते बाहेर पडले. परंतु, ते घरी गेले नाहीत. त्यांचा फोनही बंद असल्याने कुटुंबीय रात्री दहा ते अकराच्या सुमारास पोलिस स्टेशनला आले. मात्र, सोनवणे घरी गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. सोनवणे घरी परतले नव्हते. रात्री उशिरा सोनवणे पोलिस स्टेशनमध्ये आले. सहकाऱ्यांना न भेटताच नवीन बॅरेकमध्ये गेले. तेथेच त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. सोनवणे गोपनीय शाखेत लेखनिक म्हणून काम करीत असतं. सोनवणे यांच्या मृत्यूमुळे उत्तमनगर येथील ओंकारेश्वर महादेव मंदिर परिसरावर शोककळा पसरली आहे. सोनवणे मूळचे मालेगाव तालुक्यातील आघार येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

सहकाऱ्यांना धक्का

सोनवणे दीड वर्षांपासून अंबड पोलिस स्टेशनमध्ये हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी पाच वर्ष त्यांनी सातपूर तसेच पंचवटी, भद्रकाली या पोलिस स्टेशन्समध्येही काम केले होते. सोनवणे हे उत्तम धावपटू होते. उमेदीच्या काळात त्यांनी अनेक अॅथेलेटिक्स स्पर्धांमध्ये नाशिक पोलिसांच्या वतीने प्रतिनिधित्व केले. ते उत्तम क्रिकेटरही होते. खिलाडू वृत्तीचा, सुस्वभावी आणि आयुष्याबाबत नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारा कर्मचारी कौटुंबिक किंवा तत्सम व्यक्तिगत कारणांमधून आत्महत्या करेल, यावर विश्वास ठेवणे सहकारी कर्मचाऱ्यांना कठीण जात आहे.

आत्महत्येचे कारण गुलदस्तात

सोनवणे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांनी वैयक्तिक अडचणी व कौटुंबिक कारणातून आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मुलीने शिक्षण पूर्ण करावे, पत्नीने मुलीचा सांभाळ व्यवस्थित करावा, स्वतःची काळजी घ्यावी, असे नमूद केले आहे. चिठ्ठीत त्यांनी जवळच्या नातलगांसह अनेकांची माफी मागितल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

पोलिसांचे आयुष्य तणावपूर्ण

पोलिस नाईकापासून ते वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यापर्यंत सर्वांवरच कामाचा ताण असून तो समाजापासून लपून राहिलेला नाही. बारा तासांहून अधिक वेळ कामातच खर्च होत असल्याने पोलिसांना नैराश्य ग्रासत आहे. पोलिसांना त्यांच्या हक्काच्या सुट्यांपासून वंचित राहावे लागत असून, आरोग्याच्या तक्रारी बळावत आहेत. यांसारख्या अनेक कारणांमुळे पोलिस प्रचंड तणावाखाली जगत आहेत.



कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय

सोनवणे यांनी आत्महत्या केली नसून, त्यांच्या सोबत घातपात झाला असावा, असा संशय सोनवणे यांच्‍या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सलाम ‘त्या’ नाशिककरांना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मंगळवार सकाळपासूनच संपूर्ण शहर जलमय झाले होते. शहरातील बहुसंख्य रस्ते बंद. अनेक पुलांना पाणी लागले. दुचाकी, चारचाकी वाहनधारक रस्त्यात अडकलेले. मात्र पावसात सापडलेल्या अनेक नाशिककरांना सकारात्मक विचारांचा, संकटकाळात सतत मदतीसाठी धावणारा 'एक सुजाण नाशिककर' भर पावसात रस्त्यावर उतरला होता. अनेकांना वाट दाखवत होता. मदत करीत होता.

रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते. मात्र अशातही अनेक नाशिककर स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर अनेकांना वाट दाखवित होते. 'अहो, भाऊ एकडे रस्ता बंद आहे, पुलाला पाणी लागले आहे, तिकडून जा, थांबा मी मदत करतो, अहो, दादा थोडं थांबा, आधी त्यांना जाऊ द्या, मग तुमची गाडी पुढे घ्या... असे अनेक दिलासा देणारे संवाद भर पावसात कानी पडत होते.

एबीबी सर्कलवर सातपूर एमआयडीसीतून परतणारा एक तरूण अंगावर कोणताही रेनकोट, छत्रीचा आधार न घेता वाहतूक सुरळीत करण्यात दंग होता. कधी त्र्यंबकडून येणारा वाहनधारक घाई करायचा तर कधी महात्मा नगरकडून येणारा दुचाकीस्वार गर्दी करायचा, मात्र या सगळ्यांना अक्षरशः हात जोडून विनवण्या करून तो तरूण वाहतूक सुरळीत करीत होता. भर पावसातही या तरुणाने तब्बल अर्धा तास उभं राहून पोलिसांना मदत केली.

असेच काही वाहनधारक पीटीसी समोरही अनेक दुचाकीस्वारांना मदत करतांना दिसले. पोलिस अकादमीसमोर पाणी साचल्याने काही दुचाकीस्वार फ्रवशीकडील रस्त्यावर आपली दुचाकी वाहने उचलून ठेवत होती. या वाहनधारकांनाही परिसरातील दोन ते तीन युवक मदत करीत होते. शहरातील मेनरोड, एमजी रोड, कॉलेज रोड, संभाजी चौक, पिंपळपार, नाशिककरोड अशा अनेक ठिकाणी वाहने अडकली होती. मात्र अशातही संयमी आणि शांत नाशिककर अनेकांच्या पाठीशी उभा होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच हजार नागरिकांचे स्थलांतर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात पावसाने दैना उडवली असतानाच गंगापूर धरणातून झालेल्या पाण्याच्या विक्रमी विसर्गामुळे गोदावरी व त‌िच्या उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आपत्कालीन कक्षातर्फे नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून, सायंकाळपर्यंत नदीकाठावरील ६०४ कुटुंबांचे स्थलांतर समाज मंदिरे व महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आले आहे. नदीकाठावरील अडीच हजार नागरिकांना स्थलांतरीत केल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी केला आहे.पालिकेत आपत्कालीन कक्ष चोवीस तास सुरू करण्यात आला असून, नागरिकांच्या मदतीसाठी पाचही विभागांत पथके तैनात करण्यात आली आहेत.

मंगळवारच्या पावसाने नाशिककरांना पुन्हा २००८ च्या अतिवृष्टीची आठवण करून दिली. शहरात पावसाने नागरिकांची दैना उडवली असून, सर्वच रस्ते जलमय झाले आहेत.विशेष म्हणजे गोदावरी व नासर्डी नदीच्या पुरामुळे नदीकाठावरील नागरिकांच्या स्थलांतराच्या कामाला पालिकेने प्राधान्य दिले होते. सकाळपासूनच काझी गढीसह पंचवटी व गंगापूर रोडवर परिसरात नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. काझी गढीतील ४३ कुटुंबांचे मनपाच्या नागझरी शाळेत स्थलांतर करण्यात आले. मल्हारखान झोपडपट्टीतील १५० कुटुंबे मनपा शाळा क्रमांक १६ मध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. शिवाजी वाडीतील ५० कुटुंबांचे समाजमंदिरात स्थलांतर करण्यात आले आहेत. गणेशवाडी मधील ५० कुटुंबाचे गणेशवाडी मार्केटमध्ये स्थलांतर करण्यात आले. महादेववाडीतील ६० कुटुंबाचे महादेववाडी प्राथमिक शाळेत रुपांतर करण्यात आले. आनंदवली येथील ८० कुटुंबांचे मनपा घरकूल योजनेत स्थलांतर करण्यात आले आहे. आयटीआय पूल येथील १०८ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

महापालिकेच्या वतीने सहा विभागांत आपत्कालीन कक्षाअंतर्गत सहा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. आयुक्त अभिषेक कृष्णा दिवसभर शहरात फिरून अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून परिस्थितीची पाहणी करत होते. नाशिक पश्चिम विभागाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्याकडे देण्यात आली आहे. नाशिक पूर्वची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्याकडे देण्यात आली आहे. सातपूर -विजय पगार, पंचवटी रोहिदास बहिरम यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला प्रत्येक पथकात दहा कर्मचारी सोबत देण्यात आले असून, नागरिकांना तत्काळ मदत पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.



दिवसभरात ६४ कॉल

महापालिकेने नागरिकांच्या मदतीसाठी पालिका मुख्यालयात आपत्कालीन कक्ष सुरू केला असून, त्यासाठी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षात सकाळपासून मदतीसाठी केवळ ६४ कॉल आले आहेत. त्यात अग्निशमन दलासाठी तीन, रेस्क्यू कॉल- १०, झाड पडणे-११, अनाउन्सिंग- ११, पाणी साचणे २९ असे ६४ कॉल आले असून, मदतीची मागणी होताच तातडीने पथके रवाना केली जात असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे.

स्थलांतरीत कुटुंबे

विभाग कुटुंबांची संख्या

नाशिक पश्चिम २०३

नाशिक पूर्व - ९३

सातपूर- २४८

पंचवटी ५८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदिनीच्या रौद्रावताराने लाखो रुपयांची हानी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीची उपनदी असलेली नासर्डी अर्थात नंदिनी नदीनेही मंगळवारी पहाटेपासून रौद्रावतार धारण केला. पिंपळगाव बहुला ते टाकळीपर्यंत सुमारे दहा किलोमीटरच्या प्रवासात नदीच्या पुराने अक्षरशः धुमाकूळ घातला.

पिंपळगाव बहुला परिसरात अनेक शेतकऱ्यांची हाताशी आलेली पिके नदीने गिळंकृत केल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. काही ठिकाणी नदी किनाऱ्यावरील घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. गावातील कोळीवाडा परिसरात पाऊस तसेच पुराच्या पाण्याने अनेक घरांचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकेही नदी पात्रात वाहून गेली. शेतकरी अशोक भावले यांची विहीर पाण्यामुळे धसली, तसेच टोमॅटो पिकाचेही नुकसान झाले. या भागातील शेतकरी अरुण नागरे, हरी काकड, सुभाष नागरे यांच्या घरात तसेच शेतात नदीचे पाणी घुसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. त्र्यंबकरोडवर भिवा काळे यांनी नदी पात्रात भराव टाकल्याने नदीचा प्रवाह बदलल्याने अनेकांच्या घरात पाणी घुसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यारी आपली भारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळेपासून ते अगदी कॉलेजपर्यंत भरपूर मित्रमेळा जमलेला असतो. त्यातला एक तरी असा मित्र असतो, की ज्याच्यासाठी अाख्खी दुनिया कुर्बान, अशी काहीशी भावना आपल्या मनात असते. अशाच खास यारीदोस्तीसाठी 'महाराष्ट्र टाइम्स' आणि नाशिक सेंट्रल मॉलच्या वतीने 'यारी आपली भारी' ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेत तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंडसह सहभागी व्हायचे आहे. या स्पर्धेत फ्रेंडशिप डेची धमाल करत, वेगवेगळ्या खेळांचे राउंड पार करत ज्यांची यारी सगळ्यात भारी ठरेल अशा जोडीला आकर्षक बक्षीस मिळणार आहे. तर मग चला पटकन सहभागी व्हा आणि साजरा करा अनोखा फ्रेंडशिप डे!

नाशिक सेंट्रल मॉल, त्र्यंबक नाका येथे गुरुवारी (दि. ४) दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सेंट्रल मॉल या कार्यक्रमाचे व्हेन्यू पार्टनर आहेत. कल्चर क्लब सदस्यांसाठी प्रवेश मोफत असून, इतरांसाठी ५० रुपये प्रवेश फी असणार आहे. नावनोंदणीसाठी आजच सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेत संपर्क साधायचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायखेडा, चांदोरीला पुराचा वेढा

$
0
0

टीम मटा सोमवारी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस मंगळवारी दिवसभर सुरू असल्याने जिल्ह्यातील बहुतांश धरणे, तलाव, बंधारे पूर्णपणे भरली. अनेक ठिकाणी पूल खचले, तर काही गावांचा संपर्क तुटला. निफाड तालुक्यातील सायखेडा, चांदोरीला गोदावरीच्या पाण्याने वेढा दिल्याने अनेकांना सुरक्ष‌तिस्थळी हलविण्यात आले.

कळवण तालुक्यात गावांचा संपर्क तुटला शहर व तालुक्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दळणवळणाचा मुख्य आधार असलेले अनेक रस्ते मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेले. अनेक पूल पाण्याखाली गावांचा संपर्क तुटला.कळवणच्या पश्चिम पट्ट्यातील शेवटचे टोक असणाऱ्या व पुनद धरणाच्या पाठीमागील बाजूचा जुना पूल संरक्षक भिंती नसल्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही तुटल्याने वाहतूक ठप्प झाली. यामुळे उंबरदे, तिळगव्हाण या गावांसह काही पाड्यांचा सर्वार्थाने संपर्क तुटला आहे. एकलहरे रस्त्यावर गिरणा नदीवरील पूल पाण्याखाली बुडाल्याने एकलहरे, हिंगळवाडी, हिंगवे, गोपाळखडी ढेकाळे व बालापूर या गावांचा संपर्क तुटला आहे. सप्तशृंग गडावर काही प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. चणकापूर धरणातून सकाळी १८ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले असून, पुनद धरणातून १० हजार क्यूसेकचा विसर्ग करण्यात आला. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली. तालुक्यातील नवी बेज, जुनी बेज, विसापूर, पिळकोस, भादवण, चाचेर, गांगवन, बिजोरे आदी परिसरातील शेतांमध्ये पाणी घुसले असून बेजहून भादवणकडे जाणाऱ्या पुलाखाली पाण्याच्या क्षमतेतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ओतूर धरण भरण्याच्या मार्गावर असून सांडवा सोडण्यात आला आहे.

मोसम खोऱ्यात मुसळधार; चणकापूरच्या साठ्यात वाढ शहर व तालुक्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पाऊस मंगळवार सायंकाळपर्यंत सुरुच होता. गिरणा मोसम नदी क्षेत्रात व हरणबारी- चणकापूर धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस झाल्याने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. मालेगाव शहरात गेल्या २४ तासात २० मि.मी. इतका पाऊस झाला आहे. गिरणा नदीवरील चणकापूर धरणसाठ्यात मोठी वाढ झाल्याने ६४.२८ टक्के भरले असून नदीपात्रात १६ हजार ६६९ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. तर हरणबारी धरण शंभर टक्के भरले आहे. येथून मोसम नदीपात्रात ५ हजार ६४० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जून महिन्यात दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागल्यानंतर जुलै महिन्यात पावसाचे जोरदार आगमन झाले होते. ऑगस्टच्या सुरुवातीलाच शहर व तालुक्यात सर्वत्र पावसाने जोर धरला.

गिरणा, मोसम नद्यांना पूर गिरणा व मोसम नदीक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे. गिरणा नदीवरील चणकापूर धरण क्षेत्रात १०० मिमी इतका पाऊस झाला. त्यामुळे धरणातून नदीला १६ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याने नदी दुथडी भरून वाहते आहे. दुपारपर्यंत मालेगाव तालुक्यात हे पाणी पोहचल्याने नदी काठाच्या गावांना सतर्कतेचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. हरणबारी धरण भरले असून मोसमातील पहिलेच पूरपाणी नदीला सोडण्यात आले आहे. हरणबारी धरण क्षेत्रात देखील ५० मि.मी. इतका पाऊस झाला असल्याने ५ हजार ५४८ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे . उंबरदेसह परिसरातील नऊ ते दहा गावांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने तेथील गावांचा संपर्क तुटून वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. साकोरे गावातील सिमेंट बंधारा खचल्यामुळे गावाचा संपर्क तुटला होता.

सिन्नरला बंधारे भरले सिन्नर ः शहर व तालुक्यात सोमवार रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील मोठ्या धरणासह लहान मोठेही बंधारे ओव्हर फ्लो झाले असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. पास्ते येथील नदीला पूर आल्याने एक तीस वर्षीय व्यक्ती पुरात वाहून गेली आहे. तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याने आपत्ती व्यवस्थापन जागरूक झाले आहे. शिवनदीला पूर आल्याने डुबेरे, ठाणगाव गावांचा संपर्क तुटला आहे. भोजापूर व सरदवाडी धरण ओव्हर फ्लो झाले. चांदोरी, सायखेड्यात शिरले पाणी निफाड - सोमवारी रात्रभर झालेल्या पावसाने निफाड तालुक्याच्या अनेक भागात पुतपरिस्थिती निर्माण झाली. गोदावरी आणि कादवा आणि ओझर परिसरातून वाहणाऱ्या बाणगंगा या नद्यांना पूर आल्याने नदीकाठावर राहणाऱ्या राहिवाशांना हलवावे लागले. सायखेडा आणि चांदोरीत पुराची परिस्थिती गंभीर असून गोदावरीला पाणी सोडल्याने आणि रात्रभर पाऊस चालू असल्याने दोन्ही गावामध्ये पुराचे पाणी शिरले. शंभर ते दीडशे कुटुंबाना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलवले आहे. रस्त्यावर पाणी असल्याने सायखेडा-सिन्नर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. करंजगाव येथील जिजाबाईची गढीला पाण्याने वेढा दिला असून पुराच्या पाण्याचा वेग इतका होता की कादवा आणि गोदावरी नदी काठावर असणाऱ्या वीट भट्ट्यांना मोठा फटका बसला. सायखेड्याकडून सिन्नरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन ठिकाणचे ओहोळ ओव्हरफ्लो झाल्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच या दोन्ही बाजारपेठेच्या शहरांचा संपर्क तुटला होता. ओझर, निफाड, चांदवडकडून सिन्नरला जाण्याचा हा जवळचा मार्ग आहे. या मार्गावरील चाटोरीच्या पुढचा ओहोळ तसेच नायगावच्या अलिकडच्या खोल्या ओहोळावर असलेल्या पुलांवरून सहा ते सात फुट इतके पाणी वाहत होते. निफाड येथील कादवा नदीला पुराचे पाणी थेट वैनतेय विद्यालयाखालील झोपडपट्टी परिसरात शिरल्याने येथील नागरिकांना निफाड नगर पंचायतीने वैनतेय विद्यालयाच्या सभागृहात आणि ग्रामसंस्कार केंद्रात आश्रयाला पाठवले. श्री संगमेश्वेर मंदिर परिसराला पुराच्या पाण्याने वेढले. नांदूरमध्यमेशवेर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. रौळास पिंपरी व निफाड कारखाना हा रस्ताही कादवा नदीला पूर आले होते.

भाम व भावलीला पूर घोटीः इगतपुरी तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून पाऊस अधिक आक्रमक झाल्याने जनजीवन पूर्णतः विस्कटले आहे. पावसाने गेल्या अनेक वर्षाची आकडेवारी मोडीत काढत २४ तासात चक्क २१३ मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली. दरम्यान, या अतिवृष्टीमुळे दारणा, भाम व भावली नदीला दुसऱ्यांदा पूर आला असून, दारणा, भाम व भावली या नद्यांच्या पुरामुळे घोटी गावालगत दौंडतला जाणारा रस्ता पाण्याखाली गेला.

मनमाडकरांना दिलासा

मनमाड ः पाणीटंचाईने ऐन पावसाळ्यात हवालदिल झालेल्या मनमाडकरांना मुसळधार पावसाने मंगळवारी दिवसभर अव्याहतपणे हजेरी लावून दिलासा दिला. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पाऊस मंगळवारी पडल्याने शहरातील नदीला पहिल्यांदाच पाणी आले. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरण परिसरात ही चांगला पाऊस झाल्याने धरणात देखील पाणीसाठा वाढला आहे. नांदगाव शहर व परिसरात संततधार पावसाने हजेरी लावली. चांदवड शहर व परिसरात मंगळवारी सकाळी पावसाचे आगमन झाले. मात्र जोरदार पावसाची अपेक्षा असताना रिमझिम पाऊस सुरू असल्याने नागरिकांची निराशा झाली

हरणबारी धरण 'ओव्हरफ्लो' सटाणा ः बागलाण तालुक्यासह सटाणा शहरात सोमवार रात्रीपासून मंगळवार दुपारपर्यंत मुसळधार पावसाने जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले. या पावसाने तालुक्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो होऊन पाणी वाहते आहे. केळझर धरण ८८ टक्के भरले आहे. निताणे येथे लोकसहभागातून बांधलेला बंधारा फुटल्याने परिसरात पाणीच पाणी झाले. जोरण येथील हत्ती नदीत किकवारी गावाजवळ एक व्यक्ती वाहून गेल्याने त्यांचा मृतदेह काढण्यात पोलिसप्रशासनाला यश आले आहे. वीरगांव केरसाने रस्त्यावरील पुल फरशी वाहून गेल्याने संपर्क तुटला असून सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरचे नुकसान झाले आहे. करंजाड येथे केटीवेअर बंधारा फुटल्याने स्मशानभूमीसह पत्र्याचे शेड पुरात वाहून गेले आहे. बिजोटे निताणे बांध फुटल्याने पाणीच पाणी झाले. शहरातील आरम नदीला पूर आला असून, शहरवासियांनी पूर बघण्यसाठी एकच गर्दी केली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठेंगोंडा येथील गिरणा नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले असून, चणकापूर धरणातून १८ हजार ५२४ क्युसेक पाणी सोडल्याने नदीकाठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.















मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसामुळे सुट्टी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?' या गाण्याचे बोल दोन दिवसांपासून अखंड सुरू असणाऱ्या पावसाने प्रत्यक्षात उतरले आहेत. पावसाच्या मंगळवारच्या दणक्याने प्रशासनाने शाळा अर्ध्यावर सोडल्या होत्या यानंतरही पावसाचा सुरू राहणारा ओघ, धरणातून होणारे संभाव्य विसर्ग आणि उपनगरांमध्ये निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती यामुळे जिल्हा प्रशासनाने बुधवारीही (दि. ३) शाळा व कॉलेजेसनाही सुट्टी जाहीर केली आहे.

शहरात दिवसभरात सुमारे १४१ मिमी पावसाची नोंद झाली. तर जिल्ह्याची सरासरी सुमारे ६५० मिमीच्या घरात होती. यामुळे शहरातील व जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी आपत्कालीन यंत्रणाही कार्यान्वित झाली आहे. या स्थितीची माहिती कलेक्टर ऑफिसला मिळताच जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवत शाळा व कॉलेजेस आजच्या दिवस (दि. ३) बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शहरातील शाळा व कॉलेजेसमध्ये लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. परिसरातील उपनगरांसह तालुक्यामधूनही बहुसंख्य विद्यार्थी नाशिकला ये-जा करतात. दरम्यान नाशिक शहरांतर्गत व परिसरांतर्गत पावसाच्या थैमानाने सर्वच व्यवस्था कोलमडली आहे. या स्थितीत आपत्तीजनक घटना घडू नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने पूर्वदक्षता घेतली जाते आहे. याच प्रयत्नांचाच एक भाग म्हणून शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, मंगळवारी पावसाचा जोर वाढू लागल्यानंतर महापालिकेचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी शाळांना सुटी देण्याच्या सूचना दिल्या. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा सोडल्या गेल्या. दरम्यान रस्त्यात पावसाने निर्माण झालेल्या परस्थितीमुळे पाल्याला सोबत घेऊन घरी जाताना पालकांची तारांबळ उडाली.

खबरदारी म्हणून उपाय शाळांमधील विद्यार्थी रिक्षा, टॅक्सी, स्कूल बसद्वारे प्रवास करतात. तर कॉलेजचे बहुतांश विद्यार्थी सिटी बसने प्रवास करतात. मंगळवारच्या पूरस्थितीनंतर शहरातील सर्वच पूल पाण्याखाली गेल्याने त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. या पुलांवरून वाहने चालविणे जिकीरीचे होते. या स्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून या आजच्या सुटीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांच्या पदरी मनस्ताप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसामुळे शहरातील सिटी बस सेवा मंगळवारी कोलमडली. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत सर्व पुलांवरील वाहतूक बंद केली. त्यामुळे अनेक बस अर्ध्यावरच खोळंबल्या तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला. रस्त्यांवर धावणाऱ्या मोजक्याच गाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. तर अनेक स्टॉपवर सिटी बस थांबत नसल्याच्याही तक्रारी प्रवाशांनी केल्या.

शहरातील रामवाडी, व्हिक्टोरिया पूल, अशोकस्तंभ, सिटी सेंटर मॉल, उत्तमनगर, श्रमिकनगरसह ठिकठिकाणी वाहतूक बंद केल्यामुळे सीटी बसच्या वाहत‌ुकीवर मोठा परिणाम झाला. धावत असलेल्या बसेसला प्रचंड गर्दी होती. त्यामुळे या बस मधल्या स्टॉपवर थांबत नसल्यामुळे अनेकांच्या संतापातही भर पडली. विशेष म्हणजे पावसामुळे कामानिमित्त जाणाऱ्यांची गर्दी कमी असतांनाही बसची संख्या कमी झाल्यामुळे या बस फुल्ल होत्या. अनेक गाड्या रद्द तर काही गाड्या पूर्णपणे धावल्याच नाहीत. एसटी महामंडळाच्या मुख्यालयातून त्याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू होते. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या कक्षामध्ये ही सर्व माहिती गोळा केली जात होती. वाहतुकीचे मार्गही बदलले जात असले तरी शहरातील मुख्य भागातच वहातूक बंद झाल्यामुळे ही सिटी बसची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गंगापूर धरणावरील वीजपुरवठा करणाऱ्या वीज वाहिनीवर झाड कोसळल्याने वीजपुरवठा मंगळवारी तीन तास बंद होता.

शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र, तसेच कालिका बूस्टर पंपिंग स्टेशन येथील महावितरण कंपनीचा वीजपुरवठा खंडित झाल्याने या केंद्रांवर पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याचे पंपिंग होऊ शकले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी व सांयकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. चढ्ढा पार्क जलकुंभावरील इंदिरानगर, साईनाथनगर आदी भाग, तसेच कालिका जलकुंभावरील व भाभानगर जलकुंभावरील परिसरातील मंगळवारी सायंकाळचा व बुधवारी सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. संपूर्ण शहरातील बुधवारी सकाळ व सायंकाळच्या पाणीपुरवठा वितरणावर विपरित परिणाम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रजिस्ट्रेशन सुरू...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'वामन हरी पेठे ज्वेलर्स' प्रस्तुत 'मटा श्रावणक्वीन'चे रजिस्ट्रेशन सुरू झाले असून, यामध्ये तरुणींनी सोमवारपर्यंत (८ ऑगस्ट) रजिस्ट्रेशन करायचे आहे. येत्या ११ ऑगस्टला नाशिकमध्ये श्रावणक्वीनचा एलिमिनेशन राऊंड होणार आहे. १८ ते २५ वयोगटातील अविवाहित तरुणींना यामध्ये सहभागी होता येणार आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर व वाचकांनी सर्वाधिक व्होट दिलेल्या तरुणींची एलिमिनेशन राऊंडसाठी निवड करण्यात येईल.



माहितीसाठी येथे साधा संपर्क

फोन ः ०२५३-६६३७९८७ वेळ ः सकाळी ११ ते सायं. ५.

अशी आहे प्रक्रिया

ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी http://www.mtshravanqueen.com या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. या वेबसाइटवर गेल्यानंतर 'Participate now' या पर्यायावर क्लिक केल्यावर रजिस्ट्रेशन फॉर्म भरता येणार आहे. या फॉर्ममध्ये तुमचे पूर्ण नाव, पत्ता, फोन नं., इ-मेल अॅड्रेस, तुमचे पॅशन काय?, उंची, वजन, हेअर कलर, आय कलर आदी तुमच्याविषयी माहिती नमूद करायची आहे. यामध्ये तुमचे पाच फोटोदेखील अपलोड करायचे आहेत.

व्होट फॉर हर

'श्रावणक्वीन'मध्ये यंदा वाचकांनाही सहभागी करून घेता येणार आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलल्या तरुणींना वाचक व्होट करू शकतील. यामध्ये ज्या तरुणींना सर्वाधिक व्होट मिळतील, त्यांची निवड एलिमिनेशन राऊंडसाठी होणार आहे.

नियम :

- रॅम्प वॉक केल्यानंतर स्पर्धकाला एका मिनिटात स्वतःची ओळख करून द्यावी लागेल.

- स्पर्धकाने स्वतःला येणाऱ्या कोणत्याही कलाकौशल्याचे सादरीकरण दोन मिनिटांत करावयाचे आहे. त्यानंतर परीक्षक स्पर्धकाला सामान्यज्ञानाशी संबंधित एखादा प्रश्न विचारतील.

- परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेचारशे इमारती धोकादायक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात सोमवारपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीनंतर मंगळवारी महापालिकेला पुन्हा धोकेदायक इमारतींची आठवण झाली असून, पालिकेने मंगळवारी घाईघाईत पुन्हा या इमारतींची तपासणी केली. नगररचना विभागाच्या अभियंत्यांनी या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑड‌टि करत त्यापैकी ४०० इमारतींमधून नागरिकांना घर सोडून सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. अतिधोकादायक असलेले वाडे रहिवाशांनी स्वतःच सोडून दिले आहेत. तर काझी गढीतल्या ५० कुटुंबांचे स्थलांतर करण्यासह उर्वरीत रहिवाशांचे काऊन्सिलिंग केले जात आहे. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारती, वाडे व घरे यांना नोट‌सिा देण्याचे सोपस्कार पार पाडले होते. कालच्या पावसामुळे ही घरे अति धोकादायक पातळीवर पोहचल्याने महापालिकेच्या नगररचना विभागाने तातडीने या इमारतींची तपासणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त, महापौर भरपावसात फिल्डवर!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अतिवृष्टीने शहराची झालेली दैना सावरण्यासाठी महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा मंगळवारी स्वतः फिल्डवर उतरले. त्यांनी संपूर्ण शहराचा दौरा करत आपत्कालीन परिस्थिती हाताळली. गोदावरी व नासर्डी नदीसह स्थलांतरितांकडे जाऊन नागिरकांना होत असलेल्या मदतीची पाहणी केली. त्यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करत, कर्मचाऱ्यांना मदतीसाठी रस्त्यावर उतरवले. तर महापौरांसह उपमहापौरांनीही दिवसभर नदीकाठावरील नागरिकांना मदत करण्याचे काम सुरूच ठेवले. मंगळवारच्या पावसाने संपूर्ण शहराची दैना उडाली. ठिकठिकाणी पाणी साचले, तर अनेक रस्ते बंद झाले. त्यामुळे आयुक्तांनी सकाळीच पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांची एकत्र‌ति बैठक घेऊन सर्वांना त्यांच्या जबाबदारींचे वाटप करून दिले. तसेच आपत्कालीन विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करत, स्वतः रस्त्यावर उतरले. कृष्णा यांनी गोदावरीच्या पुराचा अंदाज घेत, नदीकाठचा परिसर पिंजून काढला. नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले. नासर्डी नदीच्या पुराचीही त्यांनी पाहणी केली. मल्हारखान, जोशीवाडा, पंचवटी, काझीगढी, आयटीआय पूल परिसरात स्थलांतरीत झालेल्या नागरिकांच्या भेटी घेवून त्यांना आवश्यक मदत करण्याच्या सूचना केल्या. पालकमंत्र्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली. दिवसभर शहरात फिरून फिल्डवरूनच त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवत सूचना दिल्या. आयुक्तांप्रमाणेच महापौर अशोक मुर्तडक व उपमहापौर गुरूमीत बग्गा यांनीही दिवसभर गोदावरीच्या व नासर्डीच्या पुराची पाहणी केली. महापालिकेच्या आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, नागरिकांना आवश्यक मदतही केली.

हवामान विभागाने बुधवारीही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शाळांना बुधवारीही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी नदीकाठापासून दूर रहावे. तसेच माहिती घेवूनच घरातून बाहेर पडावे.

- अभिषेक कृष्णा, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिकलेल्या लोकांचा आम्हाला अधिक त्रास!’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाच्या सरींची वाढलेली तीव्रता आणि गोदेला पूर आल्याची सोशल मीडियावरून घरबसल्या मिळालेल्या माहितीनंतर नाशिककरांमध्ये नवा उत्साह संचारला. अनेकांनी मुसळधार पावसात गोदाकाठी धाव घेतली. मात्र, त्यांच्या या उत्साहाला आवर घालण्याचे काम शहरातील सुमारे दीड हजार पोलिसांना उत्तरोत्तर कठीण होत गेले.

गोदावरी काठी दुतोंड्या मारुतीला पाण्याचा स्पर्श झाला की नाशिकच्या पुराची तीव्रता मोजली जाते. रविवारपासून सुरू झालेल्या संततधार आणि जोरदार पाऊस तसेच गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने पंचवटीमधील रामकुंड परिसरात पाण्याची पातळी वाढत गेली. या पाण्याची तीव्रता पाहण्यासाठी नाशिककरांनी गोदाकाठी मंगळवारी सकाळपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली. व्हिक्टोरिया पूल, दहिपूल, गाडगे महाराज पूल परिसरात पावसाळी पर्यटकांची संख्या वाढत गेली. या पुलांकडे जाणारे मार्ग पोलिस प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या पुलांवरून कारच काय सायकलसुद्धा जाणार नाही, याची काळजी पोलिसांनी सकाळपासून घेतली. मात्र, सहकुटुंब आणि मित्रपरिवारासह पूर 'याची देही, याची डोळा' अनुभवण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली. त्यांना पाण्यात जाऊ नका, नदीपात्रापासून दूर रहा, अशी सूचना ड्युटीवरील तैनात पोलिस कर्मचाऱ्यांनी दिल्या. मात्र, त्यांच्या सुचनांकडे शिकल्या सवरलेल्या आणि स्वत:ला सुशिक्षिण म्हणून घेणारे नागरिकही दुर्लक्ष करतांना दिसून आले. याउलट 'पुलावर तर जत्रा जमली आहे. आम्हा दोन लोकांमुळे कोणता फरक पडणार आहे? असा प्रतिप्रश्न काही व्यक्तींनी केल्यानंतर पोलिस निरुत्तरच झाले. 'शिकलेल्या लोकांचा अधिक त्रास होत असल्याची खंत पोलिसांनी केली.

सेल्फीप्रेमींचा मेळावा गोदावरी दुथडी भरून वाहत असतांना पुलावर उभे राहून भर पावसात सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. यामध्ये केवळ तरुण मंडळीच नव्हे तर वयस्कर व्यक्तींचाही समावेश मोठ्या प्रमाणात दिसून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदामाई कोपली!

$
0
0

टीम मटा

शहरासह जिल्ह्यात मंगळवारी ‌दिवसभर झालेल्या अतिवृष्टीने नाशिकला अक्षरश: धुऊन काढले. गोदावरीसह तिच्या सर्व उपनद्यांना आलेल्या पुरात चार व्यक्ती वाहून गेल्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. सायखेडा, चांदोरी गावांना पुराचा वेढा पडला असून, तेथील शेकडो रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. संभाव्य नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सैन्यदलाचे ३००, एनडीआरएफचे ४० जवान, दोन हेलिकॉप्टर, पाच बोटी मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता असून, नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दोन महिन्यांपूर्वीपर्यंत दुष्काळात होरपळणाऱ्या नाशिक जिल्ह्याला मंगळवारी पावसाने चांगलेच झोडपले. पावसाचा कहर काय असतो याचा अनुभव तब्बल आठ वर्षांनी जिल्हावासीयांनी 'याचि देही याचि डोळा' घेतला. या पावसामुळे शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील रहिवाशांची दाणाफाण उडविली. सबंध शहरच जलमय झाल्याने या जलसंकटाला सामोरे जाताना प्रशासनाचीही दमछाक झाली. जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरणांमधील पाणी पातळी कमालीची वाढली. पावसाचा जोर वाढत असल्याने हे पाणी धरणांमध्ये साठवून ठेवणे धोकादायक होते. ‍त्यामुळे धरणांमधील पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. गेल्या दोन दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू असला तरी तो मंगळवारी मध्यरात्रीनंतर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला.

सव्वालाख पाण्याचा विसर्ग

धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग आणि सातत्याने सुरू असलेला मुसळधार पाऊस यामुळे मंगळवारी सायंकाळी सातपर्यंत एक लाख २५ हजार ९११ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर हा विसर्ग वाढविण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.

पालकमंत्र्यांनी दिली भेट

दरम्यान, पावसामुळे उद््भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. पुरामुळे बाधित झालेल्या गावांना महाजन यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सैन्यदल, एनडीआरएफच्या जवानांसह हेलिकॉप्टर्सही मदतीसाठी सज्ज ठेवल्याची माहिती महाजन यांनी दिली आहे.

पाच जण पुरात वाहून गेले

गोदावरी आणि तिच्या सर्व उपनद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात पाच जण वाहून गेल्याची भीती जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. इगततुरी तालुक्यात बबन गंगा ठाकरे (वय ४०, रा. वाळविहीर) ओढ्यात वाहून गेले. दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथे अशोक तुळशीराम कराटे, सखूबाई अशोक कराटे दाम्पत्य पुरात वाहून गेले. सिन्नर तालुक्यात सुकदेव सहादू माळी हे वाहून गेले असून, नाशिक शहरात संतोष भाऊराव थोरात (३९, रा. रोकडोबावाडी) पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. याखेरीज या पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून, ४० हून अधिक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.

सलग २० तास अखंडित पाऊस

नाशिकमध्ये सोमवारी रात्री साडेबारापासून मंगळवारी सायंकाळी साडेसातपर्यंत सलग २० तास अखंडितपणे मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे संपूर्ण शहरालाच पाण्याचा वेढा पडला आहे. सायंकाळी साडेसातला काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सरी कोसळल्या. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या नऊ तासांत ९१५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

आयुक्तांकडून पाहणी

आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सकाळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आपत्कालीन कक्ष तातडीने कार्यान्वित केला. सहा विभागांत सहा पथके स्थापन केली आहेत, तसेच स्वतः गोदावरी व नासर्डी नदीच्या पुराची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदतकार्यात पोलिसांची मोलाची भूमिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात मंगळवारी पावसाने हाहाकार माजवला होता. यावेळी बचावकार्य करण्यात आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच पोलिसांनीदेखील मोलाची भूमिका बजावल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत झाली.

सोमवारी रात्री पाऊस सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाने पोलिसांना अलर्ट केले. त्याचवेळी कामाचे नियोजन करुन पोलिसांनी पाणी येणार असल्याच्या ठिकाणी बंदोबस्तास सुरुवात केली. लोकांची गर्दी होणार, अशा ठिकाणीदेखील बंदोबस्त लावला होता. लोकांनी पाण्याकडे जाऊ नये, यासाठी गोदावरीला मिळणाऱ्या सर्व उपनद्यांवर बंदोबस्त तैनात केला होता. सकाळी गंगापूर धरण, सोमेश्वर धबधबा, आनंदवल्ली, आसारामबापू पूल, जुना गंगापूर नाका येथे गस्त घालण्यात येत होती. धरणाकडे येणाऱ्या पर्यटकांनी पाण्याजवळ जाऊ नये, अशा सूचना देण्यात येत होत्या. जे पूल पाण्याखाली गेले होते त्याच्या शंभर ते दोनशे मीटर अंतरावरूनच लोकांनी तेथे जाऊ नये, असे सांगण्यात येत होते. नेहमीप्रमाणे नाशिककरांनी पूर पाहण्यासाटी गर्दी केली होती. त्यासाठी रामवाडी पुलाच्या अलीकडे व रविवार कारंजडावर गर्दी होऊ नये, यासाठी अशोकस्तंभावरच वाहतूक थांबवण्यात आली होती. या ठिकाणी बॅरिकेडस् लावण्यात आले होते. रविवार कारंजाजवळ वाहनधारकांनी जाऊ नये, अशा सूचना करण्यात येत होत्या. त्याचप्रमाणे बोहरपट्टी, चांदवडकर गल्ली, गाडगे महाराज पूल, रामसेतू पूल, रामकुंड, नासर्डी नदी काठचा परिसर अशा अनेक ठिकाणावर बंदोबस्त लावण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच पोलिसांचेदेखील मदतकार्य सुरू होते. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी सर्व कार्यक्रम रद्द करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास मदत केली. आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच पोलिस नियंत्रण कक्षातील फोन सातत्याने वाजत होते. त्यामुळे परस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांची भूमिका मोलाची ठरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकसाठी केंद्राकडून उड्डाणपूल मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

पंचवटी परिसरातील के. के. वाघ ते जत्रा हॉटेल दरम्यान उड्डाण पुल उभारण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तत्वतः मान्यता दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

के. के वाघ ते जत्रा हॉटेलपर्यंत २.३ किलोमीटर उड्डाणपुलासाठी पुल उभारण्यासाठी सुमारे २१२ कोटी लागणार आहेत. सविस्तर अहवाल बनविण्यासाठी सल्लागारांची नेमणूक केली जाईल. उड्डाणपुलाचा सविस्तर अहवाल आल्यानंतर कामास मान्यता मिळेल. सुमारे आठ महिने काम सुरू करायला लागतील. यासाठी प्रशासकीय अधिकारी राजीवसिंह, खोडसकर, साळुंके, झोडगे यांचे सहकार्य लाभले.

नाशिक उड्डाणपूल तयार होऊनही द्वारका सर्कल, इंदिरानगर, लेखानगर, के. के. वाघ कॉलेज, अमृतधाम क्रॉसिंग, जत्रा हॉटेल क्रॉसिंग आदी मुख्य ठिकाणी रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. के. के. कॉलेजसमोर अनेक विद्यार्थी जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडतात. अमृतधाम क्रॉसिंगलाही नाशिक शहरातंर्गत ३० मीटर रिंगरोड क्रॉस होतो. जत्रा क्रॉसिंगला बाह्य मार्गावरील नाशिक शहराचा ६० मीटरचा रिंगरोड क्रॉस होतो. त्यामुळे अनेकदा अपघात होतात. या त्रुटी महामार्गाच्या आराखड्यात राहिल्याचे खासदार गोडसे यांनी विभागीय अभियंता राजीवसिंह, प्रकल्प अधिकारी खोडसकर आदींसोबत पाहणी करून निदर्शनास आणून दिले. अनेक क्रॉसिंगवर किती अपघात झाले व त्यामध्ये किती नागरिकांचे मृत्यू झाले हे आडगाव व पंचवटी पोलिसांच्या लेखी पुराव्यासह दाखविले. कार्यकारी समितीच्या नुकत्याच झालेल्या २८५ व्या बैठकीमध्ये ३१ कोटी ३५ लाख मंजूर झाले. एन्ट्री व ईस्ट रॅम्पसाठी काही ठिकाणी सबवे, हायमास्क या कामासाठी मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील कामे ऑक्टोबरनंतर सुरू होतील.

उड्डाणपुलाव्यतिरिक्त मंजूर अन्य कामे लेखानगर उड्डाणपुलाच्या प्रथम गाळ्यामध्ये यू-टर्न करणे इंदिरानगर बोगद्याच्या चारही दिशांना ठराविक अंतरापर्यंत सर्व्हिसरोड व मुख्य रस्त्यामध्ये विभाजक व रेलिंग काढणे गॅब्रिएल कंपनीजवळ धुळे वाहतुकीसाठी प्रवेश मार्गिका हॉटेल सेव्हन हेवन येथे मुंबई वाहतुकीसाठी प्रवेश मार्गिका धुळे-द्वारकाकडून येणाऱ्या आणि मुंबईला जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्प्लेन्डर हॉल येथे मार्गिका पुण्याहून येणाऱ्या व मुंबईला जाणाऱ्या वाहतुकीसाठी हुनमानमंदिर व पादचारी मार्गाचे निकास ठराविक अंतरावर स्थलांतरीत करणे धुळे-द्वारकासाठी जाणाऱ्या वाहतुकीसाठी प्रवेश मार्गिका स्टेट बँक आणि पंचवटी कॉलेज येथे पादचाऱ्यांसाठी भूयारी मार्ग मोहाडी फाटा येथे उड्डाणपूल करणे कोकणगाव फाटा व दहावा मैल येथे हायमास्ट लावणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदाकाठी गाळाचे साम्राज्य

$
0
0



सातपूर : मुसळधार पावसाने नाशिकला धुवून काढल्यानंतर आता रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नदी लगतच्या भागात गाळ पसरला आहे. पाणी ओसरल्यानंतर प्रशासनाकडून दिवसभर गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले.

आनंदवल्लीत नवश्या गणपती मंदिराशेजारील रस्त्याला भगदाड पडले. मंदिर परिसरात पाणी साचले. रस्त्याला भगदाड पडल्याने वीज पोलांचेदेखील नुकसान झाले आहे. महापालिकेने गणपती मंदिराला संरक्षक भिंतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव यांनी केली आहे.

सिटी सेंटर मॉल बंद नंदिनी नदीला आलेल्या पुरामुळे सिटी सेंटर मॉलच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. तसेच मॉलचा सिग्नल पाण्यामुळे बंद पडला. त्यामुळे बुधवारी सिटी सेंटर मॉल बंद ठेवण्यात आला. अनेक तरुण-तरुणी मालबाहेर येऊन थांबले होते. मात्र, मॉल बंद असल्याचे सांगत सुरक्षारक्षकांनी त्यांना माघारी पाठविले.

वन विभागाची नर्सरी गायब वन विभागाची नर्सरी गोदावरीच्या पुरामुळे गायब झाली. नर्सरीतील रोपे वाहून गेली. तसेच तेथे गाळाचे साम्राज्य पसरले. नर्सरीची अवस्था वाईट झाली असतांना वन विभागाचे एकही कर्मचारी रोपे उचलण्यासाठी किंवा स्वच्छतेसाठी आला नाही. दरम्यान, नंदिनी नदीकाठी असलेल्या अमरधामध्ये गाळ पसरला. महापालिकेच्या वतीने अमरधाममधून गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच नदीला आलेल्या पुरामुळे अमरधामला गाळाने वेढल्याचे जाणकारांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडचे माजी नगराध्यक्ष छाजेड यांची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून नांदगाव तालुक्यात प्रसिद्ध असलेले मनमाडचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ छाजेड (वय ५२) यांचा मृतदेह बुधवारी सकाळी श्रावस्तीनगर परिसरातील विहिरीत आढळून आला. राजाभाऊ छाजेड हे गेल्या काही महिन्यांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते. या आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

छाजेड यांच्या निधनाचे वृत्त शहर व परिसरात समजताच शिवसेनेसह सर्वपक्षीय नेत्यांनी छाजेड यांच्या निवासस्थानी धाव घेतली. काही कार्यकर्त्यांना अक्षरशः रडू कोसळले. ही वार्ता पसरताच मनमाडकरांनी छाजेड यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. छाजेड हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जात. शिवसेना शहरप्रमुख, नगरसेवक, नगराध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली. शिवसेनेच्या सभेत त्यांच्या घणाघाती भाषणाची नेहमी उत्सुकता असे.

शव विच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी छाजेड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी थेट नगराध्यक्ष निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी निकटवर्तीयांना बोलून दाखवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहसील कर्मचाऱ्याची कार्यालयात आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

तहसीलदार कार्यालयातील शिपाई एकनाथ हिरकण गांगुर्डे (वय ५५) यांनी पहाटेच्या सुमारास तहसीलदार कार्यालयातच आत्महत्या केली. बुधवारी रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

गेल्या तीन महिन्यांपासून रजेवर असलेले एकनाथ गांगुर्डे (रा. रवळजी) हे २ ऑगस्ट रोजी तहसीलदार कार्यालयात रजेवर असतांनाही आले होते. प्रकृती अस्वस्थ असल्याने रजेवर असल्याने घरी जाऊन आराम करा, अशी सूचना कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गांगुर्डे यांना केली होती. शिवाय जवळचे नातेवाईक घरी घेऊन जाण्यासाठी तहसीलदार कार्यालयात आले होते. मात्र गांगुर्डे यांनी त्यांच्याबरोबर जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. पाऊस सुरू असल्याने त्यांनी घरी न जाता तहसील कार्यालयात नियंत्रण कक्षेत मुक्काम केला.

तालुक्यात सध्या आपत्कालीन परिस्थिती असल्याने आपत्ती नियंत्रण कक्षेत अन्य कर्मचारी समवेत गांगुर्डे मुक्कामी होते. बुधवारी पहाटे नियंत्रण कक्षातून चार ते पाच वाजेदरम्यान तहसीलदार यांच्या कक्षेत प्रवेश करून आतील दरवाजे बंद करून गांगुर्डे यांनी टेलिफोन वायरने खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. दीर्घ आजारामुळे नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओसरला पूर; जागल्या स्मृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

विक्रम तयार करावे लागेत नाहीत, ते काळाच्या ओघात होतच असतात. मोडले जातात, पुन्हा नवे विक्रम प्रस्थापित होतात. याची प्रचिती नाशिक परिसरातील नागरिकांना मंगळवारच्या महापुराने आली. नाशिकला गाडगे महाराज पूल प्रथमच पूर्ण बुडाला तसाच जेलरोडचा संत जनार्दन स्वामी पूलही पाण्याखाली गेल्याने नवा विक्रम नोंदला गेला. असा पूर आतापर्यंत कधी पाहिलाच नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठांनी व्यक्त केली.

नाशिकरोडच्या गोदावरी, वालदेवी, दारणा आणि नंदिनी या नद्यांनी प्रथमच धोक्याची पातळी ओलांडली. यापूर्वी २००८ मध्ये पूर आला होता तेव्हा जेलरोडच्या पुलाच्या खांबाला पाणी लागले होते. यंदा नवीन बांधलेला पूलही पाण्याखाली गेला. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी बॅरिकेड लावून पूल दोन्ही बाजूंनी बंद केला. त्यामुळे तीन महामार्गांची वाहतूक प्रथमच बंद झाली. बुधवारी सकाळी पुलावर आलेला कचरा महापालिकेने युद्धपातळीवर साफ केल्याने वाहतूक सुरू झाली.

लक्षवेधी मदतकार्य पुराची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन नाशिकरोडच्या १२ प्रभागात महापालिकेचे साडेतीनश कर्मचारी विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, विभागीय उपअभियंता मईद, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर २४ तास कार्यरत होते. आपत्ती व्यवस्तापन कक्ष सतर्क होता. अग्निशमन दलाने एस. टी. बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली एस. बी. निकम, एस. पी. मेधने, व्ही. बी. बागूल, संजय पगार, आर. बी. आहेर, एस. के. आडके, एस. के. साळवे आदींनी युद्धपातळीवर मदतकार्य केले. पोतदार हायस्कूलच्या मैदानात पाणी साचल्याने तेथील घरात अडकलेल्या कुटुंबाची सुटका अग्नीशमन दलाने केली. ब्रम्हगिरी सोसायटी, आरंभ कॉलेजजवळ पडलेली झाडे हटवली.

पाणीही विक्रमी नाशिकरोडला बिटको हॉस्पिटल व बुद्धविहारच्या तळघरात प्रथमच प्रचंड पाणी साचले. बिटको चौक, देवी चौक, शिवाजी पुतळा, आंबेडकर चौक, सुभाषरोडला रस्त्यावर प्रथमच पूरस्थिती होती. अनेक गाड्यांचे नुकसान झाले. नवले चाळ, गवळीवाड्यातील अनेक घरे पाण्यात बुडाली. देवळाली कब्रस्थानला पुराचा वेढा असल्याने अहिल्या माता पथवरील अनेक घरात प्रथमच पाणी घुसले. एकलहरा रोड ७० घरांमध्ये पाणी गेले. जयभवानीरोड परिसर जलमय झाला होता.

आरोग्य टीम सतर्क आरोग्य विभाग विभागीय निरीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले (दसक), राजू निरभवणे, प्रभाकर थोरात (देवळालीगाव), बबूल ढकोलिया (चेहेडी), विजय जाधव (विहीतगाव) आदींनी स्वच्छता मोहीम राबवली. उपनगरहून येणारे पाणी देवीचौकात साचल्याने आरोग्य विभागाने चेंबर उघडे करून दिले. प्लास्टिक अडकले होते ते काढले. सकाळी शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा भागातील एक टन कचरा या विभागाने उचलला. पाऊस व पूर ओसरल्यानंतर खरे आव्हान या विभागापुढे राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>