Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

केंद्राचे २६ मंत्री येणार राज्यात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्रसरकारच्या दोन वर्षांच्या विकासकामांचा ढोल वाजवण्यासाठी केंद्रातील २६ मंत्री राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. केंद्रीय मंत्री हे प्रत्येक जिल्ह्यात जावून केंद्रसरकारने गेल्या दोन वर्षांत राबविलेल्या योजना व विकासकामांची माहिती देणार आहेत. केंद्रसरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी नाशिकमध्ये केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती येणार असल्याची माहिती खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिली.

केंद्रसरकारला दोन वर्ष पूर्ण झाले असून, केंद्राच्या विकास योजना, घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहचवण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत. याबरोबरच भाजपच्या खासदारांनी आपल्या मतदारसंघात दोन वर्षांत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी भाजपच्या वसंतस्मृती या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मतदारसंघातील विकासकामांची माहिती सादर केली. दिंडोरी मतदारसंघात रस्त्यांचे जाळे उभे केल्याचे सांगत, मनमाड- इंदूर रेल्वेमार्ग मंजुरीसाठी प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला. नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गाच्या त्वरीत मंजुरीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन वैयक्तिक लक्ष देण्याची मागणी केली. ओझर विमानतळ सुरू करण्यासाठी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एचएएलकडे हस्तांतरणासाठी प्रयत्न केले. ओझर-वडाळी भोई-उमराणा अंडरपास मंजूर केला. नाशिक-पुणे रेल्वेमार्ग मंजूर करून आणण्यासाठीही प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय नाशिक-सुरत रेल्वेमार्ग मंजूर केल्याचे सांगत, केंद्रीय बजेटच्या अधिवेशानापर्यंत ३४४ तारांक‌ित आणि अतारांकित प्रश्न विचारले असल्याचे त्यांनी सांग‌ितले.

दरम्यान, केंद्रातर्फे विकासकामांची माहिती देण्यासाठी पुढील आठवड्यापासून केंद्रीय मंत्री राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यासाठी २६ मंत्र्यांवर महाराष्ट्राची जबाबदारी सोपविल्याचा दावा त्यांनी केला असून, नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री उमा भारती व सिद्धेश्वर रॉय येणार असल्याचे त्यांनी सांग‌ितले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जावून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार केला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

नाशिक भाजप खडसेंसोबत

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे संकटात असलेल्या महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पाठ‌िशी नाशिकची भाजप असल्याचा दावा शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी केला. खडसेंवर होत असलेले आरोप तथ्यहीन असून, चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. खडसे हे पक्षातील ज्येष्ठ नेते असून त्यांच्यासोबत आम्ही ठाम उभे असल्याचे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सप्तशृंग गडावर शेतकऱ्याची आत्महत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

शेतजमिनीच्या वादातून व वारंवार होणाऱ्या शिवीगाळ, दमदाटीमुळे वैफल्यग्रस्त झालेल्या वासूळ येथील शेतकऱ्याने सप्तशृंग गडावरील नारळे जंगल परिसरात झाडाला गळफास घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली. संजय रामचंद्र आहिरे असे या शेतकऱ्याचे नाव आहेत. ते मूळचे वाखारीचे असून, सध्या वासूळ येथे राहत होते. आहिरे यांच्या पत्नी ताराबाई आहिरे (वय ४०) यांच्या फिर्यादीवरून कळवण पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कळवण पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

आत्महत्येपूर्वी संजय आहिरे यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना घटनास्थळी सापडली असून, या चिठ्ठीचा आधार आणि फिर्यादीच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रामचंद्र आंबू आहिरे, चंद्रकांत रामचंद्र आहिरे, निर्मला एकनाथ निकम, कल्पना अरुण पगार, अरुण राजाराम पगार, माधव तुळशीराम निकम, आबा महादू निकम यांना अटक केली आहे, तर राजेंद्र अरुण पगार, सुमन बाबाजी सोनवणे, विलास बाबाजी सोनवणे, संगीता चंद्रकांत आहेर, एकनाथ देवबा निकम, गणेश एकनाथ निकम यांचा पोलिस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जानेवारीत लुबाडलेल्या ८० लाखांची तक्रार जूनमध्ये

0
0



म. टा. प्रतिनिधी, इंदिरानगर

बँकेच्या विविध एटीएममध्ये एक कोटी नव्वद लाख रूपये भरण्यास दिल्यानंतर त्यापैकी केवळ एक कोटी दहा लाख रूपयेच बँकेत भरल्याने उर्वरित ८० लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदिरानगर पोल‌िस स्टेशनमध्ये अॅक्‍ट‌िव्ह स‌िक्युअर प्रा.लि. कंपनीचे मालक अर्जुन वराडे यांच्याविरोधात शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंमत म्हणजे हा प्रकार जानेवारीत घडला असून, त्याची तक्रार जूनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील विक्रम कल्याण भडलकर (वय २८) यांनी इंदिरानगर पोल‌िस ठाण्यात फ‌िर्याद दिली आहे. नाशिक शहरातील विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैसे भरणे व एटीएमचे मेंटेनंन्स करण्याचे काम अॅक्ट‌िव्ह सिक्यूअर कंपनीला देण्यात आले होते. ५ जानेवारी २०१६ रोजी अॅक्ट‌िव्ह सिक्युअरकडे बँक ऑफ बरोडाच्या विविध शाखांमध्ये पैसे भरण्यासाठी देण्यात आले होते. बँकेच्या ४३ विविध ठिकाणच्या एटीएममध्ये ही एक कोटी नव्वद लाख रूपये रक्‍कम भरणे अपेक्षित होते. मात्र अॅक्‍ट‌िव्ह कंपनीने केवळ १८ मशिनमध्येच एक कोटी दहा लाख रूपये ही रक्‍कम भरली. यातील ऐंशी लाख रूपये रक्‍कम ही एटीएममध्ये न भरल्याचे लक्षात आल्यानंतर वराडे यांच्याकडे जानेवारीपासून पाठपुरावा करण्यात आला. इंदिरानगरमधील वडाळा पाथर्डी रोडवर असलेल्या त्यांच्या कार्यालयात वारंवार पाठपुरावा करूनही योग्य ते उत्तर अन् रक्‍कम मिळत नसल्याने इंदिरानगर पोल‌िस स्टेशनमध्ये भडलकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. अर्जुन वराडे यांच्यावर नांदेडलाही गुन्हा दाखल असल्याचे पोल‌िसांनी सांगितले असून, याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक वराडे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणे जम‌ीनदोस्त

0
0



म. टा. प्रतिनिधी, इंदिरानगर

महापालिकेच्या घरकुल योजनेत घरे मिळूनही जुन्या घरांमध्ये राहणारे, तसेच 'त्या' घरांमध्ये भाडेकरू असलेल्या भारतनगर परिसरातील सुमारे पन्नासहून अधिक घरांवर महापालिकेने शनिवारी कारवाई केली. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने जेसीबीमशीनच्या मदतीने घरे व आठ दुकानेही हटविली. यावेळी महापालिकेच्या या मोहिमेला नागरिकांनी तीव्र विरोध केला; मात्र प्रशासनाने विरोध न जुमानता हे अतिक्रमण जमीनदोस्त केले. कारवाईदरम्यान गर्दी झाल्याने लोकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला.

नाशिक महापालिकेने झोपडपट्टी मुक्‍त शहर करण्यासाठी शहरात घरकुल योजनेतंर्गत नागरिकांना घरांचे वाटप केले आहे. तरीही काही नागरिक घरकुलांच्या इमारतीत न राहता झोपडपट्टीत किंवा अतिक्रमीत घरातच भाडेकरू ठेवल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेच्या प्रशासनाने कारवाईचे आदेश दिले. महापालिकेच्या पूर्व विभागातील अधिकाऱ्यांनी भारतनगर परिसराचे सर्वेक्षण करून घरकुल मिळाले आहे पण जागा रिकमी केली नाही, अशा घरांवर मार्किंग केले होते. तसेच परिसरातील अतिक्रमणावरही मार्किंग केले होते. संबंधितांना अतिक्रमण काढून घेण्याची सूचनाही महापालिकेने केली होती. महापालिकेने सूचना करूनही हे अतिक्रमण न निघाल्याने शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास महापालिकेचे अधिकारी व पोल‌िस ताफा भारतनगर परिसरात दाखल झाला.

सुरुवातीला महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याची सूचना केली. मात्र नागरिक अतिक्रमण काढत नसल्याचे दिसून आल्यावर महापालिकेच्या जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण तोडण्यास सुरुवात केली.

कारवाई सुरू झाल्यावर काही महिलांनी अतिक्रमण काढू नये, यासाठी विरोध केला. मात्र नागरिकांचा विरोधाला न जुमानता कारवाई सुरू झाल्याने अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरुच ठेवली. मोहिमेची तीव्रता व कारवाईच्या ठिकाणी पोलिसांचा ताफा पाहून काही नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. सायंकाळपर्यंत सुरु असलेल्या या मोहिमेसाठी विभागीय अधिकाऱ्यांसह अतिक्रमण विभागाचे सहा पथके, एक जेसीबी मशीन यांच्यासह सुमारे ५० कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते. मोहिमेदरम्यान अनुचित प्रकार होवू नये म्हणून मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन यांचेसह सुमारे शंभर पोल‌िस कर्मचारी सहभागी झाले होते.

घरकुल मिळालेले असतानाही अतिक्रमण केलेल्यांवरच ही कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमण हटविण्याची मोहीम पुन्हा राबविली जाणार आहे.

- वसुधा कुरणावळ, विभागीय अधिकारी नाशिक पूर्व

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समस्यांचे सुटेना ग्रहण…

0
0

म. टा प्रतिनिधी, आडगाव

जुन्या गावठाणमध्ये येणाऱ्या आडगावला रस्ते, वीज, पाणी या मूलभूत समस्यांसह इतर नानाविध समस्यांचे लागलेले ग्रहण स्थानिक नगरसेवक व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने परिसरातील रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. येथील समस्यांसंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

गावातील सार्वजनिक शौचालयाचे पाणी थेट नाल्यात सोडल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गधी व डासांची समस्या निर्माण झाली आहे. गावात अनेक ठिकाणी पथदीप बंद असून, काही ठिकाणी तर केवळ पोल उभे करून फक्त नावालाच पथदीप बसविलेले आहेत. त्यावर लाइट केव्हा लागणार, असा प्रश्न येथील स्थानिक नागरिकांना पडला आहे.

परिसरातील उद्यानाचीही दुरवस्था झालेली असून, सर्वच खेळण्यांची मोडतोड झालेली असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या परिसरात घंटागाडी वेळेवर येत नाही, वेळोवेळी धूर फवारणी केली जात नाही, मोकाट कुत्र्यांची संख्या वाढूनही उपाययोजना केल्या जात नाहीत, चोऱ्यांचे प्रमाण वाढूनही पोलिस यंत्रणेचे परिसराकडे दुर्लक्ष होत असल्याच्या नानाविध तक्रारीदेखील नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

आडगाव-भगूर रस्त्यावरील शिंदे वस्तीजवळील चारी नंबर ६ धोकादायक बनली असून, येथील मोरी चारही बाजूंनी तुटल्याने या ठिकाणी अनेक अपघातांची संख्या वाढली आहे. पावसाळ्यात येथे पूर्ण वेळ पाणी असते, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी या मोरीची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.



परिसरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून, पावसाळ्यापूर्वी त्यांची दुरुस्ती केली नाही, तर रस्त्याची अवस्था आणखी बिकट होण्याची शक्यता आहे . गावाच्या आजूबाजूला अनेक वस्त्या तर रस्ते, लाइट, विजेच्या प्रतीक्षेत आहेत. आम्ही फक्त महापालिका हद्दीत राहतो , कर भरतो आम्हाला, कोणतीही सुविधा मिळत नाही, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. आडगावात टपऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. महापालिका प्रशासनाने फेरनियोजन करून या जागेत चांगले कॉम्प्लेक्स उभारावे. त्यामुळ कोंडी दूर होऊ शकेल.

-विलास माळोदे, स्थानिक रहिवासी

आडगावला कबड्डी, खो-खो यांसारख्या खेळांचा वारसा आहे. त्यामुळे येथे क्रीडा संकुल उभारण्यात यावे. मूलभूत समस्याही सोडवाव्यात.

-भिकाजी शिंदे, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणदिनासाठी नाशिककर सज्ज

0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नाशिक शहर परिसरातील पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. म्हसरुळ परिसरात पाच हजार रोपांची लागवड या मुख्य मोहिमेसह प्रशासनातर्फे आयोजित भव्य स्वच्छता अभियान आणि विविध सामाजिक संघटनांनी विविध स्वरुपाच्या उपक्रमांनी पर्यावरणदिन साजरा होणार आहे.

गेल्या वर्षी सिंहस्थ आणि पर्यावरण दिनानिमित्ताने नाशकात फाशीच्या डोंगरावर वृक्षलागवड तर गोदावरी नदीची मोठी मोहीम यशस्वी करण्यात आली. यंदाही कृतीशील पर्यावरणदिन साजरा करण्याकडे नाशिककरांचा कल आहे. त्याअनुषंगानेच शहर परिसरात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पर्यावरण दिनाचे औचित्य साधत रविवारी म्हसरूळ येथे पाच हजार रोपांची लागवड करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नाशिकमधील अनेक समाजसेवी संघटना, नाशिक वन विभाग आणि आपलं पर्यावरण ग्रुप यामध्ये स्वच्छेने सहभागी होणार आहेत. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत उपक्रम राबविला जाणार आहे. नाशिककरांनी कुटुंबीय आणि मित्रांसोबत एक कुटुंब एक झाड संकल्पनेतंर्गत वन महोत्सवाच्या ठिकाणी पाच लिटर पाण्याने भरलेली कॅन आणायची आहे. वृक्षांचे रोप तिथे दिले जाणार आहे. त्याचे योग्य प्रकारे रोपण करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच या उपक्रमाच्या वेळी सेंद्रीय अन्नधान्य, घाण्यावरचं तेल, सेंद्रीय भाजीपाला, मधमाशी पालक हे उपलब्ध होणार आहे. जिल्हा प्रशासनाने स्वच्छतेची मोठी मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाभरात ६८ हजार २७९ कर्मचारी त्यात सहभागी होणार आहेत. महापालिकेनेही स्वच्छता मोहीम आयोजित केली आहे. तसेच विविध संघटना त्यांच्या पातळीवरही वृक्षारोपणाचा उपक्रम राबविणार आहेत. त्यामुळे पर्यावरण दिनानिमित्त नाशिककरांमध्ये मोठा उत्साह आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षतांसोबत बियांचे वाटप

0
0




पंचवटी : पर्यावरण संतुलनासाठी पर्यावरण प्रेमींकडून विविध प्रकारच्या संकल्पना राबविल्या जात आहेत. जागतिक पर्यावरणाच्या दिनानिमित्ताने विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर एका लग्न समारंभात संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व युन‌िव्हर्सल फाउंडेशनतर्फे सात प्रकारच्या वृक्षांची आणि तुळशीच्या बियांची पाकिटे अक्षदांसोबत वाटप करण्यात आले. एकाच वेळी हजारोंच्या संख्येने आलेल्या वऱ्हाडींना बीजारोपणाचा संदेश देण्याचे काम लग्नाच्या माध्यमातून करण्यात आले.

सचिन निमसे आणि प्रियंका मटाले यांचा विवाह नुकताच मानूर येथे झाला. या विवाहाप्रसंगी संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण तसेच युनिव्हर्सल फाउंडेशनचे संचालक राम खैरनार व डॉ. जी. आर. पाटील यांनी दोन हजार वऱ्हाडी मंडळींना अक्षदांसोबत विविध वृक्षांच्या बियांचे वाटप केले आणि आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा अन्य ठिकाणी या बियांचे रोपण करा, पर्यावरण संवर्धन व वृद्धीसाठी हातभार लावा, असे आवाहन केले.

या संकल्पनेविषयी श्री. चव्हाण म्हणाले, पर्यावरण प्रेमी शेखर गायकवाड यांच्यासोबत एकदा रेल्वेने प्रवास करीत असताना एक व्यक्ती खिडकीतून काहीतरी बाहेर फेकत होता. ते दिवस पावसाळ्याचे होते. उत्सुकता म्हणून त्याला विचारले असता त्याने जमा केलेल्या बिया पावसाने ओल्या झालेल्या जम‌िनीत पडल्याने त्या रुजतील आणि त्यातील थोड्याप्रमाणात का होईना वृक्ष वाढीस लागतील, अशी त्याची भावना होती. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही बिया जमा करण्याचे काम हाती घेतले. तसेच वन विभागाकडून काही बिया विकत घेऊन त्या या लग्नात वाटप केल्या. तसेच पत्रकांचे वाटप करून घरोघरी विविध फळांच्या बिया जमा करून त्या आमच्याकडे पाठविण्याचे आवाहनही आम्ही करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

निमसे-मटाले या विवाहात आम्ही बियांचे दोन हजार पॅकेट वाटले. त्यातील दोन टक्के वऱ्हाडींनी जरी बीजरोपण करून त्या वृक्षांचे संवर्धन केले तरी ते आमच्या संकल्पनेचे यश असल्याचे आम्ही समजू लोकांमध्ये वृक्षलागवड आणि जोपासण्याचे गोडी निर्माण करण्याचा आमचा उद्देश आहे.

सचिन चव्हाण, अध्यक्ष, संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिक टिक वाजते...

0
0

शैलेन्द्र तनपुरे

भुजबळ कुटुंबियांच्या वाढत्या अडचणींमुळे त्यांच्यावरच पूर्णत: अवलंबून असलेली नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा हवालदिल झाली आहे. ज्या भुजबळांनी अनेकांना सर्वार्थाने बळ दिले, अशांनीही या संकटकाळात तोंड फिरविल्याने त्यांच्यासोबतच पक्ष संघटनाही अडचणीत आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष आमदार जयंत जाधव यांच्याकडे भुजबळांचे मानसपुत्र म्हणूनच बघितले जात असल्याने या काळातील त्यांची घालमेल व त्यातून येणारी निराशा समजू शकते. पण त्यामुळे शहरातील पक्ष संघटना निष्क्रिय बनली. भुजबळांना अटक झाल्यानंतर रस्त्यावर येऊन आंदोलन करायलाही अनेकांना चारदा फोनाफोनी करावी लागली यावरुनच संकटाची तीव्रता लक्षात यावी. जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी ग्रामीण भागात किल्ला लढविला खरा; पण त्यांना फारसा जनाधार नसल्याने संघटनेत जान ओतणे काही शक्य झाले नाही. राज्यात युती सरकारच्या विरोधात वातावरण तयार होत असतांना राष्ट्रवादी मात्र अशी गळाठलेल्या अवस्थेत असल्याने परिस्थितीचा लकवा मारलेल्या पक्षाला संजीवनी देण्याची नितांत गरज होती. गेली किमान दहा-बारा वर्षे तरी जिल्ह्यातील पक्ष संघटनेची सारी सूत्रे भुजबळ फार्मवरुनच हलत होती. त्याविषयी नाराजी व्यक्त करणाऱ्यांची दखलच घेतली जात नव्हती. एकप्रकारे पक्ष हा भुजबळांना आंदणच दिला होता. ते देखील त्यांच्या पध्दतीने तो चालवित होते. हे मान्य नसलेला पक्षातील मराठा मंडळींपैकी काही जण नाराजीतून एकतर गप्प बसले किंवा काही महत्वाकांक्षी लोक पक्षातच राहून विरोधकांशी हातमिळविणी करण्यात धन्यता मानत राहिले. यामुळे पक्षसंघटना खिळखिळी झाली. नाशिकबाबतीत शरद पवार किंवा अजित पवार यांच्याकडे गाऱ्हाणे घेऊन जाणाऱ्यांना भुजबळांशीच जमवून घ्यावे लागेल असे सांगितले जाऊ लागल्यानंतर तर अनेकांनी घरी बसणेच पसंत केले होते. भुजबळांमुळे एकीकडे पक्ष वाढत असतांनाच पक्षातील जे मुळचे पवारप्रेमी होते ते मात्र कमालीचे अस्वस्थ होत राहिले. अशा मंडळींनीच नंतर मोदी लाटेत भुजबळांना अन् पक्षालाही धक्का दिला. त्यानंतर भुजबळांभोवती चौकशांचे शुक्लकाष्ठ लागले. प्रथम समीर भुजबळांवर कारवाई झाली, तोपर्यंतही ठीक होते; पण नंतर दस्तुरखुद्द छगन भुजबळांनाच अटक झाली, तेव्हा मात्र सगळ्यांचेच होश उडाले. जी काही धुगधुगी संघटनेत होती ती देखील या घटनेने जायला लागली. अनेकांनी काळाची पाऊले ओळखून इतर पक्षांचा आसरा शोधला. काहींनी मनोमन आनंद व्यक्त केला तर काहींना काहीच सुचेनासे झाले. अशा गोंधळलेल्या अन् निर्नायकी परिस्थितीत आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांना पक्ष कसा सामोरा जाणार हा प्रश्न पुढे आला. त्याचवेळी भुजबळांना अटकेतून लवकर दिलासा मिळणे दुरापास्त वाटू लागल्यानंतर पक्षाने जितेंद्र आव्हाड या फायरब्रँड नेत्याकडे नाशिकची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला. पक्षाचा नाशकातील तारणहार म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांनीही लागलीच पक्षाचा जिर्णोध्दार करण्याचा विडा उचलून काम चालू केलेले दिसते. गजानन शेलार या भुजबळांवर नाराज असलेल्या ओबीसी नेत्याला सन्मानाने सक्रिय करण्यात आव्हांडांना यश आल्याने किमान त्यांनी सुरुवात तरी चांगली केली असे म्हणावे लागेल. आव्हाड मूळचे नाशिकचेच. सिन्नर तालुक्यातील पास्ते हे त्यांचे गाव. साहजिकच त्यांचा सुरुवातीपासूनच नाशिकशी उत्तम संपर्क राहिलेला आहे. भुजबळांच्याही गुड बुक्समधले म्हणून त्यांना ओळखले जाते. वंजारी समाजाचे आक्रमक नेते असलेल्या आव्हाडांना शरद पवारांनी चांगलीच लिफ्ट दिल्याने त्यांचा गेल्या काही वर्षातील ग्राफ सतत उंचावत राहिलेला आहे. गेल्या मंत्रिमंडळात तर अगदी जाताजाता त्यांना औट घटकेचे का होईना पण मंत्रिपद मिळाले होते. ठाण्यासारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जम बसविणे येऱ्यागबाळ्याचे काम नव्हते. एका अर्थाने वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजण्यासारखे होते. पण ते धाडस आव्हाडांनी दाखविल्याने पक्षातील त्यांचे महत्त्व वाढले. त्याचेच फळ म्हणून त्यांना प्रदेशाध्यक्षपदही देण्यात आले होते. आक्रस्ताळेपणाकडे झुकणारा आक्रमकपणा अंगी असला तरी आव्हाड हे अभ्यासूही आहेत. विविध विषयांवर विधिमंडळात सरकारला धारेवर धरण्यात त्यांचा हातखंडा आहे. नाशिक जिल्ह्यात मराठा समाजापाठोपाठ वंजारी समाज हा सर्वच दृष्टीने सशक्त असल्याने मुंडेच्या पश्चात या समाजाचे नेतृत्व करतांनाच पक्षालाही गाळातून वर काढण्याचा त्यांचा प्रयत्न राहील, यात काही शंका नाही. तथापि, भुजबळांनी ज्याप्रमाणे राष्ट्रवादीला समता परिषदेच्या शाखेचा दर्जा दिला, तसा काही प्रयत्न आव्हाडांकडून झाल्यास मग मात्र पक्षाची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी व्हायला वेळ लागणार नाही.

गजानन शेलार हे जुने जाणते कार्यकर्ते आहेत. भुजबळांच्या सोबतीने त्यांनी समता परिषदेतही मोठे काम केले. याच शेलारांना शहराध्यक्ष करण्यासाठी एकेकाळी भुजबळांनी तत्कालीन बडे प्रस्थ असलेले डॉ. वसंत पवार यांच्याशी थेट पंगा घेतला होता. निरीक्षकांसह सर्वांनाच दामटून भुजबळांनी शेलारांना शहराध्यक्ष करून यापुढे ओबीसींचे राजकारण चालेल, असा संदेश दिला होता. पण नियतीचे फासे कसे पडतात पहा, हेच शेलार नंतर भुजबळांना इतके खुपले की दोघांमध्ये विळ्याभोपळ्याचे सख्य निर्माण झाले. समीर भुजबळ व शेलार यांच्यात काही मतभेद झाल्यानंतर शेलार-भुजबळ हनिमून संपला अन् नंतर सुरू झाली ती केवळ दुश्मनी. शेलारांचा महापालिका निवडणुकीत वॉर्ड बदलण्यात आला अन् दुसऱ्या वॉर्डात त्यांच्या पराभवाची सिध्दता केली गेली. निकाल लागल्यानंतर शेलारांनी जाहीर पत्रकार परिषदेत भुजबळांवर यथेच्छ तोंडसुख घेतले. त्यानंतर त्यांचे पद काढून घेतले गेले. भुजबळांना शह म्हणून मग शेलारांनी अजित पवारांशी संधान साधत `एकच वादा अजितदादा`, असा धोषा लावला. प्रदेशचे पदही मिळविले. त्यामुळे संतापलेल्या भुजबळांनी पवारांनाच अप्रत्यक्ष इशारा देत शेलारांची नाकेबंदी तेव्हा केली होती. पुढे शेलार यांनी गप्प राहणे पसंत केले. मध्यंतरी त्यांच्या शिवसेना प्रवेशाची अफवा पसरली होती, पण तेव्हा ज्या नैय्या खैरेंमुळे त्यांच्यावर अन्याय झाला होता ते खैरेच शिवसेनावासी झाल्याने शेलार तेथे जाणे शक्य नव्हते. इतर पक्षातून त्यांना आमंत्रणेही होती, पण शेलार यांनी राष्ट्रवादीतच राहणे पसंत केले. त्यांच्या या पक्षनिष्ठेचीच पावती त्यांना आता मिळते आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने या नियुक्तीला फार महत्त्व आहे. महापालिकेच्या राजकारणातील अध्वर्यु म्हणूनच गजानन शेलारांची ओळख होती. जुन्या नाशिक भागात आजही बऱ्यापैकी प्रभाव ते टिकवून आहेत. पोलिस शिपायाच्या खुनात सहभाग असल्याच्या आरोपातून मध्यंतरी ते सहिसलामत सुटले. पण त्या काळात त्यांची या प्रकरणावरुन बरीच मानसिक ओढाताणही झाली. गजानन शेलार, वसंत गिते व विजय साने या वेगवेगळ्या पक्षातील त्रिकुटाने एकेकाळी नाशिक मर्चंट बँक व नाशिक महापालिका या संस्थांमध्ये दबदबा निर्माण केला होता. आपापल्या पक्षात त्यांची चलती तर होतीच; पण ते इतर पक्षातही सारखाच आब राखून बरेच राजकारण करीत असत. दुर्दैवाने आज या तिघांचाही बॅडपॅच चालू आहे. गिते नंतर शिवसेनेतून मनसेत गेले, आमदार झाले व आता भाजपमध्ये 'अस्वस्थ' आहेत. सानेंनी पक्षाशी एकनिष्ठता ठेवली खरी पण काळाच्या ओघात ते मागे पडले. आज तर त्यांचे नावही फारसे कोणी घेत नाही. शेलारांचीही तीच अवस्था. शेलारांचे वैशिष्ट्य एवढेच की त्यांनी पक्षाला सोडचिठ्टी कधी दिली नाही. आज जितेंद्र आव्हाडांना नाशिकची जहागिरी सर करण्यासाठी जर शेलारांची आठवण झाली असेल तर ती दोघांच्याही दृष्टीने आशादायक घटना आहे. शेलार सक्रिय झाले, आव्हाडांनी लक्ष घातले म्हणजे लागलीच पक्ष धावायला लागेल असे मात्र अजिबात नाही. कारण मुळात पक्ष उभा करावा लागणार आहे. हे काम एवढे सोपे नाही. शेलारांची संघटन शक्ती चांगली असली तरी त्यांचाही नव्या पिढीशी पाहिजे तसा संपर्क नाही. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यातील तरुण पिढीला एका छत्राखाली आणणे वाटते तितके सोपे नाही. याशिवाय शेलारांकडे काय जबाबदारी दिली जाते यालाही महत्त्व आहेच. शिवाय शेलारांनीही भुजबळांशी असलेल्या मतभेदातून काम करायचे ठरविले तर भुजबळ समर्थकही बिनसतील व नेमकी उलट परिस्थितीही उद्भवू शकते. भुजबळ समर्थकांना जर डिवचण्याचा उद्योग केला गेला तर त्यांच्यादृष्टीने आता गमावण्यासारखे काही नसल्याने ते तसे सैराट आहेत, ते अधिक त्रासदायक ठरू शकतील. म्हणूनच शेलारांचे आगमन हे अनेक संधींबरोबरच काही आपत्तीही घेऊन येतील. त्यातून आव्हाड कसा मार्ग काढतील यावरच राष्ट्रवादी काँग्रेसची नाशिकची गती-प्रगती अवलंबून राहिल.

shailendra.tanpure

@timesgroup.com





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


....कागदी घोड्यांचा नाच

0
0

गौतम संचेती

राज्यात विविध विकास महामंडळाची संख्या सातच्या आसपास आहे.त्यासाठी या महामंडळाचे आकर्षक पत्रक व वेबसाईट आहे. त्यात विविध योजनांची माहिती दिलेली आहे. इतकेच नाही तर सर्व समाजापर्यंत ही माहिती पोहचावी यासाठी प्रत्येक मतदारसंघातील आमदार आपल्या कार्यालयामार्फत असो किंवा पुस्तिकेतही या महामंडळाच्या योजनांची माहिती देतात .त्याचप्रमाणे रोजगार मेळाव्यातही या योजनांची माहिती दिली जाते तर काही सामजिक संस्थेने सरकारच्या या महामंडळाची माहिती सर्वांना कळावी यासाठी केंद्रही उघडले आहे.

यामुळे कोणत्याही बेरोजगाराला आपल्यासाठी सरकारने नोकरी नाही तर केवळ व्यवसायाची संधी दिल्याचा दिलासा मिळतो. पण प्रत्यक्षात जेव्हा तो या महामंडळाच्या कार्यालयात पोहचतो तेव्हा त्याची घोर निराशा होते.

महामंडळाची रचना मुख्यालय, विभागीय कार्यालय व राज्यभरात जिल्हा कार्यालय अशी केलेली आहे. पण कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली कार्यालय कामच नसल्यामुळे फक्त शोभेच्या वस्तू ठरल्या आहे. सध्यातरी या महामंडळाला काहीच काम उरले नाही. बोटावर मोजण्याइतकी प्रकरणे व वसुली सोडता या महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी आता रिकामे बसलेले दिसतात.

नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या २०११ च्या जणगणनेत ६१ लाखाच्या आसपास आहे. या लोकसंख्यपैकी ५५ हून अधिक टक्के समाज हा मागास आहे. त्यामुळे ३५ लाखाच्या आसपास असलेल्या या मागास समाजाला या सर्व महामंडळाने गेल्या

२५ ते ३० वर्षात किती अर्थसहाय्य केले याचा आकडा जरी काढला तर तो ५ हजाराच्या पुढे जात नाही. त्यामुळे ३३ लाखाच्या टक्केवारी हा आकडा १ टक्काही नाही. जिल्ह्यातील गावाची संख्या दोन हजाराच्या आसपास आहे. त्यामुळे एका गावात एका जणालाही या महामंडळाने अर्थसहाय्य केले असले तरी ती संख्या दोन हजाराहून अधिक झाली असली. स्थापनेपासून या महामंडळाचा एखादा अपवाद वगळला तर एक हजार ते पंधारशेच्या आत आहे.

१५०० हून अधिक जाती व पोटजातीचा समावेश असलेल्या या सर्व महामंडळाचा कारभार योग्यरितीने चालला तर अनेकांना रोजगार उपलब्ध होईल. या महामंडळाने आखलेल्या योजना आकर्षक आहे. पण निधी नसल्यामुळे त्याचे वाटपही होत नाही. या महामंडळाने वाटलेले तुटपुंजे अर्थसहाय्याचे लाभार्थी कमी असले तरी त्यांची वसुली नाही. त्यामुळे सध्यातरी या महामंडळापुढे वसुलीचे काम उरले आहे. चर्मकार महामंडळाने तर वसुली नसल्यामुळे सर्वच योजना

बंद केल्या इतकेच नाही तर प्रकरण घेणेही थांबवले.

महाराष्ट्रात इतर मागसवर्गीय वित्त महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ आहेत. यांची स्थिती बिकट आहे. तर या व्यतिरिक्त आद‌िवासी विकास महामंडळ आहे. येथे निधी भरपूर असला तरी हे महामंडळ घोटाळ्याबाबत प्रसिध्द आहे. त्याचप्रमाणे मौलाना आझाद आर्थिक अल्पसंख्याक महामंडळ आहे. तर खुल्या प्रवर्गाला रोजगार मिळावा यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे. पण या महामंडळाचे कार्यालय नाशिकमध्ये नाही.

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेल्या हे महामंडळ राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या योजना राबवत असतात. त्यात केंद्राच्या सर्वच योजना बंद आहेत. अगोदर दिलेल्या कर्जाची रक्कम थकल्यामुळे पुढे निधी मिळत नसल्याचे बोलले जाते. तर राज्यातील बीज भांडवल योजना मात्र सुरू आहेत. या योजनेला बँकेमार्फत पैसे दिले जातात. त्यामुळे त्यातील बोटावर मोजण्याइतकेच प्रकरण मंजूर होतात. वास्तविक या महामंडळाची दर तीन महिन्यात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होते. त्यात महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, बँकेचे अधिकारी उपस्थित राहतात. पण यातील किती योजना मंजूर होतात त्यातील अडचणी सुटतात का, त्याचे पुढे काय होते हे मात्र सामान्यांना कळतही नाही. खरं तर महामंडळाच्या या कारभारा विरुद्ध विविध जातीच्या मागासवर्गीय संघटनेने आवाज उठवायला हवा, त्याचप्रमाणे खासदार आमदारांनी निधी का दिला जात नाही. याचा जाब सरकारला विचारायला हवा. ज्या समाजाच्या मतांवर आपण निवडून येतो त्यांच्यासाठी थोडासा आवाज जरी उठवला तर मागासाचे जीवनमान उंचावेल...नाहीतर हे महामंडळ फक्त कागदावरच राहतील.

gautam.Sancheti

@timesgroup.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑटोग्राफ प्लीज

0
0

ऑटोग्राफ प्लीज
प्रशांत देसले नवीन पेन घेतल्यानंतर ते कसे चालते हे पाहण्यासाठी आधी आपलीच सही करून पाहणारे आपण आज कधीतरीच सही करतोय. खिशाला टांगलेलं पेन केवळ शोभेची वस्तू ठरतेय. स्व-अस्तित्वाची ओळख असलेली सही आपण आता कधीतरीच करतोय, नाही का!



काळ जसजसा बदलतो तसतशा काही गोष्टी मागे पडत जातात, अर्थात तो निसर्गाचा नियमच आहे. पण, तरीही काही बाबी आजही टिकून आहेत. कारण काय तर त्या काळाबरोवर स्वतःलाही बदलून घेत गेल्या आणि सतत प्रवाहात राहण्यासाठी बदल स्वीकारत गेल्या. फोन ते मोबाइल असा आणि त्यांनतर आता फोर जी पर्यंतचा प्रवास किंवा पत्र पासून ई-मेलपर्यंतचा प्रवास हे त्यासाठी उत्तम उदाहरण आहे. मात्र, यात आपण किती गोष्टी काळाबरोबर स्वीकारतो आणि किती मागे टाकत चाललो हे कधी तरी पाहणे गरजेचे आहे. आजकाल सगळंच ऑनलाइल झाल्यामुळे कुणालाही ऑफलाइन रहायला आवडत नाही, किंबहुना जरावेळ ऑफलाइन झालं तरी चुकल्यासारखं वाटतं. पण, या ऑनलाइनच्या हव्यासापोटी आपण अशा अनेक महत्त्वाच्या आणि स्वाभिमानाच्या, स्वअस्तित्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय, स्वतःची सही, स्वाक्षरी जी आज आपण कधीतरी करतो, हे त्यातलंच एक मनाला बोचणारं सत्य..

बायोमेट्रीक आणि ऑनलाइनच्या प्रवाहात वाहतांना आपण स्वतःची ओळख पटवून देणाऱ्या या सहीकडे खूप दुर्लक्ष करतोय. जसं प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं, तसं जगाच्या पाठीवर प्रत्येकाची सही देखील वेगळी. सुशिक्षीत असो अश‌िक्ष‌ीत, मागासलेले असो किंवा पुढारलेले असो प्रत्येकासाठी सही शिकणे हे खूप उत्सुकतेचं असतं. पूर्वी सगळे व्यवहार हे कागदावर होत होते. बँकांमध्ये आजही ती सोय आहे, पण आपण इंटरनेट आणि स्मार्ट अॅप्सच्या विळख्यात इतके अडकलोय की बँकेत जावून स्लीप भरून सही करण्यासाठी कुणाला वेळ नाही. सगळे बसल्याजागी व्यवहार करण्यातच धन्यता मानतात. इ-बँकिंगला कुठेही सही लागत नसल्याने 'ती' मागेच पडत चाललीय.

कार्यालय, ऑफिसमध्येही लाल रंगाचे आडवे-उभे रकाने असलेले हजेरीबुक आता दिसेनासे झाले आहे. पूर्वी कार्यालयात आल्याआल्या या बुकचा शोध घ्यावा लागायचा. एकदाची सही ओढली की सगळे कसे निवांत व्हायचे. मात्र, आज प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर मंदिराबाहेर घंटा टांगावी तसं टांगलेलं पंचिंग मशिन सगळ्यांचीच वाट पाहत बसलेलं असतं. आपण आल्याचा पुरावा म्हणून प्रत्येक जण त्यात अंगठा, बोट ठेवून व्यवस्थेचा भाग होतोय. काही कार्यालयांमध्ये तर कॅमेऱ्यासमोर उभं राह‌िलं की झाली हजेरी. तर काही ठिकाणी कंम्प्युटरवर लॉग‌िन केलं की आपोआप नोंद होते. मात्र, या सगळ्यात आपली हजर असल्याची, उपस्थित असल्याची जाणीव करून देणारी सही कुठेतरी मागे पडत चालली आहे.

थोडं मागे वळून बघितलं की, सही शिकण्यासाठी आपण कितो खटाटोप करायचो हे अगदी डोळ्यासमोर येतं. तेव्हा सहीबाबत खूप वेगवेगळी माहिती कानी पडायची. ती म्हणजे, सही करतांना पेन उचलायचा नसतो, म्हणजे सही ही अखंड करावी लागते, सहीखाली आडची रेघ मारावीच लागते, दोन टिंब ठेवावेच लागतात, वगैरे, वगैरे.

चौथीपास झाल्यावर इंग्रजीची ओळख होताच प्रत्येकजण सर्वात आधी सही शिकण्याचा प्रयत्न करायचा. अनेकांची पहिली सही ही अगदीच साधी राहीली असावी. जसं नावातील आद्यक्षरांची केवळ इंग्रजी अक्षर आणि त्यापुढे डॉट अन् नंतर आडनावाचं पूर्ण स्पेलिंग. सगळेच एकमेकांचं पाहून सही करायचे आणि त्यानुसार बदल घडवत जायचे.

बहुतेकांना आयुष्यात सर्वात आधी सहीचं आकर्षण निर्माण झालं असेल किंवा मनात भरली असेल तर ते शिक्षकांची सही. निबंधच्या वहीत Good, Very Good, Very Very Good असा शेरा आणि त्याखाली लाल रंगाच्या पेनाने शिक्षकांनी सफाईदार हाताने केलेली सही हे प्रत्येकासाठी खूप अप्रूप असायचं. शिक्षकांची सही पाहूनच अनेक जण आपल्या पहिल्या सहीत बदल घडविण्याचा प्रयत्न करायचे. अर्थात तेव्हाचे शिक्षक आणि त्यांचे व्यक्तिमत्व हे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खूप आदर्श होतं. आजचे शिक्षक शाळेत आल्यावर व्हॉटस् अॅपवर फोटो अपलोड करतात. अधिकाऱ्यांनीही विविधरंगी इमोजीस म्हणजेच आयकॉनरुपी अंगठा टाकला की इकडे शिक्षक मोकळा श्वास घेतात.

वडिलांची, मोठ्या भावंडांची सही पाहूनही अनेकांनी पहिली सही गिरविण्याचा प्रयत्न केला असेल. बहुतेक घरात तेव्हा आईच अशी एकमेव व्यक्ती असायची की, जी आपल्याकडून सही कशी करायची, हे शिकून घ्यायची. कुणा नातेवाईकाचे पत्र आले तर सगळ्यात शेवटी 'तुमचाच' असं म्हणून त्याखाली केलेली सही तेव्हा मोठी कौतुकाची आणि अनुकरणाची बाब होती. कुणाची सही अर्धी इंग्रजी तर अधी मराठी पाहून अनेकजण हे असं कसं बुआ, म्हणून बुचकळ्यात पडायचे, कुणाच्या सहीत पहिल्या अक्षराभोवती मोठं रिंगण पाहून प्रश्न पडायचा, तर कुणाच्या सहीच्या शेवटी लहानसा टिंब लक्ष वेधायचा, कुणाच्या सहीखालची आडवी रेघचं मनात भरायची तर कुणाच्या सहीत तारखेचा उल्लेख... हे सगळं म्हणजे न्याहाळत बसावं असंच असायचं. तसेच बाळासाहेब ठाकरे, पु. ल. देशपांडे, राज ठाकरे यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या मराठीतील सह्या मनात भरणाऱ्याच आहेत.

अनेकांना हे सही प्रकरण खूप जडही जायचे. शिक्षकांनी सांगितलेला गृहपाठ वेळेत न केल्यामुळे तोंडी परीक्षेच्या आधी वही तपासल्याचा शेरा मारून शिक्षकांची केलेली ड्युप्लिकेट सहीचे अनेक प्रकरणं तेव्हा बाहेर पडायची आणि लेखी परीक्षेच्या आधी अनेकांच्या हातावर फोड यायचे.

प्रत्येकाची पहिली सही आणि आजची सही यात बराच फरक असणार. मोजकेच असतील की त्यांची पहिली आणि आजची सही सारखी असेल. अनेक ठिकाणी आपण असल्याचा, आपली सहमती असल्याचा किंवा विरोध असल्याचं प्रतीक म्हणून आपण अगदी रुबाबाने सही करायचो किंवा अजूनही करतोय. पण कुठेतरी आपण सहीला मागे सोडतोय. जगण्याच्या रहाटगाड्यात कुठेतरी आपलं हे 'अस्तित्व' जखडले तर जात नाही ना!

आज खिशाला पेन कमी आणि पाकीटात कार्ड जास्त आहेत. एटीएम, क्रेडीट, आधार, आयकार्ड, राहीलंच तर टोलनाक्यावर दाखवायचे कार्ड. या सगळ्यांसाठी पासवर्ड नावाचा एक महाभयंकर आकड्यांचा खेळ मनात सतत पिंगा घालतोय. कधी 'अंडरस्कोर' टाकायचा राहतो तर कधी 'अॅट द रेट' , असा सगळा पासवर्डचा गोंधळ आज उडतोय. ऑनलाइन बँकिंग असल्यामुळे बँकेत अकाऊंट उघडतांना केलेली सही सोडली तर नंतर चुकनही सही करण्याचा प्रश्न येत नाही. सगळं काही स्मार्ट फोनने आपल्याकडून हिरावून घेतलयं. आपण सगळं जगणं या ऑनलाइन आणि 'फोर जी' च्या स्वाधीन करून बसलोय आपण. विशेष म्हणजे आजही काहींना दिवसभरात खूप सह्या कराव्या लागतात, मग अशावेळी ते सही करण्याऐवजी केवळ काहीतरी आरेखडायचे म्हणून ओरखडतात. त्याला कोंबडा मारणे असेही म्हंटले जाते. शाळा, कॉलेज, बँक, ऑफिस सगळीकडे अर्जफाटेही मेलवर होताय. हजेरी ऑनलाईन, पगार ऑनलाइन झाल्यामुळे खिशातला पेन काढून सही करण्यासाठी कुठे संधीच मिळत नाही. गमतीची बाब म्हणजे, नट-नट्या, प्रसिद्ध व्यक्तींच्या सह्या घेण्यासाठी फारसं कुणी उत्सुक नाही. खिशातून पेनऐवजी मोबाइल काढून प्रत्येकजण केवळ सेल्फी घेणचं आज पसंद करतोय. व्हॉटस् अॅप, फेसबुकवरही केवळ सेल्फींचा रतीब सापडतो...पण कुणी 'आमूकचा ऑटोग्राफ' असं म्हणून कुणी काहीच कसं शेअर करत नाही. कधीकाळी सही कारण्यासाठी तरसणारे या ऑनलाइनच्या हव्यासापोटी सही करणे विसरत तर नाही ना!

Prashant.desale

@timesgroup.com





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्ष लागवडीवर सॉफ्टवेअरचा वॉच

0
0

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक ः राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी २ कोटी वृक्षलागवडीसाठी विविध सरकारी विभागांवर वॉच ठेवण्यासाठी नागपूर येथे विशेष सॉफ्टवेअर कार्यन्वित करण्यात आले आहे. विभागांना देण्यात आलेले उद्द‌ीष्ट साध्य होत आहे किंवा नाही, याची शहानिशा या सॉफ्टवेअरद्वारे केली जाणार आहे. जीपीएस आणि उपग्रहाच्या माध्यमातून अशा प्रकारे पहिल्यांदाच वृक्षलागवड ट्रॅक केली जाणार आहे.

येत्या १ जुलै रोजी २ कोटी वृक्षलागवड करण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम राज्य सरकारने आखली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ही मोहीम होत असून महसूल विभागापासून पर्यटन महामंडळापर्यंत सर्व विभागांना खड्डे खोदाईपासून रोप लागवड आणि या रोपांची निगा राखण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. नेहमीप्रमाणे हे सारे उद्दीष्ट कागदावर राहणार नसून यंदा वॉच ठेवण्यासाठी वनविभागाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये हे सॉफ्टवेअर कार्यन्वित करण्यात आले आहे. याचे संपूर्ण नियंत्रण अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती तंत्रज्ञान व धोरण) यांचे राहणार आहे. प्रत्येक विभाग कुठे वृक्षारोपण करणार आहे त्याचे भौगोलिक स्थान हे अंक्षांश आणि रेखांशांसह या सॉफ्टवेअरमध्ये दिसणार आहे.

कुणाला किती उद्द‌िष्ट (प्रत्येकी रोप लागवड)

n महसूल - तलाठी कार्यालय ५, तहसील २५, उपविभागीय कार्यालय १०, जिल्हाधिकारी कार्यालय ५०, विभागीय आयुक्तालय ५०

n नगरविकास - नगरपालिका प्रती वॉर्ड २५, महापालिका प्रतीवॉर्ड ५०

n सहकार व पणन - सहकारी संस्था परिसर १०, साखर कारखाने १००, पर्यटन - महामंडळाच्या मालकीच्या जागा, पर्यटनस्थळे ५०.







यंदाचा वनमहोत्सव हा ख-या अर्थाने यशस्वी होईल. मिशनमोडवर सर्वांनी काम करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. पहिल्यांदाच सॉफ्टवेअरचा वापर आम्ही या मोहिमेत करणार आहेत.- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेफिकीर पोलिस वाहनाने दोन ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/दिंडोरी

ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक शाखेचे वाहन उलटल्याने झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना नाशिक- पेठ रस्त्यावरील रासेगावजवळ सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेनंतर जमावाने पोलिसांना मारहाण केल्याची चर्चा होती. मात्र, त्याला पुष्टी मिळू शकली नाही. मात्र, पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता.

या प्रकरणी दिंडोरी पोलिस स्टेशनमध्ये पोलिस वाहनाच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात अशोकनगरमधील संभाजी चौकात राहणारे गणेश शिवराम पगारे (वय ४३), तसेच रासेगाव येथील वैभव शांताराम धोंडगे (२०) यांचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस दलातील वाहतूक विभागाचे कर्मचारी शनिवारी सकाळी जीपने (एमएच १५/एए ५२२७) नाशिक- पेठ रस्त्यावरील वाहनांची तपासणी करण्यासाठी येत होते. मात्र, पोलिसांचे भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते साइडपट्ट्यांवरून खाली उतरल्याने उलटले. या वाहनाखाली दोन दुचाक्यांवरील चौघे जण सापडले. यात दोन जण ठार झाले, तर रासेगाव येथील श्याम भगवान ढगे (वय २१) आणि काशिनाथ पेनटप्पा जय गंभीर जखमी झाले. या प्रकरणी दिंडोरी पोलिस स्टेशनमध्ये अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

सिव्हिलमध्ये आक्रोश

अपघातात गणेश पगारे यांचा जागीच मृत्यू झाला, तर वैभव धोंडगेवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. गणेश पगारे याचे वडील ठेकेदाराच्या हाताखाली सेंट्रिंगचे काम करतात, तर आई धुणीभांडी करते. वैभव धोंडगे याच्या मृत्यूनंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाइकांचा प्रचंड आक्रोश दिसला. कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. अखेर आश्वासनानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इडी’कडून भुजबळांना वाचविण्याचा प्रयत्न?

0
0

गिसाकाचे ५५ कोटी रुपये मूल्यांकन; यशवंत अहिरे यांचा सवाल

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखाना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीने अवघ्या २७ कोटी ५५ लाख रुपयाला विकत घेतला होता. दरम्यान भुजबळ यांच्यावर इडीकडून कारवाई झाल्याने हा कारखानादेखील इडीकडून ताब्यात घेण्यात आला आहे. मात्र भुजबळांनी गैरमार्गाने मिळविलेल्या पैशातून कारखाना विकत घेतला असून याबाबत गिसाका बचाव समितीच्या माध्यमातून न्यायालयीन लढाई सुरू आहे. यात न्यायालयीन पुराव्याच्या कामासाठी या कारखान्याची चौकशीची माहिती लेखी स्वरुपात मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र सहकार बचाव अभियान अध्यक्ष यशवंत अहिरे यांनी 'इडी' संचालकांना केली आहे.

समितीचे अध्यक्ष यांनी दिलेल्या निवेदनात, त्यांनी 'इडी'कडून भुजबळांच्या मालमत्तेची चौकशी केली जाते आहे. यात गिसाकाचे आजचे बाजारमूल्य ३०० कोटी आहे, मात्र इडीकडून केवळ ५५ कोटी रुपये अशी दर्शविलेली आहे. मात्र इतके कमी मुल्यांकन दाखविल्याने जिल्ह्यामध्ये इडीकडून होणाऱ्या चौकशीबाबतच प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच इडीकडूनच भुजबळ कुटुंबियांना वाचविण्यासाठी प्रयत्न तर करीत नाही ना, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.

गिरणा साखर कारखान्याच्या कमी मूल्यांकनात कारखाना विक्री झाल्याने सभासद व शेतकरी यांच्यावतीने गिसाका बचाव समिती व महाराष्ट्र सहकार बचाव अभियानाच्या वतीने अध्यक्ष यशवंत अहिरे यांनी न्यायालयात दादा मागितली आहे. यात कारखाना खरेदी व मुल्यांकनाबाबत होत असलेल्या गैरप्रकाराबाबत दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच आर्मस्ट्राँग कंपनीचे जनरल मेनेजर सौरभ बोरुडे, चीफ इंजिनीअर खलाणे, वाघचौरे, राजपूत यांनादेखील भुजबळ कुटुंबीयांची गैरव्यवहारबाबत संपूर्ण माहिती असून त्यांचीदेखील चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे 'इडी'ला केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांनीच केला खडसेंचा गेम : आव्हाड

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनेच एकनाथ खडसेंच्या स्वीय सहाय्यकाच्या फोनचे गेल्या आठ महिन्यांपासून टॅपींग सुरू होते, त्यामुळे फडणवीसांनीच खडसेंना गेम केला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी नाशिक येथे केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर दाऊदशी संबध असल्याचा आरोप करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा उघड झाला असून दाऊदशी कोणाशी संबध आहेत, ते जनतेसमोर आपोआप आले असल्याचा दावा त्यांनी केला.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलतांना खडसेंप्रकरणी हा गौप्यस्फोट केला. राज्याचा वरिष्ठमंत्री देशाचा दुश्मन असलेल्या दाऊद इब्राह‌िमशी बोलतो, हेच गंभीर आहे. याप्रकरणामुळे खडसेंना अटक करावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली.

खडसे यांच्या पीएचे फोन हे आठ महिन्यांपासून टॅप केले जात होते. कोणत्याही मंत्र्याच्या पीएचे फोनचे टॅपींग मुख्यमंत्र्यांच्या समंतीशिवाय होवूच शकत नाही. त्यामुळे खडसेंचा गेम मुख्यमंत्र्यांनीच केला आहे, असा आरोप त्यांनी केला. खडसेंसारख्या मंत्र्यांचे दाऊदच्या फोनवर पाच वेळा बोलणे हे गंभीर आहे. एकादा मंत्री हा एवढे धाडस कसा करू शकतो असे सांगत, त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली होती असा टोमणाही त्यांनी मारला. खडसेंच्या सर्वच प्रकरणांची चौकशी होवून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

कदाचीत खडसे यांना दाऊदला पकडून भारतात आणावयाचे असेल. परंतु, फडणवीस यांनी खडसेंना श्रेय जावू द्यायचे नसेल म्हणून त्यांना अडकव‌िल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आतापर्यंत दाऊदशी संबध असल्याचा आरोप केला जात होता. परंतु, आता दाऊदशी कोणाचे संबध आहे, हे जनतेसमोर उघड झाले आहे. त्यामुळे भाजपची बोलती बंद होईल, असा दावा आव्हाड यांनी केला. त्यामुळे नाशिकमध्ये दिवसभर आव्हाडांच्या विधानांचीच चर्चा होती.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: बिबट्याच्या हल्ल्यात सात जखमी

0
0

पोलिस कर्मचारी गंभीर

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड तालुक्यातील व दुगावनजीक असलेल्या डोंगरगाव येथे बिबट्याने रविवारी अचानक केलेल्या हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्यासह आठ जण जखमी झाले. जखमींवर चांदवडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा बिबट्या डोंगरगावातील जुन्या गोबर गॅसच्या सात ते आठ फूट खोल खड्ड्यात पडला असून, त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात चांदवड पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक संजय मोरे यांच्यासह विक्रम बर्डे, बबन शिंदे, जितेंद्र शिंदे, जयराम शिंदे, लखन बर्डे, संजय गायकवाड जखमी झाले आहेत. यात पोलिस नाईक मोरे गंभीर जखमी असून, त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चांदवडपासून १२ किलोमीटरवरील डोंगरगाव येथे रविवारी दुपारी एकच्या सुमारास पडक्या विहिरीजवळ बिबट्याचे आगमन झाले आणि त्याने अचानक सुकदेव अंबू बर्डे (वय ५५) यांच्यावर हल्ला केला. या वेळी एका महिलेने बिबट्यावर कुऱ्हाड फेकून मारल्याने बिबट्या गावाच्या दिशेने पळाला. त्यानंतर बिबट्याने विक्रम बर्डे, बबन शिंदे, जितेंद्र शिंदे, जयराम शिंदे, लखन बर्डे, संजय गायकवाड यांच्यावर हल्ला चढवत जखमी केले. यात अनेकांच्या हाताला, पोटाला जखमा झाल्या आहेत. या वेळी बंदोबस्तासाठी दाखल झालेले पोलीस कर्मचारी संजय मोरे यांनाही पंजा मारून जखमी केले. त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्याच्या वृत्ताने परिसरातील नागरिकांनी डोंगरगावात धाव घेतली.

पलायन करण्याच्या प्रयत्नात बिबट्या गावातील जुन्या गोबर गॅसच्या खड्ड्यात फसला असून, त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने पिंजरा लावला असून, रात्री उशिरापर्यंत बिबट्या पिंजऱ्यात आलेला नसल्याने डोंगरगावावर दहशतीचे सावट होते. डोंगरगावात बिबट्याने हल्ला केल्याची ही पहिलीच घटना असल्याचे ग्रामस्थांनी या वेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे पुरातन काळातील सुमेर, सिंधू, ग्रीक फिनिशीयन रोमन आणि मायन यासारख्या प्रगतिशील संस्कृती नष्ट झालेल्या आहेत. कोणतीही आपत्ती पुन्हा जीवसृष्टीवर येऊ द्यायची नसेल तर मानवाने पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किशोर कुंवर यांनी केले. ते कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते.

डॉ. कुंवर म्हणाले की, प्रवाहाच्या विरुद्ध गेल्यास गंभीर संकटांचा सामना मानवास करावा लागेल. त्याचबरोबर निसर्गाचा समतोल न बिघडू देता मानवाने प्रगती साधण्याचा प्रयत्न करणे हिताचे ठरणार आहे, असेही ते म्हणाले. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुलाबराव सोनवणे, प्रशासकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. व्यवहारे तसेच रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्यासाठी शाळा, कॉलेजेसमध्ये जाऊन वर्षभर संस्थेच्या माध्यमातून 'गाव तेथे निसर्ग आणि पर्यावरण समिती' स्थापन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. व्हॉट्स अॅपच्या ग्रुपद्वारे गेल्या वर्षभरापासून निसर्ग आणि पर्यावरण संदर्भात प्रबोधन करण्याचे काम चालू आहे. यात ज्या निसर्ग प्रेमींना कामात सहभागी व्हायचे असेल त्यांनी सहभागी व्हावे, असे आव्हान डॉ. किशोर कुंवर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निसर्गाचे संवर्धन करणे सर्वांचेच आद्य कर्तव्य’

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

प्रत्येक व्यक्तीमध्ये मानसिक बदल घडवणे गरजेचे आहे. निसर्ग मानवाला खूप देत असतो, त्यांचे उत्तरदायित्व म्हणून आपले पर्यावरण समृद्ध ठेवणे व त्याचे संवर्धन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, असे प्रतिपादन बागलाणचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी केले आहे. पर्यावरणाचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचेही सैंदाणे यांनी यावेळी सांगितले. ते जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

जागतिक पर्यावरण दिनी शहराच्या सरकारी, निमसरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सटाणा बसस्थानक, तहसील कचेरी परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती, पोलिस स्टेशन, सुकड नाला, अभिमन्यू नगर, गणपती मंदिर परिसरात मोहीम राबविली. या वेळी नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, पोलिस निरीक्षक बशीर शेख, भास्कर तांबे, पी.एम. गोसावी, आर. के. मगर, नवसार, एस. एल. अहिरे, एन. बी. ठाकरे, जयप्रकाश सोनवणे, रवींद्र अहिरे, वैभव जोशी, रवींद्र देवरे, मनोज गायकवाड, एस. बी. मोरे, लांडगे उपस्थित होते. शहरात योगेश माळी, पुरवठा निरीक्षक हिरे, साई सावली फाऊंडेशनकडूनही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात तहसीलदार सुनील सैंदाणे, आबासाहेब तांबे, अध्यक्ष प्रशांत कोठावदे, पंकज सोनवणे, अजय सोनवणे, लल‌ित येशी, किरण सोनवणे, रमेश येवला, राजेंद्र मेतकर, राजेंद्र मेणे सहभागी झाले.

प्रांत कार्यालय व चिनार विश्रामगृह परिसरातही रविवारी, (दि. ५ जून) रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात प्रांताधिकारी संजय बागडे, अधिकारी जी. एस. आमले, सुभाष जगताप, पी. एस. शंभरकर, बी. एस. निसर्धन, तेजस जगताप, जयंवत देशमुख यांनी सहभाग घेतला. मविप्रच्या जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्यावतीने विद्यार्थिनींनी शहरातून पर्यावरण दिंडी काढून पर्यावरण व स्वच्छता मोहिमेद्वारे संदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवशी केली वृक्षांची लागवड

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

जागतिक पर्यावरण दिनी आलेला आपला २७ वा वाढदिवस पर्यावरण समतोल राखण्याचा संदेश सर्वदूर पोहचावा यासाठी सागर साळवे या तरुणाने आपल्या घराच्या परिसरात २७ झाडांची लागवड केली. ती झाडे कठोर प्रयत्नातून जगविण्याचा निर्धारही त्याने केला आहे. मनमाडच्या एससीएसटी रेल्वे एम्प्लॉइज संघटनेचा हा तरुण सदस्य आहे.

मनमाडच्या जनार्दन नगरात एका तरुणाने निष्ठेने मित्रांच्या साथीने साजरा केलेला पर्यावरण दिन इतरांसाठीही प्रेरक ठरला आहे. मनमाड शहरात कायम पाणीटंचाईचे सावट असते. त्यात पाण्याअभावी गावचा विकासदेखील खुंटला असल्याने मनमाड शहरवासीयांना वृक्ष संवर्धनाचे महत्व कळावे, पाऊस पडण्यासाठी झाडे असावीत याचे भान सर्वांना यावे म्हणून सागर साळवे याने रविवार, (दि. ५ जून) या पर्यावरण दिनी येणाऱ्या आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या घराच्या परिसरात २७ झाडांची लागवड करून झाडे जगविण्याचा संकल्प केला आहे.

या आगळ्या उपक्रमाची दखल घेत पूर्व विभागाचे वन अधिकारी रामानुज यांनी सागर साळवेचा मनमाड येथे रविवारी (दि. ५ जून) रोजी विशेष सत्कार केला. या वेळी अधिकारी थोरात, सतीश केदारे, प्रदीप गायकवाड, सचिन इंगळे, मंगेश जगताप, प्रशांत गोडसे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरला स्वच्छतेची प्रतिज्ञा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सिन्नर नगरपरिषदेच्यावतीने रविवार, (दि. ५ जून) रोजी शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या निमित्ताने तहसीलदार मनोजकुमार खैरनार, मुख्याधिकारी संजय जाधव, नगराध्यक्षा अश्विनी देशमुख यांच्या उपस्थितीत बस स्थानकाजवळ स्वच्छता मोहीम राबविली. या प्रसंगी स्वच्छतेबाबत प्रतिज्ञा करण्यात आली. कार्यक्रमास नायब तहसीलदार प्रशांत पाटील, उपनगराध्यक्ष संजय नवसे, नामदेव लोंढे, लता हिले, लता मुंढे, उज्वला खालकर, बापू गोजरे, डॉ प्रतिभा गारे, कर निरीक्षक नितीन परदेशी, सुनील शिंदे, रवी देशमुख यांच्यासह नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोनजाईचा डोंगर होणार हिरवागार!

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

यंदा निफाड तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. भविष्याचा वेध घेऊन आता जर झाडे लावली नाही तर निसर्ग माफ करणार नाही. म्हणूनच नाशिक-औरंगाबाद महामार्गावर विंचूर ते नैताळे दरम्यान लोनजाई डोंगरावर जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या सेवेकऱ्यांनी हा डोंगर वृक्षांनी हिरवागार करण्याचा संकल्प करत १०८ झाडांचे वृक्षारोपण केले.

या डोंगरावर पूर्वी खूप सागाची झाडे होती. कालांतराने ती वेगळ्या कारणांनी नामशेष झालीत. त्यामुळे आता पुन्हा हा डोंगर हिरवाईने नटण्यासाठी समर्थ सेवेकऱ्यांनी हा उपक्रम राबविला. रविवार, (दि. ५ जून) रोजी पर्यावरणदिनी लोनजाई मंदिराच्या पायथ्याशी याचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थितांनी अगदी उत्साहाने १०८ झाडे लावली. त्यासोबत महिलांनी तर 'डोंगर हिरवागार' या गाण्यावर फेर धरत नुकत्याच रोपण केलेल्या झाडांना प्रदक्षिणा मारल्या.

पर्जन्यवाढीसाठी उपयोग

हा परिसर जवळपास ६५ एकरचा आहे. अतिशय उंचीवर असल्यामुळे या ठिकाणी झाडांची लागवड केली तर भविष्यात ही झाडे आजुबाजूच्या दहा ते पंधरा गावांना पर्जन्याचे प्रमाण वाढण्यासाठी खूप उपयोग होणार आहे. शिवाय हा डोंगर हिरवाईने नटल्यावर परिसर तीर्थस्थळ आणि पर्यटन केंद्र म्हणून ख्यातीस येईल. डोंगराला उतार असल्याने पावसाळ्यात झाडांचे संगोपन आपोआप होणार आहे. इतरवेळी त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी लोनजाई देवी मंदिर भक्त परिवार करेल, अशी ग्वाही माणिक शास्री यांनी दिली आहे.

आवळा, चिंच, जांभूळ, गुलमोहर, करंजी, लिंब इत्यादी १०८ झाडांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी उपक्रमाचे संयोजक वि. दा. व्यवहारे, द्राक्ष बागाइतदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, अण्णासाहेब गुंजाळ, माणिक शास्री, मधुकर दरेकर, माधव निचित, नगराध्यक्षा सुनीता कुंदे, शंकर ढेपले, डॉ. उत्तम डेर्ले, कैलास सोनवणे, प्राचार्य निकम, चंदू लांडबले, दिगंबर आहेर, राजेंद्र सोदक, बाळासाहेब नेवगे, रवी शिरसाठ, विनायक महाले, जगदीश बागडे, राजेंद्र दुसाने, अविनाश सोनवणे, डॉ. सीमा डेर्ले, भारती कापसे आणि समर्थ सेवेकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images