Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कौमार्य चाचणीत अपयशी ठरल्यानं काडीमोड

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

संपूर्ण राज्याला शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना नाशिक येथे घडली आहे. लग्नानंतर कौमार्य चाचणीत अपयशी ठरल्याचे कारण देत नवऱ्याने नववधूला सोडचिट्ठी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहानंतर केवळ ४८ तासात लग्न मोडण्याचे आदेश जातपंचायतीने दिले.

नाशिक येथील संबंधीत मुलीचा विवाह २२ मे रोजी झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जातपंचायतीने तिची कौमार्य चाचणी घेतली. या चाचणीत ती अपयशी ठरल्याने पंचायतीने लग्न मोडण्याचे आदेश दिले. पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात अंधविश्वासाचा पगडा खोल असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते रंजना गवांदे आणि कृष्णा चांदगुडे यांना संबंधीत मुलीच्या कुटुंबियांकडून या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी यासंदर्भात जातपंचायतीच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांना मुलीच्या कौमार्य चाचणीसंदर्भातील शास्त्रीय कारण समजावले. जर पंचायतीने निर्णय मागे घेतला नाही तर याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे चांदगुडे यांनी सांगितले.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरांकडून गावकऱ्यांना आणि मुलाच्या कुटुंबियांना स्त्रीच्या कौमार्यसंदर्भात शास्त्रीय माहिती समजावली.

पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होती

संबंधीत वधू पोलीस दलात दाखल होण्यासाठी प्रयत्न करत होती. पोलीस भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे सराव ही मुलगी नियमीत करत असल्याचे चांदगुडे यांनी सांगितले. त्यामुळे धावणे, सायकल चालवणे, लांब उड्या अशा प्रकाराचा सराव ती नित्यनेमाने करत होती. यामागील शास्त्रीय कारणाची माहिती न घेता फैसला करणाऱ्या जातपंचायतीवर कारवाई करण्याची मागणी चांदगुडे यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनपा आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव मंजूर

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच मनपा आयुक्ताविरूद्ध सत्ताधारी नगरसेवकांनी एकत्र येऊन अविश्वासाचा ठराव बहूमताने पारीत केला. हा ठराव मनपा आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांच्या मनमानी कारभाराविरूद्ध असलेल्या असंतोष बुधवारी, (दि. १ जून) मनपामध्ये आयोजित महासभेत व्यक्त करण्यात आला. एकूण ७० नगरसेवक असलेल्या धुळे महापालिकेतील तब्बल ४९ नगरसेवकांनी अविश्वासाच्या ठरावाच्या बाजूने हात उंचावून मतदान केले. तर शिवसेना, भाजपचे नगरसेवक तटस्थ राहिले आणि सात नगरसेवक या सभेला गैरहजर होते.

गेल्या काही महिन्यापासून महानगरपालिकेत अनागोंदी कारभार सुरू आहे. आयुक्त विरूद्ध नगरसेवक यांच्यामध्ये खुलेआम सामना रंगताना दिसत आहे. या सामन्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांसह एकमेकांवर गुन्हे दाखल करण्याचेही प्रकार घडले. नगरसेवकांच्या कामाला खीळ घालून महासभा, स्थायी समिती सभा तसेच विविध समित्यांच्या सभांना आयुक्तांनी गैरहजरी लावत कोणालाही न जुमानता आपले वर्तन दाखविले. सत्ताधाऱ्यांसह विरोधातील नगरसेवकांची आयुक्त भोसले यांच्याशी सुरुवातीपासून जमले नाही. त्यातून निर्माण झालेला वाद अखेर बुधवारी, (दि. १ जून) रोजी अविश्वास ठरावाच्या रूपाने धुळे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच झाली. या प्रस्तावात शिवसेना, भाजपचे एकूण १३ नगरसेवक

तटस्थ राहिले. तर मनीषा महाले, काँग्रेसचे इस्माईल पठान, फिरोज लाला हे अनुपस्थित राहिले. तसेच भाजपच्या वैभवी दुसाणे, बसपाच्या सुश‌िला ईशी, अपक्ष नगरसेविका इंदूबाई वाघ यांनी गैरहजेरीबाबत अर्ज दिला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजीवाडीत परिसरात व्हॉल्व्हमधून पाणीगळती

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको विनयनगरलगत असलेल्या शिवाजीवाडीसह नंदिनीनगर, भारतनगर या भागातील पाण्याच्या व्हॉल्व्हमधून गेल्या दोन दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची गळती होत असून, याकडे प्रशासनाचे लक्षच नसल्याचे दिसून आले आहे. एकीकडे शहरात पाणीकपात सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. असे असताना दुसरीकडे मात्र अनेक दिवसांपासून पाणीगळती होत असतानाही प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्‍त होत आहे. पाणीप्रश्न गंभीर असताना शिवाजीवाडीतील एका व्हॉल्व्हमूधन दोन दिवसांपासून हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत जात असल्याचे दिसून येत आहे. याबाबत महापालिकेच्या विभागीय कार्यालयात तक्रार करण्यात आली असूनही अधिकारी लक्ष देत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. पाणीप्रश्न गंभीर असतानाही प्रशासन पाणीगळती रोखण्यात यशस्वी होत नसल्याचे यावरून दिसत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या परिसरातची पाहणी करून ही गळती थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसस्टॉपवरील पत्र्यांचा धोका

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड एकीकडे परिवहन दिनानिमित्त एसटी महामंडळातर्फे प्रवासीहिताच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात असतानाच प्रवाशांच्या अनेक मूलभूत समस्यांकडे मात्र साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. द्वारका येथील नाशिकरोडकडे जाणाऱ्या बसस्टॉपचे पत्रे निघाल्याने प्रवाशांना इजा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नाशिकरोड भागातील अनेक बस स्टॉपची अशीच दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवाशांनी अशा स्टॉपची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. नाशिकहून द्वारका चौक ओलांडल्यावर नाशिकरोडकडे जाताना डाव्या हातालाच बस स्टॉप आहे. या स्टॉपचे बाक, शेड आदी नवीन दिसते. मात्र, छतावरील पत्र फुटलेले आहेत. प्रवासी उभे राहिल्यावर ते डोक्याला लागतात. त्यामुळे एखादा प्रवासी जखमी होण्याची शक्यता आहे. बस आल्यावर ती पकडण्यासाठी प्रवासी धावपळ करतात, तेव्हा पत्र्याने मान, हात कापू शकतो. त्यामुळे नवीन पत्रे टाकावेत किंवा आहेत ते पत्रे दुरुस्त करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. बसस्टॉपचे नावच गायब फेम सिनेमागृहाजवळील पेट्रोलपंपासमोरील बस स्टॉप जुना झाला आहे. त्याचे नावही पुसले गेले आहे. हा बस स्टॉप हटवून नवीन बसवावा किंवा आहे त्याची रंगरंगोटी करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. उपनगर चौकातील दोन्ही बाजूचे बस स्टॉप अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आहेत. हे बस स्टॉप हटविण्याची आवश्यकता आहे. या स्टॉपमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची टीका अनेकदा झाली. तथापि, कार्यवाहीच केली जात नाही. नारायणबापू चौक आणि बिटको कॉलेज येथील बसस्टॉपचे बेंच चोरीला गेले आहेत. जेलरोडच्या इंगळेनगर चौकातील स्टॉपवर तर भिकारी आश्रयाला आले आहेत. जेलरोडच्या पेट्रोलपंपापुढील महालक्ष्मीनगरशेजारील स्टॉपवर कचरा फेकला जात आहे. त्यामुळे महामंडळाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसने घातले भाजपचे ‘श्राद्ध’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशवासीयांचा अपेक्षाभंग करणाऱ्या मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याबददल काँग्रेसने दुसऱ्या पुण्यतिथीचा कार्यक्रम ठेवून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध नोंदविला. गेल्या दोन वर्षातील सरकारची कामगिरी निराशाजनक असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसने सरकारचे प्रतीकात्मक श्राद्ध घातले. यानंतर अप्पर जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे यांना निवेदन देण्यात आले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत काँग्रेसने आंदोलने सुरू केली आहेत. अशाच आंदोलनाचा भाग म्हणून बुधवारी रविवार कारंजा परिसरात केंद्र सरकारच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सरकारी योजनांच्या अपयशाबद्दल शंखनाद करण्यात आला. सत्तेमध्ये आल्यानंतर शंभर दिवसात विदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यामध्ये १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा सरकारने केली होती. शेतीमालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळेल एवढा भाव देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. महागाई कमी करून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती नियंत्रणात ठेवल्या जातील असेही आश्‍वासन देण्यात आले. परंतु, गेल्या दोन वर्षात यापैकी एकाही आश्‍वासनाची पूर्ती होऊ शकलेली नाही. यापुढील काळात देखील ही आश्‍वासने पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नसल्याची टीका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. महिला, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक अशा विविध घटकांसाठी असणाऱ्या सरकारी योजनांच्या निधीत कपात करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली.

आंदोलनानंतर काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. अप्पर जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे यांना त्यांनी निवेदन दिले. शहरात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. मोदींनी दिलेले अच्छे दिनचे आश्‍वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. कर्जमाफी देण्याबाबतही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी

जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी आमदार डॉ. शोभा खैरे, राजेंद्र बागुल, केशव पाटील, लक्ष्मण मंडाले, बबलू खैरे उपस्थित होते.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पिळवणूक थांबवा, अन्यथा उपोषण’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरपोच गॅस सिलिंडर पोहोचविण्यासारखे अंग मेहनतीचे काम करणाऱ्या कामगारांची आर्थिक पिळवणूक थांबवावी. तसेच त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. पंधरा दिवसांत विविध मागण्यांची दखल न घेतल्यास विभागीय आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक महापालिका हद्दीत गॅस वितरक एजन्सीचे कर्मचारी घरपोच सिलिंडर पोहोचविण्याचे काम करतात. हे काम अंग मेहनतीचे आहे. मात्र कामगारांच्या संरक्षणार्थ वितरकांकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नाही. त्यांना घरपोच सिलिंडर पोहोचविण्यासाठी कामाचा मोबदला किमान वेतन कायद्यानुसार न देता या कामगारांना सिलिंडरधारक ग्राहकांकडूनच कमिशन म्हणून १५ ते २० रुपये घेण्यास सांगितले जाते. ग्राहकही मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना ती रक्कम देतात. या कामगारांना अन्य कामगारांप्रमाणेच किमान वेतन कायद्यानुसार वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र तसे न करता त्यांच्याकडून अल्प मोबदल्यात अति कष्टाचे कामे करवून घेतले जातात. बेरोजगारीची समस्या आणि वाढत्या महागाईमुळे हे कामगार निमूटपणे सहन करतात. कामगारांच्या जीवावर लाखो रुपये एजन्सीधारक कमावत असूनही त्यांना मानवतेची वागणूक देत नाहीत. कर्मचाऱ्यांच्या अनेक या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पंधरा दिवसांत मागण्यांची दखल न घेतल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू असा इशारा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल बाविस्कर आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे.

या आहेत मागण्या घरपोच सिलिंडर पोहोच करणाऱ्या कामगारांना नोकरीत कायम करावे. कामगार सुरक्षा कायद्यानुसार त्यांना कामावर सुरक्षितता असावी, त्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे, सिलिंडर पोहोचविताना र्दुर्दैवाने स्फोटासारखी घटना घडल्यास त्या कामगारास ‌विमा योजनेचा लाभ मिळावा, नागरी वस्तीमधील सिलिंडरची गुदामे निर्जनस्थळी हलवावीत, कामगारांवर होत असलेल्या अन्यायाकडे हेतूपुरस्सरपणे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाया कराव्यात, अशी मागण्या करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयनगर रस्त्यावर पसरले ड्रेनेजचे पाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, इंदिरानगर महापालिकेच्या नियोजनशून्य कारभार असलेल्या ड्रेनेजच्या विभागाच्या दुर्लक्षामुळे बुधवारी पहाटेपासूनच परिसरातील साईनाथनगरपासून विनयनगरपर्यंतच्या रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी वाहत असल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. खुद्द नगरसेवकांच्या कार्यालयासमोर आणि इतर ठिकाणीही दूषित पाण्याची डबकी साचल्याचे दिसून आले. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणेसुद्धा अवघड झाले होते. मात्र, अनेक वेळा तक्रार करूनही दुपारपर्यंत यासंदर्भातील कामाला सुरुवात झालेली नव्हती. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, गटारींची साफसफाई, तसेच ड्रेनेजचे पाणी कोठे तुंबणार नाही ना, याची दक्षता घेण्याचे काम महापालिका प्रशासनाचे असताना एेन पावसाळ्याच्या तोंडावरच बुधवारी विनयनगरच्या रस्त्यावरून अक्षरशः पावसाळ्यात वाहते त्या पद्धतीने पाणी वाहत होते. साईनाथनगर ते विनयनगर या सुमारे दोन किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने हे पाणी वाहत होते, तर काही ठिकाणी डबकी साचली होती. या पाण्याच्या दुर्गंधीमुळे या रस्त्यावरून ये-जा करणेसुद्धा नागरिकांना अवघड झाले होते. एवढा मोठा प्रकार होऊनसुद्धा या ठिकाणी ना नगरसेवक फिरकले, ना महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी आले. अनेकांनी तर आपली दुकाने व घरांसमोरील हे दुर्गंधीयुक्त पाणी हटविण्याचे काम सुरू केल्याचे दिसत होते. विशेष म्हणजे याच रस्त्यावर सत्ताधारी मनसेचे नगरसेवक यशवंत निकुळे यांचे संपर्क कार्यालय असून, त्यांच्या कार्यालयासमोरसुद्धा या दुर्गंधीयुक्त पाण्याचे डबके साचलेले होते. मात्र, तरीही हा प्रकार गांभीर्याने न घेतला गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करून, या प्रकारावरून पावसाळ्याचे नियोजन कसे असेल, याविषयी धास्ती वाटत असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी नाेंदवल्या. महापालिकेने पावसाळ्यात काय होईल याचा विचार केला पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून महापालिकेने हे काम तातडीने केले पाहिजे. - प्रवीण जाधव, स्थानिक रहिवासी प्रशासनाकडे दोन-तीन दिवसांपूर्वी तक्रार केली होती. वाहन मिळत नसल्याने हा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्वच ड्रेनेजचे काम केलेे पाहिजे. पावसाळापूर्व कामे त्वरित केली पाहिजेत. - यशवंत निकुळे, नगरसेवकविनयनगर रस्त्यावर पसरले ड्रेनेजचे पाणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीने मनपा प्रशासन बेजार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नोकरभरतीसाठी राज्य सरकारकडून मंजुरी मिळत नसताना पालिकेच्या आस्थापनेतून दर महिन्याला निवृत्तांची संख्या वाढत आहे. ३१ मे या एकाच दिवशी पालिकेच्या आस्थापनेवरील ४० अधिकारी व कर्मचारी निवृत्त झाले. यात नगरसचिवांसह सहाय्यक उद्यान अधीक्षकांचाही समावेश आहे. निवृत्तीमुळे जवळपास दीड हजार पदे पालिकेत रिक्त झाली आहेत. त्यातच नव्या नोकरभरतीला परवानगी मिळत नसल्याने सध्याच्या कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे.

महापालिकेच्या आस्थापनेवर जवळपास ७ हजार ९० पदे मंजूर आहेत. पालिका क वर्गात असतानाच ही पदे मंजूर होती. आता पालिका ब वर्गात गेली आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढणे अपेक्षित आहे. परंतु, पालिकेचा आस्थापना खर्च ४५ टक्क्यांच्या आसपास असल्याने नोकरभरतीला सरकारकडून हिरवा कंद‌ील मिळत नाही. नोकरभरती होत नसतांना दर महिन्याला मात्र निवृत्तांची संख्या वाढत चालली आहे. मंगळवारी ३१ मेच्या दिवशी पालिकेच्या पटावरून तब्बल ४० अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना पालिकेत निरोप देण्यात आला.

जानेवारी ते डिसेंबर २०१६ या वर्षभरात पालिकेच्या पटावरील तब्बल १११ अधिकारी व कर्मचारी निवृत्त होणार आहेत. गेल्या दहा वर्षातील निवृत्तांच्या संख्येमुळे पालिकेत आतापर्यंत १५३१ पदे रिक्त आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेपत्ता बालकांचे पोलिस फुलविणार चेहरे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातून हरवलेल्या ‌किंवा पळविलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम १ ते ३० जून या कालावधीत राबविण्यात येणार असून, बेवारस मुलांबाबतची माहिती पोलिसांना देऊन ही मोहीम यशस्वीतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी नागरिकांना केले आहे.

दररोज अनेक बालके होत असल्याची तक्रारी राज्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये दाखल होत असतात. याखेरीज बालकांच्या अपहरणाचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाणही मोठे आहे. मात्र तुलनेने अशा बालकांचा शोध लागण्याचे प्रमाण कमी आहे. अशा बालकांचा शोध घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पुन्हा आपॅरेशन मुस्कान ही मोहीम राबवा, असे आदेश पोलिस आयुक्तांना दिले आहेत. या मोक‌िमेला १ जूनपासून सुरुवात करण्यात आली असून, ३० जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे. हरवलेल्या तसेच पळविलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात यावे, अशी अपेक्षा महासंचालकांनी व्यक्त केली आहे. याबाबत नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा घेऊन पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ हरवलेल्या तसेच अपहृत बालकांचाच नव्हे तर अन्य बेपत्ता इसमांचा देखील शोध घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

पुनर्वसनासाठी प्रयत्नशील रेल्वे स्थानक, बस स्थानके, रस्त्यावर भीक मागणारे, वस्तू विक्री करणारे, कचरा गोळा करणारे, धार्मिक स्थळे, हॉस्पिटल्स, दुकाने इत्यादी ठिकाणे काम करणारे मुले ताब्यात घेऊन तसेच त्यांची विचारपूस करून बालकल्याण समिती, चाईल्ड हेल्पलाइन, स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमे, पोलिस मित्र यांच्या मदतीने त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व पोलिस स्टेशन स्तरावर पथक स्थापण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमडी बाजीराव जाधवांची मंत्रालयात बदली

0
0

आदिवासी विकास महामंडळातील नरेंद्र मांदळेसह चार जण निलंबित

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास महामंडळातील वादग्रस्त नोकरभरती प्रकरण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधव यांना भोवले असून, त्यांची थेट मंत्रालयात बदली झाली आहे. मात्र, हे बदली आदेश प्राप्त होताच जाधव यांनी महामंडळातील प्रशासन महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांच्यासह चौघांचे निलंबन केले आहे.

निलंबित चौघांवर अनुकंपा तत्वावरील जुन्या भरती प्रकरणात गोंधळ केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आदिवासी विकास महामंडळ व शबरी वित्त व विकास महामंडळाच्या नोकरभरतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश आदिवासी विभागाला दिले होते. आदिवासी विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांनी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात आरोप असलेले महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांची नागपूरला बदली करण्यात आली आहे, तर शबरीचे संतोष आमटे यांना वेगळे कारण दाखवून निलंबित करण्यात आले आहे. मांदळे यांच्यासह उपव्यवस्थापक एम. एल. खंबाईत, महेश वळवी, किरण चव्हाण यांचा निलबंनात समावेश आहे.

बदलीनंतर निलंबन का ?

जाधव यांनी मंत्रालयात बदली झाल्यानंतर मांदळेसह इतर कर्मचाऱ्यांचे केलेल्या निलंबनावर विभागात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. दोन वर्षापूर्वीच्या अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रकरणाचा ठपका चौघांवर ठेवण्यात आला आहे. भरती प्रकरणातील कागदपत्रे बाहेर पडू नयेत म्हणून जाधव यांनीच या सर्वांना बाहेरचा रस्ता दाखवल्याची चर्चा आहे. एकमेकांना चेकमेट देण्यासाठी ही निलबंनाची कारवाई झाल्याची चर्चा सुरू आहे.

चौकशीला वेग येणार

विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांची नाशिकहून झालेली बदली आता रद्द झाली आहे. डवलेंच्या बदलीने महिनाभरापासून चौकशीची प्रक्रिया थंड बस्त्यात गेली होती. आदिवासी विभागाने एकनाथ डवलेंवर चौकशीची जबाबदारी सोपविली होती. परंतु या प्रकरणात थेट एका आयएएस अधिकाऱ्यावर आरोप असल्याने चौकशीची प्रक्रिया थंडावली होती. आता जाधव यांची बदली झाली आहे, तर डवलेंनाही मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीला वेग येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सवलतीतून मिळाले साडेसहा कोटी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

शहरातील मालमत्ताधारकासांठी महापालिकेने सुरू केलेल्या सवलत योजनेला एप्रिल पाठोपाठ मे महिन्यातही थंड प्रतिसाद मिळाला मिळत आहे. मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी दिलेल्या तीन टक्के सवलतीतून ३१ मेपर्यंत पालिकेला केवळ सहा कोटी ४० लाख रुपये मिळाले आहेत.

गेल्या वर्षी मे महिन्यात पालिकेला तीन टक्के सवलतीतून १० कोटी रुपये मिळाले होते. एप्र‌िल आणि मे अशा दोन महिन्यात पालिकेला केवळ १३ कोटी ५८ लाख रुपये मिळाले असून गेल्या वर्षापेक्षा सात कोटीचा तोटा पालिकेला मिळाला आहे. महापालिकेकडून या सवलत योजनेसंदर्भात जनजागृती न केल्याने आर्थिक फटका बसला आहे.

नागरिकांनी मालमत्ता कर वेळेवर भरण्यासाठी पाच, तीन आणि दोन टक्के अशी सवलत योजना सुरू केली आहे. एप्रिल महिन्यात मालमत्ता कर भरल्यास पाच टक्के, मे म‌हिन्यामध्ये भरल्यास

तीन टक्के आणि जून महिन्यामध्ये भरल्यास दोन टक्के बिलात सवलत दिली जाते. एप्रिल महिन्यात पाच टक्के बिलात सवलतीतून ७ कोटी १८ लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले होते.

तर मे महिन्यात तीन टक्के सवलीत पालिकेच्या तिजोरीत ६ कोटी ४० लाख रुपये मिळाले आहेत.

गेल्या दोन महिन्यात महानगरपालिकेच्या त‌िजोरीत सवलत योजनेतून १३ कोटी ५८ लाख रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षी या दोन महिन्यात पालिकेला तब्बल २० कोटी ७४ लाख रुपये मिळाले होते. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत सात कोटीचा महानगरपालिकेला फटका बसला आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात मालमत्ता कर भरण्यासाठी सवलत जाहीर करण्यात आली होती. मात्र या सवलत योजनेबाबत योग्य प्रचार करण्यात न आल्याने वसुली कमी झाली आणि याचा फटका फटका शहरातील विकासकामांवर बसला आहे. पालिकेने प्रचार प्रसिद्धी न केल्याने उत्पन्न घटल्याचा आरोप केला आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सीईटीत उमटविला ठसा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेल्या आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमासाठीच्या सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी सीईटी) निकालात नाशिकमधील विद्यार्थ्यांनीही यशाची पताका उंचावली आहे. शहरातील विविध ज्युनिअर कॉलेजेसच्या शेकडो विद्यार्थ्यांनी या निकालात २०० पैकी १७० गुणांची सीमारेषा ओलांडली आहे.

शहरातील स्पेक्ट्रम अकादमीच्या अभिषेक दर्वे याने १८२ गुण मिळवून शहरातील अग्रेसर विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविले. या पाठोपाठ ओमकार कर्वे याने १८१ गुण, मयूर गायकवाड याने १८० गुण, मोहित मोर याने १७९ गुण, सुयश भुतरा याने १७८ गुण, एकता पंजवाणी हिने १७८ गुण, सायली क्षीरसागर हिने १७४ गुण मिळवून नाशिकमधल अग्रेसर विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकाविले.

ऑनलाईन पध्दतीने १ जून रोजी हा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेला राज्यभरात एकूण ४ लाख ९ हजार २७५ विद्यार्थी बसले होते. वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमासाठी विदर्भातून ५८ हजार ३७० परीक्षार्थींपैकी १२ हजार २०३, मराठवाड्यातून ५५ हजार ३४ विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ८९४ तर उर्वरित महाराष्ट्रातून १ लाख ६२ हजार २२३ विद्यार्थ्यांपैकी २२ हजार ७०० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. टक्केवारीनुसार हे प्रमाण विदर्भात २०.९१ टक्के, मराठवाड्यात २१.६१ टक्के तर उर्वरित महाराष्ट्र १३.९९ टक्के इतके आहे.

वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. या विषयीची अधिसूचना संकेतस्थळावर तसेच वृत्तपत्रांतून प्रसिध्द करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी व औषध निर्माण शास्त्राच्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालक, मुंबई यांच्याकडून, तर पशुवैद्यकशास्त्र व मत्स्यविज्ञान या शाखांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र पशुवैद्यक व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्याकडून प्रक्रिया राबविली जाणार आहे. जिल्ह्यातून या परीक्षेसाठी एकूण १९ हजार ५९६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्मकार महामंडळ उरले नावालाच

0
0

Gautam.Sancheti

@timesgroup.com

नाशिक : चर्मकारांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरू झालेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने निधी अभावी आपल्या सर्वच योजनाच बंद केल्यामुळे चर्मकार बांधवामध्ये प्रचंड संताप आहे. विशेष म्हणजे, या महामंडळाने कर्ज मागणीचे अर्ज स्वीकारणेही बंद केले आहे. याबाबतच्या सूचनाही फलकावर लावल्यामुळे हे महामंडळ केवळ वसुलीपुरतेच उरले आहे.

नासर्डी पुलावजवळ सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीत चर्मकार महामंडळाचे कार्यालय आहे. निधी अभावी महामंडळाच्या योजना बंद झाल्या आहेत. अधिकारी हतबल झाले असून चर्मकार बांधवांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. योजना असताना त्याचा लाभ मिळत नसल्यामुळे अनेक जण माहितीच्या अधिकारात येथे तक्रारी करतात. त्याचप्रमाणे आपले प्रकरण अधिकाऱ्यांनीच अडवले, असाही आरोप येथे होत असल्यामुळे अधिकारीही निरुत्तर झाले आहेत.

सर्वच विकास महामंडळाची अवस्था निधी अभावी बिकट असली तरी एक दोन योजना सुरू आहेत. पण चर्मकार बांधवांना स्वयंरोजगार मिळावा व चर्मोद्योगाला प्रोत्साहन मिळावे यासाठी सुरू केलेल्या या महामंडळाच्या सर्व योजना केवळ कागदावर उरल्या आहेत. राज्य सरकारच्या चार व केंद्र सरकारच्या पाच अशा सर्व योजना निधी अभावी बंद आहेत. १९७४ साली या महामंडळाची स्थापना झाली असली तरी हे महामंडळ नाशिकचे शिवसेनेचे तत्कालीन मंत्री बबनराव घोलपांमुळे चर्चेत आले. त्यानंतर या महामंडळाकडे दुर्लक्षच झाले.

४२ वर्षात या महामंडळाकडून १३८१ लाभार्थींना आतापर्यंत कर्ज देण्यात आले आहे.

यातील काहींचे कर्ज माफ झाले तर काहींनी कर्ज भरल्यामुळे आता ८४४ लाभार्थींकडे ५ कोटी २७ लाखाचे कर्ज वाटप झालेले आहे. चर्मकार बांधवासाठी राज्य सरकारने ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना, प्रशिक्षण योजना, गटई योजना सुरू केल्या. आता या सर्व योजना बंद आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाच्या दिल्ली येथील मुदत कर्ज योजना, सुक्ष्म पतपुरवठा योजना, महिला समृद्धी योजना, महिला किसान योजना, शैक्षणिक कर्ज योजना निधी अभावी रखडल्या आहेत. या महामंडळाच्या केंद्रातून चर्मवस्तूची निर्मिती करून त्या वस्तू शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांना पुरवठा करून हजारो कारागिरांना रोजगार देण्याचा उद्देश होतो. पण आता तोही बंद पडला आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फी वाढीविरोधात शिक्षणमंत्र्यांशी चर्चा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अशोका युनिव्हर्सल शाळेच्या वडाळा व चांदशी शाखेने केलेल्या अवास्तव शुल्क वाढीविरोधात विद्यार्थ्यांच्या पालकांनी जोरदार आवाज उठवला आहे. पालकांनी यासंदर्भात नुकतीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली असून, शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात न्याय मागितला आहे.

अशोका युनिव्हर्सल शाळेने कायद्याचे उल्लंघन करीत एका शैक्षणिक वर्षात तब्बल ९३ टक्के फी वाढ केली आहे. ही वाढ त्वरित रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या नेतृत्वाखाली २० मे रोजी पालकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चाही काढला होता. शुल्क नियंत्रण कायदा असतानाही शाळा अवास्तव फीवाढ करीत असल्याने पालक चिंतेने ग्रासले आहेत. कायद्यानुसार कोणत्याही शाळेला किमान दोन वर्षे फीवाढ करता येत नाही.

तरीही इतकी मोठी वाढ करण्यात आल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यावर मार्ग काढण्यासाठी पालकांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. तावडे यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना मुदतीत शाळेची चौकशी करण्याचे व विभागीय शिक्षण शुल्क समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, शाळेने कायद्याचे पालन केले नाही, तर शाळेविरोधात कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

ट्विटरवरही विरोध सोशल मीडियामुळे स्थानिक समस्यांना थेट राज्य व केंद्र मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत होत आहे. अशोका शाळेविरोधातही पालकांनी ट्विटरवर बंड पुकारले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, केंद्रिय मंत्री स्मृती इरानी यांना ट्विटरवर पोस्ट्स टॅग करमन न्याय मागितला जात आहे. तसेच, शिक्षणाचा चाललेल्या बाजारीकरणाविषयीही जनतेला सूचित केले जात आहे.

पालक-शिक्षक संघानी २०१४-१५ साली फी वाढीला मान्यता दिल्याचे शाळेतर्फे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी भूमिका स्पष्ट करणेही गरजेचे आहे. तसेच शाळेनी यासंदर्भातील कागदपत्रे आम्हाला दाखविणे गरजेचे आहे. याविषयी लवकरात लवकर मार्ग निघाला नाही तर येत्या १८ तारखेला शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. - डॉ. मिलिंद वाघ, सचिव, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांना आणखी एक दणका

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सध्या तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एमईटी या संस्थेला आर्किटेक्ट कॉलेजसाठी दिलेली गंगापूर शिवारातील ९ हेक्टर जमीन अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी महसूल विभागाने सरकारजमा केली आहे. महसूल विभागाने बुधवारी ही जमीन जप्त करून घेत सातबाऱ्यावर सरकारचे नाव आणण्यात आले आहे. दरम्यान एमईटीला शैक्षणिक प्रयोजनासाठी दिलेली जमीन जप्त करणे ही सरकारच्या राजकीय सूडाची परिसीमा असल्याचा आरोप आमदार पंकज भुजबळ यांनी केला आहे.

नाशिक तालुक्यातील गंगापूर-गोवर्धन शिवारात सुला विनियार्ड शेजारील ९ हेक्टर जमीन एमईटीला आर्किटेक्ट कॉलजेससाठी दिली होती. भुजबळ उपमुख्यमंत्री असतांना कवडीमोल दरात ही जमीन एमईटीला देण्यात आली होती. संबंध‌ित जागेवर २००९ पर्यंत बांधकाम करणे आवश्यक होते. परंतु, संस्थेकडून बांधकाम करण्यात आले नव्हते. राज्यात भाजपचे सरकार येताच भुजबळांचे बुरे दिन सुरू झाले. त्यांनी मंत्रीपदावर असतांना बेकायदेशीर संपत्ती जमा जमवली असून ही संपत्ती सरकारजमा करण्याचे काम सुरू आहे. त्याचा फटका एमईडीच्या जागेलाही बसला आहे. मंगळवारी महसूल विभागाने अटी व शर्तींचा भंग केल्याप्रकरणी ही जमीन जप्त करण्याची कारवाई केली. तसेच बुधवारी सातबाऱ्यावरील भुजबळांचे नाव काढून सरकारचे नाव लावण्यात आले आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळे जिल्ह्यात दोन जणांची हत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्ह्यात दोन जणांची हत्या करण्यात आल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना गुरूवारी उघडकीस आल्या. गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात सात जणांचा खून झाला आहे. खुनांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

धुळे शहरापासून जवळच असलेल्या मोहाडी उपनगराच्या वर्षा वाडीतील बालूआबानगर येथे राहणारे मणिलाल गोरख पाटील (वय ४५) आणि त्यांची पत्नी शोभाबाई पाटील हे त्यांच्या घरासमोर मोकळ्या जागेत रात्री झोपले होते. अज्ञात हल्लेखोराने पाटील यांची गळा चिरून मध्यरात्री हत्या केल्याचा संशय आहे. रात्री दोनच्या सुमारास नळाला पाणी येणार म्हणून शोभाबाई जागे झाल्या. त्यांना रक्ताने माखलेले पावलाचे ठसे दिसल्याने त्या प्रचंड घाबरल्या. त्यांनी जवळच राहणारे त्यांचे भाऊ, भाचे, मुलगा यांना आवाज दिला. ते घटनास्थळी आले. त्यावेळी मणिलाल पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. शोभाबाई पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहाडी पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना दोंडाईचा शहरातील स्टेशन रोड भागातील एका मोबाइल दुकानात घडली. दरोडेखोरांनी दुकानात झोपलेल्या व्यापाऱ्याच्या डोक्यात दगड टाकून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. दाऊळ (ता. शिंदखेडा) येथे राहणाऱ्या गणेश सुभाष पवार (वय ३१) या तरुणाने दोंडाईचा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार २ मे २०१६ रोजी गणेश पवार यांच्या दुकानात चोरी झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गणेशचे वडील सुभाष विष्णू पवार (वय ६५) हे रोज रात्री दुकानात झोपण्यासाठी जायचे. गुरूवारी सकाळी दुकानाचे शटर अर्धवट उघडलेल्या अवस्थेत होते. आजूबाजूला मोबाइलचे खोके, चार्जर फेकलेले दिसून आले. दुकानात सुभाष पवार हे पालथे झोपलेले दिसून आले. त्यांच्या डोक्याच्या बाजूला रक्ताने माखलेला दगड पडलेला दिसून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात २४ लाख वृक्षांची लागवड होणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात १ जुलै रोजी एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्याअंतर्गत जिल्ह्यात २४ लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. वृक्षलागवड कार्यक्रमात वनविभागाशिवाय इतर शासकीय विभाग, खासगी संस्था, शाळा, महाविद्यालये आदींचा देखील सहभाग असणार आहे.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने विविध विभागांना वृक्ष लागवडीचे उद्द‌िष्ट दिले आहे. त्यानुसार सामाजिक वनीकरण विभाग २५ हजार, उपवनसंरक्षक पूर्व विभाग ७ लाख २१ हजार, पश्चिम विभाग ७ लाख ६७ हजार, उपविभागीय वन अधिकारी मालेगाव ५ लाख ७६ हजार आणि विभागीय व्यवस्थापक वनविकास महामंडळ नाशिक यांना ३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

शासनाच्या इतर कार्यालयांपैकी महसूल ८१५, पदुम ३ हजार, नगर विकास ७ हजार २००, सहकार व पणन १० हजार, सांस्कृतिक कार्य व पर्यटन ५ हजार, सहसंचालक उच्च व तंत्रशिक्षण ८२०, गृह विभाग ९५०, गृह विभाग (परिवहन) एक हजार १००, उद्योग ५ हजार, ऊर्जा ८००, विधी व न्याय ५ हजार, सार्वजनिक आरोग्य ६ हजार ५००, सार्वजनिक बांधकाम २ हजार ९१०, ग्रामविकास १३ हजार ८००, जलसंधारण २७५, शालेय शिक्षण व क्रीडा ८७ हजार ७००, आदिवासी विकास विभाग एक हजार ६४०, जलसंपदा ५ हजार, सामाजिक न्याय ५००, कृषी २० हजार आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास २०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम पूर्ण केले आहे. सॅम्सोनाईट आणि इतर खासगी संस्था तसेच व्यक्तींचा देखील या उपक्रमात सहभाग असून, त्यांच्यामार्फत १ लाख ४३ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग करणार असलेल्या लागवडीशिवाय अतिरिक्त ९ लाख ३१ हजार रोपे या विभागांकडे उपलब्ध आहेत. या उपक्रमात लोकप्रतिनिधींचाही सहभाग असणार आहे. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिकच्या सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक टर्मिनल पडले ओस!

0
0

आडगाव ट्रक टर्मिनल ओस पडले आहे. नाशिक महापालिकेची जकात बंद झाल्यामुळे या टर्मिनलमध्ये वाहनांची संख्या घटली. जकात सुरू असेपर्यंत गाडी उभी करणे देखील कठीण असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव ट्रक टर्मिनल निर्मनुष्य वास्तू झाली असून तेथे मद्यपी आणि जुगरींचा अड्डा झाला आहे.

ट्रक टर्मिनलची सद्यस्थिती सन २००० मध्ये आडगाव परिसरातील काही आरक्षित जमिनींवर ट्रक टर्मिनल उभे केले. त्यामुळे २००१ साली १ उपहारगृह, ८ सुविधा गाळे मग त्यात दवाखाना, किराणा, झेरॉक्स व इतर यांच्यासाठी देण्यात आले. यासोबत 'बी विंग'मध्ये पहिल्या मजल्यावर १५, दुसऱ्या मजल्यावर १५, आणि 'सी' विंगमध्ये १५ अशे एकूण ४५ गाळे, साधारतः १ एकर जागा इंडियन ऑईल कॉर ला हस्तांतरित केली आहे. त्यापैकी सद्यस्थिती १३ गाळे रिक्त आहे, १३ गाळे जप्त करण्यात आले. सुविधा ८ गाळे देखील रिक्त आहे. अर्ध्यापेक्षा जास्त गाळे हे मागील सिंहस्थपासून म्हणजेच सन २००३ पासून रिक्तच आहे. या वर्षी तीन वेळा निविदा काढून देखील कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

जागामालक हवालदिल ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित जमिनींचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. मागील मंजूर विकास आराखड्यात ट्रक टर्मिनल शेजारील जमिनी या आरक्षित करण्यात आल्या होत्या. परंतु, २० ते २५ वर्षे पूर्ण होऊन देखील या जमिनी महापालिकेने ताब्यात घेतल्या नाही किंवा आरक्षण मुक्तही केलेल्या नाहीत. आताही नवीन मंजूर होणाऱ्या विकास आराखड्यात आरक्षण कायम आहे. त्यामुळे येथील जागामालक कमालीचे अस्वस्थ आहे. सोन्याचे मोल असलेली जागा आरक्षणामुळे कवडीमोल झाली आहे. 'आई जेवू घाले नाआणि बाप भिक मागू देई ना!' अशी गत या शेतकऱ्यांची झाली आहे. एक तर महापालिका पैसे नसल्याचे कारण पुढे करत या जमिनी ताब्यात घेत नाही आणि विकसित करायला परवानगीही देत नाही. त्यामुळे येथील जागामालक कात्रीत सापडले आहे. महापालिकेच्या घरपट्टी व इतर माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात देखील घट होत आहे. परिसराचा विकास खुंटला आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन आरक्षण रद्द करावे किंवा या जागा मालकांना परत कराव्यात, अशी मागणी केली जात आहे. याबाबत पाठपुरावा करण्यात येत असूनही महापालिकेकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

जमीनमालकांवर अन्याय महापालिकेने २२ एकर जमीन आरक्षित केली होती. यातील ५ ते ८ एकर जागेवर ट्रक टर्मिनल उभारण्यात आले. उरलेल्या जागेवर आरक्षण कायम आहे. ट्रक टर्मिनलमधील गाळे महापालिकेने भाड्याने दिले. मग जमीन मालकांना त्यांची जागा विकसित करण्याची परवानगी का दिली नाही? असा संतप्त सवाल जागामालकांकडून केला जात आहे. नागपूर महापालिकेने अशा जमिनी विकसित करण्याची परवानगी संबंधित जागामालकांना दिली होती. त्यामुळे आरक्षण काढावे, अशी सूचना मांडण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे महापालिकेने आमच्या जमिनी ताब्यात घ्याव्यात किंवा विकसित करण्याची परवानगी तरी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

महापालिकेने आमच्या जागा ताब्यात घेऊन नवीन नियमाप्रमाणे बाजार भावाप्रमाणे देयक अदा करावे किंवा आमच्या जागा विकसित करण्यासाठी परवानगी तरी द्यावी. जागा आरक्षणमुक्त कराव्यात. आरक्षणामुळे आमची जागा कवडीमोल झाली आहे. प्रशासनाने या प्रश्नी लवकर लक्ष द्यावे. - बाळासाहेब वाघ, जमीनमालक

महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. मंजूर होणाऱ्या विकास आराखड्यासाठी हरकती मागविल्या. तेव्हा संबंधित पॅनलमधील एका तज्ज्ञाने नागपूर महापालिकेकडून जागा विकसित करण्याची मूळ जमीन मालकांना परवानगी दिल्याची माहिती दिली. नाशिक महापालिकेनेही तशी परवानगी आम्हाला द्यावी. - मच्छिंद्र चव्हाण, जमीनमालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक, आर्किटेक्टला दणका!

0
0

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने भद्रकालीत तब्बल ९५ लहान-मोठी अतिक्रमणे हटविली. यात नगरसेवक सुफीयान जीन व समिना मेमन यांच्या संपर्क कार्यालयावरही बुलडोझर फिरविण्यात आला. तेथे अतिक्रमण काढण्यास विरोध करणाऱ्यांनी थेट महापालिकेच्या वाहनावर हल्ला करीत काचा फोडल्या. विरोधकांची गर्दी वाढल्याने तणाव कमी करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

पथकाच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघेही हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी असल्याची चर्चा आहे. दरम्यान, कॉलेजरोडवरही एका बड्या आर्किटेक्टला महापालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावली. यामुळे भेदरलेल्या संबंधित आर्किटेक्टने अनधिकृत हॉटेल्ससह पार्किंगचे अतिक्रमण काढून घेतले आहे.

महापालिकेने अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणाविरोधात मोहीम सुरू केली आहे. पश्चिम व पूर्व विभागातर्फे गुरुवारी संयुक्त अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. भद्रकालीच्या बादशाही कॉर्नरपासून मोहिमेला पोलिस बंदोबस्तात सुरूवात करण्यात आली. भद्रकाली ते सारडा सर्कल दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील व्यवसायिकांची दुकानासमोरील पत्र्यांचे शेड, पक्के ओटे, फलक ही अतिक्रमणे जेसीबी मशिनच्या साहय्याने तोडण्यात आली. अतिक्रमण मोहीम सुरू असतानाच काही अतिक्रमणधारकांनी पथकाशी हुज्जत घातली. अतिक्रमण काढण्यास विरोध करणाऱ्यांची संख्या वाढली. एकाने महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वाहनावर हातोडा फेकून मारल्याने वाहनाची काच फुटल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. गर्दी वाढल्याने तणाव निर्माण झाल्याने जमावाला पांगविण्यासाठी भद्रकाली पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर अतिक्रमणाची मोहीम सुरू करण्यात आली.

बादशाही कॉर्नर, भद्रकाली, सिंधी मार्केट, शहीद अब्दुल हमीद चौक, खडकाळी, महात्मा फुले मार्केट, शाही मशिद, माँजी साहेबा चौक, भद्रकाली पोलिस स्टेशन, मौला बाबा दरगाह परिसर, हाजी दरबार, दादासाहेब फाळके रोड, लोखंड बाजार आदी परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येवून तब्बल ९५ अतिक्रमणे काढण्यात आली. महापालिकेच्या पथकावर हल्ला केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनातर्फे भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशीनाथ अनिल बागुल, बाळासाहेब उगले आणि भावड्या कवडे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

'अर्चित आयकॉन'वर कारवाई कॉलेजवरील बिग बाजार चौकात असलेल्या अर्चित आयकॉन या इमारतीच्या टेरेसवर स्काय कॅफे नावाचे हॉटेल सुरू करण्यात आले होते. तर संबंधित आर्किटेक्टने इमारतीच्या खाली पार्किंग असतांनाही ते बंद करून तिथे गाळा काढला होता. या संदर्भातील महापालिकेच्या अतिक्रमण निमूर्लन विभागाकडे करण्यात आलेली तक्रार प्रलंबित होती. त्यामुळे महापालिकेकडून सुमतीलाल शाह व व्ही. एम. एंटरप्राजेस या कंपनीला नोटीस बजावली होती. अतिक्रमण काढण्यासाठी पथकही दाखल झालेे. परंतु, या इमारतीचा मालक हा आर्किटेक्ट असल्याने त्यांनी बदनामी नको म्हणून स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले. महापालिकेला बांधकामात सल्ले देणाऱ्या या आर्किटेक्टवरच आयुक्तांनी कारवाई करून आर्किटेक्ट लॉबीला मोठा झटका दिल्याचे मानले जात आहे.

नगरसेवक जीन, मेमन अडचणीत महापालिका प्रभाग २६ चे नगरसेवक सुफीयान जीन व नगरसेविका समीना मेमन यांचे संयुक्त संपर्क कार्यालयाचे शेड अतिक्रमित होते. लोखंडी शेड टाकून अतिक्रमण करण्यात आले. महापालिकेच्या पथकाने हे अतिक्रमणही जमीनदोस्त केले. नगरसेवकानेच अतिक्रमण केल्याने महापालिकेकडून दोघांना नोटीसा बजावल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोघांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर एका माजी नगरसेवकाचे बंधूचे फुले मार्केट परिसरातील लॉजचे शेड व ओटा जमीनदोस्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेस्थानकात भिकाऱ्यांचा संचार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्थानकात भिकाऱ्यांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. तिकीट बुकिंग ऑफीस, तिकीट खिडकी, प्लॅटफॉर्म, स्थानकाचे आवार आदी ठिकाणी हे भिकारी वेडेवाकडे वावरत चिल्यापिल्यांसह भीक मागतात किंवा झोपलेले असतात. त्यामुळे प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत.

नाशिकरोड स्थानकाला स्वच्छतेबाबत देशात सहावा क्रमांक मिळालेला आहे. येथील आवार सतत स्वच्छ ठेवले जाते. प्लॅटफॉर्म क्रमांक एकपासून चारपर्यंत स्वच्छता कर्मचारी साफसफाई करीत असतात. असे असताना भिकाऱ्यांमुळे या स्थानकाचा नावलौकिक खराब होत आहे. भिकाऱ्यांनी येथे उच्छाद मांडला असून, प्रवाशांचे कपडे ओढून भीक मागणे, स्थानकात लोळत राहणे, चिल्ल्यापिल्यांसह प्रवाशांच्या मागे लागणे, बुकिंग ऑफीस आवारात झोपणे यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. काही भिकारी स्थानकावरच नित्यकर्मे उरकत असल्याने अस्वच्छता पसरल्याचे दिसून येते.

रेल सेनेचे निवेदन रेल्वे सल्लागार समिती सदस्य नितीन चिडे, रेल कामगार सेनेचे अध्यक्ष अनिल आहेर यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेस्थानक प्रमुख एम. बी. सक्सेना यांना गुरुवारी भिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्याबाबत निवेदन देण्यात आले. या वेळी आरपीएफचे पोलिस निरीक्षक जुबेर पठाण, रेल्वे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर भाबळ, सेना कार्यकर्ते योगेश धोंगडे, एस. पी. पाटील, गणेश शिंदे, रमेश मोटे, विलास शिंदे, संतोष चव्हाण, संदीप गोसावी आदी उपस्थित होते. दरम्यान, एम. बी. सक्सेना यांनी भिकाऱ्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याचे आदेश जुबेर पठाण व भाबल यांना दिले. त्यानुसार त्वरित कारवाई करून भिकाऱ्यांना स्थानकाबाहेर हुसकावून देण्यात आले. मात्र, भिकारी थोड्या वेळाने पुन्हा स्थानकात आले. त्यामुळे याप्रश्नी रेल्वे पोलिस दलाने धडक कारवाई करण्याची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वे प्रशासनानेदेखील यासंदर्भात प्रवाशांच्या सूचनांचा विचार करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या भेडसावत असूनदेखील रेल्वे प्रशासनाकडून याबाबत ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले असून, याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नाशिकरोड स्थानकाचा नावलौकिक स्वच्छतेमुळे संपूर्ण भारतात आहे. मात्र, भिकाऱ्यांमुळे स्थानकाला अवकळा येऊ पाहत आहे. त्यांच्यामुळे त्रास होत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. भिकाऱ्यांना कायमचा प्रतिबंध करावा. -नितीन चिडे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images