Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नोकरीच्या आमिषाने फसवणूक

0
0

कोल्हापूरमधील शिक्षण संस्थेमध्ये ‌विविध पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखतीला येण्याचे आवाहन करणारी जाहिरात प्रसिद्ध करून आलेल्या हजारो इच्छुक उमेदवारांकडून प्रत्येकी १०० ते २०० रुपये उकळण्याचा प्रकार सिडको परिसरात सोमवारी उघडकीस आला. काही जागरुक तरुणांनी या प्रकाराविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, फसवणूक झालेल्या तरुणांनी अंबड पोलिस स्टेशनबाहेर दुपारी उशिरापर्यंत गर्दी करीत संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

दोन दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात कोल्हापूर येथील महर्षी शाहू राजे शिक्षण संस्थेच्या नावाने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यात संस्थेला प्राथमिक उपशिक्षक, माध्यमिक उपशिक्षक, क्रीडा शिक्षक, चित्रकला उपशिक्षक, लिपिक, शिपाई यासारखे अनेक पदे भरावयाची असून थेट मुलाखतीला येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी सकाळी नाशिकबरोबरच धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यातील हजारो इच्छूक उमेदवार महाराणा राणाप्रताप चौकातील या संस्थेच्या कार्यालयाजवळ हजर झाले. यावेळी सुरुवातीला संस्थेकडून प्रत्येकाकडून १०० रुपये घेवून त्यांना एका फॉर्मचे वाटप करण्यात आले. हा फॉर्म भरून दिल्यानंतर मुलाखत घेतल्याचे खोटे दर्शविण्यात आले. मात्र, हा सर्व प्रकार खोटा असल्याचा संशय काही जणांना आला. त्यांनी संस्थेची माहिती विचारण्यात सुरुवात केली. मात्र, संस्थेच्या उपस्थित कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे उपस्थितांचा संशय बळावला. अखेरीस यातील काही जणांनी थेट अंबड पोलिस ठाण्यात नोकरीच्या नावाने तरुणांची फसवणूक केली जात असल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संस्थेच्या तेजल गोसावी, तुषार गोसावी, हेमंत वेलीस यांच्यासह अन्य एका व्यक्तीला ताब्यात घेतले. यानंतर सर्व इच्छुक उमेदवारही अंबड पोलिस स्टेशनला जमा झाले.

यावेळी पोलिस स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्याची तसेच मुलाखतीच्या नावाखाली घेतलेले पैसे परत मिळावे, अशी मागणी तरुणांनी केली.

सुरुवातीला १०० रुपयांना देण्यात आलेले फॉर्म नंतर २०० रुपयांना विकण्यात आले. त्यामुळे ही निव्वळ फसवणूकच असल्याचे लक्षात येते. मुलाखतीला बोलावून त्यानंतर फॉर्म भरून घेण्याची कोणती पद्धत आहे? - अशोक पाडवी

वृत्तपत्रात आलेली जाहिरात वाचून नोकरीच्या आशेने आलो. परंतु, त्या ठिकाणी आमचे कागदपत्र घेऊन मुलाखत न घेता केवळ १०० रुपये घेऊन एक फॉर्म भरून घेतला. हा प्रकार फसवणुकीचा असून केवळ पैसे उकळले जात आहेत. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करून आमचे पैसे व कागदपत्र परत मिळवून द्यावेत. - सोनिया देशमुख

शिक्षण संस्थेत नोकरी मिळेल या हेतूने आम्ही थेट मुलाखतीला आलो. पण या ठिकाणी आल्यावर फॉर्म फी मागण्यात आली. तसेच संस्थेविषयी माहिती विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. पोलिसांनी या प्रकाराची सखोल चौकशी करावी व न्याय मिळवून द्यावा. - सुवर्णा राऊत

महर्षी राजे शाहू शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित मुलाखतीप्रसंगी पावती न देता १०० ते २०० रुपये घेण्यात आले. पावती व शाळेबद्दल विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरून केवळ फसवणूक करणे हाच यांचा उद्देश असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाची कायदेशीर चौकशी व्हावी. - योगेश गांगुर्डे, डीएड-बीएड बेरोजगार संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता विद्यार्थ्यांना गणवेश घरपोच

0
0

मोफत गणवेशासाठी पैसे स्वीकारताना आर्थिक परिस्थितीचा न्यूनगंड विद्यार्थ्यांच्या मनाला शिवू नये, यासाठी २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना घरपोच गणवेश देण्याच्या उपक्रम महापालिका शिक्षणसमितीमार्फत आखण्यात आला आहे. येत्या ६ जूनला प्राथमिक शाळा सुरू होणार असून पहिले आठ दिवस म्हणजे ६ ते १३ जूनपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेशासाठी ४०० रुपये दिले जातात. सर्व मुली व अनुसूचित जमाती, द्रारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) मुले यांना या योजनेचा लाभ मिळतो. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना शाळेत असे पैसे घेताना आर्थिक परिस्थितीविषयी न्यूनगंड निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ६ ते १३ जून या कालावधीत प्रत्येक विद्यार्थ्याची गृहभेट घेऊन पालकांसमक्ष गणवेश सुपूर्द करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीमार्फत हा उपक्रम राबविला जाणार असल्याने कोणावरही या उपक्रमाचा जादा भार येणार नसल्याचे समितीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांपर्यंत या उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी पुढील आठवड्यात मुख्याध्यापकांची बैठकही होणार आहे. या अंतर्गत पहिली ते आठवीच्या २५ हजार विद्यार्थ्यांना घरपोच गणवेश मिळू शकणार आहे. तसेच शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशी म्हणजेच पहिल्याच दिवशी पुस्तके वाटण्यात येणार असून १३ जूनपर्यंत पटनोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे.

सात हजार विद्यार्थ्यांनाही लाभ सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणाऱ्या मोफत गणवेश योजनेपासून जनरल, एनटी व ओबीसी संवर्गातील विद्यार्थीवर्ग वंचित होता. मात्र, या शैक्षणिक वर्षापासून या विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेशाचा लाभ मिळावा, यासाठी महापा‌लिकेच्या २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. यानुसार या गटातील सात हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मात्र, ही प्रक्रिया शिक्षणसमितीच्या अखत्यारित नसल्याने हे गणवेश वाटप कधीपर्यंत होतील, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

अंमलबजावणीमध्ये अडथळे घरपोच गणवेशाचा उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले असले तरी ही प्रक्रिया सत्यात उतरविण्यासाठी अनेक आव्हाने आहेत. शाळांकडे विद्यार्थ्यांचे रहिवासी पत्ते नसण्याची समस्या मोठी आहे. शिवाय, अनेक विद्यार्थ्यांचे पालक मजूर, बांधकाम कामगार असल्याने पालकांच्या रोजगारासाठी त्यांना स्थलांतर करावे लागते. अशा विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश घरपोच इतक्या कमी कालावधीत मिळणार का? अशी शंका महापालिकेच्याच शिक्षकांकडून उपस्थित केली जात आहे.

राज्यात केवळ नाशिकमध्येच अशा स्वरुपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळावेत व त्यांना कमीपणा वाटू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. - उमेश डोंगरे, प्रशासनाधिकारी, महापालिका शिक्षण समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नीट’ला नो ऑप्शन!

0
0

'नीट'ची सक्ती टाळण्यासाठी पालक अन् विद्यार्थ्यांनी जिवाचे रान केले असले, तरीही मेडिकलला जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी या परीक्षेला यंदाही अन्य पर्याय नसल्याचे चित्र स्पष्ट आहे. गर्व्हेन्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशाचे स्वप्न न बघता खासगी किंवा अभिमत कॉलेजमध्ये प्रवेशासाठी एका पायावर तयार असणाऱ्यांना 'नीट'च्या दिव्यातून यंदाच्याही वर्षी जावेच लागणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे १९ हजार विद्यार्थीही याच प्रक्रियेचा भाग बनणार आहेत.

मेडिकलला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांवरील 'नीट'ची टांगती तलवार टाळण्यासाठी अखेरीला केंद्र सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला असला तरीही अद्याप कायदेशीर खुलाशासाठी तो अध्यादेश राष्ट्रपतींच्या औपचा‌रिक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे अध्यादेश निघाला, असे स्पष्टही म्हणता येत नाही. त्यातही हा अध्यादेश हाती पडला तरीही केवळ गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजेसनाच राज्याची 'सीईटी' परीक्षा लागू असणार आहे. इतर खासगी मेडिकल कॉलेजेस किंवा डिम्ड युनिव्हर्सिटीसाठीचे प्रवेश केवळ 'नीट'द्वारेच होणार असल्याचेही संभाव्य अध्यादेश स्पष्ट सांगतो.

गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये वैद्यकीय व दंतवैद्यकीय प्रवेशांसाठी २८१० जागा आहेत. तर राज्यातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसकडे १७२० आणि डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये १६७५ याप्रमाणे खासगी ३३७५ जागा उपलब्ध आहेत. गव्हर्न्मेंट जागांवर 'सीईटी'ची मोहोर असेल तर खासगी जागांवर केवळ 'नीट'ची मोहोर असणार आहे. राज्यातील सुमारे २ लाख विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली आहे. यातून सरकारी २८१० जागा सोडल्यास उर्वरित साडेतीन हजार खासगी जागांसाठी या लाखो विद्यार्थ्यांना आता २४ जुलै रोजी होणारी 'नीट' सक्तीचीच राहणार आहे.

एकुलते एक गव्हर्न्मेंट कॉलेज नाशिकमधून यंदा १९ हजारावर विद्यार्थ्यांनी 'सीईटी' दिली. तर नाशिकसह नगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांसाठी धुळ्यामध्ये एकुलते एक मेडिकल कॉलेज आहे. या पाठोपाठ 'एमबीबीएस'साठी पाच आणि बीडीस (दंत वैद्यकीय) साठी सुमारे पाच खासगी कॉलेजेस उपलब्ध आहेत. इतर मेडिकल अभ्यासक्रमांसाठी सीईटीव्दारे प्रवेश होतील.

'नीट'च्या कसोटीवर परीक्षा उत्तर महाराष्ट्रात धुळ्यात दोन मेडिकल कॉलेजेस आहेत. पैकी भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज हे गव्हर्न्मेंटचे तर एसईपीएम हे मेडिकल कॉलेज खासगी आहे. अहमदनगरमध्ये विठ्ठलराव विखे फाऊंडेशनचे मेडिकल कॉलेज, जळगावमध्ये गोदावरी फाऊंडेशनचे मेडिकल कॉलेज व नाशिकमध्ये डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, घोटीमध्ये (इगतपुरी) एसएमबीटी असे पाच मेडिकल कॉलेजेस आहेत. शिवाय बीडीएससाठीही उत्तर महाराष्ट्रात पाच मेडिकल कॉलेजेस आहेत. येथील प्रवेशासाठी 'नीट'ची कसोटी असणार आहे. या खालोखाल आयुर्वेद व होमिओपॅथीचीही कॉलेजेस आहेत.

एसएमबीटीचे प्रवेश मान्यतेच्या फेऱ्यात? वैद्यकीय अभ्यासक्रम चालविणाऱ्या कॉलेजेसना विद्यापीठाच्या संलग्नते सोबतच मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचीही मान्यता हवी असते. दोन वर्षांपूर्वी घोटी (इगतपुरी) मधील एसएमबीटी कॉलेजच्या प्रवेशांना मान्यता दिली नव्हती. यामुळे तेव्हा ते कॉलेज चर्चेत आले होते. गतवर्षी या मान्यतेसह प्रवेश सुरळीत झाले होते. यंदा मात्र अद्यापही एमसीआयने प्रवेशांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वीच्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, अशी धास्ती विद्यार्थी अन् पालकांच्याही मनात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोपाळहून टेकऑफ; नाशिकला गुडबाय!

0
0

उपलब्ध विमानाने भोपाळ-रायपूर-पुणे सेवा सुरू

Bhavesh.brahmankar @timesgroup.com

नाशिक : मुंबई-नाशिक-मुंबई विमानसेवेसाठी एअर इंडियाने उपलब्ध करून दिलेले ATR-72-600 हे विमान आता भोपाळ-रायपूर-पुणे या सेवेसाठी वापरण्यात आले आहे. मुंबई विमानतळावर वेळ मिळत नसल्याने (एअर स्लॉट) नाशिकची विमानसेवा सुरू होऊ शकली नाही. आता हेच विमान अन्य ठिकाणासाठी वापरले जाणार असल्याने नाशिक विमानसेवा अधांतरीच राहणार असल्याचे दिसून येत आहे.

असंख्य अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर नाशिकहून विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात एअर इंडियाने पुढाकार घेतला. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर अलायन्सद्वारे मुंबई-नाशिक-मुंबई ही सेवा सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले. त्यासाठी ATR-72-600 हे विमानही उपलब्ध करण्यात आले. नाशिकसोबतच हुबळी, पुणे आणि मुंबई या शहरांसाठीच्याही सेवा सुरू करण्याचे एअर इंडियाने निश्चित केले. त्यानुसार नाशिकसेवेसाठी मुंबई विमानतळावर वेळेची मागणी केली. मात्र, मुंबई विमानतळ टर्मिनलचा सांभाळ करणाऱ्या जीव्हीके कंपनीने वेळ उपलब्ध होणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे नाशिक विमानसेवेचे टेक ऑफ होता होता लँडिग झाले. हवाई वेळच नसल्याने सेवा सुरू होण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली. यासंदर्भात संसदेमध्येही प्रश्न उपस्थित करण्यात आला. अखेर ही सेवा सुरू होण्याची कुठलीही चिन्हे नसल्याने एअर इंडियाने ATR-72-600 या विमानाची सेवा भोपाळ-रायपूर-पुणे या मार्गावर देण्याचे निश्चित केले आहे. म्हणूनच २३ मे पासून सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस या विमानाद्वारे सेवा सुरू झाली असून, त्याचे बुकिंगही सुरू आहे. त्यामुळे नाशिकसाठी राखीव विमानही आता अन्य मार्गासाठी गेल्याने नाशिकची विमानसेवा सुरू होण्याबाबत संदिग्धता आहे.

अडथळ्यांची शर्यत

टर्मिनलची सुविधा नाही टर्मिनलचे हस्तांतरण नाही विमान कंपन्यांचा प्रतिसाद नाही नाशिक विमानतळ हवाई नकाशावर नाही टर्मिनचा सांभाळ करणारे कुणी नाही लहान आसनी विमानांना प्रतिसाद नाही एअर इंडियाला विमान उपलब्ध नाही विमान उपलब्ध झाले पण पायलट नाही मुंबई विमानतळावर वेळेची अनुपलब्धता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवतारी पुरुषाने लुबाडले ४६ लाख

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

'मी अवतारी पुरुष असून, माझ्या मंदिरात खेटा मारल्यास तुझा उत्कर्ष होईल. तुझ्या जमिनीत देव असून, ते कोपलेले आहेत. तुला ती जमीन विकावी लागेल,' असे सांगून एका भोंदू बाबाने घोटी येथील युवकास ४६ लाखांचा गंडा घातला. याबाबत युवकाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर भोंदूबाबासह पाच जणांविरुद्ध घोटी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा विरोधी प्रतिबंधक कलमासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील रहिवासी ज्ञानेश्वर बहिरू भोसले या युवकाने घोटी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. विल्होळी येथील भगतबाबा नवनाथ निंबा महाले (रा. वाढोली) यांचा वाढोली येथे मठ आहे. 'मी दत्ताचा अवतार आहे' असे सांगून मठात वेळोवेळी खेटा मारण्यास सांगितले. गेल्या आठ वर्षापासून बाबाने भगतगिरी करून अंगारे, धुपारे करीत ज्ञानेश्वरची २००८ पासून ४६ लाख रूपयांची आर्थिक पिळवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत ज्ञानेश्वर भोसले याने घोटी पोलीसात भगत बाबा नवनाथ (अण्णा) निंबा महाले (रा. विल्होळी), रामदास नथू धोंगडे, बबन बाबर, पोपट रामदास धोंगडे व अन्य एक अशा या पाच संशय‌िता विरोधात महाराष्ट्र जादूटोणाविरोधी प्रतिबंधक कायदातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोल‌िस निरीक्षक प्रभाकर पाटील करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळीत टाकल्याने मुस्लिम कुटुंबांची होरपळ

0
0

लखन सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर

राज्यातील भटक्या विमुक्त आणि आदिवासी समाजातील जातपंचायती 'जाच'पंचायती ठरू लागल्याने ही व्यवस्था मोडून काढण्यासाठी 'जातपंचायत विरोधी मूठमाती अभियान' राबविले गेले. यामुळे अनेक जातपंचायती बरखास्त झाल्या. मात्र मुस्लिम समाजातील जातपंचायतीही 'जाच'पंचायत ठरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बागलाण तालुक्यातील वाघळे गावात दोन मुस्लिम कुटुंबांना पिंजारी जातपंचायतीने तीन वर्षांपासून वाळीत टाकल्याने या कुटुंबाची होरपळ होत असून, सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही त्यांना सहभागी करून घेतले जात नसल्याची तक्रार या कुटुंबीयांनी सोमवारी पोलिसांत दाखल केली आहे.

बागलाण तालुक्यातील वाघळे गावात मेहबूब उस्मान पिंजारी व रुस्तम यासीन पिंजारी यांचे कुटुंब राहते. महेबूब पिंजारी हे या गावचे जावई आहेत. आजूबाजूच्या गावांत पिंजारी समाजाची मांसविक्रीची दुकाने व गादी भरण्याची दुकाने आहेत. २०१४ मध्ये गावातील मांसविक्री दुकानाचा ठेका मेहबूब पिंजारी यांनी घेतला होता. सदरील ठेका जातपंचायतीतील व्यक्तीला मिळावा या कारणावरून पिंजारी जातपंचायत व पीडित कुटुंब यांच्यात वाद निर्माण झाला. वाद मिटविण्यासाठी मेहबूब पिंजारी यांचे सासरे रुस्तम पिंजारी यांनी मध्यस्ती केली. परंतु, त्यांचे कोणत्याही प्रकारचे म्हणणे न ऐकता जातपंचायतीचे पंच नवाब पिंजारी, रहेमान पिंजारी, उस्मान पिंजारी, नीहाल पिंजारी, हारून पिंजारी, शिराज पिंजारी यांनी त्यांना वाळीत टाकले. त्यांना समाजातील विवाह, धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सवापासून दूर ठेवले जाऊ लागले. याचदरम्यान पीडित कुटुंबाला जातपंचायतीतील काहींनी घरात घुसून मारहाण झाली होती. याबाबत पोलिसांत तक्रार गेेल्यानंतर मार्च महिन्यात गावातील तंटामुक्त समितीने हा वाद मिटविला. परंतु, काही दिवसांपूर्वी महेबूब पिंजारी यांना ग्रामपंचायतीने राहण्यासाठी दिलेली जागा जातपंचायतीची असल्याचे कारण देत ती जागा सोडण्याबाबत धमकविल्याने हे कुटुंब भेदरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

0
0

धुळे : तालुक्यातील आंबोडे येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

दरम्यान येथील अनिल सरग (वय ३५) या शेतकऱ्याने सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेला असता त्याठिकाणी विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार जवळच असलेल्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी उपचाराससाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केला असता मृत घोषीत केले. अनिल सरग यांच्या पश्चात पत्नी, तीन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. सततच्या नापिकी आणि दुष्काळामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या केली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘…तर पालिकेचे मोठे नुकसान झाले असते’

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

घरकुल योजनेचे काम थांबविले असते तर जळगाव नगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असते हे म्हणणे खरे आहे, अशी माहिती उलटतपासणीत तत्कालीन मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांनी दिली. मंगळवारी जळगाव घरकुल घोटाळ्याच्या उलटतपासणीत संशयीतांच्या वकीलांनी जावळीकर यांना चांगलेच गोंधळात आणले होते.

यात घरकुल योजनेप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपींनी जे कृत्य केले आहे. तेच कृत्य या गुन्ह्यामध्ये तुम्हीपण केले असल्याने तुम्हीदेखील गुन्हेगार आहेत, असे तुम्हाला वाटत नाही का? असा सवाल संशयीत वासुदेव सोनवणे, सुभद्राबाई नाईक, शिवचरण ढंढोरे व इतर संशयीतांचे वकील जितेंद्र निळे यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना या खटल्यातील साक्षीदार तत्कालीन जळगाव नगरपालिका मुख्याधिकारी धनंजय जावळीकर म्हणाले हे खरे नाही खोटे आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शैक्षणिक गुणवत्तेसाठी हवी व्हाऊचर सिस्टिम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक परदेशातील व्हाऊचर्सच्या यश-अपयशाच्या गुणदोषांची चर्चा करण्यापेक्षा शासनाने भारतीय शिक्षणपद्धतीचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी व्हाऊचर सिस्टिम सुरू करायला हवी. शिक्षणातील चढ-उतार वर्षानुवर्षे तसाच राहिल्याने इंडिया-भारत यातील अंतर हे भारताच्या जीवनशैलीवर परिणाम करीत आहे. विशेष म्हणजे, राज्यातील प्राथमिक शिक्षणाची अवस्था अत्यंत दुर्दैवी असून, सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची खंत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि युवक बिरादरी स्नेह छावणीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 'भारतीय शिक्षणपद्धतीचे मूल्यमापन' या विषयावर ते बोलत होते. हेरंब कुलकर्णी म्हणाले की, राज्यातील आश्रमशाळांतील शिक्षणाचा दर्जा खालावला असून, बहुतेक शाळांतील शिक्षकांनाच शिकविता येत नाही. त्यामुळे आता अशा शिक्षकांनाच प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. आजही देशातील ३ कोटींहून अधिक मुले शिक्षणापासून वंचित असून, त्यात बालकामगारांची संख्या ४३ लाख असून, सुमारे दीड कोटी मुले रस्त्यावर भीक मागणाऱ्या लोकांची आहेत. शिक्षण हे सर्वांसाठी समान असून, त्यात गरीब आणि श्रीमंत अशी दरी राहता कामा नये. यासाठी शासनाने व्हाऊचर सिस्टिम सुरू करावी, असे ते म्हणाले. बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी प्रबंधक राजन लोंढे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वयंरोजगाराकडे वळून नोकरी देणारे बनण्याची आवश्यकता आहे, असे सांगून बँकिंग क्षेत्रातील सुविधांच्या लाभ घेण्याचे आवाहन केले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण उद्योजक अपूर्व मंकड यांनी उद्योजक बनण्यासाठी आजच्या तरुणांनी पुढे येण्याची गरज प्रतिपादित केली. तसेच, व्यवसाय करण्यासाठीचे विविध मंत्रही दिले. सिकॉमचे निवृत्त अधिकारी मधुसूदन सोहोनी यांनी बँकिंग क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केले. या वेळी युवक बिरादरीचे संस्थापक क्रांती शाह व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मंत्र्यांनी लावावा वीज प्रकल्प मार्गी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर २८ मे रोजी भगूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दिवशी त्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नूतनीकरण केलेल्या जन्मवास्तूचा लोकार्पण सोहळा होणार आहे. मंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्ताने एकलहरेतील प्रस्तावित ६६० मेगावॅट वीज प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा नाशिककरांनी व्यक्त केली आहे. या वीज प्रकल्पाला मे २०१६ अखेर लष्कराचा ना हरकत दाखला मिळणार होता. मात्र, अद्याप कार्यवाही झालेली नाही. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नाशिक दौऱ्यात त्वरित दाखला मिळण्याची कार्यवाही होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रकल्पाच्या चिमणीच्या उंचीला लष्कराने हरकत घेतल्याने प्रकल्प रखडला आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी देवळाली कॅम्पमधील लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेऊन चिमणीपासून एक किलोमीटरचा परिसर नो फ्लाइंग झोन जाहीर करण्याची मागणी केली होती. दरम्यान, एकलहरेतील प्रस्तावित वीज प्रकल्प लवकर सुरू व्हावा यासाठी वरर्षभरापासून प्रयत्न करीत असून, संरक्षणमंत्र्याच्या भगूर दौऱ्यावेळी हा प्रश्न त्वरित मार्गी लागण्यासाठी त्यांची भेट घेणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फ्लॅटफॉर्मवरील पार्किंग अखेर हटविले

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड रेल्वे स्थानकातील पार्किंगची समस्या गंभीर झाली असतानाच प्रवासी व रेल्वे कर्मचा-यांनी थेट रेल्वे फ्लॅटफॉर्मवर वाहने पार्क करण्यास सुरुवात केली होती. म.टा.मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच दिल्लीतून सूत्रे हलली आणि भुसावळ मुख्यालयाने आदेश देऊन येथील पार्किंग हटविले आहे. रेल्वे सुरक्षा दलाने सर्व बाजूंनी बॅरिकेडस लावले असून, तीन जणांवर कारवाई केली आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर खासगी वाहने नेण्यास किंवा उभी करण्यास बंदी आहे. मात्र, नाशिकरोड रेल्वेस्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयाच्या मागेच वाहने लावली जात होती. येथून थेट प्लॅटफॉर्मवर गाडी नेली जात होती. कुंभमेळ्यावेळी रेल्वे सुरक्षा दलाच्या मागील मैदान काँक्रिटीकरण करून पोलिस बंदोबस्तासाठी उपयोगात आणले होते. आता तेथे वाहनांचा तळ झाला आहे. काही जण तेथून थेट प्लॅटफॉर्मवर वाहने लावत असल्याचे वृत्त म. टा.मध्ये प्रसिद्ध झाले होते. रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयाजवळ व मागील जागेत, नवीन पादचारी पुलाखाली वाहने पार्क केल्याने प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली होती. घातपातासाठी एखादी व्यक्ती स्फोटके भरलेले वाहन थेट रेल्वेजवळ नेण्याचा धोका होता. प्रश्न सोडवावा रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक जुबेर पठाण यांनी रेल्वेचा इंजिनीअरिंग विभाग, स्थानकप्रमुख, वाणिज्य निरीक्षक यांना तातडीने पत्र लिहून स्थानक परिसरातील पार्किंगचा प्रश्न त्वरित सोडविण्याची विनंती केली. पार्किंगसाठी प्रशस्त जागा द्या, अनाधिकृत पार्किंगचे सात-आठ एन्ट्री पाइंट आहेत, ते बंद करावेत, अशी मागणी त्यात केलेली आहे. पार्किंगला जागाच नाही पार्किंग रेल्वे प्लॅटफॉर्मवर होऊ लागल्याने रेल्वे सुरक्षा सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि भुसावळ मुख्यालयाला फोटोंसह मटाचे वृत्त पाठवले. त्याची तातडीने दखल घेऊन पार्किंगला प्रतिबंध करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार हा तळ वाहनांना बंद करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक जुबेर पठाण, सहाय्यक निरीक्षक गांगुर्डे यांनी बंदोबस्त तैनात केला आहे. पार्किंग प्रकरणी तीन जणांवर रेल्वे कायदा कलम १५९ नुसार कारवाई करण्यात आली आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकात देवी चौकात दुचाकी व पार्सल ऑफीसजवळ चारचाकीचे अधिकृत पार्किंग आहे. बस्ट स्टँड आणि रेल्वेस्थानक आवारात रिक्षाचालक व व्यावसायिकांचे अतिक्रमण असून, जागा मिळेल तेथे तसेच रेल्वेस्थानक आवारात दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जात आहेत. तरीही वाहन उभी करण्यास जागाच राहिली नसल्याने चालकांनी थेट प्लॅटफॉर्मवर पार्किंग सुरू केली होती. रेल्वे सुरक्षा दलाने अपुरे मनुष्यबळ असतानाही स्वतंत्र व्यक्ती पार्किंगच्या ठिकाणी दिली आहे. यापुढे प्लॅटफॉर्मवर वाहने येणार नाही याची काळजी घेऊ. - जुबेर पठाण, निरीक्षक, आरपीएफ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमृतधाम चौफुलीवर कसरत

0
0

म. टा. प्रतिनिधी, अमृतधाम मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगावनाका ते आडगावदरम्यानच्या अमृतधाम चौफुलीवर दररोज सायंकाळी पाच वाजेच्या नंतर होणारी वाहतूक कोंडी जीवघेणी ठरत आहे. या ठिकाणी वर्षभरापासून मागणी करूनही वाहतूक पोलिस थांबत नसल्याने वाहतूक कोंडीचा सर्व प्रवाशांना सामना करावा लागत आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी कायमस्वरूपी वाहतूक शाखेचे कर्मचारी नेमावेत, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. महामार्गावरील सर्वात मोठी समजली जाणारी आणि अनेक रस्त्यांना जोडणारी महत्त्वपूर्ण अशी अमृतधाम चौफुली आहे. या ठिकाणी रोज सायंकाळी २ ते ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. प्रत्येकाला घाई असते आणि आपले वाहन पुढे काढण्याचा प्रयत्न करीत असताना होणाऱ्या वाहतूक कोंडीचा व परिणामाचा कोणताही वाहनचालक विचार करीत आणि आणि सौजन्य दाखवत नाही. याचा परिणाम म्हणून कोंडी होते आणि सर्वांना याचा प्रचंड त्रास होतो. गुजराथ, दिंडोरी, पेठ, पुणे, औरंगाबाद आणि मालेगाव व मुंबई आदी ठिकाणाहून वाहने सतत ये-जा करीत असतात आणि त्यात अवजड वाहने व लांबलचक वाहनांची खूपच गर्दी असते व त्यामुळे कोंडी होते. अमृतधामजवळ कोंडी होत असताना काही वाहतूक पोलिस रासबिहारी चौफुली आणि रासबिहारीरोडवर वसुलीचे जोरात काम करीत असतात. पण, त्यांना या कोंडीचे काही एक सोयरसुतक नसल्याचे चित्र अनेक वेळा दिसते. हा महत्त्वाचा महामार्ग आहे. अनेक प्रकारची अवजड वाहने येतून ये-जा करीत असतात. अनेक वेळा अपघात झाले आहेत. यावर उपाय म्हणून उड्डाणपूल वाढवावा किंवा भुयारी मार्ग काढावा. - डॉ. सुभाष भालेराव शाळकरी मुलांचे व ज्येष्ठ नागरिकांचे रोड ओलाडताना खूप हाल होतात. या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिस कर्मचारी नेमण्याची गरज आहे. त्यामुळे कोंडी सुटण्यासह अनेकांचा त्रास कमी होईल. - प्रा.अशोक अहिरे नागरिकांना कायमच आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. वाहतूक पोलिसांची नेमणूक केल्याने वाहने सावकाश जातील आणि कोणी आगळीक करणार नाही व कोंडीदेखील होणार नाही. - संतोष पगारे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसहभागातून गाळ काढण्यात सुरुवात

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम 'जलयुक्त शिवार' अभियानाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात कळवण तालुक्यातील २१ गावांची निवड करण्यात आली. या गावातील विविध यंत्रणांनी सुचवलेल्या कामांचा आराखडा जिल्हास्तरावर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. त्यासंदर्भात या गावात कामला सुरुवात झाली असून त्यात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये गोबापूर येथील पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाची सुरुवात नुकतीच आमदार जे. पी. गावित यांच्या हस्ते करण्यात आली.

कळवण तालुक्यातील विविध गावांमध्ये या कामात लोकसहभाग लाभला. यात प्रामुख्याने कुंडाणे येथे पाझर तलावातील लोकसहभागातून महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानामार्फत गाळ काढण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सध्या २५ ट्रॅक्टर व तीन जेसीबी, १ डंपर यांच्याद्वारे गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्याचे काम सुरू आहे. तर दरेगाव वणी या गावात नालाखोलीकरणाचे काम सुरू असून यात शेतकरी धनराज राऊत, सोमनाथ गवळी, कैलास गवळी, पोलिस पाटील या कामी सक्रीय सहभाग नोंदवला आहे.

दरेगाव येथील नाला खोलीकरण कामास नाशिक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप, यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. जलयुक्त शिवार योजनेतील, कामाचे तालुका समितीचे अध्यक्ष, उपविभागीय अधिकारी गंगाधारण डी., तहसीलदार अनिल पुरे, तालुका कृषी अधिकारी जितेंद्र शहा, यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या गाळ काढण्याच्या कामाचे नियोजन विभागीय मंडळ कृषी अधिकारी पी. जे. पाटील, गिरासे, कृषी पर्यवेक्षक आर.एम. निकम, भरते, बागुल, तसेच कृषी सहाय्यक आर. के. सावंत, महाले, कला पवार, पालवी, कुपर, आक्लाडे, के. पी. पवार, योगेश वाघ, आहेर आदि करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

केंद्रात आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार चांगले काम करीत असून आगामी नगरपालिका व पदवीधर मतदार संघ निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मनमाड येथे केले.

आगामी पालिका निवडणूक व नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक नियोजन या विषयावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कार्यकर्त्यांची बैठक मनमाड येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल आहेर, ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव, संघटन महामंत्री बापूसाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाऊराव निकम, नारायण पवार, युवा मोर्चाचे समीर चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. नितीन पांडे यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष जय फुलवाणी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत ताकदीने कामाला लागावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी केले. यावेळी बापूसाहेबपाटील, उमाकांत रॉय, भीमराव बिडगर, केशवराव पाटोळे, जय फुलवाणी, वाल्मिकी समाजाचे प्रमुख राजाभाऊ पवार यांनी मार्गदर्शन केले. अंकुश जोशी व महेंद्र गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

दरम्यान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भीमसेनेचे राजाभाऊ निरभवणे, एकलव्य संघटनेचे रमेश मोरे, संतोष बागुल, अलीम शेख, मनोज खरात, फारुक शेख, सोमनाथ गायकवाड, हबीब मिस्तरी, दीपक गायकवाड, जगन गवळी आदींनी भाजपात प्रवेश केला. या वेळी फिरोज शहा यांची युवा मोर्चा चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या वेळी रंगनाथ कीर्तने, कांतीलाल लुनावत, गुरुजीतसिंग कांत, नीलकंठ त्रिभुवन, सुभाष संकलेचा, पंकज खताळ, बबन आव्हाड, संदीप नरवडे, ललित भंडारी, सचिन संघवी, अंकुर लुनावत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंवर्धनासाठी सरसावले पोलिसही

0
0

मनमाड पोलिस ठाण्यात स्वखर्चातून उपक्रम
म. टा. वृत्तसेवा, मनमाड
मनमाड शहर परिसरातील पाणीटंचाई तसेच शहरविकासाला बसणारी खीळ याबाबत थेंब थेंब पाण्याचे मोल नागरिकांना कळावे, यासाठी शहर पोलिसांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला आहे. त्यांनी पोलिस ठाण्यात रेन हार्वेस्टिंग उपक्रम राबविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. याद्वारे 'पाणी वाचवा' हा संदेश आधी आपण अमलात आणायचा आणि मग लोकांना जागरूक करायचे ही पोलिस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांची कल्पना सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात आणली आहे.
पोलिस म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती कायदा आणि सुव्यवस्था मात्र सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद असलेले खाकी वर्दीतील शिलेदार सामाजिक बांधिलकी जपत आहेत. पाणी बचतीसाठी आपल्या खिशातून व श्रमदान करून रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबवित आहेत. पोलिसांनी कोणताही प्रायोजक न शोधता किंवा दुसऱ्यांवर विसंबून न राहता पोलिस कर्मचाऱ्यांच्या खर्चातून व श्रमदानातून हा प्रकल्प साकारला जात असल्याने तो दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर इतरांनाही 'पाणी वाचवा पाणी जिरवा' हा मूलमंत्र देणारा ठरला आहे. पोलिसांनी घेतलेल्या या पुढाकाराने आता नेहमी लोकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारे पोलिस आता पाणाटंचाईसाठीही आपली सामाजिक जबाबदारी या उपक्रमातून पार पाडताना दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तृप्ती देसाई यांच्यावर सिन्नर येथे उपचार

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नाशिक येथील कपालेश्वर महादेव मंदिराच्या गाभा-यात प्रवेश करण्यासाठी गेलेल्या पुणे येथील भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मंदिराच्या गाभा-यात प्रवेश नाकारल्यानंतर झालेल्या धरपकडीत ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या डोक्याला मार लागल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना पुण्याकडे घेऊन जात असताना उपचारांसाठी सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

येथील प्राथमिक उपचारांनंतर त्या कार्यकर्त्यांसह पुन्हा नाशिककडे रवाना झाल्या. सिन्नर येथील रुग्णालयात डॉ. नामदेव लोणारे यांनी त्यांच्यावर उपचार केले. प्राथमिक उपचारांनंतर पोलिसांनी नाशिक येथे न जाण्याची केलेली विनंती धुडकावत त्यांनी पुन्हा नाशिककडे प्रयाण केले. या वेळी पत्रकारांशी बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, कपालेश्वर मंदिराच्या ट्रस्टने मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून दर्शन घेण्याची संमती दिलेली असताना व कायद्याने मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली असताना आम्हाला विनाकारण पोलिसांच्या मदतीने रोखले गेले. या वेळी पोलिसांनी अतिरेकी वागणूक देत धक्के देऊन बाहेर काढल्याबद्दल त्यांनी रोष व्यक्त केला. जेथे दर्शनासाठी पुरुष जातात तेथे महिलांना प्रवेश मिळालाच पाहिजे, असे सांगून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील काळाराम मंदिरात केलेल्या आंदोलनाचा दाखला देत त्या म्हणाल्या की, कपालेश्वर मंदिरात महिलांना आजही प्रवेश नाकारला जाणे खेदजनक आहे. आम्हाला रोखणा-या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली. या मंदिरात सर्वांना प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी आपले आंदोलन सुरूच राहणार असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तातडीने आदेश द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॉश गुंतविणार यंदा ३०० कोटी

0
0

bhavesh.brahmankar@timesgroup.com

नाशिक : नाशिकच्या उद्योग जगतात काहीशी मरगळ आली असताना जर्मन कंपनी असलेल्या बॉशने नाशिककरांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. नाशिकसह कर्नाटकातील बिडदी आणि बंगळूरु येथील प्रकल्पात एकूण ७७० कोटी रुपयांची गुंतवणूक यंदाच्या आर्थिक वर्षात करण्याचे कंपनीने जाहीर केले आहे. यातील जवळपास ३०० कोटींची गुंतवणूक नाशिकमध्ये होणार असल्याने शहराच्या उद्योगांना बूस्ट मिळेल.

बॉशचे जर्मनीबाहेरील सर्वात मोठे विकास केंद्र भारतात आहे. बॉश ग्रुपच्या भारतात सहा कंपन्या आहेत. त्यातील बॉश लिमिटेड ही एक कंपनी आहे. ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान, औद्योगिक तंत्रज्ञान, ग्राहक वस्तू आणि बांधकाम तंत्रज्ञान व्यवसायात ही कंपनी कार्यरत आहे. भारतात बॉशने १९५३ मध्ये प्लाण्ट सुरू केला. भारतात कंपनीचे १३ निर्मिती कारखाने आणि ४ विकास केंद्र आहेत. बॉश लिमिटेडची वाढती उलाढाल पाहता भारतातील विस्तारासाठी कंपनी विशेष प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून कंपनी सातत्याने गुंतवणूक वाढवित आहे. कंपनीने यापूर्वीच नाशिकमधील प्रकल्पात किमान ३०० कोटी रुपये गुंतविले आहेत. आशिया खंडातील अर्थव्यवस्थांचा मोठा विकास होत असून, लहान आणि कमी किंमतीच्या गाड्यांची मागणी लक्षणीयरित्या वाढत आहे. हा ट्रेण्ड लक्षात घेऊनच कंपनी भारतातील विस्ताराला प्राधान्य देत आहे. नाशिक, जयपूर आणि अहमदाबाद येथील उत्पादन क्षमता वाढविण्यात येत आहे.

या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बॉशला ३७६ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात नाशिकसह कर्नाटकातील बिडदी आणि बंगळूरू येथील आर अँड डी सेंटरमध्ये एकूण ७७० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे बॉशने मुंबई स्टॉक एक्सचेंजला कळविले आहे. यातील जवळपास ३०० कोटी रुपये नाशिकला येण्याची दाट शक्यता आहे. नाशिकच्या प्रकल्पातून डिझेल इंजेक्टरचे उत्पादन केले जाते. भारतांतर्गत व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढत असल्याचे बॉशचे एमडी स्टीफन बर्न्स यांनी कळविले आहे.
सिन्नर प्रकल्प पुढील वर्षी

सिन्नर येथील रतन इंडियाच्या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये औष्णिक विद्युत प्रकल्प सज्ज आहे. कोळशाच्या पुरवठ्याअभावी सध्या हा प्रकल्प बंद आहे. मात्र, येत्या आर्थिक वर्षात (२०१७ मध्ये) आम्ही हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत सुरू करू, असे रतन इंडिया पॉवरचे एमडी राजीव रतन यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाख विद्यार्थ्यांची होते धोकादायक वाहतूक

0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : शहरात तब्बल २ लाख विद्यार्थ्यांची बेकायदा वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक बाब शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच समोर आली आहे. आर्थिक व इतर काही कारणांमुळे पालक हतबल असून, बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागाचेही काही चालत नसल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची कोर्टाने वारंवार दखल घेतली असताना, यंदा अवैध विद्यार्थी वाहतुकीवर बडगा उगारला जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एकूण ७७१ वाहनांची नाशिक आरटीओ कार्यालयाकडे नोंदणी करण्यात आली आहे. यात स्कूलबस आणि व्हॅनचा समावेश आहे. नाशिक आरटीओ कार्यालयात येणाऱ्या काही तालुक्यांना वगळले तर शहरात विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या ७०० पर्यंत पोहचते. हा आकडा अधिकृत असून, अनधिकृत वाहनांची संख्या चार हजारांच्या पुढे जाते. शहरात ५१८ शाळा असून, यात २ लाख ९४ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी शिक्षण घेतले. चालू वर्षी हा आकडा तीन लाखांच्या पुढे सरकेल. एकूण शाळांमध्ये महापालिकेच्या १२८ शाळांचा समावेश असून, यात जवळपास ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. तीन लाखांमधून हे ३० हजार विद्यार्थी वगळले तर जवळपास दोन लाख ७० हजार विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यासाठी पालक, एसटी महामंडळ, स्कूलबस, व्हॅन किंवा रिक्षांवर अवलंबून राहावे लागते. शहरात ५०० स्कूल बसेस आणि २०० व्हॅनचे रजिस्ट्रेशन असल्याचे मानले तर यातून जास्तीत जास्त २७ हजार विद्यार्थ्यांची वाहतूक शक्य आहे. ४० ते ५० हजार विद्यार्थ्यांना शाळा जवळ असल्याने किंवा त्यांचे पालकच त्यांना शाळेत सोडत असल्याचा फायदा मिळतो. म्हणजेच सुरक्षेच्या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करणाऱ्या हजारो वाहनांमध्ये दररोज दोन लाख विद्यार्थ्यांची धोकादायक पध्दतीने वाहतूक होते आहे. याविषयी सर्वच स्तरात चिंता व्यक्त केली जाते आहे.

याबाबत नाशिक विभागाचे प्रादेशीक परिवहन अधिकारी जीवन बनसोड म्हणाले,'विद्यार्थ्यांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी महिन्याभरापासून मोहीम हाती घेतली आहे. स्कूलबस, व्हॅन किंवा रिक्षा असे कोणतेही वाहन असले तरी त्यांनी विद्यार्थी वाहतुकीचा परवाना घेणे आवश्यक आहे. हा परवाना घेण्यासाठी स्पीड गर्व्हनन्स बसवणे, ठराविक रंग देणे व सुरक्षेच्या दृष्टीने इतर उपाययोजना राबवाव्या लागतात. वाहनचालकांनी हे पाळले तर सर्वांच्या दृष्टीने ते सोयीस्कर होऊ शकते.' अनेकदा विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेले वाहन जाताना दिसते. मात्र, अशा वाहनाचा पाठलाग करणे धोकादायक ठरू शकते, अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली.

स्कूल बससह शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू आहे. ३१ मेपर्यंत यासाठी मुदत देण्यात आली असून, नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. काही संघटनांच्या प्रतिनिधींनी भेटून मुदतवाढ मागितली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

- जीवन बनसोड, प्रादेश‌ीक परिवहन अधिकारी, नाशिक

बेकादेशीर वाहतूक स्वस्त

शाळांच्या स्कूलबस विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावरच सोडतात. तिथून पालकांना त्यांना घेऊन परतावे लागते. याउलट परवाने नसलेले रिक्षा किंवा व्हॅन चालक विद्यार्थ्याला घरासमोर सोडतात. तसेच पैशांच्यादृष्टीने पालकांना हे परवडणारे ठरते. त्यामुळे सुरक्षेच्या मुद्द्याला दृष्टीआड करून बेकायदा वाहतुकीला प्राधान्य देण्यात येत असल्याचा प्रकार चिंताजनक असल्याचे प्रतिक्रिया आरटीओसह पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

नाशिक प्रादेश‌‌ीक कार्यालयाकडे नोंदणीकृत वाहने - ७७१

शहरातील वाहनांची संख्या - सुमारे ७००

सर्व प्रकाराच्या शाळा - ५१८

विद्यार्थ्यांची संख्या - दोन लाख ९४ हजार ४७४

बेकादेशीर वाहतूक होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या - सुमारे दोन लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात तृप्ती देसाई यांच्या कारवर हल्ला

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांच्या कारवर नाशिकमधील पंचवटी भागात गुरुवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास दुचाकींवरून आलेल्या २० ते २५ जणांनी दगडफेक केली. त्यात कारच्या सर्व काचा फुटल्या आहेत. या हल्ल्यात देसाई व काही महिला कार्यकर्त्या जखमी झाल्या असून हल्लेखोरांनी माझ्यावर अॅसिड फेकण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप देसाई यांनी केला.

कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यावर तृप्ती देसाई ठाम असल्याने नाशकात तणावाचे वातावरण आहे. देसाई यांनी काल दुसऱ्यांदा कपालेश्वर मंदिरात जाऊन गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्याआधीच पोलीस व भाविकांनी रोखले. त्यावेळी देसाई यांच्यावर चप्पलफेकही करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी देसाई यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. दरम्यान, पोलिसांनी देसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांना सोडल्यानंतर रात्री त्यांना लक्ष्य करण्यात आले.

देसाई नाशिकमधून पुण्याकडे निघाल्या असता कपालेश्वर मंदिराच्या परिसरात देसाई यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात देसाई व अन्य काही कार्यकर्त्या जखमी झाल्या असून एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना सोडण्यात आले.

हल्लेखोरांचा मला जीवे मारण्याचा उद्देश होता. दगडफेकीनंतर माझ्या कारचा हल्लेखोरांनी पाठलागही केला. असं असतानाही पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली, असा देसाई यांचा आरोप आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, तृप्ती देसाई या आज पुन्हा कपालेश्वर मंदिरात जाणार असल्याने तिथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचोरीची तक्रार करा ऑनलाईन!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहनचोरीच्या गुन्ह्यांची तातडीने नोंदणी व्हावी यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी वाहनचोरी तक्रार नावाचे नवीन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या आधारे वाहनचोरीची तक्रार एका चुटकीसरशी करता येणे शक्य आहे. ऑनलाईन तक्रारीमुळे वाहननोंदणीचे गुन्हे थेट दाखल होतील. यात, मानवी हस्तक्षेप नसल्याने तक्रार दाखल करताना चालढकल होणार नाही.
वाहनचोरीच्या वाढत्या घटनांमुळे अनेकदा गुन्हे उशिराने दाखल होतात. संबंधीत वाहनधारकास पोलिस स्टेशनला चक्करा माराव्या लागतात. चोरी गेलेल्या वाहनाच्या मदतीने गंभीर गुन्हे झाल्यास त्याचा थेट मनस्ताप वाहनधारकास भोगावा लागतो. यापार्श्वभूमीवर महराष्ट्र पोलिसांनी राज्य पातळीवर वाहन चोरी तक्रार नावाचे पोर्टल सुरू केले आहे. इंटरनेटच्या मदतीने वाहनधारक घरबसल्या वाहनचोरीची तक्रार नोंदवू शकतो. तक्रार नोंदवल्यानंतर तपासाबाबतची माहितीही वाहनधारकास समजणार आहे.

अशी करता येईल तक्रार

महाराष्ट्र पोलिसांनी सुरू केलेल्या www.vahanchoritakrar.com या पोर्टलवर जावून प्रथम आपल्याला नोंदणी करावी लागेल. यासाठी, स्वतःचा मोबाईल क्रमांक, ई-मेल आय डी, आधार कार्ड नंबर, स्वतःचे नाव, स्वतः चा पासवर्ड ठरवुन (Desired Password) भरावा लागेल. या माहितीच्या आधारे आपली विनंती रजिस्टर करावी. पोर्टलचा गैरवापर टाळण्यासाठी एक वन टाईम पासवर्ड (OTP) आपण नोंदवलेल्या ई-मेंल वर येईल. तो पासवर्ड बॉक्स मध्ये भरून सबमीट करन नोंदणी करावी. एकदा नोंदणी झाल्यानंतर, आपला नोंदवलेला मोबाईल नंबर, ठरवलेला पासवर्ड आणि व्हेरीफिकेशन कोड (Captcha) टाकून आपण लॉगीन करू शकतो. लॉगीन केल्यानंतर आपल्या हरवलेल्या किंवा चोरीस गेलेल्या वाहनाची तक्रार करता येऊ शकते.

वाहनाची ही माहिती आवश्यक

वाहनचोरीची ​किंवा हरवल्याची तक्रार नोंदवताना वाहनधारकास वाहनाचा प्रकार, वाहनाची कंपनी, वाहनाचा नोंदणी क्रमांक, चेईसीज नंबर, इंजिन नंबर, वाहनाचे उत्पादीत वर्ष, वाहनाचा रंग, वाहन ज्याच्या नावावर आहे त्याचे नाव, वाहन हरवले किंवा चोरी गेले ते ठिकाण, जिल्हा, चोरी गेल्याची कालावधी नमुद करावा लागेल.

या पोर्टलचा वापर राज्यस्तरावर होणार असला तरी वाहनधारकाच्या माहितीनुसार संबंधीत पोलिस स्टेशनला ती तक्रार वर्ग होईल. तक्रारीवर तसेच तपासावर वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवतील. तक्रारदाराशी पोलिस संपर्क साधतील. आवश्यकतेनुसार वैयक्तिक माहिती केव्हांही अप-डेट करू शकता. तक्रार खोटी, चुकीची, कोणाला त्रास देण्याच्या हेतुने असल्याचे समोर आल्यास कारवाई होऊ शकते. - सचिन गोरे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images