Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सात हजार विद्यार्थ्यांना पदवी

0
0

आरोग्य विज्ञान विद्यापीठात पदवीदान सोहळा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा पंधरावा दीक्षांत सोहळा मंगळवारी पार पडला. यावेळी विविध विद्याशाखांच्या एकूण ७१६८ विद्यार्थ्यांना पदवीदान झाल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच, विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ७३ सुवर्णपदके प्रदान करण्यात आले. यावेळी वैद्यकीय विद्याशाखेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांस मेरिट स्कॉलरशिप अॅवॉर्ड रोख रक्कम देउन गौरविण्यात आले. तसेच आठ जणांना पीएच.डी. या सन्मान्य पदवीने गौरविण्यात आले.

पदवीदान सोहळ्याच्‍या व्यासपीठावर यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे, कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे प्रधान सचिव डॉ. विजय सतबिर सिंग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, कुलसचिव डॉ. काशिनाथ गर्कळ, परीक्षा नियंत्रक डॉ. कालिदास चव्हाण आदी उपस्थित होते. समारंभास खासदार हरिशचंद्र चव्हाण, बाळासाहेब सानप, डॉ. राहुल आहेर, आमदार सीमा हिरे आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी तावडे म्हणाले, की ज्या मोजक्या व्यवसायांकडून समाजास सामाजिक उत्तरदायित्वाची पूर्ण अपेक्षा असते, त्यापैकी एक अग्रणी व्यवसाय म्हणजे वैद्यकीय व्यवसाय. समाजातील तळागाळातील प्रत्येक माणसाच्या सुख-दु:खाशी अन् त्याच्या भाव-भावनांशी अतूट नातेसंबंध जोपासण्याचे भाग्य या व्यवसायाला लाभले असल्याने या क्षेत्राकडून समाजाच्या अपेक्षाही त्या स्तराच्या असतात. ही जाणीव मनात जागती ठेवून समाजोपयोगी वैद्यकीय संशोधनासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:स झोकून द्यावे.

पुढे ते म्हणाले, की आजारावर उपचार करून तो बरा करण्याचे म्हणजेच मानवतेचे ब्रीद जपण्याचे प्रत्येक पॅथीचे उद्दिष्ट आहे. यामुळे कुठल्याही पॅथीमध्ये भेदाभेद करायला नको. सर्व पॅथींना एकत्र करून त्यावर संशोधन होणे आवश्यक आहे. आदिवासी भागात आरोग्य सेवेच्या समस्या गंभीर आहेत. या समस्यांच्या निवारणासांक्ष डॉक्टरांनी विशेष योगदान देण्याची गरज आहे.

विविध अभ्यासक्रम करणार सुरू : डॉ. म्हैसेकर कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर केला. ते म्हणाले, विद्यापीठ लवकरच नाशिक येथिल संदर्भ व शासकीय रुग्णालय यांच्यासोबत करार करून पोस्टग्रॅज्युएट इन्टिट्यूट सुरू करीत आहे. आजच्या काळात योगाचे महत्त्व लक्षात घेऊन योगासंदर्भात विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधनात्मक विकासात विशेष लक्ष केंद्रित करून कार्यास प्रारंभ करण्यात आला आहे. कॉलेज व शिक्षक यामध्ये संख्यात्मक व गुणात्मक सुधारणा, संशोधनाला चालना, जागतिक स्तरावर विद्यापीठाचा नावलौकिक वाढविणे, वैद्यकीय शिक्षणाचे फायदे तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न अशा विविध उपक्रमांना प्राधान्यक्रम दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरोग्य विद्यापीठात लवकरच पीजी इन्स्टिट्यूट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पुढील शैक्षणिक वर्षापासून पोस्ट ग्रॅज्युएशन (पीजी) इन्स्टिट्यूट सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रशासकीय कामकाजापलिकडे विद्यापीठाचा कार्यविस्तार वाढावा, यादृष्टीने पीजी इन्स्टिट्यूटचा निर्णय सरकारकडे विचाराधीन होता. या संदर्भात मेडिकल कौन्सिलसोबत सकारात्मक बोलणे सुरू असल्याने आगामी वर्षापासून पीजी इन्स्टिट्यूट येथे सुरू होणे अपेक्षित आहे. यादृष्टीने ‌विद्यापीठानेही तयारी सुरू केली असून, लवकरच संबंधित विषयासंदर्भातील अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे. याशिवाय विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये 'निसर्गोपचार' आणि 'योगा' या विषयांची भर टाकत आगामी वर्षापासून या विषयांचेही अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

'यूजी' अन् 'पीजी' च्या वाढणार जागा राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये अंडर ग्रॅज्युएट (यूजी) आणि पोस्ट ग्रॅज्युएट (पीजी) या स्तरावर प्रवेशांसाठी एकूण २८०० जागा आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता या अभ्यासक्रमांच्या जागा वाढविण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती तावडे यांनी दिली. यादृष्टीने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत 'पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप' या तत्वावर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांची संख्या २८०० वरून ५ हजारांवर नेण्याचा प्रयत्न आगामी वर्षात करण्यात येणार आहे.

... तर सीईटीच्या विद्यार्थ्यांना शुल्क परतावा सीईटी दिल्यानंतरही विद्यार्थ्यांना 'नीट' परीक्षा द्यावी लागली, तर सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी त्यांचे शुल्क परत केले जाईल, अशी माहिती तावडे यांनी दिली. मात्र, वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये एमबीबीएस आणि बीडीस या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाचा या निर्णयाचा लाभ होईल. अन्य अभ्यासक्रमांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार नसल्याचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘...मंग मीच निसर्ग व्हऊन गेलूया’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'पाखरांची नक्कल करायची लय सवय व्हती. मंग त्याचा नादच लागला. ह्ये पाखरू कोणतं? ते पाखरू कसा आवाज काढतंया, ह्ये जनावर बिथारलं तर कसा आवाज करतंया अशी समदीच उजाळणी केली आन् काय सांगता राव, पाखरांचा आवाज काढू लागलो की. जनावरांचा आवाज काढून आता त्येंला जवळ बोलावतुया. आता तर मीच निसर्ग व्हऊन गेलूया...' हे शब्द आहेत ठकाबाबा गांगड यांचे. ठकाबाबा हे निसर्गाचे लेकरू. त्यांना अभ्यासाने पशुपक्ष्यांची भाषा आत्मसात झाली आणि पाहता पाहता तेही निसर्गाचा एक भाग होऊन गेले.

'मटा संवाद' कार्यक्रमात बुधवार, १८ मे रोजी निसर्गप्रेमी व पशुपक्ष्यांची भाषा जाणणारे ठकाबाबा गांगड यांचा वाचकांशी संवाद होणार आहे. कॅनाल रोड, तिडके कॉलनी येथील देशस्थ ऋग्वेद मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी ठकाबाबा केवळ पशुपक्ष्यांचे आवाजच काढून दाखवणार नाही तर निसर्गाची भाषा कशी जाणायची याचा परिपाठच घेणार आहेत.

लहान असताना गुरे चारण्यासाठी मोठ्या डोंगरावर, जंगलात जाणारे ठकाबाबा तेथे प्राण्यांच्या- पक्ष्यांच्या सान्निध्यात यायचे. मग दिवसभर त्यांना तोच चाळा असायचा. पक्षी कसा आवाज काढतात याचे ते निरीक्षण करायचे. अगदीच जवळ असणाऱ्या प्राण्यांच्या भावभावना ते ओळखू लागले आणि मग हळूहळू त्यांची नक्कल करू लागले. शाळेचे एकही बुक न वाचलेले ठकाबाबा निसर्गाची परीक्षा मात्र उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. ते चार-पाच वर्षांचे असताना वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्यांचा सांभाळ आईनेच केला.

'म्हपल्या कला दाखवायला लय लांब लांब जाऊन आलूया. आता तर माझा नातूपण ये कर्तब करून दाखवायला लागलाय. निसर्गाने माणसाला लय दिलंय, पण जेनं त्येनं काय घ्यायचं ते ठरवायचं,' असे ठकाबाबा सांगतात. अशा अवलियाला भेटण्याची संधी आज मटाने उपलब्ध करून दिली आहे. कार्यक्रम विनामूल्य असून, रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

कलेने केली हलाखीवर मात

आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने शेळ्या-गुरे चारण्याचे काम त्यांच्यावर येऊन पडले. तरुण वयात आल्यानंतर तमाशाचे वेड लागले आणि त्यात नकला करण्याचे काम मिळाले. या नकलाकारातूनच पुढे चेहऱ्याचे विचित्र प्रकार करण्यास बाबांनी सुरुवात केली. आजमितीला ते कान हलवून दाखवणे, जीभ नाकाला लावणे, श्वास ओढून नागाचा फणा तयार करणे, पोटाची उलटापालट करणे, घोरपडीच्या पोटाचा आकार तयार करणे यांसारखे कर्तब लीलया करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वामीचरणी टेकला माथा

0
0

अक्कलकोट पालखी यात्रा परिक्रमेचे येवल्यात स्वागत


म. टा. वृत्तसेवा, येवला
श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने आयोजित अक्कलकोट पालखी यात्रा परिक्रमेचे येवल्यात नुकतेच स्वागत केले गेले. त्यानिमित्त शहरातील स्वामी समर्थ केंद्रापासून शहरातील मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. शहरातील विविध मार्गावरून मार्गस्थ होत शहरातील कासार गल्लीतील कालिका माता मंदिर पोहोचलेली ही मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट धर्मदाय संस्थेच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी यात्रा परिक्रमा दरवर्षी आयोजित केली जाते. सदर पालखी परिक्रमा २६ नोव्हेंबर २०१५ रोजी सुरू होऊन संपूर्ण महाराष्ट्रात परिक्रमा करीत ८ जूलै २०१६ रोजी अक्कलकोट येथे पोहोचते. परगावच्या स्वामी भक्तांना ज्यांना त्यांच्या कामाच्या व्यापामुळे, प्रकृती अस्वस्थामुळे किंवा परिस्थितीमुळे श्री स्वामींच्या दर्शनास अक्कलकोट येथे येऊन श्रींची सेवा करता येत नाही, अशा माता, भगिनी व अबालवृद्धांना व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ पालखी पादुकांच्या दर्शनाचा लाभ व्हावा आणि श्री स्वामींच्या सेवेची संधी लाभावी या उद्देशाने पालखीचे आयोजन करण्यात येते.


या वेळी संस्थानाच्या नियोजित महाप्रसाद गृह, ध्यानधारणा मंदिर व यात्री भूवन इमारत बांधकाम प्रकल्पांसाठी तसेच येथे दररोज हजारो स्वामी भक्तांसाठी अविरत चाललेल्या अन्नदानाच्या स्वामी कार्यासाठी निधी उपलब्धतेसाठीही याचे आयोजन होत असते. पालखीत अक्कलकोट येथील दीडशे भक्तगण सामील असून त्यांची भोजन व निवास व्यवस्थेची विनोद पोफळे (कासार) हे गेल्या वीस वर्षांपासून अखंडपणे करीत आहेत. यावेळी महाप्रसादाचा लाभ घेऊन पालखी पुढे लासलगाव येथे मार्गस्थ झाली.

परिक्रमेच्या स्वागतासाठी मुकुंंद कासार, नारायण कंदलकर, अरूण कंदलकर, नगरसेवक संजय कासार, राजू चिनगी, औरंगाबाद येथील नितीन पातूरकर, अतुल पोफळे, रूपेश लोणारी, गणेश लोणारी, मनोज लोणारी, विनोद पोफळे, पप्पू चांदवडकर, बालू पोफळे, प्रशांत कासार, नंदू नागपुरे, गणेश दोडे, सेवेकरी, महिला व युवक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाफेड कार्यालयाला कुलूप ठोकणार

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करायचा आणि कांद्याचे भाव पाडायचे हा केंद्र सरकारचा डाव आहे. कांदा व्यापार निर्बंध मुक्त करावा व त्याची अंमलबजावणी करावी अन्यथा बुधवारी पिंपळगाव नाफेड कार्यालयाला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांनी दिला आहे.

अर्जुन बोराडे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सरकारच्या कांदा खरेदी भूमिकेवर संशय उपस्थित केला आहे. केंद्राने नाफेडमार्फत लासलगाव, पिंपळगाव आणि कळवण येथे कांदा खरेदी करत आहे. नाफेडला जिल्ह्यातून ५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामध्ये आतापर्यंत एक हजार टनापेक्षा जास्त कांदा खरेदी केला आहे. रोज थोडा-थोडा कांदा खरेदी करून कांद्याचे बाजारभाव पाडण्याचे काम नाफेडचे अधिकारी करत आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. तर नाफेडचे दर हे स्थानिक व्यापाऱ्यांपेक्षा कमी आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

केंद्राच्या निर्देशाचे पालन नाही

केंद्र सरकार आणि नाफेडदरम्यान झालेल्या व्यवहारात रोजच्या बाजार भावाप्रमाणे कांदा खरेदीचे निर्देश आहेत. मात्र तरीही त्याचे पालन होत नाही. तसेच सरकारच्या धरसोडवृत्तीमुळे निर्यात बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे. तसेच कांदा पिकावरील व्यापार, साठवणूक व निर्यातीवरील सर्व निर्बंध कायमस्वरूपी काढून कांद्याला किमान दोन हजार रुपये क्विंटल भाव द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अन्यथा बुधवारी, (दि. १८) रोजी नाफेड कार्यालयाला कुलूप ठोकले जाईल, असा इशारा दिला आहे. यामध्ये कार्यकारिणी सदस्य अनिल धनवट, संतू झांबरे, शंकर पुरकर, सीमा नरोडे यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाकडे दुर्लक्ष

0
0
उन्हाळ्याच्या अखेरच्या चरणात तालुक्यात पाणी टंचाईने परिसीमा गाठली असून सरकारने या दुष्काळ झळांकडे अक्षरशः दुर्लक्ष केले आहे. त्यामळे परिसरातील जनतेला सामाजिक संघटनांकडून पुरविण्यात येत असलेल्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. सामाजिक संघटना पाणी पुरवित असल्यामुळे तालुका प्रशासनही याकडे दुर्लक्ष करीत आहे.

माहिती लीक केल्यामुळे स्वागतची हत्या!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपली माहिती भांडण असलेल्या व्यक्तीला पुरवितो, या संशयावरून स्वागत कन्साराची हत्या केल्याची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली. विशेष म्हणजे रविवारी सकाळपासून सोबत फिरल्यानंतर संशयित आरोपींनी स्वागतची हत्या केली.

रविवार पेठ परिसरातील मल्हार गेट पोलिस चौकीजवळ स्वागत कन्साराची (वय ३६) रोहित दिनकर सापटे (वय २७) आणि श्रीकांत उर्फ सनी सुनील पगारे (वय २४) या दोघांनी रविवारी संध्याकाळच्या सुमारास भररस्त्यात हत्या केली. साधारणतः आठ महिन्यापूर्वी संशयित आरोपी सनी पगारेचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. मयत कन्सारा आणि सनी पगारे एकाच परिसरात राहत असल्याने आणि मित्रही असल्याने या वादाची माहिती कन्साराला होती. आपली सर्व माहिती कन्सारा वाद झालेल्या व्यक्तीला पुरवितो, अशी शंका पगारेला होती. त्यातूनच त्यांच्यात कधी एकमेकांना चिवडवण्याचे तसेच वादाचेही प्रसंग उद्भवत होते. हनुमान जंयतीनंतर मात्र हे वाद विकोपाला गेले. घटनेच्या दिवशी म्हणजे १५ मे रोजी तिघे बरोबरच होते. संध्याकाळच्या सुमारास हाच मुद्दा चर्चेला येताच सनी पगारे आक्रमक झाला. त्याने त्याच्या साथिदारासमवेत कन्सारावर हल्ला चढवला. कन्साराच्या डोक्यात विटेचा वर्मी घाव बसल्याने त्याचा मृत्यू झाला.

याबाबत बोलताना सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी सांगितले की, स्वागत कन्साराची हत्या पूर्वनियोजित होती, असे प्रथम दर्शनी दिसून येत नाही. एकमेकांना माहिती पुरविण्याच्या कारणाहून त्यांच्यात सातत्याने वाद सुरूच होते. यातील सनी पगारे हा संशयित एका खासगी कंपनीत कामाला असून, त्याचे वडील महापालिकेत कर्मचारी आहेत. त्यालाही महापालिकेची नोकरी लावण्यासाठी घरच्यांचे प्रयत्न होते. यातील दुसरा संशयित सापटे हा २०१३ मध्ये दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आला होता. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असले तरी कन्सारा खून प्रकरणात मुख्य भूमिका पगारेची असल्याचे प्रथम दर्शनी दिसते, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या परिसरात बंद वाड्यामध्ये काही स्थानिक मुले मद्य प्राशन करतात, असे समोर येते आहे. आमचे गस्तीचे वाहन रात्री १० वाजेनंतर टवाळखोरांवर शक्य तितके लक्ष ठेऊन कारवाई करीत असते, असे कोल्हे म्हणाले. अशा कारवाईत आता वाढ करण्यात येईल, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरमला पाणी सोडा; अन्यथा रस्त्यावर उतरू

0
0

संतप्त ग्रामस्थांनी दिला इशारा

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील आरमनदी खोऱ्यातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई भासत असून ग्रामस्थांसह जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. केळझर धरणातील शिल्लक ८५ दशलक्ष घनफूट पाणी तीव्र उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन कमी होत असल्याने येत्या तीन दिवसात आरमनदीपात्रात पाणी सोडले नाही तर ३८ गावांतील ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील, असा इशारा सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक सूर्यवंशी, जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी, सिंधुबाई सोनवणे यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, केळझर धरणात सद्यस्थितीत अवघे ८५ दशलक्ष घनफूट पाणी आहे. मार्च महिन्यात केळझरचे आवर्तन सोडल्यानंतर अखेरचे आवर्तनासाठी पाणी राखून ठेवले आहे. मार्च, एप्रिलनंतर आता मे महिन्याचा दुसरा पंधरवडा सुरू झाला तरीही केळझरचे आवर्तन सोडण्यात आले नाही. परिणामी धरणावर अवंलबून असलेल्या डांगसौदाणे, चौधांणे, कपालेश्वर, तताणी, मुंजवाड, मळगाव, पिंपळदर, दऱ्हाणे यासह ३८ खेड्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. धरणातील शिल्लक जलसाठा बाष्पीभवनाने संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत असूनही पाणी सोडण्यात येत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लातूरसारख्या ठिकाणी रेल्वेद्वारे पाणी पुरविण्यात येत असताना केळझर धरणातील लाभक्षेत्रावर अवलंबून असलेल्या गावांना मात्र उपलब्ध पाणीही सोडणे प्रशासनाला शक्य होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. येत्या ३ दिवसात केळझरचे आवर्तन न सोडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ट्रू लाइफ’च्या कार्यालयावर छापा

0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

गुंतवणूकदारांना साखळी पध्दतीने मार्केटिंग करण्याचे व आकर्षक आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या ट्रू लाइफ व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भाभानगर येथील मुख्य कार्यालय व सिडकोच्या कामठवाडे येथील निवासस्थानी औरंगाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी छापा टाकला. या छाप्यात कागदपत्रे, संगणक डाटा व इतर साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी संशयित दीपक सूर्यवंशी हा पोलिसांबरोबरच होता.

भाभानगरच्या नवशक्ती चौकातील जगन्नाथ सोसायटीच्या पवार नामक यांच्या मालकीच्या रो हाऊसमध्ये आठ हजार रुपये मासिक भाड्याने दीपक सूर्यवंशीने कार्यालय थाटले. येथे तीन चार महिला कर्मचारी कार्यालय चालवत होत्या. भाभानगरच्या याच कार्यालयाच्या पत्त्यावर त्याने संस्था व दुकाने नोंदणी शॉप अॅक्ट लायसन्स, भारत सरकारचे कंपनी नोंदणी, आयकर विभागाचे पॅनकार्ड, महाराष्ट्र बँकेचे अकाऊंट आदी काढले असून, या प्रकरणी घरमालकाचे जबाब नोंदविण्यात आले. दरमहा साखळी पध्दतीने साडेचार लाख रुपये कमविण्याचे आमिष दाखवून दीपक गुंतवणूकदारांना आकर्षित करीत होता. आर्थिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक सुभाष खडांगळे व सहकारी यांनी झडतीची कारवाई पूर्ण केली. रात्री उशिरापर्यंत कार्यालय व निवासस्थानाची झडती सुरू होती.

अंगठ्या, ब्रेसलेट, पैठणी साड्या जप्त

भाभानगरच्या नवशक्ती चौकातील जगन्नाथ सोसायटीच्या अगदी रस्त्याच्या दर्शनी भागात एका रो हाऊसच्या दुसऱ्या मजल्यावर अलिशान तीन रुमच्या कार्यालयातून झडतीच्या वेळी पोलिसांना गुंतवणूकदारांना आमिष म्हणून देण्यात येणारे सुमारे तीन लाख रुपये किमतीच्या अंगठ्या, ब्रेसलेट, पैठणी साड्या, सफारी सूट, संगणक व टॅब आदी साहित्य मिळून आले. पोलिसांनी जप्त केलेले साहित्य औरंगाबादला रवाना केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांची अतिक्रमणे आयुक्तांच्या रडारवर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोरगरिबांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणाऱ्या महापालिकेने आता बड्या राजकारण्यांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या नगरसेवकांना कारवाईच्या रडारवर घेतले आहे. त्याचा पहिला दणका पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना दिला आहे. बडगुजर यांनी आपल्या घर व संपर्क कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याने त्यांच्यासह त्यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांच्यावर थेट अपात्रतेची कारवाई सुरू केली आहे. बडगुजर यांच्यासोबतच आणखी तीन ते चार नगरसेवक आयुक्तांच्या रडारवर असून, या कारवाईने नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे.

डॉ. गेडाम यांनी सिंहस्थापूर्वीच शहरातील अनधिकृत अतिक्रमणे काढण्याचा धडाका लावला होता. सिंहस्थानंतर ही कारवाई थंडावली होती, तसेच लहान- मोठ्या व्यावसायिकांचे व गोरगरिबांचीच अतिक्रमणे काढली जात असल्याचा आरोप महापालिकेवर होत होता. त्यामुळे आयुक्तांनी आता दुसऱ्या टप्प्यात बड्या राजकारणी लोकांची अनधिकृत अतिक्रमणे रडारवर घेतली आहेत. बड्या राजकारण्यांमध्ये त्यांनी पहिला झटका शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर व त्यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांना दिला आहे. बडगुजर यांच्या संपर्क कार्यालयात व हर्षा बडगुजर यांच्या नावावर असलेल्या घरात मंजूर नकाशापेक्षा अतिरिक्त विनापरवाना बांधकाम केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आयुक्तांनी बडगुजर दाम्पत्याला थेट अपात्रतेची नोटीस बजावल्याने राजकीय क्षेत्रासह शहरात खळबळ उडाली आहे.
अनधिकृत बांधकाम प्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारासह तीन ते चार नगरसेवकांच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. या सर्वांवरही लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे. या नगरसेवकांनाही लवकरच नोटिसा दिल्या जाणार असून, बड्या राजकारण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका महापालिका पुसणार आहे. बडगुजरांसारख्या हेविवेट नगरसेवकावरच कारवाई होऊ शकते, तर आपल्यावर का नाही, या भीतीने नगरसेवक आता धास्तावले आहेत. अनेकांनी आपल्या बांधकामांची चाचपणी सुरू केली असून, या कारवाईचा धसका घेतला आहे.

संपर्क कार्यालये अनधिकृत

महापालिकेतील ७० टक्के नगरसेवकांनी अनधिकृत जागेत संपर्क कार्यालये थाटली आहेत. नागरिकांशी संवाद साधण्याच्या बहाण्याने ही संपर्क कार्यालये रस्त्यावरच थाटली असून, त्या संदर्भातही तक्रारी आहेत. मात्र, या बांधकामांवर कारवाईची हिम्मत अद्याप कोणीच केलेली नाही. त्यामुळे अनधिकृत संपर्क कार्यालये उभारणाऱ्या नगरसेवकांवरही आयुक्त कारवाई करतील काय, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. बडगुजरांवर कारवाई होते, मग अन्य नगरसेवकांवर का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अन्य नगरसेवकांच्या कारवाईकडे नजरा लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणुसकीचा झरा खुला!

0
0

तुषार देसले, मालेगाव

मालेगाव तालुक्यात पाण्याचा भीषण दुष्काळ असला तरी माणुसकी आणि संवेदनशीलतेचा प्रत्यय देणारा प्रसंग अशा दुष्काळातही पाहायला मिळत आहे. दुंधे येथील एका शेतकऱ्याने गावातील भीषण पाणीटंचाई पाहून आपले शेततळे, विहिरीचे पाणी मोफत उपलब्ध करून दिले. डाळींब बागेपेक्षा माणसे जगली पाहिजे, असे सांगत त्या शेतकऱ्याने माणुसकीचा झरा खुला करून दिला. मालेगाव तालुक्यातील गावागावात पाणीटंचाई उग्र स्वरूप धारण करीत आहे. प्रशासन टँकरांचे प्रस्ताव मंजूर करीत आहे, पण त्यासाठी लागणारे पाणी आणायचे कोठून हा देखील मोठा प्रश्न आहे. तालुक्यातील दुंधे ,माळीनगर, जवाईवस्ती येथील परिस्थिती देखील याहून वेगळी नाही. हंडाभर पाण्यासाठीचा टाहो गावातीलच प्रगतिशील शेतकरी मधुकर रौंदळ यांना पाहवला नाही. म्हणून त्यांनी थेट आपल्याच शेतातील शेततळे आणि विहिरीतील पाणी गावासाठी मोफत उपलब्ध करून दिले.प्रशासनाने दुंधे, माळीनगर व जावईवस्ती भागात पाण्याचा टँकर सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या परिसरात २० ते ३० किमीपर्यंत कुठेही पाणी नसल्याने टँकर भरायचा कोठून, असा प्रश्न निर्माण झाला. मधुकर रौंदळ यांची गावाजनिकच ४० एकर डाळींब बाग आहे. तसेच शेतात दीड एकरावर २००६ साली त्यांनी अनुदानातून केलेले शेततळे आणि विहीरही आहे. गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र पाहून त्यांच्यातील माणुसकी आणि संवेदनशीलतेने त्यांना अस्वस्थ करून सोडले. प्रशासन टँकर देत असेल तर शेततळे व विहिरीतील पाणी गावकऱ्यांना मोफत देतो, असा निर्णय त्यांनी घेतला. यातून प्रशासनाचा १५ हजार लिटर क्षमता असलेला टँकर रोज तीन फेऱ्या करून सुमारे ४० हजार लिटर पाण्याचे वाटप गावात करीत असून, पाणीटंचाईच्या या भीषण संकटात त्यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शेतीला पाणी देऊन झाडे जगतीलही, पण गावातील माणसे तहानलेली आहेत त्याचे काय? या विचारातून मी शेततळे व विहिरीतील पाणी गावकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला- मधुकर रौंदळ, दुंधे ता. मालेगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात वाढताहेत हॉटेल

0
0

बदलत्या आहार शैलीमुळे नाशकात हॉटेल्सची संख्याही लक्षणीयरित्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या ४ वर्षात शहर परिसरात तब्बल १५०० हॉटेल्सची भर पडली आहे. नाशिककर खवय्यांची रसना तृप्त करण्यापासून भरपेट जेवणापर्यंत अनेकानेक हॉटेल्स सेवेत आली आहेत. संडे मिसळचा ट्रेंड नाशकात हिट झाल्यानंतर मिसळ महोत्सव, चौपाटी महोत्सवासारख्या अनोख्या संकल्पनांनाही नाशिककरांनी बळ दिले आहे.

शहराचा विस्तार व लोकसंख्या वाढलेली असतांना चार वर्षात नाशिकमध्ये हॉटेलच्या संख्येत १५०० ने वाढ झालेली आहे. बदलत्या खाद्य संस्कृतीमुळे ही वाढ झपाट्याने होत असतांना जगभरातील खाद्यपदार्थ आता नाशिकमध्ये मिळू लागले आहे. विशेष म्हणजे एकेकाळी सायंताराचा साबुदाणा वडा, बुधाजी जिलबी, पांडे मिठाई सारख्या काही खाद्यपदार्थ प्रसिध्द होते. आता मात्र नाशिकमध्ये गल्ली बोळात, चौकाचौकात अनेक खाद्यपदार्थ सहज मिळू लागले आहे. खाऊ गल्लीपासून एसी हॉलमध्ये मिळणाऱ्या या पदार्थांसाठी खवैय्यांनी तितकीच दाद दिल्यामुळे हॉटेलचा धंदाही सध्या तेजीत आहे.

या खाद्यसंस्कृतीत मामाचा मळा, साधना मिसळ, संस्कृती या सारख्या हॉटेलने कृषी पर्यटनांचा आनंद देण्यासाठी आपले वेगळेपण राखत मराठी खाद्य संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. या खाद्य संस्कृतीत काही महत्त्वाच्या ठिकाणी खाऊ गल्ली तर काही चौकात असलेल्या पाणीपुरी, भेळ व पावभाजीच्या गाड्यांनी सुध्दा आपली वेगळी ओळख तयार केली आहे. नाशिकमध्ये जगभरातील पदार्थ मिळत असले तरी मिसळची भुरळ मात्र कमी झाली नाही हे विशेष आहे.

गेल्या पाच महिन्यात शहरामध्ये सुमारे २०० हॉटेल्सची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे व्यवसाय करण्यासाठी शॉप अॅक्ट लायसन्स घेणाऱ्यांची ही आकडेवारी आहे. शॉप अॅक्ट लायसन्स न घेणाऱ्यांची संख्या वेगळी असल्याची शक्यता आहे.

हॉटेलचा परवाना घेण्यासाठी आमच्याकडे अर्ज येतात. योग्य त्या निकष आणि कागदपत्रांच्या आधारे आम्ही परवाने देतो. गेल्या काही वर्षात हॉटेलचे परवाने घेण्यात वाढ झाली आहे. आता या परवाण्यासाठी ऑनलाइन सुविधाही सुरू केली आहे. - रमेश पाटील, शॉप अॅक्ट इनस्पेक्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुभंगलेल्या ओठांवर फुलणार हास्य

0
0

आर्थिक तरतुदीअभावी होऊ न शकणाऱ्या शून्य ते १८ वयोगटातील मुलांवरील विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. दुभंगलेले ओठ, तिरळेपणा यासारख्या रखडलेल्या ५०० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया करण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.

जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी आरोग्य विभागाची नुकतीच बैठक घेतली. यावेळी वैद्यकीय सुविधा आणि तत्मस बाबींची आढावा घेण्यात आला. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्यासह महापालिका, जिल्हा परिषदेचे अनेक वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात ० ते १८ वयोगटातील मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते. गतवर्षी जिल्ह्यात ७५ मेडिकल पथकांनी १२ लाख मुलांची तपासणी केली. प्रत्येक पथकामध्ये दोन डॉक्टर्स, एक परिचारिका आणि सहायक यांचा समावेश आहे. अंगणवाड्या, शाळांमध्ये जाऊन या पथकाने तपासणी केली. चार वर्षांमध्ये ३०० बालकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मात्र, या वर्षी किमान १०० शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मुलांच्या शस्त्रक्रिया करण्यास पालक नकार देतात. शस्त्रक्रियेबद्दलची त्यांच्या मनात असलेली भीती घालविण्यासाठी पालकांचे समुपदेशन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दुभंगलेले ओठ, तिरळेपणा यांसारख्या साडेतीन हजार शस्त्रक्रिया जिल्ह्यात करण्यात आल्या आहेत. मात्र, अजुनही निधीअभावी सुमारे ६०० शस्त्रक्रिया होऊ शकलेल्या नाहीत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अशा शस्त्रक्रियांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

स्त्री जन्मदरवाढीबाबत सूचना जिल्ह्यात सिन्नर, येवला, सुरगाणा आणि नाशिक तालुक्यामध्ये मुलींचा जन्मदर कमी असल्याची माहिती बैठकीमध्ये पुढे आली. या तालुक्यांमध्ये गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याचा संशय जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार यांनी गोपनीयरित्या तालुक्यांमध्ये अशा प्रकारची तपासणी होत असेल तर पर्दाफाश करावा असे आदेश दिले आहेत. त्यासाठी गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तहसीलदारांनाही कारवाईचे अधिकार मिळाल्याने कुठल्याही परिस्थितीत हे प्रकार थांबायला हवेत अशी अपेक्षा राधाकृष्णन यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्त चले जाव!

0
0

शहर पोलिसांच्या नाकर्तेपणाबद्दल राजकीय पक्षांमधूनही आता शिमगा सुरू झाला आहे. शहरात खाकीचा दरारा राहिला नसून दररोजच कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. सामान्य नागरिकांची सुरक्षितता आणि शहरातील शांतता धोक्यात आल्याबद्दल पक्ष प्रमुखांमधून नाराजी आणि संताप व्यक्त होऊ लागला आहे. गुन्हेगारांना धडकी भरविणारा धडाकेबाज पोलिस अधिकारी शहराला लाभायला हवा, अशी अपेक्षा सर्वच पक्षांचे प्रतिनिधी व्यक्त करू लागले आहेत.

शहरात दिवसाढवळ्या खूनासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. साडेचार महिन्यांत खूनाच्या १९ घटना घडल्या आहेत. भरदिवसा खुले आम धारदार शस्त्रांचा वापर होऊ लागला आहे. शहरात दहशत निर्माण करण्याचे काम गुन्हेगारी प्रवृत्तींकडून सुरू असून त्यामुळे नागरिकही भयभीत झाले आहेत. वाहने जाळपोळीच्या लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे शहरात खरोखरच पोलिस आहेत का? असा प्रश्न सर्वस्तरातील नागरिकांना पडू लागला आहे. भरदिवसा महिलांच्या गळ्यातील सौभाग्याचे लेणं हिसकावले जात असतानाही पोलिसांकडून ठोस कारवाया होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होऊ लागली आहे. वाहनचोरीच्या शेकडो घटना घडत असून चोरीस गेलेली वाहने परत मिळतील, अशी आशा नागरिकांना उरलेली नाही. पोलिस गुन्हे दाखल करीत असले तरी तपास होत नसल्याने नागरिक त्रासले असून ते लोकप्रतिनिधींकडे याबाबत पाठपुरावा करू लागले आहेत.

हवा 'सिंघम' अधिकारी महापालिकेच्या निवडणूका अवघ्या आठ-नऊ महिन्यांवर आल्या आहेत. पक्षांकडून निवडणुकांसाठीची तयारी सुरू झाली असताना वाढती गुन्हेगारी त्यांच्यासाठी देखील डोकेदुखीचा विषय ठरू लागली आहे. राजकीय पक्षांकडून पोलिस आयुक्तांना निवेदने देऊनही गुन्ह्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. पोलिसांच्या निष्क्रीयतेविरोधात सर्वच पक्ष एकवटू लागले आहेत. गुन्हेगारीवर जरब बसविणारा अधिकारी शहराला हवाय, अशी मागणी सरकारमधील मंत्र्यांकडे आता केली जाऊ लागली आहे. पोलिसांची बघ्याची भूमिका व नाकर्तेपणामुळे सरकार बदनाम होत आहे. पोलिस व्यवस्थेने कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपले काम चोखपणे पार पाडावे. चुकीचे कामे करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात मोहीम उघडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू, असा इशारा शहर भाजपचे पदाधिकारी व कादवा साखर कारखान्याचे संचालक सुनील केदार यांनीही दिला आहे.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिकमध्ये सक्षम पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. पोलिस दलात एवढी हतबलता यापूर्वी कधी पाहिली नव्हती. पोलिसांचे अस्तित्व आहे की नाही असा प्रश्न जनतेच्या मनात आहे. गुन्हेगारी नियंत्रित आली नाही तर लोक रस्त्यावर उतरतील. - जयंत जाधव, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

मी केलेल्या मागणीनुसार मल्हारगेट पोलिस चौकी सुरू करण्यात आली. तेथे दोन पोलिस कर्मचारी नेमले आहेत. हनुमानवाडी येथेही लवकरच पोलिस चौकी सुरू होईल. शहरात पोलिसांचा धाक वाढवावा लागेल. तडीपार गुंड शहरात वावरत असून कोंबिंग ऑपरेशन सारख्या कारवाया मोठ्या प्रमाणात करून जरब निर्माण करावी लागले. - देवयानी फरांदे, आमदार, भाजप

मुख्यमंत्र्यांचा गृह विभागावर वचक राहिलेला नाही. शहरातील भाजपचे तीनही आमदार पोलिसांवर दबाव आणतात. त्यामुळे पोलिस आयुक्तांना अशा प्रकरणांमध्ये निर्णय घेता येत नाही. नाशिकचे बिहार झाले आहे. याबाबत पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहोत. वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही रस्त्यावर उतरू. - शरद आहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस

शहरात जंगलराज सुरू झाले आहे. पोलिस चौकीच्या समोर भरदिवसा खून होणे ही गंभीर व शरमेची बाब आहे. या प्रश्नी लक्ष देण्यास पालकमंत्री आणि भाजपच्या तीन आमदारांना वेळ नाही. गुन्हेगारी विरोधात शिवसेनेने महामोर्चा काढला. परंतु, पोलिस व भाजपचे डोळे उघडलेले नाहीत. गुन्हेगारीविरोधात आंदोलन छेडले जाईल. - अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना

काही दिवसांपासून नाशिकमध्ये वाहन जाळपोळ व खुनाच्या सत्रामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिस आणि राज्य सरकारचा गुन्हेगारीवर वचक राहिलेला नाहीे. गुन्हेगारी प्रवृत्तींचे धाडस वाढत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आली नाही तर मनसे रस्त्यावर उतरेल. - अॅड. राहुल ढिकले, शहराध्यक्ष, मनसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणाला मनपाचे अभय?

0
0

गुंठेवारीतील बांधकामांवर नाही कारवाई; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

श्रमिकनगर भागातील खाजगी विकासकाने विकलेल्या गुंठेवारीच्या जागेवर अनधिकृत बांधकामास महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचा पाठिंबा तर नाही नां, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण, एकीकडे इमारतींच्या वाढीव पार्किंगच्या तक्रारी अशोकनगर भागात केल्याने पार्किंग शेड जमीनदोस्त करण्यात आले होते तर, दुसरीकडे महापालिकेची कुठलीच परवानगी न घेता गुंठेवारीच्या जागेवर बांधकाम झालेच कसे? असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

नाशिक शहरातील काही भागांमध्ये खासगी विकसकांनी त्यांना वाटेल अशा प्रकारे भूखंडांचे वाटप केले आहे. गुंठेवारी पद्धतीने शहराच्या काही भागात भूखंडांवर घरांची पक्की बांधकामे करण्यात आली आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत नांदूरनाका परिसरातील गुंठेवारीच्या ठिकाणी बांधलेले बंगले जमीनदोस्त करण्यात आले होते. अशाच प्रकारचे घरांचे बांधकाम श्रमिकनगर भागात देखील अनेकांनी कुठलीच परवानगी न घेता केले आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरपट्टी घरमालकांना लागू केल्याचेही समोर आले आहे. नगरसेवक लता पाटील यांनी अनधिकृत जागेवर उभारलेले एका ठेकेदाराच्या शेडसह अनधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी केली होती.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संबंधित शेडचे बांधकाम पाडले परंतु अनधिकृत घरांकडे मात्र, काणाडोळा केला होता. त्याचा फायदा अनेकांनी घेतला. परिणाम पूर्वी एक किंवा दोन पर्यंत मर्यादीत असलेला घरांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या हद्दीत असेलल्या नांदूरनाका शिवारात बंगल्यांचे बांधकाम अतिक्रमण विभागाने काढले होते. परंतु श्रमिकनगर भागातील गुंठेवारीच्या ठिकाणी असलेल्या अनधिकृत बांधकामांना महापालिकेचा पाठिंबा का असा सवाल उपस्थित होत आहे. महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची मागणी नगरसेवका पाटील यांनी केली आहे.

नाशिक महापालिकेने नांदूरनाका येथील गुंठेवारीच्या जागेवर बांधलेले बंगले अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून काढले होते. परंतु श्रमिकनगर भागातील केवळ एकाच शेडचे बांधकाम महापालिकेने काढले. उर्वरीत अनधिकृत बांधकामे महापालिका कधी काढणार? महापालिकेची साथ अनधिकृत बांधकामांना आहे का असा प्रश्न उपस्थित होतो.

- लता पाटील, नगरसेविका प्रभाग क्रमांक १७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयमा निवडणुकीची वाढणार चुरस

0
0

अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची (आयमा) निवडणुकीसाठी बुधवारी, तिसऱ्या दिवशी १८ अर्जांची विक्री झाल्याने आयमा निवडणुकीची चुरस वाढणार आहे. सत्ताधारी एकता पॅनलच्या वतीने अध्यक्षपदासाठी राजेंद्र आहिरे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. विरोधी गटातून तुषार चव्हाण यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्यामुळे आयमाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन प्रमुख औद्योगिक संघटना म्हणून 'निमा' आणि 'आयमा' या संघटनांची ओळख आहे. यात निमा व आयमाची अनेकदा झालेल्या निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आजी माजी पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात होते. यात बहुतांश वेळा 'आयमा'ची निवडणूक बिनविरोध झाली आहे. परंतु, सत्ताधारी गटाच्या विरोधत असलेल्या तुषार चव्हाण यांनी अध्यक्षपदाच्या जागेवर आपला हक्क दाखविल्याने 'आयमा' निवडणुकीची रंगत वाढणार आहे. त्यातच अर्ज विक्रीच्या तिसऱ्या दिवशीही १८ अर्जांची विक्री झाली. यामुळे ३० जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीसाठी एकूण ३० अर्जांची विक्री झाली आहे. दरम्यान सत्ताधारी गटांकडून माजी अध्यक्ष असलेले विजय तलवार, जे. एम. पवार, पी. के. शेट्टी, बी. पी. सोनार, धनजंय बेळे, एस. एस. आनंद, जे. आर. वाघ, एस. एस. बिर्दी, संदीप सोनार, ज्ञानेश्वर गोपाळे, सुरेश माळी व विवेक पाटील यांनी अध्यक्षपदावर विद्यमान सरचिटणीस राजेंद्र आहिरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. अर्ज विक्री व स्वीकृतीसाठी गुरुवारपर्यंत (दि. १९) मुदत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रीन जीमला उन्हाचा चटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

उपनगर परिसरात अनेक ठिकाणी ग्रीन जीम उभारण्यात आल्या आहेत. मात्र, येथे ग्रीन म्हणजे हिरवळ नावाला सुद्धा नाही. सकाळी आणि सायंकाळी कडक उन्हाळामुळे जीमचा वापर करता येत नाही. दुपारी लहान मुले कडक उन्हात या जीमचा खेळणी म्हणून उपयोग करीत आहेत. ओपन जीमजवळ वृक्षारोपणाची किंवा शेडची मागणी होत आहे.

उपनगर परिसरात पाच ते सहा ठिकाणी आमदार देवयानी फरांदे यांच्याहस्ते काही दिवसांपूर्वी ग्रीन जीमचे उदघाटन झाले. इच्छामणी गणेश मंदिराजवळ जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आला आहे. ट्रॅक शेजारीच ग्रीन जीमचे साहित्य उभारण्यात आले आहेत. सायंकाळी ज्येष्ठ नागरिक त्याचा वापर करतात. मात्र, सायंकाळी उन्हाचा कडाका कायम असतो. त्यामुळे तापलेल्या व्यायाम साहित्याचा वापर करता येत नाही. सकाळीही तीच परिस्थिती असते. या जीम शेजारी दिवे बसवल्यास सायंकाळनंतर त्यांचा वापर करता येईल. मनपाने नागरिकांच्या मागण्यांची दखल घ्यावी, असा सूर उमटत आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत टँकरसाठी व्यावसायिक सरसावले

0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

सध्या पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर झाला आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात पाण्याची समस्या भेडसावू लागली असून, पाऊस पडेपर्यंत नागरिकांना किमान पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने विल्होळी ग्रामपंचायत हद्दीतील काही व्यवसायिकांनी मोफत टँकर सुविधा सुरू केली आहे.

विल्होळी गावातील संघर्षनगर व बजरंगवाडीत पाण्याची टंचाई चांगलीच जाणवू लागली आहे. शेतीला तर सोडाच परंतु पिण्यासाठीसुद्धा नागरिकांना पाणी मिळत नसल्याने येथील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू असते. यावर उपाय म्हणून विल्होळीचे सरपंच बाजीराव गायकवाड, उपसरपंच ताराबाई वाघ, संजय गायकवाड यांनी परिसरातील काही व्यवसायिकांच्या मदतीने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अनिलकुमार कन्स्ट्रक्शनचे रवींद्र भालेराव व मनूशेठ गुलाटी यांनी पाऊस पडेपर्यंत दररोज पाच टँकर मोफत देण्याचा निर्णय घेतला. गावातील नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे त्याचबरोबर त्यांना पाण्यासाठी वणवण होवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे भालेराव यांनी सांगितले. कालपासून हे टँकर उपलब्ध झाले आहेत. याप्रसंगी भालेराव, गुलाटी, संजय गायकवाड, संतोष आल्हाट, ग्रामविकास अधिकारी बी. एम. पगार, नवनाथ गाडेकर, सोमनाथ भावनाथ, संपत बोंबले, शरद पवार, अर्चना थोरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

कोण काय म्हणते

विल्होळी गावासह परिसरातील अनेक वस्त्यांवर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेतीतील विहिरींनासुद्धा पाहिजे त्या प्रमाणात पाणी राहिलेले नाही. त्यामुळे पाऊस येईपर्यंत नागरिकांना किमान पिण्यासाठी पाणी देण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. दानशूर व्यक्तींनी टँकर देण्याचे आवाहन केल्यावर अनिलकुमार कन्स्ट्रक्शनने ही जबाबदारी घेतल्याने आनंद झाला आहे. दररोज पाच टँकर येणार असल्याने नागरिकांना पाणी उपलब्ध होईल.

- बाजीराव गायकवाड, सरपंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्री श्री रविशंकर यांचा दारुबंदीस पाठिंबा

0
0

नाशिकमधून छत्रपती युवा व युवती सेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दारुबंदी आंदोलनाचा श्रीगणेशा करण्यात आलेला आहे. देशातील प्रगत व पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखले जाते. मात्र, महाराष्ट्रातील व्यसनाधिनतेचे प्रमाण अन्य राज्यांपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रातील युवा पिढीला वाचविण्यासाठी महाराष्ट्र दारुबंदी आंदोलनाचे नेतृत्व करणारे गणेश कदम, मराठी अभिनेता चिन्मय उद्गीरकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे महाराष्ट्र राज्य समन्वयक विजय हाके यांनी रविशंकर यांची बंगलोर येथे नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांनी जनआंदोलनाचे समर्थन केले. यावेळी तुषार भोसले, विक्रम कदम, विशाल झांजरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांच्या वारसांना व्यापारी बॅँकेची मदत

0
0

नाशिक जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ८५ कुटुंबियांना नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेतर्फे २४ लाख ६९ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते जेलरोडच्या इंगळेनगर शाखेत शुक्रवारी (दि. २०) सकाळी नऊला मदतीचा धनादेश प्रदान केला जाणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड आणि उपाध्यक्ष सुधाकर जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, अशोक चोरडिया, मनोहर कोरडे, रामदास सदाफुले, श्रीराम गायकवाड आदी उपस्थित होते.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी आत्महत्या या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक आणि सभासदांनी घेतला होता. सभासदांनी लाभांशाच्या दोन टक्के, संचालक मंडळाने वर्षभराचा सभा भत्ता आणि कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन देण्याचे ठरले होते. त्यानुसार २४ लाख ६९ हजाराचा निधी जमा झाला आहे. जिल्हाभरातील ८५ कुटंबीयांना प्रत्येकी सुमारे २० हजाराची मदत मिळणार आहे. रक्कम उरली तर मुख्यमंत्री निधीला दिली जाणार आहे. कार्यक्रमानंतर संजय गिते आत्महत्येवर समुपेदशन करतील. शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमाला खासदार संजय राऊत, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, जिल्ह्यातील खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत.

'रिपाइं'तर्फेही मदत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे दुष्काळग्रस्तांना सव्वा लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री निधीसाठी नुकतीच देण्यात आली. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील संपत कांबळे, उत्सव समितीचे अध्यक्ष देवीदास दिवेकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी अतुल भावसार, प्रेमनाथ पवार, शैलेश शिंगवेकर, दिनेश केदार, गोरख गांगुर्डे, वाहिद खान, सुनील बर्वे, आदी उपस्थित होते. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती असल्याच्या निमित्ताने सव्वा लाखाचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images