Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जिल्ह्यात टँकरसंख्या तिप्पट

$
0
0

६४७ गावे आणि वाड्यांना १९७ टँकरने पाणीपुरवठा; येवल्यात सर्वाधिक ३३ टँकर
म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या नाशिककरांची तहान सध्या टँकरच्या माध्यमातून भागवली जात आहे. कोरडी पडलेली धरणे आणि भूगर्भातील पाणी आटल्याने शेकडो वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणी पोहोचवावे लागत आहे. गतवर्षापेक्षा यंदा जिल्ह्यात तिप्प्ट टँकर धावत आहेत.

पावसाने पाठ फिरविली की पाणीटंचाईचा समस्या कशी हैराण करून सोडते, याचा अनुभव सध्या जिल्हावासी घेत आहेत. कधी नव्हे, ते जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांना यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विहिरी, तलाव यांसाख्या जलाशयांमधील पाणी आटले आहे. भूगर्भातील पाणी पातळीदेखील कमालीची खाली गेली आहे. धरणांमधील शिल्लक पाणीसाठा पुरवून वापरण्याचे काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे. मनमाडसारख्या ठिकाणी महिन्यातून एकदा पाणी पुरविण्याची वेळ आली आहे. थोड्याबहूत फरकाने जिल्ह्यातील बहुतांश भागात अशीच परिस्थिती असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावरच प्रशासनाकडून भर दिला जात आहे.

मे महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात जिल्ह्यात १९१ गावे आणि ४५६ वाड्या अशा ६४७ ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी १६२ सरकारी आणि ३५ खासगी टँकर्सची मदत घेण्यात येत आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत १०२ गावे आणि १६९ वाड्या अशा २७१ ठिकाणी अवघ्या ६९ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात होता. यंदा गावांची संख्या दुपटीने, वाड्यांची आणि टँकर्सची संख्या तिपटीने वाढल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गतवर्षी सर्वाधिक १३ टँकर येवला तालुक्यात पाणीपुरवठा करीत होते. त्याखालोखाल

सिन्नरमध्ये १२, नांदगावात १० टँकरद्वारे पाणी पुरविले जात होते. यंदाही सर्वाधिक ३३ टँकर एकट्या येवल्यात सुरू आहेत. नांदगावात ३१, सिन्नरमध्ये ३०, बागलाणमध्ये २५ टँकर रहिवाशांची तहान भागवित आहेत.

टँकर्सची द्विशतकाकडे वाटचाल जिल्ह्यात सध्या १९७ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आणखी काही टँकर्सची मागणी नोंदविण्यात आली असून, त्यामुळे येत्या एक दोन दिवसांतच टँकर्सचे द्विशतक पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली. जिल्ह्यात टँकर्सच्या ६१९ फेऱ्या मंजूर असून, त्यापैकी ५९२ फेऱ्या सुरू आहेत. सिन्नरमध्ये सर्वाधिक १७० ठिकाणी टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नाशिक आणि कळवण तालुका वगळता जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'पॉश' हॉटेलमधील देहविक्रीचा अड्डा उद्‍ध्वस्त

$
0
0

हॉटेल मालकासह एकास अटक

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाथर्डी फाटा भागातील एका मोठ्या हॉटेलमध्ये सुरू असलेला अनैतिक व्यवसायाचा अड्डा शहर पोलिसांनी उध्दवस्त केला. शनिवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या कारवाईत पोलिसांनी हॉटेलमालकासह एकास अटक केली. पीडित महिला मुंबई येथील असून, त्यांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.

फाळके स्मारकाजवळील हॉटेल हॉलिडे इनमध्ये पोलिसांना छापा मारला. हॉटेलमध्ये काही अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त अतुल झेंडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झेंडे, इंदिरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सदानंद इनामदार, सहायक पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक दिघे, हवालदार पाळदे, शेख, खोब्रागडे, जोरी, राजगुरू अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हॉटेल परिसरात सापळा रचला. पोलिसांनी दोघा पंचासमक्ष हॉटेलमध्ये डमी कस्टमर पाठवला. या बनावट ग्राहकाने आतमध्ये सुरू असलेल्या उद्योगाची माहिती देताच पोलिसांनी छापा मारून पाच पुरूषांसह दोन महिलांना ताब्यात घेतले. अटक केलेल्यांमध्ये अजय भालचंद्र ततार (वय ३५) आणि सुशील बाबाजी दीक्षित (वय ४१) यांचा समावेश आहे. राणेनगर परिसरातील साईदर्शन अपार्टमेंटमध्ये राहणारा ततार हा हॉटेल हॉलिडे इनचा मालक असून, पिंपळगाव बसवत येथील दीक्षित हा ग्राहक म्हणून आलेला होता. इतर तिघे जण हॉटेलमधील कर्मचारी आहेत. पोलिसांनी छापा मारल्यानंतर चारकोप मुंबई आणि भिवंडी ठाणे येथील अनुक्रमे ३२ आणि २६ वर्षीय महिलांची सुटका केली. पोलिसांनी या संशयितांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ४, ५ आणि ७(एक)नुसार गुन्हा दाखल केला. अटक केलेल्या दोघा संशयितांना आज कोर्टासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

याबाबत बोलताना एसीपी झेंडे यांनी सांगितले की, मागील दोन ते तीन महिन्यांपासून हा उद्योग सुरू असावा. मुंबई येथून आलेल्या मुलींना लागलीच परत पाठवले जात होते. त्यामुळे येथे प्रत्येक वेळी नवीन मुली येत होत्या. आज सुटका केलेल्या मुली मागील आठवड्यात शहरात येऊन गेल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पण झाले आहे. पवननगर पाठोपाठ हॉटेलमध्ये सुरू असलेला अनैतिक व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी उध्दवस्त केला असून नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात येते आहे.

हॉटेल परवाना रद्द? हॉटेल हॉलिडे इनच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हॉटेलचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती एसीपी अतुल झेंडे यांनी दिली. देहविक्री व्यवसायातून सुटका केलेल्या महिलांची रवानगी वात्सल्य महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संभाजी हे युध्दसन्मुख राजपुत्र’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोर्तुगीज, इंग्रज व मुस्लिम या तिघांनाही संभाजी महाराजांची दहशत वाटत होती. इंग्रजांनी तर अ वॉरियर प्रिन्स असा त्यांचा गौरवच केला. त्यांना युध्दसन्मुख राजपुत्र म्हटले जात होते. औरंगजेबाला शिवाजी राजांपेक्षाही दहापट तापदायक ठरणारा हा छत्रपती मरणासन्न अवस्थेतही कुणाला शरण गेला नाही, असे मत इतिहास अभ्यासक प्रशांत देशमुख यांनी व्यक्त केले.

९५ व्या वसंत व्याख्यानमालेत 'छत्रपती संभाजी महाराज' या विषयावरील चौदावे पुष्प प्रशांत देशमुख यांनी गुंफले. हे पुष्प पंडितराव खैरे यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले होते. गोदाघाट येथील यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर ही व्याख्यानमाला सुरू आहे.

देशमुख पुढे म्हणाले की, शंभुराजांचे चरित्र मराठी माणसासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. त्यांच्या पाठीशी जन्मत:च संघर्ष लागलेला होता. जन्मल्याबरोबर आईच्या दुधासाठी संघर्ष करावा लागला. दोन वर्षाचे झाल्यावर मातेचे छत्र हरवले. वयाच्या आठव्या वर्षी शंभुराजांना दिलेरखानाकडे ओलीस रहावे लागले होते. नाशिकमधला रामशेज किल्ला साडेपाच वर्षे संभाजी राजांनी लढवला, पण औरंगजेबाला मिळू दिला नाही. औरंगजेबाला जिवंतच तुरुंगात डांबतो, अशी इच्छा मनाशी बाळगणारे संभाजी खरोखर लढवय्ये होते. यावेळी योगेश खैरे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, प्रवीण खाबिया यांची प्रमुख उपस्थिती होती.

अमृतमधुरी प्रकल्प राबवावा : आनंद बोरा सिक्कीम धर्तीवर अमृत मधुरी हा जलधारा प्रकल्प राज्यात राबविणे आवश्यक असून, पाण्याचे सर्व स्त्रोत नकाशावर आणून त्या नुसार पाण्याचे नियोजन केल्यास पाण्याची मोठी बचत होणार आहे, असे मत आनंद बोरा यांनी व्यक्त केले. ९५ व्या वसंत व्याख्यानमालेत 'रक्षण पर्यावरणाचे' या विषयावरील तेरावे पुष्प आनंद बोरा यांनी गुंफले. हे पुष्प नरेंद्र नाना मालुसरे यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात आले होते. गोदाघाट येथील यशवंतराव देवमामलेदार पटांगणावर ही व्याख्यानमाला सुरू आहे. बोरा पुढे म्हणाले की, सिक्कीम ने त्यांच्या परिसरातील नदी, नाले, धरणाचे सर्व पाण्याचे स्त्रोत नकाशावर आणले व वेबसाईट करून नागरिकांना नवीन पाण्याचा स्रोत दिसला तर त्याने तो त्या वेबसाईट वर जाऊन लोड करण्याची सुविधा दिली आणि तो प्रयोग यशस्वी झाला. प्रचंड वृक्षतोड, वाहनाची वाढलेली प्रचंड संख्या, मोठ मोठी होऊ घातलेली गृह प्रकल्प, डोंगरांचे उत्खनन, नदीतील प्रदूषण ही निसर्गाला हानी पोहचविणारी प्रमुख कारणे असून, पाण्याचे नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील ७० किल्ल्यावर बारमाही पाण्याचे कुंड आणि झरे आहेत. या पाण्याचा उपयोग किल्ल्यांखालील गावांसाठी होऊ शकतो. पाण्याचे साठे वाढवायचे असेल, तर झाडांची संख्या देखील वाढायला हवी, असेही ते म्हणाले.

आजचे व्याख्यानविषय : न्यायाची संकल्पना व न्याय प्रक्रियेतील समाजाचा सहभागवक्ते : न्या. अंबादास जोशी, मुंबईस्थळ : यशवंतराव देवमामलेदार पटांगण, गोदाघाटवेळ : सायंकाळी ७ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असह्य उकाडा अन् खंडित वीजपुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

वीज कंपनीने पावसाळी काम हाती घेतल्याने शहरातील वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित होता. त्यातच सूर्यानेही आग ओकल्याने तापमानात असहाय्य वाढ झाली होती. या सर्व कारणांमुळे व्यावसायिकांसह नागरिकांची लाही लाही झाली.

पावसाळा जवळ आल्यावर वीज कंपनी विविध कामे हाती घेते. वादळी पावसामुळे विजेच्या तारांवर आलेल्या फांद्यामुळे वीज प्रवाह खंडित होतो. तसेच, तारा तुटून नागरिक व पशुपक्षी यांच्या जीवावर बेतल्याचे प्रसंग घडतात. त्यामुळे वीज कंपनी पावसाळ्याच्या आधी म्हणजे मे महिन्यात पावसाळी कामे हाती घेते. मात्र, त्यासाठी वीजपुरवठा खंडित केला जातो. आज नाशिक, गंगापूररोड, म्हसरूळ, नाशिकरोड, सिडको, पंचवटी असा अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. गंगापूररोड, चांदशी, सावरकरनगर, दादोजी कोंडदेवनगर, आनंदवली या परिसरात सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाचपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. नाशिकरोडलाही वीजपुरवठ्यात व्यत्यत येत होता. पाच दिवसांपूर्वी शहरात गारांसह वादळी पाऊस झाला तेव्हाही वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर गेल्या चार दिवसात कारण नसतानाही वीजपुरवठा खंडित होत आहे. आज तर कळसच गाठला गेला.

‌भूमिगत तारा टाका वीज कंपनीने विजेच्या तारा काही ठिकाणी भूमिगत केल्या आहेत. अनेक ठिकाणी अद्याप खांबावरच तारा आहेत. त्यामुळे झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी मनुष्यबळ व पैसा खर्च करावा लागतो. निसर्गाचीही हानी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्वॉलिटी कंट्रोलची नावालाच तपासणी

$
0
0

Gautam.Sancheti@timesgroup.com

रस्ते, पुल, इमारत, बंधारे व इतर शासकीय बांधकामात कामाचा दर्जा घसरू नये म्हणून शासनाने क्वॉलिटी कंट्रोलच्या प्रयोगशाळेतून बांधकाम साहित्याची तपासणी करणे सक्तीचे केले असले, तरी या विभागातून परीक्षण केलेले बांधकाम साहित्य बहुतांश ठेकेदार प्रत्यक्षात वापरत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, महानगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या प्रयोगशाळा आहे, तर नगरपालिका व इतर काही संस्थेने केलेल्या कामांसाठी वापरलेल्या बांधकाम साहित्याचे परीक्षण हे जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून केले जाते पण या प्रयोगशाळेत तपासणी केलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे, असा एकही प्रकार आढळला नसल्याचे समोर आले आहे. साहित्य उत्कृष्ट दर्जाचे असेल, तर रस्ते व इतर काम निकृष्ट दर्जाचे होतेच कसे हाही प्रश्न आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक ते कळवण, नाशिक ते सटाणा, चांदवड ते देवळा, चांदवड ते मनमाड रस्ते अतिशय खराब झाले आहेत. हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केले आहेत. त्यासाठी जर उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असेल, तर ते खराब झाले कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासकीय कामात सर्वाधिक कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाची असून, यासाठी नाशिक येथील त्र्यंबकरोड येथे बांधकाम भवनच्या तिसऱ्या मजल्यावर १९९० साली दक्षता व गुण नियंत्रक मंडळाची (क्वॉलिटी कंट्रोल) स्थापना करण्यात आली. या मंडळाच्या अंतर्गत नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.

या मंडळातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करणाऱ्यात येणाऱ्या रस्ते, पुल, इमारती या कामांची गुणवत्ता विषयक नमुना तपासणी करून अहवाल तयार करण्याचे काम केले जाते. त्याचप्रमाणे शासनस्तर किंवा मुख्य अभियंत्याकडून आलेल्या बांधकामाच्या तक्रारीबाबत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यास अहवाल दिला जातो. या मंडळात अधीक्षक अभियंता, दोन कार्यकारी अभियंता आहे. एका कार्यकारी अभियंत्याकडे नाशिक व नगरचा भार तर दुसऱ्याकडे धुळे, जळगाव व नंदुरबार आहे. त्याचप्रमाणे या मंडळात पाच उपअभियंते व प्रत्येक क्षेत्रीय मंडळासाठी नियंत्रण शाखेचे स्वतंत्र उपअभियंत्याचे पद आहे. नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा आहे.

अधिकारी व ठेकेदारांचे लागेबांधे

क्वॉलिटी कंट्रोलकडून साहित्याचे परीक्षण हे ठेकेदारांनीच करायचे असल्यामुळे ते या प्रयोगशाळेत दर्जेदार मटेरीयलचे नमुने देतात आणि त्यानंतर प्रत्यक्षात मात्र, निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरतात. गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची थेट तपासणी व सुपरव्हीजन केले जात असले तरी त्यात अधिकारी व ठेकेदारांचे लागेबांधे असल्यामुळे हे काम गुणवत्ता नियंत्रकाच्या प्रयोगशाळेतून निरीक्षण केलेल्या मटेरीयलप्रमाणे होत नाही.

कोय काय म्हणाले?

नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणनियंत्रक मंडळाच्या प्रयोगशाळेतून गेल्या वर्षभरात २६६ कामे झाली. त्यातून या मंडळाला चार कोटी ५३ लाख रुपये मिळाले. डांबर, खडी, वाळू, सिमेंट यासह बांधकामाचे सर्व बांधकाम साहित्याचे परीक्षण या मंडळात केले जाते. चाचणीसाठी येणारे बांधकाम साहित्य चांगल्या दर्जाचेच असते. निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य असलेले प्रकार जवळपास नाहीच.

- एस. जी. पाटील, शाखा अभियंता, गुण नियंत्रक मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनांची जाळपोळ चालूच

$
0
0

महालक्ष्मीनगरमधील घटना; महिला वॉचमनच्या सतर्कतेमुळे टळली जीवितहानी

म. टा. प्रतिनिधी, सिडको

महालक्ष्मीनगरमधील गाड्या जाळणारे आरोपी अजूनही मोकाट असताना याच ठिकाणापासून दुसऱ्या गल्लीतील एका सोसायटीत सहा दुचाकी जाळण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी, पहाटेच्या सुमारास घडला. समोरच्या इमारतीमधील वॉचमनच्या हा प्रकार लक्षात आल्याने जीवितहानी टळल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. दरम्यान, घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी पोलिस चौकीच्या मागणीसाठी काही वेळ रास्तारोको केले. शनिवारच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मीनगर येथील निलांजन नील अपार्टमेंटच्या पार्किंगमधील सहा दुचाकी जळून खाक झाल्या, तर एक चारचाकी काही प्रमाणात जळाली आहे. शुक्रवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास या इमारतीच्या समोरील इमारतीत वॉचमन म्हणून काम करणाऱ्या महिलेला आग लागलेली दिसली. त्यांनी आरडाओरड करून नीलांजन नील अपार्टमेंटमधील जनाबाई यांना जागे केले. या दोघींनी मिळून रहिवाशांना उठविले. त्यांनी तातडीने आग विझविण्यास सुरुवात केली. अग्निशमन दल पोहचेपर्यंत नागरिकांनी अक्षरशः इमारतीच्या टाक्यांमधील पाण्याने ही आग विझविली. आगीच्या घटनेवेळी तोंडाला काळे फडके बांधून पळणाऱ्या एकाला काही जणांनी पाहिले आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर व सहकारी तातडीने घटनास्थळी हजर झाले. नगरसेवक अॅड. तानाजी जायभावे, आमदार सीमा हिरे, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथ, पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे हे देखील घटनास्थळी आले. यावेळी संतप्त रहिवाशांनी पोलिस चौकीसाठी रास्तारोको केले. पोलिस आयुक्तांनी चौकी उभारण्याचे आश्वासन दिले.

जळालेल्या दुचाकी

या घटनेत कृष्णा कुळकर्णी यांची एमएच १५ डीपी ४३५२, दिलीप वडवजे एमएच १५ बीएस ८२३०, रेखा वडवजे एमएच १५ सीक्यू ९६४०, दिनकर चव्हाण एमएच १५ ईआर ४६२४, गौरव जाधव एमएच १५ एएल ९८८६, रोहन सिंग एमएच १५ सीपी ९१८० या सहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. एक अल्टो गाडीही काही प्रमाणात जळाली आहे.

पोलिसांचा वचक संपला आहे का?

जी तत्परता राजकीय गुन्हे दाखल करण्यात व तपासात दिसते ती जाळपोळ, चेनस्नॅचिंग, घरफोडी आदी गुन्ह्यांच्या तपासात का दाखवत नाही?

एखाद्या मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्याकडे गुन्हे घडल्यासच गांभीर्य येईल का?

पोलिस फक्त नेत्यांचे मागेपुढे फिरून त्यांना खूश करण्यात धन्यता मानतात का?

सामान्य जनतेच्या भावना लक्षात घेवनू कार्यवाही करण्यात स्वारस्य नाही का?

अशा घटनांमध्ये जबाबदारी निश्चित करून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कारवाई करण्यात पोलिस प्रशासनाला स्वारस्य नाही असे समजावे का?

जनतेचे मनोबल वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीडितांची घटनस्थळी जावून भेट घेतली आहे का?

या घटनांच्या तपासासाठी व प्रतिबंधासाठी पोलिस दलाचा उपयोग करून कृती आराखडा तयार केला का?

असेल तर त्याच्या अंमलबजावणीचे फलित काय?



कोण काय म्हणाले,

रात्री तीन वाजेच्या सुमारास वॉचमन महिलेने आम्हास इमारतीत आग लागल्याचे सांगितले. आम्ही खाली येऊन पाहिले तेव्हा सर्व गाड्या जळत असल्याचे पाहिले.

- रवींद्र जगताप

रात्री समोरच्या इमारतीमधील महिलेने सांगितल्याने मी तातडीने सोसायटीतील रहिवाशांना उठविले. त्यांनी आग विझविली. मात्र, या प्रकारामुळे आता आम्हाला खूप भीती वाटू लागली आहे.

- इंदूबाई चित्ते, वॉचमन

अंबड पोलिस ठाण्यात कर्मचारी वाढविले पाहिजे. त्याचबरोबर कायमस्वरूपी पोलिस चौकी या भागात उभारली पाहिजे. समाज मंदिरातील मोकळ्या जागेत होत असलेल्या प्रकारांमुळेच हे प्रकार घडत आहेत. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने आरोपींना अटक करावी.

- अॅड. तानाजी जायभावे, नगरसेवक

इमारतीमागे असलेल्या समाजमंदिराच्या खुल्या जागेत अनेकदा रात्री काही जण मद्यपान करीत असतात. हे समाजमंदिर एका संस्थेच्या ताब्यात आहे. महानगरपालिकेने या समाजमंदिराच्या आवारात एका वॉचमनची नियुक्ती करणे आवश्यक आहे.

- धनाजी लगड

रात्री झोपेत असताना एक व्यक्ती माझ्याजवळून पळत गेल्याचे जाणवले. त्यामुळे जाग येऊ समोर पाहते तो आग लागलेली दिसली. आरडाओरड करून नागरिकांना उठविले. पळून जाणाऱ्या व्यक्तीने तोंडाला काळे फडके बांधले असल्याचे बघितले आहे.

- जनाबाई गवळी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टाइम्स ग्रुप’तर्फे एज्युफेस्ट

$
0
0

२१, २२ मे रोजी नाशिकमध्ये आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तम शिक्षणाने आयुष्याला चांगली कलाटणी मिळते. शिक्षणाच्या जोरावरच विद्यार्थ्यांचे चांगले करिअर घडू शकते, हा विचार समोर ठेवून 'टाइम्स ग्रुप'ने 'टाइम्स एज्युफेस्ट २०१६' या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शहरातील गंगापूररोडवरील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये दि. २१ व २२ मेदरम्यान हे प्रदर्शन भरणार आहे.

हे दोनदिवसीय प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, यामध्ये फॅशन आणि इंटेरियर डिझायनिंग, एमबीए, इंजिनीअरिंग, डेंटल, हॉटेल मॅनेजमेंट, आयआयटी, फॉरेन लँग्वेज, दहावी व बारावी कॉमर्स आणि सायन्स कोचिंग क्लासेस, स्पर्धा परीक्षा, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, स्टडी अॅब्रॉड, बोर्डिंग आणि इंटरनॅशनल स्कूल या अन् शिक्षण क्षेत्रातील इत्थंभुत माहिती एकाच छताखाली नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. दोन‌ दिवस खास विद्यार्थ्यांसाठी सेमिनारचे आयोजनदेखील करण्यात आले आहे.

प्रदर्शनात पहिल्या दिवशी दि. २१ मे रोजी प्रदर्शनाच्या उदघाटनानंतर दुपारी १२ वाजता इयत्ता दहावीनंतर करिअरचे पर्याय या विषयावर मुग्धा शेट्ये (ग्रोथ सेंटर, मुंबई) तसेच, दुपारी ३ वाजता इयत्ता बारावीनंतर करिअरचे पर्याय या विषयावर मुग्धा शेट्ये मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ४.३० वाजता इयत्ता दहावी व बारावीनंतर स्पर्धा परीक्षांमधील करिअर कसे निवडावे, कसे घडवावे, या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी दि. २२ मे रोजी सकाळी १० वाजता मुलांच्या क्षमता आणि यश या विषयावर श्यामा कुलकर्णी या मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी १२ वाजता स्पर्धात्मक परीक्षांबाबत रोहन नामजोशी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जास्तीत जास्त नाशिककरांनी 'टाइम्स ग्रुप'च्या 'टाइम्स एज्युफेस्ट २०१६' या प्रदर्शनात आणि सेमीनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठकाबा बोलतात पशुपक्ष्यांची भाषा

$
0
0

बुधवारी 'मटा संवाद' कार्यक्रम; वाचकांना उपस्थितीचे आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चिवचिवाटामधून चिमणी काय सांगतेय ते अगदी सहजतने कळतेय, कावळ्याच्या कावकाव मधून त्याचे संदेश समजताहेत. पोपट, कबूतर हे केवळ पक्षीच नाही तर मांजर, कुत्रा यासह आणखीही काही प्राणी काय बोलताहेत हे कळतेय म्हटल्यावर काही काळासाठी ही फॅण्टसी वाटण्याची शक्यता आहे. परंतु हे खरे आहे. 'त्यांना' पशुपक्ष्यांची भाषा कळते. झऱ्याचे, धबधब्याचे आवाज काढता येतात. इतकेच नाही तर निसर्गातील कोणतीही हालचाल टिपून त्याचा अर्थ 'त्यांना' कळतो. तो अर्थ ते समोरच्याला उलगडून सांगू शकतात.

शिखरस्वामिनी कळसूबाईच्या पायथ्याशी उभे आयुष्य व्यतीत झाल्याने निसर्गाची भाषा अवगत झालेले ठाकर आदिवासी अवलिया कलाकार ठका कृष्णा गांगड 'मटा'वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. निमित्त आहे 'मटा संवाद' या कार्यक्रमाचे. बुधवार १८ मे रोजी, सकाळी ११ वाजता एच. आर. केटरर्स संचालित ऋग्वेद मंडळाचा ऋग्वेद हॉल, तिडके कॉलनी, इंदिरानगर-कॅनॉलरोड या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे.

सह्याद्रीच्या डोंगररांगात धुंव्वाधार बरसणारा पाऊस, रोरावत वाहणारा बेफाम वारा, कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांचा धीरगंभीर आवाज, ओढ्यानाल्यांचा खळखळाट, बिबट्यांच्या डरकाळ्या, मोरांचे केकाटणे, पशुपक्ष्यांचे मंजूळ आवाज असे निसर्गसंगीत ऐकतच ठकाबाबा लहानाचा मोठा आणि आता वृध्द झाले. जंगलात गुरे चारायला गेल्यानंतर पशुपक्ष्यांचे आवाज सभोवतालच्या नीरव शांततेत कानावर पडल्यावर तसेच आवाज काढत प्रतिसाद देण्याची त्यांना सवय लागली. त्यातूनच अनेक वन्यप्राणी, पक्ष्यांच्या हुबेहूब आवाजाचे कौशल्य ठकाबाबाने लीलया आत्मसात केले. पर्यटकांपासून तर थेट दिल्लीच्या पंतप्रधानापर्यंत अनेकांनी त्यांच्या या कलेची प्रशंसा केली. महाराष्ट्र शासनाने काही दिवसांपूर्वी ठकाबाबाला राज्य सांस्कृतिक पुरस्कारही प्रदान केला. कार्यक्रमात ठकाबाबांचा जीवनपट उलगडणार असून ते पशुपक्ष्यांचे आवाज काढून दाखवणार आहेत. कार्यक्रम विनामूल्य असून, उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठकाबांची ओळख

आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या ठकाबाबांचे वय आता ८० वर्षांहून अधिक आहे. सह्यकड्याच्या पंचक्रोशीत ठकाबाबा हीच त्यांची ओळख. अकोले तालुक्यातील उडदावणे या दुर्गम गावात सन १९३२ मध्ये ठकाबाबांचा जन्म झाला. नगर जिल्ह्यातील पश्चिमेच्या टोकाकडील भंडारदरा धरणापासून १२ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. गावातच खडकाळ माळरानावर २ ते ३ एकर शेती आहे. पशुपक्ष्यांचे हुबेहूब आवाज आणि अंगी बाणलेल्या 'नाना कळा' हेच ठकाबाबांचे आयुष्याचे भांडवल, अगदी सहजगत्या ते जीभ नाकाला टेकवतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अशोकामधील फी वाढीस विरोध

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

अशोका स्कुलने सन २०१६ -१७ या शैक्षणिक वर्षांसाठी केलेल्या फी वाढीविरोधात पालक एकवटले आहेत. फी वाढीला विरोध कायम राहणार असल्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला. सीबीएस येथील हुतात्मा स्मारकात शनिवारी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचने अशोका युनिव्हर्सलमधील विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा घेतली. या सभेत पालकांनी शाळेतर्फे आकारण्यात येत असलेल्या टर्म फी आणि इतर शुल्कवाढीबाबत नाराजी व्यक्त केली. फी वाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्रत्येक पालकाला फी च्या तपशीलासह इतर सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचा ठराव करण्यात आला. तसेच याबाबत वर्ग शिक्षकांना पत्र लिहून त्यांच्याकडून तपशीलवार माहिती घेण्यात यावी, असेही बैठकीत ठरले. बैठकीमध्ये शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे सचिव डॉ. मिलींद वाघ यांना पालकांना मार्गदर्शन केले. मंचच्या छाया देव, मुकुंद देव यांच्यासह पालक उपस्थित होते. याबाबत अशोका स्कुलनेही त्यांचे म्हणणे कळविले आहे. आम्ही राज्य शैक्षणिक संस्था कायदा २०११ आणि हाय कोर्टाच्या निर्देशांनुसारच शुल्क आकारणी करीत आहोत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास हाच स्कूलचा उद्देश असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुझ्या गळा, माझ्या गळा..

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

देशात आणि राज्यपातळीवर काँग्रेस आणि भाजपचे पदाधिकारी एकमेकांना शत्रू समजत असले तरी, नाशकात शनिवारी मात्र काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी 'तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा...'असंच वातावरण तयार केलं. निम‌त्ति होते दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या विश्रामगृहावरील एकत्र‌ति आगमनाचे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहन प्रकाश यांचे दिलदारपणे स्वागत केले. तर, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही तसाच दिलदारपणा दाखवत पालकमंत्री गिरीश महाजन यांचे स्वागत केले.
काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रीय सरचिटणीस मोहन प्रकाश हे शनिवारी नाशिकमध्ये आले होते. कळवणमध्ये परिषद संपल्यानंतर त्यांनी नाशिकच्या विश्रामगृहात पत्रकार परिषद आयाजित केली होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे नेते व महिला पदाधिकारीही उपस्थित होते. नेमके याच वेळी पालकमंत्री गिरीश महाजन हे विश्रामगृहावर येणार होते. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. त्याच वेळी काँग्रेसच्या मोहन प्रकाश यांचे आगमन झाले. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही शत्रुत्त्व बाजूला ठेवत प्रकाश यांचे स्वागत केले. भाजपच्या या स्वागताने काँग्रेसचे पदाधिकारीही भारावले.

तर चव्हाण यांच्या स्वागतासाठी माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, हेमलता पाटील थांबल्या होत्या. त्याचवेळी गिरीश महाजन यांचेही आगमन झाले. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षधर्म पाळत महाजन यांचे स्वागत केले. त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्याचा दिलदारपणाही दाखवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदी-फडणवीस सरकारची संवेदना बोथट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

दुष्काळग्रस्त लातूरला पाठविलेल्या पाण्याचे ४ कोटीचे बिल पाठवणाऱ्या मोदी व फडणवीस सरकारची संवेदना बोथट झाली असून, इंदिरा गांधींनी आदिवासी, गरीब जनतेसाठी सुरू केलेल्या योजना बंद करण्याचा सपाटा लावला आहे. शेतकरी वर्गाला संपूर्ण कर्जमाफी मिळावी व आदिवासी जनता आपल्या हक्कांपासून वंचित राहू नये म्हणून भाजप-सेनेच्या सरकारच्या विरोधात या आदिवासी वनहक्क परिषदेच्या माध्यमातून रणशिंग फुंकले असून, सरकार जागे होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा इशारा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिला.

कळवण येथील आर. के. एम. विद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित आदिवासी वन हक्क परिषद व शेतकरी मेळाव्यात खासदार चव्हाण बोलत होते. मंचावर काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, शिवाजीराव मोघे, रामकिसन ओझा उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले कि, इंदिरा गांधी यांनी गरिबांसाठी सुरू केलेली इंदिरा आवास घरकुल योजना व अनेक शासकीय व आदिवासींच्या अनुदानित योजना बंद करण्याचा सपाटा सत्ताधारी भाजप-सेना सरकारने सुरू केला आहे. आदिवासी जनतेचे अधिकार कोणी काढून घेणार असतील तर आम्ही त्यांना सडेतोड उत्तर देऊ. संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी व गरीब बांधवांसाठीच्या योजना व त्यांची माहिती सांगण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत. सध्या शेतकऱ्यांच्या घामाच्या कष्टातून पिकवलेल्या कांद्याचे वांदे केले असून कांद्याला २००० रुपये हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्नशील आहोत. सत्ताधारी पक्षातील खाकी चड्डीवाले व काळी टोपीवाले हे कुणाचेच भले करू शकत नाहीत याचे गांभीर्य लक्षात ठेवून संवेदना व जाणीव नसलेल्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी महाराष्ट्रातील आदिवासी व गोरगरीब जनतेने एकजुटीने काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले. पद्माकर वळवी यांनी केले व या वन हक्क परिषदेमागील उद्देश स्पष्ट केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएस, एनआयएचा तपास जनतेसमोर आणा

$
0
0

अशोक चव्हाण यांची मोदी-फडणवीस सरकारवर टीका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मालेगाव बाँम्बस्फोटातील आरोपींवरील मोक्का हटवण्याच्या एनआयएच्या निर्णयावर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. या प्रकरणातील सरकारी वकील रोहिधणी सालीयन यांच्यावरील दबावानंतर आरोपी सुटणार याची चाहूल लागली होती असे सांगत, मालेगाव स्फोटाचा एटीएस व एनआयएने केलेला तपास लोकांसमोर सरकारने मांडावा, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

केंद्र सरकार दहशतवाद्यांना संरक्षण देत असल्याचे सांगत, सरकारे बदलली की, तपासही बदलतात असा आरोप त्यांनी केला. दोन तपास यंत्रणा वेगवेगळया तपास कसा करू शकतात? असा प्रश्न विचारत मालेगाव स्फोटातील आरोपी सुटणे हे गंभीर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, दुष्काळाच्या प्रश्नावर त्यांनी राज्यसरकावर टीका करत संपूर्ण कर्जमाफीची पुन्हा मागणी केली आहे.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना, चव्हाण यांनी मालेगाव स्फोटातील आरोपींवरील मोक्का हटवण्याच्या एनआयएच्या निर्णयावर तीव्र टीका केली आहे. हा निकाल गंभीर असून शहीद हेमंत करकरे यांनी मेहनत घेवून हा तपास केला होता. परंतु, सरकार बदलताच या प्रकरणातील आरोपींना सोडण्याचे प्रयत्न सुरू झाले. सरकारी वकील रोहिनी सालीयन यांनी सहा महिन्यांपूर्वीच या प्रकरणात दबाव येत असल्याचे म्हटले होते. परंतु, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. केंद्रसरकार दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचे काम करत आहे असा चव्हाण यांनी केला. राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर त्यांनी राज्यसरकावर तीव्र टीका केली. सुप्रीम कोर्ट व हायकोर्टाला दुष्काळसंदर्भात आदेश द्यावे लागत आहे. तरीही सरकार निष्क्रीय आहे. विरोधकांना विश्वासात घेतले जात नाही. दुष्काळावर कर्जमाफी हा एकमेव उपाय आहे. परंतु, सरकार केवळ पुनर्गठन करत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. तरीही सरकार गंभीर नाही. त्यामुळे सरकार संपूर्ण कर्जमाफीसाठी आणखी कशाची वाट पाहत आहे, असा सवाल चव्हाण यांनी केला आहे. दुष्काळाच्या नावाखाली टँकरमाफीया सक्रीय असून विरोधकांनी दुष्काळावर विविध उपाययोजना सुचविल्यात. परंतु, सरकार विरोधकांना प्रतिसाद देत नाही असा आरोपही त्यांनी केला.

जलयुक्त शिवार खासगी तत्त्वावर

राज्यसरकारतर्फे जलयुक्त शिवारतर्फे विविध कामे केल्याचा दावा करत आहे. प्रत्यक्षात ही कामे खासगी संस्थांकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. शासनाकडून या कामांसाठी निधी दिला जात नाही. सरकार केवळ श्रेय घेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी अपघातात टाकेदचे दोघे ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, घोटी

इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथील दोघे जण घोटी येथे डोळे तपासणीसाठी आले असता, घोटीहून टाकेदकडे परताना त्यांच्या मोटरसायकलला घोटी भंडारदरा मार्गावरील अधरवड शिवारात अपघात झाला. या अपघातात दोघेही ठार झाले. अपघात कशामुळे झाला हे उशिरापर्यंत समजू शकले नाही.

टाकेद येथील भगवान नारायण घोरपडे (वय ४५) व अंकुश दामू जंगले हे दोघे जण खासगी कामानिमित्त खेड व घोटी येथे गेले होते. रविवारी तीन वाजेच्या सुमारास हे दोघेही जण घोटीहून टाकेदकडे परतत असताना त्यांच्या मोटरसायकलला अपघात झाला. त्यांना अज्ञात वाहनाने धडे दिली की मोटरसायकल घसरून दोघे पडले, हे समजू शकले नाही.

या दोघांना प्रथम घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. परंतु, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील ग्रमीण रुग्णालयात नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघाताचे वृत्त समजताच टाकेद शिवार व परिसरात शोककळा पसरली आहे. घोटी पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळ काढण्याच्या कामात लोकसहभाग वाढवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्यामुळे पाणी साठवण क्षमतेत निश्चित वाढ होईल. या कामाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्याने केवळ नाशिक शहरालाच नव्हे, तर जिल्ह्याला त्याचा लाभ होईल, असा विश्वास राज्याचे जलसंपदामंत्री तथा ‍जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील इतर भागांतही गाळ काढण्याच्या कामात लोकसहभाग वाढायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गिरणारे येथे जलसंपदा विभागामार्फत धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या कामाची सायंकाळी पाहणी करण्यात आली. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार बाळासाहेब सानप, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, अधीक्षक अभियंता राजेंद्र मोरे आदी होते.

गंगापूर धरणातील गाळ काढला जात असल्याने तेवढी जागा मोकळी होऊन पाणीसाठवण क्षमता वाढणार आहे. त्यामुळे येत्या काळात नाशिक शहर आणि परिसराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कामात आर्ट ऑफ लिव्हिंगने दिलेल्या योगनादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील इतरही भागात गाळ काढण्याच्या कामात लोकसहभाग वाढायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

गंगापूर धरणातून आतापर्यंत १० हजार ३८३ ट्रॅक्टर्स फेऱ्यांच्या साह्याने २९ हजार ३८४ घनमीटर, आठ हजार ५६२ ट्रक फेऱ्यांच्या साह्याने ८५ हजार ६२० घनमीटर आणि ४ हजार ३१५ डम्पर फेऱ्यांच्या माध्यमातून ६०,४१० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. एकूण एक लाख ७५ हजार ४१४ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. यासाठी एकूण २९ ट्रॅक्टर, ४० ट्रक, ४० डंपर, १० पोकलॅन आणि ६ जेसीबी मशीनची मदत घेतली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोच बाक... तेच किस्से अन् आठवणींची शाळा

$
0
0

किती सांगू अन् किती बोलू; तब्बल १८ वर्षांनी भेटले मित्रमैत्रिणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तब्बल १८ वर्षांनी भेटलेला शाळेतील तोच बाक. बाक कसला शाळेतल्या अनेक किश्श्यांना जपणारा सखाच तो. नजरेआड झालेले जिव्हाळ्याचे अनेक मित्र-मैत्रिणी आज दृष्टीस पडले. त्यांच्यासमवेत बाकावर बसताना शब्द गहिवरले. फळा, भिंतींसारख्या शाळेतील कितीतरी अबोल वस्तू मूकपणानेच संवाद साधू लागल्या. किती सांगू अन् किती बोलू असेच प्रत्येकाला झालेले. बाकावरून अलगद हात फिरविताना शब्द कातर झाले अन् ओठांऐवजी डोळ्यांमधूनच भावना अधिक बोलू लागल्या.

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या उंटवाडी येथील माध्यमिक विद्यालयात उन्हाळी सुटीतही शाळा भरली. ही शाळा होती माजी विद्यार्थ्यांची. १९९८ मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन व्यवहारी जगाचा सामना करण्यासाठी बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज पुन्हा शाळेतील त्याच बाकावर स्थानापन्न झाले. अनेक वर्षांनी एकमेकांना भेटत असल्याने नजरा कावऱ्या बावऱ्या झालेल्या. अनेक चेहरे परिचयाचे. परंतु विस्मरणात गेलेले.

काही वेळातच गप्पांचा प्रवास औपचारीकतेकडून अनौपचारीकतेकडे वळला अन् नंतर तब्बल तीन ते चार तास निखळ गप्पांची मैफल रंगली. प्रत्येकाच्याच मनातील हळव्या कोपऱ्याची कवाडे उघडली. बालपणीच्या आणि शालेय जीवनातील आठवणींना शब्दरूप प्राप्त झाले. हृदयाच्या कुपीत अलगद जपून ठेवलेल्या या आठवणींचा पट उलगडत गेला अन् त्यामध्ये प्रत्येकाचेच मन हरवून गेले. शिक्षिका सुनंदा पेठकर यांनी या जगाचा निरोप घेऊन गेलेल्या तीन शालेय विद्यार्थ्यांना श्रध्दांजली वाहिली. शिक्षिका नंदिनी गोवर्धने आणि चित्रकलेचे शशिंकात दंडगव्हाळ हे देखील या गेट टूगेदरमध्ये सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला. या गेट टूगेदरच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रवीण अहिरराव, प्रतीप गोळेसर, आशिष जाधव, डॉ. प्रशांत चौधरी आदींनी पुढाकार घेतला.

थँक्स फॉर सोशल मीडिया...

फेसबुक आणि व्हॉटस् अॅपसारख्या सोशल मीडियाची जुन्या मित्र-मैत्रिणींची पुन्हा गट्टी जमविण्यासाठी मदत होते आहे. व्हॉटस् अॅप हे जुन्या आठवणींना उजाळा देणारे हक्काचे व्यासपीठ बनले आहे. एकमेकांच्या मदतीने शाळेतील जुन्या मित्र-मैत्रिणींचा शोध घेऊन त्यांना व्हॉटस्अॅपवर वेलकम केले जात आहे. अनेक शाळांचे विद्यार्थी अशा प्रकारे एकत्रित येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे शिक्षकांनाही ग्रुपमध्ये सहभागी केले जाऊ लागल्याने ग्रुपवरही आठवणींची उजळणी सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जादा दरामुळे आंबे आंबट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अक्षय तृतीयेमुळे फळांचा राजा आंब्याची मागणी वाढल्याने दरही वाढले होते. मात्र, अक्षय तृतीयेनंतरही आंब्यांच्या दरात फारसा फरक पडलेला नाही. यंदा अजूनही आंब्यांचे दर कमी झालेले नाहीत. सुमारे ५० रुपयांपासून १२० रुपये किलोपर्यंत आंबे खरेदी करावे लागत आहेत. यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. इतर फळांच्या किमतीही अधिक असल्याने दुष्काळात फळांचा आस्वाद घेणे महागात पडत आहे.

शहरात आंब्यांची भरपूर आवक होत असली तरी दर मात्र कमी झालेले नाहीत. केशर, लालबाग, कर्नाटकचा हापूस, देवगड आदी जातीचे आंबे बाजारात उपलब्‍ध आहेत. मात्र, दरामुळे सर्वसामान्यांना आंबे आंबट झाली आहेत. केशर ८० रुपये, तर लालबाग ५० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. कर्नाटक हापूस आंबा १०० ते १२० रुपये किलोप्रमाणे खरेदी करावा लागत आहे. गावठी आंब्याची अद्याप आवक न वाढल्याने दर कमी झाले नसल्याचे विक्रेत्याने सांगितले. आणखी आठवडाभर तरी आंब्यांच्या दरात घट होण्याची शक्यता कमी असल्याने विक्रेत्याने सांगितले. सफरचंदचे दरही वाढले असून १४० ते १६० रुपयांप्रमाणे विक्री होत आहे. चिकू, संत्री, पपई, अननस, डाळिंब यांच्या दरात फारसा फरक पडलेला नाही.

किलोचे दर आंबे - ५० ते १२०, सफरचंद - १२० ते १६०, चिकू - ६०, संत्री - ६०, अननस - ५० रुपयाला एक, किवी - ३० ला एक, केळी - ३० रुपये डझन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गझल एक तरल जीवनाभूती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जी गझल ऐकणाऱ्याला एक तरल जीवनाभूती देऊन जाते, अंतरिक संवेदनांना छेदून जाते त्या गझलला उत्तम गझल असे म्हणता येईल. गझलमधून निघणारा भावार्थ समजवून घेतल्यास तिचे रसग्रहण चांगल्या पध्दतीने होते, असे प्रतिपादन गोव्याचे ख्यातनाम गझलकार दत्तप्रसाद जोग यांनी केले. लोकहितवादी मंडळातर्फे ज्योतीकलश सभागृहात रविवारी आयोजित 'गझल मैफल आणि गप्पा टप्पा' या कार्यक्रमात ते बोलत होते.

गझल कशी समजावून घ्यावी, त्याचे रसग्रहण कसे करावे, त्याची निर्मिती कशी होते, त्यातील व्याकरण अशा एक ना अनेक अंगांचे मार्गदर्शन त्यांनी 'गझल मैफल आणि गप्पा टप्पा' या कार्यक्रमातून केले. ते पुढे म्हणाले की, गझल हा प्रकार आपला नाही तो उर्दू, फारसी, परशीयन या माध्यमातून मराठीत आला आहे. मराठीत गझालला मानाचे स्थान सुरेश भटांनी मिळवून दिले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गझल कशी सहजगत्या तयार होऊ शकते, याचे उदाहरण त्यांनी मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून स्पष्ट केले. कोणत्याही मोठ्या शब्दांच्या मोहात न पडता सोप्या शब्दात आपल्या भावना व्यक्त कराव्यात, असे परेश नाईक यांनी सांगितले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराज पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना सुभाष पाटील यांनी, तर जोग आणि नाईक यांचे स्वागत लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी केले. यावेळी जोग व नाईक यांनी कार्यक्रम गप्पांमधून पुढे नेला. गायत्री वारुंगसे यांनी सूत्रसंचालन, तर स्वाती शेळके यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णींसह रसिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमधील कचरा अखेर हटवला!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर शहरासाठी डोकेदुखी बनलेला तहसील कार्यालयाजवळील कचरा हलविण्यात आला आहे. ऑक्टोबर २०१५ पासून येथे कचरा साचला होता. या कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही शहराची प्रमुख समस्या बनली होती.

नगरपारिषद आणि परिसरातील नागरिकांची डोकेदुखी ठरलेला हा कचरा एकदाचा हलविण्यात आला आहे. नव्याने कचरा डेपोसाठी जागा निश्चित करण्यात येत असून, येत्या काही दिवसांत कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी कायमस्वरूपी जागा ताब्यात घेणार असल्याची माहिती नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी दिली.
येत्या काही दिवसात शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्याकरिता जागोजागी खड्डे खोदण्यात येत आहेत. सेवाभावी संस्थांकडून ट्रिगार्ड मिळविण्यात येत आहेत. एकूणच स्वच्छ शहर, सुंदर शहर, हिरवे शहर अशी संकल्पना राबवत आहोत, असे नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांनी सांगितले. नागरिकांनी नगरपालिकेच्या या उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले आहे. दानशुरांनी मोठ्या प्रमाणात रोख अथवा ट्रॅक्टर, जेसीबी उपलब्‍ध करून मदत देऊ केली आहे.
विहिरी, तलावांचे पुनरुज्जीवन

शहरास विहिरी आणि तलाव यांचा वैभवशाली वारसा लाभलेला आहे. हा वारसा जतन करण्यासाठी नगरपालिकेने लोकसहभागातून या विहिरी व तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेतले आहे. अहिल्या धरणाचा गाळ काढण्यात येत आहे. त्याचसोबत बल्लाळेश्वर मंदिराशेजारी असलेली विहीर, इंद्राळेश्वर तलावचे सूर्यकुंड यांचा गाळ काढला आहे. आता मुकुंदेश्वर तलावाचा गाळ काढण्यात येणार आहे. त्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चणकापूर, हरणबारीतील गाळ काढावा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. यामुळे चणकापूर व हरणबारी या धरणांमधून गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढविण्यात यावी. भविष्यात पाणीटंचाईचे संकट तीव्र होऊ नये, यासाठी सरकार व प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जयंत पवार यांनी केली आहे.

कसमादेसाठी वरदान ठरलेल्या चणकापूर व हरणबारी या धरणांमधून गेल्या अनेक वर्षांपासून गाळ काढण्यात आलेला नाही. यामुळे दोन्ही धरणांच्या क्षमतेत घट झाली आहे. चणकापूर धरणात २७१४ तर हरणबारी धरणात ११६६ दलघफू पाणीसाठा होतो. मात्र, चणकापूर धरणात २८७ दलघफू गाळ साचला आहे. ही आकडेवारी २०१२ ची असून, या तीन वर्षांचा विचार केला तर, त्यात आणखी भर पडली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेती सिंचनालाही पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सरकार व प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. जलशिवार योजनेंतर्गत तलावातील गाळांचा उपसा केला जात आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात एकूण ४४८ तलावातील गाळ काढण्यात आला आहे. एकूण २४ लाख ४३ हजार ९११ घनमीटर गाळ काढण्यात आला. त्यामुळे तलावांची जलसाठवण क्षमता २३ लाख ३८ हजार २१८ घनमीटरने वाढली आहे. अशी कामे चणकापूर व हरणाबारी या धरणांमध्येही केली, तर धरणसाठ्यात वाढ होऊन पाणी उपलब्ध होईल. यामुळे कसमादेचा विकास करता येईल, असे डॉ. पवार यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईवर नांदगावकरांचे मंथन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पाणीटंचाईची गंभीर समस्या नांदगाव शहराला भेडसावतेय. आता तरी नागरिकांनी स्वतःची जबाबदारी ओळखून थेंब अन् थेंब पाण्याचे नियोजन केले पाहिजे. पुढच्या पिढीचा विचार करून आताच पाणी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केली पाहिजे, असा सूर नांदगाव येथील जनसेवा मंडळाने आयोजित केलेल्या नागरिकांच्या जल जागरण अभियान बैठकीत व्यक्त करण्यात आला.

पाणीटंचाईच्या प्रश्नावर सुजाण जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन पाण्याबाबत व्यक्त केलेले विचार मंथन आणि जन जागरण वैशिष्ट्यपूर्ण ठरले. जनसेवा मंडळाच्या जल जागरण अभियानाची बैठक ज्ञानेश्वर मंदिरात झाली. या बैठकीत नांदगावच्या पाणीप्रश्नाबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली. नांदगावच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाणी समस्या सोडविण्याबाबत विविध उपाय सुचवले. दुष्काळाच्या झळा व पाणीटंचाई या मुद्द्यावर कायमच्या उपाययोजनेसंदर्भात वक्त्यांनी अभ्यासपूर्ण मते मांडली. तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर, अॅड. जयकुमार कासलीवाल, महावीर पारख, संतोष गुप्ता, जनसेवा मंडळाचे राजेश कवडे आदींनी विविध सूचना केल्या. डॉ. गणेश चव्हाण, पद्माकर दुसाने, भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, श्रीकांत परदेशी, भैय्या चव्हाण, वसंत नागरे, गोरख जाधव, बाळासाहेब शेवरे, राहुल शेळके आदींनी विविध मुद्दे मांडून पाणीटंचाई दूर करण्याबाबत चर्चेत सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images