Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘महसूल सेवा ऑनलाइन करणार’

$
0
0

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शेतकऱ्यांना आता सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठ्याकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. याचबरोबर तहसील कार्यालयातून मिळणारे विविध दाखले कार्यालयात न जाता हे घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महसूल प्रशासनाने कंबर कसली असून सर्व प्रकारच्या महसुली सेवा, दाखले, उतारे हे ऑनलाइन प्रणालीद्वारे नागरिकांना घरबसल्या उपलब्ध होणार असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी धुळे शहराच्या अपर तहसील कार्यालयाच्या शुभारंभाप्रसंगी दिली.

महसूल मंत्री खडसे म्हणाले, राज्य सरकारने लोकसंख्या व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून नवीन अपर तहसील कार्यालयांची निर्मिती करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. नागरिकांना वेळोवेळी तातडीने लागणारे दाखले मिळविण्यासाठी करावी लागणारी पायपीट, लागणारा वेळ व खर्च या सर्व गोष्टी यामुळे संपुष्टात येणार आहे. महसूल प्रशासनास अधिक बळकट करण्यासाठी नवीन ३२०० सज्जांची निर्मिती करण्यात येणार असल्याचेही महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. यापूर्वी १९८३ मध्ये ही निर्मिती झाली होती त्यानंतर सज्जांची निर्मितीचा निर्णयदेखील मंत्रिमंडळाने घेतल्याचेही खडसे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्षा सरला पाटील, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अनिल गोटे, आमदार जयकुमार रावल, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी ए. बी. मिसाळ, पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, तहसीलदार दत्ता शेजुळ आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केमिकल टाकून तरुणीला जाळले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरालगत असलेल्या बिलाडी रस्त्यानजीक शनिवारी, पहाटे एका तरुणीचा निर्घृणपणे खून करून तिच्या अंगावर केमिकल टाकून तिला जाळून टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मका फॅक्टरीच्या पुढे लहान पुलाजवळ अर्धवट जळालेला मृतदेह नागरिकांना आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पहाटेच्या वेळी घटनास्थळाजवळील रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना काही तरी जळत असल्याचा घाण वास आला. त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहिले असता, त्या ठिकाणी एका तरुणीचा मृतदेह अर्धवट जळून त्याचा कोळासा झाला होता. मृतदेहावर टाकलेले केमिकल जळत होते. मृतदेह जाळण्यासाठी चाऱ्याचा वापर करण्यात आला होता.

नागरिकांनी घटनेची माहिती तालुका पोलिसांना कळविली. अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, तालुका पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी हे श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर ही घटना मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांचे एक पथक या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे महिला व तरुणींची निर्घृण हत्या करण्याचे प्रकार घडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात होणार राज्यातील पहिले माहिती व जनसंपर्क भवन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सहकार राज्यमंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून धुळ्यात राज्यातील पहिले माहिती व जनसंपर्क भवन साकारणार आहे. त्यासाठी प्राथमिक तरतूद म्हणून सन २०१६-१७च्या जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात ५० लाखांच्या निधीची तरतूदही करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी ए. बी. मिसाळ यांनी दिली.


अशाप्रकारचे स्वतंत्र माहिती व जनसंपर्क भवन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून साकारण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याने तो राज्यासाठी पथदर्शी ठरेल.जिल्ह्यात विकास संवादाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व संकल्पना सर्वसामान्य जनतेपर्यंत रुजवण्याचा राज्यातील पहिला प्रयत्न जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून १९७२पासून सुरू आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात काळानुरूप बदल माहिती व जनसंपर्कात करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे बळकटीकरण आवश्यक असल्याने जिल्हा नियोजन समितीने हा निर्णय घेतला आहे. सध्या प्रशासकीय संकुल तथा जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा माहिती कार्यालयाच्या सुमार ७८५ चौरस मीटर जागेवर हे माहिती व जनसंपर्क भवन साकारले जाणार आहे, अशी माहिती मिसाळ यांनी या संदर्भातील तातडीच्या बैठकीत दिली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, सहाय्यक अभियंता दिवाकर मोरे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी आर. ए. पवार आदी उपस्थित होते.
अत्याधुनिक सुविधा

हे भवन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक, नाशिक विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक सतीश लळीत यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली कार्यरत होईल. त्यामध्ये जिल्हा माहिती कार्यालय, कॅफेटेरिआ, जिल्ह्याची सर्वांगिण माहिती देणारे कायमस्वरूपी चित्र व शिल्प प्रदर्शनी आणि विविध आधुनिक प्रकारच्या इफेक्टसह तसेच पत्रकार परिषद व प्रसारमाध्यम विषयक शासकीय कार्यक्रमांसाठी मिनी थिएटर, सुसज्ज असे लोकराज्य संदर्भ ग्रंथालय व दृकश्राव्य कक्ष व मीडिया लायब्ररी यासारख्या सेवा सुविधा देण्यासाठी आराखडा व नियोजन केले जाणार असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्रमशाळेची कागदपत्रे जाळले

$
0
0

धुळे : धुळे तालुक्यातील उडाणे येथील भटक्या विमुक्त आश्रमशाळेतील कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शाळेची महत्त्वाची कागदपत्रे जाळली. तर गोदरेज कपाटाचे लॉक तोडून कागदपत्रे जाळल्याची घटना घडली. तालुका पोलिसांनी पंचनामा करत अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संकटांची मालिका सुरूच...

$
0
0

कुणाचा संसार उघड्यावर...तर कुणी पत्रे लागून जखमी

म. टा. वृत्तसेवा, येवला

कधी अवकाळीचा तडाखा तर कधी गारपीट, अनेकदा मोठा दुष्काळ अन् त्यातून शेतीची वाताहत अशी गेल्या काही वर्षात अस्मानी संकटाची मालिकांनी येवलेकरांपुढील संकटे कमी होत नाही. काहींची घरांची पत्रे उडाली आहेत तर काहींचा संसारच उघड्यावर आला आहे.

यंदाच्या भीषण दुष्काळाच्या झळा सोसताना नाकीनऊ आलेल्या येवल्याला सोमवारी वळीवाच्या पावसासंगे आलेल्या वादळी वाऱ्यानं मोठा तडाखा दिला. यात प्रामुख्याने येवला तालुक्यातील पूर्व भागात जोरदार तडाखा पोहचला. या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात कुणाच्या राहत्या घराचे पूर्णतः नुकसान होऊन संसार उघड्यावर पडला...तर कुणी हवेत उडालेले पत्रे लागून जखमी झाले. कुणाला आपल्या मुक्या जनावराला मुकावं लागलं तर कुणाचं काही.

सोमवारी रात्री वळीवाच्या पावसाने येवला तालुक्याला चांगलाच झटका दिला. रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील पूर्व भागातील अंदरसुल, धामणगाव, रास्ते सुरेगाव, आडगाव चोथवा, पांजरवाडी आदी ठिकाणी या वळीवाच्या पावसाने हजेरी लावली. या वादळी पावसाने तालुक्यातील अनेक घरांची पडझड झाली असून तालुक्यात सुमारे साडेचार लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या वादाळाने चार व्यक्ती जखमी झाले असून काही जनावरेही जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील धामणगाव येथील मनेाहर दगडु काटे यांच्या राहत्या घराचे संपूर्ण नुकसान होताना त्यांचा संसार उघडा पडला. त्यांच्या घराची पडझड होऊन घरातील टी. व्ही., मोटारसायकल, शिलाई मशिन व इतर साहित्याचे नुकसान झाले. घराचे वाऱ्याने उडालेले पत्रे लागून मनोहर काटे यांच्यासह त्यांची पत्नी शांताबाई, मुलगा नवनाथ व बाळनाथ हे जखमी झाले. धामणगाव येथीलच लालचंद ठाकरे यांच्या राहत्या घराचेही पूर्णतः नुकसान झाले. तर राजू ठाकरे, धर्मा ठाकरे, भिवसेन वाघ, जगन मोरे, सुमनबाई पवार, बाळाजी सोनवणे यांचेही नुकसान झाले आहे. तालुक्यातील पळेवाडी शिवारातील निमगाव मढ रोडवरील रहिवाशी बद्रीनाथ मढवई यांच्या घराचे पत्रे वादळाने उडाले असून त्यांच्या गायीचे वासरू वादळी वाऱ्यात ठार झाले. चिचोंडी बुद्रुक येथील रहिवाशी संतोष भोरकडे यांच्या घराची भिंत पडली आहे.

आडगाव चोथवा येथील अशोक खोकले व भागुजी खोकले यांच्या घराचे नुकसान झाले आहे. चिचोंडी बुद्रुक येथील बद्री मढवई यांच्या घराचेदेखील नुकसान झाले होताना वादळी वाऱ्यात त्यांच्या गायीचे वासरू मृत्यूमुखी पडले. पांजरवाडी येथील बाळनाथ भालेराव यांच्या घराचेही अंशतः नुकसान झाले आहे. तहसीलदार शरद मंडलिक यांनी नुकसानग्रस्त धामणगाव, पांजरवाडी या गावांना मंगळवारी भेट देताना नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतात काढून ठेवलेला अनेकांचा उन्हाळ कांदा पावसाने भिजला. पाटोदा परिसरातील द्राक्ष, डाळिंब या फळबागांसह कांदा बियाणेसाठीच्या डोंगळे आदीचे नुकसान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कवितांमधून मांडले पाणी बचतीचे महत्त्व

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

निसर्गाशी माणसाचे नाते सांगताना त्यात पाण्याला किती महत्त्व आहे, हे समजावून सांगणाऱ्या विविध कवितांचे सादरीकरण नाशिक वसंत व्याख्यानमालेच्या दहाव्या पुष्पात झाले. प्रा. सुरेश मेणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ झालेल्या या कवी संमेलनात नाशिक जिल्ह्यातील मान्यवर कवींनी सहभाग घेतला.

य. मा. पटांगण येथे झालेल्या कार्यक्रमास शोभना मेणे, पुष्पलता मुसळे, सत्यजित मेणे, सुभाष मुसळे उपस्थित होते. प्रा. शंकर बोऱ्हाडे आणि प्रा. सुभाष सबनीस यांनी कविसंमेलनाची सूत्रे सांभाळली. प्रा. बोऱ्हाडे यांनी सादर केलेल्या (कै.) मेणे यांच्या शेतकरी या कवितेने कविसंमेलनास सुरुवात झाली. कवी रवींद्र मालुंजकर यांच्या मिळावी सदैव पाण्याची सोबत, वाजेल नौबत आनंदाची या कवितेने पाण्यामुळे जीवनात कसा आनंद मिळतो हे सांगितले.

प्रशांत केंदळे यांनी आता पावसा मातीशी कर लगीन, साजरं गुलमोहराच कुंकू तिच्या भांगामधी भर ही निसर्गाशी नात जोडणारी कविता सादर केली. पाण्याची कमतरता भासल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होते हे सांगणारी विचारा जाऊनी त्यांना, जिथे दुर्भिक्ष पाण्याचे तयांचे हाल पाहुनी, कसे ओशाळते पाणी ही कविता प्रा. अरुण सोनवणे यांनी सादर केली.

चातकासारखी पावसाची वाट बघत असताना पावसाच वातावरण निर्माण होते. काळ्याकुट्ट मेघांनी आकाश आच्छादून जाते. जवळच्या गावात पावसाच्या जोरदार सरी पडत असल्याने आशा निर्माण होते. पेरणी झालेल्या शेतात पाऊस पडताच पीक येईल, असे वाटत असताना आपल्याच गावात पाऊस पडण्याचे टाळतो, हे जेव्हा घडते तेव्हा शेतकऱ्यांच्या मनातील व्यथा मांडणारी पेरलेलं रान सारं ऊन जाळीत चाललं नक्षत्राच्या पावसानं गाव नेमकं टाळलं ही कविता विष्णू थोरे यांनी सादर करताच उपस्थितांची मने हेलावून गेली.

प्रा. संदीप जगताप, निशिगंधा घाणेकर, मधुकर जाधव, विजयकुमार मिठे, कैलास सलादे, प्रमोद आंबाडकर या कवींनीही आपापल्या कविता सादर केल्या. श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले. संगीता बाफणा यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौराईला दिला निरोप

$
0
0

आदिवासी भागात आखाती उत्साहात

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेवरील आदिवासी गावात 'गौराई' हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी मिरवणुकीत गौराईची गाणी गाईली जातात. वृद्ध महिला मुली यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात. गावातील मंदिरात एकत्र येत आपल्या गौराईची पूजा करून विहीर अथवा तलावात याचा समारोप करतात.

यामध्ये पूजेसाठी गौराईला पाच धान्यांची पेरणी करतात. यात नागली, तूर, मका, उडीद, ज्वारी अशा प्रकारच्या धान्यांचा समावेश असतो. आखाती सणाच्या सात किंवा नऊ दिवसांपूर्वी धान्याची पेरणी करून घरातील कोपऱ्यात बांबूच्या झिल्ला टोपली खाली झाकून ठेवण्यात येते. त्या वाढविलेल्या धान्यांच्या टोपलीला डोक़्यावर घेऊन मिरवणुकीत लहान मुली, वृद्ध महिला सहभागी होतात.

काय आहे परंपरा?

या पुजेसाठी लागणारी टिपरी ही कोडई झाडापासून तयार करण्यात येतात. तालावाच्या काठावर येऊन गाणी म्हणत जमिनीवर वाळूत राक्षसाची प्रतिमा रेखाटतात. त्याला राया, बेंड्या, साखळ्या अशी नावे देऊन त्यावर कंगण व नाकातील सोन्याची नथ ठेवून त्यावर घागर हातात धरून घागर तोंडाने फुंकून आवाज काढला जातो व प्रतिमा पायाने पुसली जाते. शेवटी या उगवलेल्या धान्यवरुन पेरणीचे धान्य कसे उगवेल याचा अंदाज बांधला जातो. या सणाला नवविवाहित सासरहून माहेरी येत असतात. हा सण शेवटचा असल्यामुळे या सणाला बुडित सण असेह‌ी म्हटले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनर्थ टळला..!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राज्यमहामार्गावरील दुभाजकावर पहाटे रासायनिक वायूचा टँकर उलटल्याने सिलिंडरचे स्फोट झाले. या घटनेत टँकर बेचीराख झाला, तर सभोवतालच्या घर, दुकानांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणीतीही जीवितहानी झाली नाही. सटाणा पालिकेच्या अग्निशामक दलाने तब्बल तीन तास झुंज देत आग विझवली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत विस्कळीत झाली होती.
शहरातून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राज्यमहामार्गावर पहाटे सव्वापाच वाजेच्या सुमारास कॉम्प्रेसेड हायड्रोजन गॅसचे १९० सिलिंडर असलेला १२ चाकी टँकर (क्र. १२ जीजे - एझेड ०२४५) गुजरातकडून मुंबईकडे जात असताना विधायक कार्य समितीसमोरील दुभाजकांवर आदळल्याने उलटला. यामुळे टँकरमधील गॅस सिलिंडर इतरत्र फेकली गेली. त्यात सहा सिलिंडरचे एकापोठापाठ स्फोट झाले. यामुळे आगीचे लोळ पसरले. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले.
या घटनेचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरताच चारही बाजूंनी बघ्यांची गर्दी वाढू लागली. पोलिस उपअधीक्षक अशोक नखाते, पोलिस निरीक्षक बशीर शेख, सहाय्यक पोलिस निरीक्षक घायवटे, गुरव यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी सावधपणे परिस्थिती हाताळली. पांडूरंग सोनवणे, संजय चव्हाण, पंकज सोनवणे, राहुल पाटील, जयप्रकाश सोनवणे, आप्पा नंदाळे, बापू नंदाळे, संदीप पवार, रतन सोनवणे, आण्णा अहिरे, प्रभाकर सोनवणे, किशोर सोनवणे, यांनी आगविझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. गोदावरी गॅसचे चालक तुषार पाटील, मुंजळे पेट्रोलियमचे संचालक तुषार मंजुळे यांनी आपल्याकडील आग प्रतिबंधक सिलिंडर आणून आग विझविण्याचे प्रयत्न केले. आगीत भस्मसात झालेला टँकर महामार्गावरून दुपारी एक वाजेपर्यंत हलविण्यात येऊन राज्य महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.



दुभाजक हटविण्याची मागणी

या दुभाजकांवर आतापर्यंत दहाहून अधिक मोठी वाहने आदळल्याने दुभाजक काढण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. या दुर्घटनेतील टँकर चालक सुदैवाने बचावला असून, भोलानामक हा चालक खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.



हॉस्पिटल, दुकान, घरांचे नुकसान

टँकरमधील सिलिंडरचा स्फोट झाल्याने राज्यमहामार्गावरील स्वर्गीय तुकाराम दादा सोनवणे व्यापारी संकुलातील डॉ. प्रशांत निकम यांचे हॉस्टिपल, कमलेश छाजेड यांचे सौभाग्य मेडिकल, वर्धमान इलेक्ट्रीकल्स, भूषण ड्रेसेस, एम. एम. स्विटस् दुकानांचे शटर तुटले. दुकानातील फर्निचरची मोडतोड झाली. याच संकुलासमोरील सत्यम क्लॉथ सेंटर, राजेंद्र ऑटोमोबाइल्स, मेट्रो ऑटोमोबाइल्स, साई हॉस्पिटल तसेच दुकान व शोरूमच्या काचा फुटल्या. जवळील घरांची काचेची तावदाने, खिडक्या यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. संकुलावरील निवासस्थानी वास्तव्यास असलेल्या शिवाजी पाटील यांच्या घराला देखील मोठा तडा गेला असून, घरातील सर्व वस्तू इतरत्र पडून आगीने वेढले. पाटील कुटुंबीयांच्या सहा सदस्यांनी वेळीच घरातून पळ काढल्याने ते बालंबाल बचावले.

नागरिकांची धावपळ

स्फोटाच्या आवाजाने अनेक कुटुंबांची जीव वाचविण्यासाठी धावपळ झाली. जवळच असलेल्या राका यांच्या सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी आलेल्या महिलांनी घटना बघतात तेथेच पाण्याचे भांडे सोडून पळ काढला. आगीने रौंद्ररूप धारण केल्यावर पहाटे मुन्ना शेख, पंकज सोनवणे, जयप्रकाश सोनवणे, दादू सोनवणे, तुषार पाटील, रवी पाटील, पंकज ततार, जिनंद्र छाजेड, नरसिंग ताटीवार यांनी तत्काळ पालिका व पोलिस ठाण्याकडे धाव घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांची मिळविणार संमती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील वळणरस्ता कामासाठी पश्चिमेकडील बाधित शेतकऱ्यांची संमती घेण्यासाठी येत्या दोन दिवसात सरकारी अधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी विशेष बैठक घेण्यात यावी. तसेच, पश्चिमेकडील वळणरस्त्याच्या कामास तत्काळ प्रारंभ करण्याचा निर्णय येथील तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.


तहसील कार्यालयाच्या आवारात आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. पंडितराव भदाणे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. सी. झांबरे, पोलिस उपविभागीय अधिकारी अशोक नखाते, तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

शहरातून जाणाऱ्या पश्चिमेकडील बायपास कामास स्थानिक आमदारांचा विरोध असल्याचा थेट आरोप या बैठकीत वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. पंडितराव भदाणे यांनी केला. वकील संघाने या प्रकरणी माजी आमदार व विद्यमान आमदार यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने बैठकीने वेगळे वळण घेतले. मात्र, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पश्चिमेकडील वळणरस्त्याबाबत आमदार चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने या कामास गती मिळाली असून, निधीची आवश्यकता नाही, केवळ बाधित शेतकऱ्यांच्या संमतीची आवश्यकता असल्याचे नमूद केले.
या बैठकीस माजी नगराध्यक्ष पांडूरंग सोनवणे, भाजपा जिल्हा उपााध्यक्ष दिनेश देवरे, बाळासाहेब सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विठ्ठल येवलकर, बिंदूशेठ शर्मा, भाजपा शहराध्यक्ष राहुल सोनवणे, देवेंद्र जाधव, समको उपाध्यक्ष जगदीश मुंडावरे, संचालक पंकज ततार, दिलीप येवला, जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी आदींसह शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वळण रस्त्यासाठी सटाण्यात मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावर रासायनिक वायूने भरलेल्या टँकरच्या दुर्घटनेमुळे प्रलंबित असलेल्या बायपास रस्त्याला चालना मिळावी, या मागणीसाठी शहरातील वकील बार असोशिएशन, सटाणा डॉक्टर्स व मेडिकल असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला होता. यावेळी तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांना मोर्चेकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

शहरातील प्रलंबित बायपास होण्यास विलंब होत आहे. परिणामी शहरवासीयांना दररोज जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. रासायनिक टँकरचा अपघात अत्यंत भीषण असताना सुदैवाने कोणतीही मुनष्यहानी झाली नाही. यामुळे तातडीने बायपासला गती द्यावी, अन्यथा समाजातील शांत व संयमी समजला जाणरा वर्ग रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा निवेदनात देण्यात आला. बागलाणचे तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांना वकील संघाचे अध्यक्ष

अ‍ॅड. पंडितराव भदाणे, डॉक्टर्स सेलचे अध्यक्ष डॉ. व्ही. डी.पाटील तसेच मेडिकल असोशिएशनचे अभय बुरड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी शिष्टमंडळात डॉ. आर. एच. बंब, डॉ. प्रशांत निकम, डॉ. दिग्विजय शहा, डॉ. व्ही. के. येवलकर, डॉ. महेंद्र कोठावदे, डॉ. रवींद्र सूर्यवंशी, डॉ. जगताप, अ‍ॅड. सतीश चिंधडे, अ‍ॅड. बाबा चंद्रात्रे, डॉ. सतीश मलाणी, डॉ. कुलदीप जाधव, डॉ. प्रवीण खैरणार, डॉ. निरंजन पाटील, आदींसह मेडिकल असोशिएशन व वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अहिल्या’तून गाळ उपसा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या अ‌हिल्या धरणातील गाळ काढण्यास प्रारंभ झाला आहे. त्र्यंबक नगरपालिकेने लोकसहभागातून या धरणातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. नगर परिषदेने या धरणातील गाळ कोणास शेतीसाठी अथवा बाग बगीचासाठी हवा असेल तर मोफत घेऊन जावा, असे आवाहन केले आहे.

अक्षयतृतीयेचे औचित्य साधत नगराध्यक्षा विजया लढ्ढा, माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका यशोदा अडसरे, पाणीपुरवठा सभापती आशा झोंबाड, बांधकाम सभापती धनंजय तुंगार नगरसेवक अभिजीत काण्णव, गटनेते योगेश तुंगार, आरोग्य सभापती यशवंत भोये, माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे आदींच्या उपस्थितीत गाळ काढण्याचा शुभारंभ झाला. याकरिता जेष्ठ उद्योजक सचिन दप्तरी आदींसह ग्रामस्थांनी जेसीबी, टॅक्टर आदी उपलबध्द करून दिले.

ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी अहिल्या नदीवर माजी नगराध्यक्ष कै. हरिभाऊ दशपुत्रे यांच्या कार्यकाळात सन १९६९ च्या दरम्यान अहिल्या धरण बांधण्यात आले. धरणाची क्षमता सुमारे पाच दशलक्ष घनफूट आहे. पावसाळा सुरू होताच ब्रह्मगिरीचे शुभ्रधवल धबधबे कासेळण्यास प्रारंभ होतो आणि ही जलसंपदा या धरणात जमा होत असते. अवघ्या दोन दिवसात हे धरण ओव्हरफ्लो होऊन पाणी वाहण्यास लागते. गत काही वर्षात ब्रह्मगिरी पर्वताचे परिसरात झालेले खोदकाम तसेच नष्ट होत असलेल्या वनराईने झालेली धूप आदि कारणांनी हे धरण गाळाने पूर्णता भरले आहे. धरण परिसरात बांधकाम व्यावसायिकांनी टाकावू बांधकाम साहित्य, मलबा, विटा आदी साहित्य टाकले असून, हा सर्व भराव पावसाळयात धरणात वाहत जातो. परिणामी जवळपास २२ वर्ष शहराची तहान भागविणारे या धरणात पाणी थांबत नाही. पावसाळयात सर्व जलस्‍त्रोतांचे पाणी वाहून जाते. गाळाने शिल्लक पाणीसाठा दूषित होत असतो. म्हणूनच गाळ काढल्यास या त्र्यंबक नगरीचा अमूल्य ठेवा असलेल्या धरणाचा खोलवा वाढवावा, तसेच संरक्षक भिंत मजबूत करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूरमध्यमेश्वर कोरडेठाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड


शेकडो पाणीपुरवठा योजनांसह हजारो हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा करणारे नांदूरमध्यमेश्वर धरण कोरडेठाक पडले आहे. यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना संकटात सापडल्या असून, सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


ब्रिटिशांनी १९०६ मध्ये नांदूरमध्यमेश्वर धरण बांधून या धरणातून डावा व उजवा कालव्याची निर्मिती केली. या कालव्यामुळे निफाड, येवला, सिन्नर, कोपरगाव, शिर्डी, राहता, श्रीरामपूर या तालुक्यांचा परिसर सुजलाम् सुफलाम बनला. या धरणावरील लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजना, सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंप्रीसह १३ गाव पाणीपुरवठा योजना, भेंडाळी-औरंगपूर- महाजनपूर योजना, तलवाडे- पिंपगाव-निपानी पाणी योजना या पाणीपुरवठा योजना पाण्यावाचून कोलमडून पडल्या आहेत. तसेच, सात तालुक्यांचे ३६ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याअभावी करपून गेले आहे. नांदूरच्या धरणात पाणी असेल तरच या परिसराला पिण्यासाठी पाणी मिळू शकते. लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेला अवघ्या सात ते आठ दिवस पाणी पुरेल अशी परिस्थिती आहे. या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे साठवण क्षमता घटली आहे. धरणात बोरी, बाभळी, पानवेली यांनी बस्तान बसवल्याने चारा पाण्याच्या शोधार्थ येवला, सिन्नर, नांदगाव, चांदवड, मालेगाव तालुक्यातील मेंढपाळांनी डेरा टाकला आहे. धरण कोरडेठाक पडल्याने गाळ काढून साठवण क्षमता वाढविण्याची मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२०० पोलिस, ७५ कि.मी. अन् ५८ मिनिटे

$
0
0

अवघ्या ४० मिनिटांत झाली तयारी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सकाळच्या सुमारास प्रमुख रस्त्यावरील गर्दी, नाशिक-पुणे हायवेचे सुरू असलेले काम आणि ऐन वेळेस मदतीसाठी झालेली विनंती, अशा विपरीत परिस्थितीत शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी ग्रीन कॉरिडॉरचे नियोजन आखले. नाशिक संगमनेर हे ७५ किलोमीटरचे अंतर अवयव वाहतूक करणाऱ्या अॅम्ब्युलन्सने अवघ्या ५८ मिनिटांत कापले. यासाठी पोलिसांनी आखलेले नियोजन फारच महत्त्वाचे ठरले.

सिन्नर येथील शोभा शंकर लोणारी (वय ५२) या महिलेचा ब्रेनडेड झाला. कुटुंबीयांनी अवयवदानासाठी तयारी दर्शवल्याने तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तत्काळ शस्त्रक्रिया करून सर्व अवयव पुणे येथे पाठवण्याचा निर्णय घेतला. अवयव घेऊन जाणारी अॅम्ब्युलन्स पुणे येथे पाच ते सहा तासात पोहचणे आवश्यक होते. मात्र, सकाळच्या वेळी रस्त्यावरील वाहनांची गर्दी लक्षात घेता, हे काम जिकारीचे ठरणार होते. या पार्श्वभूमीवर डॉ. भाऊसाहेब मोरे यांनी पोलिस उपायुक्त विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्याशी चर्चा करून नियोजनास सुरुवात केली. याबाबत माहिती देताना पोलिस आयुक्त जगन्नाथन यांनी सांगितले की, सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आम्हाला ग्रीन कॉरिडॉरसंबंधी माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही वाहतूक पोलिस व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ पुढील तयारी केल्याचे जगन्नाथन यांनी स्पष्ट केले. शहर पोलिसांसमवेत नाशिक ग्रामीण, अहमदनगर तसेच पुणे ग्रामीण व पुणे शहर पोलिसांच्या पथकाने मदत केली.

ग्रीन कॉरिडॉरसाठी शहर पोलिस दलातील २०० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले. सकाळी ११ वाजून ४३ मिनिटांनी अवयवांची पेटी घेऊन अॅम्ब्युलन्स पुण्याच्या दिशेने रवाना झाली. यावेळी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक शंकर काळे व सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण कदम यांच्या दोन पथकांनी अॅम्ब्युलन्ससाठी मार्ग मोकाळा करण्याचे काम केले. ११ वाजून ४३ मिनिटांनी निघालेली अॅम्ब्युलन्स बरोबर १२ वाजून ४३ वाजून मिनिटांनी संगमनेर बायपास येथे पोहचली. तिथे पुणे पोलिसांच्या पथकाने या अॅम्ब्युलन्सला मार्ग मोकाळा करीत हॉस्पिटलपर्यंत पोहचवले. नाशिक संगमनेर हे ७५ किलोमीटरचे अंतर अॅम्ब्युलन्सने अवघ्या ५८ मिनिटांत पार केले. नाशिक व पुणे पोलिसांमुळे ही अॅम्ब्युलन्स फक्त तीन तास २५ मिनिटांत पुणे येथे पोहचली.

सिग्नल ठेवले बंद अॅम्ब्युलन्स व पोलिसांचे पथक अशोक स्तंभ, सीबीएस, मुंबई नाका, द्वारका, नाशिकरोड मार्गे सिन्नर व पुढे संगमनेरला पोहचले. या मार्गावरील सर्व सिग्नल बंद करून पोलिसांनी आठ ​मिनिटांसाठी वाहतूक थांबवली होती. पोलिसांचे नियोजन अगदी चोख ठरल्याने कोणताही अडथळा आला नाही. खूप कमी वेळात हवाई सेवेचे मदत घेणे शक्य नव्हते, असे सहायक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले.

ताफ्यासाठी पीएम स्टेटस मानवी जीवनाच्या महत्त्वामुळे इतर सर्व बाबींपुढे गौण ठरतात. म्हणूनच पोलिस आयुक्तांनी मिशन ग्रीन कॉरिडॉर आखताना अॅम्ब्युलन्स ताफ्याला पंतप्रधान ताफ्याचे स्टेटस ठेवण्याचे आदेश दिले. सकाळी नेहमीप्रमाणे पोलिस स्टेशनचे काम सुरू झाले होते. मात्र, एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या मदतीसाठी कॉल होताच सर्व यंत्रणा धावून आली. सर्वसामन्यांच्या मदतीला आपण उभे राहत असल्याची भावना यामागे होती, अशी प्र​तिक्रिया सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ यांनी व्यक्त केली.

रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त शहर पोलिसांनी ऑपरेशन ग्रीन कॉरिडॉरला सुरुवात करताना रस्त्यावरील बंदोबस्तासाठी फौजफाटा तैनात केला. वाहतूक पोलिस, गस्ती पथक, सर्व सीआर मोबाइल्स, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बीट मार्शल यांच्यासह किमान २०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिस उपायुक्त तसेच सहायक पोलिस आयुक्तांनी सुध्दा या मोहिमेत सहभाग घेऊन अॅम्ब्युलन्ससाठी मार्ग मोकळा करून दिला. या सर्व घडामोडींवर पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन स्वतः लक्ष ठेऊन होते. चिंचोली फाटा हे शहराचे टोक सदर वाहनांनी अवघ्या १८ मिनिटांत पार केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात भरदिवसा दोन लाखांवर डल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

कधी दुचाकीस्वाराची, तर कधी कारचालकाची रोकड अगदी भरदिवसा लांबविल्याच्या आजवरच्या येवला शहरातील घटना असतानाच सोमवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी भरदुपारी एकाच्या तब्बल २ लाख ३० हजारांच्या रोख रकमेवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. मनमाड-नगर राज्य महामार्गावर येवला शहरातील फत्तेबुरुज नाक्याजवळ दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.


कोपरगाव तालुक्यातील अचलगाव येथील रहिवाशी संतोष अशोक शिंदे (वय ३१) हे सोमवारी मनमाड येथील आपल्या पाहुण्याकडून पाइपलाइनच्या कामासाठी दोन लाख रुपये घेऊन चालले होते. येवला शहरात येताना त्यांनी बँक ऑफ इंडियामधून ३० हजार रुपयांची रक्कम देखील काढली. मारुती व्हॅन (एमएच-१५, इपी ५१०६) घेऊन दुपारी दीडच्या सुमारास संतोष शिंदे हे शहरातील फत्तेबुरुज नाक्याजवळ फरसाण घेण्यासाठी उभे राहिले. त्यांचा मित्र फरसाण घेण्यासाठी खाली उतरला. त्याचवेळेस साधारण २५ ते ३० वर्ष वयोगटातील एक तरूण गाडीत बसलेल्या संतोष यांच्या जवळ येताना, त्याने तुमच्या व्हॅनमधून ऑईलची गळती होत असल्याचे सांगितले.
ऑईल गळती पाहण्यासाठी शिंदे हे व्हॅनच्या खाली उतरत इंजिनच्या खाली वाकले असता, या अवघ्या दोन मिनिटाच्या कालावधीत संतोषची नजर चुकवत अज्ञात चोरटा गाडीत ठेवलेली दोन लाख तीस हजारांची बॅग घेऊन पसार झाला. संतोष शिंदे यांच्या तक्रारीवरून येवला शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पशुधनाला मिळतोय चारा छावण्यांचा आधार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीने भीषण पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे बळीराजाला शेतीकामात मदत करणाऱ्या गाय, बैल, म्हैस या मुक्या जनावरांनादेखील पाणी आणि चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत अनेक सामाजिक संस्था या मुक्या जीवांसाठी धावून येत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात गोरक्षा समिती, मुंबई जैन संघ, वर्धमान संस्कार धाम यांच्या वतीने तालुक्यात एकूण सात चारा छावण्या उभारण्यात आलेल्या आहेत. यात एकूण ३५०० मुकी जनावरे तेथे विसावली आहेत. या ठिकाणी पाणी आणि चाऱ्याची सोय करण्यात आली आहे.
तालुक्यातील ढवळेश्वर येथे मुंबई येथील जैन परिवार व मालेगाव वर्धमान परिवाराने चार चारा छावणी सुरू केल्या आहेत. या चारा छावणींमुळे या भागातील सुमारे पाचशे गुरांना चारा उपलब्ध झाला आहे. तसेच, गोवंश रक्षा समितीच्या वतीने देखील माळमाथा भागातील चारा आणि पाण्याची टंचाई लक्षात घेता या भागातील गुरांसाठी झोडगे व डोंगरळे येथे चारा छावणी सुरू केली आहे. यात डोंगराळे येथील छावणीत २ हजार १३५, तर झोडगे येथील चारा छावणीत ३५० हून अधिक जनावरे आहेत. नीळगव्हाण येथील गोशाळेत देखील सध्या ५४८ जनावरे आहेत. या चारा छावणी उभारण्यासाठी तालुक्यातील गोवंश रक्षा समितीचे सुभाष मालू, पांजरापोळ संस्थेचे केशरीचंद मेहता, विजय मेहता, झोडगेचे दीपक देसले, योगेश देसले, पोपट निकम आदींनी पुढाकार घेतला. छावणीसाठी जागा उपलब्धी, चारा व पाणी टँकर उपलब्धी करून दिल्याने दुष्काळी परिस्थितीत तालुक्यतील शेतकऱ्यांना आपले पशुधन वाचण्यास मदत झाली आहे.

मुक्या जनावरांना चारा आणि पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी या संस्थांनी पुढाकार घेतला असून, त्यासाठी ठिकठिकाणी होर्डिंग लावून समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांना मदतीचे आवाहन केले आहे. शेतकरी बांधवांना पुरेसा चारा उपलब्ध होऊपर्यंत या छावण्या सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसेच, परिसरातून मागणी झाल्यास त्या गावातदेखील अशा छावण्या सुरू करण्याची तयारी समितीने दर्शवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये अवयवदानाचा ऐतिहासिक प्रयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुर्दैवाच्या फेऱ्यात ब्रेन डेड झालेल्या एका रुग्णास अवयव रुपाने पुन्हा जगविण्याच्या ऐतिहासिक प्रयोगाचे मंगळवारी नाशिककर साक्षीदार ठरले. मृत रुग्णाच्या अवयव दानासाठी योग्यवेळी झालेले प्रबोधन, त्यास मृताच्या नातेवाईकांचा मिळालेला प्रतिसाद आणि पोलिस यंत्रणेची योग्यवेळी मिळालेली साथ यामुळे उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच अवयव प्रत्यारोपणासाठी ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्यात आला. खास अवयव प्रत्यारोपणासाठी बायरोड करण्यात आलेला हा देशातील आजवरचा मोठा ग्रीन कॉरिडॉर असल्याचे मानले जात आहे. अवयवदान चळवळीच्या दृष्टीने या घटनेला देशस्तरावर विशेष महत्त्व आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी येथील रहिवासी शोभा शंकर लोणारे (वय ५२) यांना उच्च रक्तदाब आणि ह्रदयविकाराच्या परिणामी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्रास होऊन त्या घरात कोसळल्या होत्या. यानंतर महिनाभरात पुन्हा तसा त्रास झाल्याने त्यांना उपचारांसाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे उपचारांदरम्यान ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांचा ब्रेन डेड झाल्याचे रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमाराला डॉक्टरांनी घोषित केले. ऋषिकेश हॉस्पिटलने या घटनेची माहिती कळताच मृत शोभा लोणारे यांच्या नातेवाईकांचे अवयव दानाविषयी समुपदेशन केले. नातेवाईकांनीही प्रतिसाद देत त्यांना ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथे विविध तज्ज्ञांनी दान करण्यात येणाऱ्या अवयवांची तपासणी करून परवानगी दिल्यानंतर डॉक्टरांनी अवयव प्रत्यारोपणाच्या दृष्टीने तयारी सुरू केली.

पहाटे झाला अखेरचा निर्णय

ब्रेन डेड झालेल्या मृताचे दान करण्याजोग्या अवयवांची तपासणी रात्री झाल्यानंतर मंगळवारी सकाळच्या सुमाराला ऋषिकेश हॉस्पिटलचे संचालक डॉ. भाऊसाहेब मोरे यांनी नाशिक ते पुणे बायरोड ग्रीन कॉरिडॉरसाठी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस उपायुक्त विजय पाटील यांच्याशी याबाबत चर्चा झाल्यानंतर पोलिसांनीही त्वरित प्रतिसाद देत कार्यवाही केली. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी प्रत्यारोपणासाठी हे अवयव संगमनेरपर्यंत सुरक्षित पोहचविण्याची जबाबदारी घेत डॉक्टरांना आश्वस्त केले. यासाठी डॉक्टरांच्या वतीने सज्ज अशा कार्डियाक अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती.

सेकंदा-सेकंदाशी स्पर्धा

दान करण्यात आलेल्या अवयवांपैकी मयताचे डोळे हे नाशिकमध्येच दान करण्यात आले. तर लिव्हर, रक्तवाहिन्या व किडनी हे प्रत्यारोपणासाठी पुण्यात पाठविण्यात आले. नाशिक ते पुणे या प्रवासादरम्यान कार्डियाक व्हॅनचा अपेक्षित कालावधी सुमारे ३ तास ४० मिनिटांचा होता. सकाळी ७ वाजता मृताचे लिव्हर शरीरापासून अलग करण्याची सुरू झालेली प्रक्रिया सकाळी १०.३० वाजता पूर्ण झाली. यानंतर सकाळी ११.१५ वाजता सज्ज अॅम्ब्युलन्समध्ये हे अवयव सुरक्षित ठेवण्यात आले. याकामी शहरातील नामवंत नेफरॉलॉजिस्ट आणि न्यूरो फिजिशियन्सने तपासण्या केल्या. यानंतर अवघ्या १८ मिनिटांमध्ये नाशिकमधून अशोकस्तंभ, सीबीएस, मुंबई नाका, उपनगर फ्लाय ओव्हरमार्गे चिंचोली फाट्यापर्यंत ही अॅम्ब्युलन्स पोहचविण्यात आली. तेथून पुढे नाशिक ग्रामीण पोलिसांनी संगमनेरपर्यंत ही अॅम्ब्युलन्स पोहचवली. नाशिक ते संगमनेर या अॅम्ब्युलन्स प्रवासाचा टप्पा अवघ्या ५८ मिनिटांमध्ये गाठला गेला.

'त्या' मातेने दिले सहा जणांना जीवदान

सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी येथे उभ्या हयातीत शोभा लोणारे यांची प्रतिमा सात्विक, धार्मिक अन् मदतशील वृत्तीची होती. जीवनाच्या अखेरीला त्यांच्या अवयवदानाचा निर्णय घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या दोन किडन्या, लिव्हर, दोन्ही डोळे आणि रक्तवाहिन्या दान करण्यात आल्या. पैकी एका किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण नाशिकमधील ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. दुसरी किडनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला देण्यात आली. लिव्हर व रक्तवाहिन्या पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयास देण्यात आले. त्यांचे दोन्ही डोळे नाशिकच्या सुशील नेत्रालयास देण्यात आले. या प्रकारे शोभा लोणारे यांनी जीवनाच्या अखेरीलाही नव्या सहा जणांना जीवदान दिले असल्याचे डॉ.भाऊसाहेब मोरे यांनी 'मटा' शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन शेतकऱ्यांची निफाडमध्ये आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्जबाजारीपणा, दुष्काळी परिस्थिती सारख्या संकटांमुळे हतबल झालेल्या जिल्ह्यातील आणखी दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे बागायतदारांचा तालुका अशी ओळख असलेल्या निफाड तालुक्यामध्ये या दोन्ही घटना घडल्या आहेत. त्यामुळे एकट्या निफाड तालुक्यात चालू वर्षात जीवनयात्रा संपविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ११ झाली आहे.

जानेवारी ते मे २०१६ या कालावधीत नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ३० शेतकऱ्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे. मे महिन्याच्या पहिल्या दहाच दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ओझर येथील सायखेडा फाटा परिसरात राहणारे गोविंद विलास चौधरी (वय ४८), या शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. चौधरी यांची पत्नी बाहेरगावी गेली होती. सकाळी त्यांचे भाऊ त्यांना उठवायला गेले. तेव्हा आत्महत्येची ही घटना समोर आली. ओझर पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. चौधरी यांच्या खिशात चिट्ठि आढळून आली. माझ्या मृत्युला कोणासही जबाबदार धरु नये असे या ‌चिठ्ठीत लिहिले आहे. चौधरी यांच्या पश्चात आई, वडील पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. दुसरी घटना वनसगाव परिसरात घडली. आकाश राजेंद्र शिंदे (वय २०) या तरुणाने ८ मे रोजी विषारी औषध सेवन केले. नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना सोमवारी त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी विभागाला न्यायालयाचा दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिक विभागातील ७२ कृषी पर्यवेक्षकांची कृषी सहाय्यक पदावर पदावनती करण्यात आली आहे. त्यापैकी ३४ जणांच्या पदावनीतीला मॅटच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतीच स्थगिती दिली. दि. ४ मेपासून एकूण ४२ कृषी पर्यवेक्षकांच्या पदावनतीला मॅटने स्थगिती दिली आहे. त्यामुळे गैरकारभार करणाऱ्या कृषी विभागाला मोठा दणका बसला आहे.

कृषीपर्यवेक्षकांच्या नाशिक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कुटे तसेच, संघर्ष समितीचे चंद्रशेखर गांगुर्डे, सतीश विंचुरकर, गणेश जाधव यांनी ही माहिती म. टा. ला दिली. मॅटने (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण) चार मे रोजी आठ कृषी पर्यवेक्षकांच्या पदावनतीला स्थगिती दिली होती. त्यापाठोपाठ ९ मे रोजी २५ पर्यवेक्षकांच्या आणि १० मे रोजी आणखी ९ जणांच्या पदावनीतीला मॅटने स्थगिती दिली. हा कृषी विभागाला मोठा दणका आहे. आणखी काही पर्यवेक्षकांची सुनावणी बाकी आहे. त्यांनाही न्याय मिळेल, अशी आशा समितीने व्यक्त केली आहे.

कृषी विभागाने २२ एप्रिलला आदेश काढून ७२ जणांची पदावनती केली. यानंतर संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश शिंदे यांनी धुळ्यात आत्महत्या केली. एकाचवेळी ७२ कृषी पर्यवेक्षकांना पदावनत करण्याच्या ऐतिहासिक घटनेमुळे संतप्त कृषी पर्यवेक्षकांनी नाशिकरोड येथे विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांना गेल्या आठवड्यात घेराव घातला होता. विभागातील नाशिक, जळगाव आणि धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील कृषी पर्यवेक्षकांनी हे आंदोलन केले. कृषी पर्यवेक्षकांनी खातेतंर्गत अकाऊंटची परीक्षा उत्तीर्ण होणे ६ डिसेंबर ७५ पासून सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, आजपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच, परीक्षेसाठी ट्रेनिंगही देण्यात आलेले नाही, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.

मागण्यांसाठी आंदोलन अनेक कृषी पर्यवेक्षकांची वेतनवाढ ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यामुळे थांबविण्यात आली आहे. २२ एप्रिलची बढतीची आणि पदावनतीची यादी रद्द करावी, कृषी पर्यवेक्षकांना आहे त्याच पदावर ठेवावे आदी मागण्यांसाठी कृषी पर्यवेक्षकांनी आंदोलन केले. पदावनत करण्याच्या घटनेमुळे कृषी पर्यवेक्षकांनी नाशिकरोड येथे विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांना घेराव घातला होता. न्यायालयाने पदावनती झालेल्या ३४ जणांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. उर्वरित पर्यवेक्षकांच्या पदावनीतीला स्थगिती मिळते का याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त विद्यापीठाच्या हॉल तिकिटात विषयच गहाळ

$
0
0

पर्यावरण विषयाचा पेपर असल्याची नोंद नाही

कॉलेज क्लब रिपोर्टर,

नाशिक : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या हॉल तिकिटात गोंधळ झाल्याची बाब समोर आली आहे. बीए आणि वृत्तपत्रविद्या शाखा यांच्या एसवाय वर्गाची अंतिम परीक्षा बुधवार (दि. ११) पासून सुरू झाली. यासाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या हॉल तिकिटात मात्र 'पर्यावरण' विषयाच्या पेपरची नोंद नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून ११ मे रोजी पर्यावरण विषयाचा पेपर ठेवण्यात आला होता. विद्यापीठ शिक्षण नियमानुसार पर्यावरण शास्त्र हा विषय एसवायच्या विद्यार्थ्यांना बंधनकारक करण्यात आला आहे. असे असले तरी एसवाय बीए आणि एसवाय जर्नालिझम या शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटात मात्र या विषयाचा पेपर असल्याची नोंद केली गेली नव्हती. कॉलेजेसच्या सेंटर्समधून देण्यात आलेल्या या हॉल तिकिटात याची नोंद नसल्याने विद्यार्थ्यांना पेपर आहे की नाही याचा पेच निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी केंद्र संयोजकांनी पर्यावरण विषयाचा पेपर असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना मेसेजद्वारे कळवल्याचे वृत्त आहे. मात्र, हा मेसेज सर्व विद्यार्थ्यांपर्यंत न पोहोचल्याने ऐन वेळेवर विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागले. यामुळे अनेक विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहत तर काही गैरहजर राहिल्याचेही देखील समजते. पर्यावरण विषयाच्या ८० गुणांच्या पेपरमध्ये अनुत्तीर्ण झाल्यास एटीकेटी लागण्याची शक्यता असते. यामुळे विषयाचा अभ्यास न झाल्याने परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीओ’त आता मॅन्युअली वाहन परीक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, अमृतधाम

नाशिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील स्वयंचलित वाहन चाचणी आणि परीक्षण सेंटर सध्या तोडफोडीमुळे बंद आहे. यामुळे पूर्वीप्रमाणेच मॅन्युअली पद्धतीने वाहन तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारपासून वाहन तपासणी मॅन्युअली पध्दतीने सुरू करण्यात आली आहे.

नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात केंद्र शासनाच्या प्रयत्नातून स्वयंचलित वाहन चाचणी व परीक्षण केंद्र सुरू करण्यात आले होते. वाहनांची तपासणी करून वाहनमालकास प्रमाणपत्र दिले जात होते. यावेळी अनेक वाहने तपासणीदरम्यान फेल ठरत होती. यामुळे वाहनमालक आणि चालक यांच्यात नाराजी होती. यात वाद झाले आणि केंद्राची तोडफोड झाली. यामुळे हे स्वयंचलित केंद्र बंद पडले आहे.

वाहनचालक व मालक यांची होणारी गर्दी आणि अडचण लक्षात घेऊन पूर्वीप्रमाणे तपासणी सुरू करण्यात आली आहे. स्वयंचलित वाहन केंद्र कधी दुरुस्त होईल, याबाबत खात्री नाही. त्यामुळे मंगळवारपासून पूर्वीप्रमाणे वाहनांची तपासणी करण्यात येईल, असे नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कलस्कर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images