Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गुन्हेगारांचा जोर; सर्वसामान्यांना घोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आम्ही तुमच्या फडतूस कायद्याला घाबरत नाही. माझ्यावर १९ केसेस आहेत आणि मी आताच मोक्क्यातून सुटलो आहे. जेल म्हणजे माझं सासर आहे. मी मनात आलं तेव्हा येतो आणि परत जातो, असे धमकावून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जया दिवे या सराईत गुन्हेगारामुळे एका महिलेसह पाच ते सहा सामाजिक कार्यकर्त्यांना भूमिगत व्हावे लागले आहे. मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू असून, यामुळे पंचवटी पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पीडित महिला आणि तक्रारदार कविता पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांचे मालेगाव स्टॅण्ड परिसरातील पंजाब हॉटेल शेजारी कार्यालय आहे. या कार्यालयातून मानवाधिकार व बालगुन्हेगारांना सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात. पवार यांच्या कार्याची परिसरात दखल घेतली जाते. ६ एप्रिल रोजी रात्री पवार आपल्या कार्यालयातून घराकडे निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासमवेत काही सामा​जिक कार्यकर्ते देखील होते. कार्यालयातून बाहेर निघाल्यानंतर पवार यांनी शेजारच्या एका दुकानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ​निमित्त फ्लेक्स बोर्ड तयार करण्यासाठी दिले. या दुकानातून त्या बाहेर पडल्या असता सराईत गुन्हेगार जया दिवे याने त्यांना हटकले. पवार यांनी त्यास विचारणा केली असता मद्यधुंद अवस्थेतील दिवेने त्यांना शिवीगाळ सुरू केली. दिवेच्या काही साथिदारांनी त्यांच्या दोन कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला केला. कविता पवार यांना देखील मारहाण झाली. पवार व त्यांचे साथिदार लागलीच पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गेले. तिथे काही पक्षांचे कार्यकर्ते सुध्दा पोहचले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाद नको म्हणून ही तक्रार मागे घेण्यासाठी सर्वांनी गळ घातली. पवार यांनी सुध्दा त्यास होकार दिला. मोक्क्यातीलच आणखी सराईत राकेश कोष्टीने स्वतः पवार यांची समजूत काढत प्रकरणावर पडदा पाडला. मात्र, गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास दिवे, त्याचा साथिदार कुंदन परदेशी, अक्षय इंगळे व चार ते पाच जणांनी पवार यांच्या कार्यालयात धुडगूस घातला. देशी कट्टे दाखवत जीवे मारण्याची धमकी या संशयितांनी दिली. या प्रकरणी पोलिसांकडे दिलेला तक्रार अर्ज मागे घेण्याची धमकी त्यांनी दिली. या घटनेची माहिती पवार यांनी लागलीच पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांना दिली. मात्र, त्यांनी सहकार्य करण्यास नकार दिल्याचा आरोप पवार यांनी केला. या घटनेतील सर्व आरोपी सराईत असून, मागील दोन दिवसांपासून मला व माझ्या साथिदारांना भूमिगत रहावे लागत आहे.

किती दिवस लपायचे? गुन्हेगार जीव घेतील या भीतीने किती दिवस लपत फिरायचे, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे. १८ पेक्षा गंभीर गुन्हे दाखल असलेले संशयित सर्वसामान्यांना जगू देणार नसतील आणि पोलिस उफरटे सल्ले देणार असेल तर कोणाकडे दाद मागायची, असा सवाल पवार यांनी केला. सराईत गुन्हेगारांकडून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याच्या या प्रकाराची पंचवटीत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

पंचवटीच्या विभाजनाने साधले काय? पंचवटीतील गुन्हेगारी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने या पोलिस स्टेशनचे विभाजन करून म्हसरूळ हे नवीन पोलिस स्टेशन सुरू केले. तीन वाहनांच्या गस्ती ऐवजी आता या भागात सहा वाहने येथे गस्तीवर असतात. पोलिसांचे संख्याबळ दुप्पट झाले. अधिकाऱ्यांची संख्या वाढली. पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. मात्र, यानंतरही पंचवटी पोलिस स्टेशन हद्दीतील गंभीर गुन्ह्यांची संख्या कमी झालेली दिसत नाही.

या प्रकरणी अदाखलपात्र गुन्हा दाखल झाला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे. संबंधित महिलेने पहिल्या वेळी तक्रार देण्याऐवजी तडजोड केली होती. या गुन्ह्यात मोक्का असलेल्या संशयितांचा समावेश असून, त्यांना पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही. सदर महिलेच्या तक्रारीनुसार सर्वांवर कारवाई करण्यात येईल. - प्रकाश सपकाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंचवटी

सराईत गुन्हेगारांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येतात. ते मनाला वाटेल त्यावेळी कार्यालयात येऊन कट्टे दाखवतात. पोलिस निरीक्षक मात्र सहकार्य करण्याऐवजी आम्हालाच मागे हटण्याचा सल्ला देतात. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा. पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांनी आदेश देऊनही पीआय सपकाळे यांनी गुन्हेगारांना पाठीशी घातले. पंचवटी पोलिसांमुळे आम्हाला भूमिगत व्हावे लागले. - कविता पवार, पीडीत तक्रारदार महिला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ १७ कर्मचाऱ्यांबाबत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सेवेत सहाय्यक पदावर घ्यावे या मागणीसाठी १७ कर्मचाऱ्यांच्या व इतर प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक विचार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून कायदेशीर सल्ला घेण्याबाबतचा ठराव व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत शनिवारी संमत करण्यात आला.

मुक्त विद्यापीठाच्या सेवेत १७ कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यावरून आमदार सीमा हिरे, सुनील बागूल, विजय साने यांच्यासह अन्य पालकांनी दालनात घुसून कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांना घेराव घातला होता. कुलगुरू आणि कुलसचिवांची कोंडी केल्यानंतर कुलगुरूंना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याच्या घटनेचे प्रचंड पडसाद उमटले होते. या घटनेचा विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला होता.

सहाय्यक पदावर वर्णी लावण्याच्या मागणीसाठी १७ कर्मचाऱ्यांनी २८ मार्चपासून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यांना सामावून घेण्याबाबत सरकारने अध्यादेशही काढला होता. तथापि सरकारने विद्यापीठाच्या १०३ कर्मचाऱ्यांचे, तसेच निवृत्त झालेल्या व होत असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, त्यानंतर या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असा पवित्रा मुक्त विद्यापीठाने घेतला. मात्र, काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप केल्याने या कर्मचाऱ्यांना लवकरच पदावर घेतले जाईल, असे आश्वासन कुलगुरूंन‌ी दिले होते. त्या संदर्भात शनिवारी झालेल्या बैठकीत उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून कायदेशीर सल्ला घेण्याबाबतचा ठराव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंड अन् भाविकांचीही तृप्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तब्बल १३९ वर्षानंतर रामकुंड कोरडे पडल्यानंतर भाविक व पर्यटकांची संख्या रोडावली होती. मात्र, रामकुंडात पाण्याचा खळाखळाट वाढल्यानंतर शनिवारी भाविकांचीही गर्दीही वाढली. अनेकांनी देवदर्शन करीत रामकुंडात डुबकी मारण्याचाही आनंद लुटला. सेकंड सॅटर्डेची सुटी असल्यामुळे अनेकांनी रामकुंडावर जाऊन ती एन्जॉय केली. रामकुंड कोरडे पडल्यानंतर गुरुवारी महापौर अशोक मुर्तडक यांनी गोदाकाठी जाऊन रामकुंड, लक्ष्मणकुंड व परिसराची पाहणी केली होती. त्यानंतर त्यावर काय उपाययोजना करता येईल याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी गांधी तळ्याचे पाणी घेण्यात आले तर रात्री दोन टँकरने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर गुढीपाडव्याला जलकुंभातून पाइपव्दारे पाणी सोडण्यात आले. या सर्व गोष्टीला गोदाप्रेमी व पर्यावरणवादींनी विरोध केला असला तरी रामकुंडावर पाणी आल्यामुळे अनेकांना आनंदही झाला आहे. पाणी सोडल्यानंतर २० लाख लिटरची क्षमता असलेल्या रामकुंड ७५ टक्के भरले असून त्यातून भाविक, पुरोहित व आजूबाजूचे छोटे व्यवसाय करणाऱ्यांना आनंद झाला आहे. पूजा व विधीही रामकुंडावर सुरू झाल्या असून पुरोहित संघानेही त्याचे स्वागत केले आहे. रामकुंड कोरडे पडल्यानंतर त्यात असलेल्या घाणीची दुर्गंधी सुध्दा वाढली होती. मनपाने मात्र ती साफ करण्याची मोहीम घेतल्यामुळे हा परिसरही स्वच्छ झाला. गांधी तळ्यात अगोदरच पाणी असल्यामुळे येथील बोटींग चालू होती. त्यात रामकुंडावर पाणी आल्यामुळे सगळ्यांना हायसे वाटले.

लक्ष्मण कुंडावरील झरा बंद मनपाच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष्मण कुंडावरील पायरीजवळ खोदल्यानंतर तेथून पाणी येऊ लागले होते. हे पाणी झऱ्याचे असलेले बोलले जात होते. पण, शनिवारी या झऱ्यातून पाणी येणे आता बंद झाले आहे.

केवळ गुढीपाडव्याचे निमित्त साधत मनपाने देखावा केला. त्यानंतर शनिवारी दिवसभर कोणीही फिरकले सुध्दा नाही. लक्ष्मण कुंडावरील झरा सापडला असे बोलले जात असले तरी पायरी खोदून असे झरे सापडू शकत नाही. मनपाने बुजवलेल्या विहिरीतून हे पाणी झिरपत असावे ते आज बंद झाले. या झऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे. - देवांग जानी, गोदावरीप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुधालाही महागाईचा चटका

$
0
0

प्रशांत धिवंदे, नाशिक
दुष्काळामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्यांना नागरिकांना आता दुधाच्या दरवाढीचा झटका बसण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांत अनेकदा दुधाच्या दरात चढ-उतार होत आहेत. मागणीबरोबरच चाऱ्याचे दरही वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना येत्या काही दिवसांत दुधाच्या आणखी दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.

दिवसागणिक बदलत्या ऋतुमानामुळे व तप्त उन्हापासून वाचण्यासाठी लस्सी, दही, पनीर व विविध प्रकारचे फालुदा यांसारख्या थंड पेयांना मागणी वाढली आहे. पर्यायाने या पदार्थांसाठी लागणाऱ्या दुधालाही मागणी वाढत आहे. मागणी आणि पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर दुधाच्या दरवाढीची चिन्हे आहेत. सध्या दूध बाजारातील दर ५५ ते ६० रुपये प्रतिलिटरप्रमाणे असून, यात आणखी वाढ होण्याची शक्यता दूध व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

मागणी वाढल्यास दरही वाढतील सध्या सकाळ व सांयकाळ अशा दोन सत्रांत नाशिकचा दूध बाजार भरतो. येथून दिवसाकाठी हजारो लिटर दूध विक्री होत असून, वाढत्या मागणीनुसार दुधाची दरवाढ होते. गायीचे दूध थंड असते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात गायीच्या दुधाला मागणी वाढली आहे. हॉटेल व हातगाड्यांवर लस्सी, ताक, मठ्ठा आदींसारख्या पदार्थांसाठी दुधाला मागणी वाढल्याने दरही वाढण्याची शक्यता आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाय, म्हशीसाठी लागणाऱ्या घास, ऊस बांडी, कडबा, ढेप, चुनी, तुरीच्या दरात वाढ होत असल्याने दुधाचेही दर अटळ असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाटा सेंटरमुळे अर्थव्यवस्थेला चालना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माहिती तंत्रज्ञान विभागाला महाराष्ट्रात नेहमी गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा मिळत आल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून नाशिकच्या इएसडीएस क्लाऊड डाटासेंटरने त्यांचा उद्योग मुंबईत सुरू केला आहे. यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नवी मुंबई येथील महापे येथे इएसडीएस क्लाऊड अॅण्‍ड डाटासेंटरच्या दुसऱ्या डाटा सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हे डाटासेंटर अत्यंत आद्यायावत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. तसेच महाराष्ट्र सरकारसोबत सुमारे २०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला आहे. ज्यामुळे या सेंटरसाठी वर्ष २०१७-१८ पर्यंत साधारणत: ५०० रोजगार निर्मिती होणार आहे. हे सेंटर साधारणत: ८० हजार स्क्वेअर फुटात उभारले असून, याव्दारे ग्राहकांसाठी प्रायव्हेट क्लाऊड आणि ईनलाईट पब्लिक क्लाऊड सेवा देण्यात येणार आहे. सोबतच न्यू जनरेशनला समोर ठेवून तयार केलेल्या ईनलाईट ३६० ही नवीन सेवा देखील सुरू करण्यात येणार आहे. इएसडीएस कंपनीला या सेवेचे पेटेंट मिळाले असून, याव्दारे माहिती तंत्रज्ञानाच्या जगात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच इएसडीएसच्या या नवीन सेवेमुळे केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया या अभियानाला हातभार लाभणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. यावेळी इएसडीएस कंपनीचे सीईओ आणि एमडी पीयूष सोमाणी यांनी सांगितले की, आमच्या नवीन क्लाऊड डाटा सेंटर आणि ईनलाईट ३६० या हायब्रिड क्लाऊड प्लॅटफॉर्ममुळे क्लाऊड डाटासेंटरसंदर्भात चांगल्या सेवा देत आहोत हे सिद्ध केले आहे. ईनलाईट क्लाऊड संशोधनाचे पेटंट एकमेव इएसडीएस कंपनीकडे आहे. आमच्या या नवीन सेवेमुळे आमच्यासोबत जोडल्या जाणाऱ्या भागीदारांना त्यांच्या उद्योगाला उंचावण्यासाठी चांगलाच हातभार लागणार आहे. तसेच सर्वोत्तम सेवा देऊन आयटी क्षेत्रात एक प्रकारे मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नवीन सेवेसाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार करून मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियासारख्या योजनांना आमचा हातभार लागून देशाच्या आर्थिक स्थितीला मजबूत करणार आहे. यावेळी खासदार अनुराग ठाकूर, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रिकेटच्या वादावरून चाकू हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून एकाने चाकू हल्ला केल्याची घटना सिडको परिसरातील पाटीलनगर परिसरात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पाटीलनगर येथे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मुलांच्या क्रिकेट खेळण्याहून वाद निर्माण झाला होता. मुलांचा वाद मोठ्यापर्यंत पोहचल्यानंतर संशयित आरोपी कैलास छबुराव डुंबरे यांनी फिर्यादी विलास सुधाकर वाघ यांच्यावर चाकू हल्ला केला. घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक चव्हाण करीत आहेत.

सायकलस्वाराचा मृत्यू नाशिक : भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेने सायकलस्वाराचा मृत्यू झाला. अपघाताची घटना वरचे चुंचाळे परिसरात बुधवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झाली.

संतोष चिंतामण डोळस, असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अंबड परिसरातील डायमंड पार्क येथील दत्तमंदिराजवळ राहणारे संतोष डोळस बुधवारी सकाळी सहा वाजून २० मिनिटांच्या दरम्यान चुंचाळे परिसरात सायकलने जात होते. यावेळी एका अज्ञात वाहनाने त्यांच्या सायकलीस जोराची धडक दिली. त्यात डोळस मृत्युमुखी पडले. या प्रकरणी प्रबुध्दनगर येथील चेतन सुरेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक इंगोले करीत आहे. शहरात अपघातांच्या घटनेत सातत्य आले असून यात दुचाकीस्वार, पादचारी व सायकलस्वार मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण लक्षणीय ठरते आहे.

तलवारीने वार मित्रांमधील मस्करीनंतर एका टोळक्याने युवकास हॉकीस्टीक व तलवारीने मारल्याचा प्रकार अंबड पोलिस स्टेशन हद्दीत घडला. या प्रकरणी पोलिसांनी यतिन शिंदे, करण शिंदे व त्यांच्या साथिदारांविरोधात गुन्हा दाखल केला. आयटीआय अंबड लिंकरोडवरील कार्तिकेय नगर येथे राहणारा हर्षल शरद मोरे व संशयित आरोपी शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास केवल पार्क येथे होते. यावेळी संशयित शिंदे व त्याच्या साथिदारांनी मोरेला मस्करीत शिवीगाळ केल्याच्या कारणावरून हॉकीस्टीक व तलवारीने मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दुचाकीची चोरी दिंडोरीरोडवरील चित्रकुट अपार्टमेंटमध्ये पार्क केलेली दुचाकी (एमएच ४१ जे ९८४८) चोरट्यांनी लंपास केली. चोरीची घटना २८ मार्च रोजी झाली असून, या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणी भूषण संजय देशमुख यांनी फिर्याद दिली.

वाहनाची चाके काढली मोटरसायकल चोरी करणे शक्य नसल्याने चोरट्यांनी त्या दुचाकीची दोन्ही चाके ड्रमसह काढून नेल्याची घटना आडगाव परिसरातील मीरा दातार रोडवरील सर्वज्ञ अपार्टमेंट घडली. या ठिकाणी राहणाऱ्या नितीन रामभाऊ केदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. चोरीची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेंज रिपोर्टविना बेकायदेशीर काम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केवळ चेंज रिपोर्टअभावी जिल्ह्यातील १९५६ संस्थांचे ट्रस्टी बेकायदापणे काम करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या संथ कारभारामुळे संस्थांच्या बेकायदा कामकाजाला बळ मिळत आहे. त्यामुळे ठराविक दिवसांतच चेंज रिपोर्ट मिळणे गरजेचे बनले आहे.

धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या सार्वजनिक विश्वस्त संस्थांचे पदाधिकारी बदलूनही त्यांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाने मंजुरी न दिल्यामुळे जिल्ह्यातील १९५६ संस्थांवर ९० टक्क्यांहून अधिक पदाधिकारी बेकायदा कामकाज करीत आहेत. नाशिक जिल्ह्यात एकूण १८ हजार ९८८ संस्थांची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयात करण्यात आली असून, त्यातील १९५६ संस्थांने चेंज रिपोर्ट मंजुरीसाठी दिलेले आहेत. या चेंज रिपोर्टमध्ये ९० टक्क्यांहून अधिक विषय संस्थांचे पदाधिकारी बदलाचे आहेत, तर इतर विषयांत संस्थांच्या घटनेत बदल किंवा संस्थेच्या नावात किंवा मालमत्ताबदलाचा संदर्भ आहे.

नाशिक जिल्ह्यात ए, बी, सी, डी, ई व एफ अशा वेगवेगळ्या प्रकारांत संस्था नोंदणी करण्यात आल्या असून, त्यात धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, सेवाभावी संस्था, महिला मंडळ, सांस्कृतिक व क्रीडा मंडळांसह अनेक संस्था आहेत. या संस्था घटनेप्रमाणे वेळोवेळी बदल करतात; पण या बदलाला धर्मादाय आयुक्त कार्यालय थेट मंजुरी देत नसल्यामुळे हे पदाधिकारी मंजुरीपर्यंत बेकायदा कामकाज करतात.

सार्वजिक विश्वस्त संस्थेमध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयात शेड्युल 'ब'मध्ये ज्या पदाधिकाऱ्यांची नोंद असते, त्यांना कायदेशीर पदाधिकारी समजले जाते. त्यामुळे या शेड्युल 'ब'मध्ये जोपर्यंत नोंद होत नाही, तोपर्यंत पदाधिकारी बेकायदा ठरतो. विश्वस्त संस्था म्हणजेच कोणत्याही ट्रस्टमध्ये जेव्हा पदाधिकारी बदलतात, तेव्हा त्याचा रिपोर्ट हा धर्मादाय आयुक्त कार्यालयात दिला जातो. त्यावर धर्मादाय आयुक्त सुनावणी घेतात. त्यात दोन- तीन तारखा पडल्यास हा काळ वर्षापेक्षाही जास्त असतो. केव्हा तर त्याचा काळ त्यापेक्षा अधिक असतो.

संस्थेचे पदाधिकारी बदलल्यानंतर चेंज रिपोर्ट सादर करून अनेक संस्थांत काम केले जात असल्यामुळे हे कामकाज बदल नामंजूर झाल्यास बेकायदेशीर ठरते. काही वेळा संस्थेत गैरप्रकार झाला व संस्थेचा चेंज रिपोर्ट नामंजूर झाला तर ट्रस्टी नसलेल्या पदाधिकाऱ्यावर कारवाई कशी करायची हा प्रश्न पडतो. आपल्या कामकाजाविषयी जागृत असलेल्या अनेक संस्था चेंज रिपोर्ट पाठवतात; पण काही संस्था तर बदल करूनही तो पाठवत नाही. मात्र याची नोंद धर्मादाय आयुक्त कार्यालयात नसते. चेंज रिपोर्टचे प्रकरण तत्काळ निकाली काढण्यासाठी धर्मादाय आयुक्तांनी स्पेशल ड्राइव्हची निर्मिती केली असली तरी जिल्ह्यातील पदाधिकारी बदलाची अनेक प्रकरणेही अद्याप प्रलंबित आहेत.

चेंज रिपोर्ट म्हणजे काय?
एखाद्या संस्थेच्या पदाधिकाऱ्याची नवीन नियुक्ती, प्रॉपर्टीतील बदल, घटनेत बदल किंवा नियमात बदल अशा कारणांसाठी संबंधित संस्थेला धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून संमती घेणे आवश्यक असते. त्यासाठीचा अर्ज संस्थेला करावा लागतो. चेंज रिपोर्ट या नावानेच त्यास मंजुरी मिळते. त्यानंतरच तो बदल ग्राह्य धरला जातो.

चेंज रिपोर्ट तातडीने निकाली काढण्याची गरज आहे. चेंज रिपोर्ट मंजूर न करताच कामकाज करणे बेकायदेशीरच ठरते. यातून अनेक गैरप्रकार होतात व त्याची जबाबदारी मात्र नंतर कोणी घ्यावी हा प्रश्न असतो. धर्मादाय आयुक्त कार्यालय धड न्यायालयही नाही व कार्यालयही नाही. त्यामुळे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात व दिरंगाईमुळे कामकाज रखडते, असे अॅड. भाऊसाहेब गंभिरे यांनी सांगितले.

चेंज रिपोर्टला तातडीने मंजुरी देण्यात यावी. यासाठी आम्ही स्पेशल ड्राइव्ह सुरू केला आहे. त्यामुळे बरीच प्रकरणे निकाली निघाली आहेत. चेंज रिपोर्टला लवकरात लवकर मंजुरी दिली जावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक विजय धाईंजे यांनी सांगितले.



जिल्ह्यातील प्रकारनिहाय धर्मादाय संस्था

ए - ११९०, बी- ५४, सी- ०१, डी- ११, ई- १३५४, एफ- १६,३७८, एकूण ः १८९८८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चॉईस नंबरसाठी मिळताहेत सव्वादोन लाख!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चॉईस क्रमांक किंवा व्हीआयपी क्रमांकासाठी वाहनधारकांची क्रेझ कायम असल्याचा फायदा यंदा नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या महसूल वाढीला झाला. नाशिक विभागात चॉईस क्रमांकासाठी सरासरी दररोज दोन लाख ३४ रुपये वाहनधारकांनी मोजले. वर्षाअखेरीस चॉईस क्रमांकाच्या माध्यमातून ८ कोटी ४४ लाख ९८ हजार ६८८ रुपयांचा महसूल आरटीओ कार्यालयास मिळाला. नाशिक प्रादेशिक विभागात नाशिक, अहमदनगर, श्रीरामपूर आणि मालेगाव या उपप्रादेशिक विभागांचा समावेश होतो. गेल्या काही वर्षांपासून चॉईस क्रमांक किंवा व्हीआयपी क्रमांकाची क्रेझ वाहनधारकांमध्ये वाढली आहे. वाहनांच्या क्रमांकाचा थेट संबंध ज्योतीष तसेच अंकशास्त्राशी जोडला गेला असून, त्याला प्रतिष्ठेशी जोडून पाहिले जाते. नऊ, ९९, ९९९, ९९९९ किंवा १, ११, १११, ११११ तसेच १२३४ अशा वेगवेगळ्या क्रमांकासाठी वाहनधारकांची मागणी लक्षात घेऊन असे क्रमांक वाहनधारकांना देताना आरटीओ कार्यालय अतिरिक्त शुल्क आकारते. अगदी, १० हजारांपासून काही लाख रुपयांपर्यंत वाहनधारक पैसे मोजतात. नाशिक प्रादेशिक कार्यालयात २०१४-१५ या आर्थिक वर्षात चॉईस क्रमांकाद्वारे तीन कोटी ७४ लाख ७४ हजार ५५० रुपयांचा महसूल जमा झाला होता. सन २०१५-१६ या वर्षांत हाच आकडा चार कोटी ८५ लाख सात हजार ४३३ यावर स्थिरावला. चॉईस नंबरच्या महसुलात या आर्थिक वर्षात तब्बल ९.०३ टक्के इतकी वाढ नोंदवली गेली. अहमदनगरमध्ये चॉईस क्रमांकाचा महसूल दोन कोटी ३६ लाख ६० हजार २५५ रुपये इतका राहिला. सन २०१४-१५ मध्ये दोन कोटी एक लाख ५३ हजार ५०० रुपये इतका महसूल अहमदनगर कार्यालयास मिळाला होता. श्रीरामपूर आणि मालेगाव या उपप्रादेशिक विभागांमध्ये चॉईस क्रमांकाचा महसूल मात्र अनुक्रमे १२ आणि १० टक्के घटला. श्रीरामपूर कार्यालयाचा २०१४-१५ मध्ये चॉईस क्रमांकाचा महसूल एक कोटी ६६ लाख ६३ हजार ५०० इतका होता. सन २०१५-१६ मध्ये मात्र यात घट होऊन हा आकडा एक कोटी ४५ लाख ७२ हजार ५०० वर स्थिरावला. मालेगाव कार्यालयाला २०१४-१५ मध्ये सहा कोटी दोन लाख नऊ हजार तर २०१५-१६ या आर्थिक वर्षांत पाच कोटी ४० लाख ८ हजार ५०० रुपये इतका महसूल मिळाला. संपूर्ण नाशिक विभागाचा विचार करता या महसुलात ५. २० टक्के वाढ झाल्याचे दिसते.

टार्गेटपेक्षा जादा महसूलकमाई नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने २०१५-१६ या आर्थिक वर्षात ३८७ कोटी ४४ लाख २१ हजार ४२० रुपयांचा विक्रमी महसूल संकलित केला. सुमारे ३७६ कोटी २४ लाख रुपयांचे नाशिक विभागाला टार्गेट देण्यात आले होते. या महसुलवाढीला चॉईस क्रमांकाच्या महसुलाने हातभार लावला.

चॉईस क्रमाकांच्या माहितीसाठी नाशिक कार्यालयाच्या आवारात दूरध्वनी संच बसवण्यात आला असून, आम्ही वेळोवळी नवीन सिरीजची तसेच क्रमांकाची माहिती देत असतो. चॉईस क्रमांकांना चांगली मागणी असून, त्यामुळे यंदा महसुलात वाढ झाली आहे. - जीवन बनसोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चित्रपट महामंडळ प्रचाराचा बिगूल नाशकातून

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २४ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी अध्यक्ष विजय पाटकर यांच्या क्रियाशील पॅनलने नाशकातून प्रचाराचा नारळ फोडला. नाशिकनगरीत सात दिवसांच्या आत चित्रपट महामंडळाचे कार्यालय उभे केले असल्याने येथून सुरुवात करावी, अशी भावना असल्याचे पाटकरांनी सांगितले.

नाशिक हे शहर चित्रनगरी होण्यासाठी सर्वार्थाने योग्य असल्याने त्या कामी प्रयत्न करणार असून, नाशिकच्या कलाकारांना काम मिळावे, यासाठी झटणार असल्याचे पाटकर म्हणाले. राज्यातील बंद असलेले सिंगल स्क्रीन सुरू करण्यासाठी काहीही करण्याची तयारी त्यांनी दाखवली. एकूण ४०० थिएटर बंद असून, त्यातील ४० जरी आम्हाला मिळाली तरी तेथे ४० मराठी चित्रपटांचा शो लावता येईल, अशी कल्पना पाटकर यांनी मांडली. नाशिक, पुणे, कोल्हापूर या पलीकडे जाण्याची वेळ आली असून, खरे तर इतकी वर्षे का झाली नाही, याचाच शोध घेत असल्याचे सांगत ते म्हणाले, की चार वर्षांत महामंडळाने केवळ कोर्टकचेऱ्या केल्या. त्यापेक्षा काम केले असते तर आज कलाकारांना चांगले दिवस आले असते!

नाशिकमध्ये बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. काही दिग्दर्शकांना घेऊन मला शिबिरे घ्यायची आहेत. त्यात जे विनर्स असतील त्यांना घेऊन एक चित्रपटही काढायचा असल्याचे विजय पाटकर म्हणाले.

निवडणुकीत एकूण नऊ पॅनल उतरलेले असून, १४ जागांसाठी १४३ जण आपले नशीब आजमावत आहेत. ३९५४ मतदार असून, एकट्या नाशिकमध्ये १५० मतदार आहेत. ११ एप्रिल रोजी उमेदवार माघारीची मुदत असून, २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पुणे, कोल्हापूर व मुंबई ही तीन मतदान केंद्रे आहेत. २६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मुख्य कार्यालय असलेल्या कोल्हापूरला मतमोजणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा पोलिस ठाण्यात तुफान हाणामारी

$
0
0

विजय वाघ यांना मारहाण; माजी आमदार संजय चव्हाण यांच्यावर गुन्हा, आज शहर बंद

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

येथील बसस्थानकाजवळील हॉटेल उपकार बंद करण्याच्या कारणावरून माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष विजय वाघ व पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील यांच्यात शाब्दिक चकमक होवून त्यांचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाले. याप्रकरणी माजी आमदार संजय चव्हाणांसह सुमारे १४ जणांवर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, विजय वाघ यांच्यासह चौघांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याच्या निषेधार्थ व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या कारणावरून रविवारी सटाणा शहर बंद ठेवत सकाळी मूकमोर्चा काढण्यात येणार आहे.

याप्रकरणी पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली. शुक्रवारी रात्री ११. ३० च्या सुमारास पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील गस्तीसाठी शहरात फिरत असतांना बसस्थानकाजवळ विजय वाघ हे हॉटेल उपकारच्या बाहेर ते बसलेले दिसले. पाटील यांनी त्यांना हॉटेल बंद करून घरी जाण्यास सांगितले. यावरून दोघांत बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान झटापटीत झाले. या झटापटीत वाघ यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ गहाळ झाला.

याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी वाघ काही कार्यकर्त्यांसह गेले असता त्यांची फिर्याद नोंदवून घेण्यास पोलिसांनी नकार दिला. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष पांडूरंग सोनवणे, पालिकेतील गटनेते काका रौंदळ यांनी पोलिस निरीक्षक पाटील यांना समजावून सांगण्याच्या प्रयत्न केला. मात्र, वाघ व पाटील यांच्यातील शाब्द‌िक चकमक वाढतच गेली.

दरवाजा बंद करून मारहाण

पाटील आणि वाघ यांच्यातील वाद वाढत असतानाच मालेगाव येथून राज्य राखीव दलाची तुकडी दाखल झाली. या तुकडीने तहसील आवाराचा मुख्य लाकडी दरवाजा बंद करून आत असलेले तक्रारदार विजय वाघ, आनंद सोनवणे, सुमीत वाघ, नितीन सोनवणे, कुलदीप दहिदे, नितीन बब्बू सोनवणे यांना बेदम मारहाण केली. काहींनी अक्षरशः जीव सांभाळत पलायन केले.

गुन्हे दाखल

दरम्यान, पोलिस शिपाई विश्वनाथ झिरवाळ यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, विजय वाघ, सुमित वाघ, कुलदीप दहीदे, माजी आमदार संजय चव्हाण, नितीन सोनवणे, दीपक सोनवणे, अमित शर्मा, दीपक रौंदळ यांच्यासह इतर ४० ते ५० जणांनी पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिस निरीक्षक पाटील यांना व कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करून आवारातील वाहनांची जाळपोळ केली. तहसीलदारांच्या वाहनासह बिनतारी संदेश यंत्रणा, सीसीटीव्ही यांचे नुकसान केले. याप्रकरणी सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटील यांच्या निलंबनाची मागणी

याप्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांची सटाणा येथे भेट घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, पोलिस निरीक्षक पाटील यांचे निलंबन करावे या मागण्यांचे निवेदन सादर केले.

आज मूकमोर्चा

पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील यांचे निलंबन करून नोंदविलेल्या खोट्या गुन्ह्यांची शहानिशा करण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय पातळीवर सटाणा बंद व मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय भामरे यांनी दिली.

आयडॉल इशा गुप्ता बाईकवर देशाच्या प्रांताप्रांतात हिंडते आहे. महिला जागृती करण्याचा हा प्रयत्न अफलातून आहे. मोहीम भन्नाट असल्याने ती तरुणींची आयडॉल आहे. माझा बंगळुरूला असणारा भाऊ अंकितचे या उपक्रमात योगदान आहे. इशाच्या ध्येयवादी प्रवासाचा अभिमान आहे.

- डॉ. ममता गांधी, मनमाड

जखमींची विचारपूस

मारहाण प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. पगार यांनी केली. मारहाणीत जखमी झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या प्रकृतीची पहाणी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष अॅड. पगार हे सटाणा येथील उपजिल्हा रुग्णालयात आले होते. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, विधानसभा अध्यक्ष धर्मराज खैरनार, तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकचा तिढा कायम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नको म्हणून पुरुष भाविकांनाच प्रवेश नाकारणाऱ्या देवस्थान ट्रस्टने आता महिलांना गाभाऱ्यात प्रवेश देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयालाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. शनि शिंगणापूर येथील चौथरा महिलांना खुला झाल्यानंतर त्र्यंबकराजाचा गाभाराही सर्वांसाठी खुला होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, ग्रामस्थांनी मंदिर खुले करण्यास कडाडून विरोध केला आणि देवस्थाननेही त्यांचीच री ओढल्याने त्र्यंबकराजाचा गाभारा महिलांसाठी सध्यातरी बंदच राहणार आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश द्यायचा की नाही, यावर निर्णय घेण्यासाठी शनिवारी विश्वस्त मंडळाने ग्रामस्थांची सहविचार सभा आयोज‌ित केली होती. या बैठकीस त्र्यंबकमधील सर्व समाजाच्या व्यक्तींना प्रातिनिधीक स्वरूपात निमंत्रित करण्यात आले होते. देवस्थान विश्वस्तांनी महिलांना प्रवेश देता येऊ नये यासाठी भेदाभेदाचा आरोप टाळण्यासाठी पुरुषांवरही बंदी घातल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी विश्वस्तांविरोधात मोर्चे काढले होते. प्रकरण अंगलट येणार हे लक्षात आल्यावर विश्वस्तांनी सहविचार सभा बोलावून ग्रामस्थांनीच निर्णय घ्यावा, अशी भूमिका घेतली. यावर बराच वेळ दोन्ही बाजूने चर्चा झाली.

नगरसेवक धनंजय तुंगार यांनी विश्वस्तांना धारेवर धरले. फुलनारळ बंदी, दिवसभर गाभाऱ्यात प्रवेश बंदी, पूर्व दरवाजा मंडप आणि काँक्रिटीकरण, २०० रुपयांचे पेड दर्शन असे अनेक निर्णय घेताना ग्रामस्थांना विचारले होते का, असा सवाल करून विश्वस्तांना घेरले. विश्वस्तांच्या मनमानी निर्णयामुळे त्र्यंबकेश्वरमधील अनेकांचा व्यवसाय बुडाला, त्याचा विकृत आनंद घेतला गेला. आता जबाबदारी टाळण्यासाठी ग्रामस्थांनी न्यायालयात जावे, अशी अपेक्षा कशी करता, असाही सवाल केला. त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात समर्थन दिले. विश्वस्तांना जबाबदारी सांभाळता येत नसेल तर पदाचा राजीनामा देवून बाहेर पडावे असे आवाहन केले आहे. याच बैठकीत पुरूषोत्तम लोहगावकर, मोहन झोले, प्रकाश दिवे, अनघा फडके, देवेंद्र कदम, अनंत पाचोरकर, शांताराम बागूल, लोकेश अकोलकर, प्रश़ांत गायधनी, माधुरी जोशी, मनोज काळे आदिंनी आपले विचार मांडले. यावेळी अनेकांनी सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी भूमिका मांडली. परंपरा मोडू नका मात्र ग्रामस्थांचा गाभाऱ्यात जाण्याचा अधिकारही हिरावू नका, असेही स्पष्ट करण्यात आले. या बैठकीस विश्वस्त यादवराव तुंगार, डॉ. सत्यप्रिय शुक्ल, अॅड. श्रीकांत गायधनी, ललीता शिंदे, जयंत शिखरे, सचिन पाचोरकर यांनीही आपली भूमिका मांडली. न्यायालयीन प्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे सांगत विश्वस्त मंडळास दिलेले अधिकार जपण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे यावेळेस सांगण्यात आले.

'स्वराज्य'च्या महिलांची धडक

पुणे येथील स्वराज्य महिला संघटनेच्या महिलांनी शनिवारी त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात धडक मारली. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वराज्य महिला संघटनाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनीता तानाजी गुट्टे, भाग्यश्री शांताराम नरवडे, सुरेखा राजेंद्र थोरात, मयुरी देशमाने, रंजना गणपत वाळुंज या महिला त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशासाठी दाखल झाले. यावेळी गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश नसल्याच्या ३ एप्रिलच्या निर्णयाची प्रत देवस्थान विश्वस्तांनी महिलांच्या हाती सोपविली. मात्र महिलांनी उच्च न्यायालयाचे आदेश व शनिशिंगणापूरच्या घटनेचा हवाला दिला. परंतु वाद वाढू नये यासाठी पोलिसांच्या मदतीने त्यांना मंदिराबाहेर काढण्यात आले. काही वेळातच तेथे ग्रामस्थ गोळा झाल्याने त्यांची महिलांशी बाचाबाची होऊन परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्र्यंबकेश्वर आणि कोल्हापूर मंदिरात प्र्रवेश करू पाहणाऱ्या तृप्ती देसाई यांचा विरोध करण्याचा इशारा हिंदू जनजागृती समिती प्रणित 'रणरागिणी' संघटनेने शनिवारी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरकुल घोटाळा प्रकरणात डॉ. गेडामांची उलटतपासणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नगरपालिका आणि वास्तुविशारद यांच्यातील झालेल्या करारनाम्याला 'आऊटसोर्स' म्हणता येत नाही. २००२ पासून माझ्या प्रशासकीय क्षमतेमध्ये मी आऊटसोर्स केल्याच्या घटना झालेल्या आहेत, मात्र असे मी जळगाव मनपा येथे केल्याचे आढळून आले नाही. तसे, माझ्या कार्यकाळात संशयित परेदशी हे नगरसेवक होते का? आणि ते कोणत्या राजकीय पक्षाचे होते हे मला आत सांगता येणार नाही, अशी माहिती तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी संशयित क्रमांक ३१ अशोक परदेशी यांचे वकील सागर चित्रे यांना दिली. या प्रकरणी पुढील उलटतपासणीचे कामकाज मंगळवारी होणार आहे.

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी धुळे जिल्हा विशेष न्यायालयात सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता कामकाज सुरू झाले. यावेळी खटल्यातील संशयित क्रमांक ३१ अशोक परदेशी यांचे वकील सागर चित्रे यांनी उलटतपासणी केली होती. यावेळी खटल्यातील सर्व संशयित न्यायालयात हजर होते. यानंतर संशयित शिवचरण ढंढोरे, सरस्वताबाई रामदास कोळी, साधना राधेशाम कोगटा यांच्यावतीने अॅड. जितेंद्र निळे यांनी डॉ. गेडाम यांना प्रश्न विचारले.
खटल्यातील संशयित माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे वकील धैर्यशील पाटील यांनी डॉ. गेडाम यांच्या उलटतपासणीला सुरुवात केली. तेव्हा गेडाम म्हणाले की, घरकुल योजना ज्याठिकाणी होणार होती त्याठिकाणच्या काही भागातील झोपडपट्ट्यांतील जागांना दहा वर्षापूर्वी भेटी दिल्या होत्या. आज त्या कोणत्या परिस्थितीत आहेत ते सांगता येणार नाही. तसेच, या योजनेच्या जागांवर मी ५ ते ४० मिनिटे थांबलो होतो. त्यावेळी माझ्यासोबत मनपा अभियंता भोळे, इतर अभियंते व कर्मचारी होते. त्यावेळेस नागरिकांशी चर्चा करुन विविध जागांच्या पायांची पाहणी करून चौकशी केली होती, अशी माहिती तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी यावेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे जिल्हा बँकेचे व्यवहार सुरू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य इमारतीला रविवारी सकाळी अचानक शॉटसर्किटमुळे आग लागली होती. यात बँकेचा मुख्य प्रशासकीय विभाग जळून खाक झाला. त्यामुळे आता बँक बंद होईल, अशी विरोधकांनी आवाज उठविला होता. मात्र सोमवारपासून सकाळी नियमित वेळेनुसार बँकेच्या ९० शाखांचे कामकाज सुरळीतपणे सुरू झाले.


यात बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांनी स्वत: बँकेच्या कामकाजाचा आढावा घेत सर्व शाखांमधील व्यवहार सुरळीत असल्याची माहिती दिली. जिल्हा बँकेच्या इमारतीला लागलेल्या आगीत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे टेबल, एसी, संगणक, लॅपटॉप जळाले होते. या आगीची झळ कमी अधिक प्रमाणात झाली होती. सद्यस्थितीत आगीच्या नुकसानीचा आकडा हा लाखो रुपयांच्या घरात आहे. या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक भालचंद्र चौधरी यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अग्नी उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक अधिकाऱ्यास लाच घेताना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयात कार्यरत असलेले विभागीय वाहतूक अधिकारी एच. यू. पाटील यांनी तक्रारदार वाहकाकडून खातेअंतर्गत चौकशीत शिक्षा कमी देण्यासाठी ७ हजारांची लाच मागितली. यावर तक्रारीनुसार पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. याप्रकरण शहर पोलिस ठाण्यात भष्ट्राचाराचा गुन्हा दाखल करून एच. यू. पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून विभाग नियंत्रक कार्यालयातील विभागीय वाहतूक अधिकारी पाटील यांच्याबाबत तक्रारी होत्या. मात्र त्याबाबत महामंडळाच्या प्रशासनाकडून दखल घेतली जात गेली नाही. पाटील यांच्याकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे खात्यातर्गंत चौकशी करून त्यांना योग्य ती कारवाई करून शिक्षा देण्याचे काम देण्यात आले होते. यासाठी ते एसटी चालक, वाहकांकडून पैसे घेऊन खात्यातर्गंत चौकशीत कर्मचाऱ्यांना शिक्षा कमी देत असत तसेच मध्यस्थी करीत आर्थिक लूट करत होते. याबाबत बुधवारी चालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. याबाबतच्या कारवाई पथकात पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक शिवाजी बुधवंत, निरीक्षक विजय चौरे, कर्मचारी अरूण पाटील, जितेंद्र परदेशी, संतोष माळी, संदीप सरग, कैलास शिरसाठ, किरण साळी, संदीप पाटील आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकविरा देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी यात्रोत्सवाला शुक्रवारी (दि. २२) पासून सुरुवात होणार आहे. यात्रेसाठी एकविरा देवी ट्रस्ट व यात्रा उत्सव समितीतर्फे मंदिर व परिसरात विद्युत रोषणाईसह सुशोभिकरण करण्यात आले आहे. या उत्सवाने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लहान मुलांसाठी खेळणींची दुकाने, पाळणे थाटायला सुरुवात झाली आहे. यात्रा २० ते ३० एप्रिलपर्यंत चालणार असून एकविरा देवीचे मंदिर २४ तास दर्शनासाठी उघडे ठेवण्यात आले आहे. पोलिसांकडूनही सुरक्षेव्यवस्थेबाबत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिर परिसरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहे.

दरवर्षाप्रमाणे यंदाही बुधवार (दि. २०) पासून चैत्र शु.चावदसनिमित कुळधर्म, कुळाचार, आरत्या, मान-मानता आणि जाऊळ शेंडी उतरविण्यासाठी खान्देशासह मध्यप्रदेश गुजरात राज्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. साधारण पंधरा दिवस या यात्रोत्सवात लहान मुलांच्या खेळण्यांसह, महिलांसाठी दागिने, संसारपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ आदींची दुकाने थाटण्यात आली आहेत. दुष्काळाचा काहीसा फटका व्यावसायिकांना बसण्याची शक्यता नाकरता येणार नाही, अशी माहिती एकविरा देवी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

यात्रेच्या सुरुवातीस शुक्रवारी (दि.२२) रोजी चैत्र. शु. पौर्णिमेला दुपारी चार वाजता एकविरा देवीची पालखी व शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी आमदार अनिल गोटे, खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर जयश्री अहिरराव, जिल्हाधिकारी ए. बी. मिसाळ, मनपा आयुक्त डॉ. नामदेव भोसले, जिल्हा पोलिस प्रमुख साहेबराव पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे.

सुरक्षेसाठी कॅमेरे

हा यात्रोत्सव दि. २० ते ३० एप्रिलपर्यंत पार पडणार आहे. यात्रेत अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिर व परिसरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तर पोलिस दलाकडून २४ पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पाण्याचा क्रम ठरविणे आवश्यक’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महाराष्ट्रातील दारू कारखान्यांना पाणी देण्याअगोदर नागरिकांना, जनावरांना, शेतीला पाणी दिले गेले पाहिजे. त्यासाठी क्रम ठरविला गेला पाहिजे, असे मत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले. ते मंगळवारी धुळे तालुका दौऱ्यावर आले असताना बोलत होते.


ते म्हणाले की, मराठवाड्यात आता ऊसाचे उत्पादन घेणे शक्य नाही, कारण तेथील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. यामुळे साखर कारखाने देखील बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून ऊसाचे उत्पादन न घेता मराठवाड्यात तुर, हरभरा, ज्वारी, बाजरी व तीळ हे पिके घेतली पाहिजेत. सध्या महाराष्ट्राला दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी कोणती शेतीपिके घेतली पाहिजेत याबाबत जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी यावेळी मार्गदर्शन केले. राजेंद्रसिंह यांनी धुळे तालुक्यातील जवाहर कृतज्ञता ट्रस्टतर्फे बोधगाव, वेल्हाणे, कुंडाणे गावालगत सुरू असलेल्या नाला, बंधाऱ्यांचे खोलीकरण व रूंदीकरण केलेल्या सिंचन कामांची पाहणी केली. त्यानंतर पांझरा नदीवरील फड पद्धतीची पाहणी करून अक्कलपाडा प्रकल्पाला भेट दिली.

एका लिटर दारूची बाटली बनविण्यासाठी चार लिटर पाणी लागते, असे असताना दारू कारखान्यांसाठी पाण्याचा अमाप वापर होणे ही बाब अयोग्य आहे, असे सांगत कोकणात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने ऊस लागवड करावी वाटल्यास दारूचे कारखाने उभारावेत. मात्र त्याअगोदर नागरिकांना, जनावरांना, शेतीला आणि मग उद्योगांना पाणी असा क्रम ठरलेला असताना आपण हा क्रम मनमानी करून उलटा लावल्याने निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलो आहोत, असेही राजेंद्रसिंह यांनी शेवटी सांगितले. यावेळी जवाहर ट्रस्टचे आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषद शिक्षण सभापती मधुकर गर्दे, धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गुलाबराव कोतेकर, ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घरकुलचे काम सुरेशदादांच्या निर्देशांनुसार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जळगाव नगरपालिकेशी संबंधित वाघूर पाणीपुरवठा, विमानतळ विकास, रस्ते विकास आणि घरकुल यासारख्या मोठमोठ्या योजनांची माजी आमदार सुरेश जैन यांच्या मतानुसार आणि त्यांच्या निर्देशांनुसार सुरू करण्यात आली होती, अशी माहिती घरकुल प्रकरणातील साक्षीदार तथा तत्कालीन जळगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांनी धुळे जिल्हा विशेष कोर्टाला दिली.

घरकुल प्रकरणी धुळ्यात विशेष न्यायाधीश आर. आर. कदम यांच्या कोर्टात सध्या कामकाज चालू आहे. बुधवारी, साक्ष देताना जावळीकर यांनी सांगितले की, घरकुल योजनेसाठी म्हाडाकडून कर्ज घेतले जाणार होते. त्यासाठी योजनेची जमीन जळगाव नगरपालिकेच्या नावावर हवी, अशी अट म्हाडाने घातली होती. परंतु ही जमीन नगरपालिकेच्या ताब्यात नसल्याने नगरपालिकेने कर्जाचा प्रस्ताव पाठवला नाही.

अटींची पूर्तता नाही

ज्या जमिनीवर घरकुले होणार ती जमीन म्हाडाच्या नावावर झाली पाहिजे, लाभार्थींची यादी तसेच म्हाडाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड जळगाव नगरपालिका कशी करणार याची माहिती म्हाडाने मागविली होती. त्याची पूर्तता करू न शकल्याने नगरपालिकेने कर्जाचा प्रस्ताव म्हाडाला पाठविला नाही. याबाबतचे पत्र म्हाडाने मुख्याधिकारी यांना पाठवले होते. या पत्राला कशाप्रकारचे उत्तर देण्यात यावे यासाठी प्रदीप रायसोयनी यांनी शेरे मारले होते आणि त्यावर तत्कालीन न. पा. अभियंता डी. एस. खडके, आदरणीय दादा व प्रदीप रायसोनी यांच्या स्वाक्षरी होत्या.

'आदरणीय दादा म्हणजे सुरेशदादा'

हे पत्र घेवून मी रायसोनी यांच्या दालनात गेलो. त्यांनी सांगितले की, 'आदरणीय दादा म्हणजे सुरेशदादा जैन आहेत. नगरपालिकेच्या वाघूर पाणी योजना, विमानतळ विकास योजना, रस्ते विकास योजना आणि घरकुल यासारख्या मोठमोठ्या योजनांची कामे सुरेशदादा जैन यांच्या मतानुसार व त्यांच्या निर्देशांनुसार सुरू करण्यात येत आहेत.' जावळीकर पुढे म्हणाले की, सुरेश जैन हे सन १९९७ ते २००२ या कालावधीत जळगाव नगरपालिकेत कोणत्याही पदावर नव्हते. पालिका निवडणुकीतही निवडून आले नव्हते. ते स्वीकृत सदस्य देखील नव्हते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

$
0
0

नंदुरबारच्या महिला अधिकाऱ्यावर गुन्हा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सरकारच्या अनुदान योजनेतून शेती साहित्य मिळवून देण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांकडून २०,५२,००० एवढी रक्कम हडप करण्याचा प्रकार नंदुरबार कृषी विभागात घडला आहे. याप्रकरणी नंदुरबार कृषी सहायक सुरेखा सुरेश माळी यांच्याविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.


जिल्हयातील शहादा व नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या अनुदान योजनेतून ट्रॅक्टर, टिलर, थ्रेशर, रोटावेटर, पेरणीयंत्र आदी साहित्यांवर ५० टक्के अनुदान दिले जाते. याच योजनेच्या लाभापोटी शेतकऱ्यांकडून रक्कम जमा करून कोणलाही कृषी साहित्यांचे वाटप न करता जमा पैशांचा अपहार करण्याचा प्रकार येथील कृषी अधिकारी सुरेखा माळी यांनी केला आहे. याबाबत छोटूलाल पुरूषोत्तम पाटील (रा. पटेल गल्ली, प्रकाशा ता. शहादा) या शेतकऱ्याने पोलिसात फिर्याद दिली आहे.

छोटूलाल पाटील यांच्यासह इतर शेतकऱ्यांना ३० डिसेंबर २०१३ ते १३ जानेवारी २०१४ दरम्यान कृषी अधिकारी माळी यांनी अनुदानात ट्रॅक्टरसह विविध यंत्रसामुग्री वाटप करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांचा विश्वास संपादन करीत या वस्तूंसाठी त्यांच्याकडून २०,५२,००० रुपयांची रोकड जमा केली.

शेतकऱ्यांना अनुदानापोटी मिळणारे धनादेश देऊन, जोपर्यंत पैसे जमा होत नाही तोपर्यंत धनादेश बँकेत जमा करू नका असे सांगण्यात आले होते. आपल्या बँकेतील खात्यात पैसे जमा झाली की नाही याची खात्री शेतकरी वेळोवेळी करत होते. परंतु असे अनेक दिवस केल्यानंतर त्यांना पैसे तर मिळालेच नाही तर वस्तुही मिळाल्या नाही. यावरून आपली फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला व त्यांनी पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी विद्यापीठ धुळ्यातच होईल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

कृषी विद्यापीठासाठी पाच हजार एकर जमिनीची आवश्यकता असून ती जागा द्यायला जळगावचे शेतकरी तयार नाही. अशा परिस्थितीत धुळ्यातच हे विद्यापीठ व्हावे यासाठी मी सरकारकडे सकारात्मक पाठपुरावा करेल, असे आश्वासन राज्याचे कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले.

ना. खडसे जिल्ह्यात तीन नवीन स्वतंत्र तहसील कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी कृषी विद्यापीठ कृती समितीची सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले. त्यावेळी खडसे यांनी कृषी विद्यापीठ संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी खडसे म्हणाले, खान्देशचे नेतृत्व करताना कधीही विकासाच्या बाबतीत भेदभाव केला नाही. बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अनिल गोटे, माजी आमदार प्रा. शरद पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घरकुलचे काम न करण्यासाठी राजकीय दबाव’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,धुळे

घरकूल योजनेचे काम सुरू न करण्याबाबत राजकीय दबाबतंत्राचा वापर संबंधितांकडून केला जात असल्याने याबाबत खान्देश बिल्डर्सने पाच दिवसांत उत्तर देण्याची सूचना केली होती तरी देखील खान्देश बिल्डर्सकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नव्हते, अशी माहिती जळगाव नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांनी दिली.

घरकूल प्रकरणी सोमवारी, धुळे जिल्हा विशेष न्यायालयात कामकाज झाले. यावेळी धनंजय जावळीकर यांची साक्ष नोंदवून घेण्यात आली. ते पुढे म्हणाले की, माझ्या कार्यकाळात झालेल्या निवडणुकीत जळगाव शहर विकास आघाडीचे नगरसेवक सर्वाधिक संख्येने निवडून आले असताना नगराध्यक्ष मात्र, भाजपचा झाला होता. त्यानंतर नगरपालिकेकडून खान्देश बिल्डर्सला घरकूल योजनेचे काम सुरू करण्याबाबत देण्यात आलेल्या पत्राची जावळीकर यांनी माहिती दिली.

१९ मार्च २००२ रोजी, नगराध्यक्ष के. डी. पाटील यांनीही खान्देश बिल्डर्सला काम सुरू करण्‍याबाबतचे पत्र दिले होते. २७ मार्च २००२ रोजी, मुख्याधिकारी म्हणून आपण स्वत: पुन्हा खान्देश बिल्डर्सला पत्र देवून काम सुरू करण्याची सूचना केली. या पत्रात आपण खान्देश बिल्डर्सकडे पडून असलेल्या सात कोटी ५१ लाखांचा निधी पडून असल्याने नगरपालिकेचे आर्थिक नुकसान तर होत होते. तसेच लाभार्थी लाभापासून वंचित राहत असल्याने सामाजिक नुकसानही होत असल्याचा उल्लेख केला होता. यावेळी हुडकोने योजनेसाठी मंजूर केलेल्या कर्जापैकी २० कोटीची रक्कम येणे बाकी होती. ती रक्कम व खान्देश बिल्डर्सकडे पडून असलेल्या रकमेतून योजनेचे काम पूर्ण होवू शकले असते तरीही खान्देश बिल्डर्सकडून काम सुरू न झाल्याने ८ एप्रिल २००२ रोजी पुन्हा खान्देश बिल्डर्सला पत्र देवून त्याची माहिती नगरपालिका संचालनालय आणि जिल्हाधिकरी यांनाही दिली होती. काम सुरू न करण्याबाबत राजकीय दबाब तंत्राचा वापर संबंधितांकडून केला जात असल्याने याबाबत खान्देश बिल्डर्सने पाच दिवसांत उत्तर द्यावे अशी सूचना पत्रत केली होती. तरी देखील खान्देश बिल्डर्सकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. घरकुल योजनेबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीसमोर आपण खुलासा केला. त्यानंतर सरकारने आपल्याला कारणे दाखवा नोटीस मिळाली. त्याचे उत्तर मी दिले मात्र त्यावर नंतर कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी माहिती जावळीकर यांनी दिली. आजपासून त्यांची उलटतपासणी होण्याची शक्यता आहे. या कामकाजाच्या वेळी विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी, अॅड. प्रवीण चव्हाण व आरोपींचे वकील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images