Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शिक्षक सहकारी बँकेकडून महापालिकेची फसवणूक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेकडून महापालिकेची फसवणूक झाल्याची बाब उघड झाली आहे. महापालिकेच्या ठेवीपोटी बँकेने पालिकेकडे गहाण ठेवलेल्या आचार्य दोंदे भवनाची एका बिल्डरला विक्री करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेचे जवळपास १२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आता शिक्षण समितीने या विक्री व्यवहारावरच आक्षेप घेतला आहे. तसेच, संबंधिताविरोधात फौजदारी कारवाई करण्याची तयारी केली असल्याची माहिती सभापती संजय चव्हाण यांनी दिली आहे. बँकेच्या सचांलक मंडळाने गहाण खतावरील पालिकेचा बोजा परस्पर उतरवत भूंखड विक्री केला आहे. संबंधित बिल्डरांने या जागेवर बांधकाम सुरू केले आहे. महापालिकेने ते थांबविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेकडे शिक्षण मंडळाने ३ कोटी ९१ लाखांच्या ठेवी ठेवल्या होत्या. परंतु, कालातंराने ही बँक अवसायनात गेली. त्यावेळी मंडळाने संचालक मंडळाशी पत्रव्यवहार केला. त्यात १९९८ मध्ये चेअरमन बाबासाहेब पवार यांनी बँकेच्या मालकीचे असलेले आचार्य दोंदे भवनच्या चार हजार ८०१ चौरस फूट जागेचे गहाणखत पालिकेला करून दिले. पैसे मिळाले नाही तर जमीन जप्त करण्याची तरतूद करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात बँकेच्या विश्वस्तांनी ही जागा परस्पर सुयश बिल्डर यांना विकली. महापालिकेचा जागेवर बोजा असतांनाही विश्वस्तांनी शिक्षण मंडळाला पूर्व कल्पना न देताच त्याची विक्री केली आहे. बिल्डरने या जागेवरील इमारत पाडून त्या ठिकाणी नवे बांधकामही सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रंथ दिंडीतून संत नामदेवांचा जयघोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ढोल ताशाच्या गजरात चाललेला संत नामदेवांचा जयघोष.. पारंपरिक मऱ्हाटमोळ्या वेशभूषेत धरलेला फुगडीचा ताल.. टाळ मृदंगाच्या गजरात चाललेली भजने अन् घुमानकडे जाण्याची उत्सुकता.. अशा उत्साहपूर्ण वातावरणात बुधवारी ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. पंजाब राज्यातील घुमान या गावी होणाऱ्या पहिल्या राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य संमेलनानिमित्त काढलेली ही ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. सामाजिक उपक्रमात अग्रेसर 'सरहद' या संस्थेने सामाजिक उपक्रमाबरोबरच सर्व भाषिकांना आणि राज्यांना जोडण्यासाठी पंजाबमधील घुमानमध्ये संत नामदेवांच्या भूमीत येत्या ३ व ४ एप्रिलला पहिल्या बहुभाषिक संमेलनाचे आयोजन केले आहे. साहित्य संमेलनात दिंडीचे जे स्वरूप असणार आहे, तेच स्वरूप या दिंडीत साहित्यिकांना बघण्यास मिळाले. स्वागताध्यक्षपदाचा मान असलेले अरुण नेवासकर यांच्या हस्ते फुलांनी सजावट केलेल्या पालखीत ज्ञानेश्वरी व संत नामदेव गाथा या ग्रंथांचे पूजन करण्यात आले. शालिमार येथील बी. डी. भालेकर मैदान येथून ग्रंथदिंडीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दोन बसमधून साहित्यिक घुमानला रवाना झाले. या दिंडीनंतर नाशिकमधील साहित्यिक घुमानला रवाना झाले. यावेळी साहित्यिक रसिकांना निरोप देण्यासाठी यशवंत पाटील, नंदन रहाणे, संजय चांडोले, दत्ता वावधाने, रमेश वावधाने आदी उपस्थित होते. संत नामदेवांची वेशभूषा केलेले रामदास गायकवाड यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते

लक्षवेधी मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात काढलेल्या ग्रंथ दिंडी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भजनी मंडळे, ढोलपथके, वाद्यपथकांचा समावेश होता. वारकऱ्यांच्या वेशभूषेतील बालकांमुळे दिंडीने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिगत गटारींसाठी देवळालीला १४ कोटी

$
0
0

कॅन्टोन्मेंट बोर्डाला प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात विकास निधी प्राप्त झाला आहे. देशभरातील ६२ कॅन्टोन्मेंटपैकी एकट्या देवळालीसाठी सुमारे १४ कोटीपर्यंत निधी उपलब्ध होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भूमिगत गटारींसाठी बोर्डाला सन २०१२ साली निधी उपलब्ध होऊ शकला नव्हता. या निधीसाठी बोर्डाने खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून अनेकदा प्रिन्सिपल डायरेक्टरेट, सदर्न कमांड, डायरेक्टर जनरल दिल्ली, संरक्षण मंत्रालय, अर्थमंत्रालय आदी विभागात वारंवार भेटी घेत तब्बल १४ वेळा पाठपुरावा केला. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील ६४ किलोमीटरच्या नागरी व लष्करी भागातील सर्व उघड्या गटारी भूमिगत करण्यात येणार आहेत. येत्या ६ महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल अशी माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी बैठकीप्रसंगी दिली.

योजनेचा शुभारंभ देवळालीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या योजनेचे भूमिपूजन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा मानस असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. या कामाच्या शुभारंभ प्रसंगी प्रकल्पासाठी हातभार लावणाऱ्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. संबधितांना याबाबत आभारपत्रही पाठवण्याबाबत बोर्ड सदस्य सचिन ठाकरे, दिनकर आढाव यांनी बैठकीत सांगितले. तसेच लवकरच बोर्डाच्या विशेष बैठकीत खासदार गोडसे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

वर्गणीतून खारीचा वाटा लामरोड भागातील नगरसेविका आशा गोडसे व शिवसेना युवा नेते चंद्रकांत गोडसे यांच्या प्रयत्नाने लोकवर्गणीतून कोठारी परिसरात भूमिगत गटार योजनेस प्रारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात बालगृह रोड ते निकी सागर हॉटेल पर्यंतसाठी ५८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी स्था‌निकांच्या मदतीमुळे ४२ लाख ५० हजार रुपयांचे काम पूर्ण झाले. हरिकृपा ते कोठारी सेनेटोरियमपर्यंत कामासाठी दुसऱ्या टप्प्यात ४.२५ लाख निधी जमा केला.

देवळालीकरांची खरी गरज ओळखून खासदारांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे एवढा विकास निधी प्रथमच बोर्डास प्राप्त झाला आहे. - बाबुराव मोजाड, उपाध्यक्ष, कॅन्टोन्मेंट बोर्ड

केंद्र सरकारकडून निधी वर्ग होताच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यात येईल. तोपर्यंत सर्व पशासकीय पातळीवरील सोपस्कार पार पाडण्यात येतील. - विलास पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफांचे महामोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक केंद्रीय अर्थसंकल्पात लादण्यात आलेल्या अबकारी कराविरोधात सराफ-सुवर्णकार व्यावसायिकांनी बुधवारी शहरात मोर्चा काढला. जिल्ह्यातील हजारो सराफ सुवर्णकार तसेच त्यांचे कुटुंबीय या आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकार हे सराफांच्या मागण्या मान्य करीत नसल्याने आदोलन अधिक तीव्र केले आहे. बुधवारी संपूर्ण राज्यात सराफांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. नाशिक शहरात सकाळी अकरा वाजता बी. डी. भालेकर मैदान येथून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील सुवर्ण कारागीर, सराफ व्यावसायिक, सोनार, बंगाली कारागिर, आटणीवाले अशा विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. बी. डी. भालेकर येथून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर मोर्चा शालिमार, परशुराम साईखेडकर नाट्यमंदिर, महाबळ चौक, महात्मा गांधी रोड, मेहेर-सिग्नल येथे पोहचला. तेथे मोर्चेकऱ्यांच्या वतीने नाशिक जिल्हा सराफ असोसिएसनचे अध्यक्ष राजेंद्र ओढेकर, नीलेश आहिरराव, गिरीष टकले, संजय दंडगव्हाळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना निवेदन दिले. भारताने विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर करताना सुवर्ण व्यावसायिकांवर मात्र अन्याय केला आहे. या अर्थसंकल्पात तयार दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर लावण्यात आला आहे. सन २०१२ च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी देखील उत्पादन शुल्क लागू केले होते. परंतु, सराफ व्यावसायिकांकडून तीव्र विरोध झाला होता. सुमारे महिनाभर सुवर्ण व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते. अखेरीस सुवर्ण व्यावसायिकांची बाजू पटल्याने अबकारी कर मागे घेण्यात आला होता. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्यावेळी या कराला विरोध दर्शविला होता. असे असताना सध्याच्या सरकारने व्यापारी व ग्राहक यांना जाचक ठरणारा निर्णय घेतला. या अबकारी करामुळे मिळणारे उत्पन्न अल्प राहणार असून, त्रास अधिक प्रमाणात रहाणार आहे. या करामुळे इन्स्पेक्टरराज वाढणार आहे. त्यामुळे केंद्राने हा कर रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मेहेर चौकातून मोर्चा धुमाळ पॉईंट, बोहरपट्टी मार्ग सराफ बाजारात विसर्जित करण्यात आला. यावेळी नाशिक जिल्ह्याच्या विविध भागातील आलेल्या तालुकाध्यक्षांनी आपले विचार प्रकट केले. मोर्चात पाच हजारांवर व्यावसायिक सहभागी झाले होते. या मोर्चात नाशिक, नाशिकरोड, पंचवटी, मनमाड, मालेगाव, निफाड, लासलगाव, नांदगाव, सिन्नर, ओझर, गिरणारे इत्यादी भागातील व्यावसायिक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग...

$
0
0

बँका, सहकारी व धर्मदायी संस्था, कंपन्या आदींना मार्च एण्ड अखेरपर्यंतचे टार्गेट या आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच दिलेले असते. ते पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन करुन वर्षभर प्रयत्न केले जातात. संस्था आणि कर्मचारी स्पर्धेत टिकावेत या उद्देशाने टार्गेट दिली जातात.

महाबँकेचे यश बँक ऑफ महाराष्ट्रच्या नाशिक जिल्ह्यात ९० शाखा असून सर्वांना मिळून साडेआठ हजार कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट दिले होते. ३० मार्च अखेर ८३०० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक प्रताप मोहन्ती यांनी दिली. यामध्ये पाच हजार कोटींच्या ठेवी आणि ३३०० कोटींचे टार्गेट साध्य झाले आहे. मुद्रा योजनेंतर्गत अडीच हजार व्यक्तींना उद्योग व्यवसायासाठी ३० कोटीचा निधी वितरित करण्यात आला. सव्वा लाख लोकांना पंतप्रधान सुरक्षा योजना आणि जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ देण्यात आला. पंतप्रधान अटल पेन्शन योजनेचे उद्दिष्टे मोठे होते. परंतु, जनतेचा प्रतिसाद कमी लाभल्याने दीड हजार लाभार्थ्यांनीच लाभ घेतला. पंतप्रधान जनधन योजनेत तब्बल पाच लाख लोकांनी खाते उघडली.

एलआयसीची अव्वल विश्वासाहर्तेमुळे विमा क्षेत्रात नंबर वन असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) मार्चअखेर आघाडी घेतली. विभागीय व्यवस्थापक प्रदीप शेणाय यांनी सांगितले, की या वर्षात ९२०० मृत्युदावे आले. त्यासाठी ११७ कोटींची रक्कम विमाधारकांना अदा करण्यात आली. याबाबत नाशिक विभाग देशातील ११२ विभागांमध्ये नंबर वन आला आहे. एलआयसीच्या गडकरी चौकातील नाशिक विभागातंर्गत नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, दोंडाईचा आदी ठिकाणी मिळून २० शाखा आहेत. या आर्थिक वर्षात दोन लाख ३० हजार पॉलिसीजचे उद्दिष्टे होते. त्यापैकी दोन लाख पॉलिसीज झाल्या. प्रिमीयमचे २२५ कोटींचे टार्गेट होते. त्यापैकी दोनशे कोटी प्रिमीयम जमा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर बेजार

$
0
0

शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच वीजबाफी द्यावी, गायरान तसेच वन जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात यांसह विविध मागण्या सरकारने मान्य कराव्यात यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातून हजारो शेतकरी कुटुंब नाशिकमध्ये आले असून त्यांनी सीबीएस परिसरातील मुख्य रस्त्यावरच मुक्काम ठोकल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. आंदोलकांनी मंगळवारची संपूर्ण रात्र मेहेर सिग्नल ते त्र्यंबक नाका या रस्त्यावर बसून होते. रस्ता अडवून नागरिकांची गैरसोय करण्यापेक्षा गोल्फ क्लब मैदानावर आंदोलकांनी त्यांचा महामुक्काम सत्याग्रह करावा असे आवाहन प्रशासनाने केले. मात्र, मागण्या मान्य होईपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी स्वीकारला आहे. मंगळवारी रात्रीपासून येथे मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त होता. बुधवारी देखील सकाळपासून आंदोलक रस्त्यावरच ठिय्या मांडून असल्याने नाशिककरांचा जनजीवन विस्कळीत झाले. शाळा, कोर्ट, जिल्हाधिकारी कार्यालय, सीबीएस बसस्थानक येथे काही ना काही कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. सीबीएस परिसरातून वाहने घेऊन जाणे शक्यच नसल्याने वाहनधारकांना पर्यायी मार्गांनी वळसा मारून जाणे भाग पडले.

वकील-पोलिसांमध्ये वाद आंदोलकांनी सीबीएस चौकात चक्काजाम केल्यामुळे तेथे एखाद्या वाहनामुळे अपघात घडण्याची शक्यता बळावली आहे. असे होऊ नये यासाठी पोलिसांनी सीबीएस चौक, मेहेर सिग्नल येथे बॅरीकेडींग लावून रस्ते वाहतुकीसाठी बंद केले. मात्र, यामुळे नागरिक आणि पोलिसांत वादाचे प्रसंग उदभवले. कोर्टात वाहने घेऊन जाणे शक्य होत नसल्याने वकील आणि पोलिसांत शाब्दीक चकमकी उडाल्या. वाहने कोर्टात जाऊ देण्याचा आग्रह वकिलांनी धरला. पोलिसांनी त्यांना बॅरीकेडींगच्या बाहेर वाहने लावून जाण्यास सांगितले. आमचे वाहन सुरक्षित राहील याची लेखी हमी द्या अशी मागणी वकिलांनी केली. त्यामुळे वाद चिघळत गेला.

तीन शाळांना सुटी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वाय. डी. बिटको, आदर्श विद्यालयासमोरच आंदोलक बसले आहेत. आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्यास विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते अशी भीती पालकांकडून व्यक्त केली गेली. या सर्व पार्श्वभूमीवर शाळांना सुटी देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.

जागविली रात्र आंदोलकांनी रात्र जागवून काढली. पारंपरिक लोककलांचा आधार घेत मागण्यांबाबतचा जागर करण्यात आला. आदिवासी भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक नृत्य, लोककला सादर करीत अन्य आंदोलक बांधवांचे मनोरंजन केले. रस्त्यावरच पथारी टाकून आंदोलक झोपले. काहींनी सबंध रात्र राहुट्यांमध्ये जागून काढली. दरम्यान, बुधवारी कडाक्यात उन्हातही आंदोलक रस्त्यावर बसून होते.

वाहतूक ठप्प त्र्यंबक नाका, शालिमार, अशोकस्तंभ, एम. जी. रोड, शरणपूर रोडमार्गे सीबीएसकडे येणाऱ्या वाहतुकीवर या महामुक्काम आंदोलनाचा विपरीत परिणाम झाला. या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली असून या परिसरांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस, स्कूल बसेस, अॅम्ब्युलन्ससारखी वाहने अडकून पडली. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस सीबीएस बसस्थानकातून बाहेर पडणे शक्य नसल्याने या सर्व बसेस मेळा बसस्थानकातून सोडण्यात आल्या.

आंदोलनामुळे सीबीएस जवळील आदर्श शाळेच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांना शाळेत सोडायला आल्यावर पालकांना समजले. त्यामुळे पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असतानाच हे आंदोलन झाल्याने पालक चिंतेत आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये, याची दक्षता शाळेने घ्यावी. शेतकऱ्यांचे आंदोलन लवकर मिटेल, यासाठी प्रशासानाने तत्काळ प्रयत्न करावेत. - अॅड. अमोल शिवाजीराव घुगे, पालक शिक्षक संघटना, आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल, सीबीएस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक विमानसेवा गुलदस्त्यातच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक ओझर येथील नाशिक विमानतळावरुन विमानसेवेची मोठी प्रतीक्षा नाशिककरांना आहे. यासंदर्भात विधीमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले आहे. मात्र, यासंदर्भात पाठपुरावा सुरु असल्याचे सांगून विमानसेवा नक्की कधी सुरू होणार, हे गुलदस्त्यातच ठेवले आहे. नाशिक येथे जवळपास दोन वर्षापासून विमानतळाची सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. मात्र, मार्च २०१६ पर्यंत येथून प्रवाशी सेवा सुरू झालेली नसल्यामुळे आमदार जयंत जाधव यांनी विधीमंडळात तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. विमान कंपन्यांची सेवाशुल्क माफीची मागणी सरकारकडे प्रलंबित असल्यामुळे सदर विमानतळावरील विमानाचे उड्डाण रखडले आहे. सदर विमानतळावरून प्रवाशी वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सरकारने कोणती कार्यवाही केली किंवा करण्यात येत आहे. तसेच, यात विलंबाची कारणे काय, असा खडा सवाल जाधव यांनी उपस्थित केला. लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले, की विमान कंपनीच्या मागणीनुसार `वॉच अवर चार्जेस`मध्ये ९० टक्क्यांपर्यंत सूट देण्याची तयारी विमानतळाची मालकी असलेल्या हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने संबंधित विमान कंपनीला कळविली आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक लिमिटेडकडून संबंधित विमान कंपन्यांकडे विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. विमानसेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, या उत्तराने समाधान झाले नसून, विमानतळावरील प्रवाशी वाहतूक सेवा कधी सुरू होणार, हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ठोस प्रयत्न केले. युती सरकार याप्रश्नाकडे गांभिर्याने पाहत नसल्याची टीका जाधव यांनी केली आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारनियमनातून नाशिकची सुटका!

$
0
0

दरवर्षी मे महिना जवळ आला की भारनियमन होणार या विचारानेच अनेकांना घाम फुटतो. असह्य उकाडा आणि विजेचे भारनियमन घरात थांबू नये अशी काहीशी परिस्थिती निर्माण होते. शहरात ही परिस्थिती खेड्यातही १२ तास भारनियमन होत असल्याने असह्य उकाड्याला नागरिकांना तोंड द्यावे लागते. यंदा मात्र नागरिकांना भारनियमनाला सामोरे जावे लागणार नसल्याची माहिती महावितरणचे चीफ इंजिनीअर दीपक कुमठेकर यांनी दिली ते म्हणाले, की उन्हाळ्याच्या दिवसात शेतीला पाणी जास्त लागते ते खेचण्यासाठी वीज पंपांचा अधिक वापर होतो. यंदा पाण्याची परिस्थिती गंभीर असल्याने शेतीचे बहुतांश पंप अनेक ठिकाणी बंद आहेत. त्यामुळे विजेची मागणी आणि पुरवठा यांचे व्यस्त प्रमाण आहे. सध्या उत्पादन जास्त होते आहे. इतर वेळी पुरवठा कमी व मागणी जास्त अशी परिस्थिती असते यावेळी उलट परिस्थिती आहे. तसेच यंदा पाऊस लवकर होणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसाळ्यात विजेचे उत्पादन व्यावस्थित होण्याची शक्यता आहे. तरी काहीही परिस्थिती उद्भवल्यास महावितरण यंदा भारनियमन करणार नाही. याबाबत मंत्रालयात नुकतीच बैठक झाली होती. याबाबत तेथेही विचारविनिमय करण्यात आला. त्यामुळे यंदा नाशिककरांना भारनियमनापासून मुक्ती मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे.

अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर नुकतीच बैठक झाली. भारनियमन होऊ नये याची काळजी घ्या असे मंत्रालय पातळीवर देखील सांगण्यात आले आहे. यंदा तरी भारनियमन होणार नाही. - दीपक कुमठेकर, चीफ इंजिनीअर, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घंटागाडीला अखेर मिळाले ठेकेदार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक महापालिकेतील घंटागाडी ठेक्याला अखेर ठेकेदारांनी प्रतिसाद दिला असून, सहा विभागांसाठी तब्बल २५ निविदा प्राप्त झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक ६ निविदा या नाशिकरोडसाठी आल्या असून, सातपूर विभागाला एकच निविदा आली आहे. त्यामुळे सातपूरमध्ये फेरनिविदा काढली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, निविदा प्रक्रियेत काळ्या यादीतील वर्तमान ठेकेदारांनीही सहभाग घेतल्याचे समजते. त्यामुळे घंटागाडीचा वाद कायम राहण्याची शक्यता आहे. महापालिकेने विभागनिहाय पाच वर्षासाठी घंटागाडी ठेका देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परंतु, या किमान वेतनाच्या प्रश्नामुळे पहिल्या वेळेस काढलेल्या निविदा प्रक्रियेला एकही ठेकेदार इच्छुक नव्हते. त्यामुळे पालिकेने दुसऱ्यांना ई-निविदा मागविल्या. त्यात निविदा पूर्व बैठकीत ठेकेदारांच्या शंकेचे निरसन केले. त्यामुळे ठेकेदारांनी या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. ठराव तसा नव्हे! ठेकेदारांना काळ्या यादीतून बाहेर काढण्याचा ठराव केला नसल्याचा खुलासा तत्कालीन सभापती शिवाजी चुंभळे यांनी केला आहे.चार ठेकेदारांना काळ्या यादीतून काढण्यासाठी नव्हे तर,निकोप स्पर्धेसाठी त्यांना निविदा प्रक्रियेत भाग घेवू द्यावा असा ठराव केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेत उद्रेक

$
0
0

शिवसेनेचे पश्चिम विधानसभा प्रमुख सुभाष गायधनी, विभागप्रमुख रमेश उघडे, विष्णू पवार, नाना पाटील, मंदाकिनी जाधव, राजेंद्र नानकर आदींनी घोषणाबाजी केली. पक्षाचा अवमान करणाऱ्यांना पक्षात पुन्हा का घेतले? पक्षप्रवेशाला विरोध नसून पक्षप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा का केली नाही? पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना प्रवेश दिलाच कसा? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. 'जय शिवाजी जय भवानी' अशा घोषणा देत यावेळी काही उत्साही शिवसैनिकांनी एक प्रतिकात्मक पुतळा आणला. तो जाळण्यात देखील आला. मात्र, हा पुतळा कोणाचा असे विचारातच पदाधिकाऱ्यांना या उत्तराची टाळाटाळ केली. दरम्यान, अंबड पोलिसांनी घटनास्थळी जावून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

तो पुतळा नेमका कोणाचा? शिवसेनेच्या आंदोलनाप्रसंगी काही शिवसैनिकांनी एका प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्या पुतळ्यावर सुरुवातीला एक चित्र होत. मात्र माध्यमांचे प्रतिनिधींना ते दिसण्यापूर्वीच काढून टाकण्यात आले. आंदोलनानंतर 'तो पुतळा कोणाचा?' असे विचारले असता, पदाधिकाऱ्यांनी पुतळा जाळलाच नसल्याचा दावा केला. दरम्यान, संबंधित प्रतिकात्मक पुतळा शिवसेना संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी यांचा असल्याचे समजते. त्यांच्याच विरोधात आंदोलन करण्यात आल्याची चर्चा रंगली.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने संबंधित शिवसेना नगरसेवकाने बंडखोरी केली होती. अशा गद्दारांना पक्षात पुन्हा घेतल्याचा आम्ही निषेध करतो. - राजेंद्र नानकर, आंदोलक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा सभेतून पलटवार

$
0
0

नाशिकमध्ये होणाऱ्या दोन दिवसीय कार्यकारिणीसंदर्भात मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी, पालकमंत्री गिरीश महाजन व सुरजीतसिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रदेश कार्यकारिणीची सदर कार्यसमिती बैठक पंचवटी येथील स्वामी नारायण मंदिर येथे २ व ३ एप्रिल रोजी होणार आहे.

यामध्ये शनिवारी, २ एप्रिल रोजी प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून, रविवारी, ३ रोजी प्रदेश कार्यासमितीची बैठक होणार आहे. प्रदेश कार्यसमिती बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, प्रकाश जावडेकर, हंसराज अहिर, पियूष गोयल, महाराष्ट्राचे प्रभारी सरोज पांडे, सहप्रभारी राकेशसिंह तसेच मंत्री मंडळातील सर्व सदस्य, सर्व खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, सर्व प्रदेश आघाड्यांचे प्रमुख, प्रदेश कार्यसमिती सदस्य असे एकूण ९०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर दुष्काळी परिस्थितीमुळे सदर बैठक साधेपणाने होणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

गर्दी घटण्याची धास्ती भाजपतर्फे या अगोदर ३ एप्रिल रोजी सायंकाळी जाहीर सभा घेण्यात येणार होती. मात्र, सदर सभेच्या दिवशी टी ट्वेन्टीची फायनल मॅच असल्याने गर्दीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने आता ३ ऐवजी २ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंतराव महाराज पटांगण येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

राजकीय आखाडा रंगणार नाशिकवर भाजप सरकारकडून अन्याय केला जात असल्याचा आरोप करीत शिवसेनेने गेल्याच आठवड्यात महामोर्चा काढला होता. यावेळी शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी भाजपवर आगपाखड केली. आता भाजपनेही आक्रमक होत जशास तसे उत्तर देण्याची तयारी केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय आखाडा रंगण्याची चिन्हे गडद झाली आहेत.

शिवसेनेला करणार लक्ष्य सदर सभेस मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार संबोधित करणार आहेत. या सभेतून शिवसेनेला लक्ष्य केले जाणार असून भाजपवर आरोप करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले जाणार आहे. नाशिकसाठी पॅकेजचीही सभेतून घोषणा होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामुक्काम’ अखेर स्थगित

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी केंद्राकडे आर्थिक मदत मागू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय किसान सभेला दिली आहे. याखेरीज शेतकरी हिताच्या अन्य मागण्यांचाही सरकार सकारात्मकतेने विचार करेल, अशी ग्वाही त्यांनी दिल्याने बुधवारी महामुक्काम आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. किसान सभेने बुधवारी रात्री उशिरा याबाबतचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे गुरुवारपासून नाशिककरांचे जनजीवन पूर्वपदावर येणार आहे.

किसान सभेने नाशिक शहरात पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभेच्या शिष्टमंडळाला बुधवारी दुपारी साडेतीनला चर्चेसाठी बोलावले होते. मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्याशी आंदोलकांच्या शिष्टमंडळातील डॉ. अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावित, माजी आमदार नरसय्या आडम, किसन गुजर, डॉ. अजित नवले, उद्धव पौळ, यशवंत झाडे, उमेश देशमुख, बारक्या मांगात यांनी विधान भवनात चर्चा केली. सुमारे तासभर ही चर्चा सुरू होती. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अनेक मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मकतेने विचार करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती डॉ. नवले यांनी दिली.

राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करता यावे यासाठी केंद्राची मदत घेऊ. मात्र, त्यासाठी सत्याग्रह मागे घ्यावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले. याखेरीज वनजमिनींबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या दाव्यांचा तीन महिन्यात फेरआढावा घेऊन जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. शेतीमालाला ५० टक्के नफा धरून भाव देण्यासाठी तसेच तसा आधारभूत भाव ठरविण्यासाठी पीक निहायप्रस्ताव तयार करून केंद्राला पाठविला जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले आहे. देवस्थानच्या जमिनी, गायरान जमिनी, वरकस जमिनी कसणाऱ्यांचे जिल्हावार सर्वेक्षण केले जाणार असून, त्यानंतरच अशा जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्याबाबत योग्य पावले उचलली जातील, असे शिष्टमंडळाला आश्वस्त करण्यात आले आहे. दुष्काळी भाग संपूर्ण वीज बिल मुक्त करण्याबाबत तसेच बिगर दुष्काळी भागात ३० टक्के बिल माफ करण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सभेच्या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे महामुक्काम सत्याग्रह स्थगित करण्याचा निर्णय किसान सभेने घेतला आहे. आंदोलक रात्रीच परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मात्र राज्य सरकारने आमचा विश्वासघात केल्यास हेच आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा महाराष्ट्र राज्य किसान सभेने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वप्नातल्या घराला करवाढीच्या झळा!

$
0
0

ashok.suryavanshi @timesgroup.com सर्वसामान्यांचे स्वप्नातले घर आर्थिक नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून, आजपासून महागणार आहे. रेडी रेकनरच्या दरात ६.१४ टक्क्यांची वाढ झाली आहे. पूर्णत्वाचा दाखला न मिळालेल्या घरांवर ४.३५ टक्के इतका सेवाकर आकारला जाणार आहे. त्यामुळे घर घेऊ इच्छिणाऱ्यांना घरासाठी जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. आधीच मंदीच्या गर्तेत सापडलेल्या बांधकाम उद्योगालाही यामुळे फटका बसणार आहे. नाशिक परिसरातील रेडी रेकनरचे दर आजपासून ६.१४ टक्क्यांनी वाढणार आहेत. दुष्काळामुळे गेल्या वर्षी रेडी रेकनरच्या दरवाढीस बांधकाम व्यावसायिकांनी विरोध केला होता. त्यामुळे यावर्षी ही दरवाढ जानेवारीऐवजी एप्रिलमध्ये होत आहे. हे नवे दर १ एप्रिलपासून मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारांना लागू होणार आहेत. सध्या घर खरेदीसाठी पाच टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. रजिस्ट्रेशन फी एक टक्का, एलबीटी एक टक्का आणि मूल्यवर्धित कर (व्हॅट) एक टक्का असा खरेदी किमतीच्या आठ टक्के कर भरावा लागतो. पूर्णत्वाचा दाखला न मिळालेल्या घरांसाठी ३.६२ टक्के सेवाकर आकारला जात होता. तो पाऊण टक्क्याने वाढून ४.३५ टक्के इतका करण्यात आला आहे.
अर्थात ६० चौरस मीटरपेक्षा कमी चटई क्षेत्राच्या घराला सेवाकरातून सवलत देण्यात आली आहे. रेडी रेकनरचे दर वाढल्यामुळे आपोआपच स्टॅम्प ड्युटीत वाढ होईल. सर्वसामान्यांसाठी २५ लाखांपर्यंत घरे उपलब्ध होत असतील तर अशा घरांवर दोन ते तीन लाख रुपये विविध कर भरावा लागत आहे. नवीन करवाढीमुळे यात वीस ते तीस हजारांची वाढ होणार आहे.

बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न मिळालेल्या घरांसाठी आजपासून ४. ३५ टक्के सेवाकर आकारला जाणार आहे. मात्र, ६० चौरस मीटरपेक्षा कमी आकाराच्या घरासाठी यातून सवलत देण्यात आली आहे. करवाढीमुळे घरांच्या किमतीत वाढ होणार आहे. सीए सुनील त्रिभुवन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अबब! मैत्रेयला १२५० कोटींची देणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या मैत्रेय ग्रुपच्या संचालकांना राज्यभरातील २० लाख ४७ हजार गुंतवणूकदारांना तब्बल १ हजार २४५ कोटी रुपये देणे आहे. यात नाशिक जिल्ह्यातील २ हजार २४५ गुंतवणूकदारांना ४ कोटी ६९ लाख ४१ हजार १५२ रुपये मैत्रेय ग्रुपला द्यावे लागणार आहे. गुंतवणूकदारांना पैसे परत देण्यासाठी पोलिसांच्या पुढाकाराने आणि कोर्टाच्या आदेशाने इस्क्रो हे ​वेगळ्याच्या धाटणीचे बँक खाते सुरू करण्यात आले आहे. या खात्यात मैत्रेय ग्रुपच्या संचालकांनी जवळपास दीड कोटी रुपये जमा केले आहेत. गुंतवणूकदारांना मैत्रेय ग्रुपने पैसे कसे परत करावे, याबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून त्यावर ५ एप्रिल रोजी कोर्टात फैसला होऊ शकतो. याबाबत बोलताना तपास अधिकारी आणि सरकारवाडा पोलिस स्टेशनचे सीनीअर पीआय सिताराम कोल्हे यांनी सांगितले की, गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणे महत्त्वाचे आहे. आजवरच्या तपासात महत्वपूर्ण माहिती समोर आली असून आमचा प्रयत्न संशयितांकडून पैसे मिळवून ते गुंतवणूकदारांना परत देणे इतका आहे. जामीन अटीनुसार वर्षा सत्पाळकरांनी सुमारे दीड कोटी रुपयांची रक्कम इस्क्रो खात्यात जमा केली आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातच २ हजार २४५ गुंतवणूकदार असून, त्यांना ४ कोटी ६९ लाख ४१ हजार १५२ रुपये द्यावे लागणार आहेत. किमान या गुंतवणूकदारांना पुरेसे असतील इतके पैसे इस्क्रो खात्यात जमा असणे आवश्यक आहे. राज्य किंवा देशातील गुंतवणूकदारांचा आकडा विलक्षण असून त्यांनाही न्याय मिळणे आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वराचा `नाशक` भोगतोय वनवास!

$
0
0

Ramesh.padwal@timesgroup.com

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर म्हणजे नाशिकचा शिरपेचच. याच त्र्यंबकराजाचा मुकुट साऱ्यांनाच भुरळ पाडत असतो. पण याच मुकुटातील नाशक हिरा आजही परप्रांतीयांच्याच ताब्यात आहे. अनमोल असलेला नाशक हिरा २०० वर्षांपूर्वी इंग्रजांनी लुटून इंग्लडला नेला होता. वनवास भोगत असलेल्या या हिऱ्याला घरवापसीची आस असून, त्र्यंबकेश्वराच्या मुकुटाची चमक वाढविण्यासाठी तो आतूर झाला आहे. मात्र, यासाठी गरज आहे ती नाशिककरांच्या प्रयत्नांची!

सध्याच्या बाजारभावानुसार साधारण १५ कोटींचा हा अष्टकोनी हिरा जगातील सर्वाधिक महागड्या हिऱ्यांमध्ये गणला जातो. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या खजिन्यातील हा हिरा असल्याने त्याला `आय ऑफ गॉड शिवा' असेही म्हटले जाते. जगातील सर्वाधिक आकर्षक हिऱ्यांमध्ये त्याचे स्थान आहे. ९० कॅरटचा (१८ ग्रॅम वजनाचा) हा हिरा त्र्यंबकेश्वरमधील रामचंद्र ताम्हणकर यांच्या घरात जमिनीत लपविलेल्या खजिन्यात होता. या खजिन्यात शेषशायी विष्णूच्या मूर्तीसकट एकूण ४३ किलो सोने, १३० किलो चांदी आणि सोन्याच्या मोहरा, अमूल्य रत्ने असलेल्या अनेक पेट्या होत्या. हा सर्व खजिना इंग्रजांनी १८१८ मध्ये लुटला अन्‌ येथूच नाशक हिऱ्याचा प्रवास सुरू झाला. हा हिरा नाशिकमध्ये मिळाला म्हणून त्याचा उल्लेख इंग्रजांच्या दप्तरी `नासक` (Nassak, Nassuck) असा केला गेला. त्यानंतर नाशकचे अनेकदा लिलाव झाले. हिरे व्यापाऱ्यांनी त्याला अधिक आकर्षक करण्यासाठी दोनदा पैलू पाडले. त्यामुळे त्याचे वजन निम्म्याने घटले. सध्या नाशक ४३.३८ कॅरेटचा (८.६८ ग्रॅम वजन) असून, त्याची किंमत १५ कोटी असल्याचे सांगितले जाते. १९७० ला नाशकला रॉबर्ट मोवाड (Robert Mouawad) या लेबनान येथील जव्हाहिऱ्याने तो विकत घेतला. तेव्हापासून तो त्यांच्या संग्रहात असल्याचे म्हटले जाते. मात्र, त्यानंतरही नाशकचे लिलाव झाले आहेत. नाशिकचा हा प्राचीन वारसा पुन्हा मायभूमीत यावा यासाठी प्रयत्न होण्याची गरज नाशिककर व्यक्त करीत आहेत.

`तो' मुकुटातीलच हिरा नाशक हिरा हा त्र्यंबकेश्वराच्या मुकुटातीलच आहे. मुकुटातील या हिर्‍याची जागा अजूनही रिकामी असून, हा हिरा पुन्हा या मुकुटात आणण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. नाशिकची शान असलेला हा हिरा पुन्हा मायभूमीत परत यावा यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान व नाशिककर नक्की प्रयत्न करतील. यासाठी मोहीम राबविण्याची गरज आहे.

ललिता शिंदे, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर ट्रस्ट, माजी नगराध्यक्ष

नाशकचा रोमांचकारी इतिहास!

नाशक हिरा आला कोठून?

नाशक हिरा हा १३ ते १४ व्या शतकात तेलंगाना (पूर्वीचे आंध्र प्रदेश), महबूबनगर जवळील आमरागिरी खाणीत सापडला. त्यानंतर तो म्हैसूरच्या खजिन्यात दाखल झाला. मुगलांनी म्हैसूरच्या खजिना लुटला. त्यानंतर नाशक मुगलांच्या खजिन्याची शान बनला. पेशव्यांनी दिल्लीवर ताबा मिळविल्यानंतर मुगलांचा जामदारखाना (खजिना) पेशव्यांच्या ताब्यात आला तेव्हा नाशिक पेशवाईत दाखल झाला. पेशव्यांनी त्र्यंबकगड ताब्यात यावा म्हणून पेशव्यांचे सरदार त्रिंबक सूर्याजी प्रभू यांनी त्र्यंबकेश्वराला नवस केला होता. या नवसाची फेड म्हणून पेशव्यांनी त्र्यंबकेश्वराला मुगलांच्या खजिन्यात मिळालेला सोन्याचा रत्नजडीत मुकुट शिवाला (त्र्यंबकेश्वराला) अर्पण केला. या मुकुटात सर्वात मोठा हिरा नाशक होता. म्हणून त्याला शिवाचा डोळा (आय ऑफ शिवा) असे म्हटले गेले.

त्र्यंबकेश्वर ते इंग्लंडचा प्रवास !

दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी खडकीच्या लढाईत पराभव झाल्यानंतर १७ नोव्हेंबर १८१७ पुणे सोडले अन् इंग्रजांपासून बचावासाठी त्यांची पळापळ सुरू झाली. पण ते इंग्रजांच्या तावडीत सापडले अन् पेन्शन घेऊन बिठूर येथे राहणे त्यांनी पसंत केले. १८१८ ला पेशवाईचा अस्थ झाला. त्यानंतर इंग्रजांनी पेशव्यांची संपत्ती ताब्यात घ्यायला व त्यांचे खजिने लुटायला सुरुवात केली. कॅप्टन ब्रिग्जला नाशिकच्या संपत्तीच्या शोधाची मोहीम हाती देण्यात आली. त्याने २ मे १८१८ च्या रात्री त्र्यंबकेश्वर लुटले. ही लूट डेक्कन प्राईम मनीनुसार सैन्यांमध्ये वाटली गेली. मात्र, सोने व हिऱ्यांसारख्या वस्तू इंग्लंडला पाठविण्यात आल्या. यात नाशक हिराही इंग्लंडला गेला. त्र्यंबकच्या लुटीचे वर्णन तत्काल‌िन कॅ. ब्रीजचे रिपोर्ट व १६ मार्च १८२१ च्या इंग्लंडच्या वृत्तपत्रांमध्ये नाशक हिरा इंग्लंडला दाखल झाल्याचे वृत्त वाचायला मिळते. हा हिरा नाशिकमध्ये मिळाला म्हणून त्याचा उल्लेख इंग्रजांच्या दप्तरी नासक (Nassak, Nassuck) असा केला गेला. इंग्रजांच्या हाती आलेल्या हिरा मिळविलेल्या अधिकाऱ्यांमध्ये त्यातून मिळणाऱ्या बक्षिसावरून वाद निर्माण झाले. त्यामुळे हा वाद इंग्लडच्या कोर्टात गेला. या वादाचे पडसाद इंग्लडच्या पार्लमेंटमध्येही उमटले. अखेर पंधरा वर्षांनंतर १८३६-३७ मध्ये नाशक हिऱ्याचा लिलाव करण्यात आला.

त्र्यंबकेश्वराचा मुकुट वाचला

'देवळांना अथवा त्यांच्या संपत्तीला हात लावायचा नाही' इंग्रजांच्या या धोरणामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरातील मुकुटाची इंग्रजांनी लूट केली नसावी. मात्र, लुटीच्या भीतीने त्र्यंबकेश्वराचा खजिना म‌ंदिरातून बाहेर काढून रामचंद्र ताम्हणकरांच्या घरात जमिनीत गाडण्यात आला आणि इंग्रजांच्या झडतीत नाशक हिरा व इतर संपत्ती इंग्रजांच्या हाती लागली. त्यामुळे इंग्रजांनी मंदिरातील त्र्यंबकेश्वर मुकुटाकडे दुर्लक्ष केले असावे. अथवा मुकुट इतरत्र लपविल्यामुळे वाचला, असाही कयास बांधला जातो.

नाशकचे अनेक लिलाव

इंग्लडच्या संसदेत नाशक हिऱ्यासह भारतातून लुटलेल्या संपत्तीचा लिलाव करण्याचे ठरले. त्यानुसार १८३६ मध्ये नाशक हिऱ्याचा लिलाव झाला. लंडनच्या रूंदेल आणि ब्रिज (Rundell and Bridge) या जोहरींनी नाशक तीन हजार पाऊंडला विकत घेतला. त्यांनी नाशकला पैलू पाडले तेव्हा त्याचे वजन ९० कॅरेटने घटून ७८.६२५ कॅरेट झाले. त्यानंतर जुलै १९३७ मध्ये सुप्रसिद्ध विलीस रूममध्ये नाशक पुन्हा एकदा विक्रीला आला. तेव्हा इंग्लंडच्या राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती असलेले वेस्टमिन्स्टर रोबेर्ट ग्रोसवेनोर (Robert Grosvenor) यांनी तो विकत घेतला. असे म्हटले जाते की, इंग्लंडच्या राणीच्या समारंभात रॉबर्ट यांनी आपल्या तलवारीच्या मुठीत हा हिरा बसविला होता. १९२७ मध्ये नाशक संघराज्यात आला. १९३० मध्ये नाशकची गणना जगातील पहिल्या २४ हिऱ्यांमध्ये केली गेली. १९४० साली हॅरी विन्स्टननी हा हिरा विकत घेऊन त्यांना पुन्हा पैलू पाडले. त्यामुळे नाशकचे वजन झाले ४३.३८ कॅरेट. म्हणजे मूळ वजनाच्या निम्मे झाले. हा हिरा एडवर्ड हँड यांनी विकत घेतला. त्यानंतर झालेल्या रॉबरीमध्ये नाशक गहाळ झाला. अमेरिकन ज्वेलर हॅरी विनस्टंन (Harry Winston) यांनी १९४० मध्ये तो पॅरीसमधून मिळविला. त्यानंतर नाशकने जगभरातील श्रीमंतांना आपल्या प्रेमात पाडले. मधल्या काळात नाशकला जेमोलोजीकाल इन्स्टिट्यूटमध्ये ठेवण्यात आले. १९६४ मध्ये जी. रोबेर्ट या शास्त्रज्ञाने संशोधनासाठी तो मिळवला. न्यू यार्कमध्ये १९७० मध्ये एडवर्ड जे यांनी पाच लाख डॉलरला तो विकत घेतला अन् हा जगातील सर्वात महागडा हिरा ठरला. त्यानंतर इंग्लंडचा प्रसिद्ध अभिनेता रिचर्ड बर्टन, सौदी राजा खलीदिबन अब्दुल अझीझ असा नाशकचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यानंतर २००७ मध्ये लेबनान येथील रॉबर्ट मोवाड यांच्या संग्रहात नाशक दाखल झाला. त्यानंतरही नाशकचा दहा लाख डॉलर (५ कोटी) लिलाव झाल्याचे म्हटले जाते. मात्र त्याबद्दल अधिक माहितीसाठी रॉबर्ट मोवाड प्रायव्हेट म्युझियमशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्याकडून अजून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. प्रतिसाद मिळाल्यास नाशक सध्याचा प्रवास कसा आणि कोठे सुरू आहे हे कळू शकेल.

संशोधन असेही...

ब्रिजवॉटर स्टेट युनिर्व्हसिटीमध्ये ऑक्टोबर १९९२ मध्ये फ्लिप सॅसली यांनी भारतातील हिऱ्यांबाबत केलेल्या संशोधनात नाशक हिरा व त्यांच्या पैलूंबद्दल माहिती मिळते.

अमेरिकेच्या जेमोलोजीकाल इन्स्टिट्यूटमध्येही नाशकवर संशोधन झाले आहे.

ज्वेलरी वेबसाईटवर नाशकची माहिती मिळते, तर डिक्श्नरी ऑफ जेम्स अॅण्ड जेमोलॉजी या ग्रंथातही त्याबद्दल इत्थंभूत माहिती मिळते.

नाशकची मोहिनी

नाशक हिऱ्याची मोहिनी इतकी अजब होती, की नाशकला पाहण्यासाठी येणारे आपल्या समाजसेवी संस्थेला दान करतील या उद्देशाने नोव्हेंबर १९७६ मध्ये जागतिक प्रदर्शनामध्ये तो ठेवण्यात आला. नाशकवरील प्रेमापोटी आकर्षित झालेल्या दानशूरांनी या संस्थेला भरभरून दान दिले.

नाशकच्या प्रेमापोटी ब्रिटीश मिड्लेण्ड एयरवेज या कंपनीने खरेदी केलेले मेक्डोणेल डग्लस या विमानाला द नाशक डायमंड असे नाव देऊन नाशकच्या आकर्षणावर मोहर उमटविली. या विमानालाही नाशकमुळे चांगला प्रतिसाद मिळाला.

नासक हिऱ्याची वैशिष्ट्य

मूळ वजन : ९० कॅरेट (१८ ग्रॅम)

सध्याचे वजन : ४३.३८ कॅरेट (८.६८ ग्रॅम)

मूळ पैलू : मुगल कट

लांबी-रूंदी-उंची : २३.३५ X २१.७३ X ११.५१ एमएम

रंग : पारदर्शक (कलरलेस)

कुठे मिळाला : आमरागिरी

हिरा कधी मिळाला : १३०० व्या शतकात

सध्या कोणाकडे आहे : खासगी व्यक्तीकडे

सध्याची साधारण किंमत : १५ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केंद्रीय ‘उद्योग’मंत्र्याचा शाही थाटबाट !

$
0
0

vinod.patil@timesgroup.com

ना‌शिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना दौऱ्यादरम्यान साधेपणाने राहण्याचा व शासकीय निवासस्थानांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु, भाजपच्याच मंत्र्यांना पंतप्रधानांचा हा सल्ला मान्य नाही. केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्य उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह हे शनिवारपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत असून, सरकारी यंत्रणेकडून त्यांच्या निवासासाठी पंचतारांकित हॉटेलची निवड करण्यात आली आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्या करीत असताना भाजप मंत्र्याच्या व्हीआयपी थाटबाटाने सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

राज्यात सध्या दुष्काळाची दाहकता वाढली असून पाण्याअभावी संपूर्ण महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. कर्जबाजारीपणा व दुष्काळामुळे राज्यात तीन हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशा बिकट परिस्थितीत केंद्राकडून राज्याला भरघोस आर्थिक मदतीची गरज असताना, ही मदत होण्याऐवजी केंद्रीय मंत्री राज्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. भाजपचे केंद्रीय उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह हे शनिवार (दि.२) पासून तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यासाठी प्रशासनाने मंत्री महोदयांची निवासाची व्यवस्था चक्क एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केली आहे. शहरातील सरकारी विश्रामगृहात पंचतारांकित हॉटेल्सपेक्षाही चांगल्या सोयी सुविधा आहेत. परंतु मंत्री महोदयांनी विश्रामगृहाऐवजी पंचतारांकित हॉटेलला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे त्यांच्या या शाही थाटबाटचीच चर्चा भाजपमध्ये सुरू आहे.

विशेष म्हणजे, याच काळात प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री हे नाशिक दौऱ्यावर शहरात येत आहेत. या सर्वांच्या निवासाची व्यवस्था विश्रामगृहात साधेपणाने केली असताना गिरीराज सिंह यांनी आपला शाही थाटबाट चालवला आहे. तीन दिवसांचा ताज हॉटेलचा खर्च हा दोन ते तीन लाखांवर असणार आहे. परंतु मंत्री महोदयांना खर्चापेक्षा आपल्या इभ्रतीची जास्त चिंता असल्याचे या शाही दौऱ्यातून दिसते. केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्य उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती विचार करतील का? असा सवाल नाशिककरांनी केला आहे.

देवदर्शनही शासकीय इतमामात

गिरीराज सिंह आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात आपला जास्तीचा वेळ हा देवदर्शनासाठी घालवणार आहेत. त्र्यंबकेश्वर, शिर्डी, शनीशिंगणापूर या तीर्थस्थळांच्या दर्शनाला जास्त प्राधान्य देण्यात आले आहे. आपल्या संपूर्ण दौऱ्यात केवळ चार तासच ते उद्योगासंदर्भातील एका संस्थेला भेट देणार आहे. उर्वरीत दोन दिवस संपूर्ण देवदर्शन असणार आहेत. त्यामुळे मंत्र्यांचा हा दौरा देवदर्शनासाठी की, नाशिकच्या भल्यासाठी असा प्रश्न विचारला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रीमंडळातील जबाबदार मंत्री देवदर्शनासाठी शासकीय खर्च करतो. विश्रामगृहाऐवजी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून जनतेच्या पैशांची उधळपट्टी होणे हे अशोभनीय आहे. राज्यात भीषण दुष्काळ असताना मंत्र्यांच्या अशा उधळपट्टीचा काँग्रेस जाब विचारेल.

- शरद आहेर, काँग्रेस, शहराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वाधिक उंच म्युरलला नाशिककराचे कोंदण

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

नाशिक : भारतातील सर्वात मोठे म्युरल साकारण्याची संधी नाशिकच्या मूर्तीकाराला लाभली आहे. वैश्विक कलाकृतींमध्ये अढळ स्थान असणाऱ्या लिओनार्दा द विंची याच्या 'द लास्ट सफर' या चित्रावर आधारित म्युरल शिल्पकार यतीन पंड‌ित यांनी साकारले आहे. १३ फुट बाय २३ पुटाचे ८५० किलो वजनाचे हे म्युरल लोणावळा येथे लावण्यात आले आहे.

१५ व्या शतकातील चित्राच्या स्मृती या निमित्ताने जाग्या झाल्या असून 'द लास्ट सपर' या चित्राच्या निर्मितीसाठी यतीन पंडीत यांनी अनेक चित्रांचा अभ्यास केला आहे. हे म्युरल साकारण्यासाठी यतीन पंड‌ित यांनी पॅरीसमधल्या लुव्हर या म्युझियममधून 'द लास्ट सपर'ची हूबेहूब प्रत मिळवली. या चित्रातल्या व्यक्त‌िरेखांचा, त्यांचे हावभाव, पोशाख, खोलीची अंतर्गत रचना, विविध वस्तू आणि या सगळ्या सोबत व्यक्तीरेखांची मानसिक अवस्था यांचा त्याने खूप बारकाईने अभ्यास केला आहे. मूळ चित्रामध्ये खिडकी आणि भिंत त्यापुढे खुर्ची व त्यावर बसलेल्या व्यक्ती यांच्यापुढे टेबलवरील वस्तु आणि डाव्या हाताला असलेल्या माणसाच्या टेबलचा बाहेर आलेला हात या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्तरावर दाखवाव्या लागणार होत्या त्यासाठी कमीत कमी जागेत अचूक काम करण्याचे कला पंड‌ित यांनी दाखविली आहे.

८५० किलोचे शिल्प

शिल्पकार यतीन पंड‌ित यांनी तीन महिन्याच्या अथक मेहनती नंतर १३ फूट बाय २३ फूटाचे ८५० किलो वजनाचे शिल्प साकरले आहे. याचा प्रवास थक्क करणारा आहे. हे शिल्प तयार करण्यासाठी सुरुवातीला माती काम करण्यात आले. यासाठी सर्वप्रथम लाकडाचा बेस तयार करण्यात आला. मातीच्या माध्यमातून अनेक आकार घडवले. या चित्रात येशू सोबतचे शेवटचे चित्रण साकारण्यात आले आहे. संपूर्ण कामाचा मातीचा साचा तयार केल्यानंतर भव्य कामाचे चार विभागात मोल्डिंग करण्यात आले. एका भागाचे मोल्डिंग अंदाजे दोनशे किलो वजनाचे होते. तीन महिन्याच्या अथक मेहनती नंतर १३ फूट बाय २३ फूटाचे ८५० किलो वजनाचे शिल्प नाशिकहून लोणावळ्याला रवाना झाले. या शिल्पाच्या रंग कामासाठी पंड‌ित यांनी वॉटर कलर्स, ऑइल कलर्स आणि रासायनिक रंग वापरण्यात आले आहेत. या चित्रात १५ व्या शतकातील रंग संगती जमवून आणली आहे. 'सपर' हे आधुनिक शिल्प आहे लगेच लक्षात येते.

काय आहे या म्युरलमध्ये

मिलानमधल्या सांता मारिया चर्चच्या भिंतीवर त्यावेळच्या मिलानचा राजा लुडोविको सर्फोजाच्या पाठिंब्याने १४९५ मध्ये विंचीने या चित्रकामास सुरुवात केली. पण राजाशी झालेल्या विसंवादामुळे त्याने आपले काम १४९८ मध्ये अपूर्ण सोडले. येशु आणि त्याचे बारा अनुयायी त्यांच्या जेवणाचा प्रसंग गॉसपल ऑफ जाममधून घेऊन त्याला चित्ररुप दिले आहे. आपल्या अनुयांयांपैकी कोणीतरी आपल्याला फसवले आहे आणि उद्या आपण या जगात नसणार आहोत याची कल्पना असतानाही येशू आपल्या शिष्यांसोबत शेवटचे जेवण घेतो. 'हेच ते द लास्ट सपर' तसेच १५ व्या शतकातला रेने सॉ चळवळीचा संपूर्ण सार या चित्रात उतारला आहे.

''भारतात पहिल्यांदा इतके मोठे म्युरल करण्याचा मान मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. कलाकृतीत चित्राइतकेच हुबेहूबपण आणण्याचा प्रयत्न केला आहे.'' - यतीन पंडित, शिल्पकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलमापन चाचणीला थांबा!

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअरची दिशा ठरविण्यास मार्गदर्शन मिळावे म्हणून यंदा कलमापन ही मानसशास्त्रीय चाचणी घेण्यात आली. २ एप्रिलपासून या विद्यार्थ्यांचे समुपदेशन होणार होते. मात्र विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी विभागानेच सध्या थांबा लावल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने विचार करता कलमापन चाचणी घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. त्यानुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्व शाळांमध्ये ही चाचणी पार पडली. चाचणी देऊनही ज्या विद्यार्थ्यांना आपल्या करिअरविषयी निर्णय घेता येत नसेल त्यांच्यासाठी समुपदेशनाचा दुसरा टप्पाही खुला ठेवण्यात आला होता. मात्र विभागाकडून सध्या याला ब्रेक लावण्यात आला आहे. जोपर्यंत सूचना दिल्या जात नाहीत, तोपर्यंत कलमापन चाचणीच्या समुपदेशनाला सुरुवात करू नका, असे समुपदेशकांना बजवण्यात आले आहे. त्यातच जूनपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे समुपदेशन पूर्ण करण्याची जबाबदारी समुपदेशकांवर असल्याने त्यांच्यावर वेळेअभावी भार येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’बाबत पालकांचीही अनास्था

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक दुर्बल घटकातील बालकांच्या शाळा प्रवेशासाठी बहुप्रतिक्षित ठरलेल्या 'आरटीई' प्रक्रियेत ५ ते ६ दिवसात केवळ १ हजार ३६९ अर्ज दाखल झाल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारी महिन्यापासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेल्या या प्रक्रियेसमोर त्यामुळे पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायदा अधिनियम २००९ नुसार आर्थिक दुर्बल घटकातील बालकांपर्यंत शिक्षणाचा हक्क पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी आरटीई प्रक्रिया राबविली जात आहे. गेल्या वर्षीही पालकांमध्ये जनजागृती नसल्याने व शाळांच्या मुजोरीमुळे ही प्रक्रिया तितकीशी यशस्वी होऊ शकली नव्हती. यंदा मात्र सुरुवातीपासूनच याकडे लक्ष लागले होते. मात्र यंदाही पालकांच्या अनास्थेमुळे आरटीईसाठी दिलेल्या २५ टक्के जागाही भरतील की नाही, अशी शंका उपस्थित होते आहे.
राज्यभर ही प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपात राबविण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले होते. मात्र, सातत्याने वेळापत्रकामध्ये बदल झाल्याने पालकांमध्येही या प्रक्रियेबाबत गोंधळ उडाला. त्याचाच परिणाम आता आरटीईमध्ये अत्यल्प नोंदणीद्वारे दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. जिल्हाभरात ३७४ शाळांमध्ये ६ हजार २०० जागा या प्रक्रियेसाठी राखीव असून १० एप्रिलपर्यंत पालक, पाल्यांच्या शाळा प्रवेशासाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यानंतर लगेचच लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरू शिवीगाळप्रकरणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सेवेत १७ कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यावरून आमदार सीमा हिरे, सुनील बागुल, विजय साने यांच्यासह अन्य पालकांनी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या दालनात घेराव घातला. कुलगुरू आणि कुलसचिवांची कोंडी केली. शिवाय कुलगुरूंना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या घटनेचा विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच अशा अपप्रवृत्तींच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मुक्त विद्यापीठात सहाय्यक पदावर घ्यावे या मागणीसाठी १७ कर्मचाऱ्यांनी २८ मार्चपासून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांना सामावून घेण्याबाबत शासनाने अध्यादेशही काढला होता. तथापि शासनाने विद्यापीठाच्या १०३ कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त झालेल्या व होत असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आधी प्राधान्याने सोडवावेत. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. असा पवित्रा घेतला होता. मात्र बुधवारी सायंकाळी आमदार सीमा हिरे, सुनील बागुल, विजय साने आणि आंदोलनकर्ते यांनी कुलगुरूंच्या दालनात येऊन कुलगुरूंना अर्वाच्च भाषेत शिव्यांच्या लाखोल्या वहिल्या. या प्रकाराविरोधात विद्यापीठाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले. तसेच दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांना त्वरित शासन व्हावे अशी मागणी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील सर्व शिक्षक, अधिकारी कर्मचारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांत याबाबत तक्रारही दाखल करण्यात आला आहे.
सकाळी सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यापीठात निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. अाज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर येणार असून या भेटीत त्यांना झालेल्या प्रकाराबाबत निवेदन देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images