Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मैत्रेय गुंतवणूकदारांना संजीवनी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मैत्रेयच्या गुंतवणूकदारांना लवकरच पैसे परत मिळणार आहेत. यासाठी पोलिसांच्या पुढाकाराने आणि कोर्टाच्या आदेशाने इस्क्रो हे ​वेगळ्याच्या धाटणीचे बँक खाते सुरू करण्यात आले आहे. आजवर, या खात्यात मैत्रेय ग्रुपच्या संचालकानी दीड कोटी रुपयांपैकी ७४ लाख रुपये जमा केले आहेत. उर्वरीत रक्कम दोन दिवसात भरली जाणार आहे. गुंतवणूकदारांना मैत्रेय ग्रुपने पैसे कसे परत करावे, याबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, त्यावर २३ मार्च रोजी कोर्टात फैसला होऊ शकतो.

राज्यात चर्चेत असलेल्या मैत्रेय ग्रुपच्या संचालिका वर्षा मधुसदन सत्पाळकर यांना कोर्टाने काही अटींवर २० दिवसांचा जामीन दोन मार्च रोजी मंजूर केला. गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याच्या दृष्टीने सत्पाळकरांनी पोलिसांनी सादर केलेल्या अटींवर अंमलबजावणी करण्यास कोर्टात सहमती दर्शवली होती. यात प्रामुख्याने नाशिकमध्ये दाखल झालेल्या तक्रारदारांचे पैसे जमा करण्याबाबतचा ऊहापोह करण्यात आला होता. दोन मार्चपर्यंत शहर पोलिसांकडे ६६१ तक्रारदार आले होते. या तक्रारदारांनी सुमारे १ कोटी ५० लाख रुपये मैत्रेयमध्ये गुंतवले होते. तेवढे पैसे सत्पाळकरांनी बँकेत जमा करावे, अशी पोलिसांची मागणी कोर्टाने मान्य केली. पोलिसांच्या या प्रस्तावानुसार आणि कोर्टाच्या आदेशानुसार अॅक्सिस बँकत इस्क्रो खाते सुरू करण्यात आले. जामीन मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी सत्पाळकरांनी या खात्यात ७४ लाख रुपये जमा केले. उर्वरित पैसे दोन दिवसात जमा होतील. याबाबत बोलताना तपास अधिकारी आणि सरकारवाडा पोलिस स्टेशनचे सिनीअर पीआय सीताराम कोल्हे यांनी सांगितले की, सत्पाळकरांचा पासपोर्ट जमा असणे आणि इस्क्रो खाते सुरू होणे हे या तपासाच्या दृष्टीने जमेच्या बाजू ठरल्या आहेत.

तक्रारदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्याबाबतची माहिती कोर्टात सादर केली जाणार आहे. आजमितीस तक्रार समोर आलेल्या तक्रारदारांनी तीन कोटी रुपये गुंतवल्याचे दिसते. हे पैसे सत्पाळकरांनी खात्यात जमा केल्यास गुंतवणूकदारांना ते कोर्टाच्या आदेशाने देण्यात येतील. पोलिसांकडे तक्रार दाखल असेल तरच कोर्टात त्यावर निर्णय होऊ शकतो, असे कोल्हे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, इस्क्रो खाते सुरू करून गुंतवणूकदारांना परत पैसे देण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असावी, अशी चर्चा पोलिस दलात सुरू आहे. या खात्याची माहिती पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांना होती. सीबीआयमध्ये आर्थिक शाखेचे प्रमुख म्हणून काम केलेल्या जगन्नाथन यांचा अनुभव या निमित्ताने उपयोगी पडल्याचे सांगितले जाते.

इस्क्रोमुळे कायदेशीर प्रक्रिया बंधनकारक

इस्क्रो खाते सुरू करण्यासाठी कंपनीतर्फे बँकेशी करार करण्यात येतो. हा करार झाल्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार कंपनीला पैसे भरावे लागतात. एकदा पैसे भरल्यानंतर संबंधित कंपनीला ते पैसे परत काढता येत नाही. गुंतवणूकदारांना पोलिसांच्या रिपोर्टनुसार आणि कोर्टाच्या आदेशाने काढता येतात. दरम्यान, ज्या तक्रारदारांनी आजवर तक्रार दाखल केलेली नाही, त्यांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पैसे परत मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऐंशी दिवसांचाच पाणीसाठा

$
0
0

नकाणे तलावात एकूण १२२ एमसीएफटी पाणी शिल्लक, आयुक्तांकडून पाहणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात मोठ्या पाणसंकटास सामोरे जावे लागणार आहे. कारण नकाणे तलावात केवळ ऐंशी दिवसांचाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे नागरिकांसाठी पाण्यासाठीची वणवण आता वाढणार आहे. या भीषण परिस्थितीत आता धुळेकरांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागणार अशी चिन्हे दिसत आहेत.


सध्या शहराला ६० टक्के पाणीसाठा हा तापी पाणीपुरवठा योजनेतर्गंत होतो. तर ४० टक्के पाणीसाठा शहरालगत असलेल्या नकाणे तलावातून होतो. मात्र नकाणे तलावाच्या पाण्याच्या पातळीत घट होवून तलावातील मृतसाठा मिळून एकूण १२२ एमसीएफटी एवढ्याच पाण्याचा साठा शिल्लक राहिला आहे. यामुळे महापालिकेतर्फे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याबाबतच मनपा आयुक्त डॉ. नामदेव भोसले, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय कदम, बांधकाम अभियंता कैलास शिंदे, संजय अग्रवाल आदींनी या तलावांची सोमवारी पाहणी केली.

शहरातील नकाणे तलावाची क्षमता ३५५ एमसीएफटी असून सद्यस्थितीत तलावातून दररोज एक ते सव्वा एमसीएफटी पाणी घेतले जाते. हा जलसाठा पुढच्या केवळ ८० ते ८५ दिवसच पुरेल, त्यामुळे आता धुळेकरांसमोर पुढे पाणसंकट उभे राह‌ीले आहे. या सर्व परिस्थितीला पाहून येत्या काळात पाणीटंचाई होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. जेणेकरून नागरिकांना पाण्याचा पुरवठा तीन ते चार दिवसाआड करता येईल. पांझरात पाणी सोडल्याने नदी वाहू लागली आहे. नकाणे तलावाच्या पाण्याचा वापर बंद करण्यात येऊन सरळ नदीतून पाणी उचलण्यात येत आहे. त्यामुळे आणखी काही दिवस नकाण्यातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होणार आहे. अशी माहिती पाहणीदरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

त्यानंतर अधिकाऱ्यांनी हरणमाळ तलावाला भेट दिली. त्याची क्षमता ४५० एमसीएफटी आहे. मात्र सध्याला या तलावात केवळ मृतसाठाच शिल्लक आहे. या तलावातून फक्त दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी ५ एलएलडी पाणी घेतले जाते. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई तीव्र होऊ नये, म्हणून प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. शहरात तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा हाेत आहे. यात आणखी एक दिवस वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यासाठी पाणी बचतीचे आवाहन मनपाकडून केले आहे.


९ जूनपर्यंतच पाणी

मार्च महिन्यातच धुळे शहराला पाणीटंचाईची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. याचा प्रत्यय नकाणे तलावातील पाणीसाठ्याने आलाच आहे. सद्यस्थितीला केवळ ऐंशी दिवसांचाच पाणीसाठी शिल्लक असल्याने नकाणेतून पाणीपुरवठा बंद करुन दुसरीकडून पाणीपुरवठा सुरू केला गेला आहे. तसेच अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. मात्र जर पाणीसाठा वाढला नाही तर ९ जूननंतर धुळेकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुर्वेद कॉलेजमध्ये रंगला युगांतर-२०१६

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

गणेशवाडीतील आयुर्वेद सेवा संघाच्या आयुर्वेद महाविद्यालयात 'युगांतर -२०१६' अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून अभिनेता चिन्मय उदगीरकर होते. प्राचार्य एस. एस. दासरी यांनी स्वागत केले. प्रत्येकाने सर्व प्रकारच्या उपक्रमात सहभागी होऊन उत्तम कलाकौशल्य आत्मसात करावे, असे सांगितले. जेष्ठ कवी व विनोदी लेखक नरेश महाजन यांनी विविध विनोदी गोष्टी सांगून सर्वांना मनमुराद हसवले. प्रत्येकात अनेक कलागुण दडलेले असतात त्यांचा विकास केला पाहिजे, असे उदगीरकर यांनी सांगितले. जनरल सेक्रेटरी कुमारी अनुपमा पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी आनंदमेळा, गीतरंग, विविध डेज साजरे करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख वैद्य नंदलाल पवार, वैद्य शिवानंद तोंडे, वैद्य लक्ष्मीकांत जोशी उपस्थित होते. वैद्य भीषण मोगल व अश्विनी पाटील यांनी विविध खेळाचे आयोजन केले होते. अश्विनी एकतपुरे व श्रीकांत वाकुडकर यांनी सूत्रसंचालन केले. शारदा पुरी हिने आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लहांगे, वारुंगसेंना करा अपात्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

इगतपुरी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती यांच्याकडून येथील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना वारंवार शिवीगाळ करणे, धमकी देणे, सरकारी कामात अडथळा असे प्रकार घडत आहेत. संबंधित पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तत्काळ अपात्रतेची कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी येथील राजपत्रीत अधिकारी संघटना, राज्य ग्रामसेवक संघटना, वैद्यकीय अधिकारी संघटना, विस्तार अधिकारी संघटना यांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.

इगतपुरी पंचायत समितीचे सभापती गोपाळ लहांगे व उपसभापती पांडूरंग वारुंगसे यांनी येथील गटविकास अधिकारी किरण कोवे, सहाय्यक अधिकारी जगन सूर्यवंशी, प्रकल्प अधिकारी वंदना सोनवणे, विस्तार अधिकारी विजयकुमार ढवळे यांसह अन्य कर्मचाऱ्यांशी सातत्याने गैरवर्तन केले आहे. त्यांच्या त्रासला कंटाळून संबंधित अधिकाऱ्यांनी पोलिस तक्रार दिली असून त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरबद्दल जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी अधिकारी वर्गात अत्यंत संतापाची भावना आहे. या घटनेचा निषेध म्हणून मालेगावी निषेध मोर्चा काढण्यात आला होता. अप्पर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संबंधित सभापती व उपसभापती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करावी, तसेच त्यांना अपात्र ठरविण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. संबंधितांवर कार्यवाही न झाल्यास संपूर्ण जिल्हाभर कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील संघटनेने दिला आहे.

सिन्नरला आंदोलन

सिन्नर : इगतपुरी पंचायत समिती सभापती, उपसभापती यांना तत्काळ अटक करावी व त्यांना अपात्र ठरवण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या सिन्नर शाखेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार मनोज खैरनार यांना निवेदनात देण्यात आले. याप्रसंगी कैलासचंद्र वाघचौरे, आर. एस. धुराळे, राजेंद्र माळी, पी. के. सदगीर, बे. के. खैरनार यांच्यासह ४८ ग्रामसेवक सहभागी झाले होते.

त्र्यंबकमध्ये निषेध

त्र्यंबकेश्वर ः सभापती गोपाळ लहांगे आणि उपसभापती पांडूंग वारूणसे यांना तत्काळ अटक करून त्यांना पदावरून अपात्र ठरवा या मागणीसाठी त्र्यंबक पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालवार मोर्चा काढला. मोर्चात गटविकास अधिकारी ज्ञानदा फणसे, जलसंपदाचे वनमाने रावसाहेब, विस्तार अधिकारी राठोड, सागर भाऊसाहेब सहभागी झाले होते.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगाव बसवंतला आज कडकडीत बंद!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

येथील काही समाजकंटकांनी मद्यधुंद अवस्थेत रविवारी रात्री दोघांना तलवारीचा धाक दाखवत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची अवहेलना केली. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे. घटनेचा निषेध नोंदवित शिवप्रेमींनी सोमवारी बैठक घेवून समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. मंगळवारी पिंपळगाव शहरात बंद पाळण्यात येणार आहे.

रविवारी रात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान सचिन दशमाने हे शिवाजी नगरातून आपल्या मित्रांसह मोटारसायकलवरून घरी जात असताना इनोव्हा कारमधून आलेल्या भारत गांगुर्डे याच्यासह काहींनी अडविले. त्यांनी दशमानेंना एका कार्यकर्त्याच्या घराचा पत्ता विचारला. दशमाने यांनी नकार देताच गांगुर्डेच्या साथीदारांनी तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. दशमाने यांच्या मोटारसायकलच्या पुढच्या भागावर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचीही या टवाळखोरांनी अवहेलना केली. यादरम्यान दशमाने व त्यांच्या साथीदाराने तेथून पळ काढला.

या घटनेचे वृत्त कळताच भास्कर बनकर, दीपक बनकर, पंढरीनाथ दशमाने यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना या घटनेबाबत माहिती दिली. मात्र शिवजयंती तोंडावर असल्यामुळे पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. या घटनेच्या निषेधार्थ शिवप्रेमींनी मंगळवारी शहर बंदची हाक दिली असून सकाळी दहा वाजता निफाड फाट्यावरून पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. भरत गांगुर्डे व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अभय दिले असल्याचा आरोप शहरवासीयांनी केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा येवल्यातरंगपंचमी कोरडीच!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

यंदाच्या भीषण दुष्काळ असल्यामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या येवला शहरवासियांनी पाणीबचतीचा संकल्प करत रंगपंचमीच्या दिवशी खेळले जाणारे सामुदायिक रंगपंचमीचे सामने यावर्षी न खेळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

येवला शहर आणि या शहरातील अनेक ऐतिहासिक वारसासंपन्न परंपरा म्हणजे एक मोठी खासियतच. महान सांस्कृतिक परंपरेची वर्षानुवर्षे अगदी अंतःकरणापासुन जोपासना करताना दरवर्षी रंगपंचमी निमित्त त्याच दिवशी शहरातील टिळक मैदानात खेळले जाणारे सामुसायिक रंगांचे सामने म्हणजे शहरवासियांसाठी एक मोठी पर्वणी. या रंगाच्या सामन्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी त्यातील प्रत्येक क्षण न क्षण डोळ्यात साठविण्यासाठी टिळक मैदानातील घरांच्या गच्चीवर महिलावर्गासह नागरिकांची मोठी गर्दी होत असते. यंदाची पाणीटंचाई परिस्थिती लक्षात घेता सामाजिक भान ठेवत येवेलेकरांनी हा सामुदायिक रंगांचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील सर्वच मंडळांनी यावर्षी सामने न खेळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रविवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत घेतला. येवला व्यापारी बँकेच्या सभागृहात जेष्ठ समाजसेवक प्रभाकर झळके व माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी सातच्या सुमारास ही बैठक झाली. रंगपंचमीचा सामना न खेळल्यामुळे जवळपास ५ लाख लिटर पाण्याची बचत होणार आहे. त्यादिवशी सायंकाळी टिळक मैदानात सर्वच मंडळांनी जमायचे आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून एकमेकांच्या कपाळाला केवळ गुलाल लावायचा असे या बैठकीत ठरल्याची माहिती प्रभाकर झळके यांनी सांगितले. बैठकीस माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, नगरसेवक बंडू क्षिरसागर, अविनाश कुक्कर, महेश वडे, जयंत भांबारे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैद्याची जेलरला धक्काबुक्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील न्यायालयीन कैदीने कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून धमकी दिल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे.

तुरुंगाधिकारी गणेश मानकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सलीम उर्फ पाप्या ख्वाजा शेख (१९९/१६) याला न्यायालयीन सुनावणीसाठी नाशिकच्या सत्र न्यायालयात २० मार्चला नेण्यात आले होते. तेथून आणल्यानंतर कारागृहात नेताना कर्मचाऱ्यांनी त्याची अंगझडती घेत असताना सलीमने त्यांना शिवागाळ केली. नंतर बराकीत जाण्यास

नकार दिला. तेथेही कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून चमच्याच्या सहाय्याने इजा करण्याची धमकी दिली. सरकारी कर्मचाऱ्यांना धमकी, धक्काबुकी, कामकाजात अडथळा या कलमाखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक वाळेकर या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

राका कॉलनीत घरफोडी

शरणपूर रोडवरील राका कॉलनी येथील बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी विविध साहित्यांची चोरी केली. या प्रकरणी कमोदनगर येथील शुभांगी प्रकाश पालवे (वय ५९) यांनी सरकारवाडा पोलिसांकडे फिर्याद दिली. रविवारी सकाळी ९ वाजेच्या पूर्वी चोरट्याने घरात प्रवेश करून पाणी तापवण्याचा बंद, इनर्व्हटर, चांदीच्या मूर्ती, गॅस सिलिंडर असा सुमारे १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

सट्टेबाजास अटक

टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या संशयितास पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रुपेश रत्नाकर रणसिंग (वय ३०) असे या संशयिताचे नाव असून, तो पेठरोड परिसरातील दत्तनगर परिसरात राहतो. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पेठरोड परिसरात छापा टाकून रणसिंग यास पोलिसांन ताब्यात घेतले. त्याच्याकडून १५ हजार रुपये रोख, मोबाइल असा ऐवज जप्त केला आहे.

जनावरांची सुटका

कत्तलीसाठी पिकअप वाहनात आठ जनावरे घेऊन जाणाऱ्या संशयितास आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी दुपारी हा प्रकार घडला. माडसांगवी शिवारातील शिलापूर टोलनाक्याजवळ एमएच १५ डीके ७५६४ क्रमांकाच्या पिकअप वाहनात तीन गायी आणि पाच वासरे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी निफाड तालुक्यातील चांदोरी येथे राहणाऱ्या नदीम नबाब इनामदार यास ताब्यात घेतले. पोलिसांनी पिकअप चालक इनामदार याच्याकडे चौकशी केली असता ही जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे लक्षात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विडी कामगारांचा सिन्नरला मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

केंद्र सरकारने व‌िडी बंडलवर ८५ टक्के धोका असे चित्र छापण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, यासह विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुका विडी कामगार संघाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

सकाळी ११ वाजता हा मोर्चा निघाला. या वेळी मोर्चेकऱ्यांच्यावतीने तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कामगार चौकातून आयटकचे राज्य सचिव राजू देसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चास सुरुवात झाली. केंद्र सरकारने विडी उद्योगासंदर्भात अनेक जाचक अटी लादल्याने राज्यातील लाखो विडी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्यामुळे या जाचक अटी मागे द्यावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. विडी कामगारांना देशपातळीवर हजार रुपये पेन्शन आणि पेन्शनला महागाई भत्ता लागू करावा, तेलंगणा सरकारच्या धर्तीवर देशभरातील विडी कामगारांना दरमहा एक हजार रुपये सहाय्यता निधी द्यावा, समान काम, समान दाम या न्यायाने संपूर्ण देशभरात हजार विडीस ३०० रुपयांप्रमाणे किमान वेतन महागाई भत्ता लागू करावा, कायदेशीर हक्कांची अंमलबजावणी करावी, आदी मागण्या यावेळी कामगारांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात नेमक्या बोअरवेल्स किती?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाढत्या पाणीटंचाईमुळे भूगर्भातील पाणीउपसा अपरिहार्य बनला आहे. यामुळेच सगळीकडे बोअरवेल्सचा बोलबाला सुरू झाला आहे. पण, जिल्ह्यात आजवर नक्की किती बोअरवेल्स आहेत, याचा थांगपत्ता कुणालाही नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासन आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणा अनभिज्ञ असल्याने बोअरवेल्सवर कुणाचेही नियंत्रण नाही काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. शिवाय जिल्ह्यात एकाही अनाधिकृत बोअरवेलवर अद्याप कारवाई झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. शहरवासी पाणीकपातीला सामोरे जात असताना ग्रामीण भागातही पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असताना भूगर्भातील पाणीउपसा करण्यासाठी बोअरवेल हा किफायतशीर व सोपा पर्याय ठरू लागला आहे. म्हणूनच ग्रामीण भागात सर्रास बोअरवेल करण्यास प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.

कारवाईला मर्यादा

पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतापासून ५०० मीटर अंतरात बोअर करावयाची असल्यास तसा ठराव ग्रामसभेत मंजूर करवून घेणे आवश्यक असते. मात्र, या नवीन बोअरवेलमुळे पिण्याच्या पाण्यावर परिणाम होणार असेल तर तसा प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून प्रांतांना देणे गरजेचे आहे. याबाबतच सर्व्हेक्षण करण्यासाठीचा प्रस्ताव भूजल सर्व्हेक्षणकडे पाठविला जातो. मात्र, अधिकृत व अनाधिकृत बोअरवेल्सची आकडेवारीच प्रकाशात येत नसल्याने याबाबतचे कायदे आणि त्यानुसार करावयाची कायदेशीर कारवाई जिल्ह्यात कागदावरच राहिल्याची खेदजनक माहिती पुढे आली आहे.

एकही कारवाई नाही

ग्रामीण भागात कुणी अवैधरित्या बोअरवेल घेतली तर संबंधितास पहिल्यावेळी १० हजार रुपये दंडांची तरतूद आहे. त्यानंतरही कुणी ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा प्रशासनापर्यंत कुणालाही न जुमानता बोअरवेल केलीच तर संबंधितांस २५ हजार रुपये दंड तसेच सहा महिने कारावासाची तरतूद आहे.
जलउपसा निर्बंधाची गरज

मालेगाव, चांदवड, देवळा या तालुक्यांमध्ये भूजल पातळी सर्वाधिक खाली गेली आहे. तेथे भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता बळावली आहे. त्याखालोखाल सुरगाणा, बागलाण, नांदगाव, येवला, व सिन्नर या पाच तालुक्यांतही भूजल पातळी धोकादायक अवस्थेत आहे. अशाही परिस्थितीत बोअरवेलची संख्या वाढत असून त्यावर निर्बंध आणण्यासाठीचा अधिनियम केवळ कागदावरच नाचविला जात असल्याचे वास्तवही पुढे आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोलsss खोलsss पाणी....!

$
0
0

गुलशनाबाद म्हणून ख्याती असणाऱ्या जलसमृध्द नाशिककरांना यंदाचा दुष्काळ मात्र चांगलेच चटके देतो आहे. कधी नव्हे तो शहरात पाणीप्रश्नाने डोके वर काढले आहे. परिणामी, शहरातील बहुतांश सोसायट्या अन् बंगल्यांमध्ये बोअर्स घेण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. पाण्याच्या शोधार्थ हवालदिल झालेल्या नागरीकांमुळे बोअर्सचा व्यवसाय तेजीत आला आहे. वाढत्या नागरीकरणाने चारही दिशांना शहराच्या कक्षा रुंदावल्या गेल्या. अशा स्थितीत अनेक ठिकाणी पाण्याची सुविधाही अद्याप पोचलेली नाही. त्यातच यंदाच्या पाणीटंचाईच्या समस्येची भर यात पडली आहे. शहरात सद्यस्थितीत सुमारे ७० टक्के सोसायटी आणि बंगल्यांमध्ये बोअर्स घेण्यात आल्याचे बोअरवेल व्यावसायिकांची आकडेवारी सांगते. तर गेल्या दशकभरात अवघ्या १०० फुटांच्या खोलीवर सापडणारे पाणी हे आता साडेतीनशे ते चारशे फुटांच्या अंतरावर सापडत असल्याचे वास्तव आहे.

बोअरवेल व्यवसायात दक्षिण भारतीय बोअरवेल व्यवसायात शहरात दक्षिण भारतीय व्यावसायिकांची संख्या अधिक आहे. आंध्र प्रदेश व तामिळनाडूमधील व्यावसायिक शहरात कार्यरत आहेत. सद्यस्थितीत पाण्याच्या शोधासाठी या व्यावसायिकांना तासाभराचीही उसंत नाही. नाशिक परिसरातील शेतीमध्येही बोअरवेल घेणाऱ्यांचे प्रमाण अलिकडील काळात वाढीला लागले. मात्र, जिल्ह्याच्या काही भागातील पाण्याची पातळीही घटत असल्याने पण्याच्या शोधातील नागरीकांची निराशा होत आहे.

तर पाणी मिळणे शक्य अनेकदा खोलवर बोअरवेल घेऊनही जमिनीत पाणी लागत नाही. अशावेळी त्या बोअरवेलमधील केसींग पाईप काढून घेतला जातो. शेतीमध्ये घेतल्या जाणाऱ्या बोअरवेलमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, पावसाळ्यात साठवणुकीअभावी वाया जाणारे पाणी या पाईपद्वारे बोअरमध्ये सोडत राहिल्यास कोरडे पडलेले हे बोअर्स पुनरूज्जीवीत होऊ शकतात, अशी माहिती बोअरवेल व्यावसायिक शिरीष कावळे यांनी दिली. या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टींगचा प्रयोग राबविण्यावर भर दिल्यास पाण्याची घटणारी पातळी सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास कावळे यांनी व्यक्त केला.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप आमदारांना कंठ फुटला कसा?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या विविध प्रश्नांसाठी शिवसेनेने काढलेल्या मोर्चावरून टीका करणाऱ्या भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसवर शिवसेनेने पलटवार केला आहे. अनेक दिवसांपासून मूग गिळून बसलेल्या भाजपच्या वाचाळ आमदारांना आताच कंठ कसा फुटला असा सवाल महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केला आहे.

शिवसेनेचा मोर्चा हा कुणा पक्षाच्या नव्हे तर नाशिककरांच्या प्रश्नांसाठी होता. पाण्याचे आंदोलन झाले तेव्हा भाजप आमदार कुठे होते? असा सवाल बोरस्ते यांनी केला. तर, जनतेच्या नव्हे तर भुजबळ कुटुंबियांना वाचविण्यासाठीच राष्ट्रवादी आंदोलन करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

शिवसेनेने काढलेल्या मोर्चावर भाजपसह राष्ट्रवादीने टीका केली होती. त्यामुळे बोरस्ते यांनी पत्रकार परिषद घेवून भाजप व राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिले. नाशिककर शिवसेनेसोबत रस्त्यावर उतरल्या नंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे भाजप आमदारांचा आता कंठ फुटला आहे. शिवसेनेने पाण्यासाठी मोट बांधली होती तेव्हा भाजपच्या आमदारांना मंत्रीपदाचे स्वप्न पडत होते. आता शब्दच्छल करण्यापेक्षा संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी नाशिकमध्ये आणून जाहीर खुलासा करावा, असे आवाहन बोरस्ते यांनी केले आहे. भाजपतर्फे नाशिककरांची बोळवण आता एखाद्या पॅकेजने केली जाईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

'राष्ट्रवादी'चे शहराध्यक्ष जयंत जाधव हे आमदारही आहेत. त्यामुळे त्यांनीच नागरिकांच्या प्रश्नांवर आंदोलने केली पाहिजे. परंतु, राष्ट्रवादी केवळ छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्यावर कारवाई करू नये यासाठीच आंदोलने करत आहेत. 'राष्ट्रवादी'ने मच्छरदानीपुरतेच आपले

आंदोलन मर्यादित न ठेवू नये असा सल्ला देत भुजबळांना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीला भाजपचा पुळका आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३२५ हातपंपांनी टाकली मान

$
0
0

जिल्हाभरात भूजल पातळी खोल गेल्याचा परिणाम; पाण्यासाठी नागरिकांची वणवण अटळ

pravin.bidve@timesgroup.com

नाशिक : जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होत असून अनेक गावांत रहिवाशांची तहान भागविणारे हातपंप मान टाकू लागले आहेत. भूगर्भातीलल पाण्याची पातळी प्रमाणापेक्षाही अधिक खालावल्यामूळे जिल्ह्यात तब्बल ३२५ हातपंप असून नसल्यासारखे झाले आहेत. परिणामी हातपंपावर अवलंबून असणाऱ्या ग्रामस्थांवर पाण्यासाठी दाही दिशा वणवण करण्याची वेळ आली आहे.

पावसाने पाठ फिरविल्यामुळे यंदा जिल्हावासियांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा तळ गाठत असून गावोगावी पिण्याच्या पाण्याची भिस्त आता विहिरी, हातपंप आणि तत्सम साधनांवर अवलंबून आहे. पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने नाही म्हटले तरी जिल्ह्यात ७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सरू ठेवला आहे. टँकरद्वारे ९२ गावे आणि १५१ वाड्यांची तहान भागविली जात आहे. टंचाईसदृश परिस्थितीत शेतीसाठी पाणी मिळण्याची आशा शेतकऱ्यांनी सोडून दिली. मात्र, कुटुंबाला आणि जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, अशी जिल्हावासियांचा माफक अपेक्षा आहे. पाण्याबाबतच्या गरजा पूर्ण करण्यात ग्रामीण भागात हातपंप आणि वीजपंप महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु, भूगर्भातील पाणीपातळी खालावू लागल्याने हातपंपांद्वारेही पाण्याचा उपसा करण्यावर आपसूकच मर्यादा येऊ लागल्या आहेत. गावागावांत भूजल व्यवस्थापन व पूनर्भरणाचे योग्य प्रकारे व प्रभावी नियोजन करणे काळाची गरज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दीडशे हातपंप तात्पुरते बंद

जिल्ह्यात ७ हजार २५२ हातपंप आणि ४५३ वीजपंप आहेत. सर्वाधिक ७६५ हातपंप मालेगाव तालुक्यात आहेत. त्याखालोखाल बागलाणमध्ये ७१६ तर निफाड तालुक्यात ६६५ हातपंप आहेत. सर्वात कमी म्हणजेच १४२ हातपंप पेठ तालुक्यात आहेत. जिल्ह्यातील एकूण हातपंपांपैकी १५५ हातपंप तात्पुरत्या स्वरूपात बंद पडले आहेत. तर पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे बंद पडलेल्या हातपंपांची संख्या ३२५ पर्यंत गेली आहे. त्यातही मालेगावात भूजल पातळी सर्वाधिक खालावल्याने तेथील ४९ हातपंप निरुपयोगी ठरू लागले आहेत. त्याखालोखाल सिन्नरमधील ४८ तर येवल्यातील ४७ हातपंपांनी मान टाकली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सहा हजार ७७२ हातपंप सुरू असून ४५० वीजपंपांद्वारेही भूजल उपसा होत असल्याची माहिती भूजल सर्व्हेक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. भूजलपातळी खोल जाण्याची कारणे

ग्रामीण भागातील ८० टक्के पिण्यासाठीचा पाणीपुरवठा भूजलाद्वारे भागविला जातो. ५० टक्के सिंचन क्षेत्रही भूजलसाठ्यावरच अवलंबून असते. पाऊस चांगला झाला तर धरणे, शेततळी, तलाव भरण्यास मदत होते. तर पाणी जिरल्यामुळे भूजलसाठ्यातही वाढ होते. लोकसंख्यावाढ, शहरीकरण, औद्योगिकरण, जमीन व पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, मृद व जलसंधारण उपायांकडे दुर्लक्ष, पाणी वापरासंबंधी साक्षरतेचा अभाव, जास्त पाणी लागणाऱ्या पिकांखालील क्षेत्रात होत असलेली वाढ, भूजल पूनर्भरणासाठीचे अपुरे प्रयत्न आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलाची वाढलेली मागणी यांमुळे भूजलपातळी खोल गेली आहे.



जिल्ह्यात बंद हातपंपांची तालुका निहाय आकडेवारी

तालुका बंद हातपंप

मालेगाव ४९

सिन्नर ४८

येवला ४७

चांदवड ३६

नांदगाव ३६

देवळा ३३

बागलाण २४

दिंडोरी १५

निफाड १५

पेठ ७

कळवण ५

सुरगाणा ४

नाशिक ३

त्र्यंबकेश्वर ३

एकूण ३२५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातगडवर सापडला ४६९ वर्षांपूर्वीचा शिलालेख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रातील अती दुर्गम अशा हतगड किल्ल्यावर तब्बल ४६९ वर्षांपूर्वीचा देवनागरी लिपीतील शिलालेख सापडला आहे. याद्वारे बागुलवंशी राजांच्या पराक्रमी आणि या किल्ल्याचा जाज्वल्य इतिहास उजेडात आला आहे. या शिलालेखासह किल्ल्याच्या योग्य संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सातमाळापर्वत रांगेतला हातगड किल्ला महाराष्ट्रातल्या गिर्यारोहकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. गुजरात भागातून विशेषतः सुरतेकडून येणाऱ्या प्रमूख अशा सापुताऱ्याच्या घाटमाथ्यावर वसलेला हातगड किल्ला अनेक प्राचीन अवशेषांनी समृद्ध आहे. परंतु, इतिहासात हातगड किल्ल्याच्या नोंदी अतिशय तुरळक आहे. गेल्या आठवड्यात गिर्यारोहक सुदर्शन कुलथे हे हातगड किल्ल्यावर अभ्यासासाठी गेले. मुख्य प्रवेशमार्गावरून बाहेरच्या बाजूने अवघड मार्गाने किल्ल्याभोवती पाहणी करत असतांना किल्ल्याच्या पश्चिमेकडे असलेल्या बुरूजाखाली त्यांना शिलालेख दिसून आला. वहिवाट नसलेल्या ठिकाणावर असलेल्या देवनागरी लिपित कोरलेला संस्कृत भाषेतला तब्बल सोळा ओळींचा हा शिलालेख आहे. आजही चांगल्या अवस्थेत असलेला हा उभा आयताकृती शिलालेख उंचीने चार फूट तर रुंदीला दोन फूट चार इंचाचा आहे. शिलालेखालतील अक्षरे तीन इंच उंचीची आहेत. त्या जागेवर उभे राहिले असता शिलालेख हा जमिनीपासून साडेसहा फूट उंचीवर आहे. अधिक शोध घेतला असता संपूर्ण महाराष्ट्रातील देवनागरी भाषेतला हा सगळ्यात मोठा शिलालेख असल्याचे कळते.

शिलालेख कोरीव प्रकारातला असून सदर शिलालेख किल्ल्यावरच्या वापरात नसलेल्या अवघड अशा जागेवर उभ्या कातळकड्याच्या एका भिंतीवर आजही सुस्पष्ट स्थितीत दिसून येतो. या शिलालेखावर सुदर्शन कुलथे यांनी अधिक संशोधन केले. यावरून हा शिलालेख शालिवाहन शके १४६९ सालच्या आषाढ माहिन्यात क्षय एकादशीला कोरलेला आहे. म्हणजेच इ. स. १५४७ साली कोरलेल्या शिलालेखाला आता ४६९ वर्ष पूर्ण झाली आहेत. सुमारे ५०० वर्ष जुन्या शिलालेखात बागुलवंशी राजांच्या पराक्रमाबद्दलच्या ओळी सापडल्या आहेत. या शिलालेखात बागलाण प्रांतातील राष्ट्रौढ वंशीय बागुलराजे यांच्या विजयाचा आशय आहे. बागुलवंशातील राजा महादेवसेन यांचा पुत्र भैरवसेन यांनी नगर निजामाच्या ताब्यातून हातगड किल्ल्याला वेढा घालून किल्ला जिंकल्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळला. सोळाव्या शतकाच्या मध्यावर अहमदनगरचा बुरहान निजामशहा हा या भागातल्या राजवटीतला बलाढ्य राजा होता. त्याच्या ताब्यात असलेला मोक्यावरच्या ठिकाणी वसलेला हातगड किल्ला मिळवणे हा बागुलवंशीय भैरवसेन राजाचा पराक्रम होता हे या शिलालेखावरून स्पष्ट होते. बागुलवंशीय राजांच्या दरबारी असलेल्या रुद्र कवी विरचित 'राष्ट्रौढवंशम् महाकाव्यम्' या ग्रंथात भैरवसेन यांनी हस्तगिरी किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख आहे. यावरून हातगड विजय या शिलालेखालातील मजकूराला अधिक पुष्टी मिळाली आहे.

शिलालेखातील मजकूर

स्वस्ति श्री नृप विक्र मार्क स (स्य)

....ती ... शाळिवाहन सकें

१४६९ ... संवत्सरे आषा

ढ क्षय ११ भौमे तद्दीने महाराजा

धिराज प्रौढ प्रताप चक्रवर्ती वेद मा

र्ग प्रवर्तक आचार परायण सा

रासार विचारक प्रताप नाराय

ण धर्मधुरीण सकळ वेद शा

स्त्र कोविद राष्ट्रौड बागुल मुगु

ट मणी.... वा....... श्री मा

न ब्रह्मकुळ प्रदिप श्री महादेव

सूत तपश्री.... परित श्री

रा (जा) धीराज बहिरम (भैरव) सेन राजा

जबळ पराक्रमे हातगा दुर्ग वेढा

घालुनु (न) नीजाम सहा (शहा) पासुन

घेतला..... विजयी भव

संशोधकांना अध्ययनाचे आवाहन

शिलालेख संशोधनासाठी कुलथे यांना वनविभाग, कनाशीप्रांताचे ए. एन. आडे आणि इतिहास अभ्यासक गिरीश टकले यांचे सहकार्य लाभले. सदर शिलालेख हा बागलाण आणि नाशिक प्रांताच्या इतिहासाचे अधिक धागेदोरे मिळविण्यासाठी महत्त्वाचा आहे तरी इतिहास अभ्यासक आणि जिज्ञासू मंडळींनी या विषयावर अधिक प्रकाश टाकून संशोधन करावे असे आवाहन सुदर्शन कुलथे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उत्तर महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य करा’

$
0
0

नाशिक : विकासाच्या अनुशेषावर राज्याचे विभाजन किवां नवीन राज्याची निर्मिती होत असेल तर सर्वप्रथम उत्तर महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य केले पाहिजे, असा दावा माजी मंत्री प्रशांत हिरे यांनी केला आहे. विदर्भ व मराठवाड्यापेक्षा उत्तर महाराष्ट्र खुपच मागासलेला असून अनुशेषाच्या बाबतीत उत्तर महाराष्ट्राचा वरचा क्रमांक लागतो. मराठवाडा व विदर्भा संदर्भात महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केलेल्या वक्तव्यावर हिरे यांनी पत्रक काढून स्वतंत्र उत्तर महाराष्ट्र राज्याचे समर्थन केले आहे. भौगोलिक व सामाजिक आणि राजकीय प्रकारचा अनुशेष उत्तर महाराष्ट्राचा आहे. उत्तर महाराष्ट्रावर विदर्भ व मराठवाड्यापेक्षा जास्त अन्याय झाला आहे, असे मत हिरे यांनी मांडले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्खनन जोरात; प्रशासन कोमात!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महसूल प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा लाभ खडी-क्रशर धारकांनी उठविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच एकट्या सारूळ येथील १६ अधिकृत खाणींमधून बेसुमार खनिज उत्खनन केल्याची बाब उघडकीस आली आहे. या खाणींमधून गेल्या आठ वर्षात सात लाख ७५ हजार ७२८ ब्रास खनिजांचे उत्खनन झाल्याचे खुद्द प्रशासनानेच केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. त्यामुळे महसूल विभाग खडी क्रशर धारकांच्या मुसक्या आवळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक बोकाळली आहे. नाशिक तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्यात अनेक ठि‌काणी गेल्या काही वर्षांत उत्खननाच्या नावाखाली डोंगर पोखरण्याचे 'उद्योग' सुरू आहेत. अशा अनधिकृत उत्खननामुळे डोंगर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपेक्षित रॉयल्टी न मिळाल्यामुळे सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. ही बाब लक्षात आल्याने आता जिल्हा प्रशासनाने अशा अवैध उत्खननावर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील ६० खाणींचे व्हॉल्युमेट्रीक सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांनी घेतला आहे. त्यासाठी गौण खनिज अधिकारी गणेश राठोड यांच्यासह सबंध यंत्रणाच कामाला लागली आहे. या सर्व्हेक्षणात अनधिकृतरित्या उत्खनन करणाऱ्या ६० क्रशर धारकांवर कारवाई करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने सारूळ शिवारातील १६ खाणींचे व्हॉल्युमॅट्रीक पध्दतीने सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सन २००७ पासून आजपर्यंत या खाणींमधून सात लाख ७५ हजार ७२८ ब्रास इतके उत्खनन झाले आहे.

उत्खननानुसार रॉयल्टी आकारणार

या ठिकाणच्या अधिकृत १६ खाण मालकांकडून ३०० रुपये ब्रासप्रमाणे रॉयल्टी आकारण्यात येणार आहे. ज्या खाण मालकांनी यापूर्वी रॉयल्टी भरली आहे, त्यांची २००७ पासूनची रॉयल्टी भरल्याची चलने तपासली जाणार आहेत. मालकाने भरलेली रॉयल्टी रक्कम, आतापर्यंत केलेले एकूण उत्खनन याचा मेळ साधून त्यानुसार रॉयल्टीची रक्कम आकारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपकेंद्राच्या जागेवर व्यापारी संकुल नकोच

$
0
0

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने उपकेंद्र धुळ्यात व्हावे यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत १३ जानेवारीला ठराव करुन विद्यार्थी भावनांचा आदर केला होता. मनपाच्या मालकीची देवपूरातील सर्व्हे नं. १११, ११२ अ हा भूखंड विद्यार्थ्यांसाठी विनामुल्य देण्याचेही ठरले होते. मात्र काही राजकीय मंडळी द्वेषापोटी हा भूखंड व्यापारी संकुलासाठी देण्याचा घाट घालत आहेत. यासाठी मंगळवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून आंदोलन करत निवेदन देण्यात आले.



सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेला ठराव क्रमांक १८७ विखंडीत करण्यासाठी नगरविकास विभागाला १९४९ चे कलम ४५१ अन्वये पाठविलेले पत्र त्वरीत मागे घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष यशवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष मयुर ठाकरे, शहराध्यक्ष सचिन आखाडे यांनी मनपा आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांना निवेदनाद्वारे केली आहे. विखंडीतसाठी पाठविलेले पत्र त्वरीत मागे न घेतल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आंदोलन छेडेल आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरेल असेही निवेदनात म्हटले आहे. दरम्यान विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त भोसले यांना यासंदर्भात घेराव घालून निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉपी पुरविण्यावरून दोन गटांत वाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार शहरात मंगळवारी दुपारी अचानक दोन गटांमध्ये दगडफेक होऊन तिचे रुपांतर दंगलीत झाले. यामुळे शहरात तणाव पसरला असून, काही क्षणातच पोलिसांनी शहरात पोलिस बंदोबस्त तैनात करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरातील माळीवाडा आणि चिराग गल्लीत दुपारी दोन वाजेच्या सुमारास दहावीचा पेपरला कॉपी पुरविण्याण्यावरून काही तरुणांमध्ये वाद झाला. त्यावेळी दोन गट आमने-सामने आले. त्यांनी एकमेकांवर दगड विटांचा मारा केला. माळीवाडा व चिराग गल्लीतील या प्रकाराने शहरात काही वेळातच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.



शहरात यामुळे दंगलीची अफवा पसल्याने ऐन बाजाराच्या दिवशीच धावपळ उडाली. मंगळवार बाजार, जळका बाजार, स्टेशन परिसर, धुळे रोड आदी भागात दंगलीच्या भीतीने दुकानदारांनी दुकाने बंद केली होती. शहरभर नागरिकांची एकच धावपळ उडाली. मात्र काही वेळातच जिल्हा पोलिस अधीक्षक महेश घुर्ये, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा शहरात ठिकठिकाणी दाखल झाला. त्यांनी या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. तर वाद घालणाऱ्या दोन्ही गटातील तरूणांचा पोलिस शोध घेत आहेत. लवकरच त्यांना ताब्यात घेवून अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतीपदाचा आज फैसला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी बुधवारी निवडणूक होत असून, सभापतीपदासाठी तिंरगी लढत होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सलिम शेख यांना उमेदवारी दाखल केली असून भाजपचे दिनकर पाटील आणि 'आरपीआय'तर्फे प्रकाश लोंढे यांनीही सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, काँग्रेसही महाआघाडीत परत आल्याने सभापतीपदासाठी मनसेचे पारडे जड झाले आहे. शेख यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. सकाळी अकरा वाजता सभापतीपदावर शिक्का मोर्तब होणार आहे.

सभापतीपदाची निवडणूक बुधवारी होत असून त्यासाठी मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षांच्या महाआघाडीतर्फे मनसेच्या सलिम शेख यांनी सभापतीपदासाठी चार अर्ज दाखल केले आहेत. तर विरोधी पक्षात असलेल्या भाजपतर्फे दिनकर पाटील यांचा आणि शिवसेनेतर्फे आरपीआयच्या प्रकाश लोंढे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सभापतीपदासाठी तिरंगी लढत होणार आहे. सभापती पदासाठी मनसे, राष्ट्रवादी व अपक्षांची महाआघाडी असून त्यांच्याकडे विजयासाठी सध्या तरी ९ सदस्यांचे संख्याबळ आहे. त्यामुळे मनसेचा सभापती होणार हे जवळपास निश्च‌ित मानले जात आहे. तर महाआघाडीतील नाराजी दूर करण्यात मनसेला काही अंशी यश आले असून काँग्रेसही मनसेच्या पाठीशी उभी राहणार असल्याने मनसेची ताकद वाढली आहे. शिवसेना व भाजपमध्ये मात्र उमेदवारीवरून तणाव कायम आहे. युती असली तरी, भाजपने सेनेला मदत करावी अशा दावा सेनेने केला आहे. भाजपने आरपीआयच्या उमेदवाराला पाठींबा द्यावा, अशी मागणी सेनेने केली आहे. तर भाजपने अद्यापही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेला पाणीटंचाईची झळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्राला सध्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून त्याचा फटका रेल्वेलाही बसला आहे. नाशिकरोडहून मुंबईकडे जाणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेसमध्ये पाणी नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. पंचवटी एक्स्प्रेस व गेदावरी एक्स्प्रेस या गाड्या मनमाडहून सुटतात. मनमाडमध्ये त‌ीव्र पाणीटंचाई असल्याने या गाड्यामध्ये पाणी भरता येत नाही. नाशिकमध्ये पाणी आहे; मात्र या गाड्यांना पाणी भरण्यासाठी लागणारा वेळ व गाडी थांबण्याचा कालावधी यांचा मेळ बसत नाही. त्यामुळे या दोन्ही गाड्यामध्ये प्रवाशांना पाणी उपलब्ध होत नाही. अनेकदा शौचालयाचा वापर केल्यानंतर पाणी नसल्याचे लक्षात येते. त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. मुंबईला गाडी पोहचल्यानंतर पाणी भरता येणे शक्य आहे; मात्र तेथे संपूर्ण गाडीत पाणी भरायला वेळ लागतो. त्यामुळे काही डब्बे कोरडेच राहतात. याचा फटका प्रवाशांना बसतो. ठराविक अंतराने का होईना मनमाड, इगतपुरी स्टेशनवर पाणी भरण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

रेल्वे स्टेशनवर पाणीटंचाई

उन्हाळा सुरू झालेला नसतानाही नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पाण्याचे दुर्भिक्ष आहे. स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीनवर असलेल्या नळांना टप्प्याटप्प्याने पाणी येत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी आवश्‍यक असलेल्या पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांचे निवारण करण्याबाबत रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

गरीब प्रवाशांचे हाल

लंबपल्ल्याच्या अनेक गाड्या ना‌शिकरोड मार्गावरून धावतात. त्यात पॅसेंजर गाड्यांचा भरणा अधिक असतो. एक्स्प्रेसमधील प्रवासी मिनरल वॉटरच्या बाटल्या घेऊन आपली तहान भागवतात; परंतु गरीब प्रवाशांकडे पाणी विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने त्यांना रेल्वे स्टेशनवरील पाण्याचा सहारा घ्यावा लगतो. मात्र तेही पाणी ‌मिळत नसल्याने त्यांची कुचंबना होत आहे.

पंचवटी एक्स्प्रेस व गोदावरी एक्स्प्रेसमध्ये पाणी नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून पाण्याची व्यवस्था करावी

- देवीदास पंडित, रेल्वे प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉडर्न शाळेबाहेर विद्यार्थ्यांमध्ये फ्रीस्टाईल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

इयत्ता दहावीचा पेपर आटोपल्यानंतर मंगळवारी (२२ मार्च) मॉडर्न शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. या घटनेमुळे मोठा जमाव शाळेच्या परिसरात जमा झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एका संशयिताला ताब्यात घेऊन अन्य जमाव पांगवला. या प्रकारणात चार विद्यार्थी जखमी झाले.

अशोकनगर भागातील मॉडर्न शाळेत दहावीचा मराठी व इंग्रजी माध्यमाचा पेपर दुपारी झाल्यानंतर विद्यार्थी बाहेर पडण्यास सुरुवात झाली. त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या दोन गटात फ्रीस्टाईल हाणामारी सुरू झाली. यावेळी पोलिसांसमवेत शाळेत तैनात असलेल्या होमगार्डला देखील काही जमावाकडून मारहाण झाला. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगविले. या प्रकारणात जखमी झालेल्या चार विद्यार्थ्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यात नौशाद खान, सलिम खान, सोहेल खान व माहिर खान (रा. अंबड लिंकरोड) यांचा समावेश आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी सलिम खान याला ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images