Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भूमितीच्या पेपरला १० कॉपीबहाद्दर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा मंडळाच्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत गुरुवारी भूमिती विषयाचा पेपर पार पडला. नाशिक विभागात १० कॉपीबहाद्दर पकडण्यात आले. त्यापैकी ७ जळगावमध्ये, तर धुळे जिल्ह्यात ३ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. बीजगणिताच्या पेपरमधील प्रश्नांमुळे काहीसा गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये झाला होता. त्यामुळे भूमितीच्या पेपरकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष होते.

बीजगणिताच्या ४० मार्कांच्या पेपरला प्रश्नपत्रिकेतील चौथ्या व पाचव्या प्रश्नाबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ झाला होता. हे दोन्ही प्रश्न १० मार्कांसाठी विचारण्यात आले होते. मात्र हे प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. पालकांमध्येही याबाबत मंडळाने लक्ष घालून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या गोंधळाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार आली नसल्याचे बोर्डातर्फे सांगण्यात आले आहे. तर गणिताच्या काही शिक्षकांच्या मते, अभ्यासक्रमावर आधारितच हे प्रश्न होते. केवळ पुस्तकात दिल्याप्रमाणे हे प्रश्न नव्हते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोडविता आले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

--

अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न आले अशी कोणतीही तक्रार अद्याप आमच्याकडे आलेली नाही. असा काही घोळ झाला आहे, असे कानावरही आलेले नसल्याने त्यात तथ्य वाटत नाही.

राजेंद्र मारवाडी

बोर्डाचे विभागीय सचिव

--

बीजगणिताचे पेपरची शहानिशा करण्यासाठी गणिताच्या शिक्षकांना आम्ही सांगितले आहे. त्यांचा रिपोर्ट लवकरच आम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार खरेच पेपरमध्ये त्रुटी आढळल्यास बोर्डाला आम्ही निवेदन देऊ. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील. - नरेंद्र ठाकरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद समिती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातवा वेतन आयोग देता, मग हमीभाव का नाही?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकीकडे नोकरदारांना न मागता सातवा वेतन आयोग मिळतो. दुसरीकडे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मात्र शेतकऱ्यांना मिळत नाहीत. तरीही मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याबद्दल मला अपेक्षा आहेत, ते काहीतरी चांगले निर्णय घेतील. कारण येथे जाहीर बोलल्यानंतर तरी ते काही निर्णय घेतील, असे वाटत असल्याचे प्रतिपादन अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित 'गोदावरी गौरव सन्मान २०१६' सोहळ्यात पुरस्काराला उत्तर देताना नाना पाटेकर बोलत होते. चित्रपट क्षेत्रात पुरस्कार मिळविलेले नाना पाटेकर म्हणाले, की आज काळ मोठा कठीण आलेला आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. अशा वेळेत आपण शेतकऱ्यांचा विचार करायला हवा. चळवळ अंतिम माणसापर्यंत पोहोचली म्हणजे तिचे चीज झाले असे वाटते. सरकारच्या भरवंशावर बसू नका, ते आज आहे उद्या नाही. सरकारी माणसाशी नाते जोडण्याची ही वेळ आहे कारण तो कायम असल्याचेही नाना म्हणाले.

प्रत्येक गोष्ट सातबाऱ्यावर कशाला असावी, माझ्या सातबाऱ्यावर माणसे आहेत असे सांगतानाच नानांनी राजकीय पक्षावर चांगलेच आसूड ओढले. ते म्हणाले की, पक्ष बदलणाऱ्यांची मला मोठी गंमत वाटते. तेथे पदे मिळत नाहीत म्हणून ते दुसऱ्या पक्षात येतात. या पक्षात आल्यावरही ते तसेच वागणार नाही हे कशावरून? त्यामुळे ज्याने पक्ष सोडला त्याला पाच वर्षे दुसऱ्या पक्षात प्रवेश करता येणार नाही अशी बंदी कायद्याने करायला हवी, असेही नाना म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नोटां’साठी स‌क्यिुरिटी प्रेस रडवतयं महापालिकेला!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाच कोटीच्या घरपट्टी करावरून महापालिका आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस यांच्यात थेट नोटीस युद्ध रंगले आहे. २००८ पासून थकलेली पाच कोटीची घरपट्टी भरण्यासाठी पालिकेने इंड‌यिा सिक्युरिटी प्रेसला नोटीस पाठवली. परंतू या नोटीसाला प्रेसनेही जशास तसे उत्तर देत प्रेसची मालमत्ता ही केंद्राची असून, घरपट्टी देणार नसल्याचा खुलासा सिक्युरिटी प्रेसने केला आहे. त्या खुलाशाला पालिकेने पुन्हा आव्हान दिले असून, 'केंद्राची मालमत्ता आहे तर, मग पुरावे सादर करा' असे फर्मान काढल्याने या दोन संस्थामधील चेकमेटचा सामना चांगला रंगला आहे.

महापालिकेने आता उत्पन्न वाढीसाठी बड्या थकबाकीदारांच्या वसुलीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. बड्या थकबाकीदारांना नोटीसा काढून वसुली मोहीम तीव्र केली आहे. अनेक थकबाकीदारांची मालमत्ता जप्त केली असली तरी, अनेक बड्या थकबाकीदार संस्था अजूनही पालिकेला जुमानत नसल्याचे चित्र आहे. १ नोव्हेंबर २००८ ते मार्च २०१६ पर्यंत इंडिया सिक्युरिटी प्रेसने महापालिकेकडे घरपट्टी कर जमा केलेला नाही. त्यामुळे थकबाकीची ही रक्कम पाच कोटींपर्यंत पोहचल्याने महापालिकेने सिक्युरिटी प्रेसला नोटीस बजावली होती. परंतू सिक्युरिटी प्रेसने या नोट‌सिीला केराची टोपली दाखवली होती.

चालू वर्षी महापालिकेने पुन्हा प्रेसला थकबाकीची नोटीस काढली होती. त्याला प्रेसनेही जशास तसे उत्तर देत, ही केंद्राची मालमत्ता असून त्याला घरपट्टी लागू होत नसल्याचा दावा केला. सोबतच 'घरपट्टी नव्हे; तर युजर्स चार्ज घ्या' असा सल्ला पालिकेला दिला. त्यामुळे पालिकेने पुन्हा प्रेसला आव्हान देण्याची तयारी सुरू केली असून, 'केंद्राची मालमत्ता आहे तर, त्याचे पुरावे सादर करा' असे फर्मान सोडणार आहे. त्यामुळे या दोन संस्थामधील वाद चिघळणार आहे.

लक्ष पूर्ण; पण उद्दिष्टाचे काय ?

महापालिकेने चालू वर्षी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट १३२ कोटी रुपये ठेवले आहे. त्यापैकी १० मार्चपर्यंत ७५ कोटी ३४ लाख रुपयांची वसुली झाली आहे. गेल्या वर्षी मार्चपर्यंत ७५ कोटी १९ लाखपर्यंत वसुली केली होती. त्यात या वर्षी सुधारणा झाली असून, गेल्या वर्षीचे उद्दिष्ट २१ दिवस आधीच पूर्ण केले आहे. तर उर्वरीत दिवसांमध्ये जवळपास दहा कोटी वसूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही वसुली ८५ कोटीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षाचे लक्ष पूर्ण झाले तरी, चालू वर्षाचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निमित्त ८ मार्च...

$
0
0

प्रा. डॉ. विवेक खरे

जागतिक महिला दिन म्हणून ८ मार्च हा दिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात जगभर साजरा झाला. महिलांना केंद्रभागी ठेऊन वेगवेगळ्या सभा-समारंभांचे आणि कार्यक्रमाचे आयोजन आपल्याकडे या निमित्ताने करण्यात आले. महिला दिन साजरा करण्यामागे एक मोठा संघर्षमय इतिहास आहे तो या दिनाच्या निमित्ताने आपणाला वर्तमानपत्रे वा इतर माध्यमांद्वारे ठाऊक होतोच. ८ मार्च १९०८ पासून हा दिवस जगभरात साजरा केला जातोय. भारतात १९४३ सालापासून महिला दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. भारतातील औद्योगिक तसेच आर्थिक क्रांतीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत त्याची सुरुवात झाली ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाचीच बाब म्हटली पाहिजे. कारण महाराष्ट्राला महिला मुक्तीच्या चळवळीचा एक इतिहास आहे. १९७५ हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने (युनोने) महिला वर्ष म्हणून साजरे केले त्या निमित्त जगातील सर्व स्त्रियांच्या तत्कालीन परिस्थितीचा लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न केला गेला. महिला किंवा स्त्रिया त्या मग कोणत्याही देशाच्या असोत त्यांचे म्हणून काही प्रश्न जगाच्या समोर या निमित्ताने येण्यास मदतच झाली. स्त्रियांच्या या वेगवेगळ्या प्रश्नांतून, त्या त्या काळातील त्यांच्या अभ्यासातून, त्यातून मार्ग काढण्याच्या संघर्षातून आज आपल्यापुढे एक प्रगत, स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकलेली स्त्री उभी राहते. अर्थात आजही जगभरातील स्त्रियांचे प्रश्न पूर्णपणे संपले आहेत असे म्हणता येण्यासारखी स्थिती मात्र नाही.

भारतीय परिप्रेक्ष्यातून विचार करता येथील स्त्रीला आजही असंख्य समस्यांना व अडचणींना सामोरे जावे लागते आहे. धार्मिक तसेच सामाजिकदृष्ट्या तिला आजही दुय्यम ठरविले जात असल्याचे चित्र आपणास बघावयास मिळते आहे. याचे अलिकडचे ताजे उदाहरण म्हणजे देवळाच्या गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांचा सुरू असलेला संघर्ष. भूमाता ब्रिगेड या संघटनेने आधी शनिशिंगणापूर आणि आता त्र्यंबकेश्वर येथे अशा प्रकारचा लढा उभा केला. या पार्श्वभूमीवर मुस्लिम स्त्रियांनीसुद्धा आपल्यालाही दर्ग्याच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळावा यासाठी लढा उभा केला. ही खरेतर या सर्व स्त्रियांची आत्मसन्मानाची लढाई आहे. भारतीय राज्यघटनेने समस्त स्त्री-पुरुषांना समान हक्क आणि अधिकार दिले आहेत. असे असतांनाही पुरुषांना एक न्याय आणि स्त्रियांना दुसरा हे खचितच न पटण्यासारखे आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन आपल्या जीवनाचे सार्थक मुळीच होणार नाही हे या आंदोलनकर्त्या स्त्रियांना देखील माहित आहे. पण ही त्यांची आत्मसन्मानाची एक प्रतिकात्मक लढाई आहे. या लढाईला प्रखर विरोध करणाऱ्यासुद्धा स्त्रियाच आहेत याचेही आश्चर्य वाटते. समस्त स्त्रियांच्या हक्क आणि अधिकारासाठी लढणाऱ्या स्त्रियांना स्त्रियाच आडकाठी आणीत आहेत ही गोष्टच विचित्र आहे. मंत्रिपदी विराजमान झालेली पंकजा मुंढे यांच्यासारखी एखादी स्त्री असो वा धर्माच्या कामात महिलांनी लुडबुड करू नये असे म्हणून आंदोलनास विरोध करणाऱ्या इतर अनेक स्त्रिया असो धार्मिक रूढी परंपरांचा किती जबरदस्त प्रभाव त्यांच्यावर आहे हेही या निमित्ताने प्रकर्षाने जाणवते. या सर्व घडामोडींमधून दिसते ती स्त्रियांची गुलामीची मानसिकता. स्त्री गुलामीची पुरुषी मानसिकता आणि अशा स्त्रियांची मानसिकता या एकाच प्रकारच्या असल्याचे दिसते. गाभारा प्रवेशाच्या आंदोलनातून हे वास्तव अधिक अधोरेखित झाले आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने भारतातील महिला चळवळीतील अंतर्विरोधाचीही आज चिकित्सा होणे गरजेचे आहे. भारतात महिलांचे शोषण, त्यांची होणारी कुचंबणा, त्यांना भोगाव्या लागणाऱ्या व्यथा-वेदना, बलात्कार, लैंगिक शोषण, घरगुती हिंसाचार, कुपोषण, हुंडा बळी, अपहरण, स्त्रीभ्रूणहत्या, ऑनर किलिंग अशा अनेक विषय आज गंभीर रूप धारण करून समाजासमोर उभे आहेत. आपण नेहमीच या विषयांवर उच्चरवाने बोलतोही. मात्र हे प्रश्न आणि समस्या मुळापासून कमी करण्यासाठी मुलभूत प्रयत्न होतांना दिसत नाहीत. धार्मिक पगडा, अंधश्रद्धा. रूढी परंपरा यांच्या वाहक असणाऱ्या स्त्रिया यामधूनच शोषणाच्या बळी ठरतात हे वास्तव आहे. स्त्रीवाद, स्त्रीवादी चळवळी यांत काम करणाऱ्या स्त्रियाही या प्रथा परंपरांमधून पूर्णपणे बाहेर पडलेल्या दिसत नाहीत. उच्चशिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक-प्राध्यापक झालेल्या स्त्रिया आजही धार्मिक गुलामगिरीच्या जोखडात अडकलेल्या आहेत. १९ व्या शतकात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शूद्रातिशूद्र म्हणून गणल्या जाणाऱ्या स्त्रियांच्या अवनतीचे कारण शोधून त्यांना शिक्षित करण्यासाठी आपले अवघे आयुष्य पणाला लावले. शिक्षणाने स्त्रियांचा कायमचा जाच संपेल, अशी त्यांची त्यामागील भावना होती.

स्त्रियांशी संबंधित तत्कालीन समाजातील अनिष्ठ अशा सतीप्रथा, बाला जरठ कुमारी विवाह, विधवांचे केशवपन, परितक्त्या, कुमारी मातांचा प्रश्न या सर्वच प्रश्नांवरील त्याचे कार्य दिशादर्शक ठरणारे होते. या पुढील काळात शाहू महाराज यांनी तर स्त्रियांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा कायदाच केला. 'हिंदू कोडबिलाच्या' माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त भारतीय स्त्रियांना कायद्याचे कवच देऊ करण्याचा प्रयत्न केला. पण या सर्वच समाजसुधारकांच्या कार्यापासून आजच्या आधुनिक म्हणविणाऱ्या स्त्रीने आपली नाळ तोडून घेतल्याचे चित्र दिसते आहे. आपल्या महिला मुक्तीची मुळे पाश्चात्य विचारांत आणि आंदोलनात शोधणाऱ्या भारतातील सर्वच स्त्रियांनी याचा गंभीरपणे विचार करायला हवा. जाती पातीच्या, धर्म रुढींच्या जाचक बंधनातून जोवर भारतीय स्त्री मुक्त होणार नाही तोवर महिला दिन साजरा करून काहीही हाती लागणार नाही.

स्त्रीवादी चळवळीतून निर्माण झालेले स्त्रीवादी साहित्य आज कोणत्या स्त्रियांचे प्रश्न मांडीत आहे हा देखील विचार या महिला दिनाच्या अनुषंगाने करण्यासारखा आहे. शहरात राहणाऱ्या, सुशिक्षित, आधुनिक म्हणविणाऱ्या तथाकथित स्त्रिया खरेच आपल्या लेखनातून भारतातील एकूण स्त्रियांचे प्रश्न मांडीत आहेत का? त्यांची दु:खे आणि गावखेड्यातील स्त्रियांची दु:खे यात काही समान धागा आहे का? असेल तर तो त्यांच्या लेखनाचा विषय का होत नाही? दलित, आदिवासी, कष्टकरी, श्रमजीवी स्त्रियांचे प्रश्न आजच्या स्त्रीवादी लेखिका हिरीरीने कधी मांडतील का? असे असंख्य प्रश्न स्त्रीवादी चळवळीत कार्य करणाऱ्या स्त्रियांनी स्वतःला विचारायला हवेत. महिला दिनाच्या निमित्ताने या प्रश्नांचीही चर्चा होणे गरजेचे आहे. भारतात आजही महिला मुक्तीच्या विषयावर कुत्सितपणे बोलले जाते. तथाकथित पुरुषी मानसिकता कवटाळून व्यवहार करणारे विचारवंत, साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मिळविणारे लेखक, उच्चवर्गीय राजकारणी हे सर्व घटक महिला मुक्तीच्या विरोधात आहेत. महिला मुक्ती हा त्यांच्यासाठी टिंगलटवाळीचा विषय असतो. म्हणून तर आजही महिला आरक्षण विधेयक संमत होत नाही. शिक्षण, समाजकारण, राजकारण या सर्वच क्षेत्रात महिलांची आज कुचंबणा होते आहे. भारतातल्या सर्वच महिला एकत्र आल्याशिवाय हे शक्य होण्यासारखे नाही. महिला दिनाच्या दिवशी फक्त एकत्र येऊन, आपले शक्तिप्रदर्शन घडवून हे होणे नाही. महिला मुक्तीसाठी महिलांची संघटीत शक्ती आणि कार्य उभे राहणे महत्त्वाचे आहे. तरच खऱ्या अर्थाने महिला दिन यशस्वी होईल असे वाटते..

(लेखक एसएमआरके कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संग्रहालयाचा पहिला टप्पा ऑक्टोबरपर्यंत होणार पूर्ण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आणि जीव्हीके कंपनीच्या वतीने प्रस्तावित शिवसेना प्रमख स्व. बाळासाहेब ठाकरे इतिहास संग्रहालयाचा पहिला टप्पा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. जीव्हीके कंपनी सीएसआरमधून या संग्रहालयाचे काम पूर्ण करणार असल्याने ठाकरेंनी शुक्रवारी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सोबत संग्रहालयाची पाहणीदरम्यान सांगितले. बाबासाहेब पुरंदरेनी प्रत्यक्षात आर्किटेक्ट व कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करीत संग्रहालयाचे निरिक्षण केले.

महापालिकेच्या वतीने नाशिकमध्ये स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचे इतिहास संग्रहालय उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. या संग्रहालयाच्या उभारणीचे काम स्वतः शिवशाहीर पुरंदरेंच्या देखरेखी खाली होत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार केला जात आहे. शुक्रवारी या संग्रहालयाच्या कामाला गती देण्यासाठी ठाकरेंसोबत पुरंदरेंनी नाशिक गाठले. यावेळी ठाकरे आणि शिवशाहीर पुरंदरे यांनी जीव्हीके कंपनीचे अधिकारी व आर्किटेक्ट यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर प्रत्यक्षात संग्रहालयाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे नाशिकचे संपर्क प्रमुख अविनाश अभ्यंकर, महापौर अशोक मुर्तडक, मनसे नेते डॉ. प्रदीप पवार, शहर अभियंता सुनील खुने, मनसे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगी असलेली कला जोपासणे महत्त्वाचेे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सत्ता व संपत्ती एकत्र आली की स्थैर्य येते आणि दीर्घकाळ स्थैर्य आले की कला येते. कला बैराग्याच्या दारातही येते आणि सामर्थ्यवानाच्या दारातही येते. ती कशी जोपासली जाते हे महत्त्वाचे असते. प्रशांत हिरे यांनी प्रवासादरम्यान फोटोग्राफीचा छंद जोपासला, तो वाढवावा, टिकवावा असे प्रेमळ आवाहन वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी केले.

समाजश्री प्रशांतदादा हिरे चित्रकला महाविद्यालय, मालेगाव कॅम्प येथील विद्यार्थ्यांनी चितारलेल्या चित्रांचे तसेच प्रशांत हिरे यांनी दैनंदिन आयुष्यातील प्रवासादरम्यान काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन शुक्रवारपासून कुसुमाग्रज स्मारकातील छंदोमयी सभागृहात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून पाटील बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, सत्तेसोबत छंद असला म्हणजे जगणे सुसह्य होते. चरितार्थाच्या साधनाशिवाय एखादा छंद जोपासला तर जगणे सुकर होत जाते. जगण्याला एक बहाणा लागतो. हिरे घराण्याला गाण्याच्या, शिक्षणाच्या, फोटोग्राफीच्या रूपातून हा बहाणा मिळाला आहे. परमेश्वराचा वरदहस्त हिरे कुटुंबीयाला लाभलेला आहे. त्यामुळे त्यांनी ही सौंदर्यदृष्टी डोळसपणाने अनुभवावी!

यावेळी 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे म्हणाले की, राजकारणाच्या धबडग्यातही प्रशांतदादांनी अध्यात्म व धर्माचा अभ्यास केला, त्यातून त्यांना ऊर्जा मिळते आहे. त्या ऊर्जेचा परिपाक म्हणून फोटोग्राफीचा हा छंद त्यांनी जोपासला आहे. त्यांनी स्वत: याचा आनंद घ्यावा व इतरांनाही तो द्यावा. सकाळचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांनीही छोटेखानी भाषण केले.

यावेळी सत्कार प्रशांत हिरे यांच्या हस्ते मान्यवरांचा करण्यात आला. प्राचार्या उज्ज्वला देवरे कार्यक्रमाचे प्रास्ताविक यांनी केले. प्रा. मीनाक्षी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत हिरे यांनी आभार मानले. हे प्रदर्शन सोमवार १४ मार्चपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवसैनिकांचा भर कृतीवरच’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

शिवसेना कार्यकर्ते केवळ बडबड करीत नाहीत, तर प्रत्यक्ष कृती करतात. म्हणजेच शिवसैनिक आधी करून दाखवतात आणि मग बोलतात. नाशिकमधील शिवसैनिकांच्या कामाचा धडाका पाहता याची प्रचिती येते, असे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

जेलरोड येथील प्रभाग ३२ मध्ये केंद्र सरकारच्या योजनेतंर्गत पावणे सात कोटींचे क्रीडासंकुल उभारले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन केल्यानंतर आदित्य ठाकरे बोलत होते. नगरसेवक शैलेश ढगे यांनी ठाकरेंचा सत्कार केला. खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, जयंत दिंडे, विनायक पांडे, सुधाकर बडगुजर, देवानंद बिरारी, नगरसेवक सूर्यकांत लवटे, संपत आढाव, मंगला आढाव, महिला आघाडीच्या सत्यभामा गाडेकर, बाबूराव आढाव आदी उपस्थित होते.

रस्ता कामाला प्रारंभ

सकाळी द्वारका ते दत्त मंदिर महामार्गाच्या साडेपाच कोटीच्या डांबरीकरणाच्या कामाचा प्रारंभ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला. खासदार हेमंत गोडसे यांनी या कामासाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर नितीन चिडे, सुनील देवकर, शिवाजी भोर, दिनकर आढाव, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्ष प्रक्रिया उद्योगात हवेत आमूलाग्र बदल

$
0
0

bhavesh.brahmankar

@timesgroup.com

नाशिक : भारतीय द्राक्ष प्रक्रिया उद्योगात अफाट क्षमता आहे. भारतीय द्राक्षे, वाईन आणि बेदाणे यांनी जागितक बाजारपेठेत दबदबा निर्माण करण्यासाठी त्यात अामूलाग्र बदल आवश्यक आहे, असे मत इंटरनॅशन ऑर्गनायझेशन ऑफ वाइन अॅण्ड व्हाईन (ओआयव्ही)चे महासंचालक जीन मारी ओरांड यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केले. ओरांड यांनी शुक्रवारी नाशिकला भेट देवून द्राक्ष प्रक्रिया उद्योगाची माहिती घेतली.

जगभरात द्राक्ष प्रक्रिया उद्योग हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेकानेक संधी निर्माण झाल्या आहेत. मात्र, आजही निवडक देशांमधील द्राक्ष प्रक्रिया उद्योगाचाच बोलबाला आहे. अनेक देशांमध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादने असली तरी जागतिक बाजारपेठेत पोहचत नाहीत. भारतीय द्राक्ष प्रक्रिया उद्योगात प्रचंड क्षमता आहे. खासकरून द्राक्षे, भारतीय वाइन, बेदाणे यांचे उत्कृष्ट उत्पादन, त्याचे मार्केटिंग, वाहतूक आणि प्रत्यक्ष विक्री या साऱ्या प्रक्रियेत अमुलाग्र बदल आणण्याची गरज आहे. भारत सरकारही त्यासाठी सकारात्मक प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. कृषी, कृषी प्रक्रिया, व्यापार, परराष्ट्र अशा विविध मंत्रालयातील सचिवांसह फुड स्टँडर्ड अथॉरिटीचे अध्यक्ष या सर्वांशी चर्चा केल्यानंतर भारतातील विविध प्रयत्न दिसून येत आहेत. जागतिक बाजारपेठ भारताला खुणावत असून, त्यादृष्टीने सर्वंकष नियोजनाची गरज ओरांड यांनी व्यक्त केली. पुण्यातील द्राक्ष प्रक्रिया संशोधन संस्थेनंतर ओरांड यांनी शुक्रवारी सुला वायनरीला भेट दिली. याप्रसंगी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे आकाश गुप्ता, भारतीय वाइन उत्पादक संघटनेचे माजी अध्यक्ष जगदीश होळकर, विद्यमान अध्यक्ष यतीन पाटील, सुलाचे निरज अग्रवाल, मनोज जगताप आदी उपस्थित होते.


चीनमध्ये होतेय प्रदूषण

जगभरात ओआयव्हीचे ४६ सभासद असून, या सर्व देशांमधील द्राक्ष प्रक्रिया उद्योगाची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. चीननेही सभासदत्व स्वीकारणे आवश्यक आहे. चीनमध्ये द्राक्ष प्रक्रिया उद्योगातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचवटीत शिक्षिकेचा निर्घृण खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील कृष्णनगर येथे राहणाऱ्या ५५ वर्षीय शिक्षिकेचा निर्घृण खून करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. खुनाचे नेमके कारण समोर आले नसून, गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

भारती भास्कर पाटील (वय ५५) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. कृष्णनगर येथील आधारशीला हॉस्पिटल शेजारी असलेल्या सप्तशृंगी अपार्टमेटच्या फ्लॅट क्रमांक आठमध्ये मृत शिक्षका राहत होत्या. वडाळा गावात एका खासगी शिक्षण संस्थेत उपमुख्याध्यापिका म्हणून काम पाहणाऱ्या पाटील यांचे पती भास्कर पाटील हे जळगाव येथे जिल्हा उद्योग केंद्रात काम करतात. तर, त्यांचा मुलगा मुंबई येथे कंपनीत कामाला आहे. त्यामुळे पाटील या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. मृत भारती पाटील यांच्याकडे घरकाम करणारी महिला शुक्रवारी दुपारी पाटील यांच्याकडे आली असता तिला घराचे दार उघडे दिसले. तिने घरात प्रवेश केला असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पाटील दिसल्या. सदर महिलेने ही माहिती आजूबाजूच्या रहिवाशांना कळवली. घटनास्थळी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलिस उपायुक्त एन. अंबिका, श्रीकांत धिवरे, सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, सचिन गोरे, क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक सदानंद इनामदार, पंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश सपकाळे आदींनी पाहणी केली. घरात चोरीचा प्रयत्न झालेला नाही. पाटील यांचे दागिने अंगावरच असून या खुनाचे कारण काय असावे, याबाबत पोलिस संभ्रमात आहेत. सिंधूबाई चव्हाण या वृध्द महिलेच्या खुनात पोलिसांना अद्यापपर्यंत ठोस तपास करता आलेला नाही.

डोक्यात झालेले वार पाहता हा खून असल्याचा आमचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा नाही. खुनाची घटना गुरुवारी रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यानची असावी.

- एस जगन्नाथन, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रूपी मंत्राकडून दीड कोटीला चुना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेअर मार्केट संबंधी काम करणाऱ्या रूपी मंत्रा फायनान्सशियल कन्स्लटन्सी प्रा. लिमेटड या कंपनीने शहरातील ३० पेक्षा अधिक गुंतवणूकदारांना दीड कोटी रुपयांना चुना लावल्याची बाब समोर आली आहे. औरंगाबाद पोलिसांनी दाखल केलेल्या या गुन्ह्याचा अधिक तपास इंदिरानगर पोलिस करणार आहेत.

इंदिरानगर परिसरातील चेतनानगर येथे राहणाऱ्या दीपक पंडित (वय ३९) यांनी या प्रकरणी औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. स्क्रीन प्रिटिंगचा व्यवसाय करणाऱ्या पंडित यांची २०१० औरंगाबाद शहरातील अभिजीत खिंडरे यांच्याशी ओळख झाली. नातेवाईक असलेल्या पंडित आणि खिंडरे यांची ओळख पंडित यांच्या चुलत भावाने करून दिली. खिंडरे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. आपण पैसे गुंतवल्यानंतर त्याचा महिन्याकाठी परतावा दिला जातो, याचा विश्वास बसल्यानंतर पंडित यांनी खिंडरेकडे पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. साधारणतः वर्षभर पाच हजार रुपये महिन्यानुसार पंडित यांना पैसे मिळाले. मात्र खिंडरे यांनी त्यांना आणखी गुंतवणूकदार शोधण्यास प्रोत्साहीत केले. सन २०१० ते २०१५ या काळात खिंडरेने पंडित यांच्याकडून तब्बल २० लाख रुपये उकळले. पंडित यांच्याप्रमाणे शहरातील ३० पेक्षा अधिक गुंतवणूकदारांनी पंडितच्या संस्थेत दीड कोटी रुपये जमा केले. हळूहळू संशयित आरोपी खिंडरेने व्याजाची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. यासाठी वेगवेगळे कारणे पुढे करीत असत. मे २०१५ मध्ये त्याने पंडित यांच्याशी नाशिक येथे येऊन संपर्क साधला. मला हा व्यवसाय पुढे सुरू ठेवायचा नाही. मी तुम्हाला २० लाख रुपयांचा चेक देतो, असे सांगितले. पंडित यांनी चेक स्वीकारला. मात्र, खात्यात पैसे नसल्याने तो परत आला. यानंतर, पंडित यांच्यासह इतर गुंतवणूकदारांनी ​औरंगाबाद येथे पोहचून याबाबत संशयित आरोपीस जाब विचारला. मात्र, त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. या दरम्यान फिर्यादीने इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना औरंगाबादला जाण्यास सांगण्यात आले. त्यानुसार, फिर्यादी व साक्षीदार यांनी औरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्त अमितकुमार यांना भेटून हकीगत सांगितले. त्यांच्या आदेशानुसार उस्मानपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, तो अधिक तपासासाठी इंदिरानगर पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात येणार आहे.


गुंतवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता

खिंडरेने नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर तसेच पुणे शहरातील शेकडो गुंतवणूकदारांकडून पैसे उकळले असून, फसवणुकीचा आकडा वाढू शकतो. नाशिकमधून कोट्यवधीची फसवणूक झाली आहे. इतर शहरातील फसवणुकीचा आकडा बाहेर आल्यावर या प्रकरणाची व्याप्ती वाढू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे लढणार दहा महापालिका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पुढील वर्षी होणाऱ्या राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका मनसे लढणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मनसेच्या प्रचारासाठी आपण स्वतः एप्रिलपासून राज्यभरात दौरे करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी नाशिकच्या दौऱ्यावर आले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली. त्यानंतर राज यांनी महापालिका निवडणुकांसदर्भातील पक्षाची भूमिका जाहीर केली. पुढील वर्षी नाशिकसह, मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड अशा राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका आहेत. या सर्व निवडणुका मनसे लढणार असल्याचे ठाकरे यांनीनी सांगितले. या निवडणुकांसाठी मनसेतर्फे तयारी सुरू असून, गटनिहाय मेळावे घेतले जात आहेत. आतापर्यंत पक्षातर्फे मुंबई व ठाण्यात मेळावे पार पडले आहेत. राज्यातील अन्य शहरामंध्येही मेळाव्यांना सुरुवात होणार आहे. महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी आपण स्वतः एप्रिलपासून राज्याचा दौरा करणार आहोत. सर्वच्या सर्व निवडणुका लढवून पक्षाची ताकद वाढविण्याचा विश्वास राज यांनी व्यक्त केला.

पाडवा मेळाव्यातच बोलणार!

मुंबईतल्या रिक्षा जाळण्याच्या वक्तव्यावरून राज यांच्यावर विरोधी पक्ष टीका करीत आहेत. याबाबत राज यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. आता आपण जे काही बोलू ते मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातच, असे ते म्हणाले. नाशिकमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भव्य शस्रसंग्रहालय उभारण्यात येत असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन रिक्षा आल्यावर आंदोलन होणारच!- राज

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

रिक्षांना आग लावणं हा काही पक्षाचा कार्यक्रम नाही, तर तो आमचा राग आहे. मराठी मुलांना परवाने मिळायला हवेत, ही भूमिका आम्ही याआधीही मांडली आहे आणि ती यापुढेही कायम राहील. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्याचा विषयच नाही. मी नरमलेलो नाही, घाबरलेलो नाही. फक्त आत्ता समाजकंटकांनी गैरफायदा घेऊ नये म्हणून नवीन रिक्षा येईपर्यंत थांबण्याचा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे, अशी भूमिका आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केली.

मराठी मुला-मुलींना रोजगार मिळत नसताना, परप्रांतीयांना रिक्षाचे परवाने दिले जात असतील तर आम्ही काय त्यांच्या रिक्षा धुवून त्यांना गुलाबाचं फुल द्यायचं का?, असा सवालही त्यांनी केला.

बुधवारी, ९ मार्चला मनसेच्या वर्धापनदिन सोहळ्यात राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नव्या रिक्षा जाळून टाकण्याचा चिथावणीखोर आदेश दिला होता. परप्रांतीयांना परवान्यांची खिरापत वाटली जात असून मराठी तरुणांवर अन्याय होत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला होता. हे आंदोलन चिघळण्याची चिन्हं दिसत असतानाच, राज यांनी काल आंदोलन स्थगितीची घोषणा केली होती. परंतु, या स्थगितीचा अर्थ आपण नरमलो असा नसल्याचं राज यांनी आज नाशिकमधील पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात सगळ्यातआधी मराठी मुलांनाच रिक्षाचे परवाने मिळायला हवेत, ही मनसेची पहिल्यापासूनची भूमिका आहे. त्यांना न्याय मिळायलाच हवा. बाकीच्यांचा ठेका आम्ही का घ्यायचा? म्हणून, नवीन रिक्षा आल्यावर आंदोलन करण्याचा आदेश मी दिला होता. काल फक्त जुन्या रिक्षा जाळू नका एवढंच मी सांगितलंय. याचा अर्थ मी घाबरलो किंवा नरमलो असा होत नाही. नवीन रिक्षा येतील, तेव्हा मराठी मुलांच्या न्याय्य हक्कासाठी मनसे आंदोलन करेल, असं राज यांनी ठणकावून सांगितलं.

रिक्षावाल्यांना संरक्षण देण्याची भाषा करणारे मुख्यमंत्री परप्रांतीयांना संरक्षण देणार का?, असा खोचक सवाल करत राज म्हणाले की, या परवान्यांच्या माध्यमातून परप्रांतीयांचे लोंढे अनधिकृतपणे आपली शहरं बळकावत आहेत. राज्याला विद्रुप करत आहेत. मराठी माणसाचं पोट भरलं की तुम्ही घ्या, एवढंच माझं म्हणणं आहे. पण मूळ विषय बाजूला ठेवून, रिक्षांना आग लावा एवढंच डोळ्यापुढे कशाला ठेवायचं? मराठी माणसाचा विषय आपणच मांडला पाहिजे, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांकडून मला अपेक्षाच नाही, असा टोमणाही त्यांनी मारला.

आरटीओची अख्खी खोली पैशाने भरलीय!

रिक्षा परवान्यांबद्दल मी जे बोलतोय, ती 'मन की बात' नाही. आरटीओच्या लोकांनी जी माहिती दिली आहे, त्यावरूनच मी बोलतोय. परवान्यांचा काळाबाजार जोरात सुरू असून अंधेरी आरटीओमधील एक अख्खी खोली पैशांनी भरलेली असल्याचा दावा राज यांनी केला. आमच्या आंदोलनापुढे प्रश्नचिन्हं उभी करणारे लोक जे सर्रास चुकीचं वागताहेत त्यांच्याबद्दल काहीच बोलत नाहीत, असंही त्यांनी सुनावलं. माझा विषय बजाजशी नसून सरकारशी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारने बिल्डर लॉबीशी 'डील' केलं!- राज

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

बिल्डरांवर कुठलीही कारवाई न करता त्यांची अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे बिल्डर लॉबीशी केलेलं 'डील'च आहे, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला.

बिल्डरांनाच सगळ्या सवलती का आणि कशा दिल्या जाताहेत?, असा सवाल करत असल्या गोष्टींची सवय लावणं चुकीचं असल्याचं त्यांनी निक्षून सांगितलं.

राज्यातील अनेक लहान-मोठ्या शहरांतील ३१ डिसेंबर, २०१५ सालापर्यंतची बेकायदा बांधकामे काही अटींवर नि​यमित करण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. नवी मुंबईतील दिघा, पिंपरी चिंचवड, ना​शिक अशा अनेक शहरातील गरजू कुटुंबाना याचा होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. परंतु, सरकारच्या या निर्णयावर राज ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं. या सगळ्या गोष्टी ठरवून चालल्या आहेत आणि त्या बिल्डर लॉबीसाठीच केल्या जाताहेत, असा आरोप त्यांनी केला.

अनेक बिल्डरांनी सामान्य लोकांना फसवलंय. त्यांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार आहे. त्यांना दिलासा देणं गरजेचं आहेच, पण बिल्डरवर कुठलीच कारवाई न करता बांधकामं अधिकृत कशी होऊ शकतात? बिल्डर लॉबी भेटल्यावर हा निर्णय झालाय. त्यामुळे सरकारने बिल्डरांशी डील केलं असं मी म्हटलं तर काय चुकलं?, असे प्रश्न राज यांनी उपस्थित केले. कुठली बांधकामं अधिकृत करायची आणि कुठली करायची नाहीत, हे कोण आणि कसं ठरवणार?, अशी विचारणाही त्यांनी केली. ही बांधकामं अधिकृत झाली की बिल्डर पुन्हा अनधिकृत बांधकामं करायला मोकळे होतील, त्यामुळे असल्या गोष्टींची सवय लावू नका, असंही त्यांनी सरकारला बजावलं.

राज यांच्या प्रश्नांना आणि आरोपांना सरकार काय उत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलशुद्धीकरण’ दुरुस्त करा

$
0
0

जिल्हाधिकारी मिसाळ यांची सूचना; आजपासून शहरात शुद्ध पाणीपुरवठा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

बाभळे येथील महानगरपालिकेच्या तापी पाणीपुरवठा योजनेतील फिल्टर प्रकल्प ब्रिजच्या देखभाल दुरुस्तीचे काम गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित आहे. जनतेला शुद्ध पाणी देण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असून महानगरपालिका प्रशासनाने नगरोत्थान योजनेत प्रस्तावित केलेली अन्य कामे बाजुला ठेवून या योजनेच्या कामांना प्राधान्य द्यावे. कारण त्याचा थेट संबंध जनतेच्या जीवनमरणाशी आहे. याची जाणीव ठेवून सदर प्रलंबित काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ए. बी. मिसाळ यांनी दिल्या.


आजपासून शहरात शुद्ध पाणीपुरवठा होणार असल्याचेही विभागाकडून सांगण्यात आले आहे. शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथील महानगरपालिकेच्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रास शनिवारी जिल्हाधिकारी मिसाळ यांनी अचानक भेट दिली. त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना त्यांनी दिल्यात. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, महानगरपालिकेचे शाखा अभियंता पी. डी. चव्हाण, एन. के. बागुल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे उपअभियंता व्ही. के. सूर्यवंशी, शाखा अभियंता पी. बी. राठोड उपस्थित होते.

यावेळी संपूर्ण जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी मिसाळ यांनी चांगलेच धारेवर धरले. या योजनेचे दहा वर्षापूर्वी केवळ आठ ते दहा लाखात देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असते. मात्र दहा वर्ष उलटूनही हे काम प्रलंबित आहे. या देखभाल दुरुस्तीचा खर्च सुमारे चौदा लाख रुपये इतका आहे. नगरोत्थान योजनेतून या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी पंचवीस लाख रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे, असे सांगत त्यांनी महानगरपालिकेने तत्काळ या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा प्रशासनास सादर करावा, अशा सूचना केल्यात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे महापालिकेची करवसुली २२ कोटींवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेतर्फे मालमत्ता कराच्या शास्तीसाठी अभय योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मालमत्ता कराच्या वसुलीचा आलेख उंचावला आहे. मार्चअखेर पूर्वीच धुळे महापालिकेची तब्बल २२ कोटी रुपयांपेक्षा जास्त वसुली झाली आहे.
महापालिका हद्दीत ६५ ते ७० हजार मालमत्ता धारक आहेत. मालमत्ता कराच्या थकबाकीवर दरमहा २ टक्क्यांप्रमाणे शास्तीची आकारणी केली जाते. महासभेच्या शिफारसीनुसार प्रशासनाने शास्तीत माफी देण्यासाठी अभय योजना घोषित केली आहे. याची अंमलबजावणी १६ फेब्रुवारीपासून सुरू आहे. यात ५ मार्चपर्यंत एकरकमी कराचा भरणा केल्यास थकबाकीवर ५० टक्क्यापर्यंत सूट देण्यात आली. त्यात २० मार्चदरम्यान २५ टक्के सूट देण्यात येत आहे. मात्र यापुढे अशा प्रकारची योजना राबविण्यात येणार नसल्याचे सूत्रांनी कळविले आहे.
नागरिकांनी स्वत: मनपात येऊन कराचा भरणा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यास नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. मालमत्ता कर भरण्याची कार्यालयाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. ९ मार्चपर्यंत २२,०६,७३,००० रुपयांची वसुली झाली आहे. तर शास्तीतून २२,६१,४७,७६३ रुपयांचा भरणा झाला असल्याची माहिती मनपा सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरटीओ कार्यालयाचा महावितरणाचा दणका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ४ लाख रुपये वीज बिल थकल्याने विज वितरण कंपनीने कार्यालयातील वीज पुरवठा शुक्रवारी दुपारी खंड‌ित केला आहे. यामुळे परिवहन कार्यालयात वाहन परवानासह इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांची मोठी दमछाक झाली आहे. काहींना तर आरटीओ एजंटांनी माघारी घरी पाठविले, यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला .
दरम्यान आरटीओ कार्यालयाची एकूण चार लाख रुपयांची वीजबील थकबाकी आहे. ती वेळेवर न भरल्याने कार्यालयात विज पुरवठा खंड‌ित केला गेला आहे. अशा परिस्थितीत आरटीओ कार्यालयात असा भ्रमनिरास होत असल्यास नेमका काय उपयोग असल्याची प्रतिक्रिया यावेळी नागरिकांकडून देण्यात आली. विशेष म्हणजे या कार्यालयात शुक्रवारी कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता.

संबंधित अधिकाऱ्यांची पाठ

प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे येथील गेल्या सात ते आठ महिन्यांपासून वीज बील थक‌ित आहे. मात्र याकडे जबाबदार अधिकाऱ्यांनी पाठ फिरविली आहे. वीज वितरण कपंनीने वारंवार सुचना देऊनही वीज बील भरण्यात न आल्याने अखेर शुक्रवारी परिवहन कार्यालयातील वीज पुरवठा खंड‌ित करण्यात आला. आरटीओ कार्यालयाचे जवळपास ४ लाख ४३ हजार रुपये एवढे बील थकले आहे. तरीदेखील या विभागाने कोणतेही गांभीर्य घेतले नसल्याचे दिसून आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा रुग्णालयातील परिचारिका झाल्या हमाल

$
0
0

नूतन इमारतीत स्थलांतरावेळी प्रशासनाचा कामचुकारपणा उघड
म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा रुग्णालयातील विविध विभागांचे शहराबाहेरील नूतन इमारतीत स्थलांतर होत आहे. अशावेळी प्रशासनाच्या नियोजन शुन्य कारभाराचा फटका रुग्णालयातील परिचारिकांना बसत आहे. त्यांना या स्थलांतरात सामान उचलून नेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी परिचारिकांनी आंदोलन करीत प्रशासनावर आपला रोष व्यक्त केला.



जिल्हा रुग्णालयात सोमवारी सकाळी परिचारिका कामाला गेल्या असता हजेरीपत्रक असलेली खोली बंद होती. काही काळ उलटूनही कोणताही कर्मचारी त्या ठिकाणी आला नाही. यामुळे सुमारे दीडशे परिचारिकांनी नाराजी व्यक्त केली. सध्या जिल्हा रुग्णालय सुरत-नागपूर महामार्गालगत चक्करबर्डी परिसरातील नूतन इमारतीत दाखल होत आहे. त्यासाठी रुग्णालयातील विविध विभागांतील साहित्य नेण्याचे ओझे परिचारिकांवर लादण्यात आल्याने परिचारिका फेडरेशन आणि महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांनी याविरूद्ध रुग्णालयाच्या परिसरात आंदोलन पुकारले. त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात प्रशासनाविरूद्ध घोषणाबाजी करीत आंदोलन केले. यावेळी सुजाता चव्हाण, कल्पना कुंभार, साधना वसावे, पंकज अहिरराव, दीपक रासणे, प्रिती ढालवाले, अजीत वसावे उपस्थित होते.



वाहनव्यवस्था असूनही प्रशासनाची डोळेझाक

रुग्णालयाच्या नूतन इमारतीत स्थलांतराकरीता सरकारकडून सुमारे पंधरा लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. तरी देखील फक्त दोन वाहनांवरुन सामान नेण्यात येत आहे. दुसरीकडे नूतन इमारतीत हे सामान आणल्यानंतर ते आवारातच टाकून दिले जाते. उलट हा सामान परिचारिकांकडून रुग्णालयात नेण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे रुग्णालयात सफाई कर्मचारी व शिपाई असताना देखील परिचारिकांना हमालीचे काम करावे लागत आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडेखोरांची टोळी जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील आझादनगर पोलिस ठाण्यातील मध्यरात्री गस्तीवरील पथकाने मालेगाव येथील पाच दरोडेखोरांना पकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दरोड्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मात्र पोलिसांनी पकडलेल्या पाचपैकी एक जण पळून जाण्यास यशस्वी झाला होता. त्यालाही पकडण्यात पोलिस यंत्रणेला यश आले. या गुन्हेगारांकडून मिळालेल्या साहित्यावरुन त्यांचा दरोडा घालण्याचा इरादा असल्याचे स्पष्ट होत आहे, असेही पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.
या सर्व प्रकाराबाबत धुळे पालिस दलाकडून एक पत्रकार परिषद घेऊन यांचा खुलासा करण्यात आला. पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील यावेळी अधिक माहिती दिली. यात पोलिस उपअधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, रामकृष्ण सोनवणे व कर्मचारी शनिवारी मध्यरात्री गस्त घालत होते. त्यावेळी अग्रवाल नगर भागात दोन मोटार सायकलवर पाच व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याचे या पथकाला दिसले. त्यांना पाहून या पाचही जणांनी वडजाई रोड भागात पळ काढला. या गोष्टीचा पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तत्काळ यंत्रणा आखून वडजाईरोड परिसरात पहारा ठेवत शोध घेतला. त्यावेळी मुंबई-आग्रा महामार्गाच्या पुलाखालील बोगद्यात या पाचही संशयितांना पोलिसांनी पकडले.
त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे चोरीच्या दोन मोटार सायकल, चार मोबाईल, दोन सुरे, मुखवटे, मोटार स्क्रू-ड्रायव्हर, विविध मोबाइल कंपन्याचे सिमकार्ड आदी साहित्य हस्तगत करण्यात आले. यावरुन हे दरोडा टाकण्याच्या हेतूनेच आले असावेत असे स्पष्ट होते. याप्रकरणी आझानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात सरकार विरोधात घोषणाबाजी

‘शाश्वत पाण्यासाठी जलजागृती महत्त्वाची’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

अनियमीत पाऊस व विविध क्षेत्रात होणारा पाण्याचा वाढता वापर यामुळे पाणीटंचाईची समस्या वाढत आहे. या परिस्थितीवर मात करून शाश्वत पाण्यासाठी जलजागृती महत्त्वाची आहे, असे मत जिल्हाधिकारी ए. बी. मिसाळ यांनी बुधवारी जलजागृती सप्ताहाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, अपर जिल्हाधिकारी प्रकाश वायचळ, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, पाटबंधारे प्रकल्प अधीक्षक अभियंता अलका आहिरराव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रकाश सांगळे, वृक्षमित्र वसंतराव ठाकरे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी १० वाजता शहरातील शिवतीर्थ चौकातून जलदिंडींला जिल्हाधिकारी मिसाळ यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. ढोल, लेझीमच्या तालात जलदिंडी, चित्ररथाला शिवतीर्थापासून सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयात या दिंडीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी मिसाळ यांच्या हस्ते दहा नद्यांचे पाणी कलशात एकत्रित करुन या मंगलमय कलशाचे पुजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी 'जल प्रतिज्ञा' घेतली.

जिल्हाधिकारी मिसाळ पुढे म्हणाले, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून जलसमृद्धीकडे या ब्रिदवाक्याप्रमाणे जलजागृती होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. पाण्याची एकंदर उपलब्धता, पाणी वापराचे नियोजन, पाण्याचा गरजेपुरता वापर, शेतीसाठी सुक्ष्म सिंचनाचा वापर, जलस्त्रोत व धरणांच्या जलाशयाच्या ठिकाणी होणारे प्रदूषण, पायाभूत सुविधांचे रक्षण याबाबत जनमानसात जागृतीची आवश्यकता असल्याचेही ते यावेळी म्हणाले. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणेही तितकेच आवश्यक आहे. त्या अनुषंगाने १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सर्वांनी लोकसहभागातून जलसाक्षरतेसह जलजागृती करुन पाण्याचे महत्व जनतेला पटविण्याचे काम यशस्वीपणे पार पाडावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images