Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कारच्या धडकेत महिला ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्कार्पीओ कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री पाथर्डी फाटा परिसरात रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. सरूबाई एकनाथ सदगिर (५५) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पाथर्डी फाटा परिसरातील नरहरी नगर परिसरात राहणाऱ्या सदगीर या त्यांच्या मुलीच्या दुचाकीवरून येत असताना अंबिका हार्डवेअरसमोर त्यांच्या दुचाकीस पाठीमागून आलेल्या एमएच १५, बीडी ९४०० क्रमांकाच्या स्कॉर्पिओ कारने जोरदार धडक दिली. या धडकेत सरूबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांची मुलगी जखमी झाली असून तिच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

धावत्या रेल्वेतून पडून जखमी

धावत्या रेल्वेतून पडल्याने मधुकर उत्तम तांबे (५०) जखमी झाले. नाशिकरोड परिसरातील मोरेमळा, बालाजीनगरमध्ये राहणारे तांबे पंचवटी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळ येत असल्याने ते दरवाजाजवळ येऊन थांबले. मोरेवाडी रेल्वे गेटजवळ गाडीतील अन्य प्रवाशाचा धक्का लागल्याने ते खाली पडले. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. सुरुवातीस बिटको व तेथून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तांबे यांना हलवण्यात आले आहे.

उड्डाणपुलावर एकास ट्रकची धडक

चारचाकी वाहन पंक्चर झाले म्हणून उड्डाण पुलावर थांबलेल्या एकास भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने उडवले. अस्मल खान माईनद्दीन खान (५०) असे त्यांचे नाव असून अपघात शुक्रवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास भद्रकाली पोलिस स्टेशन हद्दीतील उड्डाणपुलावर घडला. मालेगाव येथे राहणाऱ्या खान यांची अल्टो कार पंक्चर झाली होती. कारच्या थोडे पुढे थांबलेल्या खान यांना ट्रकने उडवले. याबाबत भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कट्ट्यांसह काडतुसे जप्त

नाशिकरोड : शहरातील दोन ठिकाणी छापे टाकून गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने देशी बनावटीचे दोन पिस्तुल, दोन मॅगेझीन, सुरा अशी हत्यारे बाळगणाऱ्या दोघा संशयितांना अटक केली. या संशयितांककडे आढळलेली चोरीची कारही जप्त केली आहे.

अटक केलेल्या संशयितांमध्ये देवळाली गाव येथील गांधीधाम बिल्डींगमध्ये राहणाऱ्या संजय बबन धामणे (३५) आणि आडगाव परिसरातील धात्रक फाटा येथील रमेश उर्फ गंगाधर मालिंग शेट्टी (४६) यांचा समावेश आहे. गुन्हे शाखेचे हवालदार रवींद्र बागुल यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी दुपारी धामणे याच्या घरी छापा टाकत त्यास शिताफिने अटक केली. त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तुल, दोन मॅगेझीन, एक सुरा अशी हत्यारे जप्त करण्यात आली.

धामणे याच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पोलिस निरिक्षक संजय सानप आणि सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांनी उपनगरच्या दत्तमंदिर परिसरात चोरीची गाडी घेऊन फिरणाऱ्या शेट्टीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी सुरत येथून चोरलेली जीजे१९, एएफ ००३० क्रमांकाची तवेरा कार गाडी जप्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सराफ बंदचा कारागिरांना फटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय अर्थसंकल्पात सराफी व्यवसायावर एक टक्का अबकारी कर सुरू केल्यामुळे सराफांनी आपली दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका लहान कारागिरांना बसण्यास सुरुवात झाली असून हा बंद जास्त दिवस राहिला तर उपासमारीला तोंड द्यावे लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सराफी व्यावसायिकांनी मंगळवारपासून बेमुदत पुकारला असून हा अबकारी कर रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहीती नाशिक जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ओढेकर यांनी दिली. बंदमुळे त्यावर अवलंबून असलेल्या छोट्या मोठ्या व्यवसायावर परिणाम होत आहे. बंदमुळे सराफ बाजारात शुकशुकाट होता. ग्राहकांबरोबरच सराफ व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या घटकांवर परिणाम होत आहे. सराफ व्यवसायिकांवर सरकारने विविध प्रकारचे कर लादून व्यवसायावर गदा आणली जात आहे. या अगोदरही सरकारने विविध कर लादून व्यावसायिकांना व्यवसाय करणे जिकरीचे केले आहे. सरकारच्या या निर्णयावर तोडगा काढण्यासाठी अखिल भारतीय पातळीवर हा कर रद्द करावा यासाठी केंद्र सरकारला निवेदन दिले आहे. याबाबत गुरुवारी (दि. १०) राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मध्यस्थी करण्याची गळ घातली असून त्याच्याकरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांना मागण्या सादर केल्या जाणार आहे. या अगोदरही सुवर्ण नियंत्रण कायद्यामुळे सुवर्णकारांच्या दोन पिढ्यांना झळ बसली होती. सरकारने हा अबकारी कर सुरू ठेवला तर पुढच्या अनेक पिढ्यांना व्यवसाय करणे कठीण होऊन जाईल. त्याकरता हा कर लादू नये अशी मागणी करण्यात येणार आहे.

पुण्यात बैठक

कराला विरोध करण्यासाठी शुक्रवारी पुण्यात सराफ व्यावसायिकांची बैठक झाली. बैठकीत करबोजामुळे व्यापाऱ्यांचे कसे नुकसान होणार आहे याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच आंदोलन तीव्र करण्यासाठी १० मार्च रोजी पुण्यात तर १३ मार्च रोजी मुंबईत राज्यव्यापी मोर्चा काढला जाणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील खासदार व आमदारांना निवेदन दिले जाणार आहे. त्यांनीही सराफ व्यावसायिकांची बाजू सरकार दरबारी मांडावी यासाठी गळ घातली जाणार आहे.

सराफांचा आज मेळावा

नाशिकरोड : सराफ व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंदसंदर्भात सोमवारी (दि. ७) सायंकाळी पाच वाजता सावाना शेजारील औरंगाबादकर सभागृहात सराफ संघटनेचा जिल्हा मेळावा होणार असल्याची माहिती नाशिकरोड सराफ असोसिएशनचे सरचिटणीस राहुल महाले आणि नितीन महाले यांनी दिली. नाशिकरोडला सराफाच्या बंद आंदोलनात दिलीप सोनवणे, बबन शहाणे, गणेश शहाणे, राहुल म्हसे आदींनी सहभाग घेतला.

भाजी विक्रेत्यांची गर्दी

सराफ व्यावसायिकांचा बेमुदत बंद सुरू असल्याने सराफ बाजारामध्ये भाजी विक्रेत्यांनी गर्दी केली. त्यांनी बंद गाळ्यांसमोर भाज्या विक्रीसाठी मांडल्या. भाजीबाजार भरल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.

लहान कारागिरांवर संक्रांत

सराफ व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने त्याची झळ कारागिरांना बसते आहे. काम केले तर पैसे मिळत असल्याने कारागिरांची दोन दिवसांपासून मोठी गैरसोय झाली आहे. बंद जास्त दिवस सुरू राहिला तर कारागिरांना उपासमारीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. नाशिकच्या सराफ बाजारातील अनेक कारागीर हे पश्चिम बंगाल तर काही कारागीर मराठवाड्यातून आले आहेत. त्यांना कामाप्रमाणे मंजुरी मिळते. दोन दिवसापासून काम नसल्याने हातावर हात ठेवून ते बसले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला दिनानिमित्त रंगणार बाइक रॅली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नारीशक्तीला सलाम करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'मार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला दिनानिमित्त बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. १३ मार्चला (रविवारी) भोसला मिलिटरी कॉलेजपासून सकाळी ७.३० वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे. नाशिककर बाइकर्णींना पुन्हा एकदा नारीशक्तीचे प्रदर्शन करण्याची संधी ही रॅली देणार आहे.

पुरुषांच्या बरोबरीने बाइक चालविणाऱ्या महिलांचा या रॅलीला गेल्या वर्षी मोठा प्रतिसाद मिळाला होता. बाइकप्रेमी महिलांचे अनेक ग्रुप्स या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जवळपास आठशे महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता.

यंदाही अशा बाइकर्णींसाठी ही रॅली होणार आहे. गेल्या वर्षीच्या बाइकर्णींना यासाठी 'मटा'चे आग्रहाचे निमंत्रण आहे. तसेच, गेल्या वर्षी यामध्ये सहभागी होऊ न शकलेल्या महिलांचेही यंदा होणाऱ्या रॅलीमध्ये स्वागत आहे. १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही महिलेला यामध्ये सहभागी होता येणार आहे. परंतु, यासाठी लायसन्स असणे आवश्यक आहे. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक असून, नाव नोंदणीसाठी मोबाइलवर BikerallyNSK टाइप करून ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस करा किंवा ६६३७९३९ या नंबरवर संपर्क साधा. चला तर मग तयार राहा बाइक रॅलीचा आनंद लुटण्यासाठी.

स्त्री सबलीकरणाची केवळ भाषणे ठोकण्यापेक्षा महाराष्ट्र टाइम्समार्फत राबविला जाणारा हा बाइक रॅलीचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. कोणाला दाखविण्यसाठी नव्हे तर महिलांमध्ये आत्मविश्यास जागृत करण्यासाठी ही रॅली नक्कीच उपयुक्त ठरेल. आज अनेक मुली गिअर बाइक चालवितात. त्यामुळे काळाच्या सुसंगत असणारा असा हा उपक्रम आहे.

- नेहा जोशी, अभिनेत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्याने’ केली शिक्षकांचीच ‘शाळा’

0
0

व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे पैशांची मागणी

ashwini.kawale@timesgroup.com

नाशिक : वरिष्ठ वेतन श्रेणीबाबत आदेश प्रशासनाधिकारी साहेबांनी पारीत केला आहे. त्यानुसार प्रत्येक शिक्षकाचा रेकॉर्ड तयार करावयाचा असून प्रत्येकी ३०० रुपये जमा करावेत. ज्याला कुणाला विश्वास नसेल व हे काम स्वतः करायचे असेल तर कृपया फोनही करू नये व डोके खाऊ नये, शिक्षण विभागाच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवणाऱ्या अशा आशयाचे मेसेजेस शिक्षकांना पाठवून त्या शिक्षकाने शिक्षकांचीच 'शाळा' केल्याचे समोर आले.

आधुनिक तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. हे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. व्हॉट्स अॅपचा गैरवापर करीत वरिष्ठ वेतनश्रेणीच्या नावाखाली काही शिक्षकांनी थेट ३०० रुपयांची मागणी करून इतर शिक्षकांनाच वेठीस धरले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक आघाडीच्या नावाने हा मेसेज गेल्या काही दिवसांपासून फिरत होता. शिक्षण विभाग अशी पैशांची मागणी का करीत आहे, या शंकेने काही सुज्ञ शिक्षकांनी चौकशी करताच या प्रकरणातील गौडबंगाल समोर आले. काही खोडकर शिक्षकांनी हा मेसेज मुद्दाम व्हॉट्सअॅपवर पसरविल्याचे समोर आले. या प्रकरणातून शिक्षकांची मोठी फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेत महापालिका शिक्षण विभागाने ताबडतोब आपली भूमिका स्पष्ट केली. शिक्षण विभागाने पैशांची कोणतीही मागणी केली नसल्याचे जाहीर केले. प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे व उपमहापौर गुरुमीत बग्गा यांच्या सजगतेमुळे अनेक शिक्षकांची आर्थिक लूट थांबली, असे मतही शिक्षक व्यक्त करीत आहेत. याविषयी शिक्षकसेना पदाधिकाऱ्यांंनी बोलण्यास नकार दिला.


कारवाईची मागणी

शिक्षकांकडून पैसे कमावण्यासाठी शिक्षण विभागाच्या नावाने असे खोटे मेसेज तयार केले असल्याचे महापालिका शिक्षकांनी सांगितले आहे. अवैध मार्गाने पैसे गोळा करण्यासाठी शिक्षण विभागाची बदनामी करीत असलेल्या अशा शिक्षकांवर कारवाईची मागणीही त्यांच्यातर्फे करण्यात आली आहे.



व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मेसेजेस फिरत असल्याचे समजताच आम्ही पत्रक काढून शिक्षकांपर्यंत पोहोचवले. कोणत्याही प्रकारच्या पैशांची मागणी शिक्षण विभागाने केली नसून शिक्षकांनी अशा मेसेजेसला भुलू नये, अशी जागरुकता आम्ही केली आहे.

- गुरुमीत बग्गा, उपमहापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक शहरासह त्र्यंबकमध्ये हायअलर्ट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाकिस्थानातील लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे १० दहशतवादी भारतात आणि विशेषतः गुजरात राज्यात हल्ला करण्याची शक्यता भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी वर्तवली आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हल्ल्याचा कट रचण्यात आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर तसेच, शहरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लिंग जगप्रसिध्द असून, शिवरात्रीनिमित्त येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. शहरात कपालेश्वर, सोमेश्वर या देवालयात भक्तांची मोठी गर्दी होते. भारतीय गुप्तचर संघटनेच्या माहितीनुसार, देशात घुसलेले दहशतवादी गुजरात राज्यात घातपात करण्याची शक्यता आहे. गुजरातच्या सीमेवरच नाशिक जिल्हा असून, येथे त्र्यंबकेश्वरला ज्योतीर्लिंग आहे. त्यादृष्टीने बॉम्ब शोधक व नाशक पथक, शीघ्र कृती दल व इतर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर शहरात येणाऱ्या रस्त्यावर चेक पोस्ट उभारण्यात आले असून, वरिष्ठांकडून येणाऱ्या सूचनांनुसार पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे पोलिस उपअधीक्षक प्रवीण मुंढे यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक शहरात संध्याकाळच्या सुमारास चेक पोस्ट लावण्यात आले. पोलिसांचे वेगवेगळ्या पथकांच्या मदतीने सर्च ऑपरेशन राबवण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंगांच्या सुखासाठी ‘ती’ वेचतेयं आयुष्य

0
0

ashwini.patil@timesgroup.com

त‌िला बाईकवर दूरपर्यंत प्रवास करायला आवडते...म्हणून नुसताच प्रवास करून काय मिळवणार...त्यापेक्षा या प्रवासात जर एखादे ध्येय डोळ्यासमोर ठेवले तर, या प्रवासाचं चीज होईल आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाची लकेरही उमटेल..याच विचाराने प्रेरित होऊन गोव्यातील पंचवीस वर्षाची कँडिडा लुईस या तरुणीने अवघा दक्षिण भारत पिंजून काढला आहे. कँडिडा ही तरुणी आपल्या या बाइकवरच्या प्रवासात अपंगांसाठी निधी जमा करते आहे.

अपंगांचे दुःख वेचण्यासाठी, त्यांना हवी ती मदत करण्यासाठी तब्बल दोन महिने पंधरा ते सोळा हजार किलोमिटर एकटीने प्रवास करून गोव्यातील कँडिडा लुईस या तरुणीने नुकतीच नाशिकला भेट दिली.

कँडिडाने १९ फेब्रुवारीला गोव्याहून या मोहिमेला सुरुवात केली. गोवा-हुबळी-पुणे-मुंबई-नाशिक या प्रवासात तिने अनेक कॉलेज, संस्था, नामांकीत कंपन्या आणि छोट्या शहरांना भेटी दिल्या. कृत्रिम अवयव (हात किंवा पाय) बसविण्याचा खर्च ज्यांना परवडत नाही अशा व्यक्तींसाठी ती निधी जमा करते आहे. आतापर्यंत अनेकांनी तिला मदत केली आहे. बंगळुरूमधील आदित्य मेहता फाऊंडेशनतर्फे हा निधी गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचव‌िला जाणार आहे.

मूळची हुबळी येथील असलेली कँडिडा एका नामांकित कंपनीत फायनान्स स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत होती. मात्र बाइक चालव‌िणे हे तिचे पॅशन. भारतातील विविध राज्यात बाइकवरून प्रवास करून तिने ही आवड जोपासली. मात्र आपल्या या आवडीतून आणि प्रवासातून कुणालातरी मदत व्हायला हवी असा विचार तिच्या मनात डोकावला आणि तेथूनच सुरू झाला नवा प्रवास. या संपूर्ण प्रवासात ती राहण्याचा, खाण्याचा आणि गाडीचा खर्च स्वतः करते. मदत मिळालेला निधी ती फाऊंडेशनला लगेच पाठव‌िते.

तिच्या प्रयत्नांना सर्व स्तरांतून पाठिंबा मिळतो आहे. आपल्या एकुलत्या एक लेकीच्या निर्णयात पालकही खंबीरपणे तिच्या पाठिशी उभे राहिले. आतापर्यंत अनेक अवघड टप्पे त‌िने पार केले आहेत. मात्र या मधून नवीन भारत मला पाहायला मिळतो असेही ती म्हणते. दक्षिण भारतानंतर आता तिचा उत्तर भारताच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋषभदेवांच्या मूर्तीची गिनीज बुकमध्ये नोंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मांगीतुंगी येथील ऋषभगिरी पर्वतावरील अखंड पाषणात कोरलेली भगवान ऋषभदेव यांची १०८ फुटी उंच मूर्तीची जैन तीर्थक्षेत्रात जगात सर्वाधिक उंच मूर्ती म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. दरम्यान तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या महोत्सवाची महाशिवरात्रीनिमित्त मूर्तीवर महामस्तकाभिषेक करून सांगता करण्यात आली.

गिनीजचे भारतातील संचालक स्वप्निल टाकरीकर यांनी श्री मांगीतुंगी येथे येवून मूर्तीचे मोजमाप करून पाहणी केली. टाकरीकर यांनी या मूर्तीची नोंद गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली असून त्या संदर्भातील प्रशस्तीपत्र ज्ञानमती चंदनामती माताजी यांचेकडे सुपूर्त केले. या वेळी महामंत्री डॉ. पन्नालाल पापडीवाल, सुमरे काला, सुवर्णा काला, पारस लोहारे उपस्थित होते. दर सहा वर्षांनी भगवान ऋषभदेव यांच्या महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्याचा ठराव यावेळी संमत करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाहणीचे निव्वळ सोपस्कार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
गेल्या आठवड्यात गारपीट व वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील फळबागांसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान पूर्व पट्ट्यात झाले असतांना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी पश्चिम पट्ट्याला धावती भेट दिली. अवकाळीच्या तडाख्यानंतर पालकमंत्री जिल्हाभर फिरून सांत्वन करतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र त्यांनी यावर पाणी फेरत मुबंई जातांना रस्त्यावरच नुकसानीच्या पाहणीचे सोपस्कार पार पाडल्याची टिका शेतकऱ्यांनी केली आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस व गारपीटीने धुमाकूळ घातला. त्यामुळे द्राक्ष, डाळिंब, कांदा या प्रमुख पिकांसह भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात जवळपास आठ हजार हेक्टर पिकांचे नुकसान होवून १२ हजार शेतकरी प्रभावीत झाले. अशाप्रसंगी पालकमंत्र्यांकडून मदतीसह सांत्वनची बळीराजाला अपेक्षा होती. परंतु अवकाळी पावसानंतर पालकमंत्री जिल्ह्यात उश‌िरानेच प्रकटले. त्यातही त्यांनी सोमवारी त्यांनी जिल्ह्याचा धावता दौरा करत नुकसानीची पाहणी केली. परंतू सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पूर्व भागाकडे पाठ फिरव‌िली. वास्तविक द्राक्ष, डाळींबाचे मोठे नुकसान झाल्याने या फळबागांच्या पाहणीसाठी महाजन येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु महाजन यांनी शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवत मुंबई जातांना इगतपूरी तालुक्यातील काही भागाला भेट देवून पाहणीचे निव्वळ सोपस्कार पार पाडलेत. त्यांच्या या धावत्या दर्शनाने शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंडिया बुल्सला आवरा, अन्यथा गोदावरीला धोका

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

इंड‌िया बुल्स कंपनी गोदावरी नदीतून थेट पाणी उचलत असल्याने निफाड तालुका आणि विशेषतः गोदाकाठावरील गावांचा पाणीप्रश्न बिकट होऊ शकतो. त्यामुळे या कंपनी विरोधात लढा उभारायचा निर्णय सायखेडा येथील बैठकीत घेण्यात आला. निफाडचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी हा महत्त्वाचा प्रश्न हाती घेतला आहे.

गोदावरी बचाव संघर्ष समितीतर्फे सायखेडा येथे बैठक आयोजित केली होती. इंडिया बुल्स या कंपनीला सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी उचलण्याची परवानगी असताना कंपनी सर्रासपणे गोदापात्रातूंन ५०० अश्व शक्तीच्या तीन मोटर्सच्या सहाय्याने पाणी उचलत आहे. अशाच पद्धतीने पाणी उचलणे सुरू राहिले तर येत्या आठ दिवसात गोदावरी नदी कोरडीठाक पडेल, असे राजाभाऊ शेलार यांनी सांगितले. त्यामुळे या पुढील काळात आपल्याला मोठा लढा उभारावा लागेल. अन्यथा कंपनी जर अशाच प्रकारे पाणी ओढत राहीली तर भविष्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल, अशी भीती शेलार यांनी व्यक्त केली.

या बैठकीला माजी पंचायत समिती सदस्य जगन कुटे, अश्पाक शैख यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, भविष्याच्या दृष्टीने मोठा धोका असून याविरोधात राजकीय जोडे बाजूला ठेवत लढा देणे गरजेचे आहे. तसेच न्यायालयात जनहीत याचिका दाखल करावी, असा निर्णय निर्णय घेण्यात आला.

गोदाकाठ भागातील ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी, असेही यावेळी ठरले. या बैठकीला शिवनाथ कडभाने, विलास मत्सागर, सुरेश दाते, भाऊसाहेब कातकाडे, सुनील कुटे, आदेश सानप, संदीप कुटे, विजय कारे उपस्थित होते. शनिवारी १२ मार्च रोजी सायखेडा येथे याच विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.









मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संधी वेलनेस टुरिझमची!

0
0

किशोर अहिरे

वेलनेस म्हणजे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न. यामध्ये आपल्या जीवनातील शारीरिक, सामाजिक, भावनिक आणि अध्यात्मिक पातळीवर आपले आरोग्य उत्तम राहावे. तसेच भविष्यात यातून निर्माण होणाऱ्या व्याधींपासून लांब राहण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजेच वेलनेस. वेलनेस ही उत्तम आरोग्य कायम राहण्यासाठी केलेली अत्यंत सकारात्मक अशी गोष्ट आहे. यामुळे कुठलीही व्यक्ती त्याच्या अंगी असलेल्या क्षमतांचा पूर्णपणे विकास करू शकते. आरोग्य व वेलनेस या एकमेकांना अत्यंत पूरक अशा संकल्पना आहेत.

यामध्ये प्रामुख्याने

१) आहार व शारीरिक स्वास्थ्य

२) मानसिक आरोग्य

३) बौद्धिकक्षमता

४) सामजिक/ कौटुंबिक स्वास्थ्य

५) व्यावसायिक अंगांचे स्वास्थ्य

६) अध्यात्मिक व तात्विक घटक या गोष्टींचा समावेश होतो.

कुठल्याही प्रकारच्या व्याधी किंवा कोणतेही आजार होऊ नये यासाठी अत्यंत प्रभावीपणे केलेली उपाययोजना म्हणजेच वेलनेस. भारतात उत्तम आरोग्य जपण्यासाठी पूर्वापार अत्यंत प्रभावी अशा उपचार पद्धतींचा अवलंब केला जातो यात प्रामुख्याने योगा, आयुर्वेद, निसर्गोपचार आदी पद्धतींचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला जातो.

आपल्या केरळ राज्याने वेलनेस टुरिझम या क्षेत्रात गेल्या काही वर्षात आघाडीचे स्थान निर्माण केलेले दिसते. जगभरातील पर्यटक केरळला या आरोग्यवर्धक उपचार पद्धतींचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भेट देतात. गेल्या काही दशकांत अत्यंत झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास तसेच यातून निर्माण झालेले गतिमान आयुष्य यामुळे आरोग्याच्या अनेक प्रकारच्या समस्या अत्यंत उग्र स्वरूप धारण केलेल्या दिसतात. मानसिक ताणतणावात झालेली वाढदेखील आपल्या आरोग्यावर परिणाम करतात.

वेलनेस या संकल्पनेचे यामुळेच जगभरात महत्त्व वाढलेले दिसते. आपली जीवनपद्धती आरोग्यपूर्ण कशी होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. हे आता सगळ्यांनाच पटलेले दिसते त्यामुळे वेलनेस टुरिझम (आरोग्य पर्यटन) या क्षेत्राला यातून मोठी संधी निर्माण झालेली दिसते. नाशिक व परिसरात आरोग्य पर्यटनाला इथल्या अल्हाददायी वातावरणात मोठा वाव आहे, देवळालीला असलेले सॅनिटोरीअम्स हे आपल्या आरोग्य पर्यटनाची परंपरा दर्शवतात. सुमारे दोनशे वर्षांपासून मुंबईतील आर्थिकदृष्ट्या संपन्न समुदायांनी देवळालीत आरोग्यधाम (सॅनिटॉरीअम) बांधण्यास सुरुवात केली होती. इगतपुरी येथील विपश्यना केंद्र यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले दिसते. रोजच्या जीवनातून निर्माण होणारे मानसिक ताणतणाव व व्याधी यांच्यापासून मुक्त होण्यासाठी विपश्यनेसारखी ध्यानधारणेची (मेडिटेशन) प्राचीन पद्धतीचा लोक आपले मानसिक आरोग्य जपण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर करतांना दिसतात. नाशिक येथे असलेले योग विद्याधाम व त्यांसारख्या इतर बऱ्याच संस्था अत्यंत उत्तम दर्जाच्या उपचार पद्धती वापरून रुग्णांना बरे करतांना दिसतात.

नाशिक जवळपासच्या परिसरात योगा, आयुर्वेद तसेच निसर्गोपचार आदी उपचार पद्धती पुरवणाऱ्या संस्था तसेच रिसॉर्ट्स यांना मोठा वाव आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर, नाशिक-इगतपुरी, वणी-दिंडोरी, मांगी-तुंगी परिसरात पर्यटकांना आरोग्य सुविधांसोबतच उत्तम दर्जाची आतिथ्य सेवा जर पुरवली तर आरोग्य पर्यटनाला मोठा वाव मिळेल.

उरळीकांचन, लोणावळा येथे गेल्या काही वर्षात आरोग्य पर्यटन क्षेत्राचा चांगला विकास होतांना दिसतो आहे. त्याच धर्तीवर नाशिक व परिसरात उत्तम दर्जाचे रिसॉर्टस, योगा व मेडिटेशन सेंटर जर विकसित झाले तर या क्षेत्राची मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिकपासून दोन तासाच्या अंतरावर मुंबई महानगर क्षेत्र आहे. ज्याची आजची लोकसंख्या जवळजवळ सहा करोड आहे. ही बाब नाशिक व परिसरात वेलनेस (आरोग्य पर्यटन) क्षेत्राची वाढ अत्यंत अनुकूल अशी आहे. अगदी पंचतारांकित दर्जाच्या सेवा सुविधा जर यासाठी जर निर्माण केल्या तर पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात निश्चितपणे आपल्याकडे येतील. यातून ग्रामीण भागात रोजगाराच्या देखील मोठ्या संधी उपलब्ध होतील. तसेच नैसर्गिक (ऑरगॅनिक) भाजीपाला व अन्नधान्य यांची देखील मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. केरळच्या धर्तीवर आपल्या दुर्गम भागात जर अशा सुविधा निर्माण झाल्या तर स्थानिकांच्या सहभागातून उत्तम दर्जाची सेवा आपण पर्यटकांना पुरवू शकतो.

वेलनेस टुरिझम (आरोग्य पर्यटन) याची मुख्यत्वे आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न अशा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे यासाठी येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात खर्च करण्यासाठी तयार असतील. त्यामुळे आपण जितक्या उच्च दर्जाच्या सेवा पुरवू तेवढा या क्षेत्राचा विकास होत जाईल.

वेलनेस टुरिझम (आरोग्य पर्यटन) या क्षेत्राला उच्च दर्जाचे आतिथ्यसेवा तसेच करमणुकीची साधने जर पुरवली तर याचा निश्चितच मोठा विकास होण्याची शक्यता आहे. एक मोठी संधी आपले दार ठोठावते आहे. गरज आहे ती यात आपला अधिकाधिक सहभाग होऊन संधीचे सोने करण्याची.

(लेखक हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमाता ब्रिगेडच्या मोर्चामुळे भाविकांची घटली संख्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

भूमाता ब्रिगेडचे आंदोलन आणि दहशतवादी हल्ल्याच्या हायअलर्टच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्र उत्सव तणावपूर्ण वातावरण पार पडला. सोमवार आणि सिंहस्थ पर्वकालात आलेला महाशिवरात्रीचा योग असूनही भाविकांची संख्या मात्र रोडावल्याचे दिसून आले.

पहाटे मंदिर दर्शनासाठी खुले झाले तेव्हापासून दर्शनबारी गजबजली होती. मात्र, नेहमीपेक्षा गर्दी कमी असल्याचे स्पष्ट जाणवत होते. अवघे लाखभर देखील भाविक आले नसावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला. पूर्वदरवाजा दर्शनमंडपाचे बाहेर दर्शनरांग गेली. मात्र, काही तासातच केवळ मंडपातच थांबली. भाविकांनी शिवास बेलपत्र अपर्ण करण्यासाठी गर्दी केली होती.

दुपारी दोन वाजता निघणारी पालखी खास विशेष असते. ही पालखी पाचआळी मार्गे कुशावर्तावर जाते. या मार्गावर संस्थानिक जोगळेकर यांचे निवासस्थान आहे. मंगलवद्यात पालखी निघाली तेव्हा नागरिकांनी सडा संमार्जन रांगोळ्या काढल्या होत्या. कुशावर्तावर विधीवत पूजा होऊन त्र्यंबकराजाचा सुवर्ण मुकूट असलेली पाळखी पुन्हा मंदिरात आली. महाशिवरात्रीस येथे शिवास उसाचा रस अपर्ण केला जातो. यामुळे उसाच्या गुऱ्हाळावर गर्दी होती. शहरातील सर्व शिवमंदिरात हरहर महादेवाचा जयघोष सुरू होता. बेलपत्र कवठाचे फळ आणि उसाचा रस वाहण्यासाठी रांगा लागल्या होत्या. राज्याचे अर्थमंत्री, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले.

दिवसभर भाविक दर्शनासाठी येत होते. मात्र, दर ‌शिवरात्रीला होणारी गर्दी यावेळी पहायला मिळाली नाही. पेड दर्शनही बंद ठेवण्यात आले होते. तसेच बॅरिकेडिंगमुळे भाविकांना सिंहस्थाचा पुन्हा एकदा अनुभव आला. पोलिसांनी चोख नियोजन केले होते. यामुळे कोणताही अनूचित प्रकार घडला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत व्यापाऱ्याची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा-बटाटा व्यापाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. करीम इस्माईल बागवान (वय ६०) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. बागवान यांनी रविवारी रात्रीच्या सुमारास बाजार समितीतील गाळा क्रमांक ५५ येथे गळफास घेतला. घरच्यांच्या संपर्कापासून तुटलेल्या बागवान यांचा त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. आर्थिक व्यवहारात फसलेल्या बागवान यांच्यावर कर्ज झाले होते. त्यातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

एकास जबर मारहाण

मागील भांडणाच्या कुरापतीमुळे तिघांनी एकास जबर मारहाण केल्याची घटना पंचवटी परिसरात रविवारी सकाळच्या सुमारास घडली. जेलरोडपरिसरातील धर्मेंद्र महादू तांबे हे रघुवीर इमारतीसमोरील पानटपरीवर उभे असताना संशयित दीपक गोरख पाटील, बंटी बापू मानकर व लक्ष्मण बापू मानकर यांनी मागील भांडणाची कुरापत काढून फावड्याच्या दांड्याने तांबेना मारहाण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफांनी स्वीकारावा एक टक्का कर

0
0

कर सल्लागार रवींद्र देवधर यांचा सल्ला
म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अर्थसंकल्पात सराफ व्यावसायिकांवर नव्याने लागू करण्यात आलेल्या अबकारी करात सरकारने एक टक्का आणि साडेबारा टक्के असे दोन पर्याय दिले आहेत. त्यातील करदात्यांनी एक टक्का अबकारी कराचा पर्याय स्वीकारावा, असे प्रतिपादन कर सल्लागार रवींद्र देवधर यांनी केले.

सरकारने १ मार्चपासून लागू केलेल्या अबकारी कराची माहिती सराफ व्यावसायिकांना व्हावी यासाठी नाशिक सराफ असोसिएशनच्यावतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी देवधर म्हणाले, की अर्थसंकल्पात केलेल्या व्याख्येनुसार ज्या व्यावसायिकांनी १ टक्क्याचा पर्याय स्वीकारला आहे, अशा व्यावसायिकांना सेट ऑफ मिळणार नाही. मात्र, ज्या व्यावसायिकांनी साडेबारा टक्क्याचा पर्याय स्वीकारला आहे अशांना सेट ऑफ मिळणार आहे. मात्र, त्यासाठी कागदपत्रे फायलिंग करावी लागणार आहेत. २०१२ च्या कायद्यानुसार वस्तुच्या किंमतीच्या ७० टक्के किंमतीवर करात सूट मिळत होती. ३० टक्के किमतीवर कर लागत होता. मात्र, नवीन कायद्यानुसार १०० टक्के किंमतीवर कर लागणार आहे. ब्रँडेड दागिने त्याचप्रमाणे स्मॉल स्केल इंडस्ट्री यात येणारे कर याचेही देवधर यांनी मार्गदर्शन त्यांनी केले. इन्कमटॅक्स सल्लागार संदीप पाठक यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. संपूर्ण जिल्ह्यातून सराफ व्यावसायिक हजर होते. दिवसभर आमदार खासदार यांच्या भेटी धेऊन त्यांना निवेदने देण्यात आली.

दिल्लीत आवाज उठवू

दिल्ली दरबारी सराफ व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत आवाज उठवला जाईल. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरीही मागे हटणार नाही, असे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.


पालकमंत्र्यांचे आश्वासन

सराफ व्यावसायिकांवर लावलेला १ टक्का अबकारी कर काढून टाकावा या मागणीसाठी सराफ व्यावसायिकांनी बंदचे हत्यार उपसले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. लवकरात लवकर या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढला जाईल, असे आश्वासन महाजन यांनी दिले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींचा प्रेरणास्त्रोत आता मोठ्या पडद्यावर

0
0

Vinod.patil@timesgroup.com

नाशिक : अन्याय अन् उपेक्षेने पिचलेल्या आदिवासींच्या उत्थानासाठी उभी हयात घालविणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आंदोलक झिलाबाई वसावे यांचा सामाजिक लढा आता मोठ्या पडद्याद्वारे लवकरच जगासमोर येणार आहे. आजवर केवळ आदिवासी आंदोलनांचे मार्केटिंग अन् नेतेगिरी करून स्वःनामाची ब्रॅन्ड इमेज समाजमनावर थोपवू पाहणाऱ्या तथाकथित संघर्ष कहाण्याच चघळल्या गेल्या. मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे यांच्यापेक्षा दोन पाऊल पुढे राहून आदिवासींच्या संघर्षाला तेज धार देणाऱ्या सातपुड्यातील झिलाबाईंची संघर्षमय कहाणी जगजाहीर होणार आहे.

निर्माता व दिग्दर्शक प्रतिभा शर्मा यांच्या वास्तववादी मांडणीमुळे आदिवासी आंदोलनाचा नवा आयाम हा जगासमोर येत आहे.

आदिवासींच्या न्याय हक्कासंदर्भातील जंगल, जमीन, कानून आंदोलने मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे अशी बड्या नावांभोवती केंद्रित राहिली आहेत. परंतु, या आंदोलनांना खऱ्या अर्थाने बळ देणाऱ्या स्थानिक अशिक्षित आदिवासी महिला आंदोलक मात्र पडद्याआडच राहिल्या आहेत. झिलाबाई वसावे

त्यापैकीच! सातपुडा पर्वतरांगांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातील आदिवासी गावांमध्ये झिलाबाईचे नाव पुकारले तरी प्रत्येकाच्या शरीरात वीज चमकावी, अशी ऊर्जा निर्माण होते. नर्मदा व तापीच्या खोऱ्यात आदिवासींवरील अन्यायाविरुद्ध लढ्याचे एक प्रतीक म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. ८६ वर्षांच्या झिलाबाई आजही तळमळीने आदिवासींच्या आंदोलन अग्रणी असतात. झिलाबाई या मूळच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातल्या गेनसरा गावच्या. लग्नानंतर रायसिंगपूर संस्थानातील भराडीपादर गावात स्थायिक झाल्या. इंग्रज गेल्यानंतर आदिवासींच्या जमिनी या संस्थानच्या नावावरच राहिल्या होत्या. १९७५ मध्ये प्रायव्हेट फॉरेस्ट अक्टने या जमिनींवरची उरलीसुरली मालकीही गेली. आदिवासींचे हक्क नाकारले गेले. तेथूनच झिलाबाईच्या संघर्षाला सुरुवात झाली. मग त्यांनी आदिवासींच्या नैसर्गिक संसाधनावरील हक्कांसाठी लढा सुरू केला.

जगप्रसिद्ध नर्मदा आंदोलन, लोकसंघर्ष मोर्चा, उलगुलान यात्रामध्ये सहभागी होऊन आदिवासींचा आवाज बुंलद केला. मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे यांच्या पाठिशी त्यांनी संपूर्ण सातपुडा उभा करीत केंद्र व राज्य सरकारवर दबाव वाढवला.

मौखिक पंरपरेतून समृद्ध झालेली लखलखीत वाणी हीच झिलाबाईंची मुख्य ताकद आहे. त्या बोलायला लागल्या, की अवघ्या आदिवासी संस्कृतीचा आत्मा त्यांच्या शब्दातून बाहेर येतो. सर्वच आंदोलनांचे गल्ली ते दिल्ली नेतृत्व त्याच करतात. आंदोलनाना बळ देण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. आदिवासींना त्यांच्या जीवनाचा हक्क मिळाला पाहिजे एवढेच त्यांचे ध्येय! जंगलाला वडील, तर जमिनीला त्या माता म्हणतात. त्यामुळे आदिवासींच्या व्यथा, वेदना त्या प्रखरपणे आपल्या भाषेतून जगासमोर मांडतात. त्यामुळेच त्यांच्या या प्रेरणामय व संघर्षमय जीवनाची कहाणी जगासमोर पुढे यावी या उद्देशाने प्रतिभा शर्मा यांनी त्यांच्यावरील चित्रपटाचे काम सुरू केले आहे. गेल्या सहा महिन्यापासून त्याचे चित्रीकरण सातपुड्यात तसेच मुंबईत सुरू आहे. एप्रिलमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'आमो आखा एक से'

झिलाबाई यांच्यावरील चित्रपटाचे नाव 'आमो आखा एक से' असे ठेवण्यात आले आहे. दीड तासाच्या चित्रपटात झिलाबाईचा जीवनपट उलगडण्यात आला आहे. अन्यायाविरुद्ध लढा सुरू करताना आदिवासी आमो आखा एक से हे आदिवासींच्या घोषवाक्याने करतात. त्यामुळे चित्रपटाला तेच नाव देण्यात आले असून, तो मराठी व हिंदी भाषेत झळकणार आहे. त्यामुळे सातपुड्यातील या झाशीच्या राणीची कथा बघण्यास सातपुड्यातील त्यांच्या अनुयायांसह सर्वच जण इच्छुक आहेत.

झिलाबाई या आंदोलकांसाठी एक प्रेरणास्रोत राहिल्या आहेत. जंगल, जमीन व आदिवासींचे हक्क यांच्यासाठी सुरू केलेला लढा आजही सुरूच आहे. त्यामुळे त्यांचे कार्य जगासमोर आल्यास इतरांनाही प्रेरणा मिळेल. -प्रतिभा शिंदे,अध्यक्षा, लोकसंघर्ष मोर्चा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कपाट’चा फैसला दोन दिवसात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक नाशिकमधील कपाट प्रकरणांमुळे संपूर्ण शहराचाच विकास ठप्प झाला आहे. त्यामुळे कपाट प्रकरणे नियम‌ीत करण्याबाबत सरकार सकारात्मक असून, येत्या दोन ते तीन दिवसात होणार त्यावर अंतिम निर्णय असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. या प्रकरणांची संख्या मोठी असल्याने धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे महाजन यांनी सांग‌ीतले. त्यामुळे कपाटांची कोंडी फुटणार असल्याने शहरातील बिल्डरासंह सर्वसामान्य ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे.

शहरातील अनेक बिल्डरांनी इमारतीचे बांधकाम करताना फ्री ऑफ एफएसआयच्या क्षेत्रातच आठ बाय दहाचे कपाट बांधून जास्तीचे बांधकाम करून ते ग्राहकांना विकण्याचा प्रघात पाडला होता. त्यावर मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आक्षेप घेत अशा बांधकाम परवानग्या थांबवल्याने गेल्या दीड वर्षापासून अडीच हजार इमारतींना पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही. सरकारच्या आदेशानंतर असा प्रकरणांची संख्या आता पुढे आली असून, तब्बल २५८९ अर्ज महापालिकेकडे आले आहेत. या अर्जांची संख्या आयुक्तांनी सरकारला कळविली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार अपूर्व हिरे व माजी आमदार वसंत गीते यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. यावेळी महाजन यांनी कपाट प्रकरणाचा तोडगा अंतिम टप्प्यात असल्याचे शिष्टमंडळाला सांगीतले. कपाटांसदर्भातील निर्णय हा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे अधिवेशनात पटलावर ठेवून त्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे महाजन यांनी सांगीतले. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कपाट प्रकरणाचा विषय ठेवला जाणार असल्याचे चित्र असून, कपाटाचा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिल्डरांसह, सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. यामुळे नाशिकचा ठप्प असलेल्या विकासालाही चालना मिळेल. दरम्यान, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा दावा महाजन यांनी केला आहे. असा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारपुढे नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पानेवाडी अपघातात तिघांचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड मनमाड-नांदगांव मार्गावरील पानेवाडी शिवारात इंडियन ऑइल कंपनीसमोर मोटार सायकल टँकर आणि इंडिकाच्या विचित्र अपघातात तीनजण ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले. मृतात दोन सख्या बहिणीत्यांचा मावस भावाचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदगांव तालुक्यातील जोंधळवाडीभालुर येथील राणी ज्ञानेश्वर काळे (१८), प्रतिभा ज्ञानेश्वर काळे (१३) या बहिणी आणि त्यांचा मावस भाऊ संदीप कडू आवारे (१७, रा. भालुर) हे तिघे मोटारसायकलवर नागापुर येथे महाशिवरात्रीनिमित्त दर्शनास आले होते. दर्शन घेऊन घरी पततत असताना त्यांच्या मोटार सायकलला कोणत्यातरी वाहनाने धडक दिली मात्र अपगात कसा घडला हे समजू शकलेले नाही. यात तिघेही मृत्यूमुखी पडले. तर अपघातात त्यांच्या सोबत असलेले शीतल साईनाथ काळे (२५) व समर्थ साईनाथ काळे (3०) हे गंभीर जखमी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडीचे सत्र थांबेना!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात घरफोडीच्या घटनांना ब्रेक लावण्यात अद्याप पोलिसांना यश मिळालेले नाही. मोकाट फिरणारे गुन्हेगार सर्वसामान्यांच्या घरातील मुद्देमालावर डल्ला मारीत असून शहरातील आडगाव, मुंबई नाका, इंदिरानगर व सातपूर या ठिकाणी झालेल्या चार घरफोड्यांमध्ये सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल केले आहेत.

गोविंदनगर

मुंबई नाका पोलिस स्टेशन हद्दीत समावेश होणाऱ्या गोविंदनगरमधील गुरुकृपा रो-हाऊसमध्ये राहणारे अशोक गोविंद कुलकर्णी २४ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत बाहेरगावी गेले होते. या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या स्वयंपाकगृहाच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी लोखंडी कपाटात ठेवलेले १ लाख २२ हजार रुपये किमतीचे ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केले. यात चेन, अंगठी, ब्रेसलेट, नाणे, रिंगा व रोख रक्कम या मुद्देमालाचा समावेश होता.

आडगाव शिवार

घरफोडीची दुसरी घटना आडगाव शिवारातील सरस्वतीनगरमध्ये झाली. येथील लिटल हाऊसमध्ये राहणारे राकेश कुमार शर्मा (वय ५४) हे २५ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत बाहेरगावी गेले होते. या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. यानंतर घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ४२ हजार ७०० रुपये किमतीचे १६ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरी केले. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदिरानगर परिसर

तिसरी घटना इंदिरानगर परिसरात घडली. पाथर्डी गावातील मेट्रोझोनसमोरील साफर अपार्टमेंटमधील रहिवासी गिरीश तुकाराम उगले हे रविवारी सकाळी ११ ते ४ या वेळेत बाहेर गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच, घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व १५ हजार रुपये रोख असा १ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी उगले यांच्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

सातपूर परिसर

अमृतेश्वरी कुटी येथील रहिवासी अजय कुमार परमानंद दिडा बाहेरगावी गेले असता त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात घुसलेल्या चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटात ठेवलेली सोन्याची चेन व एलईडी टीव्ही असा ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. शहरात घडणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास असमाधानकारक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माय अन् मावशीने भरले पंखात बळ!

0
0

jitendratarte@timesgroup.com

नाशिक : एमपीएससीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एसटीआय परीक्षेचा निकाल लागला. मी राज्यात प्रथम असल्याचा सुखद धक्काही मला बसला. आई मजुरी करते, त्या शेताच्या बांधावर जाऊन तिला जोर जोराने आवाज दिला. आईही लगबगीने काय झालं विचारत पुढे आली. तिच्याकडे बघून मला रडूच कोसळले. ती म्हणाली, कुठल्यातरी परीक्षेत पास झालास का? मी म्हटलं, नुसता पास नाही झालो राज्यात पहिला आलो. माझ्या या प्रतिक्रियेवर भरल्या कंठाने अन् ओलावलेल्या पापण्यांनी ती माऊली पाठमोरी होऊन पुन्हा शेतात मजुरीला निघून गेली. माझ्या या यशात माझ्या इतकाच माझाा आई आणि मावशीचा वाटा आहे. खरेतर माय अन् मावशीनंच माझ्या पंखात खरं बळ भरलं...!

हे भावोद्‍गार आहेत एसटीआय (सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर) या स्पर्धा परीक्षेत प्रथम आलेल्या दीपक वनसे याचे. निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द हे दीपकचे गाव. या परिसरात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शेतमजूर असलेल्या आई वडिलांच्या प्रेरणेने त्याने नाशिक गाठलं. बारावीनंतर आपल्या मुलानं प्लेन ग्रॅज्युएशनऐवजी फार्मसीचं क्षेत्र करिअरसाठी निवडावं ही त्या सहावी पास शेतमजूर माताची आग्रही इच्छा. यासाठी हाताशी असलेला शेतीचा इवलासा तुकडाही विकण्याची द्रोपदाबाई सुभाष वनसे यांची तयारी होती. आईच्या इच्छेसाठी त्याने नाशिकच्या पंचवटी कॉलेजात बी. फार्मसीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. कॅम्पस प्लेसमेंटमधून मिळालेली नोकरीही त्याने अल्पावधीत अधिकारी बनण्याच्या स्वप्नाने सोडली. दोन वर्षे अभ्यास करूनही हाती काही लागत नसताना यंदाच्या संधीचं सोनं करण्याचा निश्चय देवीदासने केला, तोच मुळात मुलासाठी प्रसंगी मजुरी करणाऱ्या आई द्रोपदाबाईंच्या आशावादी नजरा आठवून. आईची हीच आशावादी नजर माझ्यासमोर प्रतिकूलतेवर मात करून गेली असेही देवीदास सांगतो.

नातेवाईकांच्या घरात शिक्षणासाठी राहताना प्रत्येकाच्याच वाट्याला अनुकूलता येते असे नाही. मात्र, शिक्षणासाठी नाशिकमध्ये मावशी मंदाबाई तांदळकर यांच्याकडे राहताना त्यांनी स्वत: लोकांकडे धुणे भांड्याची कामे करीत भाच्याच्या स्वप्नांना उभारी दिली. आपल्या यशाचे मोठे शिलेदार माय अन् मावशी असल्याचेही देवीदास सांगतो. सरस्वतीचं रूप असणारी प्रेरणाशक्ती आपल्याच घरात आपल्याला कशी भेटू शकते, याचं उदाहरण दीपक वन्से याचं यश बनलयं!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चव्हाण हत्याप्रकरणी लाय डिटेक्टर टेस्ट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील इंद्रकुंड येथे झालेल्या वृध्देच्या हत्येप्रकरणी पंचवटी पेलिसांनी संशयितांपैकी एकाची लाय डिटेक्टर टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पंचवटी पोलिसांचे एक पथक संशयितांसह मुंबईला रवाना झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात संशयाची सुई असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या व्यवस्थापकाची पंचवटी पोलिसांनी सोमवारी दिवसभर चौकशी केली.

इंद्रकुंड येथील वल्लभाचार्य आश्रमातील एका खोलीत आठ फेब्रुवारी रोजी सिंधू चव्हाण (वय ७५) या वृद्धेची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली. गॅस सिलिंडर चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. चव्हाण ज्या जागेत राहत होत्या ती जागा एका बांधकाम व्यावसायिकाने घेतल्याचे आणि जागा खाली करण्यासाठी संबंधित वृद्धेला त्याने त्रास दिल्याचे समोर आले. मात्र, ठोस पुरावा नसल्याने तपासाची चक्रे त्या पाच संशयितांवरच थांबली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोरीत नाशिक-पुणे अव्वल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मागील दोन महिन्यात अॅन्टी करप्शन ब्यूरोने (एसीबी) राज्यभरात १९७ सापळे रचून २२० पेक्षा अधिक संशयित लाचखोरांना जेरबंद केले आहे. या कालावधीत नाशिक आणि पुणे परिक्षेत्रात सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी ३२ सापळे रचण्यात आले.

एसीबीने २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत लाचखोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितांकडून २३ लाख ३८ हजार ६०० रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. अटक केलेल्या लाचखोरांमध्ये महसूल विभागातील सर्वाधिक कर्मचारी असून, त्याखालोखाल गृह विभाग (पोलिस), ग्रामविकास, नगरविकास, एमएसईबी, आरोग्य, शिक्षण, वन विभाग, सहकार व पणन, कृषी विभाग, आरटीओ या विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात आठ महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.

नाशिक परिक्षेत्रात नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांचा समावेश होतो. नाशिक परिक्षेत्रात सर्वाधिक सापळे अहमदनगर जिल्ह्यात (०९) झाले असून, त्या खालोखाल नाशिक आणि जळगावमध्ये प्रत्येकी आठ, धुळे चार आणि नंदुरबारमध्ये अनुक्रमे चार आणि तीन सापळे रचण्यात आले. याबाबत माहिती देताना एसीबीचे अधीक्षक डी. पी. प्रधान यांनी सांगितले की, सर्वच वयोगटातील तक्रारांच्या संख्येत वाढ होत आहे. एसीबीकडून तक्रारदारांपर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळे फोन नंबर्स तसेच अप्लिकेशन, सोशल मीडिया यांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एसीबीकडे येणाऱ्या तक्रारीची लागलीच दखल होत असल्याने तक्रारदारांचा विश्वास वाढत असून, त्यातूनच सापळ्यांची संख्या वाढत असल्याचे प्रधान यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, लाचखोर अधिकारी वा कर्मचाऱ्यांबाबत सर्वसामान्यांना तक्रार करायची असल्यास त्यांनी पोलिस अधीक्षक डी. पी. प्रधान (९९२३१८५५६६) यांच्याशी किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच ०२५३-२५७५६२७, २५७८२३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रधान यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images