Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

रंगले बालकवी संमेलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कणा, स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या, अनंत, माझे जगणे होते गाणे, माझे जीवनगाणे.. कुसुमाग्रजांच्या या कविता तसेच स्वरचित कविता करीत बालकांनी बालकवी संमेलनात चांगलाच उत्साह निर्माण केला. निमित्त होते, लोकहितवादी संस्थेतर्फे आयोजित 'बालकवी संमेलनाचे'. राका कॉलनीतील ज्योतीकलश सभागृहात हे संमेलन पार पडले.

नाशिकमध्ये दरवर्षी बालकवींचे संमेलन व्हावे, अशी कल्पना कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी मांडली होती. ही जबाबदारी लोकहितवादी मंडळाने स्वीकारली आणि गेल्या २८ वर्षांपासून अव्याहतपणे सुरूही ठेवली. यासाठीच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी हे संमेलन आयोजित केले जाते. बालकवींना त्यांच्या कविता सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, हा संमेलनाचा उद्देश होता. इयत्ता पाचवी ते सातवी हा लहान गट व इयत्ता आठवी ते दहावी हा मोठा गट यानुसार हे स्पर्धात्मक संमेलन घेण्यात आले. शहरातील १२ ते १५ शाळांच्या १३० विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. इंग्रजी शाळांच्या विद्यार्थ्यांनीही कविता सादर केल्या. प्रत्येक बालकवीने एक कुसुमाग्रजांची कविता तर दुसरी स्वरचित कविता सादर केली. कवी प्रकाश वैद्य यांनी विद्यार्थ्यांना कुसुमाग्रजांच्या छापील कविता भेट म्हणून देऊ केल्या. लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, विश्वस्त दिलीप साळवेकर, मुकुंद कुलकर्णी, सरचिटणीस नवीन तांबट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. अरुण इंगळे व जयश्री वाघ यांनी परीक्षण केले. दोन्ही गटांमधील पहिल्या तीन विजेत्यांना रुपये ५०१, ३०१, २०१ रुपयांची तर उत्तेजनार्थ विजेत्यांना रुपये १०१ची बक्षिसे प्रदान करण्यात आली.

स्पर्धेतील विजेते

लहान गट प्रथम : अभिषेक जाधव द्वितीय : स्वानंद पारखी तृतीय : ऋतू पाठक उत्तेजनार्थ : मयुरी महाले, गायत्री वाणी

मोठा गट प्रथम : ऋचा शिंदे द्वितीय : केतकी मराठे तृतीय : ज्ञानेश्वरी वाघचौरे उत्तेजनार्थ : तनया जाधव, निनाद कुलकर्णी

सांघिक पारितोषिक लहान गट : शिशुविहार विद्यामंदिर मोठा गट : डे केअर सेंटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिंदुंनी इस्लाम समाजही समजून घेण्याची गरज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भविष्यात सर्व प्रश्न सारखे असून, सर्वांचे विचार अनेक बाबतीत समान आहेत. मात्र, इस्लाम हा भारतात आणि जगात अधिक चर्चेचा आणि वादाचा केंद्रबिंदू राहणार आहे. हिंदुंनी या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करायला हवा, इस्लाम देखील समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत आणि चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शेषराव मोरे यांनी केले. शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

प्रा. मोरे पुढे म्हणाले की, विद्यापीठ आणि माध्यमे यात प्रामुख्याने डाव्या विचारांची मंडळी मोक्याच्या जागेवर आहेत. त्यांच्या दहशतवादामुळे हिंदू न्याय विचार मांडणाऱ्याचे ऐकून घेतले जात नाही. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातच नव्हे तर सर्वच विद्यापीठात, सर्व अधिकाराच्या जागा डाव्या विचारसरणीच्या व्यक्तींनी बळकावल्या असून, हिंदूंच्या न्यायाची भाषा करणाऱ्यांना कोणताही अभ्यास न करता सरसगट प्रतिगामी ठरवून त्यांना सुविधा, पारितोषिके न देण्याचे कारस्थान विद्यापीठांच्या स्थापनेपासून शिजले आहे. सावरकर, हिंदू संघटन करणारे यांना हीन लेखले जाते. प्रतिगामी अशी शिवी दिली जाते. त्यांना पीएच. डी., प्राध्यापकी नाकारली जाते त्यामुळे लोक नाईलाजाने आपण पुरोगामी आहोत असे दाखवितात. आता यात बदल घडू लागले आहेत असेही मोरे यांनी नमूद केले.

सावरकर सर्व धर्मांना त्यांच्या संख्येच्या आधारे आरक्षण देण्यास तयार होते. मात्र, मुस्लिमांची मागणी ५० टक्के आरक्षणाची होती, ती सावरकरांना मान्य नव्हती. धर्म म्हणजे कर्मकांड नाही. धर्माची जागा पारलौकिक कल्याणासाठी आहे, असे त्यांचे मत होते हे सांगतानाचा शेषराव मोरे पुढे म्हणाले की, स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या व्यक्ती या कोणत्याही अभ्यासाशिवाय स्वा.सावरकर यांना प्रतिगामी ठरवितात. खरे तर सावरकर हे या पुरोगाम्यांपेक्षा पुरोगामी होते.

यावेळी न्यासाचे अध्यक्ष राजाभाऊ मोगल, विश्वस्त व सेक्रेटरी आनंद जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. आशिष कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. मोरे यांचा परिचय स्वानंद सोनार यांनी करून दिला. आनंद जोशी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहरला ‘तुझ्या अक्षरांच्या पंक्ती

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कविवर्य कुसुमाग्रजांच्या अजरामर कविता...वर्षानुवर्षे साधना केल्याने तावून सुलाखून निघालेला तीन कलावंतांचा स्वर...प्रत्येक कवितेला रसिकांची भरभरून दाद...टाळ्या...निश्वास...उसासे असा माहोल निर्माण झाला होता, 'तुझ्या अक्षरांच्या पंक्ती' या कार्यक्रमात. महाकवी कालिदास कलामंदिराचे वातावरण या भावविभ्रमांनी अगदी भारून गेले होते.

महाराष्ट्र टाइम्स आणि दातार जेनेटिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य कुसुमाग्रजांची जयंती अर्थातच मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला 'तुझ्या अक्षरांच्या पंक्ती' हा काव्यवाचन व नाट्य प्रवेशाचा कार्यक्रम शुक्रवारी झाला. या कार्यक्रमात किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र, प्रसाद ओक व स्पृहा जोशी या कसलेल्या कलावंतांनी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या. प्रसाद ओकचा गुलाबी आवाज, स्पृहा जोशीचा मधाळ आवाज तर किशोर कदम यांचा खर्जातला आवाज अशा तीन आवाजांचे मिश्रण झाल्याने 'तुझ्या अक्षरांच्या पंक्ती' कार्यक्रमात वेगवेगळे रंग भरले गेले.

सुरूवातीला किशोर कदम यांनी धीरगंभीर आवाजात 'नटसम्राट' नाटकातील एका उताऱ्याचे वाचन केले. त्यांनतर स्पृहा यांनी 'जाग' ही कविता सादर केली. 'सूर्यास्ताचे...हे चार किरण मी खुडून आणले आहेत, आजच्या असह्य...भयाण...तुफानलेल्या रात्रीसाठी. ते देणार नाहीत प्रकाश...पेटवणार नाहीत दिवे, ते फक्त जागृत ठेवतील...उद्याचा सूर्योदय, तुझ्या आणि माझ्या मनातला.' या कवितेनंतर प्रसाद ओक यांनी, 'तुम्ही जेव्हा माझ्या कवितेशी बोलता...तेव्हा माझ्याशी बोलू नका कारण माझ्या कवितेत मी असेन बराचसा...बहुधा' ही कविता सादर केली. 'माझ्या मराठी मातीचा... लावा ललाटास टिळा' ही कविता लयबध्द रितीने सादर करीत स्पृहाने त्यात रंगत आणली तर प्रसादने, 'माझं मराठीपण शोधलं मी सह्याद्रीच्या डोंगरात', ही कविता सादर केली. कविता व नाट्यप्रवेशांच्या सादरीकरणादरम्यान कुसुमाग्रजांच्या गीतांचे काही तुकडे पेरण्यात आले होते. 'माझ्या मातीचे गायन...तुझ्या आकाशश्रृतींनी...जरा कानोसा देऊन...कधी ऐकशील का रे?' हे गीत ऐकताना प्रेक्षक भावविवश झाले होते. 'रात्र म्हणजे नक्की काय, प्रकाशावर धरलेली साय, रात्री अपरात्री काही सुचणारा क्षण म्हणजे देव असावा, मी एका रात्री त्या नक्षत्रांना पुसले, परमेश्वर नाही मम मन घोकीत बसले, दिवेलागणीच्या ओल्या अंधारावर लोंबत असलेले रानकाजवे', परमेश्वराचा व नास्तिकाचा संवाद असलेला एक संवादतुकडा प्रसाद व किशोर कदम यांनी सादर केला. प्रसाद ओकच्या स्वरातील 'दर्शनाला आलात? या.. पण या देवालयात, सध्या देव नाही...गाभारा आहे, चांदीचे मखर आहे. सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे. त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.' ही मुक्तछंदातील कविता रसिकांची दाद मिळवून गेली. दिवाणखाणा, मधुराणी, कवीचे दु:ख, 'काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही, साद घालशील तेव्हाच येईल, पुरे झाले चंद्रसूर्य...पुरे झाला वारा, शिणलेल्या झाडापाशी, ओळखलंत का सर मला, मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले, सरणार कधी रण, मी एका बऱ्यापैकी घरात राहतो, नवलाख तळपती दीप विजेचे येथ' या कवितांनतर 'कौंतेय' नाटकाचा एक संवादतुकडा या तिन्ही कलावंतांनी सादर केला. 'सर्वात्मका शिवसुंदरा' या प्रार्थनेने 'तुझ्या अक्षरांच्या पंक्ती' या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी किशोर कदम, प्रसाद ओक, स्पृहा जोशी तसेच दातार जेनेटिक्सच्या शोभना दातार व अश्विनी घैसास यांचा सत्कार 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे आणि 'टाइम्स ग्रुप'च्या रिस्पॉन्स हेड मंजिरी शेख यांनी केला. कार्यक्रमाची संकल्पना नाट्यलेखक दत्ता पाटील यांची होती. दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले.

मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला सोहळा आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह, अप्पर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, महापौर अशोक मुर्तडक, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस उपायुक्त विजय पाटील, पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, महापालिका उपायुक्त जीवन सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रदीप पोतदार, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंबळे, मनसे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, सभागृह नेते सलिम शेख, गटनेते अनिल मटाले, भाजपाचे लक्ष्मण सावजी, अजय बोरस्ते या मान्यवरांच्या उपस्थितीत 'मटा'चा काव्य व नाट्य अभिवाचन सोहळा रंगला. आपल्या कुटुंबीयांसोबत आलेल्या या मान्यवरांचा शुक्रवार रमणीय झाला.

कार्यक्रम हाऊसफुल्ल 'तुझ्या अक्षरांच्या पंक्ती' हा काव्यवाचनाचा कार्यक्रम २६ फेब्रुवारी रोजी होता परंतु, २५ फेब्रुवारी रोजीच नाशिककरांनी सर्व तिकिटे राखीव केल्याने हाऊसफुल्लचा बोर्ड लावावा लागला. कुसुमाग्रजांच्या कवितांवरील प्रेमच यातून व्यक्त झाले. कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांची प्रचंड उपस्थिती होती. मुख्य नाट्यगृह भरून ओसंडून वहात होते. त्यामुळे प्रेक्षकांची सोय बाल्कनीत करण्यात आली. काही वेळाने बाल्कनीतही बसायला जागा नसल्याने कालिदासच्या मधल्या पॅसेजमध्ये उभे राहून या कार्यक्रमाचा आनंद सर्वांनी घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावजवळ अपघातात घोटीतील दोघांचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

सौंदाणे (ता. मालेगाव) जवळ मारुती व्हॅनला आयशर ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात इगतपुरी तालुक्यातील घोटी शहराचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपालिका सदस्य राजेंद्र भाईदास माळचे यांच्यासह घोटी शहरातील एका युवकाचा मृत्यू झाला. या घटनेने शहरावर शोककळा पसरली असून, दोघांवर घोटीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

घोटीचे माजी सरपंच राजेंद्र माळचे (वय ४२) व त्यांचा सहकारी साजीद सलीम तांबोळी (वय २८) हे दोघेही कामानिमित्त शुक्रवारी घोटी येथून मारुती व्हॅनने मालेगावला गेले होते. घोटीकडे परतत असताना सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सौंदाणे गावाजवळ व्हॅनला आयशर गाडीने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात राजेंद्र माळचे हे जागीच ठार झाले तर, साजीद तांबोळी हा गंभीर जखमी झाला. जखमी साजीदचाही पहाटे उपचारादाम्यान मृत्यू झाला.

माळचे यांनी घोटी ग्रामपालिकेत गत पंचवार्षिकमध्ये सलग पाच वर्ष सरपंच म्हणून काम पाहिले. तर, दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत त्यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली. राजेंद्र माळचे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. साजीद तांबोळी यांच्या पश्चात वडील, पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीच्या मारहाणीविरुद्ध महिलेची पोलिसांत तक्रार

0
0

नाशिकरोड : मद्यपी पतीने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार सौभाग्यनगर, देवळाली कॅम्प येथील महिलेने नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिली आहे. सध्या महिला आधारश्रमात दाखल झाली आहे.

संबंधित (वय ३४, घरकाम, श्रद्धापार्क सोभाग्यनगर, देवळाली कॅम्प) महिलीचे एका युवकावर पाच वर्षांपासून प्रेम होते. एक वर्षापूर्वी तिने आई-वडिलांच्या इच्छेविरुध्द कोर्टात रजिस्टर विवाह केला. कुशन काम करणारा पती दारू पिऊन तिला शिवीगाळ करू लागला. . त्याने शारीरिक व मानसिक छळ सुरूच ठेवल्याने तिने पोलिसांत तक्रार दिली. हा प्रेमविवाहाच उपनगर पोलिस ठाण्यावर लष्कराच्या जवानांच्या हल्ल्यास कारणीभूत ठरला होता. मुलीचे नातेवाईक उपनगर पोलिस ठाण्यात एक वर्षापूर्वी गेले होते. तिच्या लष्करात असलेल्या एका नातेवाईकाला गाडी पार्किंगवरून उपनिरीक्षकाने मारहाण केली होती. नंतर लष्करी अधिकारी मित्रांनी पोलिस ठाण्यावर हल्ला करून प्रचंड तोडफोड केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वातीन लाखाची रोकड लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यापाऱ्यांना देण्यासाठी काढलेले पैसे दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले असताना चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला. तिडके कॉलनी रोडवर शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सव्वातीन लाख रुपयांची रोकड लंपास झाल्याची माहिती समजताच परिसरात खळबळ उडाली.

इंदिरानगर परिसरातील गितांजली कॉलनीतील उपासना बंगला येथे राहणाऱ्या प्रशांत प्रकाश नलावडे (वय ३३) यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. नलावडे व्यावासायिक असून, इतर व्यापाऱ्यांना देण्यासाठी तीन लाख २० हजार रुपयांची रक्कम काढून आपल्याकडील दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. दुपारी तीन वाजेच्या सुमारास तिडके कॉलनीरोडवर चोरट्यांनी ही रक्कम चोरी केली. सीबीएस येथे अंगावर घाण पडल्याची बतावणी करून व्यापाऱ्याकडील पैसे चोरी केल्याच्या घटनेचा कोणताही तपास लागलेला नसताना चोरटे एकामागून एक गुन्हे करीत पोलिसांना आव्हान देत आहे. मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीच अधिक तपास पीएसआय पवार करीत आहे.

दरम्यान, चोरट्यांनी २४ फेब्रुवारी रोजी ११ ते २ वाजेच्या सुमारास डोंगरे वसतिगृह मैदानाच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या विद्यार्थ्याच्या दुचाकीची डिक्की फोडून आतील चार मोबाइल व पाचशे रुपये रोख रक्कम काढून पोबारा केला. सातपूर अंबड लिंकरोडवरील बजरंग सोसायटीत राहणारा राजू मदन झा (वय १८) हा परीक्षा देण्यासाठी व्ही. एन. नाईक कॉलेजमध्ये गेला होता. त्यावेळी झा आणि त्याच्या मित्रांनी आपल्याकडील मोबाइल काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते. घटनेच्या दोन दिवसानंतर सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल झाली आहे.

भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट कारने धडक दिल्याने रेहान इस्लाम इनामदार (वय १६) या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना हॉटेल संदीप समोर घडली. रेहान आपल्याकडील दुचाकीने जात असताना भरधाव वेगात जाणाऱ्या कारने (एमएच ०४ इक्यू ७९२७) धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या रेहानचा मृत्यू झाला. मुंबई नाका पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.

महिलेस सहा महिन्याची शिक्षा सातपूर पोलिस स्टेशनहद्दीत सुरू असलेल्या अनैतिक व्यावसायात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या सुमन ईश्वर खैरनार या महिलेस कोर्टाने कलम ३४२ नुसार दोषी ठरवत सहा महिने शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सन २०१० मधील या प्रकरणात पोलिसांनी आरोपी खैरनारसह आणखी चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली. यात कोर्टाने खैरनार वगळता इतरांना निर्दोष सोडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रवाशांची साडेसाती संपेना!

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मध्य रेल्वेच्या प्रवाशांची साडेसाती संपता संपत नाही. भुसावळ रेल्वे स्टेशनकडील झेडटीसी भागातील क्रॉसिंगजवळ शनिवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास मालगाडीचे डबे घसरल्याने नागपूर मार्गावरील अप व डाऊन दिशेची रेल्वेवाहतूक सुमारे नऊ तास ठप्प झाली. यामुळे नाशिकरोड स्थानकात सायंकाळी पाचपर्यंत गर्दी झाली होती. दहा दिवसात या मार्गावरील हा तिसरा अपघात आहे.

दोनच दिवसांपूर्वी कसाऱ्याजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर, दहा दिवसांपूर्वी रेल्वेमार्गावर झाड पडल्याने पंचवटी रात्री अडीचला नाशिकरोडला आली होती.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रेल्वे यार्डातील सी केबिनजवळ सिमेंट घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे चार डबे लोहमार्गावरून घसरले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. मालगाडी घसरल्यानंतर नागपूरकडे जाणाऱ्या अप व डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. त्यामुळे डाऊन मार्गावरील एलटीटी-शालिमार (हावडा) एक्स्प्रेस, एलटीटी भुवनेश्वर एक्स्प्रेस, कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाड्या खंडवा- इटारसीमार्गे वळविण्यात आल्या, तसेच अप मार्गावरील गीतांजली एक्स्प्रेस ही इटारसी- खंडवामार्गे, तर चेन्नई- अहमदाबाद नवजीवन एक्स्प्रेस ही गाडी वर्ध्यावरून नागपूर इटारसी खंडवामार्गे वळविण्यात आली. हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला अकोल्याहून वाशीम-पूर्णा-औरंगाबाद मार्गे वळविण्यात आले. सायंकाळी पाचपर्यंत सर्व वाहतूक सुरळीत झाली होती.

क्रेनचा वापर घसरलेल्या मालगाडीचे डबे क्रेनच्या साह्याने हटविण्यात आले. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास युद्धपातळीवर एका मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात यश आले. डाऊनच्या लोहमार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याने गीतांजली एक्स्प्रेस धावली व दुपारी तीनला अप दिशेच्या लोहमार्गावरील वाहतूक सुरू झाली. नागपूर मार्गावरील डाऊन दिशेला जाणाऱ्या गाड्या भुसावळ रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात आल्यानंतर बदललेल्या मार्गावरून जाण्यासोबत तिकिटाचे पैसे परत घेण्याचा पर्याय प्रवाशांसमोर रेल्वेने ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाळेधारकांना त्रास अस्वच्छतेचा

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या सी-११ इमारतीतील गाळेधारकांना बाराही महिने अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याने उद्योजकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेळोवेळी महापालिका व एमआयडीसीकडे तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्यानाे गाळेधारक त्रस्त आहेत. सर्व कर भरून देखील घंटागाडीची सुविधा मिळत नसल्याने उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सातपूर औद्योगिक वसाहतीत लघु उद्योजकांना प्रगती करता यावी यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने गाळ्यांची उभारणी केली होती. यामध्ये एमआयडीसीने उभारलेल्या दोनशेहून अधिक गाळ्यांमध्ये लघु उद्योजकांनी आपले व्यावसाय सुरू केले. परंतु गेल्या काही वर्षांपासून एमआयडीसीने उभारलेल्या गाळ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातच या परिसरात बाराही महिने कचऱ्याचे साम्राज्य असते. तसेच गाळ्यांची उभारणी झाल्यापासून रस्ते देखील झालेले नाहीत. सांडपाण्याची व्यावस्थाही नसल्याने उद्योजकांना या सांडपाण्यातूनच गाळ्यामध्ये प्रवेश करावा लागतो. या उद्योजकांकडे कामासाठी येणाऱ्या कामगारांना, ग्राहकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.

अस्वच्छतेमुळे या भागात डास, कीटक यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

कचरा व सांडपाण्याच्या समस्येबाबत महापालिका व एमआयडीसीकडे उद्योजकांनी वेळोवेळी तोंडी तसेच लेखी तक्रारी केल्या आहेत. परंतु उद्योजकांच्या समस्येकडे कुणीही लक्ष देत नसल्याने इथली अस्वच्छता दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेचा कर भरून देखील घंटागाडी कचरा संकलन करण्यासाठी येत नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. एमआयडीसीने या गाळ्यांचे अंतर्गत रस्ते करुन द्यावेत व महापालिकेने नियमीत घंडागाडी पाठवावी अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुभाजकातील झाडांमुळे अपघात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोडवरील रस्ता दुभाजकांमध्ये लावलेल्या झाडांची छाटणी केली जात नसल्यामुळे ही झाडे अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत. या फोफावलेल्या झाडांची छाटणी त्वरित करावी अशी मागणी मॉडेल कॉलनी, सावरकर कॉलनी, नवनाथ चाळीतील रहिवाशांनी केली आहे.

बिटको ते जेलरोडदरम्यान दुभाजकांमध्ये साधी माती टाकण्यात आली आहे. त्याही परिस्थितीत या ठिकाणी फुलांची व इतर झाडे उगवली आहेत. पाणी दिले जात नसल्याने प्रेससमोरील दुभाजकांमधील झाडे वाळली आहेत. जेलरोडच्या शिवाजीनगर ते सैलानीबाबा चौकापर्यंत दुभाजकातील झाडे फोफावली आहेत. या काटेरी झाडांमुळे वाहनचालकांच्या डोळ्याला दुखापत होत आहेत. झाडे वाचवताना अपघात होत आहेत. तसेच रस्ता ओलांडणाऱ्यांना येणारी वाहने झाडांमुळे दिसत नाहीत. येथे गतीरोधकांची आवश्यकता असताना ते टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहने प्रचंड वेगात असतात. झाडांमुळे वेगात आलेले वाहन दिसत नाही आणि वाहन चालकाला रस्ता ओलांडून अचानक समोर आलेली व्यक्ती दिसत नाही. यामुळे एखाद्याचा बळी गेल्यानंतर झाडांच्या फांद्या छाटणार का?, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. यावर त्वरीत कार्यवाही करण्याची नागरिकांची मागणी आहे


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतप्त महिलांचा मोर्चा

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

पाणीटंचाईचे चटके येवला शहरवासीयांना बसत असून, शहराला दहा दिवसाआड एकवेळ होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे शहरात अभुतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरातील जोगवाडा, भोईगल्ली, कानडी गल्ली, गांधी मैदान या भागातील महिलांसह नागरिकांनी नगरपालिका कार्यालयावर पाण्यासाठी मोर्चा काढला. पालिका प्रवेशद्वारावरच ठिय्या मारताना जोरदार घोषणा देत पाणीपुरवठा लगेचच करा, अशी मागणी संतप्त महिलांनी केली.

राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष राजेश भांडगे, भाजप शहराध्यक्ष आनंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील महिला या आंदोलनामध्ये सामील झाल्या होत्या. पाण्यासाठी महिलांचा आक्रोश सुरू असताना महिलांना कसे सामोरे जावे या विचाराने नगरसेवकांची बघ्याची भूमिका यावेळी दिसून आली. पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे हे प्रवेशद्वारावरच ठिय्या मारून बसलेल्या महिलांना सामोरे गेले खरे, मात्र दोन तास पाणीपुरवठा केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा पवित्रा महिलांनी घेतला होता. पाणी कुठूनही उपलब्ध करा, अशी मागणी करताना पाणीपट्टी, घरपट्टी घेता मग पाणीपुरवठ्याची जबाबदारी का पार पाडत नाही अशा अनेक प्रश्नांचा भडीमार यावेळी संतप्त येवलेकर महिला करताना दिसत होत्या. येत्या काही दिवसात पाणीटंचाईचा प्रश्न गडद होणार आहे. यामुळे टँकने पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिकेवर येणार आहे.

शाब्दीक चकमक नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे व महिलांमध्ये यावेळी चांगलेच जोरदार शाब्दीक युध्द रंगल्याचे चित्र दिसले. संतप्त महिला व प्रभागातील नागरिक यावेळी आपले आंदोलन मागे घेण्यास तयार नसल्याने नगराध्यक्षांनी अखेर आंदोलनाच्या ठिकाणावरून काढता पाय घेतला. शहरातील भोईवाडा, बालेश्वरी मंदीर व गांधी मैदानाजवळील विहिरींवर नागरिकांनी स्वतःच्या विद्युत पंप बसवून पाणी घ्यावे. तसेच, बालेश्वरी मंदिराजवळील हातपंपाची दुरुस्तीसह खोलवर पाइपलाइन टाकण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाकडून मिळाल्यानंतर महिला माघारी परतल्या.

साठवण तलावात अत्यंत कमी पाणीसाठा आहे. पालखेडचे पुढील पाणी आवर्तन एप्रिल अखेरीस मिळणार असल्याने उपलब्ध पाणी अत्यंत जबाबदारीने पुरवायचे आहे. शहरवासीयांनी वस्तुस्थिती लक्षात घेता संयमाने घेण्याची गरज आहे. टंचाई परिस्थिती बघता पाण्याचा काटकसरीने वापर करावा. - राहुल वाघ, मुख्याधिकारी, येवला नगरपालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृत्रिम पाणीटंचाईची सिन्नरकरांना झळ

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर शहर परिसरात कृत्रिम पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. जलवाहिनी सातत्याने फुटत असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात एक दिवसाआड, तर उपनगरात दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा चार, चार ते आठ दिवसांनी होत असल्याने शहरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

सिन्नर शहराला दारणा नदीपात्रातून पाणीपुरवठा होतो. या ठिकाणी नाशिक-पुणे महामार्गाचे रूंदीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या जलवाहिनीला जेसीबीचा धक्का लागला, तर जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. वेगवेगळ्या कारणामुळे जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण वाढले असून, तुटलेली जलवाहिनी पूर्ववत जोडण्यासाठी मोठा वेळ लागतो. त्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. त्याचा फटका पाणी पुरवठ्यावर होऊन शहरात कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना तोंड द्यावे लागते.

चिंचोली जवळील काँक्रीट रस्त्याखाली असलेल्या जलवाहिनीचा लिकेज असल्याचा शोध नगरपालिका कर्मचाऱ्यांना लागला. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाण्याचे लिकेज होत असल्याचे निदर्शनात आल्या नंतर ही जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली. गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणाहून पाण्याचे लिकेज होऊन लाखो लिटर पाणी वाया जात होते. सदरचे काम युद्ध पातळीवर केल्यानंतर शहरात पाणीपुरवठा टप्याटप्याने सुरू करण्यात आला.

कडवाची योजना ठप्पच! सिन्नर नगरपालिकेत माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची सत्ता असून, त्यांच्या प्रयत्नातून नव्याने होत असलेली कडवा धरणातून थेट पाइपलाइनची योजना पूर्ण झाल्यावर सिन्नरकरांना चोवीस तास पाणी मिळेल असे सत्ताधारी गटातर्फे सांगण्यात येते. मात्र, या योजनेचे काम गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे. त्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार या बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीपात्र कोरडेठाक; महिला पाण्याच्या शोधात

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

देवळा नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणूव लागली आहे. देवळा गावाला पाणीपुरवठा करणारे गिरणा नदीपात्र कोरडेठाक झाल्याने देवळ्यासह परिसरात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

देवळ्यासह परिसरातील गावांना सामुदायिक पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना गेल्या दोन आठवड्यापासून पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. परिणामी या सर्व नळपाणी पुरवठा योजना पूर्णत: ठप्प झाल्या आहेत. शहरातील उपनगरामध्ये देखील तीव्र टंचाई जाणूव लागल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पिण्याच्या पाण्यासह वापराचे पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने महिला वर्गाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायत व नगरपंचायतीच्या विंधनविहिरी देखील आटू लागल्याने या ठिकाणी महिलावर्गांचे भांडणे होऊ लागली आहेत.

सद्यस्थितीत अशी स्थिती असताना मार्च, एप्रिल व मे महिन्यातील परिस्थिती किती बिकट असेल यावरून अंदाज बांधला जाऊ लागला आहे. देवळा शहरासाठी स्वतंत्र जलशुद्धीकरण पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाच्या टप्प्यावर असली तरीही गिरणा नदीपात्रातील पाण्याचा स्त्रोत बघता सदरची योजना कितपत यशस्वी ठरते हे येणारा काळच ठरविणार आहे.

चाराटंचाईचेही संकट बागलाण तालुक्यातील गत काळात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट या कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना चाराटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शेतकरी व पशुपालकांना ऊस बांडी खरेदी करून आपल्या जनावरांचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. ऊसतोड कामगांराकडून सांयकाळी शेकडा दराने खरेदी करतात. उन्हाळ्यात चाराटंचाई भासू नये म्हणून उसाची बांडी खरेदी करून साठा करतात. शेतीला जोडधंदा म्हणून केला जाणारा दुग्धव्यवसाय चाऱ्या अभावी अडचणीत येऊ पाहत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानूरकरांना मिळतील बंधारे भरून

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील चणकापूर उजव्या कालव्यातून चार दशलक्ष पाणी देऊन मानूर गावातील बंधारे भरून देण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, अद्यापही पाणी न मिळाल्याने मानूरकरांनी तहसीलदार अनिल पुरे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. या प्रकरणातून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखविण्याचा प्रकार समोर आला असून, पाटबंधारे विभागाच्या सहाय्यक अभियंता व शाखा अभियंता यांनी सारवासारव करीत मानूर गावासाठी पाणी देण्याचे आश्वासन दिले.

तहसीलदार अनिल पुरे, पोलिस निरीक्षक मधुकर गावित, पाटबंधारे विभाग सहाय्यक अभियंता ए. बी. करनाळे, शाखा अभियंता डी. वाय. बच्छाव, पंचायत समिती उपसभापती अॅड. संजय पवार यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत मानूर येथील नागरिकांनी हक्काचे पाणी मिळावे म्हणून मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीटंचाईकडे कानाडोळा

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड तालुक्यात तीव्र पाणीटंचाईची भेडसावू लागली आहे. पंचायत समिती सदस्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांची पाणीटंचाईची स्थिती मांडायची होती. मात्र, प्रशासानातील महत्त्वाचे अधिकारी उपस्थित नसल्याने निफाड पंचायत समितीची मासिक बैठक सदस्यांनी निषेध नोंदवून तहकूब केली. बैठकीला वीसपैकी ९ सदस्यही अनुपस्थित होते.

निफाड पंचायत समितीची वार्षिक सभा होती. सभापती सुभाष कराड, सदस्य विनायक चौधरी, प्रकाश पाटील, बालू हिले, रंजना थेटे, सुनीता शेलार, कुसूम गांगुर्डे, संदीप सोनवणे, रोहिणी जाधव, जयंत पवार, प्रतिमा कदम या सदस्यांनी बैठकीसाठी सभागृहात प्रवेश केल्यानंतर अनेक विभागांचे अधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे संतप्त सभापती व सदस्य यांनी गटविकास अधिकारी इंदिरा आस्वार यांच्याकडे अधिकारी उपस्थित नसल्याचे सांगितल्याने त्यांनी ही सभा रद्द करावी, असे निर्देश दिले. अधिकारी वर्गाला गांभीर्य नसल्याबद्दल सदस्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. सध्या अनेक गावांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे.

अधिकारीच जर मासिक बैठकीला उपस्थित राहत नसतील, तर आमच्या सदस्यत्वाला काय अर्थ आहे. पाणीटंचाईच्या मुद्यावर सभेत अनेकांना आपली मत मांडायची होती. मात्र प्रशासनच नाही तर सूचना कोणाला करणार. - प्रकाश पाटील, सदस्य, लासलगाव गण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे-मालेगावच्या विकासाला मिळणार गती

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळावी ही या परिसरातील जनतेची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी होती. रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गाला मंजुरी मिळाल्याने या भागाच्या सर्वांगिण विकासाला गती मिळणार आहे, असे प्रतिपादन धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

मालेगाव येथ आयोजित पत्रकार परिषदेत खासदार डॉ. भामरे बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव, महानगर अध्यक्ष सुनील गायकवाड, तालुकाध्यक्ष दीपक पवार, भाजपनेते अद्वय हिरे, नितीन पोफळे, जेष्ठ नेते सुरेश निकम, मदन गायकवाड, भिकण शेळके, पवन ठाकरे आदी उपस्थित होते. मनमाड-मालेगाव-इंदूर रेल्वे मार्गाच्या मंजुरीबाबत डॉ. भामरे म्हणाले की, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी खात्याचा कारभार हाती घेतला त्यावेळेपासूनच आम्ही या मार्गाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करीत होतो. या मार्गाच्या मंजुरीचे अधिकृत पत्र मला दिले आहे. त्यानुसार या रेल्वेमार्गासाठी ४ हजार ९६८ कोटी रुपये निधी केंद्रने मंजूर केला आहे. या मार्गाच्या उभारणीत केंद्र ५० टक्के तर महाराष्ट्र व मध्यप्रदेश दोन्ही राज्य ५०-५० टक्के वाटा उचलणार आहेत. तसेच स्पेशल पर्पज व्हेकल माध्यमातून देखील या मार्गासाठी निधी उभारण्याच्या सूचना रेल्वेमंत्री यांनी दिल्या आहेत.

मार्गाचा बराच भाग मध्यप्रदेशातील लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या मतदारसंघातून जातो. त्यांनी देखील केंद्राकडे यामार्गाच्या मंजुरीसाठी आग्रह धरला. आगामी काळात देखील या मार्गासाठीचे भूसंपादन व राज्यांच्या मंजुरीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे या भागाच्या विकासाची चाके अधिक वेगाने फिरण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सटाणा पालिकेचे अंदाजपत्रक मंजूर

0
0

म. टा, वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपरिषदेच्या सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा कोणताही करवाढ नसलेला सुमारे ३३ कोटी रुपये खर्चाचा अर्थसंल्कप नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

अर्थसंकल्पात शहरातील पिण्याच्या पाण्याचे संकट दूर करण्यासाठी विशेष भर देण्यात आला आहे. त्यात पुनद धरणातील वाढीव पुरक पाणीपुरवठा योजनेसाठी ३५ लाख रुपये, ठेगोंडा वळण बंधारा व मळगाव बंधारा उंची वाढविण्याबरोबरच गिरणा नदीत एक, शहरातील आरम नदी एक व महालक्ष्मीमंदिरा जवळ तीन भूमिगत बंधाऱ्यासाठी २८ लाख रुपये, सुजल निर्मल अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनांसाठी ३८ लाख ५० हजार रुपये, विंधन विहिरी घेण्यासाठी १६ लाख ५० हजार रुपये, नियोजित साठवण तलाव व के.टी. वेअर साठी ५५ लाख रुपये, रस्ता काँक्रिटीकरणासाठी १ कोटी ६५ लाख रूपये, दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत विकासकामांसाठी ६० लाख रुपये, शहरात जिमनॅशिअम हॉल बांधणे, ग्राहक मीटर बसविण्यासाठी ५५ लाख रुपये, इदगाह परिसरात कंपाऊड बांधणे व पेव्हर ब्लॉक बसविणेसाठी ११ लाख रुपये, जॉगिंग ट्रॅकवर पेव्हर ब्लॉक बसविणे २२ लाख रुपये, शॉपिंग सेंटर उभारण्यासाठी २७ लाख रुपये, म्हाडा योजनेंगर्तत घरकुल उभारण्यासाठी १ कोटी १० लाख रुपये, हंगदारीमुक्त शहर करण्यासाठी ८८ लाख ७५ हजार रुपये, भुयारी गटार योजना अंमलबजावणीसाठी ७० लाख रुपये, आदी कामांसाठी तरतुद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गेल्या महिन्याभरापासून सोनेवाडी, कोलवाडी व निफाड शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. यामुळे या भागातील नागरिकांसह वनविभागानेही समाधान व्यक्त केले.

निफाड शहरापासून अवघ्या दोन ते तीन किमी अंतरावर असलेल्या एका शेतात बिबट्यास पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले. निफाडपासून सोनेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत निफाड येथील सुरेश छगन कुंदे यांची द्राक्षबाग आहे. या परिसरात बिबट्याने गेल्या महिन्याभरापासून दहशत निर्माण केली होती. शेतवस्तीतील काही कुत्र्यांचा त्याने फडशाही पाडला होता. त्यात शेतकऱ्यांना बिबट्याची मादी व तिचे दोन बछडेही नजरेस पडले होते. यामुळे बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वनविभागाने कुंदे यांच्या द्राक्षबागेत पिंजरा लावला होता.

रविवारी सकाळी सुनील नारायण कुंदे यांना या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे दिसले. येवला वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. आर. ढाकरे, वनपाल टी. डी. भोये, वनरक्षक व्ही. आर. टेकनर, वनकर्मचारी डी. आर. पगारे, लोंढे, अहिरे आदींचे पथक तातडीने कुंदे यांच्या शेतात पोहचले. निफाड, सोनेवाडी परिसर, नांदुर्डी शिवार, दावचवाडी या भागात लोकांना नजरेस पडलेला तो हाच बिबट्या असावा, असा अंदाज आहे. जेरबंद बिबट्याची रवानगी नाशिक येथे सकाळी नऊ वाजता करण्यात आली. जेरबंद बिबट्या हा सहा ते सात वर्षे वयाचा आहे. अन्न-पाण्यासाठी भटकंती

जंगल कमी झाल्याने तसेच ऊसतोड सुरू असल्याने बिबटे मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. यामुळे पाळीव प्राणी तसचे माणसांवरही बिबटे हल्ले करू लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शेतात घर बांधून राहण्यास सुरुवात केल्याने बिबटे सर्रास नजरेस पडू लागले आहेत. निफाड तालुक्यात ‌आतापर्यंत बिबट्याने अनेकांना जखमी केले आहे. कुरडगाव, कोठुरे, सुंदरपूर, जळगाव, काथरगाव व नांदूरमधमेश्वर परिसरातील काही गावांमध्ये महिनाभरापासून बिबट्यांचा संचार आढळून येतो. गेल्याच महिन्यात नांदुर्डी शिवारात बिबट्या दिसून आला होता. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असल्याने मजूरही भयभीत झाले आहेत.

येथे लावणार पिंजरा

सोनेवाडी रोड परिसरात अजून बिबट्याची मादी व तिचे दोन बछडे यांचे वास्तव्य असल्याने वनविभाग सोमवारी (दि. २९) या परिसरातील शेतात पिंजरा लावण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिवासासाठी शोध

गोदाघाट परिसरातील भुसे, शिंगवे, सोनगाव, नांदूरमधमेश्वर, शिवरे, मांजरगाव, चापडगाव, सारोळेथडी, नैताळे, सोनेवाडी ते पुढे थेट सायखेडा, चांदोरी पर्यंतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस लागवड क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्या, तरस, लांडगे, कोल्हे या वन्यजीवांना लपण्यासाठी हे ऊस लागवड क्षेत्र उत्तम अधिवास होऊ पाहत आहे.

मोटरसायकलस्वारही होताहेत लक्ष्य

कुरुडगाव येथे बिबट्याने हल्ला केल्याने मोटरसायकलवरील महिला गंभीर जखमी झाली होती. ही घटना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घडली होती. साहेबराव बोडके हे पत्नी मीराबाई (वय ४०) यांना घेऊन मोटरसायकलवरून निफाड येथील बाजारात वांगी विक्री करून कुरूडगावला परतत होते. बोडके वस्तीजवळ बिबट्याने बोडके यांच्या मोटरसायकलवर हल्ला केला होता. यावेळी त्यांच्या पायाला चावा घेतल्याने त्या जबर जखमी झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओमुळे डोकेदुखी

0
0

नवीन वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना आरटीओ कार्यालयाद्वारे आरसी बुक, ड्रायव्हिंग लायसन दिले जाते. पूर्वी आरटीओ कार्यालयातूनच थेट वाहनधारकांना अशी महत्त्वपूर्ण कागदपत्रे वितरित केली जात. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून ही कागदपत्रे टपालाद्वारे घरपोच पाठविली जातात. त्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून ५० रुपये शुल्क आकारण्यात येते. शुल्क भरूनही वेळेत कागदपत्रे प्राप्त होत नसल्याचा अनुभव नागरिकांना येतो आहे. आरटीओ आणि टपाल विभागात समन्वय नसल्याने ही कागदपत्रे घरपोच मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होतो आहे. आठ दिवसांत ही कागदपत्रे घरी पोहोचतील, असे नागरिकांना सांगितले जात असले तरी दोन महिन्यांहून अधिक काळ ती घरी पोहोचत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांचा टपाल सेवेवरील विश्वास उडाला आहे.

आरटीओ कार्यालयात कागदपत्रांबाबत चौकशी केल्यास ती टपाल विभागाकडे पाठविल्याचे नागरिकांना सांगितले जाते. मुख्य किंवा जवळच्या टपाल कार्यालयात चौकशी करा, असा सल्लाही दिला जातो. टपाल कार्यालयात धाव घेणाऱ्या नागरिकांना एकतर दादच दिली जात नाही. अद्याप तुमची कागदपत्रे आम्हाला प्राप्त झालेली नाहीत असे सांगून त्यांना तेथून पिटाळून लावले जाते. पुन्हा नागरिक आरटीओ कार्यालयात जातात. मात्र, तेथेही कागदपत्रे हाती मिळत नाहीत. घरचा पत्ता अपूर्ण किंवा चुकीचा दिला असेल, पोस्टमन कागदपत्रे घेऊन आला असेल मात्र तुम्हीच घरी नसाल, त्यामुळे कागदपत्रे टपाल विभागाने आमच्याकडे परत पाठविली असतील, अशी उत्तरे देऊन नंतर चौकशी करा असे सांगत बोळवण केली जात असल्याचा अनुभव नागरिकांना येतो आहे. परिणामी त्यांना अनेकदा हात हलवितच परतावे लागत आहे. दररोज शेकडो नागरिक असा अनुभव घेत असून वेळेच्या आणि पैशाच्या अपव्ययाबरोबरच त्यांना मनस्तापही सहन करावा लागतो आहे.

आठवड्यात दोनदा हवी सुविधा आपल्याकडे ९० टक्के लोकांचे परवाने व तत्सम कागदपत्रे घरपोच मिळत आहेत. केवळ १० टक्के लोकांनाच अशी कागदपत्रे टपालाने घर पोहोच मिळण्यास अडचणी येत असल्याचा दावा आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी पेठरोड येथील आरटीओ कार्यालयात थेट वाहनधारकांच्या हातात अशी कागदपत्रे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, महिन्यातून एकच दिवस ही सुविधा असल्याने तेथे नागरिकांची झुंबड उडते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी नागरिकांना महिनाभर मनस्ताप सहन करावा लागतो. आरटीओ कार्यालयाने आठवड्यात किमान दोनवेळा अशी कागदपत्रे वितरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

आर्थिक भुर्दंडास जबाबदार कोण? एकीकडे नागरिकांना आरटीओ आणि टपाल कार्यालयांकडून कागदपत्रे वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तर दुसरीकडे ठिकठिकाणी पोलिस वाहनधारकांना अडवून कागदपत्रे सोबत बाळगली नाहीत म्हणून दंड वसूल करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळत असून वादाचे प्रसंग उदभवत आहेत. आरटीओ कार्यालयातून कागदपत्रे मिळाली नाहीत असे सांगूनही उपयोग होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांची मारहाणीविरोधात गांधीगिरी

0
0

कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना संप, आंदोलने करता येत नसल्याने, 'आम्ही एक पोलिस आहोत' असे डीपी शनिवारी राज्यभरातील अनेक पोलिस कर्मचारी, व्हॉटसअॅप ग्रुप्स, पोलिस बॉईज संघटना यांनी ठेवले होते. यासोबतच 'पोलिस वगळता इतर कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यांसोबत मारहाण झाली असती तर अनेक संप पुकारले गेले असते. आंदोलने झाली असती. असचं आम्हा पोलिसांच्या मनात असं करणं असून सुद्धा मारहाणीचा निषेध न करता ड्युटी करावी लागतेय हे दुर्दैवं,' असा मेसेज सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. पोलिस हे कायद्याचे रक्षण करणारे आहेत. मात्र, त्यांच्या हितरक्षणासाठी कोणताही कायदा नाही. अनेकदा पोलिसांवर घातक हल्ले होतात; मात्र गुन्हेगार जामिनावर मोकळे सुटतात. सोबतच माहितीचा हक्क, सामाजिक संघटना कायम पोलिसांवर ताशेरे ओढत असल्याने कायदे सामन्यांच्या बाजूने वळविले जात आहेत, असेही पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांवर सध्या होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध नसतोच वा त्या आरोपींवर कठोर कारवाई देखील होत नाही. किंबहुना संबधित पोलिसालाच नंतरही मनस्ताप सहन करावा लागत असल्याची सध्य स्थिती आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना अनेकदा कारवाई करीत असतांना नारमाईचे धोरण ठेवून काम करा, असा सल्ला सगळ्यांकडून दिला जातो. आता तर पोलिसांनी संयम राखलाच पाहिजे, असा जणू नियमच होत असल्याने पोलिसांवर नागरिकांवर हल्ले केले जाऊ लागले आहेत. दोनच दिवसांपूर्वी ठाण्यातील महिला पोलिसावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी जामिनावर सुटल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी ही अनोखी गांधीगिरी केल्याचे दिसून आले.

पोलिसांना गुन्हेगारांवर कारवाई करतांना पाहिल्यासारखे अधिकार बहाल करावे. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात कठोर कायदे निर्मिती व्हावी. पोलिस कर्मचारी देखील एक नागरिक आहेत, ते त्यांच्या कर्तव्याचा भाग म्हणून कारवाई करतात. कायद्याच्या रक्षणकर्त्यांवर कायदे हातात घेऊन हल्ले करणारे आरोपी मात्र मोकाट असतात. हे चित्र जेव्हा बदलेलं आणि पोलिसांना खऱ्या अर्थाने अधिकार बहाल होतील तेव्हा महाराष्ट्र आणि राज्यातील पोलिस सुरक्षित होऊ शकतील. - एक पोलिस कर्मचारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कुसुमाग्रज स्मरण’ तीन मार्चपासून

0
0

शिल्पा देशमुख यांचा गुरूवारी, ३ मार्च रोजी भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर होणार आहे. प्रख्यात दिग्दर्शक विजय केंकरे हे 'शेक्सपिअर आणि मराठी रंगभूमी' हा विषयावर शनिवार, ५ मार्च रोजी व्याख्यान देतील. 'संस्कृतीचा सारांश' हा कवितागायनाचा रविवार, ६ मार्च रोजी कार्यक्रम होईल. त्यात दिलीप साळवेकर, श्याम पाडेकर सादरीकरण करतील. कॅलिग्राफर नंदू गवांदे यांची महाराष्ट्रातील पहिली कॅलिग्राफिकल डायरी 'कुसुमाक्षरे'चे प्रकाशन सोमवार, ७ मार्च रोजी होईल.

यावेळी ज्येष्ठ कवी अशोक बागवे, रमेश उबाळे, महेश म्हात्रे, कौशल इनामदार हे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितांचे सादरीकरण करतील. 'कवी एक, आविष्कार अनेक' हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारित नाट्याविष्कार मंगळवार, ८ मार्च रोजी सादर होईल. प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर, दिग्दर्शक महेश मांजरेकर, लेखक किरण यज्ञोपवित, विश्वास जोशी, अनिरुद्ध देशपांडे, अभिजित देशपांडे यांच्या उपस्थितीत 'नटसम्राट : नाटक ते सिनेमा' हा कार्यक्रम बुधवार, ९ मार्च रोजी रंगणार आहे. यातून 'नटसम्राट'च्या नाटकापासून चित्रपट निर्मितीचा प्रवास उलगडून दाखवला जाणार आहे. महाकवी कालिदास कलामंदिरात गुरुवार, १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता गोदावरी गौरव पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

'गोदावरी गौरव' वगळता अन्य सर्व कार्यक्रम कुसुमाग्रज स्मारकात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. सर्वांना खुला प्रवेश आहे. रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images