Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अखेर मुख्यमंत्र्यांनीच केले आश्वस्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विभाजनाचे तीव्र पडसाद नाशिकच्या राजकारणावर उमटले आहेत. विद्यापीठाच्या विभाजनाला तीव्र विरोध होण्यास सुरुवात होताच भाजपचे धाबे दणाणले आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाशिककरांच्या तीव्र भावना मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्या. मुख्यमंत्र्यांनीही विद्यापीठाच्या विभाजनाचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे आश्वासन फरांदे यांना दिले.

नाशिकच्या विद्यापीठाचे विभाजन होणार असल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्य सरकारच्या या प्रस्तावाचा सर्वच स्तरातून विरोध होत असून, त्याचे सर्वाधिक चटके भाजपला बसणार आहेत. त्यामुळे आ. फरांदे यांनी या प्रकरणाबाबत तातडीने सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आयुष संचालनालयाच्या प्रस्तावाचे विपरीत परिणाम नाशिकमध्ये उमटण्याची

शक्यता आहे. विद्यापीठाच्या विस्तारासाठी नाशिकमध्ये मुबलक जागा असून, निधीचीही तरतूद आहे. विद्यापीठ सदृढ होत असतांना त्याचे विभाजन करणे चुकीचे आहे. त्यामुळे नाशिककरांच्या भावना दुखावल्या असून, लोकभावेनेचा विचार करून आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या होणारे विभाजन रोखावे अशी मागणी फरांदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विभाजनाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे फरांदे यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठ विभाजनास ‘होमिओपॅथी’चाही विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करण्यास होमिओपॅथी विद्याशाखेनेही तीव्र विरोध दर्शविला आहे. कुठल्याही परिस्थितीत होमिओपॅथीचे राज्यातील मेडिकल कॉलेजेस नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाशीच संलग्नित ठेवावीत, अशी भूमिका होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र या संघटनेने घेतली आहे. ही आग्रही भूमिका मांडत शिष्टमंडळाने सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

सन १९९८ मध्ये नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. यानंतरच्या वाटचालीत आरोग्य विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरही लौकीक मिळविला असताना केवळ राजकीय भूमिकेतून नागपूरात नव्याने प्रस्तावित आयुष्य आरोग्यविद्यापीठाची संभाव्य निर्मितीतून सरकार काय साधणार, असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आयुष संचालनालयाच्या नव्या अध्यादेशानुसार नागपूरमध्ये आयुष विद्यापीठाच्या निर्मितीचा विषय मांडण्यात आला. यानंतर वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाच्या पत्रानुसार भारतीय वैद्यक समन्वय समितीच्या सदस्यांसोबत नागपूरमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नागपूरमधील संभाव्य आयुष विद्यापीठाच्या निर्मितीसाठी प्रशासकीय व इतर विभागांच्या कामासाठी जागेच्या शोधासह इतर मुद्द्यांसाठी चार सदस्यांची समितीही गठीत करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रशियन केंद्रातर्फे छायाचित्र प्रदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रशियन कॉन्सुलेटचे रशियन विज्ञान व सांस्कृतिक केंद्र आणि महानगरपालिका यांच्या वतीने महात्मा फुले कलादालनात ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उदघाटन शुक्रवार (५ फेब्रुवारी) रोजी सायंकाळी पाच वाजता महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी रशियन वकीलातीचे मुंबईतील व्हॉईस कॉन्सुल, रशियन विज्ञान आणि संस्कृतिक केंद्राचे संचालक व्ही.व्ही. दिमेंतीयेव्ह तसेच कॉन्सुलेटमधील इतर रशियन पदाधिकारीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या वर्षी भारत रशिया राजनैतिक संबंधाचे ११५ वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे या प्रदर्शनात भारत-रशिया या दोन देशातील मैत्री संबंधांना उजाळा मिळणार आहे. तसेच रशियातील सैबेरिया ते कॉकेशिअस पर्वतराजी अशी वैविध्यपूर्ण आकर्षक फोटोग्राफी पाहण्याची संधी नाशिककर रसिकांना मुंबई व पुण्यानंतर प्रथमच मिळणार आहे.

मुंबईत रशियन विज्ञान आणि सांस्कृतिक केंद्रातर्फे नेहमीच अशा प्रकारची प्रदर्शने भरविण्यात येतात. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम चित्रपट महोत्सव आदिंचेही आयोजन करण्यात येते. केंद्रात आधुनिक सुविधांनी समृध्द रशियन भाषा विभाग, मराठी, रशियन, हिंदी, गुजराती, इंग्रजी आदी भाषांतरित तसेच इतर पुस्तकांचे सुसज्ज वाचनलय, अभ्यासिका आहे. या कार्यक्रमासाठी रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जनसंपर्क तथा रशियन भाषा विभाग प्रमुख विद्या स्वर्गे-मदाने यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फी अभावी रोखले विद्यार्थ्यांचे निकाल

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

समाजकल्याण विभागाकडून अद्यापही काही अभ्यासक्रमांचा समावेश स्कॉलरशीपसाठी करण्यात न आल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. एचपीटी कॉलेजमधील जर्नालिझम विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी एकीकडे फ्री शीपचे पैसे जमा होण्याची वाट बघत असताना दुसरीकडे पहिल्याच सेमिस्टरची फी रखडल्याने त्यांचे पहिल्या सेमिस्टरचे मार्कशीट्स चक्क रोखून धरण्यात आले आहे.

या प्रकरणी समाजकल्याण विभाग, नाशिक आणि एचपीटी कॉलेज एकमेकांकडे जबाबदारी ढकलत आहेत. एचपीटी कॉलेजच्या एमसीजे (मास्टर्स इन मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम) वर्गातील विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागामार्फत फ्री शिप देण्यात येत नाही. एचपीटी कॉलेजमध्ये असलेल्या जर्नालिझम विभागातील ओबीसी, एनटी-डी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची समाजकल्याण विभागामार्फत येणारी फ्री शिप रोखली गेली आहे. एमसीजे अभ्यासक्रमाचे बदललेले नाव यादीत अद्यावत करण्यात समाजकल्याण विभागाने ढिसाळपणा दाखविल्याच्या परिणामी विद्यार्थ्यांना भुर्दंड पडत असल्याचे कॉलेजचे म्हणणे आहे.

नाशिक प्रशासकीय स्तरावर समाजकल्याण कार्यालयात विद्यार्थ्यांनी या समस्येबाबत तक्रार केली होती. समाजकल्याणच्या लिस्टमध्ये एमसीजे एचपीटी कॉलेज हे नाव असले तरीही कॉलेजमार्फत पुणे समाजकल्याण विभागात या संदर्भात अधिकृत अर्ज करायला हवा असे समाजकल्याण विभागातून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मागणीवरुन कॉलेज प्रशासनाने देखील एमसीजे विभागाच्या अनुसूचित जमातीची ई-शिष्यवृत्ती वर्ग समाविष्ठ करावा, असा अर्ज नाशिक प्रशासकीय समाजकल्याण विभागात सादर केला होता. विद्यार्थ्यांनी प्रवर्गातून प्रवेश घेतल्याने कॉलेजने विद्यार्थ्यांकडून सवलतीप्रमाणे कमी फी आकारली होती. परंतु समाजकल्याण विभागातून कोणतीही फ्री शिप जमा न झाल्याने कॉलेजने विद्यार्थ्यांस पूर्ण फी भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी कॉलेजने प्रशासनाने चक्क या विद्यार्थ्यांचे प्रथम सेमिस्टरचे मार्कशीट राखून ठेवत ते मार्कशीट दिलेले नाहीत.

एमए (एमसीजे) या अभ्यासक्रमाचा समावेश समाजकल्याण विभागाने स्कॉलरशीपच्या यादीत करावा यासाठी कॉलेजच्या वतीने सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. मात्र समाजकल्याण विभागाकडूनच प्रतिसाद नाही.

प्राचार्य व्ही.एन.सूर्यवंशी, एचपीटी कॉलेज

विद्यार्थ्यांनी अनेकदा एमएएमसीजे अभ्यासक्रमाचा समावेश समाजकल्याण विभागातील अर्जात करण्यासाठीचे निवेदन कॉलेज आणि समाजकल्याण विभागात दिले होते. यानंतरही कॉलेजचे नाव समाजकल्याणने अर्जात दिले नाही त्यावर स्कॉलरशिप जमा न झाल्याने आमच्या या वर्षीच्या पहिल्या सेमिस्टरच्या मार्कशीट अडवल्या आहे.

अजय सांगळे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आतिथ्य उद्योगाची अर्थव्यवस्था

$
0
0

किशोर अहिरे

आधुनिक काळात बदलत्या अर्थव्यवस्थांच्या संदर्भात आतिथ्य क्षेत्राचे महत्त्व अधिक आहे. बऱ्याच देशांच्या अर्थव्यवस्था या अलीकडच्या काळात संपूर्णपणे आतिथ्य क्षेत्रावर अवलंबून आहेत. आतिथ्य क्षेत्र हे सर्वाधिक रोजगार पुरवणारे व त्या देशांच्या अर्थव्यवस्थेला गतिमान करणारे असे आहे. गेल्या काही दशकात काही देशांचा तसेच काही शहरांचा उदय या क्षेत्रात अत्यंत वेगाने झालेला दिसून येतो. हवाई बेटे, मॉरिशिअस, मालदीव, सेशेल्स आदी देशांची अर्थव्यवस्था तर पूर्णपणे आतिथ्य व्यवसायावर अवलंबून आहे.

अगदी आपल्या जवळच्या पूर्व आशियायी देशांचा देखील या क्षेत्रात अत्यंत जोमदार असा विकास झाला आहे. मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर या 'आशियान' देशांचा या क्षेत्रात झालेला प्रवेश हा संपूर्ण आशिया खंडालाच मोठा दिलासा देणारा आहे. आशियान देशांच्या कोसळणाऱ्या अर्थव्यवस्था सावरायला आतिथ्य व्यवसायाने एकेकाळी मोठाच हातभार लावला आहे. अलीकडच्या काळात या देशांच्या अर्थव्यवस्था या प्रामुख्याने आतिथ्य व्यवसायावर अवलंबून आहेत. या क्षेत्रातील या देशांची प्रगती ही लक्षणीय अशी आहे. मलेशिया, थायलंड, सिंगापूर व इंडोनेशिया हे देश एकेकाळी पायाभूत सुविधा, औद्योगिकीकरण संसाधने या बाबतीत भारताच्या बरोबरीलाच होते. पण गेल्या दोन ते तीन दशकांत या देशाने आपल्या अंतर्गत मुलभूत असे बदल घडवून आणले व आतिथ्याच्या क्षेत्रात वैविध्यपूर्ण अशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे अलीकडच्या दोन दशकांत या देशाच्या पर्यटन उद्योगाची व आतिथ्य क्षेत्राची झपाट्याने भरभराट झाली.

या देशात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण अशी पाऊले उचलली व अमुलाग्र असे बदल घडवून आणले. या देशांत सर्व सर्वप्रथम मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्या. रस्ते, पाणी, वीज या गोष्टी अत्यंत सुनियोजित पद्धतीने सर्वत्र पोहोचवल्या. देशातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचे अत्यंत सूक्ष्म नियोजन केले. तसेच रस्ते हे येणाऱ्या प्रवासी व पर्यटकांना सुखद असा आंनद देणारे ठरतील अशी व्यवस्था केली. उत्कृष्ट अशा रस्त्यांची उभारणी त्यांचा सौंदर्य दृष्टीकोन सांभाळून केली. बऱ्याच ठिकाणी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवडी सोबतच फुलझाडे, उद्याने व त्या त्या भागाचे महत्त्व सांगणारे शिल्प उभारून अत्यंत उच्च दर्जाच्या अशा नागरी सुविधांची पूर्तता देखील केली. कुठल्याही प्रवासी अथवा पर्यटकाला हे सगळे निश्चितच मोहून टाकेल असेच आहे. तेथे येणाऱ्या पर्यटकांच्या बळावर या सगळ्यांचा मोठा प्रभाव पडतो.

या देशांत अंतर्गत वाहतूक व्यवस्था अत्यंत उत्कृष्टरितीने विकसित केलेली दिसते. अत्यंत स्वच्छ व नेटकी अशी रेल्वे व बससेवा, अत्यंत किफायतशीर अशी हवाई सेवा व आदबशीर टॅक्सी सेवा या कुठल्याही पर्यटकाला सुखद अशी अनुभूती देणाऱ्याच असतात. या देशांमध्ये स्वच्छता ही युरोपातल्या कुठल्याही अत्यंत प्रगत अशा शहरांच्या बरोबरीचीच आहे. स्वच्छतेच्या नियमांचे तेथील नागरिकांकडून अत्यंत काटेकोरपणे पालन केले जाते.

या देशांमध्ये प्रत्येक नागरिकाने आतिथ्यशीलता हा जणू आपला धर्मच मानला आहे व ते याची अत्यंत भाविकतेने जपणूक करतात. तेथील नागरिकांची मदत करण्याची तत्परता, आतिथ्यशीलता व विनम्रता अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. तेथील नागरिक ही गोष्ट कायम मनाशी बाळगतात की आपले वर्तन हेच आपल्या देशाची प्रतिमा हे उंचावणारी किंवा खालावणारी ठरू शकते.

इथल्या लोकांचा वक्तशीरपणा व आदबशीर वागणूक ही आपल्यासाठी निश्चितच त्यांच्याबद्दलचा आदर वाढवणारी आहे. या देशातील नागरिक वाहतुकीचे नियम तसेच सार्वजनिक ठिकाणी वर्तणूक कशी असावी या संबंधी अत्यंत दक्ष असतात. या देशांमधील कायदा व सुव्यवस्था ही देखील अनिश्चितच वाखाणण्याजोगी आहे. येथील पोलिसांची भूमिका ही नेहमीच त्या देशात आलेल्या आगंतुकाला मदत करणारी, त्याची विचारपूस करणारी अशी आहे.

या देशांनी आपल्या स्थानिक कला, परंपरा व वेशभूषा यांचा देखील वापर मोठ्या खुबीने आतिथ्य व्यवसायाचा विकास करण्यासाठी केला आहे. येणाऱ्या पर्यटकांच्या करमणुकी सोबतच आपल्या देशाच्या उज्ज्वल कला परंपरेचे देखील सादरीकरण करतात. या देशांमध्ये स्थानिक कलावस्तूंचा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. येणाऱ्या पर्यटकांप्रमाणे तेथील कला, वस्तू कशा आकर्षक रुपात कशा पोहोचतील याची देखील तेथे काळजी घेतली जाते. स्थानिक खाद्य प्रकार तेथे सर्वत्र अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीने मांडले जातात. यामुळे निश्चितच पर्यटकांच्या मनात त्याबद्दल आकर्षण निर्माण होते. तेथे वैविध्यपूर्ण स्थानिक खाद्य पदार्थांची अक्षरशः रेलचेल असते.

या देशांत आतिथ्य क्षेत्रात हॉटेल्स, रिसॉर्ट येथे राहण्याचे दर तसेच आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचे दर अत्यंत किफायतशीर ठेवल्यामुळे पर्यटकांसाठी हे महत्त्वाचे आकर्षण ठरले. येथील उत्कृष्ट दर्जाची किफायतशीर अशी निवास व्यवस्था ही अलीकडच्या काळात पर्यटकांना तसेच व्यावसायिकांना भुरळ पाडणारी ठरली आहे. यामुळे या देशात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे एकंदरच अर्थव्यवस्थेला उर्जितावस्था आली आहे.

या देशांचे सरकार या क्षेत्राच्या विकासासाठी अत्यंत गंभीरपणे प्रयत्न करतांना दिसताहेत कारण या क्षेत्रांमधून निर्माण होणारा रोजगार तसेच सुविधा या देशाच्या विकासात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देतात. आतिथ्य उद्योगाने या देशांच्या अर्थव्यवस्थांना मोठ्या प्रमाणात स्थैर्य मिळवून दिले. इथला प्रत्येक नागरिक आपल्या देशाची प्रतिमा येणाऱ्या प्रत्येक पर्यटकापुढे कशी उंचावेल यासाठी कसोशीने प्रयत्न करतांना दिसतो.

भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला आतिथ्यक्षेत्रात मोठी अशी संधी आहे. आतिथ्य व्यवसायात देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करू शकतो. आतिथ्य व्यवसाय हा स्थानिकांना त्यांच्या उत्पादनासाठी तसेच हस्तकलांसाठी मोठी बाजारपेठ मिळवून देणारा असा आहे. आपल्या देशात समृद्ध अशा कला, परंपरांना निश्चितच चांगले दिवस येतील व कलाकारांना उर्जितावस्था प्राप्त होईल. देशातील वैविध्यपूर्ण अशा खाद्य संस्कृतीला जागतिक पातळीवरून मानाचे स्थान मिळू शकेल. आपल्या देशातील केरळ, राजस्थान, हिमाचल या राज्यात आतिथ्य क्षेत्रात आपली जागतिक पातळीवर वेगळी अशी ओळख निर्माण केलेली दिसते. त्यामुळे या राज्यांकडे देशातील व परदेशातील पर्यटकांचा वाढता ओघ दिसून येतो. केरळ राज्याने आतिथ्य उद्योगात साधलेली प्रगती ही जगभरात चर्चेचा विषय ठरते आहे. या राज्याचा आदर्श देशातील इतर राज्यांनी समोर ठेवला तर आतिथ्य व्यवसायाची नवीन अर्थव्यवस्था आपल्या देशात लवकरच उभी राहु शकते.

(लेखक हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या वर्षात वाढले अपघाती मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्षाच्या पहिल्याच महिन्यात शहरातील विविध भागांत झालेल्या रस्ते अपघातांत तब्बल २० नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले असून, महापालिका व पोलिसांनी एकत्रितपणे धोकादायक ठिकाणांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

२०१५ मध्ये शहरात जीवघेण्या अपघातात २४३ जणांना प्राणास मुकावे लागले होते. शहरात चकचकीत व रूंद रस्ते असताना रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमृतधाम, आडगाव, उपनगर या हायवेवरील भागासोबत शहरातील मध्यवर्ती भागात सुध्दा जीवघेण्या अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहे. रास​बिहारी लिंकरोड येथे मुलाला शाळेतून परत घेऊन येणाऱ्या महिलेनंतर दोन दिवसांपूर्वी अमृतधाम येथे पायी जाणाऱ्या महिलेला वाहनाने उडवल्याने प्राणास मुकावे लागले.

अवघ्या ३० दिवसांत २० नागरिक मृत्युमुखी पडले असून, अपघातांच्या कारणांची योग्य कारणमीमांसा करण्याची जबाबदारी महापालिका तसेच पोलिसांना घ्यावी लागणार आहे.

२०१५ मध्येही जानेवारीत २० नागरिक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले होते. २०१४ मध्ये १६, तर २०१३ मध्ये हेच प्रमाण ९ इतके होते.

रस्तासुरक्षा सप्ताहाचा बोजवारा?

प्रादेशिक परिवहन विभाग व शहर वाहतूक पोलिसांमार्फत जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात आला. वाहतूक नियम व रस्ते अपघाताबाबत जनजागृती केली गेली. एकीकडे जनजागृती होत असताना दुसरीकडे नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. याबाबत बोलताना पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले की, रस्ते अपघाताकडे वाहनचालक गांर्भीयाने पाहत नाही. वाहन चालवण्याचा आत्मविश्वास अति झाला की, हेल्मेट, सीटबेल्ट, वाहतुकीचे नियम याकडे सर्रास डोळेझाक केली जाते. वाहनचालक व पादचाऱ्यांनी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे, रस्त्यातील अडथळे दूर करणे, पादचाऱ्यांच्या रस्ते क्राँसिंगसाठी योग्य पर्याय उपलब्ध करणे, अशा पर्यांयाशिवाय रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे शक्य नसल्याचे उपायुक्त पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरदिवसा लुटीचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डोळ्यात मिरचीची पूड टाकून पिशवीतील रोकड आणि चांदीचे दागिने चोरून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना गाडगे महाराज पुलाजवळील नवीन भाजी मार्केट परिसरात झाली असून, नागरिकांच्या सतर्कतेने चोरट्यांचा प्रयत्न फसला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.

पंचवटीतील गणेशवाडी परिसरात राहणारे परशुराम निवृत्ती गायकवाड (४९) हे रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नवीन भाजी मार्केट परिसरातून कामावर चालले होते. त्यावेळी लुटीच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपी राम मधुसुदन दास याने गायकवाड यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांच्याकडील पिशवी ओरबाडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. गायकवाड यांनी आरडाओरड केल्याने आणि दासला प्रतिकार केल्याने त्याचा हा प्रयत्न फसला. या पिशवीत २० हजार रुपये रोख आणि ३०० ग्रॅम चांदीचा ऐवज होता. पोलिसांनी कारवाई करीत संशयित आरोपीला जेरबंद केले.

युवकाची आत्महत्या

सिडकोतील लेखानगर परिसरात कोकण भवन जवळील गायत्री अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या गोकुळ निवृत्ती सायखेडे (२७) या युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सायखेडे याने राहत्या घरात विषारी औषध सेवन केल्याने त्यास परिसरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

वृध्दाची आत्महत्या

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात एका वृद्ध व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. भुपेंद्रसिंग जागिरसिंग घाटोळे (६२) असे या वृद्धाचे नाव आहे. इंदिरानगर परिसरातील श्रीश्रद्धा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या घाटोळे यांनी रविवारी रात्रीच्या सुमारास घरात विषारी औषध सेवन केले होते. त्यामुळे त्यांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ट्रॅकच्या परिसरात गस्त वाढविण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यात्रेत रस्त्यावर दुकानांना मज्जाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निवृत्तीनाथ महाराज यात्रेत यंदा रस्त्यावर दुकाने थाटण्यास प्रशासनाने आक्षेप घेतला आहे. अपवाद वगळता बहुतांश दुकाने गावातील मोकळ्या जागा-मैदानांवरच उभारावीत अशी प्रशासनाची आग्रही भूमिका आहे. मात्र, त्यास स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचा विरोध असून यात्रा परंपरेलाच खीळ बसण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. यात्रेपूर्वीच प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये जुंपण्याची शक्यता बळावली आहे.

भाविक व वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचेपर्यंत थकतात. त्यांना रस्त्यांलगतच्या दुकानांवर सहजगत्या पूजेचे साहित्य, प्रसाद खरेदी करता येते. मात्र दुकाने अन्यत्र थाटली तर भाविकांना ती शोधावी लागतील. त्यामुळे ही दुकाने रस्त्यावरच असावी, असा स्थानिकांचा आग्रह आहे. रस्त्यावर दुकाने थाटू नयेत या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत प्रशासनाने दुकानांसाठी वाहनतळ, यात्रा पटांगण तसेच आंबेडकर पुतळ्याच्या चौकात दुकाने उभारता येतील अशी व्यवस्था केली आहे. मात्र, ती स्थानिकांना रूचलेली नाही.

सिंहस्थाप्रमाणे प्रवेश

भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून यंदा सिंहस्थात त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशन मार्गेच भाविकांना मंदिर आणि कुशावर्ताकडे सोडण्यात आले होते. निवृत्तीनाथ यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनाही पोलिस स्टेशनमार्गे नगर पालिका कार्यालय, तेथून उजव्या बाजूने निवृत्तीनाथ मंदिर, कुशावर्त तसेच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर असे जाता येणार आहे. या मार्गावर कुठेही दुकाने राहणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाढीव पाणीकपात टळणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात एक दिवसाची वाढीव पाणीकपात लागू करण्यावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षावर भाजपने तोडगा काढला आहे. आठवड्यातून एक दिवसाची वाढीव पाणीकपात टळणार असून, एकलहरे औष्णिक प्रकल्पाच्या आरक्षित सहाशे दशलक्ष घनफूट पाणीसाठ्यापैकी ३०० दशलक्ष घनफूट पाणी पालिकेला मिळण्याची शक्यता आहे. पालकमंत्र्यांनीच हा तोडगा काढला आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणी मिळणार असून पाणीकपातीची गरज नसल्याचा दावा आ. देवयानी फरांदे यांनी केला आहे.

पाणीपुरवठ्यात जवळपास ५० दिवसांचा गॅप पडत असल्याने आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करावी असा निर्णय महासभेने घेतला होता. परंतु, वाढीव पाणीकपातीवर भाजपने आक्षेप घेत, त्याला विरोध केला होता. पालकमंत्र्यांनी नाशिकला पाणी कमी पडून देणार नाही असे आश्वासन दिले होते. तरीही पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कपातीची तयारी सुरू केली होती. परंतु, प्रशासनाने कपात लागू केली नाही. गंगापूर धरणात एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या पाण्याचे आरक्षण आहे. त्यांना नाशिकचे सांडपाणी द्यायचे व त्याबदल्यात प्रकल्पाचे आरक्षित पाणी नाशिक पालिकेला देण्याचा प्रस्ताव आला असून, त्यातून नाशिकला ३०० दशलक्ष घनफूट पाणी मिळणार आहे. त्यामुळे वाढीव पाणीकपात टळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात येत्या बुधवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

फरांदेंनी काढला मनसेला चिमटा

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकला पाणी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले आहे. एकलहरे केंद्राचे अतिरिक्त पाणी आता नाशिकला मिळणार असल्याचे आ. देवयानी फरांदे यांनी सांगितले. पालकमंत्री आपल्या शब्दाला जागले असून, वाढीव पाणीकपातीचा मुद्दा निकाली निघणार आहे. त्यामुळे मनसेने आता पाण्याच्या राजकारणाची कपात करावी असा टोला त्यांनी मनसेला लगावला आहे. नाशिकला पाणीकपातीची गरज पडणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन् जखमींच्या मदतीला ‘धावली’ बस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरून जाणारे तिघे जखमी झाले... त्यांना उपचाराची आवश्यकता असताना अॅम्ब्युलन्स मात्र वेळेवर पोहचेना... अशावेळी शहर बससेवेची मदत घेत नागरिकांनी त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहचवले. नागरिकांची तत्परता आणि शहर बस सेवेतील त्या कर्मचाऱ्यांच्या सावधनतेमुळे जखमींना वेळेवर उपचार मिळू शकले. या घटनेनंतर नागरिकांनी बसचालक विष्णू सांगळे आणि वाहक के. एन. सूर्यवंशी यांचे आभार मानले.

अपघाताची घटना सोमवारी दुपारी सातपूर पोलिस स्टेशनसमोरील बस थांब्यावर घडली. ओढाकडून पंचवटीच्या दिशेने जाणारी शहर बस सेवेची बस (एमएच २० डी ९२५३) या थांब्यावर प्रवाशांना घेण्यासाठी थांबलेली होती. याच वेळी एका दुचाकीस भरधाव वेगात जाणाऱ्या कारने धडक दिली. यात दुचाकीवरील स्वप्नील गायकवाड, सिध्दार्थ जाधव आणि आकाश जगताप हे तिघे युवक जखमी झाले. अपघातानंतर कारचालकाने पोबारा केला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ अॅम्ब्युलन्सला पाचारण केले. मात्र, ती वेळेत पोहचण्याची लक्षणे दिसली नाही. जखमी युवकांना तत्काळ उपचार मिळणे आवश्यक होते. त्यानुसार नागरिकांनी संबंधित जखमींना सीटीबसमधून हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला.

नागरिकांनी तिघांनाही उचलून शहर बसमध्ये टाकले व बस सिव्हील हॉस्पिटलमध्ये पोहचली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास सदर बस हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर थांबताच हॉस्पिटलमधील दोन स्ट्रेचर प्रवेशद्वारापर्यंत नेण्यात आले. तेथून दोघा जखमींना स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तर एका जखमीस दोघांनी मिळून उचलत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. यातील जखमी स्वप्नील गायकवाड हा स्थानिक नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा भाचा असून अपघाताची माहिती समजताच लोंढे कार्यकर्त्यांसह सिव्हील हॉस्पिटलमध्ये हजर झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी २९४ जादा बस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथ गुरूवारी (दि. ४) रोजी होणाऱ्या निवृत्तीनाथ यात्रेसाठी राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून २९४ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. भाविकांच्या गर्दीचा ओघ लक्षात घेऊन २४ तास बससेवा सुरू ठेवण्याची तयारी महामंडळाच्या नाशिक विभागाने केली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मेळा बस स्थानक आणि त्र्यंबकेश्वर येथे दोन नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी बांधवांच्या दिंड्या नाशिकमध्ये दाखल होऊ लागल्या आहेत. शहरातील रस्तत्यांवर हरिनामाचा गजर सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. बुधवारी ३ फेब्रुवारीपासून निवृत्तीनाथ महाराज यात्रेला सुरूवात होत आहे. ४ फेब्रुवारीला एकादशी व ५ फेब्रुवारीला द्वादशी असे यात्रेचे तीन मुख्य दिवस आहेत. यंदा पाच लाखाहून अधिक वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये येण्याची शक्यता गृहीत धरून राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. २ ते ५ फेब्रुवारी या चार दिवसांमध्ये तब्बल २९४ जादा बसेस सोडण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. २ फेब्रुवारीला ३२, ३ फेब्रुवारीला ६२, ४ फेब्रुवारीला १२५, तर ५ फेब्रुवारीला ७५ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. याखेरीज नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर दररोज २८० बसेस धावतात. या नियमित बसेसही प्रवाशांच्या सेवेसाठी हजर राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट्यवधी रुपये झिरपतात कुठे?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक भ्रष्ट व गैरकारभारमुळे कायमच चर्चेत असणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या कारभारावर आता थेट राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानेच गंभीर ताशेरे ओढले आहेत. राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या आयोगाने आदिवासी विभागाच्या कारभाराचा आढावा घेतला असून, त्यांच्या कारभाराचा पंचनामाही केला आहे. राज्यातील आश्रमशाळांची स्थिती भयावह असून, मुलांना घर आणि शाळांमधील अंतरच समजत नसल्याचे निरीक्षण समितीने नोंदविले आहे. 'कोट्यवधी रुपये झिरपतात कुठे' असा थेट सवाल आयोगाने केला आहे. सोबतच आदिवासींच्या नोकऱ्या बळकावून ठेवलेल्या राज्यातील २५ हजार बोगस आदिवासींना नोकरीवरून तात्काळ काढण्याची शिफार करणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर ओरान यांनी दिली आहे.

राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष रामेश्वर ओरान व आयोगाचे सदस्य हे गेल्या तीन दिवसापासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आयोगाचे सदस्य दोन दिवसापासून नाशिकमध्ये ठाण मांडून असून, सोमवारी भ्रष्टाचाराच कुरण असलेल्या आणि गैरकारभारामुळे पुरते बदनाम झालेल्या आदिवासी विकास विभागाची झाडाझडती घेतली. अधिकाऱ्यांनी आदिवासी योजनांची कागदोपत्री माहिती सादर केली असली, तरी आयोगाचे समाधान झाले नाही. तब्बल दोन तासाच्या आढाव्यानंतर त्यांनी विभागाच्या कारभारवर गंभीर स्वरूपाचे ताशेरे ओढले.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी विभागाच्या कारभारावर आक्षेप नोंदवला. राज्यातील आश्रमशाळांचा दर्जा दिवसेंदिवस ढसाळत चालला आहे. शिक्षण, क्रीडा, सोयी सुविधा याबाबीत आश्रमशाळा पिछाडीवर असल्याचे निरीक्षण ओरान यांनी नोंदविले. 'आदिवासी विद्यार्थ्याचे घर अन् शाळा यात फरकच समजत नाही. विद्यार्थ्यांना पोषक वातावरण मिळाल नाही तर त्यांच्या मानसिकतेत बदल कसे होणार अन् त्यांची प्रगती कशी होणार' असा रोखठोक सवाल सरकारला विचारला आहे. आश्रम शाळामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जात नाहीत. आश्रमशाळांची गुणवत्ता टिकवली जात नाही, विज्ञान, इंग्रजीचे शिक्षण देण्याच प्रमाण कमी असल्याचे अध्यक्षांनी सांगीतले. आदिवासी विभागाच्या कारभारावर गंभीर दखल घेतली असून, केंद्राला अहवाल देणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

२५ हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठवा

आश्रमशाळाच्या सध्यस्थितीचा धक्कादायक खुलासा आयोगाने पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्रात विविध सरकारी खात्यात खोटी प्रमाणपत्र सादर करून नोकरी करणाऱ्यांना संख्या २५ हजारच्या आसपास असल्याचे अध्यक्षांनी सांगीतले. या सर्वांना तात्काळ नोकरीवरून कमी करण्याची शिफारस आपण केंद्राला करणार असल्याचे ओरान यांनी सांगीतले. राज्य सकारने तात्काळ त्यांच्यावर कारवाई केली नाही, तर आयोग स्वतःहून कारवाई करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालकांनो, आजपासून सावधान!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी वाहने हटवण्यासाठी पोलिस विभागाने तीन टोईंग व्हॅन नियुक्त केल्या आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांचे काम उद्या, मंगळवारपासून सुरू होणार आहे. टोईंग व्हॅनमार्फत कारवाई झाल्यास वाहन सोडवण्यासाठी दुचाकी चालकास १७०, तर कार मालकास ३५० रुपये दंड भरावा लागणार आहे.

टोईंग व्हॅन सर्व्हिस मागील काही वर्षांपासून बंद पडली होती. महापालिकेने या कामातून अंग काढून घेतल्यानंतर शहर पोलिसांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. रस्त्यावर, नो पार्किंगमध्ये अस्ताव्यस्त पार्क केलेली वाहने उचलण्यासाठी शहर वाहतूक विभागाने एका एजन्सीची नियुक्ती केली असून तीन वाहनांमार्फत वाहने हटवण्याचे काम केले जाणार आहे. टोईंग व्हॅनवर वाहतूक पोलिस तसेच एजन्सीचे कर्मचारी तैनात राहणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त विजय पाटील यांनी दिली. संबंधित ठेकेदाराला आजच कामाच्या आदेशाची प्रत देण्यात आली असून, उद्या, मंगळवारी सकाळपासून वाहने उचलण्याचे काम सुरू होईल. नाशिकरोड, मध्य नाशिक आणि गंगापूर-सातपूर असे या तीन भागांचे ढोबळमानाने वर्गीकरण करण्यात आले आहे. नाशिकरोड वगळता इतर भागातील वाहने शरणपूररोडवरील जुन्या पोलिस आयुक्तालय कार्यालयात जमा केली जातील. सम विषम तारखांना पार्किंग, नो पार्किंग क्षेत्र, एकेरी वाहतूक, जड वाहनांना बंदी, असे अनेक नियम अस्तित्वात असले तरी त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत होते. उद्यापासून याकडे काटेकोर लक्ष दिले जाईल, असे उपायुक्त पाटील म्हणाले.

--

वाहन उचलताना होणार चित्रीकरण

बेशिस्त पध्दतीने रस्त्यावर पार्क होणारी वाहने वाहतूक विभागाने जमा केल्यानंतर अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. सदर वाहन नो पार्किंगमध्ये नव्हतेच, असा दावा वाहनचालकाकडून केला जातो तर संबंधित एजन्सीचे कर्मचारी आपल्या कारवाईवर ठाम असतात. यापुढे असे प्रसंग उद्भवू नये, यासाठी सदर ठिकाणाचे चित्रीकरण केले जाणार आहे. तसेच ज्या ठिकाणावरून वाहने उचलली जातील, तिथे संबंधित कर्मचाऱ्याचा तसेच वाहतूक विभागाचा दूरध्वनी क्रमांक लिहून ठेवला जाईल.

वाहनांचा प्रकार- दंड-वाहतूक नियमानुसार दंड-एकूण रक्कम

दुचाकी-७०-१००-१७०

तीन चाकी वाहने (सर्व प्रकारची) -२००-१००-३००

हलकी वाहने (कार/जीप) -२५०-१००-३५०

मध्यम वाहने (टेम्पो/मॅटेडोअर) -३५०-१००-४५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनिबंधक कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

नाशिक : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या पिनॅकल मॉल इमारतीतील दुय्यम उपनिबंधक कार्यालयात विषारी औषध सेवन करून एका इसमाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नारायण फकिरा भोसले असे या व्यक्तीचे नाव असून, तो म्हसरूळमधील प्रभातनगर येथील रहिवाशी आहे.

विषारी औषध सेवन केल्यानंतर कार्यालयात उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्याला लागलीच जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर बनली होती. या व्यक्तीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती मिळू शकली नव्हती. पोलिसांनी त्याच्या घरी संपर्क साधला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळासोडून मुख्याध्यापक स्वागताला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या शाळांचे प्रमुख असलेल्या मुख्याध्यापकांनी नाशकातील जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात मोठी गर्दी केली. निमित्त होते नवीन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या पदभार स्विकारण्याचे. याचवेळी नूतन शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांच्यावर मुख्यध्यापकांनी अक्षरशः बुकेंचा वर्षाव केला. त्यामुळे येत्या काळात अहिरे हे या मुख्याध्यापकांना सांभाळून घेणार की, याच मुख्याध्यापकांद्वारे शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लावणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिक्षणाधिकारी रहिम मोगल यांची औरंगाबाद येथे तर नाशिकच्या शिक्षणाधिकारीपदी प्रविण अहिरे यांची नियुक्ती झाली. त्यानुसार अहिरे यांनी सोमवारी दुपारच्या सुमारास पदभार स्विकारला. याचवेळी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात मोठ्या प्रमाणात अभ्यागतांची गर्दी झाल्याने ही बाब चर्चेची बनली. प्रत्येक व्यक्तीकडे फुलांचे पुष्पगुच्छ, महागडे बुके आदी दिसत असल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. हे सारे नूतन शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी सुरु असल्याचे दिसून आले. स्वागत परेडमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी जिल्ह्याच्या विविध भागातून हजर झाले होते. शिक्षणाधिकाऱ्यांशी आपली वैयक्तिक ओळख रहावी, या हेतूनेच अहिरे यांच्यावर पुष्पगुच्छ आणि बुके यांचा वर्षाव होत होता. दरम्यान, स्वागत सोहळ्यानंतर अहिरे यांनी प्राथमिक शाळांच्या कामकाजाची माहिती घेतली.

शिक्षणाधिकाऱ्यांपुढे आव्हान

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गळती रोखणे, कॉपीमुक्त परिक्षा, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, इंग्रजी शाळांकडे वाढता ओढा अशी अनेक आव्हाने सध्या शिक्षणाधिकाऱ्यांपुढे आहे. त्यामुळे ही आव्हाने स्वीकारुन जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता सुधारण्याकडे लक्ष देऊन याच शिक्षकांना कामाला लावणार की त्यांना पाठीशी घालणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक होईल आयटी डेस्टीनेशन

$
0
0

संतोष मंडलेचा
एकविसावे शतक हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे आहे. इंटरनेट, मोबाइल, व्हॉटस् अॅप अशी अनेक संवादाची साधने आज आपणास दिसत आहेत. काही क्षणात आपण हजारो मैलावरील माणसांशी संवाद साधू शकतो तर ई-मेल पाठवून पत्रव्यवहार करु शकतो. हे सर्व शक्य झाले आहे ते माहिती आणि तंत्रज्ञानामुळे.

माहिती आणि तंत्रज्ञानामुळे अनेक देश एकमेकांशी जोडले गेले आहे असेच नाही तर या तंत्रज्ञानामुळे जगच छोटे झाल्यासारखे वाटते. अनेक कामे अत्यंत सहजपणे आपण आपल्या कार्यालयात किंवा घरी बसून करु शकतो. वेळ, पैसा याची मोठी बचत यामुळे झाली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. साहजिकच तरुणाईचा ओढा या क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

गेल्या दशकात आयटी हा विषय अभ्यासक्रमातील एक विषय इतकाच मर्यादित होता. अद्यावत प्रयोगशाळा आणि यंत्रणा उपलब्ध नव्हत्या परंतु आता हे चित्र पूर्ण बदलले आहे. माध्यमिक शाळांपासून ते थेट महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सर्वच अभ्यासक्रमात आयटीवर जास्त भर दिला जात आहे आणि आज सर्वच महाविद्यालयात अद्ययावत संगणकीय प्रयोगशाळा व संदर्भ ग्रंथालये उपलब्ध असल्याने विद्यार्थी अद्यावत ज्ञान व तंत्रज्ञान घेऊनच बाहेर पडत आहेत. नाशिकचाच विचार केला तर आज नाशिकमध्ये असलेल्या आयटी इंजीनिअरिंग, डिप्लोमा अशा ३३ कॉलेजेसमधून हजारो विद्यार्थी दरवर्षी या क्षेत्रात तयार होऊन बाहेर पडतात. याशिवाय सॉफ्टवेअर, हार्डवेअर, अॅनिमेशन अशा अनेक विषयात ट्रेनिंग देणाऱ्या इन्स्टिट्यूटचे जाळे मोठ्या प्रमाणात आयटी इंजीनिअर्स आणि व्यावसायिक घडवत असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात दरवर्षी निर्माण होणारे कुशल मनुष्यबळ असतांना नाशिकमध्ये कोठेही आयटी इंडस्ट्री फोफावताना दिसत नाहीत. त्यामुळे हजारो तरुण हे पुणे, हैदराबाद या ठिकाणी जात आहेत.

मुंबई-पुणे-नाशिक आणि औरंगाबाद अशा सुवर्ण चौकोनाचा एक महत्त्वाचा भाग नाशिक आहे. परंतु मुंबई, पुणे येथे झालेला आयटी क्षेत्राचा विकास बघता नाशिक हे त्याच्या जवळपासही पोहोचू शकले नाही. नाशिकमध्ये आयटी उद्योगाला सर्वार्थाने पोषक असे वातावरण असतांनाही आयटी कंपन्यांनी नाशिककडे पाठ फिरवलेली दिसते आहे. आज अंबडमध्ये उभ्या असलेल्या आयटी पार्कमध्ये कंपन्यांसाठी वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे मुंबई-पुणे-हैदराबाद या शहरांप्रमाणे नाशिकला आयटी डेस्टीनेशन ही ओळख कधी होईल याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आज बोटावर मोजता येतील अशा कंपन्या नाशिकमध्ये आहेत. परंतु या कंपन्यादेखील त्यांचा विस्तार हा ते इतरत्र करीत आहेत. यावरून नाशिकमधील आयटी पार्कबाबतची उदासिनता दिसून येते.

इंटरनेटमुळे डाटा आऊटसोर्सिंग, वेब साईट डिझायनिंग अशी कामे करण्यासाठी हैदराबाद, पुणे किंवा युएसला जावे लागत नाही, तर घरी बसून किंवा ऑफिसमधूनच नाशिकमध्ये ही कामे होत आहेत. अशा प्रकारची कामे करणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाने पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे.

काही वर्षांपूर्वी इन्फोसिस आणि विप्रो या कंपन्यांनी नाशिककडे आपला मोर्चा वळविला होता परंतु त्यांना योग्य प्रतिसाद शासनाकडून न मिळाल्याने या कंपन्या परत गेल्या. आज या कंपन्या नाशिकमध्ये आल्या असत्या तर नाशिकचे स्वरुपच पालटून गेले असते. नाशिककडे आयटी कंपन्यांनी पाठ फिरविण्याचे अजून एक मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर जलद दळणवळणची कोणतीही सुविधा नाही. नाशिकला एअर कनेक्टीव्हिटी नसल्याने मोठ्या प्रमाणात परदेशी कंपन्या येथे येण्यास नाखूश दिसतात. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ नाशिकला झाले परंतु विमान कंपन्यांची उदासिनता किंवा न मिळणारा प्रतिसाद बघता विमान वाहतुकीसाठी मुहूर्त मिळालेला नाही.

नुकतीच एक बातमी वाचावयास मिळाली की, ईएसडीएस येत्या काही दिवसात नवी मुंबई, बंगळूरु व नाशिक येथे ७३५ कोटीची गुंतवणूक करून डाटा सेंटर उभारणार आहे. सातपूर एमआयडीसी प्रकल्पाचा विस्तार करुन हे डाटा सेंटर सुरू करीत आहेत. ही एक सकारात्मक गोष्ट आहे. अनेक आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्यांनी नाशिकला उद्योग सुरू करण्यासाठी प्राधान्यक्रम दिलेला आहे. नाशिकहून जर जगभर एअर कनेक्टीव्हिटी मिळाली तर नाशिक भविष्यात आयटी डेस्टीनेशन होईल यात शंका नाही.

(लेखक हे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर या संस्थेचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना‌श‌िकचे पखवाजवादक जाणार आळंदीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, पुणे, अखिल भारतीय मृदंगाचार्य संघटना आणि श्री क्षेत्र आळंदी देहु परिसर विकास समिती यांच्यावतीने भारतातील समस्त पखावज व मृदंग वादकांचे जगातील पहिलेच अखिल भारतीय पखावज-मृदंग संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रविवार (७ फेब्रुवारी) रोजी दुपारी ४.३० वाजता विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे हे संमेलन होणार आहे. या संमेलनासाठी नाशिकहून पखावजवादक व भजनीमंडळे जाणार आहेत. अशाप्रकारे होणारे हे पहिलेच संमेलन असल्याने पखावजवादकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.

या संमेलनासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार नादब्रह्मऋषी ह.भ.प. बाबा महाराज सातारकर असतील आणि मारूती महाराज कुऱ्हेकर, स्वामी परिपूर्णानंद व कर्नाटक येथील मृदंगमचे बादशहा पद्मश्री पालघट मणी राघू यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

श्री क्षेत्र आळंदी येथील विकास कामांची पूर्तता आणि विश्व शांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी गरीब व होतकरू पखावज वादक वारकरी विद्यार्थ्यांना विश्व शांती केंद्राच्या वतीने ७५ पखावज भेट म्हणून देण्यात येणार आहेत. अखिल भारतीय पखावज-मृदंग संमेलनाच्या निमित्ताने भारतातून ७ हजार पखावज-मृदंग वादक एकाच मंचावर येऊन आपली सेवा सादर करणार आहेत.

नादब्रह्माची अनुभूती देणारा हा एक अलौकिक सोहळा असेल. वारकरी संप्रदायामध्ये पखावज, मृदंग, वीणा व टाळ या वाद्यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र आळंदी येथे होणारे पहिल्या अखिल भारतीय पखावज-मृदंग वादक संमेलनात एकाच वेळी ७ हजार मृदंग वादक एका तालात आणि लयीत वाजविणार आहेत. प्रथमच अशाप्रकारचे संमेलन भारतात भरविले जात आहे. त्यामुळे या घटनेला विशेष महत्त्व आहे. या मृदंग संमेलनात भाग घेणाऱ्या मृदंगाचार्यांना संस्थेच्यावतीने माऊली व जगद्गुरूंची प्रतिमा असलेली शाल, माऊलींची प्रतिमा, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

'आळंदीला, ज्ञानेश्वर माऊलींच्या पूण्यभूमीत हे पखावज संमेलन होणार असल्याने त्या ठिकाणी जाऊन आमची सेवा आम्ही रूजू करणार आहोत. पखावज हे वाद्य अनेकदा दुर्लक्षितच असते परंतु अशानिमित्ताने त्याला सन्मान मिळत आहे ही चांगली बाब आहे.'

-विजय जाधव, पखावजवादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निवेक ओपन २०१६’ क्रीडा महोत्सवाची सांगता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इंडस्ट्रिज वेल्फेअर सेंटर (निवेक) नाशिक यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या क्रीडा महोत्सवाची सांगता निवेक क्लब येथे झाली. यावेळी विविध खेळांत नैपुण्य दाखवलेल्या खेळाडूंना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

या क्रीडा महोत्सवात टेबल टेनिस, बॅडमिंटन, जलतरण, लॉन टेनिस, बुद्धिबळ, क्रिकेट, चेस, बिलियर्ड्‍स आणि स्नूकर या खेळांच्या विविध वयोगटांतील स्पर्धा घेण्यात आल्या. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ अॅटलास कॉप्कोचे ऑपरेशन मॅनेजर सुधीर देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सुधीर देशमुख यांनी निवेक करीत असेलेल्या क्रीडा व सामाजिक कार्याविषयी कौतुक केले आणि भविष्यात नाशिकचे कॉर्पोरेट व औद्योगिक क्षेत्र निवेकच्या पाठीशी उभे राहील, याची ग्वाही दिली. निवेकचे अध्यक्ष संदीप सोनार यांनी निवेकमध्ये सुरू होणाऱ्या बुद्धिबळ, क्रिकेट, स्केटिंगच्या प्रशिक्षणवर्गाविषयी माहिती दिली.

या कार्यक्रम प्रसंगी सिएटचे व्हाइस प्रेसिडेंट आर. के. दास, नाशिक जिल्हा क्रिकेट संघाचे अध्यक्ष विनोद शहा, निवेकचे माजी अध्यक्ष रमेश वैश्य, मुनीश नारंग, निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, जनरल सेक्रेटरी मंगेश पाटणकर हजर होते. क्रीडा महोत्सवाचे सचिव रणजित सिंग यांनी स्पर्धेविषयी अहवाल सादर केला. स्पर्धेसाठी १ हजार १५० प्रवेशिका आल्याचे त्यांनी सांगितले. निवेकचे जनरल सेक्रेटरी संदीप गोयल यांनी निवेकचा क्रीडा क्षेत्रातील उंचावत असलेल्या आलेखाविषयी बोलताना क्रीडा प्रशिक्षकांविषयी गौरवोद्‍गार काढले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड झालेल्या जीताशा शास्त्री, कोमल नागरे, विक्रांत मेहता, अभिषेक शुक्ल, सिद्धार्थ साबळे, व प्रशिक्षक राकेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच उदयोन्मुख लॉन टेनिसपटू तेजल कुलकर्णी हिस नायलेक्स कंपनीचे संचालक लक्ष्मण पाचकवडे यांच्यातर्फे ५ हजारचा धनादेश देण्यात आला तर कै. विजय राठी यांचा स्मरणार्थ टेबल टेनिसपटू सौमित देशपांडेला गौरवण्यात आले. स्वीमिंगमधील नैपुण्याबद्दल अद्वैत आगाशे, ईशान बिरार, प्रतिक बंग, वैभव देसाई, नील राणे, लुब्ध खिवंसरा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर निवेकचे माजी अध्यक्ष समीर भूतानी, कोषाध्यक्ष जनक सारडा उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळाली बॉइजने पटकाविला विजय भोर चषक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प ​

योगेश महाले व मुन्ना शेखच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर देवळाली बॉईजने राजधानी संघावर ३० धावांनी मत करत १९व्या विजय भोर चषक स्पर्धेचा मानकरी होण्याबरोबरच रोख रक्कम रु.५१ हजार पारितोषिकही पटकावले. उपविजेत्या राजधानी संघाला रोख रु.३१ हजार व चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

मास्टर स्पोर्ट‍्स क्लब आयोजित विजय भोर राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत फेरीत देवळाली बॉईजने साई शिर्डी संघाचा तर राजधानीने वालदेवी संघाचा पराभव करीत अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात षटकार व चौकारांची बरसात बघावयास मिळाली.

स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज संतोष कावळे (राजधानी), गोलंदाज नंदू चिंचवडकर (कल्याण), क्षेत्ररक्षक अतिक पठाण (शिर्डी), सामनावीर योगेश महाले तर मालिकावीर मुन्ना शेख (देवळाली बॉईज)यांना गौरविण्यात आले. सामन्यात पंच म्हणून रतन खडताळे, राजू पवार, संजय धुर्जड, तारा खान यांनी तर गुणलेखक म्हणून शशिकांत पगारे, उमेश कटारे यांनी काम पाहिले. धावते समालोचन मुन्ना शहा, भाऊसाहेब गायकवाड यांनी केले.

पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी खासदार हेमंत गोडसे यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सलग १९ वर्षे ही स्पर्धा भरवण्यात येत असल्याबद्दल कौतुक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनीही स्पर्धा आयोजकांचे गौरव करीत कॅन्टोन्मेन्टच्या वतीने या मैदानासाठी विविध सुविधा देण्याचे मान्य केले. यावेळी व्यासपीठावर महाराज बिरमानी, आमदार योगेश घोलप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष सुनील दिनकर, सूत्रसंचालन सुधाकर गोडसे तर आभार अनिल दिवाने यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन दुकानाचा परवाना रद्द

$
0
0

सुरगाणा येथील रेशन धान्य घोटाळा आणि घोरपडे बंधूंनी केलेल्या कोट्यवधींच्या रेशन धान्य घोटाळ्यामुळे नाशिक जिल्हा पुरवठा विभागाची अब्रू वेशीवर टांगली गेली. रेशन वितरण प्रणालीत सुधारणा करतानाच धान्याच्या काळ्या बाजाराला चाप बसविण्यासाठी जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.

पवननगर येथे श्रमिक महिला औद्यागिक सहकारी संस्थेला स्वस्त धान्य दुकान चालविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. दिलीप तुपे हे या संस्थेचे अधिकृत सेल्समन आहेत. या दुकानातून सुमारे वर्षभरापासून धान्य मिळत नसल्याच्या नारायण घरटे, सुशिला मंडलिक, अरुण कोळी यांच्यासह अनेक शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारी जिल्हा पुरवठा विभाग आणि धान्य वितरण विभागाला प्राप्त झाल्या. याखेरीज दुय्यम ‌शिधापत्रिकेसाठी अर्ज करणाऱ्या २६ शिधापत्रिकाधारकांना शिधावस्तूंचा लाभ देणे बंद करण्यात आले होते.

धान्य वितरण अधिकाऱ्यांनी पवननगर येथील या दुकानाची तपासणी केली. त्यामध्ये अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या. परवाना संस्थेच्या नावे असताना तेथे वैभव दिलीप तुपे ही त्रयस्थ व्यक्ती दुकान चालवित असल्याचे आढळले. विशेष म्हणजे सरकारी दुकानात खुल्या बाजारातील गहू, तांदुळ, डाळी विक्रीसाठी ठेवल्याचे दिसून आले. तपासणी दरम्यान १४.७७ क्विंटल गहू कमी तर ३५.१७ क्विंटल तांदूळ अधिक आढळला. शिधापत्रिकाधारकांना नियमानुसार धान्य वाटप न केल्याच्या नोंदीही आढळल्या. पात्र लाभार्थ्यांना शिधावस्तूंपासून दूर ठेऊन हा धान्यसाठा काळ्या बाजारात विक्री केला जात असल्याची शक्यता गृहीत धरून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. संस्थेच्या मंदा लांडे यांनी पुरवठा अधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी खुलासा सादर केला. सरकारी दुकानातून खासगी माल विक्री करणार नाही, अशी ग्वाही दिली. वैभव यास पोत्यांच्या थप्प्या व्यवस्थित न मोजता आल्याने गहू, तांदळाच्या साठ्यात तफावत आढळल्याचा दावा खुलाशात करण्यात आला.

तपशीलामध्ये विसंगती तपासणी पथकाच्या प्रत्येक आक्षेपावर परवानाधारकाने बाजू मांडली. मात्र, ती मोघम स्वरुपाची असल्याचे पुरवठा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तपासणीतील कागदपत्रे व खुलाशातील तपशील यामध्ये विसंगती आढळली. परवानाधारकाने दोषारोप मान्य केले. त्यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने या दुकानाचा परवाना रद्द केल्याची तसेच अनामत रक्कमही जप्त केल्याची माहिती राजेंद्र नानकर यांनी मागविलेल्या माहितीच्या अधिकारातून पुढे आली.



शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारींची दखल घेऊन आमच्या पथकाने स्वस्त धान्य दुकान क्रमांक १२१ ची तपासणी केली. त्यावेळी तेथे अनेक आक्षेपार्ह बाबी आढळल्या. धान्य वितरणाच्या नोंदींमध्ये तफावत होती. दुकानात खासगी मालही विक्रीसाठी ठेवला होता. त्यामुळे संबंधित दुकानाचा परवाना रद्द केला असून १०० टक्के अनामत रक्कमही जप्त केली आहे. - गोरक्षनाथ गाडीलकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images