Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नामको बँकेत आग

0
0

आर्थिक व्यवहारांबाबत चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या नामको बँकेच्या इमारतीच्या तळमजल्यावरील विजेच्या सॉकेटमध्ये सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शॉट सर्कीट झाले. यातून आगीने पेट घेतला. आगीचा विस्तार वाढल्यानंतर एक कॉम्प्युटर, टेबल आणि काही कागदपत्रे आगीच्या तडाख्यात सापडली. बँकेच्या इमारतीतून बाहेर पडणाऱ्या धुराच्या लोळामुळे समोरच्या बाजुस राहणाऱ्या नागरिकांनी लागलीच अग्निशमन दलाच्या कार्यालयास कळवले. यानंतर, डी. बी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन पी. बी. परदेशी, एस. जी. मतवाड, व्ही. जी. चव्हाणके यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या १५ ते २० मिनिटांत अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. शॉट सर्कीटमुळे आग लागली. वेळीच सर्व यंत्रणा घटनास्थळी पोहचल्याने अनर्थ टळला अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली. दरम्यान, या इमारतीत आग लागल्याची घटना समोरच्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी पाहिली आणि वेळीच माहिती दिली. रात्रीच्या वेळी असा प्रकार घडला असता बँकेची मोठी हानी झाली असती, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कौशल्य रोजगार मेळावा आजपासून

0
0

मेळाव्यात रोजगारक्षम कौशल्य विकासाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बेरोजगार उमेदवारांच्या रिक्तपदांसाठी मुलाखती घेण्यासाठी उद्योजक, नियोक्ते उपस्थित राहणार आहेत. पुरुषांसाठी प्रशिक्षणार्थी पेंटर, इंजिनिअर फिटर, एक्झीक्युटीव्ह, ऑपरेटर, ऑफिस असिस्टंट, तर पुरुष व महिलांसाठी हॉटेल मॅनेजमेंट सुपरवायझर, टेलिफोन ऑपरेटर, हाऊसकिपिंग आदी पदांसाठी सोमवारी (दि. १८), सिक्युरीटी गार्ड, टेक्निकल सपोर्टर पदांसाठी मंगळवारी (दि. १९) तर इतर ट्रेनी पदांसाठी मंगळवारी (दि. २०) भरती करण्यात येणार आहे. मेळाव्यात १५०० पेक्षा अधिक पदांसाठी भरती केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समर्थ सेवा मार्गतर्फे कृषी महोत्सव

0
0

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने अनेक वर्षे गुरूमाऊली मोरे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. मोरे यांनी महाराष्ट्रभर ३०० छोटे मोठे शेतकरी मेळावे भरवून विशेषत: आत्महत्याग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी लाखों शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. शेतकरी उत्कर्षाचे हे कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी सेवामार्गाअंतर्गत श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टच्या वतीने कृषी महोत्सव, कृषी मेळावे, संशोधन, सेंद्रिय, आधुनिक शेती, सात्विक शेती, गटशेती व थेट विक्री, शेतीचे वास्तूशास्त्र शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण, कृषी पर्यटन, स्वयंरोजगार, सेंद्रिय खत, औषध निर्मिती, पशू गोवंश संवर्धन, जोड व्यवसाय, पाणी व्यवस्थापन, परदेशातील शेती असे अनेकविध विषय घेऊन शेतकऱ्यांसाठी राज्यभर जोमाने कार्य सुरू आहेत. या सर्व गोष्टींवर परिणामकारक चर्चा होऊन त्या अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवाव्यात म्हणून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजक आबासाहेब मोरे यांनी सांगितले.

कृषी महोत्सवाचा प्रारंभ २२ जानेवारीस होत असून त्यासाठी केंद्रिय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री रामदास कदम, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित राहणार आहेत. यात शेतकरी, संशोधक, तज्ज्ञ, अभ्यासक, विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी व्हावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रगीत गाणारे टपाल तिकीट!

0
0

महाराष्ट्र व गोवा सर्कलचे १७ वे राज्यस्तरीय टपाल तिकिट प्रदर्शन उपनगर पोस्ट ऑफिसमध्ये भरले आहे. प्रदर्शन सोमवारी (दि. १८) सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत खुले आहे. तिकिटासोबत सेल्फी उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. १३५ स्पर्धकांच्या चारशे फ्रेम असून २५ हजार तिकीटे, प्राचीन नाणी, नोटांचा खजिना बघण्यास गर्दी होत आहे.

प्रदर्शनात पाहण्यासारखे ऑस्ट्रियाने धूमकेतूच्या ०.०३ ग्रॅम धुळीपासून २००६ साली तयार केलेले तसेच स्वित्झर्लंडचे राष्ट्रगीत म्हणणारे तिकीट प्रदर्शनाचे आकर्षण आहे. भूतान पोस्टाने सात संगीतमय तिकिटांची काढलेली तिकीट मालिका तसेच आपल्या राजाच्या राज्यभिषेकानिमित्त काढलेली जगातील पहिली सीडी तिकिटे मालिका येथे आहेत. लालबागच्या राजाच्या स्पेशल कव्हरवरील सुवर्ण गणेश, कुवतेची थ्रीडी तिकिटे, आस्ट्रियाचे हस्तीदंत तसेच रेशीम व फुटबॉलपासून तयार केलेले तिकीट, रशियाचे चांदीच्या डेव्हिस कपचे तिकीट यात वेगळेपण आहे. टायटॅनिक जहाज सन १९१२ मध्ये बुडाले. बेल्जियमने त्याचे काढलेले थ्रीडी तिकीट व गॉगलही आहे.

गांधीजींचे दुर्मिळ तिकीट महात्मा गांधीजींवर सन १९४८ साली चार तिकिटांचा संच काढण्यात आला. तेव्हा त्याची किंमत दहा रुपये होती. हा संच अमृतसरचे हरप्रितसिंग यांनी २५ हजार रुपयाला येथे विक्रीस उपलब्ध केला आहे. मदर तेरेसांचे व सन १९३५ चे जैन मंदिरांचे दुर्मिळ तिकिटही येथे आहे. सचिन तेंडुलकरवरील तिकीट मालिका, टी शर्ट व चहाचे मगही विक्रीस उपलब्ध आहे. बॉलिवुड, अंतराळ, संरक्षण, क्रीडा, जैवविविधता आदींवरील तिकीट पाहण्यास गर्दी होत आहे.

अशोकाची नाणी नाणे संग्राहक हिंमतसिंह शेखावत यांनी सम्राट अशोकाने २३०० वर्षापूर्वी काढलेली नाणी विक्रीसाठी आहे. एक नाणे चार हजार रुपयांना आहे. सिरीया-इराक भागावर सध्या अतिरेकी संघटना इसिसचे वर्चस्व आहे. तेथे तीन हजार वर्षापूर्वी जगातील पहिले नाणे (लिडिया) काढण्यात आल्याची रोचक माहिती त्यांनी दिली. दिल्ली सुलतान मोहंमद तुघलकाचे चलन, नागवंश राजाचे दोन हजार वर्षापूर्वीची नाणी, सोमालियाने नुकतीच काढलेली चांदीची दंडगोल, चौकोन, त्रिकोन, आयातकृती नाणी, भारताची एक कोपरा कोरा असलेली दहाची नोट आहे.

नाशिककरांचेही योगदान नाशिकचे ज्येष्ठ तिकीट संग्राहक शांतीलाल हिरण यांनी जगातील पहिल्या श्वानांपासून आताच्या विविध जातींच्या श्वानांची रोचक माहिती देणारी तिकिटे प्रदर्शनात मांडली आहे. नाशिकचे पुरुषोत्तम भागर्वे, रवींद्र वामनाचार्य, किशोर बटाविया, आनंद काकड, संजय जगताप, दिलीप धुळेकर, महेश तातेड, अंजुल गुप्ता यांच्याही फ्रेम्स आहेत. नाशिकरोडच्या प्रतिभूती मुद्रणालयानेही आपला इतिहास व कर्तृत्व सांगणाऱ्या फ्रेम्स लावल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून ‘गरूडझेप’

0
0

यामध्ये आज वक्तृत्व व भित्तीचित्र स्पर्धा आणि मिसमॅच व रोज डे तसेच १९ ला सिबीसी प्रिन्स- प्रिन्सेस व रांगोळी स्पर्धा आणि ग्रुप व फन डे, दि.२० ला वादविवाद व मेहंदी स्पर्धा आणि रेड व ब्लॅक डे, दि.२१ ला टाकाऊपासून टिकाऊ व पथनाट्य स्पर्धा आणि नो व्हेईकल व सायकल डे, दि.२२ रोजी बॉलिवूड क्विझ व फिशपॉंन्ड स्पर्धा आणि कॅप व सोशल अवेरनेस डे, दि.२३ ला उत्कृष्ट भारतीय पोशाख व एकपात्री अभिनय स्पर्धा आणि टाय, साडी व चॉकलेट डे आयोजित केले गेले आहेत. २५ जानेवारीला गीतगायन व नृत्यस्पर्धेने गरूडझेप २०१६ या उत्सवाची सांगता होईल. सकाळी साडेनऊ ते दुपारी दिड वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना डेज साजरे करता येतील. स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी विविध स्पर्धा समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपले कौशल्य सिद्ध करावे व डेज शांततेत साजरा करावे असे आवाहन प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी व जीएस रोहन जाधव यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूषण लोंढेवर अखेर गुन्हा दाखल

0
0

दुुुहेरी हत्याकांड प्रकरणात कट रचून खून करण्यासाठी उद्युक्त केल्याचा ठपका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सातपूर येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण आणि संदीप गांगुर्डे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. मूळ कलमांमध्ये आता कलम १०९ आणि २०२ हे वाढवण्यात आले असून, दोघा संशयितांना केव्हाही अटक होऊ शकते.

सातपूर पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या 'पीएल ग्रुप'च्या कार्यालयात अर्जुन ऊर्फ वाट्या महेश आव्हाड (वय २४) व पंचवटीतील गोपाळनगर येथील निखिल गवळे (वय २२) या सराईत गुंडांची ३१ डिसेंबरच्या रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर संशयित आरोपींनी दोन्ही मृतदेह त्र्यंबकश्वेर तालुक्यात फेकून दिले. या गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिस दलाने ललित अशोक विठ्ठलकर, निखिल मधुकर निकुंभ, प्रिन्स चित्रसेन सिंग, वतन शिवाजी पवार आणि किशोर गायकवाड यांना अटक केली. या सर्वांच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर कोर्टाने संशयितांच्या कोठडीत २० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

लोंढेच्या सहभागाची चर्चा ठरली खरी

दुहेरी हत्याकांडाची घटना पीएल ग्रुपच्या कार्यालयात घडली होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच या हत्याकांडात भूषण लोंढेचे नाव घेतले जात होते. हत्याकांडाच्या दिवशी भूषण कोठे होता, याचाही शोध पोलिसांनी घेतला. मात्र, त्याचे लोकेशन आडगाव परिसरात सापडत असल्याने पोलिसांनी 'शांततेत' तपास सुरू ठेवला. संशयितांकडे केलेल्या चौकशीत व इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी भूषणसह संदीप गांगुर्डे या संशयितांची नावे दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात नोंदवली. तसेच पोलिसांनी मूळ फिर्यादीत कलम १०९ तसेच २०२ यांचाही समावेश केला. या दोघांना अटक झाली किंवा नाही, हे समजू शकलेले नाही. पीएल ग्रुपसाठी खबरी म्हणून काम केल्याच्या कारणास्तव सातपूर पोलिस स्टेशनचे पीएसआय महेश शिंदे यांना निलंबित करण्यात आले असून, आता भूषण लोंढेलाही पोलिसांनी रडारवर घेतले आहे. यामुळे सातपूर परिसरात खळबळ उडाली असून, ग्रामीण पोलिसांच्या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.


काय आहे कलम १०९

ग्रामीण पोलिसांनी मूळ फिर्यादीत कलम १०९ आणि २०२ वाढवले आहे. कलम १०९ हे कटकारस्थान करून एखाद्याचा जीव घेणाऱ्या आरोपीविरोधात वापरले जाते. 'अ' या व्यक्तीने 'क' व्यक्तीला संपवण्यासाठी 'ब' व्यक्तीला उद्युक्त करणे, त्या दृष्टीने शस्त्र, जागा, विष आदी पुरवणे आणि घटना होत असताना घटनास्थळापासून दूर थांबणे अशा कारणांसाठी कलम १०९ मधील 'क' तरतुदीचा वापर होतो. या कलमानुसार दोषत्व सिध्द झाल्यास 'ब' व्यक्तीविरोधात लागलेले मूळ कलम म्हणजे कलम ३०२ हे अ व्यक्तीसाठी लागू पडते. त्यालाही कलम ३०२ नुसार शिक्षा होऊ शकते. घटनेची गंभीरात पाहून संशयिताला जामीन द्यायचा की नाही, हे ठरवण्याचा अधिकार संबंधित कोर्टाकडे असल्याचे हे कलम सांगते. कलम २०२ नुसार गुन्ह्याची कल्पना असूनही त्याची माहिती दडवल्यानंतर कारवाई होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवीस अतिक्रमणांवर हातोडा

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महापालिकेने शहरातील अवैध नळ जोडणीधारकांवर कारवाईचा बडगा उगरल्यानंतर सोमवारपासून (१८ जानेवारी) शहरातील प्रमुख रस्त्यांलगत असलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या दिवशी एकूण २५ अतिक्रमणे हटविण्यात आली असून, ही कारवाई सुरूच राहणार आहे.

शहरातील नवीन बसस्थानक, किदवाई रोड, जुना आग्रा रोड, सटाणा रोड अशा विविध भागातील प्रमुख रस्त्यांवर हॉटेल व्यावसायिक, विक्रेते, व्यापारी, दुकानदार यांनी अतिक्रमण केल्याने या परिसरातील रस्त्यांचा जीव गुदमरला आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणे आणि नागरिकांना त्यामुळे त्रास होणे नित्याचेच झाले आहे. मालेगाव शहरातील अतिक्रमण तत्काळ हटवावे, असे आदेश जिल्हाधिकारी कुशवाह यांनी दिल्यानंतर मालेगाव महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडून कारवाईस सुरुवात करण्यात आली.

शहरातील नवीन बसस्थानक परिसरात दुपारी १२ वाजेपासून कारवाईस सुरुवात झाली. दरम्यान, या आधीच आयुक्त किशोर बोर्डे यांनी अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहन केले होते. त्यामुळे सोमवारी थेट कारवाईचा बुलडोझर अतिक्रमणांवर चालवला गेला. मनपाचे नगररचनाकार शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग तीनचे अधिकारी सलीम अहमद, अतिक्रमण अधीक्षक दीपक हादगे यांच्यासह एकूण वीस कर्मचारी असलेल्या पथकाने ही कारवाई केली. दुपारी चारपर्यंत याच परिसरतील एकूण २५ अतिक्रमणे हटवण्यात येऊन अतिक्रमित सामान देखील जप्त करण्यात आले. यासाठी दोन पोलिस निरीक्षक आणि २५ कॉन्स्टेबल तसेच रॅपिड अॅक्शन दल असा पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. या कारवाईमुळे बसस्थानक परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

या कारवाईनंतर या भागात मनपाच्या बीट मुकादम तसेच गस्ती पथकाकडून पाहणी केली जाणार असून, पुन्हा अतिक्रमण केल्यास ते जप्त केले जाणार आहे. ही माहिती अधिकारी शकील सय्यद यांनी दिली. दरम्यान, ही अतिक्रमण हटाव मोहीम या आठवड्यात सुरूच राहणार आहे. मंगळवारपासून शहरातील, आयेशा नगर, डीपी रोड, किदवाई रोड, जुना आग्रा रोड भागात अतिक्रमण हटविले जाणार आहे. नागरिकांकडून या कारवाईबाबत समाधान व्यक्त करण्यात येते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवाच्या दारातच राडा

0
0

खंडणी उकळणाऱ्या तिघांना बेड्या

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देवदर्शनासाठी आलेल्या परप्रांतीय भाविकांकडून खंडणी उकळणाऱ्या टोळक्याने सोमवारी चक्क पोलिसानांच आव्हान देण्याचा प्रयत्न केला. देवाच्या दारातच हातात कोयते घेऊन वसुली करणाऱ्या या 'भक्तांनी' परप्रांतीय महिला व पुरुषांना हाणामारी करीत अश्लिल शिवीगाळ केली. यानंतर थेट पोलिसांना धक्काबुक्की केली. पंचवटीतील अशा 'देवाच्या भक्तांचा' पोलिसांनी कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

धार्मिक महत्त्वामुळे देशविदेशातील पर्यटक पंचवटीत दाखल होतात. मोठ्या संख्येने येणाऱ्या या पर्यटकांना स्थानिक गुंड, पुजारी कधीतरी पोलिस अशा सर्वांच्या त्रासाला समोरे जावे लागते. पर्यटकांकडील मुद्देमाल लंपास करण्याच्या घटना नवीन राहिलेल्या नाहीत. सोमवारी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील सरदारपूर तालुक्यातील प्रेमचंद हिराजी काग व त्यांचे कुटुंबीय देवदर्शनासाठी पोहचले होते. त्यांच्यासोबत मध्यप्रदेशातील २० ते २५ भाविक होते. हे सर्व भाविक सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सितागुंफा येथे पोहचले असता, आत जाण्यासाठी काग यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. एक रुपया सुट्टा नसल्याने आमच्या कुटुंबातील इतर सदस्याकडून पैसे घ्या, असे सांगत काग यांनी मध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित व्यक्तीने ऐकले नाही. त्याने काग यांच्याकडून दहा रुपये घेतले. उर्वरीत नऊ रुपयांमध्ये नऊ सदस्य सोडण्याची विनंती काग यांनी करताच त्या व्यक्तीने शिवीगाळ सुरू केली. आपण चुकीच्या ठिकाणी पोहचल्याचा प्रत्यय आल्याने काग तेथून निघून बाहेर जाऊन बसले. याचा राग आल्याने हिमांशू उदयपुरी गोसावी (वय ३०), गोरख नामदेव भुरक (वय ३४) आणि योगेंद्र उदयपुरी गोसावी (मंदिर पुजारी) व इतर चार ते पाच जणांनी नारळ कापण्याचा कोयता हातात घेऊन काग यांच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देणाऱ्या काग यांना थेट मारहाण केली. या टोळक्याने मध्य प्रदेशातील इतर पर्यटकांना शिवीगाळ केली. महिलांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकारामुळे पर्यटकांची एकच धावपळ झाली. महिला व मुले रस्ता सापडेल तिकडे धावत सुटले. याच दरम्यान कोणीतरी स्थानिक व्यक्तीने काग यांना पंचवटी पोलिस स्टेशनपर्यंत पोहचवले. पंचवटी पोलिसांचे काही कर्मचारी घटनास्थळी पोहचले. मात्र, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. एकाही पर्यटकाला सोडणार नाही, अशी धमकी त्यांनी पोलिसांसमोर दिली. उपस्थित पोलिसांनी लागलीच जादा कुमक बोलवत तिघा संशयितांना जेरबंद केले. त्यांचे इतर साथिदार फरार झाले असून त्यांनाही अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक डी. डी. श्रीमनवार यांनी स्पष्ट केले. संशयितांविरोधात खंडणी मागणे, धमकी देणे आदी कलमानुसार एक तर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, पोलिसांना शिवीगाळ करणे आदी कलमानुसार वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित मंदिराचे खरोखरच काही ट्रस्ट आहे काय? त्याचे कामकाज काय, याविषयीची माहिती तपासात समोर येईल, असेही श्रीमनवार यांनी सांगितले.


कारवाईचे स्वागत

पंचवटीत नेहमीच पर्यटकांना लुबाडण्याचा प्रयत्न केला जातो. परराज्यातून आलेले पर्यटक ताप नको म्हणून गपगुमान सहन करतात. यावेळेस मात्र, वेगळी परिस्थिती निर्माण झाली. पंचवटी पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने, परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमण निर्मूलनाला विस्थापितांचा विरोध

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर शहरातील विस्थापित श्रमजीवीच्या झेंड्याखाली एकत्र आले असून, अतिक्रमण निर्मूलनाच्या नावाने होत असलेला अन्याय थांबविण्यासाठी एकत्रित लढा सुरू सुरू केला आहे.

त्र्यंबकेश्वर येथे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित यांच्या हस्ते शहरातील शाखा फलकांचे अनावरण करण्यात आले. यावेळी सभेत मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी चांगलीच गर्दी जमली होती. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. माजी सैनिक रामराव लोंढे यांच्या नेतृत्वाखाली सर्व एकत्र आले आहेत. त्र्यंबकेश्वर येथे देवस्थान ट्रस्ट दर्शनासाठी दोनशे रुपयांची पावती घेते याबद्दल नापसंती व्यक्त करीत भाविकांनी कोट्यवधी रुपये दानधर्मातून दिलेले असतात ते जनतेच्या कल्याणासाठी खर्च कारावेत, अशी अपेक्षा पंडित यांनी व्यक्त केली. परदेशातून आलेल्या भाविकांनी त्यांना आलेले अनुभव तक्रार पुस्तकात लिहिले आहेत. मात्र, ट्रस्टने त्यांची दखल घेतलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट आणि श्री संतनिवृत्तीनाथ समाधी मंदिर संस्थानच्या विश्वस्त ललिता शिंदे यांचीही उपस्थिती लाभली. संघटनेच्या लढ्यात त्याही सहभागी झाल्या आहेत, असे त्यांनी व्यासपीठावर जाहीर केले. त्याचसोबत ललिता शिंदे यांनी अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सर्व ठिकाणी समान होत नाही, याबाबत शंका उपस्थित केली. मेनरोडवरील अतिक्रमण का काढले जात नाही, असा सवाल उपस्थित केला. गावात गरिबांना विस्थापित करण्याचे कोण राजकारण करीत आहे याचा शोध घ्या, असे आवाहनही केले.

या प्रसंगी व्यासपीठावर सरचिटणीस बळीराम भोईर, विजय जाधव, अशोक तांबे, माजी नगरसेवक बंडू खोडे आणि माजी सैनिक रामराव लोंढे हे उपस्थित होते. भगवान मधे यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी रामराव लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी अनेक गरिबांना विस्थापित केले आहे. येथील गोरगरिबांच्या मुलाबाळांचे शिक्षण रखडले आहे. अधिकाऱ्यांची मुले इंटरनॅशनल शाळेत शिक्षण घेतात त्यांना आपल्या समस्या कळणार नाहीत. आपण शासनाशी भांडून त्या सोडवाव्या लागतील, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे मिराबाई लहांगे या वयोवृध्द महिलेने अत्यंत पोटतीडकीने आपले आपले मनोगत व्यक्त केले. ही महिला मनेरोड येथे छोटा फळांचा हातगाडा लावते. तिला विस्थापित केले आहे. त्याचबरोबर दुकान उचलण्याची सतत भीती दाखवली जाते. याचा निषेध करीत तिने सर्वांनी एकजुटीने न घाबरता लढण्याचे आवाहन केले.

त्र्यंबकच्या अतिक्रमणांबाबत अटल आखाड्याचे उदयगिरी महाराज आणि गायत्री उपासक चंद्रकांत पाठक यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत अद्याप न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. तथापि सिंहस्थ नियोजनाचे वेळेस शहरातील काही भागात अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर ही मोहीम थांबली. अर्थात न्यायालयाचा अंतिम निकाल येताच कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिफ्टमध्ये अडकल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लिफ्ट दुरुस्त करीत असलेल्या कर्मचाऱ्याचा लिफ्टच्या दरवाजात अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. योगेश सदाशिव महाजन (वय २६) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अशोकस्तंभ परिसरातील 'संचेती' इमारतीत घडली. मखमलाबाद येथील योगेश महाजन इमारतीच्या लिफ्टची दुरुस्ती करीत असताना दरवाजा व भिंतीत सापडले. ​यावेळी झालेल्या आवाजामुळे इतर नागरिकांनी त्यांना बाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

चेन स्नॅचिंग

गंगापूररोड परिसरातील समर्थनगर येथील मनोहर कॉलनीतील पंचम अपार्टमेंटसमोर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी तोडून पोबारा केला. ही घटना रविवारी सकाळी पाऊणे दहा वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी ऋतुजा चारूदत्त जोशी (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूररोड पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. विक्रोळी येथील गोदरेज हिल साईड कॉलनी येथे राहणाऱ्या जोशी काही कामानिमित्त शहरात आल्या होत्या. त्या मनोहर कॉलनीतील पंचम अपार्टमेंटसमोर उभ्या असताना एमएच ०५ बीयू ९०३९ या क्रमाकांच्या दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पोबारा केला. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दुचाकीचा क्रमांक बनावट असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. दरम्यान, २०१४ च्या तुलनेत २०१५ या वर्षात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये शहरात वाढ झाल्याचे दिसते. यंदाही तोच ट्रेंड कायम असून परिमंडळ एकमध्ये सातत्याने मंगळसूत्र ओरबडण्याच्या घटना घडत आहेत. तुलनेत परिमंडळ दोनमध्ये गेल्या काही महिन्यापासून स्नॅचरला आपले हात साफ करता आलेले नाही. परिमंडळ दोन मध्ये लावण्यात येणारा बंदोबस्त व चेकिंगमुळे हे गुन्हेगारांना आळा बसला असून अशीच व्यवस्था सरकारवाडा, पंचवटी, गंगापूर आदी पोलिस स्टेशनच्या हद्दीत निर्माण करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

गच्चीवरून पडून मुलाचा मृत्यू

गच्चीवर पतंग उडवत असताना तोल जाऊन खाली पडलेल्या १४ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. लोकेश योगेश गोसावी असे या मुलाचे नाव असून, लोकेश रविवारी संध्याकाळी कॅनडा कॉर्नर परिसरातील अभिरूची सोसायटीच्या गच्चीवर पतंग उडवत होता. याच नादात तोल जाऊन तो उंच गच्चीवरून खाली पडला. डोक्यास व इतर अवयवयांना गंभीर दुखापत झाल्याने लोकेशला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

तडीपारास अटक

गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडास शहरातून अटक करण्यात आली आहे. इलियास गुलाब शेख असे त्याचे नाव असून, तो देवळाली गाव परिसरातील सुंदर नगर येथे राहतो. शेखला १५ मार्च २०१४ रोजी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र, त्याने कोणत्याही वरिष्ठ पोलिस अधिकारी किंवा न्यायालयाची परवानगी न घेता शहरात वावर केला. त्याच्या विरोधात उपनगर पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

वणी-नाशिक रस्त्यावर मृतदेह आढळला

दिंडोरी : वणी-नाशिक रस्त्यावरील ओझरखेड सांडव्याच्या पुलाजवळ एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. रस्त्याच्या कडेपासून शेतजमिनीकडे मृतदेह फरफटत नेल्याचे दिसून आले आहे. अंगात लाल रंगाचा टी शर्ट, त्यावर फेरारी असे इंग्रजीत नाव आहे. उजव्या बाहीवर इंग्रजीत 47 असा आकडा आहे. निळ्यारंगांची जीन्स पॅन्ट तर उजव्या हातावर राजू असे नाव व तळहाताच्या मागे ॐ गोंदलेले आहे. हा तरूण गुजराथी असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. शवविच्छेदनानंतर या तरुणाच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही. त्यामुळे व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी बागूल यांनी सांगितले पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निराधारांना आधार देण्यासाठी विशेष मोहीम

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

जीवन आधार योजनेंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन निराधारांना आदराने आधार देण्यासाठी येवला उपविभागीय कार्यालयाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जीवन आधार या उपक्रमाच्या माध्यमातून येत्या १९ ते २७ जानेवारी या कालावधीत येवला तालुक्यात महसूल मंडळ स्तरावर नियोजनबध्द कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती येवला प्रांताधिकारी वासंती माळी व तहसीलदार शरद मंडलिक यांनी दिली.

पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्याकरिता यापूर्वी विविध कागदपत्रांची करावी लागणारी गोळा बेरीज तसेच धावपळ होते. या बाबी लक्षात घेता आता 'जीवन आधार' या उपक्रमाच्या माध्यमातून १९ ते २७ जानेवारी या कालावधीत येवला तालुक्यात महसूल मंडळ स्तरावर नियोजनबध्द कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महसूल, ग्रामविकास, नगर विकास, वैद्यकीय आदी शासकीय विभागांना एकाच छताखाली एकत्र आणताना ज्या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत लाभ मिळाला नाही अथवा शासनापर्यंत जे लाभार्थी पोहचू शकले नाही, अशा लाभार्थ्यांना योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता त्याच दिवशी पूर्ण करून दिली जाणार असल्याचे प्रांताधिकारी वासंती माळी व तहसीलदार शरद मंडलिक यांनी स्पष्ट केले.

जीवन आधार या योजनेचा मुख्य उद्देश येवला तालुक्यात एकही पात्र व्यक्ती केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही असा आहे. येवला तालुक्यातील दारिद्र्य रेषेखालील पात्र व्यक्तींनी महसूल मंडळाच्या ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यातील सहा महसूल मंडळांतर्गत असणाऱ्या सजेतील गावांनी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन प्रांताधिकारी वासंती माळी यांनी केले आहे.

ही कागदपत्रे गरजेची

या उपक्रमामध्ये लाभार्थ्यांनी रेशनकार्ड झेरॉक्स, निवडणूक ओळखपत्र, चार फोटो ही कागदपत्रे सोबत आणावी. तसेच, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्ती व्यक्ती मृत झालेली असल्यास राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत एकरकमी २० हजार रुपये असे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे, असे प्रांताधिकारी वासंती माळी व तहसीलदार शरद मंडलिक यांनी स्पष्ट केले.

येथे होणार शिबिर

येवला ग्रामीण रुग्णालय - १९ जानेवारी

स्वामी समर्थ सभामंडप सावरगाव - २० जानेवारी

जिल्हा परिषद शाळा अंदरसूल - २१ जानेवारी

जानकी मंगल कार्यालय नगरसूल - २२ जानेवारी

तलाठी कार्यालय मुखेड - २३ जानेवारी

रामेश्वर मंदिर पाटोदा - २७ जानेवारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणक्रमांचे निकाल आता ३० दिवसांच्या आत

0
0

कुलगुरू डॉ. साळुंखे यांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा अधिक देता याव्यात, तसेच पारदर्शकता वाढावी म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर मुक्त विद्यापीठाने भर दिला आहे. डिजिटायझेशनवर लक्ष केंद्रित केल्याने सध्या सर्व शिक्षणक्रमांचे निकाल ३० दिवसांच्या आत लावणे शक्य झाले असल्याची माहिती कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी दिली. दीक्षान्त समारंभाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मे महिन्यात होणाऱ्या परीक्षांमध्ये उत्तरपत्रिकांवर विद्यार्थ्याचा फोटो आणि स्वाक्षरी छापणार आहे. मुक्त विद्यापीठ साधारणतः २६ वर्षांनंतर प्रथमच एमकेसीएल आणि आय-कन्सेंट यांच्या सहकार्याने एकत्रितपणे 'शून्य सीमांत किंमत शिक्षण' या तत्त्वावर एकविसाव्या शतकातील डिजिटल समाज घडविण्यासाठी आवश्यक शिक्षक तयार करण्यासाठी 'पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ई-एज्युकेशन इन डिजिटल सोसायटी' हा एक नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम लवकरच सुरू करणार असल्याचेही कुलगुरू डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

विद्यापीठाने कौशल्याधिष्ठीत शिक्षणावर भर दिला असल्याचे सांगून राज्याच्या ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने नऊ९ गावे दत्तक घेतली असून, तेथे काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे, वित्त अधिकारी पंडित गवळी उपस्थित होते. जनसंपर्क विभागाचे प्रमुख संतोष साबळे यांनी स्वागत करून आभार मानले.

समारंभाची वैशिष्टे

पदवीदान समारंभात अपंग ३८७, मूकबधीर ५४, अंध २४१, बंदिवान ८६ विद्यार्थी पदवी ग्रहण करणार आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पुण्याच्या नपाथे फाउंडेशन मार्फत चालविण्यात येणारा रुग्णसहायक पदविका शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या ९५ विद्यार्थिनींना कायम नोकरी मिळाली आहे. विशेष म्हणजे या शिक्षणक्रमास प्रवेश घेणारे बहुसंख्य विद्यार्थी राज्यातल्या ग्रामीण भागातील आहेत. ल्युपिन फार्माच्या सुमारे ४५० विद्यार्थ्यांनाही कायम नोकरी मिळाली आहे. याशिवाय डोमेस्टिक वर्कस वेल्फेअर हा डिप्लोमा यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या १२१ विद्यार्थ्यांनाही या वेळी प्रथमच पदविका प्रदान केली जाणार आहे.

इंटरनेटवर थेट प्रसारण

या पदवीदान समारंभाचे थेट प्रसारण इंटरनेटवरून करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac आणि http://ycmou.ac.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध असणार आहे. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही पदवीदान समारंभ थेट पाहता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आई अन् मातीवरच्या कवितांनी केले मंत्रमुग्ध

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

कुठे जीवनाचे तत्वज्ञान सांगत मूल्य जपण्याचा मंत्र देणारे हृदयस्पर्शी दाखले देत तर कधी उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेणारी आई आणि मातीवरची कविता सादर करीत कवी विलास पगार यांनी उपस्थिताना मंत्रमुग्ध करून सोडले. निमित्त होते छत्रे विद्यालयात झालेल्या शालेय स्पर्धा पारितोषिक वितरणाचे.

कवी विलास पगार यांचे समर्पक उदाहरणे व कवितांची रेलचेल असणारे भाषण विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना ही युक्तीच्या चार गोष्टी सांगणारे ठरले. 'माय तुझ्या घामामुळे, आयुष्याची झाली फुले, सांगताच येत नाही आम्हा काय दिले' ही आईवरची कविता आणि 'घरातील जळमटदूर करीत राहिली, दुःख बाळगून उरी, गाणी सुखाची गायली' हे शब्द उपस्थितांच्या पापण्यांच्या कडा ओलावून गेले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात विविध स्पर्धांचा मोलाचा वाटा आणि पुस्तकांचे महत्त्व कवी विलास पगार यांनी नेमक्या शब्दात मांडले.

मातीवरची त्यांची कविता दाद घेऊन गेली. 'घराला ठेवते मायेने बांधून, स्वताला रांधुन तव्यावर ही माय'ची कहाणी सर्वाना अंतर्मुख करुन गेली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पी. जे. दिंडोरकर होते. संचालक प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापिका के. एस. लांबोळे, उपमुख्यध्यापक आर. एन. थोरात, पर्यवेक्षक संदीप देशपांडे, प्रवीण व्यवहारे व्यासपीठावर होते. लांबोळे यांनी प्रास्ताविक केले. एस. डी. पवार यांनी परिचय करून दिला. कवी पगार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. नंदिनी पाटील हिला गायनाबद्दल विशेष पारितोषिक देण्यात आले. स्मिता देशपांडे व संगीता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धा समिती प्रमुख विशाखा चांदवडकर, राहुल कुलकर्णी, अतुल देशपांडे, गीत मंचचे पंकज पाखले, विश्राम पवार, आर. एम. ठाकरे, सुनील इलग यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पं. गजाननशास्त्री गोडशे अनंतात विलीन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शुक्ल यजुर्वेदाचे भारतातील मेधावी विव्दान, घनपाठी पंडित गजाननशास्त्री गोडशे (वय ७८) यांचे सोमवारी पहाटे श्रीक्षेत्र वाराणसी येथे अल्पशा आजाराने निधन झाले. वाराणसी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अखिल भारतीय स्तरावर शुक्ल यजुर्वेद शाखेचे रक्षण व प्रचार, प्रसारासाठी त्यांचे नाशिक येथील निवासी ज्येष्ठ बंधू कै. श्रीकृष्णशास्त्री गोडशे यांच्या समवेत त्यांनी मोलाचे योगदान दिले.देशातील चारही पीठाच्या शंकराचार्यांकडून वेदमूर्ती गजाननशास्त्री यांना गौरविण्यात आले होते. वेद आणि उपनिषदांच्या क्षेत्रातील नाशिकचा प्रतिष्ठेचा 'गुरू गंगेश्वर वेद वेदांग पुरस्कार' आणि कैलास मठाच्या वतीने देण्यात येणारा 'श्री सरस्वती पुरस्कार' या पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आले होते.सन १९३८ साली श्रीक्षेत्र वाराणसी येथे जन्मलेल्या गजाननशास्त्री यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वेदांचे अध्ययन केले होते. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना 'सलक्षण घनान्त अध्ययन' पूर्ण करून 'वेदाचार्य' (एम.ए.) ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. शुक्ल यजुर्वेदासाठीच्या त्यांच्या समर्पित जीवनाबद्दल नाशिक येथील शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या वतीने त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

नाशिकमधील वैदीक विज्ञान संस्कृत महाविद्यालयाच्या वतीनेही त्यांना राष्ट्रीय पंडित पुरस्काराने गौरविण्यात आले होते. वेदाचार्य गोडशेशास्त्री यांच्या प्रमाणे शुक्ल यजुर्वेदाच्या रक्षणाचे कार्य काशीमधील विव्दान विनायकशास्त्री बादल, वाराणसीमधील विव्दान लक्ष्मीकांतशास्त्री दीक्षित यांनी सुरू ठेवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवार गाजला आंदोलनांनी

0
0

विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर वारंवार पाठपुरावा करूनही विद्यार्थी हिताच्या मागण्या मान्य होत नसल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, जिल्हाध्यक्ष दीपक वाघ आणि शहराध्यक्ष गौरव गोवर्धने यांच्या नेतृत्वाखाली बी. डी. भालेकर मैदान येथून मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये शेकडो तरुण सहभागी झाले. जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला. मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह उपलब्ध करून द्यावे, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह इमारती बांधून त्यांची क्षमता वाढवावी, विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वैधता तीन महिन्यांत देण्यात यावी, दुष्काळी परिस्थितीमुळे शिक्षणाचा खर्च परवडेनासा झाला आहे. शेतकरी कुटुंबातील मुले अर्ध्यावर शिक्षण सोडत असून त्यांना सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र नाशिकमध्ये लवकर सुरू करावे, राज्यातील १६८ कृषी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची दोन वर्षांपासून थकलेली सुमारे ७० कोटींची शिष्यवृत्ती त्वरित द्यावी, मेडिकल, आयुर्वे‌दिक व दंत विभागातील पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास जेलभरो आंदोलन केले जाईल, असे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी सांगितले.

आरक्षण तत्काळ मंजूर करा आरक्षणाअभावी मराठा समाज देशोधडीला लागत असून समाजाला तत्काळ आरक्षण मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीने केली आहे. समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. एकीकडे दिल्लीत समितीचे संस्थापक अध्यक्ष अविनाश खापे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी उपोषणाला बसले असताना आता राज्यातही ठिकठिकाणी आंदोलनांचा पवित्रा स्वीकारण्यात आला आहे. दिल्ली येथे आंदोलकांची प्रकृती खालावत असूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर समितीचे प्रदेश संघटक अंकुश सुळे, भाऊसाहेब शेळके, विजय नागोलकर, प्रदीप मोराडे आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

राज्य श्रमिक महासंघाचा एल्गार केंद्र सरकारच्या आयसीटी (संगणक) योजनेंतर्गत माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत कंत्राटी शिक्षकांना सरकारी सेवेत कायम करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाने केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपला स्वयंस्पष्ट अहवाल सरकारकडे पाठवावा अशा आशयाचे निवेदन आंदोलकांनी दिले. राज्यात २००८ पासून विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण देण्यासाठी आयसीटी योजना सुरू आहे. सरकारने आयसीटी (संगणक) शिक्षक हे पद निर्माण करून शिक्षकांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे आणि सर्व सरकारी सेवाशर्ती लागू कराव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. विशेष म्हणजे देशात पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गोवा, सिक्कीम आदी राज्यांनी अशा शिक्षकांना सरकारी सेवेत दाखल करून घेतले असताना महाराष्ट्रातच त्यास विलंब का असा सवाल महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन खैरनार, जयंत मोरे, अवंतिका काकड, नम्रता जाधव आदींनी उपस्थित केला आहे.

धरणग्रस्त आदिवासींचे उपोषण लाक्षणिक उपोषण करूनही जिल्हा प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने काश्यपी धरणग्रस्त आदिवासींनी आता बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. देवरगांव, धोंडेगाव, गाळोशी आणि काश्यपनगर येथील धरणग्रस्त सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून मागण्या पूर्ततेची ग्वाही मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याची माहिती आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सोमनाथ मोंढे यांनी दिली. धरणग्रस्तांच्या कुटुंबातील एकास तातडीने सरकारी नोकरी द्यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. संबंधित करारान्वये आतापर्यंत केवळ २३ मुलांना नोकरी देण्यात आली आहे. अन्य धरणग्रस्तांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्यालाही तत्काळ नोकरी द्या, अशी मागणी करण्यात आली. संपादित जमिनींचा मोबदला आजच्या बाजारभावाप्रमाणे तात्काळ देण्यात यावा, पुनर्वसनाबाबतची कुचेष्टा थांबवून न्याय्य हक्काप्रमाणे त्वरित पुनर्वसन करावे, स्थानिकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी स्वतंत्ररित्या पाणी आरक्षित करावे, धरणावर मच्छी व्यवसाय करण्याचा अधिकार स्थानिकांना व प्रामुख्याने धरणग्रस्तांना द्यावा, अशा प्रमुख मागण्या आहेत. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत पाण्याचा थेंब सोडू देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात निषेध अंमळनेर येथे प्रांताधिकारी संजय गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रयत्नाचा महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी निषेध नोंदविला. महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना, राज्य महसूल महासंघ आणि राज्य महसूल कर्मचारी कर्मचारी संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. महसूल अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापर्यंत जाऊन हल्ल्याचे प्रकार घडू लागल्याबाबत नाशिक महसूलच्या अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना व्हाव्यात, संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. सोमवारी दिवसभर काळ्या फिती लावून काम करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडेवार, पुरवठा अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर, प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे, तहसीलदार राजश्री अहिरराव, नायब तहसीलदार पंकज पवार आदी या आंदोलनात सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गतिरोधकासाठी अंबडवासीयांचा रास्ता रोको

0
0

गंगापूररोड, महात्मानगर, आंनदवल्ली परिसरातील कर्मचारी, उद्योजकांकडून अंबड एमआयडीसीकडे जाण्यासाठी आयटीआय सिग्नल, खुटवडनगर, माऊली लॉन्समार्गे या रस्त्याच्या सर्वाधित वापर केला जातो. वाढत्या रहदारीमुळे या मार्गावर रोजच अपघातांची संख्या वाढत आहे. गतिरोधक तसेच वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी अंबड परिसरातील नागरिकांनी महापालिका व पोलिस प्रशासन यांच्याकडे केली आहे. मात्र, त्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. सोमवारी सकाळी महालक्ष्मी नगर येथे तीन अपघात झाले. यात अंबडमधील तुकाराम दातीर (६०) व नातू ओमकार यांना रिक्षाने धडक दिली. दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी संतप्त स्थानिकांनी आंदोलन केले. यात साहेबराव दातीर, शांताराम फडोळ, बाळू कोरडे, दीपक दातीर, भाऊसाहेब आहेर यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनकार्ड ऑफिससाठी मस्लिम ब्रिगेडचे आंदोलन

0
0
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेले धान्य वितरण कार्यालय नाशिकरोड येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता अशा प्रकारे सर्वजनिक कार्यालयाचे स्थानांतरण करणे अवैध आहे. याच कार्यालयातून शहरात रेशनकार्ड दिले जाते. नाशिकरोडला हे कार्यालय गेल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. याची दखल घेत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी सोमवारी आंदोलन करण्यात आले.

पाणीकपातीबाबत महापौर हतबल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनातील ४९ दिवसांचा तुटवडा भरून काढण्यासाठी आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा आदेश महापौरांनी प्रशासनाला देवून आठवडा उलटला आहे. परंतु, अद्यापही महापौरांच्या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनातर्फे केली जात नसल्याने आता खुद्द महापौरच हतबल झाले आहेत. महापालिका प्रशासन महापौरांच्याच आदेशाची अवहेलना करीत असतांना सत्ताधारी मात्र तोंडावर बोट ठेवून आहेत. कपात लागू होत नसल्याने उन्हाळ्यात नाशिककरांची पाण्यासाठीची होरपळ वाढणार आहे.

जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर महापालिकेतर्फे सध्या शहरात १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. परंतु, सध्याची कपात कायम ठेवून पाणीपुरवठा केला तरी जुलै अखेरपर्यंत उपलब्ध पाणी पुरविणे शक्य नाही. गंगापूर व दारणा धरणातून महापालिकेच्या वाट्याला तीन हजार दशलक्ष घनफूट पाणी आले आहे. आतापर्यंत पालिकेने यापैकी ११०६ दशलक्ष घनफूट पाणी वापर केला आहे. त्यामुळे उर्वरित १९८ दिवसांसाठी फक्त १८१३ दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात ४९ दिवसांचा तुटवटा पडणार आहे. ही तूट भरून काढण्यासाठी पाणीकपात वाढविण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नसल्याने अखेरीस महासभेने एक दिवस आठवड्यातून पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौर अशोक मुर्तडक यांनी प्रशासनाला गेल्या मंगळवारीच दिले होते.महापौरांच्या या आदेशाला आता आठवडा लोटला आहे. परंतु, प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही.

इकडे आड, तिकडे विहीर!

सरकारचा दबाव असल्याने व भाजपच्या आमदारांचा पाणीकपातीला विरोध असल्याने प्रशासनही कचाट्यात सापडले आहे. इकडे आड, तर तिकडे विहीर अशी प्रशासनाची अवस्था आहे. दुसरीकडे आदेश देवूनही प्रशासन अंमलबजावणी करीत नसल्याने महापौर हतबल झाले आहे. सत्ताधाऱ्यांचेच पालिकेत ऐकले जात नसल्याची चित्र पालिकेत दिसत आहे. दुसरीकडे कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे त्याचा फटका नाशिककरांना बसणार आहे. उशिराने ही कपात लागू केल्यास त्याचा त्रास नागरिकांनाच सहन करावा लागणार आहे. निर्णय उशिराने लागू केल्यास सत्ताधाऱ्यांवरच त्याचे खापर फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धडपड... थेंबन् थेंब वाचविण्यासाठी!

0
0

पाणीटंचाईचा चटका जाणवू लागल्यानंतर सगळ्यांनी महापालिका प्रशासनावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली. मात्र, घराघरात होत असलेल्या पाणीगळती टंचाईकडे कुणी लक्ष देत नाही. अनेकदा आपल्या घरांमधील वॉश बेसिन, बाथरुम टॉयलेटच्या नळांमधील थेंबथेंब पाणी वाया जाते. सेकंद, प्रतिसेंकदाला टपकणाऱ्या या पाण्याकडे ऐरवी कुणी लक्ष देत नाही. मात्र, याच पाण्याचा थेंब न थेंब ‌वाचविण्यासाठी आणि नाशिककरांच्या भविष्यासाठी तन्ना यांनी मोफत प्लंबिंग मोहिम सुरू केली. एका संस्थेत व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे घेण्यासाठी गेले असता त्यांना पाणीबचतीची कल्पना सुचली. आणि ती अंमलात आणण्यासाठी त्यांनी स्वत:पासून प्रयत्न सुरू केले. इंदिरानगर परिसरातून या उपक्रमाची सुरुवात केली. यासाठी तन्ना यांना वॉर्ड क्रमांक ५३ चे नगरसेवक सतीश सोनवणे व कारडा कन्स्ट्रक्शन यांचे सहकार्य लाभले. सध्या कारडा कन्स्ट्रक्शन यांनी प्लंबर उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्यामार्फत तोट्या दुरुस्तीचे काम केले जात आहे. सध्या नाशिककर व प्रशासनासमोर असलेले पाणीबचतीचे आव्हानही यामुळे हलके होणार असल्याचा विश्वास तन्ना यांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमासाठी जयेश तन्ना यांना अश्पाक शेख, चिंतामण काळे, रश्मी तन्ना, डॉ. कांचन लोकवाणी यांची मोलाची साथ लाभत आहे. पाणीबचतीसाठी आपल्या घरातील नळांची दुरुस्ती करू इच्छिणाऱ्यांनी ९२६०५११७११ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन तन्ना यांनी केले आहे.

स्मार्ट नाशिकच्या वाटचालीत नाशिकला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. येत्या काळात संपूर्ण नाशिकमध्ये हा उपक्रम राबविण्याची इच्छा आहे. पाणीबचतीमुळे भविष्यातील मोठी समस्या दूर होण्यास मदत होईल. नागरिकांच्या सहकाऱ्यावर पुढील प्रकल्प आधारित आहेत. - जयेश तन्ना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकाऱ्यांविना नगरांची ‘पंचाईत’!

0
0

pravin.bidve@timesgroup.com

नाशिक : मोठ्या गाजावाजात आणि घाई गडबडीत राज्य सरकारने ग्रामपंचायतींचे नगरपंचायतींमध्ये रुपांतर केले असले तरी तेथे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह (सीईओ) अन्य पदेच न भरल्याने या केवळ नावालाच नगरपंचायती असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. पदनिर्मिती अभावी प्रस्ताव तयार करण्यापासून ते मार्गी लावण्यापर्यंतची सर्वच कामे रखडल्याने तालुक्यांच्या विकासालाच खीळ बसली आहे.

जिल्ह्यातील देवळा, सुरगाणा, पेठ, निफाड, चांदवड, कळवण आणि दिंडोरी या सात ग्रामपंचायतींचे रुपांतर अलीकडेच नगरपंचायतींमध्ये करण्यात आले. त्यापैकी सहा नगरपंचायतींमध्ये १ नोव्हेंबरला निवडणुकांचा बारही उडाला. नगरपंचायतीचा सदस्य ते नगराध्यक्ष अशा पदांवर विराजमान होण्याची संधी नवनिर्वाचित उमेदवारांना मिळाली. त्यांनी सत्तेची सूत्र हाती घेऊन अडीच महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र, अजूनही राज्य सरकारने तेथे अत्यावश्यक मनुष्यबळच उपलब्ध न करून दिल्याने विकास कामांना खीळ बसली आहे. नगर पंचायत प्रशासनामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, कनिष्ठ व वरिष्ठ अभियंता, अकाऊंटंट, लिपीक यांसारखी पदे अजूनही रिक्त असल्याने विकास कामे मार्गी लावण्याची संबंध प्रक्रियाच थांबली आहे. सरकारी योजना कार्यान्वित करण्यासाठीचे प्रस्तावही जिल्हा प्रशासनाकडे पाठविणे शक्य होत नसल्याने नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचीच त्यामध्ये अधिक कोंडी झाली आहे. मुनष्यबळाची उपलब्धता हा राज्य सरकारच्या पातळीवरील विषय असून पदनिर्मिती व्हावी अशा आशयाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून जिल्हा प्रशासनाने हात वर केले आहेत. याबाबत मौन बाळगणेच प्रशासनाने पसंत केले आहे.

योजना रखडल्या; सत्ताधाऱ्यांची कोंडी

नव्यानेच करण्यात आलेल्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये पदनिर्मिती अभावी अनेक कामे रखडली आहे. इमारतींना पुर्णत्वाचा दाखला देणे, विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे, नागरिकांना तत्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी येत असल्याची कैफियतनगर पंचायतींमधील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होऊ लागली आहे. विशेष म्हणजे अनेक नगरपंचायतींमध्ये शिवसेना भाजपचीच सत्ता आली असून, नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. मात्र मनुष्यबळाअभावी त्या पूर्ण होत नसल्याने लोकप्रतिनिधींचीच कोंडी होऊ लागली आहे.

सीईओंकडे अतिरिक्त पदभार

नवीन नगरपंचायतींच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार जवळच्याच नगरपंचायतींच्या विद्यमान सीईओंकडे सोपविण्यात आला आहे. निफाड नगरपंचायतींचा कारभार सिन्नरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे, चांदवडचा मनमाडच्या अधिकाऱ्यांकडे, पेठचा त्र्यंबकेश्वरच्या अधिकाऱ्यांकडे तर देवळ्याचा अतिरिक्त पदभार सटाण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडे आपापल्या मूळ पदभाराचाच व्याप मोठा असल्याने अतिरीक्त कारभार पाहण्यास पुरेसा वेळ देण्यात त्यांना मर्यादा पडू लागल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images