Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (१८ जानेवारी) अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. शनिवार अखेर ३५० हून अधिक अर्जांची विक्री होऊन एकूण १७० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्जांची विक्री आणि दाखल झालेली संख्या मोठी असून, आज अखेरच्या दिवशी सर्वच पक्ष आपल्या मातब्बर उमेदवारांचे अर्ज दाखल करून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतील. यामुळे इच्छुकांची गर्दी पहायला मिळणार आहे.

शनिवारी कर आणि रविवारी सुटी असल्याने अनेकांनी अर्ज दाखल करण्यासाठी मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधला. या दिवशी एकूण ३५ अर्ज दाखल झाले. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र, अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस असून देखील अद्याप पॅनल निर्मितीचे चित्र स्पष्ट झालेले नाही. शनिवार अखेर एकूण १७० अर्ज दाखल झाले. यात सोसायटी गटात सर्वाधिक ११०, ग्रामपंचायत गटात ४५, हमाल मापरी गटात सात तर व्यापारी गटात आठ अर्ज दाखल झाले आहेत. आज अखेरचा दिवस असल्याने कोण अर्ज दाखल करणार याकडे लक्ष लागून आहे.

यांचे अर्ज दखल

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप नेते अद्वय हिरे, राष्ट्रचादी काँग्रेसचे नेते डॉ. जयंत पवार, माजी संचालक मधुकर हिरे, राजेंद्र जाधव, दशरथ निकम, अमोल शिंदे, गजानन देसले, लतिक घोडके, युवराज गादड, लक्ष्मण देसले, भारत सोनवणे, लक्ष्मण रोकडे आदींनी अर्ज दाखल केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बेजच्या जैन बंधूंचा अनाथांना मदतीचा हात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

अनाथ, निराधार बालकांचे भोजन अनुदान रोखून शासनाने त्यांना वाऱ्यावर सोडलेले असताना समाजातील संवेदनशील संतोष जैन (जुनी बेज) यांच्या सारख्या दानशुरांनी या बालकांच्या पाठीशी उभे राहून त्यांची उपासमार होणार नाही याची काळजी घेत आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल घेत दहा ते पंधरा दिवस पुरेल इतका किराणा जैन बंधूंनी या मानूरस्थित भावना बालसदनाला दिला आहे.

शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका थेट ८० हजार अनाथ, निराश्रित बालकांना बसला असून, त्यांच्यावर संक्रांत आल्याची बातमी 'मटा'त प्रकाशित होताच समाजमन हेलावले. तीन वर्षे बालकांचे भोजन अनुदान रोखून, कर्मचाऱ्यांना बिनपगारी राबवून आणि संस्थाचालकांना कर्जबाजारी करून वाऱ्यावर सोडणाऱ्या शासनाच्या अक्षम्य बेफिकीरीचा सर्वत्र निषेध होत आहे. 'मटा'ने बालकांच्या या संवेदनशील प्रश्नाला वाचा फोडताच दानशूर हात पुढे येऊ लागले आहेत.

कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील व्यापारी संतोष आणि मनोज जैन या सह्रदयी बंधूंनी अनाथ बालकांसाठी योगदान देण्याचे ठरवून क्षणाचाही विलंब न करता आपल्या वडलांच्या स्व. फकीरचंद जैन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मानूरस्थित भावना बालसदनातील बालकांना १०-१५ दिवस पुरेल इतका किराणा व खाद्यतेल आदीची तातडीची मदत करून एक आगळा आदर्श निर्माण केला आहे.

सामाजिक बांधिलकी प्रमाण मानून आम्ही आमच्या परिने सामाजिक दायित्व केले आहे. आता शासनाने आपले कर्तव्य पार पाडत या बालकांचे भोजन अनुदान द्यावे. - संतोष जैन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिओ मोहीम गुरुवारपर्यंत

$
0
0

लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद; आजपासून घराघरात बालकांचा शोध

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मानवी इतिहासात ज्या दुर्धर रोगांनी मानवाच्या शारिरिक, आर्थिक स्थितीवर विघातक परिणाम केले आहे. त्यामध्ये पोलिओचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. पोलिओ या विषाणूजन्य आजाराचे समूळ उच्चाटन होणयासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पोलिओ लसिकरण मोहिमेचे आयोजन केले आहे. शहरातील अनेक केंद्रावर रविवारी बाळांचे लसिकरण करण्यात आले. ही मोहीम गुरुवारपर्यंत (दि. २१) राबविली जाणार आहे.

नाशिक महापालिकेच्या पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ महापौर अशोक मूर्तडक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमहापौर गुरमीत बग्गा स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, महिला व बालकल्याण सभापती वत्सला खैरे, पंचवटी प्रभाग सभापती सुनीता शिंदे, नगरसेवक रुची कुंभारकर, विमल पाटिल आदी उपस्थित होते. नाशिक महापालिका व राज्य सरकारच्या वतीने ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी ही विशेष मोहीम आखण्यात आली. यात नियमित लसीकरणा व्यतिरिक्त पोलिओचे जादा डोस दिले जातात. महापालिका व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी घराघरात जाऊन लरहान मुलांना डोस दिले. तसेच रेल्वे स्टेशन, नाशिकरोड रेल्वे स्टेशन, सीबीएस, मेळा स्टॅड, निमाणी बसस्थानक येथे देखील डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली. प्रभाग अधिकारी म्हणून निवासी वैद्यकीय अधिकारी, आर. सी. एच. नोडल ऑफिसर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. सरकारतर्फे १९९५-९६ पासून पोलिओ कार्यक्रम मोहिम राबविली जात आहे.

लसीकरणाची खातरजमा

बुथवरील रविवारच्या कामानंतर शहरात प्रत्येक घरी जाऊन मुलांना पोलिओ डोस दिला की नाही, याची खात्री करून घेण्यात येणार आहे. ज्या बालकांनी रविवारी डोस घेतला नाही, त्यांना घरी हा डोस दिला जाणार असून ही मोहीम पुढील पाच दिवस सुरू राहणार आहे. त्यासाठी एकूण ६१७ संघ व १२७ आयपीपीआय पर्यवेक्षकांनी काम केले प्रत्येक संघात दोन कर्मचारी होते. मोहिमेसाठी महापालिका, ग्रामीण रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, कर्मचारी, विभागीय अधिकारी तसेच खासगी सहाय्यक परिचारिका, अंगणवाडी, आयसीडीएस परिचारिका, सेविका, मदतनीस, वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय आदींनी परिश्रम घेतले.


३८८७ बालकांना 'दो बुंद जिंदगी के'

देवळाली कॅम्प : देवळाली कॅम्प परिसरात १ ते ५ वर्षाच्या आतील बालकांसाठी कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलच्या वतीने पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यात १५ बुथ च्या माध्यमातून सुमारे ३८८७ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. चारणवाडी, शिंगवे बहुला, स्टेशनवाडी, महेश्वरी केंद्र, जोशी हॉस्पिटल, अंबडवाडी, हौसन रोड येथील प्राथमिक शाळेत, विठ्ठलवाडी, विजयनगर आदी भागात कर्मचारी यांनी जाऊन डोस दिले. तर एक फिरते पथक ग्रामीण भागात कार्यरत होते.


मोहिमेसाठी यांचे प्रयत्न

६२८ बुथ

९५ ट्रान्झिट टीम

३९ फिरते पथक

९ रात्रपाळीचे पथक

एक हजार ८७५ कर्मचारी

एकूण १३६ पर्यवेक्षक





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडकर जपताहेत न्या. रानडेंच्या स्मृती

$
0
0


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक, भारतीय अर्थशास्राचे जनक, समाजसुधारक आणि महात्मा गांधीचे गुरू ना. गोपाळ कृष्ण गोखले यांचे गुरू म्हणून ख्याती असलेल्या व मराठी साहित्य संमेलनाचे पाहिले अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची आज जयंती. त्यांचा जन्म निफाड येथे १८ जानेवारी १८४२ रोजी झाला होता. निफाडमध्ये त्यांची स्मृती जपण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. न्या. रानडे यांचा जन्म झाला त्या ठिकाणी श्री मानकेश्वर वाचनालय, रानडे यांचे राष्ट्रीय स्मारक उभे राहत आहे. या स्मारकात साहित्य, पत्रे, लेख, विचारवंतांची साहित्य आदी ठेवली जाणार आहेत. या स्मारकाकडे मात्र राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. सरकारने मदत केली तर हे स्मारक अधिक भव्यदिव्य होऊ शकेल.

न्या. रानडे यांचे वडील ब्रिटीश काळात निफाड येथे नोकरीला होते. त्यावेळी रानडेंचा जन्म येथील श्री मानकेश्वर मंदिराशेजारील जोशींच्या वाड्यात झाला. शेजारी असलेल्या महादेवच्या मंदिरामुळे त्यांचे महादेव असे नाव ठेवले. ब्रिटीश काळात त्यांचा दबदबा होता. सामाजिक परिषदेच्या माध्यमातून त्यांनी समाज सुधारणासाठी मोठे प्रयत्न केले. त्यांचे उचित स्मारक असावे, अशी निफाडकरांची अनेक दिवसांची इच्छा होती. त्यासाठी श्री मानकेश्वर वाचनालयाने रानडेंचा जन्म झालेली जागा खरेदी केली. सुमारे ३२५ चौ. मी. जागेवर सुमारे एक ते दीड कोटी रुपये खर्चून हे स्मारक आकार घेत आहे. या स्मरकाचे भूमिपूजन माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. अनेकांनी देणगी देऊन या स्मारकासाठी हातभार लावला आहे.

रानडेंच्या नावाने निफाड येथे न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळ कार्यान्वित असून, या संस्थेमार्फत वैनतेय विद्यालय व ज्युनीअर कॉलेज, इंग्लिश मीडियम स्कूलच्या रूपाने शैक्षणिक स्मारकही उभे आहे. दरवर्षी या संस्थेतर्फे रानडेंच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम घेतले जातात. मानकेश्वर वाचनालयाच्या वतीनेही १५ जानेवारी रोजी रानडेंची पुण्यतिथी व १८ जानेवारी रोजी जयंती साजरी केली जाते.

पणती, पणतूचे योगदान

आपल्या पंजोबांचे त्यांच्या जन्मस्थळी स्मारक होतेय हे समजल्यानंतर त्यांची पुढची पिढी सक्रिय सहभागासाठी स्वतःहून पुढे आली. वसुधाताईंनी अडीच लाख रुपये दिले. यातून रानडेंचा पुतळा तयार केला आहे. तर, पणतू रमाकांत विध्वंस (मुंबई) यांनी पाच लाख रुपये या स्मारकासाठी दिले आहेत. महाराष्ट्रातील न्यायवैद्यक शास्रात ४१ वर्षांपासून कार्यरत असलेल्या डॉ. वसुधा आपटे या रानडेंच्या पणती आहेत.

असे असणार स्मारक

सुमारे ३२५ चौ. मी. जागेवर उभे असलेल्या स्मारकाच्या ठिकाणी तीन मजली भव्य वास्तू उभारली जात आहे. या वास्तूच्या तळाशी न्या. रानडेंचा अर्धकृती पुतळा व त्यांच्या जीवनातील प्रसंग चित्ररूपाने साकारले जाणार आहेत. त्यांचे उपलब्ध समग्र लेखन ज्यात त्यांची पत्रे, लेख, भाषणे आदी सर्व विचारधन संकलित करून ते उपलब्ध करून दिले जाणार आहे. रानडेंच्या जीवनावरील इतर साहित्यिक, विचारवंत यांनी लिहिलेले ग्रंथही संकलित केले जातील. त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी व्याख्यानमाला घेण्यात येईल. पहिल्या मजल्यावर ग्रंथालय व अभ्यासिका आणि दुसऱ्या मजल्यावर सभागृह असणार आहे. स्मारकासाठी महाराष्ट्रातील विचारवंतांच्या सूचनांचाही स्वीकार केला जाईल.

- संकलन : सुनील कुमावत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमीच्या हल्ल्यात चार गंभीर जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

भरदिवसा रस्त्यात प्रेमाचे चाळे केल्याचा जाब विचारल्याचा राग आलेल्या तरुणाने दोन साथीरांसह रात्री केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पोलिसांनी विठ्ठल आव्हाड याला अटक केली असून दोघे फरार आहेत. ते नाशिकरोडच्या नगरसेवकाचे कार्यकर्ते आहेत. परिसरात तणावाचे वातावरण आहे.

उपनगर पोलिस ठाण्यात नंदादीप भीमराज जाधव (४५, संघमित्रा सोसायटी, बेला डिसुजा रोड, भीमनगर, जेलरोड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. सोसायटीतील नागरिक व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विठ्ठल दुपारी चार वाजेच्या सुमारास मुलीसोबत प्रेसशेजारील बेला डिसुझा रोडवर बोलत होता. काही वेळा नंतर या प्रेमी युगलांचे चाळे झाल्यावर नागरिकांनी आव्हाड याला हटकले. मात्र, त्याने शिवीगाळ करत नगरसेवकाचे नाव घेऊन धमकी दिली. पोलिसांनी येऊन मध्यस्थी केली. रात्री साडेदहाच्या सुमारास आव्हाड दोन साथीदारांना घेऊन आला. हातात असलेल्या पाईपने त्या तिघांनी दिसेल त्यांना मारायला सुरवात केली. सुनील गुंजाळ यांच्या खिडक्या व दरवाजा तोडून सुमेध गुंजाळ व स्वप्निल दोंदे यांच्यावर त्यांनी प्राणघातक हल्ला केला. नंतर अन्य लोकांवर हल्ला केला. त्यात योगेश बाळासाहेब धुमाळ, नंदादीप जाधव जखमी झाले. तणाव वाढताच संशयित पळून गेले.

पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अतुल झेंडे, रवींद्र वाडेकर यांनीही गंभीर दखल घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे, पोलिस निरीक्षक बी. जी. कोतकर, उपनिरीक्षक अनमोल केदार, जाधव यांनी तातडीने कारवाई करुन विठ्ठलला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदुर्डी शिवारात बिबट्यांचा संचार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

गोदाकाठावर दहशत पसरवणारे बिबटे आता निफाड तालुक्याच्या उत्तर भागातील गावांमध्ये भरदिवसा ऊस आणि द्राक्ष बागांमध्ये दिसून येत आहेत. यामुळे शेतवस्तीवर राहणारे शेतकरी भयभीत झाले आहेत. बिबटे दिसल्यानंतर शेतकऱ्यांनी वनाधिकारी व कर्मचारी यांना फोन केला तर त्यांचे मोबाइल स्विच ऑफ व नॉटरिचेबल येत होते. वन अधिकाऱ्यांनी या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याबरोबरच शोधमोहीम घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.

नांदुर्डी रेल्वेगेट शिवारात शनिवार व रविवारी या दोन्ही दिवशी भरदुपारी काम करणारे कामगार आणि शेतकऱ्यांना बिबटे फिरताना दिसून आले. या परिसरात उसाची तोड चालू आहे. तसेच, द्राक्षबागांचे खुडेही सुरू आहे. दोन बिबटे आणि त्यांचे दोन ते तीन बछडे या भागात दिसून आले आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर निफडचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, नगरसेवक मुकुंद होळकर, जावेद शेख, संजय कुंदे, इरफान सैय्यद आदींनी या शिवारातील शेतमळ्यांकडे धाव घेतली. तिथे परिस्थिती पाहून वनाधिकारी व कर्मचारी यांना माहिती देण्यासाठी फोन केला तर या सर्वांचे फोन स्विच ऑफ येत होते.

निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागात असणारा बिबट्याचा वावर आता इतरत्रही दिसू लागला आहे. याकडे वनविभाग दुर्लक्ष करीत आहे. तालुक्यात बिबट्याने आतापर्यंत लहान मुलांचा जीव घेण्याबरोबरच मोठ्या माणसांवरही हल्ले करून जखमी केले आहे. वनविभाग मात्र येवला आणि सिन्नर अशा कार्यक्षेत्राच्या सिमारेषांचे कारण सांगून जबाबदारी झटकत आहेत. त्याचा परिणाम बिबट्याचा चहुबाजूने वावर वाढत आहे. निफाड शहरातही बिबटे प्रवेश करू शकतात. यामुळे त्यांना जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

पिंजरे लावण्याची मागणी

बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असलेल्या भागात पिंजरे लावावेत, अशी मागणी नगरसेवक जावेद शेख व मुकुंद होळकर यांनी केली आहे. पिंजरे मिळत नाही अशी कारणे वनविभागाने देऊ नये. या भागात अनेक ठिकाणी बिबट्यांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत पिंजरेही उपलब्ध करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्ताह ग्रंथालयाचा की...!

$
0
0

अशांत किरकिरकर

पोलिसांच्या अजब रेट्यातून कसाबसा अशांत परशुराम साईखेडकर नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचला. या नाट्यगृहाने आयुष्यात कधी इतके पोलिस पाहिले नसतील पण आज त्याला गराडा पडलेला होता. कारणही तसेच होते, येथे डॉ. सुब्रह्मण्यन स्वामी येणार होते. खरे तर त्यांना साहित्याच्या व्यासपीठावर का बोलावले आहे हा प्रश्न आहेच पण बोलावले हे खरे. सावानातच उद्योजकांची पडलेली झुंबड पाहून अशांतला प्रश्न पडला की देणगी द्यायच्या वेळी एकही उद्योजक तोंड दाखवत नाही व असा कुणी प्रमुख पाहुणा आला की एक नंबर हजर असतो, सावानातले उद्योजक आहेतच त्यांना पायघड्या टाकायला. असो.

सांस्कृतिक वर्तुळात आणखी काय चाललेय याचा शोध घ्यावा म्हणून अशांत जरा फेरफटका मारण्याच्या उद्देशाने निघाला होता तर त्याला अधिक लांब जावे लागले नाही. टिळकपथावर असलेल्या १७५ की काय वर्षे पूर्ण करणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाचा ग्रंथालय सप्ताह ऐन भरात आलेला त्याला दिसला. बहोत खूब! म्हणून त्याने वाचनालयाच्या आत पाऊल ठेवले तर तेथे रंगरंगोटी करण्याच्या कामाला उत आला होता. आता तर म्हणे महिनाभरासाठी सावानाचा मुक्तद्वार विभाग बंद ठेवण्यात आला आहे. स्वत:च्या कार्यक्रमासाठी मुक्तहस्ते वापरण्यात येणारा मुक्तद्वार विभाग वाचकांसाठी मात्र बंद करण्यात आल्याने काही वाचकांनी अशांतजवळ मन मोकळे केले होतेच त्याच धर्तीवर त्याने वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांशी डोके लावायचे ठरवले. परंतु पहातो तर काय, कार्यवाह सूत्रसंचलनात व्यग्र, अध्यक्ष सत्कार समारंभात मग्न, उपाध्यक्षांची गैरहजेरी ठरलेली व इतर पदांवरील व्यक्तींचा मागमूसच कार्यक्रमाला नव्हता. मग आता बोलायचे कुणाशी? तसेही वाचनालयाचे पदाधिकारी कुणाचेही काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत असतातच कोठे कारण त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या विरोधातच केलेली वाटते किंवा प्रत्येक वेळी वार्षिक सर्वसाधारण सभेला उभे असल्यासारखीच उत्तरे कानी पडतात. त्यामुळे वाचकांचा कैवार घेऊन आपण काही बोलायला जावे व त्याकडे पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करावे असे व्हायला नको म्हणून अशांतने गांधीवाद स्विकारत 'कळो त्यांचे त्यांनाच' अशी भूमिका घेतली. पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाला उत्सुकतेने हजेरी लावण्यासाठी निघालेला अशांत तेथे बाशिंग बांधून उभे असणाऱ्यांची गर्दी पाहून संकोचून गेला. या गर्दीत सामील न होता आपण बघ्याची भूमिका घ्यावी असे वाटून तो वाचनालयाच्या वाढविलेल्या वर्गणीतून आता अमाप पैसा मिळणार आहे या कल्पनेने हुरळून गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या नव्या कोऱ्या खुर्च्यांपैकी एकीवर जाऊन विराजमान झाला. बघतो तर काय, प्रासंगिक कार्यक्रम. कवी मंगेश पाडगावकर यांना काव्य संगीतमय आदरांजली. अरे व्वा! कार्यकारिणीला एवढे मात्र भारी सुचते. त्यातही कौतुकाची बाब म्हणजे नव्या पिढीला संधी देऊन उदारतेतून काव्यवाचन, गायन करण्याची संधी पदाधिकाऱ्यांनी देऊ केली होती. कार्यक्रम चांगलाच झाला यात शंका नाही. हा हॉल विशेष बनविण्यात आला होता हे अशांतच्या ध्यानी आले. व्यासपीठ, बॅकग्राऊंड, खुर्च्या, खिडक्यांचे नवे पडदे असा साराच जामानिमा जमून आलेला. मात्र पत्रिकेवरील पुढील कार्यक्रम पाहताना कपाळावरील आठ्या काही केल्या कमी होईना! प्रत्येक गोष्टीत एका हिंदुत्ववादी विचारसरणीचा पुरस्कार करणारे काहीजण अब्दूल कादर मुकादम साहेबांना कसे काय व्याख्यानासाठी आणू शकतात बॉ! हा मोठा प्रश्नच होता. असो. कादर साहेबांचे व्याख्यान रंगले. मूळ विषय जरा बाजूला पडून मुस्लिम इतिहासातच अधिक वेळ गेल्याने भविष्याबाबत बोलण्यासाठी त्यांना कमी वेळ मिळाला. तीच गत परिसंवादाचीही झाली. दुसरा एखादा व्याख्याता आलेला नाही म्हणजे त्याचा वेळ आपण खाल्ला तर चालेल अशा समजूतीतून परिसंवाद चांगलाच लांबला. त्यात जी चर्चा व्हायला पाहिजे होती ती कोठेतरी मार खाताना दिसली. मराठीत दर्जेदार साहित्यनिर्मिती मंदावली आहे याऐवजी मराठी भाषा कशी तग धरू शकेल या विचारमंथनात बराच वेळ गेला.

यंदाचा सप्ताह काही मानवला नाही असा विचार अशांतच्या मनात डोकावला तोच गेल्या १२५ वर्षांतील साहित्य आणि काव्याचा सांगितिक रसास्वाद या गोंडस नावाखाली गोरी गोरी पान फुलासारखी छान, कोटी कोटी प्रणित तुझ्या, रेशमाच्या रेघांनी यासारखी गाणी ऐकवण्यात आली. ती ही कशी तर तालासुरांशी अगदीच वैर असलेले सहगायक मुख्य गायकाच्या वळचणीला बसलेले होते. मुख्य गायकाचा विषय निघाला आहेच तर अशांतला पडलेल्या एका प्रश्नाने पुन्हा उचल खाल्ली. तो प्रश्न म्हणजे अभय माणकेच का? पुन्हा-पुन्हा अभय माणकेंनाच का गाण्यासाठी बोलावले जाते. आता सावानाने एकदा त्यांचा प्रयोग रसिकांवर केला आहेच ना! मग पुन्हा त्यांना गाण्यासाठी बोलाविण्यात काय पॉईंट आहे?

आता सर्वात महत्त्वाचा व वाचकांना पटेलच असा एक मुद्दा अशांतच्या नजरेसमोर आला तो म्हणजे हे डॉ. सुब्रह्मण्यन कोण आहेत, साहित्याचा व त्यांचा काय संबंध? 'भारत आज-काल व उद्या' यासारख्या विषयावर बोलण्यासाठी एखादा द्रष्टा विचारवंत बोलवायचा सोडून वादग्रस्त राजकारण्यांना बोलावून पदाधिकाऱ्यांनी काय सिध्द केले. वाचनालयासारख्या पवित्र संस्थेतील पदाधिकारी पक्ष व राजकीय लोकांच्या भानगडीत पडतात हेच मोठे दुर्देव आहे. बघाच, आम्ही किती गर्दी जमा करतो ते या भावनेतून या विभूतींना बोलावले असल्यास वाचनाच्या मंदिरातील पुजाऱ्यांनी हे करू नये असे वाटते. असो. फार पूर्वी म्हणजे किमान तीन वर्षांपूर्वी सार्वजनिक वाचनालयाने ग्रंथालय सप्ताहानिमित्त आपल्या सभासदांसाठी नवी योजना सुरू केली होती. ग्रंथालय सप्ताह सुरू झाल्यापासून संपेपर्यंत सभासदाने वाचनालयात असलेले पुस्तक विकत घेऊन ते वाचून झाल्यानंतर खराब न करता वाचनालयात बिलासह परत करायचे व त्या पुस्तकाची पूर्ण रक्कम परत घ्यायची, असे या अभिनव योजनेचे स्वरूप होते 'वाचनालयासाठी वाचकांनीच करायची पुस्तक खरेदी' अशी ही पद्धत होती. अशासारख्या योजनांचे पुढे काय होते हे पदाधिकाऱ्यांनी सांगावे. सप्ताहामध्ये गाण्याच्या मैफली भरवून रसिकांची दिशाभूल करू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांची हेल्मेट जनजागृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरवासीयांमध्ये हल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी हेल्मेट रॅली काढण्यात आली. आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्यासह तीनशेहून अधिक वाहनधारकांनी स्वत: हेल्मेट परिधान करून अन्य वाहनचालकांनाही हेल्मेट वापरासाठी प्रेरीत केले.

रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत शहरात सध्या विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. अपघाती मृत्यूंच्या वाढत्या संख्येला हेल्मेट वापराचा अभाव हे देखील एक कारण असल्याने त्याबाबत जनजागृतीची मोहीम अनेक महिने राबविली जात आहे. महात्मानगर येथील क्रिकेट मैदानाजवळून आमदार फरांदे आणि हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी रॅलीचा शुभारंभ झाला. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, पोलिस उपायुक्त विजय पाटील, वाहतूकचे सहायक पोलिस आयुक्त प्रशांत वाघुंडे, पोलिस निरीक्षक एम. एम. बागवान यांसह विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हेल्मेट जनजागृतीबाबतचे फलक दाखविण्यात आले. गंगापूर रोड, कॉलेजरोड, त्र्यंबकरोडमार्गे पुन्हा ही रॅली महात्मानगर येथील मैदानावर परतली. रोटरॅक्ट क्लब ऑफ नाशिक टुरिझमचे एचपीटी कॉलेजमधील सहकारी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमणावर आजपासून हातोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

गेल्या दोन आठवड्यापासून अवैध नळ जोडणीधारकांवर मालेगाव महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. आता आजपासून (१८ जानेवारी) महापालिका प्रशासनाच्या रडारवर शहरातील अतिक्रमणधारक असणार आहेत. मनपा हद्दीतील विविध भागातील अतिक्रमण हटाव मोहीम प्रशासनाने हाती घेणार असून, रस्ते मोकळा श्वास घेऊ शकणार आहेत.

शहरातील जुना आग्रा रोड, नवीन बसस्थानक, कॅम्प रोड, सटाणा रोड आशा प्रमुख भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यामुळे शहरातील वाहतुकीचा खोळंबा होतो. पादचाऱ्यांना चालण्यासह जागा ठेवलेली नाही. या अतिक्रमणधारकांना मनपाकडून अनेकवेळा सूचना करून देखील ते जैसे थे आहे. याबाबत शहरातील राजकीय पक्ष सामाजिक संघटना आणि नगरसेवकांनी देखील तक्रारी केल्या. गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी यांनी देखील मनपाकडून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात यावी, असे आदेश देण्यात आले. तसेच, शहरात जुना आग्रा महामार्गावर एका मौलानाचा अपघाती मृत्यू झाल्याने एमआयएम नगरसेवक ओसामा आझमी व पदाधिकारी यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनपाला देत अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी अतिक्रमणधारकांना शनिवारपर्यंतची मुदत दिली होती. आता आजपासून शहरातील अतिक्रम हटाव मोहीम पोलिस बंदोबस्तात सुरू केली जाणार आहे. गेल्या महिन्यात काही प्रभागात अशी मोहीम राबविण्यात येऊन अतिक्रमण हटविण्यात आले होते. मात्र, अतिक्रमण पथकाची पाठ फिरताच हे अतिक्रमण पूर्ववत होत असल्याचे चित्र आहे. सध्या शहराच्या सर्वच प्रमुख रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मृती बदलून महिलांना द्या मंदिरप्रवेश!

$
0
0

सार्वजनिक वाचनालय नाशिक आयोजित ग्रंथालय सप्ताहातील शेवटचे पुष्प 'भारत : काल-आज आणि उद्या' या विषयावर डॉ. स्वामी बोलत होते. स्मृतींच्या नियमांमध्ये बदलत्या काळानुसार बदल आणायला हवेत. नाशिक हे आमच्यासाठी स्फूर्तीस्थान आहे. कारण येथे सावरकरांचा जन्म झाला आहे. त्यांच्यावर राजकारण्यांनी खूप अन्याय केला. सुभाषचंद्र बोसनंतर त्यांचीच फाईल मी हाती घेणार आहे, असे डॉ. स्वामी यांनी सांगितले.

महात्मा गांधींच्या शरीरात ४ गोळ्या सापडल्या. प्रॉसिक्युटरचे म्हणणे आहे की ३ गोळ्या होत्या तर नथुरामने २ गोळ्या झाडल्या होत्या. मग इतर गोळ्या आल्या कोठून? त्यांच्या मृत्यूने सर्वाधिक फायदा जवाहरलाल नेहरूंना होणार होता. दोन वर्षांनंतर मीच याच तपास लावणार आहे, असे डॉ. स्वामी म्हणाले. आपले पूर्वज हिंदू आहेत असे मुस्लिमांनी मानले तर त्यांना आपले मानायला आम्हीही तयार आहोत. पारशी लोकांचे भारतात येणे, राहणे, मुस्लिमांचे व ख्रिश्चनांचे भारतात येऊन राहणे, शिवाजी महारांजांचा स्वराज्याचा संकल्प, महाराणा प्रतापची लढाई, राणी चेन्नमा, राणी लक्ष्मीबाई यांच्यापासून तर बाळ गंगाधर टिळक यांच्यापर्यंतचा इतिहास सांगून डॉ. स्वामी म्हणाले, की शिवाजी महाराजांना इंग्रज लोक 'चिकन थीफ' म्हणत असत पण नेहरू तर 'चूहा थीफ' आहेत.

पूर्वीपासून फार चुकीचा इतिहास लिहून ठेवलेला आहे. आपल्याला भारताचे भविष्य लिहायचे असेल तर इतिहास बदलण्याची गरज आहे. आज भारतात ८० टक्के हिंदू लोक आहेत. हे सर्वजण एकजूट झाले तर हिंदू संस्कृतीचे विराट स्वरूप लक्षात येईल. महंमद घौरीने आपल्यावर जे आक्रमण केले ते पहाटे केले नाहीतर आपण कधीही हरलो नसतो. त्यातच आमची क्षमा सवय दिवसेंदिवस घातक बनत आहे. पाकिस्तानबाबत आम्ही तेच करीत आहोत. पुन्हा पुन्हा पाकला क्षमा करीत आहोत पण तो सुधारायचे नाव घेत नाही, असेही डॉ. स्वामी म्हणाले.

आजच्या शैक्षणिक व्यवस्थेने आम्हाला 'बाबू' बनवून टाकले आहे. इंग्रजांनी आपल्या देशामध्ये हीनत्वाची भावना भरून टाकल्याने आमच्यामध्ये न्यूनगंड तयार झाला आहे. तो न्यूनगंड दूर होत नाही तोपर्यंत आम्हाला चांगले भविष्य नाही. शैक्षणिक व्यवस्था बदलल्याशिवाय भविष्य उज्ज्वल होऊ शकत नाही. नेहरू यांनी हट्ट करून सोव्हिएट युनियन स्वीकारली त्यामुळे देशाला मोठा फटका बसल्याचे डॉ. स्वामी म्हणाले.

व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह मिलिंद जहागिरदार, प्रा. विनया केळकर, रमेश जुन्नरे, डॉ. बापूसाहेब आकूत यांची उपस्थिती होती. सुरेश गायधनी यांनी सूत्रसंचालन केले. श्रीराम दांडेकर यांनी डॉ. स्वामी यांचा परिचय करून दिला, श्रीराम दांडेकर यांचा परिचय प्रदीप पेशकार यांनी करून दिला. डॉ. विनायक गोविलकर यांनी प्रास्ताविक केले.

पंडित तर आंबेडकर! डॉ. आंबेडकर ही अतिशय बुध्दिमान व्यक्ती होती. लंडनला जाऊन त्यांनी शिक्षण घेतलेले होते. अनेक पदव्या त्यांनी संपादित केलेल्या होत्या; मात्र असे असताना काँग्रेसने त्यांना नेहमीच दुय्यम वागणूक दिली. कारण लंडनला जाऊन त्यांनी पीएच. डी. केली. परंतु, नेहरू जेव्हा लंडनला गेले तेव्हा नापास होऊन आले. त्यामुळे ते कसले पंडित? पंडित तर आंबेडकर होते. आपली राज्यघटना त्यांनी लिहिली. तरीही राजकारण्यांनी त्यांना दुय्यमच वागणूक दिली. त्यांना भारतरत्नही जनता सरकारच्या काळात मिळाले. आधी नाही, अशी माहिती डॉ. स्वामी यांनी दिली.

सर्वांचा डीएनए एकच आपण सर्वांनी आता एक होण्याची गरज आहे. भारतात कुणाचीही डीएनए टेस्ट केली तर लक्षात येईल आपण एकच आहोत. राज ठाकरे आणि उत्तर प्रदेशातील टॅक्सी ड्रायव्हर यांचा डीएनए एकच आहे. हिंदू-मुस्लिमांचा डीएनए एकच आहे. ते ज्यादिवशी हे कबूल करतील तेव्हा त्या दिवशीपासून सर्व मुस्लिम आपले आहेत. आपल्या घरातील सदस्य आहेत असे आपण मानू. युवकांनीही लक्षात घ्यावे की स्त्री-पुरूष एकच आहे. तसे झाले तर आपल्या मनातील इच्छा बदलीतल व उज्ज्वल भविष्याचे निर्माण होईल, असेही डॉ. स्वामी यांनी सांगितले.



डॉ. स्वामी उवाच... पी. चिदंबरम महाचोर अमेरिका है जपान का बिठ्ठू! मनमोहनसिंग सर्कशीतले सिंह जवाहरलाल नेहरू 'चूहा थिफ' देशाचा विकासदर ७ वरून १० टक्के होणे शक्य संघाकडून मंजूर तिकीट अरुण जेटलींमुळे हुकले मिश्र अर्थव्यवस्था नसेल तर देश नष्ट होईल गांधी परिवारात सर्व फेलच; कुणीही पास नाही चैतन्यावस्था जागविण्यासाठी इतिहासाच्या पुनर्रचनेची गरज इटलीत गॅलिल‌िओ जन्माला आला अन् सोनियाही. पण किती विरोधाभास! डणामुळे मते मिळतात; म्हणून राजकारण्यांकडून भांडणे वाढवली जातात १३ प्रकारची सबसिडी काढून घेतली तर गोमांस कुणीच एक्स्पोर्ट करणार नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार निधीतून होणार ७३ लाखांची विकासकामे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा नगरपरिषदेच्या हद्दीत सुमारे ७३ लाख रुपयांच्या आमदार निधीतून विविध विकासकामे करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. ही माहिती सटाणा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण यांनी दिली.

या विकासकामांमध्ये न्यू प्लॉट जिल्हा परिषद शाळेजवळ पाणीपुरवठा वितरण व्यवस्था व पाइपलाइन करण्यासाठी सुमारे चार लाख ३२ हजार रुपये, पिंपळेश्वर बागायत पांधी येथील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था पाइपलाइन टाकण्यासाठी सुमारे चार लक्ष ४१ हजार रुपये, काळू नानाजी नगर येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरणासाठी सुमारे २४ लाख रुपये, वृंदावन कॉलनी येथील मोकळ्या जागेत बालोद्यानासाठी आठ लाख रुपये, माधवनगर येथील मोकळ्या जागेत बालोद्यानासाठी साडेसात लाख रुपये, स. न. १३२ मोकळ्या जागेच्या विकासासाठी ४.९९ लाख रुपये, जाधव नगर येथे राधाकृष्ण मंदिराजवळ सभामंडपासाठी १० लाख रुपये, विवेकांनद कॉलनी येथे बालोद्यानासाठी १० लाख रुपये असा ७३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, असे चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

$
0
0

'भारत-काल आज व उद्या' या विषयावरील भाषणात डॉ. स्वामी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडल्याने त्यांची गाडी काँग्रेस कमेटी कार्यालयाबाहेर थांबविण्यात आली. काँग्रेस कार्यकर्ते महात्मा गांधी मार्गावर हातात काळे झेंडे घेऊन आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहातून निघताना डॉ. स्वामी यांना बजरंग दलाने सुरक्षा कडे करून गाडीपर्यंत आणले. त्यांची गाडी टिळकपथावरून एम. जी. रोडवर निघताच काँग्रेस कमेटी कार्यालयाबोहर कार्यकर्ते झेंडे घेऊन दबा धरून बसलेले होते.

गाडी येताच ते रस्त्यावर आले. व डॉ. स्वामी यांची गाडी थांबविण्यात आली. काँग्रेस कार्यकर्ते गाडी पुढे जाऊ देण्यास तयार नव्हते; परंतु सुरक्षारक्षकांनी त्यांना त्वरित बाजूला हटविण्यास प्रारंभ केला. पोलिसांनी आंदोलकांना गाडीपासून दूर सारण्याचा प्रयत्न केला. डॉ. स्वामींची गाडी अडविल्याने काही काळासाठी तणाव निर्माण झाला. मात्र, सुरक्षारक्षक व पोलिसांच्या प्रसंगावधानाने त्यांची गाडी सुरक्षितपणे पुढे जाऊ देण्यात आली.

काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल डॉ. सुब्रह्मण्यन स्वामी यांची गाडी अडविणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात मुंबई पोलिस कायदा १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. नगरसेवक उध्दव निमसे, बबलू खैरे, सुरेश मालू यांच्यावर तसेच आणखी १२ जणांवर सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनिया व राहुल गांधी यांच्याबद्दल अनुदगार काढल्याने डॉ. स्वामी यांची गाडी अडविण्यात आली. काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करावा असे कार्यकत्यांना सांगितले होते. त्याप्रमाणे करण्यात आले. - शरद आहेर, काँग्रेस शहराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राममंदिर निवडणुकांचा नव्हे; अस्मितेचा मुद्दा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक २०१६ च्या शेवटापर्यंत रामजन्मभूमीत राममंदिर उभारूनच दाखवेन, कारण तो निवडणुकीचा नाही तर हिंदूंच्या अस्मितेचा मुद्दा आहे. निवडणुका तर येत जात असतात, पश्चिम बंगालची आहे मग उद्या लोकसभेची असेल परवा आणखी कुठलीतरी असेल; परंतु निवडणुकांमुळे राममंदिराचा मुद्दा येत नसून तो अस्मितेपोटी येतोय असे प्रतिपादन माजी कायदामंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यन स्वामी यांनी केले.

सार्वजनिक वाचनालय नाशिक ग्रंथालय सप्ताहाच्या समारोपासाठी डॉ. स्वामी नाशिकला आले होते. यावेळी त्यांनी परशुराम साइखेडकर नाट्यगृहाच्या ग्रीनरूममध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राममंदिर तर बनविणारच, ते ही वर्षाच्या शेवटपर्यंत व त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकारांना न्याय मिळवून देण्यासारख्या अनेक केसेस हातात घ्यावयाच्या आहेत असे डॉ. स्वामी म्हणाले.

पश्चिम बंगाल मालदाच्या प्रश्नावर बोलताना डॉ. स्वामी म्हणाले की, राष्ट्रपतींनी ममता बॅनर्जींना पत्र लिहून 'त्या' प्रकरणाचा जाब विचारायला हवा किंवा राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी. आणखी एका प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये जी हरितक्रांती केली ती संपूर्ण देशात करावयाची असेल तर आपली विदेश निती आधी योग्य करण्याची गरज आहे. समस्या कोणतीही असो ती सुधारली जाऊ शकते, फक्त आधीच्या २ वर्षांचे प्रतिबिंब या ३ वर्षांमध्ये पडले नाही तर आपण काहीतरी चांगले करू शकू असेही ते म्हणाले.

आम‌िर खानच्या 'पीके' चित्रपटाचा व आयएसआयच्या संबंधांविषयी डॉ. स्वामी म्हणाले की, या चित्रपटाचा प्रसार प्रचार करण्यासाठी आम‌िर खानने ज्या पाकिस्तानी एजन्सीचा आधार घेतला होता त्या एजन्सीला आयएसआय पैसा पुरवित होते. दुबईमध्ये आम‌िर खानने पीकेचा प्रसार याच पैशातून केला असल्याचेही ते म्हणाले. आम‌िर खानची बायको किरण राव विषयीदेखील डॉ. स्वामी यांनी आगपाखड केली ते म्हणाले,'आम‌िरसोबत लग्न करताना तिला भीती नाही वाटली व आता असहिष्णुता म्हणून घाबरतेय.'

नदी जोड प्रकल्पासाठी आमच्याकडे आणखी ३ वर्षे आहेत. त्यामुळे नद्या जोडणार आहेच परंतु त्यामुळे कोठे नैसर्गिक समतोल बिघडणार नाही ना याची काळजीही आम्ही घेत आहोत.





सावरकरांना गांधी हत्येत नेहरूंनी गोवले

नाशिक ही सावरकरांची भूमी आहे. सावरकरांवर पहिल्यापासून खूप अन्याय झाला आहे. गांधी हत्येमध्ये त्यांचे नाव पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी गोवले. तसे पाहीले तर गांधी हत्येचा सर्वाधिक फायदा नेहरूंना झाला होता; मात्र सावरकरांना त्यात गोवण्यात आले. गोडसेने ही हत्या करताना विचार करावयास हवा होता, त्याच्या रागामुळे भलत्याच लोकांचा फायदा होऊन गेला व योग्य लोकांना वेठीस धरले गेले. सावरकरांची जेव्हा या आरोपातून सुटका झाली तेव्हा इंदिरा गांधी इतक्या खजील झाल्या होत्या की, लागलीच त्यांनी सावरकरांचा स्टॅम्प बनवला.





पाकिस्तानबाबत मोदींचे धोरण योग्यच

डॉ. सुब्रह्मण्यन स्वामी पाकिस्तानच्या पठाणकोट हल्ल्याविषयी बोलताना म्हणाले की, पाकिस्तानने पठाणकोटमध्ये जी खेळी खेळली आहे त्याचे उत्तर योग्य वेळ आल्यावर मोदी देतीलच. त्यांनी रणनिती आखलेली आहे; परंतु त्याविषयी बोलण्याचा मला अधिकार नाही. मात्र पाकिस्तानविषयी त्यांचे जे धोरण आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. पाक‌िस्तान या प्रश्नावर दोन्ही देशांनी एकमेकांमध्ये संवाद ठेवायला हवा तरच ठोस निर्णय होऊ शकतो.





डॉ. सुब्रह्मण्यन स्वामी उवाच

- मे मध्ये राहुल गांधीला जेलमध्ये पाठवणार

- राहूल गांधी कोकेन घेतो

- गांधी घराण्याला खोटे बोलण्याची सवय

- राजीव गांधी सर्वात चांगले पंतप्रधान

- राजीव गांधीने चुकीच्या महिलेशी लग्न केले

- मी गृहमंत्री झालो तर पा‌किस्तानचे चार तुकडे करेल

- राष्ट्रपतींच्या एका सहीने काश्मिर प्रश्न सुटू शकतो

- भारताने आपली ताकद दाखविण्यासाठी फुत्कार टाकायला हवे

- मोदींवर काही मित्रांचे अंकुश लागलेले आहेत, त्यामुळे ते निर्णय घेऊ शकत नाहीत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी १४ कोटी रुपये निधी मंजूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव तालुक्यातील चार नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी १४ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सन २०१५-१६ या वर्षात या नद्यांच्या कामासाठी ५० टक्के निधीस मान्यता देण्यात आली आहे. या चारही नद्यांवर ठिकठिकाणी सिमेंट बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

तालुक्यातील बोरी, परसूल, कान्होळी, सुकी या चार नद्यांसाठी शासनाकडून एकूण १४ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी सात कोटी रुपये निधी खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नद्या, नाले, ओढा यांच्यामधील गाळ काढणे, खोलीकरण करणे आदी कामे लोकसहभागातून करून नद्यांचे पुनर्जीवन करण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून निधीची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत तालुक्यातील चार नद्यांवर सिमेंट नाला बंधारे बांधण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्यमंत्री दादा भुसे यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला होता.

येथे होणार सिमेंट बंधारे

मंजूर निधीतून तालुक्यातील परसूल नदीवर सौंदाणे, नांदगाव, आनंदवाडी, वाके, पाटणे या भागात आठ, कान्होळी नदीवर देवारपाडे, भिलकोट, गुगुळवाडी परिसरात सहा, बोरी नदीवर कजवाडे, पोहाणे, टिंगरी, वनपट परिसरात चार तर सुकी नदीवर एकूण १५ सिमेंट नाला बंधारे बांधण्यात येणार आहेत. या बंधाऱ्यांमुळे परिसरातील सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार असून, भूजल पातळी देखील वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदा संवर्धनासाठी गोडसेंचे केंद्राला साकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरीच्या शुध्दीकरण व स्वच्छतेसाठी मुळा व मुठा या नद्यांच्या धर्तीवर ५२१ कोटी रुपयांचा निधी मिळावी अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली असून राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत केंद्राकडे ५२१.२६ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. जायका संस्थेच्या धर्तीवर त्यास तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गोडसे यांनी केंद्राला दिलेल्या प्रस्तावात असे म्हटले, की त्र्यंबकेश्वर येथे गम पावणाऱ्या गोदावरीत प्रदूषणाची मात्रा वाढत जाते. औद्योगिक कचरा, सांडपाणी, विषारी रसायने आदी कारणांमुळे प्रदूषण वाढून नदीची अवस्था वाईट होत आहे. गोदाकाठी अनेक धार्मिक स्थळे आहे. सध्या कुंभमेळा असल्याने यात ऑगस्ट २०१६ पर्यंत अनेक भाविक नदीपात्रात स्नान करण्यासाठी येतील. यासाठी नदीपात्रातील पाणी निर्मळ होणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिश्र अर्थव्यवस्थेमुळे विकासदरवाढ शक्य

$
0
0

सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय सप्ताह समारोपानिमित्ताने नाशिकमध्ये आलेल्या डॉ. स्वामी यांनी शहरातील उद्योजकांना मार्गदर्शन केले. आपल्या देशात मिश्र अर्थव्यवस्था असली तरी तिची व्याख्या मात्र योग्य नाही. ब्रिटिशकाळात शेतकऱ्यांची कंबर मोडण्यासाठी सर्व अपराध्यांना जमिनदार बनविण्यात आले. त्यांनी मनाला वाट्टेल तसा कर आकारत देशाची कृषी व्यवस्था कोलमडून टाकली. स्वातंत्र्यानंतर नेहरू यांनी रशियाचे मॉडेल स्वीकारले. देशातील हरितक्रांतीचा फायदा फक्त १० टक्के शेतकऱ्यांना झाला. अमेरिका शेतकऱ्यांना २ टक्क्याने कर्ज देते. आपण मात्र शेतकऱ्यांना १२ टक्क्याने कर्ज देते मग या देशात शेतकरी आत्महत्या करेल नाहीतर काय असेही डॉ. स्वामी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होरपळलेल्या आयुष्याला नवपालवी

$
0
0

एचआयव्ही बाधितांसाठी भरला वधू-वर मेळावा

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

वधूवर मेळावे बरेच होतात. पण हा मेळावा वेगळाच. ज्यामध्ये ना जाती धर्माच्या अटी ना वधू-वरांच्या फार अपेक्षा. प्रत्येकाला हवा फक्त आयुष्याचा साथीदार, नव्याने आयुष्य सुरू करण्यासाठी. त्यासाठीच कुणी इंदोर, कुणी छत्तीसगड, कुणी मराठवाड्यातून तर कुणी थेट विदर्भातून नाशिक गाठले. या सर्वांना एका माळेत गुंफणारा एकच समान धागा. तो म्हणजे प्रत्येकजण एचआयव्ही पॉझिटीव्ह. एचआयव्ही बाधितांचे आयुष्य सुंदर करण्यासाठी महिंद्रा आणि महिंद्रा तसेच यश फाऊंडेशनने घेतलेला हा मेळावा आगळा वेगळा न ठरेल तरच नवल.

यश फाऊंडेशन, नेटवर्क ऑफ पॉझिटीव्ह पीपल अॅण्ड चिल्ड्रेन लिव्हिंज विथ एचआयव्ही नाशिक, विहान प्रकल्प मालेगाव आणि जिल्हा एडस प्रतिबंधक व नियंत्रण पथक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये मंगलमैत्री मेळावा पार पडला. चंद्रपूर, हिंगोली, वर्धा, जालना इतकेच नव्हे तर छत्तीगडमधील रायपूर, मध्यप्रदेशातील इंदोर येथूनही एचआयव्ही बाधित व्यक्ती जीवनसाथीदाराचा शोध घेण्यासाठी या मेळाव्यात सहभागी झाले. ८१ पुरूष आणि २६ महिला विवाहेच्छुकांनी या मेळाव्यात आपला परिचय करून दिला. त्यामध्ये विधवा, घटस्फोटितांची संख्याही लक्षणीय होती. या सर्वांना सन्मानाने सामाजिक प्रवाहात आणणे हा या मेळाव्याचा उद्देश असल्याची माहिती आयोजक यश फाऊंडेशनचे रवी पाटील यांनी दिली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयकर विभागाचे सहायक निर्देशक डॉ. जीवन बच्छाव, जिल्हा एडस प्रतिबंध आणि नियंत्रणचे प्रकल्प अधिकारी योगेश परदेशी, उषा अहिरे, महिंद्राचे कमलाकर धोंगडे आदी उपस्थित होते. रवींद्र परदेशी यांनी प्रास्ताविक केले तर नामदेव येलमामे यांनी आभार मानले.

व्यावसायिक मार्गदर्शन अन् मनोरंजनही

मेळाव्यात व्यावसायिक प्रशिक्षणाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. त्यांना सरकारी योजनांची माहिती देण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी एचआयव्ही बाधितांच्या शंकांचे निरसन केले. याखेरीज ५०० हून अधिक जणांनी विविध मनोरंजनात्मक खेळांचा आनंद लुटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसाकाची चाके आजपासून पुन्हा गतिमान

$
0
0

कैलास येवला, सटाणा

विठेवाडी येथील वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखाना तब्बल तीन वर्षाच्या विश्रांतीनंतर आमदार डॉ. राहुल आहेर व जिल्हा बँक संचालक केदा आहेर यांच्या अथक प्रयत्नातून आज सुरू होत आहे. कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन या कारखान्याची चाके आजपासून गतिमान होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ होत आहे.

कसमादेचा भाग्यविधाता म्हणून परिचित असलेला व कळवण, देवळा, बागलाण, चांदवड, मालेगाव या तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला वसाका आज गळीत हंगामाच्या माध्यमातून नव्यानेच कात टाकण्यासाठी सिध्द होत आहे. कै ग्यानदेवदादा देवरे यांच्या प्रयत्नातून सन १९८३ मध्ये उभारलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना एकेकाळी खऱ्या अर्थाने सोन्याचा धूर निघत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गत काळात वसाकावर माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर, माजी आमदार शांताराम आहेर, डॉ. जे. डी. पवार यांनी सत्तेचा सोपान चढविला आहे. डॉ. दौलतराव आहेर यांनी आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात कारखान्याने चौफेर प्रगती केली. कारखाना राज्याच्या प्रगतीत दहा क्रमांकावर त्यांनी नेऊन ठेवला होता. मात्र नंतरच्या काळात वसाकास दृष्ट लागली. कर्जबाजारीपणाने वसाका डबघाईस येऊन ठेपला. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कर्ज फेडू न शकल्याने वसाकावर जप्तीची वेळ आली. बँकेने ताबा देखील घेतला. विधानसभेच्या निवडणुकीत देवळा-चांदवड तालुक्यातील शेतकरी सभासद व मतदारांनी वसाका सुरू होण्याच्या अपेक्षेने तालुक्याचे प्रतिनिधीत्व डॉ. राहुल आहेर यांच्याकडे सोपवले. कसमादेचे काहीतरी देणे लागतो, जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी त्या दृष्टीने डॉ. राहुल आहेर व जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती केदा आहेर यांनी वसाका सुरू करण्याची मनाशी खुणगाठ बांधून प्रयत्न सुरू केले. यात ते यशस्वी ठरले. जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिक सहाय्य देण्यासाठी पुढे सरसावली. राज्य सहकारी बँकेने कर्जाचे पुर्नगठन कायदेशीर बाबी तपासून वसाकास कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने आज कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ होत आहे.

वसंतदादा साखर कारखान्याचा गळीत हंगाम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या शुभहस्ते तर आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सहकार राज्यमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या उपस्थितीत होत आहे.

गत तीन वर्षापासून बदं असलेला वसाका पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्यासाठी कारखान्याचे कर्मचारी व सर्व यंत्रणा रात्रंदिवस परिश्रम घेत आहे. गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकरी बांधवांसह सर्वांनी सहकार्य करावे. - डॉ. राहुल आहेर, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्यामची आई’ कथेत रमले विद्यार्थी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

आजच्या काळात सर्वत्र नीतिमूल्ये आणि संस्कार हरवत चाललेले असताना येवला तालुक्यातील विसापूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांना साने गुरुजींच्या श्यामची आई पुस्तकाचे जणू वेड लागले आहे. एका वर्गातील सर्व वीस विद्यार्थ्यांना या पुस्तकातील अनेक कथा त्यातील संवादासह तोंडपाठ आहेत. आठवड्यातून एकदा या कथा साभिनय सादर करण्याचे प्रयोग शाळेत रंगत आहेत. ग्रामीण भागातील मुलांचा हा संस्कारमय प्रयोग थेट राजभवनात नेण्याचा व ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांचे हे वेगळेपण सर्वांसमोर आणण्याचा ध्यास या प्रयोगाचे मार्गदर्शक शिक्षक मनमाड येथील अनिल शिनकर यांनी घेतला आहे.

श्यामची आई पुस्तकासह शिवरायांच्या गोष्टी ही मुले नाट्यकरणातून सहजतेने सर्वांसमोर पोहचवतात. विसापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या चिमुरड्यांचा मूल्यवर्धित प्रयोग लक्ष वेधून घेत आहे. आज सर्वत्र मूल्यांची वाट लागली आहे. आदर्श हरवत चालले आहेत. मुलांची दैवते ही बदलत असल्याने श्यामची आई आणि शिवचरित्र ही पुस्तके नक्कीच विद्यार्थ्यांना संस्कारदायी ठरतील, असा विश्वास शिक्षक अनिल शिनकर यांना वाटला. मग त्यांनी या पुस्तकातील गोष्टी व गोष्टीतील पात्र मुलांच्या मनावर ठसवले. या गोष्टींचे मुलांकडून पुन्हा पुन्हा पारायण करून घेतले. त्याचे संवादात्मक नाट्य रूपांतर करून वर्गात प्रत्येक आठवड्याला सादर करण्याची मुलांना सवय लावली. आता जवळपास सर्वच मुलांना या गोष्टी शब्द न शब्द मुखोदगत आहेत. त्यांचे मेकअपसह सादरीकरण कौतुकास्पद आहे. गावाकडच्या शेतकऱ्यांच्या मुलांचा हा प्रयोग आजच्या बदलत चाललेल्या समाजात संस्काराची बिजे पेरणारा ठरावा. मोबाइल सिनेमाच्या अतिरेकाच्या जमान्यात मूल्यांची जपणूक होतेय. आईचे श्रेष्ठत्व मुलांच्या मनापर्यंत पोहचवले जात आहेत, ही बाब शिक्षक अनिल तुकाराम शिनकर यांना मोलाची वाटते. म्हणून या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची टीम थेट राजभवनात नेण्याचा व खेड्यातील मुलांच्या कौशल्याला राजधानीत दाद मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरुणोदय प्रयोगशाळेला छताचा शोध

$
0
0

Jitendra.tarte

@timesgroup.com

नाशिक : 'विज्ञान प्रचार अन् प्रसार' हे एकमेव उद्दिष्ट घेऊन, सलग नऊ वर्षे झपाटून कार्य उभारणारी आणि मराठी विज्ञान परिषदेच्या नाशिक युनिटला राज्यात सर्वोत्कृष्टतेचा किताब मिळवून देणारी अरुणोदय प्रयोगशाळा पुन्हा छताच्या शोधात भिरभिरते आहे. या अनोख्या प्रयोगाचे अस्तित्व जपण्यासाठी मराठी विज्ञान परिषद आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवते आहे.

सन २००६ पासून नाशिकच्या नवरचना विद्यालयात मराठी विज्ञान परिषदेने अरुणोदय प्रयोगशाळेची मुहूर्तमेढ रोवली आहे. सामान्य कुवतीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शहरातील विशेष विद्यार्थ्यांनाही अरुणोदयच्या उपक्रमांतर्गत खेळीमेळीत प्रयोगशील विज्ञानाचे धडे देण्यात येतात. डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेसारख्या उपक्रमांचीही तयारी येथे करवून घेतली जाते. परिषदेकडे असणारा पुरेसा इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव ओळखून सुरुवातीच्या टप्प्यात नवरचना शाळेने वर्गखोल्या पुरवित या उपक्रमात नऊ वर्ष बळ भरले. मात्र, आता लवकरच नवरचना शाळेचे आयटीआयचे नवीन अभ्यासक्रम सुरू होत आहेत. परिणामी, या दोन्ही संस्थांमध्ये ठरलेल्या अटींनुसार आता अरुणोदय प्रयोगशाळेस जागा खाली करून द्यावी लागणार आहे. नऊ वर्षांच्या कालावधीत शहरातील असंख्य विद्यार्थ्यांमध्ये या प्रयोगशाळेने विज्ञानाची गोडी निर्माण केली.

सन १९६६ सालात मुंबईत विज्ञान परिषदेची स्थापना झाल्यानंतर लगेचच वर्षभरात सन १९६७ साली नाशिकमध्ये परिषदेचे युनिट स्थापन झाले होते. सुरुवातीचे अनेक वर्ष व्याख्याने, चर्चासत्र या स्वरूपाच्या उपक्रमांनंतर नवरचना शाळेने हात दिल्यानंतर अरुणोदय प्रयोगशाळा साकारली होती.


नाशिक युनिट सर्वोत्कृष्ट

सद्यस्थितीत मराठी विज्ञान परिषदेचे ७५ युनिट राज्यात कार्यरत आहेत. या युनिटच्या गुणवत्ता पाहणीत नाशिक युनिटला राज्यात नुकतेच सर्वोत्कृष्ट जाहीर करण्यात आले. या निवडीच्या निकषांमागे परिषदेचे 'अरुणोदय प्रयोगशाळा', 'निसर्ग विज्ञान कार्यशाळा', 'कचरा व्यवस्थापन' आदी उपक्रमांचे विशेष योगदानही विचारात घेण्यात आले आहे.



आजवर या उपक्रमास नवरचना शाळेची मोठी मदत झाली. नव्या टप्प्यात नव्या जागेचा शोध 'ना नफा, ना तोटा' या तत्वावर सुरू आहे. या उपक्रमासाठी किमान २ हजार चौरस फुटांची जागा गरजेची आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त आणि समाजातील सदप्रवृत्तींच्या भेटी आम्ही घेत आहोत.

- डॉ. निवांत गुजराथी,

माजी अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, नाशिक युनिट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images