Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

सहज मिळतो, आर्मी युनिफॉर्म!

$
0
0

संरक्षण मंत्रालयाच्या अख्त्यारित काम करणाऱ्या ज्या व्यक्ती युनिफॉर्म वापरतात अशा व्यक्तींना परवानाधारक टेलरकडून अथवा ज्या विक्रेत्याकडे युनिफॉर्म विकण्याची परवानगी अशांकडूनच खरेदी करणे बंधनकारक असते, ही परवानगी देवळाली कॅम्प येथील काही दुकानदारांकडे आहे. मात्र, सध्या शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे ड्रेस शिवून मिळत असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. पंजाबमधील पठाणकोट येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर यावरचे पुन्हा नोटीफिकेशन काढण्यात आले; मात्र या विक्रेत्यांवर कुणीही कारवाई करणारे नसल्याने त्याच्यावर काही परिणाम होत नसल्याचे दृष्य सर्वत्र पहायला मिळत आहे. युनिफॉर्म शिवायला किंवा खरेदी करायला येणाऱ्या व्यक्तींकडे विक्रेत्याने ओळखपत्र घेऊन ड्रेसची विक्री करायची असते. मात्र, शहरातील विक्रेते कोणत्याही प्रकारच्या ओळखपत्राची मागणी न करता मागेल त्याला युनिफॉर्म शिवून देत आहेत.

दुरुपयोगाची शक्यता आर्मी अथवा एअर फोर्ससारख्या जवानाचे युनिफॉर्म घालून कुणीही व्यक्ती लष्करी हद्दीत प्रवेश करू शकतो ही बाब अत्यंत गंभीर आहे. मात्र, पोलिसांकडून याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. तसेच अनेक टोपी विक्रेत्यांकडे इंडियन आर्मी लिहिलेल्या टोप्या आहेत त्या घालून देखील कुणीही लष्करी वेषात लष्करी कार्यालयात प्रवेश करू शकतो. ज्या दुकानदारांकडे परवाना नसताना ज्या व्यक्ती अशा ड्रेसची खरेदी करत आहेत अशांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी जागरुक नागरिकांकडून केली जात आहे.

आर्मीचा ड्रेस शक्यतो बाहेरच्या बाजारात मिळत नाही. कॉम्बॅक्ट प्रकारचा ड्रेस मिळतो. त्याचा वापर देखील नागरिकांनी करु नये, मात्र याबाबत कायदा नसल्याने कुणाला बंदी घालता येणार नाही. बंदी घालायची असेल तर कायदा होणे गरजेचे आहे. - मेजर पी. एम. भगत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मांजामुळे ओढावली ‘संक्रांत’

$
0
0

भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलिस निरीक्षक मृदुला नाईक, पीएसआय हनुमंत वारे तसेच कर्मचाऱ्यांनी तीन दुकानदारांवर कारवाई करीत १२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दुधबाजार येथील शहानवाज काईट सेंटर, भद्रकाली फुट मार्केट येथील अमरज्योत विधी भंडार या ठिकाणावर छापे मारीत मुद्देमाल जप्त केला. सिडको, महाराणा प्रताप चौकातील व्यावसायिकाविरोधात क्राइम ब्रँचच्या युनिट दोनच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. सर्व विक्रेत्यांविरोधात कलम १८८, २९० आणि २९१ नुसार गुन्हे दाखल झाले. दरम्यान, मागील १५ दिवसांपासून सुमारे २३ पेक्षा अधिक विक्रेत्यांवर कारवाई झाली असली तरी शहरात नायलॉन मांजा विक्रीचे प्रमाण कमी झालेले नाही.

शिक्षिका जखमी नायलॉन मांजावर बंदी असली तरी त्याची सर्रास विक्री होत असून गंगापूररोड येथे दुचाकीने जाणारी शिक्षिका या मांजामुळे गंभीर जखमी झाली आहे. गळ चिरल्याने या दोन तासाच्या शस्त्रक्रियेनंतर ४० टाके घालण्यात आले. त्यामुळे नायलॉन मांजा बंदीची अंमलबजावणी अधिक कडकपणे करण्याची मागणी होत आहे. गंगापूररोड परिसरातील सहदेवनगरमध्ये राहणाऱ्या श्रद्धा गोपाळ राठोड (३४) या सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दुचाकीने शाळेतून घरी जात होत्या. होरायझन अॅकॅडमी समोरून जात असताना नायलॉन मांजा त्यांच्या गळ्यात अडकला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे त्या दुचाकीवरून पडताना वाचल्या. मात्र, या घटनेत त्यांचा गळा तीन इंच खोलवर कापला गेला आणि त्यांच्या गळ्यामधून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. याचवेळी परिसरातील नागरिक मदतीस धावून आले. श्रद्धा यांचे पती गोपाळ यांना फोन केल्यानंतर ते तातडीने घटनस्थळी आले. त्यानंतर कॉलेजरोडवरील खासगी हॉस्पिटलमध्ये श्रद्धा यांना दाखल करण्यात आले. श्रद्धा यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आल्यानेच त्यांचा जीव वाचल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. नीलेश पाटील यांनी सांगितले. डॉ. राहुल पाटील, डॉ. राहुल पगार, डॉ. अनिल निकम, डॉ. व्यंकटेश्वर पाटील यांनी तब्बल दोन तासांची शस्त्रक्रिया केली. यात श्रद्धा यांच्या गळ्याला ४० टाके घालण्यात आले आहेत. याघटनेमुळे नायलॉन मांजावरील बंदी अधिक कडक करण्यात यावी आणि शहरातून नायलॉन मांजा हद्दपार करावा, अशी आग्रही मागणी होत आहे.

प्रबोधन मोहीम नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध शाळेमध्ये जाऊन नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन केले. नायलॉन मांजा किती घातक आहे, त्याचे काय परिणाम होतात याची माहिती युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिली. युवक व विद्यार्थ्यांनी याची मागणी केलीच नाही तर नायलॉन मांजा विकला जाणार नाही. संक्रांतीत पतंग उडविण्याचा खेळ आनंद देणारा असला तरी पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा घातक असतो. या जीवघेण्या मांजामुळे अनेक व्यक्तीसह पक्ष्यांनाही इजा होते, काही निष्पापांना प्राणही गमवावा लागतात, असे प्रबोधन करण्यात आले. या मोहिमेत अमोल नाईक, मुकेश शेवाळे, राहुल तुपे, कुणाल बागडे, हरीश महाजन आदी सहभागी झाले.

गुन्हा दाखल करण्याची मागणी नायलॉन मांजाची विक्री, उत्पादक आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी शहर युवक कॉँग्रेसने केली आहे. या संबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी शहराध्यक्ष स्वप्निल पाटील, नगरसेवक आकाश छाजेड, राहुल दिवे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीची छेड काढणारा गजाआड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर बसस्थानकात विद्यार्थ्यांची भाईगिरी, मुलींच्या छेडछाडीचे प्रकार नियमित होत असताना बसमधून प्रवास करणाऱ्या एका विद्यार्थिनीची चालत्या बसमधून एका टपोरीने या चेष्टेचा कळस केला. लज्जा उत्पन्न होईल, असे हावभाव करीत या विद्यार्थिनीला बसण्यासही जागा देवू नये,२ यासाठी बसमधील प्रवाशांना धमकावले. या प्रकरणी विद्यार्थिनीने सिन्नर पोलिस ठाणे गाठत तक्रार केल्याने पोलिसांनी त्या टपोरी तरुणास अटक केली.

या प्रकरणी यतिन दिलीप भाबड (रा. सिन्नर) याला सिन्नर पोलिसांनी अटक केली. बुधवारी सायंकाळी सिन्नरला येणाऱ्या बसमध्ये धक्के देऊन एका विद्यार्थिनीची छेडछाड केली. तिने विरोध करताच मला कोणीच अडवू शकत नाही. या मुलीस कोणीही बसण्यास जागा देऊ नये, असा दम गाडीतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना भरला. मुलगी रडू लागली. अशी घटना घडत असताना बसमधील कोणीही हस्तक्षेप केला नाही. सगळेच तटस्थ प्रेक्षकाच्या भूमिकेत गप्प बसून होते. मात्र, एका शिक्षकाने या विद्यार्थिनीला बसण्यासाठी जागा दिली. त्यामुळे संतापलेल्या यतिनने त्या शिक्षकासही शिवीगाळ केली. या मुलीने सिन्नरपर्यंतचा प्रवास कसाबसा पूर्ण केला. घरी पोहोचताच घडलेला प्रकार पालकांना सांगितला.

घटना समजून घेत तिच्या पालकांनी पोलिस ठाणे गाठले. तिची फिर्याद नोंदवून घेत पोलिसांनी यतिन दिलीप भाबड याला अटक केली. हा मुलगा दीड वर्षापासून आपल्या मागे असून, सतत त्रास देत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मात्र, घरी सांगितल्यास आपले कॉलेज बंद होईल, या भीतीपोटी आजवर तक्रार केली नसल्याचे या पीडित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सिन्नर पोलिसांनी यतिन दिलीप भाबड यास अटक करून कारवाई केली. त्यास एक रात्र जेलमध्ये काढावी लागली. त्यास न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८० हजार बालकांवर संक्रांत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

राज्यातील हजारावर अनाथालयातील ८० हजार अनाथ-निराश्रित बालकांची दिवाळी भोजन अनुदान नसल्याने अंधारात गेल्यांनतर संक्रांत निश्चितपणे गोड होईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली होती. प्रत्यक्षात मात्र मकरसंक्रांत उजाडली असतानाही या बालकांच्या मुखात अनुदानाचे तीळगूळ पडले नसल्याने शासनाने त्यांच्या जगण्यावर अक्षरश: संक्रांत आणली असल्याची जळजळीत प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य बालविकास संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्रकुमार जाधव यांनी व्यक्त केली आहे.

महिला व बालविकास विभागाच्या मान्यतेने महाराष्ट्रात ९९६ स्वयंसेवी संस्थाचे बालकाश्रम, बालसदन आणि अनाथालये सुरू आहेत. या संस्थांमध्ये सुमारे ८० हजार समाजातील अनाथ, निराश्रित आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके वास्तव्यास आहेत. या बालकांना शासनाकडून प्रतिदिन प्रती बालक २१ रुपयांचे भोजन अनुदान मिळते. हे अत्यल्प अनुदानही गत तीन वर्षापासून मिळाले नसल्याने या संस्थाना घरघर लागलेली आहे. धान्य-किराणा पुरविणाऱ्या यंत्रणेने पुरवठा बंद केल्याने बिकट परिस्थिती असून, संस्थाचालक कर्जबाजारी झाले आहेत. बालकांना अहोरात्र सांभाळणारे सुमारे १० हजार कर्मचारी वेतन नसल्याने उपासमारीच्या खाईत ढकलले गेले आहेत. ही भीषण वास्तवता शासनाला माहीत असतानाही निधीची उपलब्धता न करता वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे.

उच्चस्तरीय तपासणीनंतर भोजन अनुदान, इमारत भाडे आणि कर्मचारी वेतन अदा करण्याचे आदेश २० फेब्रुवारी २०१५ रोजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काढले होते. त्यानुसार जुलै-ऑगस्ट २०१५ मध्ये महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारीस्तराच्या अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत २०० गुणाची सखोल तपासणी मोहीम पार पडली. मात्र, अनाथ बालकांच्या आणि त्यांना सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदरी आजही निराशाच पडल्याने त्यांच्यात प्रचंड संतापाची भावना आहे.

भोजन अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना १५६ कोटींची पुरवणी मागणी सादर करण्याचे फर्मान काढले. मात्र, वित्त विभागाने त्यात खोडा घालून नागपूर अधिवेशनात या बालकांना ठेंगा दाखवून अनुदान नाकारले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तरतूद झाली नसताना मकरसंक्रांत तरी निश्चितपणे गोड करेन, अशी ग्वाही मंत्री पंकजा मुंडे यांनी संस्थाचालकांना आणि प्रसिद्धी माध्यमांना दिली असताना प्रत्यक्षात मात्र संक्रांतीच्या दिवशीच अनाथ बालकांची आणि कर्मचाऱ्यांची घोर निराशा करून लौकिक अर्थाने त्यांच्यावर संक्रांत आणली असल्याने राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

जानेवारी अखेर शासनाने हा प्रश्न सोडला नाही तर ८० हजार बालकांसह हजारो संस्थाचालक व कर्मचारी रस्त्यावर उतरतील, असा इशारा संस्थाचालक आणि कर्मचाऱ्यांच्यावतीने आर. के. जाधव, डॉ. अरुण इथापे, चंद्रकांत पाईकराव, संजीव भारती, कविता वाघ, माधवराव शिंदे, अमर शिंगोटे, जयराज नारायणकर, गजानन देशमुख, संजय गायकवाड, देवीदास बच्छाव, भरत वाघ, विद्या पाटील यांनी दिला आहे.

--

कोट

गत दोन वर्षाचे १५६ कोटी आणि चालू वर्षाचे सुमारे ८० कोटी असे एकूण २३६ कोटी रुपयांचे अनाथांचे भोजन अनुदान देणे शासनासाठी अशक्यप्राय निश्चित नाही. मात्र, बिन फायद्याच्या या योजनेला निधीच द्यायचा नाही. ही नकारात्मक भूमिका बालगृहचालकांच्या आणि पर्यायाने ८० हजार अनाथांच्या मुळावर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संवेदनशील बनत चाललेल्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष घालून आपल्या सहायता निधीतून मदत करावी.

- रवींद्रकुमार जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बालविकास संघटना

--

उत्तर महाराष्ट्रातील बालगृहांची स्थिती

जिल्हा संस्‍था बालके बिनपगारी कर्मचारी

नाशिक : २५ २००० १५०

नगर : ५० ५००० ३००

धुळे : १० ७०० १००

नंदुरबार : ११ ८५० ११०

जळगाव : ७ ५०० ५५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साकूर परिसरात बिबट्याचे दर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील साकूर गावात बिबट्यांची दहशत कायम असून, वनविभागाने पिंजरा लावून त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेल्याच महिन्यात साकूर येथे एका बिबट्यांचा संशयित मृत्यू झाला होता.

इगतपुरी तालुक्यात बेसुमार वृक्षतोड व जंगलातील अतिक्रमण यामुळे जंगली प्राणी तसेच बिबट्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याने हे वन्यपशू मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. संपूर्ण तालुक्यात बिबट्यांनी मोठा धुमाकूळ घातला असून, शेतकरी जीव मुठीत घेऊन राहत आहे. पूर्व भागात घोटी खुर्द, पिंपळगाव डुकरा,शेणीत, धामणगाव, निनावी, नांदगाव आदी गावांमध्ये तर कायमच दहशतीचे वातावरण आहे. शेत वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना आपली लहान मुले तसेच पाळीव जनावरे कशी संभाळावीत, असा प्रश्न पडला आहे.

गेल्या महिन्यात साकूर गावात एका बिबट्यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, आवारी मळ्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या वस्तीवरील कुत्रे, कोंबडया, बकऱ्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. गेल्या दीवाळीपासून या वस्तीवरील दहा कुटुंब जीव मुठीत घेऊन राहत आहे. दररोज बिबट्याचे दर्शन होत आहे.

साकूर गावात एक बिबट्या मृत झाला असूनही दुसऱ्याचे दर्शन होतच असल्याने नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. याबाबत वनविभागाने लक्ष घालून त्वरित या बिबट्यांचा पिंजरा लावून बंदोबस्त करावा, अशी मागणी बाळू आवारी, नारायण आवारी, अंबादास आवारी, रंगनाथ आवारी, बहिरू आवारी, गणपत आवारी, भानुदास आवारी, कांतिलाल आवारी, मधुकर आवारी, रमेश सहाणे, दशरथ आवारी, दिनकर आवारी, नामदेव आवारी, त्र्यंबक आवारी आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावांतर्गत निघणार अतिक्रमण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडावरील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हद्दीतील अतिक्रमण काढल्यानंतर आता सप्तशृंग गड ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. यामुळे व्यावसायिक बांधवांचे धाबे दणाणले आहे.

कळवण तहसील व पंचायत समितीद्वारे अद्यापही गड ग्रामपंचायतीला अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. असे असले तरी गडावरील भाविकांची होणारी गर्दी व दळणवळणाची कुठलीही गैरसोय होऊ नये, म्हणून खबरदारीचा भाग म्हणून गावांतर्गत सर्वच अतिक्रमण काढण्यात येणार आहे. नुकतेच महिनाभर दरड प्रतिबंधात्मक काम होण्यासाठी गडावर भगवतीचे दर्शन बंद होते. त्यामुळे व्यावसायिकांची बाजारपेठ ठप्प होती. त्यातच अतिक्रमण काढण्याचा निघालेला फतवा पाहता जर बारा मीटर अतिक्रमण निघाले तर गडावरील व्यावसायिकांवर संक्रांत येईल. नव्वद टक्के बेघर होतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

गडावर आदिमायेच्या दर्शनासाठी रोज भाविकांची गर्दी होत असते. चैत्र व नवरात्रोत्सव काळात दर्शनासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येथे येतात. मांढरगावच्या धर्तीवर कुठलीही धोकादायक परिस्थिती अतिक्रमणामुळे निर्माण होऊ नये. या हेतूने गडावरील सर्वच अतिक्रमण काढण्यात येईल, अशी प्रशासनाची भूमिका आहे. आम्हाला बेघर करण्याचा घाट घातला जात असल्याचे मत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.

ग्रामस्थांनी याबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळ सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जे. पी. गावित, आमदार अनिल कदम, जयश्री पवार आदींची भेट घेत अतिक्रमण मोहीम थांबवावी, असे साकडे घालत आहेत. मकरसंक्रांतीमुळे ही मोहीम दोन दिवस लांबल्याचे समजते. मात्र, या आठवडाभरात मोजमाप घेत अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

अतिक्रमण मोहिमेत बारा मीटर अतिक्रमण काढले गेले तर अनेकांचे संसार उघड्यावर पडण्याची भीती असल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वताहून १० मीटर पर्यंतचे आम्ही काढून घेऊ अशी भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-सिन्नर वाहतूक पुन्हा ठप्प

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नाशिक-पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. गुरुवारी रस्ता विस्तारीकरणासाठी मोहदरीजवळील डोंगराचा भाग सुरुंग स्फोटांनी काढण्याचे काम सुरू होते. स्फोटामुळे दगडगोट्यांचा मलबा महामार्गावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. संध्याकाळपर्यंत वाहतूक सुरळीत झालेली नव्हती. एकेरी मार्ग सुरू करण्यात आला असला, तरी संध्याकाळपर्यंत वाहतूक विस्कळीत होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या.

गेल्या आठवड्यात मोहदरीघाटात अवजड वाहने आडवे होऊन दोनदा वाहतूक ठप्प झाली होती. त्यातच घाटात किरकोळ कारणानेही वाहतूक ठप्प होत असल्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. सिन्नर-नाशिक प्रवास करणाऱ्यांना त्याचा अधिक त्रास होत आहे. या रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी सुरुंगाचा स्फोट घडविण्यात आला. यात अपेक्षेपेक्षा जास्त दगड गोटे महामार्गावर पडले. यात दगडही रस्त्यावर आल्याने वाहतूक सुरू करण्यात अडथळे आले. जेसीबीच्या साहाय्याने एका बाजूकडील मलबा काढून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे हे मटेरियल हटवेपर्यंत नाशिक-सिन्नर बाजूने दोन वाहनांच्या लांब रांगा लागल्या. महामार्ग विभागाचे पोलिस उपनिरीक्षक श्यामराव निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुकांची संख्या पोहोचली १३५ वर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज विक्री आणि दाखल प्रक्रियेला वेग आला आहे. गुरुवार अखेर एकूण ३३१ अर्जंाची विक्री झाली असून, तब्बल १३५ अर्ज दाखल झाले आहेत. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. जयंत पवार यांनी आपल्या समर्थकांसह अर्ज दाखल केला.

मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीची चुरस आता वाढली असून, इच्छुकांची चांगलीच गर्दी झाल्याचे पहायला मिळत आहे. भाजप-सेना या निवडणुकीत आमनेसामने असतील हे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यासोबतच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तिसऱ्या पॅनलच्या निर्मितीसाठी देखील हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते डॉ. जयंत पवार यांनी सोसायटी गटात इतर मागास वर्गातून शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. पवार यांच्या अर्ज दाखल झाल्याने राष्ट्रवादी पक्ष देखील या निवडणुकीत जोमाने कामाला लागला असल्याचे चित्र आहे. यावेळी त्यांच्या समवेत गिसाकाचे माजी चेअरमन विजय पवार, मामको संचालक दादाजी वाघ, शेतकी संघ अध्यक्ष समाधान हिरे, अरुण देवरे, अॅड. आर. के. बच्छाव, कोंडाजी पवार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

या निवडणुकीसाठी गुरुवार अखेर सोसायटी गट ९२, ग्रामपंचायत गट ३१, हमाल मापारी गट ७ तर व्यापारी गटातून ७ असे एकूण १३५ अर्ज दाखल झाल्याची माहिती बाजार समिती सचिव अशोक देसले यांनी दिली. दि. १८ जानेवारीपर्यंत अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी चार दिवस शिल्लक राहिले असल्याने इच्छुकांची गर्दी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोमवारपासून वसाकाच्या गळीत हंगामास प्रारंभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ३० व्या गळीत हंगामास सोमवारी (१८ जानेवारी) सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे. ही माहिती आमदार डॉ. राहुल आहेर व जिल्हा बँकेचे संचालक केदा आहेर यांनी देवळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

आमदार डॉ. राहुल आहेर या संदर्भात म्हणाले की, तीन वर्षाच्या कालखंडानंतर वसाकाचा ३० वा गळीत हंगाम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर महसूल मंत्री एकनाथ खडसे, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्य मंत्री दादा भुसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या गळीत हंगाम समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी आमदार डॉ. आहेर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या मेहरबानीमुळे ठग मोकाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने घरात घुसून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन सराईत बिहारी गुन्हेगारांविरुध्द कारवाई करण्याऐवजी त्यांना सोडून देणाऱ्या सटाणा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी वसाका मजदूर युनियनचे नेते अरुण सोनवणे यांनी केली आहे.

सोमवारी (११ जानेवारी) दुपारी पावडर विकण्याच्या बहाण्याने राजकुमार शहा (वय २२) व रोहितकुमार शहा (वय २०) या दोन बिहारी तरुणांनी सोनवणे यांच्या देवांच्या मूर्तीचे पॉलिश करून दाखविले. सोनवणे यांनी हातातील तीन सोन्याच्या अंगठ्या पॉलिश करण्यासाठी बिहारी युवकांकडे दिल्या. बिहारी युवकांनी हातचलाखीने तीनही अंगठ्या खिशात घालत पोबारा केला. सोनवणे यांनी वेळ न दवडता नाशिक रस्त्याकडे धाव घेत या युवकांना पकडले. पोलिसांच्या हवाली केले. पोलिस ठाण्यात निरीक्षक पी. टी. पाटील यांनी आम्ही कारवाई करीत आहोत. तुम्ही निश्चित होऊन घरी जा, असे सांगितले. सांयकाळी दोन्ही अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी सोडून दिल्याचे सांगण्यात आले. यामुळे सोनवणे कुटुंबीय भीतीने घाबरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शोभायात्रा अन् शाहीस्नान

$
0
0

'विष्णू याग'चे अंमळनेरकर भक्त परिवारातर्फे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संत सखाराम महाराज अंमळनेरकर भक्त परिवारातर्फे आयोजित केलेल्या २७ कुंडीय विष्णू यागानिमित्त शुक्रवारी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी राज्यभरातून आलेला भक्त परिवार आणि संत महात्म्यांच्या उपस्थितीने शहरातील रस्ते फुलून गेले.

गंगापूररोडवरील ठक्कर पार्क येथे विष्णू याग सुरू असून या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे. मकर संक्रांत ही सिंहस्थातील महत्त्वाची तिथी समजली जाते. त्याचे औचित्य साधून अंमळनेरकर महाराज भक्त परिवारातर्फे शुक्रवारी शाहीस्नान झाले. यावेळी गंगापूर रोडहून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेच्या अग्रभागी विविध ढोल पथके सामील झाली. तसेच यात्रामार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या. मिरवणुकीत शंख तुताऱ्या, घोडे, रथ सहभागी झाले. शाही मिरवणुकीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. यावेळी करवीर पीठाचे शंकाराचार्य विद्यानृहसिह भारती सहभागी झाले. यावेळी प्रसाद महाराज अमळनेरकर यांची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. शोभायात्रेत कलश घेतलेल्या सुवासिनी सहभागी झाल्या होत्या. संत परंपरेतील वंशज, वारकरी, दिंडी मालक, चालक, फडकरी, मठाधिपती, महंत सहभागी झाले. त्र्यंबकेश्वर येथील सागरानंद सरस्वती, कैलासमठाचे सविदानंद सरस्वती, जनार्दन हरिजी महाराज, चैतन्यमहाराज देगलुरकर, भक्तराज महाराज मुल्हेरकर, ज्ञानेश्वर महाराज नामदास, योगीराज महाराज गोसावी, रामकृष्ण महाराज लहवितकर, अमृत महाराज जोशी, मोहन महाराज बेलापुरकर, संभाजी महाराज मोरे, प्रकाश प्रभुणे महाराज, सोमनाथ महाराज संत सहभागी झाले. शोभायात्रा रामकुंडावर पोचताच शाहीस्नान करण्यात आले.

महोत्सवात श्री ज्ञानेश्वरी जन्म शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ज्ञानेश्वरचे पारायण होणार आहे. त्या निमित्ताने कीर्तन महोत्सव होत आहे. दररोज सकाळी ६ ते ७ वाजता विष्णू सहस्त्रनाम स्त्रोत्रपाठ, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ अचनानुष्ठान, ३ ते ६ ज्ञानदेव चरित्र चिंतन, सायंकाळी ६ ते ७ सामुदायिक हरिपाठ, ७ ते ९ सांप्रदायिक कीर्तन असे कार्यक्रम सुरू आहेत. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार १८ जानेवारीपर्यंत महोत्सवाला हजेरी लावत आहेत. दररोज सकाळी ६ ते ९ या कालावधीत यज्ञविधी होणार आहे. सकाळी ६ ते ८ या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. तसेच ८ ते ९ तिलार्चन सोहळा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वेस्ट टू एनर्जी’साठी सात कोटीचा निधी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिका आणि जर्मन सरकारच्या जीआयझेड अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी जर्मन सरकारने सहा कोटी ८० लाखाचा निधी सुपूर्द केला आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून आता निधीही मिळाला आहे. त्यामुळे डिसेंबर २०१६ पर्यंत हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली आहे.

शहरातील हॉटेल्स व रेस्टॉरंट मधील कचरा संकलित करून त्यावर ऊर्जा निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारला जात आहे. जर्मन डेव्हलपमेट कार्पोरेशन सहकार्यातून हा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी जर्मन सरकारचे अर्थसहाय्य असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि जर्मन सरकारमध्ये बोलणी सुरू होती. दिल्लीत शुक्रवारी केंद्र आणि जर्मन सरकारमध्ये करार होवून जीआयझेड उपक्रमात सहा कोटी ८० लाखांचा निधी देण्यास समंती दिली आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता अभियानाने त्र्यंबक झाले कचरामुक्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे जिल्हा प्रशासनाने स्वच्छता अभियान राबविले. शहरातील चौकाचौका साफसफाई करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी कान्हुराजे बगाटे तसेच उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाने आणि येथील शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने शहर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या अभियानात नगराध्यक्षा विजया लढ्ढा, तहसीलदार नरेशकुमार बहिरम, तहसीलदार थविल, गटविकासाधिकारी ज्ञानदा फणसे, नायब तहसीलदार डॉ. मिलींद कुलकर्णी, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, नगरसेवक धनंजय तुंगार, नगरसेविका यशोदा अडसरे, माजी नगराध्यक्ष प्रशांत तुंगार आदींनी सहभाग घेतला. सकाळी आठ वाजेच्या सुमारास बसस्थानकावर उपस्थित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्वांनी मिळून शहरातील प्रमुख रस्ते, चौक आदी स्वच्छ केले. अधिकाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्यांबाबत व्यवसायिकांना स्पष्ट सूचना दिल्या. मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर आणि इतरत्र देखील बॅरिकेडिंग आदी ठिकाणी चहाचे प्लास्टिक कप दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराध्यक्षपदासाठी चुरस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हाध्यक्ष निवडीनंतर भाजपच्या नाशिक शहराध्यक्षपदाची शनिवारी (दि. १६) निवडणूक होत आहे. जिल्हाध्यक्ष पदावर निष्ठावान कार्यकर्त्याला संधी मिळाल्यानंतर शहराध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. शहराध्यक्षपदासाठी विजय साने, सुरेश पाटील, गोपाळ पाटील, सुनील आडके, संभाजी मोरूस्कर यांची नावे चर्चेत असतांनाच आमदार बाळासाहेब सानप स्पर्धेत अचानक आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शहरातही जुन्या चेहऱ्यालाच संधी दिली जाण्याची शक्यता असून साने आणि पाटील यांच्यात चुरस आहे.

भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी व्यूहरचना अंतिम टप्प्यात आहे. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्याही डझनभर आहे. पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांसोबतच बाहेरून पक्षात नव्याने दाखल झालेल्यानाही या पदाची आस लागली आहे. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणूक आहे. त्यामुळे या पदावर संधी मिळण्यासाठी इच्छुकांकडून वरिष्ठ भाजप नेत्यांकडून लॉबिंगही केले जात आहे. भाजपच्या 'वसंतस्मृती' या पक्ष कार्यालयात दुपारी तीन वाजता ही निवड प्रक्रिया होणार असून संभाजी पगारे हे निरिक्षक म्हणून राहणार आहे.

भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी सलग दोन वेळा अध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे आता नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून निवड होणार आहे. या पदासाठी विजय साने, सुरेश पाटील, गोपाळ पाटील, संभाजी मोरुस्कर, महेश हिरे, सुनील केदार, सुनील आडके, जगन पाटील, अशी इच्छुकांची मोठी संख्या आहे.

पक्षाचे संघटक किशोर काळकर आणि रवी भुसारी यांच्या सूचनेनुसार शहराध्यक्षपदातील इच्छुकांच्या नावांची शिफारस पक्षाकडे करण्यात आली असून पक्ष यापैकी कोणाच्या करण्यासाठी सुकाणू समितीही गठीत केली होती. या समितीने इच्छुकांची नावे प्रदेशकडे पाठविली असून दुपारपर्यंत यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. शहरापदासाठी इच्छुक असलेल्या पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांनी जिल्हाध्यक्ष निवडीनंतर शांत राहणेच पसंत केले आहे.

सानपांची अनपेक्षित उडी

महापालिकेच्या निवडणुका असल्याने शहराध्यक्ष हा सर्वार्थाने समर्थ असावा अशी एका गटाची इच्छा आहे. महापालिका निवडणुकीत १०० जागा जिंकण्याचे टार्गेट भाजपचे असल्याने त्यासाठी सर्वार्थाने सक्षम उमेदवार असावा यासाठी आमदार बाळासाहेब सानप यांचेही नाव पुढे आले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुजन चेहरा देण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी सानप यांच्यावर पालकमंत्री गिरीश महाजन समर्थक असा शिक्का आहे.


जातीय समतोल साधणार

भाजपतर्फे उत्तर महाराष्ट्रात पदवाटप करतांना जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी मराठा समाजाला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदावर नियुक्ती करतांना ब्राह्मण किंवा मागासवर्गीय समाजाला संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. भाजपने आतापर्यंत शहराध्यक्ष पदावर नियुक्ती देतांनाच ब्राह्मण चेहऱ्यालाच संधी दिली आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत विजय साने आघाडीवर आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षीमित्रांनी केले जखमींवर उपचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंगबाजीला दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे पक्ष्यांच्या जीवावर संक्रांत आली आहे. सुमारे पंधरा ते वीस पक्षी मांज्यामुळे जखमी झाले आहेत. तर, काही पक्ष्यांना जीवही गमवावा लागला.

नाशिक शहर व परिसरात शुक्रवारी मकरसंक्रांत उत्साहात साजरी करण्यात आली. त्यात झालेल्या पतंगबाजीच्या प्रेमामुळे यंदा काही पक्ष्यांवर मात्र संक्रांत आली. गेल्या दोन वर्षीच्या तुलनेत यंदा पक्षी जखमी होण्याचे प्रमाण शुन्याच्या बरोबर आले आहे. मकरसंक्रांत म्हटले की, पतंगबाजी ओघाने आलीच. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पतंग उडवण्याचे प्रमाण प्रचंड वाढ होऊनही दिवसभरात कबूतर, घारी आदी पक्षी जखमी झाल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. २०१४ मध्ये ४४ पक्षी तर २०१५ मध्ये २३ पक्षी जखमी झाले होते. मात्र यंदा आश्चर्यकारकरित्या घट झाली असून, अग्निशमन दलाकडे केवळ आठ पक्षी जखमी झाल्याची नोंद करण्यात आली. अशोकस्तंभ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातही दिवसभरात एकही पक्षी जमा झाला नाही. गुरुवारी मात्र एक व्हलगे व एक स्टॉर्क पक्षी जमा झाला होता.

नेचर क्लब या पक्षीमित्र संस्थेकडे ८ ते १० कबुतरांवर उपचार करण्यात आले. पक्षीमित्र चंद्रकांत दुसाने यांच्याकडे आठ कबूतर, एक घार यांच्यावर उपचार झाले मात्र, एका पोपटाचा मृत्यू झाला, तर एक कावळा पंचवटी परिसरातील टकले नगरमध्ये झाडावर अडकलेल्या अवस्थेत आहे. हा कावळा उंच नारळाच्या झाडावर असल्याने त्याला खाली काढण्यात अपयश येत आहे. पक्षीमित्र रमेश अय्यर यांच्याकडे पाच घुबड व एक कोकीळ जखमी अवस्थेत दाखल झाला होता. मात्र, त्यावर उपचार करण्यात आले आहेत. जखमी पक्ष्यांना तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी गंगापूर रोड व परिसरात नेचर क्लबतर्फे खास भरारी पथक नेमण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘टीडीआर देतांना शेतकऱ्यांवर अन्याय’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर विकासासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला म्हणून १०० टक्के टीडीआर देणे आवश्यक असतांना महापालिका आयुक्त टीडीआरमध्ये कपात करत असल्याचा आरोप आडगाव व चुंचाळे येथील शेतकऱ्यांनी केला आहे. आरक्षित जागेचा शंभर टक्के टीडीआर देण्याचा राज्यपालांचा आदेश असतांना आयुक्त त्यात कपात करीत आहेत. १०० टक्के टीडीआर न दिल्यास आंदोलनाचाही इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.

महापालिकेने रस्ते व इतर सुविधांसाठी संपादित केलेल्या जमिनीच्या बदल्यात सन २०१४ पर्यंत शंभर टक्के टीडीआर दिला जात होता. पंरतु, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पदभार घेतल्यापासून रस्त्याचा टीडीआर वजा करून टीडीआर देण्यास सुरूवात केल्याचा आरोप हिरामन शिंदे, रामदास शिंदे यांनी केला आहे. सरकारचा २००८ चा १०० टक्के टीडीआर दण्याचा आदेश असतांनाही त्याची पायमल्ली केली जात आहे. नऊ मीटर रस्त्याचा निम्मे टीडीआर घेतला जात असल्यान हा शेतकऱ्यांवर अन्याय असून डॉ. गेडाम हे शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापू्र्वी १०० टक्के टीडीआर दिला असतांनाही आयुक्त परस्पर नियमात बदल का करतात असा सवाल करत १०० टक्के टीडीआर मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशार त्यांनी दिला आहे. मागणी मान्य न केल्यास आत्महत्या करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डायल १०८’ शहरात ठरतेय जीवनदायी

$
0
0

ह्दयविकाराच्या १९६ रुग्णांचे वाचविले प्राण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अपघात, ह्दयविकाराचा झटका आला की घरातील माणसे गोंधळून जातात. अशा वेळी आठवण येते ती 'डायल १०८ रुग्णवाहिका सेवेची. २६ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत राज्यभरात ५ लाख ९३ हजार ३५६ जणांना या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा लाभ मिळाला आहे. ह्दयविकाराच्या घटनेत नाशिक शहरातील १९६ रुग्णांना या रुग्णवाहिकेने जीवनदान दिले आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि 'बीव्हीजी इंडिया लिमिटेड' या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस'च्या 'डायल १०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे वर्षभरात ४ हजार ७०७ हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना अत्याधुनिक रुग्णवाहिकेतील उपचारामुळे आणि वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे जीवनदान मिळाले.

डायल १०८ हा दूरध्वनी क्रमांक डायल केल्यानंतर महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या सुसज्ज रुग्णवाहिका मदतीला येतात. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज डायल १०८ रुग्णवाहिकेच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेमुळे हृदयविकारासारख्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर तातडीने उपचार होणे सोपे झाले आहे.

२६ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच्या तपशीलानुसार संपूर्ण राज्यभरात ५ लाख ९३ हजार ३५६ जणांना या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा लाभ मिळाला आहे. २६ जानेवारी २०१४ रोजी सुरू झालेल्या या सेवेत अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा ९३७ रुग्णवाहिका राज्यभर आहेत. यामध्ये २३३ 'अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट' रुग्णवाहिका असून, ७०४ बेसिक लाईफ सपोर्ट रुग्णवाहिकांचा समावेश आहे.

अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी १०८ या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास विनामूल्य सेवा देणारी सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. अपघात, हृदयविकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीत भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहिका बोलावता येते.


कार्डियाक रुग्णांची आकडेवारी

अहमदनगर (२१२), अकोला (४२), अमरावती (१११), औरंगाबाद (२३७), बीड (५४), भंडारा (२१), बुलढाणा (१०५), चंद्रपूर (७६), धुळे (८०), गडचिरोली (३६), गोंदीया (३३), हिंगोली (९७), जळगाव (१८९), जालना (६४), कोल्हापूर (१७५), लातूर (८१), मुंबई (७१४), नागपूर (२७७), नांदेड (२९२), नंदूरबार (३८), नाशिक (१९६), उस्मानाबाद (८५), पालघर (३८), परभणी (४९), पुणे (३१९), रायगड (८३), रत्नागिरी (७९), सांगली (६६), सातारा (१००), सिंधुदूर्ग (७५), सोलापूर (१६०), ठाणे (२२९), वर्धा (१०४), वाशिम (६६), यवतमाळ (१२६). ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची ही आकडेवारी आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात २४ तडीपारांना वर्षभरात अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हद्दपार केलेले असताना शहरातच वास्तव्य करणाऱ्या २४ तडीपारांना शहर पोलिसांनी गेल्या वर्षभरात अटक केली. शहरातून हद्दपार झालेले गुन्हेगार शहराच्या जवळच असलेल्या पर जिल्ह्यातील एखाद्या गावात राहतात. तेथून त्यांना शहरात येणे सहज शक्य असल्याने या गुन्हेगारांचे फावते.

परिमंडळ दोनमधून सन २०१४ मध्ये १८ जणांना एक ते दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. सन २०१५ मध्ये हीच संख्या १५ इतकी होती. देवळाली कॅम्प, नाशिकरोड, उपनगर, इंदिरानगर, अंबड आणि सातपूर पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांचा यात समावेश होता.
परिमंडळ एक म्हणजेच आडगाव, पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबई नाका, म्हसरूळ आणि गंगापूर पोलिस स्टेशनमधून दोन वर्षात अवघ्या आठ जणांना तडीपार करण्यात आले. यात २०१४ मध्ये पाच तर २०१५ मध्ये तीन गुन्हेगारांचा समावेश होता.

मालमत्त तसेच शरीराविरोधात गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांकडून ही कारवाई होती. तडीपारीचा आदेश झाल्यानंतर हे गुन्हेगार ठाणे जिल्ह्यातील जव्हार किंवा अहमदनगर जिल्ह्यातील संमगनेर येथे वास्तव्यास असतात. या दोन्ही ठिकाणावरून काही वेळातच शहरात परतणे शक्य असते. त्यामुळे तडीपार झालेले बहुतांश गुन्हेगार शहरातच वास्तव्यासअसतात.

कागदोपत्री शहराबाहेर असलेले गुन्हेगार मोकाटपणे वेगवेगळे गुन्हे करताना आढळून येतात. गेल्या वर्षभरात शहरात वास्तव्यास असलेल्या २४ तडीपार गुन्हेगारांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली. अगदी दोन दिवसांपूर्वी भद्रकाली पोलिसांनी शालिमार परिसरात फिरणाऱ्या एकास जेरबंद केले. अटक झालेल्या गुन्हेगारांना कोर्टासमोर हजर करण्यात येते. मात्र, या कायद्याचा भंग करणाऱ्यांविरोधात तितकीशी कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे हे प्रकार थांबवणे सहज शक्य नसल्याचा दावा सूत्रांनी केला.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगवेगळ्या अपघातात महिलेसह युवकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन वेगवेगळ्या अपघातात एका विवाहितेसह युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी उपनगर तसेच गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.

अपघाताची एक घटना नाशिक-पुणे हायवेवरील विजय ममता चौफुलीजवळ गुरुवारी संध्याकाळी पाऊणे पाच वाजेच्या सुमारास झाली. गांधीनगर परिसरातील इंदिरागांधी झोपडपट्टीजवळ राहणारे ज्ञानेश्वर भिका जाधव आपल्या पत्नी कुसूम यांच्यासोबत जात असताना भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला (एमएच १५ अे‍‍.व्ही. ६५५१) जोराची धडक दिली. यात कुसूम जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. जाधव यांची दुचाकी विजय ममता चौफुलीवर सिग्नलवर थांबली होती. सिग्नल सुटला म्हणून ते निघाले असता नाशिक ड्रीम सिटी चौफुलीकडून वडाळारोडकडे जाणाऱ्या ट्रकने (एमएच १५ ऐ. के. ९५५५) पुढे जाण्याच्या प्रयत्नात दुचाकीला धडक दिली. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी फरार झालेल्या ट्रक चालकाविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

जीवघेण्या अपघाताची आणखी एक घटना गंगापूररोडवरील हॉटेल विकीजवळील सोमेश्वर लॉन्स येथे १३ जानेवारी रोजी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली. भरधाव वेगात जाणाऱ्या लोगोन कारने (एमएच ०४ डीजे ७४९३) दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तुकाराम यादव दिवे (वय २७) या तरुणाचा मृत्यू झाला. नाशिककडून गिरणारेकडे जाताना लोगोन कारने दिवेंच्या दुचाकीला जोराची धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या तुकाराम दिवेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ओझरखेड येथील सचिन यादव दिवे यांनी
दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिसांनी कार चालक विक्रम धनराज पाटील/महालेच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षमता

$
0
0

देवळालीच्या जुन्या बस स्थानक येथे देवळाली महोत्सवाच्या 'देवळाली रन'ला अंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजेंदरसिंह, आंतरराष्ट्रीय वॉटर पोलो खेळाडू रणजीत क्षत्रिय, माजी खासदार राजाभाऊ गोडसे, नरेश कारडा, राजेश मांडे, महाराज बिरमानी, खंडेराव मेढे आदींनी झेंडा दाखवून 'देवळाली रन'चा प्रारंभ केला. रन १४, १७ वर्षे आणि खुला अशा तीन गटात मुले, मुली अशी पार पडली. त्यानंतर पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे, बाबुराव मोजाड, तानाजी करंजकर, चंद्रकांत गोडसे, दीपक बलकवडे, डॉ. संजय गुप्ता, डॉ. युवराज मुठाळ, प्रवीण गायकवाड, गुंडाप्पा देवकर, विनोद शिंदे, लाल गुप्ता, परमजीत सिंग कोचर आदी उपस्थित होते.

आयोजक जीवन गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी देवळाली महोत्सवादरम्यान चित्रकला, रांगोळी, नृत्य, सूर्यनमस्कार व देवळाली 'रन'मधील विजेत्यांना गौरविण्यात आले. महोत्सव यशस्वीतेसाठी संजय गीते, नवनाथ झोंबाड, जयेश गोडसे, छगन गोडसे, नितीन शिंदे, हेमंत गायकवाड आदी प्रयत्नशील होते.

रनमधील विजेते :

१४ वयोगट (मुले) : १) शुभम मुळाणे, २) भूमीत पाडवी, ३) तन्मय नाईकवाडे

१४ वयोगट (मुली) : १) कीर्ती झनकर, २) सोनिया चौधरी, ३) अंजली काळे

१७ वयोगट (मुले) : १) अभिजित हिरकुड, २) नितीन गावित, ३) सुरेश बारेलाल

१७ वयोगट (मुली) : १) वेदिका वाईकर, २) पूनम माळी, ३) राखी मातेर

खुला गट (पुरुष) : १) सुरेश वाघ, २) हिरामण थविल, ३) रमेश गवळी

खुला गट (मुली) : १) आरती पाटील, २) योगिता गवळी, ३) माधुरी काळे

चित्रकला स्पर्धा : श्रावणी मोरे, निकिता पवार, राधिका विश्वकर्मा, प्रणया लोखंडे, ऐश्वर्या करंजकर, अजय चौधरी, ओंकार गोडसे, विक्रांत संसारे, ज्योती कनोजिया.

रांगोळी स्पर्धा : प्रियांका भागवत, श्रावणी मोरे, ओंकार गोडसे, सारिका पवार, धनश्री वराडे, सुजाता वराडे, वनिता बोडके, प्रियंका शाह.

नृत्य स्पर्धा : १) नूतन विद्या मंदिर, २) आर्ट गॅलरी, ३) दर्शन अॅकॅडमी, ४) कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूल, ५) डॉ. गुजर सुभाष हायस्कूल, ६) एसव्हीकेटी कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>