Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

एलईडी लाईटचा कोट्यवधींचा अपहार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या लोकप्रतिनिधी तसेच, प्रशासनाच्या वादात अडकलेल्या एमआयसी कंपनीने आपल्याकडील सर्व एलईडी लाईट्स काठेगल्ली येथील बंगल्यात ठेवल्या. मात्र, कंपनीने नियुक्त केलेल्या मार्के‌टिंग एंजट आणि स्थानिक व्यक्तीने परस्पर चार कोटी ५४ लाख ४० हजार ५८ रुपये किमतीच्या एलईडी लाईटचा अपहार केला. भद्रकाली पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करीत काठेगल्लीत राहणाऱ्या इलेक्ट्रीक ठेकेदाराला मुद्देमालासहीत अटक केली आहे.

या अपहाराबाबत एमआयसी कंपनीचे कर्मचारी शंकर नागेशराव युप्पलवार यांनी फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी देवांग निळकंठ ठाकूर यास अटक केली. या गुन्ह्यातील आणखी एक संशयित सिध्दार्थ व्ही. शहा सध्या फरार आहे. महापालिकेच्या वीज बिलात कपात करण्यासाठी शहरातील तब्बल ६९ हजार स्ट्रीट लाईट बदलून तिथे एलईडी लाईटस बसवण्यासाठी महापालिकेने हैदराबाद येथील एमआयसी कंपनीशी करार केला आहे. तब्बल १०२ कोटी रुपयांच्या करारामुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकले. सन २०१३ मध्ये हायकोर्टात केस चालली. यात कोर्टाने महापालिकेच्या बाजूने कौल दिला. यानंतर, डिसेंबर २०१४ मध्ये एमआयसी कंपनीने वेगवेगळ्या मालट्रकमध्ये साधारण साडेचार कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ८३७ एलईडी लाईटस सातपूर गोडावूनमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच दरम्यान महापालिकेत सत्ताबदल झाला आणि एमआयसी कंपनीचे साहित्य घ्यायचे नाही, असा निर्णय घेण्यात आला. हा तिढा सुटेपर्यंत एमआयसी कंपनीने नियुक्त केलेल्या पुणे येथील मार्केटिंग कंपनीचा डायरेक्टर सिध्दार्थ शहाला जागा शोधण्यासाठी सांगण्यात आले. त्याने काठे गल्ली येथील ठाकूरशी संपर्क साधला. या दोघांनी साहित्य ठेवण्यासाठी काठेगल्लीतीलच ठाकूर यांचे नातेवाईक रंजना ब्रह्मक्षत्रिय यांचा बंगला निवडला. तसेच, १० हजार रुपये घरभाड्यानुसार ६ डिसेंबर २०१४ रोजी एलईडी लाईटस बंगल्यात उतरवण्यात आल्या. सर्व व्यवस्थित झाल्यानंतर युप्पलवार पुन्हा हैदराबादला परतले. चालू आर्थिक वर्षाचे कंपनीचे स्टॉक स्टेटमेंट बँकेला द्यायचे असल्याने युप्पलवार यांना मालाची तपासणी करण्यासाठी पुन्हा नाशिकला पाठवण्यात आले. मात्र, सदर बंगल्याचे कुलूप बदलण्यात आले. तसेच, मालही गायब असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यांनी संशयित ठाकूर तसेच शहाशी संपर्क साधला. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयित ठाकूरला अटक केली. तसेच, त्याच्याकडून सर्व एलईडी जप्त केल्या. घटनेचा पुढील तपास पीएसआय हनुमंत व्ही. वारे करीत आहेत. सदर प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा

0
0

टीम मटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शनिवार सेनेच्या मंत्री व आमदारांनी ना‌शिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करून पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी या शिष्टमंडळापुढे समस्यांचा पाढा वाचला. या शिष्टमंडळाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयाची भेट घेऊन सात्वंन केले. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी व शिवसेनाप्रमुखांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्ह्यातील १२२ शेतकऱ्यांना मदत करण्यात आली.

मालेगावात रोष मालेगाव तालुक्यातील शेती, पाणी व अन्य प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतराम मोरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने तालुक्यातील सौंदाणे, कळवाडी, झोडगे, वडनेर खाकुर्डी गटांचा दौरा केला. पं. स. सभापती भरत पवार, उपसभापती अॅड. यशवंत मानकर, माजी सभापती धर्मराज पवार, जि.प. सदस्य चंदू वाघ, ज्योती तलवारे, संजय दुसाने, प्रांताधिकारी अजय मोरे आदी उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांना उपस्थित शेतकरी, ग्रामस्थांनी आपल्या समस्यांनी हैराण करून सोडले. जनतेच्या भावनांचा आदर करून शासकीय अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन काम करावे, अशी सूचना आमदार मोरे यांनी केली. दौऱ्यात गावागावात जनतेच्या रोषाला आणि प्रश्नांना सामोरे जावे लागले.

शिष्टमंडळ गहिवरले मनमाड : कुठे पाणी शोधूनही सापडत नाही, तर कुठे पाण्याअभावी पिकांचा करपा झालेला... काही ठिकाणी बळीराजाला शेती उत्पन्नाअभावी जगणेच मुश्किल झाल्याचे भीषण वास्तव पाहून करमाळा येथील आमदार नारायण पाटील यांच्यासह सेनेच्या जिल्हा नेत्यांना गहिवरून आले. तुमचे दुःख, रास्त अपेक्षा शासन दरबारी पोहचवू आणि न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार नारायण पाटील यांनी नांदगाव येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिले. यावेळी माजी आमदार संजय पवार, राजाभाऊ देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुहास कांदे, जिल्हा उपप्रमुख सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ छाजेड, गटनेते संतोष बळीद, बाजार समिती सभापती तेज कवडे उपस्थित होते.

चांदवडमध्ये मदत

चांदवड : शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी चांदवड तालुक्यातील दुष्काळसदृश स्थितीचा पाहणी दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. चांदवड तालुक्यातील वाकी, तळेगाव, रायपूर, डोणगाव या भागात पाहणी करून परि‌स्थितीचा आढावा घेतला. रेडगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास आमदार पोतनीस यांनी शासकीय व वैयक्तिक मदत पोहचवली. यावेळी शिवसेनेचे कारभारी आहेर, नितीन आहेर आदी उपस्थित होते.

पाणीप्रश्नावर भर सिन्नर : राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सिन्नर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांचा दौरा केला. यामध्ये धोंडवीर नगर, सायाळे, मिठसागरे या गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून परिसरात कायमस्वरूपी योजनाबाबत नियोजन करण्याचे आश्वासन दिले. कायमस्वरूपी पाणीटंचाई असलेल्या धोंडवीर नगर येथे पाण्याचा अधिक एक टँकर देण्याचे आदेश दिले. सायाळे येथे निळवंडे धरणातून कायमस्वरूपी कालव्यातून पाणी देण्याबाबत आश्वासन दिले. या दुष्काळ दौऱ्यात महसूल आमदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते.

त्र्यंबकमध्ये सांत्वन

त्र्यंबकेश्वर : आमदार सुनील राऊत, सुधाकर बडगुजर​, माणिकराव सोनवणे आदींसह नेत्यांनी गावात जाऊन विचारपूस करताच शासन अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा पाढा ग्रामस्थांनी वाचला. आमदार सुनील राऊत यांनी शेतकरी बांधवांना आत्महत्या करू नका, असे आवाहन केले. तळवाडे येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट दिली. सर्वनेते मंडळी शिवाजी शांताराम बोडके, रंगनाथ दामू बोडके, उत्तम पांडूरंग बोडके या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले.

मागण्यांचा पाढा लासलगाव : शिवसेनेचे आमदार प्रतापराव सरनाईक, अनिल कदम समवेत नगरसेवक किरण कापसे, तालुका प्रमुख उत्तम गडाख, जि. प. सदस्य ज्ञानेश्वर पवार, पं. स. सदस्य राजाराम दरेकर, तहसीलदार डॉ. संदीप आहेर, कृषी, पाटबंधारे अधिकारी यांनी निफाड तालुक्यातील गोंदेगाव भागाची दुष्काळ परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. गोई नदीवरील पाणी पिण्यासाठी आरक्षित करावे, कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, परिसरात चारा छावणी चालू करावी, अशा एक ना अनेक व्येथा शेतकऱ्यांनी मांडल्या.

धनादेश वाटप सटाणा : शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती देऊन सातबारा कोरा करण्यासाठी शिवसेना कटिबध्द असल्याची ग्वाही शिवसेनेचे मुंबई येथील आमदार तुकाराम काते यांनी दिली. बागलाण तालुक्यातील खमताणे, मुंजवाड, देवळाणे, अजमीर सौंदाणे, सुराणे, वायगाव, सारदे, चिराई, महड, टेंभे या गावातील भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. बुंधाटे गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी रामदास देवरे यांच्या पत्नी कुसुमबाई देवरे व राहुड येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी शामकांत देवराम ठाकरे यांच्या पत्नी कल्याणी ठाकरे यांना एक लाख रुपयांचा धनादेश आमदार काते यांच्या हस्ते देण्यात आला. या दौऱ्यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख सुभाष नंदन, मुन्ना सोनवणे, शरद शेवाळे, जयप्रकाश सोनवणे, प्रांतधिकारी संजय बागडे, तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, कृषी अधिकारी डी. के. कापडणीस आदी उपस्थित होते.

तलावांची पाहणी कळवण : निवाणे येथील कैलास आनंदा आहेर व दीपक मोतीराम निकम यांच्या कुटुंबीयांचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी सात्वंन कले. तसेच सप्तशृंगी गड येथील भवानी पाझर तलावाची पाहणी केली. यावेळी तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ, गिरीश गवळी उप‌स्थित होते. ओतूर धरणाची गळतीची पाहणी करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रारींचा पाढा वाचला. .

येवल्यात जाणल्या व्यथा

येवला : शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी काही गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. दुष्काळी परिस्थितीने कंबरडे मोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांनी आपली कथा अन् व्यथा त्यांच्यासमोर मांडत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. कर्जाचा डोंगरच माथ्यावर इतका मोठा झालाय की सोसायटीचं उचललेलं कर्ज फेडू शकत नाही, अशा अनेक व्यथा या दौऱ्यात तालुक्यातील शेतकऱ्यांनी मांडल्या. यावेळी प्रांताधिकारी वासंती माळी, तहसीलदार शरद मंडलिक, सुनील आहिरे, शेळके, मंडळ कृषी अधिकारी जगदीश तुंबारे आदी उप‌स्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिपुत्रांना मिळेना योजनांचा लाभ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी इगतपुरी तालुक्याला भेट दिली. शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यात काळुस्ते, वाघेरे, मुंडेगाव इथल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेवून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. धरणांमुळे भूमिपुत्रच विस्थापीत झाल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या. धरण ग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शनिवारी नाशिक जिल्ह्यात तालुकास्तरावर जाऊन पाहणी दौरा केला. त्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या शिष्टमंडळाने इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याची पाहणी केली. काळुस्ते या गावाला भेट देवून तीथल्या धरणग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतला. शिंदे यांनी तातडीने पुनर्वसन करण्यासह आर्थिक मोबदला देण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांना दिले. कांचनगाव आहुर्ली, वाघेरे व मुंडेगावमधील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात महसूल मंत्री,जलसंपदा मंत्री व पुनर्वसन मंत्र्यांची एक‌त्रित बैठक मंत्रालयात बोलावून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

शिवसेना उचलणार शिक्षणाचा खर्च

वाघेरे गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी व निवृत्त सैनिक कृष्णा बाबुराव शिंदे यांच्या कुटुंबीयांना भेट देवून त्यांचे सांत्वन केले. प्रांत व तहसीलदारांना जागेवरच मदतीच्या सूचना केल्या. मृत शिंदेच्या आई वडिलांना संजय गांधी निराधार योजनेत समाविष्ट करण्याचे आदेश दिले. तसेच मदतीचा प्रस्ताव तातडीने शासनाला सादर करण्याचेही आदेश दिले. सोबतच मृत शिंदे यांच्या दोन्ही मुलांचे शिक्षण शिवसेना करणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

दुकानदाराने पळ काढला

वाघेरे गावातील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे गावात येताच तेथील रेशन दुकानदाराने आपल्या दुकानाला कुलूप ठोकत धूम ठोकली. शिंदेच्या गाड्यांच्या ताफा गावात घुसले तेव्हा रेशन दुकान सुरू होते. मंत्री थेट थांबले. दुकान उघडण्यासाठी दुकानदाराची शोधाशोध सुरू झाली. परंतु, दुकानदारच नसल्याने अधिकाऱ्यांसह मंत्र्यांना काढता पाय घ्यावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाहणी पथक नव्हे तर कलापथक

0
0

येवला : शिवसेनेकडून दुष्काळ पाहणीचा देखावा केला जात असून शिवसेना नेते राज्यातील जनतेला वेड्यात काढीत आहे. शिवसेना आपल्याला शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. दौरे करण्यापेक्षा तुमच्या मित्रपक्षाबरोबर बसा अन् पंतप्रधानाकडे जा अन् भरीव पॅकेज आणा, अशी टीका विरोधी पक्षनेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक शनिवारी दुपारी येवल्यातील शासकीय विश्रामगृहावरील सभागृहात झाली. त्यावेळी पत्रकारांशी बोलतांना विखे यांनी शिवसेनेची भूमिका ही दुटप्पी असल्याचे सांगत टोले लगावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी थांबला निधी!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसे आणि भाजपमधील वादामुळे महापालिकेत मनसेची आर्थिक कोंडी केली जात असल्याचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध करताच शनिवारी राज्यातील सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले. हा वाद आणखी वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका प्रशासनाने एकत्रित येत निधीची अडवणूक नव्हे तर गुणवत्ता नियंत्रण प्रमाणपत्रासाठी निधी रिलीज केला नसल्याचा दावा केला. महापालिकेला गुणवत्ता प्रमाणपत्र सादर केल्यानंतर १७१ कोटींचा निधी तत्काळ महापालिकेला वर्ग केला जाईल असा दावा जिल्हाधिकारी कार्यालयाने केला आहे.

सिंहस्थ निधीतील २०२ कोटी रुपये शासनाने तीन महिन्यांपासून थांबवले आहेत. जायकवाडीचा पाणीप्रश्न व स्मार्ट सिटीवरून एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र आहे.

मनसेचे नेते भाजपला कोंडीत पकडत आहेत, तर भाजप नेते राज्य सरकारमार्फत महापालिकेची कोंडी करीत आहेत. सिंहस्थ निधीसाठी मनपातर्फे गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा केला जात आहे. परंतु, मनसे भाजपला अडचणी आणत असल्याने हा निधी अडवल्याचा दावा भाजपचे नेते करीत होते. त्यामुळे शनिवारी 'मटा'ने मनसेची आर्थिक कोंडी हे वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर राज्य सरकारचे धाबे दणाणले. हा वाद अधिक चिघळू देऊ नका, असा सल्ला सरकारतर्फे अधिकाऱ्यांना देण्यात आला. या निर्णयाचे उलटे प्रतिसाद उमटण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी व मनपा कार्यालयातर्फे यासंदर्भातील स्पष्टीकरण करण्यात आले आहे.

महापालिकेला १७१ कोटी रुपये देण्यास आम्ही तयार आहोत. पंरतु, पालिकेच्या वतीने सिंहस्थ कामांची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत सादर केले जाणारे कामांचे गुणवत्ता प्रमाण सादर केला नसल्याने निधी दिला नसल्याचा दावा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आला आहे. हे गुणवत्ता प्रमाणपत्र न देताही अनेक कामांची बिले अदा करण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला आताच गुणवत्ता प्रमाणपत्राची आठवण कशी झाली याची चर्चा पालिका अधिकाऱ्यांमध्ये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दात बनवणाऱ्या एजंटकडून फसवणूक

0
0

नाशिक : मुंबई येथील फाईव्ह वाय डब्लू डेंटल स्टुडिओ या कंपनीच्या नावाखाली परस्पर कृत्रिम दातांची निर्मिती करून त्यांची विक्री करणाऱ्या संशयिताविरोधात पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

मुंबई येथे कार्यरत असलेल्या सदर कंपनीचे नाशिक येथील काम पाहण्याची जबाबदारी घनश्याम जाधव ऊर्फ बाबू या संशयितांकडे देण्यात आली होती. शहरातील डेन्टीसकडून आलेल्या ऑर्डरनुसार कंपनीला माहिती देऊन कृत्रिम दात तयार करून देणे आणि आलेल्या पैशांचा ऑनलाइन भरणा करण्याची जबाबदारी जाधवकडे होती. मात्र, २०१४ पासून जाधवने कंपनीचे साहित्य वापरून परस्पर दाताची निर्मिती करण्याचा उद्योग सुरू केला. सर्व ऑर्डरची माहिती तो कंपनीला कळवत नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलांचे शैक्षणिक वर्ष

0
0

अश्विनी कावळे, नाशिक

२०१५-१६ हे शैक्षणिक वर्ष उजाडलं ते नवनव्या योजना, प्रणाली अन् मोहिमा घेऊनच. सर्व घटकातील मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यस्तरावर राबविण्यात आलेली 'शाळाबाह्य सर्व्हेक्षण मोहिम' आणि पाठीवरील 'दप्तराचे ओझे हलके' करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न विशेष लक्षवेधी ठरले. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षेचा निर्णयही शिक्षणक्षेत्रात सकारात्मक बदल आणण्यासाठी विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण ठरला.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम, सरल प्रणालीत माहिती अपडेट करणे, आंदोलने, आंतरजिल्हा बदली यांबरोबरच योगदिन, वाचन प्रेरणा दिवस अशा नव्याने सुरू झालेल्या दिवसांची शाळांमध्ये अंमलबजावणी केली गेली. २१ जून या दिवशी जागतिक योगदिन जाहीर करण्यात आला. सर्व शाळांनी हा दिवस साजरा केला. तसेच देशाचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून शाळांनी साजरा केला. विद्यार्थ्यांमधील वाचन कौशल्ये वाढविण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन, जाहीर वाचनाचा तास, असे उपक्रम यादरम्यान पार पडले.


अशैक्षणिक कामांचा वाढता भार शिक्षकांसाठी यंदा मोठी डोकेदुखी ठरला. त्यामुळे काहीवेळा सरकारी निर्णयांखाली शाळा दबल्याही गेल्या अन् त्यांची पळापळही झाली. अशैक्षणिक कामांना विरोध करण्यासाठी आंदोलने छेडण्यात आली. ग्रंथपाल, प्रयोगशाळा कर्मचारी यांनीही विविध मागण्यांसाठी आंदोलने केली. शिक्षकेतरांची पदे रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात चांगलाच आवाज उठवला गेला. अजूनही ही मागणी जोर धरुन आहे. दप्तराचे ओझे हलके झाले नाही तर मुख्याध्यापक व संचालकांना जबाबदार धरण्याच्या निर्णयाबद्दलही मुख्याध्यापकांनी नाराजी व्यक्त केली. अशा अनेक घटनाक्रमांनी काही सकारात्मक तर शाळांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या निर्णयांना शाळांना सामोरे जावे लागले. यामुळे अनेक स्थित्यंतरे शैक्षणिक बाबींमध्ये आली.


शाळाबाह्य सर्वेक्षण

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारमार्फत शाळाबाह्य मुलांच्या सर्व्हेक्षणाची मोहिम ४ जुलैला राज्यस्तरावर राबविण्यात आली. प्रशासनाबरोबरच सामाजिक संघटना, शालेय व्यवस्थापन समिती यांच्यामार्फत हे सर्व्हेक्षण पार पडले. नाशिकमध्ये १०४५ शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला. ही मोहिम शिक्षणाचा जागर करण्यासाठी महत्त्वाची ठरली असली तरी त्यात पारदर्शकता नसल्याची टीका समाजसेवी संस्थांनी केली. अपेक्षित संख्येच्या तुलनेत अत्यल्प संख्या सर्व्हेक्षणातून समोर आल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. त्यामुळे ही प्रक्रिया निरंतर राहावी, अशा सूचनाही करण्यात आल्या. या सूचनेची अंमलबजावणी करत २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान पुन्हा ही मोहिम राबविण्यात आली.


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून राज्यात सुरू करण्यात आला. इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा व गणित या विषयांच्या शैक्षणिक प्रगती चाचण्या यामार्फत घेण्याचे नियोजन होते. परंतु या परीक्षांसाठी आवश्यक प्रश्नपत्रिका शाळांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. प्रशासनाने काही शाळांना स्वखर्चाने प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना देण्यास सांगितले. त्यामुळे शाळा आर्थिक संकटात सापडल्या. याशिवाय परीक्षा रद्द करणे, पुढे ढकलणे यांसारख्या अडचणी यामध्ये सातत्याने येत राहिल्या. त्यामुळे शाळांमध्ये संभ्रम निर्माण झाला.


शिष्यवृत्ती स्वरुपात बदल

पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळांतील गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरुप बदलण्यात आले. पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौथीऐवजी पाचवी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा सातवीऐवजी आठवीमध्ये घेण्यास सुरुवात करण्यात आली. तसेच 'पूर्व माध्यमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजने'चे नाव 'उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना' असे करण्यात आले.


सरलप्रणाली

शालेय कामकाजात पारदर्शकता राहावी यासाठी सरलप्रणाली विकसित करण्यात आली. मात्र या प्रणालीत अनेक त्रुटी आढळून आल्याने शिक्षकांची नाचक्की झाली. दिलेल्या वेळेत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींची माहिती भरणे आवश्यक होते. परंतु प्रणालीतील अडथळ्यांमुळे 'सरल'ची वाट शिक्षकांसाठी वाकडी राहिली.



शाळांना व्यावसायिक शिक्षणाचे धडे

सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी शाळांमध्ये व्यवसाय शिक्षण योजना राबविण्याचे घोषित करण्यात आले. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त शाळांमध्ये ही योजना राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.



सेंट फ्रान्सिस वाद

सेंट फ्रान्सिस शाळेविरोधात पालकांनी केलेले आंदोलन या शैक्षणिक वर्षात चांगलेच पेटले. विद्यार्थ्यांना मारहाण, निकाल न देणे, मानसिक त्रास देऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरणे यामुळे या शाळेविरोधात पालकांनी वेळोवेळी आंदोलने केली. या वादावर महानगरपालिका शिक्षण मंडळात सुनावणीही झाली. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास न देता शिक्षणास प्राधान्य द्यावे, असे आदेश या शाळेला देण्यात आले होते. मात्र शाळेने हा निर्णय धुडकावून लावत ८ डिसेंबरला शाळेच्या तिडके कॉलनी शाखेतील एका शिक्षिकेने आठ वर्षीय विद्यार्थ्याला फी भरली नसल्याच्या कारणावरुन बेदम मारहाण केली. या कारणावरुन सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये पालकांनी तक्रार दाखल केली होती.



दहावी फेरपरीक्षा

दहावीमध्ये अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी जुलैमध्ये दहावीच्या फेरपरिक्षा घेण्यात आल्या. नाशिक जिल्ह्यातून ६ हजार ६४३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १ हजार ६८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २५.३३ टक्के निकाल लागला.



शाळा सहा तासावरुन आठ तास

नव्या शैक्षणिक धोरणात शाळेचे तास सहा तासावरुन आठ तास करण्याच्या निर्णयाची चांगलीच चर्चा रंगली. सहा तास अभ्यासक्रम व दोन तास इतर उपक्रम असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु सर्वच स्तरावरुन होत असलेल्या विरोधामुळे हा प्रस्ताव रद्द केला गेला. शाळांमध्ये या निर्णयामुळे धास्ती निर्माण झाली होती.



कुंभमेळ्यात शाळांना सुट्या

कुंभमेळ्यात पर्यटकांची संख्या पाहता शाळेतील विद्यार्थ्यांना गर्दीच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी ९ दिवस सुट्या देण्यात आल्या होत्या. या सुट्यांचे दिवाळीच्या सुटीत समायोजन करण्यात आले.



शिक्षक शिक्षकेतरांचे आंदोलन

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतरांनी राज्यस्तरीय आंदोलने केली. ७ नोव्हेंबरला घंटानाद आंदोलनाने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर १४ नोव्हेंबरला आमदारांच्या घरी रात्री जाऊन झोपमोड आंदोलन, ३० नोव्हेंबरला पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा, नागपूरला हिवाळी अधिवेशनात मोर्चा व १० डिसेंबरला शाळा बंद आंदोलन करण्यात आले.



दप्तर ओझे

२०१५ या वर्षाच्या अंतिम टप्प्यात दप्तर हलके करण्यासाठी प्रयत्न केले गेले. विद्यार्थ्यांच्या पाठीवर येणारा दप्तराचा भार हलका करण्यासाठी राज्य सरकारमार्फत जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार शाळा व जिल्हा प्रशासन कामाला लागले. दप्तर हलके करण्यासाठी विविध उपाययोजना यासाठी राबविण्यात आल्या. अनेक शाळांनी यासाठी तयार केलेल्या ई-लर्निंग लॅब दप्तर हलके करण्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्षासाठी सव्वालाख कर्ज

0
0

म .टा. प्रतिनिधी, नाशिक

ऊसासह द्राक्ष आणि कपाशी आदी पीक कर्जमर्यादा वाढविण्यास नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या बैठकीचे आयोजन शनिवारी बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आले होते.

‍वसंतदादा सहकारी साखर कारखान्याप्रमाणेच निफाड सहकारी साखर कारखाना आणि नाशिक सहकारी साखर कारखाना यांनाही कर्ज दिले जावे, असा मुद्दा काही संचालकांनी उपस्थित केला होता. यावर बोलताना बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी वसाकाप्रमाणेच या कारखान्यांनी राज्य सरकारकडून थकीत कर्जासाठी हमी द्यावी, असे झाल्यास त्याही कारखान्यांना कर्जपुरवठा करता येणे शक्य होईल, अशी भूमिका मांडली. अध्यक्षांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे वसाकाच्या पाठोपाठ जिल्ह्यातील उर्वरीत दोन कारखान्यांनाही अपेक्षित कर्ज मिळण्याचा आशावाद निर्माण झाला आहे.

पुढील वर्षासाठी पीककर्जाच्या मर्यादेत वाढ करण्याच्या निर्णयास या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यानुसारी प्रतिएकर क्षेत्रासाठी द्राक्षांची पीकमर्यादा ८५ हजारांहून १.२५ लाख करण्यात आली. टोमॅटो १८ हजाराहून २५ हजार, कपाशी १५ हजारांहून १७ हजार, डाळिंब ३२ हजारांहून ४० हजार अशी करण्यात आली.

पॉलिहाऊसमधील फुल व फळ पिकांसाठीही कर्जमर्यादा वाढविण्यात आली. यामध्ये फुल व फळपिकांसाठी प्रति दहा गुंठ्यांसाठी ९० हजारांहून १ लाख रुपये तर २० गुंठे क्षेत्रातील शेडनेटसाठी १२ हजार रुपयांवरून ही मर्यादा २० हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली. नव्या वर्षात शेतकऱ्यांना या वाढीव पीकमर्यादेचा फायदा घेता येणार आहे.

नरेंद्र दराडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीसाठी संचालक मंडळातून माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, माजी आमदार माणिकराव कोकाटे, गणपत बाबा पाटील, परवेझ कोकणी, अपूर्व हिरे व अव्दय हिरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बनावट खतांचा सुळसुळाट

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण तालुक्यात बनावट सेंद्रिय खते विकली जात असून, याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. परजिल्ह्यातील काही एजंट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ही खते विकत असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाने या खत विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुक्यात कांदा लागवडीचे काम सुरू ते बघून परजिल्ह्यातील एजंट थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बनावट खाते विकत आहेत. काही बोगस कंपन्या जैविक नावाचा वापर करून त्यात रासायनिक कीटकनाशक व कीडनाशक यांचा वापर करून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. यासाठी कृषी विभागाने उपयोजना करून बोगस कंपन्या तालुक्यातून हद्दपार करव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्यात बनावट व विनापरवाना खतांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अपेक्षित उतार मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कायम राहिला आहे. पिकांच्या रास्त दरासाठीच्या आंदोलनाबरोबर आता या बनावट खतांतून होणाऱ्या फसवणुकीसाठी यापुढे शेतकऱ्यांना लढावे लागणार आहे.

गेल्या दोन वर्षात खतांच्या किमती दोन ते अडीच पटीने वाढल्या. किमती वाढतील त्या प्रमाणात भेसळही वाढत आहे. कांदा, ऊस, द्राक्ष, डाळिंब बागांच्या अधिक उत्पादनासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते, सेंद्रिय खते, जैविक खतांचा वापर करू लागला आहे. एकूण उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चातील ७० ते ७५ टक्के वाटा या खतांच्या किमतीवर खर्च करावा लागतो. खतातील भेसळीची चाचणी करूनच शेतकऱ्यांनी खते वापरली पाहिजेत. लाखो रुपये खर्च करताना मागे पुढे न पाहणारा शेतकरी आंधळेपणाने खतांची गोणी लागेल म्हणून टाकतानाचे चित्र आहे. खत टाकल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पीक न आल्यास आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येते. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. कृषी विभाग आणि त्यांचे गुणनियंत्रक, तपासणीसाठी सॅम्पल घेणारे अधिकारी चिरीमिरीत अडकलेले असतात. त्यामुळे योग्य निकाल लागत नसल्याची चर्चा होत आहे. शेतकऱ्यांनी खते खरेदी करताना घटकांची तपशील नव्हे तर तपासून घेण्याची गरज आहे. प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवून कारवाईत सातत्य दाखवले पाहिजे. अन्यथा सध्याची कारवाई केवळ सोपस्कार ठरण्याची शक्यता आहे.

कळवण तालुक्यातील निवाने येथील एका शेतकऱ्याकडे बोगस सेंद्रिय खत विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एजंटवर कृषी विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. ती खते गुणवता तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत. तसेच शेतकऱ्यांनी खते अधिकृत दुकानातनूच घ्यावीत. खते घेताना बिले घ्यावीत.

- शिरीष शहा, तालुका कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनता दलाचे उपोषण मागे

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मनपा विकासकामातील गैरव्यवहार प्रकरणी चौकशीच्या मागणीसाठी येथील जनता दल सेक्युलरच्या वतीने गेल्या १४ डिसेंबरपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानंतर शनिवारी मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे पालिका प्रशासनात खळबळ माजली होती.

आंदोलनकर्त्यांपैकी एकाची प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल केल्याने आंदोलनाचे गांभीर्य वाढले होते. अखेर आयुक्त किशोर बोर्डे यांनी कार्यालयीन चर्चेच्या वेळी जनता दलाच्या दहा मुद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वॉटर ग्रेस कंपनीच्या शहरातील कचरा संकलन कार्यवाहीबाबत व त्यात झालेल्या अस्तव्यस्त कामाबाबत आयुक्तांनी सदर कंपनीला दंडात्मक करवाईचे आदेश देऊन सदर कंपनीला १ कोटी ९८ लाख ४ हजार रुपयांच्या चालू बिलातून दंड वसूल करण्यात येत असल्याचे नमूद केले. तसेच, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यातील कारवाईपोटी ५६ लाख ४२ हजार रुपये टप्प्याटप्प्याने वसूल करून सदर कंपनी ठेक्यात नवीन वाहने जीपीएस यंत्रणेसह पुरवत नाही तोपर्यंत दंडाची रक्कम वसूल करण्याचे मान्य केले. याशिवाय दिग्विजय कंपनीच्या साफसफाई कामात हजेरीसाठी बायोमेट्रिक मशिनरी तसेच कामगारांना गणवेश, जुना आग्रारोड जाळीचा ठेका, रास्ता रुंदीकरण, डंबरीकरण ही कामे मार्चअखेर पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिले. मोसमपूल ते जुना बसस्थानक दरम्यान स्कायवॉक उभारण्याबाबत काढलेल्या निविदेसंदर्भात आदेश जारी केल्याचे आयुक्तांनी कळविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायलॉन मांजावर बंदी

0
0



२० जानेवारीपर्यंत वापरणे ठरणार गुन्हा; शिक्षा व दंडाची तरतूद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मनुष्य तसेच पक्षांच्या जीवितास हानी पोहचविणाऱ्या नायलॉन (चिनी) मांजाचा वापर करताना कोणी आढळले, तर त्यांच्याविरोधात थेट कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नायलॉन मांजावर बंदी असताना पंतग उडवणारे मात्र या मांजाचा सर्रास वापर करताना दिसतात. यामुळे पक्ष्यांसह मानवी जीवन धोक्यात येते.

परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, मकरसंक्रातीदरम्यान पंतग उडवले जातात. गेल्या काही वर्षांपासून नायलॉन मांजाचा वापर वाढला असून, हा मांजापर्यावरणासह नागरिकांना धोकादायक ठरत आहे. चिनी बनावटीच्या या मांजामुळे कान, नाक इतकेच नव्हे तर मान कापण्याच्या घटना घडतात. तसेच, झाडांमध्ये अडकलेल्या मांजामुळे पक्ष्यांचे जीवन धोक्यात सापडते. नाशिक शहरातच अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाचा वापर, त्याची विक्री करणाऱ्यांविरोधात भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नायलॉन मांजाची विक्री थांबवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले असून, तपासणी मोहीम सुरू केली असल्याचे उपायुक्त धिवरे यांनी स्पष्ट केले. कलम १८८ नुसार संशयिताचा गुन्हा दाखल झाला तर त्यास कैद तसेच दंड किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात.

पर्यावरणास घातक

मागील वर्षी एका निसर्ग संस्थेने केलेल्या पाहणीत नायलॉन मांजामुळे २१ पक्षी गतप्राण झाले होते. तर, ४८ पक्षी जायबंद झाल्याचे उघड झाले होते. हा आकडा फक्त एक दिवसाचा होता. यात पोपट, चिमणी, साळुंकी, कावळे, कबूतर, रोबिण, बुलबुल याबरोबर रात्री भरारी घेणारे गवानी घुबड जायबंदी झाले होते. घार, कापशी बगळे, पोण्ड हेरोन, शराती असे शेकडो पक्षी दरवर्षी जखमी होतात अथवा मृत्युमुखी पडतात. अग्निशमन दल तसेच पक्षीप्रेमी सातत्याने मांज्यात अडकलेल्या पक्षांची सुटका करीत असतात. काही महिन्यांपूर्वी महापौर अशोक मुर्तडक यांनी सातपूर विभागीय कार्यालय परिसरातील झाडावर अडकलेल्या एका पक्षाला सोडवले होते. यानंतर महापालिकेने परिसरातील दुकानावर छापे टाकून नायलॉन मांजाचे ३०० रिळ जप्त केले होते. नायलॉन मांजा अनेक दिवस नष्ट होत नाही. तसेच तो सहजतेने तुटत देखील नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो.

नायलॉन मांजाचे दुष्परिणाम सर्वांनी अनुभवले आहेत. मकर संक्रातीनंतर अनेक महिने हा मांजा नागरिक तसेच, पक्ष्यांना धोकादायक ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर आम्ही या मांजाच्या वापरावर २० जानेवारी २०१६ पर्यंत बंदी घातली असून, त्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.

- श्रीकांत धिवरे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी भरतीला विरोध

0
0

एचएएल कामगार संघटनेचे आंदोलन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कंत्राटी कामगार भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विरोध करण्यासाठी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडमधील (एचएएल) कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी सरस्वतीनगर येथील के. के. वाघ कॉलेजमधल्या परीक्षा केंद्रावर आंदोलन केले. कंत्राटी कामगारांच्या भरतीमुळे अनेक प्रश्न उद्भवणार असल्याचा दावा करीत कायमस्वरूपी कामगारांकडून वेळोवळी या भरतीला विरोध केला जात आहे.

ओझर येथील एचएएलमध्ये भारतीय हवाई दलासाठी लागणाऱ्या लढाऊ विमानांची निर्मिती होते. येथे कायमस्वरूपी कामगारांची नेहमीच भरती केली जाते. मात्र, यंदा प्रशासनाने कंत्राटी कामगार घेण्याचा निर्णय घेतला. हे कामगार चार वर्षासाठी कंपनीसोबत काम करतील. इलेक्ट्रिकल डिप्लोमा, आयटीआय (फिटर) इलेक्ट्रशियन या पदासाठी ही भरती असून, ८५ पदांसाठी तब्बल १ हजार ९५४ उमेदवार इच्छुक आहेत. या उमेदवारांची रविवारी के. के. वाघ कॉलेजमध्ये परीक्षा घेण्यात आली. कंत्राटी भरतीच्या विरोधात कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर आंदोलन केले. प्रशासनाने कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनी केली. हंगामी कर्मचाऱ्यांची भरती करण्याची एचएएलमधील ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे चुकीचा पायंडा पडेल, अशी भिती आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. अशा भरतीमुळे कामगारांचे शोषण होणार आहे. तसेच चार वर्षानंतर पुन्हा हे कामगार बेरोजगार होतील, असे कामगार संघटनेचे मत आहे. या भरतीच्या विरोधात कामगार संघटनेने मुंबई येथील रिजनल लेबर कमिशनर यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्यानुसार विभागीय कामगार आयुक्त, मुंबई यांनी ही परीक्षा पुढे ढकलावी व कामगार संघटनेशी चर्चा करून मार्ग काढण्याचा सल्ला एचएएल व्यवस्थापनाला दिला होता. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून भरती प्रक्रिया चालूच ठेवल्याने निषेध करावा लागल्याचे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. कंत्राटी भरती प्रक्रियेमुळे एचएएलमध्ये सुरू असलेल्या कामांची गोपनीयता नष्ट होईल. तसेच, कंत्राटी तसेच कायमस्वरूपी असा वाद उद्भवू शकतो. या भरती प्रक्रियेला विरोध करण्यासाठी सकाळी एचएएल कामगार संघटनेचे सरचिटणीस संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. पी. आहेर, अविनाश कुलकर्णी, प्रदिप गोळेसर, अनिल मंडलिक, बापू भामरे, बाळासाहेब थोरात, नरेंद्र खैरनार यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राहुल-सिसिलियाने बांधली सात जन्माची गाठ

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

सनईच्या मंगल स्वरात, तुताऱ्यांच्या निनादात आणि भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाचं मोल सांगणाऱ्या रीती रिवाजात एका देखण्या सोहळ्यात डेन्मार्कची आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सिसिलिया पीटरसन सिसिलिया राहुल एळींजे झाली. भारतीयांचे आदरातिथ्य, संस्कारक्षम लग्नविधी तसेच सातासमुद्राकडील लोकांनाही भुरळ घालणारी भारतीय संस्कृती पाहून डेन्मार्कची पाहुणे मंडळीही भारावून गेली.

आपल्या कन्येची एका वैभवशाली संस्कृतीशी नाळ जुळली गेली व विश्वात लौकिक असलेल्या बौद्ध परंपरेची ती घटक झाली हे पाहताना सिसिलियाचे वडील पिले पीटरसन यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे व समाधानाचे भाव पसरले. मनमाडच्या पल्लवी मंगल कार्यालयात झालेल्या बहुचर्चित राहुल व सिसिलिया यांचा विवाह भारतीय व पाश्चात्य या दोन्ही संस्कृतीचा आगळा मिलाफ करणारे ठरले.

एकीकडे सनईच्या स्वरात मर्म बंधातील ठेव ही हे गीत सुरू होते, तर दुसरीकडे मनमाडची सून झालेल्या आपल्या लाडक्या लेकीचे भारतात होत असलेले कौतुक मोरपिसासारखे मनाच्या कप्प्यात जपावे असेच तिच्या वडिलांना वाटत राहिले. वधू-वरांना हळद लावण्याचा पारंपरिक सोहळा, लग्नाची वरात, हात जोडून नमस्कार करीत स्वागताची भारतीय पद्धत आणि बौद्ध धर्मीय पद्धतीने मंगलमय विवाह, फुलांची उधळण आणि शुभेच्छांचा वर्षांव हे सर्व याची देहा याची डोळा अनुभवताना पीटरसन दाम्पत्य पार हरखून गेले.

व्याही भेट आणि एळींजे परिवारावर प्रेम करणारे हजारो स्नेही, नातलग, हितचिंतक यांचे त्यांच्यावरचे आणि विदेशी पाहुण्यांवरचे प्रेम पाहून वधूपिता ही गहिवरल्याचे चित्र होते. सिसिलियाची बहीण मौली हिला सुद्धा हे लगीन अनुभव ताना आपल्या डोळ्यातील आसवे हळूच टिपल्याशिवाय राहवले नाही. मनमाडसह परिसरात या लग्नाची चर्चा व खास उत्सुकता दिसून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसकामात अडथळा; वाहनधारकाविरोधात गुन्हा

0
0





म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रॉँगसाईड वाहन चालवून पोलिसांना दमबाजी करणाऱ्या सिध्देश संतोष सराफ (वय २०) या काठेगल्ली परिसरात राहणाऱ्या संशयिताविरोधात इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. इंदिरानगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक केतन काशिनाथ राठोड हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत वडाळा पाथर्डीरोडवरील गुरू गोविंदसिंग कॉलेजसमोर वाहने तपासत असताना संशयित सिध्देश राँग साईडने दुचाकी चालवत आला. पोलिसांनी त्याच्याकडे वाहनाची कागदपत्रे मागितली असता त्याने पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. वऱ्हाडे करीत आहेत.

मोबाइल लांबवला

आकाशवाणी भाजी मार्केट येथून पायी जाणाऱ्या प्रज्ञा अशोक मोरे (वय २२) या महिलेच्या हातातील १० हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरट्यांनी खेचून पळ काढला. ही घटना शनिवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. सावरकरनगर येथे राहणाऱ्या मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

कॅनडा कॉर्नरला घरफोडी

कॅनडा कॉर्नर परिसरातील अद्वेय कॉलनीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटनंबर सहामध्ये राहणाऱ्या रौनक विश्वासराव सोनवणे यांचा बंद घराचा दरवाजा फोडून चोरट्यांनी कपाटातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व लॅपटॉप असा मुद्देमाल चोरी केला. ही घटना शनिवारी सकाळी साडेअकरा ते पाऊण वाजेच्या सुमारास घडली. वर्दळीच्या परिसरात भरदिवसा झालेल्या घरफोडीमुळे चोरट्यांना शोधून काढण्याचे आवाहन पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.

युवतीला पेटवले

भागिदारीत टेम्पो घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याने युवतीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून देण्याची घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास चुंचाळे शिवारातील दत्तनगर येथे घडली. वर्षा सुरेश चंद्रमोरे (वय १९) असे जखमी युवतीचे नाव असून, ती सिन्नर येथील उद्योग भवनाच्या पाठीमागे असलेल्या साईबाबा मंदिराजवळ राहते. भागिदारीत टेम्पो घेण्यासाठी वर्षाने सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथे राहणाऱ्या मंगेश खताळे यास ५० हजार रुपये दिले होते. या प्रकरणी अंबड पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून खताळेविरोधात गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांध घालून सोडवला पाणीप्रश्न

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री येथे जलसंधारण साधण्यासाठी श्री संत निवृत्तीनाथ मंदिर संस्थान विश्वस्त रामभाऊ मुळाणे आणि कुटुंबीयांनी स्वखर्चाने येथील नदीस बांध घालत शिवारात पाणी उपलबध्द करून दिले आहे. जलयुक्त शिवार संकल्पना यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे मत शासन अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता लवकरच पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. जनावरांना पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होईल हे लक्षात घेता नदी ओहळांमध्ये असलेले पाणी आडविणे अधिक उपयुक्त ठरणार आहे. विश्वस्त रामभाऊ मुळाणे, माजी सरपंच म्हाळसाबई मुळाणे, बाजार समिती सदस्य प्रभाकर मुळाणे आणि राष्ट्रवादी नेते बहीरू मुळाणे या कुटुंबाने गावाबाहेरून वाहणाऱ्या नदीपात्रात स्वखर्चाने मातीचा बांध घातला आहे. काही दिवसात या नदीपात्रात सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत सात फूट खोल पाणी साचले आहे. आज पिंप्री जवळचे गाव हिर्डी आदी गावांच्या ग्रामस्थांना पाण्याचा भेडसावणारा प्रश्न निकाली निघाला आहे. जनावरांना पाणी उपलब्ध झाले. त्याचबरोबर धुण्यासाठी व वापरासाठी पाणी उन्हाळा मध्यावर येईपर्यंत टिकेल, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. नदीपात्रात वीजपंप बंदी करण्यात आली आहे. पाणी आडवा पाणी जिरवा यशस्वी होत असल्याने आजूबाजूच्या विहिरींना पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे. याकरिता रामभाऊ मुळाणे यांच्या मदतीला आजूबाजूचे युवक पुढे सरसावले असून, हा प्रयोग यशस्वी होत असल्याचे पाहून अशाच प्रकारे काम उभे राहणार असे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हौशी संस्कृत नाट्यस्पर्धा २७ पासून

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ५५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी संस्कृत नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी नाशकात येत्या २७ डिसेंबरपासून रंगणार असून, पाच दिवसात एकूण वीस नाटके सादर होणार आहेत.

येत्या २७ ते ३१ डिसेंबरदरम्यान येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही स्पर्धा रंगणार आहे. नाटकांसाठी प्रवेश खुला असून रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन समन्वयक राजेश जाधव यांनी केले आहे.

नाटक पुढीलप्रमाणे : २७ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता जीवनाशा बलियासी (तन्मय ग्रुप, नांदेड), दुपारी ३ वाजता वक्रतुंड (सुहासिनी नाट्यधारा, महाड), २८ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सुंदरा (पुणे विद्यापीठ), दुपारी १२.३० वाजता नदीसूक्तम (युटोपिया कम्युनिकेशन्स, मुंबई), दुपारी ३ वाजता विशतिचक्रयोग (संस्कारज्योती, सांगली), सायंकाळी ५ वाजता ऐकक संघ (संक्रमण, पुणे), सायंकाळी ७ वाजता कथा वार्धक्यस्य इयम (सांगली शिक्षणसंस्था), २९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता रतन (राष्ट्रभाषा परिवार, नागपूर), दुपारी १२.३० मुक्ता (रंगमित्र कलामंडळ, इंदापूर), दुपारी ३ वाजता सुधाखण्डा: केचित् (रुईया महाविद्यालय, मुंबई), सायंकाळी ५ वाजता सिकतासु तैलम (पद्मगंधा प्रतिष्ठान, नागपूर), सायंकाळी ७ वाजता इंद्रध्वज: (दीपक मंडळ, नाशिक), ३० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता अक्षगानम् (महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड), दुपारी १२.३० वाजता आद्यम मे चौर्यम (लोकहितवादी मंडळ, नाशिक), दुपारी ३ वाजता पादत्राणहीन (कुंभी कासारी शेतकरी मंडळ, कोल्हापूर), सायंकाळी ५ वाजता तमसो मा ज्योतिर्गमय (गंधर्व संस्था, अमरावती), ३१ डिसेंबर

रोजी सकाळी १०.३० वाजता धन्यो गृहस्थाश्रम: (संस्कृत प्रचारिणी

सभा, नागपूर), दुपारी १२.३० वाजता बालादपि (डीएव्ही पब्लिक स्कूल, नवीन पनवेल), दुपारी ३ वाजता मृत्यू : जन्मस्य (ब्राह्मण संघ, भुसावळ), सायंकाळी ५ वाजता मिनोगहवरे (आपला परिवार, नागपूर).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांच्या भावनांशी मैत्री करा

0
0

विनोदिनी काळगी

बुद्धी आणि भावना हे एक लोकप्रिय द्वंद्व आहे. आजच्या विज्ञान युगात प्रगती करायची तर केवळ बौद्धिक क्षमतांचा विकास केला की पुरे अशी आपली समजूत होऊन बसली आहे. त्यात स्पर्धेचे भूत डोक्यात घुसलेले. त्यामुळे व्यक्तिमत्त्वात कमालीचे एकारलेपण व शेवटी एकाकीपण येऊ लागते. डिप्रेशन हा एकविसाव्या शतकाचा रोग म्हणून ओळखला जाऊ लागलाय तो यामुळेच.

हे टाळणे आवश्यक आहे आणि शक्यही आहे. मानसशास्त्राच्या संशोधनातून लक्षात येतं की व्यवसायातील यश किंवा नोकरीतील उच्चपदापासून चांगला मित्र परिवार, आनंदी-समाधानी आयुष्यापर्यंत कोणतीही गोष्टी मिळण्यासाठी फक्त चांगला बुध्यांक (I.Q.) पुरेसा नसतो. त्याहीपेक्षा महत्त्वाचा ठरतो तो भावनांक (E.Q.)! शाळा-कॉलेजमधे हुशार ठरलेली मुले बरेचदा पुढच्या आयुष्यात आपल्याला मागे पडलेली दिसतात ती भावनिक अक्षमतेमुळेच. भावनिक सक्षमता म्हणजे स्वत:च्या व इतरांच्या भावना समजून घेता येणे व त्याला योग्य तो प्रतिसाद देता येणे. कुठल्याही क्षेत्रात माणसांचे योग्य व्यवस्थापन हाच प्रश्न सर्वात महत्त्वाचा बनतो. त्यावेळी इतरांच्या भावनांना सकारात्मक प्रतिसाद देण्यातूनच त्यांच्यातील सर्वोच्च क्षमतांचा वापर करता येणे शक्य होते. हेच खरं म्हणजे सेव्हन हॅबिट्स, यशशास्त्र सारखी पुस्तके सांगत असतात, पण केवळ ते वाचून यश प्राप्त होत नाही तर भावनांचे महत्त्व समजून घेऊन, स्वत: सक्षम झाल्यानेच प्राप्त होते.

ही संकल्पना लहानपणापासून मुलांमध्ये रुजवणे शक्य आहे. पण त्यासाठी आधी शिक्षक व पालकांनी स्वत:च्या भावना नीट जाणून घेणे व मुलांपर्यंत त्या स्पष्ट शब्दात योग्य प्रकारे पोहोचवणे आवश्यक आहे. आता बघा एखादे मूल उंच ठिकाणी धोकादायक अवस्थेत उभे आहे आणि आईने जाऊन त्याला एक फटका दिला, तर त्याला वाटेल की आईला राग आलाय, पण प्रत्यक्षात आईच्या मनात असेल काळजी किंवा भीती. कधी आपण मुलांशी अबोला धरतो, तेव्हाही मुलांपर्यंत आपली योग्य भावना पोहोचेलच असे नाही. आपल्याला तशी अपेक्षा असते, पण त्यामुळे मुलांच्या मनात उलट गोंधळच निर्माण होतो. मुलांनी चुका केल्या तरी, तुम्ही मला आवडत नाही असे न म्हणता, तुम्ही मला आवडता पण तुमचे हे-हे वर्तन मला आवडत नाही, असे म्हणायला हवे. कोणतीच भावना चुकीची किंवा बरोबर नसते. तेव्हा स्वत:ची भावना समजून घेऊन त्याचा स्वीकार करायला मुलांना शिकवता येईल. एखाद्या मुलाला किरकोळ गोष्टीची भीती वाटत असेल तर आपण चटकन म्हणतो, त्यात काय घाबरायच? त्याऐवजी तुला भीती वाटतेय ना? ठीक आहे वाटू शकते, पण आता ती कमी कशी करता येईल त्यावर आपण उपाय शोधू, असा दृष्टीकोन मुलाला जास्त उपयोगी ठरतो. म्हणूनच भावनांना योग्य प्रकारे सकारात्मक प्रतिसाद देता येणे शिकायला हवे व मुलांना शिकवायला हवे.

हे सहजपणे शिकण्याचा मार्ग म्हणजे गटकाम. यात मुले एकमेकांच्या कमतरता व बलस्थाने ओळखून, त्याचा सुयोग्य वापर करुन, गटकामाची फलनिष्पत्ती चांगली कशी होईल त्याकडे लक्ष द्यायला शिकतात. तेव्हा शिक्षणात याचा भरपूर वापर करायला हवा. मात्र त्यासाठी मुलांच्या आणि पालकांच्या मनात सहकाराचे महत्त्व रुजायला हवे! मुलांच्या मनात भावनांचा गोंधळ असेल तर त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. शिवाय आनंद असो वा दु:ख दोन्ही भावनांचा अतिरेक त्रासदायकच. म्हणूनच भावनांचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते कोणत्याही प्रसंगी आपण जसा विचार करतो त्यानुसार आपल्या मनात भावना निर्माण होतात. हे जर आपण मुलांना शिकवले तर त्यांना हेही सांगता येईल 'विचार बदल म्हणजे जग बदलेल'.

(लेखिका आनंद निकेतनच्या संचालिका आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विज्ञान संस्कृतीचा जोपासक

0
0

fanindra.mandlik@

timesgroup.com

नाशिकमधील आरवायके कॉलेजमधून प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेल्या व्ही. बालसुब्रमण्यम यांनी रसायन शास्त्रात संशोधन केले असून वयाच्या ८४ व्या वर्षी देखील त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. शहरातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून अनेक रसायन शास्त्रज्ञ त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असतात.

व्ही. बालसुब्रमण्यम यांचा जन्म तामिळनाडूतील तंजावरचा. घरची अर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून त्यांनी बी.एस्सीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. बी.एस्सी झाल्यानंतर काय करावे हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे होता. शिक्षणाला अनुसरून नोकरी न मिळाल्याने त्यांना शाळेत शिक्षक म्हणून नोकरी पत्करावी लागली. पण नोकरीत त्यांचे मन रमत नव्हते. त्यांची ही अवस्था शाळेतील एका शिक्षकाने ओळखली आणि त्यांची चौकशी केली. शिक्षकाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी लगेचच एम.एस्सी करण्याचा निर्णय घेतला. अण्णामलाई युनिव्हर्सिटीमध्ये एम.एस्सीसाठी त्यांना प्रवेश मिळाला आणि ते उत्तम यश मिळवून बाहेर पडले. त्यांनतर त्यांनी केमिस्ट्री या विषयात पी.एचडी मिळवली.

पुढे काही काळासाठी ते अमेरिकेत संशोधनासाठी गेले. तेथे रसायनशास्त्रात भरपूर संशोधन केले. दरम्यान पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये त्यांना नोकरी लागली. मात्र १९६९ मध्ये त्यांना नाशिकला येण्याची संधी मि‍ळाली व ते नाशिकच्या एचपीटी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. येथे त्यांना वसंत कानेटकर, आंबेकरसर, सोनी सर यांचा सहवास लाभला. निवृत्त झाल्यानंतर माझ्या कामाला खरी सुरुवात झाल्याचे ते म्हणतात. त्यांच्याकडे विविध कंपन्याचे अधिकारी, शास्त्रज्ञ सल्ले घेण्यासाठी येत असतात. त्यांनी औषधांवर जास्त संशोधन केले असून कमीतकमी किमतीत चांगली औषधे रुग्णांपर्यंत कशी मिळतील याबाबत ते कंपन्यांना मार्गदर्शन करीत असतात. तसेच औद्योगिक कामात वापरण्यात येणारे अॅडेसिव्ह तयार करण्यात त्यांचा हातखंडा असून विविध कंपन्यांना त्याचे फॉर्म्युला तयार करुन देतात.

ग्लेन्मार्क, खादी ग्रामोद्योग, आदिवासी विकास भवन, वन विभाग यांच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू असते. त्याचप्रमाणे विविध संस्था, औद्येगिक आस्थापने यांना आयएसओ मिळवून देण्यासाठी ते मार्गदर्शन करतात. याचबरोबर प्रॉडक्ट रिसर्च, क्वालिटी कंट्रोल यावर विविध कंपन्यांच्या तज्ज्ञांना ते मार्गदर्शन करतात त्यांचा मुलगा व मुलगी दोघेही परदेशात असून नाशिक ही माझी कर्मभूमी आहे. ती सोडून मी येणार नाही असे त्यांना आवर्जून सांगतात. सकाळी पाच वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. सकाळी सात वाजता बॅडमिंटन खेळणे, पियानो वाजविणे, बागकाम करणे असा त्यांचा दिनक्रम असतो. आपल्याला मिळत असलेल्या उत्पन्नातील काही भाग समाजासाठी द्यावा यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. अनेक गरीब मुलांना ते आर्थिक सहाय्य करतात. त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये विज्ञानविषयक गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांनी सायन्स फोरमची त्यांनी स्थापना केली आहे. याद्वारे लहान मुलांना कायम मार्गदर्शन सुरू असते. विज्ञानाबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू असते. तसेच समाजातील अनिष्ठ चालीरितींना आळा बसावा यासाठी अंधश्रध्दा निर्मुलन समितीद्वारे त्यांचे कार्य सुरू आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गोखले एज्युकेशन सोसायटी, पुणे विद्यापीठ, सार्वजनिक वाचनालय तसेच भारतातील विविध संस्था, भारताबाहेरील अनेक संस्थांनी त्यांना गौरविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टंचाईतही पाण्याची नासाडी

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव शहराचा पाणीप्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात केवळ दहा टक्के पाणीसाठा असून, त्यावर देखील मालेगाव-जळगाव असा पाण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे. या गिरणा धरणातून मालेगाव शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला मात्र जागोजागी नादुरुस्तीमुळे रोज हजारो लिटरची पाण्याची गळती होऊन वाया जात आहे. याबाबत मात्र मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

या पाइपलाइनच्या देखरेखीसाठी गस्त घालणाऱ्या पथकाला मात्र हे वाया जाणारे पाणी दिसत नसावे का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे. गिरणा धरण ते शहरातील पाणीपुरवठा केंद्र दरम्यान असलेल्या पाइपलाइनला दरेगाव नजीक मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असून, हजारो लिटर पाणी वाया जाते आहे. वाहनधारक आता येथे वाहने धुण्यासाठी आणत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुल्लडबाजांवर पोलिसांच्या नजरा

0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक
नववर्षाचे स्वागत करताना होणाऱ्या हुल्लडबाजीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी आतापासूनच टवाळखोरांना रडारवर घेतले आहे. मागील दोन दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या भागात कारवाई केली जात असून न्यु इयर सेलिब्रेशन करताना कायद्याचे भान असू द्या, असा सल्लाही पोलिसांमार्फत दिला जातो आहे.

नववर्षाचे स्वागत करताना आयोजीत होणारे कार्यक्रम शांततेत पार पडावे, यासाठी पोलिसांकडून दरवर्षी प्रयत्न केले जातात. तरीही मद्यपींचा राडा किंवा छेडछाडीच्या घटना घडतच असतात. हा अनुभव पाठीशी असलेल्या पोलिसांनी यंदा विशेष काळजी घेण्याचे ठरवले असून मागील दोन दिवसांपासून चौकात उभे असणारे टोळके, धोकादायक पध्दतीने वाहन हाकणारे तसेच उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. नववर्षाच्या स्वागता दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमानंतर अनेक अपघात होतात. विशेषतः दुचाकी वाहनधारकांच्या अपघाताचे प्रमाण लक्षणीय असते. वेळेवर अशी कृत्य थांबवणे अवघड बनते. त्यामुळे आतापासूनच कारवाई सुरू केल्याची माहिती पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली. परिमंडळ दोनमधील नाशिकरोड, देवळाली कँम्प, उपनगर, इंदिरानगर, सातपूर आणि अंबड या पोलिस स्टेशन हद्दीत पोलिसांनी ३२२ टवाळखोरांवर मुंबई पोलिस अॅक्टनुसार कारवाई केली. याबरोबर जोरात वाहन हाकणाऱ्या १५९ तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १०२ जणांवर कायद्याचा बडगा उचलण्यात आला. पोलिस स्टेशन हद्दीतील प्रमुख कॉलेजेस, क्लासेस, चायनिज गाड्या, मोकळी मैदाने आदी ठिकाणांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केल्याचे उपायुक्त धिवरे यांनी सांगितले. लवकरच शहरात नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होईल. कोर्टाने दिलेल्या वेळेच्या बंधनाचा नियम प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून ज्याठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसेल त्याठिकाणी असणार्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन धिवरे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images