Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नागरी सोयीसुविधांसाठी १४ कोटी रुपये मंजूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगाव महापालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या गावांमधील नागरी सोयी सुविधांसाठी शासनाने विशेष अर्थसहाय्य योजनेंतर्गत १४ कोटी ५५ लाख रुपये मंजूर केले आहेत. तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी शासनाने निळगव्हाण येथील जागेवर इमारत बांधकामासाठी ४ कोटी ६४ लाख रुपये रकमेच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे. ही माहिती सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

मालेगाव मनपाच्या हद्दावाढीनंतर समाविष्ट झालेल्या गावांच्या नागरी सोयी सुविधांसाठी पहिल्या टप्प्यात ५.८२ कोटी रुपये निधी विविध विकासकामांसाठी वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. लवकरच या भागात विकासकामे सुरू करण्यात येणार आहेत. समाज कल्याण विभागाच्या मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी नियोजित निळगव्हाण येथील एक एकर जागेऐवजी आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील भायगाव येथील एक एकर जागा समाज कल्याण विभागाकडे हस्तांतरित करावी यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या हस्तांतरण प्रक्रियेस देखील मंजुरी मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संशयिताचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बलात्काराच्या गुन्ह्यात चौकशीसाठी पोलिस कोठडीत असलेल्या संशयिताने सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब गुरुवारी घडली. संशयित आरोपी चंद्रकांत भरत वाघमारेने डाव्या हाताची नस कापून घेतल्याने पोलिसांची भंबेरी उडाली.

गोल्फ क्लब मैदानावरील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या सराईत गुन्हेगार चंद्रकांत व रवि वाघमारे या सख्या भावांनी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला बळजबरीने उचलून नेले होते. त्यानंतर गोल्फ क्लब मैदानाजवळील शौचालयामध्ये नेऊन बालिकेवर अत्याचार केला. या प्रकरणी पीडित बालिकेच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी वाघमारे भावांविरोधात अल्पवयीन मुलींचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या दोघांना बुधवारी कोर्टात हजर केले असता अधिक तपासासाठी चंद्रकांतला २१ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. गुरुवारी रात्री चंद्रकांतची पत्नी व आई त्याला भेटण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये आल्या. पोलिस चौकशी करीत असल्याने त्या दोघी तिथेच थांबल्यात. मात्र, चंद्रकांतच्या कृत्यावरून त्या दोघीतच भांडण सुरू झाले. हे भांडण मिटवण्याचा पोलिस प्रयत्न करीत असताना चंद्रकांतने तिथे पडलेला चहाच्या काचेच्या ग्लासने डाव्या हाताच्या नास कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना उघड होताच त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयकर विभागाची बँकांवरही करडी नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

सीआयबी विवरण दाखल करणाऱ्या सहकारी बँकांच्या आर्थिक व्यवहारांवरही यापुढे आयकर विभागाच्या माध्यमातून अधिक करडी नजर ठेवण्यात येईल, असा इशारा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सच्या उंटवाडी येथील हॉलमध्ये आयोजित सहकारी बँकांच्या कार्यशाळेत बँक प्रतिनिधींना आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्सच्या उंटवाडी परिसरातील हॉलमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आयकर निदेशक, पुणे आणि इंटेलिजन्स अँड क्रिमिनल इनव्हेस्टिगेशन यांच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

एआयआर आणि सीआयबी विवरणपत्र सादर करणाऱ्या सहकारी बँकेच्या प्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. नव्या आर्थिक वर्षापासून काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी आयकर विभागाने काही नियमांमध्ये बदल केले आहेत. यामध्ये विशिष्ट रकमेच्या आर्थिक व्यवहारांमागे पॅन कार्डचा वापर, बँकांमधील ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील, बँकांकडून त्यांच्या व्यवहारांच्या सादर करण्यात येणारा तपशील आदी विषयांवर आयकर विभागाची करडी नजर असणार असल्याची माहिती या कार्यशाळेत अधिकारी वर्गाने दिली. बँकांचे आर्थिक गैरव्यवहार आढळून आल्यास कडक पावले उचलण्यात येतील. काळ्या पैशांना पायबंद घालण्यासाठी आयकर विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे पुणे येथील सहाय्यक निदेशक तृप्ती पटेल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर सहसंचालकास सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इमारत आणि फॅक्टरी मशिनरीचे ले आऊट नकाशाला मंजुरी देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक प्रकाश बाबुलाल परदेशी यास कोर्टाने दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. सन २०१० मध्ये अॅण्टी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी परदेशीस रंगेहाथ पकडले होते.

या घटनेतील तक्रारदार इटॉन इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीत काम करतात. या कंपनीच्या प्रशासकीय इमारतीचे व फॅक्ट्ररी मशिनरीचे ले आऊट नकाशा कारखाना अधिनियम १९४८ नुसार मंजुरीकरिता औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडे पाठवला. मात्र, प्रकाश परदेशीने १० हजार रुपये रक्कमेच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली असता १२ ऑगस्ट २०१० रोजी सापळा रचून परेदशीला रंगेहाथ पकडले. याबाबत सरकारवाडा पोलिसांकडे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

कोर्टात दोषारोपपत्र दाखल होऊन विशेष जिल्हा न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांच्या कोर्टात केसवर सुनावणी झाली. सर्व साक्षी पुरावे तपासून कोर्टाने परदेशीला दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कैद तसेच, कलम १३ नुसार एक वर्ष सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता के. एन. निबांळकर यांनी कामकाज पाहिले. दरम्यान, लाचखोर अधिकारी वा कर्मचाऱ्यांबाबत सर्वसामान्यांना तक्रार करायची असल्यास त्यांनी पोलिस अधीक्षक डी. पी. प्रधान यांच्याशी (९९२३१८५५६६) किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच ०२५३-२५७५६२७, २५७८२३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.

खूनप्रकरणी अटक

त्र्यंबकेश्वर : गणेशगाव वाघेरा येथे दोन दिवसापूर्वी झालेला खून शिवीगाळ केल्याचा राग आल्याने दारूच्या अंमलाखाली केला असल्याचे संशयित आरोपीने कबूल केला आहे. त्र्यंबक पोलिस निरीक्षक देवीदास पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी अवघ्या काही तासात तपास करीत संशयित आरोपीकडून खुनाची माहिती वदवून घेण्यात यश मिळविले.

गणेशगाव वाघेरा येथील वेळुंजे विनायक नगर रोडवर युवराज भिका महाले (वय २५) या ग्रामस्थाचा १६ डिसेंबर २०१५ रोजी मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी त्याच्याशी विविध कारणांनी संपर्कात असलेल्या नऊ व्यक्तींना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता संशयित आरोपी पुंजाराम राघो महाले (वय ४०, राहणार विनायक नगर गणेशगाव वाघेरा) याने आपण खून केला असल्याचे कबूल केले. त्र्यंबक पोलिस ठाण्यात संशयित आरोपी पुंजाराम राघो महाले यास अटक झाली असून, त्याच्यावर ३०२ व २०१ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत चार अतिक्रमणे जमीनदोस्त

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी पंचवटीत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवित चार अतिक्रमणे जमीनदोस्त केली. नागरिकांनी मंजूर ले आऊटपेक्षा जास्त केलेल्या बांधकामांवर पालिकेने हातोडा चालवला आहे. नगररचना विभागाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.

दिंडोरी रोडवरील धर्मशक्ती रेसिडेंट इमारतीतील सामासिक अंतरात दौलाराम चौधरी यांनी बांधलेले पत्र्याचे शेड अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले. तर, म्हसरूळ येथील पोकार कॉलनीतील श्रीराम रो-हाऊस संगीता नवले यांचे लोखंडी जिन्याचे अतिरिक्त बांधकाम तोडले. आडगाव येथील प्लॉट क्रमांक ४९० मधील रमेश पंडित यांचे सामासिक अंतरातील पक्के बांधकाम पाडण्यात आले. या सोबतच सर्व्हे नंबर ९४४ मधील शांतीकुंज हौसिंग सोसायटीतील सी. जी. चौधरी यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. बहिरम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्ज छाननीत ११४ अर्ज वैध

$
0
0

दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होऊन त्यात ११४ अर्ज वैध ठरविण्यात आले. तसेच, शिवसेनेने दिलेल्या दोन उमेदवारांच्या एबी फॉर्मवर निर्णय होत प्रथम अर्ज दाखल केलेल्या प्रमोद देशमुख यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला, तर शिवसेनेचे शहरप्रमुख रमेश बोरस्ते यांचा अर्ज फेटाळण्यात आला.

निवडणूक निरीक्षक रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मुकेश भोगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी अर्जांची छाननी केली. सतरा जागांसाठी ११५ उमेदवारांनी १५४ अर्ज दाखल केले होते. त्यात शिवसेनेत उमेदवारी वाटपावरून एबी फॉर्म वाटपात गोंधळ झाला. प्रभाग सातमध्ये रमेश बोरस्ते व प्रमोद देशमुख यांना एबी फॉर्म देण्यात आले होते. या दोन्ही अर्जाबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूररेषेतील बांधकामांना दिलासा देण्याची मागणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

लाल पूररेषेतील बांधकामांना आळा घालणाऱ्या आणि जॉगिंग ट्रॅकपर्यंत नदीचे विस्तारीकरण करण्याचा सल्ला देणाऱ्या निरीच्या अहवालामुळे नदीकाठावरील बांधकामावर गदा येणार आहे. त्यामुळे या अहवालामुळे नाशिककरांवर अन्याय होऊ नये, म्हणून आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना साकडे घातले आहे. निरीच्या अहवालात हस्तक्षेप करण्याची मागणी फरांदे यांनी केली आहे.

गोदावरीच्या संरक्षणासाठी निरीने नुकताच न्यायालयात अहवाल सादर केला. त्यात लाल पूररेषेतील बांधकामे थांबविल्यास नदीपात्राला धोका पोहचणार नसल्याची सूचना केली आहे. सोबतच जॉगिंग ट्रॅकचे बांधकाम न करता त्यात नदीचे विस्तारीकरण करण्याची सूचना केली आहे. परंतु, या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास नदीकाठावरील ४० ते ५० लोकसंख्या प्रभावित होणार आहे. शहरातील गोदावरी, वालदेवी आणि नासर्डी या नदीकिनारीच नाशिकचा विस्तार झाला आहे. गावठाणातील बहुसंख्य बांधकामे ही पूररेषेत येतात. मानव निर्मित पुरामुळे चुकीच्या पद्दतीने पूररेषा आखण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिकांवर अन्याय झाला आहे. तरीही पालिकेने स्टील्ट बांधकामाना परवानगी दिली आहे. पंरतु, आता निरीच्या अहवालामुळे ही बांधकामे पुन्हा संकटात येणार आहेत. नवीन बांधकामांवर प्रतिबंध येणार आहे. या निर्णयामुळे संतापाचे वातावरण असून, या अहवालामुळे नाशिककरांच्या हक्कांवर गदा येऊन त्यांच्यावर अन्याय होऊ नये, म्हणून शासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी फरांदे यांनी विभागीय आयुक्तांसह पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. २७ जानेवारी २०१६ उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी होणार असून, त्यावेळी शासनाने नागरिकांना दिलासा देणार अहवाल सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारा घसरल्याने नाशिककर गारठले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सकाळच्या गुलाबी थंडीने आणि दुपारच्या अल्हादायक उन्हामुळे नाशिककर सुखावले असून, शहरासह राज्यात थंडीने बस्तान पक्के केल्याचे निश्चित झाले आहे. शुक्रवारी नाशिक शहरातील पारा किमान १०.२ अंश सेल्सियस इतका होता तर कमाल तापमान ३० अंश सेल्सियस इतके होते.

आतापर्यंतची तापमानाची नोंद पाहता थंडीचा कडाका येत्या काळात वाढण्याची चिन्हे आहेत. वातावरणात गेल्या दोन दिवसांपासून अमुलाग्र बदल होत असून, शुक्रवारी पारा किमान १०.२ अंश सेल्सियस इतका होता, तर कमाल तापमान ३० अंश सेल्सियस इतके होते. येत्या काही दिवसात तापमान असेच रहाणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे.

उशिरा सुरू झालेल्या थंडीने आपले बस्तान बसवण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीचे प्रमाण जास्त होते. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडेल, असा हवामानखात्याचा अंदाज होता. मात्र, तसे झाले नाही. त्यानंतर गुरुवारपासून पुन्हा थंडी पडण्यास सुरुवात झाली असून, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वातावरण असेच राहणार आहे. हे वातावरण गव्हाच्या पिकासाठी उत्तम असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकजवळ कार अपघात, ५ ठार

$
0
0

नाशिक : नाशिकमधल्या कळवण-वणी रस्त्यावर झालेल्या अपघातात पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत. मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला.

मृत पाचही तरुण मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात होते. त्यावेळी खाडेमळा शिवारातल्या कळवण-वणी रस्त्यावर त्यांची कार झाडावर आदळून हा अपघात घडला.

अपघातग्रस्त सर्व तरुण वणी गावाचे रहिवाशी आहेत. त्यामुळे वणी गावावर शोककळा पसरली आहे.

अपघाताचे स्वरुप

अपघात इतका भीषण होता कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. अपघातात साहील झावरे, साहील सय्यद, सचिन शेळके, सकलेन सय्यद, सचिन ढोले हे पाच मित्र जागीच ठार झाले. तर इमरान शेख, रोशन खान्दम, द्यानेश्वर धूम हे ३ मित्र जखमी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचे धरणे आंदोलन

$
0
0

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण; केंद्र सरकारचा नोंदवला निषेध

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सीबीआयचा दुरूपयोग करून काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांवर चिखलफेक केली जात असल्याचा आरोप करीत शहर आणि जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले.

सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी खोटे आरोप केले जात असल्याच्या निषेधार्थ शनिवारी देशभरात आंदोलने करण्यात आली. नाशकातही या प्रकरणाचे पडसाद उमटले. भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर कॉंग्रेसच्या विचारधारेला बदनाम करण्याची जबाबदारी सोपविल्याचा आरोप आंदोलकांनी केला. देश कसा चालवावा, जनतेला न्याय कसा मिळवून द्यावा याची जाण नसल्याने काँग्रेसवर चिखलफेक करून जनतेचे लक्ष विचलीत केले जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांकडून करण्यात आला.

युवक काँग्रेसने हे आंदोलन आयोजित केले असले तरी त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस, जिल्हा काँग्रेस, शहर जिल्हा महिला काँग्रेस, एनएसयूआय, ओबीसी सेल, जिल्हा मागासवर्गीय सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाल्यामुळे या संमेलनाची धार अधिकच तीव्र झाली. जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, जिल्हा युवकचे अध्यक्ष राहुल दिवे, शहर युवकचे अध्यक्ष स्वप्निल पाटील आदि पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले. देशभरात भाजपकडून सूडाचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीचा अहवाल शासनाकडे पाठवणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महासभेने नुकत्याच मंजूर केलेल्या घंटागाडी प्रस्तावावर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आक्षेप घेतल्यानंतर नगरविकास विभागाने महापालिकेला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रशासन आता या घंटागाडी प्रस्तावाचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे. नगरसेवकांच्या विरोधानंतर दहा वर्षांचा हा ठराव पाच वर्षाचा करण्यात आला आहे. त्यामुळे आमदारांचा आक्षेप शासनदरबारी टिकणार नसल्याचा दावा केला जात आहे

महासभेत घंटागाडी ठरावावरून मोठा गदारोळ झाल्याने महापौरांनी ठराव दहाऐवजी पाच वर्षांसाठी दिला होता. मात्र, भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी, मतदान न घेताच ठराव मंजूर केला, तर नगरसेवकांच्या सूचनांचा अंतर्भाव केला नाही, असा आरोप केला आहे. फरांदे यांनी राज्य सरकारकडे तक्रारही केली. त्यामुळे नगरविकास विभागाने महापालिकेस अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे तसा सविस्तर अहवाल पाठविण्याची तयारी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुसुमाग्रजांच्या आठवणींना उजळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'शिरवाडकरांना भेटलेली प्रत्येक व्यक्ती सुदैवी आहे. मलाही त्यांना भेटण्याचा योग आला. इतका मोठा माणूस इतका साधा कसा राहतो, हा प्रश्न नेहमी त्यांना पाहून मनात यायचा. त्यांच्या अन् कानेटकरांच्या गप्पा ऐकणंही मोठं गमतीशीर वाटायचं.' 'नटसम्राट' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित पत्रकार परिषदेत नाना पाटेकर यांनी कुसुमाग्रजांच्या आठवणींना उजळा दिला.

कुसुमाग्रज स्मारकात शनिवारी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. शिरवाडकरांच्या नटसम्राट या मूळ कलाकृतीला कोणताही धक्का न पोहोचवता चित्रपटनिर्मिती करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चित्रपटातचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी चित्रपटास लाभलेली तांत्रिक बाबींची उत्तम साथ, नियोजन यामुळे ६५ दिवसांच्या कालावधी ठरवलेला हा चित्रपट अवघ्या ३६ दिवसांत पूर्ण झाल्याचे सांगितले. यावेळी मेधा मांजरेकर, सुनिल बर्वे यांनीही नटसम्राट चित्रपटात साकारलेल्या भूमिकांविषयी माहिती दिली.

सबसिडी बंद करा

मराठी चित्रपटांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, असे वाटत असेल तर त्याला मिळणारी सबसिडी बंद करा, असे परखड मत महेश मांजरेकर यांनी मांडले. कट्यार काळजात घुसली आणि नटसम्राटनंतर आता 'व्यक्ती आणि वल्ली'लाही चित्रपट स्वरुपात आणण्याची इच्छा यावेळी मांजरेकर यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदापात्रात घाणीचे साम्राज्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

आगामी काळात पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी पाणी न सोडल्याने वाहत्या पाण्याअभावी गोदावरीला डबक्याचे रूप आले आहे. प्रचंड घाण साचली असून, दुर्गंधी वाढली आहे. भाविक गोदावरीचे पाणी पाहून पवित्र स्नान करण्यासही धजावत नाहीत.

रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि परिसरात खूपच कचरा साचला आहे. पाण्यावर शेवाळ आले आहे. गांधी तलाव या ठिकाणी बोटिंग सध्या बंद आहे. रामकुंड स्वच्छ ठेवावे, अशी इच्छा भाविक व्यक्त करीत आहेत. पाणी नसल्यामुळे सडलेल्या घाण कचऱ्याची दुर्गंधी येत आहे. पात्रात थोडेफार पाणी असल्याने त्यावर नारळ, पत्रावळी, फुलांच्या माळा, घाण कचरा तरंगत आहे. यामुळे पात्र दलदलीसारखे वाटू लागले आहे. नाका-तोंडावर रुमाल ठेवून तेथे मार्गक्रमण करावे लागत आहे. सिंहस्थामुळे स्वच्छ दिसणाऱ्या गोदापात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

नागरिकही बेजबाबदार

गोदावरी पात्राची स्वच्छता राखणे महापालिकेचे कर्तव्य आहे, तसेच ते नागरिकांचेही आहे. मात्र काही बेजबाबदार नागरिक प्लास्टिक पिशव्या, घाण, कचरा थेट गोदावरीत टाकतात. यामुळे जलप्रदूषण वाढत आहे. या गोष्टीला आळा घालण्याची गरज आहे. गोदावरी नदीची पवित्रता जपणे आवश्यक आहे. रामकुंडमधील पवित्र जल कायम जपावे स्वच्छ ठेवावे. वाहते पाणी नसल्याने दुर्गंधी येत आहे.

- शिवाजी चव्हाण, भाविक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठे नगरात भुयारी गटारींची दुरुस्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

येथील वार्ड क्रमांक तीनमधील रवी सोसायटी ते साठे नगरपर्यंतच्या भुयारी गटार योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून रेंगाळलेले काम मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

रवी सोसायटी, अम्रोलिया पार्क, विश्वास अपार्टमेंट या भागातील १०९ घरांच्या सांडपाणी नाल्याची लाईन गेल्या काही महिन्यांपासून नादुरुस्त झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नी निर्माण झाला होता. याबाबत नगरसेवक भगवान कटारिया यांच्याकडे नागरिकांनी तक्रार केली होती. त्यांनी तातडीने दखल घेत कामास प्रारंभ केला. या भूमिगत गटारीचे सांडपाणी साठे नगरातून नागझिरा नाल्यात सोडण्यात येणार असल्याने दुर्गंधीचा प्रश्नही निकाली लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय वयापासून भीतीला दूर सारा!

$
0
0

राजीव तांबे यांचे प्रतिपाम. टा. प्रतिनिधी, नाशिक

शालेय वयात अनेक मुले नकारात्मक विचारांच्या भीतीने मागे राहतात. मी चुकलो तर? लोकं मला हासले तर? या विचारांमुळे त्यांची प्रगती खुंटते. ही भिती दूर सारुन मुलांनी विचार बदलण्याची गरज आहे. मनाला दिलेला सकारात्मक संदेश चुकणार नाही, याची काळजी घेऊन कार्यरत व्हा, असे प्रतिपादन साहित्यिक राजीव तांबे यांनी केले.

के. के. वाघ इंग्लिश स्कूलतर्फे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी 'चला यशस्वी होऊ या', या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. दादासाहेब गायकवाड येथे शुक्रवारी हे व्याख्यान झाले. तांबे पुढे म्हणाले की, पालक नेहमी आपल्या मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव करुन देत असतात. यामुळे आपल्या मुलात बदल होईल, अशी त्यांची धारणा असते. परंतु यामुळे त्यांच्या मनावरच नकारात्मक परिणाम होतात. त्यांच्या चुका सतत समोर आणून त्याची जाणीव करुन देऊ नका. चूक आठवली की चूका होण्याचे प्रमाणही वाढते. घडलेल्या चुकांमधून काय शिकलो, याची जाणीव मुलांना करुन देण्यास प्राधान्य द्या. चूकांमधूनच शिकण्याची हिंमत मिळते. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दबावात आणण्यापेक्षा प्रेमाने समजावून सांगण्यावर भर द्या. आज मुलांना शिक्षकांची, पालकांची भिती वाटते. त्याचाच परिणाम त्यांच्या मानसिकतेवरही होतो. यावेळी के. के. वाघ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक सिमरन माखिजानी, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य चित्रा नरवडे, संस्थेचे सचिव प्रा. के. एस. बंदी, डॉ. बी. व्ही. कर्डिले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अश्विनी पवार यांनी मानले.

लेबल चिकटवू नका!

मुले मातीचे गोळे असतात, ही भावना डोक्यातून काढून टाकण्याचा सल्ला यावेळी तांबे यांनी पालकांना दिला. मुले हे उर्जेचे स्त्रोत असतात. मुलांना कोणतेही लेबल चिकटवू नका. दूषणं दाखवून मुलं सुधारत नाहीत. मुलांमध्ये बदल घडावा, असे वाटत असेल तर प्रेमाने समजावून सांगा, असेही त्यांनी पालकांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वच्छ नाशिकसाठी युवकांचा पुढाकार

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, नाशिक

गोदाकाठ, सिटी सेंटर मॉल, कॉलेज रोड, सलिम चहा टपरी, महामार्ग बसस्थानक या गर्दीच्या ठिकाणी शंभर किंवा हजाराची रुपयाची नोट सापडते. काही लोक त्या नोटा उचलतात, खिशातही टाकतात आणि थोड्या वेळाने हीच खोटी नोट उचलणाऱ्यांना खरा धडा शिकवून जाते. तो धडा असतो 'स्वच्छ नाशिक हरित नाशिक.'

स्त्यावर पडलेली शंभर किंवा हजार रुपयाची नवी कोरी नोट उचलण्यासाठी जितका वेळ आपण देतो तितकाच वेळ नाशिक स्वच्छ ठेवण्यासाठी आपण देऊ शकतो, असा ध्वनीचित्रफितीतून संदेश देण्यात आला आहे. 'स्वतःमध्येच बदल घडवा जो तुम्हाला जगामध्ये बघावासा वाटतो' हा महात्मा गांधी यांचा विचार यात उद्धृत करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हॉट्स अॅपवर आजपर्यंत पन्नास हजाराहून अधिक लोकांनी बघितला आहे.

यासाठी विश्वास को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. नाशिकमध्ये तीन लाख नव्वद हजार घरे असून, नाशिक महानगरपालिकेच्या १९२ घंटागाड्या आहेत. आपले नाशिक स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश नाशिककरांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही युवकांनी पुढाकार घेतला असून, त्यात ते यशस्वी ठरले आहेत. विवेकराज ठाकूर, पायल शाह, शिवम आहेर, राकेश सरकार, हिमानी पुरी, विपीन खानकरी या युवकांनी स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून कृतिशील पाऊल उचलले आहे.

आपलं नाशिक हरित नाशिक ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येकाचा हातभार महत्त्वाचा असून, हाच संदेश यातून देण्यात आला आहे. युथ युनायटेड ही सामाजिक चळवळ विवेकराज ठाकूर व मित्रांनी सुरू केली असून, त्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महिला व बालकल्याण, शिक्षण, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, वाहतूक जनजागृतीसाठी ही चळवळ काम करणार आहे. त्यातून नाशिकच्या विकासाचे निश्चित परिणाम दिसून येतील असा या युवकांना ठाम विश्वास आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छ भारतचा नाशिकरोडला मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

स्वच्छ भारत अभियान व घर तेथे शौचालय योजनेतंर्गत नाशिकरोड येथे महापालिकेतर्फे लाभार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. अनुदान मिळालेल्या लाभार्थ्यांनी दोन महिन्यात शौचालय बांधून घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

महापालिकेचे सहाय्यक आरोग्याधिकारी सुनील बुकाने, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, डी. के. भोसले, विजय जाधव, विजय मोरे, अजय मोरे, राजू निरभवने, प्रभाकर थोरात, एकनाथ ताठे, अनिल गांगुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. यशवंत मंडई, जेलरोड, शिक्रेवाडी, विहीतगाव, देवळालीगाव, राजवाडा, जेलरोड, शिखरेवाडी आदी ठिकाणचे दोन हजार लाभार्थी उपस्थित होते.

सुनील बुकाने म्हणाले की, ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा आहे, त्यांना बारा हजाराचे अनुदान देण्यात येणार आहे. ज्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते आहे, त्यांना तातडीने सहा हजाराचे धनादेश मेळाव्यात देण्यात आले. उघड्यावर शौचास बसण्यास प्रतिबंध व्हावा म्हणून आठ संस्थांच्या माध्यमातून शौचालय बांधून देण्यात येणार आहे.

शासन आठ हजार तर महापालिका चार हजाराचे अनुदान देणार आहे. लाभार्थ्यांनी स्वतः शौचालय बांधून घ्यायचे आहे. बाराशे लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी जमा झाला आहे. दोन महिन्यात शौचालय बांधणे आवश्यक आहे. संजय दराडे म्हणाले की, पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅग वापरणे टाळावे, कापडी पिशव्या वापराव्यात, कचरा घंटागाड्यातच टाकावा, उघड्यावर शौचास बसू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊर्जा संवर्धनासाठी जनजागृती रॅली

$
0
0

नाशिकरोड : विजेची नासाडी थांबवून ऊर्जासंवर्धन करण्यासाठी जनजागृती काळाची गरज झाली आहे. विजेशी प्रामाणिक राहणे आवश्यक असून, पुढच्या पिढ्यांपर्यंत विजेचे संवर्धन करावे, असे प्रतिपादन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले.

नाशिकरोड येथे ऊर्जा संवर्धन रॅली काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, कार्यकारी अभियंता सतीश नवाथे, माहिती तंत्रज्ञान उपमहाव्यवस्थापक कांचन राजवाडे, अधीक्षक अभियंता गोपाळ पानकर, हरी ढावरे, प्रवीण बागुल, मंगेश गाडे, विनोद विपर, संजय जाधव प्रमुख पाहुणे होते. दि. १४ ते २० डिसेंबर ऊर्जासंवर्धन सप्ताह साजरा करण्यात आला. महावितरण कर्मचाऱ्यांनी नाशिकरोड ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत रॅली काढली. विभागीय महसूल कार्यालयाचे उपायुक्त सतीश देशमुख यांनी कुमठेकर यांच्या हस्ते एलईडी बल्ब भेट देण्यात आला. कुमठेकर यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन केले. वीज कर्मचाऱ्यांना वीज बचतीची शपथ देण्यात आली. वीज बचतीचे महत्त्व कर्मचाऱ्यांनी रॅलीदरम्यान नागरिकांना समजावून सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वणीचे पाच तरुण अपघातात ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी
कळवण-वणी रस्त्यावर हुंदाई व्हर्ना कार झाडावर आदळून पाच जण जागीच ठार झाले, तर तीन जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमधील सर्व जण वणी (ता. दिंडोरी) चे रहिवाशी होते. मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आटोपून ते वणीकडे परतत होते.

एकनाथ खांडे यांच्या मळ्यानजिक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे कार झाडावर जाऊन धडकली. वेग जास्त असल्याने गाडी चार ते पाच वेळा उलटली. तीन एअर बॅगही उघडल्या. साहील भागवत जावरे (वय २०), साहील अली सय्यद (वय १८), सचिन शिवाजी शेळके (वय २०), सकलेन शब्बीर सय्यद (वय १७) व सचिन दिलीप ढोले (वय २४) हे पाच जण जागीच ठार झाले. तर इम्रान सलीम शेख (वय २५), ज्ञानेश्वर राजेंद्र धुम (वय १९) व रोशन भारत खडाम (वय २०) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिकला हलविण्यात आले. साहील जावरे व सचिन शेळके यांच्या मृतदेहांवर वणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, साहील सय्यद व सकलेन सय्यद या दोघांवर मुस्लिम दफनभूमीत अंत्यसंस्कार झाले, तर सचिनचा मृतदेह पिंपळनेर (ता. साक्री) या मूळगावी नेण्यात आला.

श्रमिकनगरला एक ठार
सातपूर : अशोकनगर-श्रमिकनगर रोडवर शनिवारी अपघातात एका तरूणाचा मृत्यु झाला. रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटली नव्हती. संबंधित तरुण मित्रासह दुचाकीवरून शिवाजीनगरकडे चालला होता. ओव्हरटेक करताना दुचाकी स्लिप झाल्यानंतर पाठीमागे बसलेला हा तरुण ट्रकच्या मागील चाकाखाली आला. अपघातानंतर त्याचा मित्र घटनास्थळावरून गाडी घेऊन पसार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खत प्रकल्प मार्गी लागणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या मालकीच्या पाथर्डी शिवारातील खत प्रकल्पाचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे आहेत. महापालिकेने काढलेल्या निविदा प्रक्रियेला पुण्याच्या मेलहॅम आणि फ्रान्सच्या हायकॉस या कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. या दोन्ही कंपन्यांनी सयुंक्तपणे हा प्रकल्प चालवण्याची तयारी दाखवली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. खाजगीकरणांतर्गत पुढील ३० वर्षांसाठी हा प्रकल्प दिला जाणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर हरित लवादाने महापालिकेच्या बांधकामावर लादलेली बंदी उठवली जाण्याची शक्यता आहे.

पाथर्डी शिवारातील खत प्रकल्प सुरू होण्याच्या आशा आता पल्लवीत झाल्या आहे. हा खत प्रकल्प खाजगीकरणातून चालविण्यासाठी महापालिकने अनेकदा निविदा काढून प्रयत्न केलेत. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी विविध कंपन्यांशी चर्चा करीत हा प्रकल्प चालू होण्याचा मार्ग मोकळा केला. कंपन्यांना सातशे रुपये प्रतिटनाप्रमाणे मोबदला मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images