Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

यशस्वी सिंहस्थ पोलिसांशिवाय अशक्यच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सन्मित्र पोलिस नागरिक मित्र फाऊंडेशन, लायन्स क्लब ऑफ नाशिक आणि जेएमसीटी पॉलिटेक्निक कॉलेज यांनी पोलिसांचा सत्कार घडवून आणला, ही अत्यंत स्तुत्य बाब आहे. पोलिसांशिवाय सिंहस्थासारखा सोहळा यशस्वी होणे शक्यच होते. त्यामुळे त्यांची आठवण ठेवून सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे गौरवोउद्घार माजी पोलिस महासंचालक भीष्मराज बाम यांनी काढले.

सन्मित्र पोलिस नागरिक मित्र फाउंडेशन, लायन्स क्लब ऑफ नाशिक आणि जेएमसीटी पॉलिटेक्निक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहस्थात विशेष कामगिरी केलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार परशुराम साईखेडकर नाट्यगृहात शुक्रवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. सिंहस्थासारखा वैश्विक सोहळा पुरेसा बंदोबस्त असल्याशिवाय तडीस जाणे शक्य नाही. पोलिस अधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून केलेले नियोजन त्यास कारणी होते. सरकारी पातळीवर सत्कार होतच राहतो; मात्र नागरिकांनी केलेला सत्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. पोलिसांबद्दल नेहमी आकसाने बोलले जाते. त्यांच्याबद्दल आदर वाढला पाहिजे, असे बाम म्हणाले. 'ग्रंथ तुमच्या दारी' उपक्रमाचे संयोजक विनायक रानडे म्हणाले, की पोलिसांना नेहमी ताणतणावाला सामोरे जावे लागते. यापासून मुक्ती मिळवायची असेल तर वाचन हा एकमेव पर्याय आहे. ठाण्यातील कारागृहात तसेच राज्यातील अनेक पोलिस वसाहतींमध्ये याचे आयोजन केले जात आहे. नाशिकच्या पोलिस वसाहतींमध्येही हा उपक्रम सुरू करू असे त्यांनी सांगितले.

सिंहस्थाचे उत्तम नियोजन, शहरातील गुंडगिरीविरोधात उघडलेली मोहीम आणि अपहृत नंदिनी शर्मा प्रकारणाचा यशस्वी तपास करणारे पोलिस यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शहर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, सर्व पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला सन्मित्र फाऊंडेशनचे प्रशांत जुन्नरे जेएमसीटीचे रऊफ पटेल, लायन्स क्लबचे भाऊ सोनवणे, प्रकाश पाटील, हाजी हीसामुद्दीन खतीब, दिवाकर रत्नपारखी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रागिणी कामतीकर यांच्या शिष्या राजेंदर कौर व नेहा मूर्ती यांच्या 'तू बुध्दी दे' या गीताने झाली. शेवट रागीणी कामतीकर यांच्या पसायदानाने झाला. श्रापीद कोतवाल यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारी नव्हे, ही तर समस्यांची वसाहत!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोणत्याही सरकारी वसाहतीतील समस्या कुणासाठी नव्या नाहीत. परंतु, शरणपूर रोडवरील स्नेहबंध पोलिस वसाहत आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या दगडीचाळीत अनेक मूलभूत प्रश्नांसाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे रहिवाशी पुरते हैराण झाले आहेत.

सोयी-सुविधा पुरविण्याची जबाबदारी सरकारी यंत्रणेकडूनच पार पाडली जात असली तरी या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वसाहतींना गैरसोईंचा वनवास भोगत असल्याचे पहावयास मिळते आहे.

शरणपूर रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाजवळ सिव्हिल हॉस्पिटलमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सरकारी वसाहत आहे. दगडीचाळ नावाने हा परिसर ओळखला जातो. तेथे १०० सदनिका असून, काहींमध्ये सिव्हिल हॉस्पिटलचे कर्मचारी तर काही सदनिकांमध्ये कोर्टाचे कर्मचारी कुटुंबियांसह राहतात. पोलिस मुख्यालयाच्या मैदानासमोरून या वसाहतीमध्ये जाण्यास अरुंद रस्ता आहे. मात्र, रस्त्याच्या प्रांरभीच येजा करणाऱ्यांचे अस्वच्छतेने स्वागत होते. रहिवाशांप्रमाणेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनाही अस्वच्छतेचा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतो. या मार्गावर कचरा कुंडीचा अभाव असल्याने उघड्यावरच शिळे अन्नपदार्थ आणि घरांमधील कचरा टाकला जातो. दोन दिवस हा कचरा उचलला जात नाही. घंटागाडीही दिवसाआड येत असल्याने असा कचरा साठून राहातो. त्याचा त्रास रहिवाशांबरोबरच अन्य नागरिकांनाही सहन करावा लागतो. याच परिसरात गटारी उघड्या असून, ढाप्यांची झाकणेही तुटलेल्या अवस्थेत आहेत. महिनोंमहिने येथे औषध फवारणी होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून येथे विजेचा एक खांब पडला आहे. विद्युत डीपींनाही झाकणे नसल्याने दुर्घटना घडण्याची भिती रहिवाशांकडून व्यक्त होते आहे. वसाहतीच्या मार्गावरील विद्युत दिवे बंद असून, अंधारातूनच रहिवाशांना ये-जा करावी लागते. या समस्यांबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढगाळ वातावरण; शहरात गारठा कमी

0
0

नाशिक : हवामान विभागाने मराठवाड्यात पुढील २४ तासांत गारपीटीची शक्यता वर्तविली असून लगतच्याच नाशिक जिल्ह्यातही दिवसभर ढगाळ वातावरणाचा अनुभव नागरिकांनी शुक्रवारी घेतला. दोन दिवसांपुर्वी असलेल्या थंडीचा कडाका काही अंशी कमी झाला आहे.

मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. शहरात ५ डिसेंबरपासून थंडीचा कडाका जाणवू लागला. शहरात ९ डिसेंबरपर्यंत ११ ते १४ अंश सेल्सियस तापमान होते. विशेष म्हणजे राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. मात्र, गुरूवारपासून तापमानात वाढ झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिलिंडर गोदामाविरुद्ध शिवसेना आक्रमक

0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

गंजमाळ परिसरातील पंचशीलनगरसारख्या मध्यवस्तीतील सिलिंडरचे गोदाम हटवावे, अशी मागणी शिवसेनेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
मुंबईत कांदिवली परिसरात नुकतेच सिलिंडर गोदामाला लागलेल्या भीषण आगीत दोघांचा मृत्यू झाला, तर मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली. नाशिक शहरातही पंचशीलनगर झोपडपट्टीमध्ये मयुर गॅस एजन्सीचे सिलिंडरचे गोदाम आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर सिलिंडरचा साठा केलेला असतो. गोदामालगत आठ ते नऊ हजार लोकांची वसाहत आहे. झोपडपट्टीच्या भिंतीला खेटून सार्वजनिक शौचालयाची सेफ्टी टँक आहे.

यापूर्वी या टाकीचा स्फोट होऊन जीवितहानी झालेली आहे. टाकीतील वायूमुळे किंवा अनावधानाने या गोदामात सिलिंडरचा स्फोट झाला तर मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरातील मयूर गॅस एजन्सीचे गोदाम हटवावे, यासाठी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्यांची दखल घेतली गेली नाही. वेळीच हे गोदाम शहराबाहेर हलवावे, अशी मागणी शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना देण्यात आले. मागणीची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उपविभागप्रमुख नाना काळे, संजय चिंचोरे, सचिन बांडे आदिंनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात सराफाच्या दुकानावर दरोडा

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सटाणा

सटाण्यातील शिवाजी रोडवर असलेल्या आहिरराव ज्वेलर्सवर आज पहाटे चार शस्त्रधारी दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी त्यांनी केलेल्या गोळीबारात किरण सोनावणे हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुकानातून ५० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचा अंदाज आहे.

शिवाजी रोडवरील सोनावणे कॉम्प्लेक्सजवळच्या कस्तुरी तुळस बिल्डींगमध्ये हे दुकान आहे. पहाटे पावणेतीनच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पोओ कारमधून आलेल्या चार इसमांनी या दुकानावर दरोडा टाकला. संशयास्पद काहीतरी घडत असल्याचे आजूबाजूच्या रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी दुकानाकडे धाव घेतली आणि दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. विभागातील सामाजिक कार्यकर्ते किरण सोनावणे यांनी दरोडेखोरांच्या गाडीची काच फोडून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिथरलेल्या दरोडेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात सोनावणे यांच्या पोटात गोळी लागून ते जखमी झाले. त्यांना मालेगाव येथील प्रयास रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी केली आहे. मागच्या बाजूची काच फुटलेली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी कुणाला अढळल्यास पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन सटाणा पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीचे राज्य येवो!

0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

बळी महाराज जी जय, इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो, अशा घोषणा देत बळी महाराजांच्या मूर्तीची हजारो भाविकांच्या उपस्थितीत सजविलेल्या रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिस शाखेने वाहतूक मार्गात बदल केले होते.

सकाळी नऊ वाजेपासून मूर्तीची पूजा करण्यात आली. बळी महाराज यांचा जयघोष करीत मूर्ती आकर्षक अशा सुंदर व भव्य रथात ठेवण्यात आली. मुख्य व प्राचीन मंदिरासपासून मिरवणुकीला सकाळी दहा वाजता प्रारंभ झाला. महामार्गावर भव्य आणि आकर्षक अशा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. विविध रंगाच्या फुलांची उधळण करण्यात आली. प्रारंभी फटाके उडविण्यात आले. नाशिकच्या प्रसिद्ध ढोलपथकाने मिरवणुकीची शोभा वाढवली. सुमारे साडेतीन तास मिरवणूक चालली. ढोल पथक, नृत्य करणारे घोडे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत परिसरातील हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. यानंतर होमहवनास प्रारंभ झाला. नव्याने बांधलेल्या बळी महाराज मंदिरासमोर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. अनेक भाविकांना सपत्नीक पूजेला बसण्याची व्यवस्था करण्यात आली. बळी महाराज मित्र मंडळ आणि पोलिस कर्मचारी व अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रवाशी व महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या सर्वांनी दर्शनाचा लाभ घेतला.
वाहनधारकांची पंचाईत

श्री बळी महाराज मंदिराचा जीर्णोध्दार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे मंदिर परिसरातील वाहनांच्या मार्गात बदल करण्यात आला होता. यामुळे एरवी वाहनांच्या गर्दीने गजबजणारा रस्‍ता सुनसान दिसत होता. वाहतूक मार्गात बदल केल्यामुळे काही वाहनधारकांची पंचाईत झाली. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला होता.

शहर वाहतूक शाखेने आणि आडगाव पोलिस ठाण्याच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी महामार्गावरिल वाहतुकीचे नियोजन केले होते. अमृतधाम-विडीकामगार चौफुली येथे नियोजनाप्रमाणे नाशिक आणि मुंबईकडून येणारी वाहने विडीकामगार वसाहतीकडून औरंगाबाद रोडकडे वळविण्यात आली. मालेगावकडून मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक हॉटेल जत्रापासून नांदूरनाकाकडून वळविण्यात आली. तसेच, रासबिहारी रोडने काही तर निलगिरी बागेकडून काही वाहतूक वळविण्यात आली होती. शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण कदम, आर. एम. पानसरे, के. एस. वानखडे आदींच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलिस कर्मचारी यांनी चोख कामगिरी केल्याने कोणातीही अडचण झाली नाही. वाहतूक कोंडीही झाली नाही. वाहतूक मार्गातील बदलाबाबत वाहतूक शाखेने दोन दिवसापूर्वीच माहिती दिली होती. यामुळे नेहमी ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची कोणतीही अडचण झाली नाही. मात्र, ज्यांना माहित नव्हते, त्यांची पंचाईत झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट कॅन्टोन्मेंटसाठी आरोग्य विभाग सरसावला

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

स्वच्छ देवळाली व सुंदर देवळाली हे ब्रीदवाक्य असलेल्या देवळाली कॅन्टोन्मेन्ट बोर्ड प्रशासनाने स्वच्छतेला प्राधान्य देत नाल्यांची सफाई मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम हाती घेऊन स्मार्ट कॅन्टोन्मेन्ट होण्याच्या दिशेने देवळाली कॅन्टोन्मेंट प्रशासनाने पहिले पाऊल टाकले आहे.

प्रशासनाने देवळालीतील जवळपास सर्वच वॉर्डातील नाल्यांच्या सफाईची मोहीम उघडली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांच्या आदेशान्वये कॅन्टोन्मेन्ट आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी, दोन कर्मचारी, दोन ट्रॅक्टर व एक जेसीबीच्या सहाय्याने देवळालीच्या विविध भागातील नाल्यांमध्ये असणारा कचरा उपसला जात आहे.

नाल्यांना स्वच्छ करण्यात येत असून, यामध्ये विनीपार्क ते जमाल सेनेटोरियम या नाल्याची चार दिवस, किर्लोस्कर बंगला ते गोडसे मळा येथील नाल्याची दोन दिवस, पोलिस स्टेशन आनंद रोड ते संसरी नाका ये‌थे दोन दिवस, संसरी नाका ते रेल्वेलाइन दोन दिवस अशी सफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. नालेसफाई होताच प्रशासनाच्या आठ कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने त्वरित या नाल्यांवर मलेरिया प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीसाठी स्वाक्षरी मोहीम

0
0

भाजपचा पुढाकार; उद्योग, व्यापारी, संघटनाही मैदानात, सत्ताधाऱ्यांवर वाढवला दबाव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील सत्ताधारी मनसेने स्मार्ट सिटीतल्या एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेईकल) वगळून ठराव प्रशासनाकडे पाठविल्याने नाशिककरांचे स्मार्ट सिटीचे स्वप्न भंगल्यात जमा आहे. यामुळे भाजपने आता स्मार्ट सिटीसाठी पुढाकार घेतला आहे. शनिवारी भाजपचे पदाधिकारी आक्रमक होत सत्ताधारी मनसेवर आसूड ओढत स्मार्ट सिटीच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरले. सोबतच शहरातील विविध संघटनांनाही त्यांनी रस्त्यावर उतरवत स्मार्ट सिटीसाठी सह्यांची मोहीम सुरू करीत सत्ताधाऱ्यांवर दबाव आणला आहे.

स्मार्ट सिटीतल्या एसपीव्ही विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विरोधाची भूमिका जाहीर केल्यानंतर महापौरांनी एसव्हीपी वगळून स्मार्ट सिटीचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला. एसपीव्हीचा समावेश नसल्याने आता हा प्रस्तावच फेटाळला जाणार आहे. भाजपला या योजनेचे क्रेडिट जाईल म्हणून याला विरोध झाल्याचे चित्र स्पष्ट होताच तीन आमदारांसह भाजपचे पदाधिकारी स्मार्ट सिटीसाठी आक्रमक झाले आहेत. मनसेच्या या विकासविरोधी भूमिकेमुळे भाजपने शनिवारी मोर्चा उघडला आहे. भाजपने पत्रकार परिषद घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महापौर अशोक मुर्तडक व उपमहापौर गुरूमीत बग्गा यांच्यावर हल्लाबोल केला. आमदार देवयानी फरांदे यांनी तिघांवर टीका करीत पालिकेचे कामकाज नियमबाह्य सुरू असल्याचे सांगत त्यांना लोकशाहीचे मारेकरीच ठरवले आहे.

आमदारांनी एकीकडे शासकीय पातळीवर दबाव वाढवणे सुरू करताच स्मार्ट सिटीच्या समर्थनासाठी थेट रस्त्यावर उतरले आहेत. स्मार्ट सिटीसाठी शहरातील विविध संस्था, निमा, आयमा, क्रेडाई या संस्थाना सोबत घेऊन भाजपने सर्थनासाठी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. क्रेडाईचे अध्यक्ष जयेश ठक्कर यांच्यासह शहरातील अनेक उद्योजकही या स्मार्ट सिटीच्या आंदोलनासाठी मैदानात उतरले. त्यामुळे आता सत्ताधारी मनसेवरील दबाव वाढला आहे. दरम्यान, भाजपने स्मार्ट सिटीच्या समर्थनासाठी आंदोलन सुरू केले असले तरी, भाजपच्या अनेक नगरसेवकांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते.

राज ठाकरेंवर हल्लाबोल

स्मार्ट सिटी योजनेला विरोध करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर भाजपने हल्ला चढवला असून, सत्तेच्या बाहेर राहून राज ठाकरे लोकशाहीचा खून करीत असल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे. राज ठाकरे बाहेरून थेट महापालिकेचे कामकाज चालवत असून, स्मार्ट सिटी व घंटागाडी ठेक्यासंदर्भात मनसेने वेळोवेळी भूमिका बदलून नाशिककरांची चेष्टा चालवली असल्याची टीका भाजपने केली आहे. भाजपला क्रेडिट जाईल म्हणून स्मार्ट सिटीला विरोध करणाऱ्या ठाकरेंना नाशिककर माफ करणार नाहीत, असा टोलाही भाजपने ठाकरेंना लगावला.

फोटो का काढलेत

भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी एसपीव्ही विरोध करणारे गेले सहा महिने काय करीत होते, असा सवाल केला आहे. महापौर, उपमहापौर हे तीन महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणी हजेरी लावून स्मार्ट सिटीच्या नावाखाली स्वतःचे फोटो काढून घेत होते. मग, आताच यांचा विरोध का असा टोला त्यांनी लगावला. नाशिककरांचे नुकसान करणे चुकीचे असल्याचा आरोप त्यांनी केला.

उठा नाशिककर जागे व्हा!

गाडगे महाराज पुतळा जवळ भाजप आमदार देवयानी फरांदे, नगरसेवक प्रा. कुणाल वाघ, दिनकर पाटील यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी स्मार्टसाठी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. उठा नाशिककर जागे व्हा, स्मार्ट सिटीचा धागा व्हा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जातपंचायतविरोधी कायद्यासाठी आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जातपंचायतीच्या विरोधातील तयार मसुद्याचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभरातून बहिष्कृत परिवारांचे आंदोलन हिवाळी अधिवेशनाच्यावेळी होणार असल्याची माहिती अंनिसचे संयोजक कृष्णा चांदगुडे यांनी दिली. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहनही अंनिसच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक येथून सुरू झालेल्या जातपंचायत मूठमाती अभियानामुळे जातपंचायतचे दाहक वास्तव समोर आले आहे. हिवाळी अधिवेशनात जातपंचायत विरोधी मसुद्याचे कायद्यात रूपांतर व्हावे, या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनाच्या वेळी दि. १५ डिसेंबर रोजी नागपूर येथे बहिष्कृत परिवारांचे आंदोलन होणार आहे, अशी माहिती अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व संयोजक कृष्णा चांदगुडे यांनी दिली. इच्छुकांनी आपली नोंदणी कृष्णा चांदगुडे यांच्याकडे (९८२२ ६३०३७८) करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कायदा अधिक सक्षम होण्यासाठी, महाराष्ट्र अंनिसने आपल्या अनुभवाच्या आधारे काही सूचना व हरकती नोंदविल्या आहेत. अंनिसने न्याय विभागाकडे हरकती सादर केल्या आहेत. संबंधित गुन्हा हा अजामीनपात्र ठरविण्याची मुख्य सूचना करण्यात आली आहे. शिक्षा सात वर्षांऐवजी दहा वर्षे व दंडाची रक्कम पाच लाख ऐवजी दहा लाख रुपये करण्याचे सुचविण्यात आले आहे.

गुन्ह्याची सुनावणी सत्र न्यायालयात व्हावी, अकरावे कलम रद्द व्हावे, कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावा व इतर सूचना करण्यात आल्या आहेत. काही शब्दांवर हरकत घेऊन नवीन शब्द सुचविण्यात आले आहेत. कायदा केवळ सामाजिक बहिष्कारापुरता राहू नये, यासाठी वेगळ्या २७ गुन्ह्यांची यादी अंनिसने परिशिष्टात जोडण्याची सूचना केली आहे. या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहिणी इन्व्हेस्टमेंटचा गुन्हा आर्थिक शाखेकडे

0
0

नाशिक : मागील वर्षी उघडकीस आलेल्या रोहिणी इन्व्हेस्टमेंट घोटाळ्याची व्याप्ती काही कोटीच्या घरात गेली असून, याचा अधिक तपास करण्यासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

काठे गल्लीतील अभिनव रिव्हर व्ह्यूमध्ये राहणाऱ्या संशयित ललित बुऱ्हाडे, रोहिणी बुऱ्हाडे, महेश बुऱ्हाडे, सुनील शहाणे, सुप्रिया शहाणे यांनी संगनमत करून २०१२ मध्ये रोहिणी इन्व्हेस्टमेंट नावाची कंपनी सुरू केली होती. ठेवीदारांनी पैसा गुंतवावा यासाठी गुंतविलेल्या रकमेवर सात टक्के व्याज देण्याचे आमिष दाखविण्यात आले. यानुसार म्हसरूळ - दिंडोरीरोडवरील मिलिंद महादू निकम (वय ३२) यांच्यासह इतर ठेवीदारांनी ४७ लाख ५० हजार रुपये गुंतविले. मात्र, संचालकांनी ठेवीदारांना व्याज किंवा गुंतवलेली रक्कम परत केली नाही. याप्रकरणी, मिलिंद निकम यांनी २०१४ च्या वर्षाअखेर भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी संशयितांना अटक केली. तपासात या घोटाळ्याची व्याप्ती वाढत गेली. गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कर्मचारी १७ पासून संपावर?

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य परिवहन महामंडळातील ५३ हजार कर्मचाऱ्यांनी २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यासाठी परिवहन मंत्री ते कामगार आयुक्तांपर्यंत सर्वांना निवेदने दिली आहेत. त्यावर सकारात्मक निर्णय न घेतल्यास १७ डिसेंबरपासून महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटना बेमुदत संप पुकारणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी येथे जाहीर केले.

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार सरकारी व इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांपेक्षा तुटपुंजे आहेत. वाढती महागाई, कौटुंबीक अडीअडचणी, गृहकर्ज, वैद्यकीय खर्च, मुलांचे विवाह, शिक्षण खर्च आदीमुळे कर्मचारी कर्जबाजारी झाले आहेत. यामुळे काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्याही घटना घडल्या आहेत. हजारो कोटींचा तोटा असलेल्या महावितरणनेही पगारवाढ दिली. तेलंगणा एसटी कर्मचाऱ्यांनाही ४४ टक्के पगारवाढ मिळाली आहे. मग राज्य परिवहन मंडळ पगार का वाढवत नाही, असा प्रश्न त्यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे उपस्थित केला आहे.

मान्यताप्राप्त कामगार संघटनेने सातवा वेतन आयोग मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याबाबत अद्याप काही हालचाली केल्या नाहीत. अद्याप कराराचा मसुदाही प्रशासनाला दिलेला नाही. ही संघटना एसटी प्रशासनाशी संगनमत करीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांनी पगारवाढ व इतर सेवा सवलतींसंदर्भात एसटी प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे व करार करण्याचे कायदेशीर अधिकार एसटी वर्कर्स काँग्रेसला (इंटक) दिले आहेत. त्यानुसार संघटनेने विविध मागण्या केल्या असून, त्यांची दखल न घेतल्यास १७ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्याच्या प्रयत्नात भरवस्तीत गोळीबार

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरातील पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टिळकरोडवरील कस्तुरी तुळस इमारतीमधील अहिरराव ज्वेलर्समध्ये दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना विरोध करणाऱ्या किरण तुळशिराम सोनवणे (वय ५०) यांना दरोडेखोरांनी गोळीबार करून गंभीर जखमी केले. नाशिक येथील खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. तर, दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने पसार झालेल्या दरोडेखोरांचा पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किरण सोनवणे यांच्या सर्तकतेमुळे कोणताही ऐवज चोरीस गेला नाही.

शनिवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास येथील अहिरराव ज्वेलर्सचे लोखंडी शटर तोडून अज्ञात दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. दरोडेखोरांचा आवाज येत असल्याने जागे झालेले किरण सोनवणे बाहेर आले. दरोडेखोरांनी आणलेल्या चारचाकी स्कॉर्पिओ वाहनास त्यांनी दोन वेळा वळसा घातला. सोनवणे यांनी आवाज करण्याचा प्रयत्न केला असता दुकानात असलेल्या दरोडेखोरांनी त्यांचा प्रतिकार केला. सोनवणे यांच्या हातात लाकडाचा मोठा दांडा असल्याने त्यांनी स्कार्पिओ वाहनावर जोरात आदळल्याने गाडीच्या काचा फुटल्या. त्याचवेळी शाल पांघरलेल्या दरोडेखोराने सोनवणे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. पैकी एक गोळी त्यांच्या पोटाच्या खालच्या बाजूला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्याचा फायदा घेत दरोडेखोरांनी स्कार्पिओ वाहनातून पसार होण्यास वेळ दवडली नाही. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत सोनवणे यांना नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉ. विठ्ठल येवलकर, डॉ. किरण अहिरे यांनी तातडीने त्यांच्यावर उपचार केले. मात्र ते गंभीर जखमी असल्याने त्यांना तातडीने मालेगाव व तेथून पुन्हा नाशिक येथे हलविण्यात आले.

दरम्यान, या घटनेचे वृत्त मध्यरात्री मालेगावचे पोलिस अधीक्षक डॉ. सुनील कडासने, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक नखाते यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच पोलिसांनी सर्तक होत नाकाबंदी केली. दरोडेखोर मालेगावकडून आले असून, मालेगावकडे रवाना झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून लक्षात आल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

व्यापाऱ्यांमध्ये भीती

दरोडेखोरांनी अहिरराव ज्वेलर्समध्ये टाकलेला दरोडा किरण सोनवणे यांच्या सर्तकतेमुळे फसला असला तरीही शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पोलिस चौकी परिसरात झालेल्या या घटनेने शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक पी. टी. पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात दोन ठिकाणी चेन स्नॅचिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

रस्त्याने पायी जात असलेल्या वृध्द महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेण्याच्या घटना शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडल्या. या प्रकरणी इंदिरानगर आणि सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

वडाळा पाथर्डी रोडवरील एलआयसी कॉलनी येथील शांती दर्शन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अंजली अनिलराव तांबोळी (वय ५६) या शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान कामानिमित्त घराबाहेर पडल्या. एलआयसी कॉलनी येथून जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील अंदाजे १५ ग्रॅम वजनाचे आणि ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून धूम ठोकली. याच दरम्यान, राका कॉलनीतील जैन मंदिरापासून पायी जाणाऱ्या दिव्याबेन चंदुलाल संघवी (वय ५६) या महिलेच्या गळ्यातील चेन काळ्या दुचाकीवरील चोरट्यांनी तोडून पलायन केले. घाटकोपर,

प​श्चिम मुंबई येथील रहिवाशी असलेल्या संघवी काही कामानिमित्त शहरात आल्या आहेत. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्या राका कॉलनीतून जात असताना स्नॅचर्सने डाव साधला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांकडे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, इंदिरानगर येथील घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या संशयित दुचाकीचा पाठलाग केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त अतुल झेंडे यांनी दिली. पाठलाग करताना दुचाकीचा क्रमांक पोलिसांना घेता आला. या नंबरचा तपास केला असता तो बनावट असल्याचे उघड झाले. एकाच वेळी दोन स्नॅचिंगच्या घटना घडल्याने एखादी टोळी यात सहभागी आहे काय, याचा तपास सुरू असल्याचे एसीपी झेंडे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३८९४ प्रकरणे लोकअदालतीत निकाली

0
0

म. टा. प्रतिनिधी, ना​शिक

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणामार्फत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ३ हजार ८९४ दाव्यांचा निपटारा करण्यात आला. यात कोर्टातील प्रलंबित ९ हजार ३२४ तर कोर्टात खटला सुरू होण्यापूर्वीच्या ३० हजार ५२४ प्रकरणांचा समावेश आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद कारंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळी लोकअदालतीच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. ​जिल्हा न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी लोकअदालतीचे उद्‌घाटन केले. लोकअदालतीमध्ये प्रलंबित खटल्यांपैकी ९ हजार ३२४ खटले ठेवण्यात आले. तसेच खटला सुरू होण्यापूर्वीचे म्हणजे दावा पूर्व दाखल ३० हजार ४२४ खटल्याचांही यात समावेश करण्यात आला. प्रलंबित खटल्यांपैकी तीन हजार ४४ तर दावा पूर्व प्रकरणातील ८५० प्रकरणांचा यावेळी निपटारा झाला. लोकअदालतीच्या माध्यमातून जवळपास २ कोटी ३९ लाख २६ हजार ९०३ रुपयांच्या थकीत रक्कमा बँका तसेच दूरध्वनी कंपन्यांना मिळाल्या. तसेच, मोटार अपघात प्रकरणामध्ये २ कोटी ७१ लाख ४० हजार ६४० एवढी रक्कम नुकसान भरपाई व दंडापोटी वसूल झाली. कामगार, सहकार आदी विभागातील दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांचे दावे सुध्दा निकाली निघाले.

यावेळी जिल्हा न्यायाधीश यू. एस. जोशी - फलके, वकील संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे, जिल्हा सरकारी वकील अॅड. आर. वाय. घुमरे, वरिष्ठ व्यवस्थापक अशोक दारके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी न्यायिक अधिकारी, सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी, विधीज्ञ, प्राचार्य, समाजसेवक, पक्षकार व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे स​चिव वि. र. अगरवाल यांनी अभार मानले.

लोकअदालतीतील खटले व कंसात निकाली खटले

फौजदारी - ३३४५ (११७७), धनादेश न वटणे - १६४३ (३३५), बॅक - ११९९७ (४८२), मोटार अपघात - १०००(४३८), कौटुंबीक वाद - ४०६ (५३), दावा दाखलपूर्व प्रकरणे - ३०,५२४ (८५०), औद्योगिक न्यायालय - १४ (५), कामगार न्यायालय - २२२ (८४), सहकार न्यायालय - ४० (१९), ग्राहक मंच - १२ (६), रेल्वे न्यायालय - १ (१), दिवाणी - १४१४ (१६३), धर्मादाय आयुक्त - ३४ (५), किरकोळ गुन्हे- ७६ (६६), वाहतूक गुन्हे - ३९३ (२९०), इतर गुन्हे - ४७६ (३९८).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालनाट्यातून दिले सामाजिक संदेश

0
0

बालनाट्य स्पर्धेचा समारोप म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बालनाट्य स्पर्धेच्या सहाव्या व शेवटच्या दिवशी चिमुरड्यांनी विविध बालनाट्यातून सामाजिक संदेश दिले. जळगाव व नाशिकची एकापेक्षा एक धमाल नाटके शनिवारी झाली. अहमदनगर हौशी नाट्यरंगतर्फे सादर झालेल्या 'भेट' या नाटकाने १३ व्या महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धेचा समारोप करण्यात आला.

'केल्याने होत आहे रे' या नाटकाने सहाव्या दिवसाची सुरुवात झाली. ज्योतीराम कदम लिखित हे नाटक धनलक्ष्मी बाल विद्यामंदिर व प्राथमिक शाळेतर्फे सादर करण्यात आले. या नाटकाचे दिग्दर्शन व प्रकाशयोजना रोहित पगारे यांनी केली. नेपथ्य भरत लिचुरे व प्रिया सातपुते, संगीत श्रीपाद भालेराव व मनीषा महाजन, गायक परिश जुमनाके व सुविधा होते, तर रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकात हिमांशू चव्हाण, आरती बोरडे, अभिषेक बोडके, प्रांजल कोल्हे, यश संधान, सुमित कदम, अजिंक्य ठाकरे यांनी भूमिका केल्या.

अकबराच्या प्रश्नांवर बिरबलाने दिलेली धम्माल उत्तरे म्हणजे 'एबी टू' नाटक. सन्मित्र नाट्यरंगतर्फे हे नाटक सादर करण्यात आले. लेखन अविनाश चिटणीस, दिग्दर्शन दिशा राव यांनी केले होते. प्रकाशयोजना ईश्वर जगताप, वेशभूषा अर्चना नाटकर, संगीत गौरव कुलकर्णी यांचे होते. नेपथ्य राहुल शिरवाडकर, रंगभूषा नारायण देशपांडे, रंगमंच विजय धुमाळ व मकरंद कुलकर्णी तर निर्मिती व्यवस्था सृष्टी वाघमारे यांची होती. यात अकबराची भूमिका मनस्व जोशी, बिरबल : ओंकार धटिंगण, वजीर : रूचिर शिरवाडकर, धनगर : निरंजन धुमाळ, बिरबलाची मुलगी : जिगिषा कुलकर्णी, सायली पाठक, हेताक्षी जोशी, सार्थक पांढारकर यांनी भूमिका केल्या.

त्र्यंबकेश्वरच्या अभिरंग बालकला संस्थेतर्फे 'एक होता वाघ' हे नाटक सादर करण्यात आले. दिग्दर्शन व लेखन सुजीत जोशी, नेपथ्य सागर रत्नपारखी, प्रकाशयोजना कृतार्थ कन्सारा, संगीत मिलिंद फडके, रंगभूषा सुखदा जोशी, वेशभूषा सुवर्णा पाटील यांची होती. नाटकात एकूण १६ पात्रे होती. सुशांत दळवी, तनया जाधव, तन्मय बुरकूल, ओमकार पंडित, गायत्री जोशी, मृदुला कुलकर्णी, कस्तुरी अग्निहोत्री यांनी भूमिका केल्या. जंगलातील वाघाभोवती हे नाट्य फिरते. वाघाची इतर प्राण्यांकडे पाहण्याची दृष्टी, जंगलातील नियमानुसार त्याचे इतरांकडे पाहणे त्यात माकड, हरिण यासारख्या साध्या प्राण्यांना तुच्छ लेखणे यातून वाघाची मानसिकता दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला होता.

जळगावच्या अनूभूती इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे 'मुलं ही देवाघरची फुलं' हे नाटक सादर करण्यात आले. दिग्दर्शन व संगीत राहुल निंबाळकर यांनी केले होते. लेखन व प्रकाशयोजना योगेश पाटील यांची होती. निर्मिती प्रमुख रश्मी लाहोटी होत्या. नाटकात विवेक अस्वार, गौरव सोनोने, निर्मल राजपूत, निकिता चव्हाण, तन्वी काटकर, शर्वरी वाडकर, दामिनी बारी, पूनम पाटील, कृष्णा चव्हाण यांनी भूमिका केल्या.

अहमदनगर जिल्हा हौशी नाट्यसंघ निर्मित 'भेट' हे नाटक स्पर्धेच्या समारोपात सादर झाले. लेखक असिफ अन्सारी, दिग्दर्शिका उर्मिला लोटके, प्रकाशयोजना शेखर वाघ, नेपथ्य नाना मोरे, शैलजा लोटके, वेश व रंगभूषा नीलिमा पवार, वैशाली कराळे यांची होती. रंगमंच व्यवस्था शिवाजी शिवचरण, दीपक शर्मा व हेमंत कराळे तर सूत्रधार सतीश लोटके होते. नाटकात मार्दव लोटके, पंकजा कराळे, साक्षी पवार व शर्वाय कराळे यांनी भूमिका केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गर्भाशय काढणे क्रिया शस्त्रक्रिया...

0
0

स्त्रियांमध्ये अनेक शस्त्रक्रिया होतात, जसे क्युरेटींग कुटुंबनियोजनाचे ऑपरेशन, सिझरियन डिलेव्हरी त्यापैकीच एक ऑपरेशन म्हणजे गर्भाशय काढण्याचे त्याला इंग्रजीमध्ये हिस्ट्रेक्टोमी असे म्हणतात. हे ऑपरेशन करण्यासाठी अनेक कारणे असतात. एक लाखामध्ये जवळजवळ ३०० स्त्रियांना गर्भाशय काढण्याचे ऑपरेशन करावे लागते व दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच आहे.

गर्भाशय काढण्याची महत्त्वाची कारणे अशी आहेत. गर्भाशयात फायब्राँईड्स असणे. म्हणजे गाठी असणे या बऱ्याच स्त्रियांमध्ये असतात पण ते वाढत नसतील तर ऑपरेशनची गरज नाही. फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे असते. पुढे-मागे गाठ वाढली तर गर्भाशय फाटू शकते. गर्भाशयाच्या आतल्या भागात फायब्राँईड्सची गाठ असेल तर ती दुर्बिणीद्वारे काढू शकतो, त्याला गर्भाशय काढण्याची गरज पडत नाही. या ऑपरेशनला हिस्ट्रोस्कोपीने गाठ काढणे असे म्हणतात. गर्भाशय खाली सरकणे, पाळीच्या दिवसात अति रक्तस्त्राव होणे, गर्भाशयात किंवा गर्भाशयाच्या सुरूवातीस प्राथमिक स्वरूपाचा कॅन्सर असणे, स्त्रीबीजाला कॅन्सरची लागण असणे, धोक्याच्या बाळंतपणामध्ये गर्भाशय फाटणे, प्रसुतीनंतर अतिरक्तस्त्राव होऊन आईचा जीव धोक्यात येणे, वरील कारणे दिसली तर लगेच गर्भाशय काढत नाही. स्त्रीचे वय, किती मुले आहेत, रक्ताच्या तपासण्या, जीवाला किती धोका आहे या सगळ्यांचा विचार करूनच निर्णय घेतला जातो. हल्ली कॅन्सर सोडून इतर कारणांसाठी बरेच उपचार उपलब्ध आहेत.

गर्भाशयांच्या आजारांवर सगळे उपचार केले असतांनाही उपयोग झाला नाही तर गर्भाशय काढण्याचा निर्णय घेतला जातो. गर्भाशय कसे काढावेत याच्याही पद्धती आहेत. गर्भाशय काढण्याच्या कारणाप्रमाणे ठरवलं जातं की, गर्भाशय योनी मार्गाद्वारे काढावे किंवा पोटावरून काढावे किंवा दुर्बिणीच्या सहाय्याने काढायचे.

गर्भाशय काढतांना ओव्हरीज (स्त्रीबीज) काढण्याबद्दल पेशंटशी चर्चा करूनच काढावे, कारण स्त्रीबीज ठेवले तर स्त्रियांना इस्ट्रोजन नावाचे हार्मोन मिळते, जे स्त्रीत्वास आवश्यक असते. जर रुग्ण कमी वयाची असेल तर स्त्रीबीज काढत नाहीत. स्त्रीचे वय ४५ पेक्षा जास्त असेल तर स्त्रीबीज काढली जातात. स्त्रीबीजामध्येही कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आते. म्हणून जर स्त्रीबीज काढले नाही तर नियमितपणे सोनोग्राफी करून स्त्रीबीजाची स्थिती कशी आहे हे पाहणे आवश्यक असते. गर्भाशयाचा भाग आतुन चिटकला असेल तर कधी कधी गर्भाशय पूर्णपणे काढता येत नाही, अशावेळी गर्भमुख तसेच ठेवुन गर्भाशय काढले जाते. याला सबटोटल हिस्ट्रोक्टमी म्हणतात. टोटल हिस्ट्रोक्टमीमध्ये पूर्ण गर्भाशय व गर्भाशयाचे मुख काढले जाते. रेडीकल हिस्ट्रोक्टमीमध्ये गर्भाशय, गर्भाशयाचे मुख, गर्भाशयाचे बाजूचे आवरण, योनी मार्गाचा वरचा भाग काढला जातो.

'ओपन सर्जरी' ५० टक्के ऑपरेशन हे पोटावरूनच केले जातात, यामध्ये ओटी पोटाच्या खालच्या भागावर छेद दिला जातो व त्यातून ऑपरेशन केले जाते. साधारणपणे ५ दिवस हॉस्पिटलला राहावे लागते. लॅप्रोस्कोपिक सर्जरी यामध्ये दुर्बिणीद्वारे गर्भाशय काढले जाते. सध्या याचं प्रमाण खूप जास्त वाढले आहे. यामध्ये पेशंट लवकर बरा होतो. १-२ दिवसातच घरी जाऊ शकतो व त्रासही खूप कमी होतो. 'व्हजायनल सर्जरी' योनीमार्गातून गर्भाशय काढणे, यामध्ये पोटावर टाके येत नाहीत ऑपरेशन त्रासही जास्त होत नाही. 'रोबोटिक सर्जरी' रोबोच्या सहाय्याने सर्जरी करता येते. यामध्ये सर्जन शरीराच्या बाहेरून अद्यावत मशीनद्वारे शस्त्रक्रिया करवून घेतो.

कधी कधी ऑपरेशननंतर गुंतागुंत (कॉम्प्लीकेशन्स) होऊ शकतात, जसे अति रक्तस्त्राव होणे, आजूबाजूच्या अवयवांना इजा होणे, वेळेत सर्व तपासणीनंतर तज्ज्ञांच्या सल्ल्याने ऑपरेशन झाले तर त्रास होत नाही. स्त्रीबीज काढले असतील तर रुग्णांना इस्ट्रोजन नावाचे हार्मोन देता येते. गर्भाशय काढण्याचे ऑपरेशन न करता ही उपचार करण्यासाठी मिरीना डिव्हाईस वापरा येतात. यामध्ये रक्तस्त्राव जास्त होत असेल तर तो कमी होतो. याला वेळ व खर्चही तसा कमी लागतो. बलुन थेरपी, एन्ड्रोमटेरीअल रीसेक्षण या तंत्रांनी पण रक्तस्त्राव जास्त होत असेल तर तो कमी होतो, एका दिवसात घरी जाता येते व गर्भाशय ऑपरेशन काढण्याच्या खर्चापेक्षा कमी खर्च येतो व गर्भाशयही वाचवता येते.

बरेच वेळा साधं पांढरं पाणी जात असेल तरी, स्त्रिया गर्भाशय काढण्याचा विचार करतात, तर कधी कधी खूप त्रास होत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, भीतीमुळे डॉक्टरकडे जात नाही, अशावेळी अतिरक्तस्त्रावामुळे प्रकृती बिघडते व शस्त्रक्रियाही अवघड होऊन जाते. कदाचित कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे

आपल्याला गर्भाशयाचा काय त्रास होतो आहे, डॉक्टरकडे जाऊन पॅप स्मीअर, सोनोग्राफी, क्युरेटिंग करुन ठरवावे की, ऑपरेशनची गरज आहे का? व त्याप्रमाणे उपाययोजना करावी.



- डॉ. निवेदिता पवार (लेखिका स्त्र‌ीरोगतज्ज्ञ आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोल-ताशाच्या गजरात स्पर्धा

0
0

१९ डिसेंबर ते ३ जानेवारी २०१६ या दरम्यान आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मी मुलुंडकर सांस्कृतिक कार्य प्रतिष्ठान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ढोल-ताशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ डिसेंबर ते ३ जानेवारी २०१६ या दरम्यान ही स्पर्धा होणार असून, ढोल-ताशा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

ही ढोल-ताशा स्पर्धा विभागीय (प्राथमिक) व राज्यस्तरीय (अंतिम) अशा दोन टप्प्यात होणार असून, नाशिक विभागाची फेरी २६ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. यात औरंगाबाद १९ डिसेंबर, पुणे २५ डिसेंबर, कोकण व पनवेल विभाग २७ डिसेंबर, नागपूर २ जानेवारी व अमरावती ३ जानेवारी असे नियोजन ठरविण्यात आलेले आहे. अंतिम फेरी १२ जानेवारी रोजी रायगड महोत्सवाच्या सांगता समारोहाच्यावेळी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी होणार आहे. यापूर्वी ज्या संघांनी या स्पर्धेसाठी आपली नावे नोंदवली आहेत तेदेखील या स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहे.

स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांसाठी काही नियम व अटी आहेत, त्या पुढीलप्रमाणे. प्रत्यक्ष वादनाची वेळ १५ मिनिटांची राहिल. वादक संख्या कमीत कमी २० आणि जास्तीत जास्त ५० असावी. यामध्ये कमीत कमी १५ ढोल वादक व ५ ताशेवादक असावेत. संघांना पारंपरिक वेशभुषेत वादन करावे लागेल. ध्वजधारी व इतर मदत करणारे यांची संख्या वादकांमध्ये धरली जाणार नाही. वादनासाठी ढोल ताशांबरोबरच झांजा, टाळ, हलगी, लेझिम, शंख, तुतारी या तालवाद्यांचा उपयोग करता येईल. वादनाच्या वेळेपूर्वी स्पर्धास्थानी एक तास अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे. वादकांना प्राथमिक फेरीला स्वखर्चाने उपस्थित रहावयाचे आहे तर अंतिम फेरीसाठी प्रत्येक संघाला १० हजार रूपये देण्यात येतील. वादनासाठी शहरी, गावाकडची पथके व नाशिक बाजा पध्दतीचे किंवा अन्य प्रकारचे वादन असे तीन विभाग असतील. वादनासाठीची गुणपध्दती स्पर्धेपूर्वी सांगण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. एक वादक एकाच संघासाठी वादन करू शकेल. संघाच्या वादनाचा क्रम लॉटस् टाकून निश्चित करण्यात येईल. प्राथमिक फेरीत प्रत्येक महसूली विभागातून दोन संघांची (प्रथम व द्वितीय) अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. अंतिम स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन विजेते संघ घोषित करण्यात येतील. या संघांना शासनाचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. प्राथमिक फेरीतील प्रथम, द्वितीय संघांना अनुक्रम २५ हजार, १५ हजार रोख रक्कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. अंतिम फेरीत‌ील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकांना दीड लाख, एक लाख व ७५ हजार रूपये मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.

ढोल-ताशा स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी राहुल बाणावली यांच्याशी ९००४७६५००० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लघु उद्योग भारतीच्या अध्यक्षपदी संजय महाजन

0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत लघु उद्योग भारतीच्या नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी अंबडच्या पूजा इंडस्ट्रीजचे संचालक संजय महाजन यांची निवड करण्यात आली. तर मुख्य सचिवपदी सातपूरच्या केम इक्वीपचे मिल‌िंद कुलकर्णी यांनी फेर नियुक्ती करण्यात आली.

शाखेच्या नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा गंगापूर रोडवरील हॉटेल करी लिव्हज येथे पार पडला. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर, लघु उद्योग भारतीचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष योगेश कनानी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष संजय महाजन आणि मावळते अध्यक्ष मारूती कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. कुलकर्णी यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. तर महाजन यांनी आगामी योजनांबाबतचा मनोदय व्यक्त केला. यावेळी प्रमुख पाहूणे डॉ. विनायक गोवलकर यांनी उपस्थितांशी संवाद साधत 'संघटना आणि संघटन कौशल्य' या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी निमाचे अध्यक्ष संजीव नारग, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, जनरल सेक्रेटरी राजीव आहिरे, भाजपा महाउद्योग आघाडी महाप्रदेश संघटक प्रदीप पेशकार, भाजपा नाशिक युवा मोर्चाचे अध्यक्ष व्हीनस वाणी, लघु उद्योग भारतीचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश कुलकर्णी, डी. जी. जोशी, नलिनी कुलकर्णी, एस. के. नायर, आशिष नहार, तुषार चव्हाण आदी उपस्थित होते. संस्थेचे नवनियुक्त सहसचिव मि‌लिंद देशपांडे यांनी आभार मानले.

लघु उद्योग भारतीच्या नाशिक शाखेची कार्यकारिणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष : संजय महाजन, उपाध्यक्ष : संजय कपाडीया, अंजली निमसे, शुभदा देसाई, मुख्य सचिव : मि‌लिंद कुलकर्णी, सहकार्यवाह : मिलींद देशपांडे, विनोद पाटील तर कार्यकारिणी सदस्य म्हणून योगेश बहाळकर, श्रेयस कुलकर्णी, प्रकाश भिडे, प्रदीप देशपांडे, राजेंद्र बोरसे, निखील पारीख, राजेंद्र कुलकर्णी, मेघराज पवार, सिध्दार्थ पाटील, संतोष खालाणे, अश्विनी पेशकार यांची नियुक्त करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट’ ठराव विखंडनाच्या तयारीत

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक स्मार्ट सिटी योजनेमुळे भाजपला विकासकामांचे श्रेय जाईल म्हणून एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेईकल)ला विरोध करून योजनाच हाणून पाडणाऱ्या मनसे विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. महासभेत एक नगरसेवक वगळता सर्वांचा स्मार्ट सिटीला पाठिंबा असतानाही, महापौरांनी चुकीच्या पद्धतीने निर्णय दिल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे. एसपीव्ही वगळून केलेला महापौरांचा ठरावाविरोधात भाजप आमदार सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, हा ठरावच विखंड‌ित करणार असल्याचा दावा फरांदे यांनी केला. सोबतच महापालिकेत घटनाबाह्य कामकाज केले जात असल्याचा आरोप करत, त्यांनी थेट राज ठाकरेंवरही निशाना साधला आहे. एसपीव्ही वगळून स्मार्ट सिटीचा प्रस्ताव महापौरांनी प्रशासनाला दिल्याने नाशिकच्या स्मार्ट सिटीत समावेशाच्या आशा मावळल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला सुरूंग लागल्याने भाजपने शनिवारी पत्रकार परिषद घेवून महापौर, उपमहापौरांसह, मनसे प्रमुखांवर हल्ला चढवला. महासभेत उपमहापौर गुरूमीत बग्गा वगळता कोणीच एसपीव्हीला विरोध केला नव्हता तर करवाढ टाळून ठरावाला पाठिंबा दिला होता. तरीही महापौरांनी बहुमत डावलून निर्णय दिला आहे. महासभा सार्वभौम आहे. मनसेकडून महापालिकेत घटनाबाह्य काम केले जात असल्याचा आरोप फरांदे यांनी केला. एसपीव्ही घटनाबाह्य नसून विरोधकांनी त्याचा अभ्यास करावा असा सल्ला देत, त्यांनी महासभेचे इतिवृत्त आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असून बेकायदेशीर ठराव विखंड‌ित करणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरेंवर भाजपचा हल्लाबोल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी योजनेला विरोध करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर भाजपने हल्ला चढवला असून, सत्तेच्या बाहेर राहून राज ठाकरे लोकशाहीचा खून करीत असल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे.

राज ठाकरे बाहेरून थेट महापालिकेचे कामकाज चालवत असून, स्मार्ट सिटी व घंटागाडी ठेक्यासंदर्भात मनसेने वेळोवेळी भूमिका बदलून नाशिककरांची चेष्टा चालवली असल्याची टीका भाजपने केली आहे. भाजपला क्रेडिट जाईल म्हणून स्मार्ट सिटीला विरोध करणाऱ्या ठाकरेंना नाशिककर माफ करणार नाहीत, असा टोलाही भाजपने ठाकरे यांना लगावला.

स्मार्ट सिटी योजनेमुळे भाजपला विकासकामांचे श्रेय जाईल म्हणून 'एसपीव्ही'ला (स्पेशल पर्पज व्हेइकल) विरोध करून योजनाच हाणून पाडणाऱ्या मनसेविरोधात भाजप आक्रमक झाला आहे. महासभेत एक नगरसेवक वगळता सर्वांचा स्मार्ट सिटीला पाठिंबा असतानाही, महापौरांनी चुकीच्या पद्धतीने निर्णय दिल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे.

'एसपीव्ही' वगळून केलेला महापौरांच्या ठरावाविरोधात भाजप आमदार सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, हा ठरावच विखंडित करणार असल्याचा दावा फरांदे यांनी केला. सोबतच महापालिकेत घटनाबाह्य कामकाज केले जात असल्याचा आरोप करत, त्यांनी थेट राज ठाकरेंवरही निशाना साधला आहे. एसपीव्ही वगळून स्मार्ट सिटीचा प्रस्ताव महापौरांनी प्रशासनाला दिल्याने नाशिकच्या स्मार्ट सिटीत समावेशाच्या आशा मावळल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला सुरूंग लागल्याने भाजपने शनिवारी पत्रकार परिषद घेवून महापौर, उपमहापौरांसह, मनसे प्रमुखांवर हल्ला चढवला. महासभेत उपमहापौर गुरूमीत बग्गा वगळता कोणीच एसपीव्हीला विरोध केला नव्हता तर करवाढ टाळून ठरावाला पाठिंबा दिला होता. तरीही महापौरांनी बहुमत डावलून निर्णय दिला आहे. महासभा सार्वभौम आहे. मनसेकडून महापालिकेत घटनाबाह्य काम केले जात असल्याचा आरोप फरांदे यांनी केला.

दरम्यान, या वादावर शेवटचा तोडगा काढण्यासाठी आयुक्तांकडून गटनेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images