Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अंध चालवणार रॅलीत कार!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक राऊंड टेबल १०७, लेडिज सर्कल, ब्लाईंड वेलफेअर्स असोसिएशन आणि वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स असोसिएशन यांच्यावतीने अंधांसाठी यंदाही विशेष कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २० डिसेंबर रोजी ही नाशिक सिटी सेंटर मॉल येथून या रॅलीला सुरुवात होणार आहे.

राऊंड टेबल इंडिया ही सामाजिक संघटना असून विविध सामाजिक कार्यात ती अग्रेसर आहे. याच संस्थेच्यावतीने येत्या २० डिसेंबरला अंधांसाठी विशेष कार रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अजिताभ अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. डोळस ड्रायव्हर आणि दृष्टिहीन नेवीगेटर अशा जोडीद्वारे ही स्पर्धा होणार आहे. या रॅलीतून मिळणारा सर्व निधी आशेवाडी येथील शाळेसाठी खर्च करण्यात येणार आहे. गेल्या चार वर्षापासून नाशिक राऊंड टेबलच्यावतीने या रॅलीचे आयोजन केले जात असून, याद्वारे अंध व्यक्तींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा आणि त्यांना आनंद देण्याचा हेतू असल्याचे संस्थेचे क्षितीज अग्रवाल आणि जिग्नेश गोदा यांनी सांगितले.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. त्यांना स्वतःची गाडी घेऊन यावे लागेल. सहचालक दृष्टिहीन असल्यामुळे रोड बुक हे ब्रेल लिपीमध्ये राहणार आहे. अंध व्यक्तीच्या मार्गदर्शनानुसार चालक वाहन चालवेल. साधारण ७० किलोमीटर एवढे स्पर्धेचे अंतर राहणार असून, ७५ अंध व्यक्ती त्यात सहभाग घेणार आहेत.



आशेवाडी शाळेला इमारत

संस्थेने रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आशेवाडी गावातील शाळेला नवी इमारत बांधून देण्याचे निश्चित केले आहे. याठिकाणी सध्या २५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, मोडकळीस आणि अपुऱ्या स्वरुपाच्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. याचीच दखल घेत संस्थेने ५० लाख रुपयांच्या निधीद्वारे अत्याधुनिक इमारत उभारण्याचे निश्चित केले आहे. विद्यार्थ्यांसाठी चार खोल्या, मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठीची खोली, स्वयंपाक घर आणि मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहाची निर्मिती यात केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पुन्हा विस्तार केला जाणार असल्याचे उपाध्यक्ष गौरव गुप्ता आणि सचिव पुनित सराफ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सूर्यमुखी हनुमान मंदिर संघ विजेता

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला शहरात रंगलेल्या सागर साताळकर टेनिस बॉल करंडक क्रिकेट स्पर्धेत शहरातील सूर्यमुखी हनुमान मंदिर संघाने रामभरोसे क्रिकेट क्लबवर अंतिम सामन्यात ५ धावांनी विजय मिळवित स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

येवला शहरातील विंचूर रस्त्यावरील गोशाळा मैदानावर रंगलेल्या या आमंत्रितांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत नगर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, आळेफाटा, संगमनेर, मालेगाव, श्रीरामपूर, सिन्नर, शिर्डी, दिंडोरी, चांदवड, चाळीसगाव येथील नामांकित क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता.

पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सूर्यमुखी हनुमान मंदिर संघ व रामभरोसे संघाने प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात रामभरोसे संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारत सूर्यमुखी हनुमान संघाला फलंदाजी दिली होती. ८ षटकांच्या या सामन्यात सूर्यमुखी हनुमान मंदिर संघाने ७ बाद ६१ धावा केल्या. परवेजने २२ धावा तर नासीरने ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात रामभरोसे संघाने ८ बाद ५६ धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर सहा धावांची आवश्यकता असताना रामभरोसेचे फलंदाज एकच धाव करू शकले. सूर्यमुखी हनुमान संघाकडून शाहीदने ३ बळी घेतले. चुरशीच्या या लढतीला शहर व परिसरातून मोठी गर्दी उसळली होती. अंतिम सामन्यात पंच म्हणून राजू पवार व प्रशांत गोराणे यांनी काम पाहिले. ३१ हजार रुपये व सागर साताळकर चषकाने विजेत्या सूर्यमुखी हनुमान संघाला मनमाड विभागाचे पोलिस उपअधिक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. उपविजेता रामभरोसे संघाला दिवंगत इंद्रजित पवार चषक व २१ हजार रुपये संभाजी पवार यांच्या हस्ते देण्यात आले. माणकचंद बाबुलाल जैन यांच्या स्मरणार्थ तिसरे बक्षीस ११ हजार रुपये व चषकाचा मान औरंगाबाद येथील स्पीड ११ संघाला तर शेतकरी ११ या बेलापूरच्या संघाला धोंडीराम वस्ताद तालीम संघाच्या वतीने ७ हजार रुपये व चषक प्रदान करण्यात आला. विजेत्या संघाची मिरवणूक ढोलताशाच्या गजरात शहरातून काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांगीतुंगी विकास आराखड्याला मान्यता

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सटाणा तालुक्यातील श्री सिध्दक्षेत्र मांगीतुंगी तिर्थक्षेत्र परिसराच्या विकासासाठी तयार केलेल्या आराखड्याला शिखर समितीने शुक्रवारी मान्यता दिली. सुमारे ४० पैकी २० कोटींच्या निधीची पर्यटन विभागाने, तर उर्वरित २० कोटींची ग्रामविकास खात्याने तरतूद करावी, असे निर्देश समितीने दिले. अशा कार्यक्रमांसाठी सात दिवसांच्या अल्प कालावधीची टेंडर प्रक्रिया राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला. विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावून हा सोहळा यशस्वी करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत.

श्री मांगी शिखराजवळ भगवान ऋषभदेवांची जगातील सर्वात उंच १०८ फूट उंचीची भव्य मूर्ती अखंड पाषाणात साकारण्यात येत आहे. शिखराच्या पायथ्यापासून १८०० फूट उंचीवर ही मूर्ती असणार आहे. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि महामस्तकाभिषेक सोहळा ११ ते १६ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत होणार आहे. त्यासाठी देश विदेशातून १५ ते २० लाख भाविक येणार असून, या सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी विकासकामांचा प्राधान्यक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे.

याबाबत शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत नागपुरात विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात शिखर समितीची बैठक झाली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि उच्चपदस्थ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

प्राधान्यक्रम आराखड्यास उच्चधिकार समितीने यापूर्वीच मान्यता दिली असून, तो मान्यतेसाठी शिखर समितीपुढे सादर करण्यात आला. शिखर समितीनेही त्यास मान्यता दिली. वनजमीन वळतीकरण प्रस्तावाला तातडीने मान्यता मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशा सूचना शिखर समितीने केल्या. प्राधान्यक्रम आराखड्यातील ४० कोटी सहा लाख रुपयांच्या अंदाजित रकमेच्या आराखड्यापैकी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश पर्यटन विभागाला देण्यात आले असून, निधी लवकरात लवकर उपलब्ध व्हावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, असे आदेश समितीने दिले आहेत. उर्वरित २० कोटींच्या निधीची तरतूद ग्रामविकास विभागाने करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत. अल्पकालावधीत कराव्या लागणाऱ्या अशा सोहळ्यांसाठी सात दिवसांची टेंडर प्रक्रिया राबविली जावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ही विकासकामे दर्जेदार असावीत तसेच लवकरात लवकर कामे पूर्ण करून हा सोहळा यशस्वी करावा, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँक्रीट रोड झाला गायब

0
0

सामाजिक कार्यकर्ते योगेश गांगुर्डे यांनी माहितीच्या अधिकारात संबंधित रस्त्याबाबत कामाची माहिती मागविली आहे. त्या माहितीच्या आधारे केवळ आहिल्याबाई होळकर पुतळ्यापर्यंतच काँक्रिटीकरण करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यात स्थानिक पातळीवर गैरव्यवहार झाल्याचा संशय गांगुर्डे यांनी व्यक्त केला आहे.

नवीन नाशिकमध्ये महापालिकेने दिव्या अॅडलॅब ते पवननगर मैदानापर्यंत मुख्य रस्ता काँक्रिटीकरणासाठी मंजूर केला होता. याचे काम एका खासगी ठेकेदाराला देण्यात आले होते. मंजूर असलेल्या दिव्या अॅडलॅब ते पवननगर मैदान असा पूर्ण लांबीचा रस्ता संबंधित ठेकेदाराने करणे अपेक्षित होते. मात्र, यामध्ये ठेकेदाराने केवळ दिव्या अॅडलॅब ते आहिल्याबाई होळकर पुतळ्यापर्यंतच रस्त्याचे काँक्रिटिकरण केले. उर्वरित रस्ता मात्र काँक्रिटीकरणातून वगळ्यात आल्याचे दिसून येत आहे. यामुळे मंजूर असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे पैसे कुणाच्या खिशात गेले असा सवाल सामाजिक कार्यकर्ते गांगुर्डे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत दिव्या अॅडलॅब ते पवननगर मैदानापर्यंत मंजूर काँक्रिटीकरणाचा रस्ता केवळ आहिल्याबाई होळकर पुतळ्यापर्यंतच का करण्यात आला? असा प्रश्न गांगुर्डे यांनी केला आहे.

महापालिकेने नवीन नाशिकमधील दिव्या अॅडलॅब ते पवननगर मैदानापर्यंत काँक्रिटीकरणाचे काम मंजूर केले होते. यात महापालिकेने काँक्रिटीकरणाचे कामच अर्धवट केले आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर गैरव्यवहार झाल्याचा संशय निर्माण होत आहे. त्यामुळेच काम अर्धवट राहिले आहे. - योगेश गांगुर्डे, याचिकाकर्ते, नवीन नाशिक

दिव्या अॅडलॅब ते पवननगर, उत्तमनगरच्या मैदानापर्यंत काँक्रिटीकरणाचे काम मंजूर झालेले आहे. मात्र, महापालिकेने पूर्ण झालेल्या रस्ता काँक्रिटीकरणाचे बिल संबंधित ठेकेदाराला अद्याप दिलेले नाही. त्यामुळे उर्वरित रस्त्याचे काम रखडलेले आहे. महापालिकेने बिल अदा केल्यानंतर पुढील काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होईल. - शोभा निकम, नगरसेविका, प्रभाग क्रमांक ४६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यजमान नाशिकची तिसऱ्या फेरीत धडक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेस्टर्न इडिया फुटबॉल असोसिएशन, मुंबई आणि फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट, नाशिक याच्या संयुक्त विद्यमाने पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या १४ वर्षांआतील मुलांसाठी राज्यस्तरीय सबज्युनियर फुटबॉल स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवशी यजमान नाशिकसह सातारा, हिंगोली या संघांनी आपापले सामने जिंकून स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत दिमाखात प्रवेश केला.

३२ वर्षांनंतर अधिकृत स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नाशिकच्या संघाने औरंगाबाद संघाचा ५ विरुद्ध शून्य गोलने पराभव केला. नाशिकच्या संघाने औरंगावाद संघाला सुरुवातीपासूनच दबावाखाली ठेवत सामन्याच्या पहिल्या सत्रातच तीन गोल करून निर्णायक आघाडी प्रस्थापित केली व दुसऱ्या सत्रात पुन्हा दोन गोल करून सामना ५ विरुद्ध ० गोल फरकाने जिंकला. नाशिकच्या संघाकडून खेळताना सेटर फॉरवर्ड संकेत फडताळे याने १२व्या व ३४ व्या मिनिटांना गोल करून महत्त्वपूर्ण योगदान दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारली चित्रकलेवर बालग्रंथालयातर्फे कार्यशाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठान बालग्रंथालय नाशिकरोड विभाग व ऋतुरंग परिवारातर्फे दि. २३ डिसेंबर रोजी बालवाचक व पालकांसाठी वारली चित्रकलेची मोफत कार्यशाळा आयोजित करत आली आहे.

वारली चित्रकला ओळख व प्रात्यक्षिक कार्यशाळा या शिर्षकाने दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत ही स्पर्धा होणार आहे. ऋतुरंग भवन, दत्त मंदिर, नाशिकरोड येथे ही स्पर्धा होणार आहे. माझं ग्रंथालय बालविभागातर्फे होणाऱ्या या कार्यशाळेत वारली चित्रकार संजय देवधर मार्गदर्शन करणार आहेत.

या अभिनव कार्यशाळेत व कुसुमाग्रज प्रतिष्ठान माझे ग्रंथालय बालविभाग या योजनेत अधिकाधिक बालगोपाळांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ऋतुरंग परिवाराचे राजा पत्की, विजय संकलेचा, बालग्रंथालय सभासद कौसर तांबोळी, प्रेमलता मिश्रा, बालग्रंथालय मुख्य समन्वयक स्वाती गोरवाडकर तसेच कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे यांनी केले आहे. स्पर्धेसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठान बालग्रंथालय व ऋतुरंग परिवार सभासदांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश मर्यादित असून, नाशिक रोड विभाग समन्वयक तन्वी अमित ७७६९८८२९९९ येथे संपर्क साधावा, असे आवाहनही संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमलेश तिवारींचा नाशकात निषेध

0
0

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत महम्मद (स.) यांच्याविषयी कथित आपत्तीजनक वक्तव्य करणाऱ्या हिंदू महासभेचा अध्यक्ष कमलेश तिवारी याला फाशी द्या अशी मागणी करीत शुक्रवारी मुस्लिम समाजबांधवांनी प्रमुख धर्मगुरूंच्या उपस्थितीत निषेध आंदोलन केले.

जुने नाशिक येथील चौकमंडई भागात नमाज पठणानंतर दुपारी अडीच वाजता माहिन या सामाजिक संस्थेतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. नाशिकचे खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन मियाँ खतीब अशरफी, मुफ्ती सय्यद रिझवान साहब, मौलाना झाहिद, शेख हनिफ बशीर, हाजी बालम पटेल आदींच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन झाले. 'कमलेश तिवारीला फाशी द्या', अशी मागणी करणारे फलक व काळे झेंडे हातात घेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुस्लिम धर्मगुरुंनी यावेळी सांगितले, की भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. देशात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. मात्र, काही जातीयवादी संघटनांना जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत.

पैगंबर यांच्याविषयी आपत्तीजनक वक्तव्य करून मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. पैगंबरांच्या शिकवणीनुसार शांततेच्या मार्गाने निषेध केले जात आहे. अशी बेताल व आपत्तीजनक विधाने करून समाजात फूट पाडणाऱ्यांना सरकारने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी निषेध सभेत करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सगळं काही फिल्मी!

0
0

अपर्णा क्षेमकल्याणी
शहरात एक पिंट्या आहे. फिल्मी पिंट्या. शहरात असा एखादा पिंट्या दरपिढी असतो किंबहुना शहराला तो लागतोच. शहरातील तरुण गजबजाटातील तो चर्चेचा हॉट केक असतो. पिंट्याचं चालणं, बोलणं, वागणं, ऐकणं, झोपणं, अभ्यास करणं, जेवणं अगदी xxx सगळं फिल्मी इस्टाइल. तर आज पिंट्याबद्दल अंहं!! पिंट्यासारख्यांच्या निमित्तानं बदललेल्या लाईफस्टाइलकडे थोडसं.

सध्या शहरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत एन्टरटेनमेंट माहोल आहे. शाळा कॉलेजातून गॅदरिंग, नाटकं, वक्तृत्व, वादविवाद, परिसंवाद होत आहेत अशाच एका महाविद्यालयीन कार्यक्रमाला शहरातला पिंट्या गेला. गेला म्हणजे काय? जिथे एन्टरटेनमेंट तिथे पिंट्या हजर! शहरातल्या तरूण जिवांना या सार्वजनिक पिंट्यांचे सार्वजनिक शौक माहित आहेत. म्हणून कॉलेजातील पोरांनीच या फिल्मी परिसंवादाला फिल्मी पिंट्याला ओढून नेलंय.

पिंट्याला परिसंवाद वैगरे थोर गोष्टी माहित नसल्या तरी त्याला तो आवडलाय. विषय आहेच आवडण्यासारखा "फिल्मी जग सामान्य माणसांच्या जवळ येत चाल्लंय का?" महाविद्यालयातला हा परिसंवाद अपेक्षेपेक्षा जास्त रंगला. मात्र पिंट्याच काय तिथे उपस्थित इतरही तरुण श्रोत्यांना समजतच नव्हतं की काही वर्षांपूर्वी फिल्मी सितारे सामान्य दुनियेपासून फटकून कसे राहायचे? परिसंवादात एका बुजुर्ग वक्त्याने काही काळ आधीच्या चित्रपट-मालिकांच्या प्रमोशन्सचे वर्णन केले ते ऐकून पिंट्या व इतरजण चाट पडले. १३-१३ भागांच्या मालिकांमध्ये काय दाखवत होते? असा मुलभूत प्रश्न तरुणाईला पडला सिनेमागृहात सिनेमा महिनोंमहिने वर्षानूवर्षे चालायचा आणि सिनेमा प्रदर्शित झाल्यावर, त्यातील गाणीबिणी फेमस व्हायची म्हणे. हे ऐकून तर पिंट्या आणि मंडळींना झिट्च आली.

येणारच की राव! आता सिनेमा प्रदर्शित व्हायच्या अगोदर सिनेमातली गाणी गाजतात आणि सिनेमा थिएटरला लागला की जूनी ही होतात. सिनेमा किती दिवस चालला यावर त्याच्या यशाची गणितं थोडीच अवलंबून आहेत! सिनेमाच्या यशाची गणितं कोटीच्या कोटी क्लब हाऊसपर्यंत उड्डाण करतायेत आता.

पिंट्या आणखीन एका वाक्यावर ठेचकाळला. पूर्वी म्हणे या तारक-तारका फारच जपून वक्तव्य करीत, आपल्या इमेजला जपण्याचा तो त्यांचा एक भाग होता. न बोलणं वा अत्यल्प बोलणं हा इमेजला जपण्याचा भाग असला असता, तर आताचे काही तारे तारका एके ४७ चालवल्यासारखे शब्द सोडतात ते का येडे म्हणून? चिवचिवाटावर हरएक ताऱ्याला काही न काही म्हणायचं असतं. हे काही पिंट्याला उमजेना. उलट वक्तव्य जितकं बेताल अन्‍ बेछूट तितका ताऱ्याला आणि सिनेमाच्या प्रसिद्धीला पुरक असतं हेच बाळकडू पिंट्याला मिळालंय. सिनेमाच्या सिरियल्सच्या प्रसिद्धीसाठी हे नभांगण गावागावात जाऊन लोकांना भेटतं. क्विझा काय, गेम काय, रिअॅलिटी शो काय कशाकशात घुसतं. आता त्याच पिंट्याला फिल्मी पिंट्या असूनही कौतूक नाही. पण आज पिंट्याला कौतूक वाटलं ते पूर्वी नभांगणाच्या न मिसळण्याबद्दलचं. या कौतुकाला जोडूनच पिंट्याच्या मनात प्रश्न आला मग पूर्वी कामाव्यतिरीक्त ही मंडळी काय करत असतील? आकाशातून नारळ टपकावं तसं वक्त्याकडून उत्तर टपकतंच होतं. पूर्वी म्हणे त्यांचे चाहते पत्र पाठवायचे या मंडळींना. ढिगानं पत्र यायची. पत्र मिळाल्याची पोचपावती म्हणून बरेच तारे-तारका स्वतःचा सही असलेला फोटो पाठवायचे म्हणे! आरा.. बाप! वेगळीच दुनिया होती की राव ती. पिंट्या मिळालेल्या ज्ञानामृतामुळे भारावून गेला होता.

लोकांमध्ये न मिसळणारं पॅरलल जग चांगल की आताचं लग्नापासून बारशापर्यंत हजेरी लावणार हे जग चांगलं. हे काही पिंट्याला ठरवता येईना. एकमेकांच्या सिनेमा सिरियल्समध्ये क्रॉस पब्लिसिटी करणारे नट मोठे की निर्माते हुशार! वीस वर्षांच्या प्रदीर्घ तपश्चर्येनंतर उमललेला 'पाकीजा' आणि वीस वर्षांच्या थॉट प्रोसेसमधून येऊ घातलेला 'बाजीराव मस्तानी' यांच्या कलात्मक मुल्यांची स्वतंत्र अगर एकत्र मोट बांधावी का या प्रश्नापाशी पिंट्याच्या विचारांना स्पीडब्रेकर लागला, तो टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटामुळे. संपला म्हणायचा परिसंवाद!

कॉलेजमध्ये आल्यासरशी पिंट्या लायब्ररीत शिरला अन् मोठाल्या ग्रंथांना मनातूनच साष्टांग नमस्कार घालून रोजच्या वर्तमानपत्रांकडे सरकला; तो तिसऱ्या पानावर बातमी होतीच, अमूकतमूक सिरियलमधील लग्नासाठी वोट करा आणि जिंका संधी सिरियलमधील लग्न अटेंड करायची. पिंट्याला परिसंवादाचे उत्तर मिळालं. पिंट्या एन्टरटेनमेंटला!

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विविध नाट्यरंगांनी गाजला दिवस

0
0

'बालनाट्य'चा आज समारोप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित असलेल्या १३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत शुक्रवारी जळगाव व नाशिकची नाटके सादर करण्यात आली. विविध नाट्यरंगांनी दिवस गाजवला. सोमवारपासून सुरू असलेल्या बालनाट्य स्पर्धेचा समारोप आज (१२ डिसेंबर) होणार आहे.

शुक्रवारी सादर झालेल्या नाटकात पहिल्या स्थानावर जनस्थान सेवा मंडळातर्फे 'आई' हे नाटक सादर करण्यात आले. लेखन विजय कुमावत यांचे तर दिग्दर्शन अबोली पंचाक्षरी यांचे होते. नेपथ्य समीर कुलकर्णी, संगीत हृषिकेश हतवळणे, प्रकाशयोजना हेमंत देशपांडे तर रंगभूषा माणिक कानडे व वेशभूषा केतकी कुलकर्णी यांची होती. रंगमंच सहाय्य कैवल्य जोशी यांचे होते. आई या नाटकात ममतेची विविध रूपे दाखविण्यात आली. घाव सोसल्य‌ाशिवाय आईपण मिळत नाही व कुणालाही ते सहज वाटू नये हे सांगणारे नाटक चिमुरड्यांनी सादर केले. नाटकात ईशान घोलप, तन्मयी वाघ, ओम पाटील, श्रृती बोरस्ते, गोमान्त पंचाक्षरी, वर्धन भानुवंसे, सोहम देशपांडे यांच्या भूमिका होत्या.

त्यानंतर दीपक मंडळाच्या सांस्कृतिक विभागातर्फे 'पुन्हा नको बाबा' हे नाटक सादर करण्यात आले. सलमान खानच्या काळवीट शिकार प्रकरणावर आधारित हे नाट्य होते. गुलशन नावाचा नट हरणाचे एक पाडस मारतो, त्यामुळे त्याच्यावर केस होते व त्याला जेलमध्ये ठेवतात. मात्र इकडे जंगलात हरणांकडून वनराजाकडे तक्रार जाते व त्याच्या सांगण्यावरून माकड गुलशनला जेलमधून पळवते. त्याला घनदाट जंगलात नेऊन ठेवण्यात येते. जोपर्यंत हरणाच्या एका पाडसाला जन्म देऊन ते मोठे होत नाही तोपर्यंत गुलशनने जंगलातच रहावे, अशी शिक्षा त्याला देण्यात येते. तो जंगलात राहतो, तेथील प्राण्यांशी संवाद करतो. त्यानंतर त्याची शिक्षा जेव्हा संपते तेव्हा जंगलातून बाहेर आल्यावर त्याला माणसाच्या जगात कुणीही ओळखत नाही. त्यामुळे गुलशन पुन्हा जंगलात जातो व जंगल राखणार, मटन खाणार नाही अशी शपथ घेतो. अशा आशयाचे हे नाटक होते. नाट्यनिर्मिती विजय शिंगणे यांची होती. लेखन गिरीश जुन्नरे, तर दिग्दर्शन किरण कुलकर्णी यांचे होते. संगीत जुईली सातभाई यांचे तर प्रकाशयोजना शौनक गायधनी, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा रश्मी बागूल व नेपथ्य हर्षदा वैशंपायन यांचे होते. नाटकात वैष्णवी शिंगणे, सृष्टी पाठक, सोहम दीक्षित, युतिका शिंगणे, सई गडकरी, रमणी जोशी, भुवनेश काळे यांच्या भूमिका होत्या.

जळगावच्या यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयातर्फे मु.पो. कळमसरा हे नाटक सादर करण्यात आले. लेखन नितीन वाघ, दिग्दर्शन पवन इंद्रेकर यांचे होते. प्रकाशयोजना संजय पगार, संगीत नयन सप्रे, नेपथ्य भावेश नेरकर, रंग व वेशभूषा शुभम बेलसरे यांची होती. नाटकात अनिकेत सूर्यवंशी, अजय सोनार, मुशरफ खाटीक, जयेश सोनवणे, कुंदन लोहार यांनी भूमिका केल्या.

रावसाहेब रूपचंद माध्यमिक य उच्च माध्यमिक विद्यालय जळगावतर्फे 'इस्कोट' हे नाटक सादर करण्यात आले. लेखन अमोल जाधव, दिग्दर्शन प्रांजली रस्से, नेपथ्य कीर्तीकुमार शेलकर, रंगभूषा प्रभावती बावस्कर, वेशभूषा सुधीर महाजन, संगीत संजय क्षीरसागर, प्रकाशयोजना पीयूष रावळ यांची होती. हरिओम त्रिपाठी, धनश्री बारी, ऋतुजा सुलक्षणे, खुशी अहिरे, भावेश चौधरी, सिध्दार्थ जगताप यंनी भूमिका केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगोत्सव स्पर्धा रविवारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्येष्ठ निसर्गचित्रकार स्व. शिवाजीराव तुपे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आदर व्यक्त करण्यासाठी कला विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष निसर्गचित्रणाची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा रविवारी (१३ डिसेंबर) घेण्यात येणार आहे.

ही स्पर्धा महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयाचे ओळखपत्र बरोबर आणावे, चित्रणासाठी आवश्यक ते साहित्य सोबत आणावे, यामध्ये माध्यमाचे बंधन नाही, चित्र कमीत कमी ११ बाय १५ व जास्तीत जास्त २२ बाय तीस आकाराचे असावे, चित्र माऊंट करून स्पर्धेच्या परीक्षणासाठी द्यावे, प्रत्येक स्पर्धक एकच चित्र सादर करू शकेल, चित्राच्या मागील बाजूला चित्रकाराचे नाव, महाविद्यालयाचे नाव, पत्ता व फोन नंबर लिहिणे आवश्यक आहे. सहभागी होण्यासाठी या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे.

प्रत्यक्ष निसर्ग चित्रण स्पर्धा सकाळी सात ते नऊ यावेळेत होणार आहे. यासाठी अहिर सुवर्णकार समाजाचा सोनार वाडा, सोमवार पेठ, नेहरू चौकाजवळ याठिकाणी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी फी १०० रूपये असून स्पर्धकाने गोदाघाट, पंचवटी व नाशिक परिसर निवडून प्रत्यक्ष निसर्गचित्रण सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. माऊंट केलेले चित्र रविवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत आयोजकांकडे जमा करावे, स्पर्धेचे परीक्षण अनुभवी व तज्ज्ञ कलावंतांकडून त्याच दिवशी करण्यात येऊन दुपारी तीन वाजता सोनारवाडा येथे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात येणार आहे. परगावच्या विद्यार्थ्यांसाठी शनिवारी (१२ डिसेंबर) रात्रीच्या निवासाची सोय सोनारवाडा येथे करण्यात आली आहे. ही सोय विनामूल्य आहे. स्पर्धेची आगाऊ नोंदणी करणे आवश्यक नाही.

या स्पर्धेत प्रथम येणाऱ्यांसाठी प्रथम ७ हजार रूपये व प्रमाणपत्र, द्वितीय पुरस्कार ५ हजार व प्रमाणपत्र, तृतीय पुरस्कार ३ हजार व प्रमाणपत्र तर प्रत्येकी १ हजार रूपयांचे दोन उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार आहेत. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक प्रसिद्ध चित्रकार मुक्ता बालिगा व अनिल तुपे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडीचा ठेका पाच वर्षासाठीच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विवादास्पद घंटागाडी ठेका पुढील पाच वर्षासाठीच देण्याचा अंतिम ठराव महापौर अशोक मुर्तडक यांनी संमत केला. या ठेक्यासाठी दहा वर्षाचा कालावधी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेसमोर ठेवला होता. महापौरांनी त्यास मंजुरी देखील दिली. मात्र, अंतिम ठराव तयार करताना यात बदल करण्यात आला असून यामुळे प्रशासन व सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

कचरा संकलनासाठी देण्यात येणाऱ्या ठेक्याची मुदत संपून अनेक महिने उलटले आहेत. घंटागाडी ठेक्यावरून सातत्याने संशयाचे धुके निर्माण होत असल्याने नवीन ठेका देण्यापूर्वी काही महापालिकांचा सर्व्हे करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्यात. या माहितीच्या आधारे घंटागाडीचा ठेका १० वर्षांसाठी देण्यात यावा, असा प्रस्ताव प्रशासनाने तयार करून महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवला. गत सोमवारी यावर दीर्घकाळ चर्चा झाली. मात्र, एवढ्या काळासाठी ठेका देण्यास लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला. तर, दीर्घकालीन ठेका दिला गेल्यास ठेकेदारावर जबाबदारी टाकणे शक्य होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला. या प्रस्तावाचा अंतिम ठराव करताना सत्ताधाऱ्यांनी सदर ठेका पाच वर्षासाठी देण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. संबंधित ठेकेदाराने चांगले काम केले तर पाच वर्षानंतर त्याला सत्ताधारी दोन वर्षे मुदतवाढ देऊ शकतील, असेही या ठरावात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा वेळेमध्ये बदल

0
0

पंचवटी : पंचवटी परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या धात्रक फाटा येथील दोन जलकुंभामधून होणारी पाणीगळती रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने काम सुरू केले आहे. त्यामुळे पंचवटी परिसरात पाणीपुरवठा वेळेत सोमवार, १४ डिसेंबरपासून बदल करण्यात आला आहे. येत्या रविवारपर्यंत (दि. २०) हा बदल कायम असणार आहे.

आडगांव जलकुंभावरून पहाटे ४ ते ६ कोणार्क नगर, श्रीराम नगर, स्वामी समर्थ नगर, वृंदावन नगर, सकाळी ७ ते ९ दरम्यान आडगांव गावठाण आणि मळे परिसर तर सकाळी ९ ते दुपारी १२ दरम्यान आडगांवपर्यंत होईल. दुपारी २.३० ते ४.३० हनुमान नगर, विडीकामगार वसाहत, अमृतधाममागील डावा तट कालव्यापर्यंत व सायंकाळी ५ ते ७ आशापुरा, सुशीलनगरी, सागर व्हिलेज, निशांत गार्डन, आडगांव जलकुंभ परिसरात तर सायंकाळी ७.३० ते ९.३० दरम्यान औदुंबर नगर, साईनगर, गोपाल नगर, इंजिनीअरिंग सोसायटी भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्याने रोखली बांधकामांची वाट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पाथर्डी शिवारातील कचरा डेपातील कचऱ्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावली जात नाही, तोपर्यंत कोणत्याही बांधकामांना मंजुरी देऊ नका, असा आदेश पुण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. यामुळे महापालिकेचे धाबे दणाणले असून, या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी प्रशासनाला दिले आहेत.

पाथर्डी फाटा येथील कचरा डेपोमुळे प्रदूषण होते. त्याचा मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याची तक्रार करीत बाकेराव डेमसे या शेतकऱ्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकेच्या सुनावणीदरम्यान सुप्रीटेडंन्ट इंजिनीअर आर. के. पवार यांनी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. कचरा डेपो व खत प्रकल्प सुरळीत ठेवण्यात अडचणी आल्याचे प्रशासनाच्यावतीने कोर्टासमोर स्पष्ट करण्यात आले. संबंधित खतप्रकल्प सुरळीत ठेवण्यासाठी हायकोर्टाने काही सूचना केल्या. या सूचनांचे पालन महापालिकेने करणे अपेक्षित होते. मात्र, हायकोर्टाच्या सूचनांनुसार महापालिकेने उपाययोजना राबवल्या नाहीत. परिणामी डेमसे यांनी यासंदर्भात हरित लवादाकडे धाव घेतली. यावर सुनावणी घेताना लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मत विचारात घेतले. संबंधित खत प्रकल्पाचे नियोजन योग्य नसल्याने कचऱ्याची समस्या कायम असल्याचे मत मंडळाच्यावतीने लवादासमोर मांडण्यात आले. महापालिकेच्या दुर्लक्षामुळेच प्रदुषणात भर पडत असून, सर्वसामान्यांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. यामुळे कचरा प्रकल्पातील दोन-तृतांश कचऱ्यांची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावावी आणि सहा महिने खत प्रकल्प सुरळीत चालू ठेवावा, असे आदेश न्यायमूर्ती व्ही. आर. किनगावकर व तज्ज्ञ सदस्य डॉ. अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने दिलेत. लवादाच्या आदेशाचे पालन होईपर्यंत महापालिकेने कोणत्याही बांधकामास मंजुरी देऊ नये, असे महापालिकेला बजावण्यात आले आहे. खत प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी महापालिकेने तात्पुरते कर्मचारी घ्यावेत किंवा ठेकेदाराची नियुक्ती करावी अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. लवादाच्या आदेशाची प्रत महापालिकेला मिळताच खळबळ उडाली आहे. बांधकाम व्यावसायिक सुध्दा चिंतेत असून महापालिकेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवादाच्या निर्णया विरोधात सुप्रीम कोर्टात अपील करण्याची तयारी महापालिकेने चालवली आहे.

खत प्रकल्पाच्या कार्यक्षमतेकडे महापालिकेने कधीच लक्ष दिले नाही. याचा फटका आता शेकडो बांधकाम व्यवसायिकांना व नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. बांधकाम मंजुरीची कामे रखडली तर बांधकाम क्षेत्रातील आर्थिक घडी विस्कटेल. खत प्रकल्पाचा महापालिकेने सोक्षमोक्ष लावला पाहिजे.

उन्मेश गायधनी, आर्किटेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीसाठी सोशल लढा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचा समावेश स्मार्ट सिटीच्या योजनेत व्हावा यासाठी आता नाशिककरांनीच सोशल मीडियावर लढा उभा केला आहे. याद्वारे महापौर आणि उपमहापौर यांना व्हॉटसअॅपवर मेसेज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजना राबविण्याचे निश्चित केले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठीचे प्रस्ताव महापालिकांकडून मागविण्यात आले आहेत. मात्र, नाशिक महापालिकेने दोन अटी घालत प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे नाशिकचा या योजनेत सहभाग होण्याची शक्यता धूसर आहे. ही बाब लक्षात घेऊन नाशिककरांनी आता सोशल मीडियावर चळवळ सुरू केली आहे. नाशिक पुन्हा एकदा सुवर्णसंधीला मुकणार असल्याने नाशिककरांनो जागे व्हा, असे आवाहन करणारे मेसेज सध्या व्हॉटसअॅपवर फिरत आहेत. तसेच, महापौर अशोक मुर्तडक आणि उपमहापौर गुरुमित बग्गा यांना व्हॉटसअॅपवर मेसेज पाठविण्याचेही आवाहन करण्यात येत आहे. या मेसेजची दखल घेत नाशिकला स्मार्ट सिटीच्या योजनेत सहभागी होता येईल, असा विश्वास नाशिककर व्यक्त करीत आहेत. विविध ग्रुपमध्ये हा मेसेज पाठविला जात असून नाशिककरांच्या मनात काय आहे, याची जाणिव लोकप्रतिनिधींना करुन देण्याचा चंग सोशल मीडियावर बांधण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासन म्हणतय, शेतकरी आत्महत्यांचे प्रस्ताव फसवे!

0
0

pravin.bidve@

timesgroup.com

नाशिक : राज्यात रोजच कुठल्या ना कुठल्या भागातून शेतकऱ्यांच्या अंत्ययात्रा उठत असताना सरकारी यंत्रणांनी मात्र अजब शोध लावला आहे. शेतकरी आत्महत्यांचे बहुतांशी प्रस्ताव फसवे असल्याचा दावा प्रशासकीय यंत्रणेने केला आहे. नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि कर्जवसुलीसाठी तगादा हे सरकारी मदतीसाठी महत्त्वाचे निकष असले तरी या व्यतिरिक्त अन्य कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. निकषांच्या पातळीवर उत्तर महाराष्ट्रात मागील तीन वर्षांत शेतकरी आत्महत्येची ३९७ प्रकरणे पात्र, तर तब्बल ४२६ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत.

दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस आणि नापिकीसारख्या अस्मानी संकटांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सावकार, शेतकी सोसायट्या, पतसंस्था आणि बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली शेतकऱ्यांचा जीव गुदमरतो आहे. त्यामुळेच दररोज कोठे ना कोठे शेतकरी गळ्याला फास लावून जीवनयात्रा संपवत आहेत. गेली तीन वर्षे अवकाळी पावसाचा धुडगुस सुरू असून, डोळ्यांदेखत पिके नष्ट होताना पाहून शेतकऱ्यांचा जीव तुटतो आहे. अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून एक लाखाची मदत दिली जाते. अशी प्रकरणे संबंधित तहसीलदारांमार्फत जिल्हा प्रशासनाकडे दाखल केली जातात. शेतकरी आत्महत्येसंबंधी पोलिसांचा अभिप्राय आणि शवविच्छेदनाचा अहवाल आवश्यक असतो. याखेरीज नापिकीची समस्या होती की नाही याबाबतचा कृषी विभागाचा अहवाल, कर्जासंबंधीची माहिती आणि कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचे पुरावे सरकारी लाभ मिळवून देण्यासाठी ग्राह्य धरले जातात. मात्र जिल्हा प्रशासनाकडे दाखल झालेल्या प्रस्तावांमध्ये त्रुटी असतील तर ती प्रकरणे एकतर अपात्र ठरविली जातात किंवा फेरपडताळणीमध्ये बराचसा वेळ खर्ची पडतो. म्हणूनच जिल्हा प्रशासनांकडे दाखल होणाऱ्या प्रस्तावांपैकी अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव अपात्र ठरत आहेत. काहीवेळा शेतकऱ्याच्या आत्महत्येमागे अन्य कारणे असतात. तरीही परिस्थितीनुरूप तेथील अधिकाऱ्यांकडून शेतकरी आत्महत्येचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाला सादर केला जातो. मात्र, सरकारी मदतीसाठीच्या क्लिष्ट निकषांच्या पातळीवर असे प्रस्ताव टिकत नाहीत. त्यामुळे अशी प्रकरणे अपात्र ठरविली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पॉलीहाऊसचे अतिक्रमण हटविले

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

जेलरोड येथील पॉलीहाऊसचे अतिक्रमण शुक्रवारी हटविण्यात आले. सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेने अतिक्रमणविरोधात कारवाई केली.

पंचक शिवारातील सर्वे क्रमांक ४७/५ मधील महापालिकेच्या मिळकतीत उद्यानासाठी आरक्षण आहे. या ६६९२ चौरस मीटरवरील जागेत पॉलीहाऊसचे अतिक्रमण होते. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आर. एम. बहिरम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड विभागाचे एस. एन. वसावे, कुसुम ठाकरे, अधीक्षक एस. यू. पगार, नगररचना विभागाचे सहाय्यक अभियंता शेख, महापालिका कर्मचारी, पोलिस यांच्या पथकाने हे अतिक्रमण जमिनदोस्त केले. पंचक येथील सर्वे क्रमांक ५० मधील शिवाजी इंगळे, ज्ञानेश्वर कातारे, कौशल्या लिंगायत, नाना गायकवाड, हिरामण राव यांची तसेच देवळाली शिवारातील सर्वे नंबर २८/१/७, प्लाट नंबर चार, संत गजानन हौसिंग सोसायटी, जगताप मळा येथील चंद्रभान पुंड व रवि कोल्हटकर यांची अनाधिकृत बांधकामे महापालिकेने गुरुवारी हटविली होती. बेकायदा बांधकामे तसेच पार्किंगच्या व सार्वजनिक जागांवर अतिक्रमणे हटविण्याची सूचना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी’च्या प्रस्तावाचे सादरीकरण

0
0

नाशिक : महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी शुक्रवारी राज्याचे मुख्य स​चिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासमोर स्मार्ट सिटी योजनेच्या आराखड्याचे सादरीकरण केले. मात्र, महासभेचा ठराव नसल्याने महापालिकेचा हा प्रस्ताव राज्य सरकारला सादर होऊ शकला नाही.

स्मार्ट सिटी योजनेतील स्पेशल परपझ व्हेईकल आणि करवाढीच्या मुद्यावरून महासभेने सदर योजनेला विरोध केला. या दोन घटकांना दूर सारत स्मार्ट सिटी योजनेला मंजुरी देत असल्याचे महापौर अशोक मुर्तडक यांनी स्पष्ट केले. महापौरांच्या या आदेशाचा अंतिम ठरावात रुपांतर करण्याचे काम मात्र आजपर्यंत सुरू होते. महापौर कार्यालयाने सायंकाळी सहा वाजता हा ठराव प्रशासनाला सादर केला. दरम्यान, महासभेचा ठराव नसताना आयुक्त डॉ. गेडाम यांनी नागपूर येथे या प्रस्तावाचे सादरीकरण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंतिम सूचनापत्र देवूनही मालमत्ताकराचा भरणा करण्यात टाळटाळ करणाऱ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकीदार असलेल्या मिळकतधारकांवर १५ डिसेंबरपासून कारवाई होणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेचा महत्त्वपूर्ण आर्थिक स्त्रोत असलेल्या मिळकतकराची जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी तयारी अधिकाऱ्यांनी केली आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची देयकांचे जून महिन्यातच वाटप करण्यात आले असून आता १०० टक्के वसूलीसाठी प्रयत्न सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ११ डिसेंबर २०१५ पर्यंत महापालिकेकडे मालमत्ताकराचे ५६ कोटी ८८ लाख १५ हजार रुपये जमा झाले आहेत. यात नाशिक पश्चिम विभागाचे १० कोटी ८० लाख, नवीन नाशिक विभागातील १० कोटी ९० लाख, पूर्व विभागाचे १० कोटी ५२ लाख, नाशिकरोड विभागातील ९ कोटी ५५ लाख रुपये वसूल झाले आहेत. पंचवटीतून ८ कोटी ४५ लाख रुपये तर सर्वात कमी सातपूर विभागातून ६ कोटी ६३ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मिळकतकराचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी प्रशासनाकडे साडेतीन महिन्याचा कालावधी असून ५ हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ५० हजार ४७३ मिळकतधारकांना अंतिम सूचनापत्र पाठवण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिग्नल बनले शोभेचे बाहुले!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळा आणि चाकरमान्यांची कामासाठी होणारी धावपळ यामुळे शहरातील बहुतांशी भागात वाहनांची मोठी वर्दळ असते. या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सकाळी सात वाजेपासून सिग्नल सुरू करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी पोलिसांनी घेतला. मात्र, या वेळेत वाहतूक पोलिस सिग्नलवर हजर नसल्याने सर्वच सिग्नल शोभेच्या वस्तु बनल्या आहेत. असंख्य वाहन चालकांच्या दिवसाची सुरूवात नियमांची पायमल्ली करून होते. यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
शहराचा वाढता विस्तार आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर सकाळी सहा वाजेपासूनच वाहनांची गर्दी होते. सकाळी शाळा भरतात. विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या रिक्षा, बसेस तसेच पालकांची वाहने असतात. कामाचे ठिकाण गाठणाऱ्या चाकरमान्यांना सुध्दा घाई असते. सकाळच्या सुमारास वाहतुकीचे योग्य नियमन व्हावे, यासाठी शहर पोलिसांनी वाहतूक सिग्नल सकाळी सात वाजेपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी, हेच सिग्नल सकाळी साडेआठ ते नऊ वाजे दरम्यान सुरू व्हायचे. सध्या, शहरातील सर्वच सिग्नल सकाळी सात वाजता सुरू होतात. मात्र, याठिकाणी वाहतूक पोलिस नसल्याने वाहनचालक नियमांची पायमल्ली करीत सिग्नल तोडतात. सकाळच्या सुमारास सर्वच सिग्नलवर हे चित्र पाहण्यास मिळते. तारवालानगर चौफुली येथे गुरूवारी सकाळी अशाच प्रकारे सिग्नल मोडून जाणाऱ्या बसचालकाने एका आयशर ट्रकला जोराची धडक दिली. सिग्नलवर सर्रासपणे होणाऱ्या नियमांच्या पायमल्लीबाबत बोलताना वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक एम. एम. बागवान यांनी सांगितले की, वाहतूक नियम समजणाऱ्या सुज्ञ व्यक्तीच नियम तोडणार असेल तर काय करावे? सकाळच्या वेळी शाळा भरतात. शेकडो विद्यार्थी रस्त्यावर प्रवास करीत असतात. कामगार वर्गही असतो. अशावेळी वाहतुकीचे नियमन होणे आवश्यक आहे. सिग्नल तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास वाहनाला अपघात होण्याचा धोका असतो. वाहतूक पोलिस असेल तरच नियमाचे पालन करायचे, असा विचार योग्य नाही. सुज्ञ नागरिकांनी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत बागवान यांनी व्यक्त केले.
वाहतूक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी वाहनचालकांची असते. प्रत्येक सिग्नलवर वाहतूक पोलिस ठेवणे शक्य नाही. आजमितीस २०० कर्मचारी वाहतूक विभागात कार्यरत आहे. सुटी व रजेचा विचार करता, १५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने काम केले जाते. सध्या सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतूक पोलिस कार्यरत असतात. सकाळी सात ते रात्री ११ वाजेपर्यंत दोन शिफ्टमध्ये सिग्नल्सवर वाहतूक पोलिस नेमण्याची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद वसतिगृहात प्रवेशासाठी धरणे आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
औरंगाबाद वसतिगृहात प्रवेश मिळावा, यासाठी तेथील आदिवासी विद्यार्थ्यांतर्फे येथील आदिवासी विकास भवनासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. ४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या आंदोलनाची कोणतीही दखल आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाकडून न घेतल्यामुळे या विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थ्यांनी अन्नत्यागाचा मार्ग पत्करला आहे.

शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मधील औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांची वसतिगृह प्रवेशप्रक्रिया नियमाचे उल्लंघन करून झाल्याने करण्यात आली असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. तरीदेखील कोणतीही चौकशी न करता कारवाई करण्याकडेही दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांची घुसमट होत आहे. या बाबी प्रशासनासमोर आणून देण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. औरंगाबाद येथील १२० विद्यार्थ्यांचा या आंदोलनात सहभाग आहे. औरंगाबाद येथील मुला-मुलींचे वसतिगृह विभागीयस्तर यांना शैक्षणिक साहित्य व बेडिंग साहित्य उपलब्ध करुन द्यावे. तसेच नियमित स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन व क्लासेस उपलब्ध करुन द्यावे. तसेच वसतिगृहात प्रशिक्षित सर्व गृहपाल व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच यावी, अशा मागण्या मांडण्यात आल्या आहेत. गेले आठ दिवस हे आंदोलन केले जात असल्याने व अन्नत्यागासारखा पर्यायाला विद्यार्थ्यांनी जवळ केल्याने आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त सोनाली पोंक्षे यांनी विद्यार्थ्यांशी शुक्रवारी चर्चा करुन मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन दिले आहे. मात्र तोंडी स्वरुपातील या आश्वासनाला दाद न देता लेखी स्वरुपात आश्वासन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images