Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘जन्मदरातील विषमता हटविण्याची गरज’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आज देशाची वाटचाल विकासाकडे होत असली तरी मुलींच्या जन्मदरामध्ये मात्र विकास झालेला दिसून येत नाही. मुलींच्या जन्माचा मार्ग खडतरच असल्याचे आजही दिसून येत आहे. त्यामुळे देशभरात अद्याप एक हजार मुलांमागे आजही ९२९ इतक्याच मुली असल्याचे दिसून येते. ही विषमता हटवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. राजेंद्र फडके यांनी केले.

केंद्र सरकारने देशभर बेटी बचाओ, बेटी बढाओ अभियान राबविणे सुरू केले आहे. त्या अनुषंगाने जनजागृती करण्याच्या हेतूने रविवारी मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी डॉ. फडके बोलत होते. पुढे फडके म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी अभियानांपैकी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' एक आहे. भाजप सरकारने सर्व राज्यांमधील साडेपाचशे जिल्ह्यांमधील जन्मदराविषयक सर्वेक्षण यासाठी केले आहे. महाराष्ट्रातील नाशिक, बीड, बुलढाणा, वाशिम, जालना, औरंगाबाद, जळगाव, अहमदनगर, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमधील प्रमाणातही मोठी विषमता असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. हे मिटविण्यासाठी या अभियानात गर्भचाचणीला प्रतिबंध, मुलींच्या शिक्षणाबाबत समाजात सकारात्मक दृष्टीकोन रुजविणे, मुलींच्या जीवनमानास सरकार म्हणून खात्री देणे, घटणारा जन्मदर वाचवणे ही उद्दिष्टे समोर ठेवून कार्य केले जाणार आहे. तसेच मेळावे, कीर्तने, पथनाट्य, शॉर्टफिल्म या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्र, राज्य, जिल्हा, तालुका अशा टप्प्यांनुसार समितीही नेमण्यात आली आहे. या अभियानाचे धागे फडके यांनी शिक्षणाशी जोडून शैक्षणिकदृष्ट्या सक्षम समाज घडविण्याची गरजही व्यक्त केली.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, आमदार देवयानी फरांदे, उत्तर महाराष्ट्र प्रकल्प समन्वयक डॉ. विजया अहिरराव, राज्य प्रकल्पप्रमुख अस्मिता पाटील, नगरसेवक सतीश कुलकर्णी, विजय साने व भाजपाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावकडे चाललेला ७२ लाखांचा गुटखा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गुटख्याला बंदी असतानाही मालेगाव येथे दोन आयशर ट्रकमधून विक्रीसाठी चाललेला ७२ लाखांच्या अवैध गुटख्याचा साठा पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतला. गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. द्वारका परिसरात सकाळी नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. हैदराबाद येथून हा गुटखा आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सय्यद सिराज हुसेन इकबाल हुसेन (वय ३५) आणि जगन्नाथ माळी अल्लाप्पा कल्लूर (वय ३७, दोघेही रा. कर्नाटक) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोन आयशर ट्रक गुटखा घेऊन मालेगावच्या दिशेने चालल्याची माहिती मिळाल्यानुसार पोलिस मुंबई-आग्रा महामार्गावर लक्ष ठेऊन होते. द्वारका परिसरातून चाललेली ही दोन वाहने भद्रकाली पोलिसांच्या पथकाने अडविली. त्यामध्ये मागील बाजूस दर्शनी भागात सिलिंग फॅनचे बॉक्स होते. आत गुटख्याचा मोठा साठा असल्याचे तपासणीत उघडकीस आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकी १९ लाख ५० हजार रुपये किमतीचा हिरा पान मसाला आणि रॉयल तंबाखूचा साठा आढळून आला. याखेरीज ३३ लाख रुपये किमतीचा बाबा गुटखा आढळून आला आहे. या मालासह २४ लाख रुपये किमतीचे दोन ट्रक असा एकूण ९६ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिस उपआयुक्त एन. अंबिका यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, पोलिस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलिस निरीक्षक विलास शेळके, एच. व्ही. वारे, हवालदार सातपूते आणि सोनार यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोमॅटो तेजीत; वांगे, कारले, गिलके, दोडके पन्नाशीपार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे रविवारी पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली असली तरी नुकसानीमुळे पालेभाज्यांचे दर कडाडण्याची शक्यता आहे. सध्या टोमॅटोला सुगीचे दिवस आले आहेत. टोमॅटोला ३५ ते ४० रुपये दर मिळत आहे.

गिलके, दोडके, कारले, वांगे यांचे दर पन्नाशीपल्ल्याडच आहेत. आता टोमॅटोही त्यांच्या वाट्यावर आहे. वाटाणानेही भावाचे अर्धशतक ओलांडले आहे. मात्र, पावसामुळे पालेभाज्यांचे दर घसरले आहेत. रविवारी मेथा, कोथिंबीर, शेपू, पालक या भाज्यांचे दर दोन रुपयांपासून पंधरा रुपयांपर्यंत खाली आले. पावसामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाल्याने दोन ते तीन दिवस तरी खराब मालामुळे घसरण्याची शक्यता आहे. मात्र, आवक घटल्यास दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना खाद्यपदार्थांसह पालेभाज्याही चढ्या दराने खरेदी करण्याची वेळ येणार आहे. वांग्यांना चांगली मागणी असल्याने त्यांचेही दर साठ रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. शेपूचे दर कमी झाले असून पालक दोन रुपये जुडीने मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीच्या स्वागताला पाऊस

$
0
0

मदत जानेवारीनंतरच

टीम मटा

उकाड्याने हैराण झालेले मुंबई, ठाणेकर थंडीचे स्वागत करण्यासाठी सज्ज होत असताना पाऊसही त्यासाठी दाखल झाला आहे. शनिवारनंतर रविवारीही मुंबई-ठाणे, तसेच नवी मुंबई परिसरात अनेक ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली आणि लोकांना स्वेटरऐवजी छत्र्या कपाटांतून बाहेर काढाव्या लागल्या. अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र रविवारीही कायम असल्याने मुंबईतील आकाश ढगाळलेलेच होते. त्यातच थंड वाऱ्यांनी शहराची पकड घेतली. संध्याकाळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ अशा अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आज, सोमवारीही पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात गारपिटीची शक्यता हवामानखात्याने वर्तवली आहे.

शेतकऱ्यांना धसका

विदर्भ व खानदेशचा काही भाग वगळता राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसत आहे. रब्बी हंगामासाठी हा पाऊस नुकसानदायी ठरू शकतो. इगतपुरी, त्र्यंबक भागात या पावसाने भातपिकाचे मोठे नुकसान झाले. कांदा, हरभरा व गव्हावर रोग पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील दुष्काळग्रस्त

गावांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन केंद्रीय पथकाने दौरा केला असला, तरी पथकाचा अहवाल केंद्र सरकारकडे गेल्यावर डिसेंबरपर्यंत मदतीची घोषणा, तर जानेवारीत शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी औरंगाबादमध्ये सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांची लोकसंख्या वाढीत मुंबईकरांवरही मात

$
0
0

नाशिककरांची लोकसंख्या वाढीत मुंबईकरांवरही मात २०११ च्या जनगणनेतून झाले स्पष्ट Jeevan.bhawasar@timesgroup.com नाशिक : मुंबईच्या गर्दीला, राहणीमानाला कंटाळलेले लोक नाशिककडे सरकू लागले आहेत, ही चर्चा फार पूर्वीपासून सुरू आहे. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीवरूनही ते स्पष्ट झाले आहे. २००१ ते २०११ या दशकभरात नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या २२.३ टक्क्यांनी वाढली. त्याचवेळी मुंबई शहराच्या लोकसंख्येत साडेसात टक्क्यांची घट झाली तर मुंबई उपनगराची लोकसंख्या ८.२९ टक्क्यांनी वाढली. २०११ च्या जनगणनेची जिल्हानिहाय माहिती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार राज्याच्या लोकसंख्या वाढीचा सरासरी दर १६ टक्के होता. या कालावधीत ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक ३६ टक्क्यांनी वाढली. मुंबई आणि उपनगरातील घरांच्या वाढत्या किंमतींमुळे नागरिकांनी या भागात स्थलांतर करण्यास प्राधान्य दिल्याने ही वाढ झाली. त्यानंतर पुणे (३०.३४), औरंगाबाद (२७.३३), नंदूरबार (२५.५) यांचा क्रमांक लागतो. मुंबई येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या वाढत असली तरी शहराची एकूण लोकसंख्या मात्र साडेसात टक्क्यांनी कमी झाली. याशिवाय सिंधूदुर्ग (४.९६) आणि रत्नागिरी (२.३) या जिल्ह्यांच्या लोकसंख्येतही घट झाली. दशकभरात झालेली वाढ राज्य वाढ/घट(%) नाशिक वाढ/घट(%) एकूण १,५४,९५,७०६ १५.९९ ११,१३,३९१ २२.३०

पुरुष ७८,४२,४६० १५.५६ ५,६६,२७४ २१.८६

महिला ७६,५३,२४६ १६.४७ ५,४७,११७ २२.७७

११ लोकसंख्येचे गाव

गावपातळीवर विचार करता पिंपळगाव बसवंत गावात सर्वाधिक ४१,५५९ नागरिकांची वस्ती तर बागलाण तालुक्यातील कोंधराबादमध्ये केवळ ११ नागरिकांचे वास्तव्य आहे. येवला तालुक्यातील ममदापूर गावाचे क्षेत्रफळ सर्वाधिक ५,९५१ हेक्टर तर कोंधराबादचे क्षेत्रफळ सर्वात कमी म्हणजे केवळ १२ हेक्टर आहे. जिल्ह्यात एकूण १९२२ गावे आणि २५ शहरे असून त्यापैकी ३ गावांमध्ये वस्ती नाही. जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता (एक किलोमीटर क्षेत्रफळात राहणारे नागरिक) ३९३ आहे. २५ टक्के अनुसूचित जमाती जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ६१ लाख ७ हजार १८७ असून त्यापैकी ३१ लाख ५७ हजार १८६ पुरुष आणि २९ लाख ५० हजार महिला आहेत. जिल्ह्यातील ३५ लाख ९ हजार लोक ग्रामीण भागात २५ लाख ९७ हजार लोक शहरी भागात राहतात. जिल्ह्यात अनुसुचित जातीच्या नागरिकांची संख्या ९ टक्के तर अनुसूचित जमातीच्या नागरिकांची संख्या २५.६२ टक्के आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-नगर वादाची ठिणगी

$
0
0

सिंचनासाठी तीन आवर्तने; पाणीकपात वाढणार म. टा. प्रतिनिधी, नाशिक पाणीप्रश्नावरून नाशिकमध्ये निर्माण झालेल्या वादाला तोंड देता देता नाकीनऊ आल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी सिंचनासाठी गंगापूर डावा कालव्यातून तीन आवर्तन सोडण्याचा निर्णय सोमवार घेतला. मात्र, यातील एक आवर्तन कोपरगावसाठीच्या राखीव साठ्यातून दिले जाणार असल्याने सुरुवातीला मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असलेला संघर्ष आता नाशिक विरुद्ध नगर असा होण्याची शक्यता आहे. नाशिक शहरासाठी प्रति माणशी दाोनशे दहावरून दीडशे लिटर पाणी देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याने नाशिककरांना मोठ्या पाणीकपातीला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट आहे. थोड्याच दिवसात शहरवासीयांना दिवसाआडच्या पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागू शकते. जळगावलाही आवर्तन सोडण्याबाबतही आज (२४ नोव्हेंबर) विभागीय आयुक्तालयात निर्णय होण्याची शक्यता असून, त्यामुळे जिल्ह्यातील पाणीप्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, नाशिककरांच्या पाणी प्रश्नावरील बैठकीकडे मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची सोमवारी प्रचंड निराशा झाली. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मान्य नसल्याची नाराजी व्यक्त करीत आमदार जयंत जाधव यांनी वॉक आऊट केले. त्यामुळे तापलेल्या वातावरणातच पाणी आरक्षणावर घमासान चर्चा झाली. मराठवाड्याला गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी सोडल्यामुळे नाशिककर प्रचंड संतापले आहेत. पालकंमत्री गिरीष महाजन यांना शनिवारी नाशिककरांच्या या रोषाचा सामना करावा लागला. पाणी आरक्षणाबाबत महाजन यांना शेतकऱ्यांनी धारेवर धरले. सकारात्मक निर्णयाचे आश्वासन देत पालकमंत्र्यांनी सोमवारी मुंबईत बैठक बोलावण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल, असे सांगण्यात आल्याने अनेक लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरविल्याने लोकप्रतिनिधींची निराशा झाली. सहकार राज्य मंत्री दादा भुसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे, जिल्ह्यातील आमदारांसह महापौर अशोक मुर्तडक, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, जलसंपदाचे सचिव शिवाजी उपासे आदी बैठकीला उपस्थित होते. येत्या काळात नाशिक डाव्या कालव्यातून सिंचन व बिगर सिंचनाकरिता तीन आवर्तन पाणी देणे शक्य होईल, असा दावा महाजन यांनी केला. पालखेड समूहातूनही दोन नियमित आवर्तने पाणी देता येईल व दुसऱ्या नियमित आवर्तनात एक प्रासंगिक देणेही शक्य होईल, असेही ते म्हणाले. चणकापूर, केळझर, हरणबारी व पुनद या धरणातून सद्यस्थितीत पिण्याचे आरक्षण लक्षात घेता गिरणा धरणात मागील वर्षातील आरक्षित पाणी व यावर्षी उपलब्ध पाण्याची तुलना करून समान कपात करुन जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यासाठी पाण्याच्या आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अशा सूचना महाजन यांनी दिल्या. 'मेंढेगिरी' त्रुटींवर लवकरच बैठक मेंढेगिरी समितीच्या गोदावरी अभ्यासगटाने अहवालात चुकीची आकडेवारी दिल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर तातडीने स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी घेतला आहे. त्यामुळे आळंदी धरणाचा समावेश गंगापूर समूहात होण्याबरोबरच आकडेवारीतील तफावतही दूर होण्याची चिन्हे आहेत. गंगापूर समूहात ४७०० दशलक्ष घनफूट व दारणा समूहात ७१०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. मनपाचे ६०० दलघफू पाणी दारणा धरण समूहात आरक्षित केल्यास तेवढेच पाणी डावा कालव्यास पिण्यासाठी उपलब्ध होऊ शकेल. खरीपात गंगापूर डाव्या कालव्यास सिंहस्थामुळे पाणी देण्यात आलेले नाही. त्यांना पाणी देण्याचा प्राधान्यक्रमाने विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली. गंगापूर धरण समूहावर अन्याय होत असल्याचे जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखभर रुपयांची रोज ‘सफाई’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नदीतील पाण्यावर तरंगणारे निर्माल्य, प्लास्टिक पिशव्या व इतर कचरा साफ करण्यासाठी महापालिका तीन महिन्यांच्या कालावधीसाठी फ्लोटिंग ट्रॅश स्किमर मशिन भाडेतत्त्वावर घेणार आहे. यासाठी दिवसाला एक लाख १० हजार रुपये प्रतिदिन याप्रमाणे ठेकेदाराला ९९ लाख रूपये भाडे देण्यात येणार आहे. सिंहस्थात हे काम अगदी किरकोळ खर्चात करण्यात आले होते. त्यामुळे या प्रस्तावाबाबत स्थायी समिती काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोदावरी नदीच्या धार्मिक महत्त्वामुळे लाखो भाविक दरवर्षी याठिकाणी स्नान व धार्मिक विधीसाठी येतात. यातून नदीपात्रात निर्माल्यासह इतर प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. हा कचरा साफ करण्यासाठी महापालिका प्रशासनाने फ्लोटिंग ट्रॅश स्किमर मशिन भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ९ जून रोजी ई-निविदा सूचना प्रसिध्द करण्यात आली. मात्र, दोनच ठेकेदार पुढे आल्याने प्रशासनाने २४ जून रोजी पुन्हा हीच सूचना प्रसिध्द केली. त्यानुसार क्लिनटेक प्रा. लि. मुंबई, जे. एम. इन्व्हायरो प्रा. लि. मुंबई आणि अमिन प्रा. लि. अहमदाबाद या कंपन्यांनी ई-निविदा सादर केल्या. १६ जुलै रोजी कागदपत्रांची पडताळणी केली असता, अमिन एक्युपमेंट कंपनीच्या कागदपत्रांमध्ये पूर्तता आढळून आली नाही. उर्वरित दोन कंपन्यांपैकी क्लिनटेक प्रा. लि. कंपनीचे काम चांगले असल्याचा निष्कर्ष महापालिका अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीनंतर काढला. तीन महिन्यांच्या करारासाठी तब्बल ९९ लाख रूपये यासाठी खर्ची पडणार असून, पैशांच्या उधळपट्टीनंतरही गोदा स्वच्छ होण्याची कोणतीही शक्यता दिसून येत नाही. सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान महापालिका प्रशासनाने अगदी किरकोळ खर्चात नदी स्वच्छतेसाठी यंत्रणा उभारली होती. सिंहस्थ संपताच ही यंत्रणा दूर सारत आता खर्चिक मशिनरी तीही भाडेतत्त्वावर चालवण्याचा घाट घातला जातो आहे. प्रशासनाच्या या प्रस्तावावर स्थायी समिती काय निर्णय घेते याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेमोसमीने घेतले दोन बळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कळवण/सटाणा दुष्काळ, गारपीट व बेमोसमी पाऊस यामुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे दडपण वाढत असून, अस्मानी संकटाला धास्तावलेल्या कळवण व सटाणा येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून झालेल्या बेमोसमी अवकाळी पावसाने शेतातील कांदा पीक पूूर्णत: उद्धवस्त झाल्याने मुलीच्या लग्नासाठी काढलेल्या सावकारी कर्ज फेडणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने सटाणा तालुक्यातील बुंधाटे येथील शेतकरी रामदास काशीराम देवरे (४८) याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी घडली. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात पावसाची संततधार सुरूच आहे. रविवारी (दि.२२) सायंकाळी झालेल्या बेमोसमी पावसाने दीड एकर शेतातील कांदा पिकाचे नुकसान झाले. यामुळे अंगावरील कर्जाच्या दडपणाने रामदास देवरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी व एक अल्पवयीन मुलगा आहे. मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून शोकाकुल वातावरणात अंतविधी करण्यात आला. दरम्यान, सहकारी संस्था, फायनान्स व हात उसणवार घेतलेल्या कर्जाच्या वाढत्या भारामुळे कळवण येथील शेतकरी दीपक मोतीराम निकम (४१) यांने गुरुवारी घरात इंजेक्शनद्वारे विषप्राशन करून आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपवली. निकम यांनी कळवण बु. विविध कार्यकारी सोसायटीकडून व शहरातील पतसंस्थाकडून कर्ज घेतले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांविरोधात रास्ता रोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाणी प्रश्नाहून कलेक्टर ऑफिसच्या आवारात पेटलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी शेतकरी तसेच पत्रकारास केलेल्या बेदम मारहाणीच्या निषेधार्थ सामाजिक संघटनांनी सोमवारी निदर्शने केली. सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर रास्तारोको करण्यात आल्याने या परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला.

शेतकरी आंदोलनाचे वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार महेंद्र महाजन यांच्यावर पोलिसांनी हेतूपुरस्सर हल्ला केल्याच्या निषेधार्थ डावी लोकशाही आघाडी व पुरोगामी संघटना आणि आयटक कामगार संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करीत पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांना निलंबित करण्याची मागणी या संघटनाच्या वतीने करण्यात आली. निदर्शनांना सुरुवात झाल्यानंतर या परिसरात थोडाच वेळात ट्रॅफिक जाम झाली. यामुळे सीबीएस, त्र्यंबक नाका, मुंबई नाका, एमजी रोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा या परिसरातील वाहतुकीवर चक्काजामचा परिणाम सुमारे तासभर दिसून आला. ट्रॅफिक पोलिसांना वाहतुकीच्या नियोजनासाठी चांगलीच धावपळ करावी लागली.

पुरोगामी संघटनांच्या वतीने डॉ. डी. एल. कराड, श्रीधर देशपांडे, राजू देसले, मनीष बस्ते, वसुधा कराड, मिलींद वाघ, शांताराम चव्हाण, विजय बागूल, पद्माकर इंगळे तर नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष यशवंत पवार, मोतीराम पिंगळे, सुभाष पुरकर, शशीकांत पगारे, दीपक निकम आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कानेटकर उद्यान कोमात!

$
0
0

प्रेमीयुगलांसह टवाळखोरांचा बनला अड्डा; महापालिकेच्या खर्चावर पाणी नामदेव पवार, सातपूर नाशिक महापालिकेने गंगापूर गावातील शिवारात निर्सग रम्य परिसरात तब्बल १७ एकरमध्ये उभारलेले वसंत कानेटकर उद्यान सध्या कोमात गेले आहे. उद्यानात पर्यटकांपेक्षा प्रेमीयुगल व टवाळखोरांचाच अड्डा बनला आहे. महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून उभारेल्या कानेटकर उद्यानाला उभारी येणार कधी? असा प्रश्न ना‌शिककरांनी उपस्थित केला आहे. नागरी सुविधा देतांना महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी उद्यानांची निर्मिती केली आहे. परंतु, काही ठराविकच उद्याने सोडली तर, इतर उद्याने आजारी पडलेल्या रुग्णांसारखीच आहेत. गंगापूर परिसरात महापालिकेचे तत्कालीन महापौर दशरथ पाटील यांनी सन २००४ मध्ये वसंत कानेटकर उद्यानाची मुहूर्तमेढ रोवली होती. यानंतर उद्यानात जाँगिग ट्रॅक व वृक्षांची लागवड करण्यात आली. नगरसेवक दिनकर पाटील यांच्या कार्यकाळ सन २००८ मध्ये दुसऱ्या टप्याचे काम हाती घेण्यात आले. यावेळी उद्यानात खेळणी तसेच संरक्षक भिंत महापालिकेने बांधली होती. परंतु, १७ एकरमधील उद्यानाची देखभाल करण्यासाठी केवळ दोन कर्मचारी असल्याने नगरसेवक पाटील यांनी बचतगटाकडे उद्यानाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी तत्कालीन आयुक्तांकडे केली होती. नगरसेवक पाटील यांची मागणी मान्य होत चार महिला बचतगटांच्या माध्यमातून कानेटकर उद्यानाची देखभाल केली जात होती. परंतु, महापालिका प्रशासनाचे महिला बचतगटांकडून उद्यानांची कामे काढून घेतल्यानंतर उद्यानांची दयनीय अवस्था झाल्याचा आरोप नगरसेवक पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे सतरा एकरच्या उद्यानात केवळ एकाच कर्मचाऱ्याची नेमणूक केल्याने संबंधित कर्मचारी काय आणि कोणती कामे करणार हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. उद्यानात मोठ्या प्रमाणावर गाजर गवत झुडपे वाढली असून जाँगिंग ट्रॅक गायब झाला आहे. नगरसेविका लता पाटील यांनी उद्यानाकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करणारे पत्र पाठविले आहे. परंतु महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेविका पाटील यांनी केला. महापालिकेने आतापर्यंत पाच कोटी रुपये कानेटकर उद्यानावर खर्च केले आहे. तो सर्व खर्च व्यर्थ गेल्याचा आरोपही नगरसेविका पाटील यांनी केला आहे. संरक्षक जाळ्या झाल्या गायब महापालिकेने कानेटकर उद्यानात दुसऱ्या टप्प्यात संरक्षक जाळ्या उभारल्या होत्या. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून महिला बचतगटांकडून काम महापालिकेने काढून घेतल्यानंतर उद्यानाला बसविण्यात आलेल्या संरक्षक जाळ्याच चोरट्यांनी गायब केल्या आहेत. यामुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता मोहीम पावसाळ्या अगोदर महापालिकेच्या सहाही उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांकडून कानेटकर उद्यानाची स्वच्छता करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर महापालिकेतील उद्यानाचे एकही अधिकारी कानेटकर उद्यानात पाहाणीसाठी गेले नाही. त्यामुळे डोक्याहून अधिक उंचीचे जंगली गवत उद्यानामध्ये वाढले आहे. वाढत्या गवतामुळे या उद्यानात साप आणि अन्य जनावरांची गर्दी दिसून येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनई चौघड्याचे स्वर गुंजणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चातुर्मास आणि सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान तब्बल सहा महिन्यांपर्यंत लग्नसमारंभांना लागलेला ब्रेक आता तुलसी विवाहानंतर पुन्हा मोकळा झाला आहे. यामुळे आजपासून (दि.२४) पुन्हा सनई चौघड्याचे स्वर गुंजणार आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षात विवाहाचे तब्बल ८० मुहूर्त आहेत. यामुळे आता बाजारपेठही गजबजणार आहे.

गत कालावधीत कुंभमेळ्यामुळे सलग सहा महिन्यांपर्यंत विवाहाचे मुहूर्त नव्हते. सोमवारी तुलसी विवाह पार पडल्यानंतर आजपासून पुन्हा विवाह सोहळ्यांना सुरुवात होत आहे. यामुळे आता मंगल कार्यालय, लॉन, फुले, केटरिंग, टेण्ट हाऊस बुकिंग, सोने खरेदी, कापड खरेदी, फर्निचर खरेदी आदी व्यवसाय तेजीत येणार आहेत. साधारणत: एप्रिल महिन्यापर्यंत सर्वाधिक मुहूर्तांवर वधू-वर पक्षांचा भर असण्याची शक्यता पंचागकर्ते प्रा. हर्षद महाजन यांनी व्यक्त केली. पुढील वर्षात मे आणि जून महिन्यात शुक्राचा अस्त असल्याने तत्पूर्वीच विवाहाच्या आयोजनावर भर दिला जाणार आहे. यानंतर जुलै महिन्यातही अत्यल्प मुहूर्त हाती आहेत. यामुळे डिसेंबर ते एप्रिल या कालावधीदरम्यान सर्वाधिक विवाह सोहळ्यांचे आयोजन होणार आहे.

ज्योतीष शास्त्राच्या संदर्भानुसार सिंह राशीमध्ये गुरू असताना विवाह मुहूर्त नसतात. मात्र, यास अपवाद म्हणजे १६ अंश आणि ४० कलांनी पुढे सरकणारा गुरू विवाह मुहूर्तास ग्रीन सिग्नल देतो, अशी माहिती नाशिक पंचागकर्ते प्रा. हर्षद महाजन यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई-लर्निंगमुळे भार होणार हलका

$
0
0

ashwini.kawale@timesgroup.com

नाशिक : दप्तराचे ओझे कमी करण्याविषयी शाळांना देण्यात आलेल्या सूचनांवर मार्ग काढत 'ई-लर्निंग' शिक्षणपद्धतीचा अवलंब शहरातील शाळा करीत आहेत. वह्या-पुस्तकांच्या भारावर तंत्रज्ञानात्मक पद्धतीने मार्ग काढत तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा स्तुत्य उपक्रम शाळांमध्ये राबवत असल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल साक्षरता आणण्यासाठी सध्या सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी डिजिटल हा शब्द विशेष ठरत आहे. प्रत्येक विषयाची वही व पुस्तक यामुळे दप्तराचा भार हा गरजेपेक्षा कित्येक पटीने वाढत असतो. हा भार कमी करण्याच्या दृष्टीने पुस्तके आणण्याच्या संख्येवर शाळा आता मर्यादा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. याचसाठी ई-लर्निंग लॅबला प्राधान्य दिले जात आहेत.

अनेक महत्त्वाच्या अभ्यासक्रम प्रकाशकांनीही अभ्यासक्रम ऑनलाइन स्वरुपात आणला आहे. यामध्ये बालभारती, नवनीत यांसारख्या प्रकाशनांचाही समावेश आहे. त्यामुळे कोणत्याही विषयाचे पुस्तक घेऊन जात दप्तराचे ओझे वाढविण्यापेक्षा थेट स्क्रिनवर पाहून अभ्यास करणे व त्याच्या नोट्स काढणे, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. शाळांच्या आर्थिक क्षमतेनुसार या लॅब तयार करण्यात आल्या आहेत. तर काही शाळांमध्ये आमदार निधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनुसार लॅब तयार करण्यात आल्या आहेत. प्रोजेक्टरच्या माध्यमातून स्क्रिनवर विद्यार्थ्यांना विषय समजावून सांगणे, कॉम्प्युटर लॅबमध्ये त्याबाबत उजळणी करुन घेणे आदी बाबी या माध्यमातून दिली जात आहे. सध्या उन्नती विद्यालय, सरस्वती पाटील विद्यालय, बालविद्या प्रसारक संचलित आदर्श बालविद्यामंदिर, नाशिक एज्युकेशन सोसायटीची सारडा कन्या विद्यालय, के. व्ही. एन. नाईक संस्था संचलित नूतन मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळा आदींमध्ये अशा प्रकारची लॅब कार्यरत असून, दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

असा होणार लाभ

शाळांमध्ये ई-लर्निंग लॅबमुळे विद्यार्थ्यांना कमीत कमी वह्या-पुस्तके आणावी लागणार आहे. कारण शिकवलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी कॉम्प्युटरवरच केली जाणार असल्याने पेपरलेस ही संकल्पना येथे रुजवली जाणार आहे. याचा मोठा लाभ दप्तराचे ओझे घटवण्यास होणार आहे.

आजच्या काळात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. हे या माध्यमातून मिळू शकेल. शिवाय, दप्तराच्या ओझ्याविषयी ज्या उपाययोजना केल्या जात आहेत, त्यात ही योजना महत्त्वाची भूमिका बजवू शकेल.

नंदलाल धांडे, मुख्याध्यापक, उन्नती विद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षतोड प्रक्रियेवर संशय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड शहरातील वृक्षतोडीला हरकतीसाठी महापालिकेने फक्त २४ तासाची मुदत दिली आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वृक्षसमिती सदस्य व महापालिका यंत्रणेवर गुन्हा दाखल करावा, असा विनंती अर्ज वृक्षप्रेमींतर्फे कोर्टाला करणार असल्याचे वृक्षप्रेमी अश्विनी भट यांनी नमूद केले. शहरातील ६३ झाडे तोडण्यासाठी आणि ४९ झाडांचा विस्तार कमी करण्यासाठी महापालिकेने प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, हायकोर्टाच्या नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप होत आहे. वृक्षतोडीला हरकतीसाठी एक महिना अगोदर नोटीस न देता महापालिकेने २४ तासाचा अवधी दिला आहे. मोजक्या खपाच्या एकाच वृत्तपत्रातून ही नोटीस दिल्याचे भट यांचे म्हणणे आहे. गेल्यावेळी हायकोर्टाच्या आदेशाने जनसुनावणी झाली तेव्हा आघाडीच्या सर्व वृत्तपत्रांमधून महापालिकेने वृक्षतोडीची नोटीस दिली होती. यंदा नोटीसमध्ये झाडांचे वय, उंची घेर, प्रजाती, पुनर्रोपणाचा उल्लेख नाही. झाडांवर पंधरा दिवस आधी नोटीस चिकटवणे कायद्याने आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत बरसला पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प गेल्या तीन दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसाने देवळाली परिसराला झोडपून काढले. पावसामुळे व्यावसायिकांसह विद्यार्थी व नोकरदारांची धावपळ उडाली. हिवाळ्यात रेनाकोट शोधण्यासाठी घराघरांमध्ये धावपळ दिसून आली. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान पावसाने अचानक हजेरी लावल्याने शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. शाळेतून सुट्टी होण्यापूर्वी आलेल्या पावसाने अनेक विद्यार्थी शाळेच्या आवारातच थांबले. रविवारीही आलेल्या पावसामुळे येथे भरणाऱ्या आठवडे बाजारात व्यावसायिकांची पळापळ झाली होती. सोमवारीही मुसळधार सरींनी दुकानदार तसेच शालेय विद्यार्थ्यांची त्रेधातिरपिट उडवून दिली. जुने बस स्थानक परिसरात थांबलेल्या प्रवाशांना अचानक आलेल्या पावसाने कुठे आडोसा घ्यावा याचा उलगडा होत नव्हता. दिसेल त्याजागी दुकानांसमोर गर्दी करीत पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिक धावतांना दिसून आले. वाहनांमुळे लामरोडसह बाजार भागात साचलेले पाणी अनेकांच्या अंगावर उडत होते. द्राक्षउत्पादक धास्तावले बेमोसमी पावसाला सुरूवात झाल्यापासून द्राक्ष बागाईतदार वर्गाची द्राक्षाला लागणाऱ्या रोगांपासून बचाव करण्यासाठी फवारणीही सुरू केली. मात्र सायंकाळच्या सुमारास पुन्हा आलेल्या पावसाने हजारो रुपयांच्या औषधांचे नुकसान झाले. अशा बेमोसमी पावसामुळे द्राक्ष बागासोबत शेतात उभे असलेल्या पिकालाही डावण्या आणि अन्य तत्सम रोगांची भीती असते. यामुळे देवळालीसह ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग धास्तावला आहे. ढगाळ वातावरणाचा पिकावर गंभीर परिणाम होण्याची त्यांना धास्ती आहे. रेस्ट कॅम्प रोडवर वृक्ष कोसळला रेस्ट कॅम्प रोडवर असणाऱ्या वर्कशॉप समोरील बाजूस अचानक बाभळीचा वृक्ष कोसळल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेस्ट कॅम्प रोडवर अशी अनेक जुनी व एक बाजूला कललेली अनेक वृक्ष असून याबाबत लष्करी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. भविष्यात अशी अनेक जुनी झाडे कोसळून ‌जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत. गेल्या काही दिवसांपासून देवळालीत सातत्याने जुनी वृक्ष कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिनकर पाटलांचा पालकमंत्र्यांना `घरचा आहेर`

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडी धरणासाठी पाणी सोडताना नाशिककरांचा कोणताही विचार झाला नाही. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हा अन्याय केला असल्याची टीका भाजपाचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी पालकमंत्र्यांवर टीका करून पक्षाला घरचा आहेरच दिला आहे.

जायकवाडी धरणासाठी पाणी सोडताना नाशिककरांवर अन्याय झाला. विरोधी पक्षांनी राजकारण करण्यात रस दाखवला. पालकमंत्री महाजन यांनी पाणी सोडण्याचा निर्णय दुख:दायक होता. विरोधी पक्षांनी आंदोलन करण्यापेक्षा जलसंपदामंत्र्यांना भेटून हा निर्णय बदलण्यासाठी दबाव आणणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता या पक्षांनी राजकारण करण्यात धन्यता मानली. आता, धरणे कोरडीठाक पडली असून शेतकरी म्हणून आपण ही शोकांतिका मांडत असल्याचे पाटील म्हणाले. पाणी सोडण्याच्या निर्णयानंतर भाजपातील अनेक पदाधिकारी अस्वस्थ आहेत. मात्र, पक्षविरोधी भूमिका घेण्यास कोणीही धजावलेले नाही. पाटील यांनी पालकमंत्र्यांना घरचा आहेर दिला असून पाटील याच्या या भूमिकेनंतर भाजपमध्ये काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व पाण्यासारख्या संवेदनशील प्रश्नावर राजकारण करणाऱ्या पक्षांना सर्वसामान्य नागरिक कधीही आपलेसे करणार नाहीत, अशी टीकाही पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरेशा वेळेअभावी रंगकर्मींची दमछाक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कमी कालावधीत नेपथ्य उभे करणे, प्रकाशयोजनेला पुरेसा वेळ देणे, रंगभूषा व वेशभूषेची जय्यत तयारी करणे या कामांसाठी लागणारा वेळ कमी पडत असल्याने किमान दोन तास आधी रंगमंच ताब्यात मिळण्याची गरज रंगकर्मींकडून व्यक्त होत आहे. पुरेशा वेळेअभावी त्यांची दमछाक होत असून, कोणत्याच गोष्टीसाठी हवा तितका वेळ देता न आल्याने नाटकावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची रंगकर्मींची ओरड आहे.

नाशिकला परशुराम साईखेडकर नाट्यगृहात गेल्या आठवड्यापासून हौशी मराठी नाट्य स्पर्धा सुरू आहेत. याठिकाणी धुळे आणि नगर येथूनही नाटक करण्यासाठी रंगकर्मी येतात. नाशिक हे तीन केंद्रांचे मिळून एक केंद्र बनलेले आहे. असे असताना बाहेरगावाहून येणाऱ्या नाटकांसाठी व स्थानिक नाटकांसाठी ठराविक वेळेलाच रंगमंच उपलब्ध करून दिला जातो. परंतु त्यामुळे होते काय की नेपथ्य, प्रकाशयोजना टेस्टिंग, रंगभूषा व वेशभूषा यासाठी जितका वेळ दिला जावा तितका मिळत नसल्याने चटावरचे श्राध्द उरकावे तसे नाटक उरकून घ्यावे लागते. ही बाब प्रतीच्या दृष्टीने विपरित ठरत असल्याची रंगकर्मींची भावना झाली आहे. रंगमंच उशिरा ताब्यात मिळाल्याने एकीकडे नाट्य दिग्दर्शकच रंगमंच तपासून बघत असतो, नेपथ्याकडे तोच लक्ष ठेवतो, परीक्षकांना हवे नको ते पुरविण्याची जबाबदारीही दिग्दर्शकाकडेच असते. या सर्व बाबींमुळे त्याला हवा तितका वेळ सर्व गोष्टींसाठी देणे शक्य होत नसल्याची ओरड होत आहे.

रंगमंच ताब्यात मिळणे ही नाटकासाठी अत्यंत महत्त्वाची बाब असते. पूर्वी आधीचे नाटक संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या नाटकासाठी रंगमंच ताब्यात देण्यात येत असे. त्याचा फायदा असा होत असे की दिग्दर्शक रात्रीच सेट लावून तयार असत. दुसऱ्या दिवशी अंतिम हात फिरविण्यासाठी थोडा वेळ मिळून जात असे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊनंतर रंगमंच ताब्यात मिळायला लागला. त्यावेळीही धकून जात असे मात्र शासनाच्या धोरणामुळे आता केवळ एका शोसाठीच नाट्यगृह घेतले जात असल्याने रंगमंच लावण्यासाठी अत्यंत कमी कालावधी मिळत असल्याची तक्रार रंगकर्मी करीत आहेत.

शासनाच्या दुर्लक्षाची रंगकर्मींना शिक्षा

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे ही हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा घेण्यात येते. परंतु एकूणच राज्यातील या स्पर्धांकडे शासनाचे किती लक्ष असते हे सर्वश्रृतच आहे. दोन किंवा तीन शोसाठी नाट्यगृह बूक करण्याचे औदार्य शासन दाखवणार आहे की नाही असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित होत आहे. एका शोसाठी नाट्यगृह बूक असेल तर रंगकर्मींना वेळेच्या अडचणी येणारच अशी प्रतिक्रिया रंगकर्मींच्या वर्तुळातून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंद्रिय दूध निर्मितीवर चर्चासत्र

$
0
0

कृषीथॉन २०१५ चे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ह्यूमन सर्व्हिस फाऊंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कृषीथॉन - २०१५ चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात दि. २८ नोव्हेंबर रोजी सेंद्रिय दूध उत्पादन निर्मितीवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.

कृषीथॉन प्रदर्शनात दुग्ध व्यावसायिकांसाठी डेअरी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता सेंद्रिय दूध उत्पादन काळाची गरज या विषयावर चर्चासत्र होणार आहे. चर्चासत्रात दूध उत्पादकांना सेंद्रिय दुधासंदर्भात डॉ. मिलिंद भणगे व डॉ. प्रकाश झांबरे यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आदर्श दूध उत्पादनांचे तंत्र व मंत्र या विषयावर पशुवैद्यकीय कॉलेजचे प्राध्यापक डॉ. नितीन मार्कंडेय यांचे मार्गदर्शन करणार आहेत. दुग्ध व्यवसायाला पुरक असलेले असंख्य तंत्रज्ञान विकसित झालेले आहेत. त्याची माहिती दुग्ध उत्पादन तंत्र, उपाययोजना, वितरण व्यवस्था याचे मार्गदर्शन तसेच संभाव्य मार्केट, संधी, व्यवसाय वृध्दी यावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

डेअरी एक्स्पोमध्ये पशु आहार, औषधोपचार याची माहिती, डेअरीपुरक उपकरणे, उत्पादक पुरवठादार यांची माहिती, दूध प्रक्रिया आणि पॅकिंग साधने, पशू पोषक आहार आणि त्याचे पुरवठादार, डेअरी उत्पादने, प्रक्रिया आणि वितरण व्यवस्था, संशोधन संस्थांची माहिती आणि डेअरी व्यवसायपुरक उत्पादनांचे

उद्योग, सेवादार यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या एक्स्पोमध्ये दुग्ध व्यावसायिक आणि शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक साहील न्याहारकर यांनी केले आहे.

तयारी पूर्णत्त्वाकडे

गेल्या काही दिवसांपासून कृषीथॉन-२०१५ या कृषिप्रदर्शनाची तयारी सुरू आहे. शहरातील ठक्कर्स डोम, एबीबी सर्कल पी. टी. सी. समोर, त्र्यंबक रोड येथे प्रदर्शन भरणार आहे. मोठे डोम उभारण्यात येत असून, पावसाने स्टॉलधारकांचे नुकसान होऊ नये याकरिता वॉटरप्रूफ डोम उभारले आहेत. तसेच, संपूर्ण डोम हे वूडन प्लॅटफॉर्मवर बांधण्यात येत आहे. कृषीथॉन प्रदर्शनात २५० ते ३०० स्टॉल्स असणार आहेत. ज्यात डेअरी एक्स्पो, फ्रूट अॅण्‍ड व्हेजिटेबल एक्स्पो, अॅग्रो करिअर जॉब फेअर, शासनाच्या कृषी विभागाचे स्टॉल्स असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्रामन्यायालयाचा निश्चितच उपयोग’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

जगण्याच्या अधिकारात न्यायाची हमी मिळावी. गावागावातील शांतता सलोखा व सामजंस्य टिकावे. तसेच, न्यायप्रक्रिया अधिक जलद गतीने व्हावी, यासाठी या ग्रामन्यायालयाचा निश्चित उपयोग होईल. मात्र, न्यायालयाचे दार ठोठावण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी व कर्तव्य ओळखून स्वतःला तपासून पहावे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

देवळा येथील प्रथमच सुरू केलेल्या ग्रामन्यायालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद करंजकर होते. न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले की, खरे तर नात्यातील दुरावा संपणे, सामाजिक स्थिती बिघडणे, तंटे बखेडे निर्माण होणे यातून न्यायालयाची गरज भासू शकते. यामुळे नागरिकांचा वेळ, श्रम व पैसा खर्च होतो. तसे होऊ नये म्हणून वकीलवर्गाने योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त व्यक्त केली. अॅड. शशिकांत पवार यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी कळवणचे दिवाणी न्यायाधीश सखाराम नाईक, सहन्यायाधीश सुनीता पैठणकर, अॅॅड. नितीन ठाकरे, उषा बच्छाव, केदा शिरसाठ, जनुभाऊ आहेर, जि. प. गटनेते रवींद्र देवरे, प्रांताधिकारी भीमराव दराडे, तहसीलदार कैलास पवार, प्राचार्य हितेंद्र आहेर जितेंद्र आहेर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात माघार; जिल्ह्यात धुंवाधार

$
0
0

नांदगाव तालुक्यात अवकाळी पावसाची सर्वाधिक नोंद; सुरगाणा तालुका कोरडाच!

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मान्सून हंगामात पाठ फिरविणारा पाऊस अवकाळीच्या रुपाने संकट घेऊन पुन्हा शेतकऱ्यांच्या उरावर बसला आहे. नांदगावसह, देवळा, कळवण, येवला, चांदवड आणि बागलाण तालुक्यामध्ये हजेरी लावत या अवकाळी पावसाने उभी पिके अक्षरश: झोडपून काढली. त्यामुळे खरिपापाठोपाठ रब्बीची पिकेही हातची जाण्याच्या भीतीने शेतकरी पुरता कोलमडला आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत २३९ मिलीमीटर तर शहरात ३.४ मिमी पावसाची नोंद झाली.

अवकाळीने धिंगाणा घालण्याचे यंदाचे सलग चौथे वर्ष आहे. पिकांची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेणाऱ्या शेतकऱ्याचा खरिपाचा हंगाम वाया गेला. मान्सूनने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढावले. त्यामुळे खरिपातील पिके शेतकऱ्याच्या हाती लागू शकली नाहीत. धरणेही भरू न शकल्याने पिके जगवायची कशी या चिंतेत शेतकरी असताना आता अवकाळी पावसाने धुडगूस घालण्यास सुरुवात केल्याने रब्बी पिकेही हातची जाण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. रविवारी जिल्ह्यातील नऊच तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली

होती. मात्र, सोमवारी पावसाने सुरगाणा वगळता अन्य सर्वच तालुक्यांकडे मोर्चा वळवला. एकट्या नांदगाव तालुक्यात सोमवारपासून ते मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत सर्वाधिक ४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल देवळ्यातही ४२ मि. मी. पाऊस पडल्याची मा‌हिती जिल्हा प्रशासनाने दिली. कळवणमध्ये ३३.९ मि. मी. पाऊस झाला. सिन्नरमध्ये २९.० तर बागलाण आणि चांदवडमध्ये अनुक्रमे २२ आणि १६.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. रविवारी सर्वात कमी पाऊस निफाड तालुक्यात २.८ मि.मी. इतका झाला.

पिकांवर रोगांचे सावट

या पावसामुळे द्राक्ष बागांवर डावण्या व बुरशीजन्य रोग पडण्याची शक्यता बळावली आहे. असेच वातावरण आणखी दोन दिवस कायम राहिले तर कांदा पिकावरही रोग पडण्याची भीती शेतकऱ्याला सतावू लागली आहे. या पावसामुळे भात पाण्यात भिजला आहे. टोमॅटोवर करपा रोग पडून पाने गळण्याची शक्यता बळावली आहे. सध्याच्या रोगट वातावरणामुळे मानवी आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता देखील बळावली आहे.

धरण क्षेत्र कोरडेच

अवकाळीमुळे एकीकडे पिकांना धोका निर्माण झाला असताना धरणक्षेत्रालाही या पावसाचा फारसा फायदा नसल्याचे पहावयास मिळत आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर यासारख्या क्षेत्रांमध्ये अवघा सहा आणि तीन मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी वाढण्याकामी या पावसाचा उपयोग नाही. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला तरच गंगापूर, दारणासह अन्य धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत होऊ शकेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गारपीट टळल्याने दिलासा

जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात २२ ते २४ नोव्हेंबर या तीन दिवसात गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, त्यातील २२ आणि २३ नोव्हेंबर या दोन दिवसात गारपीट न झाल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. हवामानाचा अंदाज चुकला असला तरी मंगळवारी देखील गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने अजूनही शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.


शहरात ३.४ मि.मी. पाऊस

सलग तिसऱ्या दिवशी शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर मोठ्या प्रमाणावर ढग दाटून आले. त्यामुळे सायंकाळी पाचपासूनच अंधार होण्यास सुरुवात झाली. नाशिकचे सोमवारचे तापमान किमान २०.४ अंश सेल्सियस तर कमाल तापमान ३० अंश सेल्सियस ऐवढे राहिले. सकाळी साडेआठपर्यंत शहरात ३.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. सोमवारी मात्र केवळ पावसाची भूरभूर झाली.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगर परिसरात दुचाकी पेटवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोडसह उपनगर परिसरात वाहन जाळपोळीचे सत्र सुरूच आहे. उपनगर येथे घरासमोर उभी दुचाकी जाळण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पंचशीलनगरमध्ये राहणारे हरेंद्र जग्गनाथ पगारे यांनी रविवारी रात्री घरासमोर आपली दुचाकी (एम.एच.१५ए.ई. ८६६२) उभी केली होती. मध्यरात्री अज्ञात व्यक्तांनी त्यांची दुचाकी पेटवून दिली. जळण्याचा वास आल्याने पगारे घराबाहेर आले असता दुचाकी पेटलेली दिसली. तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बसचालकाचा मृत्यू

शिंदे गावात महामार्गावर बसची वाट पाहत असलेल्या बसचालकाला ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे गावाचे रहिवासी भरत लक्ष्मण निंबाळकर हे एसटी महामंडळात सेवेत आहेत. ते कामावर जाण्यासाठी सोमवारी पहाटे नाशिक-पुणे महामार्गावर बसची प्रतीक्षा करीत होते. त्याचवेळी सिन्नरहून नाशिककडे वेगाने चाललेल्या ट्रकने (एम.एच.१२ क्यू. क्यू. ८८९२) त्यांना जोरदार धडक दिली. त्यात निबांळकर यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जेलरोडला घरफोडी

जेलरोड येथे सुमारे पावणेतीन लाखाची घरफोडी झाली. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश गणपती करंजकर (वय ६५, आसावरी बंगली, लोखंडे मळा, सायखेडा रोड) यांनी फिर्याद दिली आहे. दि. २० ते २१ नोव्हेंबरला करंजकर कुटुंबीय घरी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी बंगल्याच्या खिडकीचे गज कापून बेडरूममध्ये प्रवेश केला. लाकडी कपाटाचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली.

महिलेचा मृत्यू

सातपूर : सातपूर कॉलनीतील समतानगर भागात राहणाऱ्या सुरेखा विजय जाधव (वय ३५) यांना पहाटे साडेसात वाजता घरातील पिण्याच्या इलेक्ट्रिक पंपाचा झटका लागल्याने गंभीर दुखापत झाली होती. भाऊ सोमनाथ शिंदे यांनी सुरेखा यांना जिल्हा रुग्णालायत दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. सातपूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, सहाय्यक पोलिस निरिक्षक वाघ अधिक तपास करीत आहेत.

तरुणाची आत्महत्या

सातपूर : सातपूरच्या अशोकनगर भागात राहणारा आशिष दत्तात्रय खांडगे (वय २७) या तरुणाने २१ नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास विषारी औषध सेवन केले होते. यानंतर पहाटे आशिषचे वडील दत्तात्रय खांडगे यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. सातपूर पोलिसात नोंद करण्यात करण्यात आली आहे.

युवकाचा मृत्यू

वेगात जाणाऱ्या अल्टोकारने फ्लायओव्हरवरील डिव्हायडरला धडक दिल्याने सौरव शंकर आव्हाड (वय १८) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई नाक्याकडून द्वारकाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर राष्ट्रवादी भवन कार्यालयासमोर संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात आणखी दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्याबाबत अधिक माहिती घेण्याचे तसेच अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्याचे उशिरापर्यंत भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images