Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

गोळीबार करत लामकानीत लूट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

लामकानी गावातील ज्वेलर्स दुकान बंद करून दागिने व रोकड घेऊन घराकडे परतणाऱ्या व्यापाऱ्यावर चार मोटरसायकलींवर आलेल्या आठ ते नऊ दरोडेखोरांनी छर्याच्या बंदुकीतून ३० ते ३५ गोळ्या झाडत दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवज लुटला. ही घटना धनत्रयोदशीच्या दिवशी सोमवारी लामकानी गावात घडली असून, जखमी व्यापाऱ्यावर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लामकानी गावात बसस्थानकाच्या परिसरात अनिल उत्तमचंद बाफना (वय ३५) यांचे बाफना ज्वेलर्स नावाचे सोने-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. धनत्रोदशीच्या दिवशी सोमवारी बाफना पूजाविधी आटोपून नेहमीप्रमाणे रात्री आठच्या सुमारास दुकानातील सर्व दागिने व रोख रक्कम घेऊन मारुती ओम्नी व्हॅनने घराकडे निघाले. मात्र, घरी पोहोचताच त्यांच्या गाडीला मोटरसायकलवरून आलेल्या आठ ते नऊ दरोडेखोरांनी घेरले. त्यांनी छर्याच्या बंदुकीतून बाफना यांच्यावर गोळ्या झाडल्या व दागिने, रोख रक्कम असलेली बॅग घेऊन पसार झाले.

जिल्हाभरात नाकाबंदी

पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक हिंमत जाधव, सोनगीर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक धनंजय पाटील यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. लामकानी परिसरात चार मोटरसायकली आढळून आल्या असून, त्या दरोडेखोरांच्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोनगीर शिवारात दागिन्यांची डबी आढळली असून, दरोडेखोर जंगलातून पसार झाल्याचा अंदाज सोनगीर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांनी व्यक्त केले. त्या दिशेने तपास सुरू आहे.

पत्नीसह व्यापारी जखमी

या वेळी बाफना यांची पत्नी प्रिया यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली असता, त्यांच्या पाठीत लाकडी दांडा मारला. त्यात त्या जागीच बेशुद्ध पडल्या. या घटनेत अनिल बाफना गंभीर जखमी झाल्याने त्यांना धुळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पोटातून व हातातून ३० ते ३५ छर्रे काढण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हरणांच्या धडकेत मुलीचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

भरधाव वेगाने रस्ता ओलांडणाऱ्या एका हरणाच्या कळपाची रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या मोटरसायकलला धडक बसल्याने एका पंधरा वर्षीय मुलीला प्राण गमवावे लागले. येवला तालुक्यातील मातूलठाण-धामोडे रस्त्यावर नित्यानंद शिवारात ही दुर्दैवी घटना घटली.

येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात वनविभागाचे विस्तीर्ण असे क्षेत्र असून, त्यात हजारोंच्या संख्यने हरिणांचा संचार आहे. त्यातही तालुक्याच्या भारम शिवारात अगदी मोठ्या संख्येने हरिण आहेत. वनक्षेत्र सोडून हे हरिण नेहमीच नागरी वाड्या वस्त्या व शेतांकडे धाव घेत असतात. रात्री आठ वाजेच्या सुमारास असाच एक हरणांचा कळप भटकत असताना या कळपाने येवला तालुक्यातील धामोडे-मातृलठाण रस्त्यावर नित्यानंद नगर शिवारात रस्ता क्रॉस करण्याच्या हेतूने झेप घेतली. त्याचवेळेस या रस्त्यावरून मोटरसायकल जात असताना ती या हरिणांच्या कळपाच्या कात्रीत सापडली. या दुर्घटनेत मोटरसायकलवरील कावेरी गोरख दाणे (वय १५) ही जागेवरच ठार झाली. तिचे वडील गोरख बाबुराव दाणे (वय ४६) गंभीर जखमी झाले. तालुक्यातील येवला-भारम रस्त्यावर धामणगाव शिवारात हरिण व मोटरसायकलच्या धडकेत सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास न्याहारखेडा येथील पुंडलिक देवचंद गुंजाळ (वय ३२), जनार्दन सोमनाथ लांडे हेही गंभीर जखमी झाले. जखमींवर येवला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मातूलठाण येथील कावेरी दाणे ही धामोडे येथे मामाकडे शिक्षणासाठी राहात होती. येवला तालुक्यातील धामोडे येथील गुरुदत्त माध्यमिक विद्यालयात नववीत ती शिकत होती. कावेरीचे वडील गोरख दाणे हे आपल्या लाडक्या एकुलत्या एक मुलीला दिवाळीच्या सणासाठी घेण्यास येताना सायंकाळी साडेसात वाजता जेवण आटोपून ते आपल्या लेकीसह मोटरसायकलने घरी निघाले होते. गोरख दाणे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर येवला येथील खासगी रुग्णालयात उपचार सूरू आहे.

आतूरता कायमचीच राहिली!

धामोडे ते मातूलठाण सहा किलोमीटरचे अंतर. आता थोड्यावेळाने माझी बबली (कावेरी) येईल, तिच्याशी गप्पागोष्टी करून आपलं मन हलकं करायचय असं कावेरीच्या आईला वाटत होतं. दिवाळीची आवराआवर करायची म्हणून आईसह दोन लहान भाऊ देखील आपल्या ताईची अगदी आतूरतेने वाट बघत होते. मात्र ही भेट काही होऊ शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्र्याने तोडले २२ जनावरांचे लचके

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

ऐन दिवाळी सणाच्या काळात बुधवारच्या लक्ष्मीपूजनाच्या भल्या पहाटे पिसाळलेल्या कुत्र्याने येवला तालुक्यातील न्याहारखेडे या गावाबरोबरच तालुक्यातील अंगुलगाव या ठिकाणी चांगलाच धुमाकूळ घातला. सैरभैर झालेल्या व दिसेल त्याचे लचके तोडत सुटलेल्या या पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यात अनेकजण जखमी झाले. यामध्ये अनेक शेतकऱ्यांची पाळीव जनावरे देखील सुटली नाहीत.

येवला तालुक्यातील न्याहारखेडे येथे बुधवारी मध्यरात्री ते पहाटेदरम्यान तब्बल चार तास एका पिसाळलेल्या कुत्र्याने मोठा हैदोस घातला. मध्यरात्री दोन ते पहाटे सहा वाजेपर्यंत या पिसाळलेल्या कुत्र्याने न्याहारखेडे येथील सहा जणांबरोबरच २२ जनावरांना चावा घेतला. या पिसाळलेल्या कुत्र्याने एका महिलेच्या हाताचे बोट अक्षरक्षः तोडून घेतले, तर एका वृध्दाच्या डोळा व नाकाच्या मधील भागाचा लचका तोडल्याने तो गंभीर जखमी झाला. अखेर एका ग्रामस्थाने हिमतीने पुढे सरसावत या कुत्र्याला ठार मारल्याने न्याहारखेडे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. जखमींना येवला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी त्यांना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

जखमींना रेबीप्युअर व टिटॅनसचे इंजेक्शन देऊन प्रथमोपचार केले आहेत. पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यावरील उपचारासाठी इमिनोग्लोबलीन हे महागडे इंजेक्शन आवश्यक असते. ते नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असून, ते देताना इतर वैद्यकीय सुविधा गरजेच्या असतात. त्या येथे नसल्याने अशा रुग्णांना नाशिक येथे हलवावे लागते. त्यामुळे या जखमींना तत्काळ नाशिक येथे पाठवण्यात आले. - डॉ. एस. डी. सदावर्ते, वैद्यकीय अधीक्षक, येवला ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय

अंगुलगाव येथेही पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांना चावा घेतल्याची घटना घडली. अंगुलगाव येथे एका शाळकरी विद्यार्थ्याला आणि एका वासरीला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. घराबाहेर झोपलेल्या वृध्द महिला व पुरुष यांच्यासह तरुणांना या कुत्र्याने चावून जखमी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्नास वर्षांनी उजळली वस्ती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

दीपावली म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय, अज्ञानातून ज्ञानाकडे वाटचाल, तिमिरातूनी तेजाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! पण, गेली पन्नास वर्ष दीपावलीच्या या तेजोमय प्रकाशापासून दुरावलेल्या मालेगाव तालुक्यातील गिरणा डॅम वस्तीवर महाराष्ट्र शिक्षक समिती मालेगाव शाखेच्या प्रयत्नांनातून सौरदिवे लावण्यात आल्याने खऱ्या अर्थाने दीपावलीत प्रकाशाची वाट या वस्तीला मिळाली.

मालेगाव तालुक्यातील उंबरदे जवळील गिरणा डॅम वस्तीवर गेल्या पन्नास वर्षांत विद्युत जोडणीच झालेली नसल्याने आजवर रात्रीच्या काळोखात हे गाव गडप होत असे. दरवर्षी दीपावलीच्या सणात सर्वत्र प्रकाशाची उधळण होत असताना डॅम वस्तीवरील आदिवासी बांधव अंधकारमय जीवन जगत होते. हे चित्र बदलायला हवे असा विचार शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पंचायत समिती सभापती भरत पवार व उपसभापती यशवंत मानकर यांनी व्यक्त केला.

शिक्षक समितीच्या सदस्यांनी यंदाची दिवाळी ही डॅम वस्तीवरील आदिवासी बांधवांच्या आयुष्यातील गेल्या कित्येक वर्षांतील अंधकार मिटवण्यासाठी साजरा करू या, असा संकल्प करीत कामाला सुरुवात केली. समितीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र दिघे व त्यांचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी वस्तीचा पाहणी दौरा करून वस्तुस्थिती किती भयानक आहे, हे समजून घेतले. वस्तीवर केवळ विद्युत जोडणीच नाही तर शिक्षणाची अवस्था देखील दयनीय असल्याचे लक्षात आले. शिक्षक समितीत सर्वच शिक्षक कार्यरते असल्याने मग गावातील अंधकारच नाही तर दर्जेदार व इ लर्निंग शिक्षणाच्या माध्यमातून अज्ञानाचा अंधकार देखील दूर करण्यासाठी गावच दत्तक घेतले.

गिरणा डॅम आदिवासी वस्तीचा सर्वांगिण विकास करून समाजाच्या मुख्य प्रवाहात गाव कसे येईल यासाठी काम सुरू केले असून, दिवाळीच्या वसुबारस सणापासून या वस्तीवर दिवाळीमय वातावरण तयार झाले आहे. त्यासाठी गावाची स्वच्छता मोहीम, रंगरंगोटी, श्रमदान, आरोग्यविषयक जागृती, शिक्षणविषयक जागृतीचे कार्यक्रम समितीच्या कार्यकर्त्यांनी राबविले आहेत. सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत धनत्रयोदशी या दिवशी वस्तीत लावण्यात आलेल्या सौर दिव्यांनी वस्ती प्रकाशाने उजळून निघाली. यामुळे आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू तरळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांची दिवाळी; नागरिकांचे दिवाळे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात ऐन दिवाळीच्या हंगामात बुलेटसारखी महागडी वाहने, आयफोनसारखे महागडे मोबाइल्स लंपास करून चोरट्यांनी नागरिकांचे दिवाळे काढले. शहरात लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या तीन दिवसात चोरट्यांनी तब्बल तीन लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. या प्रकरणी शहरातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशन्समध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजी बाजार, बसस्थानके, रविवार कारंजा बाजारपेठ यासारख्या गर्दीच्या परिसरात चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्या. पंचवटीतील हिरावाडी भाजी बाजारात प्रवीण गोटीराम कुलथे (४७, रा. विनायक सोसायटी, हिरावाडी) यांचे आयफोनसह ६० हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल चोरीस गेले. त्यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. कुलथे भाजी खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.

रविवार कारंजा येथे खरेदीसाठी गेलेल्या नंदन विठ्ठल बागडे (वय ४८, रा. आरटीओ कॉलनीमागे, पंचवटी) यांच्याजवळील १८ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरट्याने लांबविला. लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. काठेगल्लीतून अनुप विजय सोनजे (२८, रा. सावता माळी गार्डन, काठेगल्ली) यांची मोटरसायकल चोरीस गेली. सोमवार पेठेतील प्रांजल प्रकाश देव (वय ३५) यांच्या उदय जनरल स्टोअर्समधून सहा हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरट्यांनी लांबविला. राणाप्रताप चौकात बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने एलईडी टीव्ही, सिलिंडर असा ११ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. रफीक सलील पठाण (वय २४) यांनी अंबड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. सिंहस्थनगर येथील मैदानाजवळून संजय भाऊराव निकम यांची १५ हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरीस गेली.

गंगापूर रोड परिसरातील आदित्य पेट्रोल पंपाजवळील रंगतरंग अपार्टमेंटच्या वाहनतळातून ज्योती चौधरी यांची मोपेड मोटरसायकल चोरीस गेली. गंगापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ध्रुवनगर येथील पवार हॉस्पिटलजवळून चोरट्याने ७५ हजार रुपये किमतीची रॉयल इनफिल्ड मोटरसायकल चोरीस गेल्याची तक्रार प्रतिक गुलाबराव बागुल यांनी दिली. मखमलाबाद गावातील महात्मा फुले चौकातून कांतीलाल राजाराम तिडके यांची ६५ हजार रुपये किमतीची रॉयल इनफिल्ड मोटरसायकल चोरीस गेल्याची फिर्याद पंचवटी पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे. भद्रकालीतील सायंतारा हॉटेलजवळून अरमाण प्रवीण शर्मा (वय २३) यांचा ३५ हजार रुपये किमतीचा आयफोन चोरीस गेला. जाखोरी येथे कारची काच फोडून चोरट्याने टॅबसह बँकेची महत्त्वाची कागदतपत्रे चोरून नेल्याची फिर्याद विश्वास जगन्नाथ करमरकर यांनी नाशि‌करोड पोलिस स्टेशनमध्ये दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंपळगाव बसवंतची टोलवाढ लांबणीवर

$
0
0

नाशिक : मुंबई-आग्रा हायवेवरील पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्याची दरवाढ अखेर लांबली आहे. १५ नोव्हेंबरपासून नाशिक जिल्ह्यातील एमएच १५ आणि एमएच ४१ या मोठ्या वाहनांना (मल्टीएक्सल) ही टोलवाढ लागू होण्याचे प्रस्तावित होते. सद्यस्थितीत या वाहनांना २१० रुपये लागत आहेत. नव्या दरवाढीत ते थेट ६९० रुपये लागणार असल्याने वाहतूकदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यासंदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आल्याने ही टोलदरवाढ लांबविण्यात आली आहे. यासंदर्भात निफाडचे प्रांत डॉ. संदीप आहेर यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच एक बैठक घेण्यात येणार आहे. त्यात आंदोलनाचा इशारा देण्यात आलेल्या संस्था, संघटना तसेच व्यक्ती यांच्यासह राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोतया पोलिसांनी वृध्दाला लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परिसरात चोरीचे प्रकार खूप वाढत असल्याने आम्ही पेट्रोलिंग करीत आहोत. तुमच्या जवळील मौल्यवान वस्तू खिशात ठेवा, असे सांगत तोतया पोलिसांनी एका वृध्दाची सोनसाखळी, अंगठ्या असा ५० हजारांचा ऐवज लांबविला.

इंदिरानगर परिसरात गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. अरविंद राजाराम पाटील (वय ७५, रा. सिध्दी विनायक सोसायटी, इंदिरानगर) यांनी फिर्याद दिली. रस्त्याने पायी जात असताना मोटरसायकलवरून दोघेजण त्यांच्याजवळ आले. आमच्या हद्दीमध्ये चोरीच्या घटना खूप वाढत असल्याने आम्ही पेट्रो‌लिंग करीत आहोत. तुमच्या जवळील मौल्यवान वस्तू रूमालात बांधून ठेवा, असे सांगत त्यांनी पाटील यांचा विश्वास संपादन केला. पाटील यांनी सोनसाखळी रुमालात बांधून खिशात ठेवली. चोरट्यांनी पुन्हा तो रूमाल व्यवस्थित ठेवण्यासाठी बाहेर काढण्यास सांगितले. पाटील यांच्या खिशात तो रूमाल ठेवण्याचा बहाणा करून सोनसाखळी लांबविण्यात आली. तोतया पोलिसांकडून वारंवार लुटीचे प्रकार घडत असल्याने त्यांना आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

पोलिसाला धक्काबुक्की

दोन गटांत झालेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसाला धक्काबुक्की करून त्यांच्याकडील सरकारी मोटरसायकलचे नुकसान करण्यात आले. आगार टाकळी परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. नाना ढवळे, कुणाल साळवे, सुगन निर्मळ, मोगली दाणी (सर्व रा. समतानगर, आगार टाकळी) अशी त्यांची नावे आहेत. पोलिस नाईक मनोज विजयसिंग परदेशी यांनी फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चायनीज विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एका नगरसेवकाच्या मुलाच्या नावे धमकावूनही चायनीज विक्रेत्याने २५ हजारांची खंडणी न दिल्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. शरणपूररोडवरील तिबेटियन मार्केटमध्ये गुरुवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास हा प्रकार घडला. सरकारवाडा पोलिसांनी या प्रकरणी २० संशयितांवर जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

फरसबल बहादूर कुंवर उर्फ विनोद यांनी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. तिबेटियन मार्केटमध्ये त्यांचा चायनीजचा व्यवसाय आहे. गुरुवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास मार्केटमध्ये संशयित विशाल शिरसाठ, जेम्स मायकल, सनी मोहिते, दीपक कांबळे, राजेश जेम्स, अजय पाटणकर, केशव वाधवा, विकास वाघमारे, चंदू दायजी यांच्यासह आणखी १० संशयित आले. विनोद यांच्याकडे २५ हजार रुपयांची खंडणी मागितली. मात्र, विनोद यांनी त्यापैकी काही रक्कम दिली. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी तू जॉय कांबळे याचा आदेश मानला नाही तर तुला संपवून टाकू, असे धमकावत त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. लोखंडी रॉड, दगडांनी त्यास मारहाण केली. तसेच तेथे उभ्या एका महिलेचा विनयभंग केला. विनोद यांच्या मुलास देखील मारहाण करून दुकानातील सामानाची तोडफोड करण्यात आली. जेम्स मायकल आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्यांनी’ लुटला दिवाळीचा आनंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीची आणि त्यांची फारशी ओळख नाही. गरीबी आणि मागासलेपणामुळे त्यांना रोजचाच दिवस सारखा, रोज दोनवेळ पोटभर जेवायला मिळालं तरी आनंद विराळाच. अशा आपल्याच समाजबांधवांच्या मुखात मिठाई भरून, त्यांना फराळाचे वाटप करून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करण्यात आली.

नाशिक शहरात विकासाची घौडदौड सुरू असली तरी अवघ्या ४० ते ५० किलोमीटरवर आदिवासी बांधव अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ‌दिवस कंठताना दिसून येतात. यंदा अशा आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचून, त्यांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करून काही संस्थांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. अशोकनगर येथील मातोश्री सिंधुबाई एज्युकेशन चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने त्र्यंबकेश्वर हरसुल रस्त्यावरील नांदगाव कोहळी या गावातील आदिवासी कुटुंबातील चिमुकले आणि वृध्दांना फराळाचे पदार्थ आणि खाऊचे वाटप करण्यात आले. खाऊ घेऊन कार्यकर्ते गावात पोहोचताच तेथील पारावर शंभर ते सव्वाशे चिमुकले जमा झाले. त्यांना तसेच गावातील वृध्द नागरिकांनाही फराळाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर त्र्यंबकेश्वर नाशिक रस्त्यावरील डॉ. रत्नाकर पवार संचलित अनाथाश्रमातील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. संतोष निकम, पंकज कुलकर्णी, हरिष भाबड, प्रसाद सुर्यवंशी, चंद्रभान घुगे, संदेश शिंदे, पंकज भापकर आदींनी उपक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

कर्मयोगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने तळेगाव जवळील वाघमारापाडा, धुमाळपाडा, जावळ्याची वाडी, शिंदे वाडी या ठिकाणी फराळ तसेच कपडे वाटप करण्यात आले. असा उपक्रम राबविण्याचे यंदाचे सातवे वर्ष होते. संस्थेचे अध्यक्ष पंकज पळसकर, राजु मानवतकर, स्वप्नील अग्रवाल, काशिनाथ खडसे, सदाशिव नाईक, प्रकाश चव्हाण, देवेंद्र प्रसाद आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प‌रिश्रम घेतले.

निरीक्षणगृहातही फुलला आनंद
दिवाळीसारख्या मोठ्या सणाचे सेलिब्रेशन करण्यासाठी सामान्य घरांमध्ये मोठी उत्सुकता असते. फटाके, नवीन कपडे, फराळ आदी तयारी घराघरांमध्ये केली जाते. मात्र या सर्व आनंदापासून समाजातील अनाथ मुले मात्र मुकत असतात. या मुलांनाही दिवाळीचा आनंद उत्स्फूर्तपणे लुटता यावा, यासाठी 'निरीक्षणगृह व बालगृह' येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी साजरी करण्यात आली.

उंटवाडी येथील निरीक्षणगृह व बालगृहात संस्थेचे मानद सचिव चंदुलाल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी साजरी करण्यात आली. शहरातील इतर सामान्य कुटुंबात होते अगदी तशीच. प्रामुख्याने भाऊ-बहिणीच्या नात्याची वीण आणखी मजबूत करणारी भाऊबीज येथे साजरी करण्यात आली. मुला-मुलींना भाऊबीजेच्या सकाळीच नवीन कपडे देण्यात आले. मुलींनी आपल्या निरीक्षण गृहातील भावांसाठी आखीव-रेखीव रांगोळ्या रेखाटून त्यांना ओवाळले. मुलांनीही आपापल्यापरीने बहिणींना ओवाळणी घातली.

त्यानंतर संस्थेत संध्याकाळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांच्या हस्ते फटाके वाटप करण्यात आले. बाहेर फटाके फोडण्याचा उत्साह सुरू असताना संस्थेतील बालके या आनंदापासून वंचित राहू नये, यासाठी नाशिक फटाका असोसिएशनच्या सहकाऱ्याने फटाके देण्यात आले होते. तसेच शहरातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या मदतीने फराळ वाटपही करण्यात आले. एखाद्या सामान्य कुटुंबात ज्याप्रमाणे दिवाळी साजरी होते, त्याप्रमाणे दिवाळी साजरी करण्यात आली. निरीक्षणगृहात राहताना या मुलांना आपल्या एकटेपणाची जाणीव होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेत मोठ्या मायेने संस्थेतील कर्मचाऱ्यांनी दिवाळी साजरी केली.

संस्थेतील मुला-मुलींची दिवाळी कौटुंबिक वातावरणात साजरी व्हावी व त्यांना वंचित असल्याची जाणीव होऊ नये, यासाठी दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते. एका सामान्य कुटुंबात असेल त्या सर्वांचाच आनंद मुला-मुलींना संस्थेतही मिळतो.

- चंदुलाल शहा, मानद सचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शो हाऊसफुल्ल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीनिमित्त रसिकांच्या भेटीला आलेल्या सर्वच चित्रपटांना नाशिकमध्ये मोठा प्रतिसाद लाभत असून, सर्व शो हाऊसफुल्ल असल्याचे निदर्शनास येत आहे. खासकरुन, फॅमिलीसह चित्रपटाला जाण्याचा ट्रेंड यंदा दिसून येत असल्याने मनोरंजन क्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 'प्रेम रतन धन पायो' हा हिंदी तर 'मुंबई-पुणे-मुंबई' आणि 'कट्यार काळजात घुसली' हे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. दरवेळी शुक्रवारी रिलीज होणारे चित्रपट यंदा दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच गुरुवारी प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाले. या तिन्ही चित्रपटांची यापूर्वीच मोठे प्रमोशन करण्यात आल्याने बहुतांश प्रेक्षकांना या चित्रपटांची मोठी उत्सुकता होती. सहाजिकच फर्स्ट डे, फर्स्ट शो पासून सर्वच शो ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळेच शहरातील मल्ट‌प्लिेक्स आणि चित्रपटगृहे गर्दीने भरल्याचे दिसून येत आहे.

प्रेक्षकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे चित्रपटाचे तिक‌टिही महागले आहेत. मराठी चित्रपट हे टॅक्स फ्री असल्याने त्यांची किंमत मल्ट‌प्लिेक्स मध्ये १२५ रुपयांच्या पुढेच आहे. तर, हिंदी चित्रपटाचे तिकीट हे किमान २०० रुपये एवढे आहे. वाढत्या प्रतिसादामुळे हिंदी चित्रपटाचे तिकीट हे ३५० ते ४०० रुपयांनाही विक्री होत आहे.मल्टीप्लेक्स मधील चित्रपटाचे बुक‌िंग मोठ्या प्रमाणात ऑनलाइन करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलच्या दगडी भिंतींना फुटला पाझर!

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : जेल आणि माणुसकी असे विरोधाभासी चित्र सर्वसामान्यांच्या मनात घर करून असते. मात्र, काही महिन्यांपासून नाशिक सेंट्रल जेलमधील हे नकारात्मक चित्र काहीअंशी पुसले गेले. जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कमलबाई रामदास अहिरे (वय ७०) या महिलेची जेल प्रशासनाने अखेरच्या श्वासापर्यंत सेवा करीत माणुसकी जपली.

सासू सुनेच्या भांडणानंतर काहीतरी अघटित घडले. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात राहणाऱ्या कमलबाई रामदास अहिरे आणि त्यांचा मुलगा जिभाऊ यास पोलिसांनी अटक केली. पुढे काही काळ कोर्टात सुनावणी झाली. सुनेला जीवे मारल्याचा आरोप सिध्द झाल्याने कोर्टाने माय-लेकास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. उतारवयाची सुरुवात होत असतानाच कमलबाई आणि जिभाऊ यांना पोलिसांनी नाशिक सेंट्रल जेलच्या गेटपर्यंत सोडले. यानंतर अहिरे माय-लेकांचा हळूहळू सर्वांशी संपर्क सुटला. कालौघात कमलबाईची तब्येत वयोमानानुसार ढासळू लागली. सत्तर वर्षीय कमलबाई सतत अंथरूणाला खिळून राहू लागल्याने त्यांना बेड सोराईसीस होण्याचा धोका निर्माण झाला. याची सर्व माहिती समजलेले नाशिक सेंट्रल जेलचे जेलर रमेश कांबळे अस्वस्थ झाले. कमलबाईची मृत्यूकडे चाललेली वाटचाल सर्वांना दिसत होती. आता, ती खडतर वाटचाल सुकर करण्यासाठी कांबळे यांनी कमलबाईंना वॉटरबेडची तजवीज केली. कैद्यांना वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात. त्यातूनच कमलबाईला वॉटरबेड देण्यात आले, असे जेलर कांबळे यांनी सांगितले. काही कालावधीनंतर आम्ही त्यांचा मुलगा जिभाऊ यास त्यांना भेटण्याची मंजुरी दिली. आमच्या एका मंजुरीमुळे शेवटच्या श्वासापर्यंत मुलाला त्याच्या आईची सेवा करता आली. माणुसकीच्या पलिकडे जाऊन केलेला हा प्रयत्न कैदी बनून जगणाऱ्या जिभाऊच्या मनात कोठेतरी नि​श्चितच कोरला जाईल, अशी अपेक्षा कांब‍ळे यांना आहे. कमलबाईचे २९ ऑक्टोबर रोजी ​जेलमध्येच निधन झाले. मात्र, कैदी नव्हे तर व्यक्ती म्हणून त्यांची सर्वांनी केलेली सेवा, त्यातून निर्माण झालेले प्रेम इतर कैद्यांना नक्कीच परिवर्तनाची दिशा देईल, असा दावा कांबळे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीत ५०० कोटींची उलाढाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मांगल्यमयी दीपावलीमुळे शहरात यंदा किमान ५०० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. सोने, कपडे, वाहन, रिअल इस्टेट, इंटेरिअर यांसह विविध प्रकारच्या खरेदी-विक्रीने बाजारपेठेतील मगरळ झटकली गेली असून, व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.

यंदा पावसाने सरासरी न गाठल्याने दुष्काळी स्थिती आहे. परिणामी, शेतकऱ्यांसह बाजारपेठेतही काहीसे चिंतेचे वातावरण होते. मात्र, चैतन्यमयी नवरात्र आणि दिवाळीच्या उत्सवाने मंदी आणि दुष्काळाचे झाकोळ काहीसे दूर सारले गेले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून शहरातील बाजारामध्ये

उत्साहाचे वातावरण पहायला मि‍ळाले. कपडे, सोने, चांदी, वाहने, इंटेरिअर, मोबाईल, लॅपटॉप्स, होम अप्लायन्सेस, घरे आदींच्या खरेदी-विक्रीने मोठा वेग घेतला होता. सोने आणि चांदी यांचे ऐन दिवाळीत भाव घसरल्याने ग्राहकांनी त्यास मोठा प्रतिसाद दिला. रिअल इस्टेट क्षेत्रातही दसऱ्यापूर्वी काहीसे मंदीचे वातावरण होते. मात्र, दिवाळीच्या निमित्ताने २५० फ्लॅट्सची विक्री झाल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष जयेश ठक्कर यांनी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून होम अप्लायन्सेस आणि डिजिटल वस्तूंना मागणी वाढली आहे. यंदाही हा ट्रेंड कायम असल्याचे पहावयास मिळाले. त्यानुसार मोबाईल, लॅपटॉपची थेट तसेच ऑनलाइन खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, दिवाळीत शहरात सुमारे ५०० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून दुष्काळ आणि मंदीच्या वातावरणामूळे आलेली मरगळ झटकली गेली आहे.

सोने-चांदीची २०० कोटींची उलाढाल...

नाशिकमध्ये लहान-मोठ्या सुमारे ८०० सराफी पेढ्या आहेत. या सर्वपेढ्यांमध्ये मिळून यंदा दोनशे कोटींची उलाढाल झाली असावी, असा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. गतवर्षीपेक्षा यंदा सोन्याचा दर प्रतितोळा एक हजार रुपयांनी कमी होता. त्यामुळे महिला वर्गाने धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंतचा मुहूर्त साधत दागिन्यांच्या खरेदीला पसंती दिली. अनेक सराफी पेढ्यांनी लकी ड्रॉ योजनेसह आकर्षक स्कीम ठेवल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

वाहन उद्योगाला बूस्ट

बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याला वाहन खरेदीला प्राधान्य दिले जाते. यंदाही शहरात ५० हजारांपासून दीड दोन लाख रुपये किंमती पर्यंतच्या वाहनांची मोठी विक्री झाली. शहरात वाहन विक्रीची १० हून अधिक शोरूम आहेत. तेथे सुमारे २० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. यंदा कारलाही मोठी मागणी असल्याचे पहावयास मिळाले. क्रयशक्ती वाढल्याने शहरातील शोरूम्समध्ये ग्राहकांची गर्दी होती. शहरात सुमारे आठशे नवीन कार रस्त्यावर उतरल्या असून त्यातून ७० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

एलईडीला पसंती

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीलाही यंदा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचे १०० हून अधिक शोरूम आहेत. विशेष म्हणजे यंदा नागरिकांची सर्वाधिक मागणी ३२ ते ४0 इंची एलईडी टीव्हींना होती अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. २० ते ५० हजार रुपये किंमत असलेल्या एलईडींची मोठ्या संख्येने खरेदी झाली. त्याखालोखाल मोबाईल्स, फ्रीज, वॉशिंग मशीन खरदीला पसंती देण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठेत सुमारे ६० ते ७० कोटींपर्यंत उलाढाल झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

आनंद द्विगुणीत

बच्चे मंडळी, महिलावर्गाने यंदाही कपडे आणि साड्या खरेदीला पसंती दिली. शहरात कपडे विक्रीची ७५० ते ८०० दुकाने आहेत. तेथे गेले आठवडाभर ग्राहकांची कपडे खरेदीसाठी गर्दी असायची. त्यामुळे दुकानांच्या वेळाही वाढविण्यात आल्या होत्या. शहरात केवळ कपडे व्यवसायात ५० कोटींपर्यंतची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.

ऑनलाइन मार्केट जोरात

अमॅझॉन, फ्लीपकार्ट, स्नॅप डिल, शॉप क्ल्यूज, जबाँग, इ-बे, माईंत्रा, वुणीक यांसारख्या ऑनलाइन कंपन्यांच्या माध्यमातून ऑनलाईन शॉपींगला ग्राहकांनी पसंती दिली. मनासारखी वस्तू थेट घरपोच दिली जात असल्याने अन् ती पसंत न पडल्यास परत घेतली जात असल्याने यंदा ऑनलाइन शॉपिंगवरील ऑफर्सवर ग्राहकांच्या उड्या पडल्या. शहरात दुकाने थाटणाऱ्या व्यावसायिकांना मात्र त्याचा मोठा फटका बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये आजपासून एक्झाम फिव्हर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या चालू शैक्षणिक वर्षातील पहिल्या सेमिस्टरच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, आजपासून परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे इंजिनीअरिंग कॉलेजेसमध्ये आजपासून एक्झाम फिव्हर असणार आहे.

विद्यार्थ्यांचे सबमिशन, ओरल, प्रॅक्टिकल दिवाळीपूर्वीच विद्यापीठामार्फत घेण्यात आले होते. लेखी परीक्षा मात्र दरवर्षीप्रमाणे नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान होत असते. त्या पार्श्वभूमीवर सोमवार (दि. १६) पासून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. पदवी परीक्षांबरोबरच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या डिप्लोमा परीक्षा १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. सर्व शाखांच्या परीक्षांचा यामध्ये समावेश असणार आहे. साधारणपणे १० डिसेंबरपर्यंत या परीक्षा सुरू राहणार आहेत. दिवाळीनंतर इंजिनीअरिंगच्या परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळाला. मात्र, दिवाळीच अभ्यासात जात असल्याने सणाचा आनंद लुटता आला नाही.

विद्यार्थ्यांची नाराजी

ज्या विद्यार्थ्यांना बॅकलॉग होते, त्या विद्यार्थ्यांचे पुनर्तपासणीचे रिझल्ट वेळेत न लागल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा ते पेपर द्यावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. पेपर पुन्हा देण्याच्या मनस्तापाबरोबरच पैशांचा अपव्ययही होत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समाजाला गरज सशक्त विचारांची’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजात केलेली सशक्त विचारांची आतषबाजी हीच समाजातील दूषित विचार दूर करेल. आज घडत असलेल्या नकारात्मक घडामोडी पाहता, समाजाला सशक्त विचार देण्याची तसेच अंधश्रद्धा मिटविण्याची गरज आहे, असे मत प्रा. शिरीष गंधे यांनी व्यक्त केले.

अमरधाम विकास समितीकडून पिंपळगावजवळ स्मशानभूमीत आयोजित केलेल्या 'स्मशानातील दिवाळी' या अनोख्या कार्यक्रमात ते बोलत होते. या उपक्रमाचे यंदाचे पाचवे वर्ष होते. अमरधाम विकास समितीची माहिती यावेळी समितीचे शाम मोरे यांनी दिली. ते म्हणाले की, परिसरात तरुणवर्ग पाच वर्षांपासून ग्रामस्वच्छता अभियान राबवित आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील पहिली अमरधाम विकास समिती स्थापन केली आहे. प्रा. गंधे यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी स्मशानभूमीतील दिवाळी साजरी केली जाते. यानिमित्त येथे आकर्षक रांगोळ्या, दिवे, आकाश कंदील लावून विद्युत रोषणाई करण्यात करण्यात आली होती. परिसरातील सर्व लहान मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले. या परिसरातील रहिवाशांनी स्मशानातील अंतेष्टी चबुत-याची पूजा केली. यावेळी डॉ. अरुण काळे, सुहास ठाकरे, गोरख वडनेरे, चांगदेव भुजबळ, सचिन विंचू, प्रकाश आंबेकर आदि उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. सबनीस यांचा नाशिकरोडला सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेच्यावतीने पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचा १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री संत नरहरी महाराज कुलथे मंगल कार्यालय येथे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड येथे जानेवारी २०१६ मध्ये भरणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड झाली आहे. नाशिक शहरात त्यांचा जाहीर सत्कार व्हावा, अशी नाशिकरोड करांची इच्छा होती. हा सत्कार बुधवार १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री संत नरहरी महाराज कुलथे मंगल कार्यालय कोठारी कन्या शाळेसमोर जेलरोड येथे आयोजित केला आहे. प्रा. डॉ. सबनीसांचा सत्कार शहराचे प्रथम नागरिक अशोक मुर्तडक यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाखेचे कार्याध्यक्ष उन्मेश गायधनी भूषविणार आहेत. नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदिवासींसोबत दिवाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी नाशिक

द्वारका येथील सिध्दिविनायक ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने अभिनव पध्दतीने दिवाळी साजरी करण्यात आली. संस्थेतर्फे पेठ तालुक्यातील तिळभाट येथे आदिवांसी बांधवांना नवीन कपडे वाटप करण्यात आले. सिध्दिविनायक ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने प्रत्येक दिवाळीला विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात येतात. गरजुंना कपडे वाटप, वैद्यकीय तपासणी इत्यादींचा त्यात समावेश असतो. यावेळी संस्थेच्या वतीने तीळभाट गावातील नागरिकांसाठी भोजन देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मधुकर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम राबविण्यात आले. सिध्दिविनायक संस्थेतील सदस्यांनी गावात प्रवेश करताच वेशीवर स्वागत करुन नागरिकांच्यावतीने पारंपरिक पध्दतीने सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक गावात पोहचताच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आलेल्या नेत्र विकार तज्ञ डॉक्टर मीना बापये यांनी आदिवासी बांधवांची नेत्र तपासणी करुन उपचार केले.

यावेळी तीळभाटचे पोलिस पाटील मनोज भोये, श्री राऊत सर यांनी संस्थेचे आभार मानले. संस्थेचे सदस्य नारायण निकम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसीत मशिनरींची धडधड सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको/सातपूर

सिडको व सातपूर औद्योगिक वसाहतीला पाच ते सात दिवस दिवाळीची सुटी मिळाल्याने रस्ते ओस पडले होते. आज, सोमवारपासून कारखाने सुरू होत असल्याने मशिनरींची धडधड पुन्हा सुरू होणार आहे.

कंपन्यांना सुट्या असल्याने सिडको व सातपूर एमआयडीसीतील रस्ते ओस पडले होते. यात काही कंपनीमालकांनी चोरीचे प्रकार होऊ नयेत, म्हणून कंपनीच्या प्रवेशद्वारावरच ठाण मांडले होते. पोलिसांनी देखील चोरीचे घटना होऊ नयेत, यासाठी पेट्रोलिंग वाढवली होती. सोमवारपासून एमआयडीसीतील मशिनरींची धडधड सुरू होणार असून, कामगारांची पावलेही गावाकडून परतत आहेत. सात दिवसांपासून बंद असलेल्या कारखान्यांमुळे एमआयडीसीतील रस्ते ओस पडले होत. आज पुन्हा रस्ते गजबजणार आहेत. काही कंपन्या कारखाने मंगळवारनंतर सुरू होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोल-ताशांच्या गजरात रेड्यांची मिरवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिपावलीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पाडव्या निमित्त पंचवटीत पारंपरिक पद्धतीने सायंकाळी रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आलेली मिरवणूक बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

वीरशैव लिंगायत गवळी समाज तसेच परिसरातील दुग्ध व्यावसायिकांच्यावतीने रेड्याची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. दरवर्षी रेड्यांना सजवले जाते व शहरातील मुख्य भागातून त्यांची मिरवणूक काढली जाते. पंचवटीत पाडव्यानिमित्त रेड्यांच्या शिंगावर तसेच अंगावर रंगरंगोटी करून गळ्यात पितळी घंटा, तोडे तसेच झेंडूच्या फुलांच्या माळा, अशी आकर्षक सजावट केली होती, तर काहींनी रेड्यांच्या पाठीवर विविध देवदेवता, आकर्षक फुले, काही रेड्यांच्या पाठीवर सध्याच्या धरणातील पाण्याची स्थिती लक्षात घेऊन 'धरण वाचवा- पाणी वाचवा' असे संदेश लिहिलेले होते. तर काही रेड्यांच्या पाठीवर 'लेक वाचवा-देश वाचवा' असे संदेश होते.

पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेली रेड्यांची मिरवणूक पुढे दिंडोरीरोड, पंचवटी कारंजा तसेच गंगाघाट परिसरात असलेल्या श्री म्हसोबा महाराज मंदिराकडे नेण्यात आली. म्हसोबा महाराज मंदिरात दर्शनानंतर मिरवणुकीतील रेडे एकमेकांच्या समोरासमोर उभे करण्यात येत होते.

या मिरवणुकीत दुग्ध व्यावसायिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. नाशिक शहरातील वीरशैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीनेही दरवर्षीप्रमाणे पाडव्यानिमित्त रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, अनिल कोठुळे, महेश कल्याणकर, भास्कर शिंदे, महेंद्र आव्हाड, मंगेश कोठुळे, गणेश कल्याणकर, चंद्रकांत कोठुळे आदिंसह नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. दरवर्षी निघणारी रेड्यांची मिरवणूक पहाण्यासाठी पंचवटी परीसरातील अनेक नागरिक गंगेवर जमा झाले होते. पारंपरिक हलगीच्या तालावर रेड्यांना फिरवण्यात येत होते. बाहेर गावाहून आलेल्य़ा पर्यटकांना वेगळी मिरवणूक पहायला मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बक्कळ पैसे मोजूनही ग्राहकांची झाली पंचाईत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीत कपडे विक्रेत्यांनी वेगवेगळ्या ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही दुकानात पैसे मोजूनही ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. महागड्या साड्या फाटलेल्या निघणे, कपड्यांची शिलाई उसवणे यासारख्या समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागले. तसचे फिक्स रेट व एकदा घेतलेला माल परत घेतला जाणार नाही, यामुळे ग्राहकांची चांगलीच पंचाईत झाली.

दीपावलीत जवळपास सर्वच जण नवे कपडे घेतात. सर्वाधिक उलाढाल याच क्षेत्रात होते. यामुळे कापड दुकानदारांनी दिवाळीसाठी नवा माल आणून ग्राहकांना डिस्काउंट देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही ठिकाणी सेलचे फलकही झळकले. मात्र, चांगल्या मालात जुना व सदोष मालही विकण्यात आला. फिक्स रेटचे बोर्ड लावून ग्राहकांची लूट करण्यात आली.

वेगवेगळ्या ब्रॅण्डचे कपडे विकणा-या तसेच कपड्यांच्या मोठ्या दुकानांपेक्षा छोट्या दुकांनामध्ये अधिक गर्दी झाल्याचे दिसून आले. मेन रोडला सर्वसामान्यांना डोळयासमारे ठेवून १००, २०० ते ५०० रुपयांपर्यंत कपडे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

अनेक कापड दुकानदारांकडून खरेदी पावतीही दिली जात नसल्याने कपड्यात काही फॉल्ट निघाल्यास परत करणे दुरापास्त झाले होते. तसेच डिफॉल्ट कपडे परत करण्याची वेळ ठरवून देण्यात आली होती. काही दुकांनदारांनी एकदा घेतलेला माल परत घेतला जाणार नाही, असे

फलक लावल्याने कपडे डिफॉल्ट निघूनही परत करणे शक्य नसल्याने ग्राहकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागला. यामुळे पैसे जावूनही आनंद मिळाला नाही, अशी ग्राहकांची अवस्था झाली. यामुळे दिवाळी काहीशी कडू वाटली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवक घटल्याने भाज्यांच्या दरात वाढ

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, नाशिक
गेल्या आठवड्यात भाजीपाल्याची आवक घटल्याने भाव पाच ते पंधरा रुपयांनी वधारले. कारले, दोडके, गिलके, कांदापात, भेंडी या भाज्यांचे दर वीस रुपयांनी वाढले आहेत. मात्र, मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक यांचे दर खाली आले आहेत.
गेल्या आठवड्यात दीपावली काळात पालेभाज्या तसेच भाज्यांची आवक मंदावली होती. यामुळे साहजिकच भाज्यांचे दर वाढले होते. मात्र, रविवारपासून भाज्यांची आवक पुन्हा वाढल्याने दर पूर्वपदावर येऊ लागले आहेत. वांग्याची मागणी वाढल्याने साठ रुपये किलोपर्यंत दर वाढले आहेत. कांदापातही पाच रुपयांनी महागली आहे. कारले, गिलके, दोडके यांचे दर चाळीस रुपयांवरून साठ रुपये झाले आहेत. मात्र, साठ रुपये किलोने मिळणाऱ्या गवारचे दर वीस रुपयांनी घसरले आहेत. बटाट्याचे दर जैसे थे आहेत. कांद्याचे दर दोन ते पाच रुपयांनी वाढले आहेत. या आठवड्यात आवक वाढण्याची शक्यता असून दरात घसरण होण्याची शक्यता आहे, असे विक्रेत्याने सांगितले.


भाजीपाल्याचे दर (किलोमध्ये) कारले ६० गिलके ६० दोडके ६० गवार ४० भेंडी ६० कांदे २५ ते ३० बटाटे १५ ते २० कोबी २० फ्लॉवर २० वांगे ६० मेथी ८ ते १२ रुपये जुडी कोथिंबीर ८ ते १५ रुपये जुडी कांदापात १५ ते २० रुपये जुडी मुळा २५ ला ८ शेपू ८ ते १२ रुपये जुडी पालक २ रुपये जुडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images