Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अवकाशात गर्दी आवाजविरहित फटाक्यांची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दणदणाट करणाऱ्या फटाक्यांपेक्षा आवाजविरहित आकाश उजळवून टाकणाऱ्या फटाक्यांना यंदा चांगली मागणी आहे. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याकडे असलेला कल लक्षात घेत फटाके विक्रेत्यांनीही आकाश उजळविणाऱ्या फटाके विक्रीस आणले आहेत. ध्वनीप्रदूषणास आळा घालण्याच्या दृष्टीने या प्रकारातील फटाक्यांना चांगली मागणी मिळाल्याचे चित्र बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिसून आले.

दिवाळीत फटाके उडविण्याची हौस प्रत्येकालात असते. मात्र, आपल्या हौसेपोटी कोणाला त्रास होऊ नये, अशी इच्छाही अनेकांची असते. ही इच्छा आवाजविरहित फटाक्यांमुळे पूर्णत्त्वास गेली. यंदा पर्यावरणप्रेमी, समाजसेवी संघटना, शाळा-कॉलेजेस यांनी पर्यावरणपूरक दिवाळीबाबत जोरदार जनजागृती केली होती. त्यामुळेही आवाजविरहित फटाक्यांना पसंती दिल्याचे दिसून येत आहे. पर्यावरणाला धोका पोहोचू नये, तसेच ध्वनी प्रदूषणही होऊ नये याचा विचार या फटाक्यांच्या पसंतीमागे दिसून आला.

आवाजविरहित फटाक्यांमध्ये प्रामुख्याने शोभेच्या फटाक्यांना पसंती दिली जात आहे. झाड, भुईचक्र, फुलबाज्या या आतषबाजी करणाऱ्या तसेच आकाशातील फटाक्यांना अधिक पसंती दिली जात आहे. तसेच लाल, पिवळा, निळा, हिरवा असे रंग बाहेर टाकणाऱ्या फुलपाखरू या फटाक्यालादेखील मोठी मागणी आहे. तसेच, आकाशातील स्काय शॉट प्रकारातील रंगीबेरंगी आवाजविरहित फटाक्यांनाही सर्वाधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांने सांगितले. लहानग्यांबरोबरच मोठ्यांमध्येही या फटाक्याची क्रेझ आहे.

आवाजाच्या फटाक्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, इजा यांचा विचार करताही शोभेचे फटाके पसंतीस उतरत असल्याचे दिसत आहे. डोंगरे वसतिगृहावर नाशिक फटाका असोसिएशनच्या स्टॉल्सवर लक्ष्मीपूजनाला गर्दी दिसून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक - पुणे बसेसला गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लक्ष्मी पूजनानंतर खान्देशात तर भाऊबिजेनंतर पुण्याकडे जाणाऱ्या नोकरदारांची गर्दी लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जादा बसेसचे नियोजन केले आहे. नाशिकहून पुण्याकडे नियमित जाणाऱ्या ४८ बसेसचे बुकिंग फुल्ल झाले असून, १८ जादा बसेसमधील ७० टक्के बुकिंग फुल्ल झाल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली. त्यामुळे जादा बसेसच नियोजन करताना महामंडळाची दमछाक होत आहे.

नाशिकमध्ये जळगाव, धुळे येथील रहिवाशांची संख्या मोठी आहे. कामगार वर्गालाही शनिवारपर्यंत सुटी असल्याने अनेकांनी गावी जाण्याचे नियोजन करून ठेवले आहे. त्यामुळे मालेगाव, धुळे, जळगावकडे जाणाऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन महामंडळाने जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.

नाशिकमधील अनेकजण पुण्यात नोकरीला आहेत. नाशिक शहरातून दररोज २४ बसेस जातात. तर, जिल्ह्यातून २४ अशा ४८ बसेस असतात. रविवारी सुटणार असलेल्या या सर्व बसेसचे बुकिंग फुल्ल झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीच्या खरेदीला आनंदाचे कोंदण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर खरेदीचा योग साधत नाशिककरांची शहरात कोट्यवधींची उलाढाल झाली. यामुळे व्यापारीवर्गात आनंदाचे वातावरण होते. कपडे, मोबाइल, मिठाई, दिवाळी गिफ्ट्स आदी खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या होत्या. नोकरदारवर्गाला अगदी वेळेवर बोनस मिळाल्याने लक्ष्मीपूजनाला दुपारपर्यंत खरेदीसाठी बाजारात गर्दी होती.

ऐन दिवाळीत बाजारात महागाईचे सावट दिसून येत असले तरी सण उत्साहात साजरा व्हावा, यासाठी खरेदीत शहरवासीयांचा मोठा सहभाग होता. लक्ष्मीपूजनाला नवे कपडे घालण्याची प्रथा अनेकांकडे असल्याने या दिवसाच्या दुपारपर्यंत कापड बाजार, दहिपूल, मेनरोड आदी ठिकाणी गर्दी दिसून आली. गेल्या वर्षापेक्षा यंदा दहा टक्क्यांनी कपड्यांच्या किमतीत वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

आजच्या काळात डिजिटल खरेदी ही प्रतिष्ठेशी निगडीत बाब झाली आहे. आपल्याकडे चांगला मोबाइल, लॅपटॉप, टॅब असावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. या इच्छेला दिवाळीचा शुभमुहूर्त त्याचबरोबर ऑफर्स व डिस्काऊंटची जोड मिळत असल्याने डिजिटल शॉपीज् फुल्ल झाल्या होत्या. 'एक रुपया भरा आणि वस्तू घेऊन जा' अशा प्रकारच्या ऑफर्सही अनेक दुकानदारांनी

दिल्या होत्या. या ओढीने

ग्राहकवर्गानी दुकानात गर्दी केल्याचे दिसून आले. या ऑफर्समुळे ग्राहकांबरोबरच विक्रेत्यांनाही चांगलाच फायदा झाला.

दिवाळीची इतर खरेदी होत असली तरी सणासुदीत गोड खाल्याशिवाय सण साजरा झाला असे वाटत नाही. तसेच, सणाच्या पार्श्वभूमीवर देवाला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखविण्यासाठी फराळाबरोबरच मिठाईला महत्त्व असते. मिठाईशिवाय दिवाळीच पूर्ण होऊ शकत नाही, इतके दिवाळी आणि मिठाई हे समीकरण झाले असल्याने साहजिकच मिठाईला मोठी मागणी होती. त्यामुळेच लक्ष्मीपूजनाला सुमारे हजारो किलो मिठाईची उलाढाल नाशिकमध्ये झाली. काजू कतली, ड्रायफूट बर्फी, अंजीर बर्फी, मावा पेढा या मिठायांना नाशिककरांची सर्वाधिक मागणी होती. दुधाच्या दरांमध्ये मागील वर्षापेक्षा काहीशी वाढ झाली असल्याने मिठाईच्या किमतीमध्येही वाढ झाली आहे. मात्र, या दरवाढीचा खरेदीवर फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून आले नाही.

दिवाळी गिफ्ट्स देण्याचा ट्रेण्डही अलिकडे जोरात असल्याने गिफ्ट्स खरेदी केली गेली. यामध्ये फुला-पानांच्या आकाराचे कॅण्ड्ल्स, कॅण्डल स्टॅण्ड, ड्रायफ्रूट बॉक्स, चॉकलेट बॉक्स व मिठाई बॉक्सला अधिक प्राधान्य देण्यात आले. अनेक स्वीट्सच्या दुकानांमध्ये या प्रकारच्या गिफ्ट्ससाठी खास व्यवस्थाही करण्यात आली होती. दिवाळीनिमित्त शहरात बाहेरगावचे विक्रेतेही आल्याचे चित्र बाजारात दिसून येत होते. या विक्रेत्यांनी रस्त्यावरच आपली दुकाने थाटली आहेत. शोरुमच्या तुलनेत कमी दरात या विक्रेत्यांकडे वस्तू मिळत असल्याने ग्राहकांनी येथेही खरेदी करण्यास पसंती दिली. शोभेच्या वस्तूंबरोबरच टाय, कुर्ते, शूज या आवश्यक वस्तू कमी किमतीत विकावयास आणल्याने महागाईशी दोन हात करण्याचे बळ मध्यमवर्गीयांना मिळाले. अनेक नोकरदारांचे बोनस उशिरा झाल्याने ऐनवेळी खरेदी केली जात असल्याचे मत यावेळी शहरातील विक्रेता वर्ग व्यक्त करीत होता.


ऑनलाइन शॉपिंग

दिवाळीनिमित्त ऑनलाइन शॉपिंग साईट्सवर मोठी सूट देण्यात आली होती. प्रत्येक वस्तूवर ऑफर्स देण्यात आल्याने नेटीझन्सच्या या साईट्सवर खरेदी करण्यासाठी उड्या पडल्या होत्या. घड्याळे, कपडे, मोबाइल्स, दिवाळी गिफ्ट्स, कॅण्डल्स इत्यादी वस्तूंवर सूट देण्यात आली होती. बाजारापेक्षा अनेक वस्तू कमी किमतीत मिळत असल्याने अनेकांनी याचा लाभ घेतला. तसेच सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळत असल्याने ऑनलाइन शॉपिंगला पसंती दिली जात असल्याचे दिसून आले.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरे शनिवारपासून नाशकात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवार (दि. १४) पासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहेत. कल्याण डोंबिवलीत मनसेने सपाटून मार खाल्यानंतर नाशिकमध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे दोन दिवस ते नाशिकमध्ये तळ ठोकणार असून, त्यांच्या हस्ते दोन वाहतूक बेटांचे उद्घाटन होईल.

नाशिकच्या मॉडेलवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीत मतांचा जोगवा मागितला. मात्र, मतदारांनी त्यांना नाकारल्याने मनसेच्या नगरसेवकांची संख्या २७ वरून ९ वर आली. त्यामुळे ठाकरेंना पुन्हा नाशिकचा गड भक्कम करावा लागणार आहे. शनिवारपासून तीन दिवस ते नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे उद्घाटने करण्यात येणार आहेत. विशेषतः वाहतूक बेटांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. आयुक्तांशी चर्चा करून रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटीने मोडले महापालिकेचे कंबरडे

$
0
0

विकासकामे, स्मार्ट सिटीसाठी घरपट्टी, पाणीपट्टीत दरवाढ आवश्यक म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक शहरात एकीकडे स्मार्ट सिटीचा जागर सुरू असतांना महापालिका कमालीच्या आर्थिक विवंचनेत आहे. सिटी स्मार्ट करण्यासाठी उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याशिवाय कोणताही पर्याय महापालिकेपुढे राहिला नसल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. राज्यातील अन्य महापालिकांचे एलबीटीचे उत्पन्न हे ५० टक्क्याच्या खाली असतांना, नाशिक महापालिकेचे ते ८० टक्के आहे. त्यामुळे नव्या धोरणामुळे उत्पन्नात मोठी घट झाली असून थेट शहराच्या विकासालाच ब्रेक लागला आहे. महापालिकेत जकात सुरू असतांना, महापालिकेसह शहराच्या विकासाला चालना मिळाली होती. शासकीय अनुदानापेक्षा हक्काच्या जकातीतून पालिकेन विकासकामांचा सपाटा लावला असतांनाच, सन २०१२ मध्ये जकातीला ब्रेक लावून एलबीटी आली. जकातीचा आकडा ८०० कोटीवर जात असतांनाच, एलबीटीमुळे महापालिलेका ६५० कोटीवर थांबावे लागले. त्यामुळे विकासकामांना पहिला ब्रेक लागला. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शिस्त लावत जकातीची तूट भरून काढत एलबीटीत घाटा होवू दिला नाही. त्यामुळे राज्यात सर्वाधिक एलबीटीची चांगली वसूली ही महापालिकेन केली. अशातच आता एक ऑगस्टपासून राज्य सरकारने एलबीटी धोरणात बदल करत महापालिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. ५० कोटीच्या आत उलाढाल असलेल्या ३२ हजाराच्या वर व्यापाऱ्यांना एलबीटी माफ झाल्याने महापालिकेच्या आर्थिक गाडा रुतण्यास पूर्ण मदत झाली आहे. महापालिकेचे उत्पन्नच घटल्याने बजेटचेही तीनतेरा वाजले असून खर्चाचा ताळमेळ करतांना नोव्हेंबर उजाडला तरी त्याला अंतिम रुप देता आलेले नाही. महापालिकेच्या एकूण उत्पन्नाच्या ८० टक्के उत्पन्न हे एलबीटीतून येते. सुमारे हजार कोटीच्या उत्पन्नात ही सरासरी आठशे कोटीत जाते. मात्र, आता त्यातही घट झाल्याने एलबीटीतून प्रत्यक्षात दरमहा ३० कोटी येणार आहे. तर उर्वरित अनुदानातून येणार आहेत. महापालिकेचे सरासरी खर्च हा दरमहा ३५ ते ४० कोटी आहे. त्यामुळे विकासकामांसाठीच निधीच मिळणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पर्यायी उत्पन्न वाढवण्याशिवाय पालिकेला पर्याय नाही. त्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टी शिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. नाशिक महापालिकेचे घरपट्टी व पाणीपट्टीचे दर राज्यात सर्वाधिक कमी आहे. सन १९९९ पासून दर वाढलेच नाहीत. त्यामुळे इतर उत्पन्न वाढलेले नाही. त्यामुळे आता विकास करायचा असेल व शहराला स्मार्ट करायचे असेल तर घरपट्टी व पाणीपट्टी वाढविण्याशिवाय महापालिकेसमोर पर्याय नाही. त्यामुळे विकास हवा असेल आणि शहर स्मार्ट व्हावे अशी नागरिकांची इच्छा असेल तर त्यांना घरपट्टी व पाणीपट्टी दराची वाढ स्वीकारावीच लागणार आहे. स्मार्ट सिटीत घरपट्टी व पाणीपट्टी दरात वाढ करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता विकास हवा असेल दरवाढीची तयारी नाशिककरांना ठेवावी लागणीर आहे. लोकप्रतिनिधींची भूमिका दुटप्पी महापालिकेतील नगरसेवकांकडून विकासकामांसाठी निधी मागितला जात असतांना उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याकडे दुर्लक्ष केले जाते. महापालिकेची आर्थिक स्थिती डामाडोल झाल्याने उत्पन्नासाठी घरपट्टी व पाणीपट्टी दर वाढवावे लागणार आहेत. मात्र, त्याला लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. त्यामुळे एकीकडे उत्पन्न वाढू द्यायचे नाही अशी दुसरीकडे उत्पन्नाचे स्रोत वाढीला विरोध करायचा अशा भूमिकेमुळे महापालिकाच आर्थिक कचाट्यात सापडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुबेरला जाणाऱ्या भाविकाचा अपघातात मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, गंगापूररोड गुजरातमधील कुबेर देवस्थानाच्या दर्शनाला जात असताना बोलेरो गाडीला झालेल्या अपघातात नाशिक शहराला लागून असलेल्या यशवंतनगर व आभाळेवाडी येथील एका जणाचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. त्यांना नाशिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अमावस्येला गुजरातमधील राजपिंपळा येथे असलेल्या कुबेर या देवस्थानाला नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक जात असतात. त्यातच किमान पाच किंवा सात फेऱ्या अमावस्येला पूर्ण करण्याची देखील प्रथा आहे. यशवंतनगर व आभाळेवाडी येथील सहा जण बोलेरो गाडीतून मंगळवारी कुबेरला जाण्यासाठी निघाले होते. सापुताराच्या पुढे ४० किलोमीटरवर असलेल्या वघईजवळ वळणावर बोलेरो गाडी उलटल्याने त्यात यशवंतनगरचे ४५ वर्षीय रघुनाथ फडोळ यांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरीत पाच जणांना हाताला, पायाला व डोक्याला मार लागला असून, त्यांना नाशिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यकर्त्यांवर गुन्हा

$
0
0

नाशिक : महापालिकेच्या जागेवर समूहाने जमा होणाऱ्या ३० ते ४० संशयितांवर नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश लक्ष्मण गाडेकर (३०, रा. चेहडी रोड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. संशयित राहुल प्रभाकर मोरे यांच्यासह श्रमिक संघटनेचे २५ कार्यकर्ते मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास नाशिकरोड येथील महापालिकेच्या वाहनतळाजवळ जमले. वाहनतळातील घंटागाड्या बाहेर पडू देण्यास त्यांनी मज्जाव केला. या विरोधात गाडेकर यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे हमालांची दिवाळी अंधारातच!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

रेल्वे प्रवाशांचे ओझे उचलणाऱ्या हमालांची दिवाळी नेहमी अंधारातच साजरी होते. बारा तास राबल्यावर त्यांना कसेबसे तीनएकशे रुपये मिळतात. रेल्वतर्फे पगार नाही की, बोनस नाही. मग, दिवाळी कशी साजरी करायची असा त्यांचा प्रश्न आहे.

नाशिकरोड रेल्वे स्थानकात पन्नास हमाल आहेत. दोन पाळीत ते काम करतात. त्यांची ड्युटी बारा तासाची असते. नम्र सेवा, तत्परता, कष्ट यामुळे ते सर्वांचे मन जिंकून घेतात. परंतु, त्यांना रेल्वेतर्फे कोणतीही सुविधा दिली जात नाही. पगार अथवा बोनस नाही की, निवारा नाही. मिळतो तो फक्त दोन महिन्याचा रेल्वे पास आणि किरकोळ वैद्यकीय सुविधा. प्रवाशाने साहेबाकडे खोटी तक्रार केली तर पंधरा दिवस घरी बसावे लागते. हमालांना एका बॅगेचे वीस रुपये मिळतात. दिवसाला तीनशे रुपये जमतात. त्यावरच गुजराण करावी लागते. या लोकांची सोसायटी आहे. ती अडीअडचणीला थोडे कर्ज देते.

पैसे नाही, आजार मिळाले

हमालांना रेल्वे जीन्यांवर चढ-उतार करून गुडघ्याचे आजार लागले आहेत. ओझे उचलून पाठीचे व मानेचे मणके कामातून गेले आहेत. निवृत्तीचे वय ठरलेले नाही. शरीर साथ देते तोपर्यंत काम करावे लागते. कधी कधी रेल्वेखाली ठार झालेल्या व्यक्तीच्या शरीराचे तुकडे गोळा करावे लागतात. त्यासाठी हॅण्‍डग्लोज मिळत नाही. प्लास्टिक गुंडाळून काम करावे लागते. त्यातून इनफ्केशनचा धोका असतो.कुंभमेळ्यात नव्या चौथ्या फ्लॅटफार्मवर गाड्या थांबविण्यात आल्याने प्रवासी तेथूनच बस पकडून रामकुंडावर गेले. त्यामुळे हमालांना कामच मिळाले नाही.

हमालांचा मुकादम असून, ७१ वय आहे. सात मुलींना शिकवून लग्न करून दिले. आता मला पेन्शन नाही की फंड नाही. हमालीमुळे आजार मागे लागले आहेत. दवाखान्याला पैसे नाहीत. कसे जगायचे असा प्रश्न आहे.
- पांडूरंग मानकर, हमाल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृद्धाने घेतला गळफास

$
0
0

एका ६० वर्षीय वृध्दाने पंचवटीतील सम्राटनगर परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दत्तू गोपाराम लहांगे असे आत्महत्या करणाऱ्या वृध्दाचे नाव आहे. त्यांनी मंगळवारी (दि.१०) गळफास घेतला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंगापूर, थायलंडला पसंती

$
0
0

आठ रात्र, नऊ दिवसांचा परदेशात मुक्काम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीनंतर पर्यटनाला जाण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षात रूढ झाला असला तरी, आता मात्र परदेशात जाण्याचा नाशिककरांचा कल असल्याचे दिसून येत आहे. खासकरून मलेशिया, थायलंड आणि सिंगापूर या तीन देशांच्या एकत्रित टूरला चांगली पसंती मिळत आहे.

परदेशात एकदा तरी पर्यटनाला जाण्याची मनोमन असलेली इच्छा दिवाळीच्या सुटीत पूर्ण करण्याची संधी अनेक जण साधतात. राज्य आणि देशांतर्गत पर्यटनाला त्यामुळेच दिवाळीनंतर बहर येतो. पण, आता परदेश गमनानेही चांगला वेग धरल्याचा नाशिकच्या पर्यटन व्यावसायिकांचा अनुभव आहे. यंदा नाशिककर सिंगापूर, थायलंड आणि मलेशियाच्या पर्यटनाकडे आकृष्ट झाले आहेत. त्यासाठीचे बुकिंग जोरात सुरू आहे. आठ रात्र आणि नऊ दिवस अशा स्वरुपाचे प्रति व्यक्ती जवळपास एक लाख रुपयांचे पॅकेज असून, त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. या पॅकेजमध्ये सर्व प्रकारचा प्रवास, निवास, भोजन, नाश्ता, गाईड, स्थानिक पातळीवर फिरण्यासाठीच्या सवलती आदींचा समावेश आहे.

सध्या भारतात हिवाळा आहे. अशाच प्रकारचे वातावरण सध्या परदेशात असल्याने आल्हाददायक हवामानात पर्यटनाकडे अधिक कल असतो. या तिन्ही देशातील विविध प्रकारची ठिकाणे पाहण्यासाठी नाशिककर उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. दुबईच्या टूरलाही प्रतिसाद लाभत असल्याचे पर्यटन व्यावसायिकांचे म्हणणे आहे. चार रात्र आणि पाच दिवस अशा स्वरुपाच्या दुबईच्या पर्यटनाचे प्रति व्यक्ती ५० हजार रुपयांचे पॅकेज देण्यात येत आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे परदेश गमनाला नाशिककरांचा प्रतिसाद लाभेल की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, बोनस मिळाल्यानेही अनेकांनी परदेशवारीचा निश्चय केल्याचे ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिकच्या सदस्यांनी सांगितले. सिंगापूर, थायलंड आणि मलेशिया तीन देशांच्या पर्यटनासाठी ग्राहक इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच यंदाच्या दिवाळीत या पॅकेजला चांगला प्रतिसाद लाभला असून, येत्या काळात हा ट्रेंड सेट होण्याची शक्यता आहे.

- दत्ता भालेराव, अध्यक्ष, तान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचालकाची फसवणूक

$
0
0

भाडेतत्त्वावर वाहन घेऊन त्याचा मोबदला न देता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाहनचालकाने तिघा संशयितांविरोधात इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीची फिर्याद दिली. संपत रामदास निर्मळे (३०, रा. लहवित) यांच्याकडे बोलेरो गाडी आहे. संशयित दीपक दिगंबर साळुंखे (रा. पाथर्डीफाटा), दत्ता कडवे (रा. इंदिरानगर) आणि राजेश मनोहर भोसले (रा. इगतपुरी) यांनी २ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पाथर्डीफाटा येथील हॉटेल एक्स्प्रेस इनजवळ निर्मळे यांना भेटले. त्यांनी ओझर येथे भाडेतत्त्वावर गाडी लागत असून, ३० हजार रुपये देऊ असे त्यांना सांगितले. निर्मळे यांनी देखील विश्वासाने तिघांकडे गाडीचा ताबा दिला. मात्र संशयितांनी ठरल्यानुसार रक्कम न देताच ताबा घेतल्याची त्यांची तक्रार आहे. काही दिवसांनी त्यांनी भाडे देण्यासही टाळाटाळ केली. पोलिसांनी संशयितावर फसवणुकीची गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाची आत्महत्या

$
0
0

नाशिक : गंगापूर रोडवरील श्रीगुरुजी रुग्णालयाजवळील परिसरात २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेतला. ज्ञानेश्‍वर उत्तम खंदारे (रा. काळे नगर) असे त्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीच्या शुभेच्छा नकोत!

$
0
0

डॉ. सुधीर देवरे, सटाणा

माझ्या दिवाळीच्या शुभेच्छेच्या एसएमएसला माझ्या एका मित्राकडून उत्तराच्या संदेशात म्हटले होते, 'मी हिंदू नाही. दिवाळी हा हिंदूचा सण आहे. म्हणून मला दिवाळीच्या शुभेच्छा देऊ नयेत.'

बाप रे! उत्तर वाचून मला मुर्च्छा येण्याचेच बाकी राहिले. संदेश वाचून माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं ते हे की, मी जन्माने हिंदू आहे आणि ज्याने हे उत्तर लिहिले तो हिंदू नव्हता. दिवाळीच्या शुभेच्छांचा असाही अर्थ काढला जाऊ शकतो हे मला आयुष्यात पहिल्यांदा लक्षात आलं.

खरं तर हा माझा नव्यानेच मित्र झालेला माणूस होता. मला जुजबी ओळखत होता. लहानपणापासून आणि विचारांनी त्याने मला ओळखले असते तर कदाचित त्याने असे उत्तर देताना शंभर वेळा विचार केला असता. माझ्या लिखाणाचे वाचन केलेला कोणीही वाचक असता तरी त्याने मला असे उत्तर दिले नसते. ते उत्तर वाचून मला राहवले नाही. मी त्याला समजावणीच्या सुरात पुन्हा एसएमएस केला 'हिंदू आणि दिवाळी असा आजतरी काही संबंध मला दिसत नाही. दिवाळी आख्या जगात साजरी केली जाते. दिवाळी हा भारताचा सांस्कृतिक सण आहे. धर्माचा नाही.' वगैरे. त्यानंतर त्याचे पुन्हा जे उत्तर आले ते तर अतिशय उध्दटपणाचे होते. या उत्तरात त्याने म्हटले होते, 'तुम्ही जरा नीट अभ्यास करा, वाचन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की, दिवाळी का साजरी करतात. असा मला सल्ला देत त्याने पुढे म्हटले होते, सोबत मी तीन घटना देत आहे. त्या वाचा म्हणजे दिवाळी का साजरी करतात ते तुम्हाला कळेल.' त्याने ज्या तीन गोष्टी सांगितल्या होत्या त्या अशा : अमूक एकाचा तमूक एकाने खून केला म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दुसऱ्या कथेतही त्याने असाच काहीतरी जोडून एक धर्म भारतातून हद्दपार झाला म्हणून दिवाळी साजरी करत असल्याचे म्हटले होते आणि तिसरी सर्वांना माहीत असलेली बळीराजाची कथा सांगितलेली होती. शेवटी तो म्हणाला, म्हणून आम्ही दिवाळी साजरी करत नाही.

अशा अतिशय उद्दाम पध्दतीने हा अनुभव मला सामोरा आला तरी या अनुभवावर मी चिंतन करू लागलो. आपण एखाद्याला दिवाळीच्या वा कुठल्याही सणाच्या शुभेच्छा कोणत्या अर्थाने पाठवतो. अशा शुभेच्‍छा पाठवताना या मित्राला अभिप्रेत असे सर्व अर्थ गृहीत धरून वाईट गोष्टींचे मी समर्थन करत होतो का? (जे सण जनमानसात आज शुभ समजले जातात त्याच सणांच्या शुभेच्छा दिल्या जातात. काही सणांच्या शुभेच्छा दिल्या जात नाहीत. उदा. मोहरमच्या शुभेच्छा दिल्या जात नाहीत.) समजा मला एखाद्या सणाच्या दंतकथेची पार्श्वभूमी माहीत आहे (उदाहरणार्थ दिवाळी) आणि तरी सुध्दा मी एखाद्याला त्या सणाच्या सहज शुभेच्छा पाठवल्या तर मी त्या माणसाचा उपमर्द करतो का? का एखाद्या अनिष्ट परंपरेचे समर्थन करतो. एखादा सण साजरा करण्यामागे असलेली कथा, लोककथा, दंतकथा, आख्यायिका या फक्‍त सांगिवांगीतून, कल्पनेतून वा विपर्यासातून निर्माण झालेल्या असतात का तो शंभर टक्के इतिहास असतो. ख्रिसमस साजरा करण्यामागे जितका स्पष्ट इतिहास असेल त्याच्या एक शतांशही इतिहास दिवाळी साजरा करण्यामागे नाही हे इथे आवर्जून लक्षात घ्यावे लागेल.

इतिहास असेल तर त्याला केवळ दंतकथा हा पुरावा होऊ शकत नाही. आणि तो तसा मानला तरी एकाच सणामागे तीन प्रकारच्या पार्श्वभूमी कथा कशा येऊ शकतात. मी वर ज्या मित्राचा उल्लेख केला त्याने बळीराजाच्या कथेसोबतच ज्या अजून दोन कथा सांगितल्या त्याच त्याच्या मताच्या विरूध्द जात होत्या. दिवाळी का साजरी केली जाते यावर त्याने तीन वेगवेगळ्या कथा सांगितल्या. या ‍तीन कथांपैकी नक्की कोणत्या घटनेमुळे आधी दिवाळी साजरी झाली हे त्याला सांगता यायला हवे होते. का या तिन्ही घटना एकाच दिवसभरात घडल्या आणि या‍ तिन्ही घटनांच्या विजयासाठी दिवाळी साजरी होते. म्हणजे बळी राजाला मारले म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दुसरी कथा, अमूक एकाचा तमुक एकाने खून केल्यामुळे दिवाळी साजरी केली जाते. आणि तिसरी कथा, भारतातून एक धर्म हद्दपार केल्यामुळे दिवाळी साजरी केली जाते असे हे तर्कट. कशातच कुठलाही ताळमेळ नाही. (समजा एखाद्या दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात एखादी वाईट घटना घडली. तर फक्त त्या वर्षापुरती आपण दिवाळी साजरी करणार नाही, का कायमस्वरूपी आयुष्यात दिवाळीच येऊ देणार नाही? आणि आपल्या घरात अमूक एका दिवाळीत अशी वाईट घटना घडली म्हण़ून लोक दिवाळी साजरी करतात, असा आपल्याला प्रचार करता येईल का?) त्याचे हे तर्कट स्वत:चे नसावे. एखाद्या संशोधनात्मक अभ्यासपूर्ण संदर्भ ग्रंथामध्येही ते त्याने वाचलेले नसावे. कुठल्यातरी भडकाऊ भाषणातून वा चटपटीत मासिकातून वाचून त्याने दिवाळीबद्दल आपले मत बनवलेले दिसले.

आज आपण दिवाळी साजरी करतो. दिवाळीला सर्वच धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. आपण ख्रिसमस साजरा करतो. सर्व धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्‍छा देतात. आपण रमजान ईद साजरा करतो. सर्वच धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. पैकी अनेकांना अशा सणांमागची पार्श्वभूमी माहीत असतेच असे नाही. पण आपण दिवसेंदिवस लोकपरंपरेच्या या सगळ्या सणांबाबतही सर्व धर्मिय ग्लोबल होत एकमेकांना या निमित्ताने शुभेच्छा देत एकमेकांच्या जवळ येऊ पहातो ही मानवतेची एक चांगली खूण आहे. माझा एक मुस्ल‌िम धर्मिय बालमित्र आहे. तो मुस्ल‌िम धर्मिय आहे असा उल्लेख आज मी पहिल्यांदा करतोय. कारण आमच्या मैत्रीत कधीही धर्म आडवा येत नाही. प्रत्येक रमजान ईदच्या दिवशी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आधी त्याचा मला एसएमएस येतो. नंतर मी त्याला शुभेच्छा देतो. त्याच्या शुभेच्छा आल्या तर मी मुसलमान नसूनही हा मित्र मला का एसएमएस करतो असे मला कधी वाटले नाही. कधी वाटणारही नाही. आणि कोणालाही तसे कधी वाटू नये.

खरे तर माझ्या मते आज कोणताच सण एखाद्या धर्मापुरता धार्मिक सण राहिलेला नाही. सण साजरा करणे या आज ग्लोबल लोकपरंपरा झाल्या आहेत. निदान भारतात साजरे होणारे अनेक सण हे हिंदू धर्माचे सण आहेत असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. सण हे धार्मिक असण्यापेक्षा इथल्या अस्तित्वाच्या सांस्कृतिक खुणा आहेत, असे मला वाटते. दिवाळी ही भारताची सांस्कृतिक खूण आहे. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. आपल्याला न्यूनगंडच पाळायचा झाला तर आपण बळीराजाच्या आठवणीसाठीही तो साजरा करू शकतोच की. दिवाळी ही एकीकडे अनेक गोष्टींचे प्रतिक होताना दिसते तर दुसरीकडे अशा अनुभवाचा ठणठणीत सांस्कृतिक दुष्काळ सामोरा येताना दिसतो.

मलेशिया हा मुस्ल‌िम धर्मिय देश असूनही तिथे कलात्मक रामायण नाट्य साजरे केले जाते. पाकिस्तान हा मुस्ल‌िम देश असूनही मकरसंक्रातीला अनेक ठिकाणी पंतग उडवले जातात.

सारांश, आजचे सण हे लोकपरंपरेच्या सांस्कृतिक खुणा ठरत आहेत. धार्मिक उत्सव नव्हेत. धर्माच्या उन्मादाला विरोध करणे वेगळे आणि सांस्कृतिकता पाळणे या दोन्ही वेगवेळ्या गोष्टी आहेत.

(लेखक साहित्यिक व संशोधक असून भाषा, कला, लोकवाड्‍मय आणि लोकजीवनाचे अभ्यासक आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नासा : युवकांसाठी नवी ‌संधी !

$
0
0

Gopal.paliwal@timesgroup.com

गेल्या काही दिवसांपासून नाशिक स्मार्ट सिटी होणार याचीच चर्चा रंगताना दिसते आहे. पण त्यासाठी लागणारे बळ आणि सिद्धता आपण कोणीच तपासून पहात नाही असेही दिसते. या सर्व स्मार्ट गोंधळात एक चांगली बातमी नाशिकसाठी घडली. ती म्हणजे नाशिकच्या जुळ्या बहिणींना 'नासा'च्या २०१८ मोहिमेचे निमंत्रण मिळाले. अपूर्वा जाखडी आणि लीना जाखडी बोकील असे या जुळ्या बहिणींचे नाव. त्यापैकी अपूर्वा जाखाडी यांच्याशी या पूर्ण मोहिमेबद्दल आणि त्यांच्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल केलेली ही बातचीत.

आपल्या 'स्पेस' प्रवासाला कुठून सुरूवात झाली?

- माझे शिक्षण सर विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटीतून पूर्ण केले. त्यावेळी माझा बी.ई.ला इलेक्ट्रॉनिक आणि टेल‌िकम्युनिकेशन हा स्पेशल विषय होता. त्यामुळे सुरवातीलाच इस्रोच्या बेंगळूरू येथील इन्स्टिट्यूटला माझा प्रोजेक्ट करण्याची संधी मिळाली. तेथूनच या संबंध‌िची आवड निर्माण होत गेली. तेथून या प्रवासाला सुरूवात झाली. आम्हाला दोघींनाही या विषयाची आवड निर्माण झाली. त्यासाठी वसंत गोवारीकर, जयंत नारळीकर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. पुढे स्पेसच्या संबंधित असलेल्या एअरक्राफ्ट इलेक्ट्रॉनिक या विषयाचे शिक्षण घेतले. त्यात सेटलाईट कम्युनिकेशन, मायक्रोवेव्ह रडार यांचे शिक्षण घेऊन अनुभव मिळवला.

आपल्या दोघांच्या विषय निवडीत साम्य होते का?

- हो, नक्कीच तसे होते. काही प्रमाणात नाही तर पूर्णपणे आमच्यात आवडी निवडीचे साम्य होतेच. ते शिक्षणानंतरही कायम होते. पुढे लीनाने जॉबचा पर्याय निवडला तर मी पुढे शिकण्याचा. त्याचबरोबर स्पेस टेक्नॉलॉजीबद्दल मुलांना अवगत करविणे हा पर्याय निवडत आपले नाते स्पेसशी कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. आम्ही दोघेही सोबतच पहिल्यांदा नासाला भेट दिली होती. त्यानंतर पुढे मी वेळोवळी कामनिमित्त नासा तसेच अवकाशासंबंधित शहरांना भेट ‌देत राहिली. यामध्ये रॉकेट सिटी अल्बामा, युएस सेंटर, केनेडी स्पेस सेंटर आणि फ्लोरिडा जेथून प्रक्षेपण होते. यात मी स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित काही ट्रेनिंग्समध्ये सहभाग घेतला. त्यामुळे जवळून अवकाशातील प्रक्षेपणातील बारकावे आणि महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या. माझी दुसरीकडे स्पेस एज्युकेटर म्हणून निवड झाल्याने तो प्रवासही नाशिक आणि प्रसंगी नाशिकच्या बाहेर सुरू होता.

तुमचे प्रेरणास्थळ व घरातून पाठिंबा होता का?

- लहानपणी स्पेस विषयावरील सिनेमे पाहण्याची आवड होतीच. पण पुढे जाऊन मला लाभलेले गुरूवर्य नारळीकर सर आणि गोवारीकर सर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. नासामध्ये ट्रेनिंग घेताना भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स यांचीही मला प्रेरणा लाभली. यासोबतच घरातून पूर्णपणे पाठिंबा होताच. माहेर आणि सासरी आल्यानंतरही मला माझ्या या प्रवासाला कधीही अडचणी आल्या नाहीत.

स्पेसमधील करिअर संधीबद्दल तुम्ही काय सांगाल?

- ज्यांना कोणालाही स्पेसमध्ये आवड असेल. त्यांना यात करिअर करण्याची फार संधी आहेत. यामध्ये प्रामुख्याने अवकाश तंत्रज्ञान, स्पेस अॅडव्हाकेसी, एव्हीऑनिक्स यांचा समावेश होतो. युवकांनी या क्षेत्राकडे ग्लॅमर नाही तर उद्याची आवश्यकता म्हणून पाहायला हवे, असे मला वाटते. कलामांच्या स्वप्नातील भारत साकारायचा असेल तर नक्की या क्षेत्रात करिअर करायलाच पाहिजे. आपली बुद्धी आपण इतर देशांत देण्यापेक्षा स्वत:च्या देशाच्या विकासात लावली तरच भारत विकसनशीलपासून विकसित होईल. संधी आहेत ‌केवळ आपण त्या घेतल्या पाहिजेत आणि त्याचे सोने करायला हवे.

नासाच्या या मोहिमेची झालेली निवड का आणि कशी झाली?

- मी आणि माझी बहीण लीना आम्ही जुळ्या असल्यानेच आमची या नासा मोहिमेत निवड झाली आहे. यात 'टेलिपॅथी'ने आम्हा दोघांवर काही प्रयोग केले जातील. त्यांचा आमच्या पंचेद्रियांवर, स्नायूवर, ह्रदयावर होणारा परिणाम अभ्यासला जाणार आहे. आमच्यापैकी एक 'नासा'ने तयार केलेले व्हर्च्यूअल स्पेस सेंटरमध्ये असेल तर एक जमिनीवर. यामुळे हा अनुभव आम्हा दोघांसाठीही खूप अनोखा असणार आहे.

नाशिकमधून स्पेस एक करिअर म्हणून कसे वातावरण आहे?

- नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र या पूर्ण विभागात युवकांची ज्ञानमयी फौज आहे. त्यांना केवळ लहानपणापासून गोंजारणे आणि बळ देणे आवश्यक आहे. आम्ही एक स्पेस एज्युकेटर म्हणून त्यांना यातील बारकावे, वेगवेगळ्या कुतूहलाच्या गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करतो. नुकतेच त्यासाठी त्यासाठी स्पेस वीक साजरा करून लहान मुलांना अवकाशाबद्दलचे आकर्षण आम्ही सांगण्याचा आणि दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी महापालिका आणि प्रशासनाकडून चांगले सहकार्य लाभले. पुढेही मी आणि माझे सहकारी नाशिकसाठी चांगले करण्याचा प्रयत्न नक्की करू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेमाडपंथी शिवालयात होणार दोन हजार दिवे प्रज्वलित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील झोडगे येथील माणकेश्वर हेमाडपंथी शिवालय येथे गेल्या चार वर्षांपासून आयोजित केला जाणारा झोडगे दीपोत्सव यावर्षी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपासून साजरा होणार आहे. दीपोत्सवानिमित्त दोन हजार दिवे प्रज्वलित करण्याचा झोडगेकरांचा संकल्प आहे.

दीपावलीच्या प्रकाश पर्वात आपले घर, आंगण प्रकाशाने, रंगोळीच्या रंगाने उजळते पण, झोडगे गावाचे भूषण, श्रद्धास्थान असलेले ७५० वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी शिवालय मात्र कायमच अंधारात राहिले आहे. दिवाळी सणाचे निमित्त साधून या ऐतिहासिक शिवालयाचे जतन, संवर्धन व्हावे या ठिकाणी अधिकाधिक पर्यटन वाढावे यासाठी जागृती व्हावी म्हणून फक्त एक दिवा आपल्या मंदिरासाठी या संकल्पनेवर आधारित हा झोडगे दीपोत्सव समस्त झोडगे ग्रामस्थांकडून गेल्या चार वर्षांपासून साजरा केला जात आहे.

गेल्या चार वर्षात येथे साजरा होणाऱ्या दीपोत्सवातून अनेकांना आकर्षित केले आहे. तसेच, हेमाडपंती शिवालयाच्या जतन व संवर्धनाच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश देखील मिळत आहे. दीपोत्सवाच्या माध्यमातून दिवा लावू तेजाचा, वारसा जपू शिवालयाचा हा संदेश या निमित्ताने देण्याचा प्रयत्न असणार आहे. मागील चार वर्षांपासून एक हजार दिव्यांच्या प्रकाशात हे शिवालय प्रकाशमान झाले होते. यावर्षी दीपोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून, यंदा दोन हजार दिव्यांच्या प्रकाशात हा मंदिर परिसर प्रकाशित करण्याचा संकल्प झोडगेकरांनी घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बांधकामांना मजुरांना दिवाळीभेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सरकारच्या बांधकाम कामगार मंडळाकडून लवकरच बांधकाम मजुरांना टूलकीटसाठी पाच हजार रुपये मिळणार आहेत. तसेच गेल्या २२ ऑगस्टपासून बंद झालेली बांधकाम मजुरांसाठीची मेडिक्लेम पॉलिसीही सुरू होणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमिवर बांधकाम मजुरांसाठी या दोन्ही बातम्या आनंदाची वार्ता घेऊन आल्या आहेत.

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी बांधकाम मजुरांसदर्भात झालेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. सरकारकडून बांधकाम कल्याण मंडळाकडून बांधकाम मजुरांची नोंदणीच होत नसल्याचा आरोप डॉ. कराड यांनी केला. त्यामुळे तब्बल चार हजार कोटी रुपये सरकारकडे विनावापर पडून असल्याची वस्तुस्थितीही त्यांनी यावेळी मांडली.

राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण मंडळ सन २०११ मध्ये स्थापन केले. बांधकाम मजुरांच्या हितासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. मंडळ स्थापन झाल्यापासून बांधकाम व्यवसायिकांकडून दहा लाखांच्या पुढील बांधकामापासून एक टक्के रक्कम बांधकाम मंडळाकडे जमा करण्याचे आदेश सरकारने केले होते. बांधकाम व्यावसायिकांनी देखील सरकारचा आदेश पाळत सन २०११ पासून नियमितपणे १ टक्का रक्कम आजपर्यंत भरलेली आहे. परंतु, पाच वर्षांत बांधकाम कामगार मंडळाकडे चार हजार कोटीच्या पुढे रकम जमा झाली असतांना त्यातील केवळ १०० कोटींचा निधी बांधकाम मजुरांवर खर्च करण्यात आले असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

डिसेंबरमध्ये नोंदणी

बांधकाम मजुरांच्या अध्यक्षा सिंधू शार्दुल यांनी बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून बांधकाम मजुरांना दिल्या जाणाऱ्या २२ लाभदायी योजनांची माहिती दिली. तर बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी 'सीटू'चे सहकार्य असून कामगार उपायुक्तांनी सांगितल्यास सीटू भवनात बांधकाम मजुरांची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून देणार असल्याचेही 'सीटू'चे सिताराम ठोंबरे म्हणाले. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर बांधकाम कामगारांच्या नोंदणीची मोहीमच 'सीटू' राबविणार आहे.

मागणी मान्य

सरकारने बांधकाम मजुरांना टूलकीटसाठी पाच हजार रुपये द्यावेत व बंद करण्यात आलेली मेडिक्लेम पॉलिसी सुरू करावी याबाबत मागणी केली होती. 'सीटू'ची मागणी बांधकाम कामगार कल्याण मंडळाने मान्य करत लवकरच टूलकीटसाठी बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये व मेडिक्लेम पॉलिसी सुरू करणार असल्याचे बांधकाम कामगार कल्याण मंडळ आयुक्तांनी सांगितल्याची डॉ. कराड यांनी माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉवरडीलच्या कामगारांना पावली लक्ष्मी

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ट्रान्समिशन टॉवरसाठी आवश्यक ते घटक बनविणारी पॉवरडील कंपनी लक्ष्मी पूजनाच्या महूर्तावर नव्याने सुरू झाली आहे. कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील मतभेदानंतर आर्थिक तोट्याचे कारण दर्शवित कंपनीने जून महिन्यात लॉक आऊट नोटीस दिली होती. मात्र त्यांच्यात समझोता झाल्याने सहा महिन्यांच्या कालावधीनंतर कंपनीचे युनिट नव्याने सुरू झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

विल्होळीतील पॉवरडील कंपनीचे युनिट कार्यरत आहे. येथे सहा महिन्यांपूर्वी कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीच्या संपापाठोपाठ पॉवरडीलचाही संप चर्चेत आला होता. दरम्यान, आर्थिक डबघाईचे कारण दर्शवित कंपनीने जून २०१५ पासून कंपनीने टाळेबंदी जाहीर केली होती. यानंतर १३ जुलै रोजी कामगार उपायुक्तांनी टाळेबंदी बेकायदा असल्याचे जाहीर केल्यानंतरही युनिट पुन्हा कार्यरत करण्यात कंपनी व्यवस्थापनास अपयश आले होते. दरम्यान, काही दिवसांपासून महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्या पुढाकाराने कामगार आणि व्यवस्थापनात चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरज 'नो व्हेइकल झोन'ची

$
0
0

प्रवीण बिडवे, नाशिक

शहरात निद्रिस्त प्रशासन आणि बेशिस्त नागरिक असतील तर वाहतूक व्यवस्थेचा कसा खेळखंडोबा होऊ शकतो, हे या दिवाळीच्या काळात पहावयास मिळाले. बाजारपेठांमधील दुकानांपर्यंत वाहने घेऊन जाण्याच्या नागरिकांचा अट्टाहास वाहतूक व्यवस्थेचे कसे तीन तेरा वाजवू शकतो हे गेल्या आठवडाभरात प्रकर्षाने जाणवले. अशी परिस्थिती उदभवू नये यासाठी नो व्हेईकल झोन व तत्सम उपाययोजना करणे ही काळाची गरज बनली आहे.

दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेमध्ये उत्साह संचारल्याचे पहावयास मिळते आहे. पगार आणि बोनस मिळाल्यानंतर कामगारांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली. एमजी रोड, मेनरोड, दहिपूल, सराफ बाजार, रविवार कारंजा, शालिमार ही नागरिकांची खरेदीची आवडीची बाजारपेठ. त्यामुळे साहजिकच प्रत्येकाचा ओढा या बाजारपेठांकडे होता. अरुंद रस्ते, त्यावरच हातगाडीवाल्यांची गर्दी, दुकानदारही रस्त्याचा सुमारे अर्धा भाग माल ठेवण्यासाठी वापरत असल्याने रस्ते अधिकच अरुंद बनले आहेत. याउलट शहराची लोकसंख्या वाढतच असल्याने गर्दीचा ओघही वाढतो आहे. त्यामुळे भेडसावणाऱ्या समस्या दिवाळीच्या निमित्ताने प्रामुख्याने पुढे आल्या. खरेदीसाठी येणारा प्रत्येक ग्राहक थेट दुकानापर्यंत वाहन घेऊन जाण्याचा अट्टाहास करीत असल्याने पादचाऱ्यांना पायी चालणेही मुश्किल होत असल्याचे खेदजनक वास्तव पुढे आले. बाजारपेठेत चालायलाही पुरेशी जागा नसताना तेथे वाहन घेऊन जाण्याचा अट्टाहास कशासाठी? त्यातून आपण इतरांची गैरसोय करतोच; परंतु त्याचबरोबर स्वत:ची गैरसोय करीत असल्याचे आपल्या लक्षात कसे येत नाही? हा खरा प्रश्न आहे. बरे, अशा बाजारपेठांमध्ये ही परिस्थिती आताच एवढी चिंताजनक असून भविष्यात कसे होणार याचा कुणीतरी विचार करणार आहे की नाही? रस्त्यांची रुंदी वाढविणे तसेच हातगाडीवाल्यांना रस्त्यावर थांबण्यास मज्जाव करणेही शक्य नाही. दुकानासमोर वाहन उभे करण्यास व्यावसायिक मज्जाव करीत नाही मग हा प्रश्न सुटणार तरी कसा?

विशेष म्हणजे वाहतुकीची समस्या जटील होत असली तरी ती सोडविण्यासाठी ज्या उपाययोजना करावयास हव्यात त्या करण्यास ना महापालिका उत्सुक आहे ना पोलिस प्रशासन. त्यामुळे वाहनधारकांचा बेशिस्तपणा फावतो आणि त्याचे परिणाम पादचाऱ्यांनाही भोगावे लागतात. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होऊ लागताच खरेतर पोलिसांनी काही परिसर नो व्हेईकल झोन करणे आवश्यक होते. परंतु, तसे केले गेले नाही. परिणामी ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊन त्याचा मनस्ताप सर्वांनाच सहन करावा लागला. रविवार कारंजासारख्या परिसरात बॅरिकेडींग टाकण्याचे शहाणपण पोलिसांना सुचले. परंतु ते ही उशिरा.

दुसरी प्रमुख समस्या भेडसावली ती वाहनतळांची. शहरात वाहनतळांचा मोठा अभाव असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. मात्र त्यावर अजूनही समाधानकारक तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. वाहनतळांचा प्रश्न सोडविल्याशिवाय आणि नो व्हेईकल झोन सारखे निर्णय घेतल्याशिवाय वाहतूक कोंडीचा जटील प्रश्न सुटू शकत नाही, हे वास्तव प्रशासनाला आज ना उद्या स्वीकारावे लागणार आहे. शहरातील बाजारपेठांजवळ छोटी मोठी मैदाने आहेत. यशवंतराव व्यायामशाळेचे पटांगण, बी. डी. भालेकर मैदान, गंगापूर रोडवरील मराठा विद्या प्रसारक समाजाचे वाहनतळ, शालिमार येथील जिमखाना मैदान, थोड्या अधिक अंतरावर असलेले गोल्फ क्लब मैदान ही अशा गर्दीच्या काळात उपयोगात आणता येऊ शकतात का याचा विचार करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अन्यथा आणखी काही वर्षांत बाजारपेठांमधील रस्त्यांवर पाय ठेवायलाही जागा मिळणार नाही. म्हणूनच अशा गर्दीच्या काळात वाहनधारकांवर मर्यादा आणण्याचे पाऊल प्रशासनाला उचलावे लागेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अवलंब हा समर्थ पर्याय असला तरी तो कितपत स्वीकारला जाईल याबाबत शंकाच आहे. परंतु, किमान जवळच्या मैदानांवर वाहनतळाची व्यवस्था केली गेल्यास व तेथेच वाहने उभी करण्याची सक्ती केल्यास हा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूजल विकास?

$
0
0

डॉ. प्राजक्ता बस्ते

पाणीटंचाई हा प्रश्न आणि परिस्थिती आज आपल्याला नवीन नाही. पाणीटंचाई निर्माण होणे मानव आणि निसर्गनिर्मित बाब आहे. याची दोन मुख्य कारणे आहेत. पहिले तर शहरातील लोकांकडून पाण्याचा अवाजवी हव्यासापोटी होणारा अतिरिक्त वापर आणि दुसरे कारण म्हणजे जमिनीमध्ये पाणी न मुरल्यामुळे भूजलाचा साठा तयार न झाल्यामुळे पाण्यासाठी होणारी वणवण.

भूजल वापराबद्दल खूप कमी जागरुकता आहे. पहिली बाब म्हणजे सगळ्यांना असे ढोबळ पद्धतीने माहित असणे की ज्या काळ्या पाषाणावर हा संपूर्ण महाराष्ट्र आहे त्यात पाणी मुरविणे अत्यंत कठीण आहे. किंबहुना अशक्य आहे. परंतु, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राज्याच्या जलआराखड्यानुसार पश्चिम वाहिनी नद्यांचे क्षेत्र सोडले तर पूर्वल वाहिनी नद्यांच्या खोऱ्यामध्ये ८० ते ९० टक्के भूजल संवर्धन होऊ शकते. म्हणजेच भूजल संवर्धनाच्या योग्य असे आपले भूक्षेत्र आहे. या वैज्ञानिक वास्तवावर विश्वास ठेवून आज शहरातील लोकानी भूजल पातळीची वाढ करण्यासाठी जबाबदारी उचलायला हवी.

ग्रामीण भागात अजून ७० टक्के शेती व्यवसाय भूजलावर आधारित असल्यामुळे शेतकऱ्यांनी पर्यायाने या संपत्तीकडे काळजीपूर्वक व डोळसपणे पहायला सुरूवात केली आहे. भूजल पातळीचा विकास होण्यासाठी सरकारकडून बरेच उपक्रम राबविले जात आहे. थोड्या फार प्रमाणात त्या उपक्रमांची अंमलबजावणी होत आहे. ग्रामीण भागात त्या कामांचे स्वरुप आणि व्याप्ती आताची दुष्काळी परिस्थिती पाहता किमान ५० पटीने वाढण्याची आवश्यकता आहे. सरकारने ग्रामीण भागांसाठी भूजल संवर्धन मार्गदर्शक तत्त्वे आणि ठोस नियमावली प्रसिद्ध केली आहे. अशाच प्रकारची तत्वे आणि नियमावली शहरी भागासाठीही आवश्यक आहे. मुख्यत्वे शहरे ही नदी किनारी वसलेली आहेत आणि नदी हे भौगोलिकदृष्ट्या जमिनीवरील आणि जमिनीखालील पाणी या दोघांशी जोडलेली असते. त्यामुळे शहरातूल भूजल संवर्धन खूप महत्त्वाचे आहे. बांधकाम विकासाच्या नियमावलीनुसार, बांधकाम करताना किंवा पूर्ण झाल्यावर विंधन विहीर घेऊन भूजलाचा वापर केला आहे. त्याने भूजल संवर्धन करणे बंधनकारक आहे. परंतु, या नियमांची अंमलबजावणी किंवा त्याबद्दल संवेदनशील दृष्टीकोन अभावानेच पहायला मिळतोय. आतापर्यंत या नैसर्गिक संपत्तीचे शहरवासियांनी केवळ शोषण केल्यामुळे बहुतांश शहरांमधील भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. या परिस्थितीला बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, नागपूर ही शहरे अपवाद नाहीत. परंतु, बंगळुरू आणि चेन्नईमध्ये या परिस्थितीची जाणीव १०-१२ वर्षांपूर्वीच झाली असल्यामुळे तिथे भूजलसाठीची नियमावली कडक करण्यात आली आहे. या शहरांचा भूजलाचा त्याच्या पूनर्भरणाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून त्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर भूजल संवर्धन करणाऱ्याला वेगवेगळ्या करांमध्ये सूट देण्यात आली. त्यामुळे आपोआपच लोक सहभाग प्रचंड प्रमाणात वाढला आहे. आणि कृती आराखडा राबविण्यास मोठे यश आले आहे. आज दोन्ही शहरांमधील भूजल पातळी ०.५ ते १ मीटरने उंचावली आहे.

नाशिकमध्ये भूजल पातळी खालावली आहे, शहर ज्या पाणलोट क्षेत्रात येते ते पाणलोट क्षेत्र हे अतिविकसित या वर्गात मोडते म्हणजे ओव्हर एक्सप्लॉईटेड वॉटरशेड. त्यामुळे आपण ही जबाबदारी भूजल पातळी वाढण्यासाठी उंचावण्याची उचलली पाहिजे. आज ४ हजार चौरस मीटर क्षेत्राचा विकास कराताना १० टक्के ओपन स्पेस ठेवणे बंधनकारक आहे. या १० टक्के जागांवर सार्वजिनक उद्याने, सामाजिक मंदिरे आदी विकसित केल्या जातात. या क्षेत्रात जर त्या जागेच्या उताराप्रमाणे भूजल साठवणुकीसाठी विहिरी रिचार्ज पिटस करण्यात आल्या तर ही परिस्थिती सुधारण्यास हातभार लागेल. उद्यान किंवा समाज विकास कराताना हे बंधनकारक केल्यास परिणामकारक ठरेल. ही साठवण विहीर किंवा शोषखड्डा महापालिकेच्या खर्चातून होईल व ती नीट ठेवण्यासाठी आणि सांभाळण्याची जबाबदारी त्या कॉलनीत राहणाऱ्या लोकांची असेल. तसे केल्यास लोकवस्तीत नागरी सुविधांची वेगळी सूट देणे किंवा बक्षिस देवून बढावा देणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटीचा विचार करताना ही बाब मोलाची आहे.

(लेखिका आर्किटेक्ट कॉलेजच्या प्राचार्या आहेत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाडसाला मिळाले जीवदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

पाठीमागे लागलेला कुत्र्यांची एक मोठी झुंड...जीवाच्या आकांताने सैरभर होत धावणारे पाडस...नव्हे तर पोटावर कुत्र्यांचा चावा होताना भीतीने गर्भगळीत झालेले एक निष्पाप हरणाचे पाडस वाचले ते ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे. वनक्षेत्र सोडून येवला तालुक्यातील देवरगाव येथील नागरी वस्ती असलेल्या शेताकडे भरकटलेल्या या हरिणाच्या पाडसाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करतानाच ग्रामस्थांनी त्याला तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यात नेल्याने एका निष्पाप वन्यजीवाचे प्राण वाचले.

येवला तालुक्यात वनविभागाच्या उत्तरपूर्व भागासह अनेक ठिकाणी विस्तीर्ण असे वनक्षेत्र असून, त्यात मोठ्या प्रमाणात हरिण, काळवीट हे वन्यजीव आहेत. हे वनक्षेत्र सोडून अनेकदा ही हरणे नागरी वाड्या, वस्त्या व शेताकडे भरकट असतात. या अगोदर अशीच वाड्या वस्त्यांकडे थडकलेली हरणे मोकाट कुत्र्यांच्या तावडीत सापडताना तर कधी शेतातील विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना घडल्या.

सोमवारी सकाळी असंच एक छोटेसे हरिणाचे पाडस आपला कळप सोडून येवला तालुक्यातील देवरगाव येथील शेत शिवाराकडे धडकले. देवरगावातील गणेश लोखंडे यांच्या शेतात सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास हरणाचे पाडस आले असता कुत्र्यांनी या पाडसावर पाठलाग करीत हल्ला केला.

जीव वाचविण्यासाठी त्याने पळण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र, या छोट्या जीवाचा प्रयत्न अपुरा ठरला. कुत्र्यांच्या या हल्ल्यात हे पाडस जखमी झाले. ग्रामस्थांच्या प्रयत्नाने कुत्र्यांच्या हल्ल्यातून पाडस बचावले. हल्ल्यात कुत्र्यांनी पाडसाच्या पोटाला चावा घेतला. पुढे ग्रामस्थांना पाडसाच्या मागे लागलेली कुत्र्यांची झुंड दिसताच काठ्यांनी कुत्र्यांला पिटाळून लावले.

कुत्र्यांच्या तावडीतून हरिणाच्या पाडसाची सुटका केल्यानंतर पुढे गावातील विठ्ठल सालमुठे व गणेश लोखंडे या दोघा युवकांनी मोटरसायकलवरून सावरगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले. प्राथमिक उपचारानंतर हरणाच्या पाडसाला पुन्हा देवरगावी नेण्यात येऊन वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वनमजूर मोहन पवार हे देवरगाव येथे दाखल झाल्यानंतर हे हरिणाचे पाडस त्यांच्या ताब्यात देण्यात आले. या भागात सातत्याने हरणांवर कुत्रे हल्ले करीत असतात. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images