Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

लसीकरण मोहीमच अशक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत मालेगाव महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दैनंदिन आढावा घ्यावा तसेच तात्काळ आवश्यक उपाययोजना करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

मिशन इंद्रधनुष्यच्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी कुशवाह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. मिशन इंद्रधनुष्यच्या दुसऱ्या टप्प्यात लसिकरण न झालेले बालक व गरोदर मातांच्या लसीकरणासाठी विशेष प्रयत्न करावे आणि या योजनेची अंमजबजावणी प्रभावीपणे करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी सिव्हिल सर्जन डॉ. एस.पी. जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे आदी उपस्थित होते.

लसीकरणाचे कामकाज समाधानकारक न झाल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विचारणा केली. स्थलांतरीत बालक अथवा गरोदर मातांच्या लसिकरणासाठी संबंधित भागातील आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. लसीकरण अभियानातील त्रुटींचे निराकरण करण्यात येऊन १०० टक्के लसीकरण होण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी नियमितपणे कामाचा आढावा घ्यावा. आवश्यक त्या वेळी स्थळभेटी कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. बैठकीस विविध तालुक्यातील आरोग्य अधिकारीही उपस्थित होते.

कामगिरीत सुधारणा अपेक्षित

नाशिक महापालिका क्षेत्रातही आरोग्य अधिकाऱ्यांनी अभियानाकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. चांदवड, त्र्यंबकेश्वर, दिंडेारी तालुक्यासह मनमाड आणि येवला नगर परिषद क्षेत्रातील अभियानांतर्गत कामगिरी सुधारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यावर सोडणारी ‘ती’ माता की, वैरीण ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरात चाकरमान्यांची लगबग सुरू होती. त्यातच एका हॉटेलच्या समोरील मोकळ्या जागेत कपड्यात गुंडाळलेले मुल जीवाच्या आकांताने रडत असल्याचे काहींनी पाहिले. आजूबाजूला कुत्र्यांचा घोळका जमू लागला. नागरिक धावले... अन् एक नकोशी झालेली चिमुरडी वाचली.पण येथे उपस्थित असलेल्या एक प्रश्न सतावून गेला. 'अवघ्या पाच तासांपूर्वी जन्मलेल्या स्त्री अर्भकाला रस्त्यावर सोडणारी 'ती' माता की, वैरीण ?'

वंशाचा दिवा हवा अशी बुरसटलेली विचारसरणी असलेली अनेक कुटुंब जन्माला येणाऱ्या मुलींची कळी पोटातच खुडतात तर जन्मलेल्या नकोशीला रस्त्यावर सोडून देतात. याचाच आणखी एक प्रत्यय पाथर्डी फाटा परिसरातील नागरिकांना आला. 'समाज मान्य करणार नाही' अशा कृत्यांना लपविण्यासाठी नुकत्याच जन्मलेल्या चिमुरडीला थंडीच्या कडाक्यात मरणाच्या दारात ढकलून फरार झालेल्या मातेसह तिच्या नातेवाईकांना पोलिसांनी शोधून कडक शासन करावे, अशी मागणीही नागरिकांनी केली.

रस्त्यावर सोडलेल्या मुलीला पाहून नागरिकांनी तातडीने इंदिरानगर पोलिस स्टेशनला कळवले. हेड कॉन्स्टेबल बी. आर. बोळे, एन. डी, पवार आणि महिला पोलिस कर्मचारी एस. बी. कवडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अगदी पाच तासापूर्वी जन्मलेल्या तान्हुलीची जीवनासाठी सुरू असलेली तगमग पाहून खाकी वर्दीतील माणूस गहिवरला. या कर्मचाऱ्यांनी लागलीच अॅम्ब्युलन्सला कॉल करून त्या तान्हुलीला सिव्ह‌लि हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली. तिची प्रकृती स्थिर असून संबंध‌ति महिलेचा शोध घेत असल्याचे कॉन्स्टेबल बोळे यांनी सांगितले.

कसली ही क्रूरता ?

रस्त्यावरच्या एखाद्या हॉटेलच्या पायरीवर चिमुकलीला कुत्र्यांच्या हवाली करणे ही क्रूरता असल्याचे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले. एखाद्या हॉस्प‌टिलमध्ये जन्मलेले हे मुल काहीच तासात रस्त्यावर आल्याने क्रूरता दाखविणाऱ्या पालकांचा शोध घेणे शक्य असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले. पोलिसांनी याची गंभीर दखल घेतल्यास अशा पालकांचे चेहरे उघड होतील.

अनैतिक संबंधाचा परिणाम?

पोटच्या गोळ्याला अशा प्रकारे अंधारात सोडून पळ काढणारी ती माता कोण? असा प्रश्न या घटनेमुळे सर्वांनाच पडला. एकीकडे स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी वेगवेगळ्यापद्धतीने जनजागृती होत आहे. तर, दुसरीकडे मुलगी जन्माला आली म्हणून पोटच्या गोळ्याला उराशी न धरता चक्क रस्त्यावर टाकून देणाऱ्यांची संख्या कमी नाही. यासाठी अनेकदा अनैतिक संबंध कारणीभूत ठरतात असा दावा पोलिस सूत्रांनी केला. अनैतिक संबंधानंतर जन्मला येणारे मूल अशा पध्दतीने टाकून देण्याच्या घटना शहरात सातत्याने घडत असतात.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूरच्या पाण्याचा आज फैसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठवाड्याला नाशिक आणि नगरमधून पाणी सोडण्यासंदर्भातील याचिकाकर्त्यांचे म्हणणे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने गुरुवारी ऐकून घेतले. याप्रकरणी प्राधिकरण शुक्रवारी (६ नोव्हेंबर) निकाल देणार असून, त्याकडे नाशिक आणि नगरकरांचे लक्ष लागले आहे. या निर्णयावर गंगापूर धरणातून पाणी सोडणे सुरूच राहणार की, याला ब्रेक लागणार याचा निर्णय होणार आहे.

जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही नकार दिल्याने नाशिकमधील जलचिंतन संस्था, गोदावरी कालवा संघर्ष समिती, गोदावरी डावा कालवा पाणी वापर संस्था, नगर जिल्ह्यातील प्रवरा आणि संगमनेर साखर कारखाना यांनी प्राधिकरणाकडे याचिका दाखल केल्या. या याचिकाकर्त्यांचे म्हणणे गुरुवारी ऐकून घेतले. मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये असलेल्या प्राधिकरणाच्या कार्यालयात अध्यक्ष सुरेश कुलकर्णी, सदस्य व्ही व्ही सोडल आणि चित्रकला दीक्षित यांच्या समोर याचिकाकर्त्यांनी त्यांची बाजू मांडली.

गंगापूर धरण समुहात सध्या पिण्याचे आणि उद्योगांचे पाणी आरक्ष‌ति आहे. त्यामुळे जायकवाडीला पाणी देण्याच्या आदेशातील गंगापूर धरण समूह वगळावा, आळंदी धरणाचा समावेश दारणा धरण समुहात करण्यात आला आहे. त्यामुळे या धरणातील पाणी शेतीसाठी आरक्षित असतानाही ते जायकवाडीसाठी सोडले जाते. म्हणून प्रत्यक्षात हे धरण गंगापूर धरण समुहात असणे आवश्यक असल्याचा युक्तीवाद जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केला. गोदावरी खोरे विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यानुसार गेल्या वर्षी जायकवाडी धरणात पिण्याच्या पाण्यासाठी ४.८ टीएमसी पाणी आवश्यक आहे. यंदा १४ टीएमसी इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज कशी निर्माण झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जायकवाडी धरणातून ७.२१ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होईल, असे महामंडळाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नाशिक, नगरमधून जाणारे पाणी हे बाष्पीभवनासाठी आहे का, असा सवालही जाधव यांनी प्राधिकरणाकडे उपस्थित केला. मेंढेगिरी समितीने दिलेला तक्ता बदलण्याची गरज असून गरजेनुसार पाण्याचे आरक्षण निश्चित करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर, डाव्या कालव्यावर आमच्या द्राक्षबागा अवलंबून आहेत. जलसंपदा विभागाशी करार केला असल्यामुळे विभागाने आम्हाला पाणी देणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीने तयार करण्यात आलेल्या बागा पाणी न मिळाल्यास उद्धवस्त होणार आहे.

उद्या विशेष महासभा

नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्याविरोधातील आंदोलनाची दखल मुख्यमंत्री घेत नसल्याने लोकप्रतिनिधी आणि महापालिका आता आक्रमक झाली आहे. आपल्या हक्काच्या पाण्याला धक्का लावू नये म्हणून महापालिकेच्या वतीने शनिवारी (दि. ७) तातडीची महासभा बोलविण्यात आली आहे. यात सरकारला संभाव्य पाणीटंचाई व कायदा सुव्यवस्थेसंदर्भातील परिस्थितीची जाणीव करून दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुठे नेऊन ठेवली १२० रुपयांची तूरडाळ?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कडालेल्या तूरडाळीवरून राजकारण भडकले असताना आणि त्यात सर्वसामान्य होरपळून जात असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली १२० रुपये किलो दराची तूरडाळ अद्याप कुठेच दिसून येत नसल्याचे वास्तव आहे. तूरडाळीच्या किंमती कमी न केल्यास कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांनी देऊनही सलग दुसऱ्या दिवशीही बाजारात तूरडाळ किमान १८० रुपयांनी खुलेआम विकली जात होती!

वाढत्या महागाईमुळे त्रासलेल्या नाशिककरांना तूरडाळीच्या वाढीव किंमतीने जेरीस आणले आहे. दिवाळी चार दिवसांवर आली असली तूरडाळ दोनशे रुपये किलोचा 'भाव' खात आहे. एकशे वीस रुपयांना तूरडाळीची विक्री न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले असल्याने गुरुवारी बाजारात तूरडाळीचे दर कमी होतील ही ग्राहकांची अटकळ खोटी ठरली. डाळीच्या किंमती कमी करण्यासंदर्भात कोणत्याही सूचना आल्या नाहीत, हे कारण पुढे करून नाशिकसहसह उपनगरांमध्ये तूरडाळ १८० ते २२० रुपये प्रति किलोनेच विकली जात होती. दोनशे रुपयांच्या खाली असलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या प्रतीच्या डाळीची गुणवत्ता अगदीच सुमार असल्याने ग्राहकांना महागडी डाळ विकत घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

पंचवटी, आडगाव, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, सिडको, सातपूर, गंगापूररोड, म्हसरूळ या ठिकाणी चांगल्या प्रतीच्या तूरडाळीचे दर १८० ते २०० रुपये किलो आहे.

नाशिकच्या बहुतांश ठिकाणी तूरडाळीचा दर चढाच होता. तूरडाळीचा दर नेमका कधी कमी करायचा यासंदर्भात विक्रेत्यांमध्ये एकमत नसून, ही डाळ घाऊक बाजारातून चढ्या दराने विकत घेतल्याने ती स्वस्त विकता येणार नाही, असा युक्तिवाद विक्रेते करत होते.

भाजप प्रतिनिधी उदासीन

मुंबईत भाजप कार्यालयासह रस्त्यांवर स्टॉल उभारून १२० रूपयांने डाळ उपलब्ध केली जात असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र नाशिकमध्ये भाजपच्या आमदारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत कोणीही स्वस्तात नाशिककरांना तूरडाळ मिळावी यासाठी प्रयत्नच न केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत होते आणि नाशिकमध्ये का होत नाही, असा सवालही नाशिककरांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वांच्या सहभागातून पर्यावरण रक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

पर्यावरणाचे रक्षण सर्वांच्या सहभागातूनच शक्य आहे. याबाबत जनजागृतीसाठी माध्यमांचा उपयोग करताना लोकसहभागावर भर देण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुंभमेळ्यात हरितकुंभ स्पर्धा घेण्यात आली, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केले.

राज्यस्तरीय हरितकुंभ माहितीपट स्पर्धेतील विजेत्यांना विभागीय आयुक्त कार्यालयात डवले यांच्याहस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक आयुक्त प्रकाश वाघमोडे, माहिती उपसंचालक सतीश लळीत, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, पर्यावरणप्रेमी राजेश पंडित‍, निशीकांत पगारे, अजित सारंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

डवले म्हणाले, की रांगोळी, चित्रकला, माहितीपट आदी स्पर्धांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाबाबत चांगल्या कल्पना समोर आल्या आहेत. स्पर्धकांनी जबाबदारीच्या भावनेतून स्पर्धेत सहभाग घेऊन चांगली निर्मिती करावी. अशा स्पर्धांमुळे प्रतिभेलाही संधी मिळते. नदी प्रदूषणमुक्तीचा जागर करण्यासाठी माहितीपट उपयुक्त ठरतील.

विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे

उत्कृष्ट माहितीपट : १) रुद्राज गोसावी आणि विशाल पाटील, यश कम्युनिकेशन्स (माझं नाशिक माझी गोदावरी), २) (विभागून) शंतनू चंदात्रे, यश क्रिएशन्स (एहसास), आणि प्रवीण पाटील (गोदावरीचे भविष्य हे आपलंच कर्तव्य), ३) प्रसाद देशपांडे (गंगा माता का दर्द).

उत्कृष्ट संहिता लेखन :

१) दीप्ती चंद्रात्रे, २) सुनेत्रा महाजन व प्रवीण पाटील.

उत्कृष्ट चित्रीकरण :

१) सी. डी. देशमुख, २) किरण जोशी (पुणे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेब्रुवारीपासून अलायन्स एअरची सेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नाशिककरांसाठी मोठी खुशखबर आहे. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरची नाशिक-मुंबई ही विमानसेवा येत्या फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तसेच, पुढच्या टप्प्यात सूरत आणि हैदराबाद या शहरांसाठीची सेवा सुरू करण्याचे एअर इंडियाने जाहीर केले आहे. गो एअरही त्यांची सेवा लवकरच सुरू करण्याची चिन्हे असल्याने इतरही विमान कंपन्यांची सेवा येत्या काळात नाशिककरांना मिळण्याची दाट शक्यता आहे.

ओझर येथील विमानतळाच्या ठिकाणी अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल आणि इतर सोयी-सुविधा असतानाही नाशिकहून विमानसेवेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. यासंदर्भात विविध प्रकारच्या मागण्या, पाठपुरावा झाला तरी त्यास यश आले नाही. मात्र, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एअर इंडिया कंपनीने नाशिककरांना दिलासा दिला आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या एअर इंडियाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून येत्या फेब्रुवारीपासून एटीआर७२-६०० हे या अलायन्स एअरच्या विमानाद्वारे मुंबई-नाशिक-मुंबई ही सेवा देणार असल्याचे पत्र एअर इंडियाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी गोडसे यांना दिले आहे.

पॅसेंजर टर्मिनलची देखभाल करण्यासाठीचे टेंडर हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) काही दिवसांपूर्वीच काढले आहे. एअर इंडियाची सेवा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर टर्मिनलचा सांभाळ बहुराष्ट्रीय कंपनीकडे गेल्यास त्याचा विशेष परिणाम होणार आहे. गो एअर कंपनीनेही नाशिकहून विमान सेवा देण्याबाबत सकारात्मकता दाखविली आहे. एअर इंडियापाठोपाठ गो एअरची सेवाही सुरू झाल्यास अन्य विमान कंपन्याही नाशिकचा विचार गांभिर्याने करतील, असे असे हवाई क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे. परिणामी, २०१६ हे वर्ष नाशिककरांसाठी लाभदायी ठरणार असल्याची चिन्हे आहेत.

नाशिकहून फेब्रुवारीत

सेवा देण्याचे पत्र एअर इंडियाने दिले आहे. मात्र, जानेवारीपासूनच ही सेवा सुरू करावी, असा आग्रह मी त्यांना केला आहे. - हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळग्रस्त वाऱ्यावरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पेठ तालुक्यातील अनेक गावे अंधारात होती. ती हायमास्टमुळे प्रकाशमय झाली आहेत. विजेचे प्रश्न सोडविण्यासाठी उपक्रेंद्रांना मंजुरी मिळविल्याचा दावा दिंडोरी-पेठ मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी केला आहे. मात्र, दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना मदत आणि सरकारी लाभ मिळवून देण्यात आमदार झिरवाळ कमी पडल्याचे पहावयास मिळत आहे. मांजरपाडा प्रकल्प वळण योजना त्यांनी कार्यान्वित करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. वर्षभरासाठी मिळणाऱ्या दोन कोटी निधीपैकी आतापर्यंत आमदार निधीतून ३३ लाख ५६ हजार रुपयांची कामे त्यांनी केली आहेत.

आदिवासी बहुल तालुका हे पेठचे वैशिष्ट्ये तर, दिंडोरी हा कृषिसंपन्न तालुका. दोन्ही ठिकाणचे प्रश्न वेगळे. अशी भिन्न परिस्थिती असणाऱ्या दोन तालुक्यांचे प्रतिनिधीत्व आमदार झिरवाळ करीत आहेत. त्यांना मतदारांनी पुन्हा विधानसभेमध्ये मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. त्यांच्याकडून अपेक्षाही वाढल्या आहेत. मतदारसंघात मांजरपाडा प्रकल्प वळण योजना अजूनही प्रलंबित आहे. याबाबत पाठपुरावा सुरू असला तरी त्यास यश मिळू शकलेले नाही. ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी आणि पाणीप्रश्न निकाली निघावा, अशी मतदारांची अपेक्षा आहे.

आमदार निधीतून छोटे रस्ते, शाळांसाठी संगणक खरेदी तसेच, सभागृह उभारणीसारखी कामे होत आहेत. दिंडोरी-मोहाडी, लखमापूर फाटा-भनवड, लखमापूर फाटा-कादवा कारखाना, दिंडोरी-उमराळे रस्त्यांच्या डागडूजीची कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. विजेच्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी ही मोठी अपेक्षा मतदारांना विशेषत: शेतकऱ्यांना होती. त्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले, ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. गोळशी फाटा येथे १३२ केव्हीचे नवीन उपकेंद्र याखेरीज करंजाळी, निगडोळ, परमोरी, कोराटे या ठिकाणी नवीन उपकेंद्रांना मंजुरी मिळाली आहे. वडनेर भैरव आणि भनवडपासून पुढे गुजरातला जोडणाऱ्या रस्त्यास मंजुरी मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जात असून, हे कामही मार्गी लागेल असा विश्वास आहे. दोनशे कोटींचे हे काम निविदा प्रक्रियेत अडकले आहे. अक्राळे औद्योगिक वसाहत प्रकल्पग्रस्तांना भरीव मोबदला मिळवून देण्याचा तसेच औद्योगिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्नही सातत्याने सुरू आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. पेठ तालुक्यात पाच मोठ्या पुलांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, त्यामुळे अनेक गावे एकमेकांना जोडले जाणार आहेत. त्यासाठी घाट कटिंगची कामे प्रगतीपथावर आहेत.

पेठमध्ये अनेक गावे, पाडे अंधारात होते. तेथे हायमास्ट बसविल्याने गावे प्रकाशमय झाली आहेत. पेठ-दिंडोरीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असून, मतदारसंघामध्ये अभ्यासिकांना मंजुरी मिळविण्यातही यश आले आहे. आदिवासी विकास विभागामार्फत ठक्कर बाप्पा योजनेतून आदिवासी वस्त्यांमध्ये पक्के रस्ते बांधण्यावर भर दिला जात आहे. काही कामांना मान्यता मिळाली असून, अनेक कामे मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांच्या वादात अधिकाऱ्यांची कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सेवा हमी कायदा करून नागरिकांना दिलासा देण्याचा आभास निर्माण करणाऱ्या आणि मेक इन महाराष्ट्राचा डंका पिटणाऱ्या युती सरकारमधील अंतर्गत राजकारणाचे मोठे परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. महसूल विभागातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये (एमआयडीसी) प्रती नियुक्ती झाल्यानंतरही अधिकाऱ्यांना अद्यापही आदेशाची प्रतीक्षा आहे.

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या स्वाक्षरीनिशी गेल्या महिन्यात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात नाशिक महसूल विभागातील दोन अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर 'एमआयडीसी'त पाठविण्यात आले. यातील एका अधिकाऱ्याची नियुक्ती धुळे, जळगाव व नंदुरबार येथील एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारीपदी तर दुसऱ्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती नाशिक व नगर एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारीपदी करण्यात आली आहे. या साऱ्या प्रकाराला महिना उलटला तरी हे दोन्ही अधिकारी अद्याप कामावर रुजू होऊ शकलेले नाहीत. त्यास भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद आणि राजकारण कारणीभूत असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. उद्योग मंत्रालय हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याकडे असून महसूल विभागातून उद्योग विभागात प्रतिनियुक्तीवर बोलावण्यात आले नाही तर महसूल विभागाने या अधिकाऱ्यांचे आदेश काढलेच कसे, असा प्रश्न उद्योग मंत्रालयाने उपस्थित केला आहे. दोन मंत्रालयांमध्ये असलेला असमन्वयातून हा प्रश्न निर्माण झाला आहे की राजकारणातून याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे, याप्रश्नी तोडगा निघत नसल्याने हे प्रकरण आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्याचेही समजते. दिवाळी आल्याने या प्रकरणी आता दिवाळीनंतरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

कामाविना घरबसल्या पगार

सेवा हमी कायदा करुन निश्चित वेळेत नागरिकांना सेवा देण्याचे राज्य सरकारने प्रशासनावर बंधन टाकले आहे. तसेच, मेक इन महाराष्ट्रद्वारे परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणणे आणि राज्यातील उद्योग क्षेत्राचा विकास करण्याची युती सरकारची महत्त्वाकांक्षा आहे. असे असताना दोन उपजिल्हाधिकाऱ्यांना तब्बल महिनाभर घरी बसून पगार दिला जात आहे. काही महिन्यांपूर्वीही महसूल विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी बदलीनंतरही अनेक महिने वेटिंगवर असल्याने त्यांनाही घरबसल्याच पगार सरकाने दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंदिरानगर अंडरपास झाला डोईजड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मध्य नाशिक मतदारसंघात दिग्गज प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारून विजयावर स्वार झालेल्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी मतदारसंघातील विकासकामांचा पाळणा काहीअंशी हलता ठेवला आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या आमदार असल्याने हा वेग अधिक वाढविण्याची गरज मतदारांसह विरोधकांकडून व्यक्त केली जात आहे. फरांदेचा जनसंपर्क चांगला असला, तरी आक्रमकपणा बऱ्याचदा त्यांच्या अंगलट येत असून, पक्षांतर्गत विरोधकांमध्येच त्या गुरफटल्या आहेत. वर्षभरात आमदार निधी वापरात त्यांनी आघाडी घेतली तरी, इंदिरानगरच्या अंडरपासचे दुखणे बरे करणे त्यांच्या हे त्यांच्यापुढचे सर्वात मोठे आव्हान आहे.

नरेंद्र मोदींच्या लाटेमुळे नाशिक मध्य मतदारसंघात प्रा. फरांदे यांनी वसंत गितेंसारख्या दिग्गज उमेदवाराचा तब्बल २८ हजार मतांनी पराभव केला. नगरसेवक पदामुळे अगोदरच जनसंपर्क दांडगा असल्याने आमदारकीची दुहेरी जबाबदारी त्यांच्यावर मतदारांनी सोपवली. योगागाने भाजपने राज्यात सत्ता स्थापन केल्याने नाशिक मध्य मतदारसंघातील मतदाराच्या अपेक्षा त्यांच्याकडून अधिक उचांवल्या. कुटुंबाला राजकीय वारसा असल्याने थेट पहिल्या यादीतच मंत्रिपदाची संधी मिळेल, अशी अपेक्षा मतदारांना होती. मात्र, मंत्रिपद न मिळाल्याने नाराज न होता त्यांनी मतदारसंघातील जनतेची गरज ओळखत कामाला सुरुवात केली. विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मतदारसंघातील कामांना सुरुवात केली. ग्रीन जीम उभारणे, शाळांना संगणक देणे, ई-लर्निंगच्या सुविधेसाठी प्रयत्न करीत आमदार निधी जास्तीत जास्त या तीन कामांसाठी वापरण्यात त्यांनी प्राधान्य दिले. तसेच, मतदारसंघातील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी आपल्याच कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.

शिलापूर येथील टेस्टिंग लॅबसाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. वाडीवऱ्हे येथील थायसन कंपनीतील संप मिटवून कामगारांचा प्रश्न मार्गी लावला. शहरात महिलांसाठी स्वतंत्र शंभर खाटांचे रुग्णालय शासनाकडून पाठपुरावा करून मंजूर करून घेतले. त्यामुळे शहरात प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उपलब्ध होणार आहे. मतदारसंघातील मेळा बसस्थानकांचे रुपडे पालटण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला असून, २४ कोटी रुपये मंजूर केल्याचा दावा त्यांनी केला आहे. कथडा भागात व्यायामशाळा, द्वारका येथे बाजारपेठ, गोदावरीवर हरिद्वारच्या धर्तीवर आरती सुरू करणे, टी. पी. स्कीम, महाराष्ट्र जिल्हा नावीन्यता परिषदेंतर्गत इनोव्हेशन हबसाठी प्रयत्न करण्यास आता त्यांनी प्राधान्य दिले आहे.

सद्यस्थितीत इंदिरानगर अंडरपासचा प्रश्न सोडविण्याचे सर्वात मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. कोट्यवधी रुपये खर्चून या भागातील नागरिकांना अंडरपासचा उपयोग होत नाही. त्यामुळे त्यांच्यासह नागरिकांसाठी मोठी डोकेदुःखी ठरली आहे. केवळ शांळाना संगणक, ग्रीन जीम पुरते मर्यादीत न राहता त्यांनी नाशिकसाठी सरकारकडून मोठे प्रकल्प आणून मतदारसंघाच्या विकासाला बुस्ट देण्याची गरज आहे. सोबतच महापालिकेसाठी शासनाकडून अधिकचा निधी आणून मतदारसंघातील पायाभूत सुविधांसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शासन दरबारी आपले वजन वापरून जुन्या नाशकातील रस्ते, घरांचे प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे. मतदारसंघातील झोपडपट्ट्यांची संख्या अधिक असून, त्यासाठी प्रयत्न करावे, अशी मतदारांची अपेक्षा आहे. महापालिकेच्या रखडलेल्या घरकुल योजनेला गती देऊन झोपडपट्ट्यांची संख्या कमी करता येणार आहे.त् यामुळे मतदारांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या आहेत. आक्रमकणपणा व महत्त्वाकांक्षेमुळे पक्षांतर्गत विरोधक वाढल्याने त्यांच्या प्रयत्नांना खोडे घालण्याचेच प्रयत्न अधिक होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुतण्याने लुटले काकाचे घर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्ज फेडण्यासाठी काकाच्या घरात साथीदारांच्या मदतीने लूट करणाऱ्या पुतण्यास अंबड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सावतानगर येथील सूर्योदय कॉलनीत राहणाऱ्या राजकुमार बाफना यांच्या घरी हा प्रकार घडला. पोलिसांनी पुतण्या पंकज दिलीप बाफना (वय २३) याच्यासह त्याच्या अन्य दोन साथीदारांना अटक केली.

पंकजला जुगारासह अन्य काही नाद आहेत. यातून त्याच्यावर काही कर्ज झाले होते. या पार्श्वभूमीवर पंकजने राहुल चौधरी (वय ३०) आणि अक्षय देशमुख (वय २४) या दोघांना लुटीसाठी मदतीला घेतले. गुरुवारी रात्री संशयितांना बाफना यांच्या घरात प्रवेश केला. तसेच चाकूचा धाक दाखवून गर्व्हमेंट कॉट्रक्टर असलेल्या बाफना यांच्या पत्नी आरती यांना बंदी बनवले. संशयितांनी आरती यांचे हातपाय बांधून घरातील पैसे व दागिने जमा करण्यास सुरुवात केली. मात्र, घरात असलेल्या १० वर्षाची सिध्दीने दरवाजा ठोठवण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. याच वेळी अंबड परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. इमारतीतील रहिवाशांनी या घटनेची माहिती बीट मार्शल विष्णू गावित आणि राजाराम गांगुर्डे यांना कळवली. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने एका संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता परिस्थिती समोर आली.

पंचवटीत गोळीबार

हवेत गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या योगेश दत्तू क्षीरसागर, दीपक आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पंचवटीत साडेबाराच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर आरोपींनी पलायन केले असून, पोलिस मागावर आहेत. पेठरोडवरील अशोक कारवाल यांच्याशी सुरू असलेला पूर्वीचा वाद मिटवताना योगेशने हवेत गोळी चालवल्याचे प्राथमिक तपासात निष्पण झाले.

दहा जणांवर मोक्का

हिरावाडी परिसरातील कमलनगर येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या १० संशयित सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी मोक्का कलमानुसार गुन्हा दाखल केला. वाढीव कलमाच्या वापरासाठी कोर्टाने मंजुरी दिली असून यात जयेश दिवे, राकेश कोष्टी, कुंदन परदेशी, सुनील धोत्रे, लक्ष्मण जाधव, गणेश कालेकर, अक्षय इंगळे, राकेश शेवाळे, मयूर कानडे, परिक्षित सूर्यवंशी यांचा समावेश आहे. संशयिताविरोधात विविध पोलिस स्टेशनमध्ये २२ गुन्हे दाखल असून, चालू वर्षात पहिल्यांदाच सराईत गुन्हेगाराविरोधात मोक्का कलमाचा वापर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकाशयात्रा आठवणीतून जागवल्या स्मृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने नाशिकच्या नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य अशा विविध कलाप्रांतातील आणि सांस्कृतिक विश्वातील काळाच्या पडद्याआड गेलेल्या कलावंतांच्या स्मृती 'प्रकाशयात्रा आठवणींची' या कार्यक्रमातून जागविण्यात आल्या.

कवी कुसुमाग्रज, भारतीय चित्रसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्यापासून अगदी अलिकडे देवाघरी गेलेले तरूण कलावंत अशा नाशिकच्या सांस्कृतिक नभांगणातील अनेक तेजस्वी ताऱ्यांचे दिपावलीच्या पूर्वसंध्येला स्मरण करावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या दीपोत्सवानिमित्ताने प्रत्येक दिवंगत कलावंतांचे स्मरणप्रीत्यर्थ कुटुंबीयांच्या हातून एक पणती प्रकाशमान करण्यात आली. या कलावंताचे नाव असलेला आकाशकंदील प्रज्वलित करण्यात आला. सुमारे १५० स्वर्गस्त कलावंतांचे स्मरण, त्यांचे कार्य व महती स्लाईडच्या माध्यमातून देण्यात आली. हेमंत टकले यांनी प्रास्ताविक केले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विनायक रानडे, सूत्रधार कैलास पाटील, दिग्दर्शक सचिन शिंदे, सर्वश्री मनिष चिंधडे, शाम पाडेकर, राजा पाटेकर, नवीन तांबट, सी. एल. कुलकर्णी, राजू पत्की आणि सहकारी कलावंत व कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीपोत्सवाला सुरुवात; आज वसुबारस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीची खरी सुरुवात होते ती आश्विन कृष्ण द्वादशी, गोवत्सद्वादशीस म्हणजेच वसुबारस या सणापासून. गाय आणि वासराच्या पूजेचे महत्त्व असलेला हा दिवाळीच्या दिवसांपैकी पहिला दिवस आहे. हिंदू संस्कृतीमध्ये गायीला माता मानलेले असल्याने या दिवसाला मोठे महत्त्व आहे.

वसुबारस याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी घरातील महिला गायीच्या पायावर पाणी घालतात. गायीला वस्त्र परिधान करतात. शिंगाला व खुरांना हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून, गायीचे व वासराचे औक्षण करून त्यांना नैवेद्य खाऊ घातला जातो.

आजकाल विविध गोशाळांमार्फत या दिवशी खास वसुबारस पूजेचे आयोजनही करण्यात येते. ज्यांना जवळपास कुठेच गाय उपलब्ध होत नाही ते घरच्या घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय-वासराचे चित्र रेखाटतात व त्याची पूजा करून नैवेद्य दाखवतात.दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथे असलेल्या नंदिनी गोशाळेमार्फत आज (शनिवार) संध्याकाळी ४ ते ६ यावेळेत वसुबारस सण साजरा केला जाणार असून, यावेळी गाय व वासराचे पूजन होणार आहे.

या पूजेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोम्बिंग ऑपरेशनने गुन्हेगारांवर जरब

$
0
0

नाशिकरोड : शहर पोलिसांतर्फे नाशिकरोड, झोन क्रमांक दोनमध्ये शुक्रवारी रात्री कोम्बिंग आपरेशन झाले. प्रत्येक पोलिस ठाण्यातील संवदेनशील तीन भागांत केलेल्या कारवाईत सराईत गुन्हेगार मुख्य लक्ष्य होते. उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे, अशोक भगत व त्यांचे सहकारी सहभागी झाले.

नाशिककरांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी पोलिसांनी दिवाळीत खास मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशनचाही समावेश आहे. नाशिकरोडच्या मालधक्का, सिन्नरफाटा, एकलहरे येथील कारवाईत १७ संशयितांची चौकशी करण्यात आली. मुंबई पोलिस कायद्यानुसार १८ तर वाहन कायद्यानुसार १२ गुन्हे नोंदविण्यात आले. भगूरचा राजवाडा परिसर, सहा चाळ परिसरातील कारवाईत ११ संशयितांची तपासणी करून १९ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. २१ जणांविरुद्ध मोटरवाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रायकॉम कामगारांचे वेतनवाढीसाठी आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर एमआयडीसी, नाईस भागातील ट्रायकॉम कंपनीतील कामगारांनी दोन वर्षांपासून वेतनवाढ झाली नसल्याने कामबंद आंदोलन पुकारले आहे. यात वेतनवाढीची मागणी करीत शुक्रवारी कंपनीतील कामगारांनी उद्योग भवनातील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी मात्र कामगार उपायुक्त आर. एस. जाधव अहमदनगर जिल्ह्यात अतिरिक्त कामामुळे गेले असल्याने पुन्हा शनिवारी (दि. ७) बैठक घेतली जाणार आहे.

मात्र, ऐन दिवाळीत कामगारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याने कामगारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ट्रायकॉम कंपनीच्या वेतनवाढीसाठी कंपनीतील महिला व पुरूष कामगारांनी जोरदार निर्दशने करत उद्योग भवन दणाणून सोडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी गोदामांतील धान्य असुरक्षित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड आणि गोल्फ क्लब येथील सरकारी गोदामांत तब्बल दीड कोटींहून अधिक किमतीच्या साडे सात हजार क्विंटल धान्याची सुरक्षा धोक्यात आली आहे. गोदामांसाठी सुरक्षारक्षकाचे पदच मंजूर नसल्याने सध्या ही गोदामे रामभरोसे आहेत. सुरगाणा रेशन धान्य घोटाळा राज्यभर गाजत असताना घोटाळेबाज तसेच चोरट्यांना रानच मोकळे असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ऐन सणासुदीच्या काळात गेल्याच आठवड्यात नाशिकरोड येथील गोदामातून साखरेचे कट्टे चोरीस गेले होते. चोरट्यांना पकडण्यात आणि हे कट्टे जप्त करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, त्याचवेळी सरकारी गोदामांमधील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला. गोल्फ क्लब येथील सरकारी गोदामात सध्या ५ हजार १८५ क्विंटल तर नाशिकरोड येथील गोदामात २३७५ क्विंटल धान्य आहे. या धान्याची नियमित उचल होत असली तरी सरकारकडूनही गोदामात धान्याचा ओघ सुरूच असतो. त्यामुळे या गोदामांमध्ये कोट्यावधी रुपयांचे धान्य पडून असते. विशेष म्हणजे अशा या सरकारी मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी गोदामांमध्ये सुरक्षारक्षक असायला हवेत. परंतु, पदच मंजूर नसल्याने तेथे रात्री सुरक्षारक्षक नसतात. दिवसभर गोदामातील कामगारांच्या भरवशावर सुरक्षा होत असली तरी रात्री चोरट्यांना रानच मोकळे राहात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या भरवशावर गोदामातील धान्याची सुरक्षा केली जात असली तरी हे सीसीटीव्ही कुचकामी ठरत असल्याचे चोरीच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

दीड कोटींचा धान्यसाठा उपलब्ध

गोल्फ क्लब गोदामात सध्या २ हजार ६५० क्विंटल गहू, २ हजार ३८ क्विंटल तांदूळ आणि ४९७ क्विंटल साखर आहे. नाशिकरोड गोदामात १ हजार ४४२ क्विंटल गहू, ८०५ क्विंटल तांदूळ, ४ क्विंटल साखर आणि १२४ क्विंटल ज्वारी आहे. रेशनच्या सरकारी दरानुसार या धान्याची किंमत २३ लाख ४७ हजार ६५० एवढी होते. तर बाजारभावानुसार त्याची किंमत १ कोटी ५७ लाख ४१ हजार २०० रुपये आहे.

आपल्याकडे स्वतंत्र सुरक्षारक्षकाचे पद मंजूर नाही. त्यामुळे गोदाम परिसरात सुरक्षारक्षक नसतात. हे पद मंजुरीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे. गोदामात दिवसा हमाल, गोदामपाल असतात. सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविले आहेत.

- गोरक्षनाथ गाडीलकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदारांना प्रतीक्षा आमंत्रणाची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नावर भाजपच्या तीनही आमदारांनी नाशिककरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आंदोलन करणाऱ्या कृती समिती ऐवजीसाठी महापौरांनी निमंत्रणे दिले असते तर आम्हीही या आंदोलनात सहभागी झालो असतो, असा पवित्रा पाणी वाहून गेल्यानंतर घेतला आहे.

जलसंपदा विभागाने सव्वा टीएमसी पाण्याची चुकीची आकडेवारी सादर केल्याचा आरोप आपल्याच खात्याच्या मंत्र्यांवर आमदारभूतींनी लावला आहे. तर मित्रपक्ष शिवसेनेच्या भूमिकेवर आक्षेप घेत सर्व पक्ष पाणीप्रश्नी गलिच्छ राजकारण करत असल्याचा थयथयाट भाजप आमदारांनी केला आहे. दरम्यान, नाशिकच्या पाणीप्रश्नी शनिवारी (दि. ७) एक वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करू केविलवाणे उत्तर देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

जिल्ह्यातील धरणांमधून हक्काचे पाणी चार दिवसापासून वाहून जात आहे. ते पाणी वाचविण्यासाठी शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्ष रस्त्यावर उतरले असतांना भाजपने मात्र मौन साधले होते. गंगापूरचे पाणी सोडल्यामुळे नाशिककरांना गंभीर पाणीसंकटाचा सामना करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत सर्वपक्षीय रान उठले असतांना आठ दिवसापासून गायब असलेले भाजपचे आमदार पक्ष कार्यालयात गुरूवारी प्रकटले. निम्म्यापेक्षा अधिक पाणी वाहून गेल्यानंतर आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत पक्ष आणि सरकारची भूमिका मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

आम्हाला शिवसेनेचे नव्हे; महापौर अशोक मुर्तडक यांचे रितसर आमंत्रण हवे होते. तसे आमंत्रण आले असते तर आम्हीही या आंदोलनात सहभागी होवून मुख्यमंत्र्यांची भेट घेवून पाणीप्रश्नावर आवाज उठविला असता, अशी भूमिका भाजप आमदारांनी घेतली. जलसंपत्ती नियमन कायद्याप्रमाणे पाणी देणे आवश्यक आहे. मात्र, सध्या पाणीप्रश्नावर गलिच्छ राजकारण केले जात असल्याची भूमिका आमदार फरांदे यांनी मांडली. या प्रश्नावर राजकारणा पलिकडे जावून विचार करायला हवे असे सांगत, असतांना फरांदे यांनाही रितसर स्वतंत्र आमंत्रण हवे होते. सिहंस्थ, गंगापूरचे लाईव्ह स्टोरेज, आळंदी धरणाचा गंगापूर धरण समूहात समावेशामुळे तब्बल १३०० दशलक्ष घनफूट पाण्याचे नाशिकचे नुकसान झाले आहे. ही आकडेवारी जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाकडे उपस्थित केले असते तर अधिकचे पाणी मिळाले असते अशी माहिती फरांदेनी दिली. मात्र, मंत्री भाजपचे असल्याचे सांगितल्यावर त्यांची बोलती बंद झाली. तर राजकीय आसूड घेण्याऐवजी एकत्र येवून मोट बांधू, असे आवाहनही त्यांनी केले.

अन् आमदारांची बोलती बंद

जनतेच्या प्रश्नावर आमदारांना रितसर आमंत्रणाची गरज होती काय? असा प्रश्न विचारल्यावर तीनही आमदारांची बोलती बंद झाली. जलसंपदा मंत्र्यांच्या खात्यानेच चुकीची आकडेवारी दिल्याचे पत्रकारांनी लक्षात आणून दिल्यावर आमदारांचे तर आवसान गळाले. आता काय बोलावे अशी त्यांची केविलवाणी अवस्था झाली. कृती समितीऐवजी पाणीप्रश्नावर आमदारांनीच लिड घेतले असते तर पाणी वाचले नसते का? पाणी आंदोलनाचे नेतृत्व आमदारांनीच का केले नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू झाल्यानंतर आमदारांचे चेहरे फिके पडले. कुठून पत्रकार परिषद घेतली असे हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. पाण्यासाठी प्रयत्न करू असे सांगत असतांना वाहून गेलेल्या पाण्यासाठी कसे प्रयत्न करणार असा प्रश्न पडताच 'पाणी कमी पडू देणार नाही' हे एकच उत्तर देतांना त्यांची दमछाक होत होती.

भुजबळ, कदम काय करत होते?

पत्रकार परिषदेत आमदार फरांदे व लक्ष्मण सावजी यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर कडाडून टीका केली. शिवसेना रोज भूमिका बदलते, त्यांच्याबरोबर कसे जाणार असा प्रश्न शहराध्यक्ष सावजी यांनी उपस्थित केला. सन २००५ मध्ये कायदा पास होतांना छगन भुजबळ व आमदार अनिल कदम काय करत होते? शिवसेनेने तेव्हा आवाज उठवला नसता तर आज भुजबळ फार्म हाऊसवर जाण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती असा टोला फरांदे यांनी लगावला.

आमदारांना आमंत्रणाची गरजच का?

भाजप आमदरांच्या आमंत्रणाच्या भूमिकेवर कृती समितीच्या अजय बोरस्ते यांनी टीका केली आहे. उशिरा का होईना भाजपचे आमदार शहरात प्रकट झाल्याचा आनंद असल्याचा टोला लगावत 'पक्षभेद बाजूला ठेवून आम्ही लढतोय. भाजप आमदार सोबत आले असते तर पाणी वाचले असते. मात्र, त्यांना जनतेच्या प्रश्नावर सुद्धा आमत्रंणाची गरज वाटते का?' असा सवाल बोरस्ते यांनी उपस्थित केला आहे.

पाणीप्रश्नी आज महासभा

पाणीप्रश्नावर आवाज तीव्र करण्यासाठी महापालिकेची महापौर अशोक मुर्तडक यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. ७) विशेष महासभा होत आहे. नाशिकचे पाणी जायकवाडीला पळवले जात असल्यामुळे भाजप वगळता सर्वच पक्ष संतप्त आहे. त्यामुळे सरकारच्या निषेधाचा ठराव करून व तात्काळ पाणी थांबविण्याची विनंती ठरावाद्वारे सरकारला केली जाणार आहे. या महासभेत भाजप नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेब्रुवारीपासून अलायन्स एअरची सेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नाशिककरांसाठी मोठी खुशखबर आहे. येत्या फेब्रुवारीपासून एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरची नाशिक-मुंबई ही विमानसेवा येत्या फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तसेच, पुढच्या टप्प्यात सूरत आणि हैदराबाद या शहरांसाठीची सेवा सुरू करण्याचे एअर इंडियाने जाहीर केले आहे. गो एअरही त्यांची सेवा लवकरच सुरू करण्याची चिन्हे असल्याने इतरही विमान कंपन्यांची सेवा येत्या काळात नाशिककरांना मिळण्याची दाट शक्यता आहे.

ओझर येथील विमानतळाच्या ठिकाणी अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल आणि इतर सोयी-सुविधा असतानाही नाशिकहून विमानसेवेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. यासंदर्भात विविध प्रकारच्या मागण्या, पाठपुरावा झाला तरी त्यास यश आले नाही. मात्र, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एअर इंडिया कंपनीने नाशिककरांना दिलासा दिला आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या एअर इंडियाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून येत्या फेब्रुवारीपासून एटीआर७२-६०० हे या अलायन्स एअरच्या विमानाद्वारे मुंबई-नाशिक-मुंबई ही सेवा देणार असल्याचे पत्र एअर इंडियाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांनी गोडसे यांना दिले आहे.

पॅसेंजर टर्मिनलची देखभाल करण्यासाठीचे टेंडर हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) काही दिवसांपूर्वीच काढले आहे. एअर इंडियाची सेवा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर टर्मिनलचा सांभाळ बहुराष्ट्रीय कंपनीकडे गेल्यास त्याचा विशेष परिणाम होणार आहे. गो एअर कंपनीनेही नाशिकहून विमान सेवा देण्याबाबत सकारात्मकता दाखविली आहे. एअर इंडियापाठोपाठ गो एअरची सेवाही सुरू झाल्यास अन्य विमान कंपन्याही नाशिकचा विचार गांभिर्याने करतील, असे असे हवाई क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे. परिणामी, २०१६ हे वर्ष नाशिककरांसाठी लाभदायी ठरणार असल्याची चिन्हे आहेत.

नाशिकहून फेब्रुवारीत

सेवा देण्याचे पत्र एअर इंडियाने दिले आहे. मात्र, जानेवारीपासूनच ही सेवा सुरू करावी, असा आग्रह मी त्यांना केला आहे.

- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅक्टर अपघातात तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, गंगापूररोड

गंगापूरगाव शिवारातील जलालपूर, चांदशी रस्त्यावरील कॅनॉलरोडवर जात असताना ट्रॅक्टर कॅनॉलमध्ये पडला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत नाशिक तालुका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जलालपूर गावातील किशोर भिका पवार (वय ३५) शेतीचे काम आटोपून गावाकडे परतत असताना जलालपूर, चादंशी शिवारातील कॅनॉलरोडवर ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. यात हुडाचा लोखंडी रॉड पाठीत घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला. किशोरच्या पश्चात आई, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इन्स्पेक्शन सेंटर बंद

$
0
0

पुन्हा जुन्याच पद्धतीने 'आरटीओ'त वाहनांची तपासणी सुरू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध राजकीय संघटनांचा हस्तक्षेप, प्रादेशिक परिवहन विभागाची तटस्थ राहण्याची भूमिका आणि संबंधित केंद्र संचालकांची हतबलता यामुळे थाटामाटात सुरू झालेले राज्यातील पहिलेच ऑटोमेटीक व्हेईकल इन्स्पेक्शन सर्टिफिकेशन सेंटर (एव्हीइएस) अघोषित काळासाठी बंद करण्यात आले. शुक्रवारी जुन्याच पध्दतीने वाहन तपासणीचे काम सुरू झाल्याने वाहनचालकांची मात्र दिवाळी झाली.

वाहनातील तांत्रिक त्रुटी आणि प्रदूषणाचे प्रमाण तपासणीसाठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एआरएआय) सहकार्याने प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) जागेत एव्हीइएस यंत्रणा सुरू करण्यात आली. मात्र, या यंत्रणेमुळे सदोष वाहन असलेल्या मालकांसमोर प्रश्न निर्माण झाले. यामुळे अनेक राजकीय संघटनांनी पुढे येत सदर सेंटर बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दोन दिवसापासून वाहनचालकांनी सेंटर चालकांवर दबाव टाकत तोडफोड करण्याची धमकी दिली. आरटीओ कार्यालयात सुरू असलेल्या गोंधळास पोलिसांसह आरटीओ अधिकाऱ्यांनी मुकसंमती दिल्याचे चित्र दिसून येत आहे. आजवर झालेल्या वाहन तपासणीमध्ये शेकडो वाहने ब्रेक, प्रदूषण, हेडलाईट बीम यासह इतर महत्त्वपूर्ण चाचण्यांमध्ये फेल ठरली. दुरुस्ती करून येणाऱ्या वाहनांमध्ये सुध्दा हे प्रमाण कमी झाले नसून, तपासणी सेंटर चालवणाऱ्या रोसमेर्टा टेक्नॉलॉजीज या कंपनीने सर्व्हिस सेंटर सुरू करावे, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. मात्र, असे सेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक ती मंजूर घ्यावी लागेल, असे कंपनीचे डीजीएम सुमित ललित यांनी स्पष्ट केले. आमच्या कंपनीमार्फत आजवर साडेचारशेपेक्षा जास्त वाहनांच्या हेडलाईटचा प्रश्न जागेवर सोडवण्यात आला. दुर्दैवाने जुन्या वाहनांची संख्या मोठी असून, इंधनामध्ये भेसळ करण्याचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. या केंद्रावर सुरुवातीस अनेक रिक्षाचालक रॉकेल मिश्रित पेट्रोलचा वापर करणाऱ्या रिक्षा घेऊन येत. त्यामुळे साहजिकच प्रदूषणाच्या तपासणीत त्या रिक्षा नापास होत. हळूहळू सर्वांना समजावून सांगितले असता आता रिक्षा नापास होण्याचे प्रमाण कमी झाल्याचा दावा जैन यांनी केला. सातत्याने पोलिस संरक्षणाची मागणी करूनही ते मिळालेले नाही. त्यामुळे संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हे केंद्र बंद ठेवणार असल्याचे सुमित ललित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, खासदार हेमंत गोडसे यांनी आंदोलनकर्त्यांची तसेच डेप्यूटी आरटीओ अधिकारी भरत कळसकर यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी निवेदन सादर करीत हे केंद्र बंद करून जुन्या पध्दतीने वाहनांची तपासणी करण्याची मागणी केली. आंदोलकांच्या रेट्यापुढे नमते घेत पुढील दोन दिवस मॅन्युअल पध्दतीने वाहनांची तपासणी करण्याचे ठरले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळारामाला अखेर पावली ‘लक्ष्मी’!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

श्री काळारामासह लक्ष्मण व सीतेला सुवर्णहार करण्यासाठी सुवर्णकार ठरविण्याबाबत दोन विश्वस्तांमध्ये सुरू असलेल्या वादावर अखेर संस्थानच्या अध्यक्षांनी मध्यस्थी करीत पडदा टाकला आहे. सुवर्णहार बनविण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, दंडे आणि गुरव या सराफांकडून दागिने घडविले जात आहेत. येत्या लक्ष्मीपूजनाला श्री काळाराम, लक्ष्मण व सीतेला या सुवर्णहारांनी अलंकृत केले जाणार आहे.

श्री काळाराम संस्थानच्या दानपेटीत आलेल्या २१ तोळे सोन्यातून श्रीरामाला सुवर्णहार करण्याचा निर्णय संस्थानने घेतला होता. यासाठी शहरातील नामांकित सुवर्णकार विनामूल्य हार तयार करून देण्यास तयार होते. मात्र, हा सुवर्णहार कोणत्या सराफाकडून तयार करावा यावरून दोन विश्वस्तांमध्ये एकमत होत नव्हते. त्यामुळे अध्यक्षांनी हा प्रस्तावच बारगळवला होता. विश्वस्तांमधील या वादामुळे श्री काळारामाला पुन्हा वनवास मिळाल्याचे वृत्त 'मटा'ने ३ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केले. या वृत्ताची गंभीर दखल अध्यक्षांसह विश्वस्तांना घेत संस्थानची तत्काळ नव्याने बैठक बोलवली. पांडुरंग बोडके, अजय निकम, गिरीश पुजारी, मंडलेश्वर काळे, कुलकर्णी उपस्थित होते. यात अध्यक्षांनी या विश्वस्तांमध्ये समझोता करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्याला विश्वस्तांनी संमती दिली असून आता दोन सराफांकडून हे अलंकार बनविण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी केवळ श्रीरामालाच हार केला जाणार होता. मात्र, आता नव्याने दहा तोळे सोने घेवून श्रीराम व लक्ष्मणाच्या मूर्तीला प्रत्येकी दहा तोळे, तर सीतेच्या मूर्तीला ११ तोळ्यांचा हार करण्याचा निर्णय झाला आहे. लक्ष्मीपूजन मूहर्तावर श्री काळारामासह, लक्ष्मण व सीतेला प्रत्येकी १० तोळ्याचा हार चढविला जाणार आहे. त्यामुळे भक्तांच्या दानातून श्रीरामाला सुवर्णहार करण्याचे भक्तांची इच्छा पूर्ण होणार आहे तर सुवर्णहाराचा काळारामाचा वनवासही संपणार आहे.

विश्वस्तांमधील वाद मिटला असून, श्री काळारामासह, लक्ष्मण व सीतेलाही आता सुवर्णहार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन सराफांना हे काम देण्यात आले आहे. येत्या ११ तारखेला लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर तीनही हार अर्पण केले जाणार आहेत.

- पांडूरंग बोडके, विश्वस्त, श्री काळाराम संस्थान

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images