Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नगरपंचायतींसाठी आज मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी आज (दि. १ नोव्हेंबर) मतदान होत आहे. निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ३०० हून अधिक पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतींचे नगरपंचायतींमध्ये रुपांतर झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. निफाड, कळवण, चांदवड, देवळा, सुरगाणा, आणि पेठ नगरपंचायतीमध्ये रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी सातला मतदानाला सुरुवात होणार असून, सायंकाळी पाचपर्यंत मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. प्रत्येक नगरपंचायतीमध्ये १७ प्रभाग असून, अनेक उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. रविवारी (दि. १ नोव्हेंबर) येथे मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. प्रत्येक नगरपंचायतीमध्ये १०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये २० मतदान केंद्र अधिकारी, २० सहायक अधिकारी, २० शिपायांसह १०० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याखेरीज कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ३०० पोलिसांचा बंदोबस्तही तैनात असणार आहे. सहा नगरपचायतींसाठी १०२ मतदान केंद्र असून तेथे २१० कंट्रोल युनिट, २१० बॅलेट युनिट, २१० मेमरी चिप पाठविण्यात आले आहेत. प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी ३५ बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि मेमरी चिप पोहोचल्या असून, यंत्रणा सज्ज झाली आहे.

प्रत्येक मतदान केंद्रावर एक याप्रमाणे १७ मतदान केंद्रांसाठी १७ इव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहेत. मशीनमध्ये बिघाड झालाच तर मतदान प्रक्रिया खंडित होऊ नये यासाठी राखीव मशिनरी सज्ज असणार आहे.

सोमवारी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट

शक्यतो त्या त्या तालुक्यातील तहसील कार्यालयामध्येच मतमोजणी करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सोमवारी (दि. २) सकाळी दहाला मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी आठ ते नऊ ठेवल्यास अवघ्या एक दीड तासात निकाल जाहीर होऊ शकेल, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिली आहे. दरम्यान, मतदानाच्या आणि मतमोजणीच्या दिवशी मतदारसंघामध्ये ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे मद्यविक्रीस तसेच मद्य सेवनास बंदी असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाट्य परिषदेच्या पुरस्कारांची घोषणा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे रंगभूमी दिनाच्या दिवशी (५ नोव्हेंबर) दिवंगत दिग्गज रंगकर्मींच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा शनिवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. महाकवी कालिदास कलामंदिरात होणाऱ्या मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

अभिनयासाठी पुरूष गटात देण्यात येणारा स्वर्गीय दत्ता भट स्मृती पुरस्कार विवेक पाटणकर यांना जाहीर झाला आहे. शांता जोग स्मृती पुरस्कारासाठी (अभिनय स्त्री) नीलकांती पाटेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दिग्दर्शनाचा प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार रवींद्र ढवळे यांना, रंगभूषेचा बापूसाहेब काळसेकर स्मृती पुरस्कार नारायण देशपांडे यांना, नेपथ्यासाठी रावसाहेब अंधारे स्मृती पुरस्कार अमरसिंग भोईर तर, प्रकाशयोजनेसाठी गिरीधर मोरे स्मृती पुरस्कार श्रीकांत हिंगणे यांना जाहीर करण्यात आला.

दोन हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांसोबतच नाशिकची रंगभूमी सक्षम, समृध्द आणि सृजनशील करण्यासाठी ज्या रंगकर्मींनी संपूर्ण आयुष्य नटराजाच्या चरणी अर्पण करून नाशिक रंगभूमीला आणि सांस्कृतिक चळवळीला नवीन दिशा दिली. त्या तीस दिवंगत रंगकर्मींच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांच्या वारसांचा सत्कार याप्रसंगी होणार आहे. पुरस्कार समितीमध्ये नेताजी भोईर, विवेक गरूड, मधुकर झेंडे, मुरलीधर खैरनार यांचा समावेश होता. पत्रकार परिषदेला नाट्य परिषद अध्यक्ष प्रा. रवीद्र कदम, उपाध्यक्ष शाहू खैरे, कार्यवाह सुनील ढगे आणि महेश डोकफोडे यांची उपस्थिती होती.

रंगभूमी दिन कार्यक्रम

नाशिक महापालिका व नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ५ नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सुरुवातीला नांदी व गुरुवंदना संजीवनी कुलकर्णी सादर करतील. नटराज वंदना शुभांगी साळवे, प्रेशीता पंडित सादर करतील. शाहीर दत्त शिंदे व सहकारी शाहिरी लोककला तसेच गांधीनगर रामलिला समिती रामलिला सादर करणार आहेत. त्यानंतर दत्ता पाटील लिखित कस्टमर केअर ही एकांकिका सादर होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

घोटी-इगतपुरी येथे राहणाऱ्या भरत पांडूरंग जगताप यास अवैधरित्या अटक करून मारहाण केल्याचा आरोप असलेल्या सहा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांविरोधात पुढील कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. संशयितांमध्ये तत्कालीन पोलिस अधीक्षक मिलिंद भारंबे, सह पोलिस अधीक्षक मैथीली झा यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.

जगताप यांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात त्यांनी २०१० मध्ये नाशिक कोर्टातील प्रथम दंडाधिकाऱ्यांकडे खटला दाखल केला होता. त्यात सुनावणी पूर्ण होऊन एसपी भारंबे, झा यांच्यासह प्रकाश शिशुपाल, पीआय देवीदास शेळके, गौतम गायकवाड, आर. आर. बुठे यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ, धमकी देणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. संशयितांनी सत्र न्यायालयात पुनर्निर्णय घेण्याची विनंती केली. सुनावणीत भरत जगताप यांची फिर्याद योग्य असल्याचा निर्णय देण्यात आला. अर्ज नामंजूर झाल्याची बाब प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पोहचल्यानंतर त्यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनला या केसबाबत आजवर झालेल्या कार्यवाहीची माहिती देण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयितांच्या अटकेसाठी कुटुंब बसणार उपोषणाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबईतील सीएने केलेल्या आर्थिक फसवणुकीबाबत अडीच वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पोलिस आता त्याला अटक करण्याचे टाळत असून, १० नोव्हेंबरपर्यंत यात समाधानकारक प्रगती झाली नाही तर, वृध्द मात्यापित्यांसह पोलिस आयुक्तालयात उपोषणाला बसण्याचा इशारा व्यावसायिक रमेश जाजू यांनी दिला आहे.

बांधकाम व्यवसायिक रमेश जाजू यांनी काही वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अबिटधर येथील बँक ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली कर्जरुपात जमा झालेली १० एकर जागा १ कोटी ९४ लाख रुपयांना लिलावाद्वारे घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्यांनी २५ टक्के रक्कम बँकेत भरली. याच दरम्यान शहरातील नितीन ओस्तवाल आणि संदीप कांकरिया या दोघा दलालांनी मुंबई येथील सीए राजेशकुमार शर्मा यांच्याशी जाजू यांची ओळख करून दिली. उर्वरित ७५ टक्के रक्कम भरण्यासाठी बँकेने त्यांना दोन महिन्याचा कालावधी दिला. पंरतु, जाजू यांच्यासह त्यांचे पार्टनर शमशुद्दीन पारकर यांना ते शक्य नव्हते. यावर, हा कालावधी चार महिने करून देतो, अशी हमी शर्मा यांनी जाजू यांना दिली. तुमचे समाधान झाले तर फी द्या, असेही शर्माने स्पष्ट केले. जाजू यांनी दहा लाख रुपयांचे दोन डीडी आणि सहा लाख रुपये रोख असे २६ लाख रुपये शर्मा यांच्याकडे दिले. मात्र, हे पैसे बँकेत भरण्याऐवजी शर्माने ते स्वतःच्या बँक खात्यात जमा केले. दिलेल्या मुदतीत पैसे न भरल्याने तुमचे पैसे जमा करीत असल्याचे पत्र बँकेने पाठवल्यानंतर सर्व भिंग फुटले. यानंतर जाजू यांनी वारंवार शर्मा यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजवर ते शक्य झाले नाही. त्यामुळे जाजू यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनचे पोलिस इन्सपेक्टर दिलीप गावित, त्यानंतर सुरेश सपकाळे व हेमंत सोमवंशी यांची अनेकदा भेट घेतली. पंरतु, पोलिसांनी गुन्हा दाखल केलाच नाही. यानंतर, त्यांनी पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. बारगळ यांनी दिलेल्या आदेशानुसार २३ ऑगस्ट २०१५ रोजी शर्मासह अन्य दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, संशयितांना आजवर अटक झालेली नाही. या प्रकरणात राजकीय तसेच पोलिस अधिकारी दबाव आणत असल्याचा आरोप जाजू यांनी केला आहे. १० नोव्हेंबरपर्यंत संशयितांना अटक झाली नाही तर त्याच दिवसापासून पोलिस आयुक्त कार्यालयातच कुटुंबासह उपोषणाला बसणार असल्याचा दावा फिर्यादी जाजू यांनी केला.

या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपास अधिकाऱ्यांना सर्व सूचना देण्यात आल्या असून, तपासादरम्यान ते कधीही संशयितांना अटक करू शकतात.

- एन. अंबिका, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात कम्युनिटी प्लंबिंग चॅलेंज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळेतील प्रसाधनगृहांच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांचे धोक्यात येणाऱ्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक स्तरावरील कम्युनिटी प्लंबिंग चॅलेंज ही स्पर्धा येत्या सोमवारपासून (२ नोव्हेंबर) नाशकात होत आहे. मुक्तीधामच्या महापालिका शाळा क्र. १२५ मध्ये २ ते ५ नोव्हेंबरपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक प्रसाधनगृहे उभारली जाणार आहेत.

वर्ल्ड स्कील कौन्सिल, इंटरनॅशनल असोसिएशन फॉर प्लंबिंग अँड मेकॅनिकल ऑफिशिअल्स आरएमआयटी युनिव्हर्सिटी (ऑस्ट्रेलिया), वर्ल्ड प्लंबिंग कौन्सिल आणि इंडियन प्लंबिंग असोसिएशन यांच्या तर्फे कम्युनिटी प्लंबिंग चॅलेंज ही स्पर्धा घेण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करण्याचा उद्देश या स्पर्धेमागे असल्याची माहिती प्लंबिंग असोसिएशनच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष मिलिंद शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेत भारतासह ऑस्ट्रेलिया, स्पेन, अमेरिका या चार देशांचे संघ सहभागी होणार आहेत. कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक अशी मुला-मुलींसाठीचे प्रसाधनगृह आणि हात धुण्यासाठीची स्वच्छ जागा तयार करण्याची ही स्पर्धा असल्याचे वर्ल्ड स्किल फाऊंडेशनचे प्रोजेक्ट डेव्हलपर सीन केर्ने म्हणाले. प्रत्येक संघात प्लंबरसह इंजिनीअर, बांधकाम क्षेत्रातील व्यक्ती आणि डिझाईनर यांचा समावेश असणार आहे. स्पर्धेसोबत विद्यार्थ्यांना हात धुणे, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, प्रसाधनगृहाचा वापर आदींविषयीची जागृकताही विद्यार्थ्यांमध्ये केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडकोत पुन्हा एकदा वाहने जाळण्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिडको

सिडकोत पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कारवाईचे हत्यार उपसले असतांनाही गुन्हेगारी आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. महाजननगर भागात शनिवारी रात्री दोन वाहने जाळण्याचा प्रयत्न अज्ञात इसमांकडून झाला आहे. एक रिक्षा व दुचाकी जाळण्याचा प्रयत्न अज्ञात इसमांनी केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. आपसातील वादातून वाहने जाळण्याचा प्रयत्न झाला का, याबाबत अंबड पोलिस तपास करत आहेत. रहिवाशांनीही चुकीचे अथवा गुन्हेगारी स्वरुपाचे व्यक्ती आढळ्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाका स्टॉल्सचा वाद कोर्टात

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात अनधिकृतरित्या फटाके विक्रीचे स्टॉल्स उभारले जात असल्याबाबत मुंबई हाय कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. हिंदू खाटीक युवा महासंघाचे पदाधिकारी चंद्रकांत लासुरे यांनी ही याचिका दाखल केली आहे. पोलिस प्रशासनाने अनधिकृत फटाके स्टॉल्सवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दिवाळी सण अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपला असून, शहरात फटाके विक्रीचे दुकाने थाटण्यास सुरूवात झाली आहे. अनेक व्यावसायिक फटाके विक्रीबाबतचे नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे फटाके विक्री करतात. रहिवाशी भागात फटाके विक्री केली जात असल्याने नागरिकांच्या जीवा धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही पोलिस दाद देत नसल्याने लासुरे यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. भद्रकाली, मेनरोड, रविवार कारंजा, शालिमार, पंचवटी परिसरात अनाधिकृत्यरित्या लावल्या जाणाऱ्या फटाके विक्रेत्यांवर कारवाई करावी, फटाक्यांचे साठे तपासावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ज्या परिसरात अनधिकृतरित्या फटाके विक्री होत असेल त्या पोलीस स्टेशनच्या निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करावी, शहराबाहेरील मोकळ्या जागांवर फटाके विक्री करावी, रहिवाशी भागात फटाक्यांची दुकाने थाटणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त यांना हे निवेदन देण्यात आले आहे. पोलिस उपआयुक्त अविनाश बारगळ यांनी याप्रकरणात लक्ष घालून बेकायदेशीर व अनधिकृत फटाका विक्रीची दुकाने लावली जाऊ नयेत असे आदेश भद्रकाली पोलिसांना दिले आहेत. तसेच बेकायदेशीर दुकाने काढण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्याच्या अंमलबजावणीकडे आता लक्ष लागले आहे.

शहरातील अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर कारवाई करून नाग‌रिकांच्या जीवीताचे रक्षण करावे अशी आमची मागणी आहे. प्रशासन दाद देत नसल्याने आम्ही फटाके विक्रेत्यांविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. सोमवारी (दि. २) त्यावर सुनावणी होणार आहे. पोलिस आणि महापालिका प्रशासनाच या बेकायदा फटाके विक्रीला आळा घालू शकते.

चंद्रकांत लासुरे, याचिकाकर्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्त’च्या पुस्तकांअभावी विद्यार्थ्यांची होतेय परवड

$
0
0

अभ्यासासाठी पुरेसा कालावधी मिळत नसल्याची तक्रार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पुस्तके अद्याप न मिळाल्याने सध्या विद्यार्थ्यांची परवड सुरू आहे. काही दिवसांतच येणाऱ्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ रहात नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. अभ्यासक्रेंद्रावर अनेकदा चकरा मारून त्याचा काही उपयोग होत नसल्याची तक्रारही विद्यार्थी करीत आहेत. अशा परिस्थितीत मुक्त विद्यापीठाचे 'ज्ञानगंगा घरोघरी' हे ब्रीद कसे साध्य होईल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुक्त विद्यापीठाने यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली. त्यामुळे या प्रक्रियाचे लाभ घेत जवळपास ६ लाख ४५ हजार विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठात वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदवला. मात्र, आता या प्रचंड संख्येत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकच मिळत नसल्याची तक्रार काही अभ्यासकेंद्रांवर करण्यात आली आहे. मुक्त विद्यापीठाचे व्यवस्थापन मात्र या मूलभूत बाबींकडे लक्ष देण्याचे सोडून विविध कार्यक्रम घेण्यात मश्गुल आहेत. दिवाळीपर्यंत पुस्तके मिळणार, असे आश्वासन विद्यापीठाने दिले असले तरी लगेचच येणाऱ्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

पूर्वी अभ्यासकेंद्रावर पुस्तके देण्यात येण्याच्या प्रोसेसमध्ये आता काही अंशी सुधारणा केली असून, प्रेसमधून पुस्तके विद्यार्थ्यांच्या घरी, त्यांच्या पत्त्यावर पोहोचविण्यात येतात असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. परंतु, ग्रामीण भागातील असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांच्यापर्यंत पुस्तकेच पोहोचली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ऑनलाइन प्रवेश करताना संभाव्य धोका ओळखून वेळेच्या आधीच पुस्तके छपाईसाठी देण्याची गरज होती, अशी चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होत असून, पुस्तके वेळेवर न मिळाल्यास अभ्यास कसा करायचा असा सवाल विद्यार्थी करीत आहेत. परीक्षेच्या काळात तरी पुस्तके उपलब्ध व्हावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

पत्ते अपडेट नसल्याचा फटका

ऑनलाइन प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अपडेट पत्ते भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, ग्रामीण भागातील अनेकांनी पत्ते व्यवस्थित न भरल्याने त्यांची पुस्तके कोणत्या पत्त्यावर पाठवायची असा मोठा प्रश्न मुक्त विद्यापीठासमोर पडला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासकेंद्रापर्यंतही येऊ शकत नसल्याने त्याला पुस्तके मिळण्याची पंचाईतच झाली असून, वर्ष वाया जाते की काय अशी धास्ती विद्यार्थ्यांना पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांना लुटणारा ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'माझ्या बहिणीचे नाव का घेतले? किंवा माझ्या भावास का मारले?' अशा प्रश्नांनी कॉलेज विद्यार्थ्यांशी कुरापती काढत त्यांना मारहाण करून लूट करणारा आरोपी नीलेश अशोक सोनवणे ऊर्फ खांडवा याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे पावणेचार लाखांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे.

शहरातील विविध कॉलेजांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लुटण्याचा धंदा नीलेश सोनवणे ऊर्फ खांडवा याने सुरू केला होता. विद्यार्थ्यांना बळजबरी ‌रिक्षामध्ये कोंबत त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रकारही वारंवार कॉलेजांच्या आवारात घडत होता. यातील बहुतांश प्रकारात खांडवाचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांशी कुरापती काढल्यानंतर त्यांना मारहाण करून प्रसंगी शस्त्राचा धाक दाखवित त्याने मोबाइल, पैसे आणि दागिने हिसकावले आहेत. या पध्दतीने हिसकलेल्या मुद्देमालापैकी सुमारे तीन लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल सरकारवाडा पोलिसांना हस्तगत केला आहे. सरकारवाडा पोलिसांच्या हद्दीतच सुमारे १० गुन्हे केल्याची कबुलीही खांडवा याने पोलिसी खाक्या अनुभवताच दिली.

अशा प्रकारांबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी वारंवार वाढत होत्या. अखेरीला पोलिसांनी पाठपुरावा करीत रचलेल्या सापळ्यात खांडवा सापडला. याकामी पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार झोन एकच्या पोलिस उपायुक्त एन. अंबिका, पोलिस निरीक्षक हेमंत सोमवंशी, शेगर, गोसावी, पवार, पळशीकर, प्रवीण वाघमारे, राजेंद्र शेळके, प्रभकर कोल्हे, रवि मरकड, सुरेश शेळके आदी कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

एकटाच करायचा लूट

नीलेश सोनवणे ऊर्फ खांडवा हा मूळ नाशिकचाच. चोरीच्या उद्देशाने दहशत पसरविण्यासाठी त्याने विद्यार्थ्यांना लक्ष्य केले. विद्यार्थी हेरून त्याला विशिष्ट ठिकाणी गाठणे, प्रसंगी रिक्षात कोंबून शस्त्राचा धाक दाखविणे आणि लूट करणे अशी त्याच्या गुन्ह्याची पध्दती होती. गुन्हा झाल्यानंतर काही दिवस तो शहराबाहेरही निघून जात होता. शिवाय गुन्ह्यामध्ये तो एकटाच सहभागी होत असल्याने तो वारंवार पोलिसांना चुकविण्यात यशस्वी होत होता. अखेरीस पोलिसांनी सापळा रचत खांडवाच्या मुसक्या आवळल्या.

अनेक दिवसांपासून नीलेश सोनवणे ऊर्फ खांडवा याचा शोध सुरू होता. प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या लुटीवर त्याचा भर होता. त्याला ताब्यात घेण्यास पोलिस पथकाला यश मिळाल्याने विद्यार्थी सुरक्षित होतील. या प्रकारचा त्रास विद्यार्थ्यांना जाणवल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा.

- हेमंत सोमवंशी, पोलिस निरीक्षक, सरकारवाडा, पोलिस स्टेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोस्टनवारी पडली महागात

$
0
0

एमआयटीने उचलला फक्त अधिकाऱ्यांचा खर्च

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नाशिकमधील कामासाठी थेट अमेरिकेकडून सत्काराची पाठ थोपटून घेण्यासाठी बोस्टनला गेलेल्या महापौर व उपमहापौरांसह आमदारांना ही वारी चांगलीच महागात पडली आहे. एमआयटी कुंभथॉनने केवळ चार अधिकारी, पालकमंत्री अशा पाच जणांचाच खर्च उचलला. त्यामुळे उर्वरित चार लोकप्रतिनिधींच्या खिशाला झळ बसली. बोस्टनमध्ये जाऊन मिरवण्याची हौस या महाशयांना चांगलीच महागात पडली आहे. बोस्टनदौरा आटोपता घेत थेट नाशिक गाठायची वेळ त्यांच्यावर आली.

कुंभमेळ्याचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल बोस्टनच्या एमआयटी कुंभथॉनने नाशिकमधील निवडक अधिकारी व लोकप्रतिनिधींना आमंत्रित केले होते. हा खर्च उचलण्याची तयारीही कुंभथॉनने दाखवली होती. अमेरिकेची वारी म्हटल्यावर इच्छुकांची यादी मात्र वाढतच गेली. त्यामुळे भराभर निमंत्रणे सोडण्याची वेळ कुंभथॉनवर आली. मुख्यमंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त यांच्यासह महापौर, उपमहापौर, दोन आमदार अशी मोठी यादीच तयार झाली. ऐनवेळी आर्थिक खर्चाचा भार उचलण्यापासून कुंभथॉनने हात आखडता घेतला. पालकमंत्र्यांसह केवळ अधिकाऱ्यांचीच विमान प्रवासाची तिकिटे मिळाली. त्यामुळे महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमीत बग्गा, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरेंना अखेर स्वखर्चाने बोस्टनवारी करावी लागली. निवास खर्च वगळता प्रवासासह इतर खर्च हा या लोकप्रतिनिधींना चांगलाच डोईजड झाला. पाच दिवसांचा भला मोठा खर्च अंगावर आला. बोस्टन दौऱ्यात शहरातील नामांकित बिल्डरांचे पुत्र तसेच उद्योजकांच्या मुलांनी घुसखोरी केली होती. या बिल्डर, उद्योजकांनीही ऐनवेळी आपले हात वर केले. त्यामुळे सर्वांच्या खर्चाची पंचाईत झाल्याने गड्या आपला गावच बरा असे म्हणत या दौऱ्यातील निम्मे लोकांनी नाशिककडे कूच केले.

मुख्यमंत्र्यांना स्वकियांचा विसर!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीच्या प्रचार सभेत महापौरांच्या बोस्टनवारीवर तिखट टीका केली. महापौरांना आमंत्रणच नसल्याचा दावा करीत त्यांनी यांच्या प्रवासाचा खर्चही उचलला नसल्याचा आरोप केला. मात्र, एमआयटीने महापौरांसह सर्व लोकप्रतिनिधींना रितसर निमंत्रणे दिले होते. तरीही मुख्यमंत्री आरोपाच्या नादात मनसेसह स्वपक्षियांचीही पोलखोल करून गेले. या दौऱ्यात भाजपच्या दोनही आमदारांनाही आपल्या स्वखर्चानेच बोस्टन गाठावे लागले. विरोधकांवर आरोप करण्याच्या नादात भाजपचेही आमदारांच्या घुसखोरीचा त्यांना विसर पडल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७० कोटींच्या मालमत्तेवर टाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेशनसाठी येणाऱ्या अन्नधान्याची परस्पर विक्री करून कोट्यवधी रुपयांची माया जमविणाऱ्या पाच ठेकेदारांची तब्बल १७० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त करण्याचा निकाल विशेष मोक्का न्यायालयाने दिला आहे. संशयितांच्या मालमत्तेवर टाच आणण्यासंबंधी पोलिस उपअधीक्षक छगन देवराज यांनी कोर्टाकडे विनंती केली होती.

आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यात जानेवरी महिन्यात ३ हजार मेट्रीक टन रेशनच्या धान्याचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सरकारी अधिकारी आणि ठेकेदार मिळून सर्वसामान्यांच्या तोंडाचा घास पळवत कोट्यवधी रुपयांची उलाढाल करीत असल्याचे पुरावे समोर आले. हा घोटाळा उघडकीस येताच राज्य सरकारने तातडीने ९ तहसीलदारांना निलंबित केले होते. सुरगाणा पोलिसांनी धान्य अपहाराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अधिक तपास केला असता या घोटाळ्याचे धागेदोरे संपत नामदेव घोरपडे, विश्‍वास नामदेव घोरपडे, अरुण नामदेव घोरपडे, मगन रतन पवार आणि रमेश सोमनाथ पाटणकर यांच्यापर्यंत पोहचले. या ठेकेदारांनी संगनमत करून सरकारची आर्थिक लूट केल्याचे सबळ पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनमध्ये मोक्कातंर्गत गुन्हा दाखल केला. संशयित ठेकेदारांनी कोट्यवधी रुपयांची माया धान्य घोटाळ्यातून जमा केली असून, ती जप्त करण्याबाबत पोलिस उपअधीक्षक छगन देवराज यांनी मोक्का कोर्टात ​विनंती अर्ज सादर केला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायाधीश उर्मिला जोशी-फलके यांनी संशयितांची तब्बल १७० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले.

धाबे दणाणले

नाशिक जिल्ह्यात उघडकीस आलेला हा धान्य घोटाळा सर्वांत मोठा असून, राज्यात प्रथमच धान्य घोटाळ्यात मोक्कासारख्या कलमाचा वापर करण्यात आला. या प्रकरणात सर्वांत प्रथम ९ तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, यातील आठ जणांना मॅटकडून क्लिन चिट मिळाली. दुसरीकडे ठेकेदार कायद्याच्या कचाट्यात सापडले असून, जिल्ह्यातील सर्वांत मोठी जप्तीची कारवाई पोलिसांकडून केली जाणार आहे. ठेकेदारांपाठोपाठ कारवाईचा फेरा कोणा कोणावर फिरणार याची चर्चा होत आहे.

शिल्लक दहा हजार ते कोट्यधीश!

या घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधार म्हणून संपत घोरपडे याकडे पाहिले जाते. पोलिसांनी बँकेचे व्यवहार तपासले असता, १९९७ मध्ये त्याच्या बँक खात्यात अवघे १० हजार रुपये होते. यानंतर त्याचा संबंध अपहाराशी वाढत गेला. धान्याची अफरातफर वाढली तशी त्याच्याकडे पेट्रोलपंप, अनेक प्लॉट, वाहने अशी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा होत गेली. त्याच्यासह अन्य आरोपींविरोधात खून, खूनाचा प्रयत्न यासह कमोडिटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी ​दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इग्नु’च्या प्रवेशांना सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या वतीने (इग्नु) चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्र‌िया सुरू झाली आहे. जानेवारी २०१६ च्या सत्रासाठी केटीएचएम कॉलेजमधील इग्नु केंद्रांवर प्रवेश अर्ज व माहिती पत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. इग्नुच्या माध्यमातून विविध पदवी , पदविका, पदव्युत्तर पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविण्यात येतात. या अभ्यासक्रमांस प्रवेश घेण्यासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०१५ आहे.

विलंब शुल्कासहित अर्ज सदर करण्याची मुदत २१ डिसेंबर २०१५ आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी केटीएचएम महाविद्यालयातील अभ्यास केंद्रामध्ये संपर्क साधावा अशी माहिती अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. आर. डी. दरेकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बार्न्स स्कूलच्या शिक्षकांचा संप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

'बोनस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, हमारी मांगे पुरी करो-वर्ण खुर्सी खाली करो', अशा घोषणा देत शाळा बार्न्स स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावरच विविध मागण्यांसाठी नुकताच लाक्षणिक संप करण्यात आला.

कामगारांना वेतनवाढ मिळावी, बोनस मिळावा, कामगारांना कायम करावे, कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शाळेत सवलती मिळाव्यात, अशा या कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या आहेत. एकूण ११ मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. यावेळी संपामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण, वाल्मिक अन्सारी, मधुकर वाघ, योगेश्वर मोजाड आदींसह शाळेचे मोहन कुमार टाक, रमेश देशमुख, महेंद्र गायकवाड आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एबीबी सर्कलचा गुदमरला श्वास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

शहरातील रोजच वर्दळीचा असलेल्या त्र्यंबकेश्वर रोडवरील वाहनांमुळे एबीबी सर्कलचा श्वास गुदमरला आहे. त्यातच रोजच्या वाहतूक कोंडीने वाहनचालकही हैराण झाले आहेत. यात पोलिस आयुक्तालयाने स्वतंत्र पोलिस व्यवस्था उभी करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. सततच्या वाहतूक कोंडीने एबीबी सर्कलवर होणाऱ्या वाहतूक कोंडीने रहिवाशी देखील हैराण झाले आहेत.

देशभरातील १२ पैकी एक ज्योर्तिंलिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील महादेवाचे दर्शन करण्यासाठी जगभरातून भाविक नाशिकमध्ये वर्षभर येत असतात. यामुळे त्र्यंबकेश्वर रस्त्यावर रोजच वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. परंतु, दिवसेंदिवस वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे एबीबी सर्कलवर रोजच वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. कुंभमेळ्यात सर्कलचे नूतनीकरण करण्यात येऊन योगसाधनेवर आधारित प्रतिकृती नुकत्याच लावण्यात आल्या आहेत. वाहनांची वाढलेल्या वर्दळीमुळे रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीने एबीबी सर्कलवरून जाण्यासाठी रोजच वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविक येतात. एबीबी सर्कलवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्यांना त्रास होतो. याकडे पोलिसांनी लक्ष घालण्याची गरज आहे.

- कैलास खांडबहाले, वाहनचालक

काही वर्षांत शहराचा विकास वेगाने झाला. परंतु, रस्त्यांवर रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण झाले आहेत. अत्यंत वर्दळीमुळे रोजच वाहतूक कोंडी होणारा भाग म्हणून एबीबी सर्कलची नवी ओळख होत आहे.

- गणेश आहेर, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे पोलिसांना सावत्रपणाची वागणूक

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

रेल्वे सुरक्षा दलाइतकीच महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या रेल्वे पोलिसांना रेल्वेकडूनच सवतीची वागणूक मिळत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. एका खोलीत कसाबसे कामकाज करताना अनंत अडचणी येत आहेत. रेल्वे पोलिसांना प्रशस्त कार्यालय देण्याची गरज आहे.

खोली नव्हे अडगळ

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिस यांचे शेजारी शेजारीच कार्यालय आहे. सन १९६२ मध्ये येथे रेल्वे चौकी होती. पूर्वी इगतपुरीचे ते आऊटपोस्ट होते. या चौकीलाच सन १९९९ मध्ये रेल्वे पोलिस स्टेशन असे नाव मिळाले. रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) मोठे व सुविधा युक्त कार्यालय आहे. रेल्वे पोलिसांना मात्र १५ बाय १५ फुटाचे खुराडे मिळाले आहे. रेल्वे पोलिसांचे रात्र व दिवसपाळीत मिळून ४० कर्मचारी आहेत. यात दोन उपनिरीक्षकांसह पाच अधिकारी आहेत. त्यांनाही बसायला जागा नाही. फक्त पोलिस निरीक्षकांना स्वतंत्र केबिन आहे. जुन्या टेबलावर ठाणे अमंलदार बसतात. या खोलीत रेकार्ड ठेवायला जागा नाही.

चार संगणकांनाही टेबल नाही. या खोलीतच दोन छोटे लॉकअप आहेत. एक पुरुषांसाठी तर दुसरी महिलांसाठी आहेत. एका लॉकअपचा वापर मुद्देमाल ठेवण्यासाठी करावा लागतो. गुन्ह्यांची संख्या वाढल्याने फिर्यादींची संख्याही वाढली आहे. फिर्यादी आल्यावर त्याला उभे राहायलाही जागा नाही. शेजारीच असलेल्या कोर्टाच्या खोलीचा वापर हे पोलिस करत असतात.

रेल्वेने वाऱ्यावर सोडले

रेल्वे पोलिस हे प्रवाशांच्या सुरक्षेची दिवसरात्र काळजी घेतात. प्रवासी जखमी झाल्यावर त्याला रुग्णालयात नेण्याची जबाबदारी ते पार पाडतात. नाशिकरोड स्टेशनवर रेल्वेची भरपूर जागा आहे. रेल्वेकडे अनेकदा विनंती करूनही रेल्वे पोलिसांना कायार्लयासाठी जागा मिळत नाही. रेल्वे पोलिसांचे नियंत्रण नागपूरहून अधीक्षक करतात. मनमाडला उपविभागीय अधिकारी आहेत. कुंभमेळ्यात अनेक दिग्गज अधिकारी आले पण कोणीही रेल्वे पोलिसांच्या व्यथा जाणल्या नाहीत. कुंभमेळ्याचा थोडा निधी या पोलिसांच्या सुविधांसाठी मिळण्याची अपेक्षाही फोल ठरली.

पुरेशी जागा तर द्या

वरिष्ठ रेल्वे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर भाबल 'मटा'शी बोलताना म्हणाले की, छोट्या रेल्वे चौकीचेच हे पोलिस स्टेशन केलेले आहे. आमच्या पोलिसांना काम करायला, बसायला जागा नाही. रेल्वेला अनेकदा विनंती करूनही जागा मिळत नाही. कोणत्याच सुविधा मिळत नाही. प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी असेल तर रेल्वेने त्वरित कार्यवाही करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

महिला पोलिसांची गैरसोय

रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये शौचालय नाही की पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. रेल्वेने नळ जोडणी दिलेली नाही. प्रवाशांसाठीच्या नळावरच पाणी प्यावे लागते. महिला पोलिस ड्युटीवर आल्यावर युनिफार्म बदलण्यासाठी त्यांना चेजिंग रुम नाही. त्यांच्यासाठी स्वच्छतागृहाचीही सोय नाही. त्यामुळे त्यांची मोठी कोंडी होते. तोंड दाबून बुक्क्याचा मार रेल्वे पोलिसांना खावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेठमध्ये ८० टक्के मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पेठ

पेठ नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत १७ जागांसाठी एकूण ८०.२४ टक्के मतदान झाले. एकूण ३९६७ पैकी ३१८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग क्रमांक १३ मध्ये सर्वाधिक ३४५ पैकी ३०३ मतदारांनी मतदान केले. सगळ्यात कमी मतदान प्रभाग दोनमध्ये झाले. या प्रभागात १०५ पैकी केवळ ७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदार केंद्र क्रमांक ७ मध्ये दुपारी दोन एव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे तासभर मतदान प्रक्रिया बंद पडली होती. लवकर नवीन एव्हीएम मशीन उपलब्ध होत नसल्याने मतदार व उमेदवारांनी तक्रारी केल्या. आज (दि. २) पेठ येथील तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणी होणार आहे.

शिवेसना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही खरी लढत होत असून आज मतदार कोणाला हात देतात याकडे लक्ष लागले आहे. पोलिस प्रशासनाने अनूचित प्रकार टाळण्यााठी मतमोजणीवेळी कडक बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडमध्ये ८१.१४ टक्के मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

निफाड नगरपंचायतीसाठी रविवारी किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले. निफाडमध्ये ८१.१४ टक्के मतदान झाले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात होताच मतदारांनी सर्वच केंद्रांवर मतदानासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. दुपारी गर्दी काहीशी कमी होती. तर, ३ वाजेनंतर मतदारांनी पुन्हा मतदान केंद्रांवर गर्दी केल्याने बहुतेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

निफाड नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी तब्बल ६८ उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब अजमावत असून, १३ हजार ७३४ मतदार आहेत. पैकी ८१.१४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून, अवघ्या तासाभरात नगर पंचायत निवडणुकीचे निकाल हाती येणार असल्याचे तहसीलदार डॉ. संदीप आहेर यांनी सांगितले. नगरपंचायतीच्या सत्तेचे सूत्र हाती घेण्यासाठी उमेदवारी करीत असलेले राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा माजी सरपंच अनिल कुंदे, भाजपाचे राजाराम शेलार, शिवसेनेचे मुकुंद होळकर, जावेद शेख आदींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निफाडमध्ये शिवसेना-भाजपा युती असून, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस विरोधात उभे ठाकले आहेत. बसपानेही पाच उमेदवार उभे केले आहेत. अपक्षांचा वाढलेला प्रभाव पाहता निकालानंतर निवडून आलेले अपक्ष उमेदवारही निर्णायक भूमिकेत असतील, अशी शक्यताही राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळा नगरपंचायतीसाठी सर्वाधिक मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

देवळा नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांचा उत्साह प्रचंड दुणावला असून, ८२.५६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अत्यंत शांततेत व सुरळीत मतदान होत असून, आज (२ नोव्हेंबर) वाजगाव रोडवरील नवीन प्रशासकीय इमारतीत मतमोजणी होणार आहे. देवळा येथील आठवडे बाजाराला मतदानामुळे सुटी देण्यात आली होती.

देवळा नगरपंचायतीच्या पहिल्यावहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत देवळा विकास आघाडी व जनशक्ती पॅनलमध्ये १७ जागांसाठी काट्याची लढत होत आहे. या निवडणुकीत सुमारे ८८२३ मतदार मतदानाचा हक्क बजाविण्यसाठी सकाळपासून मतदान केंद्रावर रांगा लावून उभे होते. देवळा येथील जिल्हा परिषदेच्या मुलामुलींच्या प्राथमिक शाळेत मतदान असल्याने या परिसराला पोलिसांनी चारही बाजूंनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

देवळा विकास आघाडीकडून वॉर्ड क्र. ९ व ११ मध्ये भारती अशोक आहेर व अशोक देवराम आहेर हे दाम्पत्य उमेदवारी करीत आहे. जनशक्ती पॅनलमधून वॉर्ड ११ मधून उदय आहेर तर १२ व १४ मधून अश्विनी आहेर हे दाम्पत्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. वॉर्ड क्र. पाच, नऊ, अकरा, तेरा, व चौदा यात सरळ लढती होत आहेत. वॉर्ड नऊमधून माजी पंचायत समिती सदस्या भारती आहेर प्रतिष्ठेची लढत देत आहेत.

वॉर्ड अकरामधून पंचायत समितीचे माजी सभापती अशोक बापू आहेर यांची लढत शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष व जनशक्ती पॅनलचे नेते उदयकुमार आहेर यांच्याशी होत आहे. वॉर्ड क्रमांक चौदामधून देवळा विकास आघाडीचे नेते केदा आहेर यांच्या पत्नी धनश्री आहेर यांची लढत जनशक्ती पॅनलचे नेते उदयकुमार आहेर यांच्या पत्नी अश्विनी आहेर यांच्याशी होत आहे. या लढतींकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. दरम्यान, दिवसभर मतदान केंद्रावर मतदार आणण्यासाठी दोघाही पॅनलच्या कार्यकर्त्यांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

सकाळी दहापासून मतमोजणी

देवळा प्रशासकीय इमारतीत आज सकाळी १० वा. मतमोजणी होणार आहे. यासाठी १७ टेबल ठेवण्यात आले असून, ३४ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अवघ्या एक तासात देवळा नगरपंचायतीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा बागलाणचे प्रातांधिकारी संजय बागडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदवडमध्ये ८० टक्के मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरासरी ८०.१२ टक्के मतदान झाले. चांदवडमधील प्रस्थापित नेत्यांचे भवितव्य ठरविणाऱ्या आणि नवोदितांसाठी पालिका राजकारणात प्रवेश करण्यासाठी मोठी संधी घेऊन आलेल्या या निवडणुकीबद्दल औत्सुक्य असल्याने निवडणूक अखेरपर्यंत रंगतदार झाल्याचे दिसून आले.

सकाळी साडेनऊपर्यंत प्रभाग एकमध्ये २१.७१ टक्के तर प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्वात कमी म्हणजे ८.१८ टक्के मतदान झाले होते. नंतरच्या काळात मतदान केंद्रावर गर्दी वाढू लागल्याचे चित्र होते. पुढील दोन तासात काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. साडेअकरा वाजेपर्यंत सर्व १७ मतदान केंद्रे मिळून ३५.८० टक्के मतदान झाले. सर्वात जास्त मतदान या वेळेस प्रभाग एकमध्ये सरासरी ५० टक्के होते. मतदान केंद्र क्रमांक दहामध्ये मतदारांची एकच झुंबड उडाली.

चांदवड पालिका निवडणुकीत स्वतःला अजमावत असलेल्या बहुतांश उमेदवारांनी मतदानास मतदारांनी यावे, यासाठी शनिवारी रात्रीपासून फिल्डिंग लावल्याचे बोलले जात होते. सगेसोयरे, नातेवाईक यांच्यासह सारे कुटुंब यात गुंतल्याचे स्पष्ट होते. अनेकांनी रेणुका देवी आणि इच्छापूर्ती गणेशासह विविध धार्मिक ठिकाणी पूजा करून कौल मागितले.

अर्थपूर्ण चर्चा

दरम्यान, कोणाचा भाव किती फुटला याची सर्वत्र चर्चा होती. एक हजार रुपयांपासून सात हजारापर्यंत भाव फुटल्याचे काही मतदार सांगताना दिसत होते. तर, प्रशासन-उमेदवार यात तथ्य नसल्याचे सांगत खंडन करताना दिसत होते.

मतांचा गठ्ठा प्रभावी

ज्या कुटुंबात मतांची संख्या जास्त त्या कुटुंब प्रमुखाला मोठे महत्त्व प्राप्त झाल्याची स्थिती होती. त्यांनी मतदानाला बाहेर पडावे यासाठी उमेदवार, त्यांचे समर्थक यांचे सर्वदूर प्रयत्न सुरू होते. बऱ्याच ठिकाणी मतदार वारंवार आवाहन करूनही मतदानाला घराबाहेर पडत नव्हते. त्यांच्या या भूमिकेबद्दल ना तर्कवितर्क लढविले जात होते.

अपक्षांवर सर्वकाही

सतरा प्रभागात तब्बल ५७ अपक्ष उमेदवार आहेत. कोणत्याच राजकीय पक्षाची युती किंवा आघाडी नाही त्यामुळे अपक्ष किती मते घेतात आणि कोणाची मते खातात याची प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारात धाकधूक असल्याचेही खासगीत सांगितले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवणमध्ये झाले सर्वात कमी मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण नगरपंचायतीच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत कुठेही अनूचित प्रकार न घडता उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण सोळा प्रभगात सरासरी ७५ टक्के मतदान झाले. सोळा प्रभागतून ७४ उमेडवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले.

कळवण नगरपंचायतची पहिलीच निवडणूक असल्याने जशी उमेदवारांची उत्सुकता होती, त्याप्रमाणे मतदारही उत्सुक होते. सकाळी आठ वाजेपासून मतदान केंद्रावर गर्दीस सुरुवात होऊन १२ वाजेपर्यंत ५० टक्क्यांच्या पुढे मतदान झाले. दुपारी मतदारांची गर्दी ओसरली होती. त्यानंतर मतदारांचा उत्साह कायम राहून मतदान केंद्रांवर रांग लागली होती. पक्षीय नेते आपापल्या प्रभागात ठाण मांडून होते. सर्व प्रभागात उमेदवार मतदान केंद्राच्या २०० मीटर लांब थांबून मतदारराज्याला नमस्कार करून मतदान करण्याची विनंती करीत होते.

सुरगाण्यात ८० टक्के मतदान

सुरगाणा नगरपंचायतीसाठी किरकोळ वादविवाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण ३७३९ पैकी २९१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १४६३ महिला तर १४५३ पुरुषांनी मतदान केले. आज मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images