Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वीज प्रकल्पासाठी रास्तारोको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

एकलहरेतील प्रस्तावित ६६० मेगावॅट औष्णिक विद्युत प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करावे या व अन्य मागण्यांसाठी नाशिक औष्णिक विद्युत प्रकल्प संघर्ष समितीतर्फे सिन्नर फाटा येथे रास्तारोको करण्यात आला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. सहाय्यक पोलिस आयुक वाडेकर यांना समितीतर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

समितीचे अध्यक्ष शंकरराव धनवटे, निवृत्ती चाफळकर, नितीन जगताप, प्रकाश म्हस्के, योगेश म्हस्के, विशाल घेगडमल, विनायक हारक, शांताराम राजोळे, दिनकर म्हस्के, बाळासाहेब पवळे, राजेंद्र जाधव, नंदू मगर, मधुकर कापसे, सचिन जगताप, सुभाष जगताप, बहिर जाधव आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, नवीन प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. त्याचे काम लवकर सुरू करावे. प्रकल्प चालू होत नाही तोपर्यंत संच क्रमांक तीन, चार व पाच बंद करू नये. त्यांचे नूतनीकरण करावे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी, संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. त्यावेळी प्रकल्पाच्या अडचणी दूर करून कामाला वेग देण्याचे ठरले होते. राज्य विद्युत निर्मितीच्या मालकीची जमीन, रेल्वे, पाणी विद्युत वितरण उपकेंद्र उपलब्ध आहे. त्यामुळे नवीन प्रकल्पाचा खर्च कमी होईल. एवढे असतानाही शासन प्रकल्प उभारणीसाठी टाळाटाळ करीत आहे. शासन खासगी कंपन्यांच्या दबावाखाली आहे. खासगी कंपन्यांना परवानगी न देता शासनाच्या मालकीच्या विद्युत कंपन्यांना परवानगी द्यावी. या प्रकल्पासाठी जमीन संपादीत केलेल्या मालकांचे पुनर्वसन त्वरित करावे, त्यांना रोजगार द्यावा. त्यांच्या वारसांना विनाअट शासकीय प्रमापत्र द्यावे. शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिन्याला सापडतो एक कट्टा

$
0
0

नाशकात परप्रांतीयांकडून होते विक्री; सराईत गुन्हेगारांकडून मागणी

arvind.jadhav @timesgroup.com

नाशिक : गावठी कट्ट्यांची सहज उपलब्धता गुन्हेगारांच्या पथ्यावर पडली असून, किरकोळ घटनांमध्ये सुध्दा कट्ट्यांचा वापर करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर कारवाई होते. मात्र, हे प्रमाण कमी असून आजमितीस महिन्याकाठी सरासरी एक गावटी कट्टा शहर परिसरातून जप्त होत आहे. शहराबाहेरील व्यक्तींचा या व्यवसायात सक्रिय सहभाग असून, अवैध हत्यारांचा बाजार उद्ध्वस्त करण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

मध्य प्रदेश राज्यातील महाराष्ट्राच्या सीमेवरील काही गावांमध्ये गावठी कट्ट्यांची सहजतेने निर्मिती होती. विशेषतः सैंधवा हे गाव यासाठी कुप्रसिध्द आहे. अवैध हत्यार निर्मितीचे केंद्र असलेल्या या गावांमध्ये अगदी दोन ते आठ हजार रुपयांमध्ये गावठी कट्टे तयार करून दिले जातात. तयार झालेला माल रस्ते किंवा रेल्वे मार्गे महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात पोहचवण्यासाठी हस्तक काम करतात. परराज्यातील बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड या राज्यातील गुन्हेगारांसह जिल्ह्यातील तसेच शहरातील स्थानिक गुन्हेगारांना पोलिसांनी वेळोवेळी अटक केली आहे.

दोन दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचचे पीआय संजय सानप यांच्या पथकाने शिर्डी व येवला येथे राहणाऱ्या दत्तात्रय डहाळे आणि भूषण मोरे यांसह एकास​ सिन्नर फाटा येथे अटक केली. हे आरोपी दोन गावठी कट्टे विकण्याच्या बेताने शहरात दाखल झाले होते. काही वर्षांपूर्वी क्राईम ब्रँचनेच सागर ठाकूर या इंदूर येथील स्थानिकास गावटी कट्टा विकताना मुक्तीधाम येथून ताब्यात घेतले होते. पहाटेच्या सुमारास

ठाकूर टिक्कू शेख या सराईत गुन्हेगारास कट्टा विकताना पोलिसांना सापडला होता. क्राईम ब्रँचसह स्थानिक पोलिसांनी आजवर पकडलेले सर्व गावठी कट्ट्यांचे मध्यप्रदेश राज्याशी कनेक्शन असल्याचे समोर आले

आहे.

याबाबत माहिती देताना पीआय सानप यांनी सांगितले की, या गुन्ह्यात विक्री करणारा आणि विकत घेणारा दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतात. हा कट्टा कसा मिळाला याची तुंटपुंजी माहिती विक्री करणाऱ्या व्यक्तींकडे असते. बनावटीनुसार किंवा संशयिताने दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश राज्याचे कनेक्शनसमोर येत असल्याचे सानप यांनी स्पष्ट केले.

जीवाचे भय असलेले गुन्हेगार गावठी कट्ट्यांना प्राधन्य देतात. दोन गटातील भांडणांमुळेच सराईत गुन्हेगार गावठी कट्ट्यांच्या शोधात असतात. शहराबाहेरील विक्रेत्यांचा त्यांच्याशी संपर्क आल्यास सौदा होतो. सुदैवाने ही माहिती आमच्यापर्यंत पोहचल्यास लागलीच कारवाई होते. आजवर अटक झालेल्या आरोपींमध्ये सर्वाधिक समावेश परराज्यातील गुन्हेगारांचा आहे.

- सचिन गोरे, सहायक पोलिस आयुक्त, क्राईम ब्रँच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लॉ’चे दहा विद्यार्थी अखेर ठरले पास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सद्यस्थितीत गाजत असलेल्या नाशिकच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नी अखेर संघर्षानंतर कसाबसा न्याय पदरात पडला आहे. विद्यार्थ्यांच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर विद्यापीठाने गहाळ झालेल्या उत्तरपत्रिकांची शोधाशोध करीत अखेर पुनर्निकाल मंगळवारी जाहीर केले. या घडामोडीत एनबीटी कॉलेजच्या नापास ठरलेल्या १२ पैकी १० विद्यार्थी पास ठरले आहेत.

गत शैक्षणिक वर्षात कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या इव्हीडन्स या विषयाच्या पार पडलेल्या परीक्षेमध्ये नापास झालेल्या १२ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे रिचेकिंगसाठी अर्ज केले होते. पण, महिना उलटून गेल्यानंतरही विद्यार्थ्यांना विद्यापीठाने उत्तर दिले नाही. तोपर्यंत रिपीटर्स विद्यार्थ्यांसाठी पुन्हा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. रिचेकिंगच्या अर्जांचा या दरम्यान विद्यार्थ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाच गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती विद्यार्थ्यांच्या कानी आली होती. यावर विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत टर्म एंड परीक्षांवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत आंदोलन सुरू केले होते. मात्र, मंगळवारी या तथाकथित गहाळ झालेल्या उत्तरपत्रिकांचा मागोवा घेत विद्यापीठाने कसेबसे रिचेकिंगचे निकाल जाहीर केले. यामध्ये नापास ठरलेल्या सुमारे १२ विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थी पास ठरले आहेत. या सर्वांच्या गुणांमध्ये मोठा बदल घडून आला.

मोठ्या संख्येने पास विद्यार्थ्यांना नापास ठरविणारे विद्यापीठ गलथान कारभाराचीच साक्ष देते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा अधिकार विद्यापीठास नाही. भविष्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाने जबाबदारीपूर्वक काम करावे.

- अजिंक्य गिते, आंदोलनकर्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात टीडीआर धमाका!

$
0
0

शेतकऱ्यांना सहाऐवजी एकास तीनपट टीडीआर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

साधुग्रामसाठी कायमस्वरूपी २७३ एकर जागा आरक्षित करण्यासाठी महापालिकेने पाठविलेल्या एकास सहापट टीडीआर प्रस्तावाला शासनाने पुन्हा ठेंगा दाखविला आहे. नगरविकास विभागाने साधुग्रामच्या जागेसाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त एकास तीनपट टीडीआर देण्यास संमती दर्शवली आहे. बिल्डरांनीच शासनावर दबाव टाकल्याने टीडीआर कमी करण्यात आल्याची ऑचर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. शासनाच्या संमतीमुळे ऐन दिवाळीत शहरात तब्बल पावणेचार कोटी टीडीआर उपलब्ध होणार आहेत. यातून टीडीआरचे दर कोसळण्याचीही शक्यता आहे.

दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा काळात साधुग्रामच्या जागेचा वाद निर्माण होतो. कुंभमेळ्यासाठी ३२५ एकर जागा आवश्यक असतांना, केवळ ५७ एकरच जागा ताब्यात आहे. त्यामुळे उर्वरित जागेचा वाद कायमचा मिटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी शेतकऱ्यांना वाढीव टीडीआर देवून जागेचे कायमस्वरूपी भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे पालिकेला आर्थिक झळ बसणार नसल्याचा दावा केला गेला. महासभेत येथील जमीनधारकांना आरक्षित जागेसाठी अंतिम म्हणून एकास सहापट प्रमाणात टीडीआर देण्याचा ठराव मंजूर केला होता. सिंहस्थापूर्वी हा प्रस्ताव पाठविला होता. मात्र, त्यावर निर्णय झाला नव्हता. अखेरीस सोमवारी यांसंदर्भात निर्णय घेवून पालिकेचा प्रस्ताव अमान्य करीत, एकास अडीचपट व वेळेत संमती दिल्यास अर्धा असा तीनपट टीडीआर देण्याचा आदेश काढला आहे.

प्रचलित नियमानुसारच शासनाने एकास तीनपट टीडीआर देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याने यात शेतकऱ्यांना जास्तीचा आर्थिक मोबदला मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता असून, कायमस्वरूपी जागा संपादित करण्याच्या प्रक्रियेला खोडा बसण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणून जास्तीचा टीडीआर मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांनी जमीन देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, टीडीआर क्षेत्रात मक्तेदारी असलेल्या काही बिल्डरांनी याला शासनस्तरावर विरोध केला. त्यामुळे हा विषय रखडला होता. आता महापालिका नेमकी काय भूमिका घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

बिल्डरांना दणका

सध्याचा शासनाने देऊ केलेला टीडीआर शेतकऱ्यांनी मान्य केल्यास बाजारात तब्बल पावणेचार कोटी एवढा टीडीआर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांसाठी हा दिवाळी धमाका ठरणार आहे. एवढा टीडीआर बाजारात उपलब्ध झाल्यास सध्याचे टीडीआरचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळण्याची शक्यता आहे. टीडीआरटी बँक करून घेतलेल्या निवडक बिल्डरांना याचा मोठा आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे छोट्या बिल्डरांना त्याचा लाभ मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’संगे बनवा ग्रिटिंग, आकाशकंदील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीत आपल्या आप्तांना, मित्रपरिवाराला शुभेच्छा देण्यासाठी ग्रिटिंग व घर प्रकाशात न्हाऊन निघावे यासाठी आकाशकंदील लावण्याची पद्धत आहे. या दोन्ही वस्तू विकत घेण्यास अनेकदा प्राधान्य दिले जाते, पण या दोन्ही वस्तू विकत घेण्यापेक्षा स्वतः बनविल्या तर त्या निश्चितच अधिक समाधान देतात. याच विचाराने 'महाराष्ट्र टाइम्स' व 'श्री रचना चित्रकला कॉलेज' यांच्या संयुक्त विद्यमाने 'ग्रिटिंग व आकाशकंदील बनवा' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 'ग्रिटिंग बनवा' कार्यशाळा गुरुवारी (दि. २९) तर 'आकाशकंदील बनवा' कार्यशाळा शुक्रवारी (दि. ३०) होणार आहे.

आकर्षक कलाकुसरीच्या माध्यमातून ग्रिटिंग व आकाशकंदील कसे बनवावे, याबाबत प्रा. सचिन सानप या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. ग्रिटिंग कार्यशाळेसाठी सहभागींनी पोस्टर कलर्स, ब्रश, रुमाल, पाणी व ग्लास आणावा. ग्रिटिंगसाठी पोस्टकार्ड कार्यशाळेत मिळणार आहे. ग्रिटिंग वर्कशॉपसाठी कल्चर क्लब सदस्यांना १०० तर इतरांना १५० रुपये शुल्क भरून कार्यक्रमस्थळी नोंदणी करता येणार आहे.

'आकाशकंदील बनवा' या शुक्रवारी होणाऱ्या कार्यशाळेसाठी आवश्यक सर्व साहित्य कार्यशाळेत उपलब्ध करून दिले जाणार असून कल्चर क्लब सदस्यांसाठी १५० व इतरांसाठी २०० रुपये शुल्क भरून कार्यक्रमस्थळी नोंदणी करता येणार आहे. या दोन्ही कार्यशाळांसाठी वयाची अट नाही. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था या कार्यशाळेचे व्हेन्यू पार्टनर आहे.

येथे होणार कार्यशाळा

ग्रिटिंग आणि आकाशकंदील या दोन्ही कार्यशाळा दोन्ही दिवस दुपारी ३ ते ५ या वेळेत त्र्यंबकरोडवरील सिबल हॉटेलजवळील अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेत कार्यशाळा होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगकामामुळे घरे बहरली

$
0
0

रंगांच्या दरात १० टक्क्यांची घसरण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असल्याने घराघरांमध्ये तयारीला सुरुवात झाली आहे. या शुभकार्यात मंगलमयता आणण्यासाठी रंग देण्यास प्राधान्य दिले जात असून यंदा रंगांचे दरही दहा टक्क्यांनी कमी झाल्याने उत्साह अधिक वाढल्याचे चित्र आहे.

दिवाळी आली की घरातील सजावटीला प्राधान्य दिले जाते. सजावटीच्या वस्तू, आकर्षक दिवे, आकाशकंदिल इत्यादी वस्तूंची खरेदी खास या उत्सवाच्या निमित्ताने केली जाते. या वस्तू घरात अधिक प्रभावी दिसाव्यात, यासाठी प्राथमिक सजावट केली जाते ती घराच्या रंगकामाची. घरात सुबक रंगसंगती असेल तर बाकी वस्तूही अधिक उठून दिसतात. त्यामुळे दिवाळीत प्राधान्याने रंगकामास पसंती दिली जाते. काळानुसार जागतिकीकरणाचा प्रभावही दिसू लागल्याने रंगांमधील वैविध्यही सहजतेने उपलब्ध झाले आहे. आज या रंगांमध्ये इम्पोर्टेड प्रकारही झळकू लागले असून नाशिककरांची त्यास चांगली पसंती असल्याचे विक्रेते सांगतात.

रंगांच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत दर कमी झाले असल्याने आवडीनुसार रंग निवडण्याची संधीही मिळणार आहे. यामध्ये वॉटर बेस्ड, ऑईल बेस्ड, क्रॅकल्स, मॅट, सेमी ग्लॉस, ग्लॉस इत्यादी प्रकारांमध्ये तसेच मॉडर्न, क्लासिक, अबस्ट्रॅक्ट, ट्रॅडिशनल, रिअलॅस्टिक या शैलींमध्ये रंग देण्यास पसंती दिली जात आहे. सध्या डिजिटलची क्रेझ असल्याने डिजिटल पेंटिंग तसेच अनिमेशन, सीस्केप, सिनरी आदी थिम्सला रंगकाम करण्याची मागणी केली जात असल्याचे विक्रेते सांगतात. घराला वेगळा लूक देण्यास प्रयत्नशील असलेल्यांना स्प्रे पेंटिंग हादेखील पर्याय असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे यंदा दिवाळीत रंगांच्या विविध प्रकार आणि शैलींनी शिवाय किंमती घसरल्याने स्वस्तात घर सजविता येणार आहे.

इकोफ्रेंडलीचा ट्रेंड

पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेले पर्यावरणावर आधारित रंगसंगती करुन घेण्यास पसंती दिसते. इकोफ्रेंडली रंगांचाच वापर यात होत असल्याने पर्यावरण संवर्धनासाठी खर्या अर्थाने हे उपयुक्त असतात. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून इकोक्लीन हा इकोफ्रेंडली रंग बाजारात आला आहे. इतर रंगांच्या तुलनेत याचा वासदेखील उग्र नसतो. यामध्ये घराच्या भिंतींवर झाडं, पक्षी रेखाटण्यास प्राधान्य दिले जाते. यंदा रंगांचे दर कमी झाले असल्याने दिवाळीत बऱ्याच पर्यायांचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. सध्या ट्रॅक्टर इमल्शन हा रंग बजेटमध्ये असल्याने त्यास अधिक पसंती दिसत आहे.

- शब्बीर वोहरा, व्यावासायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रायकॉम कामगारांना भाजपाचा पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर औद्योगिक वसाहतीतील ट्रायकॉम कंपनीतील कामगारांनी पाच दिवसांपासून वेतनवाढीच्या करारावरून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान सिटू संघटना असलेल्या ट्रायकॉम कंपनीतील कामगारांना भाजपा कामगार मोर्चाने पाठिंबा दिला आहे. आमदार सिमा हिरे, भाजपा कामगार मोर्चाचे महाराष्ट्र चिटणिस विक्रम नागरे यांनी कामगारांशी भेट घेत पालकमंत्र्यांना मध्यस्थी करण्यास सांगणार असल्याचे कामगारांना सांगितले.

ट्रायकॉम कंपनीतील कामगार गेल्या दोन वर्षांपासून वेतनवाढीच्या करारावरून आंदोलन करत आहेत. यात अनेकदा कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांच्या दालनात बैठक होऊन देखील वेतनवाढीच्या कराराबाबत तोडगा निघालेला नाही.

यामुळे ट्रायकॉम कंपनीतील कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाला नोटिस देत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, पश्चिम मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे व भाजपा कामगार मोर्चाचे महाराष्ट्र चिटणीस नागरे यांनी कामगारांना भेटून समस्या जाणून घेतल्या. ३५० कामगार असलेल्या ट्रायकॉम कंपनीत बहुतांश महिला कामगार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुयारी गटारांना केंद्राचे बळ

$
0
0

नाशिकचा समावेश अमृत योजनेत; केंद्रीय नगरविकास मंत्र्यांचे आश्वासन
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्राच्या जेएनयुआरएम योजनेतून ३१ मार्च २०१४ पूर्वी ५० टक्क्यापेक्षा जास्त काम झालेल्या योजनांचा समावेश अमृत योजनेत करण्याचा निर्णय केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत झाला आहे. मात्र, राज्य शासनाच्या दिरंगाईमुळे अमृत योजनेत नाशिकच्या भुयारी गटार योजनेचा समावेश झाला नाही. त्यामुळे नाशिक महापालिकेने भुयारी योजना पॅकेज-२ चे काम ६० टक्के पूर्ण केल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकैय्या नायडू यांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले असून, नायडू यांनी नाशिकचा समावेश अमृत योजनेत समावेश करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे भुयारी गटारीचे कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या भुयारी गटार योजनेसाठी केंद्राकडून २०१० साली १७१ कोटी ८२ लाखाचा निधी मंजूर झाला होता. केंद्राचे ५० टक्के, राज्याचे २० टक्के आणि महापालिकेचे ३० टक्के मिळून १७१ कोटी मिळणार होते. केंद्राने योजनेचे काम सुरु करण्यासाठी दोन हप्त्यापोटी ४२ कोटी ९४ लाखाचा निधी महापालिकेकडे वर्ग केला.

मात्र, उर्वरीत निधी अभावी योजना बंद झाली. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत ज्या महापालिकेने ५० टक्के भुयार गटार योजनेचे काम पूर्ण केले असेल अशाच शहरांचा समावेश अमृत योजनेत करण्याचा निर्णय झाला. नाशिक महापालिकेने ६१ टक्के काम पूर्ण केलेले असतानाही राज्य शासनाने पाठवलेल्या अमृत यादीत नाशिकचा समावेश करण्याचे राहिले. गोडसे यांनी ही प्रशासकीय चूक नायडूंच्या लक्षात आणून दिली व अमृत योजनेत समावेश करण्याची विनंती केली. त्याला व्यंकय्या नायडूंनी संमती दिली आहे.

अमृत योजनेत नाशिकचा समावेश झाल्याने केंद्राकडून ४२ कोटीचे दोन हप्ते महापालिकेला मिळतील आणि भुयारी गटार योजनचे काम पुन्हा सुरु होईल. नायडू यांनी नाशिक महापालिकेच्या कामाची चौकशी करुन महापालिकेचा समावेश अमृत योजनेत करण्याचीच सूचना संबंधित विभागाला दिली आहे.

- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमच्या वर्गणीतून केबल टाकून द्या!

$
0
0

उद्विग्न ग्राहकांची बीएसएनएलला विनवणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या दोन वर्षांपासून आम्ही ब्रॉडबँड कनेक्शनसाठी अर्ज केला आहे. पण, केबल नसल्याचे कारण दिले जात आहे. आम्ही परिसरातील नागरिक केबलसाठी वर्गणी गोळा करतो. त्यातून तरी ब्रॉडबँडचे कनेक्शन द्या, असे उद्विग्न उद्गार ग्राहकांनी बीएसएनएलच्या ओपन हाऊसमध्ये काढले. या हाऊसमध्ये बीएसएनएलच्या सेवेबाबत ग्राहकांकडून तक्रारींचा पाऊस पाडला.

कॅनडा कॉर्नर येथील बीएसएनएलच्या कार्यालयात बुधवारी ग्राहकांसाठी ओपन हाऊसचे आयोजन करण्यात आले होते. बीएसएनएलचे जनरल मॅनेजर सुरेशबाबू प्रजापती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या हाऊसमध्ये ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. याद्वारेच बीएसएनएलच्या विस्कळीत सेवेवर प्रकाश पडला. लँडलाईनचे कनेक्शन न मिळणे, मोबाइलचे नेटवर्क नसणे, कॉलड्रॉप होणे, रिचार्ज ठिकठिकाणी उपलब्ध न होणे, टॉवर असूनही बंद असणे, ब्रॉडबँड कनेक्शनसाठी वेटिंगवर रहावे लागणे, बिल अधिक येणे, ऑनलाइन रिचार्जची सुविधा नसणे, बिल न मिळणे अशा विविध प्रकारच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या. या सर्व ग्राहकांचे समाधान करताना प्रजापती यांच्यासह बीएसएनएल अधिकाऱ्यांचे चांगलेच नाकीनव आले.

याप्रसंगी ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष प्रा. टी. बी. सांळुके यांच्यासह बीएसएनएल अधिकारी, कर्मचारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्राहकांच्या तक्रारी

प्रजापती साहेब मी आपल्याला दोन मेल केले आहेत. मात्र, त्याची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही. आपल्याला तक्रार करूनही काहीच होत नसेल तर काय

फायदा.

- संतोष वाजे,

ग्राहक

आडगाव परिसरात आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून ब्रॉडबँडची मागणी करीत आहोत. मात्र, त्याची पूर्तता केली जात नाही. केबल नाही असे सांगितले. हम चंदा निकालते है, वो पैसेसे आप केबल खरीदके हमे कनेक्शन दे दो.

- नाशिकरोड ट्रान्सपोर्ट असोसिएशन

गुरुगोविंद सिंग कॉलेज जवळील समर्थ नगरमध्ये आमचे घर आहे. त्या परिसरात ब्रॉडबँड कनेक्सन हवे आहे. पण, आपल्याकडून सेवा दिली जात नाही. तक्रार केल्यावर तेथील सर्वेक्षण करण्यात आले. एकूण २८ जण कनेक्शन घेण्यास इच्छुक आहेत. तसा अर्ज दिला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून आपल्याकडून कुठलाही प्रतिसाद नाही.

- अशोक गुजर, ग्राहक

कुलकर्णी गार्डन जवळील साधूवासवाणी रोड येथे आमच्या घर परिसरात मोबाइलचे नेटवर्क मिळत नाही. घरातून बाहेर आल्यावरही हीच समस्या आहे. आता आम्ही घर बदलायचे की बीएसएनएलचे कनेक्शन ते तुम्ही सांगा.

- ज्येष्ठ नागरिक

रामवाडी येथे मी ब्रॉडबँडचे कनेक्शन घेतले आणि पहिलेच बील थेट ३ हजार रुपयांचे आले आहे. ते कसे? एक हजार रुपये माझ्याकडून इन्स्टॉलेशन चार्जेस घेतले आहेत. प्रत्यक्षात केवळ इन्स्ट्रुमेंटस मला देण्यात आले. ते जोडून देण्यात आले नाहीत. शिवाय अधिकचे बिल आले. मी कनेक्शन ठेवायचे की बंद करायचे?

- हरिओम विसपुते, ग्राहक



निदान आम्ही येथे आहोत

बीएसएनएल ही भारत सरकारची कंपनी आहे. देशभरात अडीच लाख अधिकारी व कर्मचारी सेवा देत आहेत. देशात आज एवढ्या मोठ्या संख्येने सेवा देणारी कुठलाही टेलिकॉम कंपनी नाही. सेवेबाबत काही अडचणी असतील आणि त्या आमच्या निदर्शनास आल्या तर त्याची आम्ही नक्कीच दखल घेतो. एखाद्या भागात केवळ कनेक्शनचा एकच अर्ज आला तर तेथे केबल टाकण्याचा खर्च आणि इतर बाबी लक्षात घेता ते परवडणारे नसते. समर्थ नगरसारख्या भागासाठी तर आम्हाला नवीन एक्सचेंजच उभारावे लागणार आहे. आज ग्राहक निदान बीएसएनएलच्या कुठल्याही कार्यालयात तक्रारीसाठी येऊ शकतात. काही तांत्रिक आणि इतरही अडचणी असतात. त्यामुळे थोड्या फार प्रमाणात सेवा मिळत नसेल तर थेट बीएसएनएलला सोडचिठ्ठी देणे योग्य नाही. बीएसएनएलची सेवा घेणे म्हणजे देशाच्या विकासालाच एकप्रकारे योगदान आहे. दर तीन महिन्यातून आम्ही ओपन हाऊस गेतो. इतर कंपन्या घेतात का, याचाही विचार ग्राहकांनी करावा.

- सुरेशबाबू प्रजापती,

जनरल मॅनेजर, बीएसएनएल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिंद्राकडून दहा लाखाची नेम फाऊंडेशनला मदत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अपघातग्रस्त व आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना मदत करणाऱ्या नेम फाऊंडेशनला महिंद्रा कंपनीकडून दहा लाखाची आर्थिक मदत करण्यात आली. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण आहेर यांच्या हस्ते फाऊंडेशनचे संचालक डॉ. प्रशांत पाटील यांना हा धनादेश प्रदान करण्यात आला.

आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तत्काळ मदत करण्याच्या उद्देशाने नाशिक शहरात नेम फाऊंडेशन ही संस्था २ ऑगस्ट २००८ साली स्थापन झाली. या संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत पाटील, सलील राजे, तेज टकले हे संस्थेसाठी सुरुवातीपासून परिश्रम घेत आहेत. या संस्थेच्या १०८ नंबर वर कॉल आल्यानंतर सदर रुग्णवाहिका १० ते १५ मिनिटात अपघातस्थळी पोहचते व पुढील १५ मिनिटांत जवळच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी रुग्णास दाखल करते. नेम फाऊंडेशनने नाशिक आणि परिसरात गेल्या सात वर्षांपासून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून कार्यरत राहून आजपर्यंत सुमारे ३८५० अपघातग्रस्त आणि रुग्णांना विनामूल्य सेवा पुरवली आहे. त्यामुळे नेमच्या या कार्याची दखल घेऊन महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या वतीने दहा लाखाची आर्थिक मदत करण्यात आली. कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट हिरामण आहेर व त्यांचे सहकारी कमलाकर घोंगडे यांच्या हस्ते नेम फाऊंडेशनचे पदाधिकारी डॉ. प्रशांत पाटील, तेज टाकले, रौंदळ यांना चेक सुपूर्द करण्यात आला. या निधीमुळे रुग्णांच्या मदतकार्याला बळ मिळेल, असे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौधरीच्या जामिनावर शुक्रवारी निकाल!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जळगाव येथील रामानंदनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्या प्रकरणातील संशयित वाळू ठेकेदार सागर मोतीलाल चौधरी याच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारीही निर्णय होऊ शकला नाही. दोन्ही पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात तब्बल दोन तास युक्तिवाद केला. त्यावर शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर) रोजी निकाल देण्यात येणार आहे.

सागर चौधरी याच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होणार होती. सादरे यांच्या पत्नी माधुरी, मुलगी पूनम न्यायालयात हजर होत्या. दुपारी पावणेतीनच्या सुमारास युक्तिवादाला सुरुवात झाली. चौधरी यांचे वकील मुकेश शिंपी यांनी सव्वातास युक्तीवाद केला. सादरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये सागर चौधरी याने त्रास दिल्याचे म्हटलेले नाही. ३ मे २०१५ नंतर सादरे आणि चौधरी यांच्यामध्ये कुठलाही संवाद झालेला नाही. चौधरी हे वाळू ठेकेदार आहेत. परंतु, त्यांना वाळूमाफिया ठरवून त्यांची प्रतिमा मलीन केली जात असल्याचे ते युक्तितीवादात म्हणाले.

जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला. सादरे २६ वर्षांपासून पोलिस दलामध्ये आहेत. २३ वर्षांत त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. मात्र, गेल्या तीन वर्षांत जळगावमध्ये त्यंच्यावर सलग सात ते आठ गुन्हे दाखल होऊन निलंबनासारखी कारवाई झाली. संशयितांकडून होणारा अन्याय असह्य झाल्याने त्यांनी आत्महत्त्येचा मार्ग पत्करला. पोलिस अधीक्षक सुपेकर, पोलिस निरीक्षक रायते व सागर चौधरी यांनी संगनमताने अशी परिस्थिती निर्माण केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये चौधरी याचे नाव आहे. चौधरी याच्यापासून सादरे कुटुंबीयांना धोका आहे. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली.

या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधिकारी विजयकुमार चव्हाण यांनीही न्यायालयात तपासाबाबत माहिती दिली. सादरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये चौधरी याचे नाव लिहिले आहे. चौधरी गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. तपासासाठी त्याला पोलिस कोठडी मिळणे आवश्यक असल्याची विनंती चव्हाण यांनी न्यायालयाला केली.

चौधरी याने अटकपूर्व जामिनासाठी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये २० ऑक्टोबरला अर्ज केला आहे. युक्तीवाद पूर्ण झाल्यामुळे आता ३० ऑक्टोबरला त्यावर न्यायाधीश एस. आर. कदम निर्णय देण्याची शक्यता आहे. यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सादरे कुटुंबीय तसेच पोलिसांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओचे लक्ष्य आता कंपन्या, कॉलेजेसवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'मराठा विद्या प्रसारक शैक्षणिक संस्थेने हेल्मेट व सीटबेल्ट सक्तीचा निर्णय घेऊन आमच्या प्रयत्नांना भक्कम पाठबळ दिले आहे. शहरातील अन्य शैक्षणिक संस्था आणि एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये हेल्मेट सक्ती व्हावी, असा आग्रह आम्ही धरत असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल.' असा विश्वास प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी धुळे महामार्ग आणि गंगापूर रोडवर तब्बल १०० जणांवर कारवाई करण्यात आली.

हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर न करण्याची वाहनधारकांची उदासिनता त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरते आहे. अवतीभवती दररोज अशा मृत्यूच्या घटना घडत असतानाही वाहनधारक त्यापासून बोध न घेता सर्रास हेल्मेट तसेच सीटबेल्टशिवाय वाहने चालविण्याची जोखीम उचलत आहेत. सर्वाच्च न्यायालयानेच हेल्मेट आणि सीटबेल्ट वापराबाबतचा आग्रह धरल्याने आता प्रादेशिक परिवहन विभागाने शहरात याबाबतची मोहीम सुरू केली आहे. सक्ती नव्हे आग्रह असा या मोहीमेचा सूर ठेवण्यात आला असून, महामार्गांवर कारवाई करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. बुधवारी धुळे महामार्ग आणि गंगापूर रोडवर ही कारवाईची मोहीम राबविण्यात आली. गंगापूर रोडवर अशोक स्तंभ ते गंगापूर गाव या दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. हेल्मेटशिवाय वाहने चालविणारे मोटरसायकलस्वार आणि सीटबेल्टशिवाय वाहने चालविणाऱ्या चालकांवर ही कारवाई करण्यात आली. विशेषत: केटीएचएम कॉलेजमध्ये ये जा करणाऱ्या मोटरसायकलस्वार

विद्यार्थ्यांना समुपदेशानासाठी पेठरोडवरील आरटीओ कार्यालयात बोलावून घेण्यात आले आहे.

धुळे महामार्गावरही के. के. वाघ कॉलेज, पंचवटी कॉलेजचे अनेक विद्यार्थी हेल्मेटशिवाय वाहने चालवित असल्याचे आढळून आले. आडगाव नाका ते जत्रा हॉटेल या दरम्यानच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. दिवसभरात १०० हून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. गुरूवारी कॉलेजरोड आणि औरंगाबाद रोडवर ही कारवाई होणार आहे.

मराठा विद्या प्रसारक संस्थेने हेल्मेट आणि सीटबेल्ट सक्तीचा निर्णय घेतल्याने या मोह‌िमेला पाठबळ मिळाले आहे. अशा अनेक शैक्षणिक संस्था नाशिकमध्ये असून, आम्ही त्यांच्याकडेही याबाबत आग्रह धरणार आहोत. अंबड आणि सातपूर एमआयडीसीमधील कंपन्यांनी देखील या मोह‌िमेत सहभागी होऊन कामगारांचे हित जोपासावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

- भरत कळसकर,

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधार पूल कॅम्पस इंटरव्ह्यूचा

$
0
0

अमोघ पोंक्षे, कॉलेज क्लब रिपोर्टर

कॅम्पस इंटरव्ह्यू एकाच कॉलेजमध्ये आयोजित करण्यात येत असले तरी त्यामध्ये सहभागी होण्याची संधी शहरातील अन्य कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांनाही मिळत आहे. नाशिकमधील बहुतांश कॉलेजेसमधील विद्यार्थ्यांना यानिमित्ताने प्लॅटफॉर्म उपलब्ध होत असून जास्तीत जास्त तरुणांना नोकरी मिळण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे.

इंजिनिअरींगच नव्हे तर फार्मसी व मॅनेजमेंट कॉलेजमध्येही सध्या कॅम्पस इंटरव्ह्यूचा माहोल पाहायला मिळत आहे. अॅप्टीट्युड टेस्ट, ग्रुप डिस्कशन व नंतर पर्सनल इंटरव्ह्यू अशा विविध पातळ्यांवर यश मिळवत अखेर विद्यार्थ्यांना त्यांचा ड्रीम जॉब मिळत आहे. या वर्षीचा विचार केला असता एम.ई.टी भुजबळ नॉलेज सिटी व के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये आतापर्यंत बहुतांशी पूल कॅम्पस इंटरव्ह्यू झाले. ज्यामध्ये नाशिकमधील विविध कॉलेजेसच्या मुलांनी नोकरी मिळविली. यामध्ये प्रामुख्याने पुण्यातील झेन्सर टेक्नॉलॉजी व परसिस्टन्ट, मुंबईतील एल अँड टी, इन्फोटेक या कंपन्यांचा समावेश होता.

बक्कळ पॅकेज

नाशिकमधील इंजिनीअरिंग क्षेत्रातील ७.५ लाख पर इयरचे पॅकेज नुकतेच के.के वाघ इंजिनीअरिंग कॉलेजमधील कम्प्युटर शाखेतील संध्या पर्वाणी व प्रशांत धेंडे या मुलांना मिळाले. हे पॅकेज एनव्हिडीया या कंपनीतर्फे नुकतेच देण्यात आले. यासाठी नाशिकमधील विविध कॉलेजेसमधून एकूण ९५ मुले इंटरव्ह्यूसाठी सहभागी झाली होती.

फार्मसीसाठी धावली टीसीएस

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ व एम.ई.टी भुजबळ नॉलेज सिटीच्या इन्स्टीट्युट ऑफ फार्मसीमार्फत नाशिक व नगर जिल्ह्यातील फार्मसी कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी पूल कॅम्पसचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. आय.टी क्षेत्रातील अग्रगण्य टी.सी.एस. या कंपनीतर्फे हे इंटरव्ह्यू घेण्यात आले. यामध्ये नाशिक व नगरमधील फार्मसीचे एकूण १८० विद्यार्थी सहभागी झाले होते, ज्यातून १९ जणांना नोकरीची संधी मिळाली.

मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनाही संधी

नाशिकमधील सर्व मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पूल कॅम्पसचे आयोजन नुकतेच या कंपनीसाठी करण्यात आले होते. बँक ऑफ न्यूयॉर्क मेलॉन या कंपनीसाठी हे इंटरव्ह्यू घेण्यात आले. यामध्ये एकूण ८३ विद्यार्थी सहभागी झाले होते व त्यातून १६ जणांची नोकरी पक्की झाली. गेल्या चारहून अधिक वर्षापासून ही कंपनी नाशिकमध्ये प्लेसमेंटसाठी सातत्याने येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेटसक्ती व्हॉट्सअॅपवर

$
0
0

नाशिक टाइम्स टीम

हाय कोर्टाच्या नियामांनुसार दुचाकीस्वारांना हेल्मेट तर चारचाकी ड्रायव्हरला सीट बेल्ट सक्तीचे करण्यात आले आहे. या अनुषंगाने गेल्या चार-पाच दिवसांपासून नाशिकमधील आरटीओ आणि पोलीस यंत्रणा या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर गुन्हे दाखल करत आहे. या थेट अॅक्शनमुळे गेल्या चार दिवसात ही हेल्मेट सक्तीही व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली आहेत.





'हेल्मेट सक्तीमुळे नाशिकमधील चालू गाडीवरुन थुंकण्याची लोकप्रिय कला नामशेष होण्याच्या मार्गावर...' हा मेसेज गमतीने अनेक ग्रुप्समध्ये व्हायरल होतो आहे. सोबतच कॉलेजियन्सच्या ग्रुप्समध्ये 'तोंडावर स्कार्फ बांधून फिरणाऱ्या मुलींनो, आता तुम्ही सुद्धा तडपणार नाशिकच्या हँडसम मुलांना पहायला..., आता नाशिकला हेल्मेट सक्ती' हा मेसेज हिट ठरला आहे. या मेसेजेससोबतच काही गंभीर्याच्या गोष्टी कथन करणारी व्यंगचित्रे व्हायरल होत आहेत. यात एका स्कूटरवर असलेल्या सर्व कुटुंबाने परिधान केलेले हेल्मेट पाहून ट्रॅफिक पोलिसाला होणारा आनंद दर्शवणारे एक चित्र हेल्मेट ही काळाची गरज असल्याचे दर्शवून देते. दुसऱ्या व्यंगचित्रात एक सामान्य व्यक्ती 'या हेल्मेटसक्ती खाली नेमकं दडलयं काय?' या प्रश्नाचं उत्तर हेल्मेटकडे बघत शोधतोय असं दिसतं. सर्वसामान्य नाशिककरांना पडलेल्या प्रश्नावरचे हे व्यंगचित्र आहे.
या मेसेज आणि व्यंगचित्रांसोबत माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार वाहन पकडल्यानंतर आरटीओ वा पोलिस कोणत्या कलमाखाली किती दंड आकारु शकतात याचा तक्ताही माहितीपर संदेश म्हणून व्हॉट्सअॅपवर फिरत आहे. हेल्मेटसक्ती आणि त्याचा नाशिककरांवर झालेला परिणाम या मेसेजेसमधून अधोरेखित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरेंनी 'ते' प्रेझेन्टेशन ढापलंय! - शिवसेना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरात सिंहस्थानिम‌ित्त राज्य सरकारच्या निधीतून झालेल्या कामांचे श्रेय घेत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. ठाकरे एवढ्यावरच थांबले नसून, त्यांनी चक्क स्मार्ट नाशिकचे आयुक्तांनी केलेले प्रझेन्टेंशनही ढापल्याचा आरोप शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केला आहे. तर भाजपनेही राज ठाकरेंच्या श्रेयावर टीका केली असून, नागरिकांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून कल्याण डोंबीवली महापालिकेत नाशिकच्या विकासकामांचा ढोल वाजवला जात आहे. सिंहस्थानिम‌ित्त नाशिकमध्ये झालेली कामेच ठाकरे मनसेने केल्याचे दाखवत आहेत. राज्य सरकारने सिंहस्थासाठी २३७८ कोटी रुपये मंजूर केली होती. त्यातूनच ही विकासकामे उभी राह‌िली आहेत. मात्र ही कामे आपणच केल्याचे स्वप्न ठाकरेंना पडल्याचा टोला सेनेने लगावला आहे. नाशिकमध्ये आनंदवल्ली ते रामवाडी अशी जलवाहतुक सुरू केल्याचे सांगत ठाकरेचे नाव राज ठाकरे ऐवजी राज थापा करा, अशी टीका सेनेने केली आहे. विशेष म्हणजे स्मार्ट सिटी प्रोजेक्टमध्ये आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रस्ताव‌ित केलेली कामे ही जणू आपणच केल्याचा दावा त्यांनी सुरू केला आहे. प्रत्यक्षात कागदावरही नसलेली कामे त्यांनी केल्याचा दावा केल्याने भाजपासह नाशिककरांनी त्यांच्या भाषणांची खिल्ली उडवली आहे. ठाकरेंच्या या आरोपांना उत्तरे देण्यासाठी सेनेने नाशिकच्या लोकप्रतिनिधींना कल्याण डोंबविलीच्या प्रचारात उतरवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीगळतीला लागला ब्रेक!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

यंदा पुरशा प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे पाणीकपातीचे संकट लादून नाशिककरांना पाणीबचतीचे डोस पाजणाऱ्या महापालिका प्रशासनाकडून पाण्याच्या वारेमाप उधळपट्टीकडे डोळेझाक केली जात होती. याबाबत 'मटा'ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाने गुरुवारी तत्काळ पाणीगळती बंद करण्याला प्राधान्य दिले.

शहरात महापालिकेने पाणीकपात केल्यानंतर पाणीगळती रोखणार कोण अशा आशयाचे वृत्त 'मटा'ने गुरुवारी प्रसिद्ध केले. त्यानंतर महापालिकेची पाणी पुरवठ्याची यंत्रणा खडबडून जागी झाली आणि शहरात विविध ठिकाणी होत असलेल्या पाणीगळतीकडे प्राधान्याने लक्ष देत तत्काळ उपाययोजनाही केल्या. नवीन नाशिकमधील पवननगर येथील जलकुंभातून पाणीगळती आणि पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासनाने गेटच बंद करून टाकले. यापूर्वी हे गेट कधीही बंद करण्यात आले नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

महापालिका प्रशासनाने केवळ नवीन नाशिकच नव्हे तर सातपूर आणि गंगापूर रोड ‌परिसरातही पाणीगळतीला ब्रेक लावण्यासाठी प्रयत्न केले. नादुस्त व्हॉल्वमधून पाण्याची सतत गळती होत होती. ती रोखण्यासाठी कामगारांना कामाला जुंपण्यात आले. त्यांच्याकडून काम पूण करून पाण्याचा थेंबही वाया जाणार नाही, याची चाचपणी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी करून घेतली.

महापालिकेने शहरात पाणीकपातीचा निर्णय नुकताच जाहीर केला. शहरवासियांनी पाणीकपातीला कुठलाच विरोध न करता मूकसंमती दिली आहे. परंतु, दुसरीकडे मुख्य जलवाहिन्यांमधून पाणीगळती होत आहे. बातमी प्रसिद्ध करीत याकडे 'मटा'ने सगळ्यांचे लक्ष वेधले. नवीन नाशिकमधील पवननगर येथे जलकुंभाच्याच बाजूला व्हॉल्वमधून होणारी पाणीगळती पाणी पुरवठा विभागाने बंद केली. तर जलकुंभाला सुरक्षेसाठी असलेल्या लोखंडी गेट कधी नव्हे ते बंद करण्यात आले. याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. गेट खुले असल्याने जलकुंभ परिसरात कोणालाही मुक्त प्रवेश मिळत होता. सातपूर परिसरातही जलवाहिनी दुरुस्तीचे काम महापालिकेने जोमात हाती घेतले.



प्रशासनाचे लक्ष आहे तरी कुठे?

शहरात पाणीकपात होत असतांना सिडको, सातपूरमध्ये अनेक ठिकाणी नागरिक पाण्याचा प्रचंड प्रमाणात अपव्यय करीत असतात. याकडे महापालिकेचे विभागीय अधिकारी व स्वच्छता निरिक्षकांचे लक्ष नाही काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलेला आहे. रस्त्यांवर किंवा घराबाहेर चारचाकी किंवा दुचाकी वाहने धुणारे, झाडांना नळद्वारे आंघोळ घालणारे, अंगणात अर्धा अर्धा तास नळीद्वारे सडा मारणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई करण्याची मागणी जागरुक नागरिकांनी केली आहे.

पवननगर जलकुंभ, नवीन नाशिक

पाणी हे जीवन आहे, हे बालपणापासूनच प्रत्येकावर बिंबवले जात असते. मात्र, तरीही त्याचे गांभीर्य नसणारे पाण्याची सर्रास नासाडी करतात. महापालिकेने पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी स्वरुपाची थेट कारवाई करण्याची गरज आहे. - रोहित पाटील, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना कोर्टाचा दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दरोड्यासारख्या गुन्ह्याची अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करणाऱ्या पोलिसांची कोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आली. सदर गुन्ह्याची नोंद करून तपास करण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.

पंचवटी परिसरातील आरटीओ कार्यालयासमोर हरिश्चंद्र काळे व रुपाली काळे हे पाववडा विक्रीचा व्यवसाय करतात. हे दोघे व त्यांची आई शकुंतला काळे यांच्यासोबत ७ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घराकडे परतत असताना सुनील शिंदे, अस्लम शेख, सागर दिलीप शिंदे आणि अन्य काही जणांनी त्यांचा रस्ता अडवून लुटमार केली. त्यामध्ये काळे कुंटुबीयाची मारुती कार फोडण्यात आली. तसेच ४ हजार २५० रुपये, पीठाची बॅग आणि दोन तोळे वजनाची सोन्याची पोत लांबवण्यात आली. यानंतर हे कुंटुंब थेट पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये पोहचले. मात्र, दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद पोलिसांनी अदखलपात्र म्हणून करून घेतली. दोनदा प्रयत्न करूनही गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी थेट कोर्टात धाव घेतली. सर्व बाजू समोर आल्यानंतर संबंधीत व्यक्तींविरोधात गुन्ह्याची नोंद करून तपास करण्याचे निर्देश कोर्टाने पोलिसांना दिले. याबाबत अॅड. राहुल पाटील व अॅड. सुनील काळे यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यमेजवानी १७ नोव्हेंबरपासून

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सांस्कृतिक संचलनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या ५५ व्या राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. परशुराम सायखेडकर नाट्यगृह, टिळकपथ येथे सायंकाळी रोज सात वाजता नाशिककर रंगकर्मींकडून नाटकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

राज्य नाट्य स्पर्धेचा प्रारंभ १७ नोव्हेंबर रोजी विजय नाट्य मंडळ प्रस्तुत नेताजी भोईर लिखित व दिग्दर्शित 'लागता डोहाळे कुंभाचे' या नाटकाने होणार आहे. बहुउद्देशीय संस्थेतर्फे १८ रोजी चं. प्र. देशपांडे लिखित व सुयोग देशपांडे दिग्दर्शित 'सामसूम', शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेतर्फे १९ रोजी हरिष जाधव लिखित व विक्रम गवांदे दिग्दर्शित 'सटवाई अश्व' हे नाटक सादर होणार आहे. शिवछत्रपती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळातर्फे २० रोजी लक्ष्मण काटे लिखित 'नो सेंटिमेंटस्ट प्लीज' नाटक सादर होईल. दिग्दर्शन प्रसन्न काटे यांनी केले आहे. अरविंद चॅरिटेबल बहुउद्देशीय संस्था, धुळे यांच्यातर्फे २१ रोजी आनंद प्रभू लिखित व मुकेश काळे दिग्दर्शित 'लग्न नको पण पप्पा आवर', संकर्षण युवा फाऊंडेशनतर्फे २२ रोजी सकाळी साडे अकरा वाजता हरिष जाधव लिखित व विजय दीक्षित दिग्दर्शित 'नड नड कानडे' तर सायंकाळी सात वाजता आर. एम. ग्रुपतर्फे निरंजन मार्कंडेयवार लिखित व प्रशांत हिरे दिग्दर्शित 'माय डियर शुबी', मेनली अमॅच्युअर्सतर्फे २३ रोजी महेश डोकफोडे लिखित व सागर रत्नपारखी दिग्दर्शित 'गांधी हत्या आणि मी', मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे २४ रोजी डॉ. समीर कुलकर्णी लिखित व डॉ. राजीव पाठक दिग्दर्शित 'तुझ्यात माझ्यात', केटीएचएम कॉलेजतर्फे २५ रोजी आदित्य शेख लिखित व दिग्दर्शित पाऊस पाड्या, मदत सामाजिक संस्थेतर्फे २६ रोजी राजेश शर्मा लिखित व दिग्दर्शित 'विठाबाईचा कावळा', लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था, धुळे यांच्यातर्फे २७ रोजी अरविंद चौधरी लिखित व राहुल मंगले दिग्दर्शित 'फुटपाथ', लोकहितवादी मंडळ प्रस्तुत २८ रोजी मुकुंद कुलकर्णी लिखित व हेमंत देशपांडे दिग्दर्शित 'या ही वळणावर', कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयतर्फे २९ रोजी सकाळी साडे अकरा वाजता समीर मोने लिखित व सचिन रहाणे दिग्दर्शित 'नट नावाचे नाटक' तर सायंकाळी सात वाजता क. का. वाघ ललित कला कॉलेजतर्फे चि. त्र्यं खानोलकर लिखित व रोहित पगारे दिग्दर्शित 'हयवदन', जगदंब प्रतिष्ठान, धुळे यांच्यावतीने ३० रोजी नोव्हेंबर रोजी किरण लडे लिखित व दिग्दर्शित 'अघटीत' नाटक सादर होणार आहे.

एचएईडब्ल्यूआरसी रंगशाखातर्फे १ डिसेंबर रोजी रमेश कोटस्थाने लिखित व विजय जगताप दिग्दर्शित 'अरण्यभूल', गिरीधरलिला प्रॉडक्शनतर्फे २ डिसेंबर रोजी सचिन उत्तेकर लिखित व भगवान देवर दिग्दर्शित 'बायको पहावी सांभाळून', दीपक मंडळाच्या सांस्कृतिक विभागातर्फे ३ डिसेंबर रोजी दिग्पाल लांजेकर लिखित व गिरिश जुन्नरे दिग्दर्शित 'हू इज डेड', बाबाज थिएटरतर्फे ४ डिसेंबर रोजी लक्ष्मीकांत देशमुख लिखित व राजेश जांभळे दिग्दर्शित 'अखेरची रात्र' आणि आकाश शैक्षणिक व सामाजिक संस्था प्रस्तुत, ५ डिसेंबर रोजी जयवंत दळवी लिखित व प्रदीप देवरे दिग्दर्शित 'पुरूष' नाटक सादर होणार आहे. या हौशी नाट्य स्पर्धेसाठी अधिकाधिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सांस्कृतिक संचलनालयाच्या संचालकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस चौकीतच तरुणाला भोसकले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पूर्वी झालेले भांडण पोलिसांसमोर मिटवण्याचे काम सुरू असताना एका युवकाला चाकूने भोसकण्याचा प्रकार शहरात घडला. बुधवारी मध्यरात्री पोलिस चौकीतच घडलेल्या या थरारक घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चेतन गायकवाड या तरुणाच्या बहिणीची सागर गरड या पंचवटी भागातच राहणाऱ्या युवकाने छेड काढली होती. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या चेतनला सागरसह त्याचा साथीदार दिगंबर धुमाळने मारहाण केली. याबाबत पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये किरकोळ गुन्हा नोंदवण्यात आला. सदर गुन्ह्यात तडजोड करण्यात यावी, म्हणून दोन गटात चर्चा सुरू होती. त्यासाठी काट्या मारूती पोलिस चौकीत दोन्ही बाजुचे आठ-दहा लोक जमा झाले होते.

यावेळी गुन्हा मिटवताना दोन्ही बाजूने शिवीगाळ होऊन सागर गरड या संशयिताने चेतन गायकवाडचा मामा सोमेश्वर उर्फ जीतु शामराव साबळे (२९) यास चाकूने भोसकले. भर पोलिस चौकीत घडलेल्या प्रकारामुळे संशयितांसह उपस्थित पोलिसांनीही पलायन केल्याची चर्चा आहे. जीतूला सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सागर गरडसह, विकी शिंदे, दिगंबर धुमाळ, भारत गरड आणि गणेश शिंदे यांच्याविरोधात हल्ला करणे, शिवीगाळ करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.



चौकी नव्हे चौकातली घटना!

टोळीयुद्ध, खून, दरोडे, लुटमार यासारख्या घटनांमुळं सर्वसामान्यांच्या दारात येऊन पोहचलेली गुन्हेगारी आता थेट पोलिसांच्या अंगणात पोहचली असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे पोलिस चौकीत सांडलेल्या रक्ताचे व धावपळीचे व्हिडिओ फिर्यादीकडे उपलब्ध असताना, हा प्रकार काट्या मारूती पोलिस चौकीत नव्हे तर चौकात झाला, असा दावा पोलिस अधिकाऱ्यांकडून करण्यात येतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तेत ऐकत नाही म्हणून अधिकाऱ्यांवर राग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील सत्तेत शिवसेनेचे ऐकले जात नाही म्हणून शिवसेनेची लाचारी वाढली आहे. याच लाचारीतून शिवसेनेचे खासदार आमदार आता अधिकाऱ्यांवर राग काढत असल्याची ट‌ीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. निलंबित पोलिस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणात वाळू माफिया सागर चौधरी बरोबर थेट महसुल मंत्रांचे नाव येत असल्याने या प्रकरणाची सीआयडी नको तर सीबीआय चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी औरंगाबादचे खासदार चंद्रकात खैरे यांच्याकडून अधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला.या अधिकाऱ्यांनी थेट फौजदारी कारवाई करावी, असे सांगून सेना दंडेल शाही, मनमानी करते आहे. शिवसेना पक्ष लाचार झाला असून, सत्तेत राहून त्यांचे कोणी एकत नाही म्हणून अधिकाऱ्यांवर राग काढत असल्याचा टोला त्यांनी लगावला. सादरे प्रकरणाची सीआयडी नको तर, सीबीआय चौकशी झाली पाहिजे. थेट एकनाथ खडसेंचा या प्रकरणात सहभाग उघड होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. नाशिकसह राज्याची कायदा सुरक्षा व्यवस्था बिघडली असून, मुख्यमंत्री राज्याला स्वतंत्र गृहमंत्री का देत नाही, म्हणजेच त्यांना आपल्या स्वता:च्याच मंत्र्यांवर विश्वास नाही असा टोलाही लावला.

पुण्यातील नेते दुटप्पी

उजनी धरणासाठी पुण्यातील धरणामधून पाणी सोडण्याला पुण्याचे नेते आता विरोध करत आहेत. मात्र हेच नेते नाशिक व नगरमधून जायकवाडीला पाणी सोडा असे सांगत होते. त्यामुळे हे दुटप्पीपणे वागत असून, जायकवाडीला पाणी सोडा असे म्हणणाऱ्यानी आता उजनी धरणातून पाणी सोडण्यास विरोध का करता, असा प्रश्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारलाय. स्वतःवर आल्यावर नेते दुटप्पी भूमिका घेतात अशी टीकाही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images