Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

दसऱ्याच्या दिवशी चोरट्यांची चांदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दसऱ्याच्या दिवशी झेंडूची फुले विकत घेणाऱ्या फिर्यादीच्या खिशातील २० हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरट्यांनी हातोहात लंपास केला. ही घटना सकाळी १० ते सव्वादहा वाजेच्या सुमारास रविवार कारंजा येथे घडली. नाशिकरोड परिसरातील बिटको पॉईंट येथील बँक ऑफ बडोद्यासमोरील फुलांच्या दुकानासमोर चोरट्याने एका व्यक्तीच्या खिशातील आठ हजार रुपये किमतीचा मोबाइल लांबवला. त्यापूर्वी झेंडू फुलांची खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यावसायिकांना चोरट्यांनी हिसका दाखवला.

विवाहितेचा विनयभंग

उपनगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेचा विनयभंग करणाऱ्या युवकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास संशयिताने संबंधित महिलेला नारायणबापूनगर, टाकळीरोड येथे अडवले. दुचाकीवरून जाणाऱ्या विवाहितेला थांबवून सदर आरोपीने तिचा हात पकडला. हा प्रकार महिलेने आपल्या पतीस सांगितल्यानंतर आरोपीला बोलावून दोघांनी त्यास जाब विचारला. यावर आरोपीने फिर्यादी महिलेच्या पतीस शिवीगाळ करीत दमदाटी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिन्नर सेझमध्ये गुंतवणूक श्रीगणेशा

$
0
0

नाशिक : सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथील इंडिया बुल्स आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये गुंतवणुकीचा ओढा सुरू झाला आहे. दोन कंपन्यांनी या ठिकाणी गुंतवणूक करून प्रकल्प सुरू करण्याचे निश्चित केले असून, येत्या काळात इतरही कंपन्या येथे आकृष्ट होतील.

गुरगाव येथील आयबी टेक्नॉलॉजी या आयटी कंपनीने सिन्नर सेझमध्ये येण्याचे निश्चित केले आहे. या कंपनीच्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यामध्ये ५० ते १०० जणांना रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे. आयटीशी संबंधित सॉफ्टवेअर आणि इतर बाबींची निर्यात या प्रकल्पातून केली जाणार आहे. आयबी टेक्नॉलॉजी या कंपनीचे ३७ देशांत विविध प्रकारचे ग्राहक (क्लायंट) असून कंपनीची उलाढाल २५० कोटी आहे.

जपानची कंपनी असलेल्या कोसो ग्रुपनेही सिन्नर सेझमध्ये गुंतवणुकीची घोषणा केली आहे. कंपनीचे महाराष्ट्रात ३, तर भारतात ६ ठिकाणी उत्पादन प्रकल्प आहेत. सिन्नर सेझमधील प्रकल्पामुळे कंपनीचा महाराष्ट्रातील चौथा तर भारतातील सातवा प्रकल्प कार्यन्वित होणार आहे. कोसो ग्रुपचे अध्यक्ष युईची इकेगाया व भारतातील व्यवस्थापकीय संचालक गौरव गुप्ता यांनी गुंतवणुकीसाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने वॉल्व निर्मितीशी संबंधित छोटे उद्योगांनाही नाशिकमध्ये चालना मिळेल, असा विश्वास नाशिक प्लॅण्टचे संचालक उन्मेश वानखेडे यांनी व्यक्त केला आहे.

उद्योगांना प्लॉटचे वाटप

इंडिया बुल्स आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथे बहुउत्पादक (मल्टी प्रॉडक्ट) विशेष आर्थिक क्षेत्राचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ३८२ एकरांवरील जवळपास ४५० प्लॉट उद्योगांना देण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जाती म्हणजे ज्ञानाचे भांडार’

$
0
0

नाशिक : जातीभेद निर्मूलनासाठी सामाजिक चळवळी उभ्या राहिल्या. सामाजिक समता स्थापने हा चळवळींचा प्रयत्न राहिला. परंतु, प्रत्येक जात हे ज्ञानाचे भांडार आहे. शेकडो वर्षांपासून त्यांनी आपापल्या कामात वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासला आहे. या जाती आणि त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे भारतीय संस्कृती समृध्द झाली, असे प्रतिपादन गिरीश प्रभुणे यांनी शनिवारी केले.

ज्योती स्टोअर्सच्या वतीने कूर्तकोटी सभागृहात आयोजित लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमात ते बोलत होते. वंचित समाज आणि भारतीय संस्कृती या विषयावर प्रभुणे म्हणाले, वंचित समाज म्हणजे मागासलेला असा साधारण समज आहे. अशा लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने आम्ही कामाला सुरूवात केली परंतु आपणच किती अज्ञानी आहोत, कितीतरी गोष्टींची आपल्यालाच माहिती नसल्याची जाणीव छोट्या अनुभवांमधून होत गेली. जाती म्हणजे ज्ञाती असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फोनिक्स’ घोटाळा कोटीच्या घरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वस्त किमतीत भूखंड मिळणार असे सांगत गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या फोनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल प्रा. लिमिटेड या कंपनीच्या घोटाळ्याची व्याप्ती एक कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. तक्रारदारांची संख्या सुध्दा वाढत असून, यात गोविंदनगर आणि नाईकवाडी परिसरातील सर्वांत जास्त गुंतवणूकदार आढळले आहेत. याबाबत अंबड पोलिस तपास करीत असून, फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

फोनिक्स इन्फ्रा इस्टेट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे गोविंदनगर येथील चंद्रकिरण पार्कमध्ये कार्यालय आहे. सिन्नरमधील देवपूर, उजनी तसेच त्र्यंबकेश्वरमधील नाईकवाडी, ठाण्यातील मुरबाड, नागपूर येथील सीताबर्डीसह इंदूर येथे कंपनीचे भूखंड असून, ग्राहक ते स्वस्तात आणि हफ्त्याने खरेदी करू शकतात, असे आमिष कंपनीतर्फे दाखवण्यात आले. शहरातील अनेक गुंतवणूकदारांनी स्वस्तात जमीन मिळण्याच्या अपेक्षेने लाखो रुपयांची गुंतवणूक केली.

प्रत्यक्षात मात्र पैसे लाटणाऱ्या कंपनीकडून पुढे काहीच हालचाल झाली नाही. यामुळे काही तक्रारदारांनी पोलिसांकडे तक्रार अर्जही दिले होते. मात्र, कंपनीशी संबंधित लोक गुंतवणूकदारांना भूखंड ‌दिले जातील, अशी हमी दिल्याने प्रत्यक्ष दाखल झाली नाही. यादरम्यान काही तक्रारदारांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशानुसार १३ ऑक्टोबररोजी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. कंपनीकडून फसवणूक झालेल्या तक्रारदारांचा ओघ अद्याप कमी झाला नसून, फक्त अंबड पोलिसांकडेच जवळपास १५० तक्रारदार आले आहेत. सुरुवातीस ४२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पुढे आली होती. आता हा आकडा एक कोटी रुपयांच्या घरात पोहचला असल्याचे तपास अधिकारी पीएसआय विशाल मुळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळींचे तपासणीसत्र थंडावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डाळीच्या व्यापाऱ्यांकडून साठेबाजी तसेच काळाबाजार होण्याची शक्यता असताना जिल्हा पुरवठा विभागाने बुधवापासून सुरू केलेले तपासणी सत्र शनिवारी लगेचच थंडावले. आतापर्यंत ९९ दुकानांमध्ये तपासणी करण्यात आली असून, साठेबाजी अथवा काळाबाजारासारखे आक्षेपार्ह प्रकार आढळले नसल्याची माहिती पुरवठा विभागातील सूत्रांनी दिली आहे. तपासणीसाठी शहरात स्वतंत्र पथक स्थापण्यात आले असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागातही तहसीलदारांच्या पथकामार्फत तपासणी सुरू आहे. मात्र, आतापर्यंत तेथे आक्षेपार्ह काहीच आढळून आलेले नाही. अनेक दुकानदारांनी अन्नधान्य विक्री परवान्यांचे नूतनीकरण केलेले नाही. अशा विक्रेत्यांनी परवान्यांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-नगरची राजकीय मोट!

$
0
0

मतभेद विसरून कृती समिती स्थापन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

धरणातील पाण्यावरून आपसात भांडणाऱ्या नाशिक व अहमदनगरमधील लोकप्रतिनिधींनी जायकवाडीला सोडण्यात येणाऱ्या पाण्याविरोधात आता एकत्रितपणे मोर्चेबांधणी केली आहे. जायकवाडीला पाणी सोडण्याच्या मुद्द्यावर आपसातील मतभेद व पक्षभेद विसरून दोन्ही जिल्ह्यातील आमदारांनी एकत्रित मोट बांधत लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर व नाशिकच्या आमदारांची कृती समिती स्थापन झाली असून, निफाडचे शिवसेना आमदार अनिल कदम यांच्याकडे समितीचे निमंत्रक पद देण्यात आले आहे.

सोमवारच्या न्यायालयीन निर्णयानंतर दोन्ही जिल्ह्याच्या आमदारांची एकत्रित बैठक होऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याने सरकारच्या अडचणीत भरच पडणार आहे. शनिवारी नाशिकमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्महाऊसवर दोन्ही जिल्ह्यातील निवडक नेत्यांची बैठक झाली. माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार अनिल कदम, आमदार जयंत जाधव, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमीत बग्गा, अॅड.रवींद्र पगार यांचा समावेश होता. प्रसंगी रस्त्यावरचे आंदोलन तीव्र करून सरकारला या निर्णयापासून परावृत्त करण्याचा विडा कृति समितीने उचलला आहे.

दारणाचे आवर्तन लांबणीवर

इगतपुरी तालुक्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांचा विरोध झाल्याने दारणा धरणातून कोपरगाव-राहता-शिर्डी या भागासाठी शनिवारी सकाळी सोडण्यात येणारे बिगरसिंचन पाण्याचे आवर्तन ऐनवेळी रद्द करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये आवर्तनाचे नियोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांची सकाळपासूनच धरणावर गर्दी होत असल्याचे पाहून पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिंदे व शाखा अभियंता मिसाळ यांनी पाण्याचे आवर्तन रद्द केले. दारणा धरणातून २४ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत सुमारे ९०० दलघफू इतके पाणी सोडण्यात येणार होते. या आवर्तनाची माहिती मिळताच राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांनी धरणावर धाव घेतली. पाणी सोडण्यास विरोध दर्शविण्यासाठी २८ तारखेला आमदार निर्मला गावित व सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

भुजबळ फार्मच आंदोलनाचे केंद्र

जायकवाडीच्या पाण्याविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व हे सत्ताधारी शिवसेनेचे आमदार कदम करणार असले तरी त्याची सर्व सूत्रे भुजबळ फार्महाऊसवरूनच हलविली जाणार आहेत. सर्व पक्षाच्या आमदारांना एकत्रित आणून नगर-नाशिकचा दबावगट तयार करायचा आणि सरकारला या निर्णयापासून परावृत्त करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. त्यासाठी छगन भुजबळ यांचा अनुभव व मार्गदर्शन कामी येणार आहे. राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचा दबदबा आहे. राजकीय दबावात ते पश्चिम महाराष्ट्रालाही मागे टाकतात. त्यामुळे त्यात नाशिकचाही समावेश करून सरकार विरोधात मोठी ताकद उभी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात दुधाच्या मागणी अन् दरातही वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. कोजागिरी निमित्त दुधाच्या मागणीत वाढ झाली असून, रविवारीच ग्राहकांनी दुधाची मागणी नोंदवण्यास सुरुवात केली.
दुधाच्या मागणीमुळे रविवारी सकाळी ५० रुपये असलेला भाव संध्याकाळी ६० रुपयांवर आला होता. सोमवारी सकाळी मागणी व पुरवठ्यानुसार भाव ठरतील असे दूध विक्रेत्यांचे म्हणणे आहे. कोजागरी पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये चंद्राला नैवेद्य दाखवून भाविकांना दुधाचे वाटप करण्यात येणार असून, काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून दुधाचे वाटप केले जाणार आहे.

कोजागरीनिमित्त दूध प्राशन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे रविवारी दूधबाजारात दुधाला चांगला भाव होता. सकाळी ५० रुपये असलेले म्हशीचे दूध संध्याकाळी ६० रुपये लिटरप्रमाणे ग्राहकांना खरेदी करावे लागले. कोजागरीच्या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू दिल्यानंतर ते दूध प्राशन केले जाते. काही सोसायट्यांमध्ये उत्तररात्रीपर्यंत जागरण करण्यात येणार आहे तर, काही ठिकाणी मुलींनी संध्याकळच्या वेळी भोंडला आयोजित केला आहे. उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन 'को जागर्ति' म्हणजे 'कोण जागत आहे' असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात. त्याच प्रमाणे या दिवशी गरबा व दांडिया खेळण्याची परंपरा आहे. त्यामुळे पंचवटीतील अनेक सोसायट्यांमध्ये गरबाचे आयोजन केले आहे.

अशोकस्तंभावरच्या नवीन तांबट गल्लीतील कालिका देवी मंदिरात गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यानंतर दुग्धपान होणार आहे त्याचप्रमाणे गाडगीळ गल्लीतील रेणुका देवी मंदिरात देखील नवरात्रीनिमित्त दुग्धपानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बंगाली बांधवांकडूनही कोजागिरी पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत असून, बंगाली लोक कोजागिरी पौर्णिमेच्या पुजेला लोख्खी पुजो म्हणतात व या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. शहरातील बंगाली बांधवांतर्फे या पूजेचे आयोजन केले आहे. तसेच यादिवशी घरातील ज्येष्ठ व्यक्तीला ओवाळण्याची प्रथा आहे.

या दिवशी कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्विनी साजरी करण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे अनेक घरामधून मुलामुलींना ओवाळण्यात येणार आहे. त्यासाठी देण्यात येणाऱ्या भेचटवस्तूंचे देखील नियोजन करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे मागणीत वाढ आहे. प्रथम वार्षिक खरेदीदारांना प्राधान्य दिले जाणार असून, त्यांनतर दुधाचे भाव ठरणार आहेत. तरी सुध्दा भाव जास्तच असतील.

- गुलजार कोकणी, दूध व्यावसायिक

काही लोकांनी रविवारपासूनच मागणी नोंदविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ७० ते ७५ रुपये भाव असण्याची शक्यता आहे.

- महेश कल्याणकर, दूध व्यावसायिक

कोजागीरी पौर्णिमेच्या दिवशी भाव कितीही असले तरी दूध घ्यावेच लागणार आहे. त्यामुळे आमच्या मंडळाने अगोदरच मागणी नोंदवली आहे. यामुळे त्यांना आधी प्राधान्य द्यावे लागणार आहे.

- जितेंद्र बोरसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉट वाटप संशयाच्या भोवऱ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यामध्ये एकीकडे नव्या उद्योगांच्या स्थापना व विस्तारासाठी जागेची बोंब असताना दुसरीकडे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सिन्नर तालुक्यातील एमआयडीसी परिसरात उद्योगांसाठी होणारी प्लॉट वाटप प्रक्रिया पारदर्शी नसल्याबाबत भाजप उद्योग आघाडीच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे. या प्लॉट वाटपांसंदर्भात आज (दि.२५) आयोजित केलेल्या मुलाखती नियमबाह्य असल्याने त्या रद्द करण्यात याव्यात, अशी मागणीही आघाडीने केली आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सिन्नर तालुक्यात माळेगाव एमआयडीसीच्या तब्बल ४३ हजार ३७४ चौरस मीटर एवढ्या भूखंडावर सुमारे ९५ प्लॉट्सची निर्मिती करण्यात आली आहे. या प्लॉट वाटपासाठी आज (दि. २६) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात कुठलीही जाहीरात मागविण्यात न आल्याने अनेक इच्छुक उद्योजकांना यातून डावलण्यात आल्याचा आरोपही उद्योग आघाडीने केला आहे. सदरच्या प्लॉट वाटपासाठी खादी ग्रामोद्योगने गेल्या पाच ते सहा वर्षांच्या कालावधीत या पध्दतीने कुठलीही जाहिरात दिली नसल्याने ही प्रक्रियाच बेकायदेशीर ठरते, असा आक्षेप उद्योग आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप पेशकार यांनी घेतला आहे. महामंडळाच्या वेबसाईटवर मात्र ही वसाहत दहा लाख रुपयांच्या मर्यादेमुळे विकसितच झाली नसल्याचा शेराही दिसत आहे. एकेका कुटुंबातील अनेक सदस्यांच्या घशात हे प्लॉट घातले जात असल्याने ही प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. परिणामी या संदर्भात भविष्यात गैरव्यवहाराची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. नियमांनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सिन्नर तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी वसाहतीमध्ये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सुरू असणारी प्लॉट वाटपाची प्रक्रियाच संशयास्पद आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने राबविण्यात यावी. प्लॉट वाटपासाठी अर्ज मागविताना कुठलीही जाहिरात गत सहा वर्षांत प्रसिध्द करण्यात आलेली नाही.

- प्रदीप पेशकार, प्रदेश सरचिटणीस, भाजप उद्योग आघाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाणीवाटपाचा आज फैसला?

$
0
0

हायकोर्टाच्या निकालाकडे मराठवाड्यासह नगर-ना‌शिककरांचे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मराठवाड्यातील जायकवाडी धरणाला नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडले जाणार की नाही याबाबतचा निर्णय आज (दि. २६) होणार असल्याने याचिकाकर्त्यांसह सर्वांचेच हायकोर्टाच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. पाणी सोडण्याच्या निर्णयाला कोर्ट स्थगिती देणार की मराठवाड्याच्या बाजूने निकाल लागणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

मराठवाड्यात पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुभिक्ष्य असल्याने नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणाला पाणी सोडावे, असा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत घेतला. मात्र, या निर्णयाला आव्हान देत विखे-पाटील सहकारी साखर कारखाना, बी. डी. घुमरे यांच्यासह सही ते सात याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. मराठवाड्याला पाणी दिल्यास नगर आणि नाशिकमध्ये कशी बिकट परिस्थिती ओढावेल हे पटवून देण्याचा प्रयत्न याचिकाकर्त्यांच्या व‌किलांनी केला. तर, मराठवाड्यासाठी पाणी सोडणे किती आवश्यक आहे हे पटवून देण्याचा युक्तीवाद मराठवाड्याची बाजू मांडणाऱ्या वकिलांकडून करण्यात आला. सोमवारीही या मुद्द्यांवर युक्तीवाद होणार आहे. गेल्यावर्षी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पाणी वाटपासंदर्भात दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी योग्य पध्दतीने झाली होती का, हे स्पष्ट करा असे आदेश कोर्टाने दिले आहेत. जायकवाडीत सोडल्या जाणाऱ्या पाणीवाटप पडताळणीबाबत हायकोर्टाने राज्य सरकारकडे खुलासा मागितल्याने नगर आणि नाशिककरांना हायसे वाटले आहे.

पंधरा ऑक्टोबरपर्यंत धरणांमध्ये असलेल्या पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणीवाटपाचा निर्णय घेण्याचे आदेश कोर्टाने यापूर्वी दिले होते. पाणी सोडताना पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगांसाठी असा त्याचा प्राधान्यक्रमही ठरविण्यात आला. पाणीवाटपाची टक्केवारी योग्य की अयोग्य याची पडताळणी राज्य जलस्रोत नियंत्रण प्राधिकरणाकडून करणे आवश्यक आहे. २६ ऑक्टोबरच्या सुनावणीमध्ये त्याबाबत खुलासा करावा, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. हायकोर्टात दाखल असलेल्या नऊपैकी तीन याचिकांवर शुक्रवारी युक्तीवाद झाला. उर्वरित याचिकांवर आज (दि. २६) युक्तीवाद होण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणाविषयी न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आंदोलनासाठी तयार रहा!

गंगापूर धरणामधून जायकवाडीसाठी पाणी सोडणे नाशिककरांवर अन्यायकारक असल्याचे महापौर अशोक मुर्तडक यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे नाशिककरांचीही पिण्याच्या पाण्यासाठी तगमग होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. हे पाणी पूर्णत: नाशिककरांसाठीच आरक्षित असावे याकरिता हायकोर्टात खटला सुरू असून, त्यामध्ये आम्हाला वादी करून घ्यावे, असा अर्ज करण्यात आला आहे. हा निर्णय विरोधात गेला तर नाशिककरांना आठ दिवसांनी पाणी सोडणेही शक्य होणार नाही, असे प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. म्हणूनच नाशिककर जनतेने जन आंदोलनासाठी तयार राहावे, ‍असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रश्नावर लढा देण्यासाठी सर्वपक्षीय समिती नेमण्यात येत असून, त्यामध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला पेड दर्शनातून साडेआठ लाखांची कमाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नवरात्र उत्सवानंतर येथे भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. दर्शनासाठी रांगा लागत असून, देणगी दर्शनासाठी देखील मोठी रांग लागली होती. शनिवारी एकाच दिवसात प्रति भाविक दोनशे रुपये अशा देणगी दर्शनातून तब्बल साडेआड लाख रुपयांची देवस्थान संस्थानला कमाई झाल्याचे समजते. किमान पाच हजार भाविकांनी या रांगेतून दर्शन घेतल्याचे सांगण्यात आले.

पूर्व दरवाजा दर्शन रांगेत देखील चांगली गर्दी आहे. येथे देवस्थान संस्थान ट्रस्टने पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध केली आहे. याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले. शहरात गर्दी वाढली आहे. याचा फायदा स्थानिक व्यवसायिकांना मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सुयोग्य नियोजनाअभावी मंदीचा फटका बसत आहे. सिंहस्थापूर्वी अतिक्रमण काढणे, रस्ते तयार करणे आदी कारणांनी व्यावसायिकांना झळ बसली. त्यानंतर गर्दीच्या नियोजनात व्यवसाय पूर्णपणे थंडावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक देवस्थान ट्रस्टचा कारभार सुधारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत शिवसैनिकांनी देवस्थान कार्यालयावर धडक देत असंतोष व्यक्त केला. अनेक दिवसांपासून नागरिकांच्या मनात खदखदत असलेल्या असंतोषाला वाट देण्यासाठी शिवसेना आणि युवासेनेच्या सैनिकांनी ट्रस्टच्या अध्यक्षांच्या कानावर हे घालण्यासाठी कार्यालयावर धडक मारली. परंतु, अध्यक्ष हजर नसल्याने विश्वस्त सदस्यांना आपले ग्राऱ्हाणे ठणकावून सांगत सुधारणा करा, अन्यथा आंदोलनाला सामोरे जा असे बजावले.

त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना व्यवस्थापनाकडून अरेरावीची वागणूक मिळते. प्रसंगी माराहाण देखील होते. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांना देवदर्शनासाठी वेळेचे बंधन घातले जाते. कार्यालयात अधिकारी अथवा कर्मचारी शिपाई नेमताना स्थानिकांना प्राधान्य दिलेले नाही. भाविकांच्या दानातून मिळालेल्या पैशांची सुविधांच्या नावाखाली उधळपट्टी होत आहे. यासारखे स्थानिक प्रश्न घेऊन शिवसैनिक देवस्थान कार्यालयात गेले होते. येथे विश्वस्त स्वातंत्र्य सैनिक यादवराव तुंगार, अॅड. श्रीकांत गायधनी आणि सचिन पाचोरकर यांच्यासमोर ठिय्या देत प्रदीर्घ चर्चा केली. बेरोजगार स्थानिकांना नोकरीत प्राधान्य द्या, या मागणीवर जोर देण्यात आला. तसेच, स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी वेळेचे आणि दरवाजांच्या नियमांचे बंधन ठेवून वेठीस धरू नका, अशी मागणी करण्यात आली.

बाहेरगावहून आलेल्या भाविकांना मारहाण करता कामा नये, मारहाण झाल्यास व्यवस्थापन अधिकाऱ्यावर भाविकांच्या वतीने आम्ही स्वतः गुन्हे दाखल करणार असल्याचे शिवसैनिकांनी बजावले. दरवाजावर स्थानिक शिपाई नेमल्यास स्थानिक भाविकांची ओळख परेड घ्यावी लागणार नाही, अशी सूचना करण्यात आली. उत्तर म्हणजेच प्रमुख दरवाजाला बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आले आहे. येथे शेकडो वर्षांपासून असलेल्या फूल विक्रेत्यांना बेरोजगार करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप याप्रसंगी विश्वस्तांवर करण्यात आला.

याबाबत त्वरित सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. या प्रसंगी शहरप्रमुख नितीन पवार, संपर्कप्रमुख भूषण अडसरे, विशाल जोशी, सचिन दीक्षित, जेष्ठ शिवसैनिक मंगेश धारणे, महेंद्र बागडे, दीपक लोखंडे, माजी नगराध्यक्ष संजय कदम, नंदू कदम, मनोज काळे, गणपत कोकणे, संजय हरळे, युवा सेनाप्रमुख कल्पेश कदम, सतीश कदम, नीलेश मोरे आदी उपस्थित होते. विश्वस्त मंडळाला चेअरमन यांच्या नावे निवेदन देण्यात आले.

सिंहस्थाच्या पूर्वीपासून येथे दर्शनाबाबत झालेल्या नियोजनाबाबत नाराजी व्यक्त होत आहे. फूल, प्रसाद व्रिकेत्यांसह व्यावसायिक विस्थापित झाले आहेत. त्र्यंबक शहरात भाविक, पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसायास वाव असताना बेरोजगारी वाढली आहे. यातूनच असंतोष खदखदत आहे. शिवसेनेने यास तोंड फोडले. अशाच प्रकारे शहरात अतिक्रमणाबाबत नागरिक संभ्रमावस्थेत आहेत.

शिवसेनेने केलेल्या मागण्या ट्रस्ट मंडळाच्या बैठकीत चेअरमन यांच्यासमोर ठेवल्या जातील. ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे देवदर्शनासाठी अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जाईल. योग्य त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विश्वस्त मंडळाचा सदस्य म्हणून पाठपुरावा केला जाईल.

- अॅड. श्रीकांत गायधनी, देवस्थान विश्वस्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच तोळे सोने चोरीस

$
0
0

सटाणा : तालुक्यातील डांगसौंदाणे येथील महाराष्ट्र बँकेशेजारील निवासस्थानाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने व दोन हजार सातशे रुपये चोरून पोबारा केला. कंधाणे येथील प्राथमिक शिक्षक राजाराम जगन्नाथ सोनवणे हे गत दोन दिवसांपासून कुटुंबीयांसह सटाणा येथे वास्तव्यास होते. त्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला.

विद्यार्थ्याचा मृत्यू

मयूर प्रकाश महाले हा विद्यार्थी आपल्या शेतात झोका खेळत असताना दोरखंडाचा फास गळ्यास लागल्याने मृत्युमुखी पडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रीपूरवडे येथील आश्रमशाळेत इयत्ता पाचवीत असलेला मयूर हा दसऱ्यानिमित्तीने घरी आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याअभावी रब्बीच्या आशाही धूसर

$
0
0

म. टा. वृतसेवा, येवला

येवला तालुक्याला यंदाच्या पावसाळ्यात निसर्गाने वाकुल्या दाखवल्याने खरिपाचा खेळ खल्लास झाला. उशिराच्या पावसाने कुठे कुठे थोडेफार खरिपाच पीक निघाले खरे, मात्र आता रब्बीच्या आशा देखील धूसर झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे संकटाची मालिका आ वासून उभी आहे. तालुक्यातील ज्या विहिरीत थोडेफार पाणी आहे, त्यावर तेथील शेतकऱ्यांनी रब्बीचा जुगार खेळला आहे.

गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात वरुणराजाने मोठी दडी मारल्याने आणि नको त्यावेळी पाठ फिरवल्याने येवला तालुक्यातील खरीप व रब्बी या दोन्ही हंगामाचं संपूर्ण शेतीचक्र कोलमडून गेलं. यंदाच्या पावसाळ्यात तर तालुक्यात सरासरी इतकाही पाऊस झाला नाही. परिणामी खरीप हंगाम जवळपास गेला. सुरुवातीचे जवळपास अगदी कोरडे गेलेले तीन महिने यातून खरीप बहरलाच नाही.

पावसाळ्यातील शेवटच्या अर्थातच सप्टेंबरच्या मध्यास दमदार पाऊस झाला खरा. मात्र, तोवर वेळ निघून गेली होती. सप्टेंबर महिन्याच्या मध्यास झालेल्या पावसाने विहिरीत जेथे कुठे थोडेफार पाणी आहे, अशांनी यंदाच्या रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या करण्यास सुरुवात केली खरी, मात्र हा एक जुगारच समजला जात आहे. यंदाच्या रब्बी हंगामात जेथे कुठे पाणी आहे अशा ठिकाणच्या ज्वारीच्या तालुक्यात पेरण्या झाल्या आहेत. जास्त पाणी लागणारा गहू यंदा कसा घ्यावा याची तालुक्यातील शेतकऱ्यांना चिंता भेडसावत आहे. यावर्षी तालुक्यातील गव्हाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे.

पावसाळा आता संपल्याने व परतीच्या अथवा अवेळीच्या पावसाचा देखील मागमूस दिसत नसल्याने यंदाचा रब्बी हंगाम धोक्यात दिसत आहे. तालुक्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रब्बीतील हरभरा पेरणीला हात घातला असला तरी तोही अगदी तुरळक दिसत आहे. तालुक्यात ज्या भागात दांडग्या जमिनी आहेत, अर्थातच ज्या जमिनीत काही प्रमाणात का होईना ओलावा आहे, अशा ठिकाणचे शेतकरीच हरभरा पिकाला हात घालतांना दिसत आहेत.

कांदा लागवडीचा जुगार

नगदी पीक समजला जाणारा कांदा हे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक. यंदाच्या खरीप हंगामात पावसाअभावी तालुक्यात कांदा पिकाचे उत्पादन घटले. सध्या गेल्या काही महिन्यात बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळणारा बरा बाजारभाव बघता तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात देखील कांद्याचा जुगार खेळण्याचे ठरविल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील ज्या भागात आज विहिरींना पाण्याचा काहीसा स्रोत आहे, अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील रांगडा लाल व उन्हाळ कांद्याची रोपे टाकली आहेत. काहींनी मोठा खर्च करून रोपे आणतांना त्याची लागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या तालुक्यातील अगदी काही भागातील शेतकऱ्यांना रब्बीमधील रोटेशनच्या आशा आहेत. मात्र, धरण क्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा बघता रोटेशनची शाश्वती अगदी कमी दिसत असल्याने रब्बीवरील संकटाची टांगती तलवार कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाकूचा धाक दाखवून भंगाराचा ट्रक पळवला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

ट्रकचालकास चाकूचा धाक दाखवून सहा लाखाच्या आयशर टेम्पोसह एक लाखाचे भंगार घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. घोटीजवळ महामार्गावर ही घटना घडली. या घटनेने वाहनचालकांमध्ये भीती निर्माण झाली असून, महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शनिवारी पहाटे मुंबईहून निघालेल्या आयशर ट्रक (एमएच ०४ - एफयू ८५०७) मध्ये एक लाखाचे लोखंडी पत्रे असलेले भंगार होते. हे भंगार घेऊन हा ट्रक सिन्नर एमआयडीसीकडे जात होता. घोटीजवळ वेताळमाथा परिसरात हा ट्रक येताच महामार्गावर उभ्या असलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हा ट्रक थांबविला. त्यातील एकाने चालकास मारहाण केली. हे अज्ञात लुटारू हिंदी भाषेतून बोलत होते. चालकास ट्रक खाली उतरून देऊन या दोन लुटारू भंगार मालासह ट्रक घेऊन पसार झाले.

ट्रकचालक अली अहमद जुम्मन हुसेन न्हाई (वय ३०) याने या घटनेची घोटी पोलिस स्टेशन येथे फिर्याद देऊन घडलेल्या प्रकारची माहिती दिली. गेल्या महिनाभरात घोटी-सिन्नर महामार्गावर वाहनचालकांना लुटण्याच्या दोन घटना घडल्या. त्या पाठोपाठ आता भंगार मालासह हा ट्रक लुटल्याच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रानडुक्कराने केले शिकारीलाच जखमी

सटाणा : तालुक्यातील रातीर शिवारात रानडुकराची शिकार करताना विहिरीचा अंदाज न आल्याने शिकाऱ्यासह शिकार अर्थात रानडुक्कर विहिरीत पडल्याची घटना घडली. विहिरीत रानडुकराने देवळाने येथील शिकारी बंडू पुरमल माळी यास ठिकठिकाणी चावा घेऊन जखमी केले. माळी हा विहिरीतून जोरजोरात किंचाळल्याने परिसरातील लोकांनी जमून विहिरीतून त्यास बाहेर काढले. रानडुकराने जणू माळी यांच्यावर सूड उगवला, अशी चर्चा ग्रामस्थ करीत होते. मालेगाव येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या हाती सत्ता द्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

केंद्र आणि राज्यातील भाजप मित्रपक्षांच्या सरकारने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केले. घरपोच सिलिंडर देण्याची व्यवस्था केली. दारूच्या किमती वाढवल्या हे अच्छे दिन नाही तर काय? असा सवाल करीत चांदवडच्या जलशुद्धीकरण केंद्रास त्वरित मंजुरी देण्यासह सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध राहू. भाजपच्या हातात एक हाती सत्ता द्या, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी चांदवड येथे केले. यावेळी ना. खडसे यांनी सादरे प्रकरण व शिवसेनेबाबत बोलण्याचे टाळले.

चांदवड नगरपंचायत निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार राहुल आहेर, भाजप जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, बाजार समिती सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, पदाधिकारी भूषण कासलीवाल, मोहन शर्मा, विलास ढोमसे आदी उपस्थित होते. यावेळी ना. खडसे यांनी उपस्थितांशी संवाद साधत चांदवड नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे सर्व सतरा उमेदवार निवडून देण्याचे आवाहन केले. केंद्रात व राज्यात आम्हीची सत्ता आहे मग, चांदवडमध्ये आम्हालाच बहुमताने निवडून द्या. मग बघा कसा विकास होतो, असे सांगत एकनाथ खडसे यांनी भाजपने केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. दलित, मुस्लिम, आदिवासी, अल्पसंख्यांक यांच्यासाठी कॉलेज, वसतिगृहे यासाठी लाखो रुपयांची तरतूद राज्य शासनाने केली आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही खडसे यांनी केले.

शेतकऱ्यांसाठी विमा योजना

राज्यातील आमचे सरकार शेतकरी वर्गाच्या पाठीशी समर्थपणे उभे असून, शेतकऱ्यांसाठी विशेष अशी विमा योजना शासन सुरू करणार आहे. एक कोटी ३८ लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे, अशी घोषणा ना. खडसे यांनी करताच उपस्थितांनी त्यास भरभरून दाद दिली. राज्य शासनातर्फे विविध ठिकाणी असलेल्या मदरशांना संगणक देणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. अल्पसंख्यांकांसाठी कॉलेज, वसतिगृहे यासाठी निधी दिला जाईल, असेही ते म्हणाले.

जलशुद्धीकरण केंद्रास मंजुरी!

आमदार राहुल आहेर यांनी भाषणात उपस्थित केलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या मागणीची दखल घेत भाजपला एकहाती सत्ता द्या, या केंद्रास लगेच मंजुरी मिळेल, असे खडसे यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, डॉ. आहेर, डॉ. कुंभार्डे, भूषण कासलीवाल यांची भाषणे झाली. त्यांनी चांदवड पालिकेची सूत्रे भाजपकडे द्या, असे आवाहन करीत विकासाची चांगली संधी चालून आलीय याची जाणीव ठेवून मतदारांनी भाजपच्या सतरा उमेदवारांना निवडून आणा, असे सांगितले. अशोक भोसले यांनी सूत्रसंचालन केले.

दारूचे दर वाढले म्हणून अच्छे दिन आले आहेत. दारुच्या किमती वाढल्या आहेत आणि हेच आमच्या विरोधकांना आवडलेले नाही. याला आम्ही काय करणार, असे ना. खडसे यांनी म्हणताच एकच हशा पिकला. यावेळी भाजपचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

हा तर प्रसिद्धी स्टंट

पोलिस निरीक्षक सादरे प्रकरणी 'आप'कडून माझ्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या आरोपात तथ्य नाही. एकनाथ खडसे यांचे नाव घेतले की प्रसिद्धी मिळते, म्हणून 'आप' वाले माझे नाव घेत आहेत, असे ना. खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमणामुळे असुरक्षितता वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पंचवटी

शालिमार चौक आणि नेहरू गार्डन परिसरात वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना गैरसोईंचा सामना करावा लागत आहे. या परिसरात अनेक शाळा असून विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सकाळी-सायंकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांसह शाळा व्यवस्थापन, शिक्षक तसेच पालक त्रस्त आहे. त्यामुळे अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली जात आहे.

शालिमार व नेहरू गार्डन परिसरामध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सागरमल मोदी प्राथमिक शाळा, शिशुवृंद सागरमल मोदी आणि मा. रा. सारडा मुलींची माध्यमिक शाळा आहे. बाजूलाच रमाबाई आंबेडकर संस्थेचे मुलींचे बोर्डिंग आहे. मोदी शाळेचे ४ हजार मुले मुली, सारडाच्या ३ हजारहून अधिक मुलींची येथे दररोज ये-जा असते. शेजारील बोर्डिंगमधील विद्यार्थ्यांनाही जीव मुठीत धरूनच बाहेर पडावे लागते. विशेष म्हणजे येथे वाहनधारकांचे वेगावर नियंत्रण राहात नाही. अशा भरधाव वाहनांचा सामना करीतच विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते. दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास आणि शाळा सुटल्यानंतर रस्त्याच्या पलीकडेच उभ्या स्कूल व्हॅन किंवा पालकांपर्यंत पोहोचणेही विद्यार्थ्यांसाठी दिव्य ठरते. बोर्डिंग मधल्या मुलींनाही हातात हात धरूनच रस्ता ओलांडावा लागतो.

शाळा परिसरात मुख्य रस्त्यालगत खाद्यपदार्थांच्या अनेक गाड्या लागतात. शाळेच्या भिंतीला लागूनच अनेक वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे आधीच अरुंद ठरणारा हा रस्ता अधिकच अरुंद ठरतो. त्यामुळे येथील अतिक्रमणे अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहेत. शालिमारकडून रविवार कारंजा आणि मेनरोडकडे जाणारी वाहने, रविवार कारंजाकडून शालीमारकडे येणारी वाहने, वाटेतच व्यावसायिकांच्या दुकानांजवळ वाहने उभी करून बिनदिक्कतपणे फिरणारे लोक या सर्व बेशिस्तपणाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसतो आहे. रस्ता ओलांडण्यासाठी त्यांना सहकार्य करण्याऐवजी वाहन कसे वेगाने पुढे दामटविता येईल याच्याच प्रयत्नात वाहनचालक राहात असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. लोकप्रतिनिधी व महापालिकेने अतिक्रमणे हटवून विद्यार्थी सुरक्षेसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी केली जात आहे.

महापालिकेने अतिक्रमणे हटवायला हवीत. शाळा भरते आणि सुट‌तेवेळी वाहतूक पोलिस असायलाच हवे. पालकांनी शाळा सुटण्याच्या किमान पाच मिनिटे आधी येऊन थांबायला हवे. त्यामुळे पाल्यास अधिक सुरक्षितता लाभते. वाहन चालकांनी वाहने प्रवेशद्वारापासून दूर ठेवावीत.

- राजेंद्र निकम, मुख्याध्यापक

वाहतूक शाखेकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला. परंतु, त्यांच्याकडून सहकार्य मिळाले नाही. शाळा सुटताना आणि भरताना आम्ही शक्य तेवढी दक्षता घेतो. शाळेचे सुरक्षारक्षकही रस्त्यावर थांबतात. परंतु, वाहन चालक त्यांना दाद देत नाहीत.

- लतिका पाटील, मुख्याध्यापिका

पालक-विद्यार्थ्यांच्या अपेक्षा

शाळा भरतांना आणि सुटताना वाहतूक पोलिस असावेत

शाळा परिसरात हातगाडीवाले आणि इतर दुकाने हटवावीत

शाळा परिसरात वाहनपार्किंगचा विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जावी

रिक्षा व इतर वाहनचालकांनी वाहने ओळीत उभी करण्यात यावीत

वाहन शिस्तीमुळे रस्ता ओलांडणे सोपे होईल याची काळजी घ्यावी

प्रवेशद्वारासमोर वाहने उभी केली जाऊ नयेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटी कंपन्या खूप; उत्पादन कुठे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. भारतात मोठ्या संख्येने आयटी कंपन्या आहेत. पण, केवळ सेवा देणे योग्य नाही. अॅपल, व्हॉटसअॅप यासारखे जगावर राज्य गाजवेल असे एकही उत्पादन भारतीय कंपन्यांनी बनविलेले नाही. हे काही चांगले लक्षण नाही, असे प्रतिपादन महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष एस दुर्गाशंकर यांनी केले. द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सच्या नाशिक शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या इंजिनिअर्स अॅवॉर्डच्या समारंभात ते बोलत होते.

गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या या समारंभात व्यासपीठावर नाशिक शाखेचे अध्यक्ष नरेंद्र बिरार, आयोजक समितीचे अध्यक्ष संजय लोंढे, सहसचिव आशिष कटारिया उपस्थित होते. यावेळी दुर्गाशंकर म्हणाले, की तंत्रज्ञान आणि सोशल मीडियामध्ये मोठी ताकद आहे. माणसाच्या जगण्याचे आयाम याने बदलले आहेत. नोकरी मिळण्यासाठीही सोशल मीडिया आणि तंत्रज्ञान कारणीभूत ठरत आहे. इच्छुक उमेदवार हा सोशल मीडियाचा वापर करतो का, त्याच्या आवडी निवडी काय आहेत, सोशल मीडियामध्ये त्याची प्रतिमा कशी आहे, अशा विविध बाबींचा विचार करून एचआर विभाग नोकर भरती करीत आहेत, असे दुर्गाशंकर यांनी सांगितले. आपल्याला संशोधन करण्याची मोठी गरज आहे. सर विश्वेश्वरैय्या यांच्यानंतर जगविख्यात झालेल्या इंजिनिअरचे नाव आपल्याला आठवावे लागते. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यासह अनेक जण बहुराष्ट्रीय कंपन्यांचे नेतृत्व करीत आहेत. अशा प्रकारच्या बौद्धिक संपदेला भारतात पोषक वातावरण तयार करणे गरजेचे आहे. अन्यथा आपण केवळ सेवा देवू आणि वापरू पण या सर्वांवर अधिराज्य बाहेरच्या देशांचेच राहिल, असेही दुर्गाशंकर म्हणाले.

यांना मिळाला पुरस्कार

आउटस्टँडिंग अवॉर्ड : नरेंद्र गोलिया, अध्यक्ष, ऋषभ इन्स्टूमेंट कंपनी

अँचिव्हमेंट अवॉर्ड (महिला) : प्रा. डॉ. नीता देशपांडे, मातोश्री कॉलेज

प्रॉमिससिंग इजिंनिअरिंग अवॉर्ड : स्वप्नील बोरा (संस्थापक, इलुमी सोल्यूशन्स), मयूर मुंद्रा (संचालक, नाशिक मेटल डस्ट), प्रसाद जैन (प्रेम कन्स्टलटंट), प्रा. संतोष संचेती (जैन कॉलेज, चांदवड) पराग देवरे (उपव्यवस्थापक, महिंद्र अॅण्ड महिंद्र)

लेडी इंजिनीअर अॅवॉर्ड : पल्लवी दयाल (सहायक व्यवस्थापक, बॉश लि.), सोनम मेहरोत्रा (वरिष्ठ अभियंता, बॉश लि.), प्रेमलता मिस्त्रा (पार्टनर - अॅडव्हेन्ट इंजिनिअर्स, सिन्नर)

निबंध स्पर्धा विजेते : पल्लवी दयाल (सहायक, व्यवस्थापक बॉश लि.), प्रा. एस. व्ही. जोशी (के. के. वाघ महिला पॉलिटेक्निक), रोहिणी जोशी (सहायक व्यवस्थापक, बॉश लि.)

इंजिनिअरिंग अँचिव्हमेंट अवॉर्ड : प्राचार्य धनंजय बंगाळ (व्ही. एन. नाईक पॉलिटेक्निक), प्रशांत मगर (आयटी सेलप्रमुख नाशिक महापालिका) सहस्त्ररश्मी पुंड (वरिष्ठ व्यवस्थापक, महिंद्र अॅण्ड महिंद्र), समीर जोशी (व्यवस्थापक, बॉश लि.), स्वप्नील देशमुख (प्रकल्प प्रमुख, राज टेक्नॉलाजीस)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुसळधार पावसाने ‘हिट’मध्ये दिलासा

$
0
0

वादळीवाऱ्यासह पावसाची पुन्हा हजेरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह रविवारी दाखल झालेल्या पावसाने सर्वांचीच दाणादाण उडवली असली तरी ऑक्टोबर हिटमध्ये उकडून निघालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा दिला. कळवण, दिंडोरीसह काही ग्रामीण भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी झाडे पडणे, वाड्याच्या ‌भिंती तसेच कमानीचा काही भाग कोसळला. शहरात चार तासांमध्ये ३६ मिलीमीटर पाऊस पडला. कळवणमध्ये १४ तर दिंडोरीत १७ मिमी पावसाची नोंद झाली.

ऑक्टोबरच्या पहिल्या तीन दिवसांत पावसाने शहरातच नव्हे, तर जिल्ह्यात धिंगाणा घातला होता. त्यामध्ये जिल्ह्यात एका माजी सरपंचासह चार जणांनी जीव गमावला. जिल्ह्यात सुरगाणा, नाशिक, निफाड आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये व‌जिा कोसळून एका माजी सरपंचासह चौघांचा मृत्यू झाला होता. सलग दोन दिवस झालेल्या या पावसामुळे धरणांमधील पाणी पातळी वाढविली. मात्र, त्यानंतर पाऊस पुन्हा गायब झाला. रविवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास पावसाने शहरात हजेरी लावली. शहरात रविवारी कमाल ३३.८ आणि कमाल १९.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दुपारी वातावरणात उकाडा असला तरी पाऊस पडेल अशी कोणतीही चिन्हे नव्हती. साडेतीन पावणे चारच्या सुमारास पंचवटी आणि लगतच्या परिसरात पावसाला जोरदार सुरूवात झाली.

जुने नाशिक, सिडको, सातपूरसह शहरातील बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. रविवारची सुटी एन्जॉय करण्याच्या मुडमध्ये असलेल्या पावसाचा मनमुराद आनंद लुटला. कळवण, नांदुरी, सप्तश्रृंगी गड,पिंपळगाव बसवंत, निफाड तालुक्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली.



वीजपुरवठा खंडित; झाडे कोसळली

वादळी वारा आणि विजांचा कडकडाट यामुळे शहरातील बहुतांश भागातील व‌जिपुरवठा खंडीत होता. सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. मखमबलाबाद येथील चिंचबन परिसरात तीन झाडे पडली. ही झाडे हटविण्यासाठी अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. जुना नाशिक येथे एका वाड्याच्या इमारतीचा काही भाग कोसळला. तर महापालिकेने त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पपया नर्सरीजवळ उभारलेल्या प्रवेशद्वाराचाही वरचा भाग कोसळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने उडवली दैना

$
0
0

टीम मटा, नाशिक

ऑक्टोबर हिटच्या शेवटच्या तडाख्यात रविवारी पावसाने शहर परिसरात जोरदार हजेरी लावली. जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि दोन तासापेक्षा अधिक वेळ कोसळलेल्या पावसामुळे नाशिककरांची त्रेधा उडाली. सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारंबळ उडाली.

शहरातील काही भागात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला हळूहळू शहराच्या सर्वच भागात पोहचला. जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटात सुरू झालेल्या पावसाचा जोर हळूहळू वाढतच गेला. वाऱ्याच्या आणि पावसाच्या जोरामुळे शहरातील अनेक भागातील वृक्ष कोसळून पडले. दुपारपर्यंत पावसाची कोणतीही शक्यता नसताना आगमन केलेल्या पावसामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्याची हाल झाली. त्यातच विजेचा खेळखोंडोबा झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान पावसाचा आंनद घेणाऱ्या एका तरुणाने थेट वाहनाच्या बोनेटवर बसून कॉलेजरोडवर प्रवास केला. या तरुणाचा जीव धोक्यात असल्याचे पाहून अनेकाच्या काळजाचा ठेका चुकला. स्वतःचा व दुसऱ्याचा जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या तरुणांनी अर्धा तास सर्कस चालवली.

कामगारांचे हाल

सातपूर : रविवारी दुपारनंतर झालेल्या पावसाने जोरदार हजेरी लावत कामगारांसह महिलांचे हाल केले. ठिकठिकणी मुख्य रस्त्यांवर साचलेल्या पाण्यातून वाहने चालवितांना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. तर पावसात आलेल्या वेगाच्या वाऱ्याने अनेक ठिकाणी वृक्षांच्या फांद्या कोलमडून पडल्या. पावसाळ्यात विजेच्या कडकडासह पाऊस पडला नाही त्यापेक्षा अधिक विजेच्या कडकडाट रविवारी नाशिककरांनी अनुभवला. काही ठिकाणी तर रस्त्यांवर पाणी साचल्याने चारचाकी वाहने देखील अडकून पडली. मात्र, शहरात लगत असलेल्या शेतकऱ्यांनी पाऊस झाल्याने आनंद व्यक्त केला. दरम्यान, विजेच्या कडकडासह सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे महावितरण कंपनीची वीज पुरवठा बंद झाल्याने सांयकाळी अंधारात राहण्याची वेळ सातपूरकरांवर आली.

अफवांचाही पाऊस

जुने नाशिक : शहरातील मेहर सिग्नल, कालिदास कला मंदिर, अशोकस्तंभ, चांडक सर्कल, गणेशवाडी, पंचवटी, द्वारका, काठे गल्ली आदी ठिकाणी झाडे व फांद्या पडल्या. दरम्यान, दिल्ली दरवाजा येथे घराची भिंत कोसळून जिवितहानी झाल्याची अफवा पसरली. व्हॉटसअॅपवर याबाबत चर्चांना उत आला होता. व्हायरल झालेल्या घटनेची माहिती घेण्यासाठी अनेकांनी दिल्ली दरवाजा येथे धाव घेतली; मात्र ती अफवाच ठरली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन युवकांना लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुचाकीवर जाणाऱ्या दोघा युवकांना अडवून त्यांच्याकडील मोबाइल व रोख पैस काढून घेण्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. संशयित आरोपीमध्ये एका रिक्षाचालकाचाही समावेश असून, याबाबत सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सद्गुरूनगरमध्ये राहणारा प्रथमेश आशय राका (वय १८) हा दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मित्रासोबत अनमोल पुस्तकालयाजवळील सागर स्वीट येथून जात असताना एका रिक्षाचालकासह त्याच्या मित्राने त्यांची दुचाकी अडवली. यानंतर दोघाना दमबाजी करीत रिक्षात बसवून हनुमानवाडीतील भावबंधन मंगलकार्यालय परिसरात घेऊन गेले.

याठिकाणी आरोपींनी दोघा युवकांना मारहाणीची धमकी देत दोन मोबाइल व रोख रक्कम असा नऊ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घरफोडी करून २५ हजारांची चोरी

आडगाव परिसरातील महालक्ष्मीनगरमधील साईस्मृती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मधुकर खैरनार यांच्या बंद घराच्या दरवाजाचे लॉक तोडून घरात घुसलेल्या चोरट्यांनी २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. २२ ते २४ ऑक्टोबर या दरम्यान खैरनार बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी संधी साधली. याप्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात गुन्हा

लक्ष्मीनारायण घाटाजवळील मीनानाथ महाराज समाधीचे विद्रुपीकरण करणाऱ्या दोघा अल्पवयीन मुलांवर भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जुने नाशिक परिसरातील दोन अल्पवयीन मुलांनी ​मीनानाथ महाराज समाधी आवारातील धुनीतील लाकडे बाहेर फेकली होती. धार्मिक भावना दुखावल्याने कैलास देशमुख यांनी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images