Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भाविकांचा पूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

नवरात्रोत्सवानिमित्त सातव्या माळेला सप्तशृंग गडावर दिवसभर भाविकांची अलोट गर्दी होऊन सुमारे एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. आदिशक्ती सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवानिमित्त पहिल्या दिवसापासून भाविकांनी दर्शनास गर्दी केली आहे. शनिवार व रविवार या दोन सुटी सलग आल्याने रविवारी विशेष गर्दी होती. मात्र, सोमवारी सप्तमीनिमित्त गडावर सुमारे एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले. तीस हजार भाविकांनी मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला. आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते देवीची महापूजा करण्यात आली. दिवसभरात ट्रस्ट कार्यालयात दहा लाख रुपयांच्या देणग्या स्वीकारण्यात आल्या.

सकाळपासून गर्दीचा ओघ वाढू लागल्याने पहिल्या पायरीपासून बारी लावण्यात आल्या होत्या. सुरक्षेच्या कारणास्तव ठराविक अंतराने मंदिरात प्रवेश दिला जात होता. वाढती गर्दी पाहून गडावर जाणाऱ्या एस.टी. बसेस दुपारी नांदुरी पायथ्यपासून काही कालवधीसाठी बंद करण्यात येऊन गडावरील गर्दी कमी होऊन भाविक नांदुरी पायथ्याशी आल्यांनतर एस. टी. बसेस पुन्हा सुरू करण्यात आल्या. अलोट गर्दीमुळे प्रशासनावर तान वाढला होता. मात्र, ट्रस्टच्या सुरक्षा कर्मचारी यांच्या सुयोग्य नियोजनाने दर्शन घेण्यास भाविकांना काही त्रास झाला नाही परंतु, दर्शनास दोन ते अडीच तास एवढा वेळ लागत होताच. घोषणांनी गड परिसर दुमदुमून गेला होता.

..................

चांदवडच्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी शनिवार, रविवार व सोमवारी भाविकांनी गर्दी केली होती. सातव्या माळेनिमित्त दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर चोवीसतास दर्शनासाठी खुले आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दर्शन घेताना अडचणी येऊ नयेत म्हणून टप्पाटप्प्याने भाविकांना सोडण्यात येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाविकांच्या गर्दीने कोटमगाव फुलले!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील श्री क्षेत्र कोटमगाव येथील श्री जगदंबा मातेच्या दर्शनासाठी प्रत्येक माळेगणिक भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. भक्तांमुळे कोटमगाव अक्षरशः फुलून गेले आहे. येथील जगदंबा माता म्हणजे भक्तांच्या नवसाला पावणारी श्री महाकाली, श्री महालक्ष्मी व श्री महासरस्वती या तीन देवींचे एकरूप म्हणजे कोटमगावची जगदंबा.

नाशिक जिल्ह्यासह नजीकच्या नगर, औरंगाबाद, जळगाव आदी जिल्ह्यातील भाविकांच्या दरवर्षीप्रमाणे दर्शनासाठी रांगाच रांगा लागलेल्या दिसत आहेत. येवला शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावोगावच्या भक्तांची पावले पहाटेपासून अगदी पायी कोटमगावच्या दिशेने वळताना रस्ते देखील गर्दीने फुलले आहेत. येवला शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गालगत नारंदी नदीच्या तीरावर वसलेल्या श्री क्षेत्र कोटमगाव येथील जगदंबा माता जागृत देवस्थान समजली जाते.

विकलागांना आधार देणारी, दुर्बलांना सबल करणारी अन् निशस्त्रकाला शक्ती देणारी ही जगदंबा माता समजली जात असल्याने नेहमीच या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रेलचेल असते. नवरात्र उत्सव काळात येथे राज्याच्या विविध भागातून महिला-पुरूष नऊ दिवस घटी बसायला येतात. बरोबरच नाशिक जिल्ह्यासह नजीकच्या अनेक जिल्ह्यातील भाविकांची गर्दी दर्शनासाठी उसळते. जगदंबा मातेचे स्वयंभू अधिष्ठान असल्याने यात्राकाळात लाखोंच्या संख्येने भाविक नतमस्तक होतात. पाचव्या, सातव्या व नवव्या माळेला तर मोठी गर्दी उसळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१६९ उमेदवारांची माघार

$
0
0

टीम मटा

नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी १६९ उमेदवारांनी माघार घेतली. निफाडमध्ये ६८, चांदवडमध्ये ११६, कळवणमध्ये ७४, देवळ्यात ६१ तर सुरगाण्यात ५९ उमेदवार रिंगणात आहेत. पेठ नगरपंचायतीत १२ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. दि. १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

निफाड नगरपंचायतीसाठी २८ उमेदवारांनी माघार घेतली. निवडणूक रिंगणात ६८ उमेदवार आहेत. चांदवड नगरपंचायतीसाठी ४५ उमेदवारांनी माघार घेतली असून, ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तसेच सुरगाणा नगरपंचायतीसाठी १० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तर, ५९ उमेदवार रिंगणात आहेत.

कळवणमध्ये ७३ उमेदवार रिंगणात

कळवण नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी माघारीच्या अखेरच्या दिवसांनतर १७ प्रभागातून बहुरंगी लढती होणार आहेत. प्रभाग क्रमांक एकमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता पगार या बिनविरोध झाल्या. एकूण १७ प्रभागांतून २६ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने बहुतेक प्रभागात तिरंगी, चौरंगी, पंचरंगी, सप्तरंगी व नवरंगी लढती रंगणार आहेत. १७ प्रभागातून ७३ उमेदवारांनी माघार घेतली असली तरी अपक्ष उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.

भाजप-सेना युतीत सेनेच्या वाटेला सहा जागा आल्या होत्या. प्रभाग एकमधून अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याने तोंडावर पडावे लागले. काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी केली असताना सर्व जागावर उमेदवार उभे करता आले नाहीत. त्यातच प्रभाग ७ मधून अधिकृत उमेदवाराने माघार घेतली. प्रभाग एकमधून रेखा सोनवणे, सुनीता बुटे, सुरेखा बुटे यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीच्या सुनीता पगार यांची बिनविरोध निवडीची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. १७ प्रभागातून ७३ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब आजमावत आहेत.

२६ अपक्ष उमेदवार

सतरा प्रभागातून एकूण २६ अपक्ष उमेदवारांमुळे अधिकृत पक्ष उमेदवारांची डोकेदुखी निश्चित वाढणार असून, मतविभाजनाचा फायदा नेमका कोणाला होतो हे निकालानंतर दिसून येईल. भाजपने ११, सेनेने ३, राष्ट्रवादीने १६, काँग्रेसने ११, मनसेने ४, बसपाने २ उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादीने आपले खाते उघडले असल्याने त्यांचे मनोबल निश्चितच उंचावले आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीत पेठमध्ये चुरस

पेठ नगरपंचायतीसाठी १२ उमेदवारांनी माघार घेतली. आता १७ जागांसाठी ६९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेस-माकपसोबत मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. पेठ नगरपंचायतीसाठी चुरस निर्माण झाली आहे. आजी-माजी आमदार तसेच खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माघारीच्या दिवशी सहा अपक्ष, तीन माकप, दोन राष्ट्रवादी तर काँग्रेसच्या एका उमेदवाराने माघार घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळा नगरपंचायतीसाठी ६१ उमेदवार रिंगणात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

देवळा नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी सुमारे ६१ उमेदवार रिंगणात असून, ४८ उमेदवारांनी माघार घेतली. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा बागलाणचे प्रातांधिकारी संजय बागडे यांनी दिली. दरम्यान, जनशक्ती व देवळा विकास आघाडीत सरळ लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देवळा नगरपंचायतीच्या अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी येथील तहसील कार्यालयाला गर्दीचे स्वरूप प्राप्त झाले होते. तीन वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात खलबते होऊन माघारीचे नाट्य रंगले होते.

देवळा नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी सुमारे ६१ उमेदवार रिंगणात असून, ४८ उमेदवारांनी माघार घेतली. वॉर्ड क्र. १४ मधून जिल्हा बँकेचे संचालक व जि. प. सदस्य केदा आहेर यांच्या पत्नी धनश्री आहेर व शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांच्या पत्नी अश्विनी आहेर यांच्या सरळ लढत होत आहे. वॉर्ड क्र. ११ मधून उदयकुमार आहेर व माजी पं. स. सभापती अशोक देवराम आहेर यांच्यात सरळ लढत होत आहे. वॉर्ड क्र. ४, ६, ११, १२, १४ मध्ये सरळ लढत होत आहेत. या निवडणुकीत उदयकुमार आहेर व अश्विनी उदयकुमार आहेर हे पती-पत्नी निवडणुकीत नशीब अजमावणार आहेत. दि. १ नोव्हेंबर रोजी मतदान असून, आज दि. २० रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे.

दरम्यान, शिवसंग्रामचे उदयकुमार आहेर व माजी सरपंच जितेंद्र आहेर यांचे जनशक्ती तर केदा आहेर व योगेश आहेर यांचे देवळा विकास आघाडीचे सरळ लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माघारीनंतर उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. आपापल्या वॉर्डात जाऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. अनेकांनी भाऊबंद, मित्रमंडळी व नातेसंबंधावर जोर दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यामुळे सिन्नरकर त्रस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर शहरात अनेक दिवसांपासून नगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पाणीपुरवठा अनियमित व अपुरा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दारणा धरणात पुरेसा पाण्याचा साठा असताना केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सिन्नरकरांना पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे. शहरातील बहुतेक भागात तीन ते चार दिवसांनी पाणीपुरवठा होत असून, नगरपालिकेच्या गलथान काराभाराने ऐन सणासुदीच्या काळात शहरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

केवळ वीजपुरवठ्याचे कारण व रस्त्याच्या कामामुळे पाइपलाइन तुटल्याच्या कारणामुळे पाणी पाणीपुरवठ्याचे तीन तेरा वाजले आहे. नगरपालिका प्रशासन व विद्यमान नगरसेवक या प्रकरणी अनभिज्ञ असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाणी सोडण्याच्या वेळा निश्चित नसल्याने कर्मचाऱ्यांची मनमानी झाल्याने कधीही पाणी सोडण्याचे प्रकार होत असल्याने नागरिकांना पाण्याची वाट पाहत तिष्ठत बसावे लागते. अनेकांना पाण्यावाचून वंचित राहावे लागते.

वीजपुरवठ्याचा व्यत्यय

पळसे ता नाशिक येथील पंपिंग स्टेशनवरील खंडित वीजपुरवठ्यामुळे सिन्नर शहर, मुसळगाव, माळेगाव, नगरपरिषदेचा वाढीव भागात पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. याबाबत आमदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता यांना लेखी सूचना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक धडकेने २ ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर कॉलेजजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू ट्रकने धडक दिल्याने कॉलेज विद्यार्थिनी व परप्रांतीय कामगार जागीच ठार झाले, तर एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. अपघातानंतर ट्रक डाव्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबावर आदळून उलटला. त्यामुळे विजेची हायटेंशन वायर तुटली. सुदैवाने कोणालाही विजेचा घक्का बसला नाही, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

सोमवारी दुपारी साडेबारा वाजता हा अपघात झाला. यावेळी सकाळचे कॉलेज सुटण्याची तर दुपारचे कॉलेज भरण्याची वेळ होती. रस्त्यावर दोन्ही बाजूंनी विद्यार्थी ये-जा करीत असताना भर गर्दीच्या वेळी हा अपघात झाला. नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर कॉलेजजवळील कडवा कॉलनी जवळून दीपाली सोपान बोराडे (वय १७, रा. सिन्नर) व तिची मैत्रीण मोनिका चंद्रभान पवार (वय १७, रा. सिन्नर) या कॉलेजमधून सिन्नरकडे परतत होत्या. त्यावेळी नाशिकहून भरधाव वेगाने मागून येणारी मालट्रक (एम एच ०४ सी ए ४०५) ने या विद्यार्थिनींना धडक दिली. त्यानंतर त्यांच्या पुढे चालत असलेले दोघे परप्रांतीय कामगार यांनाही ट्रकने धडक दिली. या धडकेत दीपाली बोराडे व वकील जोधू अहमद (वय १८, रा. उत्तरप्रदेश) हे जागीच ठार झाले. मोनिका पवार ही विद्यार्थिनी व कामगार मुजफर अली अहमद हे बालबाल बचावले. अपघातानंतर चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या डाव्या बाजूला विजेच्या खांबावर हा मालट्रक आदळला. या धडकेत खांबावरील विजेची हायटेन्शन वायर तुटली. तसेच, ट्रकचे पुढची चाकेही तुटली. सुदैवाने विजेचा धक्का कोणाला बसला नाही.

चालकाला चोप

अपघातात वाचलेला परप्रांतीय कामगार मुजफ्फर अली आपल्या लहान भावासह सिन्नर येथे दोन महिन्यापूर्वी ज्युसचा धंदा करण्यासाठी आला होता. देवी मंदिराच्या रस्त्यावर जुसचा ते व्यवसाय ते करीत होते. दोघे सायकल घेऊन माल आणण्यासाठी रस्त्याने चालले होते. समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दोन्ही मुलींसह त्याच्या भावाला धडक दिली. हे बघून मालट्रकच्या चालकाला मुजफ्फरने यथेच्च चोप दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बायपास मार्गाला आडकाठी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहराच्या पश्चिमेकडील बायपास रस्त्यांच्या शुभारंभप्रसंगी मुंजवाड येथील शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केल्याने बायपासची मागणी करणाऱ्या वकील संघाला घटनास्थळावरून काढता पाय घ्यावा लागला. खासदार-आमदारांसह अधिकाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊनही शेतकऱ्यांचा विरोध कायम असल्याने अखेर माघार घेत सन २००३ मधील राज्यमार्ग १९ च्या कामाचा नारळ फोडण्याची नामुष्की खासदार-आमदारांवर आली. दरम्यान, एका महिन्याच्या आत बायपास रस्ता कामाचे सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांची भूमिका समाजावून घेऊनच अखेर निर्णय घेण्याचा सुवर्णमध्य काढण्यात आला.

सकाळी १० वाजेच्या सुमारास मुजंवाड येथून सटाणा बायपास मार्गाचा पश्चिमेकडील रस्ता कामाच्या शुभारंभाप्रसंगी घटनास्थळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दीपिका चव्हाण यांच्यासह बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता डी. सी. झांबरे, वकील संघाचे सर्व सदस्य, नगरसेवक व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शुभारंभाप्रसंगी मुंजवाडचे माजी सरपंच राजेंद्र जाधव, जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी, दौलत जाधव, वैभव अहिरे यांनी तीव्र आक्षेप घेतला.

वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. पंडित भदाणे यांनी वकील संघाला बाह्य वळण रस्त्याची आवश्यकता असून, आम्हाला यात राजकारण नको असून, तोडगा हवा असल्याची भूमिका घेतली. अ‍ॅड. सरोज चंद्रात्रे यांनी बायपासचे महत्त्व विषद करीत भारत-पाकिस्तान प्रमाणे भांडू नये, असे आवाहन केले. मात्र, शेतकऱ्यांनी आपली विरोधाची भूमिका तीव्र ठेवली. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी शेतकऱ्यांना सामंजस्याची भूमिका घेत सन २००३ मधील रस्ता विकासकामाचा शुभारंभ करून देण्याची विनंती करीत बायपास वळण रस्ता कामात मुंजवाडमधील कामांचे एक महिन्याच्या आत सर्व्हेक्षण करून किती शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करावी लागेल यांची माहिती घेऊन नंतरच शेतकऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आवाहन केले. अखेर बायपास कामाचा नारळ न फोडता विकासकामांचा नारळ वाढवून लोकप्रतिनिधींना माघारी फिरावे लागले. या प्रसंगी सा. बां. विभागाचे उपकार्यकारी अभियंता झांबरे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढून एक महिन्यात सर्व्हेक्षण अहवाल सादर करण्याची भूमिका घेतली. या प्रसंगी वकील संघाचे सदस्य अभिमन्यू पाटील, सोमदत्त मुंजवाडकर, नाना भामरे, नगरसेवक काका रौंदळ, राजेंद्र सोनवणे, भारत खैरणार, सुमनबाई सोनवणे, सिंधुबाई सोनवणे, सुशीला रौंदळ, लालचंद सोनवणे, साहेबराव सोनवणे, पंकज ततार, जगदीश मुंडावरे, श्रीधर कोठावदे, आण्णा अहिरे, डॉ. प्रशांत पाटील, सचिन सावंत आदींसह मान्यवर उपस्थित होते.

आत्मदहनाचा इशारा

रस्ता कामाच्या शुभारंभास मुंजवाडच्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करून बायपास नेणार असल्यास प्रसंगी आत्मदहनाची भूमिका घेतली. जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी यांनी पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात गावठाण जागा नाही, प्रत्येक कुटुंबीयांना सरासरी दीड एकर शेतीचे क्षेत्र येत असल्याने वळण रस्त्यास विरोध असल्याचे नमूद केले. तसेच शहराचा पूर्वेकडील बायपास योग्य असताना पश्चिमेकडील बायपासला आमचा विरोध असल्याची भूमिका या ठिकाणी विषद केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगाला उपासमारीची समस्या भेडसावणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'जगाला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या ही उपासमार असून त्याचे कारण हे दुष्काळ किंवा अन्नधान्याचा तुटवडा नसून लोकांची उपलब्ध अन्नधान्य विकत घेण्याची क्रयशक्ती नाही.' असे प्रतिपादन डॉ. गोविलकर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आयोजित तीन दिवसीय कृषि तंत्रज्ञान महोत्सवाप्रसंगी ते बोलत होते. तंत्रज्ञान महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी 'सामाजिक संरक्षण आणि कृषी : ग्रामीण दारिद्रय चक्रभेद' या विषयावर जेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील होते.

अन्न व कृषी संघटना दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी एक विषय घेऊन जागतिक अन्न दिन साजरा करत असते. यावर्षी 'सामाजिक संरक्षण आणि कृषी : ग्रामीण दारिद्रय चक्रभेद' हा विषय घेऊन हा दिवस साजरा केला जात आहे.

जगातील ७०० कोटी लोकसंख्येपैकी ८५ कोटी लोकसंख्या ही उपासमारीने ग्रस्त आहे. विशेष म्हणजे यातील जवळपास निम्याने लोकसंख्या ही आशिया खंडातील आहे. यात महिला व लहान मुलांची संख्या जास्त आहे. ४ कोटी लोक यामुळे दरवर्षी भूकबळीचे शिकार होतात. या देशांत अन्नधान्याचा तुटवडा नसूनही केवळ या लोकांची ते खरेदी करण्याची क्रयशक्ती नसल्याने ते या समस्येने ग्रस्त आहेत अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. लोकसंखेपेक्षा अन्नधान्याची वाढ ही जास्त आहे ही आशेची बाब असली तरी अन्नधान्यातील कमी पोषणमूल्य ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक स्तरावर मोठ्या उद्योग धंद्यातील गुंतवणुकीपेक्षा छोट्या शेतीक्षेत्रात गुंतवणुकीला प्राधान्य देण्याची शिफारस केली जात आहे. सामाजिक संरक्षणाचाच हा भाग आहे. सामाजिक संरक्षणासाठी अन्न व कृषि संगठना त्रिसूत्री राबविण्यावर भर देत आहे. यात श्रम बाजारपेठेत हस्तक्षेप, सामाजिक विमा कवच व सामाजिक सहाय्य या बाबींचा समावेश असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

प्रा. रावसाहेब पाटील यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात कृषि क्षेत्रात तंत्रज्ञाच्या वापरावर भर देताना सांगितले कि आपल्या देशात छोटे व सीमांत शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असून त्यांनी आपल्या शेतात तंत्रज्ञाचा वापर करून उत्पादनक्षमता वाढवण्याची गरज आहे. त्याचबरोबर अश्या शेतकऱ्यांनी केवळ पिकांवर अवलंबून न राहता कृषिपूरक जोडधंदे करावेत. वर्षभर उत्पन्न स्रोताची निर्मिती व संपूर्ण कुटुंबाला काम यावर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे व कृषि विज्ञान केंद्राने यावर काम केले असून शेतकऱ्यांना इत्यंभूत ज्ञान देण्यासाठी केंद्र तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोहितच्या आजोबांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अवघ्या १७ वर्षांच्या नातवाचा पैशांसाठी निर्घृण खून करण्यात आल्याची माहिती कानावर पडताच अस्वस्थ झालेल्या आजोबाचा हार्ट अॅटॅकमुळे मृत्यू झाला. दोधा यादव बच्छाव (७५) असे या आजोबाचे नाव आहे. ते जुनी बेज, तालुका कळवण येथील रहिवाशी होते.

२० लाख रूपयांच्या खंडणीसाठी मालेगाव येथे राहणाऱ्या मोहित बाविस्करची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येत त्याचाच बालपणीचा मित्र सौरभ चौधरी आणि आकाश प्रभू या दोघांचा समावेश होता. पोलिसांना त्यांना अटक केली. हा घटनाक्रम घडत असताना मोहितेचे आजोबा प्रकृती अस्वस्थेमुळे नाशिकच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. झालेल्या प्रकरणामुळे त्यांना धक्का बसू नये म्हणून डॉक्टर तसेच नातेवाईकांनी या घटनेची माहिती त्यांना समजू दिली नव्हती. मात्र, उपचार पूर्ण घरी परतल्यानंतर नातवाच्या मृत्युची बातमी त्यांच्यापर्यंत पोहचली. या घटनेने अस्वस्थ झालेल्या बच्छावांना आज, सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हार्ट अॅटॅकचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. नातवाच्या मृत्यु वियोगामुळे आजोबांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.

संशयितांना २३ पर्यंत कोठडी

मोहित बाविस्कर याचे अपहरण व खूनाचा आरोप असलेला संशयित आरोपी सौरभ चौधरीसह त्याच्या साथीदारास कोर्टाने २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. टीव्ही सिरीयलमधून 'प्रेरणा' घेत मोहितचा खून करणाऱ्या दोघा संशयित आरोपींना शहर पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या होत्या. संशयित आरोपींनी सफाईने हे काम केले आहे. यात आणखी काही साथीदार आहेत का? गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त करायची असून, या चौकशीसाठी संशयिताच्या पोलिस कोठडीची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा गंगापूर धरणावर ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर आणि आळंदी धरणातून मराठवाड्याला पाणी देवू नये या जोरदार मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी गंगापूर धरण परिसरात आंदोलन केले. शिवसेनेचे आमदार अनिल कदम, राजाभाऊ वाजे आणि योगेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांनी फळबागांना पाणी देवून शेतकरी आत्महत्या रोखण्याची मागणी केली.

मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात गंगापूर धरणातून १.३६ टीएमसी आणि दारणा धरणातून ३.२४ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. या निर्णयास नाशिक जिल्ह्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. आमदार अनिल कदम, राजाभाऊ वाजे आणि योगेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली निफाड, नाशिक, त्र्यंबकेश्वरसह इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गंगापूर धरण परिसरात आंदोलन केले. गंगापूर डाव्या कालव्यावर २५ हजार फळबागा आहेत. या बागांसाठी शेतकऱ्यांनी १७ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. या कालव्यावर अनेक पाणी वापर संस्था अवलंबून आहेत. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता गंगापूर धरणातून पाणी सोडणे कितपत संयुक्तिक आहे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

...तर फळबागा नष्ट होतील!

आळंदी धरणाचे पाणी शेतीसाठी राखीव असले तरी पाणी सोडण्याचे आदेश हे हुकूमशाही पद्धतीचे आहेत. फळबागांना पाणी न देता धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडले तर फळबागा नष्ट होणार आहेत. परिणामी, या सर्व शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून घेतलेली मेहनत वाया जाणार आहे. यातून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू होण्याची भीती अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. जेवढे पाणी सोडले जाते, त्यातील निम्मे पाणी वाया जात असल्याने पाणी टँकर किंवा रेल्वेद्वारे नेवून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता हायकोर्टात याप्रश्नी याचिका दाखल करण्याचा निर्णय तिन्ही आमदारांनी बोलून दाखविला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त धरण परिसरात तैनात केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायद्याच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेवरच बहिष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रिचेकींगचे पेपर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गहाळ केल्याच्या प्रकरणाने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आजपासून (दि. २०) सुरू होणाऱ्या विद्यापीठाच्या टर्म एंड परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. यामुळे आज टर्म एंडचा पहिला पेपर देण्यासाठी उर्वरित विद्यार्थी परीक्षा केंद्रावर असताना अन्यायाची भावना असलेले विद्यार्थी मात्र विद्यापीठाच्या उपविभागीय केंद्राबाहेर बसून आंदोलन छेडणार आहेत.

कायद्याच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा 'इव्हीडन्स' या विषयाचा गोंधळ विद्यापीठात झाला. या विषयाची परीक्षा देऊन यात अनुत्तीर्ण ठरलेल्या एनबीटी कॉलेजच्या १२ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज केला होता. महिनाभराचा कालावधी उलटूनही विद्यापीठाने विद्यार्थ्यांना निकाल दिला नाही. यावर विचारणा करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकाच गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती कळाली होती. यावर विद्यापीठाने कुलगुरूंना साकडे घालत समन्वयवादी मार्ग काढण्याची विनंती केली होती. यानंतरही याप्रश्नाचा तिढा सुटलेला नाही. पुढील टर्ममध्ये या विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा द्यावी,असे समुपदेशन विद्यापीठाच्या वतीने केले जात असून याला विद्यार्थी राजी नाहीत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याच्या मुद्द्यावरून त्यांच्या समर्थनार्थ इतरही विद्यार्थी या बहिष्कारात सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगाचे राष्ट्रीय संमेलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

योगाचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार व्हावा यासाठी योग विद्या गुरुकुलतर्फे नवव्या राष्ट्रीय योग संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन १८ ते २० डिसेंबर रोजी विश्व योग दर्शन आश्रम तळवाडे (ता. त्र्यंबकेश्वर) येथे होणार आहे.

योग शास्त्राचे आद्य प्रवर्तक योग महर्षी पतंजली यांनी पातंजल योग दर्शन या ग्रंथामध्ये ध्यानाचे महत्त्व सांगितले आहे. आधुनिक विज्ञानही याबाबत फारसे प्रगत नाही या संमेलनात या विषयावर जास्त प्रमाणात अभ्यास होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, आयुषचे संचालक कुलदीपराज कोहली, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू अरुण जामकर यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी ११ ते १२.३० या कालावधीत पुणे येथील चिन्मय मिशनचे स्वामी सिध्देशानंद यांचे 'उपनिशदातील ध्यान' या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी २ ते ३.३० या कालावधीत योग संशोधन मार्गदर्शक आशाताई वेळूकर, नंदीनी बेंडाळे रमेश भगत यांचे सादरीकरण होणार आहे. संध्याकाळी ५.३० वाजता योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक यांचे व्याख्यान होणार आहे. १९ डिसेंबर रोजी 'प्राणायाम' या विषयावर विश्वास मंडलिक, 'ध्यान व प्रात्यक्षिक' या विषयावर श्रीकृष्ण व्यवहारे, 'उपनिषद' यावर स्वामी माधवानंद, 'भावातीत ध्यान परिचय' या विषयावर डॉ. रमेश बोंडाळे, भीष्मराज बाम, 'ओंकार ध्यान' या विषयावर पौर्णिमाताई मंडलिक व्याख्यान देणार आहे. रविवार २० डिसेंबर रोजी योगाचार्य विश्वास मंडलिक हे प्राणायाम प्रात्यक्षिके करून घेणार आहेत. 'ध्यान समाधान' विषयावर रामचंद्र ढेकणे यांचे व्याख्यान होणार असून, डॉ. इश्वर आचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत तीन दिवसीय योग संमेलनाचा समारोप होणार आहे. संमेलनस्थळी पोहचण्यासाठी सीबीएसवरून त्र्यंबकेश्वरसाठी बसेस सुटतात. तुपादेवी फाट्यावर उतरून संमेलनस्थळी जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी गंधार मंडलिक यांच्याशी (९४२०४८४०१०) किंवा योग विद्या धाम २३१८०९० ( ९४२०४८४०१७ ) या क्रमांकावर संपर्क साधावा] असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८८ गावे पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर

$
0
0

प्रवीण बिडवे । नाशिक

भूजल सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यातील सरासरी स्थिर भूजल पातळी यंदा ०.९३ मीटरने खाली गेली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल २८८ गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, जिल्हा परिषदेने टंचाई आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. राज्य दुष्काळी परिस्थितीतून जात असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे दीड हजार गावे दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. अलीकडेच करण्यात आलेल्या भूजल सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यातील

२८८ गावांना पुढील वर्षभरात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे नांदगावातील चार गावांना आताच पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा सामना करावा लागतो आहे. जिल्ह्यातील ९५ गावांना जानेवारी ते मार्च २०१६ या कालावधीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागणार आहे. ही परिस्थिती एप्रिल ते जून २०१६ या कालावधीत अधिक बिकट होणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील १८९ गावांमधील गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. या गावांना टंचाईपासून वाचविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील नाशिक, निफाड, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांमधील एकाही गावाला पुढील वर्षभरात पिण्याच्या पाण्याचे र्दुभिक्ष्य जाणवणार नसल्याचे सर्व्हेक्षणात स्पष्ट केले आहे. या तालुक्यांसह पेठ, सुरगाणा आणि कळवणमध्ये मार्च २०१६ पर्यंत पिण्याचा पाण्याचा प्रश्न उदभवणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पाणी पातळी दोन मीटरवर

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्ह्यातील १९१ विहिरींची पाहणी केली. दिंडोरी, नाशिक, निफाड तालुक्यांत विहिरींमधील पाणी पातळीत ०.०८ ते ०.०१४ मीटरपर्यंत वाढ झाली. मात्र हा अपवाद वगळता अन्य सर्वच तालुक्यांत विहिरींमधील पाणी पातळी स्थिर भूजल पातळीपेक्षा सरासरी ०.९३ मीटरने खाली गेली आहे. पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवणमध्ये हीच पाणी पातळी सुमारे एक मीटरपर्यंत खाली गेली आहे. एक ते दोन मीटर पाणी पातळी खाली गेलेल्या तालुक्यांमध्ये बागलाण, नांदगाव, सिन्नर, सुरगाण्याचा समावेश आहे. तर दोन मीटरहून अधिक पाणी पातळी खाली गेलेले तीन तालुके पाणी टंचाईच्या धोकादायक उंबरठ्यावर आहेत. त्यामध्ये चांदवड (२.१३ मीटर), देवळा (२.०४), मालेगावचा (२.२०) समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी गळतीने प्रशासन त्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही वर्षांत जिल्ह्याला कोरड्या दुष्काळाच्या फारशा झळा बसल्या नाहीत. त्यामुळे वहन मार्गाद्वारे होणाऱ्या पाण्याचे गांभीर्य दुर्लक्षिले गेले. मात्र, या मार्गाने होणाऱ्या पाण्याचा अपव्यय पाहून आता जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचतीच्या प्रभावी उपाययोजनांवर भर द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपेन्द्रसिंह कुशवाह यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्ह्यात विविध क्षेत्रांसाठी असणारी पाण्याची आवश्यकता, धरणांमध्ये उपलब्ध असणारा पाणीसाठा याचा आढावा घेऊन दरवर्षी पाणी वाटपाबाबतचे नियोजन केले जाते. हा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कुशवाह यांनी सोमवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हा परिषद, महापालिका, एमआयडीसी, भूजल विभागासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. गंगापूर धरणातून मराठवाड्याला वहन मार्गाने पाणी सोडणास विरोध होत आहे. वहन मार्गाने पाणी सोडले तरी त्यापैकी ८० टक्के पाणीही संबंधित ठिकाणापर्यंत पोहोचत नसल्याने अशा पध्दतीने पाणी सोडण्याऐवजी किमान जिल्हा पातळीवर पर्यायांचा विचार करता येईल का, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

किमान जिल्ह्यात ३० ते ४० किलोमीटरच्या परिघात जेथे वहन मार्गाने पाणी सोडण्यात येते तेथे टँकर किंवा तत्सम मार्गांनी पाणी सोडता येईल का याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आल्याची जाणीव अधिकाऱ्यांना करून देण्यात आली.

उपलब्ध पाणीसाठा अत्यंत मर्यादित असल्याने विविध विभागांसाठी पाणी राखून ठेवताना यंदा हात आखडता घ्यावा लागेल, असे संकेत या बैठकीत देण्यात आले. महापालिका, एमआयडीसी, अन्य पाणी योजनांना गतवर्षी किती दशलक्ष घनफूट पाणी दिले होते, त्यापैकी प्रत्यक्षात किती दशलक्ष घनफूट पाणी वापरण्यात आले याची माहिती या बैठकीत अधिकाऱ्यांनी सादर केली. या विभागांना

यावर्षी असणारी पाण्याची गरज विचारात घेऊन त्यांना किती पाणी द्यायचे याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. पाणी नियोजनासंदर्भातील पुढील बैठकीला येताना प्रत्येक विभागाने पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेऊन यावे, असे आदेश कुशवाह यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...म्हणून डीपी रस्त्याचे स्थलांतर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नगररचना व मिळकत विभागाने बिल्डरांच्या भल्यासाठी थेट महापालिकेच्या २४ मीटरचा डीपी रोडच स्थलांतरीत करण्याची तयारी सुरू केली आहे. गंगापूर नाका ते पंचवटी लिंकरोड (रामवाडी मार्ग) या रस्त्यावरील बिल्डरांच्या बड्या प्रोजेक्टसाठी हा रस्ता अडसर ठरत असल्यानेच थेट रस्त्याच्या स्थलांतरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप नगरसेविका मनिषा हेकरेसह स्थानिकांनी केला आहे. विशेष म्हणजे सिंहस्थातच हा रस्ता नव्याने तयार करण्यात आला आहे. असे असताना रस्ता स्थलांतर करण्याची प्रशासनाची लगीनघाई संशयास्पद असल्याने स्थानिकांनी आयुक्तांकडे धाव घेतली आहे. तर शिवसेनेने आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

महापालिकेतील नगररचना व भूसंपादन करणारा मिळकत विभागाच्या कारभाराकडे संशयास्पदरित्या पाहिले जात होते. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या दोन्ही विभागाच्या संशयास्पद कामगिरीला ब्रेक लावला असला तरी, या विभागातल्या काही हितसंबंधितांनी जुन्या पत्रांचा आधार घेत, आपले हेतू साधण्याची तयारी सुरू केली आहे. या जम‌िनीवरील प्रस्तावीत प्रोजेक्टला हा रस्ता अडसर ठरत आहे. त्यामुळे एकतर रस्ता रुंद करा किंवा तो स्थलांतरीत करा असा दबाव अधिकाऱ्यांवर टाकला जात आहे. तत्काल‌िन महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी 'हा रस्ता स्थलांतरीत करावा' असे पत्र दिल्याचा दाखला आता मिळकत विभागाकडून दिला जात आहे. सिंहस्थ होताच हे जुने पत्र काढून ही प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक धास्तावले आहेत. विशेष म्हणजे महापौरांच्या प्रभागातील या रस्ताबाबत त्यांनाच अंधारात ठेवण्यात आले आहे.

मागणी नसतानाच कारवाई

रस्ता स्थलांतरीत करावा किंवा रुंद करावा अशी कोणाचीही मागणी नसताना महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी स्थलांतराच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारीची साधी दखल न घेणाऱ्या प्रशासनाने अचानक हे जुने पत्र कसे काढले याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेषत: मिळकत विभागाची भूमिका संशयास्पद आहे.

या रस्त्यासाठी पालिकेने करोडो रुपये खर्च केले आहेत. मात्र काही बिल्डरांच्या भल्यासाठी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या स्थलांतराचा घाट घातला आहे. प्रशासनाने असा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.अजय बोरस्ते, गटनेता, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेनेचे पाण्यासाठी आंदोलन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठवाड्यासाठी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याच्या निर्णयाचे तीव्र पडसाद सोमवारी नाशिकमध्ये उमटली आहे. पाणी सोडण्याच्या विरोधात शेतकरी व सर्वसामान्यांपाठोपाठ शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसेने उघड विरोध केला आहे. तर आता शहरातील नागरिकही पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी शिवसेनेनेच्या नेतृत्वात सर्वपक्षीय मोट बांधली जात असून, मंगळवारी सर्वपक्षीय बैठक होणार आहे. दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांचे गंगापूर धरणावर आंदोलन केले.

नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्याच्या विरोधात सोमवारी नाशिक व निफाडमधील शेतकऱ्यांनी गंगापूर धरणांवर ठिय्या आंदोलन केले. शिवसेनेच्या अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. धरणांतून पाणी सोडण्याला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेने विरोध केला आहे. तर भाजपची भूमिका संदीग्ध आहे. तर इतर पक्षांनी सोमवारी वेगवेगळे विरोध नोंदविल्याने त्याची तीव्रता कमी झाली. त्यामुळे पाण्याविरोधात वेगवेगळे न लढता सर्वच पक्षांची एकत्र मोट बांधण्याचा निर्णय सेनेच्या अजय बोरस्ते यांनी घेतला असून, सर्वपक्षाच्या अध्यक्षांची मंगळवारी एकत्रीत बैठक घेऊन आंदोलनाची रणनिती ठरविणार आहेत.

भाजपची गोची...

दरम्यान, सर्वपक्षीयांनी पाणीविरोधात भूमिका घेतली असताना, भाजपची भूमिका मात्र अद्यापही संशयास्पद आहे. पाणी सोडणे आवश्यक असल्याचे भाजप नेते उघडपणे सांगत असले तरी, खासगीत विरोध करत आहेत. सरकार भाजपचे असल्याने भाजपला समर्थन करावे लागणार आहे. मात्र सेनेने उघड विरोधात भूमिका घेतल्याने अधिक गोची झाली आहे.

जिल्ह्यात २८८ गावे पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर

भूजल सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यातील सरासरी स्थिर भूजल पातळी यंदा ०.९३ मीटरने खाली गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल २८८ गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, जिल्हा परिषदेने टंचाई आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. राज्य दुष्काळी परिस्थितीतून जात असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे दीड हजार गावे दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. अलीकडेच करण्यात आलेल्या भूजल सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यातील २८८ गावांना पुढील वर्षभरात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

निषेधाचे मोर्चे

नगर- नाशिक जिल्ह्यातील धरणांतून सुमारे १३ टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी सोमवारी नगरजिल्ह्यात अकोले, संगमनेर , श्रीरामपूर, कोपरगांव या ठिकाणी हजारो शेतकर्यांनी निषेधाचे मोर्चे काढले. यावेळी संतप्त शेतकर्यांनी पाटबंधारे खाते व राज्यसरकार यांना शिव्यांची लाखोली वाहीली. दरम्यान महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण यांच्या निर्णयाविरोधात स्थगिती मिळवण्यासाठी तीन सहकारी साखरकारखान्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उद्या, मंगळवारी मुंबई हायकोर्टात मुख्य न्यायाधिशांसमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. हायकोर्टाच्या निर्णयाकडे नगर-नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधानांकडून नाशिककरांचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'रेस अॅक्रास अमेरिका' ही जगप्रसिद्ध सायकल स्पर्धा जिंकणारे नाशिकचे सायकलपटू डॉ. महेंद्र महाजन आण‌ि डॉ. हितेंद्र महाजन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यालयात बोलवून विशेष गौरव केला.

या प्रसंगी महाजन बंधूंसोबत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण आण‌ि मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधानांनी महाजन बंधूंचे व सायकल चळवळीचे कौतुक केले तसेच, दैनंदिन जीवनात सायकलचा वापर करण्याचे आवाहन केले. मोदींनी महाजनबंधूंचा उल्लेख 'मन की बात' या कार्यकमातही केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठेबाजांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डाळींसह कडधान्याचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे व्यापाऱ्यांकडून साठेबाजी तसेच काळाबाजार होण्याची शक्यता बळावली आहे. असे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने विशेष पथक नेमले असून, शहरासह जिल्ह्यात नाशिकमध्ये मंगळवारी आठ व्यापाऱ्यांवर छापे टाकण्यात आले.

कधी नव्हे ते तूरडाळीचे भाव प्रतिकिलो २०० रुपयांच्यावर पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांकडून डाळींची साठेबाजी होण्याची शक्यता आहे. म्हणून राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जिल्हास्तरावर विशेष पथक स्थापून संबंधितांवर कारवाईचेे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पथक स्थापन केले असून, त्यामध्ये सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सौंदाणे, नायब तहसीलदार एन. एम. बिरारी यांच्यासह सर्व पुरवठा निरीक्षकांचे पथक नेमले आहे. या पथकासह जिल्ह्यात तहसीलदारांनी घाऊक व्यापाऱ्यांची गुदामे तसेच डाळ मिलवर छापे टाकले. जिल्ह्यात आठ घाऊक व्यापारी तसेच शिंदे पळसे आणि नाशिक शहरातील डाळ मिलवर छापे टाकले. मात्र त्यांना ठरवून दिलेल्या मर्यादेतच डाळी, तसेच खाद्य तेलांचा साठा असल्याचे तपासणीअंती आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोहितच्या खुनात आणखी एकाचा सहभाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोहित बाविस्कर हत्या प्रकरणात दोघांव्यतिरिक्त आणखी काही आरोपींचा हात असण्याचा संशय असून, पोलिसांकडे त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. मालेगाव येथे मोहितचे पंचसंस्कार पार पडले. यावेळी जमा झालेल्या नातेवाईकांमध्ये ही चर्चा सुरू होती.

अपहरण झालेल्या मोहितची पैशांसाठी बालपणीचा मित्र सौरभ चौधरी आणि त्याच्या एका साथीदाराने १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री हत्या केली. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग असू शकतो. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी करावीच, अशी मागणी नातेवाईक सातत्याने करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फार्मसी विद्यार्थ्यांची मान्यताच धोक्यात

$
0
0

जीतेंद्र तरटे । नाशिक

सेंट्रल फार्मसी कौन्सिलने घालून दिलेली बंधने धुडकावण्याची मनमानी यंदाच्या शैक्षणिक वर्षात राज्यातील संस्थांनी केली आहे. परिणामी, राज्यभरातील सुमारे ९५ कॉलेजमध्ये प्रवेशित पाच हजारपैकी एकाही विद्यार्थ्याची नोंदणी स्टेट फार्मसी कौन्सिलकडे अद्याप करण्यात आलेली नाही. यामुळे सद्यस्थितीत या अभ्यासक्रमातील विद्यार्थी नियमबाह्य पध्दतीने शिक्षण घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

यंदा विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा दाखला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने तपासण्यात आलेला नाही. ज्या फार्मसी कॉलेजांकडे फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने फार्मसी कायदा सेक्शन १२ खाली देण्यात येणारी पूर्वपरवानगी नाही, अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश मान्यतेच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने एम. फार्म अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. मंडळाने या प्रक्रियेबाबत दिलेल्या माहितीपत्रकातील निकषांनाच या प्रकारामुळे छेद जात आहे.

माहितीपत्रकातील पात्रता या मुद्द्यांतर्गत यंदा ३१ जुलै २०१५ ही कट ऑफ डेट देण्यात आली होती. यानंतर स्टेट कौन्सिलकडे विद्यार्थ्यांची नोंदणी होणे अपेक्षित होते. मात्र, ही तारीख उलटून आता दोन महिन्यांचा कालावधीही मागे पडल्याने काही घटकांनी या प्रकरणी शिक्षणमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.

राज्यातील काही फार्मसी कॉलेजांकडे फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची 'कोर्स ऑफ कंडक्ट' ची परवानगी असली तरीही फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची फार्मसी कायद्याच्या सेक्शन १२ खाली देण्यात येणारी सेक्शन १२ ची परवानगी नाही. या प्रकारच्या फार्मसी कॉलेजातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी स्वतःची रजिस्टर्ड फार्मसीस्ट म्हणून नोंदणी स्टेट फार्मसी कौन्सिलकडे करू शकत नाहीत. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची अंतिम परवानगी जी कॉलेज अपूर्ण ठरली तेथील विद्यार्थ्यांवर ही नामुष्की येणार आहे. संबंधित कॉलेजसने सेंट्रल कौन्सिलचे नियम न पाळल्याने त्यांना यंदा सेक्शन १२ अंतर्गत अत्यंत महत्त्वाची असणारी परवानगी बहुतांश कॉलेज मिळवू शकलेले नाहीत. सेंट्रल कौन्सिलच्या मुद्द्यांकडे कानाडोळा करून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ निकषपूर्ती न करणाऱ्या कॉलेजांना पाठीआड घालत असल्याच्या तक्रारीही आता शिक्षणमंत्र्यांच्या दरबारी दाखल होत आहेत. चुकीच्या वागणाऱ्या कॉलेजांना चाप बसवावा व या प्रक्रियेतील दोषींची उलटतपासणी व्हावी, अशी मागणी पुढील टप्प्यात जोर धरण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images