Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अॅपवर अडीच हजार तक्रारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने लाँच केलेल्या स्मार्ट नाशिक अॅपवर महिनाभरात तब्बल अडीच हजार नागरिकांना तक्रारी केल्या आहेत. एकूण तक्रारीपैंकी १६०० तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. प्रलंबित तक्रारीमंध्ये धोरणात्मक विषयाच्या तक्रारी अधिक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान महिनाभरात शहरातील १४ हजार २५० नागरिकांना स्मार्ट नाशिक अॅप डाऊनलोड केला आहे.

महापालिकेचा कारभार अधिक पारदर्शक करण्यासाठी महापालिकेन लाँच केलेल्या स्मार्ट नाशिक अॅपला बुधवारी महिना पूर्ण झाला. या महिनाभरात स्मार्ट अॅपचे नागरिकांनी स्वागत केले असले तरी नागरिकांच्या तक्रारी परस्पर बंद केल्या जात असल्याच्या तक्रारीही केल्या आहेत. महिनाभरात अॅपवर अडीच हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात विद्युत विभाग आघाडीवर असून या विभागाच्या सर्वाधिक ९०४ तक्रारी आहेत. त्यापाठोपाठ आरोग्य विभाग - ४७५, बांधकाम विभाग - ३३०, पाणीपुरवठा विभाग - २५० या प्रमुख विभागांचा समावेश आहे. यापैकी जवळपास १६०० तक्रारी निपटारा करण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला आहे. सोबतच १०८ नागरिकांना आपल्या तक्रारींचे समाधान न झाल्याने त्या तक्रारी रिओपन केल्या आहेत.

दरम्यान महिनाभरात नाशिककरांना या स्मार्ट नाशिक अॅपला चांगला प्रतिसाद दिला असून आतापर्यंत तब्बल १४ हजार २५० नागरिकांनी मोबाइलवर त्याला डाऊनलोड केला आहे. दररोज सरासरी २०० ते ३०० नागरिक या अॅपला डाऊनलोड करीत आहेत. त्यामुळे या अॅपला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे.

अॅपवर ९०६ रक्तदाते

महापालिकेच्या या अॅपवर महिनाभरात ९०६ रक्तदात्यांची नोंद झाली आहे. अॅप डाऊनलोड करतांना आपण रक्तदान करू इच्छिता का, असा एक प्रश्न विचारला जातो. त्यात होकार दिल्यानंतर तुमचे नाव आपोआप रक्तदात्यांच्या सूचित येते. गरजूला रक्त हवे असल्यास त्यांनी या स्मार्ट अॅपवर जावून संबंधित रक्तदात्याला फोन केल्यास तत्काळ रक्त मिळते. आतापर्यंत ९०६ रक्तदात्यांनी या अॅपवर नोंदणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘लॉ’च्या विद्यार्थ्यांचा ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निकालानंतर अनुत्तीर्ण दर्शविले गेलल्या विद्यार्थ्यांनी पुर्नमुल्यांकनासाठी रितसर अर्ज केल्यानंतर उत्तरपत्रिकाच गहाळ झाल्याची धक्कादायक बाब उघड झाल्याने या विद्यार्थ्यांनी बुधवारी पाच तास ठिय्या आंदोलन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयात चाललेल्या या गोंधळाचा तिढा सुटू शकला नाही. याप्रश्नी दोन दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी दिले असले तरीही विद्यार्थ्यांमधून विद्यापीठाच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पुणे विद्यापीठातील लॉ विद्याशाखा दरवर्षी गोंधळलेल्या कार्यपध्दतीमुळे चर्चेत राहते आहे. यंदाही भोंगळ कारभाराचा प्रत्यय विद्यार्थ्यांना आला. यंदा नाशिकमधील एनबीटी कॉलेजचे सुमारे १२ विद्यार्थी ज्युरीस्पिडन्स या विषयात अनुत्तीर्ण ठरले होते. एलएलबी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या आणि एलएलएम अभ्यासक्रमाच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी पुनरमुल्यांकनासाठी विद्यापीठाकडे रितसर अर्ज केला. मात्र, महिना उलटूनही विद्यापीठाकडून काहीच प्रतिसाद न आल्याने विद्यार्थ्यांनी विचारणा केली असता त्यांच्या उत्तरपत्रिकाच विद्यापीठातून गहाळ झाल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या हाती लागली. यावर समन्वयवादी तोडगा काढण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्यानंतरही विद्यापीठाने हात वर केल्याने आता विद्यार्थी आंदोलनाच्या पावित्र्यात उतरले आहेत.

या निमित्ताने विविध मागण्याही कायदे शाखेच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी यावेळी मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने दर सहा महिन्यातून किमान एकदा परीक्षा नियंत्रकांनी एनबीटी लॉ कॉलेजला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया समजावून घ्याव्यात, विद्यापीठाच्या उपकेंद्राचे निर्णय क्षमतेचे अधिकार वाढवावेत, लॉ विद्याशाखेच्या परीक्षेनंतर मॉडेल अन्सर पेपर प्रसिध्द करण्यात यावा, पुनरमुल्यांकनाचे निकाल किमान ६ महिन्यात लावण्यात यावेत आदी मागण्यांचा यात समावेश आहे. आंदोलनामध्ये विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी अजिंक्य गिते, चिन्मय गाढे, प्रसाद निकाळे, नरेंद्र आहेर, गिरीश औरकर, भाग्यश्री राजभोज, नरेंद्र आहेर यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

दोन दिवसात निघणार तोडगा ?

विद्यार्थ्यांच्या तक्रारीबद्दल दोन दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी विद्यार्थ्यांना दिले. मात्र, विद्यार्थी यावर समाधानी नाही. उत्तर पत्रिका गहाळ करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी नामवंत विद्यापीठ कसे काय खेळू शकते? असा सवालही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधांसाठी सामान्यांची भटकंती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या एक दिवसीय बंदमुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले. बंद १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. मात्र, अत्यावश्यक औषधांच्या उपलब्धतेसाठी सर्वसामान्यांना पायपीट करावी लागली. तर, अन्न व औषध प्रशासनाच्या हेल्पलाईनमुळे अनेकांना औषधे उपलब्ध झाली.

औषधांच्या ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या धोरणाला तीव्र विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी बुधवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळला. जिल्ह्यातील पाच हजार औषध विक्रेत्यांनी या संपात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचा दावा नाशिक असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पाठक यांनी केला. सरकारने ऑनलाईन फार्मसीचे तोटे लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केमिस्ट संघटनांनी केली. या संपामुळे मात्र सर्वसामान्यांना दैनंदिन गरजेची तसेच अत्यावश्यक औषधे मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. काही औषध विक्रेत्यांनी छुप्या पद्धतीने औषधे उपलब्ध करुन दिली. पण, त्यासाठी सर्वसामान्यांकडून औषधांसाठी अधिकची रक्कमही घेण्यात आली. हॉस्पिटलला लागून असलेल्या औषध दुकानांमध्ये औषधे उपलब्ध होतील, असे एफडीएच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, बहुतांश औषध दुकानदारांनी हॉस्पिटलच्या पेशंटसाठी औषधांची सेवा दिली. पण, बाहेरुन येणाऱ्या ग्राहकांना संपात सहभागी असल्याचे सांगत औषध देण्याचे टाळले.

आम्हा सर्व अधिकाऱ्यांना सकाळपासून फोन येत होते. त्यानुसार ज्या भागात औषधे हवी आहेत तेथे उपलब्धता होण्याबाबत आम्ही सूचित केले. त्यानुसार सर्वसामान्यांना औषधे उपलब्ध करुन देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. - दुष्यंत भामरे, सहायक आयुक्त, एफडीए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुकसानीपोटी हवी पावणेदोन कोटींची भरपाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थातील तथाकथित यशाचे श्रेय लाटण्यात अधिकारी वर्ग व्यस्त असताना, दुसरीकडे पहिल्या पर्वणीतील नुकसानाच्या भरपाईपोटी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तब्बल पावणे दोन कोटी रुपयांची मागणी केली आहे. सिंहस्थातील यशापयशाचा संभ्रम निर्माण करणाऱ्या या वस्तुस्थितीमुळे प्रशासनाचा बुरखा उघडा पडला आहे.

कुंभमेळ्यात प्रवासी वाहतुकीची सर्व भिस्त राज्य मार्ग परिवहन महामंडळावर होती. कुंभमेळ्यातील तीन पर्वण्यांना सुमारे पाच कोटी भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने प्रवासी वाहतुकीचेही नियोजन केले. सर्व रस्त्यांवर केवळ एसटी बसेसच धावणार असल्याने दोन हजार ऐवजी तीन हजार बसेस सज्ज ठेवण्याचे फर्मान जिल्हा प्रशासनाने सोडले. सिंहस्थात पाचशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल आणि त्यातून एसटी महामंडळाचे दारिद्र्य काही प्रमाणात कमी होईल, अशी आशा महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या मनात निर्माण झाली.

पहिल्या पर्वणीपूर्वीच महामंडळाने नागपूर, अमरावतीसह राज्यातील विविध भागांतून बसेस बोलावल्या. मात्र, भाविकांनी पहिल्या पर्वणीकडे पाठ फिरविल्याने तीन हजार बसेसपैकी तब्बल अकराशे बसेस जागेवरच थांबून राहिल्या. केवळ १,९३२ बसेसचीच प्रवाशी वाहतुकीसाठी मदत घेण्यात आली. एका बसची २४ तासांसाठी १६ हजार रुपये याप्रमाणे पहिल्या पर्वणीच्या दिवशी झालेल्या नुकसानापोटी जिल्हा प्रशासनाकडे भरपाईची मागणी करा, असे आदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने नाशिक विभागाला दिले आहेत. त्याप्रमाणे महामंडळाने एक कोटी ७० लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

दिवाळीऐवजी दिवाळखोरी!

भाविकांचा प्रतिसाद नसल्याने नागपूर, अमरावतीकडील बसेस माघारी पाठविण्याची नामुष्की महामंडळावर ओढावली. अपेक्षित उत्पन्नाअभावी महामंडळाचा भ्रमनिरास झाला असताना जिल्हा प्रशासनाकडून अजूनही सिंहस्थ यशस्वीतेचे पोवाडे गायले जात आहेत. काही अधिकाऱ्यांना तर सत्कार सोहळ्यासाठी अमेरिकेला पोहोचल्याची स्वप्नेही पडू लागली आहेत. जिल्हा प्रशासन अशा खुशीच्या माहोलात धुंद असताना बक्कळ नफा कमावण्याची संधी हातची गेल्याने एसटी महामंडळावर तोंड झोडून घेण्याची वेळ आली आहे. दिवाळी जोरात होण्याऐवजी दिवाळखोरीत जाण्याची वेळ एसटीवर आल्याची सार्वत्रिक भावना व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारो बांधकाम फाइल्स रखडल्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने विकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे धोरण स्वीकारल्यापासून बिल्डरांनी नगररचना विभागाकडे भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल करणेच थांबवले आहे. एफएसआय व कपाटांसंदर्भात कठोर धोरण स्वीकारल्याने गेल्या वर्षभरापासून एकही अर्ज कम्प्लिशनसाठी आलेला नाही. त्यामुळे तब्बल चार हजार तीनशे फाइल्स रखडल्या आहेत. बिल्डरांनी नियमाच्या बाहेर जावून इमारतींमध्ये बांधकामे केल्याने त्यांना भोगवटा प्रमाणपत्र मिळणे शक्यच नाही. बांधकाम परवानग्यांना बिल्डरच आठकाठी करीत असल्याचा आरोप महापालिकेने केला आहे.

नगररचना विभागात सहाय्यक नगररचना संचालकपदी विनय शेंडे दाखल झाल्यापासून त्यांनी नाशिक विकास नियंत्रण नियमावली प्रमाणे भोगवटा प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे मंजूर प्लॅनमध्ये बिल्डरांनी केलेले परस्पर बदल हे बिल्डरांसाठीच अडचणीचे ठरले आहेत. कपाटांमुळे प्रत्येक प्लॅटमध्ये ३० ते ४० स्क्वेअर फूट बांधकाम वाढल्याने व एफएसआयचा चुकीचा वापर केल्याने नगररचनाने नियमावर बोट ठेवत अशा पाचशेच्या वर फाइल्स भोगवटा प्रमाणपत्रासाठी थांबवून ठेवल्या आहेत. तर बदल झालेल्या प्लॅनला महापालिकेने कम्प्लिशन सर्टीफिकेट द्यावे यासाठी बिल्डर आग्रही आहेत. मात्र, ही बाब आपल्या अखत्यारित नसल्याचे सांगून महापालिकेने राज्य सरकारकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे या वादात बिल्डरांच्या फाइल्सच मंजूर होण्याची शक्यता नसल्याचे चित्र आहे.

फाईल्सधारकांना नोटिसा?

कम्प्लिशनसाठी अर्जच न करणाऱ्या ४३०० फाइल्सधारकांना महापालिका विचारणा करणार आहे. त्यांच्याकडून संबंधित कागदपत्रे मागवून इमारतींची पाहणी करून सर्टिफिकेट दिली जाणार आहेत. त्यामुळे आता बिल्डरांना नोटिशीची तयारी ठेवावी लागणार आहे.

गेल्या वर्ष-दीड वर्षापासून बिल्डरांकडून भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्जच दाखल होत नाहीत. अर्ज दाखल का करीत नाहीत, अशी विचारणा आम्ही करणार आहोत. - डॉ. प्रवीण गेडाम, महापालिका आयुक्त

बांधकामाना उशीर होत असल्या कारणाने पूर्णत्वासाठी अर्ज दाखल करण्यास उशीर होत असेल. तमंदी असल्याने काहींनी कामच थांबवले आहे. क्रेडाईच्या मेम्बर्सपेक्षा इतर बिल्डरांची संख्या शहरात जास्त आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अशी बांधकामे झाली असतील. त्याचा क्रेडाईशी संबंध नाही. - जयेश ठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संविधानाचा स्वीकार म्हणजेच धम्म स्वीकार

$
0
0

पत्रकार संजय आवटे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा ही जगातील मानवी इतिहासातील सर्वात मोठी अहिंसक क्रांती असून अखंड विश्वातील तमाम प्रकारच्या गुलामीतून मानवास मुक्त करणारी अभूतपूर्व क्रांती होती. त्यांनी लिहिलेल्या संविधानाचा स्वीकार म्हणजे धम्माचा स्वीकार असे म्हटल्यास वावगे ठरू नये, असे प्रतिपादन पत्रकार संजय आवटे यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती आणि ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या वर्धापनदिनानिमित्त लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने धर्म, धम्म आणि भारतीय संविधान या विषयावरील व्याख्यानात आवटे बोलत होते.

जगातील सर्व धर्म देव-ईश्वर दैवताला देवालयात शोधत असताना तथागत बुध्दाने तो समस्त गणराज्यात संघ शासनात असल्याचे सांगून धम्म आणि भारतीय संविधान हेच जगाला तारक असल्याचे सांगितले. मानवतावादी, समतावादी कार्यकर्ते, विचारवंतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी नाते सांगणाऱ्यांनी त्यांच्या विचार कार्याशी इमान राखा, असे आवटे म्हणाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठानचे संस्थापक कार्याध्यक्ष शरद शेजवळ, सल्लागार प्रकाश वाघ, प्रा. कविता कर्डक, शिवाजी भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अर्जुन कोकाटे होते. प्रारंभी बोधी वृक्षाला पाणी देत मुक्ती काव्य संमेलन व आंबेडकरी प्रबोधन शाहिरी जलशा व जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. शंकर जाधव यांनी सूत्रसंचलन केले. काव्य संम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी शिवाजी भालेराव होते. लक्ष्मण बारहाते, सचिन साताळकर, राहुल आढांगळे, महेश शेटे, रतन पिंगट, भास्कर चव्हाण यांनी सामाजिक प्रबोधनपर कविता सादर केल्या. लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान कला पथक नाशिकच्या कलावंतांनी प्रबोधनपर शिवाजी, फुले, आंबेडकरी शाहिरी जलशा सादर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन, क्रीडा प्रबोधिनी आणि यशवंत व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ६२व्या वरिष्ठ गटाच्या पुरुष आणि महिलांच्या अजिंक्यपद आणि निवडचाचणी स्पर्धेला सुरुवात झाली.

यशवंत व्यायाम शाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यांमध्ये बाद पद्धतीच्या सामन्यातून मुख्य साखळीसाठी एकलव्य (मनमाड), उत्कर्ष (सय्यद पिंपरी), ब्रह्म स्पोर्ट (आडगाव), राजभाऊ तुंगार पतसंस्था (शिंदे), कलिका माता (मनमाड), नाशिक शहर पोलिस, भारतमाता (मनमाड), एन. व्ही. एच. (मालेगाव), जय भवानी (मनमाड), अशोक (मनमाड), यशवंत क्रीडा प्रबोधिनी (नाशिक) हे संघ पात्र ठरले आहेत.

स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील पुरुषांचे ३६ तर महिलांचे ८ संघ सहभागी झाले आहेत. संघांची मोठी संख्या लक्षात घेता पाच अद्ययावत मैदाने तयार करण्यात आली असून या सर्व मैदानावर प्रकाशझोतात सामने खेळविले जात आहेत.

स्पर्धेचे उद्‍घाटन भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या हस्ते झाले. 'खेळाडूंनी पोलिस भरतीस प्राधान्य दिल्यास त्याचा फायदा खेळाचे कौशल्य दाखविण्यास होईल. त्याचप्रमाणे पोलिस दलालाही चांगले मनुष्यबळ मिळेल,' असे आवाहन कड यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक चार्टड अकाउंट सस्थेचे अध्यक्ष उल्हास बोरसे, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार जयंत जाधव, प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड, महाराष्ट्र कबड्डी असो. सहसचिव प्रकाश बोराडे, क्रीडा अधिकारी, महेश पाटील, सतीश सूर्यवंशी, रंगनाथ शिंदे, बाळासाहेब जाधव, सुरखा काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिलजित सेठींचे आज व्याख्यान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत नाशिक आल्याने आता स्थानिक संस्था-संघटनांनीही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरिअर डिझायनर्स (ट्रिपल आयडी)च्या नाशिक शाखेच्या वतीने जगप्रसिद्ध वास्तूविशारद ग्रुप कार्लसनचे उपाध्यक्ष दिलजीत सेटी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) दुपारी ३ वाजता तिडके कॉलनीतील हॉटेल एसएसके येथे या शहरातील निवडक व्यक्ती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सेटी हे स्मार्ट सिटीबाबतचे सादरीकरण करणार असल्याचे ट्रीपल आयडीचे अध्यक्ष हेमंत दुगड यांनी सांगितले आहे. सेटी हे अमेरिकेत नामांकीत वास्तुविशारद म्हणून ओळखले जातात. वॉशिंग्टन येथील मायक्रोसॉफ्ट कॅम्पससह जगभरातील अनेक वास्तूंचे डिझाईन्स त्यांनी बनविले आहे. संध्याकाळी ६ वाजता हे गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सेठी यांचे व्याख्यान होणार आहे. विविध देशांमधील नोकरी व व्यवसायाच्या संधी याबाबत ते मार्गदर्शन करुन सादरीकरण करणार असल्याचे सचिव तरन्नुम कादरी यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विश्वास ठाकूर यांना बेस्ट चेअरमन पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्लोकल स्ट्रेटेजिज् अ‍ॅण्ड सर्व्हिसेस या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या संस्थेमार्फत बँकिंग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करणाऱ्या बँकांसाठी व व्यक्तींसाठी 'फ्रँटियर्स इन को-ऑपरेटिव्ह बँकिंग पुरस्कार २०१५ जाहीर झाला असून यात विश्वास को-ऑप बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांना 'बेस्ट चेअरमन' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

गुणवत्ता, व्यवस्थापन कौशल्य, दर्जा यात सातत्याने लक्षणीय प्रगतीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. गोवा येथील हॉटेल हॉलीडे ईन रिसोर्ट कॅव्हीलेसीममध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात बँकेचे उपाध्यक्ष विलास हावरे व संचालक घनःश्याम येवला यांनी पुरस्कार स्व‌ीकारला. नॅफकॅबचे अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर व रिझर्व्ह बँकेचे जनरल मॅनेजर राधाकृष्णन, बँकिंग फ्रंटीयर्सचे मनोज अग्रवाल, बाबू नायर आदी उपस्थित होते.

भारतातील सहकारी बँकिंग विश्वात माहिती तंत्रज्ञान व आधुनिक व्यवस्थापन प्रणाली या गुणांवर आपले वेगळेपण सिद्ध केलेल्या विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक या नामांकित बँकेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

सहकारी संस्थांच्या कामकाजात सुसुत्रता आणणे व गुणात्मक मूल्य वाढविण्याच्या दृष्टीने सहकारी धोरणांचा आढावा घेणाऱ्या शासनाच्या अनेक समित्यांमध्ये ठाकूर यांनी प्रातिनिधीत्त्व केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स् असोसिएशन लि.,मुंबई या संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत. पुरस्कारानंतर बोलतांना विश्वास ठाकूर म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कार्यक्षम व तत्पर ग्राहकसेवा या त्रिसूत्रीच्या वापरामुळे बँकेची वाटचाल कॉर्पोरेट बँकिंगकडे सुरु आहे. या पुरस्काराबद्दल सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडा, राजकीय, सहकार अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ठाकूर यांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुर्वेदाच्या परिभाषेला संस्कृतचे कोंदण

$
0
0

संस्कृत अभ्यासक अतुल तरटे यांचे मत

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयुर्वेद या प्राचीन शास्त्राच्या मांडणीसाठी समृध्द अशा संस्कृत भाषेचे कोंदण लाभले आहे. या भाषेच्या सामर्थ्याने आयुर्वेदातील सूक्ष्म निरीक्षणे आणि अचूकता समर्थपणे अधोरेखित केली आहे. पुरातन विज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा मेळ साधून मानवाचे कल्याण साधण्यासाठी संस्कृत भाषेचा अभ्यास दुवा ठरेल, असा विश्वास संस्कृत विषयाचे अभ्यासक अतुल तरटे यांनी व्यक्त केला.

पंचवटीतील सप्तशृंगी आयुर्वेद कॉलेजातील विद्यार्थ्यांसाठी सात दिवसीय 'संस्कृत व्याकरण व संभाषण कौशल्य' या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. आयुर्वेदातून संस्कृत वजा केल्यास आयुर्वेदाची कल्पना करता येणार नाही. शास्त्र आणि भाषा यांच्यातील एकरुपता हीच आयुर्वेदाचे वैशिष्ट्य बनली आहे. आयुर्वेदात चरक आणि सुश्रूत यांसारख्या महान ऋषींनी रचलेल्या ग्रंथांमधील ज्ञान आत्मसात करण्यासाठी संस्कृत अध्ययनाच्या साधनेला पर्याय नाही. आधुनिक विज्ञानालाही काही प्रसंगी थक्क करणारे तर काही प्रसंगी काळानुरून पोषक ठरणारे संदर्भ सूत्र हे आयुर्वेद ग्रंथांमधून प्रकटतात. ही काळाच्याही पल्याड जाणारी व मानव जातीसाठी उपकारक ठरणारी संदर्भ सूत्रे आकलन करण्याचा ध्यास आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी बाळगावा. हा दृष्टीकोनच भविष्यात निष्णात वैद्यांची घडवणूक करेल, असाही विश्वात तरटे यांनी व्यक्त केला.

उपक्रमाच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलींद आवारे, प्रथम वर्ष वर्गाचे समन्वयक डॉ. प्रा. अरुण भुजबळ, डॉ. प्रा. ज्ञानदा भुजबळ आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कॉलेज पत्रव्यवहार संस्कृत भाषेतून करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. आवारे यांनी विद्यार्थ्यांना केले. डॉ. भुजबळ यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. भुजबळ यांनी प्रास्तविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिनेमा कट्टामध्ये आज ‘मुलादे’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विश्वास को-ऑप बँकच्या वतीने 'सिनेमा कट्टा' उपक्रमांतर्गत रसिकांसाठी शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी साडे सहा वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक ओसमान सेम्बेने यांचा 'मुलादे' हा आफ्रिकन भाषेतील चित्रपट दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट क्लब हाऊस, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकर नगर, गंगापूर रोड येथे दाखविण्यात येणार आहे.

सेनेगलचे जगप्रसिद्ध दिग्दर्शक ओसमान सेम्बेने स्वतंत्र वसाहत्तोत्तर अफ्रिक्रेचे पहिले महत्वाचे चित्रपट दिग्दर्शक आहेत. आफ्रिकेतील स्त्रियांचे प्रश्न त्यांनी आपल्या चित्रपटातून हाताळले आहेत. त्यापैकीच हा मुलादे किंवा जादुई संरक्षण. आफ्रिकेतील प्रचलीत मुलींच्या पारंपारिक प्रथेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या महिलांची ही गोष्ट आहे. एका खेडेगावात घडणारी ही गोष्ट त्याच गावात येणारी आधुनिकता व गावातील जुन्या परंपरा प्रथा यांचा संघर्ष व त्यात गावातील महिलांची भूमिका मांडणारा हा चित्रपट नक्कीच स्फूर्तीदायक ठरावा. स्त्रियांच्या संघर्षाबरोबर खेडेगावातील आफ्रिकेचे रंगतदार व वास्तववादी चित्र या चित्रपटातून आपल्या समोर येते.

या चित्रपट सफरीत सामील होण्यासाठी आपल्या सर्वांना आग्रहाचे आमंत्रण. २००४ साली प्रदर्शित झालेल्या या रंगीत चित्रपटाचा कालावधी १२५ मिनिटांचा आहे. 'मूलादे' हा चित्रपट बघण्यास नाशिककर रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ठाकूर, उपाध्यक्ष विलास हावरे, जनसंपर्क संचालक मंगेश पंचाक्षरी, संचालिका वैशाली होळकर, संचालक डॉ.वासुदेव भेंडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार अपघातात विद्यार्थी ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वेगात असलेल्या कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात शाहू सुनील पाटील (वय २१) हा इंजिनीअरींगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी ठार झाला. ही घटना आज, गुरूवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास के. के. वाघ इंजिनीअरींग कॉलेजसमोरी तारवालानगर-हिरावाडी रिंगरोडवर घडली.

गंगापूररोडवरील निर्माला कॉनव्हेंट हायस्कूल जवळी चैतन्यनगर परिसरात राहणारा शाहू पाटील आपल्या मैत्रणीसमवेत रिंगरोडने जात असताना कमलनगरच्या पाठीमागील बाजुस त्याच्या कारचे (एमएच १५ सीडी ८४३६) टायर फुटले. यावेळेस कार वेगात होती. टायर फुटल्याने शाहूचा कारवरील ताबा सुटून कारने दोन ते तीन पलट्या मारल्या. यात, शाहूसह त्याची मैत्रीण गंभीर जखमी झाली. शाहूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुध्दावस्थेत होता. तर त्याच्या मैत्रणीला दुखापत झाली होती. कारमध्ये सापडलेल्या कॉलेजच्या प्रोजेक्ट रिपोर्टवरून नागरिकांनी शाहूची ओळख पटवली. त्याला तत्काळ सिव्ह‌िल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोष‌ित केले. शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. खेळामध्ये विशेष रूची असलेल्या शाहूच्या अकाली मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. याप्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीनंतरही प्रचाराचे एसएमएस

$
0
0

फैज बँकेच्या एकता, अपना पॅनलचा प्रचार संपेना

म. टा. प्रतिनिधी, जुने नाशिक

बहुसंख्य मुस्लिम सभासद असलेली दि फैज मर्कंटाईल को-आप. बँकेची पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रीया पूर्ण झाली. या बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचीही निवडीची प्रकिया पार पडली. मात्र, निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन करणारे दूरध्वनी आणि एसएमएस येत असल्याने बँकेचे मतदार असलेले सभासद बुचकळ्यात पडले आहेत.

फैज बँकेची निवडणूक पूर्ण होऊन महिना उलटला आहे. या निवडणुकीत सर्व जागांवर अपना पॅनल नमवित एकता पॅनलने‌ विजय मिळविला. तर सपाटून मार खाल्लेच्या अपना पॅनलचा अद्यापही निवडणूक सुरू असल्याचा भास निर्माण करणारा प्रचार संपला नाही.

फैज बँकेच्या निवडणुकीत मातब्बर उमेदवार असलेल्या अपना पॅनलला पराभावाला सामोरे जावे लागले. निवडणुकीत हार पत्करावी लागली. तर एकता पॅनलने सर्व जागांवर विजय मिळवत एक हाती सत्ता खेचून आणली; मात्र निवडणूक संपल्यानंतरही दोन्ही पॅनलची प्रचार यंत्रणा जागीच आहे. दोन्ही पॅनलशी सभासदांमध्ये दूरध्वनी एसएमएसव्दारे प्रचार करणाचा करार करणाऱ्या कंपनीला निवडणूक संपल्याचा विसर पडला आहे. दोन्ही पॅनलचा दूरध्वनी एसएमएस प्रचार सुरु आहे. त्यामुळे सभासदांमध्ये निवडणूक पुन्हा होत असल्याचा संभ्रम निर्माण झाला आहे. हा प्रचार चर्चेचा विषय बनला आहे. यामुळे सभासदांचे चांगलेच मनोरंजनही होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेत पुन्हा समितीचे नियंत्रण

$
0
0

भुजबळाकडून पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी; निवडणुका असल्याने वाद टाळण्याचा सल्ला

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीची सत्ता असून, पक्षातीलच सदस्यांचे व पदाधिकाऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री छगन भुजबळांच्या दरबारात वाद नेला. भुजबळांनीही अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना वाद विवाद थांबवून तात्काळ प्रश्न मार्गी लावा अन्यथा घरी बसावे लागेल, असा इशारा अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना दिला. सोबतच वाद टाळण्यासाठी जिल्हा प‌रिषदेतील कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी समितीची घोषणा केली. जयश्री पवार अध्यक्ष असतानाही अशीच समिती नियुक्त करण्यात आली होती.

जिल्हा परिषदेतील सध्याच्या कारभाऱ्यांनी गतवेळच्याच कारभाऱ्यांचा कित्ता गिरवला असून, गेल्या वेळेप्रमाणेच फाईलींची अडवाअडवी करत, बुद्धीबळाचा खेळ खेळला जात आहे. सध्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांना कारभार हातात घेऊन एक वर्ष होवूनही विकास कामे मार्गी लागत नाहीत. फाईली मध्येच अडविल्या जात असल्याचा तक्रारी या विरोधकांच्या नव्हे, तर सत्ताधारी गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या व सदस्यांच्या आहेत. जयश्री पवार अध्यक्ष असतानाही सत्ताधाऱ्यांचीच कामे अडवली जात होती. त्यामुळे पहिले अडीच वर्ष असेच वाया गेले होते. त्यानंतर ही परिस्थिती सुधारेल असे चित्र होते. मात्र वर्तमान पदाधिकाऱ्यांनीही पूर्वीचाच कित्ता गिरवल्याने आता सत्तेचा वाद भुजबळांपर्यंत पुन्हा पोहचवण्यात आला. हा वाद आणखीन वाढू नये म्हणून भुजबळांनी राष्ट्रवादी भवनात या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेत, त्यांचीच खरपट्टी काढली. प्रत्येक पदाधिकाऱ्यांची तक्रार त्यांनी ऐकून घेतली. सर्वांच्या तक्रारींचा सूर अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्याकडून विकासकामांच्या फाईलींची अडवणूक करण्यात येत असल्याचा लक्षात आल्यानंतर भुजबळ संतापले.

'वर्षभरानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे जनतेला कामे दिसली पाहिजेत अशी कृती करा' असा सल्ला त्यांनी दिला. 'तुम्हाला निवडायचे नसेल तर, तसे सांगा' असा दमही त्यानी सदस्यांना भरला. 'जनतेची जास्तीत जास्त कामे करावीत, कोणत्याही कामांना विलंब होता कामा नये,' अशा सूचना त्यांनी सदस्यांना देत, कारभारावर नियंत्रण देण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली. सदस्यांना येणाऱ्या अडचणी व त्यांची कामे मार्गी लागण्यासाठी ही समिती काम करणार असून, त्यात अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापती उषा बच्छाव, किरण थोरे, गटनेते रवींद्र देवरे, यतिन पगार, बाळासाहेब गुंड, शैलेश सूर्यवंशी यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वजनी फाईल्सला लागतो ब्रेक

गेल्याच सत्ताधाऱ्यांचा कित्ता वर्तमान पदाधिकाऱ्यांनी कायम ठेवला आहे. अर्थपूर्ण घडामोडींशिवाय फाईल्स पुढे सरकावायच्या नाहीत, असा प्रघातच जिल्हा परिषदेत पडला असून त्या घडामोडी पूर्ण झाल्याशिवाय फाईल्सला गती दिली जात नाही. त्यामुळेच ठिकठिकाणी फाईल्सना ब्रेक लावला जातो. पदाधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण वादामुळे प्रशासनाचीही अडचण होत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधील सुंदोपसुंदीने अधिकारी भरडले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रासबिहारी आयोजित विज्ञान प्रदर्शनाचा समारोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विज्ञानाचा प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाचा गुरुवारी समारोप झाला. सिटी सेंटर मॉल येथे या दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विज्ञानविषयक संकल्पना समजावून घेतल्या.

मुंबईच्या 'होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशन' येथील विद्यार्थ्यांनी डिझाईन केलेले मॉडेल्स येथे सादर करण्यात आले होते. डॉ. अब्दुल कलाम यांच्यामुळे देशाला विज्ञान क्षेत्रात एक नवी ओळख मिळाली. जागतिक स्तरावर भारताचे नाव त्यामुळे उंचावले गेले. त्यांच्या कार्याला समाल करण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, यासाठी शाळेने या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. दैनंदिन वापरातील गोष्टींमागे विज्ञान कशाप्रकारे दडले आहे? याची जाणीव विद्यार्थ्यांना यामार्फत करुन देण्यात आली. रासबिहारीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थितांना माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कीर्ती कला मंदिराची बालाजी मंदिरात नृत्यसेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कापडपेठेतील बालाजी मंदिरात यंदाही परंपरेनुसार ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्ती कला मंदिराच्या शिष्यांनी 'उत्सव नुपूरांचा' हा कार्यक्रम सादर केला. रुद्र म्हणजे महादेवाचा उग्र अवतार याचं प्रगटीकरण शिव तांडवामधून यावेळी दाखवण्यात आले. या नृत्य प्रकारातून होणारा क्रूरतेचा आणि नकारात्मक शक्तींचा नाश कथ्थक रूपातून मांडण्यात आला.

नुपूर, नाद व स्वरांचा मेळ साधत पं. विष्णू दिगंबर पलुस्कर रचित यांच्या ' दिजे दरसमोहे चतुर भूजन कर' या अनवट बंदिशीने वंदना सदर करून कार्यक्रमाला सुरवात झाली. पंडित गोपिकृष्णजी यांच्या शिष्या रेखा नाडगौडा यांच्या शिष्यांनी 'रुद्र' ही संकल्पना सादर करून उपस्थित रसिकांची वाहवा मिळविली. तराणा आणि `दिजे` यांचे नृत्य दिग्दर्शन आदिती पानसे यांनी तर 'रुद्र' संकल्पनेचे दिग्दर्शन अश्विनी काळसेकर यांचे होते. त्यानंतर शिववंदना सादर करण्यात आली. 'सोहम हर डमरू बाजे' हे तांडव नृत्य सादर केले. तराणा आणि भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. रमेश बालाजीवाले, विक्रम बालाजीवाले, हर्षवर्धन बालाजीवाले आणि आदिती पानसे यांनी कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन केले तर वैशाली बालाजीवाले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषिविज्ञान केंद्रातर्फे कृषि तंत्रज्ञान महोत्सव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषि विज्ञान केंद्र आणि आत्मा, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रात होणाऱ्या या महोत्सवादरम्यान रब्बी शेतकरी संमेलन कार्यक्रमाचेही यानिमित्ताने खास आयोजन करण्यात आले आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्‍घाटन आज, शुक्रवार १६ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते होणार असून, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंके कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. कृषि तंत्रज्ञान महोत्सवानिमित्त कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने, कृषि प्रदर्शन, केंद्रावर असलेल्या विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांना भेटींचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भरविण्यात येणाऱ्या कृषि प्रदर्शनात सर्व शासकीय संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती एकाच छताखाली शेतकऱ्यास मिळावी या उद्देशाने कृषि व कृषि संलग्न विविध शासकीय विभाग, या कार्यक्रमानिमित्त कृषि प्रदर्शनात आपापल्या विभागाचे माहितीपर स्टॉल मांडून शेतकऱ्यांना विविध योजनांबद्दल माहिती पुरविणार आहेत.

गोविलकरांचे व्याख्यान

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे विविध प्रश्नांचे शंका समाधान करण्यात येईल. सुप्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांचे 'सामाजिक संरक्षण आणि कृषि ग्रामीण गरिबी निवारण' या विषयावर शनिवार १७ रोजी तर भात शास्रज्ञ डॉ. विजय देशपांडे यांचे 'आधुनिक भात शेती पद्धती' या विषयावरील व्याख्यान रविवार १८ रोजी होणार असून, या महोत्सवाचा समारोप विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी खरेदीसाठी आता कार्यपध्दती निश्चित

$
0
0

तेवीस वर्षांनंतर प्रथमच खरेदी धोरणात बदल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य शासनाची विविध कार्यालये, शासकीय उपक्रम, स्वायत्त संस्था इत्यादींसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंची खरेदी करण्याबाबत तयार करण्यात आलेल्या नवीन खरेदी धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. गेल्या तेवीस वर्षांनंतर प्रथमच खरेदी धोरणात मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आला आहे. दर करार पद्धत काही अपवाद वगळता जवळपास संपुष्टात आणली गेली आहे. महाराष्ट्र टाइम्सने तीन महिन्यांपूर्वी निविदेचा घोळ अशी वृत्तमालिका चालवली होती व यासाठी सुयोग्य खरेदी धोरण असावे, अशी भूमिका मांडली होती.

यावर १४ ऑक्टोबर रोजी सरकारने एका शासकीय निर्णयाद्वारे नवीन खरेदी धोरणास मान्यता दिली आहे. सरकारी पातळीवर होणाऱ्या खरेदी प्रक्रियेत पारदर्शकतेची गरज, संगणकीकरण व वस्तूंच्या वाढलेल्या किंमती या सर्व गोष्टींचा विचार करुन खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी नवीन खरेदी धोरण तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ३० जुलै २०१५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याचे प्रारूप सादर करून त्यास तत्त्वत: मान्यता घेण्यात आली होती. बैठकीत या प्रारूपावर चर्चा होऊन करण्यात आलेल्या सूचना व सुधारित निर्णयांचा या नव्या नियमावलीत समावेश करण्यात आला आहे.

नवीन खरेदी धोरण लागू झाले असून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आलेल्या अडचणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच सर्व संबंधित तीन महिन्याच्या आत उद्योग विभागाच्या निदर्शनास आणून देणार आहेत. या खरेदी धोरणामध्ये स्विस चॅलेंज व इलेक्ट्रॉनिक रिव्हर्स ऑक्शन या नवीन खरेदीच्या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या अधिनियमाप्रमाणे शासकीय खरेदीत महाराष्ट्र राज्य हातमाग महासंघ व महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, नागपूर या दोन संस्थांच्या ११ वस्तूंसाठी आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. अंध व अपंग यांच्या धर्मादाय संस्था यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या दरनिश्चितीसाठी आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे.

खरेदीसाठी ई-निविदाच!

नवीन धोरणानुसार खरेदीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी यापुढे ३ लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याची

सर्व खरेदी ई-निविदा पद्धतीने करण्यात येणार आहे. सूक्ष्म व लघू उद्योगांमार्फत खरेदी करण्यासाठी एकूण २४१ वस्तू राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अशा वस्तूंसाठी निविदा प्रक्रिया अवलंबिण्यात येणार आहे. राखीव वस्तूंची खरेदी शंभर टक्के सूक्ष्म व लघू उद्योगांकडून करताना त्यापैकी वीस टक्के खरेदी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या उद्योजकांकडून करण्या‍त येणार आहे. ज्या वस्तू दोन किेवा अधिक प्रशासकीय विभागांना खरेदी करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांनी मागणी केल्यास अशा वस्तूंची खरेदी मध्यवर्ती भांडार खरेदी समितीकडून (सीएसपीओ) करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क. का. वाघ महाविद्यालयाचे नौकानयन स्पर्धेत नेत्रदीपक यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिंगोली जिल्ह्याच्या औंढ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणावर झालेल्या राज्यस्तरीय नौकानयन स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या पिंपळगाव येथील क. का. वाघ महाविद्यालयाच्या नौकानयनपटूंनी कॅनॉईंग या क्रीडा प्रकारात नेत्रदीपक यश प्राप्त केले.

सागर गाढवे याने २०० मीटर, ५०० मीटर व १ हजार मीटर अंतराच्या शर्यतीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करताना तीनही सुवर्णपदके पटकविली. तसेच सीटू या प्रकारात सुलतान देशमुख व सागर नागरे या जोडीनेदेखील २०० मीटर, ५०० मीटर व १ हजार मीटर अंतराच्या शर्यतीत सुर्वणपदके मिळविली. स्पर्धेत ३ सुवर्णपदके मिळविणाऱ्या पिंपळगावच्या सागर गाढवेला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

हे सर्व खेळाडू पिंपळगावच्या कादवा नदीत प्रा. हेमंत पाटील व पी. एम. खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. नौकानयनमधील कॅनॉइंग या साहसी व अवघड प्रकाराच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत एकूण ९ सुवर्णपदके पटकविणाऱ्या नौकानयनपटूंचा सत्कार मविप्रच्या सरचिटणीस नी‌ल‌िमाताई पवार, सभापती नानासाहेब दळवी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बी. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायन्स क्लबचा सप्ताह आगळ्या पद्धतीने साजरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजोपयोगी कामे करण्यास नेहमीच तत्पर असलेला लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टारच्या ऑक्टोबर सेवा सप्ताहांतर्गत अनेक सेवकार्ये करण्यात आली. यात शिक्षणासाठी मुली दत्तक घेणे, स्त्री भ्रूण हत्येविरोधी जनजागृती करणे, चिंचोली गावांत गावकऱ्यांची मोफत रुग्ण तपासणी शिबिर यांचा समावेश आहे

अध्यक्ष ऊर्जा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक स्टारने प्रामुख्याने प्लास्टिक विरोधी अभियान हाती घेतले. या उप्रकमाचा आकाशवाणी टॉवर , गंगापूर रोड येथे प्रारंभ करण्यात आला. यावेळी क्लबच्या सदस्यांनी अनेकांच्या हातून प्लास्टिक पिशव्या घेऊन त्या बदल्यात कापडी पिशव्या दिल्या. पर्यावरण समतोल राखण्यात महत्त्वाचा भाग असलेल्या चिमण्या कमी होत असल्याच्या कारणावरून चिमणी घरटे वाटप सुद्धा वर्षभरात करण्याचे योजिले आहे.

सेवा सप्ताहाची सांगता १५० मुलींना स्व संरक्षणाचे धडे देऊन करण्यात आली. सेल्फ डिफेन्स अॅकॅडमीचे जितेंद्र यांनी आरंभ कॉलेज, नाशिकरोड येथील मुलींना स्व संरक्षणाचे धडे व निर्भय बना असा सल्ला दिला. लायन्स क्लब नाशिक स्टारचे पदाधिकारी नितिन मराठे, राम व नीलिमा डावरे, सचिव निशा व प्रशांत भारबट, खजिनदार डॉ. नुपूर प्रभू व डॉ. अमित प्रभू, डॉ विशाल व नीतू ठाकूर आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images