Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

उद्योगांना मिळणार बूस्ट

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्रीय विद्युत अणुसंधान संस्थेमार्फत नाशिकजवळील शिलापूरच्या सर्वे नंबर २२० मध्ये होणाऱ्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्राबरोबरच पश्चिम व दक्षिण भारतातील विद्युत उद्योगांचा आर्थिक, तांत्रिक व औद्योगिक विकास होण्यास या लॅबची भरीव मदत होणार आहे. जिल्ह्यात १५ मोठे व ४२० लघु-मध्यम विद्युत घटक नोंदणीकृत आहेत.

त्यांना तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्युत उपकरणे तपासण्यांसाठी या लॅबचा उपयोग होईल. सुमारे पावणे तीनशे तंत्रज्ञ आणि सहा हजार कामगारांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहे. सन १९६० मध्ये स्थापन झालेल्या केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थानचे (सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट) पुनर्गठण सन् १९७८ मध्ये करण्यात आले. या माध्यमातून या संस्थेला स्वायत्त दर्जा प्राप्त झाला होता.

नाशिक नजिक शिलापूर येथे या संस्थेच्या स्थापनेस ग्रीन सिग्नल मिळाल्याने राज्यभरात विद्युत उपकरणे निर्मितीचा उद्योग भरभराटीला येऊ शकतो. या लॅबमुळे विद्युत निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना राज्यातच सर्व प्रकारच्या संचांचे विद्युत परीक्षण करण्यासाठी संस्थेच्या प्रयोगशाळेचा उपयोग करणे शक्य होणार आहे. नाशिकमधील या इलेक्ट्रीक लॅबमुळे राज्यातील विद्युत निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना गती मिळणार आहे. राज्याच्या उर्जा क्षेत्रासाठी हे विशेष सकारात्मक मानण्यात येते.

खासदारांनी मानले आभार

लॅबसाठी जमीन मंजुरीस मान्यता देऊन प्रकल्प सुकर केल्याबद्दल खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार योगेश घोलप, मंत्री दादा भुसे उपस्थित होते.

नाममात्र दराने जागा उपलब्ध

लॅबसाठी बाराव्या पंचवार्षिक योजनेत १३६८.९० कोटी गुंतवणूक अपेक्षित आहे. खा. गोडसे यांनी पहिल्या टप्प्यासाठी ११५.३० कोटी यापूर्वीच मंजूर करून आणले आहेत. लॅब स्थापनेच्या प्रक्रियेला लवकर प्रारंभ होण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. त्यास यश आले. लॅबसाठी प्रचलित रेडिरेकनर दराऐवजी नाममात्र भाड्याने जागा देण्याची गोडसे यांनी केलेली मागणीही मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी मंजूर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस निष्क्रिय; तोतया सक्रिय

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थात रस्त्यावर ठिकठि‌काणी असणारे पोलिस आता दिसेनासे होताच चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. पोलिस असल्याची बतावणी करीत शहरात तोतया पोलिसांनी नागरिकांना लुबाडण्यास सुरुवात केली आहे. इंदिरानगर आणि उपनगर परिसरात एकाच दिवशी दोघांना लुटल्याच्या घटना घडल्याने पोलिसांपुढे आव्हान निर्माण केले आहे.

सिंहस्थाची तिसरी पर्वणी पार पडेपर्यंत शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे शहराला छावणीचे रूप आले होते. मात्र १८ सप्टेंबरला तिसरी पर्वणी संपताच टप्प्याटप्प्याने पोलिस बंदोबस्त शिथिल करण्यात आला. बाहेरगावाहून बंदोबस्तासाठी आलेले पोलिस पुन्हा आपल्या मुक्कामाच्या ‌ठिकाणी पोहोचल्याने नाशिक शहरातील रस्त्यांवरील पोलिस गायब झाले आहेत. सिंहस्थ काळात काहीसे शांत झालेले चोरटे आता पुन्हा कामाला लागले आहेत. चोऱ्या, घरफोड्यांमध्ये वाढ होत असतानाच आता तोतया पोलिसांनीही नागरिकांना भीती घालून त्यांना फसविण्यास सुरुवात केली आहे. भिकनअप्पा वसंतअप्पा पाथरफोडे (५९, रा. मोटवानी रोड, नाशिकरोड) हे उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गंधर्वनगरीतून मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास चालले होते. त्यावेळी दोघेजण मोटरसायकलवरून त्यांच्याजवळ आले. त्यांना खोटे ओळखपत्र दाखविले. आम्ही पोलिस आहोत. पुढे चोरी झाल्याने तपासणी सुरू आहे. तुम्ही एवढे दागिने घालून कुठे चाललात, अशी त्यांनी विचारणा केली. अंगावरील दागिने त्यांना पिशवीत ठेवण्यास सांगितले. त्यांच्या जवळील दागिने काढून पिशवीत ठेवण्याचा बहाणा करीत हे दागिने लांबविण्यात आले. सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या तीन चेनसह एक लाख २२ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांनी उपनगर पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दुसरी घटना इंदिरानगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सह्याद्री व्यायाम शाळेजवळ घडली. विजयमाला आत्माराम जाधव (६३, रा. चेतना नगर, सिडको) घराकडे मंगळवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास पायी चालल्या होत्या. तिघांनी त्यांना थांबविले. आम्ही पोलिस आहोत. शहरात चेन चोरीच्या घटना वाढत आहेत, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. चोरट्यांनी त्यांना दागिने पिशवीत ठेवण्यास सांगितले. फिर्यादी यांनी दागिने काढताच ते पर्समध्ये ठेवण्याचा बहाणा करीत चोरट्यांनी लांब‌विले. ५५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.

पोलिस करणार जनजागृती

अशा घटना यापूर्वी अनेकदा घडूनही नागरिक अशा भूलथापांना बळी पडतात. म्हणून पोलिस आता नागरिकांच्या जनजागृतीवर भर देणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त एन. अंबिका यांनी दिली. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत अशा घटना अधिक घडत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण असून, अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न असणार आहे. अशा प्रकारे कुणी बतावणी करीत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन अंबिका यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानाची वादळी सभा; वर्गणी दुप्पट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सभासदत्व रद्द केलेल्यांना सन्मानाने पुन्हा घ्या, संविध इन्फोटेकच्या स्मार्ट कार्डच्या थकलेल्या लाखों रूपयांचा मुद्दा, नव्या वाचकांना सभासदत्व त्वरित द्यावे त्यांना वेटिंगवर ठेवू नये, कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करावी आणि सर्वाधिक वादाचा ठरलेला मासिक वर्गणी पुनर्रचनेचा मुद्दा अशा नानाविध विषयांनी सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. सावानाच्या वर्गणीमध्ये दुपटीने वाढ करीत प्रचंड वादावादीनंतर हा ठराव मंजूर करण्यात आला.

सावानाची मासिक वर्गणी १० रूपयांवरून २० रूपये करीत गेल्या दोन वर्षांपासून पेंडिंग ठेवण्यात आलेल्या या मुद्द्याचा बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत निकाल लावण्यात आला. मात्र, त्यासाठी सत्ताधाऱ्यांना कमालीच्या टोकाचा विरोध सहन करावा लागला. तरीही न डगमगता आपले मुद्दे सभासदांना पटवून देत ही गेल्या कित्येक वर्षांपासून १० रूपये असलेली ही वर्गणी दुपटीने वाढविण्यात आली. वर्गणी वाढवू नये त्याऐवजी सभासदांची संख्या वाढवावी, परशुराम साईखेडकर नाट्यगृहाच्या भाड्यात वाढ करावी अशा सूचना विरोधकांनी मांडल्या. परंतु, अन्य सूज्ञ सभासदांच्या रेट्यापुढे विरोधकांचे काहीही चालले नाही व बहुमताने वर्गणी वाढीचा ठराव मंजूर करण्यात आला.

वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोधक काही समर्थकांकरवी गोंधळ घालण्याची शक्यता वर्तवत भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवत सभेसाठी पोलिस संरक्षण मागविण्यात आले होते. त्यानुसार याठिकाणी पूर्णवेळ पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. मात्र, त्यांनी हस्तक्षेप करावा इतका टोकाचा प्रसंग न आल्याने सत्ताधाऱ्यांचा हा समज वृथा ठरल्याचा चर्चाही यावेळी चांगल्याच रंगल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. विकास गोगटे यांना पुरस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजातील परिस्थितीचे भान ठेवत प्रामाणिकपणे कार्यरत असणाऱ्या डॉ. विकास गोगटे यांना यंदाचा वसंत पवार स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. अविनाश आंधळे यांनी दिली. लायन्स क्लब येथे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात बुधवारी (दि. ७) दुपारी ४ वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जनरल सर्जन डॉ. विनायक श्रीखंडे यांच्या हस्ते या पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलिमा पवार यांची विशेष उपस्थिती या सोहळ्यास असणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील समाजाभिमुख व्यक्तींना डॉ. वसंत पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. वसंत पवार स्मृती पुरस्कार 'योगदान' या सोहळ्याचे आयोजन करून दिला जातो. ज्या व्यक्ती प्रामाणिकपणे शिक्षण, वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत, अशा व्यक्तींना या पुरस्काराने २०१२ सालापासून दरवर्षी गौरविण्यात येते. या व्यक्तींचा गौरव करणे हे समाजासाठीही प्रेरणादायी असून त्यादृष्टीने निलवसंत मेडिकल फाऊंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटर प्रयत्नशील आहे, असे डॉ. आंधळे यांनी सांगितले. निलवसंत मेडिकल फाऊंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटरच्या अध्यक्ष डॉ. प्राची पवार यांनी आतापर्यंत देण्यात आलेल्या पुरस्कारांची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, 'राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एचआयव्ही एड्स विषयावर संशोधन करणारे डॉ. संजय पुजारी, एमकेसीएलचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या निलू नावरेकर यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.' यावेळी वसंत खैरनार, रंजना पाटील, प्र. द. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

शैक्षणिक क्षेत्रात कार्य

यावर्षीचे पुरस्कारार्थी असलेले डॉ. विकास गोगटे हे गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. गरीब, आदिवासी व गरजू लोकांसाठी ते विविध भागांमध्ये कार्य करतात. शिवाय त्यांना मोफत औषधे मिळावेत, त्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी डॉ. गोगटे विविध मार्गांनी प्रयत्नशील असतात. आरोग्यविषयक बाबींचे ते प्रबोधन करीत असतात. त्यांच्या या कार्याचा गौरव येथे केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुर्चीलाच चिकटवले निवेदन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

गिरणारे येथील शिवसैनिक आणि महादेवपूरच्या ग्रामस्थांनी गांधीजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच गुरुवारी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. वीज मंडळाच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला निवेदन चिकटविण्यात आले.

महादेवपूर परिसरात वीजपुरवठा सतत खंडीत होतो. पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता सायनेकर यांना देण्यासाठी ग्रामस्थ नाशिकरोडच्या कार्यालयात आले. तथापी, साहेब नसल्याने त्यांच्या खुर्चीला निवेदन चिकटविण्यात आले. सध्या पाऊस नसल्याने पिके जळत आहेत. वीज पुरवठा खंडीत असल्याने विहिरीवरील वीजपंप सुरु करता येत नाही व वाचलेल्या पिकांना पाणी देत येत नाही. शेतीमालाचे नुकसान होत आहे. रात्री विद्यार्थ्यांना अभ्यासापासून वंचित रहावे लागते. परिसरात सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करावा ही मागणीही पूर्ण होत नाही. त्यामुळे शेतकरी व नागरिक वैतागले आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.

यावेळी संपत फडोळ, दत्तात्रेय भागवत, विलासराज सांडखोरे, शरद सांडखोरे, सचिन सांडखोरे, शंकर आभाळे, दशरत आगळे, कैलास तांबडे, रामदास भागवत, शांताराम भागवत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणांनी समाजाची सेवा करावी

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

राष्ट्र सामर्थ्यशाली व बलवान बनवण्याची ताकद तरुणांमध्ये आहे. त्यामुळे युवकांनी ग्रामीण भागाशी समरस होऊन समाजाची सेवा करावी, असे मत भाजप प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे यांनी व्यक्त केले. 'मविप्र'च्या श्रीमती विमालाबेन खिमजी तेजुकाया कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) वर्धापन दिनाच्या समारंभात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुनिता आडके होत्या. व्यासपीठावर प्रा. दौलत शिंदे, प्रा. जयंत महाजन आदी उपस्थित होते. प्रा. फरांदे म्हणाले, की गांधीजींच्या विचाराने प्रेरीत होऊन पंडित नेहरू यांनी 'एनएसएस' योजना राबविली. १९६९ पासून आजपर्यंत देशातील सर्व विद्यापीठात ही योजना राबविली जाते. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी या योजनेत काम करणाऱ्यांना प्रेरणा मिळते. 'एनएसएस'मध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना समाजसेवा कळते. देश बलवान व शक्तिशाली बनवण्याचे काम या योजनेत होते.

'एनएसएस'चे समन्वयक प्रा. विक्रम काकुळते यांनी 'एनएसएस' सप्ताहाची माहिती दिली. प्रा. सुनिता आडके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. एल. डी. जाधव, प्रा. एस. एम. चव्हाण, प्रा. व्ही. ए. अहिरे, एस. डब्लू. पवार, बाळासाहेब मालुंजकर आदी यावेळी उपस्थित होते. सोनाली आहेर या विद्यार्थिनीने उपस्थितांचा परिचय करून दिला . शारदा देवकर हिने प्रास्ताविक केले. निकिता जगले हिने सूत्रसंचालन तर श्रद्धा कुंभकर्ण हिने आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून साहित्य मेजवानी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक तुमच्या भेटीला उत्सवाची सुरुवात शुक्रवार (दि. २) पासून करण्यात आले आहे. यादरम्यान ग्रंथजत्राही भरविण्यात येणार असून मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिक साळुंखे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे.

शंकराचार्य न्याय कुर्तकोटी सभागृहात सायंकाळी साडे सहा वाजता व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या कार्यक्रमाचे १६ वे वर्ष आहे. व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी मराठी विश्वकोश मंडळाचे संपादक अरुण फडके यांच्या 'भाषागंमत' या विषयासह या व्याख्यानमालेला सुरुवात होणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे 'मादाम क्युरी आणि मी', १० ऑक्टोबर रोजी ग्रंथाली वाचक चळवळीचे संस्थापक दिनकर गांगल 'माध्यमांचा गलबला आणि संस्कृतीचा कळवळा', १७ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ लेखिका मीना प्रभू यांचे 'न्यूयॉर्क न्यूयॉर्क', १८ ऑक्टोबर रोजी मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप तळवलकर यांची 'मधुमेहाविषयी गैरसमज', २४ ऑक्टोबर रोजी सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे हे 'वंचित समाज आणि भारतीय संस्कृती', ३१ ऑक्टोबर रोजी रामोजी फिल्मसिटीचे व्हाईस प्रेसिडेंट राजीव जालनापूरकर 'रामोजी फिल्मसिटी जगातील सर्वात मोठी फिल्मसिटी' या विषयावर व्याख्यान होणार आहेत. तर १ नोव्हेंबर रोजी नाटककार सतीश आळेकर यांच्या 'बदलती मराठी रंगभूमी' या विषयांवरील व्याख्यानाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. ही सर्व व्याख्याने गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुल येथे होणार आहे. यासाठी सर्व नागरिकांनी प्रवेश खुला असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ज्योती स्टोअर्स ग्रंथदालनाचे वसंत खैरनार व शंकराचार्य न्यासचे अध्यक्ष राजा मोगल यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूररोडवर गतिरोधक टाकण्याची मागणी

0
0

पालकांचा जीव टांगणीला

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

शहरातील उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेला गंगापूररोड वाहनांची वर्दळ कायम असतांना ओलांडणे विद्यार्थ्यांसाठी कठीण झाले आहे. वेगाने येणारी वाहने चुकवित विद्यार्थी रस्ता ओलांडत असल्याने पालकांचाच जीव टांगणीला लागत असल्याचे चित्र आहे. या प्रश्नी लक्ष देत महापालिका प्रशासनाने ‌रस्त्यांवर गतिरोधक निर्माण करण्याची मागणी गेली जात आहे.

शहरातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या रस्त्यांमध्ये गंगापूररोडचाही समावेश होतो. या रस्त्यालगतच महापालिकेची आनंदवल्ली येथे शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता ओलडांताना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. विद्यार्थी गटागटाने एकत्र येतात आणि मग रस्ता ओलांडत‌ात. विद्यार्थ्यांच्या अंगावर येणाऱ्या वाहनांचा वेग कमी व्हावा यासाठी आंनदवल्ली महाप‌ालिका शाळेच्या दुर्तफा गतिरोधक टाकण्याची मागणी पालकांनी केली आहे. गंगापूररोडवर वाहनांची नेहमीच वर्दळ असल्याने अपघात होऊन अनेकांचे प्राण गेले आहेत. महापालिका प्रशासन आणखी किती बळी जाण्याची वाट पहात आहे, असा सवाल वाहनचालक उपस्थित करत आहेत. महापालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी पालकांनी केली आहे.

गंगापूररोडवर नेहमीच होणाऱ्या अपघांतामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडतांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. याकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.

- राजू जाधव,

अध्यक्ष, नवश्या गणपती ट्रस्ट

गंगापूररोडवर झालेल्या अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. आंनदवल्ली महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता ओलडतांना भीती वाटते.

- विलास गायकवाड,

रहिवाशी, आंनदवल्ली

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोंबत्या तारांचा धोका

0
0

वर्टी कॉलनीमध्ये अंधाराचे साम्राज्य

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेजवळील वर्टी कॉलनीत दोन वर्षांपूर्वी झाड पडले. यामुळे परिसरातील विजेच्या खांबांवरील तारा तुटल्या. आता पुन्हा झाडांची पडझड झाल्यामुळे विजेच्या तारा तुटल्या आहेत. या प्रश्नी वारंवार पाठपुरावा करूनही विजेच्या तारांची अद्याप जोडणी झालेली नाही. तसेच वीज पुरवठा खंडीत झाल्याने कॉलनीमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या हवेत लटकलेल्या अवस्थेतील तारांमुळे अपघात होऊन जिवीत हानी होण्याची शक्यता निर्माण झाली.

शहरातील अतिशय वर्दळीच्या भागात असलेल्या आणि त्र्यंबक नाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वर्टी कॉलनीत बाबू वर्टी यांचे घर आहे. तेथे वीज पुरवठा करणाऱ्या तारांवर २ ऑक्टोबर २०१३ रोजी झाड पडले. त्यावेळी वर्टी यांनी वीज महावितरण कंपनीच्या भद्रकाली येथील तक्रार निवारण केंद्रावर तक्रार केली. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी येऊन तात्पूर्ती डागडुजी केली. थोड्याच दिवसात कायमस्वरुपी करून देऊ असे आश्वासन दिले. त्या तारा जवळच असलेल्या पेरुच्या झाडाला बांधून ठेवल्या. ही बाब वर्टी यांनी अनेकदा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, काही दिवसांनंतर वर्टी कुटुंबीय परदेशात असताना १८ ऑगस्ट रोजी पुन्हा याच ठिकाणी झाड पडले. त्यावेळी तात्पुरत्या स्वरुपात बांधलेल्या तारा पुन्हा जमिनीवर लोंबकाळल्या. त्यातून शॉर्ट सर्किट होऊन परिसरातील वीज प्रवाह खंडीत झाला, त्याच बरोबर वर्टी यांच्या घरातील देखील वीज प्रवाह खंडीत झाला. १ सप्टेंबर रोजी वर्टी परदेशातून परतल्यावर त्याच्या घरातील वीज प्रवाह खंडीत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी भद्रकाली येथील तक्रार केंद्रात तक्रार दाखल केली. ‌तेव्हाही तेथील अधिकाऱ्यांनी कर्मचारी पाठवून तात्पुरती दुरुस्ती करीत त्या तारा झाडाला लटकवून ठेवल्या आणि दुसऱ्याच्या मीटरमधून वर्टी यांच्या घराचा वीज प्रवाह सुरू केला. या वायर जमिनीवर लोळत असून याबाबत वर्टी यांनी अनेकदा भद्रकालीतील तक्रार निवारण केंद्रात तक्रार केली. परंतु, त्यांना कोणतेही ठोस उत्तर दिले गेले नाही. वर्टी यांच्या घरातील वीज प्रवाह गेल्या १ महिन्यापासून चालू बंद असून त्याबाबत तक्रार करूनही काही पावले उचलली जात नसल्याचे वर्टी यांचे म्हणणे आहे. याच कालावधीत त्यांना वीज बील पाठवण्यात आले. त्यावर कोणतेही रिडींग न घेता थेट ५५० रुपये आकार लावण्यात आला.

कॉलनीजवळच शाळा आहेत. येथून लहान मुले वयस्कर व्यक्तींची कायम येजा सुरू असते. लटकलेल्या तारांमुळे जिवीत हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- बाबू वर्टी, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ब्लड स्टोरेज सेंटर नवसंजीवनी ठरणार’

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

देवळालीतील एकमेव असलेल्या रोंचाबाई सुगनोमल मनवानी या रक्तपेढीतील ब्लड स्टोरेज सेंटरचा लाभ परिसरातील सुमारे ३२ गावातील नागरिकांना होणार आहे. ग्रामीण भागातील जनतेला हे सेंटर नवसंजीवनी प्रदान करणार असल्याचे प्रतिपादन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर प्रदीप कौल यांनी केले.

कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये जागतिक रक्तदाता दिवसाचे औचित्य साधत आयोजित ब्लड स्टोरेज सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला रोंचाबाई सुगनोमल मनवानी रक्तपेढीत या सेंटरचे लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी रक्तपेढीसाठी सहकार्य करणारे साचुजी मनवानी, मधू मनवानी, उपाध्यक्ष सचिन ठाकरे, कर्नल चंद्रशेखरन, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विलास पवार, जनकल्याण रक्तपेढीचे सचिव दिलीप कुलकर्णी, ज्येष्ठ नगरसेवक बाबुराव मोजाड, आशा गोडसे, प्रभावती धिवरे, कावेरी कासार, भगवान कटारिया, मीना करंजकर, सतीश मेवानी, डॉ. उन्मेश पत्की, डॉ. जयश्री नटेश आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. मनीषा होनराव यांनी रक्तपेढीचा इतिहास सांगितला. यावेळी १९८८ पासून आजपर्यंत विविध व्यक्ती व संस्था यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून सर्वांच्या प्रयत्नाने आज हे सेंटर उभे राहत असल्याचे 'सीईओ' पवार यांनी सांगितले. तर उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी रक्तघटक निर्मितीसाठी एफडीए व एसबीटीसी ने सूचित केलेल्या विविध नियमांप्रमाणे या रक्तपेढीत बदल करीत जनकल्याण रक्तपेढीच्या सहकाऱ्याने ब्लड स्टोरेज सेंटरचा लाभ गरीब जनतेला मिळावा यासाठी विशेष सवलतीत येथे रक्त, रक्तघटक, प्लाझ्मा आदी उपलब्ध होणार आहेत.

कार्यक्रमात जनकल्याण रक्तपेढीचे दिलीप कुलकर्णी यांनी सांगितले, की येथील रक्तपेढीस कोणत्याही क्षणी रक्त अथवा रक्ताशी निगडीत कोणत्याही घटकाची कमतरता भासू दिली जाणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधारकार्डसाठी वणवण थांबेना!

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

आधारकार्ड काढण्यासाठी सर्वसामान्यांना रोजच करावी लागणार वणवण संपणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे. महसूल विभागाने ई-सेवा सेतू केंद्र नेमलेल्या ठिकाणी आठवड्यातून एकदाच आधार नोंदणी केली जात असल्याने ठराविकच नोंदणी होतात. यासाठी महापालीकेने सातपूर विभागाच्या टाऊन हॉलमध्ये सातपूरकरांसाठी पुन्हा नव्याने आधार नोंदणी केंद्र सुरू केले आहे. परंतु, या ठिकाणी विभागातील पालकांची मुलांचे आधार नोंदणीसाठी मोठी गर्दी होत असल्याने अनेकांना त‌ाटकळत बसावे लागते. महापालिकेने किमान तीन ते चार ठिकाणी विद्यार्थ्यांना आधार नोंदणीचे केंद्र सुरू करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

नाशिक शहराचा समावेश केंद्र सरकारच्या मेट्रो सिटीमध्ये करण्यात आला आहे. परंतु, महापालिकेकडून शहरवासियांना नागरी सुविधा हव्या त्या प्रमाणात मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच सिहंस्थ कुंभमेळ्याचे नाव सागंत महापालिकेचे अधिकारी कामात असल्याचे सांगत असतात. अशातच सातपूर विभागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेत आधार नोंदणी करण्याचे सक्तीचे करण्यात आले आहे. परंतु, ठराविक शाळांमध्येच आधार नोंदणी होत असल्याने इतर विद्यार्थ्यांनी आधार नोंदणी करावी कुठे? असा सवाल पालकांना उपस्थित होतो. तसेच महसूल विभागाने ई-सेवा सेतूचालकांना आधार नोंदणीचे कामे दिली आहेत. मात्र, यात आठवड्यातील केवळ एकच दिवस ई-सेवा केंद्रचालक आधार नोंदणीचे काम करत असल्याने अनेकदा पालकांना पुढील आठवड्यात येण्याचा सल्ला दिला जातो. आधार नोंदणीचे केंद्र सुरू करावे याबाबत सातपूरच्या सभापती उषा शेळके यांनी मागणी केली होती. सभापती शेळके यांच्या मागणीला महसूल विभागाने प्रतिसाद देत एक आधार नोंदणी केंद्र सातपूर महापालिकेच्या टाऊन हॉलमध्ये सुरू केले आहे. परंतु, विभागातील मोठ्या प्रमाणावर पालकांची गर्दी याआधार नोंदणी केंद्रावर होत असल्याने अनेकांना ताटकळत थांबावे लागते.

जादा आधार केंद्रांची गरज

शाळा कॉलेजांमधील स्कॉलरशीपसाठी बँक खाते अनिवार्य आहे आणि बँकखात्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. मात्र, आधार नोंदणीचे प्रमाण अधिक नसल्याने अनेक विद्यार्थी व पालकांना नोंदणी न करताच माघारी परतावे लागते. यासाठी महापालिकेने सातपूर विभागात किमान तीन ते चार ठिकाणी आधार नोंदणीचे केंद्र सुरू करावेत, अशी मागणी पालकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्त’चे १८ नवीन अभ्यासक्रम

0
0

विद्वत परिषदेचा महत्त्वपूर्ण निर्णय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दृष्टीबाधित आणि श्रवणबाधीत विद्यार्थ्यांसाठी विशेष बी.एड. सुरु करण्यासह २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर असे एकूण १८ शिक्षणक्रम नव्याने सुरु करण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या विद्वत परिषदेची बैठक गुरूवारी विद्यापीठात पार पडली. यात हे निर्णय घेण्यात आला.

कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत सर्टिफिकेट, डिप्लोमा इन स्पोर्ट मेड‌िसीन, सर्टिफिकेट, डिप्लोमा इन डायलेसिस क्लिनिकल असिस्टट, पुण्याच्या भारत विकास शिक्षण संस्थेच्या सहकार्याने बीएएमएस नंतर पदव्युत्तर प्रमाणपत्र सुरु करण्याबाबत कायाचिकित्सा (जनरल मेडिसिन -आयुर्वेद), स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्र (गायनाकॉलॉजी आणि ऑबस्टेट्रिक्स), कौमारभृत्य (चाईल्ड हेल्थ - आयुर्वेद) हे शिक्षणक्रम तर मानव्यविद्या व सामाजिकशास्रे विद्याशाखे अंतर्गत एम.ए.- अर्थशास्र, राज्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमातून सुरु करणे, पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एम.ए. मास कम्युनिकेशन जर्नालिझम शिक्षणक्रम, बी. ए. लोकसेवा व एम. ए. लोकसेवा, एम. एस. डब्ल्यू, बी. ए. लिबरल आर्ट शिक्षणक्रम नव्याने सुरु करण्यास मान्यता देण्यात आली.

त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्यांना पर्यावरणशास्राची माहिती व्हावी म्हणून 'पर्यावरणशास्र' विषयाच्या अध्ययन साहित्याचा हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत अनुवाद करणे, विद्यार्थ्यांना संवाद पत्रिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून देणे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती संग्रहालयाची निर्मिती करून त्यात त्यांचे अद्ययावत ग्रंथालय, चित्रे, पूर्वज, वंशवृक्ष, परिवार, बालपण व शिक्षण, स्वातंत्र्य चळवळ सहभाग, तुरुंगवास, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, साहित्य संपदा, दृक-श्राव्य कक्ष यासारख्या अनेक बाबींचा अंतर्भाव करण्याचाही अतिशय महत्त्वाचा निर्णय या वेळी घेण्यात आला. यशवंतराव चव्हाण यांचे कृषी संबंधित कार्याची माहिती समाजाला मिळेल अशा पुस्तकाची निर्मिती कार्याची सूचना डॉ. शंकरराव मगर यांनी या वेळी मांडली. लक्ष्मीकांत देशमुख यांनी यावेळी केलेल्या सादरीकरणात विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासात मुक्त विद्यापीठाचा सहभाग कसा वाढविता येईल याविषयी मार्गदर्शक सूचना केल्या. यावर डॉ. दीपक शिकारपूर, डॉ. संजय खड्डकर आदींनी मार्गदर्शन केले. प्रतापराव पवार यांनी विद्यापीठाच्या वतीने सुरु करण्यात येणाऱ्या सर्टिफिकेट, डिप्लोमा इन स्पोर्ट मेड‌िसीन शिक्षणक्रम सुरु करण्यासाठी बालेवाडीच्या क्रीडा अकादमीचे सहकार्य घेण्याची सूचना केली.

तसेच चॉईस बेस क्रेडीट सिस्टीम बाबत मार्गदर्शन केले. या बैठकीस विद्वत परिषदेचे सदस्य प्रतापराव पवार, डॉ. शंकरराव मगर, डॉ. दीपक शिकारपूर, डॉ. संजय खड्डकर, एस.व्ही. मशरुवाला, लक्ष्मीकांत देशमुख आणि कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांच्यासह सर्व विद्याशाखांचे संचालक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांकडे तक्रार करा ‘व्हॉटसअॅप’ नंबरवर!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावापासून सरकारी यंत्रणा सुध्दा दूर राहिल्येला नाहीत. प्रशासन आणि सर्वसामन्यांमध्ये महत्त्वाचा दुवा म्हणून व्हॉटसअॅप, ट्विटर, फेसबूक आदी सोशल मीडिया काम पाहतो आहे. याचाच एक भाग म्हणून शहर पोलिसांनी ९०७५०११२२२ हा नंबर उपलब्ध करून दिला असून, आजपासून कोणत्याही व्यक्तीला या नंबरवर तक्रार करता येऊ शकते.

आपल्या आजुबाजूला एखादी घटना घडल्यानंतर ती पोलिसांना कळवली तर नसता उद्योग मागे लागेल, अशी सर्वसामान्यांची धारणा असते. किंबहुना तसेच अनुभव सर्वांना येतात. पोलिसांच्या कार्यपध्दतीबाबत निर्माण झालेल्या नकारात्मक प्रतिमेमुळे सर्वसामान्य नागरिक पोलिसांना टाळू पाहतात. रस्त्यावर होणारे छेडछाडीचे प्रकार, पती-पत्नीची भांडणे, मद्यपींचा त्रास, अवैध धंदे याबाबत माहिती असूनही नागरिक पोलिसांकडे तक्रार करण्याचे धारिष्ट्य दाखवत नाही. याचा सर्वांत शेवटी तोटा पोलिसांनाच होतो. यापार्श्वभूमीवर माहितीचा स्त्रोत वाढावा यासाठी शहर पोलिसांनी पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉटस अॅप सेवा सुरू केली आहे.

ओळख गोपनीय

सर्वसामान्यांकडून माहिती मिळाल्यानंतर त्यावर कारवाई करण्यासंदर्भांत पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे संबंधितांना आदेश देतील. त्यामुळे पोलिस कर्मचारी परस्पर सदर घटनास्थळी पोहचतील. यात, तक्रारदाराची माहिती उघड होणार नाही. ही योजना अॅक्शन ओरिएंटेड असल्याने तक्रारदाराला फारतर केलेल्या कारवाईची माहिती दिली जाईल. पण, तक्रारदाराचे नाव समोर येणार नाही, असा दावा पोलिस उपायुक्त धिवरे यांनी केला आहे.

''वरील नंबरवर शहरातील कोणत्याही नागरिकाला माहिती देता येईल. त्यातून अनेक गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होऊ शकते. तक्रारदाराचे नाव कुठेही वापरले जाणार नसल्याने नागरिकांनी थेट तक्रारी कराव्यात.'' - श्रीकांत धिवरे,पोलिस उपायुक्त

इथे करा संपर्क

अपघात, रस्त्यावर सुरू असलेले भांडणे, मद्यपींचा त्रास, अवैध धंदे, अगदी पतीकडून पत्नीला होणारी बेदम मारहाण, बस स्टॉप किंवा इतरत्र होणारे छेडछाडीचे प्रकार याबाबत पोलिसांना माहिती मिळतेच असे नाही. त्यामुळे यापुढे असा कोणताही प्रकार घडत असल्यास त्याची माहिती आणि शक्य असल्यास त्याचे छायाचित्र तत्काळ ९०७५०११२२२ या व्हॉटस अॅप नंबरवर पाठवावेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित पोलिस स्टेशनचे कर्मचारी पुढील कार्यवाही करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पं. विनायक बादल यांना राष्ट्रीय पंडित पुरस्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैदिक ज्ञान विज्ञानाच्या प्रचार व प्रसारासाठी आयुष्यभर साधनारत असणारे वैदिक सम्राट पंडित श्रीकृष्णशास्त्री गोडशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राष्ट्रीय पंडित पुरस्कार यंदा श्रीक्षेत्र काशीचे वेदमूर्ती पं. विनायक मंगलेश्वर भट्ट बादल यांना जाहीर झाला आहे. ३ ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

येथील वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालयाचे (गुरूकुल) विश्वस्त, कार्यकारी मंडळ, विद्यार्थी आणि कुटुंबीयांच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात येतो. सन्मानपत्र, महावस्त्र आणि सन्माननिधी, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या सोहळ्याची माहिती देताना गुरूकुलाचे प्राचार्य पं. शांताराम भानोसे म्हणाले, 'पूज्य गोडशे गुरूजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे देशभरातील विद्यार्थी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत वेद पारायण करणार आहेत. शनिवारी सायंकाळी ६ वाजता पंचवटीतील केवडीवनाच्या स्वामी नारायण सत्संग भवनात मुख्य सोहळा होणार आहे.

अखिल भारतीय वैदिकाधर्म प्रचाराश्रम (जम्मू)चे अध्यक्ष पूज्य स्वामी निर्मलस्वरूपजी महाराज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. काशीच्या वैदिक घराण्यात जन्मलेले बादल गुरूजी श्रौत, स्मार्त आणि कुण्डमण्डप विषयात भारतातील विख्यात पंडित म्हणून ओळखले जातात. श्री शंकराचार्यांच्या चारही पीठांनी त्यांचा गौरव केलेला आहे. वेदप्रेमींनी या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरीर सौष्ठवपटू हितेश निकमचे निधन

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

क्रीडा क्षेत्रात इगतपुरीसह नाशिक जिल्ह्याचे नाव संपूर्ण भारत देशात गाजविणारा प्रसिद्ध शरीर सौष्ठवपटू हितेश नारायण निकम (वय २७) याचे गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन महिन्यांचा मुलगा, भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. हितेशने शरीर सौष्ठव क्षेत्रात `भारत श्री`सह अनेक किताब पटकावलेले आहेत.

वडील नारायण निकम आणि मोठा भाऊ योगेश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हितशने वयाच्या १६ वर्षांपासून पिळदार शरीर बनविण्यासाठी मेहनत घेतली होती. तालुकास्तरावरून कॉलेज स्तरावर आणि तेथून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये त्याने यश मिळविले होते.

चार वेळा इगतपुरी श्री, २००९ मध्ये नाशिक श्री, कामगार श्री, जळगाव येथे २०११ मध्ये ज्युनियर महाराष्ट्र श्री हा किताब पटकावला होता. ठाणे येथे २०११ मध्ये ज्युनियर मिस्टर इंडिया ब्रान्स मेडलचा तो विजेता ठरला होता. २०१३ मध्ये हितेशने सोलापूर येथे गोल्ड मेडल मिळविले होते. त्याचवर्षी उज्जैन येथे झालेल्या ८० किलो वजन गटात त्याने सीनिअर भारत श्री हा किताब पटकविला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


... सशस्त्र गस्त वाढवा!

0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : बँका, ज्वेलरी शॉप किंवा आर्थिक उलाढालीचे मोठे केंद्र असलेल्या भागांमध्ये सशस्त्र पोलिस कर्मचाऱ्यांची गस्त वाढवण्याचे आदेश नवनियुक्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना दिले आहेत. विशेष म्हणजे दिलेल्या आदेशाची अमंलबजावणी होते किंवा नाही याचा आढावा घेण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.

राज्यभरातील विविध बँका, ज्वेलरी शॉप किंवा मोठी आर्थिक उलाढाल होणाऱ्या संस्थांना चोरट्यांकडून नेहमीच 'टार्गेट' केले जाते. नाशिक जिल्ह्यातच जिल्हा बँकेचे पैसे चार वेळा लुटण्याच्या घटना घडल्या. बंदुकीचा धाक दाखवून लुटमारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तत्काळ सशस्त्र गस्त वाढवण्याचे आदेश पोलिस महासंचालकांनी दिलेत. आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते, अशा सर्व ठिकाणी हा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याबरोबर, अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध घेण्याचे फर्मान सुध्दा दीक्षित यांनी सोडले. राज्यभरातील पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांना काम करताना काय समस्या येतात, याचा आढावा दीक्षित घेत असून, येणाऱ्या अडचणी व त्यावरील पर्याय याची सविस्तर माहिती देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

नाशिक शहराचे पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांना विचारणा केली असता, त्यांनी सशस्त्र पोलिसांची गस्त सुरू झाल्याचे सांगितले. सामान्यतः शहरात गस्त असतेच. बँका, ज्वेलरी शॉप किंवा आर्थिक उलाढालीचे केंद्र असलेल्या ठिकाणी सशस्त्र पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाईल, असे जगन्नाथन यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यूची साथ; काळजी घ्या!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात अचानक डेंग्यूची व साथीच्या आजाराची साथ पसरल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. हा आजार किटकजन्य अशा एडिस एजिप्ताय या डासापासून होत असल्याने नागरिकांनी घरातील भांडे व टाक्या साफ व स्वच्छ करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच डासांची शोध मोहीम महापालिकेनही सुरू केली आहे.

सप्टेंबर महिन्यात शहरात तब्बल डेंग्यूचे ४४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन खळबळून जागे झाले आहे. गेल्या वर्षी डेंग्यूमुळे शहरात अनेक जणांचे बळी घेतले होते. डेंग्यूने थेट नगरसेविकाच्या पतीचाही बळी घेतला होता. त्यामुळे आता सिंहस्थ संपताच डेंग्यूने डोक वर काढल्याच्या प्रकाराने आरोग्य विभागाने धास्ती घेतली आहे. तातडीने डेंग्यूबाबत उपाययोजना सुरू केल्या असून नागरिकांनाच सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेने दहा उपाययोजना नागरिकांना सुचविल्या आहेत. आठवड्यातून एकदा घरात भांडी स्वच्छ व फुरून कोरडी ठेवणे, पाण्याच्या टाक्या झाकणे, टायर व अडगळीचे साहित्य नष्ट करणे, मच्छरदानी वापरणे, ताप येताच वैद्यकीय सल्ला घेणे, गप्पी मासे पाळणे आदी उपाययोजना करण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे. तसेच महापालिकेनेही डास निर्मलन मोहीम उघडली आहे.

वातावरणातील बदलामुळे शहरात डेंग्यू आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. डेंग्यूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. शक्य झाल्यास घरात आठवडयातून एक दिवस ड्राय डे नागरिकांनी पाळावा.

- अनिल चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाटक ही आत्मिक कला!: अतुल पेठे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाटक ही कला जगातल्या कुठल्याही माणसाला येऊ शकते. नाटकात अस्सल असलेली माणसचं टिकून राहतात. बेगडी माणसं नाटकात टिकणं अशक्य असल्याचे परखड मत नाटककार अतुल पेठे यांनी व्यक्त केलं. कुसुमाग्रज स्मारकातच रंगालयतर्फे आयोजित केलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. 'नाटकवाल्याचे प्रयोग' या विषयावर त्यांची मुलाखत आयोजित केली होती.

मुलाखत घेताना अतुल पेठे यांनी औपचारिकता न ठेवता प्रेक्षकांशी थेट संवाद साधला. अत्यंत रंगलेल्या मुलाखतीत पेठे म्हणाले, की मी शाळेत असताना नाटक कशाला म्हणतात हे माहित नव्हतं. मी अत्यंत रागीट माणूस होतो, वडीलांशी पटत नसल्यानं त्यांचा खून करावा, स्वतः आत्महत्या करावी, असे अनेकदा मनात विचार येत होते. थिएटर अकादमीने माझ्यावर नाटकाचे खरे संस्कार केले असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. घरात नाटक होतेच. त्यामुळे नकळत नाटकाककडे ओढलो गेलो, असे पेठे यांनी सांगितले.

थिएटर ही जादूमय गोष्ट आहे. माणसं कळायला लागली की आपोआप नाटकातले विषय सूचत जातात. अनेक वेळा काय करू आणि काय नको असं होऊन जाते. त्यामुळे नाटक ही जगण्याची कला आहे, असे पेठे ‍म्हणाले. राग आल्याशिवाय नाटक करता येत नाही. नाटक करायचे असेल तर राग आलाच पाहिजे. राग येणारा माणूसच मोठा नाटककार होऊ शकतो. त्यातही तुमचा आतला आवाज येणं महत्त्वाचे असते. करत असलेली कलाकृती मी प्रामाणिकपणाने करतो आहे का? मला जे म्हणायचे ते मी खरोखर मांडतो आहे का? मी माझ्या विचारांशी आणि कलाकृतीशी तडजोड करतो आहे का? हे आतल्या आवाजाने ओळखले पाहिजे. आतला आवाज जे सांगतो ते केलं पाहिजे कलाकृतीशी तडजोड म्हणजे प्रतारणा असल्याचे ते म्हणाले. रश्मी काळोखे, अभिषेक रहाळकर, लोकेश शेवडे यांनी पेठे यांची मुलाखत घेतली.

नाटकाची व्याख्या अशक्य

नाटक म्हणजे काय याविषयी पेठे म्हणाले, की नाटकाची व्याख्या करणं शक्य नाही. मला जे कारायचे आहे ते करता येणं म्हणजे नाटक होय. नाटक म्हणजे गंमतच. नाटक ही जादुई कला आहे. रंगमंचावर गेल्यानंतर जादुई दुनियेत गेल्यासारखे वाटतं वेडेपणा करायचे स्वातंत्र्य नाटकात असते. त्यामुळे नाटक हे मनाला भावते असे ते म्हणाले.

नाटकच करणार

व्यावसायिक व प्रायोगिक नाटकाची संकल्पना मांडतांना पेठे म्हणाले, की व्यावसायिक नाटकाला कॅलक्युलेशन्स असतात, ती मला कधी जमली नाही. मला माझ्या म्हणण्याप्रमाणे नाटक करायचे आहे. त्याबाबत मी ठरविले पाहिजे. ते माझ्या अर्थार्जनाचे साधन असू नये. नाटकाची शिडी करून मला टीव्ही व सिनेमा करायचा नाही. त्यामुळे आयुष्याच्या शेवटापर्यंत मला नाटक या विषयात ३५ टक्के मार्क मिळाले तरी चालेल, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करू!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजकल्याणच्या वतीने देण्यात येणाऱ्या ई शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज कॉलेज स्तरावरून त्वरित समाजकल्याण न पाठविले गेल्यास प्राचार्य व संस्थाचलकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी तंबी समाजकल्याण विभागाच्या वतीने कॉलेजेसच्या प्राचार्यांना देण्यात आली आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ई-शिष्यवृत्ती अंतर्गत नाशिक विभागातील कॉलेजेसने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज अद्यापही प्रलंबित ठेवले आहेत. अशा कॉलेजेसने त्यांच्या स्तरावर प्रलंबित असलेले पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज १० ऑक्टोबरच्या आत सहाय्यकसमाज कल्याण यांच्याकडे पाठवावेत, अशा सूचना सर्व कॉलेजेसच्या प्राचार्यांना समाजकल्याणकडून देण्यात आल्या आहेत. अपात्र विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करून कॉलेज स्तरावरील प्रलंबित अर्जांची संख्या निरंक करण्यात यावी, असेही आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग काशिनाथ गवळे यांनी केले आहे.

ई स्कॉलरशीप ही सन् २०११-१२ या वर्षापासून ऑनलाइन राबविण्यास सुरुवात केली. केंद्र सरकार शिष्यवृत्ती योजना ऑनलाइन झाल्यामुळे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती व शिक्षण फी, परीक्षा फीची रक्कम कॉलेजेसच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येते. शासन स्तरावरून ऑनलाइन अर्ज त्वरीत निकाली काढण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

विभागातील कॉलेजेसना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयांकडून वेळोवेळी पत्रव्यवहार व तोंडी सूचना देऊन ही त्यांनी अद्याप त्यांच्या स्तरावर प्रलंबित असलेले मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आलेले नाहीत.

प्राचार्यांकडून वारंवार दुर्लक्ष

नाशिक विभागात नाशिक, धुळे,नंदुरबार, जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील कॉलेजेसने सन २०१३-१४ व सन २०१४-१५ चे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज कॉलेज स्तरावर प्रलंबित आहेत. वारंवार सूचना देऊनही कॉलेज स्तरावरील अर्ज मंजुरीसाठी सहाय्यक आयुक्तांकडे पाठविण्यास प्राचार्यांनी दुर्लक्ष केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये नगराध्यक्ष निवडणुकीची पर्वणी?

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपरिषदेत नेतृत्वबदलाच्या हालचाली सुरू झाल्या असून, गुप्त बैठकांचा राबता सुरू झाला आहे. त्र्यंबक नगर पालिकेत दर चार-दोन महिन्यांआड नगराध्यक्ष बदलाचे वारे वाहत असते. कुंभमेळा असूनही यात खंड पडलेला नाही. १७ जून २०१५ रोजी नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची मुदत संपली आणि त्यामुळे झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले. विद्यमान नगराध्यक्षा अनघा फडके यांनी कार्यभार स्वीकारला त्यास आता उणीपुरे तीन महिने झाले आहेत.

नगरपालिकेत २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत १७ नगरसेवकांचे बलाबल मनसे ६, राष्ट्रवादी ४, काँग्रेस ३, भाजपा एक, शिवसेना एक आणि अपक्ष २ याप्रमाणे होते. अर्थात, मनसे सर्वाधिक सदस्य असल्याने मनसेने आपल्यासोबत काँग्रेस-भाजप सेना आणि अपक्ष एकत्र घेवून १३ सदस्यांचा सत्तारूढ गट स्थापन केला व राष्ट्रवादी विरोधात बसले तेव्हा मनसेचे योगेश तुंगार बिनविरोध नगराध्यक्ष झाले.

त्यानंतर वर्षभराने पुन्हा सत्तेच्या संगीत खुर्चीचा खेळ सुरू झाला व यावेळेस मनेसच्या यशोदा अडसरे नगराध्यक्ष झाल्या. मात्र, सत्तारूढ मनसेच्या गटातून तीन काँग्रेस आणि एक अपक्ष सदस्य विरोधात गेले. त्यानंतर पुन्हा डिसेंबर २०१४ मध्ये नगराध्यक्षांचा राजीनामा झाला. अर्थात यावेळेस पारडे फिरले. भाजपाच्या एकमेव सदस्या तृप्ती धारणे विरोधी गटास जाऊन मिळाल्याने राष्ट्रवादीच्या अलका शिरसाठ नगराध्यक्षा झाल्या. दोन वर्षांपासून विरोधात असलेला राष्ट्रवादी गट सत्तेत आला. नगरपालिकेत ९ विरूध्द ८ असे समीकरण तयार झाले. जून २०१५ मध्ये आरक्षण बदलानंतर मिळणारी संधी लक्षात घेवून सारे काही घडले. अर्थात त्र्यंबक नगरपालिकेच्या राजकारणात केव्हाही काहीही घडू शकते, यास पुष्टी मिळाली आणि जून २०१५ मध्ये झालेली निवडणूक पक्षीय राजकारणाला अभूतपुर्व वळण देणारी ठरली. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या बालेकिल्ल्यात मनसेने भाजपचा सफाया केला. निवडणूक प्रक्रियेत एकमेव

बिनविरोध विजयी झालेल्या सदस्या धारणे वगळता एकही उमेदवार विजयी झाला नाही. संपूर्ण जिल्ह्यात हा राजकीय विश्लेषण आणि मंथनाचा विषय झाला होता. शहरात मनसेची घोडदौड सुरू झाली म्हणून मनसे आणि समर्थकांच्या गोटात उत्साही वातावरण होते. तथापि जून २०१५ मध्ये भाजपाच्या एकमेव सदस्या तृप्ती धारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने समर्थन दिले होते. तेव्हाचा विरोधी गट असलेल्या मनसेने अनघा फडके यांचा अर्ज दाखल केला. त्यांना शिवसेना एक आणि अपक्ष एक असे सर्मथन होते. धारणे यांचा विजय निश्चित असतांना त्यांच्या गटातील अपक्ष सदस्या विजया लढ्ढा यांनी अनघा फडके यांना मतदान केले. मतदानाच्या पूर्वी आठ दिवस झालेल्या नाट्यात लढ्ढा यांना फडके गटात येण्यासाठी नव्याने भाजपात आलेले पूर्वाश्रमीचे मनसेचे माजी आमदार वसंत गिते यांनी प्रयत्न केले. त्यास भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातील पादधिका-यांचे सहकार्य लाभले. भाजपच्या चिन्हावर निवडणुक लढलेल्या तृप्ती धारणे पराभूत झाल्या. त्र्यंबकमध्ये अडीच वर्षानंतर पुन्हा भाजपने मनसेकडून पराभव पत्करला. अनघा फडके विजयी झाल्या मात्र त्यानंतर दोन दिवसांत फडके यांच्यासह मनसेचे सर्व सहा सदस्य तसेच अपक्ष लढ्ढा आणि अपक्ष धनंजय तुंगार यांनी भाजपात प्रवेश केला.

मनसेचे अनेक कार्यकर्ते पदाधिका-यांनीही भाजपात प्रवेश केल्याने नगराध्यक्ष निवडणूक अप्रत्यक्षपणे मनसे नेस्तनाबूत होण्यास कारण ठरली आहे. सिंहस्थ शाही पर्वणीचा कालावधी संपताच पुन्हा नेतृत्व बदलाचे वारे वाहायला लागले कारण सत्तासंपादन करतांना दिलेल्या आणाभाका पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

नव्या समीकरणांची नांदी

त्र्यंबक पालिकेत सध्या भाजपाचे ९ नगरसेवक आहेत. यात नव्याने आलेले आठ सदस्य तसेच पूर्वीच्या एका सदस्याचा समावेश आहे. नगराध्यक्षांच्या निवडणुकीसाठी विजया लढ्ढा यांचे या नव्या भाजपा गटाकडून समर्थन राहील तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या विरोधी गटाकडून पूर्वीच्या भाजपाच्या तृप्ती धारणे यांचे नाव राहील, असे प्राथमिक चर्चेच्या फेरीत जाणवत आहे. येथे भाजपा विरूध्द भाजपा असा संघर्ष झाल्यास अनेक वर्षांपासून भाजपासाठी कष्ट घेतलेले निष्ठावंत काय भूमिका घेणार, हा सध्या चर्चेचा विषय आहे. अर्थात येथे केव्हाही आणि काहीही घडू शकते या नियमानुसार आणखी काही नवी समीकरणे जुळतील, असा जाणकारांचे अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images