Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

भाविकांची रेकॉर्डब्रेक गर्दी

$
0
0

vinod.patil@timesgroup.com

नाशिक : राज्याला पावसाने दिलेला दिलासा, लागोपाठ आलेल्या सुट्ट्या आणि एकादशी व प्रदोषचा मुहूर्तामुळे भाविकांनी त्र्यंबकमधील तिसऱ्या पर्वणीला रेकॉर्डब्रेक हजेरी लावली. विशेष म्हणजे नाशिकच्या तीन व त्र्यंबकेश्वरच्या दोन पर्वण्यापासूंन लाब राहिलेला मराठी भाविक शेवटच्या पर्वणीला घराबाहेर पडले आणि भक्तांचा महामेळाच भरला. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आल्याने तिसऱ्या पर्वणीचे प्रशासनाने केलेले पूर्ण नियोजनच कोलमडले. त्र्यंबकमध्ये सुमारे २० लाख भाविकांनी हजेरी लावल्याने व कुशावर्तच्या क्षमतेपक्षा अधिक संख्या असल्याने लाखो भाविकांना स्नान व दर्शनाविनाच त्र्यंबक सोडावे लागले.

त्र्यंबकमध्ये शुक्रवारी कुंभमेळ्याची शेवटची पर्वणी असल्याने प्रशासनाने या पर्वणीचे नियोजन बेताचेच केले होते. पहिल्या पर्वण्यांना फारसा प्रतिसाद न मिळालेल्या त्र्यंबकमध्ये तिसऱ्या पर्वणीला मोजकीच गर्दी होईल असा प्रशासनाचा अंदाज होता. मात्र, राज्यात नुकताच झालेला दिलासादायक पाऊस, लागोपाठ आलेल्या चार दिवसांच्या सुट्ट्या,शेवटच्या पर्वणीच्या पूर्वसंध्येला एकादशी व प्रदोष व्रत आल्याने भाविकांनी प्रशासनाचा पूर्ण अंदाजच चुकविला. दिवसभरात पाच लाख भाविकांना सामावून घेण्याची क्षमता असलेल्या त्र्यंबकेश्वर आदल्या रात्रीच चार लाख भाविकांनी ठाण मांडले. त्यामुळे रात्रीच गर्दीने हाऊस फुल्ल झालेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये सकाळी आणखीन भाविकांना सामावून घेण्याची क्षमताच उरली नव्हती.

चार ते पाच लाख भाविकांचा अंदाज बांधून असलेल्या प्रशासनाला मराठी भाविकांनी शेवटच्या पर्वणीला मोठा धक्काच दिला. पहिल्या व दुसऱ्या पर्वणापासून दूर राहिलेला राज्यातील भाविकांनी तिसऱ्या पर्वणीला हजेरी लावून प्रशासनाला अंदाज खोटा ठरविला. दुष्काळामुळे दूर राहिलेल्या राज्यातील कानाकोपऱ्यातील भाविकांनी मिळेल त्या वाहनाने सकाळी नाशिकमध्ये दस्तक दिली. मिळेल त्या वाहनाने त्यांनी त्र्यंबक गाठायला सुरुवात केली. तर एसटी बस न मिळाल्याने काहीनी पायपीटच सुरू केली. त्यामुळे सकाळीच अचानक त्र्यंबकच्या दिशेने वाढलेली गर्दी बघताच प्रशासनाने धावपळ सुरू केली.

एवढ्या गर्दीची क्षमता नसल्याने 'होल्ड अॅण्ड रिलीज'चे आदेश सोडण्यात आले. त्यामुळे दुपारीच त्र्यंबकपासून नाशिक आणि घोटीकडे दहा किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. एसटी बसेस बंद कराव्या लागल्या. तर नाशिकची वाहतूक गंगापूर मार्गे वळविण्यात आली. एवढ्या भाविकांचे कुशावर्तावर स्नान व त्र्यंबकराजाचे दर्शन करणेच शक्य नसल्याने भाविकांना आहे, त्याच ठिकाणी रोखून हळू हळू गर्दी रिलीज करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला. मात्र, वाढती गर्दी आणि रिलीजचे ताळमेळ बसत नसल्याने हजारो भाविकांनी दुरूनच त्र्यंबक राजाचे दर्शन घेवून माघारी फिरणे पसंद केले. भाविकांना सुमारे २० किलोमीटर पायपीट करावी लागल्याने अनेकांनी रस्त्यावरूनच आपल्या गावी माघारी फिरणेच पसंत केले.

दोनदा स्टॅम्पेंड वाचवली

त्र्यंबकनगरीत क्षमतेपेक्षा जास्त भाविक दाखल झाल्याने चेंगराचेंगरीची शक्यता बळावली. मात्र, पोलिस व प्रशासनाने शिताफीने गर्दीचे नियंत्रण करत चेंगराचेंगरीची निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात केली. सकाळी कुशावर्तावर बडा उदासीन आखाड्याच्या स्नानावेळीच चेंगराचेंगरी होता होता वाचली. पालकमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून ही स्टॅम्पेड रोखली. तर गजाजन महाराज मंदिराबाहेरही गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी आपले जीव पणाला लावले. त्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये दोनदा चेंगराचेंगरी होता होता वाचल्याचे श्रेय पोलिस आणि प्रशासनालाच जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नर्सिंग कॉलेजच्या कारभाराची चौकशी

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

नर्सिंग कॉलेजची विद्यार्थींनी सुप्रीया माळी हीचा मृत्यू आणि त्यानंतर इतर विद्यार्थींनींनी केलेले गंभीर आरोप याबाबत चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालनालयाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय कमिटीने चौकशीस सुरूवात केली आहे.

या प्रकरणातील जाब जबाब नोंदवण्याचे काम येत्या सोमवारपर्यंत होण्याची शक्यता असून, त्यानंतर ही कमिटी आपला अहवाल सादर करेल. या समितीने चौकशीचे काम गुरूवारी सुरू केले. सुरूवातीस काही विद्यार्थींनीसह कर्मचाऱ्यांचे जाब नोंदवण्यात आले. बुधवारी आपला अहवाल आरोग्य संचालकांकडे सोपवण्यात येईल, अशी माहिती सहायक उपसंचालक डॉ. बी. डी. पवार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक बडगुजर यांच्यावर चौघांचा हल्ला

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यावर चौघा जणांनी हल्ला केला. या घटनेत किरकाोळ जखमी झाले. शुक्रवारी संध्याकाळी साडेसात ते पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास सावता नगर येथील समर्थ नागरी सहकारी बँकेजवळ हा प्रकार घडला.

संध्याकाळी बडगुजर याठिकाणी कामानिमित्त गेले होते. त्याच वेळी दोन दुचाकींवर आलेल्या चौघांनी बडगुजर यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. मात्र, बडगुजर यांनी प्रतिकार केल्याने तसेच त्यांचे कार्यकर्ते धावून आल्याने हल्लेखोर पसार झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर शिवसेनेचे महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी अंबड पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. हल्लेखोरांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिस स्टेशनमध्ये सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटोग्राफर्सला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भाविकांच्या सुरक्षिततेचचा बाऊ करीत पोलिसांनी त्र्यंबकेश्वरमधील तिसऱ्या शाहीपर्वणीत सामान्य नागरिक आणि माध्यमांच्या प्रतिनिधींवर मर्दुमकी गाजवित वर्दीच्या गुर्मीचे दर्शन घडविले. दैनिकांच्या फोटोग्राफर्सला मारहाण करीत त्यांचे कॅमेरे हिसकावण्यापर्यंत पोलिस कर्मचाऱ्यांची मजल गेली. पोलिस कॉन्स्टेबल एम. व्ही. गायकवाड आणि मच्छिंद्र देवरे यांनी केलेल्या अरेरावीची निश्चित दखल घेऊ, अशी ग्वाही पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी त्र्यंबकेश्वर परिसरात तगडा बदोबस्त तैनात केला होता. मात्र सौजन्याने बोलण्याची पध्दती न बाळणाऱ्या या पोलिसांकडून भाविकांना तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना अनेकदा अरेरावीची भाषा वापरली जात होती. माध्यमांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र साधू-महंतांचे स्नान आटोपल्यानंतर माध्यमांचे पाच ते सहा प्रतिनिधी कुशावर्ताकडून पायी जव्हार फाट्याकडे निघाले होते. लक्ष्मीनारायण चौकात काही भाविक बॅरिकेडींगवर चढून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत होते. तर तेथे कर्तव्यावर असलेले पोलिस या भाविकांना रोखण्याचा प्रयत्न करीत होते. माध्यमांच्या काही प्रतिनिधींनी लगेचच हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात टिपला. यामुळे संतप्त झालेल्या काही पोलिसांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबक्की व मारहाण करून कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. छायाचित्रकारांना अरेरावीची भाषा वापरीत शिवीगाळ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडेखोरांच्या मारहाणीत चौघे गंभीर जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाडजवळील पानेवाडी शिवारात बेदाडेवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरावर गुरूवारी मध्यरात्री दरोडा पडला. दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा दीड लाखांचा ऐवज लुटला. दरम्यान, दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत ४ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दरोडयाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानेवाडी शिवारात एकवई रस्त्यालगत बेदाडे वस्ती आहे. गुरुवारी मध्यरात्री काशीनाथ वामन बेदाडे या शेतकऱ्याच्या घराचा दरवाजा तोडून ५ ते ६ दरोडेखोर घरात शिरले. पडवीत झोपलेल्या जनार्दन काशीनाथ बेदाडे (वय ४०), हरणबाई जनार्दन बेदाडे (वय ३५), भीमाबाई काशीनाथ बेदाडे (वय ५४) आणि सोमनाथ जनार्दन बेदाडे (वय १६) या चौघांना दरोडेखोरांनी लाकडी दांडा आणि दगडांनी बेदम मारहाण करीत रोख ७५ हजार रुपये आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने असा १ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटुन नेला. घराच्या गच्चीवर पळून गेल्याने काशीनाथ बेदाडे यांच्यापर्यंत दरोडेखोर पोहचू शकले नाही. पूजा बेदाडे ही ११ वर्षीय मुलगीही घाबरून घराबाहेर पळाल्याने ती वाचली. दरोडेखोरांनी तोंडाला काळे फडके बांधलेले होते. हाफचड्डया घातल्या होत्या तसेच ते मराठी व हिंदी बोलत होते. त्यांनी सर्वांना मारहाण केली त्यात चौघे जखमी झाले. दरम्यान, काशीनाथ बेदाडे यांनी गच्चीवरून आरडाओरड करून वस्तीवरील इतरांना दरोडेखोर घरात घुसल्याची माहिती दिली. आजूबाजूचे ग्रामस्थ मदतीला धावले मात्र दरोडेखोरांनी सर्वांना जीवेमारण्याची धमकी दिली व घराच्या मागील बाजूने पलायन केले.

जखमींना तातडीने मनमाडच्या डॉ. अजय भन्साळी यांच्या रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आले. बहुतेकांच्या डोक्याला व हाताला जबर मार बसला असून, सर्वांच्या हातांना फ्रॅक्चर झाले असल्याचे डॉ. भन्साळी यांनी सांगितले. भीमाबाई बेदाडे यांना डोक्याला चेहऱ्याला जास्त मार लागल्याने त्यांना इतरत्र हलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान दरोड्याचे वृत्त समजताच पोल‌िस उप अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी परिस्थितीची पाहणी केली व तातडीने तपास पथके सर्वत्र रवाना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवकाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

उपनगर येथे गुरूवारी (ता.२४) साडेअकराच्या सुमारास जुन्या वादातून पाच जणांनी केलेल्या मारहाणीत योगेश पवार (वय २३) या युवकाचा मृत्यू झाला. हल्ल्यात त्याचे दोन मित्रही जखमी झाले. उपनगर पोलिस ठाण्यात या घटनेत जखमी झालेला किरण सुरवाडे व सूरज पगारे यांनी याने दिलेल्या फिर्यादीवरुन पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात रिंकू सुनसुना, मुकेश मोहिते, अक्षय चावरिया, दिपक चावरिया, सनी लोट यांच्यावर गुन्हा दाखल झाले आहेत. हल्लेखोरांना अटक करुन मोक्का लावावा या मागणीसाठी नगरसेवक कुणाल वाघ, नगरसेवक राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली उपनगर नाक्यावर दुपारी बाराला एक तास रास्ता रोको करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्तीचा महासागर

$
0
0

त्र्यंबकमध्ये अभूतपूर्व उत्साहात शाहीपर्वाची सांगता

टीम मटा

तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्यातील अखेरच्या शाहीपर्वाची शुक्रवारी अभुतपूर्व उत्साहात सांगता झाली. परप्रांतीय भाविकांबरोबरच राज्यातील भाविकांच्या अनपेक्षित गर्दीचे नियोजन करताना प्रशासन व पोलिसांच्या नाकीनऊ आले. पंधरा ते वीस लाख भाविक या सोहळ्यात सहभागी झाले. त्र्यंबकनगरीत पोहचण्यासाठी भाविकांना दहा-पंधरा किलोमीटरपर्यंत पायपीट करतानाच, कुशावर्तात स्नानासाठी तब्बल दहा ते पंधरा तास वाट पाहावी लागली. ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा त्र्यंबकनगरीत जनसागर लोटल्याने अनेकदा चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती अनुभवायला मिळाली. सुदैवाने अनुचित प्रकार घडला नाही.

महिनाभराहून अधिक काळ भक्तीरसात न्हाऊन निघणाऱ्या त्र्यंबकवासीयांनी साधू-महंतांसह राज्यभरातून लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांचे आदरातिथ्य केले. सडा शिंपून, रांगोळ्या अन् फुलांच्या पायघड्या घालून साधू-महंतांचे अन् भाविकांचे स्वागत करण्यात आले. त्र्यंबकेश्वरध्ये प्रथमच प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली आणि चौक, बसस्थानकाचा परिसर इतकेच नव्हे तर नजर जाईल ती मोकळी जागा भाविकांच्या निवाऱ्याचे ठिकाण बनली होती. गुरूवारी सायंकाळपासूनच त्र्यंबकनगरीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. रस्त्यावर पथारी टाकून भाविकांनी जागा पटकावल्या होत्या. कुशावर्त, त्र्यंबकराजाचे मंदिर अन् या सर्वच परिसरात भाविकांची मांदियाळी जमली होती. विशेष म्हणजे रात्री साडेबारापर्यंत त्र्यंबकेश्वरमध्ये अडीच लाखांहून अधिक भाविक होते. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गुरुवारी रात्री दोन ते अडीचच्या सुमारास शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी कुशावर्तात स्नान केले. त्यानंतर आखाड्यांच्या शाही मिरवणुकीला सुरूवात झाली. भाविकांचा उत्साह पाहून साधू-महंतांच्याही आनंदाला भरते आले.

अन् भाविकांनी वाट धरली...

शेवटच्या शाही पर्वणीला कोणत्याही परिस्थितीत जायचेच असा दृढ निश्चय केलेल्या भाविकांनी अक्षरशः खंबाळे पार्किंगपासूनच भगवान शिवाचे गुणगान करीत पहाटेच्या कुंद वातावरणात त्र्यंबकनगरीची वाट धरली. समोर धिप्पाड ब्रह्मगिरी, अन सभोवताली पसरलेली दाट हिरवळीशी गट्टी करीत अन् अधूनमधून पडणाऱ्या दवबिंदूंची शाल अंगावर पांघरतच भाविकांनी त्र्यंबकेश्वरची वाट धरली. मात्र, तेथे पोहचल्यावर पोलिसांच्या कडेकोट नियोजनाला सामोरे जावे लागल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. गर्दीमुळे भाविकांचे प्रचंड हाल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्वणी त्र्यंबकला; डुबकी रामकुंडावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदाच्या कुंभमेळ्यातील त्र्यंबकमधील अखेरच्या पर्वणीसाठी लाखो भाविकांनी रामकुंडावरही हजेरी लावली. अनपेक्षितपणे या परिसरात वाढणाऱ्या गर्दीचा परिणाम नाशिकमध्येही दिसून आला. शुक्रवारी पहाटेपासून दिवसभरात रामकुंडावर सुमारे दोन लाख भाविकांनी स्नान केले.

गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये अखेरची पर्वणी पार पडली. या पर्वणी दरम्यान शहरात झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम काही वेळ गर्दीवरही झाला होता. त्र्यंबकमध्ये शुक्रवारी पार पडलेली पर्वणी प्रदोष अर्थात द्वादशीच्या दिवशी पार पडली. प्रदोष आणि पर्वणीकाळ एकत्रित आल्याने या दिवशीही गोदास्नानाचे विशेष पुण्य मिळत असल्याची भाविकांची श्रध्दा आहे. यानुसार रामकुंडावर पहाटे चार वाजेपासूनच भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढीला लागला होता. शहरात येणाऱ्या बसगाड्यांसह खाजगी वाहनांचीही उपस्थिती वाढीला लागली. पहाटे ४ ते दुपारी ११ या वेळेदरम्यान सुमारे दीड लाख भाविकांनी रामकुंडावर स्नान केले असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी दिली.

प्रशासनाची धावपळ

रामकुंडावर पहाटेपासूनच भाविकांची वाढणारी उपस्थिती लक्षात घेता या परिसरात प्रशासनाचीही धावपळ उडाली. नाशिकसह त्र्यंबकेश्वरी स्नान करण्यावर भाविकांचा भर दिसून येत होता. दुपारनंतर त्र्यंबकेश्वरी जाणारी वाढती गर्दी नियंत्रणात आणताना त्र्यंबक रस्त्यावर काही ठिकाणी बॅरेकेडींग करण्यात आले. तर त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या बसगाड्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात आणण्यात आली. परिणामी, मोठ्या संख्येने भाविकांनी रामकुंडावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अखिलेशचा खून ऑनर कि‌लिंगमधून ?

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

उत्तर प्रदेश राज्यातील प्रेमप्रकरणाचे पडसाद नाशिकमध्ये उमटल्याने आडगाव येथे वास्तव्यास असलेल्या अखिलेशचा बुधवारी खून झाला होता. प्रेमविवाह केलेल्या मुलीच्या भावानेच हा खून केला असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून, मोठ्या भावाच्या प्रेमप्रकरणात अखिलेशचे ऑनर कि‌लिंग झाले काय याचा तपास पोलिस करीत आहेत.

मुंबई-आग्रा हायवेवरील आडगाव शिवारातील देशमुख वस्ती येथील पोटचारीमध्ये अखिलेश प्रसाद आयोध्याप्रसाद विषाद या उत्तर प्रदेश राज्यातील ​अहमदगंज जिल्ह्यातील तिहार येथे राहणाऱ्या २४ वर्षीय तरूणाचा मृतदेह बेवारस अवस्थेत २३ सप्टेंबररोजी आढळून आला होता. मृताच्या उत्तरीय तपासणीत अखिलेशचा खून झाल्याचे निष्पण झाले. अखिलेशच्या मोठ्या भावाने तीन ते चार वर्षापूर्वी तिहार येथे प्रेमविवाह केला. या प्रेमविवाहामुळे मुलीच्या घरच्यांचे आणि अखिलेश विषादच्या परिवारामध्ये तेढ निर्माण झाली. याच प्रकरणामुळे तिथे आजही तणाव निर्माण होतात. दोन कुंटुबातील खुन्नस वाढत असताना मुलीचा भाऊ सहा महिन्यापूर्वी कामानिमित्त नाशिकमध्ये आला. काही दिवसांपूर्वी त्याची आणि अखिलेशची भेट झाली हो‌‌ती. आरोपीने अखिलेशचा खून केला. या घटनेनंतर तो फरार झाल्याने पोलिसांना आॅनर किलिंगचा संशय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांची वॉटर डिप्लोमसी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

बौध्द आणि हिंदू संस्कृतीचा मिलाफ घडवितानाच भारत-चीन संबंध दृढ करण्यासाठी शुक्रवारी आज कुशावर्त तीर्थात कैलास मानसरोवराचे पवित्र जल समर्पित करण्यात आले. राज्य सरकार, मुंबईतील चिनी दूतावास आणि ऑब्झर्वर रिसर्च फाऊंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. 'सिंहस्थाच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या या होली वॉटर डिप्लोमसीमुळे भारत चीन संबंध दृढ होतील,' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कैलास मानसरोवराचा संगम या सिंहस्थानिमित्त गोदावरीशी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.

एकादशी, प्रदोष आणि शेवटची शाही पर्वणी असा योग जुळून आल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कुशावर्तातील तीर्थात कैलास मानसरोवराचे पाणी समर्पित करण्यात आले. या सोहळ्याला पालकमंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, आमदार बाळासाहेब सानप, विशेष पोलिस महानिरीक्षक जे. जे. सिंग, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, ऑब्झर्वर रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, 'भारत आणि चीन या दोन देशांमधील संबंध सुधारण्याच्या पातळीवर अनेक प्रयोग होत आहेत. होली वॉटर डिप्लोमसीच्या अंतर्गत कैलास मानसरोवराचे पाणी आणण्यासाठी होली वॉटर डिप्लोमसीच्या अंतर्गत भटकर, क्रीडापटू अंजली भागवत, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार कैलास मानसरोवर येथे गेले होते. त्यांनी तेथून हे पाणी आणले आहे. केवळ दोन ठिकाणच्या जलाचा संगम नाही तर दोन संस्कृतींचा संगम आहे. मानवी कल्याणाच्या कार्याला हा संगम प्रेरणादायी ठरेल. होली वॉटर डिप्लोमसीच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वी झाला आहे. त्यामुळे भारत-चीन संबंध दृढ होण्यास मदत होईल. दोन्ही देशांमधील संवाद वाढेल. धार्मिक संस्कृती जोपासली जाऊन परस्परांतील संबंधही अधिक दृढ होतील. सिंहस्थात हा कार्यक्रम घेता याला याचा आनंद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. हा कुंभमेळा आपण हरित कुंभ म्हणून साजरा केला. सिंहस्थ काळात नाशिक तसेच त्र्यंबकेश्वराला भेट देणाऱ्या अनेकांनी येथील स्वच्छतेबद्दल गौरवोदगार काढले आहेत. लोकसहभागातून हे होऊ शकले असे सांगत त्यांनी नागरिकांना धन्यवाद दिले. सिंहस्थ निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल फडणवीस यांनी जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिसांचेही कौतुक केले. महाराष्ट्राला पर्जन्य द्या असे मागणे आपण त्र्यंबकेश्वरमध्ये मागितले होते. निसर्गाने आपले हे मागणे मान्य केल्याबाबत फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.

पर्यटनाला चालना मिळेल

सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक विकासकामे झाली असून, शहराचा आणि जिल्ह्यातील काही भागाचा चेहरामोहरा बदलला आहे. पर्यटन वाढीच्या दृष्टीने नाशि‌क अधिक विकसित करता येऊ शकते, असा विश्वास याप्रसंगी सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाहुणचार घेऊन साधू परतीच्या वाटेवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

बारा वर्षे प्रतीक्षा केलेल्या शाहीस्नानास बारा तास उलटले नाही तोच कुंभनगरी सामसूम झाली आहे. सुटीचा पर्वकाल साधण्यासाठी आलेले भाविक वगळता येथे आता परतीचा मार्ग धरलेल्या साधू व भाविकांची संख्या अधिक आहे. सकाळपासून आखाड्यांमध्यपे ध्वज अवतरण सुरू होते. दहापैकी सात आखाड्यांनी आपल्या ध्वजा उतरविण्याच्या धार्मिक कार्यक्रमासोबतच कढी पकोडा हा निरोपाचा खास पाहुणचार असलेले जेवण देऊन अनेक दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या साधूंना निरोप दिला.

शहरातील अन्नछत्र बंद झाले असून, पत्र्यांचे शेड काढण्याचे काम वेगाने सुरू झालेले दिसून येत आहे. आखाड्यांमध्ये ठाणापती, स्थानिक, महंत व मेळा करण्यासाठी आलेले त्या त्या आखाड्यांचे कार्यकारिणीचे साधू वगळता आचार्य, महामंडलेश्वर आदींचे प्रस्थान झाले आहे. बस स्थानकावर परतीस लागलेले साधू दिसून येत होते.

आखाड्या संबंधात नसलेले अथवा छोट्या मोठ्या राहुट्या देऊन राहिलेले साधू आपल्यासोबत आणलेले गाठोडे घेऊन बसने जाण्यासाठी बसस्थानकाच्या परिसरात येत होते. स्वतःची वाहने आणि भक्तपरिवार घेऊन आलेले साधू आपापल्या वाहनांनी जाण्यासाठी बांधाबांध करीत होते. एकूणच परतीचे चित्र असे हुरहूर लावणारे दिसत होते.

त्र्यंबकचा कुंभमेळा तसा प्रारंभीपासून चर्चेत राहिला तो संभाव्य गर्दी आणि नियोजनामुळे. अर्थात शेवटच्या शाहीस्नानानंतर दुपारी झालेली अलोट गर्दी वगळता एकूण चित्र तसे निराशाजनकच राहिले. येथे खूप पाऊस होतो आणि भाविकांची व साधूंची निवाऱ्याची गैरसोय होईल, असा अंदाज होता मात्र, पाऊसच झाला नाही.

भाविक आणि साधू येथे आले आणि स्वच्छता व मुबलक शुध्द पाणीपुरवठा यांचा संदेश घेऊन गेले. गर्दीच्या कालावधीत वीज, पाणी आणि स्वच्छता यांनी पुरविलेली अखंड सुविधा प्रशंसेचा विषय ठरली. त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले.

पोलिस आत्मपरीक्षण करतील काय?

पोलिस यंत्रणा मात्र याबाबत टीकेची धनी ठरली असून, पहिल्या स्नानास अपेक्षेपेक्षा कमी गर्दी झाली तेव्हा काही पावले मागे सरकलेली ही सुरक्षा व्यवस्था नंतरच्या शेवटच्या स्नानाच्या दरम्यान पुन्हा नियमनाच्या अतिरेकाने चर्चेत आली. यामध्ये प्रशिक्षणार्थी अथवा नुकतेच शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अधिकारी आणि पोलिस कर्मचारी यांचा भाविकांशी व स्थानिकांशी झालेला विसंवाद निश्चितच गांभीर्याने विचार करण्यास पात्र ठरला. भविष्यात हे नवीन भरती झालेले अधिकारी व कर्मचारी पोलिसांच्या या अपकिर्तीत भर घालणार काय अशी चर्चा आता सर्वत्र होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘‌बिझनेस बँकेत घोटाळा नाहीच’

$
0
0

नाशिकरोड : नाशिकरोडच्या बिझनेस बँकेत घोटाळा झालेला नाही, कोणीही संचालक दोषी नाही. गुरुवारच्या (ता.२४) १९ व्या वार्षिक सभेत सभासदांना सत्य सांगणार असल्याची माहिती अध्यक्ष वसंत नगरकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

उपाध्यक्ष संजय सुराणा, नेमिचंद कोचर, विजय संकलेचा, अशोक तापडीया, राजश्री कपोते, आशा जाजू, मिलिंद दंडे आदी संचालकांनीही बँकेची बाजू मांडली. अजगर खान यांच्या ५० लाखांच्या कथित एफडी घोटाळाप्रकरणी पोलिसांनी काल न्यायालयाचे सर्च वॉरंट घेऊन बँकेची झडती घेतली. त्याबाबत नगरकर म्हणाले की, योग्य कागदपत्रे सादर केल्यानेच कोर्टाने संचालकांना जामीन दिला. तपासासाठी आम्ही पोलिसांना सहकार्य करीत आहोत. बँकेचे ६१ लाख रुपये डुबवणारे, बँकेत खोट्या नावाने खाती उघडून फसवणूक करणारेच बॅँकेची बदनामी करीत आहेत. खान यांचा निवडणुकीत अर्ज बाद झाल्यामुळे ते आता बदला घेत आहेत. कर्मचाऱ्यांच्या चुकीबद्दल संचालकांना जबाबदार धरले जाऊ शकत नाही, असा कोर्टाचा निकाल आहे.

सचोटीमुळेच ड मधून अ वर्गात जाणाऱ्या या बँकेने केवळ १८ वर्षांत चाळीस कोटींची मालमत्ता उभी केली आहे. बँकेचा एनपीए शुन्य आहे. साडेपाच हजार सभासद व ११६ कोटींच्या ठेवी असून, निव्वळ नफा एक कोटी ४०लाख आहे. बँकेची परिस्थिती भक्कम असल्यानेच सभासदांचा विश्वास कायम आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाशिकचा कुंभमेळा आदर्श अन् सुरक्षित’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक व त्र्यंबकेश्वरचा सिहंस्थ कुंभमेळा हा सुरक्षित, स्वच्छ, हरित व आदर्श कुंभमेळा झाल्याचा दावा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. देशात असा कुंभमेळा कधीच झाला नसल्याचे सांगून तीन पर्वण्यांमिळून नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये दोन कोटी भाविकांनी हजेरी लावल्याचा दावाही त्यांनी केला. सर्वांच्या सहकार्यानेच राज्य सरकारने हा कुंभमेळा यशस्वी करून दाखविल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्र्यंबकेश्वरमधील तिसरी पर्वणी यशस्वी झाल्यानंतर माध्यमांशी बोलतांना पालकमंत्र्यांच्या चेहऱ्यावर कुंभमेळा यशस्वी व सुरक्षित केल्याचा आत्मविश्वास झळकत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित असलेला सुरक्षित, स्वच्छ व हरित असा आदर्श कुंभमेळा नाशिकचा झाला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौव्हान यांनी आपल्याला फोन करून कुंभमेळा यशस्वी व आदर्श झाल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या तीनही पर्वण्या यशस्वी झाल्या आहेत. दोन्ही ठिकाणी तीन पर्वण्यांमध्ये जवळपास दोन कोटी भाविकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येवर भाविक आले असतानाही कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लवकरच भुसावळ-नाशिक लोकल

$
0
0

म. टा. वृत्तेसवा, भुसावळ

भुसावळ- नांदगाव- नाशिक ही लोकल एक महिन्यात सुरू होण्याची शक्यता असून, त्यासाठी तांत्रिक चाचपणी सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) सुधीरकुमार गुप्ता यांनी शनिवारी भुसावळ येथे दिली.

इटलीतील दोन आठवड्यांच्या प्रशिक्षणावरून परतल्यानंतर गुप्ता यांनी भुसावळ येथे शनिवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. इटलीमध्ये एसडीए बकोनी स्कूलमध्ये दोन आठवड्यांचे लीडरशिप प्रशिक्षण नुकतेच झाले. प्रशिक्षणात भारतातून रेल्वेचे अधिकारी सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून भुसावळ व नागपूर विभागाचे व्यवस्थापक सहभागी झाले होते. प्रशिक्षणाबाबत माहिती देताना डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांनी सांगितले, की बदल हे चक्र आहे. इटलीत रेल्वेचे कमी गती, मध्यगती व उच्च गती अशा श्रेणी आहेत. उच्च गतीच्या रेल्वेला भेट देऊन त्यांची माहिती जाणून घेतली.

लोकलसाठी मुंबईत प्रशिक्षण?

भुसावळ-नाशिक लोकलसेवा सुरू करण्यासाठी तांत्रिक चाचपणी सुरू आहे. या लोकलसेवेबाबत चालक व कर्मचाऱ्यांनी मुंबईत प्रशिक्षण घेतल्याचे समजते. ही लोकलसेवा कुंभमेळ्याच्या काळातच सुरू होणार होती. मात्र, काही कारणास्तव विलंब झाल्याची चर्चा आहे.

अप-डाऊन करणाऱ्यांची सोय

भुसाव‍ळ-नाशिक ही लोकलसेवा भुसावळसह जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड येथे थांबा घेऊ शकेल, अशी शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील अप-डाऊन करणाऱ्या सुमारे साडेतीन हजार प्रवाशांची सोय होईल. ही गाडी

सध्या भुसावळला दाखल झालेली आहे. तांत्रिक चाचणीनंतर ती प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होईल. या लोकलला चांगला प्रतिसाद लाभणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

रेल्वेचीही पर्वणी!

त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्याच्या अंतिम पर्वणीत खान्देश, उत्तर भारतातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली असून, तब्बल ७० हजार तिकिटांची विक्री झाल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

आपल्याकडे अंमलबजावणीतच अडथळे

इटलीमध्ये तिकीट खिडकी नाही. प्रत्येक प्रवाशाला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तिकीट देण्यात येते. इटलीमध्ये एकच तिकीट काढून रेल्वे व बसचा प्रवास करता येतो. तशी सोय आपल्याकडे नाही. मात्र, चेन्नईमध्ये हा प्रयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात रेल्वेच्या विकासासाठी इटलीप्रमाणे संधी आहे. त्यांच्या आणि आपल्या परिस्थितीत विशेष फरक नाही. फक्त आपल्याकडे कृती करताना अनेक अडथळे असतात, असे गुप्ता यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पांच्या विसर्जनासाठी ३४ ठिकाणे

$
0
0

१९ कृत्रिम तलावांचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने कृत्रिम तलावांची परिणामकारकता लक्षात घेऊन महापालिकेकडून गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. गणपती विसर्जनासाठी महापालिकेने नैसर्गिक आणि कृत्रिम तलाव मिळून ३४ ठिकाणे नि​श्चित केली आहेत.

गणपती विसर्जनासाठी महापालिकेने निश्चित केलेल्या ३४ ठिकाणांमध्ये १९ कृत्रिम तलावांचाही समावेश आहे. या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कलश तसेच, निर्माल्य घंटागाडी उपलब्ध करून दिली जाणार आहे. मागील तीन वर्षांपासून कृत्रिम तलावांना भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने महापालिकेने जय्यत तयारी केली आहे.

विसर्जन ठिकाण विभागनुसार

सिडको विभाग- आयटीआय पूल, डे केअर स्कूल इंदिरानगर- चेतनानगर (कृत्रिम तलाव), गोविंदनगर सामाजिक सभागृह जिजाऊ वाचनालय (कृत्रिम तलाव), पिंपळगाव खांब, वालदेवी नदी घाट, राजे संभाजी स्टेडियम अश्विन नगर (कृत्रिम तलाव), हिरे विद्यालय, पवनगर (कृत्रिम तलाव)

नाशिक पश्चिम

एकमुखी दत्त मंदिरालगत गोदावरी तीर, सिध्देश्वर मंदिर, घारपुरे घाट, हनुमान घाट, अशोक स्तंभ, गोदापार्क जॉगिंग पार्क, लोकमान्य नगर चोपडा लॉन्स (कृत्रिम तलाव), चव्हाण कॉलनी, परिचा बाग (कृत्रिम तलाव), फॉरेस्ट नर्सरी (कृत्रिम तलाव), दोंदे पूल उंटवाडीरोड, म्हसोबा मंदिराजवळ नासर्डी पूल (कृत्रिम तलाव), येवलेकर मळा, बॅडमिंटन हॉल (कृत्रिम तलाव), महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ (कृत्रिम तलाव), लायन्स क्लब मनपा विभागीय कार्यालयासमोर, पंडित कॉलनी (कृत्रिम तलाव)

सातपूर

नासर्डी नदीवरील पूल, सातपूर-अंबड लिंकरोड, गंगापूर धबधबा, सोमेश्वर, चांदशी पूल आनंदवली, मते नर्सरी पूल सावरकरनगर, पाइपलाइन रोड रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ (कृत्रिम तलाव), विजडम हायस्कूल, अशोकनगर पोलिस चौकी (कृत्रिम तलाव), शिवाजीनगर सूर्या मर्फी चौक (कृत्रिम तलाव)

नाशिकरोड

चेहडीगाव, दारणा नदी किनारी, गोदावरी नदीतीर, दसकगाव नदी तीर, वालदेवी नदी तीर देवळालीगाव, वडनेर पंपिंग तसेच विहीतगाव वालदेवी नदी तीर, मनपा शाळ क्रमांक १२५, मुक्तीधाम मागे मैदानावर (कृत्रिम तलाव), शिखरेवाडी मैदान (कृत्रिम तलाव), मनपा नर्सरी, जयभवानीरोड (कृत्रिम तलाव), इंदिरागांधी पुतळ्याजवळ, नारायण बापू चौक, जेलरोड (कृत्रिम तलाव)

पंचवटी

रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, तपोवन कपिला संगम, नांदूर मानूर, आडगाव पाझर तलाव, सीता सरोवर, म्हसरूळ, जॉगिंग ट्रॅक रामवाडी, कोणार्कनगर, गणेश मार्केट (कृत्रिम तलाव), गोपाळ नगर (कृत्रिम तलाव), वाघाडी (कृत्रिम तलाव), आरटीओ कॉर्नर पेठरोड (कृत्रिम तलाव), गोरक्षनगर, दिंडोरीरोड (कृत्रिम तलाव), राजमाता मंगल कार्यालय, वाघाडी नदी (कृत्रिम तलाव), दत्तचौक, किशोर सूर्यवंशी मार्ग (कृत्रिम तलाव)

नाशिक पूर्व

कपूरथळा पटांगण, रोकडोबा तालीम, टाळकुटेश्वर मंदिर पूल, रामदास स्वामी मठ, शिवाजीवाडी, रामदास स्वामी नगर बसस्टॉप (कृत्रिम तलाव), साईनाथ नगर चौफुली, जॉगिंग ट्रॅक जवळ, किशोरनगर (कृत्रिम तलाव), राणेनगर (कृत्रिम तलाव)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीपल्स रिपब्लिकनचे बिटको चौकात धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

सनातन संस्थेने जातीय सलोखा बिघडविण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप करीत या संघटनेवर बंदी घालावी, या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे शनिवारी बिटको चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

पक्षाचे नेते शशिभाई उन्हवणे, राहुल तुपलोंढे, हरिभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात महादेव खुडे, संदीप काकळीज, नंदू जाधव, प्रवीण निकम, रवी खरात, नीलेश उन्हवणे, प्रकाश साडे, राजू खरात, मिलिंद शेजवळ, संतोष गायधनी, सीताबाई कातकाडे, अल्का निकम, अमोल कचरे, रवि खरात आदी सहभागी झाले. नरेंद्र दाभोळकर आणि पानसरे हत्याप्रकरणातील दोषींना त्वरित अटक करून त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगर खूनप्रकरणी पाच जणांना कोठडी

$
0
0

नाशिकरोड : उपनगर येथील योगेश पवार या युवकाच्या खूनप्रकरणी उपनगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. नाशिकच्या न्यायालायाने शनिवारी त्यांना तीन आक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

अक्षय दीपक चावरीया (२०, उपनगर), दीपक रामचंद्र चावरीया (४०, उपनगर), सनी राजेश लोट (२३, महालक्ष्मी चाळ, नाशिक), अभिजित उर्फ रिंकू भारत सुनसुना (१८, उपनगर), मनिष ऊर्फ मुकेश मोहिते (२१, कॅनलरोड, जेलरोड) अशी त्यांची नावे आहेत. उपनगर येथे जुन्या वादातून शनिवारी (ता.२४) मध्यरात्री या पाच जणांनी योगेशची चाकूने हत्या केल्याचे व आपल्यासह दोघांना जखमी केल्याची तक्रार किरण सुरवाडे याने उपनगर पोलिस ठाण्यात दिली. नगरसेवक व नागरिकांनी रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करून हल्लेखोरांना पकडले. नाशिकरोडचे कोर्ट शनिवारी बंद असल्याने संशयितांना नाशिक कोर्टात हजर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमा विनयार्डला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशकात कार्यरत असलेल्या सोमा विनयार्डच्या शेनिन ब्लॅक गोल्ड या वाइनला अत्यंत प्रतिष्ठेचा डिकँटर्स एशिया वाइन अॅवॉर्ड प्राप्त झाला आहे. नाशकातील वाइनला पहिल्यांदाच अशा प्रकारचा पुरस्कार मिळाला असून, येत्या ५ ऑक्टोबरला एका आंतरराष्ट्रीय समारंभात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. भारताची वाइन कॅपिटल म्हणून नाशिकची ओळख आहे. देशातील सर्वाधिक वायनरी नाशकात आहेत. वाइनसाठी लागणाऱ्या द्राक्षांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी वायनरी करार करीत असून, याद्वारे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून वाइन उद्योगाकडे पाहिले जाते.

गेल्या काही वर्षात वाइन उद्योगात झपाट्याने बदल आणि विकास होत आहे. शहरालगत कार्यरत असलेल्या सोमा विनयार्डसच्या शेनिन ब्लॅक गोल्ड या वाइनला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठेचा असलेला डिकँटर्स एशिया वाइन अॅवॉर्ड मिळाला आहे. भारतातून २५ तर आशिया खंडातून एकूण २६०० नामांकन दाखल झाले होते. त्यातून सोमा विनयार्डसच्या शेनिन ब्लॅक गोल्ड या ब्रँडची निवड झाल्याचे सोमा विनयार्डसचे चेअरमन प्रदीप पाचपाटील यांनी सांगितले. रंग, गंध, चव अशा विविध निकषांच्या आधारे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, येत्या ५ ऑक्टोबरला एका आंतरराष्ट्रीय समारंभात त्याचे वितरण केले जाणार आहे.

पहिल्याच वर्षी सोमाला आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाल्याने ही नाशिकसाठीही अभिमानाची बाब ठरल्याचे पाचपाटील यांनी सांगितले. या पुरस्कारामुळे वाइनप्रेमींची निवड ही शेनिन ब्लॅक गोल्ड राहील. यातून तिचे उत्पादन व विक्री वाढणार असल्याने त्याचा फायदा नाशिकलाच होईल, असा विश्वासही प्रदीप पाचपाटील यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरोपाचा दिनु!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी विराजमान झालेले लाडके गणराय भाविकांच्या घरचा अकरा दिवसांचा पाहुणचार आटोपून आज, रविवारी परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. वातावरणात पसरलेला गुलाल... चौपाट्यांच्या दिशेने वाहत जाणारी गर्दी... मोदक, लाडू, दहीभात अशी प्रवासासाठीची शिदोरी बांधून बाप्पांना निरोप देणारे भाविक... नदी किना किनाऱ्यावर वाऱ्यापासून आडोसा शोधत होणारी आरती... ओलावलेले डोळे आणि 'पुढच्या वर्षी लवकर या'चा होणारा जयघोष... अनंत चतुर्दशीच्या दिवशी हमखास दिसणारे हे निरोपाचे दृश्य रविवारी ठिकठिकाणी दिसणार आहे.

विसर्जनासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह प्रशासनाने तयारी चालवली आहे. सिंहस्थ कुंभमेळा आणि दुष्काळ या दोन्हीमुळे यंदाचा गणेशोत्साव काहीसा झाकोळला गेला असला तरी भक्तांच्या उत्साहावर तसूभरही परिणाम झालेला नाही. यंदा शहरात सुमारे ८०० छोट्या मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांकडून श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. मुख्य विसर्जन मिरवणुकीची सुरूवात दुपारी १२ वाजता वाकडी बारव येथे होईल. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या १९ मोठ्या मंडळाची भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये संध्याकाळी उशिरापर्यंत नोंदणी करण्याचे काम सुरू होते. या मंडळाची संख्या आणखी वाढू शकते. नंबरवरून गोंधळ होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याचा दावा भद्रकाली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी केला. शहरातील मुख्य मिरवणुकीसह नाशिकरोड, जेलरोड, गंगापूररोड, इंदिरानगर, सातपूर या ठिकाणी मिरवणुकींचा जल्लोष पाहता येईल.

'मटा'चा पुढाकार

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विचार करता 'महाराष्ट्र टाइम्स' व 'मातोश्री पॉलिटेक्निकचा मॅकेनिकल विभाग' यांच्या संयुक्त विद्यमाने अनंत चतुर्दशीला मूर्ती व निर्माल्य संकलन उपक्रम राबविण्यात येणार आहे. जलप्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांमध्ये यानिमित्ताने प्रबोधन केले जाणार असून, मूर्तीदानाचे महत्त्व पटवून सांगितले जाणार आहे. सात ते आठ जागा निवडण्यात आल्या असून, मातोश्री कॉलेजचे १०० विद्यार्थी उपक्रमासाठी पुढाकार घेणार आहेत.

बंदोबस्ताचे कडे

मुख्य विसर्जन मार्गावर एक पोलिस उपायुक्त, दोन एसीपी, ९ पोलिस निरीक्षक, २२ पीएसआय, २१० पोलिस कर्मचारी, याशिवाय सीआरपीएफच्या दोन तुकड्या तैनात असतील. नाशिकरोड, जेलरोडसह शहराच्या महत्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. आज संध्याकाळी मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर पोलिसांनी रूटमार्च करीत शक्तीप्रदर्शन केले.

कृत्रिम तलाव आणि मूर्तीदान

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने कृत्रिम तलाव तयार करण्याचा निर्णय महापालिकेने २०१२ साली घेतला. महापालिकेच्या या उपक्रमास तेव्हापासून चांगला प्रतिसाद मिळत असून, दरवर्षी लाखो गणेश मूर्ती संकलित केल्या जातात. यासाठी महापालिकेने आरोग्य कर्मचाऱ्यासह स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कच चुकला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधला पहिला चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्यकेशन पार्क साकार झाला असला तरी तो चुकला असून, या ठिकाणी सर्व प्रकारचे बोर्ड इंग्रजीत लावण्यात आले आहेत. तसेच, या पार्कमध्ये टोलनाका कुठेच नाही. म्हणून पार्कमध्ये टोल नाका बसवा आणि मराठीत बोर्ड लावा, असे उपहासात्मक वक्तव्य करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पार्कचे उद्घाटन केले.

तिडके कॉलनीत साकारलेल्या पार्कचा लोकार्पण सोहळा शनिवारी सायंकाळच्या सुमारास झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, मनसेच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असलेला ट्रॅफिक पार्क सर्वसामान्यांसाठी खुला झाला असून, या पार्कद्वारे लहान मुलांसह युवक, प्रौढ व ज्येष्ठांनाही वाहतुकीचे धडे दिले जाणार आहेत. वाहतुकीची काळजी करणाऱ्या वाहतूक पोलिसांना (कॉन्स्टेबल) कुठल्याही प्रकारचे अधिकार नाहीत. वाहतुकीचे नियम हे पाळण्यासाठी असतात हेच मुळात आपल्याकडे अनेकांना माहित नाही. या पार्कमध्ये केवळ लहानग्यांनाच नाही तर मोठ्यांनाही शिकवायला हवे. आपल्याकडे रिक्षाचालक हे डावी किंवा उजवीकडे वळताना इंडिकेटर देण्याऐवजी पाय बाहेर काढतात, असेही राज यांनी सांगितले. पार्कच्या माध्यमातून नाशिकच्या वाहतुकीला वेगळा आयाम मिळेल. मनसेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पण, प्रकल्प पूर्ण होण्यास काही कालावधी लागतो. सगळं होईल, थोडं थांबा, असे आवाहन राज यांनी नाशिककरांना केले. लोकोपयुक्त आणि प्रभावी प्रकल्पांसाठी नाशिककरांनी पुढे यावे, अशी विनंतीही राज यांनी केली.लोकार्पण सोहळ्यात व्यासपीठावर महापौर अशोक मुर्तडक, महिंद्रा कंपनीचे सीईओ राजीव दुबे, निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. पी. एस. पसरीचा, लॉर्डस इंडियाचे एमडी विलास ढवळे, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, आमदार देवयानी फरांदे, नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, महापालिकेचे स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, नगरसेवक सुजाता डेरे, सुनीता मोटकरी आदी उपस्थित होते.

ट्रॅफिक सेल कार्यान्वित करा

नाशकात ट्रॅफिक पार्क आता सुरू झाला आहे. पण, महापालिकेत आता ट्रॅफिक सेल कार्यान्वित होण्याची गरज आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी दूर होतानाच येत्या काळात वाहतूक समस्या उदभवणार नाही. यासाठी सेलद्वारे काळजी घेतली जाईल, असे अभय कुलकर्णी यांनी सांगितले.

पसरिचांचे मार्गदर्शन

नाशिकला आपण भेटी दिल्या आहेत. आता नाशिकच्या ट्रॅफिक संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शन करा, अशी विनंती राज यांनी केली आहे. त्यानुसार सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे पसरिचा यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images