Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

तपोवनात कायमस्वरुपी रुग्णालय

0
0

महापालिकेचा विचार सुरू

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात उभारण्यात आलेले साठ खाटांचे रुग्णालय कायमस्वरुपी ठेवण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेले रुग्णालय कायम सुरू ठेवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. तसेच, नागरिकांचा या रुग्णालयाला चांगला प्रतिसाद असल्याने हे रुग्णालय कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा विचार सुरू असल्याचे अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी सांगितले.

कुंभमेळ्यासाठी पालिकेच्या वतीने तपोवनात तात्पुरत्या स्वरुपात साठ खाटांचे रुग्णालय सुरू केले होते. या रुग्णालयातून साधू-महंतासह भाविकांना आपत्कालीन परिस्थितीत सुविधा दिली गेली. मात्र, भाविक आणि साधू-महंतांपेक्षा सिंहस्थ काळात स्थानिक नागरिकांनीच या रुग्णालयाचा चांगला लाभ घेतला. त्यामुळे हे रुग्णालय सिंहस्थासाठीच न ठेवता कायमस्वरुपी सुरू ठेवण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. परिसरातील नगरेसवकांनीही इथे कायमस्वरूपी रुग्णालय करण्यासाठी दबाव टाकला आहे. त्याला प्रशासनानेही प्रतिसाद दिला असून, हे रुग्णालय कायमस्वरुपी करण्यावर विचार सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या रुग्णालयाचा स्थानिकांना फायदा होणार असल्याने प्रशासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे स्थानिकांना आता तपोवनातच कायमस्वरुपी उपचार मिळण्याची शक्यता आहे.

तपोवनातील रुग्णालय कायमस्वरूपी सुरू राहिल्यास मोठ्या परिसराला याचा फायदा होणार आहे. या परिसरातील रुग्णांना उपचारासाठी इतरत्र जावे लागते. मात्र, या रुग्णालयामुळे मोठी सोय होणार आहे.

नर्सिंग कॉलेजचा विचार

तपोवनातील हे रुग्णालय कायमस्वरुपी सुरू ठेवण्यासह या ठिकाणी नर्सिंगचा अभ्यासक्रम सुरू करण्याचाही प्रशासनाचा मानस आहे. नर्सिंग कॉलेज सुरू झाल्यास पालिकेला मनुष्यबळही उपलब्ध होणार आहे. त्यासाठी आरोग्य विद्यापीठाशी करार करण्याचा पालिकेचा विचार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नव्या ‘एलबीटी’तून मिळाले २५ कोटी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने नव्याने राबविलेल्या एलबीटी धोरणामुळे पालिकेला आर्थिक फटका बसेल असा धसका घेतला होता. मात्र, ऑगस्ट महिन्यात वसुली झालेल्या ५० कोटींच्या वर ऊलाढाल असलेल्या कंपनीकडून अपेक्षेपेक्षा चांगली वसुली झाली. जवळपास शंभर कंपन्यांकडून पालिकेच्या तिजोरीत एलबीटीपोटी २५ कोटी रुपये जमा झाले आहेत. अपेक्षित उत्पन्नापेक्षा ९ ते १० कोटीने ते अधिक आहे. दरम्यान, अभय योजनेमुळे पालिकेच्या तिजोरीत तीन महिन्यात तब्बल २० कोटी रुपये जमा झाल्याने पालिकेला दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारने एक ऑगस्टपासून एलबीटी धोरणात बदल करीत ५० कोटींच्या आत ऊलाढाल असलेले व्यापारी, उद्योजकांना एलबीटीतून सवलत दिली. नव्या धोरणात पालिकेच्या उत्पन्नात मोठी घट होईल, अशी भीती व्यक्त केली जात असतानाच पालिकेच्या एलबीटी विभागाने चांगली कामगिरी करीत अपेक्षपेक्षा चांगली वसुली केली. महापालिका हद्दीत असलेल्या ५० कोटींच्या वर उलाढाल असलेल्या कंपन्याकडून तब्बल २५ कोटींची वसुली झाली. पालिकेने दरमहा १५ ते १६ कोटी रुपये मिळतील, असा अंदाज बांधला होता. मात्र, त्यापेक्षा १० कोटी अधिक आले आहेत. शासनाने अनुदानापोटी ४५ कोटी ८५ पालिकेला अगोदरच अदा केले आहेत.

महापालिकेला अभयचे मिळाले २० कोटी

एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी राबविलेल्या अभय योजेतूनही पालिकेच्या तिजोरीत तब्बल २० कोटी ४० लाख रुपये जमा झाले आहेत. सन २०१३-१४ या वर्षात १०५० व्यापाऱ्यांकडून ३ कोटी ५३ लाख, सन २०१४-१५ या वर्षात १०७८ व्यापाऱ्यांकडून १६ कोटी २७ लाख तर सन २०१५-१६ या वर्षात १५ व्यापाऱ्यांकडून ६२ लाखांची वसुली झाली. व्याज आणि दंडापोटी पालिकेला चार कोटीवर पाणी सोडावे लागले. मात्र, तरीही २० कोटी तिजोरीत जमा झाल्याने पालिकेला आर्थिक दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुंभळे-पिंगळे हमरीतुमरीवर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सत्ताधारी व विरोधकांच्या आरोप- प्रत्यारोपाने चांगलीच गाजली. सभापती पैशांचा भ्रष्टाचार करीत असून, समितीचा कारभार घरच्या सारखाच चालवत असल्याचा आरोप संचालक शिवाजी चुंभळे यांनी पिंगळेंवर केला, तर विरोधकांची दादागिरी खपवून घेणार नाही ,असा इशारा पिंगळेंनी चुंभळेंना दिला. पराभूत मनोवृत्तीतून चुंभळे असे आरोप करीत असल्याचा पलटवार पिंगळेंनी केला. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.

बाजार समितीची निवडणूक नुकतीच चुरशीत पार पडली. यात पिंगळे यांनी सत्ता राखतांना दणदणीत विजय मिळविला. तत्पूर्वी झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीत पिंगळे यांचा शिवाजी चुंभळे यांनी धक्कादायक पराभव केला होता. तेव्हापासून आप्तस्वकीय असलेल्या या दोन नेत्यांमध्ये विळ्या भोपळ्याचे सख्य झाले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीनंतरची ही पहिलीच वार्षिक सर्वसाधारण सभा असल्याने सभासदांसह सहकार क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष होते.

प्रारंभी सचिव अरुण काळे यांनी अहवाल वाचन केले. गेल्या वर्षीच्या इतिवृत्ताचे वाचन सहसचिव केशव शेवाळे यांनी केल्यानंतर सभापती पिंगळे यांनी सभा संपल्याचे जाहीर केले. या प्रकाराने संतप्त झालेले शिवाजी चुंभळे, संपत सकाळे व संदीप पाटील यांनी आक्षेप घेत सभासदांना इतर विषयांवर बोलू देण्याचा आग्रह धरला.

मुरलीधर पाटील यांनी समितीवर किती कर्ज आहे, किती फेड झाली याची सभेला माहिती द्यावी, अशी विनंती केली. समितीत कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला असून, त्यावर चर्चा होऊ नये म्हणून सभा गुंडाळल्याचा आरोपही यावेळी केला गेला. समितीत भ्रष्टाचार फोफावला असून, सभापती आपल्या घरचा कारभार समजून समितीचे कामकाज करीत असल्याचा आरोप चुंभळे यांनी केला. सभापती देवीदास पिंगळे यांनी मात्र समितीत कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही.

निवडणुकीनेच या प्रश्नांची सभासदांनी परस्पर उत्तरे दिली. विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानेच सभा संपल्याचे जाहीर केले, असा खुलासा केला. सोबतच कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. या आरोप प्रत्यारोपात सभेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टूरच्या नावाने उधळपट्टी!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी खर्चावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करण्याची आवश्यकता असताना अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली आता संचालक मंडळच सातारा बँकेच्या अभ्यासाला जाणार आहेत. पुढील आठवड्यात २१ संचालक मंडळ साताऱ्याची टूर करणार असून, सातारा बँकेचा पॅटर्न नाशिक बँकेत राबविण्यासाठी अभ्यास करणार आहेत. संचालकांच्या या दौऱ्यामुळे बँकेला शिस्त लागेल तेव्हा लागेल मात्र, त्यांच्या टूरची हौस पूर्ण होणार आहे. दरम्यान सोमवारच्या सर्वसाधारण सभेत पीककर्जाची मर्यादा वाढवण्यासह, सुरक्षारक्षक नेमणे, विमा संरक्षण वाढविण्याचे ठराव संमत करण्यात आले.

नव्या संचालक मंडळाची पहिलीच सर्वसाधारण सभा अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. सभासदांनी या सभेत विविध मागण्यासाठी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असला तरी अध्यक्षांनी सभासदांसह संचालकांना विश्वासात घेत काही महत्त्वपूर्ण विषय मंजूर करून घेतले. पीककर्ज मर्यादा वाढविण्यासह सुरक्षारक्षक नेमणे, निसाका, नासाका सुरू करणे, ठेवींना विमा संरक्षण वाढवणे, सक्तीची कर्जवसुली थांबविणे, लॉकर्सधारकांनाही विमा संरक्षण देणे, सभासदांना लांभाश देणे, कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ५८ वरून ६० करावे आदी विविध मागण्या सभासदांनी केल्या. यातील बहुतांश मागण्यांना सभेत हिरवा कंदील दाखवण्यात आला. निसाका व नासाकावर मात्र चर्चा टाळण्यात आली.

विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव जिल्हा बँकेत वर्ग करण्याची मागणी करण्यात आली होती. सातारा जिल्हा बँकेत सचिवांना सहकार विभागाकडून बँकेत वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे बँकेची वसुली ९० टक्क्याच्या वर असून एकही संस्था तोट्यात नाही. त्यामुळे सातारा जिल्हा बँकेच्या कारभाराचा अभ्यास करण्यासाठी संचालक सातारा जिल्ह्याचा दौरा करण्याचा ठरावही या सभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे २१ संचालक पुढील आठवड्यात साताऱ्याच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठीचा आर्थिक खर्च बँकेलाच उचलावा लागणार आहे. संचालकांच्या या निर्णयावर मात्र सभासदांनी टीका केली. बँकेला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्याऐवजी संचालक मंडळ सातारा जाऊन काय पाहणार असा सवाल सभासदांनी केला आहे.



दौऱ्यातून काय साध्य होणार?

सातारा बँकेने सचिवांची सेवा सहकार विभागाकडून आपल्याकडे वर्ग करीत वसुली शंभर टक्के वाढविण्याचा पॅटर्न राबविला आहे. त्यामुळे हा पॅटर्न सातारा पॅटर्न म्हणून ओळखला जातो. मात्र, या पॅटर्नच्या अभ्यासासाठी २१ संचालकांना साताऱ्याला जाण्याची गरजच काय?, असा सवाल सभासदांनी उपस्थित केला आहे. एक संचालक आणि एक अधिकारी जाऊन या पॅटर्नचा अभ्यास करू शकतो. मात्र, त्यासाठी सर्वांनीच जाण्याची गरज आहे काय, असा सवाल करीत यावर खर्चाची उधळपट्टीच होणार असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे संचालकांच्या या प्रयत्नावर आता काही संचालक आणि सभासदच आक्षेप घेत आहेत. त्यामुळे हा विषय वादात सापडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क सज्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लहान मुलांवर वाहतूक नियमांचे संस्कार करण्यासाठी प्रस्तावित असलेले चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क सज्ज झाले असून, येत्या शनिवारी त्याचे उद्घाटन केले जाणार आहे. या पार्कच्या निमित्ताने शहरात आणखी एक वेगळा प्रकल्प कार्यरत होणार असून, उत्तम महाराष्ट्रातील विद्यार्थी या पार्कमध्ये प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत.

लहान वयातच संस्कार झाले तर, भविष्यात अडचणी न उद्भवता विविध कामे सहज होतानाच कुठल्याही प्रकारचे नियम जाणून बुजून तोडले जात नाहीत. खासकरून वाहतुकीच्या नियमांबाबत फारशी जागरूकता नसल्याने वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जातात. यातूनच विविध अपघात होण्यासह काही अनावस्था प्रसंगही उद्भवतात. ही बाब लक्षात घेऊन नाशिक फर्स्ट या संस्थेने लहान मुलांवर वाहतुकीचे संस्कार घडविण्यासाठी चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क साकार केले आहे. या पार्कसाठी महिंद्राने अडीच कोटी रुपये तर लॉर्ड इंडिया फाऊंडेशनने ६० लाख रुपये दिले आहेत. या पार्कसाठी एकूण दोन कोटी रुपयांचा निधी उभा करून त्याची योग्य ती देखभाल केली जाणार असल्याचे नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी दिली.

तिडके कॉलनीतील अडीच एकर जागा महापालिकेने नाशिक फर्स्टला दिली असून, त्यावर हे पार्क साकारले आहे. या पार्कचे येत्या शनिवारी (२६ सप्टेंबर) उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी मनसे प्रमुख राज ठाकरे, महिंद्रा कंपनीचे सीईओ राजीव दुबे, निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. पी. एस. पसरीचा, लॉर्डस इंडियाचे एमडी विलास ढवळे, महापौर अशोक मुर्तडक, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित राहणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

पार्कची वैशिष्ट्ये

बस थांबा, रेल्वे स्टेशन, रस्ते आणि रस्त्यांवरील सूचना फलक, वाहतुकीचे नियम दर्शविणारे फलक, पेट्रोलपंप, शाळा, मॉल्स, उड्डाणपूल, अंडरपास आदींच्या प्रतिकृती असतील. तसेच, मुलांना छोटेखानी वाहने दिली जातील. ही वाहने चालविताना वाहतुकीच्या नियमांचे कसे पालन करायचे याचे प्रशिक्षण दिले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ चिमुरड्याच्या डोळ्यांची दोन पाखरे..!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नव्या जगाला चिमुकल्या नेत्रात साठवून घेण्याअगोदर दुर्दैवाने अवघ्या चार वर्षीय शौर्यचा रविवारी मृत्यू ओढवला. मात्र पुत्रशोकाच्या आवेगातही सामाजिक बांधिलकीचे भान जपत शौर्यचे आई-वडिल ऋषीकेश व वैशाली परमार यांनी मयत चिमुरड्याचे नेत्रदान करून नवा आदर्श निर्माण केला आहे. परमार कुटुंंबीयांच्या या धैर्याच्या निर्णयाने 'या डोळ्यांची दोन पाखरे, फिरतील तुमच्या भोवती... पाठलाग हे सदैव करतील, असा कुठेही जगती.!' या ओव्या पुन्हा जिवंत झाल्याचा अनुभव नाशिककरांना आला.

म्हसरूळ परिसरातील प्रभातनगरमध्ये परमार कुटुंंबीय रहिवासाला आहे. ऋषीकेश परमार हे नेत्ररूग्णालयांसाठी शिबिरांचे आयोजन आणि नेत्रदानासंदर्भातील विविध उपक्रमांच्या संदर्भात जनजागृती व उपक्रम आयोजनाच्या व्यवसायात आहेत.

रविवारी दुपारी खेळताना त्यांचा चार वर्षांचा मुलगा शौर्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने त्याला जोराचा मार लागला होता. या स्थितीत मृत्यूशी झुंजताना सोमवारी पहाटे अखेरीला त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर शोकावेग आवरत त्याच्या आई व वडिलांनी शौर्यच्या अवयव आणि त्वचादानाचा निर्णय घेतला. त्यांच्या इच्छेनुसार चिमुरड्या शौर्यचे नेत्रदान करण्यात आले.

नाशिकमध्ये त्वचा बँक नसल्याने त्वचादान मात्र करता आले नाही. त्याच्या इतर अवयव दानालाही वैद्यकीय संमती अभावी चालना देता आली नाही. मात्र या सर्वातून समन्वय साधत त्यांनी नेत्रदानाच्या माध्यमातून मुलाचे अस्तित्व जपले आहे.

म्हसरूळ परिसरातील 'माय होम' या ज्युनिअर केजीच्या पायऱ्या शौर्य नुकताच चढायला लागला होता. नव जग इवल्याश्या डोळ्यात नव्याने साठवायला लागला होता. मात्र नियतीच्या या आघातानंतरही शौर्य हे जग नेत्रदानामुळे नव्या ताकदीने बघेल, अशी भावना परमार कटुंंबीयांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकणेप्रकरणी अल्ट‌िमेटम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुकणे पाणीपुरवठा योजनेतील गोंधळाप्रकरणी एल अॅन्ड टी कंपनीने पालिकेला आता ३० सप्टेंबरचा अल्ट‌मिेटम दिला आहे. कंपनीच्या निव‌दिेला ३० सप्टेंबरच्या आत मान्यता न दिल्यास प्रकल्पातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे २६६ कोटींची महत्त्वाकांक्षी योजना बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयुक्तांनी महापौरांना पत्र लिहून मुकणेसंदर्भात तात्काळ निर्णय घेण्याची सुचना गेल्याने महापौरांनीही तातडीने विशेष सभा घेण्याची तयारी सुरू केली आहे.

नाशिक शहराचा २०३६ या वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून मुकणे धरणातून थेट पाइपलाईनने पाणी आणण्यासाठी मुकणे पाणीपुरवठा योजना आखली आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुर्नरुथान योजनेअंतर्गत केंद्र सरकारने या योजनेला मंजुरी दिली आहे. मात्र २२० कोटी ही योजना निव‌दिा प्रक्रियेत २६६ कोटींवर पोहचली आहे. त्यामुळे वाढीव ५० कोटी पालिकेच्या तिजोरीतून द्यावे लागणार आहेत. या योजनेची निव‌दिा प्रक्रिया राबवून सर्वात कमी निव‌दिा ही एल अॅन्ड टी ची २६९ कोटीची आली होती. त्यामुळे एल अॅन्ड टीला काम देण्याची तयारी सुरू असतानाच १८ मे रोजी राज्यसरकारने या भ्रष्टाचार असल्याचे कारण देत स्थगिती दिली होती. त्यामुळे गेल्या पाच महिन्यापासून मुकणेची प्रक्रिया रखडली आहे.

राज्य सरकारने ८ सप्टेंबरला ही स्थगिती उठवली आहे. मात्र त्यासाठी महासभेची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे एल अॅन्ड टी ने १० सप्टेंबरला पालिकेला पत्र लिहून ३० सप्टेंबरच्या आत कार्यारंभ आदेश देण्याची मागणी केली आहे. महागाईमुळे काम परवडणारे नसून, ३० तारखेच्या आत निर्णय न घेतल्यास बाहेर पडू असा इशारा दिला आहे. एल अॅन्ड टी ने अगोदरच मुदतवाढ दिली होती. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ देणे शक्य नसल्याचे सांगून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

मुकणेतील गौडबंगाल काय?

दरम्यान आयुक्तांनी १६ सप्टेंबरलाच महापौरांना व नगरसचिव विभागाला पत्र लिहून निर्णय घेण्याची सुचना केली होती. त्यामुळे १९ सप्टेंबरच्या महासभेत हा विषय येणे अपेक्षित होते. मात्र हा जादा विषयातही हा विषय आला नाही. त्यामुळे मनसेच्या स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे मुकणेची स्थगिती उठविण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, तर त्यांचेच पक्षाचे नेते हा विषय मंजुरीसाठी आणत नाहीत. त्यामुळे मुकणेतील गौडबंगाल काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात निवृत्त जवानांचे लाक्षणिक उपोषण

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

राज्यातील गृहरक्षक दलाच्या सर्व निवृत्त जवानांना निष्काम सेवा बजावल्याबद्दल राज्य शासनाकडून सानुग्रह अनुदान व उदरनिर्वाह भत्ता मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी बागलाण तालुक्यातील गृहरक्षक दलाच्या निवृत्त जवानांनी येथील तहसील कार्यालयाच्या प्रागंणात एक दिवसीय लाक्षाणिक उपोषण केले.

सकाळी ११ वाजेच्या सुमारास गृहरक्षक दलाचे निवृत्त कमांडंट अमृतलाल शर्मा (जालना) यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालय आवारात लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली.

नायब तहसीलदार पल्लवी जगताप यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. निवेदनात प्रमुख मागण्यांचा समावेश असून, यात निवृत्त जवानास दरमहा सात हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता द्यावा, मृत निवृत्त जवानांच्या वारसांनाही एकरकमी सानुग्रह अनुदान व उदरनिर्वाह भत्ता मिळावा, राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ मिळावा, तीन वर्षाचा सेवाकाल केलेल्या सर्व सदस्यांना सानुग्रह अनुदान व उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावा, सानुग्रह अनुदानाची एकरकमी रक्कम चार श्रेणीतून द्यावी, आदी मागण्यांचा यात समावेश होता.

या लाक्षणिक उपोषणात अमृतलाल शर्मा, दत्तात्रेय देवरे, रघुनाथ शेवाळे, कारभारी जाधव, त्र्यंबक रौंदळ, कडू सूर्यवंशी, बबन सूर्यवंशी, बारकू जगताप, पंढरीनाथ येवला, साहेबराव शेवाळे, संतोष पवार सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदार सावकारेंना चौधरींचा दणका

0
0

भुसावळ बाजार समितीवर 'सहकार'ला बहुमत

म. टा. वृत्तसेवा, भुसावळ

भुसावळ बाजार समितीच्या चुरशीच्या निवडणुकीत माजी आमदार संतोष चौधरी यांनी आमदार संजय सावकारे यांना दणका दिला. चौधरींच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या सहकार पॅनलने १८ पैकी १३ जागा मिळवत सत्ता मिळवली, तर आमदार सावकारे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सर्वपक्षीय शेतकरी पॅनलला अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे.

निवडणुकीत भाजपचे सर्वपक्षीय शेतकरी पॅनल विरुद्ध शिवसेनेचे सहकार पॅनल अशी थेट लढत झाली.

माजी सभापती पराभूत

निवडणुकीत दिग्गजांना धक्का बसला असून, बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील व उल्हास बोरोले पराभूत झाले. हमाल-

मापाडी मतदारसंघात अली अजगरअली कासम अली व कैलास गव्हाणे यांना प्रत्येकी १५ मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठीद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. विराज शर्मा याने काढलेल्या चिठ्ठीद्वारे गव्हाणे विजयी झाले.

विजयी उमेदवार

सहकार पॅनलः ः सुभाष पाटील, कैलास महाजन, राजेश जोशी, ओंकार वारके, कोकिळाबाई पाटील, इंदूबाई महाजन, अशोक पाटील, सोसायटी सोपान भारंबे, सर्वसाधारण ग्रामपंचायत ः गजानन सरोदे, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक ः प्रमिला पाटील, ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती ः नारायण सपकाळे, व्यापारी मतदारसंघ ः नरेंद्र अग्रवाल, हमाल मापाडी मतदारसंघ ः कैलास गव्हाणे

सर्वपक्षीय शेतकरी पॅनलः

सः संजय पाटील, सुनील महाजन, डिगंबर कोल्हेः प्रदीप वाणी, जयंतीलाल सुराणा

शिवसेना यापुढेही स्वतंत्र लढणार!

सहकार पॅनलच्या सर्व विजयी उमेदवारांचा माळीभवनात सत्कार करण्यात आला. त्या वेळी माजी आमदार संतोष चौधरी यांनी ही शिवसेनेच्या विजयाची मुहूर्तमेढ असून, आगामी सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौदा पध्दतीमुळे टोमॅटोची आवक वाढली

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत सौदा पध्दतीने टोमॅटो लिलाव सुरू झाल्यामुळे सर्व खरेदीदारांना टोमॅटो पाहिजे तेवढा खरेदी करता येत आहे. तसेच, येवला बाजार समितीने टोमॅटो बाबत सहा टक्के प्रमाणेच आडत कपात करण्यास सुरुवात केल्याने बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या आवकेत विक्रमी वाढ झाली आहे. ही माहिती बाजार समिती सभापती उषा शिंदे यांनी दिली.

येवला बाजार समितीच्या यावर्षीच्या २८ ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेतील निर्णयानुसार २ सप्टेंबर रोजी बाजार समितीमधील परवानेधारक फळे, भाजीपाला आडते व व्यापारी यांची संयुक्त बैठक घेऊन टोमॅटो व भाजीपाला या शेतीमालासाठी कायद्यातील तरतुदीप्रमाणे बाजार समितीत उघड सौदा पद्धतीने लिलाव सुरू करणे व ६ टक्के प्रमाणे आडत कपात करणे याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत ३ सप्टेंबर २०१५ पासून सौदा पध्दतीने टोमॅटोचे लिलाव सुरू करण्यात आले होते. टोमॅटोसाठी सौदा पद्धत लागू केल्यापासून २१ सप्टेंबर २०१५ पर्यंत येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण २ लाख ४८ हजार ९४० इतकी टोमॅटो क्रेटची आवक झाली असून, त्याची किमत अंदाजे ३ कोटी ७३ हजार ४१ हजार रुपये इतकी झाली आहे, अशी माहिती सभापती शिंदे यांनी दिली. तसेच, येवला बाजार समितीत टोमॅटो आडत ही सहा टक्के प्रमाणे कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे दोन टक्के प्रमाणे अंदाजे ७ लाख ४६ हजार रुपये इतक्या रकमेचा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे, असेही सभापती शिंदे यांनी स्पष्ट केले.

टोमॅटो व भाजीपाला उत्पादकांनी टोमॅटो, कांदा व भाजीपाला दूरवरील इतर बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी घेऊन न जाता प्रतवारी करून येवला बाजार समितीमध्येच विक्रीसाठी आणावा. जास्तीत जास्त बाजारभावाचा फायदा घ्यावा व यासाठी बाजार समितीस सहकार्य करावे, असे आवाहन सभापती शिंदे, उपसभापती गणपतराव कांदळकर, सचिव डी. सी. खैरनार व संचालक मंडळाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेचार लाखाचे दागिने रेल्वे डब्यातून लांबविले

0
0

मनमाड : धावत्या लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमधील वातानुकूलित डब्यातून प्रवासी महिलेची बॅग चोरून तब्बल साडेचार लाखाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. मनमाड-नाशिक दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी इगतपुरी रेल्वे स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शुन्य क्रमांकाने मनमाड लोहमार्ग पोलिसात सोमवारी वर्ग करण्यात आला. या धाडसी चोरीने धावत्या रेल्वेतील

गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रणजीत परितोष त्रिपाठी (रा. ऐरोली, नवी मुंबई) हे आपल्या परिवारासह लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसने वातानुकूलित डब्यातून प्रवास करीत असताना त्यांच्या पत्नीची सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, सोनसाखळी, हिरेजडीत अंगठी, नेकलेस व कर्णफूले असा ४ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग रेल्वेडब्यातून चोरीला गेली. मनमाड येथून गाडी सुटल्यानंतर थोड्या वेळाने हा प्रकार घडल्याचे त्रिपाठी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. इगतपुरी रेल्वे पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आणि शुन्य क्रमांकाने मनमाड लोहमार्ग पोलिसात सोमवारी उशिरा वर्ग करण्यात आली. वातानुकूलित डब्यात आरक्षित तिकिटाशिवाय प्रवाशांना प्रवेश नसल्याने ही धाडसी चोरी कोणी व कशी केली हे पोलिसांपुढील मोठे आव्हान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाकी-खापरीत साठणार पाणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

वाकी-खापरी धरणाचे काम पूर्ण होऊनही गेटअभावी धरणात पाणी साठविले जात नव्हते. मात्र, धरणग्रस्तांचे प्रश्न डिसेंबरपर्यंत सोडविण्याचे पालकमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर धरणाला गेट बसविण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. आठ दिवसांत गेट टाकून येथे जलपूजन केले जाणार आहे. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले.

नांदुरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या इगतपुरी तालुक्यातील वाकी-खापरी या धरणाचे काम पूर्णत्वास येऊनही धरणग्रस्तांचे प्रश्न रखडल्याने गेल्या दीड वर्षापासून धरणग्रस्तांच्या विरोधामुळे धरणाला गेट टाकण्याचे काम रखडले होते. चार ते पाच वेळा गेट टाकण्याचा प्रयत्न उधळून लावला होता. अखेर धरणग्रस्तांनी पालकमंत्री, संबंधित अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली. पालकमंत्र्यांनी डिसेंबरपर्यंत धरणग्रस्तांचा रखडलेला आर्थिक मोबदला, पुनर्वसनाची कामे पूर्ण करण्याची ग्वाही दिल्याने प्रकल्पग्रस्तांचे तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता या धरणाला गेट टाकण्याच्या कामाला धरणग्रस्तांनी ग्रीन सिग्नल दिला. यामुळे मंगळवारपासून गेट टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली.

वाकी-खापरी धरणाला गेट टाकल्यामुळे धरणात सद्यस्थितीत एक टीएमसी पाणी साठणार आहे. भविष्यात हे पाणी मराठवाड्याला जाणार असले तरी प्रकल्पक्षेत्रातील पाच गावे, वाड्या तसेच घोटीपर्यंतची गावे यांना पिण्याचे पाणी, शेती सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याने तालुक्याचा फायदाच होणार आहे. वाकी खापरी धरणाचे काम पूर्णत्वास येऊनही धरणग्रस्तांनी आपल्या १८ मागण्यांसाठी गेटचे काम रोखले होते. त्यामुळे गेल्या वर्षीही धरणात पाणी साठवता आले नाही. यावर्षीही हीच परिस्थिती कायम राहिल्याने काम रखडलेच होते. गेल्या दोन महिन्यापासून गेट टाकण्याबाबत हालचाली गतिमान झाल्या होत्या. शासनाने व प्रशासनाने धरणग्रस्तांच्या मागण्यांची दखल घ्यावी यासाठी अॅड. रतनकुमार इचम यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी गेटचे काम रोखले होते. धरणग्रस्तांच्या गावासह परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी धरणाचे पाणी उपयुक्त असल्याने लवकर गेट टाकून पाणी धरण्याची मागणी शेतकरी करीत होते. याबाबत दोन्ही गटाच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन भूमिका व्यक्त केली होती.

पालकमंत्र्यांनीही जलसंपदा खाते आपल्याकडेच असून, भविष्यातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता व दुष्काळी स्थिती लक्षात घेता धरणाला गेट टाकण्याच्या कामाला धरणग्रस्तांनी सहकार्य करावे, डिसेंबर २०१५ पर्यंत धरणग्रस्तांचे आर्थिक प्रश्न व इतर मागण्यांबाबत जलदगतीने कार्यवाही करण्याची ग्वाही ना. महाजन यांनी दिली होती. पालकमंत्री गिरीश महाजन व संबंधित विभागाचे अधिकारी यांनी ग्वाही दिल्याने त्यांच्यावर विश्वास ठेऊन तसेच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन धरणग्रस्तांनी या धरणाला गेट टाकण्याच्या कामाला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती धरणग्रस्तांचे प्रतिनिधी रतनकुमार ईचम यांनी दिली.

पालकमंत्री व संबंधित अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून व डिसेंबरपर्यंत धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिल्याने धरणग्रस्तांनी काहीअंशी शिथिल भूमिका घेत गेट टाकण्याच्या कामाला ग्रीन सिग्नल दिला. पालकमंत्री व अधिकारी यांनी धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत दिरंगाई केल्यास गेट टाकले तरी धरणातील थेंबभरही पाणी धरणाबाहेर जाऊ देणार नाही.

- अॅड. रतनकुमार इचम, धरणग्रस्तांचे नेते

धरणाचे काम पूर्ण होऊनही धरणग्रस्तांचे प्रश्न अद्यापही रखडलेले आहेत. धरणाला गेट टाकण्यास आपला विरोध नाही. मात्र, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी धरणग्रस्तांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय घ्यावा. धरणग्रस्तांबरोबरच शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

- निर्मला गावित, आमदार

सर्व प्रकल्पग्रस्तांच्या सहकार्यामुळेच आज काम सुरू करण्यात आले. त्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी उपविभागातर्फे पाठपुरावा चालू आहे. आठ दिवसांत गेटचे सर्व काम पूर्ण करून पाणीसाठा करण्यात येईल. त्यामुळे उन्हाळ्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

- हरिभाऊ गिते, सहाय्यक अभियंता, वाकी-खापरी धरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवकांनी खुलवले जुन्या विहिरीचे सौंदर्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

आगामी काळात पाण्याची तीव्र टंचाई जाणवणार आहे. पाण्याचे स्त्रोत जपण्याची आवश्यकता आहे. हे ओळखून जेलरोडच्या सेंट फिलोमिना शाळेसमोरील कलानगर मित्रमंडळाच्या युवकांनी पैसे जमवून सव्वाशे वर्षापूर्वीच्या विहिरीचे पुनर्रुज्जीवन करत विहिर परिसरात सुंदर बगीचा फुलवला आहे.

कलानगरमध्ये सन १८९५ साली विजय भुकनदास आत्माराम यांनी पत्नीच्या स्मृतीनिमित्त विहीर बांधली. जिवंत झऱ्यामुळे शंभर वर्षे या विहिरीने जेलरोड परिसराची तहान भागवली. वस्ती वाढल्यानंतर नागरिकांनी विहिरीला कचरा डेपो केले. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले. डासांचा उपद्रव वाढला. स्थानिक तरुण अक्षय एडके याच्यासह श्रेयस गोखले, अक्षय कुलकर्णी, भुवनेश ताजनपुरे, ऋषिकेश ताजनपुरे, चैतन्य श्रत्रिय, सितमी कोष्टी, सूरज वारुंगसे, अनिकेत कुलकर्णी, संतोष सोनवणे, संकेत सिंग, संजयसिंग, हर्षल वणीकर, प्रफुल्ल क्षत्रिय आदींनी श्रमदान करीत विहिरीचे रुपडेच बदलले.

विहिरीच्या पाण्याचा विनियोग

विहिरीतून तीन ट्रॅक्टर कचरा काढण्यात आला. थोरात पेट्रोलपंपाचे संचालक शिवाजी थोरात यांनी विहीर परिसरात उद्यानासाठी चांगली माती तर प्रकाश नाखरे यांनी लाईटिंगसाठी सहकार्य केले. युवकांनी विहीरीला रंगरंगोटी करुन तुळस, सब्जा, जास्वंद, गुलाब तसेच नारळ, बेल आदी झाडे लाऊन बगीचा फुलवला. विहिरीत गप्पी व इतर मासे सोडले. आता दररोज तुळशीपुढे दिवा लावला जातो. ज्येष्ठ नागरिक कळुस्कर, यतीन मुजूमदार, कन्नू ताजणे आदींनी प्रोत्साहन दिले. महापालिकेने विहिरीला जाळी व पाईप बसविले. सोसायटीचे रहिवासी विहिरीच्या पाण्याचा वापर करत आहेत.

युवा शक्तीला विधायक स्वरुप दिले तर आदर्श कार्य घडू शकते हे आमच्या ग्रुपला विहीरीच्या कामातून दाखवून द्यायचे होते. लाखमोलाचा जलत्रोत जपल्याचे आत्मिक समाधानही मिळत आहे.

- अक्षय एडके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते गेले खड्ड्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

अशोकनगर भागातील जाधव संकुलमध्ये बहुतांश रस्ते खड्डेमय झाले आहेत. यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची दुर्दशा झाली असून ग्रामीण भागातील रस्त्यांप्रमाणे जाधव संकुलमधील रस्त्यांना स्वरूप आले आहे. या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी रहिवाशी करत आहेत.

अशोकनगर येथील जाधव संकुलमध्ये गेल्या वर्षी अंतर्गत रस्त्यांची कामे महापालिकेने हातात घेतली होती. यामध्ये जाधव संकुलच्या अर्ध्या भागात महापालीकेने अंतर्गत रस्ते काँक्रिटिकरण देखील केले आहेत. परंतु, उर्वरित जाधव संकुलमधील रस्ते खड्डेमय झाले असल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. जाधव संकुलमध्ये रहिवाशंची अंतर्गत रस्त्यांबाबत नेहमीच तक्रार होती. रहिवाशांची समस्या लक्षात घेता नगरसेवक शशिकांत जाधव यांनी जाधव संकुलमधील रस्त्यांचे काँक्रिटिकणाचे कामे मंजूर केली होती. परंतु, यात केवळ संकुलमधील रस्त्यांचे अर्धवटच काँक्रिटिकरण महापालिकेकडून करण्यात आले. उर्वरित रस्त्यांचे कामे न झाल्याने रस्ते खड्डेमय झाले आहेत. सर्व प्रकारचे कर भरून देखील रहिवाशांना खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे. जाधव संकुलच्या उर्वरित भागात रस्त्यांची कामे करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. याबाबत महापालिकेचे उप अभियंता रमेश पाटोळे यांना विचारले असता, त्यांनी लवकरच उर्वरित रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार असल्याचे सांगितले.

जाधव संकुलमधील काही भागात अंतर्गत रस्त्यांचे महापालिकेने काँक्रिटिकरण केले आहे. परंतु, उर्वरित रस्त्यांची कामे महापालिकेने केली नसल्याने संपूर्ण रस्तेच खड्डेमय झाला आहे.

- कैलास देवडे, रहिवाशी

जाधव संकुलमधिल उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटिकरणाचे काम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. लवकरच उर्वरित रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.

- रमेश पाटोळे, उप अभियंता, बांधकाम विभाग, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

सातपूर एमआयडीसीमध्ये असलेल्या राष्ट्रीयकृत सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या संलग्न असलेल्या सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेच्या सदस्य शेतकऱ्यांनी बँकेने कर्ज पुरवठा केला नसल्याने पुन्हा ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. आंदोलनात शेतकऱ्यांनी सेंट्रल बँकेने दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा करण्याची मागणी केली आहे.

सेंट्रल गोदावरी कृषक सहकारी संस्थेत २७ गावातील शेतकरी सदस्य आहेत. विशेष म्हणजे सेंट्रल गोदावरी बँकेत दरवर्षी २७ गावातील शेतकरी विविध कामांसाठी कर्ज घेत असतात. तसेच घेतलेले कर्ज वेळेवर बँकेला व्याजासह परतही करत असतात. परंतु, यंदा बँकेकडून सेंट्रल गोदावरी कृषक सहकारी संस्थेला कर्ज पुरवठा न झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. त्यामुळे त्यांनी ञबँकेसमोरच ठिय्या आंदोनलन सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाचपट भाडेवाढमुळे संताप

0
0

सिडको सातपूरमधील गाळेधारकांचे महापालिकेला निवेदन

म. टा. प्रतिनिधी, सातपूर

महापालिकेच्या सिडको व सातपूर परिसरात उभारलेल्या गाळ्यांचे अचनाकपणे भाडेवाढ करण्यात आल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. त्यातच भाडेआकारणी करतांना पाचपट वाढ केली असल्याचा आरोपही व्यापाऱ्यांनी केला आहे. भाडेवाढ रद्द करावी यासाठी सातपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील व सातपूर कॉलनीतील व्यापाऱ्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे व सातपूर विभागाचे विभागीय अधिकारी महेंद्रकुमार पगारे यांनी निवदेन दिले. भाडेवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

महापालिकेने सातपूरला व्यापारी गाळे उभारून लिलाव पद्धतीने वाटप केले आहेत. परंतु, गेल्या वर्षापासून अचानकपणे भाड्यात वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याने व्यापारीवर्ग हैराण झाला आहे. महापालिकेच्या गाळेधारकांना अतिरिक्त भाडेवाढीच्या नोटीसा देखील कर्मचाऱ्यांकडून वितरित करण्यात आल्या आहेत. नोटिसीत पाचपटीने भाडेवाढ केली असल्याचा आरोप व्यापा‍ऱ्यांना केला आहे. अचानकपणे झालेल्या भाडेवाढीचा निषेध म्हणून छत्रपती शिवाजी मंडईतील व सातपूर कॉलनीतील गाळेधारकांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे व विभागीय अधिकारी महेंद्रकुमार पगारे यांना निवेदन देत भाडेवाढ मागे घेण्याची मागणी केली.

पाचपट झालेल्या भाडेवाढीमुळे व्यापाऱ्यांनी सोनवणे यांना गाळ्यांची भाडेवाढ जाचक अाहे. अगोदरच सरकारने अनेक करांची वाढ केली असल्याने पुन्हा पाचपट वाढीचा बोजा गाळेधारकांवर पडणार असल्याचे व्यापारी म्हणाले. याप्रसंगी सभागृहनेते सलिम शेख, नगरसेवक अनिल मटाले, गणेश चव्हाण, शिवाजी मंडईचे अध्यक्ष शंकर पाटील, दशरथ चव्हाण, समाधान चौधरी, बाबासाहेब घोडके, जगदीश रायते, शंकर देवघरे, काका कोशिरे यांच्यासह सातपूर सिडकोतील व्यापारी उपस्थित होते.

नियमानुसारच भाडेवाढ

सरकारच्या जीआरनुसारच गाळ्यांची भाडेवाढ केली असल्याचे व्यापाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त सोनवणे यांनी सांगितले. सरकारने दिलेल्या सूचनेनुसार सर्व गाळेधारकांना भाडेवाढची माहिती देण्यात आली आहे. परंतु, आपल्या निवेदनावरून सरकारकडे पुन्हा भाडेकमी कसे करता, येईल याबाबत पाठपुरावा महापालिका करणार असल्याचे सोनवणे यांनी व्यापाऱ्यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिझनेस बँकेत झडतीसत्र

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

बिझनेस बँकेतील ५० लाखाच्या एफडी घोटाळाप्रकरणी पोलिसांनी बँकेची अचानक झडती घेतली. बँकेच्या रेकार्ड रुममधील कागदपत्रांची ११ ते ३ अशी चार तपासणी केली.

पोलिस उपअधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक भगत, उपनिरीक्षक सुजित मुंढे, आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक चांदखेडे, देवळाली कॅम्पचे हवालदार चव्हाणके, चार्टर्ड अकाऊंटट, सायबर तज्ञ, दोन पंच, स्ट्राईकिंग फोर्सचे दहा जवान आदी २० जणांनी कारवाई केली. न्यायालयाचे सर्च वॉरंट घेऊन केलेल्या या कारवाईत काय सापडले ते सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.

सन २००१ ते २००२ दरम्यान बॅँकेने एफडी घोटाळ्यात आपली ५० लाखांची फसवणूक केल्याची तक्रार अजगर खान यांनी ९ एप्रिल २०१५ रोजी उपनगर पोलिस ठाण्यात दाखल केली. तत्कालीन अध्यक्ष विजय संकलेचा, उपाध्यक्ष मोहन चोरडिया, संचालक वसंत नगरकर, तत्कालीन व्यवस्थापक प्रल्हाद बलदेवा यांच्यासह १७ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

एफडी व अन्य कागदपत्रे द्यावीत म्हणून पोलिस बॅँकेकडे पाच महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत. मात्र, व्यवस्थापन अजिबात सहकार्य करत नसल्याची पोलिसांची तक्रार आहे. प्रकरण जुने आहे, आठ वर्षाची कागदपत्रे नष्ट केली आहे, असे सांगत बँकेने आजपर्यंत कागदपत्रे दिली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे बॅँकेने पुरावे कायमचे नष्ट केल्याचा व जुन्या कागदपत्रांची विल्हेवाट लावताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचा पोलिसांचा संशय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकणे योजनेवरून राजकारण तापले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुकणे पाणीपुरवठा योजनेप्रकरणी एल अॅण्ड टी कंपनीने अल्टिमेटम दिल्यानंतर आता महापालिकेचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेन सत्ताधारी मनसेला घेरण्याची तयारी केली असून, एल अॅण्ड टी च्या पत्राचा बोलविता धनी कोण?, असा सवाल आता सत्ताधाऱ्यांना केला आहे. या प्रकरणात विशेष महासभा घेऊन अतिरिक्त खर्चाची जबाबदारी कोणाची यावर प्रशासनाने प्रकाशझोत टाकावा, अशी मागणी शिवसेना गटनेता अजय बोरस्ते यांनी केली आहे. दोन लाखांच्या फाईल्स मंजूर होत नसताना कोट्यवधीच्या विषयांसाठी दबाव का?, असा सवाल सेनेने उपस्थित केला आहे.

नाशिक महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुकणे पाणीपुरवठा योजनेतील गोंधळाप्रकरणी एल अॅण्ड टी कंपनीने पालिकेला आता ३० सप्टेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. कंपनीच्या निविदेला ३० सप्टेंबरच्या आत मान्यता न दिल्यास प्रकल्पातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. आयुक्तांनी महापौरांना पत्र लिहून मुकणेसंदर्भात तत्काळ निर्णय घेण्याची सूचना केल्यानंतर पालिकेतील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेने आक्रमक होत, नोटीसला भीख घालू नका, असे सांगत या पत्रामागचा बोलविता धनी कोण?, असा सवाल केला आहे. कंपनीच्या आडून कोणीतरी दुसराच व्यक्ती इशारा देत असल्याचा संशय बोरस्ते यांनी व्यक्त केला आहे.

निविदा काढल्यानंतरही अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पावर सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. स्थगिती उठविताना राज्य सरकारने पालिकेचे आर्थिक दायित्व कमी करण्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खर्चाचा खुलासा घेणे आवश्यक आहे. सत्ताधारी ठेकेदार कंपनीला पाठीशी घालत तर नाही ना असा सवाल करीत प्रशासनावरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खून प्रकरणात आणखी एकाला अटक

0
0

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

महामार्ग बसस्थानकाजवळील हॉटेल तुळजासमोर झालेल्या खून प्रकरणात शहर पोलिसांनी आणखी एका संशयितास अटक केली. या घटनेत पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची संख्या आता तीन झाली असून, अद्याप व्यंकटेश मोरे या मुख्य सूत्रधारासह आठ जणांचा पोलिस शोध घेत आहेत.

महामार्ग बसस्थानक येथील हॉटेल तुळजाजवळ गत बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास राहुल ऊर्फ गुणाजी गणपत जाधव (वय ३६) रा. रामवाडी, पंचवटी या युवकाचा १० हजार रुपयांच्या आर्थिक वादातून एका टोळक्याने खून केला होता. या हल्ल्यात किशोर नागरे (वय २८) रा. रामवाडी, पंचवटी, हिरालाल कृष्णा ठोंबरे (३५) रा. क्रांतीनगर, पंचवटी व विकी द्वारकानाथ दिवे (वय २८) रा. पेठरोड मेहरधाम हे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी तत्काळ पंचवटी तसेच सिडको परिसरात राहणाऱ्या ११ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सुरुवातीलाच पोलिसांनी निखील मोरे आणि समीर व्यवहारे यांना बेड्या ठोकल्या. सध्या हे संशयित पोलिस कोठडीत असून, उद्या रिमांड संपल्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले जाईल. याच प्रकरणात पोलिसांनी हर्षल पोपट निकम या २२ वर्षीय तरुणास त्रिमूर्ती चौक, सिडको येथून मंगळवारी अटक केली. कोर्टात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उज्जैन कुंभमेळ्यातील घरांना नाशिककरांचा टच

0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी बोस्टन येथील प्रख्यात आर्किटेक्ट स्कॉट नॉक्स यांनी हनी कॉम्ब व्हिलेज तयार केले जात आहे. यापुढील सर्व कुंभमेळ्यात केंद्र सरकारकडून याच घरांचा वापर होणार आहे. नाशिकमध्ये या घरांचा थेट वापर झाला नव्हता मात्र डेमोचे सादरीकरण झाले होते. आता उज्जैनला या घरांचा वापर होणार असल्याचे ही घरे उभारण्यासाठी नाशिकचे ३१ आर्किटेक्ट झटत आहेत. नाशिककर ही घरे उभी करणार असल्याने हनी कॉम्ब व्हिलेजला 'मेड इन नाशिक पॅटर्न' म्हटले जाणार आहे.

कुंभमेळ्यात साधू-महंतांच्या निवासाचा अनेकदा प्रश्न निर्माण होतो. तकलादू घरे किंवा तंबूमध्ये त्यांना वास्तव्य करावे लागते. सध्या अस्तित्वात असलेली घरे ही वॉटर प्रुफ नसल्याने पावसाचे पाणी तंबूत शिरते. आग लागल्यास तंबू खाक होतात. ही अडचण ओळखून बोस्टन येथील स्कॉट नॉक्स यांनी हनी कॉम्ब व्हिलेज तयार केले असून, केंद्र सरकारतर्फे त्याचा वापर करण्यात येणार आहे. यात तयार होणारे ही घरे सेमी परमनंट हाऊस या प्रकारची असून, ती पोर्टेबल स्वरुपाची असणार आहे. एका घरात चाळीस लोकांना रहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही घरे बांबू आणि फायर प्रुफ कापड यापासून तयार करण्यात येणार आहेत. यात लिव्हिंग पॅव्हेलियन, मेडिकल पॅव्हेलियन आणि मल्टीपर्पज पॅव्हेलियन असे तीन प्रकार आहेत. या व्हिलेजमध्ये वीज बचतीसाठी प्रत्येक घरावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहे. घरांवर पडणारे पाणी रेन हार्वेस्टींगद्वारे जमा केले जाणार आहे.

घरे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपच्या माध्यमातून तयार केली जाणार आहेत. एका पॅव्हेलियनला तयार करण्यासाठी ३ लाख रुपये खर्च येणार असून, त्यात ४० माणसांची राहण्याची व्यवस्था होणार आहे. एकूण २५ हजारांसाठी ७ कोटी ५० लाख रुपये खर्च येणार आहे. नाशिक कुंभमेळ्यात साधुग्राममध्ये सेक्टरनुसार व्यवस्था करण्यात आली होती. अशिक्षित लोकांना सेक्टर शोधतांना येणारी अडचण लक्षात घेऊन प्रत्येक सेक्टरसाठी रंगांचा वापर करण्यात येणार आहे. सब सेक्टरला फळांची नावे दिली जाणार आहे.

घराच्या निमिर्तीसाठी नाशिकमधील ३१ आर्किटेक्ट काम करीत असून, निकीता गायकवाड या समन्वयाची भूमिका बजावत आहेत. भूकंप झाला तरी या घरांमध्ये काही होणार नाही. तसेच आग लागलीच तर फोफावणार नाही, अशा पध्दतीने ही घरे आहेत. या घरांना मेड इन नाशिक पॅटर्न असे नाव दिले जाणार आहे. स्कॉट नॉक्स यांनी बोस्टनचे विमानतळही साकारले आहे.

साधुग्राममध्ये घरांचे डेमो दाखविले होते. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांना रहाता यावे यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. याचा कुंभमेळ्यात चांगला उपयोग होईल.

- स्कॉट नॉक्स, आर्किटेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images