Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

शिवराजसिंह चौहान आज नाशकात

0
0

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

नाशिकमधले तिसरे व अखेरचे शाहीस्नान आटोपले. २५ सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथील स्नान पार पडेल. यानंतर साधू महंताचे पावले मध्य प्रदेशातील उज्जैनच्या दिशेने निघतील. एप्रिल २०१६ मध्ये येथे कुंभमेळा होणार असून, त्याचे आमंत्रण देण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.

देशात चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. नाशिक, अलाहाबाद, उज्जैन आणि प्रयाग येथे हे वैश्विक सोहळे पार पडतात. यातील नाशिक वगळता उर्वरीत तिन्ही राज्ये हिंदी भाषिक असून, येथे साधू महंतांना वेगळीच उंची प्राप्त होते, असे बोलले जाते. नाशिकमध्ये सुध्दा साधू महंतांचा योग्य मान राखला जातो. मात्र, जितकी सरबराई हिंदी भाषिक राज्यात साधू महंतांची केली जाते तितकी महाराष्ट्रात होत नाही हे ही खरे आहे. मुख्यमंत्री चौहान यांच्या दौऱ्याला यामुळेच महत्त्व प्राप्त होते. नाशिकनंतर काही महिन्यांच्या अंतराने उज्जैन येथे कुंभमेळा पार पडेल. याची तयारी मध्य प्रदेश सरकारने केली असून, नाशिकमध्ये त्यांचे काही वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून होते. नाशिकमधील तिसऱ्या शाही पर्वणीनंतर साधू महंतांची तिच लगभग सुरू झाली आहे. यापार्श्वभूमीवर उद्या, रविवारी मुख्यमंत्री चौहान साधू-महंतांना आमंत्रण देण्यासाठी शहरात दाखल होतील. सकाळी सव्वा अकारा वाजता ते साधुग्राममध्ये पोहचतील. तेथे एक तास ते वेगवेगळ्या आखाड्यांच्या प्रमुखांना भेटून उज्जैन महाकुंभमेळ्याचे निमंत्रण देतील. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वरला मार्गस्थ होतील. सांयकाळी सव्वापाच ते पाऊणे सहा असा अर्धा तास ते हॉटेल ताज येथे थांबतील. यानंतर ते पुन्हा मध्य प्रदेशकडे रवाना होतील. २००३ मध्ये नाशिक येथे झालेल्या कुंभमेळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी साधू महंतांना वैयक्तिक भेटून कुंभमेळ्याचे आमंत्रण दिले होते. आता तब्बल १२ वर्षांनी हाच कित्ता गिरवला जातो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरात अडकलेल्या नऊ जणांची सुटका

0
0

म. टा. वृत्तसेवा, लासलगाव

निफाडच्या गोदाकाठातील संगमेश्वर लाड येथे शुक्रवारी सायंकाळी पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने निफाड येथील नऊ नागरिकांचा जीव धोक्यात आला होता. सुदैवाने मदतीसाठी केलेला पुकारा स्थानिकांनी ऐकताच तत्काळ निफाड पोलिस व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधल्याने नाशिकहून आलेल्या एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमच्या मदतीने त्‍यांना सुखरूप बाहेर काढण्यात शनिवारी सकाळी यश आले.

किरण पुंडलिक राऊत, रमेश आण्णा राऊत, दिगंबर जाधव, आकाश जाधव, प्रवीण पुंडलिक राऊत, प्रवीण बोराडे, राजेंद्र केदारे, सविता मोरे, नंदा मोरे हे निफाड येथील रहिवाशी त्यांच्या नातलगाच्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी आदल्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी स्वयंपाक व इतर तयारीसाठी संगमेश्वर येथे गेले होते. शुक्रवारी दिवसभर संपूर्ण निफाड तालुक्यात जोरदार पाऊस पडत होता. त्यात गोदाकाठ भागात झालेल्या मुसळधार पावसाने गोदा-कादवा संगमावर असलेल्या संगमेश्वराच्या मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला.

त्यामुळे दहाव्याच्या तयारीसाठी गेलेले हे सर्व नातलग अडकून पडले. यावेळी त्यांनी मदतीसाठी स्थानिकांना आवाज दिले. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. रात्री उशिरा निफाड पोलिस, तहसील विभागाचे अधिकारी व स्थानिक कार्यकर्ते मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्रीच तत्काळ एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमशी संपर्क साधून त्यांना पाचारण करण्यात आले. मात्र, अंधार असल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. पुरात अडकलेल्या नऊ लोकांनी संगमेश्वर मंदिराचा आसरा घेतला. रात्रभर हे नातलग तब्बल बारा तास उंच सुरक्षित ठिकाणी राहिले. अखेर शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नाशिकहून रात्रीच दाखल झालेल्या एनडीआरएफच्या टीमने रेस्क्यू अभियान राबहवत अडकलेल्या नऊ लोकांची सुखरूप सुटका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकेश्वरमध्ये बॅग लिफ्टिंग

0
0

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथे चोरांनी पर्वणी साधली असून, एका साधूची २ लाख २० हजार रुपयांची बॅग उभ्या असलेल्या कारमधून पळवून नेली. दुसऱ्या घटनेत येथील हॉटेलमध्ये बसलेल्या हरियाणाच्या पत्रकाराचे सुमारे २ लाख ६० हजार रुपये किमतीचा कॅमेरा असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

त्र्यंबकेश्वर शहरातील बसस्थानकाजवळ नगरपालिका अमृतकुंभ अतिथी निवासाच्या बाजूस सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास फॉर्च्यनर कार उभी करून दरवाजा लॉक न करता साधू महाराज इमारतीत घुसले. परतल्यावर गाडीच्या शिटावर ठेवलेला बाबाचा झोला म्हणजेच थैली गायब झाली होती. या बॉगेत दोन लाख वीस हजार रोख आणि एक सॅमसंग आणि एक नोकिया असे दोन मोबाइल होते. याबाबत आनंद आखाड्याचे साधू भोलाधनरगि‌री यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तसेच पोलिस सीसीटीव्हीचा आधार घेत तेथे कोण उभे होते याचा तपास करीत आहेत. दुसरी घटना मंदिराच्या समोरच असलेल्या पाटील गल्ली चौकात विल कामत हॉटेलमध्ये घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालधक्कामार्गेचे प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

तिसऱ्या पर्वणीनंतरही परतीच्या भाविकांची रेल्वेस्टेशनवर शनिवारी तुफान गर्दी होती. सायंकाळी सहापर्यंत साठ हजार भाविक रेल्वेने परतले. गर्दी वाढल्याने रेल्वेने प्रवेशाचे मुख्य मार्ग बंद ठेवले. पोलिस उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांनी विनंती करूनही मार्ग खुले केले नाहीत. मालधक्क्याचा अडीच किलोमीटरच्या परेडनंतरच भाविकांना स्थानकात जाता आले. त्यामुळे त्यांनी रेल्वे पोलिसांशी वाद घातले.

पहिल्या पर्वणीसाठी रेल्वेने एक लाख तर दुसऱ्या पर्वणीला दोन लाख भाविक आले होते. तिसऱ्या पर्वणीला पाऊण लाख भाविक आले. अनेकजण परतल्यानंतर शनिवारी नेहमीचे प्रवेश मार्ग रेल्वे खुले करेल, अशी अपेक्षा होती. पोलिस उपायुक्त बनसोडे, सहाय्यक आयुक्त अतुल झेंडे, नाशिकरोडचे निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी बसस्थानकमार्गे भाविकांना प्रवेश देण्याची विनंती अनकेदा केली. मात्र, रेल्वेने ती फेटाळली. खालशांचे भक्त आणि भाविक यांचा प्रचंड ओघ सुरू असल्याने त्यांना मालधक्क्यावर थांबवून गाडी आल्यावरच सोडण्यात येत होते. नेहमीच्या प्रवाशांनाही मालधक्कामार्गेच जावे लागले. खासगी कंपनीतील अधिकारी महिला तर हातघाईवर आली होती. बालकांसमवेत आलेल्या नाशिकरोडच्या कुटुंबानेही वाद घातला. रेल्वेस्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना बसस्थानक पोलिस चौकीच्या मागील बाजूने सोडण्यात आले.

टीसींचा स्थानकातच मुक्काम

नाशिकरोड स्थानकात देशभरातून अडीचशे तिकीट तपासणीस आले आहेत. या टीसींना दुसऱ्या पर्वणीप्रमाणेच आजही प्रचंड गर्दीमुळे स्थानकातच रात्र काढावी लागली. अनेकांनी सोळा तास उभे राहून ड्युटी केली. न थकता भाविकांना मार्गदर्शन केले. अनेकांना जेवणालाही वेळ मिळाला नाही. भाविकांनीही त्यांच्या कामाची प्रशंसा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौरे संपवा; कामाला लागा

0
0

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात अडकलेल्या अधिकाऱ्यांनी आता कोणतीही सबब पुढे न करता दैनंदिन कामांवर लक्ष केंद्रित करावे. सिंहस्थ कुंभमेळ्याक‌‌‌रिता केले जाणारे दौरे बंद करून लागलीच महापालिकेच्या दैनंदिन कामाला लागा, असे आदेश महापौर अशोक मुर्तडक यांनी महासभेत दिले.

तिसऱ्या शाही पर्वणीत दमछाक झालेल्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना शनिवारची महासभा शिक्षेप्रमाणेच ठरणार होती. त्यामुळे महासभा सुरू होताच ती संपवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. महासभेत दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या ११ कामांचा समावेश होता. तसेच, सदस्यांचेही १० विषय होते. मात्र, यावर चर्चा करण्यापेक्षा ते लागलीच मंजूर करण्यात आले.

साधुग्राममधील पोलचा वापर करा

पथदीप आणि बिल्डिंग मेंटनन्ससाठी नवीन साहित्य खरेदी करण्याचा प्रस्ताव विद्युत विभागाने महासभेसमोर आणला. तब्बल ३५ लाख ७५ हजार ५८५ रुपयांचा प्रस्ताव चर्चेला आला असता पूर्व विभागाचे सभापती कुणाल वाघ यांनी स्ट्रीट लाईटबाबत सावळा गोंधळ सुरू असल्याचे सांगितले. पूर्व विभागातील बहुतांश भागात अजूनही अंधार पसरला आहे. याकरिता साधुग्राममध्ये बसवण्यात आलेले पोल काढून ते गरज असेल तिथे शिफ्ट करण्याची मागणी त्यांनी केली. साधुग्राममध्ये प्रत्येकी ३० मीटरवर एक असे १ हजार ३४१ पेक्षा जास्त स्ट्रीटलाईट साधुग्राममध्ये बसवण्यात आले आहेत. वाघ यांनी केलेल्या सूचनेवर तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देत महापौरांनी सभा संपल्याचे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साधूंची परतीची वाट; साधुग्राममध्ये अस्वच्छता

0
0

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

तिसऱ्या शाही पर्वणीची सांगता होताच साधुग्राममधील साधू-महंतांनी परतीची वाट धरली आहे. दिवसभरात अनेक खालशांनी जागा रिकामी केली. यामुळे साधुग्रामचे ​चित्र पालटत असून, तेथील अस्वच्छता ठसठशीतपणे समोर येत आहे.

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यातील तिसऱ्या शाही पर्वणी संपताच साधू-महंत परतू लागले आहेत. साधुग्राममध्ये इतक्या दिवस परिचयाचे असलेले वातावरण अचानक बदलू लागले असून, स्वच्छता विभागही थंड पडल्याचे दिसून आले. साधुग्राममधील अनेक मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे ढिग पडले असून, पावसाच्या माऱ्यामुळे इथे दुर्गंधी पसरली आहे. अजून काही दिवस येथे साधू-महंत मुक्कामी असतील. तसेच कर्मचारीही जात-येत राहतील. अशा परिस्थितीत दुर्गंधीसह कचऱ्यांचे प्रमाण कायम राहिल्यास रोगराई पसरण्याचा धोका वाढू शकतो. साधुग्राममधील कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावून औषध फवारणी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांसह आणखी काही दिवस मुक्कामी असलेल्या साधूंनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोल जाचविरोधात आज बैठक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशभरातील टोलनाके हद्दपार करण्यासाठी वर्षाला तब्बल २८ हजार कोटी रुपये देण्याची तयारी आम्ही दर्शवित असलो तरी केंद्र सरकार टोल नाक्यांच्या पाठिशी असल्याचा गंभीर आरोप ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केला आहे. यासंदर्भात देशभरातील असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी (२० सप्टेंबर) नाशिकमध्ये होत आहे.

वेळ, पैसा आणि इंधन बचतीसाठी देशभरातून टोल उखडून टाकणे आवश्यक आहे. नाशिकहून महिन्याला एक मालवाहतूक वाहन दिल्लीला साधारणपणे तीनदा जाते. मात्र, यापोटी तब्बल ५० हजार रुपयांचा केवळ टोल भरावा लागतो. त्याशिवाय टोलनाक्यांवर जाणारा वेळ आणि इंधनाचा अपव्यय मोठा आहे. त्यामुळे देशातून टोल हद्दपार करणे आवश्यक आहे. यासाठीच आम्ही माहितीच्या अधिकारान्वये केंद्र सरकारकडे विचारणा केली. सरकारला दर महिन्याला टोलसाठी १४ हजार कोटी रुपये अदा करावे लागतात. त्यामुळे या रकमेच्या दुप्पट म्हणजेच २८ हजार कोटी रुपये आम्ही सरकारला दर महिन्याला द्यायला तयार आहोत. सरकारने सर्व टोल हटवावेत, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली. पण, सरकार त्याकडे गांभिर्याने पाहत नाही, असे नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष अंजू सिंघल यांनी सांगितले. देशभरात ९० लाख मालवाहतूक वाहने आहेत. या सर्वांना मोठ्या आर्थिक भुर्दंडाबरोबरच इंधन आणि वेळही अधिक खर्च करावा लागतो. यातूनच देशात ८७ हजार कोटी रुपयांचे डिझेलचे ज्वलन होते. यातून प्रदूषणाचा प्रश्नही निर्माण होतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन सरकारने टोलचा अडथळा हटवायला हवा, असे सिंघल यांनी सांगितले.टोल नाके मुक्तीसाठी एक ऑक्टोबरला देशव्यापी चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिल्लर घ्या; नोटा द्या!

0
0

arvind.jadhav@timesgroup.com

नाशिक : दानापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. त्यातूनच गरजवंताला आपण काही देऊ शकलो, ही भावना सर्वसामान्यांच्या मनात सहज डोकावते. नेमके याचेच गणित आखत देशभरातील किमान पाच हजार भिकारी किंवा त्यांचे कुटुंब सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात दाखल झाले. दुसऱ्या पर्वणीपासून यांची उलाढाल तेजीत असून, सरासरीनुसार याची व्याप्ती किमान लाखापेक्षा जास्त रुपयांपर्यंत पोहचते.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातील साधू-महंत, भाविक गेल्या दोन महिन्यापासून शहरात डेरेदाखल झाले. हिंदू धर्माच्या या वैश्विक सोहळ्याचा एक भाग होता यावे म्हणून अनेकांचा खटाटोप असतो. मग, यात भिकारी तरी कसे मागे राहतील. सिंहस्थ कुंभमेळ्याचे पडघम वाजू लागले तसे देशाच्या कानाकोपऱ्यातील भिकारी शहरात दाखल होऊ लागले. रेल्वेस्टेशन, साधुग्राम, नवीन शाहीमार्ग आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रामकुंड आदी ठिकाणी भिकाऱ्यांचा मुक्काम पडला. विशेष म्हणजे यात काही कुटुंबाचा देखील समावेश आहे.

या कुटुंबातील सर्वच सदस्य दिवसभर फक्त भीक मागणे, एवढेच काम करतात. याबाबत माहिती देताना शांती देवी यांनी सांगितले की, आम्ही बिहारमध्ये राहतो. शेतीमध्ये परवडत नाही म्हणून गाव सोडले. आमच्या कुटुंबात पाच सदस्य असून, सर्व जण दिवसभर हेच काम करतो. आमची अर्थव्यवस्था भाविकांच्या संख्येवर अवलंबून असते. जितके जास्त भाविक तेवढी जास्त कमाई, असे यातील तत्व आहे. कधी कधी कमी गर्दीत चांगली कमाई देखील होते, असे शांतीदेवी यांनी सांगितले. गर्दी काळात १०० पासून २०० रुपयांपर्यंत कमाई होते. एखाद्या वेळी दिवसभरात २५ रुपये सुध्दा मिळत नाही. नाशिकमध्ये दुसऱ्या पर्वणीच्या दोन दिवस अगोदरपासून भाविकांनी गर्दी केली. त्यामुळे रामकुंड आणि साधुग्राममध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात पैशांचे दान दिल्याचे चमरूदास यांनी सांगितले. राज्य राज्य फिरणारे चमरूदास लवकरच उज्जैनचा रस्ता धरणार आहेत.

चिल्लरचा सुळसुळाट

सिंहस्थ कुंभमेळ्याची पर्वणी कॅश करण्यासाठी दाखल झालेल्या जवळपास पाच हजार भिकाऱ्यांनी साधुग्राम, रामकुंडासह रेल्वेस्टेशन आणि इतर भागात आपला डेरा जमावला आहे. सध्या रामकुंडावर भाविकांची रिघ लागली असून, या भिकाऱ्यांकडे दिवसभरात किमान ५० ते जास्तीत जास्त १०० रुपये जमतात. दोन हजार भिकाऱ्यांचे सरासरी ५० रुपयांचे उत्पन्न पकडले तरी दिवसभरात एक लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचे दिसते. ही चिल्लर मग भिकारी स्थानिक दुकानदारांकडे सोपवून तेवढ्या रक्कमेच्या नोटा घेतात. सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे व्यावसायिकांची चिल्लरची कटकट सध्यातरी संपली असे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आली गौराई पाहुणी… तिला निंबलोण करा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आल्या आल्या गौरी... सोन्याच्या पावली... असे म्हणत सुवासिनींनी शनिवारी गौरींचा गृहप्रवेश केला. शहरात ठिकठिकाणी गौरी म्हणजेच महालक्ष्मींची विधीवत स्थापना करण्यात आली.

'महालक्ष्मी कशाच्या पावला वर... सोन्याच्या पावलावर'! अशा जयघोषात या जेष्ठा व कनिष्ठा गौरींचे सोनपावलांनी आगमन झाले. काही घरांमधे मुखवट्यांची तर काही घरांमध्ये उभ्या गौरींची स्थापना करण्यात येते अशी परंपरा आहे. मोठ्या धूमधडाक्यात झालेल्या या गौरींच्या आगमनानिमित्ताने सर्वत्र ढोलताशांचा गजर कानी पडत होता. ग्रामीण भागातही पारंपरिक पध्दतीने गौरींचे स्वागत करण्यात आले. रांगोळ्या, फटाके, ढोल ताशा, भजन, लेझीमच्या तालावर भक्तांनी गौरींना घरी आणले. महिला पारंपरिक वेशभूषांनी नटल्या होत्या. यावेळी हार, फुले, वेणी व गौरीपूजनासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी गर्दी पहावयास मिळाली.

वर्षातून तीन दिवसासाठी माहेरी येणाऱ्या गौरींचे शनिवारी आगमन झाले. अनुराधा नक्षत्रावर या गौरींची स्थापना करण्यात आली. तीन दिवसांसाठी माहेरी आलेल्या या गौराईंच्या पूजेसाठी गृहिणींची लगबग सुरू झाली. आज या गौराईंना पंचपक्वानांचा नैवेद्य दाखविला जाणार आहे. त्यात पुरण पोळी, १६ प्रकारच्या भाज्या असा हा नैवेद्य राहील. महालक्ष्मी स्थापल्यानंतर त्यांचा साजश्रृंगार केला जातो. घरात सजावटदेखील केली जाते. तसेच सायंकाळी परिसरातील सुवासीनींना हळदीकुंकवाचे निमंत्रण दिले जाते. तीन दिवस महालक्ष्मींची मनोभावे पूजा करून नवसदेखील फेडले जातात. अशा गौराईंचे सोन्याच्या पावलांनी आगमन झाले. शहराबरोबरच उपनगरांमध्येही गौराईचा उत्साह पहायला मिळाला. सातपूर, सिडकोमध्येही महिला वर्गाने गौराईंचे वाजतगाजत स्वागत केले. घराघरांतून गाण्यांचे स्वर कानी येत होते. घरोघरी गोड पदार्थ बनविण्यात आले होते.

रामकुंडाचा आकर्षक देखावा

सोनपावलांनी आलेल्या गौरी गणपतीची आरास हा एक आकर्षणाचा विषय असतो. फुलांची सजावट, वेगवेगळ्या डिझाइन्स असल्याने गौरी अधिक आकर्षक दिसतात. मात्र त्यातही काही इनोव्हेटिव्ह असेल तर त्याला आणखीच चार चाँद लागतात. सेजल पार्क, जाणता राजा कॉलनी मखमलाबाद रोड येथील गौरी पांडे या गृहिणीने गौराईंसाठी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रामकुंडाचा हा हुबेहूब देखावा निर्माण केला आहे. गौराई पाहण्यासाठी जे भाविक येतात ते अशा आकर्षक देखाव्यांनी मोहीत होत नसल्यास नवलच!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपात तूर्तास टळली

0
0

म. टा. प्र​तिनिधी, नाशिक

शुक्रवारी झालेल्या दमदार पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला. पावसाचा जोर काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून, २५ सप्टेंबरनंतर पाणी कपातीचा निर्णय घेणार असल्याचे महापौर अशोक मुर्तडक यांनी आज स्पष्ट केले. महापौरांच्या या घोषणेमुळे नाशिक शहरावरील पाणी कपातीचे संकट तूर्तास तरी टळले आहे.

यंदा जिल्ह्यात पावसाने ओढ दिली. त्र्यंबकेश्वरसह घोटी-इगतपुरी या धरणांच्या तालुक्यात सुध्दा पावसाने पाठ फिरवली. यामुळे शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समुहात मुबलक पाणी जमा झाले नाही. याचदरम्यान सिंहस्थ कुंभमेळा सुरू झाला. एकीकडे ऊन आणि दुसरीकडे पाण्याची वाढलेली मागणी यामुळे धरणातून पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला. या बिकट परिस्थितीशी सामना करण्यासाठी पाणीकपात महत्त्वाची असल्याचे स्पष्ट करीत स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी मागील आठवड्यात तशी घोषणाही करून टाकली. सभापतींच्या निर्णयानुसार २० सप्टेंबरपासून शहरात एकवेळ पाणी पुरवठा होणार होता. मात्र, शुक्रवारी शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. गंगापूर धरणात सुध्दा ४ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला. पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाणीकपातीचा निर्णय २५ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचे महापौर मुर्तडक यांनी जाहीर केले. २५ सप्टेंबरपर्यंत पावसाची काय परिस्थिती असेल यावर बैठकीत चर्चा करून मगच आपला निर्णय जाहिर करू असेही मुर्तडक यांनी स्पष्ट केले. आजमितीस गंगापूर धरणात ६६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

शह-काटशह देण्याचा प्रयत्न

पाणीकपातीसारख्या महत्वपूर्ण विषयावर सत्ताधारी राजकारण करीत असल्याचा आरोप महापालिका वर्तुळात होतो आहे. पाणीकपातीचा निर्णय साधारणतः महापौरच जाहीर करतात. मात्र, शिवाजी चुंभळे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत तो परस्पर घेऊन टाकला. विशेष म्हणजे याबाबत राष्ट्रवादीच्या नगरसेविका नीलिमा आमले यांनी लेखी पत्र दिले होते. आता, महापौरांनी हा निर्णय मागे घेत असल्याचे स्पष्ट करीत सत्तेत सहभागी झालेल्या मित्रपक्षावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पाणी गळती, पाणी चोरी रोखून पाण्याचे काटकसरीने नियोजन करण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांनी पार पाडावी, असे मत सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणसाठ्यात भर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जिल्ह्यात उत्तरा नक्षत्रातील पाऊस धो-धो बरसल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यातील २३ धरणांमध्ये ४२ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील हा साठा ७७ टक्के होता. त्यामुळे धरणक्षेत्रांना अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, शनिवारी शहरात आणि जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. मात्र पावसाचा जोर ओसरल्याचे पहावयास मिळाले.

गत वर्ष अखेरीस अवकाळी आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. हातची पिके डोळ्यांदेखत मातीत गेली. एकीकडे हंगाम नसताना धुडगूस घालणारा पाऊस ऐन हंगामात गायब झाल्याचा अनुभव बळीराजा घेत आहे. गेल्या तीन महिन्यांत मृगापाठोपाठ आद्रा नक्षत्रानेही हुलकावणी दिली. पुनर्वसू नक्षत्राने जिल्हाभर हजेरी लावून बळीराजाला दिलासा दिला. त्यावेळी जिल्ह्यातील २३ धरणांमध्ये केवळ १७ टक्के पाणीसाठा होता. पुढे तो २३ टक्क्यांवर गेला. जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्यात आला. मात्र तोही अपयशी ठरला. पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्याला दुष्काळी जाहीर करावे, अशी मागणी जोर धरू लागली असताना गुरूवारी मध्यरात्री उत्तरा नक्षत्रातील पावसाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी दिवसभर पाऊस बरसल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली आहे.

उत्तरा नक्षत्रामुळे धरणांमधील पाणीसाठयात तब्बल १० टक्के वाढ झाली. शुक्रवारी सकाळपर्यंत धरणांमध्ये ३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. शुक्रवारी दिवसभरात कधी संततधार तर कधी मुसळधार सुरू होती. त्यामुळे एक दीड दिवसातच धरणांमधील पाणीसाठ्यात १० टक्के एवढी वाढ झाली आहे.

पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणांमधील पाणी पातळीत झपाट्याने वाढली आहे. कळवण तालुक्यात सर्वाधिक १४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल इगतपुरीत १२६ मि.मी, सुरगाण्यात १५१ मि.मी, निफाड, दिंडोरी आणि पेठमध्ये ९७ मि. मी पावसाची नोंद झाली आहे.

पाणीकपात तूर्तास टळली

शुक्रवारी झालेल्या दमदार पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला. पावसाचा जोर काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून, २५ सप्टेंबरनंतर पाणी कपातीचा निर्णय घेणार असल्याचे महापौर अशोक मुर्तडक यांनी आज स्पष्ट केले. महापौरांच्या या घोषणेमुळे नाशिक शहरावरील पाणी कपातीचे संकट तूर्तास तरी टळले आहे.

गंगापूर ६३ वरून ६७ टक्क्यांवर

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा ६३ वरून ६७ टक्क्यांवर पोहोचला आहे. कश्यपी धरणात ४९, गौतमी गोदावरीत ४७, पालखेड ८६, करंजवणमध्ये ३३, वाघाड ५२, ओझरखेड २७, पुणेगाव ३७, तिसगाव ४०, दारणा ६९, भावली ९७, मुकणे ३१, वालदेवी ६७, कडवा ७९, आळंदी ५७, भोजापूर १८, चणकापूर ८३, पुनद ७२, हरणबारी ९०, गिरणामध्ये फक्त चारच टक्के पाणीसाठा आहे. तर गिरणा खोऱ्यातील चरकापूर, पुनद, हरणबारी आणि केळझर या धरण क्षेत्रांमध्ये शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस पडला. त्यामुळे तेथील पाणी साठ्यामध्ये एकाच दिवसात कमालीची वाढ झाली आहे. या चार धरणांमध्ये सरासरी २२ ते ४७ टक्के एवढी मोठी वाढ झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांची तारांबळ

0
0



प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

आम्ही जातो आमच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, अशी काहीशी भावना मनात बाळगत पुन्हा १२ वर्षाने येणे किंवा नाही हे त्या परमेश्वराच्या हाती असे म्हणत सिंहस्थातील तिसऱ्या व अखेरच्या शाही पर्वणीच्या निमित्ताने नाशिकरोड येथील रेल्वे स्थानकातून परतणाऱ्या भाविकांनी सांगितले.

सर्वच व्यवस्था शासनाने चोख केली तर काहींनी मनातील नाराजीचा स्वर आपापल्या गावी जाताना आळवला. रेल्वेने परतणाऱ्या भाविकांना पुन्हा एकदा बॅरिके‌डिंगचा सामना करावा लागला. मालधक्का मार्गानेच प्रवेश देण्यात आल्याने भाविकांची पायपीट झाली. रेल्वेच्या चारही प्लॅटफॉर्मवर भाविकांची गर्दी दिसून येत होती. शनिवारी रात्री ८ वाजेनंतर पाऊस थांबल्यावर गर्दीचे लोंढे नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या दिशेने येत होते. रात्रीपासून र‌विवारी सायंकाळपर्यंत सुमारे लाखभर भाविकांनी रेल्वेने परतीचा प्रवास केला.

निवारा शेडमध्येच स्वयंपाक

रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपाच्या उभारलेल्या निवारा शेडमध्ये अनेक संन्यासीजणांनी तीन दगडाची चूल मांडत तेथेच आपल्या भोजनाची व्यवस्था केली. अनेक साधू-संन्याशांनी चिलीम ओढण्याचा कार्यक्रम आटोपून घेत पुढील प्रवास सुरू केला.

बॅरिके‌डिंगमुळे हुज्जत

पर्वणीवरून परतणाऱ्या भाविकांसाठी उभारलेल्या बॅरिकेडिंगमुळे नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशी तथा पासधारकांची रेल्वेसुरक्षा जवानांशी चांगलीच हुज्जत पहायला मिळत होती. नागरिकांनी तरी सहकार्य करावे, अशी आळवणी जवान करीत होते.

पेशंटला मिळेना अॅम्ब्युलन्स

रांगेतून जात असताना एका साध्वीला अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने सुमारे तासभर झाला तरी एकही रेल्वे पोलिस किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याचे त्याकडे लक्ष गेले नाही. अॅम्ब्युलन्सच्या शोधात फिरणाऱ्या साध्वीच्या सहकार्याच्या मदतीने तासभराने मग रेल्वेस्थानकात तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या दवाखान्यात हलविण्यात आले.

तक्षशिला विद्यालयाचा आसरा

रेल्वे प्रशासनाने केलेली पायपीट अन् त्यात पायी फिरून थकलेल्या अनेक महिलांनी तक्षशिला विद्यालयाच्या आसऱ्याला आपल्या गाठोडीत असलेली भाजी भाकर सोडीत तेथेच खाण्यास आरंभ केला.

प्रवाशांचे हाल

रेल्वे प्रशासनाने बसस्थानकाच्या बाहेरील बाजूस केलेल्या बॅरिकेडिंगमुळे प्रवाशांना बाहेर पडणे कठीण झाले होते. अनेकांना बाहेर जाण्याचा मार्गही सापडत नव्हता. सर्वच प्रवाशांना सिन्नर फाट्याकडे असणाऱ्या बसस्थानकाकडे जाण्यास सांगण्यात येत होते. त्यामुळे नाशिकरोड किंवा शहराच्या इतर भागात जाणाऱ्या प्रवाशांचा गोंधळ निर्माण झाला. त्यातच बसस्थानकाच्या दिशेने बाहेर येणाऱ्या प्रवाशांना टॅक्सी व रिक्षा मिळणे कठीण झाले होते.

अब कब आना होगा, नही होगा, पता नही लेकीन, जीवनमे यह कुंभ हमेशा याद रहेगा.

- लल्लनसिंग राठोड, मध्यप्रदेश

नासिक के रिक्षावालोने हमे बहुत अच्छा सफर करवाया. जिसके भरोसे हमें सुरक्षित सफर और सफल हुवा.

- छोटूलाल मिश्रा, बिहार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगलेला धर्मसंवाद

0
0

अशांत किरकिरकर

मध्यंतरी एका भल्या मोठ्या ज्योतिष्याने सांगितलेले एक वाक्य राहून राहून आज अशांतच्या मनात रूंजी घालत होते. ते वाक्य होते की 'कुंभमेळा वर्षभर चालतो.' मग आता तिसरी पर्वणी संपल्यावर सर्वजण हुश्श करीत 'संपला एकदाचा कुंभमेळा' असे का म्हणताहेत हेच त्याला कळेना. कुंभमेळा हा तर वर्षभर चालणारा उत्सव असे अनेकदा त्याच्या ऐकण्यात आले. या शंकेचे निरसन करण्यासाठी तो गंगेकडे निघाला. गंगेवर आल्यानंतर त्याला भासले की युग आते जाते है गंगा निर्मम है.

कुंभमेळ्यासारखा अखंड उत्सव अक्षरश: पचवून गंगा निर्मम आहे. पाणी शांतपणे वाहते आहे, पुन्हा एकदा तिच्या काठावर काही साधू, काही भिकारी वस्तीला आले आहेत. एकमेकांमध्ये काही विषयांवर चर्चा करीत आहेत. असेच एक संन्यासी व एक भिकारी त्याला चर्चा करताना दिसले. दोघांचा विषय होता कुंभमेळ्यात तू काय कमावले? साधू तावातावाने भिकाऱ्याला सांगत होता की 'आम्ही किती श्रेष्ठ. अमृतकुंभ जेव्हा गंगेच्या पाण्यात कलला होता त्याचघडीला आम्ही गंगेत स्नान केले. कुंभमेळ्याच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत शासनाला कसे खोळंबून ठेवले. पालकमंत्री, कलेक्टर, आयुक्त कसे नाक घासत आमच्याकडे आले व आमच्या विनवण्या करून आम्हाला स्नानाला घेऊन गेले. आताही पुढील कुंभमेळ्याचे आमंत्रण देण्यासाठी स्वत: मंत्री शिवराजसिंह आमच्यासाठी येथे आलेल आहेत. बघ, आमची किती दहशत आहे. संन्याशाने म्हणणे शांतपणे ऐकल्यावर तो म्हणाला, 'आमची तर प्रशासनाने चांगलीच पंचाईत करून टाकली. कुंभमेळा सुरू होण्याआधीच आम्हाला भूमिहीन करून टाकले. आम्ही चिडून जाऊन विचारलेही की आम्हाला रामकुंडावर का येऊ देत नाही, ही आमची नेहमीची जागा आहे. तर तिथे आमच्यापेक्षा मोठे कर्मदरिद्री आलेले आहेत असे एका वैतागलेल्या पोलिसाने आम्हाला सांगितले. त्याच्या बोलण्याचा अर्थ आम्हाला कळलेला नव्हता आता तू सांगत आहेस तर मला या सर्वांचा उलगडा होत आहे. तुम्ही सगळे तिथे आलेले होता तर. पण, तुम्हाला अशी एकदम काय आठवण येते बारा वर्षांतून की तुम्ही एकमेकांना मारायला उठतात. का तुम्हाला इतक्या वर्षांतून आमच्या गंगेची आठवण येते, आम्हाला काही काळाकरिता का होईना बेघर करतात?' भिकाऱ्याचा त्रागा साधूच्या लक्षात आला होता पण, तो बोलता बोलता आपल्याला मोठे भिकारी म्हणाल्याचेही त्याच्या श्रवणातून सुटलेले नव्हते म्हणून तो भांडण्याच्या स्वरात भिकाऱ्याला म्हणाला की, तू आम्हाला भिकारी म्हणतोस. अरे आम्ही तर खरे राजे. तू बघितले नाहीस का आम्ही कलेक्टरला आमच्या बोटावर कसे नाचवले? अजूनही आमचाच रूबाब चालतोे. यानंतर भिकाऱ्याने त्याला विचारले की, तुम्ही अंघोळी करून काय कमावले?' साधू म्हणाला, 'पुण्य' त्याचे उत्तर ऐकून भिकारी खदाखदा हसायला लागला. म्हणाला, बदामाचा शिरा खाऊन, प्रशासनावर रूबाब गाजवून, सोन्यासारख्या माणसांना भिकेला लावून तुम्ही काय पुण्य साधण्याच्या गप्पा मारत आहात. आम्हाला विचारा पुण्य-बिण्य काही नसते, येथे एकवेळच्या जेवणाची भ्रांत आम्हाला पडते. त्यामुळे सांगतो, शेंडी असावी आणि नसावी यासाठी हजार ग्रंथ अशी दीर्घ परंपरा असलेला आपला धर्म आहे. तो अशा दोन-चार दिवसात आणि ते ही तुमच्यासारख्यांना कळणे अवघड आहे. त्यामुळे पाप-पुण्याचा हिशेब काढत बसणे मुश्किल आहे. आमच्यासारख्या दोन जणांच्या मुखी एखादा घास पडू द्या. सुखाने या, सुखाने गंगेच्या पाया पडा व सुखाने पुन्हा घरी जा. इतकेच काय ते आमचे म्हणणे आहे. तुमच्या सरबराईच्या नादात आमच्यासारख्यांची ससेहोलपट करू नका. ते खरे पुण्य. भिकाऱ्याच्या या प्रचंड आत्मतत्त्वज्ञानावर आता आपण काय बोलावे असे त्या साधूला होऊन गेले. त्यामुळे काही न बोलता आपली छाटी धुण्यासठी म्हणून तो गंगेकडे जाऊ लागला तर भिकाऱ्याने त्याला थांबवले व सुनावले 'आधीच आमची गंगा खूप मैली केलीय तुम्ही या दोन महिन्यात आता आणखी करू नका, उपकार करा आमच्यावर, निघा' भिकाऱ्याचा तो रूद्रावतार पाहून साधू काही क्षण चपापला व यशवंतराव देवमामलेदार मंदिराच्या बाजूने पुढे निघून गेला. कुंभ वर्षभर की साधूंचे स्नान होईपर्यंतच, या प्रश्नाच्या उत्तरापेक्षाही मोठे काहीतरी अशांतला हाती लागले होते. त्यामुळे तो आणखी कुणाशी बोलण्याच्या भानगडीत न पडता मागे फिरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवसारी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्युला कवटाळण्याच्या घटना थांबायला तयार नसून, मनमाडपासून काही अंतरावर असणाऱ्या नवसारी या गावातील शेतकऱ्याने शेतात पीक येत नाही म्हणून स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. या प्रकरणी मनमाड शहर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला आहे. मनमाडनजीक आणि नांदगाव तालुक्यातील नवसारी येथील बबन नामदेव आहिरे (वय ३५) या शेतकऱ्याने दुष्काळ असल्याने शेतीत पीक येणे अवघड झाल्याने निराश होऊन शेतातील राहत्या घरात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीप्रश्न तूर्त सुटला

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरासह तालुक्यात गत दोन दिवसात पावसाने झोडपून काढले असून, खरिपासह रब्बी पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यात सुमारे ६५ मि. मी पाऊस झाला आहे. तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणे भरण्याच्या मार्गावर असून, दोन पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. सटाणा शहराचा पाणीप्रश्न तूर्त सुटला आहे.

बागलाण तालुक्यात गत तीन महिन्यात अवघ्या ४५ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती. मात्र, अवघ्या २४ तासांत सुमारे ६५ मि. मी. इतका मुसळधार पावसाने तालुक्यातील संपूर्ण चित्र पालटून टाकले आहे. तालुक्यातील हरणबारी धरण ९० टक्के भरले असून, केळझर धरण ८० टक्के भरले आहे.

पठावे व दसाणे ही पाझर तलाव १०० टक्के भरले आहेत. शेमळी व तळवाडे भामेर लघु प्रकल्प अद्यापही कोरडीच असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांचा शेती सिंचनाचा प्रश्न कायम आहे.

सटाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा व आरम नदीपात्र दुथडी भरून वाहू लागल्याने तसेच, चणकापूर व पुनद धरणे ओव्हरप्लो झाल्याने सटाणा शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्त सुटला आहे. सटाणा शहरातील आरम नदीला गेल्या अनेक वर्षांत पाणी आल्याने शहरवासीयांनी नदीकिनारी धाव घेऊन एकच गर्दी केली होती.

मंडलनिहाय पाऊस

सटाणा ७८ मि.मी., ब्राह्मणगाव ३३ मि. मी., डांगसौदाणे ५४.३ मि. मी., मुल्हेर ५७ मि. मी., ताहाराबाद ५८.७ मि. मी., जायखेडा ४३. मि. मी., वीरगाव ७२.७ मि. मी., नामपूर २९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू असल्याने पावसाच्या सरासरीत वाढ होणार आहे.

देवनदी झाली प्रवाहीत

सिन्नर : सिन्नर तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण समजली जाणारी देवनदी दोन दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे दुष्काळाच्या गर्तेत सापडलेले सिन्नरकर सुखावले असून, तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचल्यास पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एकाच दिवसात सुमारे १२५ मि. मी. पावसाची नोंद करून वरुणराजाने सिन्नरकरांवर बरसात केली. बोरखिंड, उंबरदरी, कोनांबे ही धरणे भरल्याने पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने भोजापूर धरणात मोठा पाणी साठा वाढत आहे. तसेच कोनांबे धरण भरल्याने देवनदीला पाणी वाहू लागल्याने हे पाणी सिन्नरच्या पुढे गेले असून, कुंदेवाडी, मुसळगाव, खोपडी येथील बंधारे भरून हे पाणी पुढे सरकत आहे. या नदीवर ३२ ब्रिटीशकालीन बंधारे आहेत. हे बंधारे भरल्यास तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची तहान भागणार आहे. या पावसामुळे सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाणी अडवण्यासाठी करा सहकार्य

मनमाड : सर्व गणेशमंडळांनी पाणी अडवा पाणी जिरवा या अभियानात आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन मनमाड बचाव कृती समितीतर्फे करण्यात आले आहे. पाणीटंचाईने गेल्या अनेक दशकांपासून मनमाड शहराला त्रासून सोडले आहे. मनमाड बचाव कृती समितीने पाणी अडवा, पाणी जिरवा या माध्यमातून के. आर. टी. विद्यालयाजवळील बंधारा दुरुस्त केला. तसेच लॉयन्स क्लब ऑफ मनमाड प्राइडने बंधारा उपलब्ध करून दिला आहे. पुढील काळात रामगुळना नदीवर बंधारा बांधणे, बुधलवाडी ते बुरकुलवाडीदरम्यान सात बंधारे उभारणे हे प्रकल्प समिती हाती घेणार आहे. गणेशोत्सव खर्चाला फाटा देऊन गणेश मंडळांनी पाणी अडवा पाणी जिरवा अभियानाला आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन अशोक परदेशी, राजकमल पांडे, भीमराज लोखंडे, नरेंद्र कांबळे आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोकाट कुत्र्यांची दहशत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वृंदावन नगर परिसरात काही दिवसांपासून अनेक मोकाट कुत्रे धुमाकूळ घालत आहेत. या कुत्र्यांमध्येच काही कुत्र्यांच्या अंगावर जखमा झालेली असून त्यापैकी काही कुत्री पिसाळलेली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ही कुत्री रात्रंदिवस परिसरात भटकत असल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे.

आनंद नगर व विठ्ठल नगर भागातही कुत्र्यांची दहशत माजली आहे. येथील काही लहान मुलांना कुत्र्याने चावा घेतल्याने घरातून बाहेर निघावे की नाही असे वातावरण तयार झाले आहे. या परिसरात भटकणारी कुत्री माणसाबरोबरच पाळीव जनावरांवरही हल्ला करतात. त्यामुळे पूर्वी या ठिकाणी चरण्यासाठी येणाऱ्या गायी आता शेतकरी दावणीला बांधून ठेवत आहेत. परिसरात मॉर्निंग वॉकसाठी पुरूष व महिला वर्ग जास्त असतो, पहाटेच्या वेळी भटके कुत्रे घोळक्याने फिरत असल्याने ते लोकांच्या अंगावर धावून येतात. तर कधी हे कुत्रे गाडी आली की हे गाडीचा पाठलाग करतात सुटतात. यामध्ये अनेक अपघातही झाले आहेत. आयटीआय सिग्नल, खुटवडनगर, वावरे नगर येथे कुत्र्यांच्या टोळ्या निर्माण झालेल्या आहेत. येथे किमान तीस ते चाळीसहून अधिक भटकी कुत्री आहेत. या भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरण करण्याची उपाययोजना करावी, जेणे करून या भटक्या कुत्र्यांची पैदास थांबेल. तसेच या पिसाट कुत्र्यांचा महापा‌लिकेने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड प्रेसमध्ये पीपीओचे वितरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

नाशिकरोड प्रेसमधील कम्बाईन पेन्शन धारकांना पेन्शन पेमेंट आर्डर (पीपीओ) बुकचे वितरण नुकतेच मजदूर संघाच्या हॉलमध्ये करण्यात आले. सात वर्षाच्या प्रतिक्षेनंतर कर्मचाऱ्यांना हे पुस्तक मिळाले आहे.

यावेळी मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष माधवराव लहांगे, सुनील आहिरे, नंदू पाळदे, स्टाफ युनियनचे संदीप बिश्वास, आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रो राटा पेन्शन धारकांना पीपीओ बुक मिळाले व पेन्शन सुरु देखील झाली. १ नोव्हेंबर २००८ पासून निवृत्त कम्बाईन पेन्शनधारकांना पेन्शन मिळण्यास सुरवात झाली. परंतु, त्यांना पेन्शनचे लिगल डाक्युमेंट, पीपीओ बुक आजपर्यंत मिळाले नव्हते. जगदीश गोडसे यांची कम्बाईन पेन्शन ट्रस्टवर निवड झाल्यावर त्यांनी पीपीओ बुकप्रश्नी आवाज उठवला तसेच पेन्शन देण्यास ट्रस्ट सक्षम करण्यासाठी प्रयत्न करून कंपनीला दरवर्षी ट्रस्टमध्ये निधी टाकण्यास भाग पाडले. पीपीओ बुक वितरण कार्यक्रमाला इरफान शेख, उत्तम रकिबे, ज्ञानेश्वर गायकवाड, दीपक दिंडे, संपत घुगे, चंद्रकांत हिंगमिरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासिकाप्रश्नी आक्रमक

0
0

म. टा. प्रतिनिधी, देवळाली कॅम्प

'वाचनाने मस्तक सुधारत अन् सुधारलेल मस्तक कोणाचेही हस्तक होत नाही,' असा बाबासाहेबांनी सांगितलेला मंत्र आचरणात आणण्यासाठी व झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्याकरिता देवळालीच्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सार्वजनिक वाचनालयाच्या अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसह वाचकांनीही बंडाचा पवित्रा घेतला. प्रशासनाला जाब विचारण्यासाठी थेट कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कार्यालयाला धडक दिली अन् आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. त्यांनीही या समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.

गेल्या पंचवार्षिक काळात नगरसेवक राहिलेल्या आणि आता विद्यमान बोर्डचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी त्यांच्या निधीतून ५० लाख रुपये खर्चून अभ्यासिका व ग्रंथालय उभारले. मात्र, तेथे सुविधांचा अभाव होता. वाचनालय व अभ्यासिकेत आवश्यक असणारे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तके, नियमित स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, येथील असलेल्या लोखंडी खुर्ची बदलून प्लॅस्टिक खुर्ची, सीसीटीव्ही कॅमेरे अशा विविध सोयी तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी निवेदनद्वारे मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या ज्ञानप्राप्तीची तळमळ लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांनी सांगितले, की या सर्व समस्या १ महिन्यात प्राधान्यक्रमाने सोडविल्या जातील. निवेदन सादर करतेवेळी विद्यार्थ्यांसमवेत 'रिपाइं'चे माजी शहराध्यक्ष आर. डी. जाधव,चंद्रकांत गोडसे, रिपाइं शहराध्यक्ष गौतम भालेराव यांसह नरेंद्र मोरे, शैलेश धुरिया, सुहास बोरोले, पंडित साळवे, ज्ञानेश्वर शिंदे, किरण मोजाड, समाधान टोचे, बापू खंडागळे, मोहिनी ठोकळ, राधिका मोरे, आश्विनी गायकवाड, कीर्ती गिते, ज्योती पाटोळे, प्रिया कापसे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

नगरसेवकांचे दुर्लक्ष

आपल्याच परिसरातील विद्यार्थी निवेदन देण्यास आलेले पाहून कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या कार्यालयात बसलेले काही नगरसेवकांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्यांची त्यांना जाण असून देखील उदासिन असलेल्या या लोक‌प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या समोर देखील जाण्याचे टाळल्याचा आरोप युवासेना शहरप्रमुख प्रमोद मोजाड यांनी केला आहे.

परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देवळाली कॅम्प सोडून नाशिकरोड येथील महापालिका अभ्यासिकेत जावे लागत आहे. खासदार हेमंत गोडसे व आमदार योगेश घोलप यांनी स्थानिक विकास निधीतून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके उपलब्ध करून द्यावी.

- राहुल बोराडे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर नाशिकला पहिल्या गाडीनं येवू!

0
0

Prashant.desale@timesgroup.com

गत कुंभमेळ्याचा अनुभवावरून हा कुंभमेळा कसा पार पडतो, याबाबत प्रशासनासह सर्वसामान्यांच्या मनातही एक अनामिक भीती होती. सुदैवानं तसं काही घडलं नाही. मात्र यात पोलिस प्रशासनाने जी कामगिरी निभावली ती खरंच कौतुकास पात्र आहे. ज्या अधिकाऱ्यांनी गत कुंभमेळ्यात कामकाज पाहिले होते अशांना अवार्जून बोलाविण्यात आले. मात्र या कुंभमेळ्यात असेही काही नवखे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी होते, की ज्यांनी आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली. महिला पोलिसांचे योगदान तर अधिक महत्त्वाचे ठरले. पोलिस खात्यात रुजू होवून वर्ष होत नाही तोच नागपूर आणि खंडाळा पीटीसीतून नाशिकला बंदोबस्ताला जाणं हे या पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं.

सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, येथून शेकडो तरुण महिला पोलिस नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दोन महिन्यांपासून बंदोबस्तासाठी आल्या होत्या. सीटी सेंटर मॉल समोरील लक्षिका हॉलमध्ये यांचे वास्तव होतं. आयुष्यातला पहिलाच बंदोबस्त. मात्र, न डगमगता त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. पर्यटक, भाविकांना वेळेवर मदत केली, अंध-अपंगांना सहाय्य केलं. वेळेवर अनेकांना चांगलाच इंगाही दाखविला.

तिसरी पर्वणी होताच त्यांच्यातील अर्धा फौजफाटा रवाना होण्याच्या तयारीत होता. सामानाची आवराआवर, बॅगा भरणं, एकमेकांना भेटणं, निरोप घेणं हे सगळे सोपस्कार आटपून वाशिमला बंदोबस्तासाठी या रणरागिणी निघाल्या. यातल्या काहींना नाशिकचा बंदोबस्तातला अनुभव आणि इथली दिलखुलास लोकं खूप आवडली. माधुरी, कुंभार, स्नेहल कुंभार, शोभाताई कोळी, प्रियांका वाघमारे, दिपाली नागरगोजे या सगळ्या वाशिमकडे रवाना होत होत्या. आपापल्या बॅग घेवून हॉलच्या गेटजवळ पोलिस व्हॅनची वाट पाहत होत्या. अनेकांचे डोळे पानावले होते, काही सकाळी, काही दुपारी तर काही त्र्यंबकची पर्वणी आटोपल्यावर निघणार असल्याने त्या सगळ्याच थोड्या गहिवरल्या.

माधुरी आणि स्नेहल यांचा तिसऱ्या पर्वणीतला अनुभव खूपच हृदयस्पशी होता. माधुरी म्हटल्या, 'तिसऱ्या पर्वणीला आम्ही दिल्ली दरवाजाजवळ बंदोबस्तात होतो. पावसाचा जोर वाढला होता. पावसात पूर्ण भिजलो. पण काय करणार? ड्युटी असल्याने पावसात थांबलो. जवळच्या घरातून आवाज आला, 'अहो मॅडम, या घरात' त्यांचा आवाज ऐकून जीवात जीव आला, खरं सांगायचं तर घराची आठवण झाली. त्या स्थानिक नागरिकांनी आम्हाला चहा-नाश्ता दिला. आमची विचारपूस केली, खूप बरं वाटलं, नाहीतर आजकाल पोलिस म्हटलं की सगळे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात, त्यात आम्ही मुली. पण त्यांनी आमचं थोड्याच वेळात चांगलचं आदरातिथ्य केलं. आजकाल कोण करतं हो एवढं?' त्या थांबत नाही तोच माधुरी कुंभार म्हटल्या, 'खरं सांगायचं तर, आम्ही डिपार्टमेंटमध्ये नवख्या. अजून ट्रेनिंगही पूर्ण झालं नाही. पण तरी इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं. दीड महिन्यापासून इकडे असल्यामुळे घरीही जाता आलं नाही. सांगलीहून भावालाही रक्षाबंधनासाठी यायला जमलं नाही. शेवटी पॉईंटवर आमच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनाच राखी बांधली. त्यामुळे आता नाशिकशी आमचं नातं जुळलं आहे. इथले लोक खूपच शांत आणि केअरिंग आहेत.'

शेवटी वाशिमकडे जाणाऱ्या व्हॅनमध्ये बसतांना या सगळ्यांनी एकच सांगितलं, 'या दोन महिन्यात इथं खूप प्रेम मिळालं, नवीन शिकयाला मिळालं, त्यामुळे भविष्यात कधी संधी भेटली, नाशिकला बंदोबस्तासाठी येण्याची, तर आम्ही पहिल्या गाडीनं येवू...'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश मंडप उभारतांना नियम पायदळी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक उत्सवप्रसंगी रस्त्यांवर अथवा सार्वजनिक ठिकाणी मंडप, कमान उभारणीसंबंधीची नियमावली तयार करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र नाशिक महापालिकेने या नियमावलीकडे दुर्लक्ष केले असून अनेक गणेश मंडळांनी थेट भर रस्त्यांवर मंडप उभारणी केली आहे. त्यामुळे न्यायालयासह राज्य सरकारच्या निर्देशाकडेही महापालिकेन दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.

उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका जनहित याचिकेनुसार न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्यासंबंधी परवानगी देण्यासाठी कार्यपद्धती निश्‍चित करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार, राज्य सरकारने सर्व महापालिकांना नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिक महापालिका प्रशासनाने एक नियमावली तयार केली असून, रस्त्यांवर मंडप उभारताना खड्डे खोदल्यास प्रति खड्डा ५० हजार रुपये दंडाची तरतूद करणारा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेवर गेल्या आठवड्यात ठेवण्यात आला होता. गणेशोत्सव असल्याने या महासभेत चर्चा होवून नियमावली ठरणे अपेक्षित होते. मात्र, सदस्यांना वेळ नसल्याने या बैठकीत चर्चा झाली नाही. याबाबत सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेऊन नियमावलीबाबत निर्णय घेण्याचे महापौरांनी जाहीर केले होते. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असल्याने या नियमावलीची अत्यंत आवश्यकता होती. तिसऱ्या पर्वणीपूर्वीच गणरायाचे आगमन होणार होते. त्यामुळे ही नियमावली तयार झाली असती तर पोलिसांना कारवाईचे अधिकार मिळाले असते.

रस्त्यावरील गणेश मंडळाचे अतिक्रमण थांबले असते. मात्र, तसे झाले नाही. ही नियमावली अस्तित्वात आली नाही. त्यामुळे शहरात सर्वत्र मंडळानी रस्त्यांवरच अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीलाही त्याचा अडथळा होत आहे.

गटनेत्यांचा बैठकीला खो

महासभा झाल्यानंतर एक दोन दिवसात ही बैठक महापौरांनी बैठक घेणे अपेक्षित होते. मात्र, महापौरांनी ही बैठक घेतली नाही. सिंहस्थाचे कारण देत, ही बैठक टाळण्यात आली होती. मात्र ही नियमावली ठरवली नाही म्हणून कोणी न्यायालयात धाव घेतल्यास महापालिकेलाच त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. उच्च न्यायालय, राज्य सरकारने निर्देश देवूनही नियमावली तयार करण्यास टाळाटाळ केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images